माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३ फेब्रुवारी, २००७

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ४

दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे(साडे पाच वाजले असावेत) दरवाज्याची कडी जोरजोरात वाजत होती म्हणून धडपडून उठलो. दरवाजा उघडून पाहतो तो एक काळा-सावळा लहान मुलगा दारासमोर हातात चहाची किटली घेऊन उभा होता. मला पाहताच त्याने विचारले, सार,चाया?
मला त्याला सांगायचे होते की थोड्या वेळाने ये पण हे मी त्याला कुठल्या भाषेत सांगायचं हा एक प्रश्नच होता. मी आपला खुणेने त्याला नंतर ये असे सांगायचा अयशस्वी प्रयत्न केला. पण त्याला माझी ही भाषा काही कळेना. तेव्हढ्यात त्याला बाजूच्या काही खोल्यांतून बोलावणे आले म्हणून तो तिथे गेला. ह्या सर्व गडबडीत चिंटू देखिल उठला आणि त्याने त्या पोर्‍याला खुणेने बोलावून चहा मागवला(चिंटूला'बेड टी’लागत असे). तो पोर्‍या दोन कप भरू लागला. मी चहा पीत नसे म्हणून नुसतेच ’कॉफी, कॉफी’ असे त्याला उद्देशून बोललो. त्याला ते कळले असावे म्हणून त्याने एकच कप भरून चिंटूला दिला आणि मला उद्देशून काही तरी बोलला, पण मला ते काहीच कळले नाही.

नंतर तो पोर्‍या दुसर्‍या खोल्यांकडे वळला आणि मी प्रातर्विधी उरकून आलो तेंव्हा हा पोर्‍या कॉफी घेऊन हजर झाला होता. मला त्याचे कौतुक वाटले पण ते कोणत्या शब्दात व्यक्त करावे हे कळेना म्हणून मी त्याच्या पाठीवर शाबासकी दिली. त्यावर तो पोर्‍या प्रसन्नपणे हसला. माझी भावना त्याच्या पर्यंत पोचली ह्याचीच ती पावती होती. आता प्रश्न, किती पैसे द्यावेत हा होता कारण त्याला तमिळ शिवाय काहीच येत नव्हते. सगळे व्यवहार खुणेनेच चालत होते. मी माझ्या हातावर काही नाणी ठेवली आणि हात त्याच्या समोर धरला. त्याने प्रथम १रुपया घेतला आणि म्हणाला, ’चाया!’ नंतर पुन्हा २रुपये घेतले आणि म्हणाला,कापी!
मी हसलो,तो हसला आणि काही तरी बोलून गेला. बहुतेक 'उद्या येताना कॉफी पण बरोबरच आणीन' असे काहीसे असावे.

आज रविवार असल्यामुळे जरा आरामच होता आणि अजून प्रवासाचा शीण पूर्णपणे गेला नव्हता म्हणून दरवाजा उघडा ठेवूनच निवांत पडलो. कडीचा आवाज आला म्हणून उठून बघितलं तर,गुड मॉर्निंग बॉस! म्हणत रामालिंगम दारात उभा होता.तेव्हढ्यात चिंटू अंघोळ करून आला. मग आमचे तिघांचे काही जुजबी बोलणे झाले आणि त्या दोघांना तसेच सोडून मी अंघोळीला गेलो. अंघोळीहून आलो तेंव्हा प्रश्न असा पडला की धुतलेले कपडे वाळत कुठे घालायचे. गादी दुमडून तात्पुरते पलंगावरच टाकले आणि रामालिंगमला दोरी कुठे मिळेल म्हणून विचारले.
नो प्रॉब्लेमा! आय वुइल गीव यू जस्ट नाऊ! असे म्हणून तरातरा चालत निघून गेला. १०-१५ मिनिटांनी साधारण दोन-तीन मीटर लांब अशी दोरी त्याने आणली आणि म्हणाला, टेक इट बॉस!
हा आम्हाला सारखा बॉस का म्हणत होता कळत नव्हते आणि मनाला पटत देखील नव्हते. मी त्याला तसे विचारले तेंव्हा तो म्हणाला, आवर चिंटू(आवर चिंटू ?म्हणजे एव्हढ्यात तो स्वतःला आमच्यातलाच एक समजायला लागला की काय?) लुक्स लाइक बॉस!

खरेच होते ते. मी आतापर्यंत माझ्या दूषित नजरेतूनच त्याच्याकडे बघितले होते त्यामुळे मला जे उमगले नव्हते ते ह्या गृहस्थाने दाखवून दिले. मग मी पण चिंटूला म्हटले, बॉस,आज दिवसभर काय करायचे?
चिंटू म्हणाला, आता बॉस-बीस बस कर. इथे तू माझा बॉस आहेस,काय करायचे ते तू सांग आणि त्याप्रमाणे आपण करू या!
मी म्हटले, ओके बॉस!
चिंटू मूठ आवळून माझ्याकडे बघू लागला आणि म्हणाला, आता बस करतो की देऊ एक ठेवून. कालपासून हा काळू(रामालिंगम) उगीचच बॉस बॉस करून कान खातोय आणि आता तू पण त्याला सामील झालास? माझा डोका नको फिरवू!
मी म्हटलं, बरं बॉस,तुला बॉस म्हटलेलं आवडत नाहीना बॉस, तर नाही म्हणणार तुला बॉस!ओके बॉस?
चिंटू भडकून अंगावर धावून आला. त्याचा तो अवतार बघून रामालिंगमने काढता पाय घेतला(त्याला बिचार्‍याला काहीच कळले नव्हते हा का पिसाळला ते).

चिंटू जातीचाच मुष्टीयोद्धा. तो मुठी वळून माझ्यापर्यंत पोचला आणि त्याने एक मूठ माझ्या दिशेने हाणली. मी ती चुकवली आणि जरा बाजूला सरकून कराटेच्या पवित्र्यात उभा राहिलो. माझा तो पवित्रा बघितला आणि चिंटू एकदम राग विसरून मला म्हणाला, आयला देवा,तू कधी कराटे शिकलास?
मी म्हणालो, मला जेव्हा कळले की मला तुझ्याबरोबर मद्रासला तीन महिने राहायचे आहे तेंव्हाच मी स्वसंरक्षणासाठी काही डावपेच शिकून घेतलेत!
तो म्हणाला, मग धमाल आहे, मी बॉक्सिंग करतो तू कराटेने डिफेंड कर. ओके.कमॉन स्टार्ट!

अहो ही भलतीच आफत आली होती. खरे तर मला कराटे-बिराटे काहीच येत नव्हते. काही दिवसांपूर्वी मी एक कराटेचे पुस्तक विकत घेतले होते आणि त्यातील काही पवित्रे अभ्यासले होते इतकेच. प्रात्यक्षिक कधी केले नव्हते आणि आता ह्या सराईत मुष्टीयोध्याबरोबर दोन हात करण्याचे नाटक करायचे म्हणजे चित्र बघून हिमालय सर करण्यासारखे होते. मी त्याला थांबण्याचा इशारा केला. तो थांबला.
मग त्याला म्हणालो, हे बघ माझ्या गुरुने मला काही नियम सांगितले आहेत ते मला पाळावे लागतील! नियम क्र.१..... उगाचच शक्तिपरिक्षण करू नये.
नियम क्र.२..... शक्यतो आपल्या बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्याशीच दोन हात करावेत( आपल्या पेक्षा दुबळ्या व्यक्तीवर हात उचलू नये).
नियम क्र.३..... हा शेवटचा आणि फार महत्वाचा नियम आहे. आपल्यावर हल्ला होत असेल तर सर्वप्रथम जिथून वाट मिळेल तिथून पळून जावे आणि जर तसे करता आले नाही तरच मग सामना करावा(आहे की नाही डोकॅलिटी).
आता तूच सांग मी तुझ्याशी कसे दोन हात करणार कारण तू माझ्या बरोबरीचा नाहीस(खरे तर मीच त्याच्या बरोबरीचा नव्हतो पण ह्या शक्तिमान लोकांचा मेंदू गुढग्यात असतो हे माहीत होते) म्हणजे नियमाप्रमाणे मी तुझ्याशी लढू शकत नाही आणि लढलो तर माझ्या गुरुचा अपमान होईल. आता तूच सांग काय करायचे ते!
त्यावर तो म्हणाला, नको,नको,गुरुचा अपमान नको. पण तू मला कराटे तर शिकवू शकशील ना?
मी त्याला म्हणालो, हो शिकवेन ना. पण अगोदर तुला काही योगासनं शिकावी लागतील. ती तुला व्यवस्थित आली की मग आपण कराटेचा अभ्यास सुरू करू. चालेल?
तो म्हणाला, चालेल. कधी करू या सुरुवात? आत्ता?
मी म्हटलं, आज नको,उद्या सकाळपासून करू या सुरुवात!
बरं चालेल! तो म्हणाला.

आणि अशा तर्‍हेने मस्करीची कुस्करी होता-होता मी कर्म-धर्म संयोगाने वाचलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: