माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० जानेवारी, २०१०

होळी विशेषांक!

मित्र-मैत्रिणींनो लक्ष देवून वाचा.
शद्बगाऽऽऽरवा ह्या हिवाळी विशेषांकानंतर आम्ही आणत आहोत होळी विशेषांक.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
ह्या अंकासाठी फक्त हास्यवर्धक साहित्य पाठवायचंय. ह्यामध्ये विनोदी कथा/कविता/विडंबनं/उपहासगर्भ लेखन/वात्रटिका/व्यंगचित्रं वगैरे पद्धतीचे लेखन अपेक्षित आहे.एखादा फजितीचा प्रसंग..स्वत:विषयीचा/दुसर्‍या विषयीचा किंवा कुणाची तरी घेतलेली फिरकी..अशा कोणत्याही प्रासंगिक विनोद निर्मिती करणार्‍या घटना...गद्य/पद्य स्वरूपात आपण पाठवायच्या आहेत. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी की कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही.
ह्या अंकासाठी जे साहित्य येईल त्यात कोणतेही संपादन केले जाणार नाही...फक्त टंकलेखनात काही चुका असतील तर त्याच सुधारल्या जातील. बाकी लेखातील मजकुराची जबाबदारी संपूर्णपणे त्या त्या लेखक/लेखिकेची असेल हे लक्षात ठेवावे.
आपले लेखन पाठवण्याची शेवटची तारीख आहे.... १९फेब्रुवारी २०१० (भारतीय वेळेप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत).
साहित्य पाठवण्याचा पत्ता attyanand@gmail.com
विशेष सूचना: कृपा करून लेखन पीडीएफ स्वरूपात पाठवू नये. तसेच पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये. ताजे आणि नवे साहित्य ह्या अंकासाठी पाठवावे आणि हा अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य जाहीरपणे अन्यत्र कुठेही प्रकाशित करू नये ही विनंती.
तेव्हा मंडळी आता लागा तयारीला आणि लवकरात लवकर पाठवा आपले सहित्य.

२७ जानेवारी, २०१०

वाढदिवसाची भेट!!!!!!!

रविवारी दिनांक २४ रोजी स्टार माझाच्या ’ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला गेलो होतो. परतताना एका ठिकाणी ठेचकाळलो आणि डावं पाऊल जबरदस्त दुखावलं....त्याबद्दल आधीच लिहून झालंय.
दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी पाय चांगलाच ठणकत होता म्हणून सकाळी बाहेर कुठेच गेलो नाही. संध्याकाळी मात्र जरा बरं वाटत होतं म्हणून आमच्याच इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील क्ष-किरण तपासणी केंद्रातून पायाची तपासणी करून घेतली.
संगणकावर प्रतिमा पाहून हे नक्की झालं की हाडाला कुठेही दुखापत झालेली नव्हती, पायाच्या घोट्याभोवतीचे स्नायु मात्र खूपच ताणले गेलेले दिसले. तरीही हाड मोडलं नाही हा एक दिलासा मिळाला. हुश्श. दुसर्‍या दिवशी २६ जानेवारी..म्हणजे सार्वजनिक सुट्टी म्हणून कागदोपत्री तपासणी अहवाल २७ला मिळणार होता. त्यानंतरच तो अहवाल घेऊन डॉक्टरांकडे जायचं ठरवलं.

आज २७ जानेवारी. सकाळी तपासणी अहवाल घेण्यासाठी घरातून बाहेर पडलो तर लक्षात आलं की लिफ्ट बंद आहे. मला सहाव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर दुखर्‍या पायानं उतरवेना म्हणून परत घरात आलो. अर्थात कसाबसा उतरलो असतो तरी परत वर पाच मजले चढून येणं कठीणच होतं. दुपारी कन्या तिच्या कार्यालयात गेली तेव्हा लिफ्ट सुरु झालेली. डॉक्टरांची वेळ संध्याकाळची म्हणून संध्याकाळी मी जामानिमा करून घराच्या बाहेर पडलो. लिफ्टमधून पहिल्या मजल्यावरच्या केंद्रातून तपासणी अहवाल घेऊन बाहेर आलो तो कळलं की पुन्हा लिफ्ट बिघडली. :(
मग हळूहळू पायर्‍या उतरत एक मजला खाली उतरलो आणि माझ्या घरापासून साधारण शंभर मीटर अंतरावर असणार्‍या हाडांच्या डॉक्टरांकडे(ऑर्थोपेडीक सर्जन)कडेकडेनं पोचलो. परत घरी येताना दूध आणि भाजी आणायची होती म्हणून बरोबर पिशव्याही घेतलेल्या होत्या.

