आमची वाडी खूप मोठी होती हे ह्या आधीच सांगितलेले आहे. तर ह्या वाडीतच एका बाजूला आमच्या वाडीच्या मालकांची खूपच मोठी एक बाग होती. त्यात अनेक प्रकारची फुलझाडे,वेली,फळझाडे, भाज्या, औषधी वनस्पती वगैरेंची रेलचेल होती. ह्या बागेचे वैशिष्ट्य हे होते की ह्यात लावलेली झाडे पद्धतशीर अथवा शिस्तशीर अशी लावलेली नव्हती. तर जिथे जशी जागा मिळेल तशी ती लावलेली होती. मात्र त्यातील विविधता इतकी होती की काही विचारू नका. बागेत एक छानशी विहीरही होती. हिच्याच पाण्यावर ती बाग पोसलेली होती.
मोठे वृक्ष म्हटले तर ताड-माड होतेच; वड-पिंपळ होतेच; बकुळ, चिंच, चिकू,पेरू,आंबा, फणस, केळी सारखी फळझाडं होती. विलायती चिंच,तुती सारखी क्वचितच आढळणारी झाडेही होती. भोपळा,शेवगा,दोडका,काकडी,टोमॅटो,कारली,वांगी,मिरच्या,अळू(भाजीचा आणि वड्यांचा आणि शोभेचा),तोंडली,भेंडी,मायाळू,नागवेल(विड्याची पाने) इत्यादी भाज्यांच्या वेली/झाडेही होती.
फुलझाडे आणि वेली तर विविध प्रकारच्या होत्या. गुलाब,मोगरा,जाई-जुई,चमेली,चाफा(ह्यातले जवळपास सगळे प्रकार म्हणजे हिरवा,पिवळा,पांढरा वगैरे), जास्वंदी(ह्याचेही बरेच प्रकार होते),सोनटक्का,कर्दळ(ह्यांची तर बने होती.),झेंडू,तगर,अनंत,गोकर्ण,सूर्यफूल,अष्टर,शेवंती,अबोली,गुलबक्षी,चिनी गुलाब अशी अनेकविध झाडे/रोपे/वेलींची रेलचेल होती.
शोभेची झाडेही भरपूर होती. त्यातच झिपरी(वेण्यांमध्ये जो हिरवा पाला घालतात ना ती), लाजाळू अशी नावे माहीत असलेली आणि नावे माहीत नसलेल्या असंख्य वनस्पती होत्या.
औषधी वनस्पतींमध्ये वाळा,माका,आघाडा,कोरफड,ब्राह्मी आणि अशा अनेक वनस्पती होत्या.
ह्या बागेला मालकांच्या बंगल्याजवळ प्रवेशद्वार ठेवले होते बाकी सर्व बाजूंनी तारांचे कुंपण घातलेले होते आणि त्याच्या जोडीला मेंदीची लागवड केलेली होती.
आमच्या वाडीत मुलांना तर तोटाच नव्हता. घरटी सरासरी तीन-चार मुले तर होतीच. त्यामुळे ह्या बागेवर आम्हा मुलांचा नियमित हल्ला असायचा. दगड मारून चिंचा,कैर्या,पेरू,चिकू वगैरे पाडण्यात आम्ही सगळे अव्वल होतो. पण व्हायचे काय की जी काही फळे पडत ती त्या बागेच्या आवारातच पडत. त्यात जायला एकच प्रवेशद्वार आणि तेही मालकांच्या बंगल्यासमोर असल्यामुळे त्यांची नजर चुकवून आत जाणे महा कर्मकठीण असे. त्यातही बागेचा माळी, मालकांचे इतर नोकर वगैरे मंडळींचा राबता असायचा. मग ती पडलेली फळे शोधायला बागेत जायचे तरी कसे? आमच्या वाडीच्या मालकीण बाई म्हणजे एक जंगी प्रकरण होते. मालक जातीने पाठारे-प्रभू समाजातले होते आणि ते रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त डेप्युटी डायरेक्टर होते. त्यांची पहिली पत्नी हयात नव्हती (जिला मी कधीच पाहिलेले नाही) म्हणून त्यांनी उतारवयात दुसरे लग्न केले होते आणि ती स्त्री(म्हणजे मालकीण बाई) जातीने कोळी होती. जाडजूड शरीरयष्टी, उंची अगदीच बेताची, बेडकासारखे बटबटीत डोळे आणि त्यावर लाल काड्यांचा जाड भिंगांचा चश्मा. लुगडे नेसणे खास कोळी पद्धतीचे आणि अंगात कोपरापर्यंत लांब बाह्यांचा पोलका.
ह्या बाईकडे नुसते डोळे वर करून पाहणेच आम्हाला भीतिदायक वाटायचे. त्यात तिचा तो भसाडा आणि राक्षसी आवाज. तिला नुसती चाहूल लागली की कुणीतरी बागेत शिरलंय; की ती असेल तिथून जोरात ओरडायची, "थांब! आलो मी!"
की त्याची पळता भुई थोडी व्हायची. ही बाई असून "आलो मी" असे का म्हणायची ह्याचे कोडे सुरुवातीला आम्हाला होते; पण पुढे कळले की कोळी जातीच्या बायका असेच बोलतात म्हणून. असो. तर अशा ह्या आमच्या वाडीच्या मालकिणीला आम्ही मुलेच काय तर मोठी मंडळी देखिल टरकून असत.
वाडीत शिरण्याचा रस्ताच त्यांच्या बंगल्याच्या दरवाज्यासमोरून होता. त्यामुळे वाडीत येणार्या जाणार्या सगळ्यांची खबर ह्या मालकिणीला.. ताईंना (ह्यांना समस्त भाडेकरू 'ताई' आणि मालकांना 'दादा' म्हणत) असायची. ताई तशा प्रेमळ होत्या पण त्यांचे प्रेमही पाशवी प्रेम होते. म्हणजे असे की प्रेमाने त्यांनी कुणाला हाक मारली तरी त्यात जरब जाणवायची. त्यामुळे आम्ही लहान मुले तर आईच्या पदरामागे नाहीतर वडिलांच्या मागे लपत असू.
आमच्या त्या मोठ्या वाडीत आमचे एकुलते एकच ब्राह्मणाचे (हल्लीच्या भाषेत सांगायचे तर 'भटाचे')कुटुंब होते. ब्राह्मणांचे त्यांना खूप कौतुक असावे असे वाटते; कारण त्यांचा देवही 'ब्राह्मणदेव'(त्यांच्या भाषेत 'बामणदेव) हा त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारापाशी एका छोटेखानी देवळात स्थानापन्न झालेला होता. त्यामुळेच की काय माझे वडील(ब्राह्मण आणि त्यातून आडनावाने देव) आणि माझी आई ह्यांच्याशी बोलताना ताई जरा(त्यातल्या त्यात हो !) नरमाईने बोलत.
ताई वाडीतल्या कोणत्याही स्त्रीला एकेरी संबोधत आणि वाडीतल्या सर्व स्त्रियादेखील त्यांना वडिलकीचा मान देत. घरात सगळ्याच कामांना नोकर-चाकर असल्यामुळे तसे ताईंना काहीच काम नसे. त्या त्यांच्या बंगल्याच्या प्रशस्त पडवीत खुर्ची टाकून बसलेल्या असत. बाहेरून येणार्या वाडीतल्या प्रत्येक स्त्रीची चौकशी केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्यामुळे सगळ्याच बायका आपल्या हातातील पिशव्या अथवा जे काही सामान असेल ते तिथेच खाली ठेवून दोन घटका तिथल्या ओट्यावर विसावत. मग ताईंच्या चौकश्या सुरू होत.
"कुठे गेली होतीस? काय आणलंस? काय भावाने आणलंस?" वगैरे वगैरे चौकश्या झाल्यावर आणि त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यावर मग त्या स्त्रीला जायची परवानगी मिळायची. ह्या चौकश्यांमध्ये कोण पाहुणे आले, कोण गेले, कोण आजारी आहे, मग औषध कोणत्या डॉक्टरांचे घेताय, घरात काय अडचण आहे, मुले नीट अभ्यास करतात की नाही असे सगळे बारीक-सारीक विषयही असत. ताईंच्या ह्या सवयीमुळे एक फायदा होत असे, सहसा वाडीत अनोळखी माणूस शिरत नसे. तसेच वाडीतली लहान मुलेही वाडीच्या बाहेर जाण्याची एकट्याने हिंमत करत नसत. एक प्रकारचा दरारा त्यांनी निर्माण केलेला होता. अर्थात त्यामागे वाडीतल्या आपल्या भाडेकरूंबद्दल आत्मीयता देखिल असायची. एका मोठ्या कुटंबाच्या कर्त्या स्त्री प्रमाणे त्या सगळीकडे लक्ष ठेवून असत. वेळप्रसंगी मदतही करत.
झाडाचे नारळ, आंबे, फणस ,केळी वगैरे फळे उतरवली की प्रत्येक घरी ती नोकरांच्या मार्फत जातीने पोचवली जात. त्यात दूजाभाव नसे.
सुरुवातीला भाडे घ्यायला ताई प्रत्येकाच्या घरी स्वतः जात. पुढे पुढे मग लोकच त्यांना त्यांच्या घरी भाडे नेऊन द्यायला लागले.
दरवर्षी न चुकता ताई नोकरांकरवी वाडीतल्या प्रत्येक घराला पिवळी (पिवळा चुना) फासून देत. त्या निमित्ताने मग आमची वाडी नव्याने चमकायला लागायची.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा