माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ डिसेंबर, २००७

भविष्य,डायेट आणि कुत्रा!

सीता आणि गीता ह्या दोन्ही मैत्रिणी बरेच दिवसांनी भेटताहेत.दोघी तशा मिश्किल आहेत. एकमेकांची थट्टा करण्यात मागेपुढे बघत नाहीत. बोलण्यातून बोलणे कसे बदलत जाते त्याचे हे एक गमतीदार उदाहरण ! गीताचा ज्योतिष शास्त्रावर थोडाफार विश्वास आहे आणि सद्या तिच्या राशीला मंगळ वक्री आहे असे तिचे म्हणणे आहे.

सीता: काय म्हणतोय तुझा मंगळ्या?
गीता: मंगळ्याच काय, आता तू सुद्धा वाकड्यांत शिरलीस ?
सीता: काय गं? काय केलं मी? ठीक आहेस ना? आज सकाळी सकाळी काय?गीता: वृत्तपत्रात वाचलं नाहीस काय? शनी पुढचे १४० दिवस वक्री आहे ते! सगळे कसे आमच्याच राशीला आलेत समजत नाही.
सीता: हाहाहा! "सर्वे गुण: कांचनम् आश्रयन्ते" असे काहीसे वचन आहे ना!
गीता: गंमत म्हणजे तो शनी जो वक्री झालाय ते स्थान माझ्या पत्रिकेत भाग्योदयाचे आहे...
सीता : वा! वा!
गीता : वा! वा! काय? तो वाकड्यात शिरल्याने सगळंच त्रांगडं होऊन बसलंय!म्हणजे इथून तिथून आम्ही अभागीच.
सीता: ए पत्रिका बदलून घे बघू!
गीता: अगं, पत्रिका बदलून नशीब बदलत असतं तर...काय हवं होतं !
सीता: तेही खरंय म्हणा! अगं पण तुझे नशीब तूच बदलू शकतेस! तुझे ते सद्गुरू नाही का सांगत "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!" वगैरे वगैरे.
गीता : (हसत हसत)ते म्हणतात, तूच "माझ्या" जीवनाचा शिल्पकार.
सीता: हाहाहा!अगं मग शनीला म्हणजे मारुतीला तेल वाहा की!
गीता: मी आता विचार करतेय की सगळ्या ग्रहांची आता होलसेल मध्ये शांती करावी का काय ? सीता: तसं नको. मग खास ग्रहांना राग येईल ना. त्यांनाही इतरांच्या मापाने मोजल्याबद्दल.
गीता: सगळ्या ग्रहांना गृहीत धरल्याबद्दल सगळेच एकदम वाकड्यांत शिरताहेत. मंगळ झाला, गुरुचे भ्रमण चालू आहे, शनी नुकताच शिरलाय, गेलाबाजार राहू तर गेले १७ वर्ष खनपटीला बसलाय. त्यातल्या त्यात एकच सुदैव म्हणजे साडेसाती चालू नाही ते.. नाही तर कुत्र्याने सुद्धा हाल खाल्ले नसते.
सीता: (नाटकीपणे) मुली! घाबरू नकोस! आता तु्झा वाईट काळ संपणार आहे. ही शेपटाची वळवळ चालू आहे. इतके धीराने सहन कर बघू. मग बाईसाहेब! पुढे तुमचेच राज्य आहे. आणि बरं का, कुत्रा हाडं खातो होऽऽ! हाल नाही खात म्हटलं!
गीता: मला बघून माझ्यात हाडं असतीलसं वाटतं का ?
सीता: ता खरा! ता मात्र खरा हां! हाहाहा.
गीता : त्यामुळे तो ही वाटेला जायाचा नाय. काय समजला?
सीता: तू त्याला नुसते "हाऽऽड, हाऽऽड" केलंस तरी तो शेपूट हालवेल.
गीता: हाड मिळेलसं वाटूनऽऽऽ ?
सीता: हो! पण मग त्यासाठी आजपासून डायेट कर म्हणजे छानपैकी बारीक होशील आणि तुझी हाडेही दिसायला लागतील.
गीता: उगाच बारीक बिरीक झाले तर! नको गं बाई...नवरा हाकलून द्यायचा अशाने.
सीता: का गं? कमी खाल्ल्याने तू बारीक झालीस तर उलट त्यांचे पैसे वाचतील की! म्हणजे मग "मनी सेव्हड् इज मनी गेन्ड" असे समजता येईल ना! हाहाहा!
गीता: (हसत हसत) काही न करता, बारीक होता आलं असतं तर आधीच नसते का झाले? त्यामुळे तळवळकरांची पोटं भरल्याशिवाय काही यश नाही.. म्हणजे, कमी खाल्ल्याने वाचणारा पैसा उगाचच तळवळकरांना(जिमनॅशियम) जाणार... मग काय डोंबऽऽल, "मनी सेव्हड् इज मनी गेन्ड?" त्यापेक्षा नवरा म्हणेल, "तू खाऽऽऽ! निदान मी उपाशी ठेवतो असा तरी कोणी समज करणार नाही."
सीता: एक बेस्ट सझेशन आहे. मग असे कर! जिथे रस्ते उंच सखल आहेत ना तिथे चालायला जा. म्हणजे रस्ते आपोआप सपाट होतील आणि तूही बर्‍यापैकी बारीक होशील. म्हणजे तु्झी हाडं दिसायला लागतील आणि भविष्यात जरूर पडलीच तर कुत्रा तुझे हाल(हाडं) खाईल. हा हा हा!
गीता : हां..........ही आयडियाची कल्पना बाकी भारी हाय! चला त्यामुळे कुत्र्याचीही सोय होईल. हाहाहा! सीता: आणि रस्ते सपाट केल्याचे तेवढेच समाजकार्यही घडेल तुझ्याकडून!
गीता: हो, स्वार्थ आणि परमार्थ... सपाट रस्ते आणि एका कुत्र्याला जगवल्याबद्दल... त्याची आयुष्यभराची ददात मिटेल.
सीता: मग आता गुरुजींकडून एखादा शुभ मुहूर्त काढून घे बघू. किंवा नव्या वर्षाचा संकल्प म्हणून ही योजना अमलात आण.
गीता: हां...पण गुरुजींना सध्या टाइम नाय हाय. ते सध्या त्यांच्या आमराईच्या चिंतेत हायेत.
सीता:(हसत) म्हणजे आप "कतार"मैं है की कुवेतमे?
गीता: ????????
सीता: आप कतार मैं है की कुवेतमे? ह्यातला विनोद तुझ्या डोक्यावरून गेलेला दिसतोय. अग "कतारमे(क्यू)!" कळलं काय आता? गुरुजींना वेळ नाही सद्या असे म्हणालीस म्हणून तसे म्हटले.
गीता: हाहाहा. सहीऽऽऽऽ!कशाच्या संदर्भात ते आधी कळलेच नाही... हं! मग कतारमे च म्हणायला लागेल.त्यांना सद्या पत्रिका बघायला वेळ आणि मूड नाही म्हणतात. पण ते क्यू प्रकरण जुने च हाय की "एमटीएनएल"चे. एमटीएनएल चा फुल फॉर्म माहीत आहे की नाही ? "मेरा टेलिफोन नही लगता." पण आता अशी परिस्थिती राहिली नाहीये बघ. खूप सुधारलेय एमटीएनएल. तसाच "बीपीएल" चा माहीत आहे का ?
सीता: नाही गं! बीपीएल म्हणजे काय?
गीता: "बहोत पछतायेगा लेकर."
सीता: हाहाहा! हुशार आहेस! (विषय बदलून)अजून काय नवल विशेष?
गीता: आज आमच्या प.पू सासूबाईंचा वाढदिवस आहे.
सीता: अरे वा ! मग आज गोड काय आहे ? पुपो की गाह?
गीता: मी गुलाबजाम करणार होते पण त्यांनीच चितळ्यांचे श्रीखंड आणले काल. गाह नेहमीच असतो... म्हणजे गेली काही वर्षे तेच करत होते... कारण या सीझनला गाजरं चांगली मिळतात. संध्याकाळी मिसळ आहे.
सीता: हं! मजा आहे तुमची सगळ्यांची!
गीता: उद्या हाटेलात जाऊ....विकेण्ड ला....नणंद ही येईल...सहपरिवार. माझी कसली गंऽऽ मजा ?
सीता: अगं त्यानिमित्ताने गोड खायची संधी तुलाही मिळाली ना!
गीता: म्हणूनच म्हटलं डाएट बिएट ची भानगड माझ्याकरता नाही. उगाच या लोकांच्या पोटावर पाय...मी खाणं सोडलं तर. हाहाहा!
सीता: तो नव्या वर्षातला संकल्प आहे. ३१डिसेंबर पर्यंत हवे ते खाऊन घे.
गीता: आम्हाला नवीन बिवीन काऽऽही नाही... वर्ष बदललं तरी आपलं आयुष्य..मागीलं पानावरून पुढे चालू.
सीता: तेही खरंच की ! पण मघाशी कुत्रे किती खूश झाले होते. आता ते पुन्हा निराश होतील ना!
गीता: हाहाहा! अगं पण आहे ते मेंटेन करीनच की आणि एखाद्याला पोशीन...सगळ्यांचा काही मक्ता नाही घेतला मी.
सीता: (नाटकीपणे) नकोऽऽ गं तू त्यांना असे निराश करूस. दत्त गुरुंनाही क्लेश होतात बघ . मग सांग बघू, अशाने तुझा भाग्योदय कसा होईल ते?
गीता: अरे बापरे ! असं म्हणतेस? इथेही भाग्य आडवं आलंच का ?
सीता: गुरु महाराजांची अवकृपा होऊ देऊ नकोस. बाकी काऽऽहीही होऊ दे!
गीता: छे ! त्यांच्याशी वाकडं घ्यायची काय बिऽशाद!
सीता: जरा धोरणीपणाने वाग.
गीता: म्हणजे कसे बाईऽऽ?
सीता: म्हणजे कुत्र्यांशी प्रेमाऽऽने वाग!
गीता: चावऽलं तरी ?
सीता: चावू द्यायचे नाही. इथेच तर धोरणीपणा दाखवायचाय.
गीता: बरं बरं.
सीता: ए चल बाई! निघते उशीर झाला खूप! पण मजा आली. भेटेन पुन्हा अशीच कधी तरी! टाऽऽटा!
गीता: टाऽऽऽऽऽऽटा!

२२ डिसेंबर, २००७

आठवणी!शालेय जीवनातल्या!१५

विचार करूनही मला योग्य असा उपाय सापडत नव्हता आणि रतीब लावल्यासारखा माझा तो वर्गबंधू रोज माझ्या नाकावर टिच्चून माझ्या घरात जेवत होता.
एक दिवस अघटित घडले. त्याचा डबा कुणीतरी पळवला. डबा नाही म्हटल्यावर त्याचा जीव कासावीस झाला. ज्याला त्याला विचारत सुटला डबा कुणी घेतला ते पाहिले काय म्हणून. खरे तर त्याचा संशय माझ्यावरच होता; पण मी तसे केले नसल्यामुळे मला घाबरण्याचे कारणच नव्हते. मात्र, हे कुणाचे काम असावे ह्याबद्दल उत्सुकता होतीच. ज्याने कुणी केले असेल त्याच्याबद्दल मला उगीचच आपुलकी निर्माण झाली.

डबा मिळत नाही हे पाहून तो शिक्षकांकडे तक्रार करायला गेला. वर्गावर शिक्षक आले आणि त्यांनी सगळ्या वर्गाला ह्या घटनेचा जाब विचारला पण कुणीच काही बोलेना. शेवटी शिक्षकांनी सगळ्यांच्या दफ़्तर आणि बाकांची झडती घ्यायला शिपायाला सांगितले. त्याने सगळ्यांची कसून झडती घेतली पण डबा कुठेच सापडला नाही. शेवटी शिक्षकांनी त्या तक्रार करणार्‍या माझ्या वर्गबंधूचे दफ़्तर तपासायला सांगितले आणि काय आश्चर्य? डबा त्यातच सापडला की हो!डबा आपल्याच दफ़्तरात बघून तोही चक्रावला. त्याने झडप घालून तो डबा शिपायाच्या हातून हिसकावून घेतला आणि चटकन उघडला तर त्यात काहीच नव्हते. सगळा डबा चाटून पुसून साफ केलेला दिसत होता. ते पाहून तो रडू लागला.
आता शिक्षकांना कळत नव्हते की कुणाला शिक्षा करावी? त्यांनी आपली त्याचीच समजूत घातली, " अरे रोजच्या सवयीने तूच खाल्ला असशील डबा आणि विसरला असशील. होते असे कधी कधी. माणूस एखाद्या तंद्रीत नेहमीचे काम उरकतो पण त्याला ते केले असे नंतर आठवत नाही. तेव्हा उगी उगी! आता रडणे थांबव बघू!
"पण तो आपला रडतोच आहे आणि कळवळून सांगतोय की, "मी डबा खाल्लेला नाही. मी हात धुवायला गेलो आणि येऊन पाहिले तो डबा दफ़्तरात नाही. माझ्यावर विश्वास ठेवा!"पण शिक्षकांचा त्याच्यावर विश्वासच बसला नाही. तेव्हढ्यात सुट्टी संपल्याची घंटा वाजली आणि पुढच्या तासाचे शिक्षक वर्गात आले आणि तेवढ्यापुरते ते प्रकरण मिटले.
मी विचार करत होतो की कोण बरे असावा हा बहाद्दर की ज्याने डबा पळवतानाही कुणाला कळले नव्हते आणि पुन्हा जागच्या जागी ठेवतानाही कळले नव्हते. विचार करताना सहज माझी नजर माझ्या त्या सल्लागार मित्रावर पडली आणि त्याच्या डोळ्यातले भाव पाहून माझी खात्रीच पटली की हाच तो बहाद्दर असणार. मी नेत्रपल्लवीद्वारे त्याच्याशी संवाद साधला आणि त्यानेही मला तसाच प्रतिसाद देत ’हे आपलेच कर्तृत्व’ असल्याचे सुचवले. मी हसून त्याला त्याबद्दल शाबासकी दिली.

त्यानंतर जेवणाची सुट्टी झाली. मी वर्गाबाहेर पडण्याआधी आमचा हावरट वर्गबंधू माझ्या घराच्या दिशेने धूम ठोकताना मी पाहिला आणि लक्षात आले की हा उपाय देखिल उपयोगाचा नाहीये. उलट आज तो दोन पोळ्या जास्तच हाणेल हे नक्की. सल्लागार बंधूला शाबासकी देऊन मी घरी आलो तेव्हा आई माझी वाटच पाहत होती. तिला बहुधा आज घडलेले रामायण(डबायण) त्या हावरटाने सांगितले असणारच.
मी हातपाय धुऊन जेवायला बसलो. माझ्या पानात वाढताना तिने मला त्या डब्याबद्दल विचारले, "तू घेतलास काय रे ह्याचा डबा?"
मी "नाही!" म्हणालो.
मी सहसा कधी खोटे बोलत नाही आणि असल्या क्षुल्लक गोष्टीत तर नाहीच नाही हे आई ओळखून होती. उत्तर देताना तिची नजर माझ्या नजरेला भिडली आणि तिची खात्री पटली की हे कृत्य माझे नाही. तिने तो विषय तिथेच थांबवला आणि मग पटापट जेवून मी पुन्हा शाळेत गेलो.

दुसर्‍या दिवशी तो आपल्या आईला घेऊन आला. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईने मला त्या डबा प्रकरणाबद्दल विचारले.
"मी नाही खाल्ला!" असे मी तिला सांगितले.
"मग कुणी खाल्ला?" असा तिचा प्रश्न येताच मला काय करावे हे सुचेना. कुणी खाल्ला हे मला माहीत होते. अशा परिस्थितीत ते "माहीत नाही" असे सांगणे खोटेपणाचे ठरले असते आणि "अमक्याने खाल्ले" असे सांगितले असते तर ती चहाडी ठरली.
मी अशा अवस्थेत असताना माझा सल्लागार मित्र चटकन पुढे आला आणि म्हणाला, "मावशी! मी खाल्ला ह्याचा डबा! हा रोज स्वत:चा डबा खाऊनच्या खाऊन वर ह्याच्या(म्हणजे माझ्या) घरी जाऊन जेवतो. असे करू नको म्हणून सांगितले तरी ऐकत नाही. म्हणून ह्याला धडा शिकवायला मी असे केले त्याबद्दल मला माफ करा."
हे ऐकून त्या मावशींनी त्यांच्या मुलाच्या एक थोबाडीत मारली आणि म्हटले, "अरे तुला मी रोज डबा देते ना? मग असे रोज रोज भिकार्‍यासारखे लोकांच्या घरी जाऊन जेवायला तुला लाज कशी वाटली नाही?"
आपल्या मुलाच्या ह्या असल्या वागण्यामुळे दुखावलेली ती माउली त्याला आमच्या समोर बदड बदड बदडू लागली आणि विचारू लागली, "बोल? पुन्हा असे करशील?"
तेव्हा रडत रडत आईच्या पाया पडत त्याने "आता असे पुन्हा नाही करणार" म्हणून कबुली दिली. त्यानंतर त्या मावशी माझ्या घरी गेल्या आणि त्यांनी आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल माझ्या आईची माफी मागितली.माझ्या आईने त्यांना शांत केले आणि सांगितले, " अहो,जाऊ दे हो! लहान मूल आहे ते. भूक लागते एखाद्याला जास्तीची. तुम्ही असे का नाही करत? त्याला दोन डबे देत जा. बघा, त्याची भूकही भागेल आणि त्याची ही सवयही सुटेल."

माझ्या आईच्या सल्ल्याप्रमाणे त्या दिवसानंतर त्याच्या आईने त्याला दोन-दोन डबे द्यायला सुरुवात केली आणि खरंच त्याची ती सवय कायमची सुटली.पुढे मग हळूहळू आमच्या दोघांची मैत्री झाली . तो त्याच्या डब्यात काही खास पदार्थ असले की मला देऊ लागला. आमच्यातली कटुता केव्हाच संपली होती.

आता आम्ही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरू लागलो.

२१ डिसेंबर, २००७

बालपणीचा काळ सुखाचा! २

माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. लहानपणी खूप बडबड्या होता. सतत गाणी म्हणायचा. गोष्टी सांगायचा. नकला करायचा. पण साधारण पाच सहा वर्षांचा असेपर्यंत खूप बोबडा होता. त्याच्याबद्दलची आई-वडिलांनी सांगितलेली ही एक आठवण.

माझ्या मामाकडे त्या काळात फोनो(चावीचा रेकॉर्ड प्लेयर आणि त्याला पुढे लावलेला भोंगा) होता. त्यावर रेकॉर्ड्स लावल्या की त्या आम्ही ऐकत असू. ह्यातून येणार्‍या आवाजाचा मालक (गायक-गायिका) ह्यात आतमध्ये कसे शिरतात? बरे शिरतात तर शिरतात पण शिरताना दिसत कसे नाहीत आणि इतक्या छोट्याश्या जागेत मावतात कसे? असले प्रश्न नेहमी मला सतावायचे. पण माझा भाऊ(त्याला मी दादा म्हणतो) मात्र त्या गाण्यांचे मोठ्या भक्तीने श्रवण करायचा आणि घरी आला की मग आमच्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर बसून ती गाणी तो आपल्या बोबड्या बोलीत जोरजोरात ऐकवायचा. ऐकणार्‍यांना खूप गंमत वाटायची कारण बहुतेक सगळेच शब्द उलटे पालटे झालेले असत. नेमके गाणे काय तेही समजत नसे.
एखाद्याने हे गाणे तू कुठे ऐकलेस असे विचारले की लगेच तो सांगायचा, "मोघुमामातले तवा दाद्दा होता ना!" (मधुमामाकडे तवा (रेकॉर्ड) लागला होता ना!) गाणे काय तर .... अले नुत्ता हाताय हाताय , तय तय लादे तवंदी तायला तिताय तिताय मग बर्‍याच प्रयत्नांनी आईच्या लक्षात यायचे ते गाणे...... अरे नाखवा हाकार हाकार, चल चल राधे करवंदी खायला चिकार चिकार... असे काहीसे ते गाणे होते. ह्याच्या आधी आणि पुढे काय होते ते आता आठवत नाही. पण त्याची टकळी चालूच असायची.

माझ्या लहानपणी आमच्या आजूबाजूला भरपूर वनसंपदा होती. त्यामुळे खूप सारी फुलपाखरे, चतुर, मधमाशा वगैरे असे उडणारे कीटक दिसत तसे लाल मुंग्या,काळ्या मुंग्या,डोंगळे,मुंगळे वगैरे वगैरेंचीही रेलचेल होती. ह्या माझ्या दादाला डोंगळे खायची सवय लागली. कशी ती माहीत नाही; पण दिसला डोंगळा की तो उचलून लगेच तोंडात टाकायचा. चावण्याची भिती वगैरे काहीच नव्हती. ही सवय मोडण्यासाठी आईने जंग जंग पछाडले पण तिचा डोळा चुकवून तो आपला कार्यभाग साधून घेत असे.मात्र एकदा एक डोंगळा त्याच्या जिभेला असा काही करकचून चावला की त्या दिवसापासून त्याची ती सवय आपोआप सुटली.

माझ्या धाकट्या भावाचे पराक्रम तर काही विचित्र होते. हे किस्से तो तीन-चार वर्षांचा असतानाचे आहेत. माझ्या वडिलांना तपकिरीचे व्यसन होते. ती तपकीरही साधीसुधी अथवा सुगंधी तपकीर नसायची. त्या काळात ’मंगलोरी’ ह्या नावाने मिळणारी अती कडक(स्ट्रॉंग) अशी ती तपकीर असायची. तपकिरीची डबी सदैव त्यांच्याजवळ असायची. थोड्या थोड्या वेळाने त्यातली चिमूटभर तपकीर ते नाकात कोंबत. हे सगळे माझा धाकटा भाऊ नेहमी पाहत असे. एकदा वडील काही कामात असताना त्यांचे लक्ष चुकवून ह्या माझ्या भावाने तपकिरीची डबी पळवली आणि आडोशाला जाऊन ती डबी उघडून त्यातील सगळी तपकीर आपल्या नाकात ओतली.जे व्हायचे तेच झाले. फटाफट शिंका यायला लागल्या आणि तो घाबराघुबरा झाला. आई-वडील आपापली कामे सोडून धावत पळत त्याच्याकडे गेले आणि त्याची सुश्रुषा करायला लागले. त्याला ह्या शिंका अचानक कशा यायला लागल्या हे आधी कळलेच नाही पण बाजूलाच पडलेली तपकिरीची डबी पाहिली आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. त्याचे वय अतिशय लहान असल्यामुळे त्याला ओरडून काहीच उपयोग नव्हता म्हणून आईने वडिलांनाच दोन शब्द सुनावले. पण त्या परिस्थितीत वडील शांत राहिले म्हणून पुढे बोलणे वाढले नाही.

ह्यानंतरचा पराक्रम तर काही और आहे. त्या काळात कोळसा आणि रॉकेल ह्यांचा वापर जळणासाठी करायचे. आमच्याकडे वीज नव्हती त्यामुळे चिमण्या-कंदील हे रॉकेलचे दिवे असत. तसेच रॉकेलचे स्टोव्ह असत. त्या सर्वांमध्ये रॉकेल भरण्याचे काम रोज चालत असे. हा माझा धाकटा भाऊ आईच्या अवतीभवतीच असायचा. डब्यातनं रॉकेल बाटलीत काढणे आणि बाटलीतनं ते स्टोव्ह,दिव्यांमध्ये भरणे ह्या गोष्टीचे रोज त्याचे निरीक्षण चाले. रॉकेलचा डबा,बाटली वगैरे सामान एरवी स्वयंपाकघरात एका कोपर्‍यात ठेवलेले असे. एक दिवस आई बाहेरच्या खोलीत कचरा काढत असताना हे महाशय स्वयंपाकघरात खेळत होते. खेळता खेळता त्याचे लक्ष त्या रॉकेलच्या बाटलीकडे गेले. ती अर्धी भरलेली होती. त्याने ती तशीच उचलली आणि तोंडाला लावली. त्यातले बरेच रॉकेल त्याच्या नाकातही गेले आणि जोराचा ठसका लागला. त्याचा तो विचित्र आवाज ऐकून आई धावत आली आणि तिने ते पाहिले मात्र. तिने कपाळाला हात मारून घेतला. पटापट त्याला तिथून उचलून बाहेर आणले. मिठाचे पाणी प्यायला लावून ओकून सगळे पोटातले रॉकेल बाहेर काढले तेव्हा कुठे तो नीट श्वास घेऊ लागला. आई मनातनं घाबरली होती पण प्रसंगावधान राखून तिने ते सगळे सोपस्कार केले म्हणून बरे नाहीतर फार गंभीर प्रसंग ओढवला असता.त्यानंतर आई त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेली आणि झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. डॉक्टरांनी त्याला नीट तपासले आणि काही काळजीचे कारण नाही असे सांगितले तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला. डॉक्टरांनी माझ्या आईच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.त्यानंतर आई प्रत्येक गोष्टीत काटेकोर झाली. अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी त्याच्या हाती लागू नये म्हणून वर फळीवर ठेवायला सुरुवात केली.

आठवणी!शालेय जीवनातल्या!१४

माझी शाळा अगदी घराजवळच होती. त्यामुळे शाळा भरल्याची,सुटल्याची, इतकेच काय प्रत्येक तास संपल्याची घंटा देखिल घरात ऐकू येत असे. शाळा भरल्याची घंटा वाजली की मी घरातून निघत असे आणि प्रार्थनेची सुरुवात होण्याच्या आधीच आपल्या जागेवर स्थानापन्न झालेला असे. मात्र ६वी पासून माझी वर्णी प्रार्थना म्हणणार्‍यांत लागल्यामुळे मला १० मिनिटे आधीच शाळेत पोचावे लागे.
प्रार्थनेला आमचे गाडगीळ सर पेटीवर साथ करत. शाळा तिमजली होती आणि आम्ही पहिल्या मजल्यावरच्या मार्गिकेमध्ये उभे राहून प्रार्थना म्हणायचो. सुरुवातीला शाळेत ध्वनिक्षेपकाची सोय नव्हती त्यामुळे प्रार्थना सगळ्या वर्गात ऐकू जायची नाही. म्हणून प्रार्थना सुरु होण्या आधी आणि नंतर, घंटेचा एक टोल वाजत असे. माझ्या समावेशामुळे प्रार्थना बर्‍याच वर्गात ऐकू जाऊ लागली असे बर्‍याच शिक्षकांकडून कळले. त्याबद्दल माझे आणि माझ्या आवाजाचे कौतुकही झाले. माझ्या पहाडी आवाजाचा हा असाही एक फायदा झाला.

आम्हाला दोन मधल्या सुट्ट्या असत. एक १५ मिनिटांची आणि दुसरी ३० मिनिटांची.
पहिल्या सुट्टीत पाणी पिण्यासाठी ही झुंबड उडायची म्हणून मी घरी येऊनच पाणी पीत असे. हळूहळू माझ्याबरोबर माझे वर्गमित्रही यायला लागले. मग हे प्रकरण इतके वाढले की आईने ओट्यावर एक नळ असलेला माठ आणि दोनचार भांडी ठेऊन सगळ्यांची सोय केली.

दुसर्‍या सुट्टीत मी जेवायला घरीच येत असे. जेमतेम दहा मिनिटांत जेवून उरलेला वेळ पुन्हा शाळेत जावून खेळण्यात घालवत असे. एकदिवस ह्या सुट्टीत मी घरी जाताना एक वर्गबंधू माझ्या बरोबर घरी आला. माझ्याबरोबर आईने त्यालाही जेवायला वाढले. त्यानंतर मग तो येतच राहिला . इतका की एखादे वेळेस मी घरी उशीरा पोचत असे पण हा माझ्या आधीच जावून पाटावर बसलेला असे. मला अस्सा राग यायचा त्याचा की काही विचारू नका. "रोज रोज कशाला रे येतोस माझ्या बरोबर जेवायला?" असे मी त्याला विचारले तरी तो काहीच उत्तर देत नसे. निमूटपणे जेवायचा आणि शांतपणे निघून जायचा. जेवण आटोपल्यावर तो माझ्या, बरोबर येण्याची देखिल वाट पाहात नसे.

मी आईला कितीतरी वेळा सांगितले की "तू त्याला जेवायला देत जावू नकोस. तो हावरट आहे. त्याचा डबा आधीच्या सुट्टीत खातो तेव्हा मलाही काही देत नाही आणि दुसर्‍या कुणालाही काही देत नाही. पक्का आप्पलपोटा आहे. रोज त्याच्या डब्यात छान छान पदार्थ असतात. शीरा,उपमा,थालीपीठ,घावनं,तुपसाखर पोळी,गुळसाखरपोळी तर कधी कधी पुरणपोळी देखिल असते; पण हा कुणाला त्याचा वासही देत नाही. ह्या अशा मुलाला तू कशाला लाडावून ठेवतेस? मला तो अजिबात आवडत नाही."

आई आपली नेहेमी एकच सांगायची, " अरे कसा ही असला तरी तुझा मित्रच आहे ना?"
मी, "नाही"! म्हणायचो. पण एक नाही आणि दोन नाही.
"अरे, दिल्याने आपले काऽऽही कमी होत नाही. भुकेलेल्याला अन्न आणि तहानेलेल्याला पाणी दिले की पुण्य लागते."
"तो काही भुकेलेला बिकेलेला नाही. चांगला चापून येतो स्वत:चा डबा आणि इथे येवून फुकट मध्ये खात असतो. त्याच्यापेक्षा एखाद्या भिकार्‍याला जेवायला घाल तू रोज. मी काही म्हणणार नाही."

पण माझ्या बोलण्याचा,त्रागा करण्याचा ना आईवर परिणाम व्हायचा ना त्या वर्गबंधूवर. माझ्या पुढे गहन प्रश्न पडला. आता ह्याला ह्या पासून परावृत्त कसे करायचे? काहीतरी युक्ती केली पाहिजे. पण काय करणार? शारिरीक दृष्ट्या मी दुबळा होतो त्यामुळे त्याला माराची भिती दाखवणे शक्य नव्हते आणि असे काही मी केले असे आईला कळले असते तर माझीच पाठ शेकली गेली असती. मग करावे तरी काय? बराच विचार केला पण काही सुचेना. मग मी हे माझ्या दुसर्‍या एका वर्गबंधुला विश्वासात घेऊन सांगितले आणि त्यावर त्याचे मत मागितले. तो चटकन म्हणाला, "आयला,त्यात काय आहे? तू त्याचा डबा खा मग बघ कशी खोड मोडेल ती."
"अरे पण त्याच्या डब्याला तो हात तरी लावू देईल काय? मग खाणे तर दूरच राहिले."
"तू पण ना चम्याच आहेस(खरे तर पम्याच). इतके कसे कळत नाही तुला की तो डबा खाण्याआधी हात धुवायला जातो, तेव्हाच त्याचा डबा लांबवायचा आणि शाळेच्या मागे जाऊन गुपचुप खायचा."
"अरे पण हे कसे शक्य आहे? तो शिक्षकांकडे तक्रार करेल ना माझी आणि मग इथे शिक्षक आणि घरी गेल्यावर आई माझी पाद्यपुजा करेल त्याचे काय? नाय बाबा. आपल्याला हे जमणार नाही."
"मग रडत बस." असे म्हणून त्या मित्राने माझा नाद सोडला. मी देखिल काय करावे आणि कसे करावे ह्या विवंचनेत गढून गेलो.

११ डिसेंबर, २००७

समिधा: एक मनमोकळे आत्मकथन!


वेदशास्त्रसंपन्न घुले घराण्यातील,अतिशय सनातन वातावरणात वाढलेली एक सुंदर तरूणी आणि दाढी, जटा,कफनी व दंडधारी,आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतलेला एक संन्यासी ह्यांच्यातील ही प्रेमकथा आहे. पहिल्याच नजरेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि वयात भरपूर अंतर असूनही विवाहबद्ध होतात. ह्यातील ती सुंदर तरुणी म्हणजे सौ.साधनाताई आमटे आणि तो संन्यासी म्हणजे मुरली देवीदास उर्फ बाबा आमटे हे सांगितल्यावर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण ही सत्यघटना आहे.

सुखवस्तु, सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून दारिद्र्य आणि खाचखळग्यांनी भरलेले आयुष्य जाणिवपूर्वक स्वीकारणे हे येरा-गबाळाचे काम नोहे हेच खरे. बाबा आमट्यांसारख्या लोकोत्तर पुरुषाची मर्जी सांभाळत, वेळप्रसंगी त्यांच्या चुका दाखवत त्यांच्या समाजसेवी कामात सर्वस्वी झोकून देणे म्हणजे एक प्रकारचे असिधारा व्रतच होय आणि हेच व्रत सौ. साधनाताई आजवर अखंडपणे पाळत आलेल्या आहेत. त्यातील सर्व घटनांचे त्रयस्थपणे केलेले निवेदन "समिधा" ह्या नावाने पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहे.

लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ हा प्रणयाराधनेत गेल्यानंतर हळूहळू बाबांच्या अलौकिक कार्याला साधनाताईंनी डोळसपणे वाहून घेतले. पहिला कुष्टरुग्ण पाहिल्यावर झालेली बाबांच्या मनाची अवस्था,त्याची सेवा करण्यासाठी साधनाताईंनी दिलेले अनुमोदन आणि प्रत्यक्ष सहभाग ह्याचे वर्णन वाचले की कळते की शिव-शक्तीचे मीलन म्हणजे काय असते. बाबा म्हणजे कामाचा झपाटा. त्यात चूक झालेली त्यांना अजिबात चालत नाही. अशा वेळी साक्षात जमदग्नीचा अवतार असलेल्या बाबांची मर्जी सांभाळणे आणि त्यावेळी त्यांच्या रोषाला पात्र ठरलेल्या व्यक्तिला पाठीशी घालून ती चूक आपल्यावर ओढवून घेणे; ही सगळी तारेवरची कसरत करणार्‍या साधनाताई म्हणजे साक्षात मायमाऊलीच होत.

जसजसा व्याप वाढत गेला तसतशी कामे वाढत गेली. सगळ्यांचा स्वयंपाक करणे(रुग्ण आणि इतर साथीदार), भांडी घासणे ही कामे साधनाताई एकट्यानेच करत. वर चार चार गाईंचे दुध काढणे, कुणाचे दुखले-खुपले बघणे, आपापसातील वाद सोडवणे आणि बाबांची सेवा करणे वगैरे असंख्य कामे त्या न थकता, न कंटाळता सतत हसतमुख राहून करतात हे वाचले की जाणवते की श्रमासारखा खरा आनंद दुसरा कशात नाही. अर्थात हे सगळे त्याच करू जाणे. सामान्य माणसाचे ते काम नाही.

उजाड, ओसाड जागी बस्तान बसविणे, साप,विंचूंचे आगर असलेल्या ठिकाणी सहजपणे वावरणे हे आपल्यासारख्या शहरात वाढलेल्या पांढरपेशांना कसे जमेल? पण लाडा-कोडात आणि सुखवस्तु वातावरणात वावरलेली ही स्त्री किती धिटाईने ह्या सर्व प्रसंगात वागते हे पाहिले की मग घरातल्या पाली-झुरळांना घाबरणार्‍या आपल्यासारख्यांना आपलीच कींव करावीशी वाटते. साधनाताईंच्या आणि बाबांच्या बाबतीत मात्र जितकी परिस्थिती विपरीत तितकाच काम करण्याचा उत्साह वाढतो हे पदोपदी जाणवते.

साधनाताईंचा हा जीवनप्रवास वाचताना पदोपदी आपण थक्क होत जातो. डॉ.प्रकाश आणि डॉ.विकास ह्या मुलांचे बालपण, डॉ.प्रकाशची पत्नी डॉ. मंदा ह्यांच्याबद्दलची कृतज्ञता, प्रकाश-विकास ह्यांनी बाबांचे समर्थपणे पुढे चालवलेले कार्य, बाबांचे भारत-जोडो अभियान, मेधा पाटकर आणि नर्मदा बचाव आंदोलन वगैरे वगैरे आणि त्या अनुषंगाने येणारी माहिती देखिल ह्या आत्मकथनात वाचायला मिळेल. तसेच बाबांची नियमित आजारपणं,त्यावेळची झालेली साधनाताईंची धावपळ आणि मनाची घालमेल, त्यातून बाबांचे सही सलामत वाचणे हे सगळे वाचताना आपणही नकळतपणे त्यात सामील होतो.

प्रत्येक कर्तबगार माणसाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. त्यात किंचित बदल करून मी म्हणेन की "प्रत्येक कर्तबगार माणसाच्या मागे एक ’कर्तबगार’ स्त्री असते. अशा कर्तबगार स्त्रीच्या पाठिंब्याशिवाय कोणताही पुरुष उच्चपदी पोचू शकणार नाही हे मात्र नक्की.

बाबा आमटे ह्यांचे आजवरचे लोकोत्तर समाजकार्य तर जगजाहीर आहेच. ह्या कार्यात तितकीच समर्थपणे साथ देणार्‍या साधनाताईंची ही सगळी कहाणी साहजिकच बाबांच्या भोवतीच गुंफलेली आहे. बुद्धिमान आणि कर्तबगार पती असलेल्या पत्नींच्या आत्मचरित्रात पतीकडून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल लिहिलेले आढळेल. त्या तुलनेत हे आत्मचरित्र खूपच वेगळे आहे.

प्रत्येकाने हे आत्मकथन जरूर वाचावे असे मी आवाहन करतो.

५ डिसेंबर, २००७

मी दुर्गा खोटे!

हिंदी-मराठी चित्रपट आणि मराठी नाटकात गाजलेल्या जुन्या पिढीतील एक स्त्री कलाकार म्हणजे श्रीमती दुर्गा खोटे. हे नाव उच्चारताच दुर्गाबाईंचे ते खानदानी रुप डोळ्यासमोर दिसू लागते.
अतिशय लाडाकोडात आणि ऐश्वर्यात वाढलेली लाडांच्या घरातली ही माहेरवाशीण लग्नानंतर खोट्यांच्या घरात गेली. खोट्यांचे घराणेही तितक्याच तोलामोलाचे होते. पण व्यापारात खोट बसून असलेले सगळे वैभव पार धुळीला मिळाले आणि खोटे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. माहेरच्या मदतीमुळे राहाण्याची सोय झाली तरी मानी बानूला(बानू हे दुर्गाबाईंचे माहेरचे घरगुती नाव) बापाच्या जीवावर जगणे अमान्य होते. ऐष आरामात लोळणार्‍या नवर्‍याला कमावण्याची अक्कल नव्हती त्यामुळे मग दुर्गाबाईंनाच हातपाय हलवावे लागले. त्यातून पदरात दोन मुलेही होती. ह्या अशा परिस्थितीमुळे आणि निव्वळ योगायोगामुळे दुर्गाबाईंनी तोंडाला रंग फासला आणि एका सुमार चित्रपटात भूमिका केली. पहिलाच अनुभव इतका भयाण होता की घरच्यांनी त्यांना ह्यापुढे चित्रपटात काम करायची बंदी केली. पण पुन्हा एक संधी प्रभातच्या व्ही. शांताराम ह्यांच्याकडून मिळाली आणि मग दुर्गाबाईंच्या वडिलांच्या सर्व वकिली अटी मान्य करून प्रभातने त्यांच्याशी करार केला. इथून मग दुर्गाबाईंनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही.हा सर्व इतिहास खुद्द दुर्गाबाईंच्या तोंडून ऐकण्यात गंमत आहे.
बालगंधर्व हे नाट्य सृष्टीचे चालते बोलते दैवत होते. त्यांच्याबद्दल दुर्गाबाई भरभरून बोलतात. तसेच समकालीन नट,नट्या ह्यांच्याबद्दलच्या आठवणींही त्यांनी शब्दबद्द केलेत.दुर्गाबाईंची दोन लग्ने झाली. त्यासंबंधीही त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्यांची दोन मुले बकुल आणि हरीन ह्यांच्याबद्दलही भरभरून लिहिलेय. त्यांची एक सून विजया हरीन खोटे(पुर्वाश्रमीच्या विजया जयवंत आणि सद्याच्या नामवंत दिग्दर्शिका आणि अभिनेत्री श्रीमती विजया मेहता)ह्यांच्या अनुषंगानेही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.दुर्गाबाईंचे दुसरे पती श्री.रशीद ह्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती देखिल ह्यात आहे.
दुर्गाबाईंनी कधी एकटीने तर कधी सिनेसृष्टीतील शिष्ठमंडळाबरोबर केलेल्या प्रवासाचे साद्यंत वर्णन वाचताना आपण त्यात रंगून जातो.आपली संपूर्ण चित्रपट आणि नाट्य कारकीर्द दुर्गाबाईंनी अतिशय समर्थ शब्दात उभी केलेय. ती त्यांच्याच शब्दात वाचण्यातली मजा काही औरच आहे. एकदा हातात घेतलेले हे पुस्तक पूर्ण वाचून होईस्तो खाली ठेववत नाही ह्यातच त्याचे यश सामावलेले आहे.

२७ नोव्हेंबर, २००७

श्वना!

हे व्यक्तिचित्र ह्याआधी मायबोलीच्या ’हितगुज दिवाळी २००७" च्या अंकात प्रकाशित झालेले आहे.


"झालेत?" (झेंडू मधल्या झ चा उच्चार)
"भिजवलेत?" (जवान मधला ज चा उच्चार)?
"टॅम हाय?"
निरनिराळ्या वेळी येणार्‍या अशा निरनिराळ्या हाकांचा मालक म्हणजे 'श्वना'! नाव ऐकून गोंधळ होतोय ना! अहो होणारच! कारण असे कुणाचे नाव मी सुद्धा अजून पर्यंत ऐकलेले नाहीये. मग हा श्वना कोण? ऐकायचंय तर ऐका!

बाणकोटचा बाल्या सरळ मुंबईत आला तो आमच्या गावात म्हणजे मालाडला(मुंबई).तो इथे आला म्हणण्यापेक्षा आणला गेला. मला काही कळायच्या आधीपासूनच तो आलेला होता म्हणजे माझ्यापेक्षा चांगलाच मोठा होता(तरीही सगळे त्याला एकारान्तीच हाक मारायचे). त्याचे लग्न झालेले होते. एकदोन मुलेही होती; पण हे सगळे कुटुंब गावीच असायचे. क्वचित प्रसंगी दोनचार दिवस मुंबईला येत तेवढेच.
आम्ही ज्या चाळीत राहात होतो त्या चाळीच्या मालकांकडे हा घरगडी म्हणून होता.पण फावल्या वेळात आणि मालकांच्या परवानगीने वाडीतल्या एकदोन घरांतील धुणी-भांडी करत असे. सकाळी त्याच्या दोन फेर्‍या होत असत. एक १०च्या सुमारास कपडे धुण्यासाठी.
"भिजवलेत?" ह्या त्याच्या हाकेने त्या घरातल्या गृहिणीला साद घातली जात असे. मग साधारण एक-दीडच्या सुमारास जेवणं "झालेत?" अशा तर्‍हेची साद असायची आणि रात्री साडेआठ-नवाच्या सुमाराला "टॅम हाय?" अशा त्याच्या साद घालण्याच्या वेळा आणि पद्धती ठरलेल्या होत्या.

जेमतेम पावणे पाच फूट उंच,काळा कुळकुळीत पण तुकतुकीत रंग,रापलेला तरीही हसमुख चेहरा, अंगमेहनतीची कामे करून झालेली पीळदार पण कृश(मांसल नसलेली) शरीरयष्टी असणार्‍या ह्या श्वनाचा अंगात जाळीचा बनियन आणि कमरेला निळ्या रंगाची अर्धी चड्डी असा बारा महिने तेरा काळचा गणवेश होता. त्यात क्वचित बदल असे तो खूप थंडी असेल तेव्हाच. तो म्हणजे डोक्याला मफलर बांधणे इतकाच. धुण्या-भांड्याला थोडा अवकाश आहे असे कळले की मग खिशातून विडी-काड्यापेटी काढून त्याचे अग्निहोत्र सुरु व्हायचे.

ह्याचे खरे नाव 'यशवंत' असे होते; कधी मधी तो, आधीची हाक ऐकू गेली नाही असे वाटले की "यशवंता आलाय" असे ओरडायचा. आम्हा मुलांना त्याचा उच्चार 'श्वना' असाच ऐकायला यायचा. कदाचित तो त्याच्या बोलण्यातला अथवा आमच्या ऐकण्यातला दोष असावा; पण आम्ही मुले त्याला 'श्वना' च म्हणायचो आणि त्याबद्दल त्याची कधीच तक्रार नसायची.
आमच्या चाळीच्या पुढे मोठे अंगण होते आणि त्यात एक मोठे बकुळाचे आणि चिंचेचे झाड होते. श्वना भांडी अंगणात त्या झाडांखाली बसून घासायचा. त्याचे ते भांडी घासणे पण 'खास' असायचे. मी तर त्याच्या समोर बसून त्या सगळ्या क्रिया मंत्रमुग्ध होऊन पाहात असे. मधे मधे त्याच्याशी गप्पा देखील मारत असे. माझे बघून कधी तरी वाडीतली इतर मुलेही तिथे येत. श्वना आमची थट्टा मस्करी करायचा आणि आम्हालाही ते आवडायचे.

भांडी आणि पाण्याची बादली घेऊन श्वना अंगणात आला की मी त्याच्या जवळ जायचो.एका हातात भांड्यांचा डोलारा सावरत (मारुतीने द्रोणागिरी कसा उचलला होता त्या स्टाईलीत) आणि दुसर्‍या हातात पाण्याने भरलेली बादली.अशा अवस्थेत श्वनाचे ते दंडाचे आणि पोटर्‍यांचे फुगलेले स्नायु पाहिले की मला तो साक्षात बजरंगबलीच वाटायचा. प्रथम तो सगळ्या भांड्यांवर थोडे थोडे पाणी शिंपडून ती ओली करायचा. मग त्यातलीच एखादी छोटी वाटी नीट घासून घेऊन ती एका पायाच्या टाचेखाली ठेवायचा. नंतर मग नारळाची शेंडी पाण्याने ओली करून आणि तिला माती फासून भांडी घासायला सुरुवात करायचा. त्यातही एक विशिष्ट पद्धत होती. सुरुवातीला चिल्लर चमच्या-वाट्यांपासून सुरुवात करून सर्वात शेवटी तो ताटं घासायचा. मोठी भांडी घासताना तो थोडा जोर लावत असे. तो जोर लावतेवेळी जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला त्याच्या त्या टाचेखाली वाटी ठेवण्याचे रहस्य कळले.त्यामुळे कमी जोर लावून भांडे लवकर स्वच्छ घासले जाई.

भांडी विसाळताना तो उलट्या क्रमाने विसाळायचा. म्हणजे आधी मोठी आणि पसरट ताटं,मग पातेली ,मग तांबे,पेले,वाट्या,कालथे,डावले-चमचे वगैरे. त्यामुळे व्हायचे काय की विसाळलेली भांडी एकात एक नीट रचता यायची आणि उचलून नेण्यात सहजता यायची. माझ्या त्या बालपणी स्टेनलेस स्टीलचा नुकताच जन्म झालेला होता त्यामुळे बहुसंख्य घरातून अजूनही तांब्या-पितळ आणि ऍल्युमिनियम(जर्मन असेही काही लोक म्हणत)ह्या धातुंची भांडी वापरली जात. श्वनाने घासलेली ती भांडी इतकी लखलखीत असत की आपला चेहराही त्यात मी पाहून घेई.भांडी घासण्यातही शास्त्र असते हे मी त्याच्याकडून शिकलो.

श्वना कपडे कसे धुवायचा हे कधी पाह्यला मिळाले नाही कारण तो ते मोरीत धुवायचा.अशावेळी लोकांच्या घरात जाणे शक्य नव्हते. श्वना आमच्याकडे काम करत असता तर कदाचित ते देखिल कळले असते. माझी आई स्वावलंबनाची पुरस्कर्ती असल्यामुळे तिने असल्या कामासाठी कधी गडी वापरले नाहीत; पण श्वना कपडे वाळत कसा घालायचा हे मात्र पाहायला मिळायचे. कारण अंगणातल्या दोर्‍यांवरच सगळ्यांचे कपडे वाळत पडायचे. धुऊन घट्ट पिळलेले कपडे बादलीत घालून श्वना अंगणात आला रे आला की मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहात असे. प्रत्येक कपडा नीट झटकून आणि उलगडूनच तो दोरीवर अगदी व्यवस्थितपणे वाळत घालत असे. अहो छोट्या कपड्यांचे ठीक आहे पण त्याकाळी बायका नऊवारी लुगडी,आणि पुरुष धोतरे देखिल नेसत. मग ती कशी तो वाळत घालत असेल हा देखिल एक प्रश्नच आहे नाही का?त्याचेही शास्त्र श्वनानेच मला शिकवले(म्हणजे निरिक्षणातूनच मी ते शिकलो). त्या बादलीतलच तो ती लुगडी आणि धोतरे एकेक करून हळूहळू उलगडत असे आणि त्यांची चौपदरी घडी घालून, नीट झटकून मगच दोरीवर वाळत घालत असे. हे करताना चुकुनही कधी लुगड्याचा अथवा धोतराचा एखादा भाग बादलीच्या बाहेर गेलाय असे होत नसे इतकी त्याच्या कामात कमालीची सफाई होती.

श्वना कोकणी बाल्या असल्यामुळे साहजिकच नारळाच्या झाडांवर चढण्यात पटाईत होता. कमरेला कोयता अडकवून अगदी खारूताईच्या सहजतेने तो बघता बघता वर पोचत असे आणि नारळ पाडून झाले की तितक्याच लीलयेने खाली येत असे. आम्हा मुलांना त्याची खूप गंमत वाटायची. त्याकाळी आमच्या आजूबाजूला इतकी झाडी होती, वनराई होती की त्यामुळे साप वगैरेंचे असणे हे नैसर्गिकच होते. अशा परिस्थितीत साप मारण्याचे काम हे मुख्यत: श्वनावरच असे. तेव्हा साप हा माणसाचा मित्र वगैरे कल्पना लोकांपर्यंत पोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे साप दिसला रे दिसला की तो मारायचा इतकेच माहित असल्यामुळे आम्ही मुलं जाऊन त्याला सांगत असू की मग तो हातात असेल ते काम सोडून हातात त्रिशुळ घेऊन यायचा(मालकांनी हा त्रिशुळ खास श्वनाच्या सांगण्यावरून बाळगला होता).त्यावेळी श्वनाचे रूप बघण्यासारखे असायचे. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे तेज विलसत असायचे . आम्हाला तो खूप शूर वाटायचा. श्वनाचे साप मारण्यातले प्रावीण्य इतके कमालीचे होते की त्याचा वार क्वचितच फुकट जात असे. तो त्रिशुळ अशा तर्‍हेने चालवी की त्रिशुळाच्या मधल्या टोकाने नेमका सापाच्या डोक्याचा वेध घेतला जायचा. मग सापाला तसाच त्रिशुळाने टोचलेल्या अवस्थेत मिरवत मिरवत आम्हा मुलांसह ती मिरवणूक सबंध वाडीत फिरत असे.

मला तर सापांबद्दल जाम भिती वाटायची; पण तरीही आमच्या गप्पात सापाचा विषय हमखास यायचा. कधीतरी श्वनाकडे हा विषय काढला की मग त्याची रसवंती सुरु व्हायची. मग कोणता विषारी,कोणता बिनविषारी हे तो सांगायचा. त्यात 'नानेटी' नावाचा एक पट्टेवाला साप असतो आणि एकाला मारले की लागोपाठ सात नानेट्या कशा बाहेर येतात. त्या सगळ्यांना मारले नाही तर मग तो डुक ठेवतो आणि आपल्याला चावतो... वगैरे गोष्टी ऐकल्या की आमची सगळ्यांची पाचावर धारण बसे. आता त्या गप्पा आठवल्या की माझेच मला हसू येते.सापांबद्दल किती चित्रविचित्र कल्पना आणि गैरसमजूती आम्ही बाळगून होतो तेव्हा.

गौरी गणपतीला श्वना गावी जायचा तो मात्र दिवाळी करूनच यायचा. वर्षातली ही सुट्टी सोडली तर त्याने कधी सुटी घेतली नाही. संध्याकाळी अंगावर एक शर्ट चढवून एका विशिष्ठ ठिकाणच्या अड्डयावर थोडा वेळ समव्यवसायी गाववाल्यांबरोबर तासभर गप्पा मारल्या की त्याचा दिवसभराच्या कामाचा शीण दूर होत असे. कधीमधी देशी दारूची आचमनं देखिल चालत पण ते सगळे एका मर्यादेपर्यंतच होते.
असेच जीवन कंठता कंठता श्वना म्हातारा कधी झाला तेही कळले नाही कारण त्याच्या दृष्यरुपात कोणताच फरक पडलेला नव्हता. फरक पडलाच होता तर त्याच्या शारिरिक क्षमतेवर. नियमित विडी ओढण्यामुळे छातीचे खोके झाले होते. आताशा त्याने वाडीतील कामे देखिल सोडून दिली होती. कसेबसे मालकांचे काम तो करत होता.असाच एकदा गणपतीला तो जो गेला तो पुन्हा कधीच आला नाही. आपल्या गाववाल्यांबरोबर "आता मुंबईला पुन्हा कधी येणार नाही" असा निरोप धाडला आणि त्यानंतर त्याच्याबद्दल काहीच कळले नाही.

आज श्वना जर जीवंत असलाच तर त्याने वयाची सत्तरी नक्कीच ओलांडलेली असेल.कसा असेल तो आता? त्याला आमची आठवण येत असेल काय? कुणास ठाऊक!त्याला आठवत असेल नसेल ठाऊक नाही पण त्याने माझ्या बालपणात जे रंग भरले होते ते मी कधीच विसरणार नाही.

२३ नोव्हेंबर, २००७

बाबूल मोरा! २

"सैगल साहब! आपने इतने सारे गाने जो गाये है और उसमेसे बहूत सारे लोकप्रिय भी हुये है! क्या आप बता सकते है की इनमेसे कौनसा गाना सबसे ज्यादा, आपको पसंद है?"
माझा प्रश्न ऐकताच सैसा हसले आणि कोणताही कलाकार जे उत्तर देईल तेच, म्हणजे "जैसे माँ को तो सभी बच्चे प्यारे होते है वैसे ही मुझे मेरे गाये हुये सभी गाने उतनेही प्यारे है. उसमे कोई ज्यादा,कोई कम नही हो सकता!" असे म्हणाले.
"लेकीन मुझे तो आपने गाया हुआ 'बाबुल मोरा नैहर छुटोही जाय' यही गाना सबसे ज्यादा प्रिय है! मैं तो गये कितने सालोंसे उसके पीछे पागल हुआ हूँ.आपकी क्या राय हैं इस बारेमे?".... मी.
काही क्षण सैसांनी डोळे मिटले आणि त्या गाण्याचा पूर्व-इतिहास आठवण्यात दंग झाले. मग एकदम दचकून जागे झाल्यासारखे करत म्हणाले, " अरे वो गाना तो मेरे कलेजेका टुकडा है रे! 'आर सी बोराल' साहबने क्या धुन बनाई है! जितनी भी बार वो गाना गाता हूँ तो बाकी सबकुछ भूल जाता हूँ! सच कहूँ तो लब्जोमें बयाँ करना मुश्किल है!" आणि सैगल साहेब पुन्हा जुन्या आठवणीत हरवले.

"मोद'बुवा'! अहो तुम्ही काय ती तुमची कल्पना सांगणार होता ना? केव्हांपासून मी वाट पाहतोय, तुम्ही त्याबद्दल काही बोलतच नाहीये. आता काय ते चटकन सांगा बघू." अण्णा कृतक कोपाने म्हणाले.
"अण्णा! मी ह्या गाण्याबद्दलच म्हणत होतो की....
तेव्हढ्यात सैसा त्यांच्या भावसमाधीतून जागे झाले आणि नकळतपणे गुणगुणायला लागले. मी पटकन त्या नोकराला खुणेने पेटी आण म्हणून सांगितले आणि त्यानेही अतिशय तत्परतेने पेटी आणून सैसांच्या पुढ्यात ठेवली. सैसांनी पेटी उघडली आणि सहजतेने त्यावर बोटे फिरवत हलकेच भैरवीची स्वरधून छेडली आणि पाठोपाठ गळ्यातून तो ओळखीचा खर्ज उमटला.
आहाहाहा!सगळे अंग रोमांचित झाले.
"बाबुल मोराऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ नैहऽऽऽर छुटोऽऽही जाय." सैसा मुक्तपणे गाऊ लागले.

मी अण्णांकडे पाहिले. त्यांचीही भावसमाधी लागली होती. सैसा गातच होते आणि आम्ही सगळे त्यात रंगून गेलो होतो. मधेच थांबून सैसा म्हणाले, "भीमसेनजी! आपभी सुरमे सुर मिलाईये ना!"
अण्णा मनातल्या मनात सैसांबरोबर गातच होते. अशा तर्‍हेचे आवाहन ते वाया कसे जाऊ देतील. त्यांनीही आपला आवाज लावला आणि मग त्या दोन 'तानसेनांची' ती अवर्णनीय जुगलबंदी सुरु झाली.एकमेकांवर कुरघोडी करणारी जुगलबंदी नव्हती ती! ती तर एकमेकांसाठी पुरक अशीच होती. अण्णांच्या गळ्यातुन येणार्‍या त्या भैरवीच्या करूण सुरांनी सगळे वातावरणच भारुन गेले. अण्णांच्या सुरांची जादूच अशी होती की सैसांनी मग फक्त धृवपद गाण्यापुरताच आपला सहभाग ठेवला.

"चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें" ह्यातल्या "डोलिया" वर पोचलेला अण्णांचा आर्त 'तार षड्ज' काळजाचे पाणी पाणी करत होता. सैसांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु झरायला लागले. "क्या बात है!", "जियो!" अशी वाहवा त्यांच्या मुखातून निघू लागली. सैसांसारख्या तानसेनाची दाद मिळाल्यामुळे अण्णांना नव्या नव्या जागा दिसायला लागल्या आणि त्या त्यांच्या गळ्यातून निघताना त्यांच्या चेहर्‍यावरची ती तृप्ती खूप काही सांगून जात होती. मी तर त्या स्वरसागरात आकंठ बुडालो होतो. मधेच अण्णांनी मला खूण केली आणि माझ्या नकळत मीही गाऊ लागलो. अण्णा(माझे मानसगुरु) आणि सैसा ह्यांच्या गाण्याचा आणि सहवासाचा परिणाम म्हणा किंवा जे काही असेल त्याने माझाही आवाज मस्त लागला होता आणि कधी अण्णांची तर कधी सैसांची नक्कल करत मीही उन्मुक्तपणे गाऊ लागलो. त्यांची दादही घेऊ लागलो. मधेच सैसा देखिल एखादी छोटी नजाकतदार तान घेऊन अण्णांना प्रोत्साहन देत होते आणि अण्णा मला. कधीच संपू नये असे वाटणारा तो क्षण होता.

दुसर्‍या कडव्यातील "जे बाबुल घर आपनो मैं चली पिया के देश" मधल्या "पियाऽऽऽ" वर सैसांनी केलेला किंचित ठेहराव पुन्हा काळजाला हात घालून गेला. अण्णांनी तर ह्या ठिकाणी नतमस्तक होत सैसांना वंदन केले. धृवपद गाऊन सैसांनी भैरवीची समाप्ती केली आणि आनंदाच्या भरात अण्णांना कडकडून मिठी मारली. ते दृष्य पाहात असताना माझ्या डोळ्यांचेही पारणे फिटले.मघाशी कान तृप्त झाले आता डोळेही तृप्त झाले.ज्या साठी हा सगळा बनाव मी घडवून आणला होता तो त्या दोघांच्या नकळत त्यांनीच सहजसाध्य केलेला पाहून मी कृतकृत्य झालो. इथे मला तुकाराम महाराजांच्या त्या वचनाची प्रकर्षाने जाणीव झाली, "ह्याच साठी केला होता अट्टहास,शेवटचा दिस गोड व्हावा!"

बराच वेळ दिवाणखान्यात एक प्रसन्न शांतता नांदली. त्या शांततेचा भंग करत अण्णा म्हणाले, "काय मोद'बुवा'! आता तरी सांगणार काय तुमची कल्पना?"
"अण्णा! मी सांगायच्या आधीच तुम्ही दोघांनी ती काही प्रमाणात मूर्त स्वरुपात आणलीत."
"म्हणजे? मी नाही समजलो!"
"सांगतो ऐका! त्याचं काय आहे अण्णा! माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक कल्पना आहे. सैगल साहब आप भी सुनिये!.............

"आणि तू मला तेव्हढ्यात उठवलेस. काय मस्त बैठक जमली होती."
"कमालच आहे बाबा तुमची. अहो सैसा जाऊन कितीतरी वर्षे झाली आणि भीमसेन आजोबाही आता खूप थकलेत. तरीही तुमच्या बरोबर ते गात होते? तुम्ही काही म्हणा पण तुमची स्वप्नं देखील अफलातून असतात बाकी!"
"अगं! देहरुपाने सैसा आता नसले तरी ह्या 'बाबुल मोरा' च्या रुपात ते सदैव माझ्यासोबत असतात आणि अण्णा जरी शरीराने थकले असले तरी त्यांचे गाणे माझ्या हृदयात आजही तरूण आहे. ही कलावंत मंडळी म्हातारी होवोत अथवा ह्या जगाचा निरोप घेवोत पण त्यांची कला 'चिरतरूण' आहे हे विसरु नकोस. तिला कधीही मरण नाही."
"हे मात्र पटलं बाबा !"

दूर कुठे तरी रेडिओ गात होता, "बाबुल मोरा नैहर छुटोही जाय!"

समाप्त.

थोडीशी पूर्वपिठिका:
बरेच दिवस माझ्या डोक्यात स्वर्गीय कुंदनलाल सैगल ह्यांनी गायलेलं आणि अजरामर झालेलं 'बाबुल मोरा' ठाण मांडून बसलंय.सैगलसाहेबांची तशी सगळीच गाणी मला आवडतात; पण हे गाणं त्यातले शिरोमणी म्हणावं असे आहे. माझेच काय मोठमोठ्या गवयांना देखिल 'बाबुल मोरा' ने भूल घातलेय. ठुमरीच्या अंगाने जाणारे भैरवी रागातले हे गीत असल्यामुळे बर्‍याचदा शास्त्रीय मैफिलींचा शेवट देखिल ह्याच भैरवीने करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आलेला नाहीये. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींनी देखिल ही भैरवी गायलेली आहे.त्याची ध्वनीफितही माझ्याकडे आहे. तसेच गिरिजा देवींकडूनही हीच भैरवी ठुमरी एकदा कधीतरी ऐकल्याची स्मृती अजूनही ताजी आहे.
रोज न्हाणीघरात स्नानाच्या वेळी मी ह्याच गाण्यावर निरनिराळे प्रयोग करत असतो. तेव्हा मनात एक कीडा आला की आपण ह्या गीताचे 'फ्युजन' की काय म्हणतात ते का करू नये? सैसा,भीमसेन आणि गिरिजादेवी ह्या तिघांनी मिळून हे गीत गावे असे मला वाटते. मात्र प्रत्येक वेळी धृवपद सैगलसाहेबच गातील. त्यामुळे गाण्याला एक वेगळाच उठाव येईल असे माझे मत आहे.सगळ्यांचे गाऊन झाल्यावर मग त्याचे संपादन करून जे काही बनेल ते नक्कीच अफलातून असेल.अर्थात ही निव्वळ कविकल्पना आहे हे मला ठाऊक आहे. पण कशी वाटली कल्पना? आवडली का तुम्हाला?

अवांतर: मला संगीतातले तसे काही कळत नाही. पुलंच्या 'रावसाहेबां' इतकेच माझे संगीत विषयक ज्ञान आहे ह्याची कृपया संगीतज्ञांनी नोंद घ्यावी.

हाच लेख इथेही वाचता येईल.

२१ नोव्हेंबर, २००७

बाबुल मोरा!१

"अहो बाबा! उठा!"
माझी कन्या मला गदगदा हलवून जागे करत होती.
"काय शिंची कटकट आहे? सुखाने झोपू पण देत नाही." त्रासिकपणे उद्गारत मी धडपडून उठलो.
"काय झाले? कशाला ऊठवलेस? चांगली मस्त झोप लागली होती."
"अहो, पण झोपेत ते सारखं ’बाबुल मोरा,बाबुल मोरा’ काय चाललं होतं तुमचं? मधेच जोरजोरात गात काय होता. काय प्रकार काय आहे?"...कन्यारत्न उद्गारले.
"सांगतो. जरा आठवू दे. हं! तर काय छान स्वप्न पाहात होतो मी.....


बरेच दिवस एक कीडा मनात वळवळत होता.उठता बसता तो स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी एकदाचा निर्णय घेतला आणि मी
भीमसेन अण्णांना फोन केला, "अण्णा मी मोद बोलतोय. आत्ता येतोय तुमच्याकडे. आल्यावर बोलू".
तसाच सैगलसाहेबांना फोन केला, " सैगलसाहब मैं मोद बोल रहा हूं! आपके घर आ रहा हूं. आनेके बाद बात करेंगे"!
फोन ठेवला. गाडी काढली आणि तडक कलाश्री गाठले. अण्णा माझीच वाट पाहात होते.
" काय मोद’बुवा’? इतक्या घाईत काय काम काढलंत?"(अण्णा मला गमतीने मोद’बुवा’म्हणतात आणि अहो-जाहो करतात.फिरकी घेण्याची सवय आहे त्यांना!)
"अण्णा! एक मस्त कल्पना आहे. तुम्ही आधी हो म्हणा मग सांगतो".
"अहो पण कल्पना काय ती तर सांगा."
"नाही अण्णा. आपल्याला लगेच निघायचे आहे. इथून आपल्याला मुंबईला जायचेय.मी तुम्हाला गाडीत सांगतो. तुम्ही कपडे बदलून या लवकर".
अण्णा बघतच राहिले पण माझ्या विनंतीला मान देऊन दोन मिनिटात कपडे बदलून हजर झाले.आम्ही गाडीत बसलो. मी प्रथम टेपरेकॉर्डर सुरु केला. सैगलसाहेबांचे ’बाबुल मोरा’ सुरु झाले आणि ते स्वर कानावर पडताच अण्णा प्रश्न विचारायचे विसरले. गाण्यात रंगून गेले.
"काय आवाज आहे ह्या माणसाचा? खर्ज असावा तर असा"! अण्णा मनापासून दाद देत होते.
"मोद’बुवा’तुमची आवड देखिल भारी आहे हो. अहो आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण अगदी खरे आहे!सांगतो ऐका. माझ्या उमेदवारीच्या काळात मी देखिल सैगल साहेबांची नक्कल करायचा प्रयत्न केलाय. ह्या माणसाने गायलेली सगळीच गाणी गाजलेली आहेत. पण फक्त हे एकच गाणे जरी ते गायले असते ना तरीही ते अवघ्या संगीत विश्वात अजरामर ठरले असतेच ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.दैवी वरदहस्त बरं का! आपण नशीबवान, म्हणून असे स्वर्गीय गायन आपल्याला ह्याच जन्मी ऐकायला मिळतंय."
"अण्णा! तुम्ही देखिल ही भैरवी गायलेय. माझ्याकडे आहे त्याची ध्वनीफित.तुम्ही देखिल बहार उडवलेत त्यात.आता तुम्हाला माझी कल्पना सांगतो."
अण्णा सरसावून बसले. तेव्हढ्यात आमची गाडी सैगल साहेबांच्या बंगल्यात पोचली देखिल.
"अहो,हे काय ’बुवा’? आपण कुठे आलोय? हे कुणाचे घर आहे?"
"अण्णा,जरा धीर धरा. काही क्षणातच तुम्हाला ते कळेल."

मी दारावरची घंटी वाजवली. नोकराने येऊन दार उघडले. आत गेलो आणि समोर पाहिले.दिवाणखान्यात सोफ्यावर साक्षात सैगल साहेब माझी वाट पाहात बसले होते.अण्णांची आणि त्यांची दृष्टभेट झाली मात्र!क्षणभर दोघेही विस्फारलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहात राहिले.जन्मजन्मांतरीची ओळख पटली आणि दोघांचेही डोळे झरू लागले. अण्णा चटकन खाली वाकले सैगल साहेबांना नमस्कार करायला.सैगलसाहेबांनी त्यांना ऊठवून आलिंगन दिले.त्या दोन तानसेनांची भेट पाहताना मी आणि तो नोकर आम्ही दोघेही गहिवरून गेलो होतो.
"अहो ’बुवा’,किती सुखद धक्का दिलात ? नाही हो सहन होत आता ह्या वयात!आधी नाही का सांगायचंत?"
"बेटे,भीमसेनजी कहां मिले तुझे? अच्छा किया जो इन्हे अपने साथ लाया.इनका स्वर्गीय गाना तो मैं अक्सर सुनता रहता हूं! मगर ये कंबख्त बुढापा, कही जाने नही देता.कबसे इनको मिलनेके लिये जी तरस रहा था.जूग जूग जियो बेटे.तूने मेरा बहोत बडा काम किया हैं जो इनसे मिलाया.आज मैं तुझपर खुश हूं, तू जो कहेगा मैं करूंगा."
"मोद’बुवा’,मी देखिल आज तु्मच्यावर खुश आहे बरं का. माझे देखिल ह्या तानसेनाला साक्षात भेटण्याचे स्वप्न तुम्ही सत्यात आणलेत त्याबद्दल तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. बोला. काय करु?"
"अण्णा, ते मी सांगणारच आहे पण आधी आपण ह्या चहाचा आस्वाद घेऊ या आणि मग बोलू निवांतपणे."
नोकराने आणलेला चहाचा ट्रे घेत मी म्हटले. माझ्या ह्या बोलण्यावर त्यांनी सहमती दर्शवली आणि मग आमचे चहापान सुरु झाले.

१९ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!६

खोलीवर परत आलो.माझी शबनम पिशवी घेतली (जिच्यात आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडतील अशा काही गोष्टी मी नेहमी बाळगत असे. जसे की चश्मा.खरे तर डोळ्य़ात नेत्रस्पर्षी भिंगे असत पण कधी धुळीचा त्रास होऊन ती भिंगे काढावी लागत आणि अशा वेळी चश्मा उपयोगी पडत असे.त्याबरोबरच विजेरी,सुईदोरा,कात्री,चाकू,एक निऑन टेस्टर,काड्यापेटी आणि मेणबत्ती अशी सगळी वेळप्रसंगी उपयोगी पडणारी सामग्री माझ्या ह्या शबनम पिशवीत असे) आणि पुन्हा रस्त्यावर आलो.समोरच कालूपूर बसडेपो होता तिथे गेलो.डेपोमध्ये भरपूर बस होत्या पण चालक-वाहकांचा कुठेही पत्ता नव्हता. ह्याचा अर्थ बस चालणार नव्हत्या हे नक्की झाले.मग आता काय करायचे. तिथून पुन्हा स्टेशनवर आलो.तिथेही बरेच लोक रिक्षा,टॅक्सी नसल्यामुळे ताटकळत बसल्याचे दिसले.म्हणजे एकूण सर्व वाहतूक व्यवस्था बंद होती हेही नक्की झाले.

मी आपले एका पोलिसाला विचारले की सॅटेलाईटला मला जायचे आहे तर कसे जाता येईल? त्याने एकदा मला आपादमस्तक न्याहाळले आणि म्हणाला, "तमे अंया नवा छो केम?तमने खबर नथी के आजे बंद छे?"
मी म्हटले, " एम तो हूं मुंबईना छूं अने अंया सरकारी काम माटे आवेला छूं! मने खबर तो छे के आजे बंद छे पण मारे जाऊज जोईये केमके हूं ड्युटी उपर छूं आने मारी हाजरी बहू जरूरी छे!"
मुंबईचा आणि त्यातून सरकारी माणूस म्हटल्यावर त्याचा आवाज जरा सौम्य झाला.पण तरीही "सॅटेलाईट अंयाथी बहू दूर छे. तमे कोई पण वाहन वगर त्यां नथी जई शकाय" असे त्याने ठासून सांगितले.
मग दूसरा काही मार्ग असल्यास सांग असे म्हटल्यावर त्याने मला सांगितले की "तमे काई पण करीने (म्हणजे पायीच की) लाल दरवाजा(एका विभागाचे नाव) पोचशो तो कदाच त्यांथी तमने एसटी मळशे. एनी पण गेरंटी नथी. पण मारी वात सांबळो, आजे माहोल बहू खराब छे. होई शके तो तमे अंयाच रेवो".
त्याचा सल्ला ऐकून माझा सगळाच उत्साह मावळला. तरीही बघूया तरी तो लाल दरवाजा किती दूर आहे ते. नाहीतरी इथे बसून वेळ कसा जाणार म्हणून मी त्या पोलिसाचा निरोप घेऊन पुन्हा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो.

रस्त्यावर आलो तेव्हा अतिशय तुरळक अशी वर्दळ दिसत होती. एखाद दूसरा माणूस आपल्याच नादात स्टेशनच्या दिशेने जाणारा दिसत होता. अशाच एकाला मी लाल दरवाजा इथून किती दूर आहे असे विचारल्यावर "बहू दूर छे" इतकेच उत्तर देऊन चटकन पसार झाला. आता विचारायचे तरी कोणाला? जाऊ दे! पाय नेतील तिथे जाऊ. कदाचित त्यातच सापडेल. लाल दरवाजा दिवसा उजेडी सापडायला काय हरकत आहे असा विनोदी विचारही माझ्या मनात आला. लांबूनच त्याचा लाल रंग दिसेलच की. उगीच कशाला कुणाला भाव द्या असा विचार करून मी चालायला लागलो.

माझ्या एकूण विक्षिप्त दिसण्यामुळे आणि दिशाहीन भरकटण्यामुळे नाही म्हटले तरी मी रस्त्यातल्या लोकांच्या डोळ्यात चांगलाच खूपत असलो पाहिजे असे मला जाणवले. कारण माझ्याकडे ते अगदी टक लावून बघत असायचे. माझी आणि त्यांची नजरानजर झाली की नजर चोरायचे पण मग पुन्हा हळूच वळून बघायचा प्रयत्न करायचे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मलाही त्यात गंमत वाटू लागली. अर्थात त्यांच्या नजरेचा अर्थ काय असावा हे मला माहित नव्हते पण आपल्याकडे कुणीतरी बघतंय म्हणजे आपण कुणीतरी खास आहोत असे मला उगीचच वाटायला लागले.ह्या भरात मी कितीतरी अंतर पार केले होते. आता उन चढायला लागले होते आणि चालून चालून थकायला झाले होते. कुठे तरी चहा-पाणी मिळाले तर बरे होईल असे मनात म्हणत होतो पण सगळी दुकाने बंद दिसत होती. नाईलाज म्हणून चालतच होतो. कुठे जात होतो ते माहित नव्हते पण जायचे कुठे ते मात्र पक्के डोक्यात होते.

तास दोन तासांची पायपीट झाली होती. मी पार थकलो होतो.कोरड्या हवेमुळे घाम येत नव्हता पण आता अंग भाजायला लागले होते आणि पिण्याचे पाणी कुठे मिळेल असेही वाटत नव्हते.सुदैवाने तिथे एक छोटीशी बाग दिसली तीही जवळपास रिकामी होती. काही घर नसलेली माणसे,भिकारी वगैरे कुठे कुठे बाकांवर झोपलेले दिसत होते. मी बागेत हळूच प्रवेश केला आणि एकदा सभोवार नजर टाकली. मला हवी असलेली गोष्ट एका कोपर्‍यात दिसली आणि मी खूश झालो.पाण्याचा नळ दिसत होता आणि चक्क त्या नळातून थेंब थेंब पाणी ठिबकत होते. आधी जाऊन हातपाय धुतले आणि आधाशासारखा पाणी प्यायलो. तेवढ्यानेही खूप बरं वाटलं. मग एका झाडाच्या सावलीत जाऊन निवांतपणे बसलो.पाचदहा मिनिटे अशीच गेली आणि माझ्या लक्षात आले की मी इथे आल्यापासनं माझ्यावर बरेच डोळे खिळलेले आहेत ह्या गोष्टीची जाणीव झाली. जेव्हा त्यातल्याच काहींशी माझी नजरानजर झाली तेव्हा का कुणास ठाऊक मला किंचित भिती वाटली. इथे आपण सुरक्षित नाही असेही वाटले आणि इथे थांबण्यात काहीही अर्थ नाही असे माझ्या मनाने ठरवले. मी तसाच उठून झपाझप चालत त्या बागेच्या बाहेर आलो आणि जणू काही फार मोठ्या संकटातून सुटलो असे समजून एक दीर्घ सुस्कारा सोडला.

आता मी कुठे येऊन पोचलोय?इथून लाल दरवाजा अजून किती दूर आहे आणि रेल्वे स्टेशन किती मागे राहिले ? ह्या कशाचाच पत्ता लागेना. मुंबई शहर कसे लांबलचक आहे. रेल्वेने केलेले दोन भाग; एक पुर्व आणि पश्चिम. बहुतेक रस्ते हे समांतर असल्यामुळे कोणत्याही रस्त्याने गेलात तरी फारशी चुकामुक होत नाही . तर त्याच्या उलट हे शहर. गोल गोल फिरवणारे. थोडासा कोन चुकला की पार भलत्याच दिशेला पोचवणारा रस्ता. अशा अवस्थेतही मी चालतच होतो आणि अचानक एका खूप मोठ्या चौरस्त्यावर मी येऊन पोचलो. आता आली का पंचाईत! कोणत्या रस्त्याने जायचे? आता कुणाला तरी विचारायला हवे हे नक्की. मग तिथूनच जाणार्‍या एकाला मी लाल दरवाजा कुठे आहे म्हणून मी विचारले तर अतिशय विचित्र नजरेने त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो चक्क पळत सुटला.मला कळेचना! हा काय प्रकार आहे? पण कोण सांगणार? होतंच कोण त्याचे स्पष्टीकरण द्यायला!

पुन्हा पायपीट सुरु झाली आणि मी त्या चौरस्त्यातला एक रस्ता पकडला आणि चालू लागलो.चालता चालता तोंडातून चक्क गाणे फुटायला लागले "एकटेच येणे येथे,एकटेच जाणे। एकट्याच जीवाचे हे,एकटेच गाणे॥"
माझ्या नादात चालत असतानाच मला अचानक जाणवले की मी हमरस्ता सोडून एका वेगळ्याच रस्त्याला लागलोय.ह्या रस्याच्या दोन्ही बाजूला बरीच गर्दी आहे. बरेच लोक बंद दुकानांच्या पायर्‍यांवर बसून आपापसात काही तरी कुजबुजत आहेत.आपोआप माझे गाणे बंद पडले आणि मला वस्तुस्थितीची कल्पना आली.मी चक्क मुसलमानांच्या मोहल्ल्यात शिरलो होतो. बाहेरचा असा मी त्या रस्त्यावरून एकटाच आपल्या नादात चाललो होतो.तो रस्ता कुठे जाणार आहे हे मला माहित नव्हते आणि इतकी सगळी लोकं आजूबाजूला असतानाही त्यांना विचारण्याची हिंमत होत नव्हती. खरे तर मी मनातून टरकलोच होतो.अगदी आयता बकरा चालून आलाय असेच त्या सगळ्यांच्या मनात असावे असेही क्षणभर वाटून गेले.पण माझी बोकड दाढी आहे ना! ती बघून कदाचित ते मला त्यांच्यातलाच समजतीलही. अरे पण ते लोक फक्त दाढीच ठेवतात. मिशी कापलेली असते आणि माझी तर मिशी चांगली वाढलेली आहे.आता आपले काही खरे नाही. पिशवीत चाकू,कात्री आहे .अशा वातावरणात ही सामान्य शस्त्रे देखिल आपल्याबद्दल संशय निर्माण करू शकतील.तेव्हा चल हो मरणाला तयार! असे उलटसुलट विचार मनात येत होते पण मी त्याची प्रतिक्रिया चेहर्‍यावर दिसणार नाही असा आटोकाट प्रयत्न करत नाकासमोर चालत राहिलो.

रस्ता खूपच लांब होता. कुठेही वळलेला दिसत नव्हता की पुढे संपतोय असेही दिसत नव्हते. अजून असे किती चालायचे? माहित नव्हते.फक्त चालत राहाणे माझ्या हातात होते. चांगला मैलभर चाललो आणि शेवटी तो रस्ता संपलाय असे दिसले. आता आली की पंचाईत? इतका वेळ मला कुणी काही केले नाही. आता पुन्हा त्याच रस्त्याने त्यांच्या समोरून परत जायचे. त्यांच्या नजरा झेलत,चुकवत जायचे म्हणजे आपले काही खरे नाही आज!"ते खरे आहे रे! पण असे हातपाय गाळून काही होणार आहे काय? आल्या प्रसंगाला तोंड द्यायलाच हवे. तुलाच खाज होती ना पायी जाण्याची मग भोग आपल्या कर्माची फळे." एक मन दुसर्‍या मनाला सांगत होते.पण दूसरे मन बजावत होते "सदैव सैनिका पुढेच जायचे,न मागुती तुवा कधी फिरायचे॥" मग काय? चला.तुका म्हणे "उगी रहावे,जे जे होईल ते ते पहावे॥
अशा प्रसंगी मी कितीही घाबरलेला असलो तरी कसे कुणास ठाऊक पण अचानक धैर्य गोळा होते असा माझा नेहमीचा अनुभव आहे.म्हणजे माझ्यातच एक घाबरट आणि एक धैर्यधर अशी दोन व्यक्तिमत्व वास करून आहेत असे म्हणता येईल. मी पुन्हा हिंमतवाला होतो आणि संकटाशी मुकाबला करायला तयार होतो. इथेही तसेच झाले. एका दृढ निश्चयाने मी त्या रस्त्यावरून पुन्हा त्या सर्व मियां लोकांच्या नजरा झेलत झेलत त्या मोठ्या चौरस्त्यापर्यंत आलो.मात्र एक गोष्ट नक्की की त्या लोकांपैकी कुणीही मला अडवण्याचा अथवा मी कोण आहे,इथे कशाला आलोय वगैरे चौकशी करण्यासाठी थांबवण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलेला नव्हता. माझा मीच घाबरलो होतो आणि माझा मीच तिथून सुखरूप बाहेर आलो होतो. म्हणजे हा सगळा माझ्याच मनाचा खेळ होता. माझ्या एकूण अवतारावरून मी एखादा अवलिया असावा अथवा वाट चुकलेला वाटसरू असावा असेही त्यांना वाटले असेल. खरे काय ते कुणाला ठाऊक? पण त्या तशा परिस्थितीतून मी सहीसलामत बाहेर आलो होतो हे नक्की.

मी मोठ्या रस्त्याला लागलो आणि अचानक मला एक पोलिसांची गाडी दिसली.त्या पहिल्या पोलिसाला विचारल्यावर रस्त्यात ठिकठिकाणी दिसणार्‍या पोलिसांना मी उगाचच विचारत बसलो नव्हतो; पण आता मी जास्त विचार न करता त्या गाडीला हात दाखवला. ती गाडी माझ्याजवळ येऊन थांबली.त्या गाडीत इतर पोलिसांबरोबर एक इन्स्पेक्टरही होता.मी सद्या कुठे आहे आणि इथून लाल दरवाजा किती दूर आहे?असे विचारताच.. माझ्याकडे आश्चर्याने बघत तो इन्स्पेक्टर बोलला ते ऐकून मी हैराण झालो.
"लाल दरवाजा तर विरुद्ध दिशेला राहिलाय" !म्हणजे आत्तापर्यंत माझी जी काही पायपीट झाली होती ती सर्व दर्यापूर,खानपूर,शाहपूर वगैरे मुसलमान बहुल भागांतूनच झालेली होती हेही कळले आणि इतका वेळ अशा भागांतून फिरल्यानंतरही मला काहीच त्रास झाला नव्हता हे माझ्याकडून ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात मला अविश्वासाची भावना जाणवली.पण त्याच वेळी मी किती नशीबवान आहे हे देखिल त्यांनी बोलून दाखवले. माझ्या बोलण्यावरून त्यांच्या केव्हाच लक्षात आलेले होते की मी इथला स्थानिक नागरिक नाहीये म्हणून मग त्यांनी माझी कसून चौकशी केली. मी कोण,कुठला,कशासाठी इथे आलोय?
पोलिसांना समजेल अशा भाषेत मी माझी ओळख करून दिली,माझे ओळखपत्र दाखवले आणि मला कसेही करून सॅटेलाईटला पोचवा अशी विनंती केली.ओळखपत्रावरचा अशोकस्तंभ बघून लगेच इन्स्पेक्टरने मला त्याच्या बाजूला बसवून घेतले.तिथून त्यांनी मला शहराच्या बाहेर पोचवले.बंदचे आवाहन शहरापुरतेच असल्यामुळे शहराबाहेर सगळे व्यवहार सुरळितपणे सुरु होते. इथे पोलिसांनी मला एका रिक्शात बसवून दिले.मी पोलिसांचे आभार मानले आणि रिक्षा सॅटेलाईटकडे दौडू लागली.
मी घड्याळात पाहिले तो दूपारचा एक वाजला होता.म्हणजे सकाळी ८ वाजता सुरु झालेली माझी पायपीट जवळ जवळ ५ तास सुरु होती तर.
आणि.. कितीतरी तासांनी मी मोकळा श्वास घेतला.

समाप्त!

१७ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!५

आम्ही मागवलेले मनुष्यबळ आले आणि काम अधिक जोरात आणि व्यवस्थितपणे सुरु झाले. माझ्या बरोबर काम करण्यासाठी पदू आला त्यामुळे मी एकदम निश्चिंत्त झालो होतो. पदू ज्ञानाच्या आणि कामाच्या बाबतीत 'बाप माणूस' होता. मी बरेचसे काम त्याच्याकडूनच शिकलो होतो. त्यामुळे आता तो माझा बॉस झाला होता आणि साहजिकच माझ्यावरचे दडपण खूपच कमी झालेले होते. मुंबईला एक चक्कर टाकावी असे मनात होते आणि आता पदूच्या आगमनामुळे ते शक्य होणार होते म्हणून मी वरिष्ठांकडे चार दिवस मुंबईला जाण्याची परवानगी मागितली आणि ती त्यांनी कोणतीही खळखळ न करता दिली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी लगेच मुंबई गाठली.

मुंबईत चार दिवस राहून मी पुन्हा अहमदाबादला आलो तेव्हा मला कळले की सॅटेलाईटच्या सगळ्या गेस्टरूम भरलेल्या असल्यामुळे निदान एक आठवडा तरी मला कुठे तरी बाहेर राहावे लागणार होते आणि त्याप्रमाणे माझ्या राहण्याची व्यवस्था अहमदाबाद स्टेशनच्या जवळ असणार्‍या कालूपूर भागातील वेड्यांच्या इस्पितळाशेजारी(मेंटल हॉस्पिटल.. इथे नुसते 'मेंटल' म्हणूनच प्रसिद्ध होते) असणार्‍या सरकारी विश्रामगृहात करण्यात आली होती. इथून सॅटेलाईटला जायचे म्हणजे खूपच वेळ लागत असे. बसने जवळ जवळ १७-१८ किमि चा प्रवास करावा लागायचा.पण त्यातही एक गंमत होती. जायला यायला बराच वेळ लागत असल्यामुळे मला फक्त दिवसपाळी करावी लागायची आणि त्यामुळे संध्याकाळ मोकळीच मिळायची. मग रात्रीचे जेवण अगदी मनपसंत असे मिळत असे. तसेच आजूबाजूचा परिसर बघण्याची संधी आणि तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्याची संधीही मिळाली.

संध्याकाळी शहरात परत आलो की मी आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी पायीच फिरत असे. पण असे करताना कैक वेळेला रस्ता चूकल्यामुळे माझ्या वसतीस्थानाकडे कसे पोहोचायचे हे कळत नसे. मग सरकारी विश्रामगृह कुठे असे एखाद्या स्थानिक माणसाला विचारले की तो बावचळत असे. इथे असे काही आहे हे स्थानिकांना माहितच नसायचे. मग नुसते 'मेंटल' म्हटले तरी चालायचे. पण असे म्हटल्याने समोरचा माणूस माझ्याकडे विचित्र नजरेने पाही आणि काहीच उत्तर न देता निघून जाई. आधी मला त्याचे कारण कळले नाही. पण मग उशीराने ट्युब पेटली. अरेच्चा! खरेच की! रात्री-बेरात्री मेंटल हॉस्पिटलचा पत्ता विचारणार्‍या माणसाकडे लोक असेच बघणार की! त्यातून माझा एकूण अवतारच एखाद्या विक्षिप्तासारखा असायचा. त्यामुळे काहीजण मला टाळत पण एखाददुसरा सज्जन भेटायचाच की जो व्यवस्थित मार्गदर्शन करायचा आणि मी सुखरुप आपल्या विश्रामगृहावर पोहोचायचो.

असाच एक दिवस मी माझे काम संपवून शहरात आलो आणि कळले की शहरात कुठे तरी दोन जमातीत वादावादी झाली आणि त्याचे पर्यवसान मारामारीत होऊन त्यात दोन जण ठार झालेत. त्यामुळे दुसर्‍या दिवशी अहमदाबाद बंदचे आवाहन केले गेलेय आणि त्यात बस,टॅक्सी,रिक्शा वगैरेसकट सगळी वाहने बंद राहतील. आता सॅटेलाईटला कसे जायचे हा प्रश्न माझ्या पुढे पडला होता.पण विचार करायला संपूर्ण रात्र हाताशी होती तेव्हा 'बघू उद्या सकाळी' असा विचार करून मी निवांतपणे जेवून झोपलो.

दुसर्‍या दिवशी उठलो. सगळी आन्हिके उरकली. कपडे चढवले आणि चहा पिण्यासाठी बाहेर पडलो. बाहेर सगळा थंडा कारभार होता. रस्ते सुनसान होते . दुकाने बंद होती. अहमदाबाद स्टेशन जवळच असल्यामुळे मी तिथे जाऊन चहा प्यायला. वर्तमानपत्र घेतले. त्यातील ठळक बातम्या वाचल्या आणि लक्षात आले की मामला गंभीर आहे. आज शहरातली सगळी वाहतूक बंद असल्यामुळे मला स्वतःला खोलीतच कोंडून घ्यावे लागणार होते.पण तिथे दिवसभर एकटाच भूतासारखा बसून काय करणार? पायी जावे काय? छे! ते तर शक्यच नव्हते आणि त्यातून मला रस्तेही नीट माहित नव्हते. मग काय करायचे?

१३ नोव्हेंबर, २००७

"पोलीसी खाक्या"! २

"हां! बोला. काय काम हाय?" एक तारा.
"साहेब, त्याचं काय आहे की माझं पाकीट उडवलं"! मी
"उडवलं? ते कस काय बुवा? "
"आता ते मला कळलं असतं तर मी इथे कशाला आलो असतो?" मी. मी देखिल तिरकस बोलण्यात कमी नव्हतो. इथे आपला हात दगडाखाली आहे हे माहित असल्यामुळे त्यातल्या त्यात सौम्य भाषेत बोललो.
"बर का वाघमार्‍या,ह्ये सायेब बग काय म्हनताहेत. त्येंचं पाकीट उडवलं तरी बी त्यांना काहीच कळालं न्हाय". एकतारा.
एकतार्‍याच्या बोलण्याने आता वाघमार्‍या मैदानात आला.
" बर सायेब मला सांगा तुमी ते पाकीट काय असे दोन बोटात धरून उंच धरले व्हते की काय? म्हंजी आसं बगा की ह्ये पाकीट हाय आनि ह्ये मी आसं धरलंय उंच(वाघमार्‍या अगदी प्रात्यक्षिक करून दाखवत होता) आनि तुमी त्या पाकीटमारांला आवतन देत व्हता काय की या,उडवा माजं पाकीट?" वाघमार्‍या. आणि दोघे खो-खो हसत सुटले.
"काय तिच्या आयला लोक बी कंप्लेंटी आनत्यात? पाकीट उडवले म्हनं?" एकतारा.
"बर माला सांगा,पाकीट उडवला तवा तुमी काय करत व्हता? न्हाय म्हन्जे बसला व्हता,उबा व्हता? नक्की काय करत व्हता?" वाघमार्‍या.
"अहो गर्दी चिक्कार होती गाडीला....
मी माझे वाक्य पूर्ण करण्याच्या आधीच दोघे ठो ठो हसू लागले.
" आरं तेच्या मायला,वाघमार्‍या! सायेब काय म्हन्तायेत की गाडीला लय गर्दी व्हती. आता मुंबैच्या गाडीत गर्दी आसनार न्हाय तर मग कुटं आसनार? मुंबैत नवीनच दिसतंय बेनं! भटाचं दिसतंय ! भासा बग कसी एकदम सुद्द वापर्तोय". एकतारा.
"ओ साहेब शिव्या द्यायचं काय काम नाही सांगून ठेवतोय आणि माझी जात काढायची तर अजिबात जरूर नाही. मीही बक्कळ शिव्या देऊ शकतो. उगीच माझे तोंड उघडायला लावू नका". मीही चिडून बोललो.
"च्यामारी वाघमार्‍या! हिथं पोलीस कोन हाय? आपून की ह्ये बेनं? चायला हाय तर किडूक-मिडूक. पर आपल्याला दम देतोय. घे रे ह्याला आत आन दाव आपला इंगा". एकतारा.
"ओ,हात लावायचे काय काम नाही सांगून ठेवतो. उगीच पस्तावाल". आता माझाही संयम संपत चालला होता. ते दोघे माझ्याकडे एक टाईमपास म्हणून बघत होते आणि स्वतःची करमणूक करून घेत होते. माझा आवाजही आता तापला होता आणि आजूबाजूची फलाटावरची दोनचार पासिंजर मंडळीही ही करमणूक बघायला आतमध्ये डोकावली.
माझ्या आव्हानाने वाघमार्‍या चवताळला. पटकन उठला आणि माझा दंड त्याच्या राकट हातांनी धरायला म्हणून पुढे सरसावला. पण मी सावध होतो. चपळाईने दूर झालो आणि वाघमार्‍याचा तोल जाऊन तो जमिनीवर कोसळला. जणू मला तो साष्टांग नमस्कार करत होता कारण त्या अवस्थेतही त्याने त्याचे हात मला पकडण्यासाठी लांब केले होते.
आता गप्प बसून चालणार नाही हे मी ताडले आणि माझा हुकुमाचा एक्का काढला. खरे तर मी एक सामान्य नागरिक म्हणून जगू इच्छित होतो पण ह्या दोघा टोणग्यांनी मला माझे खरे स्वरूप उघड करायची वेळ आणली होती जे मी स्वतःहून करू इच्छित नव्हतो.
"अतिरिक्त आयुक्त,विशेष शाखा(ऍडिशनल कमिशनर स्पेशल ब्रँच) श्रीयुत अमूक अमूक ह्यांच्या ऑफिसात मी काम करतोय. मला जायला उशीर होतोय. ते तिकडे माझी वाट पाहात आहेत आणि मला तुमच्यामुळे हा उशीर होतोय. वर मला मानसिक त्रास तुम्ही जो देताय हे सगळे त्यांना कळले ना तर माझ्याऐवजी तुम्हीच आत जाल. तेव्हा मुकाट्याने माझी तक्रार नोंदवून घ्या आणि मला त्याची पोचपावती द्या. नाहीतर पुढच्या परिणामांना तयार व्हा". माझ्या ह्या खणखणीत बोलण्याने दोघेही हतबुद्ध होऊन माझ्याकडे पाहातच राहिले.

अत्यंत कृश शरीरयष्टी(अगदी क्रिकेटच्या यष्टीसारखी),मध्यम उंची,पट्ट्यापट्ट्याचा टी शर्ट्,खाली भडक रंगाची पँट,केस अस्ताव्यस्त, हनुवटीखालची बोकडदाढी आणि हातात ब्रीफकेस असा माझा त्यावेळचा अवतार हा कोणत्याही अशा तर्‍हेच्या पोलीसी खात्याला शोभणारा मुळीच नव्हता त्यामुळे त्या दोघांना कळेना की नक्की काय प्रकार असावा ते. हा म्हणतोय ते खरे असेल तर आपले काही खरे नाही पण हा उगीचच दमबाजी करत असेल तर? अशा पेचात ते दोघे सापडले असतानाच एक सब इन्स्पेक्टर आत आला. त्याच्या आगमनाने त्या दोघांना हायसे वाटले असावे असे त्यांच्या चेहर्‍यावरच्या हावभावावरून वाटले. त्या दोघांनी सइला एक कडक सलाम ठोकला. सइ खूर्चीत स्थानापन्न झाला आणि त्याने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिले. ही संधी साधून मी माझी खरी ओळख दिली आणि तक्रार घडाघडा सांगून टाकली.
माझ्या साहेबांचे नाव ऐकले मात्र सइची पण कळी खुलली . हे साहेब मूळातले मुंबई पोलीसातलेच होते.पण आमच्या कडे पाहूणे कलाकार म्हणून(डेप्युटेशनवर) आले होते. राष्ट्रपती पदक विजेते आणि अतिशय कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष म्हणून त्यांचा लौकिक होता.सइदेखिल त्यांचा लौकिक जाणून होता.

लगेच मला बसायला खूर्ची दिली गेली आणि वाघमार्‍याला चहा आणायला पिटाळले. एकतारा आता खाली मान घालून उभा होता. आता आपले काही खरे नाही असेच भाव त्याच्या चेहर्‍यावर होते कारण आतापर्यंत झालेला प्रसंग मी सइला सविस्तर सांगितला. त्याने त्या दोघांना असे काही झापले की त्यांची ती दयनीय अवस्था पाहून मलाच वाईट वाटले.पण त्या माजोरड्यांना त्यांच्या भाषेत डोस मिळणे अत्यावश्यक होतेच. त्यानंतर विद्युत वेगाने हालचाली झाल्या. माझी तक्रार नोंदवून त्याची पोचपावती दिली गेली. स्पेशल चहा आलाच होता. तो पिऊन मी त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो.

एकतारा आणि वाघमार्‍यांनी माझ्याकडे दयेची याचना केली.
"सायेब, गलती जाली. एक डाव माप करा. आमी वळकलं न्हाय तुमाला. आता मोट्या सायबांस्नी काय सांगू नकासा. न्हाईतर आमची नोकरी जाईल. तुमी आदीच सांगतल आस्तं तर आसं जालं नसत. पुन्यांदा आसं न्हाय व्हनार. आयच्यान!" एकतारा
"बाबांनो, तुमी पोलीस लोक सामान्य माणसाशी कसे वागता हेच मला बघायचे होते आणि मी जर सामान्यच आहे असे सिद्ध झाले असते तर तुम्ही माझे काय हाल केले असते ह्याची कल्पनाच करवत नाही. तेव्हा एक अनुभव म्हणून मी हे साहेबांना सांगणार आहे हे नक्की".
माझ्या त्या बोलण्यावर दोघे माझ्या पाया पडायला लागले आणि मग जास्त तमाशा नको म्हणून मी त्यांना माफ करून साहेबांकडे त्यांची तक्रार करणार नाही असे वचन दिले.

आज मी जर एक सामान्य नागरिक असतो तर माझे काय झाले असते?

समाप्त!

१२ नोव्हेंबर, २००७

"पोलीसी खाक्या"! १

त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता यावे म्हणून दोन्ही हातांनी वरच्या कड्या पकडल्या. मालाडला चढलो होतो तेव्हा जेवढी गर्दी होती त्यात अंधेरी पर्यंत वाढच होत गेली आणि मग तर श्वास घेणेही मुश्किल होऊन गेले. एकमेकांचे उच्छ्वास झेलत लोक कसे तरी प्रवास करत होते. त्यात काही पंखेही बंद होते. कुणीतरी उत्साही तरूण त्यात कंगवा घालून त्याचे पाते फिरवून पंखा सुरु होतो का असला प्रयत्नही करून पाहात होता.

जलद गाडी (फास्ट ट्रेन) असल्यामुळे अंधेरी-वांद्रे,वांद्रे-दादर आणि दादर-मुंबई सेंट्रल ह्या दरम्यानच्या स्थानकांवर ती थांबणार नव्हती त्यामुळे आता अंधेरीहून गाडी सुटल्यावर तरी निदान पुढचे स्थानक(स्टेशन) येईपर्यंत गर्दी वाढणार नव्हती. भर उन्हाळ्याचे दिवस,त्यात काही पंखे बंद म्हणजे आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना असा प्रकार होता. भरमसाठ गर्दीने आणि उकाड्यामुळे घामाने भिजलेली अंगं,त्यात पाशिंजरांच्या आपापसातील बडबडीमुळे होणारा कलकलाट आणि गाडी वेगात धावत असल्यामुळे होणारा खडखडाट ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही मला झोप येत होती. मी उभ्या उभ्या पेंगायलाही लागलो. एक-दोन वेळा मानही लुढकली पण पुन्हा मी मोठ्या निर्धाराने झोपेचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करू लागलो.

ह्या सगळ्या प्रकारात वांद्रे स्थानक आले केव्हा तेच कळले नाही पण वांद्र्याकडून गाडी जेव्हा माहीमच्या दिशेला निघाली तेव्हा त्या खाडीच्या थंडगार वार्‍याने मी जागा झालो. वांद्र्याला गाडी थोडी रिकामी झाल्याचे जाणवले आणि हात खाली करून कोणताही आधार न घेता उभे राहाता येईल अशी परिस्थिती असल्यामुळे मी कड्या सोडल्या आणि हात खाली केले. हातांचा स्पर्श पँटच्या खिशांना झाला आणि मी ताडकन उडालो. ज्या खिश्यात पास-पाकीट होते तो चक्क सपाट लागत होता. मी खिशात हात घालून पाहिले आणि माझ्या सगळा प्रकार लक्षात आला. माझे पाकीट त्या गर्दीत मारले गेले होते. त्यात नुकताच काढलेला तीन महिन्यांचा रेल्वेचा पास, माझे ऑफीसचे ओळखपत्र आणि काही किरकोळ रक्कम त्यात होती. पास पुन्हा काढता येत होता पण मला चिंता होती ती त्या ओळख पत्राची.कारण मी ज्या केंद्र सरकारी कार्यालयात काम करत होतो ते जरा विचित्र खाते होते. धड ना पोलीस ना नागरी. पोलिसांसारखे आम्ही २४ तास बांधील होतो पण आम्हाला गणवेश नव्हता. पोलीसांसारखे अधिकारही नव्हते पण सेवाशर्ती सगळ्या पोलिसांसारख्या. म्हणजे शिस्तीला एकदम कडक आणि अधिकार काहीच नाही. म्हणजे आमची अवस्था वटवाघळासारखी अधांतरी! ओळखपत्र हरवले म्हणजे आता चौकशीला सामोरे जावे लागणार, कानपिचक्या,दंड आणि रेकॉर्ड खराब होणार. मग आता काय करायचे?तर दादरला उतरून रेल्वे पोलीसात तक्रार करणे इतकेच माझ्या हातात होते.

मी दादरला उतरलो. रेल्वे पोलीस चौकी शोधून काढली आणि माझी तक्रार सांगितली. माझे पाकीट कुठे मारले गेले ? तर अंधेरी ते वांद्रे ह्या दरम्यान. हे त्यांनी माझ्याच तोंडून वदवून घेतले आणि आपले हात वर केले. म्हणाले की ही केस वांद्रे रेपोंची आहे तेव्हा तुम्ही तिथे जा. मग काय मी तसाच वांद्र्याला पोचलो. ह्या सर्व धांदलीत आता आपल्याकडे पास किंवा तिकीट नाही हे देखिल लक्षात आले नाही.पण सुदैवाने कुणी अडवले नाही. वांद्र्याच्या त्या पोचौ मध्ये मी पोचलो तेव्हा तिथे दोन पोलीस बसले होते. दोघे आमने सामने बसले होते. त्यातला एक जमादार(एक तारा) फोनवर कुणाशी तरी गप्पा मारत होता आणि दुसरा हवालदार त्याच्या समोरच्या बाकड्यावर बसून अगदी मन लावून कान कोरत होता. माझ्या तिथल्या आगमनाची जरादेखिल जाणीव त्यांना झाल्याचे दिसले नाही. मी आपला त्यांचे माझ्याकडे कधी लक्ष जाते ह्याची वाट पाहात चुळबुळ करत उभा होतो पण रामा शिवा गोविंदा. दोघेही आपल्याच तारेत होते. शेवटी एकदाचे त्या जमादाराचे फोनवरचे बोलणे संपले आणि आता तो आपल्याकडे नक्की पाहील आणि विचारेल... वगैरे वगैरे विचार मी केला पण पुढे काहीच घडले नाही. त्या जमादाराने हवालदाराशी बोलणे सुरु केले.
"बरं का वाघमार्‍या,तिच्या आयला........ ह्या मा**** साहेबाच्या *** बांबू सारला पाहिजे. फुकटचोट भे** तरास देतोय."
"सायेब.तुमाला काय सांगू? ते म्हनजे बगा एकदम बारा बोड्याचं बेनं हाय.लय मा**** बगा.त्येच्या फुडं नुस्तं हांजी हांजी म्हनायचं. अवो धा वर्सं काडलीत त्येच्या संगट.लई हरामी जात हाय. तुमी त्येच्या नादी लागू नका.... वगैरे वगैरे वगैरे"!
त्यांचे ते बोलणे असे सुरुच राहिले असते म्हणून त्यात व्यत्यय आणण्यासाठी मी जोरात खाकरलो आणि मग नाईलाजाने त्यांना माझ्या अस्तित्वाची दखल घ्यावी लागली.

३ नोव्हेंबर, २००७

मी एक पुलकित! २

पुलंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे वाचणे,ती त्यांच्याच शब्दात आणि आवाजात ऐकणे आणि त्याचे दूरदर्शन रुपांतर पाहणे ह्यापैकी मला स्वतःला ती त्यांच्याच आवाजात ऐकायला जास्त आवडतात. आपण स्वतः ही व्यक्तिचित्रे नुसती वाचली तरी आवडतातच पण पुलंच्या आवाजात ऐकताना ते ती आपल्याला प्रत्यक्ष भेटवत असतात. नकलाकार असण्याचा पुलंना आणि त्यामुळे आपल्यासारख्या श्रोत्यांना ह्याठिकाणी खूपच फायदा झालाय. वर्णन केलेली व्यक्ती प्रत्यक्ष कशी बोलते ते पुलं आवाजातील बदल, चढउतार, नेमक्या जागी शब्दावर जोर अथवा शब्द तोडून आपल्याला दाखवत असतात. त्या व्यक्तीचे मूर्तीमंत दर्शन आपल्याला घडवतात.

कोकणात राहणार्‍यांना कोकणी बोली अथवा कोकणी बाणा काही नवीन नाही.पण तरीही तो ज्याला माहित नाही अशा माझ्यासारख्या असंख्य लोकांना निव्वळ शब्दांतून जाणवू देण्याची किमया केवळ पुलंच करू जाणे. आता उदाहरण म्हणून आपण "अंतू बर्वा आणि मंडळी" घेऊ या.

अंतूच्या तोंडी घातलेली आणि त्या अड्ड्यातील इतर मंडळींची भाषा पहा.

अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते.
"कशी काय गर्दी ?"
"ठीक आहे !"
"प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात ?"
"छे ! छे !"
"अहो, छे छे म्हणून झिटकता काय पाल झिटकल्यासारखे ? पहिला अंक ऐकला मी हितूनच.तुमच्या त्या सिंधूच्या पार्ट्यात काय दम दिसत नाही . 'लागे हृदयीं हुरहुर' म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलंनीत. बालगंधर्वाचं ऐकलं होतंत काय ?"
मॅनेजरही जरा उखडले. "आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा."
"अहो,गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत --- आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षतदेखील घेऊन हिंडत होते तुमचे ब्यांडवाले! अहो, एवीतेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं --- चार आण्यात जमवा."
"चार आण्यात बघायला काय डोंबा~याचा खेळ आहे काय ?"
"अहो तो बरा !
"आधी तो खेळ दाखवतो आणि मग थाळी फिरवतो."
"तुम्ही तसं करा. पुढलं 'कशि या त्यजूं पदाला' जमलं फक्कड तर थाळीत चार आणे आणखी टाकीन."

आणि हा एक नमूना पहा.अण्णा साने हा त्या अड्ड्यातलाच एक.
त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सान्यांनी एकदाच फक्त काही माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतूशेटच्या मुलाचा उल्लेख आला.
"म्हणजे? अंतूशेटना मुलगा आहे ?"
"आहे ? म्हणजे काय ? चांगला कलेक्टर आहे !"
"कलेक्टर ?"
"भायखळ्याच्या स्टेशनावर तिकिटं गोळा करतो." चेह~यावरची सुरकुती हलू न देता अण्णा म्हणाले.
"मग वडलांना मदत करीत नाही की काय ?"
"अहो, करतो कधी कधी. त्यालाही त्याचा संसार आहे. त्यातून बीबीशीआयला जीआयपीचा डबा जोडलेला ..."
ह्या अड्ड्यातले हे विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयाल होईल. बी बी सी आयला जी आय पीचा डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह हे लक्षात यायला मला उशीर लागला.
"काय लक्षात आलं ना ? तेव्हा अंतूशेटच्या स्नानसंध्येची पंचाईत होते. मुलाच्या घरी थोडी इतर ’आन्हिकंही’ चालतात म्हणे. आमच्या अंतूशेटचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाहण्यास गेला होता. गणित चुकल्यासारखा परतला. दसरा-दिवाळीला अंतू बर्व्याला मिळतं आपलं मनिऑर्डरीतून पितृप्रेमाचं पोस्त ! पाचदहा रुपयांचं ! तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप म्हणून सांगत ! आणि उगीचच खुर्दा खुळखुळवतो चार दिवस खिशात हात घालून."
"अहो, तिकिट-कलेक्टरला पगार तो काय असणार ?"
"पगार बेताचाच, पण चवल्यापावल्यांची आचमनं चालतात म्हणतात. खरंखोटं देव जाणे. आणि चालायचंच ! घेतले तर घेऊ देत .. काय ? अहो, आठ आणे खाल्ले की चौकडीचा मुगूट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि एक लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत ! लोकनियुक्त प्रतिनिधी !"

ह्या दोन्ही संवादातून आपल्याला त्या बोलण्यातला मिस्किलपणा जाणवतो पण हेच शब्द वाचण्या ऐवजी पुलंच्या तोंडून ऐकले की ते अधिक प्रभावी वाटतात.निदान मला तरी ते तसे वाटते. त्यातला नेमका आशय हृदयाला भिडतो.

हरितात्या हे एक वेगळे पात्र पुलंनी रंगवलंय. सदैव इतिहासात रमलेले हे पात्र प्रत्येक गोष्ट "पुराव्याने शाबीत करीन" असे म्हणत असते. वर्तमानात जगायला तयार नसलेले हरितात्या आणि वास्तवाची नको तितकी जाणीव करून देणारे अंतू बर्वा ह्यांची एखादी जुगलबंदी पुलंच्या लेखणीतून झरावी अशी माझी खूप इच्छा होती. पण मी ती त्यांच्याकडे पत्ररुपाने बोलून दाखवू शकलो नाही ह्याची आज खंत वाटते. तसा संवाद लिहिला गेला असता तर... माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते आहे...

अंतू उवाच : "आला न्हेरू चालले बघायला ! आणि रत्नांग्रीत दाखवलनीत काय त्यांस ? बाळ गंगाधर टिळक जन्मले ती खोली आणि खाट? गंगाधरपंत टिळकास काय स्वप्नात द्रष्टांत झाला होता काय रे ... तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार म्हणून ? कुणाची तरी खाट दाखवली नि दिलं ठोकून त्याच्यावर टिळकानं पहिलं ट्यांहां केलं म्हणून ! पुरावा काय ? का टिळकाच्या आयशीचं बाळंतपण केलेली सुईण होती साक्षीस ? टिळकाचं सोड ! शंभर वर्षं झाली त्याच्या जन्मास. तू जन्मास आलास ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय ? म्हातारीस विचारून ये घरी जाऊन आणि मग सांग मला टिळकाच्या आणि न्हेरूच्या गोष्टी."

हे ऐकून हरितात्या पुढे येतात आणि म्हणतात .....

"तुला सांगतो पुरुषोतम, पुरावा आहे. अरे आम्ही इथे असे उभे. समोर गंगाधरपंत अस्वस्थपणे फेर्‍या मारताहेत. सुईणींची लगबग चाललेय. तिथे गरम पाण्याचा बंब पेटलाय. आत असह्य होणार्‍या वेदनांनी कळवळणार्‍या पार्वतीबाई. आणि तशाच अवस्थेत एकाएकी बाळाचे "ट्यांहां" ऐकू आले. बाळ किती तेजस्वी म्हणून सांगू? अरे सगळीकडे आनंदी आनंद झाला. हत्तीवरून पेढे वाटले. असे होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!"..... वगैरे वगैरे!

अर्थात हे चित्र खर्‍या अर्थाने पुलंनीच पूर्ण करायला हवे होते.ते ह्या जन्मी तरी आता होणे नाही.पण जर कधी पुलं मला वर भेटलेच तर मी त्यांना ह्याबाबत नक्कीच गळ घालणार आहे.

१ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!४

त्या दिवशीच्या अनुभवामुळे मी वेळप्रसंगी स्वसंरक्षणासाठी हातात एखादी काठी असावी म्हणून खास शोधून एक बर्‍यापैकी काठी बरोबर बाळगू लागलो.माझ्या त्या ’हातात काठी’ घेऊन जाण्याचेही अप्रुप काही जणांना वाटले पण मी कुणालाच त्याचा खुलासा देत बसलो नाही.

त्या प्रसंगानंतर साधारण दोनतीन दिवसांनी रात्रीचे जेवण करण्यासाठी गेस्ट-हाऊसवर परतलो तेव्हा संध्याकाळचे सव्वासात वाजले असावेत.त्या दिवशीही जेवण मस्त होते.बाहेर थंडी पडायला सुरुवात झालेली आणि इथे गरम गरम फुलके पानात पडत होते. त्याच्याबरोबर तोंडी लावायला मस्त रस्सा भाजी असल्यामुळे मी अगदी रंगात येऊन जेवत होतो.चांगले मनसोक्त जेवून मग पुन्हा कामगिरीसाठी त्या महाकाय तबकडीकडे रमत-गमत जायला निघालो.

आज चंद्र चांगला हातभर वर आलेला दिसत होता. बहुदा पौर्णिमेच्या मागचा-पुढचा कोणता तरी दिवस(रात्र) असावा.मी माझ्याच तंद्रीत मार्गाला लगलो. आज माझ्यात भीमसेन संचारले होते. त्यांच्या गाण्यातल्या एकेक खास जागा मी आपल्या नरड्यातून काढण्याच्या प्रयत्नात होतो. भीमसेन आणि वसंतराव हे माझे खास आवडीचे आणि आत्मसात करण्याचे विषय आहेत. त्यांची गाणी लागली की त्यांच्यामागून मी देखिल तसेच्या तसे गायचा प्रयत्न करतो आणि बरेच वेळा चक्क जमून पण जाते. तर त्या दिवशी असाच "इंद्रायणी काठी,देवाची आळंदी। लागली समाधी,ज्ञानेशाची॥" हा अभंग गात गात निघालो.

पहिलीच तान घेताना जाणवले की आज आवाज अगदी मस्त लागलाय. आज ह्या ठिकाणी भीमण्णा असते तर नक्कीच "वा!" अशी सहज दाद मिळाली असती अशी खणखणीत तान माझ्या गळ्यातून (आता इथे नरडे म्हणणे शोभणार नाही)निघाली तेव्हाच लक्षात आले की आजचा दिवस काही वेगळाच आहे. इतकी स्वच्छ-सुंदर तान आजपर्यंत माझ्या गळ्यातून ह्यापूर्वी आलेली मलाही आठवेना.धृवपदही मस्तच जमले.त्यानंतरची दोन्ही कडवीही रंगली. वा! क्या बात है! मी आज स्वत:च स्वत:च्या गाण्यावर खुश होतो.

शेवटच्या कडव्याला पोचेपर्यंत मी महाकाय तबकडीच्या आसपास पोचलो देखिल.पण पायर्‍या चढण्या आधी चढ्या आवाजात सुरु केले "इंदायणी काऽऽऽऽठी,इंद्राऽऽयणी काऽऽठी. विठ्ठऽऽऽलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ मायऽऽऽबाऽऽऽऽऽऽऽऽऽपा, आऽऽऽऽऽऽऽ वगैरे करत पुन्हा खालच्या षड्जावर येईपर्यंत..... माझी बोलतीच बंद झाली.पायर्‍या चढण्यासाठी उचललेले पाऊल तसेच अधांतरी अवस्थेत,आवाज बंद,श्वास द्रूतगतीने चाललेला आणि नजर एका जागी खिळलेली!
त्या अलौकिक अवस्थेत काही क्षण गेले आणि मग वस्तुस्थितीची जाणीव झाली तेव्हा कळले की माझ्या नजरेसमोर अगदी ५-फुटांवर एक "नागराज" आपला भला थोरला फणा काढून अतिशय स्तब्धपणे बसलेले दिसले.

त्याची नजर आणि माझी नजर एकमेकांना भिडली आणि माझ्या अंगातून भितीची एक लहर उठली. मी तर मंत्रमुग्ध झाल्यासारखा,अगदी भारल्या सारखा तसाच उभा होतो.पुढे काय होणार हे माहित नव्हते.पुढे पाऊल टाकणे शक्यच नव्हते पण मागे पळण्याचाही विचार मनात डोकावत नव्हता. हातात जरी काठी होती तरी तिचा वापर करण्याची हिंमत होत नव्हती. काही क्षण तसेच त्या भारलेल्या अवस्थेत गेले आणि अचानक नागाने फणा खाली करून हळूहळू तो शांतपणे बाजूच्या बिळात दिसेनासा झाला.तो गेल्यावरही काही मिनिटे मी तसाच निश्चल उभा होतो.

वास्तवाचे पूर्ण भान आल्यावरही पुढे पाऊल टाकायची हिंमत होत नव्हती पण वर जाणे भाग होते कारण अजून एकाला वेळेवर जेवायला पाठवायचे होते. मी आजूबाजूचा कानोसा घेतला आणि मनाचा निर्धार करून पायर्‍यांना वळसा घालून जरा लांबून वर चढलो आणि धूम पळालो. आत दालनात पोचताच माझ्या सहकार्‍यांना झाला प्रकार सांगितला आणि त्यांचीही पांचावर धारण बसली.ज्याला जेवायला जायचे होते त्याने जेवण रद्द केले आणि पाणी पिऊनच भूक भागवली.

दुसर्‍या दिवशी मी ती गोष्ट आमच्या वरिष्ठांना सांगितली. त्यांनी ती तिथल्या सुरक्षा अधिकार्‍यांना कळवली. मग त्या लोकांनी ते बीळ आणि आजूबाजूला शोधून असलेली काही अन्य बीळे पक्की बुजवून टाकली आणि त्या ठिकाणी रात्रीचा पहारा लावला.त्यानंतरच आम्ही तिथे रात्री-बेरात्री निशं:क पणे वावरू लागलो.

३० ऑक्टोबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!३

त्या दिवशी मी माझे काम आटोपून पुन्हा गेस्ट-हाऊसकडे यायला निघालो तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते.आज जेवणही मनासारखे झाल्यामुळे आम्ही सगळेच खुशीत होतो. बरोबरीच्या त्या दोघांना व्यवस्थित सूचना देऊन त्यांचा निरोप घेऊन जेव्हा त्या दालनाच्या बाहेर पाऊल टाकले तेव्हाच जाणवले की बाहेर थंडगार वारं सुटलं होतं. बाहेरच्या त्या थंडगार हवेने अंगावर एक हलकिशी शिरशिरी आली.त्यावेळी मला आशा भोसले ह्यांनी गायलेले ते मस्त गीत आठवले.

थंडगार ही हवा,त्यात गोड गारवा
अशा सुरम्य संगमी जवळ तू मला हवा
...... यमकाबिमकाची पर्वा अजिबात न करता "हवा" च्या ऐवजी "हवी" असे घातले आणि ते गाणे गुणगुणतच मार्गाला लागलो.

आजूबाजूचा शांत परिसर,त्यात रातकिड्यांचे चाललेले जोशपूर्ण गायन,मधूनच वटवाघळांचा चित्कार आणि घुबडांचा घुत्कार. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गर्द झाडीमुळे आधीच मंद असणारा रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश अजून मंद वाटत होता आणि ह्या अशा वातावरणात मी आपल्याच नादात गाणे गात चाललो होतो. माझे ते चालणे अगदी वा.रा.कांत ह्यांनी लिहिलेल्या वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटते जसा फुला फुलात चाललो ह्या गीताच्या आशयाशी मिळते जुळते होते.गुणगुणणे संपून मी खुल्या आवाजात कधी गायला लागलो ते मलाही कळले नाही इतका मी त्या गाण्याशी एकरूप झालो होतो. त्यावेळी माझे लग्नही झालेले नसल्यामुळे तर ते गीत मी जास्तच समरसून गात होतो असेही असेल. जणू काही माझे गाणे ऐकून एखादी ’वनबाला’ मला आपल्या बाहूत सामावून घ्यायला येणार होती.

ह्या तंद्रीत अर्धा रस्ता कधी पार झाला तेही कळले नाही. गाणंही मनसोक्त आळवून झालं होतं. इतका वेळ मी माझ्याच मस्तीत असल्यामुळे मला आजूबाजूचे भान नव्हते; पण मन जाग्यावर नव्हते तरी डोळे आपले काम करतच होते. तशातच माझ्यापासून साधारण शंभर फुटावर मला काही तरी चमकणारे दिसले आणि माझी तंद्री खाडकन तुटली. "काय असावे बरे?" मी आपल्या मनाशीच म्हणालो. इतक्या वेळ मी अतिशय निर्भय अवस्थेत होतो त्याची जागा किंचित भयाने घेतली.

"भूत तर नसेल? पण भूतांवर माझा विश्वास नाही. जे नाहीच ते इथे तरी कसे असेल? पण समजा असलेच तर? आपला विश्वास नसला म्हणून काय झाले? ते जर भूत असलेच तर आणि त्याने आपल्याला काही केले तर?"

मनातल्या मनात मी हे सगळे बोललो आणि माझ्या शेवट्च्या विचाराने मीच कमालीचा शहारलो. अंगातून एक भीतीची लहर गेली. तोंडाला कोरड पडली. आता करायचे काय? मागेही जाऊ शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही. मदतीसाठी ओरडावे तर आसपास वस्तीही नव्हती आणि माझा आवाजही मला सोडून गेला होता.

ह्या अवस्थेत क्षण-दोन क्षण गेले आणि मी आता पुरता भानावर आलो. अंगातले सगळे धैर्य गोळा केले आणि पाऊल पुढे टाकले. जे होईल ते होवो. अशा विपरीत परिस्थितीत माझे धैर्य अचानक वाढते असा माझा आजवरचा अनुभव होता आणि आताही मी त्याच निश्चयाने पाऊल पुढे टाकले. अतिशय सावध चित्ताने मी एकएक पाऊल पुढे टाकत होतो आणि ते जे काही चमकणारे होते त्याच्यापासून मी आता साधारण पन्नास फुटावर येऊन उभा राहिलो.तिथेच उभे राहून नीट निरीक्षण केले आणि लक्षात आले की हे भूत नाही तर कुठला तरी प्राणी असावा.आपण उगीचच घाबरलो. ते त्या प्राण्याचेच डोळे होते आणि अंधारामुळे खूपच चमकत होते पण अजून तो प्राणी कोणता हे काळोखामुळे समजत नव्हते.


इतका वेळ भीती भूताची होती पण आता एखाद्या हिंस्त्र श्वापदाशी गाठ होती. आता काय करायचे? पुन्हा एक क्षणभर भीतीने मनाचा ताबा घेतला पण लगेच मी भानावर आलो. माझी आई म्हणायची "वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातो, मग वाघ्या च का म्हणू नये?" ते शब्द आठवले आणि पुन्हा मनाचा हिय्या करून पुढे चालायला लागलो. मी इतका पुढे आलो तरी ते डोळे जागचे हलेनात. पण एक झाले आता तो जो कुणी प्राणी होता त्याला मी व्यवस्थितपणे पाहू शकत होतो.

जरा निरीक्षण केल्यावर लक्षात आले की तो 'कोल्हा' असावा. रस्त्याच्या मध्यभागी ही स्वारी बसली होती जीभ बाहेर काढून आपल्या भक्षाच्या शोधात.त्याच्या आजच्या भोजनासाठी खास माझी योजना असावी असा एक विनोदी विचार त्या परिस्थितीतही मला चाटून गेला. आता आम्ही अगदी समोरा-समोर आलो होतो आणि आमच्यामधील अंतर जेमतेम २०-२५ फुटांचे असावे. आता हे महाराज जर असाच रस्ता अडवून बसणार असतील तर माझी तरी शहामत नव्हती त्यांना ओलांडून जाण्याची. मग काय करायचे? मागे हटावे तर तो हल्ला करेल आणि पुढे गेलो तरी तेच. माझ्या हातात काहीच नव्हते आणि आजूबाजूलाही कुठे एखादी झाडाची वाळकी फांदीही दिसेना. त्यामुळे काही वेळ माझी स्थिती बुद्धिबळातील 'ठाणबंद' केलेल्या राजासारखी झाली होती आणि आमच्या दोघांच्या हालचाली बंद असल्यामुळे बुद्धिबळातीलच 'स्टेलमेट' म्हणजे निर्नायकी अवस्था झाली होती. ह्यावर उपाय एक त्याने तरी करायचा होता किंवा मलाच काहीतरी करणे भाग होते.

ह्या अवस्थेत काही क्षण गेल्यावर मग मी खाली वाकून दगड उचलण्याची क्रिया केली(त्या रस्त्यावर असा चटकन हाताला लागावा असा दगडही नव्हता!कमाल आहे! आमच्या मुंबईत हवे तितके दगड मिळतात!) आणि अतिशय त्वेषाने तो दगड(नसलेला)त्याच्यावर भिरकावला. ह्या माझ्या अनपेक्षित खेळीने (बुद्धिबळातही मी कैक वेळेला अशा अनपेक्षित चाली करून प्रतिस्पर्ध्याला चकित करत असे)मात्र तो चांगलाच चक्रावला आणि बाजूच्या झाडीत धूम पळाला. तो जरी झाडीत पळाला होता तरी झाडीत उठलेल्या तरंगांवरून तो जास्त लांब गेला नसावा असे माझ्या लक्षात आले म्हणून मी चालत चालत तो आधी ज्या जागेवर बसला होता तिथे पोचलो आणि तो पळालेल्या दिशेला तोंड करुन उभा राहिलो. आताही त्याचे ते चमकणारे डोळे मलाच शोधत आहेत हे दिसत होते. पुन्हा अंगावर एक सरसरून शहारा आला. मग मी पुन्हा दगड उचल आणि भिरकावण्याची क्रिया केली आणि ह्यावेळी मात्र तो पार धूम पळाला. काही क्षण मी तिथेच उभा राहून खात्री केली की हे महाशय पुन्हा येत तर नाहीत ना! पूर्ण खात्री झाल्यावर मात्र एक क्षणही न दवडता झपाझप पाय उचलत गेस्ट-हाऊसकडे रवाना झालो.

२६ ऑक्टोबर, २००७

गप्पाष्टक!४..शब्दच्छल!

गरा: जेवण झालेलं दिसतंय मस्तपैकी
गोरा: अगदी व्यवस्थित!
गरा: माझा आत्ता दुसरा चहा चाललाय
गोरा: अरे वा साहेब! म्हणजे चहाबाज दिसताय पक्के!
गरा: दिवसातून ३-४ वेळा फक्त.
बाकी जहांबाज!
गोरा: हे तर भरपूर झाले माझ्यासाठी!
चहाची आंघोळच झाली की!
गरा: सद्या पाऊस काय म्हणतोय?
गोरा:जोरदार पडतोय. अगदी हिरवळ पसरलेय सगळीकडे. ऋतु हिरवा!
गरा: :) मराठी भाषेची काय मजा आहे पहा ना.
ऋतुला हिरवा म्हटलं की कसं वाटतं!
गोरा: तीच तर अनुभवतोय!
गरा: आणि तेच एखाद्या म्हातार्‍याला हिरवा म्हटलं तर ?
गोरा: तर मग अजूनच मजा!
गरा: म्हातार्‍याची
गोरा: म्हाताराही खूष आणि म्हणणाराही खूष!
गरा: :)
गोरा: हिरवं मन!
हिरवेपणा!
सगळी नुसती हिरवळ!
गरा: :)))))))))))))
थांबला का पाऊस ?
गोरा: छे! अजून बरसतोय! घन हे आले गरजत बरसत! च्या चालीवर अगदी!!!!!!!!!!


गोरा: आज डब्यात काय आहे?
गरा: फ्रुट सॅलड
म्हणजे फ्रुट्स आणि सॅलड
जरा हलका आहार घ्यायचाय असं ठरवलंय आता
गोरा: छान विनोद आहे! :)))))))))))
गरा: त्यामुळे रोज हा प्रश्न विचारलात तरी उत्तर हेच मिळेल
अजून थोडे दिवस तरी, कंटाळा येईपर्यंत
गोरा: कुणाचा? माझ्या प्रश्नाचा की फ्रुट सॅलडचा!!!!!
की दोघांचाही?
गरा: हा विनोद सुध्दा चांगला आहे
गोरा: तुमच्या संगतीने हल्ली जमायला लागलाय!
गरा: ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या
गोरा: अगदी बरोबर! ह्याचा पुढचा प्रवास अजुन अधिक मजेशीर होणार आहे.
गरा: कसा काय देवा ?
गोरा: म्हणजे मी गाण्यांना चाली लावायला लागणार आणि तुम्ही रावसाहेबी सुचना करणार! एकूण संगतीचा परिणाम हो!
गरा: :-)
गोरा: कशी आहे आयडियाची कल्पना?
गरा: चांगली आहे
गोरा: काय आहे की तशा मी बर्‍याच गाण्यांना चाली लावलेल्या आहेत. पण बाबूजी म्हणाले की तुम्ही तुमच्या चाली लोकांना ऐकवू नका! नाहीतर माझे गाणे कुणीच ऐकणार नाहीत. म्हणून सोडून दिला तो धंदा! नाहीतर................
गरा: वाचले बाबुजी.
पण लोकांच्या दुर्दैवाने आता तुमच्या मार्गातला बाबुजींचा अडसरही दूर झालाय
मग बघताय काय ? काढा पेटी
गोरा: कधी वाचले तुम्ही बाबूजी? म्हणजे त्यांचे चरित्र वाचलेत काय? :-)
गरा: हो, बाबुजींचे चरित्र पण वाचले
गोरा: आता पेटी कुठून काढू? मी विडी-सिगारेट पीत नाही हो!
गरा: आता "काढायची पेटी" असं म्हणालो, काड्याची नाही
गोरा: तेच हो! आमच्यासारख्यांना दोन्ही सारखेच!
गरा: एकाने आग लागते तर दुसर्‍याने आग शमते
गोरा: पण दोघांचा आगीशी संबंध आहे ना? मग झाले तर.
गरा: मग "पेटवा" की आता
गोरा: हल्ली भुमिका बदललेय आम्ही! पेटवायचे आणि पेटायचे दिवस राहिले नाहीत.तेव्हा आता विझवणे जास्त बरे वाटते!
गरा: आता फक्त कानाखाली "पेटवणं" जमत असेल :-)
गोरा: तेही सोडले! हल्ली आम्ही 'अहिंसावादी' झालोय!
गरा: अरेरे, काय हे या वयात येवढी निरिच्छा ?
गोरा: आता जग जिंकायचंय 'प्रेमाने'(ही 'प्रेमा' कोण ते मात्र विचारू नका)!
गरा: छान आहे हा उपक्रम


गरा: :-) हल्ली काही लिखाण केलंत की नाही ?
गोरा:नाही हो.लिहायचा कंटाळा येतोय हल्ली.
गरा:मलाही लिहायचा कंटाळा आहे. म्हणून मग आपण दोघांनी मिळून एक ठेवली पाहिजे.
(सेक्रेटरी हो!)
गोरा: तिला 'ठेवाय'च्या ऐवजी तीच आपल्याल ठेवेल तिच्या पायाशी!
गरा: हरकत नाहीत, "देवाने" पाय दोन दिले आहेत, वाटून घेता येतील
तुम्ही काही "वाटून" घेऊ नका
गोरा: पण काय 'वाटायचे', ते कूणी 'वाटायचे' आणि कशाला 'वाटायचे' हे कोण आणि कसे ठरवणार?
गरा: आता अजून कोणाची "वाट" पहाण्यापेक्षा आपणंच दोघे ठरवून टाकूया
लागली तर "वाट" आपलीच लागणार आहे
सेक्रेटरी ही आपल्याला वहि"वाटी"तच मिळाली आहे असं समजून करुया "वाट"णी
गोरा: होय तेही खरेच ह्या 'वाटा-वाटी'त कुणी तरी 'वाटमारी' करून जायचा की!
गरा: हो, लोकांना "वाटे"ल, ही सार्वजनिक "वाट" आहे म्हणून
गोरा: आणि 'वहिवाट' व्हायची! :-)
गरा: म्हणून ही "वाट" आपलीच आहे, हे आपल्याच "वही"त आधी लिहून ठेवूया
गोरा: ही 'वाट' कधीच संपणार नाही अशी आहे.
त्यापेक्षा मला 'वाट'ते की आपण एक तमाशाचा फड काढू या त्या काळू-बाळू सारखा आणि त्यात सोंगाड्याची भुमिका करता येईल दोघांना!
गरा: हो, पण दोघांच्या हातात संगणक मात्र हवा, बोलताना मला सुचत नाही असं आणि "वाट" लागते.
गोरा: आपण दोघांनी 'वाटू'न घेऊ या काय बोलायचे ते! नाही तर प्रेक्षक आपली 'वाट'लावतीलच! काळजी 'वाटू'न घेऊ नका!!!!!!!!
गरा: आपण एक काम करु, "वाट"वे नावाचीच सेक्रेटरी पाहू
म्हणजे नावात सुद्धा २ वाटा
वाट आणि वे
म्हणजे "वाटून" घेताना मारामारी होणार नाही, कसं ?
गोरा: वा! वा! मस्तच आहे 'वाट'णी! मला 'वाट'लंच होतं की तुम्ही ह्यातून काही तरी 'वाट' ही काढणारच!
गरा: मग काय तर, पळ"वाट धरायची नाही हे तर वडिलांनी शिकवलंच आहे
कितीही वाट लागली तरी वाट सोडायची नाही
वडिलांना "वाट"लं नव्हतं मला हे जमेल असं
गोरा: अगदी खरे आहे.तरी देखिल प्रसंगी चोर'वाट' माहित असलेली बरी असते की नाही? नाहीतर 'वाट' बघून बघून घरच्यांची 'वाट' लागायची!
गरा: चोरांच्या "वाटे"ला जाऊ नको असंही वडिल म्हणाल्याचं आठवतंय
तशा "वाटे"वर काटे असतात असं म्हणायचे ते
गोरा: मग एखादी पाय'वाट' शोधावी.आणि गाणे म्हणत चालावे 'वाटे'वर काटे वेचीत चाललो, 'वाट'ते जसा फुला-फुलात चाललो!
गरा: मला वाटतं पाय"वाटे" पेक्षा आड"वाटे" लाच काटे जास्त असावेत ना ?
काट्याची "वाट" पाय"वाट" होईलच कशी ?
चालणार्‍याच्या पायाची "वाट" लागेल की हो
गोरा: म्हणजे चालून चालून आपण ती पाय'वाट' करायची आणि मग लोक ती वहि'वाट' म्हणून वापरायला लागतील!
गोरा: अहो, हे संभाषण छापून ठेवा हो, नाहीतर "वाट"वे बाईंची लिहिता लिहिता "वाट" लागेल
आणी त्यांनी आपली "वाट" धरली तर
दुसरी शोधताना आपली "वाट" लागेल
गोरा: आता हे 'वाट'ण खूप झालं !
गरा:आता त्या ’वाट’णाचं काय करणार?
गोरा: आता ते'वाट'ण इतरांना 'वाटा'यचे आहे. बघू या त्यांना कितपत आवडते ते!
गरा: आणि मिरचीचा चक्क एक "वाटा" टाका त्यात.
होऊ दे झणझणीत
गोरा: नको हो ! आधीच ह्या 'वाट'णामुळे लोक कासावीस होतील आणि अजून त्यात मिरची! म्हणजे त्यांना तिकडची 'वाट' धरावी लागेल ना!
गरा: तिकडची "वाट" बंदच होईल असं बघा.
म्हणजे लोकांना वाचताना त्या "वाटे"ला जायची बुद्धीच होणार नाही
गोरा: मग वैद्यांची 'वाट' 'धरावी लागेल !
गरा: लोकांना "बिकट वाट वहिवाट" हे गाणं म्हणत म्हणत "वाट" पहावी लागेल
गोरा: खरंय! बाकी बोलता बोलता 'वाट' कशी सरली ते कळलंच नाही! आता धरा की घरची वाट!

मु.पो.अहमदाबाद!२

पहिला दिवस निव्वळ श्रमपरिहारार्थ गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी प्रोफेसर साहेबांनी आमच्या सगळ्यांचे बौद्धिक घेऊन कामाची रूपरेषा समजावून दिली.त्यानंतर यंत्रसामुग्रीची जुळवाजुळव, उभारणी, तपासणी आणि ती कार्यान्वित करण्याची जबाबदारी आमचे मुंबईचे साहेब आणि मी ह्या दोघांवर टाकली गेली. बाकीचे दोघे लागेल ती शारिरिक मदत करण्यासाठी होते.सर्वप्रथम आम्हाला जिथे प्रत्यक्ष काम करायचे होते ती जागा पाहिली.तिथे ज्या गोष्टींची कमी जाणवली(इलेक्ट्रिक पॉईंट्स,टेबल-खुर्च्या वगैरे)त्यांची यादी बनवून ती संबंधित व्यक्तीकडे सोपवून त्वरीत अंमल बजावणी करून घेतली.काय गंमत आहे पाहा. एरवी सहजासहजी न हलणारे हे सरकारी कर्मचारी(आम्हीही सरकारीच होतो म्हणा)आम्ही म्हणू ते काम अतिशय तातडीने पार पाडत होते. त्यामुळे त्या संध्याकाळपर्यंत आमचे जोडणी, उभारणी आणि तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले.आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची खोटी होती.

ह्या सर्व यंत्र उभारणीत माझाच सहभाग जास्त होता आणि ते स्वाभाविकही होते. साहेब म्हणून ते मोठे दोघे फक्त खुर्चीवर बसून सुचना देण्याचे काम करत होते.दुसरे दोघे आयुष्यात पहिल्यांदाच ती यंत्र पाहात होते त्यामुळे त्यांच्याकडून हमाली व्यतिरिक्त आणखी कोणतीही अपेक्षा करणे योग्य नव्हते. राहता राहिलो मी.ज्याला कामाची पूर्ण माहिती होती,ते करायची मनापासून तयारी होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी पदाने सर्वात कनिष्ट असल्यामुळे कुणाकडून कोणतीच अपेक्षा करू शकत नव्हतो.तरीही मी अतिशय सहजतेने ते काम पार पाडले. अर्थात त्याबद्दल प्रोफेसर साहेबांनी माझे सगळ्यांसमक्ष तोंड भरून कौतुकही केले.
हा प्रोफेसर मुळचा बंगाली होता.पण वैमानिक दलात नोकरी निमित्त सदैव देशभर फिरलेला होता. तिथून मग तो आमच्या खात्यात आला तो सेवानिवृत्त होईपर्यंत राहिला.माझ्या आडनावावरून तो मला बंगाली समजला. "सो मिश्टोर देब(देव चा खास बंगाली उच्चार..बंगाली लोकात ’देब’हे नाव आणि आडनाव असे दोन्हीही आहे)आय ऍम प्राऊड ऑफ यू! यू हॅव डोन(डन) अ नाईश जॉब!
हे बंगाली इंग्लीश,हिंदी आणि त्यांची बंगाली एकाच पद्धतीने बोलतात. तोंडात गुलाबजाम नाही तर रोशोगुल्ला(रसगुल्ला) ठेऊनच उच्चार केल्यासारखे जिथे तिथे ’ओ’कार लावतात. ’व’ चा ’ब’ करतात. पण तरीही ऐकायला गोड वाटते.

दुसर्‍या दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.आधी वाटले तितके काम कठीण नव्हते पण आता लक्षात आले की काम कठीण नसले तरी ते व्यवस्थित आणि सुरळीत पार पडावे असे वाटत असेल तर अजून काही माणसांची जरूर आहे. मग त्यावर त्या दोन साहेबांच्यात खल झाला. त्यांनी दिल्लीशी संपर्क स्थापून मग अजून काही लोकांची मागणी केली. त्याप्रमाणे मागणी मान्य होऊन दिल्ली आणि मुंबईहून प्रत्येकी अजून ३-३ म्हणजे सहा माणसे येतील असे कळले. अर्थात ती सर्वजण येईपर्यंत तरी आम्हा तिघांनाच ते काम करायचे होते.आमचे हे काम दिवसरात्र चालणारे होते त्यामुळे काम न थांबवता आम्ही तिघे आळीपाळीने ते करत होतो. एकावेळी दोघांनी काम करायचे; त्यावेळी तिसर्‍याने विश्रांती घ्यायची. असे सगळे आलटून पालटून चालत होते. त्यात खरे तर मीच जास्त ताबडला जात होतो कारण ह्या कामाबरोबरच सगळ्या यंत्रसामुग्रीची देखभाल आणि जरूर पडल्यास दुरुस्तीची कामगिरीही माझ्याच शिरावर होती.वर त्यांच्या शंका-कुशंकांचे निराकरण करणेही मलाच निस्तरावे लागत होते.पण खरे सांगू का त्यातही एक वेगळाच आनंद होता आणि मी तो पूर्णपणे उपभोगत होतो.

आमची काम करण्याची जागा गेस्ट हाऊस पासून साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर दूर होती. तिथे पायी चालत जावे लागे.पण त्याचे काही विशेष नव्हते. उलट तसे चालण्यातही एक आनंदच होता. ह्या अर्थस्टेशनचा परिसर कैक एकर दूरवर पसरलेला होता. मध्यभागी गेस्ट हाऊस,कंट्रोल रूम,तसेच इतर कार्यालयांच्या इमारती होत्या.त्याच्या आजूबाजूला खूप छान राखलेली हिरवळ,त्यात थुईथुई नाचणारी पाण्याची कारंजी, मधूनच जाणारे काळेभोर डांबरी रस्ते आणि दूरदूर पर्यंत पसरलेले नैसर्गिक रान होते.ह्या सगळ्या वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य प्रदेशामुळे इथे चित्रपटाची चित्रीकरणे पण होत असतात.सकाळी हा सगळा परिसर गजबजलेला असतो.
तिथूनच थोडे दूर एका बाजूला थोड्याश्या उंचवट्यावर ती महाकाय तबकडी(डिश ऍंटेना) आकाशाकडे ’आ’वासून होती. त्याच तबकडीच्या सावलीत एका दालनात आम्ही काम करत होतो. इथे जागा घेण्यामागे इतरेजनांपासून दूर आणि व्यत्ययाविना काम करता येणे हेच प्रयोजन होते.दिवसा तिथे चूकून माकून कुणी स्थानिक कर्मचारी तबकडीची देखभाल करण्याच्या निमित्ताने असायचा पण संध्याकाळ झाल्यावर मात्र एक भयाण शांतता तिथे नांदायला लागायची.अवघ्या वातावरणात एक प्रचंड गुढ भरलेले असायचे.

२३ ऑक्टोबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!१

आता मला नेमके साल आठवत नाहीये पण १९८०-८५ च्या दरम्यानची ही गोष्ट असावी. . मुंबईहून मी,माझे दोन वरिष्ठ (निव्वळ पदाने)सहकारी आणि एक साहेब असे चौघेजण अहमदाबादला कार्यालयीन कामासाठी गेलो होतो. अहमदाबादच्या उपग्रह भूस्थिर केंद्रात(सॅटेलाईट अर्थ स्टेशन) जाऊन काही खास संशोधन करण्याच्या कामगिरीसाठी आम्ही तिथे जाऊन पोचलो. दिल्लीहून एक मोठा साहेब आमच्या गटाचा प्रमूख म्हणून आला होता. त्या केंद्रात प्रवेश करण्यापासून ते तिथेच राहून काम करण्यासाठी लागणार्‍या सगळ्या परवानग्या त्याने आधीच काढून ठेवलेल्या होत्या. आमच्या राहण्याचाही बंदोबस्त तिथल्याच गेस्ट-हाऊसमध्ये केला होता.

आमचे क्रमांक एकचे साहेब हे प्रोफेसर आणि आम्ही इतर चौघे त्यांचे सहाय्यक आहोत आणि अतिशय महत्वाचे संशोधन करण्यासाठी आमचा तिथे मुक्काम आहे असा समज तिथल्या कर्मचार्‍यांचा करून देण्यात आला होता.मी सोडलो तर इतर चौघे अतिशय व्यवस्थित राहात. रोज गुळगुळीत दाढी,परीटघडीचे कपडे,मितभाषीपणा ह्यामुळे ते तिथल्या साहेब लोकांसारखेच दिसायचे. माझा पोशाख मात्र तसा 'हटके' होता. कमरेला गडद निळ्या रंगाची जीन्स, वर कोणताही भडक रंगाचा टी-शर्ट, डोळ्याला गडद रंगाचा गॉगल्स आणि कपाळावर अस्ताव्यस्त रुळणारे केस. तेव्हा मी नेत्रस्पर्शी भिंगे म्हणजे शुद्ध मराठीत ज्याला 'कॉंटॅक्ट लेन्सेस' म्हणतात ती वापरायचो आणि तिथल्या उन्हाचा, धुळीचा त्रास होऊ नये म्हणून तो गॉगल्स वापरत होतो. त्यावेळी माझ्या हनुवटीखाली असणारी दाढी मी व्यवथित राखून होतो(मला तितकीच दाढी आहे;संपूर्ण गालभर नाही. तशी 'ती दाढी' हीच माझी ओळख झालेय. हल्ली अमिताभने ’कौबक’ मध्ये तशी दाढी वापरायला सुरुवात केल्यापासून लोक मला मी अमिताभची नक्कल करतोय असे म्हणायला लागले.पण खरे तर अमिताभनेच माझी नक्कल केलेय हे लोकांना सांगूनही पटत नाही. असो. एकदा एखाद्याच्या नावाच्या मागे मोठेपण चिकटले की लोक तो करेल तीच फॅशन असे मानतात.)

मी जरी पदाने कनिष्ठ होतो तरी अनुभवाने माझ्या दोघा वरिष्ठ सहकार्‍यांपेक्षा जास्त संपन्न होतो. ते दोघे नुकतेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची डिग्री घेऊन आमच्या कार्यालयात चिकटले होते. प्रत्यक्ष कामाचा असा खास अनुभव नसल्यामुळे अलिखितपणे मीच त्यांचा बॉस झालो होतो. त्यामुळे ते मला 'बॉस' असेच म्हणत.काम करताना आलेली कोणतीही अडचण मी सहज सोडवत असे त्यामुळेही असेल ते मला मानत होते

तसा दिसायला जरी मी काटकुळा होतो तरी एकूण माझे विक्षिप्त दिसणे आणि तिथले गुढ वागणे ह्याचा संमिश्र परिणाम म्हणजे तिथले सगळे मला मी कुणी तरी 'शास्त्रज्ञ' आहे असेच समजायचे. माझे इतर दोघे साथी मला 'बॉस' म्हणत त्याचाही कदाचित तो अदृष्य परिणाम असावा. तसे वाटायला आणखी एक कारण होते. त्या केंद्रातील सर्वसामान्य कर्मचार्‍यांना जिथे प्रवेश वर्जित होता अशा एका अतिशय 'खास' जागेत आमचे हे काम चालत असे.तिथल्या केंद्र संचालकांनी आम्हाला त्या जागेचा ताबा देताना एकही प्रश्न विचारलेला नव्हता कारण त्यांनाही दिल्लीहून तसे आदेश आलेले असावेत. आम्ही तिथे काय करणार आहोत हे देखिल त्यांनी विचारले नव्हते आणि काय करतो आहोत हे पाहायला ते एकदाही तिथे फिरकले नाहीत. फक्त तिथल्या अतिशय महत्वाच्या आणि वरिष्ठ अधिकार्‍याला बोलावून "ह्यांना लागेल ती मदत त्वरीत द्यायची" असा आदेश दिला होता. तिथल्या सुरक्षा अधिकार्‍यांनाही त्याचप्रमाणे आदेश देऊन आम्हा पाच जणांच्या हालचालीवर,कामकाजावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत ह्याची पक्की काळजी घेण्याबद्दल बजावले होते. ह्या सर्व गोष्टींमुळे नकळत आमच्या भोवती असलेले गुढतेचे वलय अधिकच मोठे झाले.

तिथल्या वास्तव्यात आमचे वागणे,आमच्या हालचाली गुढ वाटाव्यात अशाच असत. कॅंटिनमध्ये जेवताना,न्याहारी करताना आम्ही तिघे एकत्रच असायचो पण एकमेकांशी बोलण्याऐवजी जास्ती करून मुद्राभिनय आणि सांकेतिक भाषेत आणि कमीत कमी शब्दात आम्ही आपापसात व्यवहार करायचो. ह्या आमच्या वागण्याचे नाही म्हटले तरी तिथल्या स्थानिक कर्मचार्‍यांना कुतुहल वाटत असायचे आणि ते आमच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे.पण आम्हाला सक्त सूचना होती की इथे आपण आणि आपले काम ह्या व्यतिरिक्त कुणाशी संबंध वाढवायच्या भानगडीत पडायचे नाही. तेव्हा आम्ही निव्वळ हसून वेळ साजरी करायचो.

२२ ऑक्टोबर, २००७

गप्पाष्टक!३

गोरा: सुप्रभात!

गरा: सुप्रभात
गोरा: तुम्ही नाही नाही म्हणता बाकी मस्तच लिहिलंत हो. वाचकांच्या उड्या पडताहेत त्यावर. त्या अभिजितवरही दडपण टाकतोय. पण दाद देत नाहीये.
गरा: मी तरी कुठे देत होतो आधी.
पण आता सुटका नाही हे जेंव्हा कळलं तेंव्हा लिहून टाकलं :-)
त्याला सांगा, तू गाणं वाजव मग आम्ही "दाद" देऊ
गोरा: प्रयत्न करतोय हो. मी असा सोडणार नाही रणांगण!
गरा: देवाला काहीही कठीण नाही
गोरा: ते आहेच. पण काही भक्त 'नामदेवा'सारखे हट्टी असतात ना!
गरा: सगळेच असतात बहुतेक, पण देवापुढे भक्तांना आपला हट्ट सोडावाच लागतो शेवटी
अहो भक्त या हट्टात जिंकले तर देवाचं देवपण काय राहिलं मग ?
देव हरता कामा नये कोणत्याही परिस्थितीत.
गोरा: अहो देव आणि भक्त हे अद्वैताचे नाते आहे. तेव्हा कुणाचीही हारजीत होत नसते. त्यातून तो 'अभिजित' आहे. :-)
गरा: कभी"जीत" दुसरे की भी होती है!
गोरा: पण अभी'जित' त्याचीच दिसतेय ना!
गरा: अभी आपको मनावर लेना गिरेगा.
गोरा: मनावर,किलोवर वगैरे घेतलेच आहे आणि कार्य सिद्धीस गेल्याबिगर (चैन) पडणार नाही.
गरा: तथास्तु! असं म्हणायची पाळी आता भक्तावर आली आहे.
गोरा: म्हणुनच म्हटलंय 'अद्वैताचे नाते'!
गरा: अद्वैत म्हणजे एकरुपता ? तेच "ना ते" ?
गोरा: होय. म्हणजेच स्वत:चा स्वत: केलेला पराभव ठरेल तो. भक्त आणि देव शरीराने वेगळे असले तरी एकाच मनात नांदतात.
नांदतो देव हा आपुल्या अंतरी!
गरा: छान
गोरा: सद्या काय नवीन हालहवाल?
गरा: नवीन काही नाही
गोरा: कळफलकाबाबतची(सिंथेसायजर) प्रगती कितपत झाली?
गरा:चालू आहे जोरदार, नवनवीन शोध लागताहेत रोज
गोरा: मग त्याचीच एक सु'रस' कहाणी लिहा की!
गरा: या कहाणी ला "सूर"स कहाणी म्हणावं लागेल खरं तर
गोरा: तसं म्हणा हवं तर! पण 'लिहा' की! हमकु वाचनेसे मतलब हाये! :-)
गरा: आता मी काही "वाचत" नाही.. तुमच्या हातून ;-)
गोरा: तुम्ही लिहा हो म्हणजे आम्ही 'वाचू'!
गरा: हो, रिक्षाच्या मागे लिहिलेलं वाचलंय मी "वाचाल तर वाचाल"
ही घोषवाक्य किती विचित्रपणे लिहिलेली असतात रिक्षांवर. कधीतरी
कोणीतरी अडाणी माणसं पेन्ट करतात बर्‍याच वेळेस.
एका रिक्षेवर लिहिलं होतं "जोशी केळं तोटी केळं"
आता याचा अर्थ काय ? ओळखा पाहू
गोरा: जो शिकेल तो टिकेल! हाहाहा!
गरा: अरे वा! हुशार आहात
गोरा: आता तुम्ही ह्या असल्या प्रासंगिक विनोदावरही लिहाच.प्रतिक्रियांचा पुर येईल त्यावर.
गरा:पण खरी प्रतिक्रिया आपल्याला न ओळखणार्‍या माणसाची. इथे सगळे गोतावळ्यातले लोकच ’वा,वा’ करतात.
गोरा: काही प्रमाणात ते खरेच असते;पण गोतावळा हळू हळू वाढतो ना!
गरा: तरी शेवटी तो गोतावळाच.
गोरा: नाही. तसं नाही. आधी न ओळखणारा प्रतिसाद देतो आणि मग तोही गोतावळ्याचाच एक भाग होतो.
गरा: अच्छा
गोतावळ्याबाहेरच्या प्रतिक्रिया मिळण्यासाठी नामांकित संकेतस्थळी लेखन टाकायला पाहिजे.
जालनिशीवर सहसा गोतावळाच चक्कर टाकतो.
गरा: हे सगळं तुम्हीच करु शकाल, कारण आज आता मला कामाकडे वळावं लागेल
गोरा: चालेल. बघू या कसे जमते ते!
गरा: धन्यवाद सर!
गोरा: एकदम सर! झाडावर चढल्यासारखे आणि मागे 'प्रो. ठिगळे' अशी पदवी लावल्या सारखे वाटतेय! :-)
गरा: :-)))))))))))))))) ठिगळं ही बहुधा मागेच लागतात कारण तोच जास्त घर्षणाचा भाग असतो
गोरा: अजून एक गंमत सांगू का?
गरा: बोला!
गोरा: तुमच्या सौ. म्हणजे आमच्या वहिनी साहेबांनी मला 'काका' बनवले आहे. मला ते संबोधन चालेल असे मी म्हटले पण.....
गरा: हाहाहा! "मामा" नाही बनवलं हेच नशीब तुमचं
गोरा: कन्या म्हणाली," बाबा! तुम्ही त्यांचे काका! तर त्यांच्या मुलाचे आजोबा! आणि तो तर माझ्याच वयाचा आहे!
मग मी तुम्हाला बाबा का म्हणायचं?
गरा: छान निरिक्षण आहे :-)
गोरा: आता काय बोलणार?
गरा: म्हणजे मामा बनवलं असतं तरी तुमचा "आजोबा"च झाला असता शेवटी
गोरा: आता तुम्हीही मला काका नाहीतर सासरेबुवा म्हणा! :-)
गरा: सासरेबुवा बरं वाटतंय जरा, कारण हे संबोधन माझ्या नशिबातच नव्हतं कधी
गरा: का हो?
गरा: हिचे वडील आमचं लग्न व्हायच्या आधीच गेले
मी त्यांना पाहिलंच नाहिये
गोरा: पण चुलत,मामे,मावस वगैरे सासरे असतीलच ना! त्यात आता माझी भर!
गरा: :) जावयाचे लाड करावे लागतील, परवडणार नाही!
गोरा: आता करतोच आहे ना! :-)
रोज उठून हालहवाल विचारतोय.
गरा: सासरेबुवा, या दिवाळीला मला एक स्कूटर पाहिजे.
गोरा: दिली! चावीची की स्प्रिंगची हवीय!
गरा: चावीची, पेट्रोल वर चालणारी,खरीखुरी.
नाहीतर सूनबाईला नांदवणार नाही नीट.
गोरा: पण एक अट आहे. ती चालवत चालवत आखातात जायचं! आणि रस्त्यात कुठेही थांबायचे नाही!
गरा: चालेल (म्हणजे चालवेन) म्हणजेच (चालवून घेईन).
टाकी फुल करुन द्यायची तुम्ही ही माझी अट.
गोरा: हो आणि पेट्रोल तिथेच भरायचे(कारण तुम्हाला ते फुकटच मिळते ना!)
गरा: मुंबईपासून काय ढकलत नेऊ का ?
गोरा: मग??? समजलात काय?
गरा: मी स्कूटर मागितली आहे, ढकलगाडी नाही.
गोरा: मग मी स्कुटरच देतोय ना!
गरा: उद्या स्कूटरची नुसती हॅंडल्स द्याल आणी म्हणाल "हीच स्कूटर".
गोरा: आता मला जे परवडणार आहे तेच देणार ना! मी काय तुम्हाला विमानही घेऊन देईन.
गरा: काय "टर" उडवताय राव माझी
गोरा: टर नाही हो. मी विमान उडवायचे म्हणतोय! :P
गरा: नको. आता मला काही नको.हौस फिटली.
गोरा: बरं ते जाऊ द्या. जेवायला येताय काय?
जेवणाचे आमंत्रण आलंय.
गरा: आज काय केलंय ते सांगा आधी.
गोरा: शाही खिचडी!!!!!!!!!!
गरा: अरे वा, मेजवानीचा बेत आहे.
घ्या जेवून.
गोरा: मग येताय?
गरा: आज नको, परत कधीतरी
गोरा: बरं मग टाटा . नंतर भेटू.
गरा: टाटा

२१ ऑक्टोबर, २००७

गप्पाष्टक!२

गणपतरावांच्या गुगलटॉकचा 'हिरवा दिवा' लागलेला पाहून गोपाळराव खुशीत आलेत.आज काय गप्पा मारताहेत चला ऐकू या!

गोपाळराव: सुप्रभात! श्लोनेक!
सकाळी सकाळी एकदम हिरवा दिवा? वा! क्या बात है!
गणपतराव: जरा थांबा हा, सकाळच्या चहाचा आस्वाद घेतो आणि येतो.
गोरा: चालू द्या! निवांत!

गरा: बोला साहेब, कसं काय ?
गोरा: मजेत!आपण दोन दिवस चांगलीच मजा केलेली दिसतेय!
गरा: वीकएंडला नेहेमीच मजा असते
गोरा: मग कुठे बाहेर गेला होतात फिरायला की घरच्या घरी पार्ट्या चालू होत्या?
गरा: एक दिवस माझ्या घरी डिनर होतं, एक दिवस एका मित्राने हॉटेल मधे डिनर पार्टी ठेवली होती.आणि दुसर्‍या मित्राकडे एकदा लंच :-)
गोरा: म्हणजे डीनर डीप्लोमसी चाललेय तर!

गोरा: तुम्ही जागा बदलताय असे कळले! खरे आहे काय आणि का?
गरा: तुमचं हेरखातं जोरदार काम करतंय तर :-)
गोरा: :) कानून के हात बहूत लंबे होते है जानी!
गरा: मोठी जागा घेतोय आणि कार्यालयापासून जरा जवळ देखिल.
गोरा: मग काय चालत चालत जाणार कार्यालयात? की कारभारीण गाठोड्यात कांदा-भाकर बांधून रोज घेऊन येणार आहे?
गरा: दोन्ही शक्य आहे :-)
गोरा: चला म्हणजे त्या निमित्ताने अंगावरील काही पौंड गमावता येतील आणि पेट्रोलवरले काही पौंड वाचवता येतील. रस्तेही गुळगुळीत होतील हे अजून एक चांगले होईल! :)
गरा: वजनी गमावून चलनी कमवायचे :-)
गोरा: आयडियाची कल्पना चांगली आहे ना!
गरा: मग काय तर!
गोरा: मग कधी जाताय नव्या जागेत?
गरा बहुतेक पुढच्या आठवड्यात शिफ्ट होईन
गोरा: तुमच्या मित्र मंडळींपासून दूर जाणार आहात की जवळ पोहोचणार आहात?
गरा: दूर,पण फार दूर नाही.
साधारण १५ किमी
गोरा: म्हणजे ह्याचा अर्थ काय समजायचा? कंटाळलात काय सगळ्यांना! रोज पीडतात काय? माझ्याचसारखे!!!!!
गरा: नाही, तसे नाही. मोठी जागा पाहिजे होती
संगीतासाठी एक "शेपरेट" खोली पाहिजे होती
गोरा: संगीताची बाकी मजा आहे बरं का!
गरा: माझी पण आहे की!
गोरा: :) म्हणजे तिच्या बरोबरीने मग कविता,गजल,वीणा,सतार,सारंगी वगैरे पण येणार असतील ना!
गरा: प्रतिभा, कल्पना यांना विसरलात काय ?
गोरा: अरे हो!मजा आहे बुवा एका माणसाची!
गरा: :-)
गोरा: साहेब एक दहा-पंधरा मिनिटांनी येतो. एक काम आहे!
गरा: ठीक आहे.

गरा: या साहेब
गोरा: बोला आज काय नवी खबर देताय!
गरा: काहीच नाही, तुम्हीच हेरखात्यात आहात. तुम्ही शोधायची तर आम्हाला विचारताय? :-)
गोरा: म्हणूनच! दुसर्‍याकडून बातम्या काढून घेणे हे आमचे एक प्रमूख काम आहे ! :D
गरा: चालू द्या :-) लगे रहो गोपाळ भाई!
गोरा: बरे, संगीता कशी आहे? सद्या रुसलेय की प्रसन्न आहे?आणि त्या नव्या कळफलकाचे(सिंथेसायजर) उद्घाटान कधी करताय?
गरा: सध्या कळफलकाचे तंत्रज्ञान समजावून घेणे चालू आहे.तांत्रिक बाजूंमुळे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय.पण या आठवड्यात एका महत्वाच्या गोष्टीवर ताबा आला
तबल्याची सॅंपल्स मी आता माझ्या कळफलकावरुन वाजवू शकतो
गोरा: अजून तिथेच अडकलाय?कमाल आहे तुमची.
एकदा माझ्याबरोबर बसा! नीट समजाऊन देतो.म्हणजे संगीताकडे असे दूर्लक्ष होणार नाही. :)
गरा: अजून म्हणजे ? अजून २ वर्ष लागतील या नव्या उपकरणाची सगळी अंगं समजावून घ्यायला
गोरा: फारच मंद बुवा तुम्ही! जरा त्या मोदबुवांची शिकवणी लावा. मग बघा कसे झरझर कळायला लागेल.
गरा: त्यांच्या वरदहस्तामुळेच २ वर्ष म्हणालो मी, नाहीतर ४ लागली असती
गोरा: हा अपमान आहे त्यांचा! तुमचा धि:क्कार असो!
अहो चुटकीसरशी शिकवतील ते तुम्हाला! दोन वर्षे म्हणजे खूपच जास्त होतात!
गरा: अहो ते लहरी आहेत फार
त्यांचा शिष्यांचा गोतावळा पण मोठा आहे
त्यातून म्या पामराला कितीसा वेळ मिळणार ?
हा, रोज त्यांचे पाय चेपले तर मात्र शक्य आहे.पण सध्या माझेच येवढे दुखतात की मीच कोणीतरी बुवा (म्हणजे बाई नाही) ठेवावा म्हणतोय पाय चेपायला.
गोरा: तुमच्यावर मेहरबान आहेत असे ऐकतोय! तुमचे तबलावादनही फार आवडले आहे ना! माझ्याकडे नेहमी बोलून दाखवतात ते तसे! तबलजी कसा असावा? तर गणपतरावासारखा असे सगळ्यांना ऐकवत .असतात!
गरा: फुकटातला तबलजी कोणाला नाही आवडणार ?
गोरा: मुलगा नाव काढेल असेही म्हणाले!
गरा: नाव काढतोच मी त्यांचं संधी मिळेल तेंव्हा (बदनामी करायची संधी काय नेहेमीच येते कां ?).
गोरा: पण तुम्ही काही म्हणा(नावं ठेवा) तरी ते तुमच्याबद्दल नेहमीच चांगले बोलतात!
गरा: हे सगळं मी पुढच्या विश्व(व्यापी) संगीत महोत्सवाची बिदागी सांगेपर्यंत.
एकदा त्यांना कळलं की मी फुकटात वाजवणार नाही की पहा कसे कोकलत फिरतील माझ्या नावाने.
गोरा: बिदागी, बिदागी काय करता सारखे? अहो बुवांबरोबर तुम्हाला वाजवायला मिळाले हे तुमचे अहोभाग्य आहे. आता बघा तुमच्या घरासमोर रांगा लागतील कलाकारांच्या! सगळे तुम्हालाच त्यांच्या साथीला बोलावतील.
गरा: रांगा लागताहेत तबलजींच्या ! तुम्हाला बिदागी दिली का, हे विचारणार्‍यांचीच संख्या जास्त आहे
गोरा: अहो तुम्ही पण सांगा की त्या झाकीर सारखा आकडा!
बुवांना कुणी विचारलेच तर तेही तेच सांगतील ह्याची खात्री आहे. आपणच आपला भाव वाढवायचा असतो एवढेही कळत नाही तुम्हाला? अगदीच कच्चे आहात बुवा ह्या क्षेत्रात! खूप काळजी वाटते तुमची!
गरा: बुवांकडून शिकायला मात्र भरपूर मिळालं, व्यवहारात चोख रहाण्याचे धडे
गोरा: मग! आता कसे?
गरा: बरं आता दुसर्‍या एखाद्या कार्यक्रमाचा वृत्तांत कधी ?
गोरा: बघू या! हल्ली लोकांना ते ऑरकेस्ट्राचे सुमार कार्यक्रम जास्त आवडतात ना!
गरा: मग लिहा की त्यावर.
वार्ताहरांनी पण लोकाभिमुख असलं पाहिजे.
गोरा: हल्ली खूप प्रयत्न करूनही काहीही जमत नाहीये मनासारखे.
गरा: हं, दिसतंय खरं.
संगणकाने बराच वेळ खालेल्ला दिसतोय तुमच्या प्रतिभासाधनेतला.
झाला का तंदुरुस्त ?
गोरा: ते तर आहेच! आणि इतरही कामं बरीच रखडलेत.
दूरध्वनीने देखिल मान टाकलेय.
गरा: अरे बापरे, मग तर तुम्हाला भरपूर मोकळा वेळ मिळाला पाहिजे
गोरा: पण सद्या संगणकाच्याच मागे आहे. तो जोपर्यंत पूर्ण कार्यक्षमतेने चालत नाही तोपर्यंत जीवाला स्वस्थता मिळणार नाही!
गरा: "जिवा" बघेल हो सगळं.
तुम्ही लेखनाकडे लक्ष केंद्रित करा
गोरा: ते आहेच हो.त्याच्यावरच तर सगळी भिस्त आहे! पण तो देखिल कधी तरी घाबरतो ना!
गरा: संगणकाची प्रगती कुठवर आलीये ?
गोरा: संगणक हळू हळू मार्गावर येतोय!
बरं साहेब थोडे पोटात अन्न ढकलतो आणि येतो.
गरा: बरं, आज वेळ मिळेल यानंतर असं वाटत नाहिये मला, तरी देखील बघू.
गोरा: काहो?
गरा: मीटींग्ज आहेत जरा
गोरा: म्हणजे परत पार्टी?
गरा: नाही
गोरा: मग बौद्धिक आहे की काय?
गरा: हो
गोरा: मग येताय का जेवायला?
गरा: चालू द्या
गोरा: बरं मग भेटू या! टाटा-बिर्ला!
गरा: टाटा