माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० मे, २००७

माती असशी,मातीत मिळशी!

मी ५-६वीत असताना आकाशवाणीवर एक गाणे ऐकले होते. सुप्रसिद्ध गायक गोविंद पोवळे ह्यांनी ते गायले होते. गाण्याचे शब्द होते..........
माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी
तुझाच आहे शेवट वेड्या
माझ्या पायाशी.... अशी त्याची सुरुवात होती.ह्या गीताचे कवी कोण हे आता आठवत नाही पण हे गीत मला इतके आवडले की मीही नकळतपणे ते गीत गाऊ लागलो. हळूहळू पाठही झाले. जेव्हा जेव्हा हे गीत आकाशवाणीवर लागत असे तेव्हा मी अतिशय काळजीपूर्वक ते ऐकत असे आणि त्याचे शब्द नीटपणे टिपून ठेवत असे.ह्या गाण्याचा अर्थ अगदी पहिल्यांदा नीटसा कळला नव्हता;पण पुढे पुढे तो समजायला लागला आणि एका वेगळ्याच अर्थाने ते गाणे मला आवडायला लागले.
मला फिरविसी तू चाकावर,घट मातीचे बनवी सुंदर
लग्न मंडपी कधी असे मी कधी शवापाशी

वीर धुरंधर आले गेले,पायी माझ्या इथे झोपले
कुब्जा अथवा मोहक युवती अंती मजपाशी

गर्वाने का ताठ राहसी,भाग्य कशाला उगा नाशसी
तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी
ह्या सगळ्या गाण्यातील साधे सोपे तत्त्वज्ञान मनाला भिडले आणि मग हे गाणे माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञानच होऊन बसले.हे शरीर ज्या मातीपासून बनले(त्या अर्थी पार्थिव)ते अखेर तिच्यातच सामावले जाणार आहे. काही क्षणांसाठी कुठला एक वेगळा आकार,रूप धारण केले असले तरी त्याचे मूलतत्त्व विसरून कसे चालेल.
मग अशाच गाण्यांचा शोध सुरू झाला तेव्हा अजून काही गाणी मिळाली.पंडित भीमसेन जोशी ह्यांनी गायलेला कबीराचा अभंग देखिल असेच तत्त्वज्ञान सांगतो.
ए तनू मुंडना बेमुंडना
आखिर मिट्टीमे मिल जाना

मिट्टी कहे कुम्हारको,बे तू क्यों खोदे मुझको
एक दिन ऐसा आवेगा की मै गाडूंगी तुझको

कपडा कहे दर्जीको क्यों तू फाडे रे मुझको
कोई वखत ऐसा आवेगा की मैं ढकाउं तुझको

लकडी कहे सुतारको रे तू क्यों छिले मुझको
एक दिन ऐसा आवेगा की मैं जलाऊ तुझको



राहत्या घराचा शोध घेताना खूप भटकावे लागले होते तेव्हा राहून राहून हे गाणे आठवायचे...
जागा जागा शोधीत फिरसी का वेड्या उन्हात
अखेर तुजला जागा आहे साडेतीन हात,वेड्या साडेतीन हात
....योगायोगाने हे गाणेही गोविंद पोवळे ह्यांनीच गायलेले आहे(आता हे गाणे पूर्ण आठवत मात्र नाही). पुन्हा अतिशय साध्या सोप्या शब्दात मांडलेले जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान.का कुणास ठाऊक पण ही गाणी आणि त्यातील अर्थ माझ्या मनात खोल कुठेतरी जाऊन बसलाय. ह्या क्षणभंगूर जीवनाचा आपल्याला किती सोस असतो;पण अशा ओळी ऐकल्या की खरे चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणि आजवर हे आयुष्य सत्कारणी लावले नाही ह्याची खंत वाटते.
अजून बरीच अशी गाणी आहेत पण आता आठवत नाहीत. त्यासंबंधी पुन्हा केव्हातरी!

२६ मे, २००७

गानयोगी!

पंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या 'गानयोगी' ह्या संपादित चरित्राचा हा एक परिचय करण्याचा प्रयत्न!
ह्या पुस्तकात मूळ कन्नड भाषेतील ' माझी रसयात्रा' ह्या पंडितजींच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद सौ.उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला आहे. ह्यात मजेची गोष्ट अशी आहे की सौ.उमा कुलकर्णीना कन्नड वाचता येत नाही मात्र त्या कानडी समजू शकतात. ह्या कामी त्यांना त्यांचे पती श्री. विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांनी वाचन करून साथ दिली आहे.
श्री पु. ल. देशपांडे, सौ. सुनिता देशपांडे,श्री भिर्डीकर(पंडितजींचे शिष्य),श्री.एम.के.कुलकर्णी यांच्या बरोबरीनेच मन्सूरपुत्र डॉ. राजशेखर ,सुकन्या लक्ष्मीबाई यांच्या लेखनाचा आणि श्री. अशोक वाजपेयी यांच्या कवितांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.
ह्या पुस्तकाचे संपादन श्री. वि.भा.देशपांडे ह्यांनी केलेय.

धारवाड जवळच्या मन्सूर ह्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांची आई नीलम्मा आपल्या गोड आवाजात जात्यावरच्या ओव्या गात असे. हेच त्यांच्यावर झालेले प्राथमिक संगीत संस्कार.त्यांचे मोठे बंधू बसवराज हे कन्नड संगीत नाटकात कामे करत आणि असे करताना त्यांनी खूप नावलौकिक मिळवला होता. त्यांच्याच आधाराने आणि प्रोत्साहनाने छोट्या मल्लिकार्जुनाने संगीत नाटकात कामे करायला सुरवात केली आणि थोड्याच काळात ते एक उत्तम बालगायक म्हणून प्रसिद्धी पावले.पण मल्लिकार्जुनाला त्यात समाधान वाटेना. त्याला गाण्यात प्रगती करायची होती. शेवटी बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावात शिवयोगी स्वामींच्या दर्शनाला गेले असताना छोट्या मल्लिकार्जुनाचे गाणे ऐकून स्वामी आनंदित झाले आणि त्यांनी नीलकंठबुवा आलुरमठ(ग्वाल्हेर घराणे) ह्यांच्याकडे त्याला गाणे शिकवावे म्हणून शिफारस केली. इथेच गाणे शिकता शिकता मन्सूरजी नावारुपाला आले. निरनिराळ्या ठिकाणच्या संगीतसभा गाजवत असतानाच काही नाटकांचे संगीत दिग्दर्शन करण्याची संधीही त्यांना मिळाली आणि त्यांनी ती अतिशय समर्थपणे पार पाडली. ह्यातूनच मग त्यांच्या आवाजात काही रागांच्या ध्वनिमुद्रिका काढण्याची प्रेरणा एचएमव्ही ला मिळाली.
पुढे त्यांची गाठ गान सम्राट अल्लादियांखांशी पडली आणि त्यातूनच मग त्यांचेच चिरंजीव मंजीखां ह्यांचेकडून गंडाबंधन करून घेऊन जयपूर घराण्याची तालीम सुरू झाली. पुढे मंजीखांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू भुर्जीखां ह्यांच्याकडून तालीम मिळाली.
अशाच आणि बऱ्याच चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेले हे चरित्र मुळातूनच वाचल्याशिवाय त्याची महती कळणार नाही.

पुलंनी म्हटलंय " मल्लिकार्जुन मन्सूर हा एक गाण्यात राहणारा माणूस आहे. तसा त्यांचा टपाली पत्ता'मृत्यंजय बंगला,धारवाड' असा आहे. पण अण्णांचे वास्तव्य गाण्यात. सकाळी ते तोडी-आसावरीत राहतात. दुपारी सारंगाच्या छायेत असतात. संध्याकाळी पूरिया-मारव्याच्या ओसरीवर येऊन बसतात आणि रात्री यमन-भूप-बागेश्रीच्या महालात असतात".

हे इतके सांगितले तरी भरपूर आहे. तरीही पंडितजी ही काय चीज आहे हे कळण्यासाठी त्यांचे भरपूर गाणे ऐकले पाहिजे आणि त्यांचे हे संपादित चरित्रही प्रत्येकाने जरूर वाचायला हवेय.

आता आपल्याला हे चरित्र वाचावेसे वाटले तर माझ्या लिहिण्याला काही अर्थ प्राप्त होईल.

गानयोगी
पं.मल्लिकार्जुन मन्सूर
प्रकाशिका: सौ‌. स्मिता इनामदार
पृथ्वी प्रकाशन,२२,भोसले काँप्लेक्स,
पौड रोड,पुणे: ४११०३८
किंमत:एकशे पंचवीस रुपये

६ मे, २००७

माझ्या 'बुध्दीचे बळ'! ५

झंडू कँटीनमधे खेळणे बंद केल्यावर मग आम्ही मुंबईत इतरत्र होणाऱ्या खुल्या स्पर्धेत भाग घेऊ लागलो.खेळ सुधारण्यासाठी काही गोष्टींची अतिशय जरूरी असते. त्यांमध्ये नियमित सराव,खेळलेल्या प्रत्येक डावांचे विश्लेषण,स्पर्धेत भाग घेणे ,तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आणि सतत ध्यास धरणे अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. ह्यांपैकी विश्लेषण हा भाग जरा जास्तच महत्त्वाचा असतो असे मला वाटते. आपण खेळत असलेला प्रत्येक डाव हा लिहिण्याची आम्हाला आता सवय लागलीच होती.त्यात हरणाऱ्या डावात आपण नेमकी काय चूक केली होती,जिंकलेल्या डावात प्रतिस्पर्ध्याची काय चूक होती,त्याची खेळण्याची पद्धत कशी होती,त्यातली त्याची बलस्थाने,कच्चे दुवे कोणते हे कळू शकते. आपल्या खेळातील बलस्थाने आणि कच्च्या दुव्यांची नव्याने जाणीव होते आणि त्यात सुधारणा करता येतात.

पण इथेच मी कमी पडत होतो. प्रत्येक स्पर्धेत मी माझा डाव लिहून घेत असे;पण त्याचे विश्लेषण करण्यात टाळाटाळ करत असे. ह्याउलट मी असे कितीतरी मोठे खेळाडू बघितलेत की ते मोकळ्या वेळात आपले तेच डाव पुन्हा खेळून बघतात. त्यातल्या स्वतःच्या आणि त्या त्या डावातील प्रतिस्पर्ध्याच्या बलस्थानांची त्रुटींची नोंद ठेवतात. ह्याचे कारण असे आहे की बऱ्याच वेळा तेच तेच प्रतिस्पर्धी आलटून पालटून सर्व स्पर्धांत उतरत असतात. मग कुणाशी कसे खेळायचे त्याचे नीट संयोजन करता येते. आपल्या चुका कमीत कमी कशा होतील;किंबहुना त्या कशा होणारच नाही ह्याची काळजी घेता येते आणि आपल्या विजयाची निश्चिती करता येते.माझ्या आळसामुळे माझ्या खेळात खास अशी प्रगती होत नव्हती. कैक वेळा तर मी जिंकता जिंकता हरत असे. अशा तऱ्हेने मी का हरतो ह्याचे विश्लेषण करावे असेही कैक वेळा ठरवले.मात्र त्याची अंमलबजावणी करू शकलो नाही.

असाच एकदा मी दादरच्या वनमाळी हॉल मध्ये भरलेल्या खुल्या स्पर्धेत भाग घेतला. ह्या स्पर्धेतही ९ डावांची साखळी होती. त्यावेळचे दिग्गज असे बरेचसे राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू त्यात सामील झालेले होते. पहिले तीन डाव अतिशय सहजतेने जिंकत मी नामांकितांच्या यादीत सामील झालो होतो. कधी नव्हे ते माझे नावही वर्तमानपत्रातील छोटेखानी बातमीत इतर आघाडीवीरांसोबत झळकले होते.

ह्या स्पर्धेत तीन गोऱ्या-गोमट्या शाळकरी मुलीही सहभागी झालेल्या होत्या आणि त्यांनीही आपापले पहिले तीनही डाव जिंकलेले होते. ह्या तिन्ही मुली सख्या भगिनी होत्या हे अजून एक विशेष होते. त्यांची वयं अनुक्रमे १०,१२ आणि १४ अशी होती.सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू असायची. तशा ह्या तीनही भगिनी ठेंगण्या ठुसक्या होत्या. त्यातली सर्वात धाकटी तर इतकी छोटी होती की खुर्चीवर दोन उशा ठेवून ती त्यावर बसत असे तेव्हा कुठे तिची मान टेबलाच्या वर दिसत असे. ह्या मुलींची काळजी घेण्यासाठी त्यांची आई जातीने हजर असायची.

तर त्यातल्या मधल्या बहिणीशी माझी ४थ्या डावात गाठ पडली. खरे तर त्या मुलीचे वय आणि छोटी चण बघितल्यावर मला तिच्याशी खेळणे अवघड वाटत होते. एका लहान मुलीशी कसे खेळायचे? तिला हरवण्यात काय मोठा पराक्रम आहे. पण खेळणे भागच होते. तो स्पर्धेचा एक भागच होता म्हणून जरासा बेताबेताने मी खेळायला लागलो. मात्र पहिल्या काही खेळीतच लक्षात आले की मुलगी वयाने लहान असली तरी बुद्धीने महान आहे.तेव्हा तिला बरोबरीचा प्रतिस्पर्धी मानूनच आपल्याला खेळायला हवंय. नाहीतर आपले काही खरे नाही.

त्याप्रमाणे मी माझा धडाका सुरू केला आणि साधारण पुढच्या सातआठ खेळीतच मी माझा वजीर ,एक घोडा आणि एक उंटाचा बळी देत(आमिष देणे म्हणतात)तिच्या संरक्षक फळीचा पुरा धुव्वा उडवला आणि अशा खेळीपाशी आलो की पुढच्याच खेळीला शह आणि मात द्यायची. तिच्या वजीर वगैरे महत्त्वाच्या सोंगट्या पार दुसरीकडे अडकून बसल्या होत्या. मुलगी बिचारी रडवेली झाली होती.तिला हरवण्यात मलाही काही खास सुख वाटत नव्हते;पण स्पर्धेत दयामाया दाखवणे कधीच चालत नाही.मी माझे घड्याळ बंद करत तिचे घड्याळ चालू केले आणि शांतपणे तिच्या खेळीची असे म्हणण्याऐवजी असे म्हणता येईल की तिच्या हार स्वीकारण्याची वाट पाहत बसलो. पाच मिनिटे झाली,दहा मिनिटे झाली,वीस मिनिटे झाली तरी ती मुलगी पटावर नजर खिळवून बसली होती आणि पुढची खेळी करण्याच्या तयारीत दिसत नव्हती. पराभव स्वीकारेल असेही दिसत नव्हती. खरे तर तिला तो स्वीकारण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता;पण ती अत्यंत नि:स्तब्ध अशा अवस्थेत, पटाकडे बघत समाधी अवस्थेत पोचलेली दिसत होती. मी तिला दोन वेळा तशी जाणीव करून दिली तरी तिने काहीच हालचाल केली नाही.माझा धीर सुटत चालला होता. मी विजयी झालोय हे मला कळत होते पण ती पराभव स्वीकारत नव्हती. पाऊण तास झाला तरी ती काहीही करायला उत्सुक दिसत नव्हती. खरे तर वेळ मर्यादेच्या नियमाने मी केव्हाच जिंकल्यात जमा होतो;पण एव्हढ्या लहान मुलीच्या बाबतीत घड्याळासारख्या क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करणे मलाही उचित वाटत नव्हते.

मी असा अस्वथपणे प्रतीक्षा करत असतानाच एकदाची ती हालली.पुढे झुकून तिने एक खेळी केली आणि अतिशय प्रसन्नपणे तिने माझ्याकडे पाहत एक स्मितहास्य केले.हार स्वीकार करण्याऐवजी तिने अशी काय खेळी केली की ज्यामुळे ती इतकी प्रसन्न दिसत होती ह्याचा अचंबा करत मी पटाकडे नजर टाकली आणि क्षणात माझ्या सगळे काही लक्षात आले."अरेच्च्या! ही वाचलेली दिसतेय!" माझ्या मनात विचार उमटले!(मानलं बुवा आपण तिला!)तिने केलेली खेळी इतकी बिनतोड होती(माझ्या नजरेतून आणि आडाख्यातून सुटलेली-प्रचंड चूक(ब्लंडर)) की आता मला तिला हरवणे तर दूरच होते ;पण मला स्वतःला वाचवणे अवघड होऊन बसले होते. जिंकण्याच्या कैफात मी माझे महत्त्वाचे मोहरे घालवून बसलो होतो आणि तिच्या त्या एका खेळीने मला आक्रमणाऐवजी संरक्षक भूमिकेत ढकलले होते.

आता काय सांगू आणि कसे सांगू? बाजी पालटली होती. पुढच्या दहाबारा खेळीत अस्मादिकांचा डाव आटोपला होता आणि ती चिमुरडी, छे!चिमुरडी कसली? ती तर साक्षात बुद्धीची देवता सरस्वती वाटली मला!तिने मला हार मानायला भाग पाडले होते.त्याक्षणी हरल्याचे वाईटही वाटले आणि आनंदही वाटला. जिंकता जिंकता हरलो म्हणून वाईट वाटले. इतक्या लहान वयातही माझ्यासारख्या सराइताचा सहजपणे आणि दडपणाला बळी न पडता,विपरीत परिस्थितीतीतून मार्ग काढत पराभव केला हे पाहून आनंदही वाटला. एका लढवय्या खेळाडूकडून हरल्याबद्दल मला स्वतःला स्वत:चाच सन्मान झाल्यासारखे वाटले.ह्या हरण्यातही एक निराळाच आनंद होता. हा प्रसंग विसरू म्हटले तरी विसरता येत नाही. आज त्या डावातली ती विशिष्ट खेळी जरी मला आठवत नसली(कारण आता ती कागदपत्र तर केव्हाच हरवली) तरी तो प्रसंग आता इथे घडतोय असे दृश्य क्षणभर डोळ्यांसमोर तरळून जाते.

आता तुम्हाला उत्सुकता असणारच! कोण होती ती 'चिमुरडी'? सांगू?सांगायलाच हवे काय? बरं सांगतो तर!

ती होती 'जयश्री खाडिलकर'! प्रख्यात पत्रकार आणि दैनिक नवाकाळ आणि संध्याकाळचे संपादक श्री नीळकंठ खाडिलकर ह्यांची मधली कन्या. पुढे ती आणि तिच्या त्या दोन्ही भगिनी वासंती(थोरली) आणि रोहिणी(धाकटी) बुद्धिबळ क्षेत्रात खूपच गाजल्या हे आपल्याला माहीत आहेच. भारतातर्फे 'पहिली महिला आंतर्राष्टीय मास्टर' बनण्याचा मान ह्याच जयश्रीला मिळाला. त्यानंतर रोहिणी आणि वासंतीनेही तो मान मिळवला.

आयुष्यात ह्यापुढेही मी अनेक खुल्या स्पर्धेत खेळलो;पण ५०-५५% पेक्षा जास्त गुण मिळवू शकलो नाही. 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' म्हणतात! तसेच काहीसे माझे झाले. नाही म्हणायला कार्यालयातील बुद्धिबळ स्पर्धेत सतत तीन वेळा अजिंक्य राहिलो (वासरात लंगडी गाय शहाणी!) आणि तिथे स्पर्धा नाही म्हणून पुढे खेळायचे सोडून दिले. त्यानंतर संगणकाशी खेळून बघितले. त्याच्याही सर्वोच्च पायऱ्यांपर्यंत खेळलो. कधी जिंकलो, कधी हरलोही.पण निर्भेळ असे ,घवघवीत असे यश काही मिळाले नाही. तुम्ही काही म्हणा ! मला असे वाटते की एकेकाची जितकी कुवत असते त्यापेक्षा तो जास्त काही करू शकत नाही.कधी मधी चमक दाखवणे होते;पण ते केवळ अपघाताने असे मला वाटते.आपल्याला काय वाटते?

समाप्त!

१ मे, २००७

माझ्या 'बुध्दीचे बळ'! ४

प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्याच्या आधी आपल्या राजाला कडेकोट बंदोबस्तात ठेवणे(कॅसलिंग करणे) ही फार महत्त्वाची बाब असल्याचे श्री.बाबूर ह्यांच्या वक्तव्यावरून मनावर ठसले. मात्र हा बंदोबस्त राजाच्या बाजूला करावा की वजीराच्या बाजूला करावा हे मात्र खेळाचा आणि प्रतिस्पर्ध्याच्या आक्रमणाचा कल लक्षात घेऊनच केला पाहिजे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे तत्त्व लक्षात ठेवणे भाग होते. चुकीच्या वेळी चुकीच्या बाजूला राजाला किल्ल्यात बंद करणे म्हणजे प्रतिस्पर्ध्याला आपणहून त्याठिकाणी हल्ला करायला मदत करण्यासारखे असते आणि संरक्षण होण्याऐवजी नाहकपणे राजा संकटात सापडतो. आपले सगळे सैन्य त्याच्या रक्षणासाठी तिथेच अडकून पडते आणि आपल्याला प्रतिहल्ला करता येत नाही. तात्पर्य काय की १)आपला राजा तर सुरक्षित राहायला हवा आणि २)प्रतिस्पर्ध्याला त्याच्या आक्रमणाची दिशा पक्की करू द्यायची नाही आणि ३) आपण आक्रमण जारी ठेवून त्याच्या राजाला खिंडीत गाठायचा प्रयत्न करायचा जेणेकरून त्याचे सैन्य त्याच्या बचावात अडकून राहील. अशा तर्‍हेने योजना करायची म्हणजे सखोल विचार करणे ओघाने आलेच. हा विचार करताना शक्याशक्यतांचा विचार करणे क्रमप्राप्तच असते. तेव्हा घिसाडघाई अजिबात कामाची नाही आणि त्याच वेळी वेळकाढूपणाही कामाचा नाही. म्हणजे समतोल वृत्तीने विचार करायचा. हे सगळे त्यांनी आम्हाला व्यवस्थित उकल करून सांगितले आणि त्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला.

दुसर्‍या दिवशी अतिशय आत्मविश्वासाने आम्ही दोघे खेळायला उतरलो आणि अगदी चुटकीसरशी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. आमचाच आमच्यावर विश्वास बसला नाही कारण प्रतिस्पर्धी बरेच अनुभवी होते असे(नंतर) कळले;पण कालचा उपदेशाचा डोसच इतका ताजा होता की आम्ही दोघे जोश्यातच होतो आणि त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांचे आमच्यापुढे काहीच चालले नाही. अशा तर्‍हेने सहा डावात ४-४ गुणांची कमाई करून आम्ही तिथल्या त्या लोकांच्या चर्चेचा विषय झालो होतो;पण खरी लढाई तर पुढेच होती. कारण जसजसे गुण वाढत जातात तसतसे येणारे प्रतिस्पर्धी हे सराईत खेळाडू असतात आणि त्यांच्याबरोबर खेळून त्यांना हरवणे हे इतके सोपे नसते.

आतापर्यंत झालेल्या सहा फेर्‍यांतून सहाच्या सहा गुण मिळवलेलेही काही खेळाडू होते. तसेच साडे पाच,पाच,साडेचार असे गुण मिळवणारेही खेळाडू होते. अशांपैकीच कुणीतरी आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून भेटणार होते. त्यामुळे नाही म्हटले तरी एक प्रकारचे दडपण जाणवत होतेच. ह्या अवस्थेतच मी ७वा डाव बरोबरीतच सोडवला आणि भाऊ त्याचा डाव जिंकता जिंकता हरला. आता माझे ४.५ आणि भावाचे ४ गुण झाले होते.पुढचाच डाव मी सडकून हरलो आणि भाऊ मात्र आरामात जिंकला. आता आठ डावात माझे ४.५ तर भावाचे ५ गुण झाले.शेवटच्या आणि निर्णायक डावात आमच्या दोघांच्याही काळ्या सोंगट्या होत्या;पण मी मोठ्या शर्थीने लढत देऊन हरता हरता अचानक बाजी पालटवत जिंकलो(प्रतिस्पर्ध्याने मोठ्या मनाने माझे अभिनंदन केले) आणि तिथे भावाने त्याचा डाव बरोबरीत सोडवला. आमचे दोघांचे नऊ डावात प्रत्येकी ५.५ गुण झाले. एव्हढ्या मोठ्या खुल्या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेऊन आम्ही मिळवलेले गुण केवळ आमच्याच नव्हे तर काही जाणकारांच्या मतेही अतिशय मोलाचे होते. ह्या गुणांच्या कमाईमुळे आमची निवड पुढच्या वर्षी होणार्‍या वरिष्ठ गटासाठी झाली.

ह्या स्पर्धेत खेळणारा एक अतिशय नाजूक प्रकृतीचा,कुरळे केस असणारा आणि काहीसा बायकी दिसणारा,गोरापान तरुण ९ च्या ९ डाव जिंकून पहिला आला. कोण होता तो? माहिताय? अहो तो तरुण म्हणजे आजचा भारताचा आघाडीचा 'ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे' होय(बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात!). सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा आम्हा दोघांपैकी कोणाशीही त्याची गाठ पडली नाही. सुदैवाने एव्हढ्यासाठी की त्याच्याबरोबरचा सामना आम्ही हरलोच असतो.तेव्हा न खेळल्यामुळे इज्जत वाचली आणि दुर्दैवाने अशासाठी की खेळून हरलो जरी असतो तरी आज सांगता आले असते की मी त्याच्याशी खेळलो होतो(चुकून जिंकलोही असतो! असेही म्हणायला काय हरकत आहे?).त्याच्या बरोबरीने त्याचा मोठा भाऊ 'अभय ठिपसे' हाही त्या स्पर्धेत खेळला होता आणि माझ्या आठवणीप्रमाणे त्याने आठ गुण कमावले होते. आज तो मुंबईत 'मॅजिस्ट्रेट' म्हणून कार्यरत आहे.ह्या दोन बंधूंसारखेच अजून काही राष्ट्रीय पातळीवर भविष्यात गाजलेले खेळाडू ह्या स्पर्धेतून पुढे आले ते म्हणजे 'अविनाश आवटे,रवी हेग्गडे,घाटे,डोंगरे आणि अजून काही.

त्यानंतरच्या पुढील दोन्ही वर्षी आम्ही दोघे वरिष्ठ गटात खेळलो आणि मी व माझ्या भावाने अनुक्रमे पहिल्या वर्षी ४.५ व ५ आणि दुसर्‍या वर्षी ४.५;४.५ गुण मिळवले. लागोपाठ दोन वर्षे वरिष्ठ गटात खेळूनही आम्ही पुढच्या गटात(राज्य स्तरीय) खेळण्यास पात्र ठरविणारे कमीत कमी ५.५ गुण मिळवू शकलो नाही. म्हणून पुन्हा एकदा आम्हाला कनिष्ठ गटात खेळून आपली पात्रता सिद्ध करावी लागणार होती(पुन्हा बिगरीत बसणे आले कपाळी!).

मग आम्ही दोघांनी ठरवले की आता तिथे(झंडू कॅंटीन) खेळायचे नाही.झाला तेव्हढा तिथला खेळ पुरे झाला. आता खेळलोच तर बाहेर कुठेही होणार्‍या खुल्या स्पर्धेतच खेळायचे. तिथे खेळूनच आपला अनुभव वाढवायचा.

क्रमश: