माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

बंगलोरच्या आठवणी!भाग२

आयटीआय मध्ये आमचा नित्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी आम्ही वसतिगृहात जाऊन अंघोळी उरकून कामावर रुजू होईपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. तिथल्या जेवणावळीत जेवायला गेलो आणि थक्कच झालो. एका वेळी जवळ ५००-६०० माणसे जेवायला बसली होती(कदाचित जास्तच असतील पण कमी नाही). लग्नाच्या पंगतीत देखिल एव्हढी माणसे एकाच वेळी जेवायला बसलेली मी तरी पाहिलेली नाहीत. पण जेवण मात्र साधेच होते. ढीगभर भात,त्यावर रस्सम की सारम काय जे असेल ते,लोणचे,पापड,४-५कडकडीत पुर्‍या(मैद्याच्या)आणि सागु(ते लोक भाजीला 'सागु' म्हणतात असे कळले. ते सगळे बघून माझा तर जेवणातला रसच निघून गेला. तरी देखिल दुसरा पर्याय नसल्यामुळे कसेबसे दोन घास खाल्ले,हात धुतले आणि शांतपणे तिथेच बसून राहिलो.
अहो,का म्हणून काय विचारता? प्रतोदने चांगलाच आडवा हात मारला होता त्या भाताच्या ढिगावर. भात एकदाच वाढला होता आणि ते पातळसर कालवण मात्र हवे तेव्हढे वाढत होते.
त्याचे(प्रतोदचे) नुसते दोन दोन मिनिटानी .... "हां.वाढा,वाढा!" म्हणून गरजणे चालले होते. ते वाढपी सुद्धा जरा आश्चर्याने बघायला लागले हा कोण एव्हढा प्राणी आहे ज्याला आमचे कालवण खूपच आवडलेले दिसतेय म्हणून! त्यापैकी एकाने त्याला विचारले सुद्धा (कानडीत) आणि आश्चर्य म्हणजे तो काय म्हणाला हे न कळून सुध्दा प्रतोदने त्याला मराठीत प्रतिसाद दिला...... "अरे काय मस्त आहे रे!कसं बनवता तुम्ही,मला जरा हे बनवायची पद्धत सांगशील काय?"
त्या वाढप्याला काहीच कळले नाही. तो आपला नुसताच त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. ते बघून प्रतोदला वाटले की खाताना आपल्या चेहर्‍याला काही इकडे-तिकडे लागले तर नाही ना? म्हणून त्या वाढप्याला तो म्हणाला,"हा माझा खिसा आहे ना त्यांतून जरा रुमाल काढून माझे तोंड पुसतोस?"( वाढपी शुंभासारखा उभाच)
"अरे मी काय म्हणालो तुला कळले नाही काय? बहिरा आहेस काय?"..प्रतोद उवाच!
मला खरे तर हा सगळा विक्षिप्त प्रकार बघताना अवघडल्यासारखे झाले होते आणि त्यात गंमत पण वाटत होती. मग मी मध्ये पडलो आणि त्या वाढप्याला खुणेनेच जा असे सांगितले.
प्रतोदला म्हणालो,"अरे हे बंगलोर आहे. त्या कन्नड माणसाला त्याच्या मातृभाषेशिवाय काही येत नसेल आणि तू त्याच्याशी अस्खलित मराठीत बोलत होतास ते त्याला कसे कळणार?"
प्रतोद म्हणतो कसा..."मग त्याने मराठीतून तसे सांगावे की 'मला मराठी येत नाही म्हणून! नुसते गप्प बसला तर मला कसे समजणार?"
मी म्हणालो,"अरे त्याला मराठीच येत नाही तर तो तुला मराठीत कसे सांगणार मला मराठी येत नाही म्हणून!"
त्यावर त्याचे उत्तर ..."मला पण इंग्लिश(नीट)येत नाही तरी पण मी सांगतो ना आय डोंट नो इंग्लिश म्हणून!"
मी त्याच्या पुढे हात जोडले,म्हटले,"आता चर्चा पुरे. तुझे जेवण झाले असेल तर चल आपण आता पुन्हा कामाला लागू या."

आम्ही जेवण आटोपून पुन्हा त्या विभागात गेलो जिथे आम्हाला महिनाभर काम करायचे होते आणि पुन्हा थक्क झालो! अजून जेवणाची सुट्टी संपायला १० मिनिटे बाकी होती; जवळपास सगळे दिवे मालवले होते आणि प्रत्येक टेबलावर लोक चक्क झोपले होते. विश्वास बसत नाही ना? अहो क्षणभर आम्ही देखिल हतबुद्ध झालो. काय करावे काहीच कळेना. तेव्हढ्यात गजर झाला(जेवणाची सुट्टी संपल्याची निशाणी)आणि लोक पटापट उठले,दिवे लागले आणि दोन मिनिटात कामाला पण लागले. आपण त्या गावचेच नाही असा एकूण आविर्भाव(असे आम्हाला वाटले पण नंतर कळले की हे नेहमीचेच होते) होता त्यांचा. रोज लोक झटपट जेवून घेत आणि आपापल्या टेबलावर ताणून देत. मग आम्ही मात्र ठरवले की'जेसु'संपल्याशिवाय तिथे पाऊल टाकायचे नाही आणि त्याप्रमाणे आम्ही मग थोडेसे 'चांदण्यात' भटकून येत असू.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

E.C.I.L.(Electronics Corporation of India Ltd), hyderabad chi athavan zali.
tithe hi jevanachya sutti chyaveli hech drushya asayache. jewanache varnan ekdam ditto.

Prachi