डॉक्टरांकडे गेलो. त्यांना तपासणी अहवाल दाखवला. माझा पाय आणि तो अहवाल तपासल्यावर त्यांनी हाड मोडले नसल्याबद्दल खुशी जाहीर केली मात्र त्याच वेळी माझ्या घोट्याच्या बाजुचे स्नायु चांगलेच दुखावले गेल्याचेही सांगितले. त्यावर औषधयोजना करण्याबरोबर, पाय लवकर बरा व्हायचा असेल तर तो प्लास्टरमध्ये बांधावा लागेल असेही ते म्हणाले. अर्थात प्लास्टर लावायचे की नाही ते ठरवण्याचा पर्याय मला होताच..पण त्यामुळे पाय वारंवार हलणार आणि दुखणं बरं व्हायला कितीही वेळ लागू शकतो हे लक्षात आणून दिल्यावर मी पाय प्लास्टरबंद करण्यासाठी राजी झालो.
प्लास्टरमध्येही दोन प्रकार सांगितले गेले. एक, प्लास्टर ऑफ पॅरिसयुक्त आणि दुसरं फायबरयुक्त. पहिलं सहा आठवडे पायाबरोबर बाळगावं लागणार होतं तर दुसरं फक्त तीन आठवडे...इति. डॉक्टर. मात्र दुसर्‍याची किंमत पहिल्यापेक्षा दुप्पट होती. दुप्पट किंमत देऊन जर लवकर बरं होणार असेल तर तेच करा असं मी डॉक्टरांना म्हटलं.

झालं. मला शस्त्रकियागृहात नेलं गेलं. मग दोन परिचारिकांच्या साथीने डॉक्टरांनी माझा पाय प्लास्टरबद्ध केला आणि....

मी भानावर आलो. अहो भानावर आलो म्हणजे बेशद्ध वगैरे नव्हतो हो, मी पूर्ण शुद्धीतच होतो. मात्र पाय प्लास्टरमध्ये बांधावा लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्यावर मी मागचा पुढचा असा कोणताही विचार न करता तसं करायला राजी झालो होतो आणि आता अचानक लक्षात आलं की.. अरेच्चा! आता तर मला चपलाही घालता येणार नाहीत. गच्च रहदारीच्या अशा हमरस्त्यावरून मी हा असा पाय घेऊन घरी कसा जाणार? ह्याक्षणी माझ्या बरोबर कुणीच नाही हे आत्ता लक्षात आलं. त्यातून लिफ्ट बंद आहे आणि अशा अवस्थेत सहा मजले चढून जायचं कसं? हा प्रश्न आधीच मनात यायला हवा होता तो आता आ वासून उभा राहिला. :(

क्षणभर माझ्या मनात विचार आला की डॉक्टरांना सांगावं की तुमचे जे काही पैसे असतील ते घ्या पण हे प्लास्टर आत्ताच काढा. पण मी तसं केलं नाही. मात्र डॉक्टरांना माझी अडचण सांगितली...की मी आता चार पावलंही चालू शकत नाहीये आणि ह्या भर रहदारीत मी घरी कसा जाऊ? त्यातून लिफ्टही बंद आहे आणि मला जायचंय सहाव्या मजल्यावर?
तेव्हा डॉक्टर म्हणाले की...अहो मग इथेच राहा आजची रात्र.
मी म्हटलं..नको. त्यापेक्षा तुमच्या कुणा माणसाला माझ्या बरोबर पाठवलंत तर ते जास्त बरं होईल.त्यामुळे दोन कामं होतील. मला आधारही मिळेल आणि त्या माणसाच्या हातात मी राहिलेले पैसेही पाठवून देईन.
डॉक्टर खूपच दिलदार स्वभावाचे आहेत. मुळात प्लास्टरसाठीचे पूर्ण पैसेही माझ्याकडे नव्हते. माझ्याकडे त्यातले जेमतेम १/६ पैसेच होते. तरी राहिलेले पैसे मी नंतर देईन ह्या भरवशावर त्यांनी प्लास्टर चढवलेलं होतं. त्यांनी लगेच त्यांच्याकडच्या एका सहाय्यकाला माझ्या बरोबर पाठवलं..पैशांची घाई नाही,तुम्ही आमच्याकडे ह्या आधीही आलेला होता आणि आमचा तुमच्यावर विश्वास आहे तेव्हा पैसे नंतर दिलेत तरी चालेल. मात्र जपून जा .

इस्पितळाच्या आवारातून कसाबसा खरडत खरडत रस्त्यापर्यंत आलो. रस्ता वाहनांनी नुसता ओसंडून वाहत होता तरीही एकही रिक्षा रिकामी दिसत नव्हती. खरं तर तिथून माझं घर इतकं जवळ आहे की कोणताही रिक्षावाला इतक्या कमी अंतरासाठी येण्यासाठी तयार होण्याची शक्यता नव्हती....आणि अचानक एक रिकामी रिक्षा कडेकडेने माझ्या दिशेने येताना दिसली. मी माझ्याबरोबरच्या सहाय्यकाला रिक्षावाल्याला अडवायला सांगितले. सुदैवाने पुढच्या नाक्यावरील लाल दिव्यामुळे त्याच वेळी रहदारी थांबली. रिक्षावाला आधी तयारच होईना पण मग मी माझा प्लास्टरयुक्त पाय त्याला दाखवला आणि त्याला कणव आली. हुश्श! रिक्षात बसलो आणि तीनचार मिनिटात इमारतीच्या आवारात पोचलो.

आता इथून पुन्हा माझी कसोटी होती. हळूहळू,खुरडत खुरडत पण जिद्दीने मी कसाबसा पाचव्या मजल्यावर पोचलो आणि अचानक लिफ्ट सुरु झाल्याचा चमत्कार झाला.
आमच्या इमारतीत एकच लिफ्ट आहे आणि ती कधी बंद पडेल ह्याचा भरवसा नसतो. त्यामुळे तो एक मजला लिफ्टनं वर चढावा की पायीच चढावा ह्या दुविधेत क्षणभर पडलो. कुणी सांगावं...लिफ्ट तेवढ्यातल्या तेवढ्या मधेच कुठे बंद पडली तर? तर काय, लटकलोच समजा.. पण मनातले विचार बाजुला सारले आणि बिनधास्तपणे राहिलेला एक मजला लिफ्टने वर गेलो. :)

मित्रहो, उद्या २८ जानेवारी. माझा वाढदिवस. माझ्या वाढदिवसाची ही अनोखी भेट कशी वाटली? आता ती तीन आठवडे मला जवळ बाळगायची आहे. :D
डॉक्टरांकडे जाईपर्यंत मलाही माहीत नव्हतं की मला अशी काही भेट मिळणार आहे..पण एका क्षणात सगळं बदललं आणि पायावर मणभर जड असं प्लास्टर घातलं गेलं

२४ जानेवारी, २०१०

ब्लॉग माझा-पारितोषिक वितरण समारोह.

शेवटी एकदाचा झाला बुवा पारितोषिक वितरण समारंभ. देर आये,दुरुस्त आये...असं म्हणतात तसंच.
जवळजवळ दोन महिने ह्या समारंभाला उशीर झाल्याबद्दल मी स्टार माझाच्या प्रसन्न जोशीला जाबच विचारला असं म्हणता येईल. पण खिलाडूपणाने आपली चूक मान्य करतानाच त्याने त्याच्या आणि ह्या स्पर्धेचे परीक्षक श्री. अच्युत गोडबोले ह्यांच्या व्यस्ततेची योग्य प्रकारे जाणीवही करून दिली...त्यामुळे मी अशा तर्‍हेने त्याच्याशी बोलायला नको होतं असंही वाटून गेलं.
स्टार माझाच्या वतीने प्रसन्न जोशींनी आमची खूपच छान बडदास्त ठेवली होती. माणूस एकदम आवडून गेला मला.
असो.समारंभ अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. त्याबद्दल वैयक्तिक प्रसन्न जोशीचे आणि एकूणच स्टार माझाचे मन:पूर्वक आभार. तसेच परीक्षक श्री,अच्युत गोडबोले ह्यांचेही मन:पूर्वक आभार.


परीक्षक , संगणक तज्ञ श्री. अच्युत गोडबोले आणि स्टार माझाचे प्रसन्न जोशी


पारितोषिकं स्वीकारण्यासाठी आलेल्या श्री.आनंद घारे(आनंदघन), नीरजा पटवर्धन(नीधप), दीपक कुलकर्णी, अनिकेत समुद्र(भुणभुणणारा भुंगा), दीपक शिंदे(भुंगा), देवदत्त गाणार, हरिप्रसाद भालेराव(छोटा डॉन),
मीनानाथ धसके, सलील चौधरी ह्या विजेत्यांना मी ह्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटू शकलो.
प्रत्यक्ष हजर राहू न शकलेल्या मेधा सकपाळ  ह्यांच्या वतीने विक्रांत देशमुख, राजकुमार जैनच्या वतीने निखिल देशपांडे आणि विजयसिंह होलाम ह्यांच्या वतीने त्यांचे मेव्हणे श्री.नीलेश पाटील ह्यांनी पारितोषिक स्वीकारले. ह्या प्रतिनिधित्व करणार्‍या व्यक्तींचीही त्या निमित्ताने खास ओळख झाली.
श्री. सुनील तथा लक्ष्मीनारायण हट्टंगडी हे नव्याने ब्लॉगिंग सुरु करणारे ६७ वर्षाचे तरूण गृहस्थ खास परवानगी काढून ह्या समारंभाला उपस्थित होते. त्यांचीही ओळख झाली.




छायाचित्रात डावीकडून..अच्युत गोडबोले,छोटा डॉन,निखिल देशपांडे,देवदत्त गाणार,सौ. देवदत्त,आनंद घारे आणि अनिकेत समुद्र.



छायाचित्रात डावीकडून...नीरजा पटवर्धन, श्री नीलेश पाटील, सौ. देवदत्त (खिडकीजवळ कॅमेरासहित),सौ. नीलेश पाटील, विक्रांत देशमुख आणि दीपक शिंदे
(काही जण माझ्या कॅमेरातून सुटलेत त्याबद्दल क्षमा मागतो.)

श्री अच्युत गोडबोले ह्यांच्याबरोबर एकत्र बसून सर्वांनी आपापली ओळख करून दिली. त्याचप्रमाणे आपण का लिहितो,काय लिहितो वगैरेबद्दल औपचारिक माहिती दिली. श्री अच्युत गोडबोले ह्यांनी परीक्षक म्हणून नेमके काय पाहिले हे थोडक्यात सांगितले.तसंच ब्लॉगमध्ये अजून कोणकोणते विषय यायला हवेत ह्याबद्दलही काही मौलिक सुचना केल्या. त्यानंतर अल्पोपहार झाला.
नंतर प्रत्यक्ष पारितोषिक समारंभ आणि त्याचे चित्रिकरण पार पडले. ह्या कार्यक्रमाचे निवेदन अश्विन बापट ह्या उमद्या तरूणाने अतिशय सराईतपणे केले. त्यानंतर एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही सगळे स्टार माझाच्या कार्यालयाबाहेर पडलो.

कार्यक्रमाचे प्रक्षेपण केव्हा होईल ते नंतर कळवले जाईल.

पुढे आम्ही काही जण म्हणजे नीरजा, मी, आनंद घारे, हट्टंगडी, निखिल देशपांडे, छोटा डॉन, श्री व सौ. देवदत्त आणि दीपक कुलकर्णी असे सगळे मिळून शिवाजी पार्कजवळच्या जिप्सी हॉटेलात गेलो. तिथे प्रवेश करण्याआधीच मी माझा पाय मुरगळून घेतला. :(
तिथून खानपान करून मग सगळे आपापल्या मार्गाला लागले.
नीरजाच्या गाडीतून मी मग माहीम बस आगारामध्ये गेलो.
तिथे मला दीड तास बसची वाट पाहावी लागली. संध्याकाळी सात वाजता बसमध्ये बसलो ते रात्री नऊ वाजता घरी पोहोचलो. (तरी बरं की नीरजा मला घरापर्यंत सोडायला तयार होती पण माझा संकोची पणा नडला.  :D )

अशा तर्‍हेने  आजचा दिवस साजरा झाला.
आता बसलोय तंगडं धरून.  :D
ह्या वयात दुसर्‍यांदा पाऊल घसरलं! ;)



माहिम बस आगारात बसल्या बसल्या टिपलेला सुर्यास्त!
.....सर्व छायाचित्रं माझ्या भ्रमणध्वनीच्या कॅमेर्‍यातून टिपलेली आहेत....

१० जानेवारी, २०१०

वडिलांची माया!

असं म्हटलं जातं की वडिल हे फक्त रागावण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी असतात. माया करण्याचा मक्ता फक्त आईकडेच असतो. वरवर पाहता हे बरोबर वाटते. पण वडिलांच्यात देखिल मायाळूपणा असतो ह्याची काही कमी उदाहरणे नाहीत. आता हेच पाहा ना!
मी रोज सकाळी व्यायामशाळेतून परत येत असतो त्यावेळी शाळा भरण्याची वेळ झालेली असते. शाळकरी मुलं आपापल्या पालकांच्या बरोबर शाळेत जात असताना दिसतात. त्या पालकांच्यात आई-वडिल,आजी-आजोबा,मोठा भाऊ-मोठी बहीण वगैरेंपैकी कुणी ना कुणी एकजण असतंच. ह्यापैकी दोन प्रातिनिधिक चित्रं आपल्यासमोर सादर करतोय. एक तिसरी-चौथीतली मुलगी. दिसायला तरतरीत. नेहमी आपल्या वडिलांचा हात धरून निमूटपणे चाललेली असते. रस्त्याने चालताना पिता-पुत्रीत कोणताही संवाद नसतो पण दोघेही रमत गमत चाललेले असतात. शाळा जवळ आल्यावर वडिल आपल्या मुलीचा हात सोडून तिला टाटा करतात आणि परत फिरतात. चार पावले चालून गेल्यावर पुन्हा मागे वळून पाहतात..मुलगी तिथेच उभी असते. पुन्हा टाटा होतो. वडिल पुन्हा चार पावले चालतात..पुन्हा वळून पाहतात...पुन्हा टाटा. वडिल वळणावरून दिसेनासे होईपर्यंत ती मुलगी तिथेच उभी असते आणि तोपर्यंत वडिलांनी किमान दहावेळा मागे वळून टाटा केलेला असतो.
कुणी म्हणेल पहिला-दुसरा दिवस असावा मुलीला सोडण्याचा...म्हणून असेल. पण मी गेली जवळजवळ २ वर्ष हे चित्र पाहतोय आणि आजही तेच चालू आहे....मागील पानावरून पुढे सुरु.
एक मतीमंद आणि शारिरीक तसेच वाचा-व्यंग असलेली बारा-तेरा वर्षांची मुलगी आणि तिचे वडिल रोज सकाळी भेटतात. त्या मुलीला नीट चालता येत नाही पण वडिल तिला अतिशय मायेने हात धरून चालवत तिच्या चालीने अतिशय संथपणे चालत असतात. अधून मधून तिच्याशी गप्पाही मारत असतात. मुलगी मधेच हसते...त्यावरून असे वाटते की बहुधा काही हास्यविनोद होत असावेत. हे चित्रही मी रोज पाहतो. वडिलांच्या चेहर्‍यावर नेहमी स्मितहास्य असते. कधीही चेहरा दुर्मुखलेला दिसत नाही. मधेच एकदोनदा वडिलांच्या ऐवजी त्या मुलीची आई तिला शाळेत सोडायला आलेली पाहिली पण वडिलांच्या वागण्यातली सहजता तिच्या वागण्यात दिसली नाही. ती आपल्या मुलीला ओढत ओढत चाललेली दिसली आणि चेहराही त्रासिक दिसत होता. रोज वडिलांबरोबर असताना त्या मुलीच्या चेहर्‍यावर असणारे हास्य अशावेळी अभावानेच दिसते.
पुरुष आपल्या भावना सहजपणे आणि मोकळेपणाने व्यक्त करत नसतो म्हणून कदाचित त्याला माया-ममता वगैरे गोष्टींचे वावडे असावे असा आपल्या सगळ्यांचा ग्रह होतो असे मला वाटते. पण खरे काय आहे?
आपल्याला काय वाटते ते जाणून घ्यावे म्हणून ही दोन उदाहरणं दिलेत.

मी ठरवलंय...

मी आता ठरवलंय की ह्या महाजालावरचा इ-कचरा वाढवायचा नाही..... अहो पण हा इ-कचरा काय असतो?
सांगतो. जरा थांबा.
सर्वसाधारण इ-कचरा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे जुन्या-पुराण्या, पुन्हा न वापरता येणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु,त्याचे सुटे भाग वगैरे असे येते. बरोबर आहे. तो सगळा इ-कचराच आहे. त्याची विल्हेवाट कशी लावावी,त्यातल्या कोणत्या गोष्टी पुनर्वापरात आणता येतील,ज्या तशा वापरता येणार नसतील तर त्याचे काय करावे...वगैरे प्रश्न सद्द्या आपल्याला भेडसावत आहेतच.
ह्या सगळ्याबरोबरच आता महाजालावर आपण जो काही विदा(डेटा) चढवतो आणि तिथून उतरवून घेतो....त्याचा साठा आता इतक्या प्रचंड प्रमाणावर होत चाललाय की त्यातूनही ह्या इ-कचर्‍याची समस्या निर्माण होणार आहे असे मला वाटतंय. आता हा विदा कोणकोणत्या स्वरूपात आपल्याला दिसतो?
१)लेखन...त्यात लेख आले,खरडी आल्या,व्यक्तीगत निरोप आले,विरोप(इ-मेल) आले,गप्पा(चॅटिंग) आलं,जाहिराती आल्या,ढकलपत्र आली(ह्यांना तर सुमारच राहिलेला नाहीये)... आता हा दिवसेंदिवस वाढत चाललेला लेखनसाठा कुठवर जाणार आहे? त्याला कोणती मर्यादा आहे का?
२)ध्वनीमुद्रण..ह्यात गाणी,संवाद वगैरे येतात. लेखनापेक्षा ह्याला जास्त जागा लागते. रोज लाखोंनी लोक अशा तर्‍हेने गाणी महाजालावर चढवत असतात/उतरवून घेत असतात.
३) ध्वनीचित्रमुद्रण...ह्याला सगळ्यात जास्त जागा लागते....इथेही तेच.
४)चित्र,छायाचित्रं....ह्यांनाही भरपूर जागा लागते...इथेही तेच.

अशा तर्‍हेने निरनिराळ्या माध्यमातून आपण महाजालावर/घराघरातून विदा साठवत चाललेलो आहे. एका लेखाच्या/गाण्याच्या,दृष्याच्या,छायाचित्राच्या अनेक आवृत्त्या..वेगवेगळ्या संकेतस्थळांवर आपण पाहत असतो..आपणही चढवत/उतरवत असतो. त्यामुळे तोच तोच विदा भरमसाठ वाढत जातोय. विदा वाढतोय म्हणून बँडविड्थ वाढवावी लागतेय,साठवण क्षमता वाढवावी लागतेय. त्यामुळे विजेचा खर्च वाढतोय. त्यामुळे उष्णतेचं उत्सर्जन वाढतंय...हवेतला कार्बन वाढतोय. जीवनावश्यक गोष्टींकडचा खर्च इथे वळवला जातोय...वगैरे वगैरे. खूप जास्त बोलतोय का मी? बरं सद्द्या इथेच थांबतो.  :)
ह्या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत...ह्याच्यात माझाही काही वाटा आहेच आणि तो वाटा पूर्णपणे बंद करणे मला जमणार जरी नसले....कारण? व्यसन लागलंय महाजालाचं आणि व्यसन असं सहजासहजी सुटत नाही म्हणून निदान काही प्रमाणात तरी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सद्द्या मी ठरवलंय की माझे लेखन मी फक्त माझ्या जालनिशीवरच करेन. त्याचीच आवृत्ती पूर्वीसारखी इतरत्र कोणत्याही संकेतस्थळावर चढवणार नाही. आलेले व्यनी, खरडी,विरोप वगैरे वाचून होताच पुसून टाकणार आहे.  कुणी म्हणेल ही तर दर्यामे खसखस आहे.. असेलही. नाकारतंय कोण. मी देखिल म्हणतोय की ही एक छोटीशी सुरुवात आहे. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही लहानच असते. हळूहळू त्यातही प्रगती होऊ शकतेच की. बहुतेकांना हे म्हणणे पटणार नाही. काहीतरी नवीन फॅड आहे म्हणूनही संभावना होईल. होऊ द्या. पण कदाचित काही लोकांना हे म्हणणे पटेलही,ते देखिल त्यांच्या परीने प्रयत्न करतील आणि कालांतराने ही एक मोठी चळवळ होईल.

हसलात ना? मी दिवास्वप्नं पाहतोय असं वाटतंय ना?
खरं तर मलाही तसंच वाटतंय. पण हे स्वप्न भलतंच रम्य वाटतंय मला त्यामुळे त्यातच हरवून जायला आवडतंय. :)
पाहूया ह्यातनं काय  साध्य होतंय ते.
सद्द्या तरी उद्दिष्ट मर्यादित आहे...त्यावर अंमल करू शकलो तर ....
सांगेन पुढच्या वेळी.