माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
प्रासंगिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रासंगिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१३ जानेवारी, २०१८

चुकीचा पायंडा !

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी आपली व्यथा मांडण्यासाठी प्रसार माध्यमांसमोर येणं हा अतिशय चुकीचा पर्याय होता.  भारतीय न्यायव्यवस्थेवर नितांत विश्वास असलेला  एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून मला हे मत व्यक्त करावंसं वाटतंय...  कोणत्याही तर्काने हे कृत्त्य योग्य आहे असे म्हणता येत नाही असं मला वाटतं. कोर्टाच्या कोणत्याही निर्णयावर किंवा वैयक्तिकपणे कोणत्याही न्याधीशांच्या हेतूविषयी शंका व्यक्त करणं म्हणजे  कोर्टाचा अवमान होतो असे सरसकटपणे मानलं जातं.  मग आता सरन्यायाधीशांबाबत ह्या चार न्यायाधीशांच्या जाहीर वक्तव्याबाबत तसं का मानता येणार नाही?

सरकारी कामाची पद्धत ही परंपरागत आहे आणि ती सगळीकडे सारखीच असते असं सामान्यपणे म्हटलं जातं. खात्याअंतर्गत कोणत्याही प्रकरणांची तड लावण्यासाठी ठरवून दिलेल्या पद्धतीनेच प्रयत्न करायचे असतात, त्यासाठी विशिष्ठ आणि नियमबद्ध मार्ग अवलंबणे ह्या गोष्टीला पर्याय नाही...कुणी ह्या मार्गाव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग अवलंबला तर तो शिस्तभंग होतो. त्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास सरन्यायाधीशांसोबत चर्चा करून, त्यांच्याकडे अर्ज करूनही जर ह्या न्याधीशांचे समाधान झाले नसेल तर त्यांना अजून एक मार्ग शिल्लक राहतोय आणि तो म्हणजे राष्ट्रपतींकडे दाद मागणे. भारतीय घटनेप्रमाणे राष्ट्रपती हेच सर्वोच्च पद आहे आणि सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांसह इतरही न्यायाधीश नेमण्याचा अधिकार त्यांचाच आहे. अशा परिस्थितीत ह्या चार न्यायाधीशांनी राष्ट्रपतींकडे दाद का मागितली नाही ह्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.

आता ह्या प्रकरणाकडे आपण जर राजकीय नजरेने पाहिले तर असे लक्षात येतंय की सत्ताधारी विरूद्ध विरोधी पक्ष ह्यांच्यातल्या वितुष्टाचा हा परिपाक आहे. सरन्यायाधीश हे भाजपला झुकते माप देत आहेत असे अप्रत्यक्षपणे सुचवत ही मंडळी त्यांच्या विरोधात बंड करून उठलेत. त्याच वेळी ह्या चौघांचे कॉंग्रेस, डावे वगैरेंशी असलेले छुपे संबंधही आता उघड होत आहेत. 

आपापल्या कार्यकालात सत्ताधारी पक्ष आपल्या धोरणाला अनुकूल ठरतील असे अधिकारी नेमतात...मोक्याच्या जागी असलेले  जुने अधिकारी निश्चितपणे बदलले जातात. ह्यात राजकीय सोय असतेच आणि शासनसुलभताही असतेच. ह्या गोष्टी सगळेच पक्ष करत असतात आणि त्यामुळे त्याबद्दल आक्षेपही घेता येत नाही किंवा तसा तो घेऊनही फारसा उपयोग होत नाही. ह्या गोष्टीचा चांगला आणि वाईट असा दोन्ही तर्‍हेचा परिणाम होत असतो. मोक्याच्या जागी नेमणूक व्हावी, सेवानिवृत्तीनंतरही काही तरी सत्तापद मिळावं ह्यासाठी काही अपवाद वगळता
ह्यातली बहुसंख्य माणसं सत्ताधार्‍यांच्या कलाने कारभार करत असतात. खरं तर हा गुण सर्वसाधारणपणे कमीजास्त प्रमाणात सगळ्यांच्यातच दिसून येतो...त्यात पक्षीय मतभेद करता येणार नाहीत.

म्हणूनच मला असं वाटतं की ह्या चार न्यायाधीशांनी आपल्या व्यथा जाहीरपणे माध्यमांसमोर मांडून अतिशय चुकीचा असा पायंडा पाडलेला आहे आणि त्यासाठी त्यांना शासन होणे नक्कीच गरजेचे आहे. आता कुणी म्हणेल की मग त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे काय?  तर त्याचीही शहानिशा खुद्द राष्ट्रपतींनी करायला हवी आहे आणि त्यात जर सरन्यायाधीशांचे वर्तन चुकीचे वाटले तर त्यांना बरखास्त करून त्यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करायला हवी आहे...ह्या चार न्यायाधीशांच्या जाहीर आरोपांमुळे डळमळीत झालेला, भारतीय न्यायव्यवस्थेवरचा  विश्वास जर पुन्हा बळकट करायचा असेल तर व्यक्तीनिरपेक्ष, पदनिरपेक्ष अशा पद्धतीने ह्या प्रकरणात लक्ष घालून त्याचा तातडीने निकाल लावायला हवा आहे.

जे घडलं ते निश्चितच दूर्दैवी होतं  पण ह्यातूनही नक्कीच काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असा माझा विश्वास आहे.

२३ जानेवारी, २०१७

दिव्य विद्यालय, जव्हार!


काल दिनांक २२जानेवारी २०१७रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील श्री गुरुदेव बहुद्देशिय सामाजिक संस्था संचालित ’दिव्य विद्यालय’शाळेच्या दत्तक पालक मेळाव्याला हजर राहण्याचा योग आला.
तिथली काही छायाचित्र आणि दृष्यचित्र आपल्याला त्या संस्थेचं स्वरूप माहीत व्हावी ह्या दृष्टीने इथे सादर करत आहे.






दत्तक पालकांचे वाजत-गाजत स्वागत



थोडक्यात संस्थेचा परिचय


अंध विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक ह्यांनी सादर केलेले स्वागत गीत आणि एक भावगीत




विद्यार्थ्यांनी अतिशय सहजपणाने सादर केलेली कलाकुसर, नाट्य, संगीत आणि नृत्य पाहून असं वाटलंच नाही की त्यांच्यात काही कमी आहे/असावी. खरं तर कमी असलीच तर त्यांच्यांकडे पाहण्याची आपली दृष्टीच अधू असावी असंच मला वाटतं. ह्या सर्वाचे श्रेय मुख्याध्यापिका आणि संस्थापिका श्रीमती कोकडबाई आणि त्यांचे सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ह्या सगळ्यांनाच द्यायला हवंय. मुलांच्या अंगी असणारे अंगभूत गुण
शोधून त्यांना त्याबाबतीत प्रोत्साहन देऊन आणि त्यांच्याच कलाने वागून त्यांना शिक्षण देणं हे काम वाटतं तेवढं सोपे नाही...पण ह्या समस्त शिक्षक मंडळींचं कर्तृत्त्व  निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांना माझा सलाम.

आणि हे त्यांचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/Divya-Vidyalaya-School-for-Blind-and-Mentally-Disabled-Children-611020559083391/?fref=ts


शाळा भेट संपल्यावर येता येता रस्त्यात एक स्थळ पाहिलं ते म्हणजे ’शिरपामाळ!’
शिवाजी महाराज सुरतेला जातांना वाटेत जिथे जव्हारचे राजे विक्रमशहा ह्यांनी शिवाजी महाराजांचा शिरपेच देऊन सत्कार केलेला ते स्थळ म्हणजे शिरपामाळ!  



३ ऑक्टोबर, २०१५

गांधीजयंतीच्या निमित्ताने...

मंडळी, काल गांधी जयंती झाली...त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जे उलटसुलट अशा राजकीय विचारांचे वादळ ह्या जालीय जगात उठले ते सर्व पाहून कधी नव्हे ते खूपच अस्वस्थ झालो आणि त्यानंतर आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त झालो....कधीकाळी मीही असाच, वाहवत जायचो.....पण हे योग्य नव्हे ह्याचे आता नक्कीच भान आलेले आहे.....तुम्हीही वाचा आणि विचार करा...


गांधीजी-सावरकर-आंबेडकर आणि अशाच मोठ्या लोकांकडून आपण जर काही शिकायचं असेल तर ते म्हणजे ह्या देशाबद्दलचं त्यांचे निस्सीम प्रेम...देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी वेगवेगळे मार्ग जरी चोखाळले असले तरी त्यांचे उद्दिष्ट मात्र एकच होते..मला वाटतं, आज कुण्या एकाला नायक आणि इतरांना खलनायक बनवून आपण नेमकं हेच विसरून जातोय की हे जे स्वातंत्र्य,स्वराज्य आपल्याला त्यांच्या त्यागामुळे, लढ्यांमुळे आणि कष्टांमुळे मिळालंय त्याचा आपण अनादर करत आहोत...कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ ह्या वादात न पडता, सगळेच आपल्यासाठी वंदनीय आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे आहे आणि आपल्याला मिळालेलं हे स्वराज्य, सुराज्य कसे करता येईल ह्याचा गांभीर्याने विचार करून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत....

नेता झाला तरी तोही माणूसच असतो आणि गुणावगुण सगळ्यांच्यातच असतात...आपण फक्त त्यांच्यातल्या आपल्याला आवडलेल्या गुणाचे/गुणांचे आपल्या कुवतीप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न केला तरी त्यांचा योग्य तो सन्मान होईल...त्यासाठी जयंत्या/मयंत्या साजर्‍या करण्याचा देखावा करणे जरूरी नाही...त्यांना देवत्त्व बहाल करण्याची किंवा त्यांची स्मारकं, पुतळे उभारण्याची गरज नाहिये...त्याऐवजी आपण त्यांच्यातला एक जरी गुण आपल्यात बाणवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी ह्या देशाचे भवितव्य बदलून जाईल आणि तीच खरी ह्या समस्त महान लोकांच्या कार्याची पावती असेल...

थोडंसं वैयक्तिक...

माझे वडिल गांधीजी आणि सावरकर ह्या दोघांच्या विचाराने प्रभावित झाले होते...गांधीजींकडून त्यांनी स्वावलंबन, सत्यप्रियता, साधेपणा, काटकसरीपणा  इत्यादि गुण उचलले होते आणि सावरकरांच्या प्रेरणेने ते दुसर्‍या महायुद्धाच्या काळात भारतीय सैन्यात दाखल होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावून आले होते....


वडिलांच्यातले बरेचसे गुण माझ्यातही आलेत....तरीही माझ्या तरूणपणात मी अतिशय बोलभांड होतो, बर्‍याचदा, उचलली जीभ लावली टाळ्याला अश्या प्रकारे..आपली लायकी विसरून, न्यायाधीशाच्या आवेशात एखाद्याला नायक आणि दुसर्‍याला खलनायक ठरवून मोकळा होत असे...काहीच अभ्यास नसतांनाही, तुटपुंज्या वाचनाच्या आधारे आपली राजकीय मतं ठामपणे व्यक्त करत होतो...त्यात ठामपणापेक्षाही दुराग्रहच जास्त होता..हे आज कळतंय...माझ्या पिढीतल्या बर्‍याच जणांची थोड्याफार फरकाने बहुदा हीच अवस्था असावी आणि म्हणूनच मला असं वाटतंय की स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही आपण समाज म्हणून एकत्र होऊ शकलो नाही...त्याच्या मुळाशी ही माझ्या/आमच्यासारखी बहुसंख्य अशी वाचाळ, निष्क्रिय अशी सर्व थरातील अर्धवट मंडळी असावीत...आमच्या ह्या वाईट अनुभवांतून ह्या नव्या पिढीने जर काही शिकायचे असेल तर...न्यायाधीश बनायचे सोडा...प्रत्येक गोष्टीचा निष्कारण कीस काढणे सोडा...गतगोष्टीचे शवविच्छेदन करणे थांबवा आणि थोडेसे क्रियाशील व्हा, देशाच्या प्रगतीसाठी मारक होतील अशा गोष्टींपासून जाणीवपूर्वक चार हात दूर राहा..मतभेद जरूर व्यक्त करा पण मनभेद होतील इतके ताणू नका....

थोरामोठ्यांना आपण खरोखरच मानत असाल तर इतके जरूर कराच...
आमची पिढी वाया गेली...तुमची आणि पुढील पिढ्या वाया जाऊ नयेत इतकीच माफक अपेक्षा!
जयहिंद! 

२७ जुलै, २०१३

'मोद’गाणीच्या दीडशतकाच्या निमित्ताने...

मंडळी, ’मोद’गाणी ह्या माझ्या जालनिशीवरील दीडशे गाणी पूर्ण झाली त्या निमित्ताने काही सांगावंसं वाटतंय...
सर्वप्रथम, मी इतकी विविध प्रकारची गाणी गाऊ शकेन असं मलाही वाटलं नव्हतं... त्याचे कारण मला ती गाणी आवडत नव्हती किंवा गाता येणार नाहीत असे नसून त्या सगळ्या गाण्यांसाठी त्यांचे रूळ (ट्रॅक्स) कसे आणि कुठून मिळतील हेच माहीत नव्हतं...पण काही जालमित्र अशा वेळी मदतीला धावून आले...(छट्ट...अजिबात नावं सांगणार नाहीये मी त्यांची...नाहीतर माझ्यावरचा राग त्यांच्यावर काढाल.)
त्यांनी काही रूळ पाठवले आणि मला जालावर शोध घ्यायला प्रवृत्त केलं..आणि पुढे....जाऊ दे...पुढे काय घडलं ते तुम्ही पाहताच आहात. 

दुसरी गोष्ट अशी होती/आहे की माझ्या गाण्यांना श्रोता आणि प्रतिक्रिया..दोन्हींचाही अभाव...अर्थात ह्यात फारसं वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही हे मी माझ्या मनाला बजावलं आहे...कारण, ही गाणी गाण्यात मला खूप आनंद मिळतोय  आणि त्याच बरोबर माझा वेळही मजेत जातोय... हेच माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे.

आता इतकी विविध गाणी गायल्यानंतर...अर्थातच त्या त्या गाण्यांचा अभ्यास केल्यानंतर माझी स्वत:ची अशी काही विशिष्ट मतं बनली आहेत जी मी ह्यापुढे आपल्यासमोर व्यक्त करणार आहे....ह्यातली बरीचशी मतं आपल्याला धक्कादायक आणि विक्षिप्तही वाटू शकतील...पण त्याला इलाज नाही...

नामवंत गीतकार-संगीतकार आणि गायक-गायिका ह्यांनी आपापल्या कलागुणांनी सजवलेली ही गीतं गातांना माझ्या आनंदाची पुनरावृत्ती होत होती...आजवर ही गाणी मी मला जमतील तशी...चुकीची शब्दरचना, चुकीच्या चाली, चालींची सरमिसळ वगैरे पद्धतीने गातच असायचो...पण आता नेमके शब्द कळून आल्यावर, त्या शब्दांमागची भावना समजून आल्यावर जी काही गंमत वाटली ती शब्दातीत आहे...चालींमधलं वैविध्य अनुभवतांना विशिष्ट संगीतकारांची काही वैशिष्ठ्यही लक्षात आली.

मराठी आणि हिंदी अश्या दोन्ही भाषांतली गीत मी इथे गायलेत....त्यामुळे त्यातला प्रामुख्याने जाणवलेला फरक मला इथे दाखवावासा वाटतोय....मराठी संगीतकारातील नामवंत अशा सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, हृदयनाथ मंगेशकर आणि इतरही...अशा ज्या संगीतकारांच्या रचना मी गायल्या त्यात ठळकपणे हे आढळले की कोणत्याही एका गीताची चाल..अथपासून इतिपर्यंत एकच नाहीये...गाण्यातल्या दोन-तीन कडव्यांतील किमान एका कडव्याला वेगळी चाल, वेगळे वळण दिलेले आपल्याला प्रकर्षाने आढळून येईल...मराठी संगीतकारांचे हे  वेगळे वैशिष्ठ्य ठळकपणाने डोळ्यात भरतंय...त्याचं कारण बहुसंख्य नामवंत हिंदी संगीतकारांच्या चालीतला साचेबद्धपणा...अर्थात काही अपवाद आहेतही...नाही असं नाही...पण मदन मोहन, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन, शंकर जयकिशन, ओ.पी नय्यर, कल्याणजी आनंदजी इत्यादि नामवंताच्या  चालीत आपल्याला हा साचेबद्धपणा दिसून येतो...गाण्यातली कडवी दोन असोत/तीन असोत..सगळी कडवी एकाच चालीत....शंकर जयकिशन किंवा बर्मन पिता-पुत्र ह्यांची एखाद दुसरी चाल वेगळेपणा दाखवणारी आहेही...पण ते अपवाद म्हणूनच समजावे.
नौशाद ,रवि  ह्यांच्या ज्या काही चाली मी गायल्या आहेत त्यात मात्र मराठी संगीतकारांसारखं वैषिष्ठ्य जाणवतं...रवि ह्यांची...चलो एक बार फिर से...ही चाल तर ह्याचं उत्तम उदाहरण आहे...तीनही कडव्यांच्या चाली वेगवेगळ्या आहेत...अशी गाणी गातांना गायकाची नक्कीच कसोटी लागते आणि महेंद्र कपूर ह्यांनीही ते गाणे खूप छान गायलंय.

लता, आशा ह्या गायिका हिंदी-मराठी अशा दोन्हीतही अग्रस्थानी आहेत...दोन्ही ठिकाणची त्यांची गाणी (इथे मी गायलेली) ही गाजलेलीच गाणी आहेत..तरीही मला असं वाटतं की मराठी संगीतकारांनी त्यांच्याकडून जे गाऊन घेतलंय त्या तुलनेत हिंदीतली त्यांची गाणी गायला खूपच सोपी आहेत...माझं हे विधान तुम्हाला खूप धार्ष्ट्याचे किंवा कदाचित वेडगळपणाचेही वाटेल...पण मी हे विधान गंभीरपणाने करतोय.

लताबाईंनी गायलेली...रागदारीवर आधारित गाणीही त्यांच्यासारख्या महान गायिकेला  गायला अगदीच सामान्य वाटली असतील ह्याची मला खात्री आहे...कारण त्यात गायिकेचा कस बघावा असं काही आहे असं मला स्वत:ला प्रामाणिकपणे  वाटत नाही...ती गाणी इतर कुणाही त्याकाळच्या गायिकांकडून गाऊन घेता आली असती...मात्र लताबाईंच्या (त्यावेळच्या) अलौकिक  आवाजाचा केलेला वापर हा त्या संगीतकारासाठी आणि पर्यायाने गाणी जास्त लोकप्रिय व्हावीत ह्या दृष्टीने केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठी आणि हिंदीतल्या माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लोकप्रिय अशा गायक-गायिकांनी गायिलेली ही गाणी गातांना मला जो आनंद मिळालाय तो वर्णनातीत आहे...ह्यातली कैक गाणी ही माझ्या जन्माआधीच जन्माला आलेली आहेत...कैक गाण्यांवर माझं बालपण आणि तरूणपण पोसलं गेलंय...
हिंदीत तलत, रफी, मन्ना डे, मुकेश, हेमंत कुमार, किशोर कुमार, महेंद्र कपूर अशा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ठ्यपूर्ण पुरुष गायकांची गाणी ऐकतांना आणि ती स्वत: गातांना एक वेगळाच आनंद मिळतो...अर्थात इथली गाणी ही उर्दू-हिंदी भाषेत असल्यामुळे नेमक्या उच्चारांची कसोटी पाहणारी असते...ते तसे नाही झाले तर ताल-लय बिघडण्याची आणि वेळप्रसंगी अर्थही बदलण्याची भिती असते...ह्याबाबतीत मी अजूनही शिकतोय..माझे जाणकार मित्र मला वेळोवेळी त्याबद्दल मार्गदर्शन करत असतातच...म्हणूनच आत्तापर्यंत हे साहस मी करू धजलोय
लता, आशा, सुमन अशा गायिकांची  एकापेक्षा एक सरस मराठी-हिंदी गाणी ऐकतांना मन प्रसन्न होत असतं आणि ती गातांना मात्र आपल्याला स्त्रीच्या आवाजात गाता येत नाही ह्याची खंत वाटते..तरीही ती गाणी गायला नक्कीच आवडतात...मग भले ती तेवढी प्रभावी होतही नसतील.

मराठी ही तर माझी मातृभाषा...त्यामुळे मराठीत गायला जास्त सहज वाटत असेल असे म्हणणंही धार्ष्ट्याचे होईल...कारण गाण्यात शब्दांचा उच्चार नेमका नाही झाला तर ताल-लय बिघडते हे गणित इथेही लागू आहेच...कैक वेळेला आपल्या तोंडात बसलेले उच्चार आणि गाण्यातले उच्चार वेगळे असतात...इथे र्‍हस्व-दीर्घ देखिल नीट उच्चारला नाही गेला तरी तालात-लयीत मार खावा लागतो....त्यामुळे इथेही गाणं वाटतं तेवढं सोपं नाही...पण आपल्या मातृभाषेत गाण्याचा आनंद मात्र काही औरच आहे.
मराठीतले आघाडीचे गायक-गायिका सुधीर फडके, अरूण दाते, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी, हृदयनाथ मंगेशकर, लता, आशा, सुमन  वगैरेंच्या  आवाजातले आणि गाण्यातले वैषिष्ठ्य आणि वैविध्य इतके आहे की त्यांची गाणी गातांना त्यांच्या शैलीची कळत-नकळत नक्कल करण्याचा मोह होतो..अर्थात मोह झाला तरी तसे जमणे ही गोष्ट मात्र माझ्यासारख्यासाठी किमान ह्या जन्मी तरी अशक्य आहे...ह्याचेही भान आहे बरं का!

तर मंडळी इतके दिवस सहन केलंत..पुढेही सहन करा...करू नका...तुमची इच्छा! 
धन्यवाद

११ ऑक्टोबर, २०१२

क्षयाच्या निमित्ताने....

मंडळी मागच्या लेखात जे म्हटलं होतं....त्याची पुढची कहाणी ऐका...आपलं वाचा.

८ ऑगस्ट २०१२ला माझी सिटी स्कॅनच्या मदतीने बायोप्सी झाली. त्यातून गाठीतून काढलेले दोन नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले....त्यातल्या एकाचा अहवाल आठवडाभरात आला....मला त्यातली तांत्रिक भाषा कळत नाही पण त्याचा सारांश असा होता...त्यात टीबी(क्षय) किंवा सार्कॉईडोसिस (मी हा रोग पहिल्यांदाच ऐकला) ह्यांची शक्यता व्यक्त केली होती.
सार्कॉईडोसिसवर शक्यतो औषधोपचार करत नाहीत ...तो आपोआप बरा होतो असे कळले....मी जास्त खोलात नाही गेलो...ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी कृपया गुगलून पाहावे.  :)
त्यामुळे टीबी(क्षय) असावा असे समजून त्यावर १३ ऑगस्ट २०१२ पासून उपचार सुरु झाले.....

बायोप्सी करून काढलेला दुसरा नमुना कल्चर करण्यासाठी पाठवला होता...त्याचा अहवाल सहा आठवड्यांनी म्हणजे साधारण नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात आला....त्यातही क्षयासाठी भक्कम पुरावा सापडला नाही.
हा अहवाल येण्याआधी काही दिवस टीबी गोल्ड नावाची एक रक्त तपासणी केली गेली...त्याचा निष्कर्ष नकारार्थी आला.

अशा तर्‍हेने बहुतेक तपासण्यात काहीच ठोस पुरावा सापडला नाही.
१३ ऑक्टोबरला औषधोपचारांना दोन महिने होतील....काल पुन्हा एकदा छातीचा एक्स-रे काढला...आज तो  एक्स-रे आणि जुना...अगदी सुरुवातीला काढलेला एक्सरे ह्यांची तुलना डॉक्टरांनी करून काही आशादायक बदल झाल्याचे म्हटले आणि एकूण चारपैकी दोन औषधं बंद करण्याचे ठरवलंय...राहिलेली दोन औषधं अजून किमान तीन चार महिने घ्यावी लागतील असेही ते म्हणाले.

इतकं सगळं आजवर झालंय....माझा पहिल्यापासूनचा एकच प्रश्न..जो मी डॉक्टरांना विचारतोय.....मला टीबी झालाय हे  पूर्णपणे सिद्ध झालेलं नाहीये..बहुतेक तपासण्या नकारार्थी निष्कर्ष दाखवताहेत...तरी मला ही औषधं का घ्यावी लागताहेत....

डॉक्टर शांतपणे म्हणतात...बायोप्सीच्या सुरुवातीच्या निष्कर्षात  तशी शक्यता वर्तवलेली होती. त्यामुळे पुढचे निष्कर्ष काही येवोत...केवळ शंका आली तरी टीबीच्या बाबतीत वेळीच जर उपचार नाही केले तर पुढे त्याचा त्रास होतो....वगैरे वगैरे.

मंडळी, एक मात्र झालंय...ज्या सततच्या खोकल्यामुळे मी हे सर्व सोपस्कार...उदा. तपासण्या,औषधं वगैरे करून घेतोय...तो खोकला सुरुवातीच्या आठ-दहा दिवसातच कमी झाला आणि हळूहळू गायब झाला....हा माझ्यासाठी खूप मोठा लाभ आहे.

४ ऑगस्ट, २०१२

पूर्वसूचना?

मंडळी गेले कैक महिने अधूनमधून मला कोरड्या खोकल्याने सतावलंय हे आपल्याला माहीत आहेच...मध्यंतरी जवळपास सलग तीन महिने माझी बोलतीही बंद होती....बरेच लोक खूशही होते त्यामुळे.  ;)
कारण,कानांना त्रास नव्हता ना?  :)

त्यावेळी बर्‍याच तपासण्या आणि दीर्घकालीन औषधोपचारांनंतर मी बरा झालो..आणि तुमच्या कानांचा त्रासही सुरु झाला होता....हेही तुम्हाला माहीत आहेच. पण आता तोच खोकला पुन: सुरु झालाय....पुन्हा एकदा डॉक्टरांची पायरी चढलोय...आता ह्यावेळी जरा वेगळ्या पद्धतीने तपासण्या सुरु आहेत....छाती तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे काही रक्ततपासण्या आणि त्यानंतर सीटी स्कॅन(कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी) करून घेतलंय....रक्ताच्या चाचण्यात काहीच दोष आढळलेला नाहीये....पण सीटी स्कॅनमध्ये श्वसनमार्गात एक गाठ असल्याचं आढळलंय....आता ती गाठ कसली आहे हे शोधण्यासाठी पुन्हा सीटी स्कॅनच्या जोडीने बायोप्सी करून घेण्याचा सल्ला मिळालाय...त्यानंतर मग प्रयोगशाळेत त्या काढलेल्या मांस/पाणी(जे असेल ते) वगैरेची तपासणी  होईल.
आता ही गाठ साधीच असू शकेल, कदाचित क्षय किंवा अस्थमाबद्दलची असू शकेल किंवा अगदी कर्करोगाचीही असू शकेल...त्यामुळे ती कसली आहे हे तपासणी अंतीच कळणार आहे.....

आजपर्यंत...अगदी ह्या क्षणापर्यंत मला एक कोरडा खोकला सोडला तर श्वसनाचा तसा कोणताच त्रास जाणवत नाहीये...त्यामुळे मला स्वत:ला काही फार गंभीर बाब असेल असं वाटत नाहीये...तरीही नेमकं काय आहे ते तपासणी नंतर कळेलच...तोवर वाट पाहूया....पण तसंच काही गंभीर असलं तरी काही हरकत नाही.....जे असेल ते सहजपणाने स्वीकारणं इतकंच मला माहीत आहे.

पुढचा आठवडा थोडा फार धावपळीचा जाणार आहेच ...कारण ह्या तपासण्या करण्यासाठी मला घरापासून बरंच दूर...मुंबईतच जावं लागणार आहे.... असो....माझ्या समस्त हितचिंतकांना माहीती असावी म्हणूनच हे सगळं लिहून ठेवतोय....उगाच अचानक ’धक्का’ नको!  ;)

वैधानिक इशारा: हे सर्व वाचून लगेच ...शुभेच्छा वगैरे देऊ नका....त्या देण्याआधी जरा पक्का विचार करा...कारण तुमच्या शुभेच्छा माझ्या उपयोगी पडल्या तर त्यात तुमचंच नुकसान आहे.  :)))
कसं? अहो, मी ह्यातून व्यवस्थित पार पडलो की लगेच माझं गाणं सुरु होणार आणि मग तुमचे कान आणि माझं गाणं ह्यांची गाठ(माझ्या श्वासमार्गातली नव्हे हो!) आहे हे लक्षात ठेवा......तेव्हा कोणती गाठ हवी त्याचा विचार करूनच सदिच्छांवर शिक्का मारा/मारू नका.  :पी

कुणीसं म्हटलंय तेच म्हणतो.....

काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ!   :)))))))))))

२३ जून, २०१२

साक्षात्कार!

गेल्या दोनतीन दिवसात मला असा साक्षात्कार झालाय की मला इतकी वर्षं...अहो इतकी म्हणजे काय तर उणीपूरी साठ(६०) वर्ष वाकुल्या दाखवणारा संगीतातला ताल आता माझ्यावर प्रसन्न झालाय आणि आता माझ्या गाण्यात एक नेमकेपणा यायला लागलाय...

होय, हे विधान मी अतिशय गंभीरपणे करतोय...ताल माझ्याशी कसा फटकून वागतो आणि त्यामुळे माझ्या गाण्यात, माझ्या चालीत कसा अस्ताव्यस्तपणा असतो ह्याबद्दल मी स्वत:च इतके दिवस माझी टिंगल-टवाळी करत असे हे आपण सर्वजण जाणून आहातच..ती टिंगल-टवाळी जितकी प्रामाणिक होती तेवढेच मी वर केलेले ताजे विधानही अतिशय प्रामाणिकपणाने करत आहे....माझ्याकडे, माझ्यातल्या चालकाकडे, माझ्यातल्या  गायकाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन मला आता प्राप्त झालेला आहे...आशा आहे की आपण सर्व गानरसिकही ह्या गोष्टीची योग्य ती नोंद घ्याल आणि माझे नव्या स्वरूपातले गाणे नक्की ऐकाल.

ह्यापुढे मी जे काही पेश करेन त्याला तालाची जोड असेल..मग तो ताल भारतीय अभिजात संगीतातील असेल अथवा पाश्चात्य संगीतातला असेल...पण तालाच्या बंधनातलं माझं गाणं आपल्याला ऐकायला मिळेल ह्याची खात्री देतो...सद्द्या काही निवडक  जुन्याच रचनांमधून हा बदल आपल्याला ऐकायला मिळेल...तेव्हा जरूर ऐका ह्या बदललेल्या रचना आणि हो...आपल्या चिकित्सक प्रतिक्रियाही जरूर द्या कारण माझ्यात जी काही सुधारणा होते आहे ती केवळ तुमच्यासारख्या चिकित्सक आणि रसिक श्रोत्यांमुळेच हे मी कधीच विसरू शकत नाही.

तालाशिवाय गाणं म्हणजे मुक्तछंद काव्यासारखं आहे असं मला वाटतं...त्यामुळे मला तालात गाता येत नव्हतं तेव्हा मी गंमतीने म्हणत असे की आमचे न्हाणी घराण्याचे सगळे तालच वेगळे आहेत...आम्हाला पट्टी म्हणजे फूटपट्टी आणि ताल म्हणजे बेताल इतकंच कळतं....तालज्ञ रसिकांसाठी मी उगाच अजून काही वात्रटपणा करत असे....
तुमचा तीन ताल तर आमचा तीन ताड!
तुमचा झपताल तर आमचा झापताल!
तुमचा आडा चौताल तर आमचा आडवा-तिडवा चौताल....
तुमच्या तालात १६ मात्रा तर आमच्यात साडेसतरा मात्रा......इत्यादि.

आता वरचं वाचून कधी कधी काही लोकांना वाटायचं की...अरेच्चा,ह्याला तालांची नावं,त्यातल्या मात्रा इत्यादि माहीत आहेत म्हणजे हा उगाच वेड घेऊन पेडगांवला तर जात नाही ना....पण मी खरंच सांगतो बर्‍याच गोष्टी ह्या आपल्याला वाचनामुळे आणि श्रवणामुळे  जुजबी स्वरूपात माहीत झालेल्या असतात...त्यातलं सखोल ज्ञान त्या विशिष्ट गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय कधीच प्राप्त होत नसतं...माझंही वाचन आणि श्रवण बर्‍यापैकी असल्यामुळे ह्या अशा काही जुजबी गोष्टी माहीत होत्या....आपल्या बोलण्यात योग्य ठिकाणी त्या पेरल्या की समोरच्याला उगाच वाटायला लागतं....की हा काही अगदीच ’हा’ नाहीये. ...बस हे इतकंच खरं आहे.

असो. सांगण्याचा मुद्दा इतकाच की इतके दिवस माझ्या गाण्यांकडे मी आणि माझ्यामुळे कदाचित/बहुदा तुम्हीही ज्या नजरेने पाहत होता ती आता बदलायला हवी आहे.  आता ह्यापुढे येणारी गाणी ऐकाल तर त्याची निश्चितच खात्रीही पटेल!

धन्यवाद!

२८ मे, २०१२

पत्ता सांगा हो जरा...

मला एक अनुभव हटकून येतो....मी सद्द्या राहातो ती इमारत सात मजली आहे आणि मी सहाव्या मजल्यावर राहतो...इथे एका मजल्यावर पाच सदनिका आहेत...माझ्या मजल्यावर माझ्या सदनिकेचे दार नेहमीच बंद असतं...इतर दोन ठिकाणी घरात लहान मुलं असल्यामुळे त्यांचे दरवाजे नेहमीच उघडे असतात....तरीही आमच्या ह्या मजल्यावर कधी कुणी व्यक्ती पहिल्यांदाच आली तर पत्ता विचारण्यासाठी माझ्या बंद दरवाज्याची घंटीच वाजवली जाते...समोर दारं उघडी दिसत असूनही त्यातल्या कुणालाही पत्ता विचारावासा  का वाटत नाही हे मला कोडंच आहे....कारण बहुतेक करून आलेली व्यक्ती ही माझ्या व्यतिरिक्त इतर चार जणांपैकी कुणाकडे तरी आलेली असते...मग तो वाणसामान घेऊन आलेला हमाल असो, हॉटेलातून काही खाद्य पदार्थ घेऊन आलेला पोरगा असो किंवा कुणी पाहुणा असो....
हे कमी म्हणून की काय कैक वेळेला आलेला मनुष्य केवळ इमारतीचे आणि ज्याच्याकडे जायचंय त्याचे नाव इतक्याच भांडवलावर आलेला असतो आणि तो इतर कोणत्याही मजल्यावर न जाता थेट माझ्या मजल्यावर येऊन मलाच पत्ता विचारत असतो.....माझ्या इमारतीत मी सोडून बाकी सगळे गुजराथीच  आणि येणारी व्यक्ती ही त्यांच्यापैकीच कुणाकडे तरी आलेली असते....इमारतीत येतांना इमारतीच्या रखवालदारालाही ते लोक पत्ता विचारू शकतात ना...किंवा खाली असलेली नावांची पाटीही वाचू शकतात ना....पण नाही..थेट माझ्याकडेच येतात....आता तुम्ही म्हणाल की थेट माझ्याकडे कशावरून येतात...इतरांकडेही जात असतीलच..तुम्हाला काय माहीत?
मुद्दा बरोबर आहे तुमचा....मलाही आधी तसंच वाटलं होतं...पण बरेचदा मी असं पाहिलंय की येणारी व्यक्ती ज्यांच्याकडे येते असे लोक समोर असूनही त्यांना पत्ता न विचारताच माझा बंद दरवाजा खटखटवला जातो... आणि मी त्यांना समोरच उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे  निर्देश करतो...आता बोला.
हाच अनुभव मला ह्यापूर्वी जिथे मी राहात असे तिथेही यायचा....
अहो पत्ता विचारण्याबद्दल किंवा चौकशी करण्याबद्दल तक्रार नाही..पण त्याला काही वेळकाळ? ह्या आधी मी जिथे राहायचो तिथे मी तळमजल्यावर राहायचो... एकदा रात्री अडीच वाजता एकाने माझ्या घराची घंटी वाजवली होती आणि मीही अतिशय सहजतेने कोण आहे हे न पाहताच दार उघडले होते...सुदैवाने ते कुणी चोर-दरवडेखोर नव्हते... समोरच्या घरात राहणारे लोक कुठे गेलेत म्हणून चौकशी करणारे त्यांचे नातेवाईकच होते...अर्थात त्या आलेल्या लोकांची आणि माझी साधी तोंडओळखही नव्हती...पण मी आपला सद्गृहस्थ म्हणून त्यांची चौकशी करून उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून त्यांना पाणी वगैरे प्यायला दिलं आणि वाटेला लावलं....आलेले लोक आमच्याच गावातले म्हणजे स्थानिकच होते...पण त्यांचे नातेवाईक कुठे गेले ते मला माहीत नव्हतं....चौकशीत कळलं की ते लोक असेच सहज फिरत फिरतच आले होते...एका गाण्याच्या कार्यक्रमाहून घरी परत जातांना  आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी....म्हणजे त्यांच्याकडे असे काही गंभीर कारणही नव्हतं अशा अवेळी कुणाचाही दरवाजा ठोठवण्यासाठी...
मी त्यांना विचारलं की अहो, तसं काही गंभीर कारण नव्हतं तर का उगाच मला त्रास दिलात...तर म्हणाले की तुमच्या घरातला दिवा चालू दिसला, म्हणून म्हटलं जागे असाल...आता नाईट लँपच्या प्रकाशामुळेही जर कुणाला असं वाटत असेल की घरातले लोक जागे असतील तर अशा लोकांबद्दल काय बोलणार?
काही नाही, मी कपाळाला हात लावून घेतला.
दुपारच्या झोपेचं खोबरं तर किती तरी लोक करतच असतात...माझ्या झोपेशी लोकांचं काय वाकडं आहे माहीत नाही..पण भली पहाट, टळटळीत दुपार, मध्यरात्र...वेळ कोणतीही असो...मला जेव्हा कमालीची झोप येत असेल तेव्हाच नेमकी घंटी वाजते....
कुणीसं म्हटलंय ना हो...देवाचिये द्वारी,उभा क्षणभरी,त्याने मुक्ती साधियेल्या!  ;)
मला आता माझ्या दरवाज्यावरची माझ्या नावाची पाटीच काढून टाकावी लागणार आहे.. बहुदा देव आडनावाचा दोष असावा हा सगळा...दुसरं काय असू शकतं! 

७ मे, २०१२

’सत्यमेव जयते’च्या निमित्ताने!

अमिरखानचा कालचा कार्यक्रम पाहिला....त्यात माझ्या दृष्टीने दोन गोष्टी धक्कादायक वाटल्या.  त्यातली एक म्हणजे... कुटुंबनियोजनाच्या नावाखाली सरकारनेच स्त्री-भ्रूण हत्येला चालना दिली होती....अर्थात नंतर सामाजिक संस्थाच्या दबावाने सरकारला माघार घ्यावी लागली हे अलाहिदा...पण तिथून ते लोण खाजगी क्षेत्रात जे पसरले ते आज बंदी घालूनही चोरून मारून नव्हे तर राजरोसपणे सुरु आहे...फक्त सांकेतिक भाषेत...आणि आज आपण सारे त्याचे सामाजिक दुष्परिणाम भोगतोय.

दुसरी अशी की हरयाणा.दिल्ली,पंजाब इत्यादि ठिकाणी विवाहयोग्य अशा मुलींची चणचण असल्यामुळे ह्या ठिकाणचे लोक कर्नाटक,आंध्र,बिहार वगैरेसारख्या ठिकाणाहून मुलींना विकत घेऊन त्यांची जबरदस्तीने तिथल्या पुरुषांशी लग्नं लावत आहेत...ह्यात काही ठिकाणी एका स्त्रीवर त्या घरातले सगळे पुरुष अत्याचार करतात तर कधी तिला पत्नीचा दर्जा न देता मोलकरणीचा दर्जा दिला जातो असे निदर्शनाला आलेले आहे.

मंडळी सद्द्याचा स्त्री-भ्रूण हत्येचा प्रकार जर आपण वेळीच थांबवला नाही तर मग...एकेका मुलीशी तीन-चार जणांना विवाह करावा लागेल..महाभारतात द्रौपदीची जी परवड झाली होती तीच परवड आताच्या मुलींना भोगावी लागेल....आताही स्थिती काही फारशी वेगळी नाहीये म्हणा.

बाकी, गरीब लोकांच्यातच हे स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाण जास्त आहे ,सुशिक्षित वर्गात तेवढे नाही इत्यादि गैरसमजांबद्दल मला आधीच कल्पना होती...नियमित वृत्तपत्रवाचन आणि डोळे/कान उघडे ठेवून समाजात वावरलं तर हे असे गैरसमज कधीच निर्माण होत नाहीत...पण आपले सर्वसाधारण वर्तन असे असते की...आपल्याला काय करायचंय? आपण तर असं काही करत नाही ना? आपल्याला त्रास होत नाही ना..इत्यादि...ह्या आधुनिक तपासण्या नव्हत्या तेव्हाही नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीला  कधी दुधात बुडवून तर कधी तिच्या तोंडावर उशी ठेऊन तिला गुदमरून टाकून जीव घेण्याचे प्रकार आपण कथा कादंबर्‍यातही वाचल्याचे आठवत असेलच...ते बहुतेक सगळे प्रकार उच्च वर्णीय , जमीनदार, मालदार वर्गातच होत असत....आजही होतात. ही असली कामं परस्पर दाई अथवा सुईणींच्या हस्ते, त्यांना मोठी बिदागी देऊन करवली जातात. गरीबांकडे कधी असे प्रकार होत नाहीत...त्यांचं एकच म्हणणं असतं...देवाची इच्छा...जे मिळालंय ते स्वीकारण्याची वृत्ती त्यांच्यात दिसून येते.

स्त्री-भ्रूण हत्येमूळे स्त्री-पुरुष संख्येचा समतोल ढासळला हे तर निर्विवादच आहे...आणि त्यामुळेच हल्ली स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि अत्याचार वाढले आहेत असे माझे मत आहे आणि  थोपुवरच्या एका चर्चेत मी ते मांडलेही होते....पण लोकांना ते तितकेसे पटले नाही...कालच्या कार्यक्रमात हरियाणातल्याच एका स्त्री समाजसेविकेने माझ्या म्हणण्याला दुजोरा दिलाय...तिने म्हटलंय मुलींची संख्या कमी झाल्यामुळे गावातल्या लग्नेच्छु युवकांची संख्या बरीच वाढलेय पण त्यांच्यासाठी बायको म्हणून मुलीच मिळेनाशा झाल्यामुळे आता तेच युवक आपल्याच ओळखी-पाळखीतल्या स्त्रियांची छेडछाड करायला लागलेत.

कालच्या त्या कार्यक्रमामुळे, ज्या गोष्टींबद्दल कुजबूज ह्या स्वरूपात चर्चा चालत होत्या त्या आता उघड प्रमाणात होतील हे नक्की आणि समाजमनाच्या दडपणामुळे  स्त्री-भ्रूण हत्येच्या संख्येत निश्चितच घट होईल अशी आशा आपण करूया.
जयहिंद!

५ फेब्रुवारी, २०१२

मौनीबाबा झालाय माझा!

ज्याला जी गोष्ट करायला जास्तीत जास्त आवडते तीच करायला परिस्थितीवशात एखाद्यावर काही काळासाठी बंदी आली तर?
तुम्ही म्हणाल,कसले भलते सलते प्रश्न हल्ली तुमच्या डोक्यात येतात हो....साठी बुद्धी नाठी...दुसरं काय?
चांगलं लिहावं,वाचावं...झालंच तर गप्पा माराव्यात,गाणी म्हणावीत....
झालं! सगळंच मुसळ केरात की हो...अहो मीही तेच सांगत होतो तुम्हाला...गेला आठवडाभर मला खोकल्याने हैराण केलंय... गाणी म्हणणं सोडा हो..नुसतं गाण्याचा मनात विचार आला तरी ढास लागतेय...दोन शब्द बोलायलाही मारामार झालेय....औषधं घेतोय..अगदी वेळच्या वेळी,सगळी काळजीही घेतोय....पाहिलंत ना तोंडावर फडकं बांधलंय ते? पण हा खोकला काही पाठ सोडायला तयार नाहीये....हितचिंतक सल्ला देताहेत त्याला लवकरात लवकर पळवा..लवकर बरे व्हा....मलाही तसंच वाटतंय हो....पण

आता हा पण काय आणखी?
सांगतो हो....काय तो अभंग आहे...आयला आठवायचा प्रयत्न करतोय तर आठवण्याऐवजी खोकलाच येतोय की राव....हं,आत्ता आठवला....
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, त्याने मुक्ती चारी साधियेल्या....असा काहीसा अभंग आहे बघा....
हा खोकला, तशाच मिषाने आला की हो माझ्याकडे...पण आता म्हणतो...नाऽऽही! अजिबात नाही जाणार इतक्या लवकर! मलाही राहायचंय तुझ्याबरोबर! उठसुठ कशाला ती गाणी गायची? जरा आम्हाला पण बागडू दे की तुझ्या मुखी!
आता,हा असा बोलायला लागला तर मलाही प्रश्न पडला की हो....खरा नसलो म्हणून काय झालं आडनावाचा तरी देव आहे ना...मग त्या आडनावाला जागायला नको....भले त्याचा आडफायदा...म्हणजे गैरफायदा हो... तो खोकला घेऊ दे...आपण आपल्या नावाला...त्येच त्ये हो...आड, आडनावाला जागायला नको? म्हणून सद्द्या त्याला म्हटलं..बाबा रे, किती दिवस राहायचे तेवढे दिवस राहा...मी पण कैक वर्षात गप्प बसलेलो नाहीये...तेव्हा जरा तेवढंच मौनव्रत पाळतो...तुला जेवढं काही माझ्या मुखात...खरं तर नरड्यात म्हणणार होतो.....वास करायचा असेल...वास म्हणे रहिवास हो...इतकं शिंपल तुमच्यासारख्या जंटलमन लोकांला समजू नये?....हं तर म्हटलं..तुला जितका वेळ वास करायचा असेल कर बाबा...तुही खूश हो! मी आपला मौनीबाबाच बनतो.

असो...तर मंडळी, ह्या मौनामुळे एक फायदा झाला...बोलता येत नाही, गाता येत नाही मग आता करायचं काय हा माझ्यासारख्या बडबड्या माणसापुढे यक्षप्रश्न निर्माण झाला...पण काही नाही..त्यावरही तोडगा निघाला...कुठेतरी वाचलं होतं...समस्येमुळे  तुमचा एक मार्ग बंद झाला असं जरी क्षणभर वाटलं तरी ते तसं नसतं...दुसर्‍या ठिकाणी कुठे तरी वाट सापडते...आपण ती शोधायची असते....माझंही तसंच झालं..काही काळ मी निर्बुद्ध मनाने बसून होतो...मग एका क्षणी साक्षात्कार झाला....अरेच्चा...इतके दिवस आपण चाली लावत होतो, स्वत:च गात होतो....त्या सगळ्याकडे कधी एका त्रयस्थ श्रोत्याच्या दृष्टीकोनातून पाहिले आहे काय?
नाही...असेच उत्तर होते....मग? आता कसली वाट पाहतो आहेस...आताचा वेळ लाव सत्कारणी...कर त्या गोष्टींचा विचार....शोध त्यातल्या त्रुटी, शोध त्यातलं सौंदर्य...आणि मी लगेच कामाला लागलो....

मंडळी, खरंच सांगतो....माझ्या काही चाली पुन्हा नव्याने ऐकल्या....बर्‍याचशा आवडल्या..काही अगदीच सामान्य वाटल्या....पण त्यांच्यात सुधारणा करता येईल असेही लक्षात आले.....गाण्याच्या बाबतीत सांगायचे तर ताल...तो आधीपासूनच कच्चा आहे....पण बर्‍याचदा अधेमधे किंचित सूरही घसरतोय....किमान तो तसा घसरता कामा नये.....मनातल्या मनात नोंदी करतोय...पुन्हा नरडं गाण्यालायक झालं की आता ह्या गोष्टीतही नक्कीच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.....तालाच्या बाबतीत मात्र अजून काही मार्ग दृष्टीपथात दिसत नाहीये...आधी मला माझ्या शरीराचे घड्याळच सुधारावे लागेल...बहुदा त्यातूनच ताल जागेवर येईल....पाहूया...प्रयत्न करणं माझ्या हाती आहे...बाकी यश मिळेल न मिळेल...काहीच माहीत नाही.
(वेळ जात नाही म्हणून काही तरी खरडलंय..फारसं मनावर घेऊ नका.)

३१ जानेवारी, २०१२

मायबोली शीर्षक गीत!


मंडळी, ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहात होता ते मायबोली शीर्षक गीत आज सगळ्यांसाठी जाहीरपणे ऐकायला खुले करण्यात आले आहे...

ह्या गीतामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांची यादी....

संपूर्ण श्रेयनामावली
गीतकारः ऊल्हास भिडे
संगीतकारः योग (योगेश जोशी)

गायक-गायिका:
मुंबई: मुग्धा कारंजेकर, अनिताताई आठवले,  प्रमोद देव,  मिलिंद पाध्ये,  सृजन पळसकर
पुणे: विवेक देसाई, सई कोडोलीकर, पद्मजा जोशी, स्मिता गद्रे, अंबर कर्वे, मिहीर देशपांडे
दुबई (सं. अरब अमिराती):  देविका आणि कौशल केंभावी , सारिका जोशी, दिया जोशी, योगेश जोशी, वर्षा नायर
कुवेतः जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अश्विनी गोरे
अमेरिका: जयवंत काकडे, अनिल सांगोडकर
वाद्यवृंदः प्रशांत लळीत, विजू तांबे, ऊमाशंकर शुक्ल, जगदीश मयेकर, योगेश जोशी
संगीत संयोजकः प्रशांत लळीत
ध्वनीमुद्रण तंत्रज्ञः
    नदीम- ईंम्पॅक्ट स्टुडीयो, सांताक्रुझ, मुंबई.

    जयदेव- साऊंड आइयडीयाझ, एरंडवणे, पुणे.

    संजय- नेहा ऑडीयो ईफेक्टस, दत्तवाडी, पुणे.

    मेरशाद- अल शिबाक मुझिक सेंटर, दुबई.

मायबोली विभाग समन्वयकः दिप्ती जोशी (पुणे), प्रमोद देव (मुंबई), अनिल सांगोडकर (अमेरिका)
झलक ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर , नंदन कुलकर्णी ), हिमांशु कुलकर्णी  आणि आरती रानडे
 निर्मिती: maayboli.inc

गीताचे शब्द आणि ते कुणी कसे गायलेत....
 गीतातील गायक क्रमः
[मायबोली.....] (मिलिंद पाध्ये)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेऊन ध्यास आली उदयास मायबोली (अनिताताई आठवले, योगेश जोशी)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउन ध्यास आली उदयास मायबोली ║धृ║ (समूह- मुंबई, पुणे, दुबई)

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात मायबोली (अश्विनी गोरे व जयवंत काकडे)
[विश्वात मायबोली] (मिलिंद पाध्ये) ||१||

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अनिल सांगोडकर)
सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अंबर कर्वे व जयश्री अंबासकर)
साहित्य वाङ्मयाची, ही खाण मायबोली (सई कोडोलीकर) ||२||

[युडलिंग (योगेश जोशी) आणि कोरस (अनिताताई आठवले, मुग्धा कारंजेकर)]

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली (प्रमोद देव व मुग्धा कारंजेकर)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (प्रमोद देव, व मुग्धा कारंजेकर)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (देविका केंभावी, कौशल केंभावी, सृजन पळसकर व समूह- विवेक देसाई, मिलिंद पाध्ये, प्रमोद देव)
ही माय मायबोली (सृजन पळसकर)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी (दिया जोशी व समूह)
घेउन ध्यास आली उदयास मायबोली (दिया जोशी व समूह) ||३||

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (वर्षा नायर व अनिताताई आठवले)
[मधले संवाद- मिलिंद पाध्ये, मुग्धा कारंजेकर व योगेश जोशी]
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (मिहीर देशपांडे)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (मिहीर देशपांडे व समूह- विवेक देसाई, मिलिंद पाध्ये, प्रमोद देव)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (अनिताताई आठवले, सई कोडोलीकर, स्मिता गद्रे, पद्मजा जोशी) ||४||

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली (योगेश जोशी व सारिका जोशी)
[हार्मनी समूह-मिलिंद पाध्ये, प्रमोद देव, विवेक देसाई, पद्मजा जोशी, सई कोडोलीकर, स्मिता गद्रे]
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (योगेश जोशी, सारिका जोशी व सर्व गायक)
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (पुरूष व स्त्री गायक)
अभिजात मायबोली (सर्व) ║५║

मायबोली.. (सर्व गायक)



आता गीत ऐका...


मंडळी,ह्या गीताचं वैषिष्ठ्य असे की ह्यात लहानात लहान साडेतीन वर्षांची दिया जोशी(योगेश जोशी आणि सारिका जोशी ह्या दांपत्याची कन्या) ते साठीचा मी, प्रमोद देव असे सर्व वयोगटातील मायबोली परिवारातले सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांनी आपला आवाज ह्या गीतासाठी दिलेला आहे. एक दोन अपवाद वगळता सगळेच कलाकार हे हौशी ह्या सदरातलेच आहेत...अशा लोकांकडून हे गीत गाऊन घेणं हे खरं तर अतिशय कठीण काम होतं...पण ते योगेश जोशी ह्या संगीतकाराने अतिशय कुशलतेने केलेलं आहे हे आपल्याला गीत ऐकल्यावर कळेलच.




२९ जानेवारी, २०१२

'साठी’च्या निमित्ताने....

मंडळी कालच म्हणजे २८ जानेवारी २०१२ रोजी माझी ’साठी’ झाली...खरंतर ह्यात माझं स्वत:चं असं काय कर्तृत्व आहे? जन्माला आलेला प्राणी मरत नाही तोवर त्याचे वय वाढतच असतं...त्या न्यायाने मी अजून जिवंत आहे. :D
कालच्या दिवसात माझ्यावर आपल्यासारख्या सुहृदांनी, मित्रमंडळींनी आणि आप्तस्वकीयांनी शुभेच्छांचा जो तुफान वर्षाव केलाय त्याच्या बळावर मी बहुदा ’शंभरी’ देखील साजरी करेन असं उगीच आपलं वाटायला लागलंय....अरेच्चा! कोण तिथे चुकचुकलं? कुणीतरी म्हटल्याचं ऐकू आलं...आयला म्हणजे आमच्या कानपुरात पूर्ण हरताळ केल्याशिवाय काय हा म्हा.....

असो...असे म्हणणारेही आमचे सच्चे मित्रच आहेत...त्यांना आमच्या प्रतिभेची असली/नसली तरी प्रतिमेची नक्कीच काळजी वाटते...काहीही म्हणा, पण त्यांच्यामुळेच सतत सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्न होत असतात....आता त्या सुधारणा खरंच होतात की नाही ते आपणच जाणता...आपल्याशिवाय कोण आहेत इथे जाणकार! :)

ह्या साठ वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं? बरंच काही! दोन्हीची यादी खूप मोठी होईल...पण खरोखरंच हिशोब मांडायचा ठरवला तर....तर क गपेक्षा  वरचढ ठरतोय...सदिच्छांची कमाई...कशी कुणास ठाऊक पण प्रचंड आहे. आयुष्यात सुखदु:खाचे असे अगदी टोकाचे अनुभव आले...पण तेव्हाही हितचिंतकांची संख्या विरोधकांपेक्षा नेहमीच खूप जास्त दिसून आली...ह्याबाबतीत मी खरंच सुदैवी आहे...मला वेळोवेळी चांगले मित्र मिळाले...ह्या मित्रांचंही एक वैशिष्ठ्य ठळकपणाने दिसून येतं....

मी तसा विचारांचा पक्का माणूस आहे...म्हणजे असं की एकदा मी ठरवलं की मग त्याबाबतीत तडजोडीला कधीच वाव नसतो...अर्थात तो माझ्याकडूनच...अशा अवस्थेत समोरचा माणूसही तसाच भेटला तर?  तर काय, वादावादी, मारामारी, भांडण...काहीही घडू शकतं....आता तुम्ही सांगा अशा माणसाला मित्रांपेक्षा खरं तर शत्रूच जास्त असायला हवेत की नाही? पण नाही ना! माझे सखेसोबती, मित्रमंडळी वगैरे ही मंडळी स्वत: एरवी आपल्या मतांबाबत कितीही पक्की असली तरी माझ्याशी जुळवून घेतांना त्यांनी त्यांचा स्वत:चा अहंही कैकवेळा बाजूला ठेवलाय...मला नेहमी ह्याच गोष्टीचे आश्चर्य वाटत आलंय...मी इतरांशी जुळवून घेण्यासाठी कधीही माझ्या तत्वांना मुरड घालायला तयार नसतो...पण ही सगळी मंडळी माझ्या त्या दुर्गुणाकडे सहजपणाने काणाडोळा करून माझ्या मनाप्रमाणे करतात...त्यांच्या मनाविरूद्धही अगदी सहजपणाने ते केवळ माझ्यासाठी वागू शकतात...मला खरंच हा प्रकार म्हणजे कोडं वाटत आलाय....कळायला लागल्यापासून ते आत्तापर्यंत हाच अनुभव मी घेत आलोय...कुणी ह्याला माझी पूर्वपुण्याई देखील म्हणेल...पण मी अजूनही त्यामागचं नेमकं कारण समजू शकलेलो नाहीये....

शब्द हे शस्त्र आहे...हे मी कैकवेळा अनुभवलंय...ह्या शस्त्राने मी कैकजणांना जखमीही केलंय...कधीतरी मलाही घायाळ व्हावं लागलंय...पण तरीही जमाखर्च मांडायचा झाला तर...माझ्याबद्दल आपुलकी, सदिच्छा बाळगणारेच अवती-भवती जास्त दिसतात!

माझ्या आयुष्यात महत्त्वाच्या म्हणाव्यात अशा लग्न, संसार ह्या गोष्टी उशीरानेच घडलेत...अगदी त्या आपल्या आयुष्यात बहुदा नसाव्यात असे वाटण्यापर्यंत टोकाच्या...पण त्या उशीरा घडल्या तरी लौकिकार्थाने त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या...संसार फार काळ नाही टिकला..पण जितका काळ झाला तो काही अपवाद वगळता सुखावहच झाला!

तुम्हाला एक गंमत सांगतो...प्रत्येक लहान मुलाची जन्मपत्रिका बनवण्याची आपल्यात पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे...आता त्यात किती तथ्य आहे/नाही हे सोडून द्या...हं तर काय सांगत होतो... माझीही जन्मपत्रिका बनवून घेतलेली होती..आमच्या आई-वडिलांनी...त्या पत्रिकेत भविष्यही लिहिलेलं होतं...काय? सांगतो.....

माझं लग्न वयाच्या पंचविशीत होईल आणि मला एक मुलगा असेल.... वास्तवात माझं लग्न झालं वयाच्या पस्तिशीत आणि मला एक मुलगी आहे... ह्यात अजूनही लिहिलं होतं...की मला राजयोग आहे. :D
आता हल्लीच्या युगात राजे-महाराजे राहिलेत कुठे....तर मी राजा होणार? अगदी नाटकातला राजाही नाही झालो....

हे सांगायचं कारण....राजयोग! अहो, ह्या बाबतीत त्या ज्योतिषाचं चुकलं असं आधी जरी मला वाटलं होतं...तरी आता मात्र मला असं वाटतंय...खरंच राजयोग आहे माझ्या नशीबात! एरवी, इतके हितचिंतक, आप्तस्वकीय आणि सुहृद कुठून मिळते? आयुष्यात समर प्रसंग आले, दु:खद प्रसंग आले, संकटं आली...पण एखादा अपवाद वगळता प्रत्येकवेळी त्यात कुणी ना कुणी ज्ञात-अज्ञात व्यक्ती मदतीला धावून आली...त्यामुळे प्रसंगांची तीव्रताही कमी झाली!

हाच! अगदी हाच तो राजयोग असावा!  :)
आपल्यासारख्या सामान्य माणसाला अजून काय हवं असतं हो?

सांगण्यासारखं खूप आहे पण त्याचं सगळ्याचं सार हेच आहे....

जीवनाच्या प्रवासातील......वाटेवर काटे वेचित चाललो.... पण तुम्हा सर्वांमुळे ते.... वाटले जसा फुला-फुलात चाललो.....इतके सुसह्य झालं!

माझ्याबद्दल आपुलकी बाळगणार्‍या सर्वांना हे लेखन अर्पण करतोय!

>

२० सप्टेंबर, २०११

’चाल’कत्व!

२०११च्या मायबोली वर्षाविहारला ह्यावेळी हजेरी लावली आणि त्यामुळे मित्रमंडळाचं वर्तूळ अजून मोठं झालं. खरं तर गेले जवळपास पाच वर्ष सदस्य असूनही मी मायबोलीवर फारसा सक्रिय कधीच नव्हतो. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक मला आणि मी त्यांना नावाने ओळखत होतो..त्यातही एक/दोन जणांनाच मी प्रत्यक्ष भेटलो होतो....मात्र वविच्या आधी टी-शर्ट नोंदणी आणि टी-शर्ट वाटप निमित्ताने दोन वेळा शिवाजीपार्कच्या कट्ट्यावर हजेरी लावली आणि अजून किमान दहा-बारा जणांना प्रत्यक्ष भेटलो...त्यातले बहुसंख्य लोक मला आधी नावानिशी माहीतही नव्हते...असो.

वविला भरपूर दंगामस्ती करतांना तीन चांगल्या आवाजाच्या तरूण मित्रांशी माझी ओळख झाली आणि ह्या आवाजाचा उपयोग मला करून घेता येईल अशी आशा मनात निर्माण झाली...आता तुम्ही म्हणाल की आवाजाचा उपयोग?हा काय प्रकार आहे? :) सांगतो....तसं पाहायला गेलं तर आता जालावरच्या बहुसंख्य मित्रमंडळींना हे माहीत झालंय की मी एक हौशी आणि छांदिष्ट चालक आहे...चालक? हो...चालकच! कवितांना चाली लावतो ह्या अर्थाने हो... ’चाल’क! ;)
हं, तर काय झालं....जरा मूळ मुद्द्याकडे येतो आता. वविला भेटलेल्या त्या तीनजणांना मी माझी कल्पना सांगितली ती अशी....मी आजवर बर्‍याच कवितांना चाली लावलेत. त्यातल्या काही निवडक एक/दोन चाली मी तुम्हाला पाठवतो...तुम्ही त्या तुमच्या आवाजात गाऊन मला पाठवायच्या...नेहमीपेक्षा काही तरी हटके करायला मिळणार म्हणून त्यांनीही उत्सुकतेने होकार दिला. ह्या तीन तरूणांपैकी दोन माझ्यापासून बरेच दूर राहात असल्यामुळे आम्ही प्रत्यक्ष एकमेकांना वारंवार भेटणे शक्य नव्हते, त्यामुळे हे सगळे काम इमेलच्या माध्यमातूनच होणार होते...पण तिसरा एकजण तर माझ्या अगदीच जवळ राहणारा निघाल्यामुळे तो म्हणाला...काका,मी येईन तुमच्या घरी...मला तुम्ही तिथेच ऐकवा तुमच्या चाली..मी माझ्या आवाजात गायचा प्रयत्न करेन! अशा तर्‍हेने तीन जणांच्या होकारामुळे, त्यांच्या तरूण आवाजात आता माझ्या चाली जास्त लोकांना ऐकायला आवडतील अशी खुशीची गाजरं खात मी घरी परतलो. मध्यंतरी एकमेकांच्या इमेल आणि भ्रमणध्वनीक्रमांकाची देवघेवही झाली.

त्यानंतर मी दूरस्थ अशा त्या दोन पुतण्यांना माझ्या चालींची एम्पी३ फाईल आणि संबंधित कवितेचा दुवा असे दोन्ही पाठवून दिले. बरेच दिवस कुणाकडूनही काही उत्तर आले  नाही. त्यातला एकजण थोपुवर भेटला तेव्हा त्याला विचारल्यावर..विचारल्यावर बरं का! स्वत:हून नाही. ;)   त्याने सांगितले...काका,चाल ऐकली,आवडलीही, पण ताल कठीण आहे..मला नाही जमणार! :(
दुसराही थोपुवर भेटला...त्याला विचारले...तो म्हणाला, अजून मला वेळच मिळाला नाहीये त्या फाईल्स पाहायला. तिसरा, काही ना काही कारणाने आजपर्यंत घरी आलेला नाहीये...थोडक्यात काय तर...परिस्थिती जैसे थे...एकूणच माझ्या चाली माझ्या व्यतिरिक्त दुसरे कुणी गाऊ शकेल अथवा गाईल अशी आशा उरली नाही. असो.

त्यानंतर इथे मायबोलीवर गणेशोत्सवाची घोषणा झाली...त्यासाठी संयोजन मंडळात काम करण्यासाठीच्या आवाहनाला मी प्रतिसाद दिला आणि माझी संयोजन मंडळात वर्णीही लागली...खरं तर मी नेमकं काय करू शकेन ह्याची मलाच कल्पना नव्हती...पण काम करण्याची इच्छा आणि भरपूर मोकळा वेळ ह्या गोष्टी हाताशी असल्यामुळे मी बिनधास्तपणे हो म्हणून टाकलं. संयोजन मंडळातल्या इतर चार व्यक्ती माझ्यापेक्षा खूपच तरूण असल्यामुळे आपोआपच मला वडिलकीचा मान मिळाला आणि कामाचा भार माझ्यावर फारसा पडणार नाही हे त्यांनी पाहिले आणि त्याप्रमाणे मला सहज जमतील आणि आवडतील अशी मुशो(मुद्रितशोधन) आणि गणेशोत्सवासाठी गाणी तयार करणे  अशी दोन कामं माझ्यावर सोपवली....इथे माझा ’चाल’कत्वाचा लौकिक कामी आला. ;)
गाणी तयार करायची तर आधी त्यासाठी काव्य हवे...आता ते कुणाकडून मागवावे बरं? लगेच माझ्या डोळ्यासमोर काही नावं झळकली.. जयश्री अंबासकर,क्रांती साडेकर,गंगाधरपंत मुटे आणि कामिनी केंभावी(श्यामली)....ही चौघंही माझ्या जवळच्या वर्तूळातली असल्यामुळे मी हक्काने त्यांच्याकडून काही गणेशगीतांची मागणी केली. खरं सांगायचं तर माझ्याकडे आधीच ह्या कविमंडळींच्या काही काव्यरचना होत्याच ज्यांना मी आधी चाली लावलेल्या होत्या....पण त्या सगळ्या माझ्या आवाजात ध्वनीमुद्रित होत्या त्यामुळे त्या कुणी ऐकायला उत्सूक असणार नाहीत ह्याची जाणीव होती..म्हणून तर ताज्या दमाचे आणि चांगल्या आवाजाचे गायक/गायिका मला हवे होते...पण आयत्यावेळी आता काय करायचं असा यक्षप्रश्न उभा राहिला. गऊच्या तयारीत असतांना त्यासंबंधीचे गेल्या वर्षीचे काही धागे वाचतांना ’योग’ ह्यांचे अनुभव कथन वाचले आणि त्यांची गाणी ऐकल्यावर लक्षात आलं की हीच व्यक्ती आपल्याला नक्की मदत करेल, म्हणून मग त्यांच्याशी संपर्क साधला...त्यांनीही लगेच प्रतिसाद देऊन अशा मदतीची काही प्रमाणात ग्वाही दिली...व्यवसायात व्यस्त असल्यामुळे खूप जास्त आणि सलग असा वेळ देऊ शकत नसलो तरी यथाशक्ती मदत नक्की करेन...असे आश्वासन मिळाले आणि मी थोडा सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांच्या मागणीप्रमाणे मी लगेच त्यांना माझ्या, आधीच तयार असलेल्या चार चाली आणि काव्य पाठवून दिले...चाली ऐकल्यावर त्यातल्या तीन गीतांवर ते निश्चितपणे काम करून साधारण ३१ ऑगस्टपर्यंत तयार करून पाठवतील असे म्हणाले.

चला, आता बाकी राहिलेल्या गीतांचं काय करावं? कुणाकडून गाऊन घ्यावं बरं? चौकशी करता करता मायबोली सदस्या ’रैना’चं नाव पुढे आलं, म्हणून तिला संदेश पाठवला......तिला तर प्रचंड सर्दी-खोकला झाला होता, बोलतांनाही दम लागत होता हे तिच्याशी प्रत्यक्ष फोनवर बोलतांना जाणवत होते...तरीही तिचे उत्तर होते...मी जरूर प्रयत्न करेन...वेळेचं बंधन मात्र थोडं शिथिल केलंत तर बरं होईल...ते तर करणं भाग होतंच...मी प्रत्यक्ष परिस्थिती पाहात होतोच...मग तिच्याचकडून कळलं की मायबोली सदस्या ’अगो’ देखिल खूप चांगलं गाते...त्याचा पुरावा म्हणून तिने मला लागलीच ’अगो’च्या गेल्या वर्षीच्या गायनाचा दुवा पाठवून दिला...’अगो’चं गाणं ऐकलं आणि ठरवलं..तिलाही विनंती करूया, म्हणून तिला संदेश पाठवला...अपेक्षेप्रमाणे तिचाही होकार आला..मात्र गाणं ऐकल्यावरच निश्चित काय ते सांगता येईल असं ती म्हणाली...मग मी तिला चाल आणि काव्य पाठवलं...ऐकल्यावर तिने ते तिच्या आवाजात पाठवायचं कबूल केलं, मात्र वेळेची मर्यादा वाढवण्याची विनंती केली... मी लगेच ती मान्य करून टाकली.....हुश्श! चला आता किमान पाच गाण्यांची निश्चिंती झाली होती...हेही काही कमी नव्हते..माझ्यासारख्या नवख्या माणसाला. :)

आणि अचानक...योग ह्यांच्याकडून संदेश आला....अचानकपणे  मला व्यवसायानिमित्त परदेशी जावं लागत आहे त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे मी गाणी तयार करू शकत नाही...आपल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व...आपण मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो... खरं तर हा जबरदस्त आघात होता...क्षणभर काय करावे तेच कळेना...पण ह्या गाण्यांपेक्षा त्यांचे काम निश्चितच जास्त महत्त्वाचे होते त्यामुळे त्यांना दोष न देता शांतपणे विचार करू लागलो...विचार करतांना माझ्या एका मित्रवर्यांची, श्री.सुहास कबरे ह्यांची आठवण झाली जे एक प्रख्यात तबलजी आहेत...माझा हा चाली लावण्याचा छंद त्यांनाही माहीत होता...लगेच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळी परिस्थिती कथन केली आणि म्हटलं...काही मदत करू शकाल काय? त्यांनी थोडा विचार करून म्हटले...माझा एक चांगला गायक मित्र आहे...त्याला विचारून पाहतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला कळवतो. अर्धाएक तासाने त्यांचा फोन आला...अमूक अमूक दिवशी रात्री ८ वाजता माझ्या गायक मित्राला घेऊन येतोय...येतांना तबला,पेटीही आणतोय...कितीही उशीर होऊ दे किमान दोन गाणी बसवून देतो. पुन्हा जीवात जीव आला...कबरेसाहेबांनी शब्द दिलाय म्हटल्यावर मी निश्चिंत झालो.

ठरल्याप्रमाणे कबरेसाहेब आपले मित्र श्री. केदार पावनगडकर ह्यांना घेऊन हजर झाले....थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, चहा-पाणी झालं आणि मग आम्ही मूळ मुद्द्याकडे वळलो....आधी केदारजींना चाली ऐकवल्या....शांतपणाने आणि लक्षपूर्वक त्यांनी चाली ऐकल्या. त्यानंतर पहिली भूप रागातली ’सकल कलांचा उद्गाता’ ही चाल ऐकता ऐकताच त्यांनी ती स्वरलिपीत लिहायला सुरुवात केली आणि त्यानंतर प्रत्यक्ष गाऊन पाहिली... केदारजी ह्यांचा आवाज ऐकला मात्र...मी अतिशय रोमांचित झालो..अतिशय मधुर आणि तीनही सप्तकात सहजतेने फिरणारा त्यांचा आवाज ऐकून मनाची पक्की खात्री झाली की आता आपल्या चालींचे नक्की सोने होणार. केदारजी हे व्यवसायाने संगीत शिक्षक आहेत आणि ते खाजगी मैफिलीतूनही गातात...त्यामुळे त्यांच्या गात्या गळ्यातून येणारे स्वर अगदी सहजसुंदर असेच होते....माझ्यासारख्या संगीतातल्या कुडमुड्या ’चाल’काच्या चाली, असा मातबर कलाकार गाणार म्हटल्यावर मला खरंच कृतकृत्य झाल्यासारखे वाटले...स्वत: एक संगीतशिक्षक असूनही, चाल माझ्याकडून समजून घेतांना मात्र ते एखाद्या विद्यार्थ्यासारखे माझे गाणे ऐकत होते...मी स्वत: काय आहे हे मला नीटपणे माहीत आहे...बेताल आणि बेसूर...अशी बेची जोडी माझ्या गाण्यात पदोपदी आढळून येत असतांनाही....त्यातनं नेमकं जे काही घेण्यासारखं दिसलं ते घेऊन केदारजींनी त्यानंतर ’सकल कलांचा उद्गाता’ असं काही गायलंय की माझ्या आणि कबरेसाहेबांच्या तोंडून उस्फूर्तपणाने ’व्वा!’ असा उद्गार निघाला.

आता थोडं ध्वनीमुद्रणाविषयी.....इतके दिवस मी माझ्याच आवाजातल्या चाली ऑडेसिटी ह्या ध्वनीमुद्रण प्रणालीच्या मदतीने ध्वनीमुद्रित करत होतो..त्याही विना वाद्यसंगीत...पण आज इथे तर गायन-वादन असे दोन्हीही ध्वनीमुद्रित करायचे होते. माझ्या संगणकातल्या दोन ऑडियो पोर्टमधील फक्त एकच ऑडियोपोर्ट व्यवस्थित सुरु आहे...ह्याचा अर्थ केवळ एकाच माईकवर हे ध्वनीमुद्रण करावे लागणार होते...तसं पाहायला गेलं तर माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता की मी एखाद्या मातबर कलाकाराचे गाणे ध्वनीमुद्रित करणार होतो.... सर्वात आधी दोनतीन चांचणी ध्वमु केली आणि त्याचा दर्जा पाहून एका विवक्षित ठिकाणी मायक्रोफोनची मांडणी केली....ह्या मांडणीमुळे शक्यतो गायकाचा आवाज इतर वाद्यांच्या तुलनेत कमी पडणार नाही ही खात्री झाली...आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष ध्वनीमुद्रणाला सुरुवात केली...खरं तर केदारजींना स्वत: पेटी वाजवून गायची सवय नाही...पण दुसरा कुणी वादक हजर नसल्यामुळे गातांना त्यांना स्वत:लाच पेटीसाथ करावी लागली...त्याचा नाही म्हटले तरी थोडा परिणाम त्यांच्या गाण्यावर जाणवत होता हे त्यांच्याच बोलण्यावरून मला कळत होते...एकदोनदा पूर्णं गाणं गाऊनही त्यांचं पूर्ण समाधान झालेलं नव्हतं...पण एकीकडे वेळेचं बंधन होतं तर दुसरीकडे घड्याळाचा तासकाटा भराभर पुढे सरकत होता....दोन तास उलटून गेले होते आणि कसंबसं एक गाणं पूर्णपणे ध्वमु झालेलं होतं...शेवटी मीच केदारजींना म्हटलं की आता जे झालंय ते चांगलंच आहे...आपण दुसर्‍या गाण्याकडे वळूया का? खरा कलाकार कधीच समाधानी नसतो हे केदारजींच्या बोलण्यावरून कळलं...ते म्हणाले..तुमचं समाधान झालं असलं तरी माझं स्वत:चं अजून समाधान झालेलं नाहीये...मला अजून चांगलं गायला हवंय... मी आणि कबरेसाहेबांनी मग कशीबशी त्यांची समजूत घालून त्यांना दुसर्‍या गाण्याकडे वळवलं...त्यानंतर ते नाईलाजानेच दुसर्‍या गाण्याकडे वळले....आणि मग ध्वमु झालं... ’तुंदिलतनु श्री गणेश!’ फक्त दोन गाणी पूर्ण होईपर्यंत रात्रीचे साडेबारा होऊन गेले होते...दुसर्‍या दिवशी सकाळी उठून त्या दोघांनाही आपापल्या कामगिरीवर जायचं होतं आणि म्हणूनच नाईलाजाने जे काही ध्वमु झालं त्यावर समाधान मानण्यावाचून गत्यंतर नव्हतं...खरं तर केदारजींचं म्हणणं होतं की... माझ्या मनाप्रमाणे अजून गाणी जमलेली नाहीयेत तेव्हा ही गाणी प्रसिद्ध करू नयेत, आपण पुन्हा एकदा बसून ती चांगली बसवू आणि मगच ध्वमु करू... पण गणपती उत्सव संपेस्तोवर त्या दोघांनाही अजिबात फुरसत नव्हती आणि मला तर ही गाणी मायबोलीसाठी द्यायची होती...मग दुसरा पर्याय काय होता? मी केदारजींना म्हटलं...केदारजी,तुम्ही स्वत: जरी समाधानी नसलात तरी मला मात्र दोन्ही गाणी आवडलेत आणि आता तुमच्या-माझ्याकडे,दोघांकडेही अजिबात वेळ नाहीये तेव्हा मला वाटतंय की हीच गाणी आपण वापरूया...मग केवळ नाईलाज म्हणून त्यांनी मला गाणी वापरण्याची परवानगी दिली...मी लगेच ती गाणी मायबोलीकडे  पाठवून दिली...गणेशोत्सवाची सुरुवात तरी आता सुश्राव्य संगीताने होणार हे निश्चित झाले होते.
त्याप्रमाणे  सकल कलांचा उद्गाता  आणि तुंदिलतनु श्रीगणेश ही दोन्ही गीतं गणेश उत्सवाच्या अनुक्रमे दुसर्‍या आणि चौथ्या दिवशी मायबोलीवर प्रसारित झाली.
ह्या दोन्ही गीतांची रचना मायबोलीची एक आघाडीची कवयित्री क्रांती साडेकर हिनेच केलेली आहे. अतिशय उत्तम शब्दरचना आणि अंगभूत लय असलेल्या ह्या रचनांना चाल देण्याची खरं तर काहीच गरज पडली नाही..ह्या दोन्ही चाली गीतं वाचतांनाच आपोआप उलगडत गेल्या ...हेच क्रांतीच्या शब्दसामर्थ्याचं यश आहे.


ही दोन गाणी तर झाली.लोकांना आवडलीही... अजून रैना आणि अगोकडून  गाणी यायची होती. रैनाशी माझं फोनवर बोलणं होतंच होतं...एकदोनदा तिने मला तिला जमले तसे ध्वनीमुद्रण पाठवलेही..पण तिला जबरदस्त सर्दी आणि खोकला झालेला असल्यामुळे त्याचा तिच्या आवाजावर झालेला परिणाम स्पष्टपणे जाणवत होता..त्यामुळे तिचं आणि माझंही पूर्ण समाधान होत नव्हतं...पण रैना मागे हटणारी नव्हती...तिने  काहीही करून ह्यावर मात करण्याचा चंग बांधला होता...ध्वनीमुद्रण ऐकतांना मला एक जाणवत होतं की तिला धाप लागतेय,मध्येच ठसका लागतोय...त्यामुळे बर्‍याचदा सूर कमी पडतोय... तिने पाठवलेल्या ध्वनीमुद्रणातले हे दोष मी काढायचा प्रयत्न केला...काही अंशी तो जमलाही..पण त्यामुळे तंबोर्‍याचा आवाजही मधे मधे गायब होत होता...म्हणून मग मी तिला ऑडेसिटी वापरण्याची सूचना केली आणि ती तिने ऐकली.
ह्यात ध्वनीमुद्रण करण्यासाठीही एक उपसूचना केली...इलेक्ट्रॉनिक तंबोरा वापरून तो हेडफोनमधून ऐक आणि फक्त गाणं ध्वनीमुद्रित कर...गाणं ध्वनीमुद्रित करतांना खोकावंसं वाटलं तर खुशाल खोक..ध्वनीमुद्रण मात्र सुरुच ठेव..जिथे व्यत्यय येतोय तिथे थोडं थांबून  तो भाग पुन्हा गाऊनच पुढे जा.....तंबोर्‍याचा ट्रॅक वेगळा पाठव...मी करतो बाकीचे सोपस्कार....आणि रैनाने तसंच करून मला पाठवलं ...आता माझं काम आधीपेक्षा सोपं झालं होतं....रैनाच्या ध्वनीमुद्रणातले अधलेमधले व्यत्यय,थांबे पुसत पुसत मला तिचे सलग असे गाणे तयार करता आले...मग त्याला तंबोर्‍याचा ट्रॅकही जोडला आणि तयार झाले एक सुंदर गाणे...तारीख होती
६ सप्टेंबर २०११. मी लगेच ते गाणं मायबोलीला पाठवून दिलं.
एकवेळ तर अशी आली होती की रैनाला तिचा खोकलाग्रस्त गळा हे गाणं गाऊ देईल की नाही ही शंका येत होती...पण त्या तशा परिस्थितीतही तिने सर्वस्व पणाला लावून जे काही गायलंय ते आपण प्रत्यक्ष ऐकलंच आहे...शाबास रैना! तुझ्या जिद्दीला माझे शतश: प्रणाम!
रैनाने गायलेल्या हे गजवदना ह्या गीताचे कवी आहेत मायबोलीचेच एक ज्येष्ट सदस्य आणि सुप्रसिद्ध कवी श्री. प्रसाद शिरगांवकर. त्यांच्या ह्या गीताला मी खूप आधीच चाल लावलेली होती...उत्सुकता असल्यास त्याबद्दलची कहाणी अवश्य वाचावी.

इथे रैनाच्या गाण्याचे हे प्रयोग सुरु असतांना अचानक अगोकडून निरोप आला...  काही वैयक्तिक अडचणींमुळे मी हे गाणं गाऊन, ठरलेल्या अवधीत पाठवू शकेन असे वाटत  नाहीये त्याबद्दल क्षमस्व..म्हणून आपण माझ्यावर अवलंबून राहू नये.  :(
पुन्हा विचार सुरु झाला...कुणाला सांगावं आता? मी पुन्हा केदारजींना फोन केला..अजून एखादं गाणं किमान तंबोर्‍याच्या साथीने गाऊन द्याल का हे विचारण्यासाठी...पण फोनवरचा त्यांचा आवाज ऐकताच लक्षात आलं की त्यांची तब्येत बिघडलेली आहे....ते सांगत होते...गेले दोन दिवस सर्दी,खोकला आणि तापाने बेजार आहे. :(
मी माझे शब्द तसेच गिळून त्यांना... आराम करा आणि वेळेवर औषध घ्या असे सांगून फोन ठेवला. मनाशी म्हटलं...चला,किमान तीन गाणी तर तयार आहेत ना...हेही नसे थोडके! आता शांत बसणंच ठीक आहे.

केदारजींची दोन्ही गाणी प्रकाशित झाली आणि त्याने जणू जादूच केली...ती गाणी ऐकताच अगोकडून पुन्हा संदेश आला...काका,दोन्ही गाणी उत्तम झालेत...इतकी, की ती ऐकून मी ठरवलंय...
मीही आता गाणं पाठवतेच. :)
अचानक ह्या आलेल्या संदेशाने मी ही खुश झालो. अगो नुसतं बोलून थांबली नाही तर तिने काही तासातच गाणं अतिशय उत्तमरित्या गाऊन आणि ध्वनीमुद्रित करून पाठवलं...ती तारीख होती ७ सप्टेंबर २०११. अगोने तिच्या वैयक्तिक अडीअडचणींना बाजूला सारून ठरलेल्या मुदतीत इतकं उत्तम गाणं गाऊन पाठवलं त्याबद्दल तिचंही करावं तेवढं कौतुक कमीच आहे...शाबास अगो!
तिचे गाणं येतांच मी तेही लगेच मायबोलीला पाठवून दिलं आणि लगेचंच दुसर्‍या दिवशी रैना आणि अगो ह्या दोघींचीही गाणी मायबोलीवर प्रकाशित झाली.
अगोने गायलेल्या गिरीजासुता,गौरीगणेशा ह्या गाण्य़ाची कवयित्री देखील क्रांती साडेकर हीच आहे. अशा रितीने ह्या गणेशोत्सवात क्रांतीने, क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचे तर  हॅटट्रीक केलेली आहे.

अशा रितीने, इतक्या सगळ्या लोकांच्या मदतीने मी माझ्यावर सोपवलेली कामगिरी काही प्रमाणात का होईना पार पाडू शकलो ह्याबद्दल मी समाधानी आहे. ही संधी दिल्याबद्दल मी मायबोली प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानतो. तसेच, मला माझ्या ह्या ’चाल’कत्वाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून इतर दुसर्‍या कोणत्याही कामाला न जुंपता पूर्ण मोकळे सोडल्याबद्दल   संयोजन समितीच्या प्रमुख मामी आणि इतर सदस्य लाजो,प्रज्ञा९ ,वैद्यबुवा आणि दिव्या ह्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो.

तळटीपः प्राप्त परिस्थितीत आणि सहज हाताशी असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून ही सर्व ध्वनीमुद्रणं घरगुती स्वरूपात केलेली असल्यामुळे त्यांचा दर्जा हा व्यावसायिक दर्जाच्या ध्वनीमुद्रणाइतका उत्तम नाहीये ह्याची मला पूर्ण जाणीव आहे.

२० जुलै, २०११

चंशिकुम! १२(अंतिम)

कॉफी पिऊन खाली उतरणार होतोच,तेवढ्यात भटक्या वाजला...कन्या म्हणत होती...बाबा कुठे आहात? आम्ही आता माल रोडवर आलोय.
मी इथेच आहे माल रोडवर..इथे कोपर्‍यावरच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एक हॉटेल आहे. आत्ताच कॉफी प्यायली,आता उतरतोच खाली आणि येतो दोन मिनिटात.
मनालीच्या त्या गजबजलेल्या मालरोडवर मंडळींना शोधायला जरा वेळ लागला खरा...पण शोधलं ! मंडळी एका रस्त्यावरच्या दुकानाबाहेर उभी राहून पाणीपुरी खात होती. त्यांचं पाणीपुरी खाऊन झाल्यावर मग मंडळी ’मोमोज’ शोधायला लागली...तेही मिळाले ...मग तिथे दहापंधरा मिनिटं घालवली...मोमोज..हा प्रकार मी पहिल्यांदा ऐकला...काय तर म्हणे...  मोदकाचा चिनी अवतार...त्यातही शाकाहारी आणि मांसाहारी असे प्रकार असतात म्हणे...असंही कळलं.
मला पाणीपुरी कधीच खावीशी वाटत नाही आणि मोमोज वगैरेसारख्या आधी कधीच न ऐकलेल्या/खाल्लेल्या प्रकारांच्या   वाटेलाही मी कधी जात नाही...खाण्यात प्रयोग करण्याच्या मी विरुद्ध आहे अशातला भाग नाहीये...पण आजवर खात आलेल्या पारंपारिक पदार्थांनीच मला इतकं समाधान दिलंय की अजून नवीन काही खाऊन पाहावं असं अजिबात वाटत नाही....कदाचित त्यामागे दुसरीच भिती ही असावी...वशाट असण्याची. असो...पण तिथे मात्र त्या त्या दुकानांबाहेर गिर्‍हाईकांची अगदी झुम्मड उडालेली दिसत होती....एकेकाच्या चेहर्‍यावरचे ते तृप्ततेचे आणि कृतकृत्यतेचे भाव टिपण्यात(प्रग्रात नव्हे) मला मजा वाटत होती.

मनालीच्या मालरोडवर आम्ही तासभर हिंडलो. मला स्वत:ला काहीच खरेदी करायची नव्हती पण बरोबरची मंडळी..खास करून स्त्रीवर्ग...हे बघ,ते बघ! कुठे भाव विचार! कुठे भाव करत...पण काहीही न घेता पुढे पुढे सरकत होती...मी तिथे आलेल्या आमच्यासारख्याच इतर प्रवासी मंडळीतलं वैविध्य पाहात होतो. स्थानिक मंडळी आणि प्रवासी मंडळी ह्यांच्यातला फरक मात्र चटकन कळून येत होता....आमच्यासारखेच गटागटाने,रेंगाळत चालणारे,दुकानात डोकावणारे बहुसंख्य हे प्रवासीच होते आणि विक्रेते,फेरीवाले,ठेलेवाले,इत्यादि बहुतेक स्थानिकच होते....मोठ्या दुकानात मात्र पंजाबी आणि सरदारजी लोकांची मालकी दिसत होती.

फिरून फिरून मंडळी थकली होती. आमची गाडी जिथे उभी केली होती तिथून आम्ही कितीतरी दूर आलेलो...मग काय चालकाला भ्रमणध्वनीवरून आमचा पत्ता कळवला आणि गाडी तिथेच आणायला सांगितली. दहा-पंधरा मिनिटात गाडी आली....आम्ही त्यात आम्हाला कोंबलं आणि निघालो आमच्या वसतीस्थानाकडे.
ही आमची मनालीतली आणि एकूणच प्रवासातली शेवटची रात्र होती. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून चंडीगढकडे प्रस्थान ठेवायचं होतं(मनाली-चंडीगढ ३२० किमीचा,साधारणपणे १० तासांचा  प्रवास होता)...
उशीरा निघालात तर रस्त्यात रहदारीत अडकून पडाल...हे आमच्या पहिल्या चालकाचे शब्द आमच्या कानात गुंजत होते. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ७.२० चे विमान पकडायचं होतं आणि उशीरात उशीरा ६-४०ला विमानतळावर पोचणं गरजेचं होतं...त्याआधी चंडीगढात पोचून काही स्थानिक खरेदी करण्याचा मंडळींचा मनसुबा होता... त्यामुळे ह्या चालकाला गाडी सकाळी सहा वाजता आणायला सांगून  आम्ही हॉटेलात परतलो...गरमागरम  आणि स्वादिष्ट जेवण  आमची वाट पाहात होतेच....त्याचा रसास्वाद घेत जेवण उरकलं आणि आपापल्या खोल्यात दाखल झालो.

मी पुन्हा एकदा खोलीच्या सज्जातून समोर दिसणारे दृश्य टिपायचा प्रयत्न केला...खरं तर आता अंधाराचेच साम्राज्य होते...पण तरीही दूरवर दिसणारी हिमशिखरं अका अनामिक प्रकाशाने चमकत होती...प्रग्रा आपल्याला काहीही दाखवो पण एक मात्र खरं की आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते तसंच्या तसं प्रग्रात कधीच कैद होत नसतं...प्रग्राचे तंत्रज्ञान कितीही अद्ययावत का असेना अजूनही आपल्या डोळ्याशी ते बरोबरी करू शकलेले नाहीये हे माझे प्रांजळ मत आहे.

दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही सगळी आन्हिकं उरकून,चहापाणी घेऊन तयार झालो पण गाडीचालकाचा पत्ताच नव्हता....त्याच्याशी संपर्क साधण्याचा एक दोन वेळा केलेला प्रयत्न फोल ठरला...हा माणूस असा मध्येच कुठे गायब होतो कुणास ठाऊक? काहीच कळायला मार्ग नव्हता...होता होता सात वाजता तो हजर झाला...आम्ही पटापट गाडीत सामानासह आम्हाला कोंबून घेतलं आणि गाडी निघाली.... मनालीला टाटा करून..चंडीगढकडे.

वाटेतली तीच निसर्गदृश्ये पुन्हा डोळ्यात साठवत,काही प्रग्रात टिपत आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. वातावरण खूपच आल्हाददायक होते. सोबतीला बियास होतीच....जातांना ती आमच्या उजव्या अंगाला होती...आता डाव्या. तिची विविध रूपं आता मला जवळून टिपायला संधी मिळत होती...ती मी कशी सोडणार?
मध्ये एका ठिकाणी आम्ही एका ढाब्यावर न्याहारीसाठी थांबलो....गरमागरम पराठे आणि कॉफीचा आस्वाद घेऊन पुन्हा पुढचा प्रवास सुरु केला. अधून मधून आमच्या पहिल्या चालकाचा फोन येत होता...तो मंडीला आमची वाट पाहात उभा होता....तिथून थेट चंडीगढ विमानतळावर नेऊन सोडेपर्यंत तो आमच्याबरोबर राहणार होता...तो आमची केव्हापासून तिथे वाट पाहात उभा होता....त्याच्या अंदाजानुसार आम्ही तिथे आत्तापर्यंत पोचायला हवे होतो....पण आधीच निघायला उशीर झालेला आणि त्यातही रस्त्यावरची रहदारी थोडीफार वाढलेली असल्यामुळे....आम्ही न्याहारीसाठी वाटेत अर्धा तास थांबल्यामुळे...अशा एकूणच सगळ्यांमुळे उशीर वाढत चाललेला होता.

शेवटी एकदाचे आम्ही मंडीला पोचलो...साधारण नऊ वाजल्यापासून तो आमची वाट पाहात होता आणि आम्हाला पोचायला वाजले होते पावणेअकरा! दोन्ही चालकांचे आपापसात काही तरी गुफ्तगु झाले...सूत्रबदल झाला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली...चालकाचे काय बिनसले होते कुणास ठाऊक तो थोड्या थोड्या वेळाने आम्हाला सुनावत होता..इतका उशीर केलात,आता रहदारीत नक्की फसणार...तुम्हाला पोचायला उशीर झाला तर माझ्याकडे दोष नाहीये.....मनालीहून निघतांनाच चालक एक तास उशीरा आला वगैरे आम्ही सांगूनही तो आपले तेच पालूपद ऐकवत बसला...आता उशीर झाला तर मला दोष देऊ नका.
शेवटी मी त्याला सुनावले....तू तुझे काम कर निमूटपणे...जे काही घडलं त्याला कोण जबाबदार वगैरे बाबी दे सोडून...जे व्हायचं ते होईल...चल पुढे!
तेव्हा कुठे तो गप्प बसला आणि आपल्या कामाकडे नीटपणे लक्ष देऊ लागला.
रस्त्यावर तशी खूप काही वर्दळ नव्हती पण आमच्या पुढे चालणार्‍या वाहनांमुळे गाडीच्या वेगावर मर्यादा येत होती..कारण  अधून मधून उलट्या दिशेने येणार्‍या काही वाहनांमुळे कधी कधी चालकाला गाडी पुढे काढता येत नव्हती....तसा चालक कुशल होता त्यामुळे त्यातूनही तो वाट काढत गाडी दामटत होता....वाटेत भेटलेल्या कैक वाहनांना मागे टाकत तो आपल्या कुशल सारथ्याचे प्रदर्शन करत होताच... त्यामुळे माझी खात्री होती की गाडी अशीच धावत राहिली तर आम्ही निश्चितपणे चार साडेचारपर्यंत चंढीगढ शहरात पोचू.

गाडी आता भरधाव धावत होती..वेळेवर पोचू आणि  हवी ती खरेदी करायलाही थोडा वेळ नक्की मिळेल याबाबत आम्ही सगळेच आता आश्वस्त झालो होतो...थोड्याच वेळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली की समोरच्या बाजूने येणारी वाहने अदृश्य झालेत आणि आम्ही ज्या दिशेने निघालो होतो त्या दिशेला तोंड करून बरेच मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला उभे आहेत...आमची गाडी मात्र पुढे पुढे जात होती...इतका वेळ भरधाव जाणार्‍या गाडीला आता आपल्या पुढे बर्‍याच छोट्या गाड्या रांगेत हळूहळू चालताहेत हे दृश्य दिसलं आणि पुढे काहीतरी आक्रित घडले असण्याची पुसटशी शंका मनात डोकावायला लागली.

डाव्या बाजूला ट्रकची रांग लागलेलीच होती...त्यातले चालक-साथीदार खाली उतरून निवांतपणे गप्पा हाणत होते...आता शंकेचं रुपांतर खात्रीत झालं...पुढे नक्कीच अपघात झाला होता...ट्रकचालकांकडून कळलं...पुढे एखाद किलोमीटर दूर, एक ट्रक रस्त्यातच आडवा होऊन पडलाय आणि त्यामुळे रस्ता अडवला गेलाय....पण त्यातही एक आशेचा किरण दिसत होता..छोटी वाहनं हळूहळू का होईना त्यातून निसटू शकत होती...होता होता एक क्षण असा आला की छोटी वाहनंही जागची हालेनात...दोन्ही दिशांनी येणार्‍या छोट्या वाहनांनी त्या चिंचोळ्या रस्त्याचा ताबा घेऊन अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी निर्माण केली होती...कुणीच मागे हटायला तयार नव्हते कारण दोन्ही बाजूंना आता मागे लांबच लांब, वाहनांची रांग लागलेली होती....आता मागे जाणे अथवा पुढे जाणे शक्यच नव्हते....आम्हीही गाडीच्या बाहेर निघून हातपाय मोकळे करून घेतले....गाडीत इतका वेळ वातानुकुलनात बसलेलो..आता तळपत्या उन्हात ,उन्हाचे चटके खात उभे राहिलो...दुसरा पर्यायच नव्हता...गाडी थांबलेल्या अवस्थेत वाकु यंत्रणा सुरु ठेवता येत नव्हती....आता इथे किती वेळ थांबावं लागणार कुणास ठाऊक?
थोड्या वेळापूर्वी मनात रचलेले सगळे मनसुबे हवेत विरले...आता निदान विमान गाठण्यासाठी तरी वेळेवर पोचता येऊ दे...अशी इच्छा आम्ही आपापसात व्यक्त करू लागलो.

आता त्या घाटरस्त्यावर झालेला असा हा अपघात...ह्याबाबत पुढे कोण आणि कशी  आणि कधी कारवाई करणार ह्या चिंतेत आम्ही बूडून गेलो....मग बातमी आली की लष्कराला पाचारण केलं गेलंय...त्यांच्या पथकासोबत एक क्रेनही येतेय..ती लवकरच मार्ग मोकळा करेल.
मला प्रश्न पडला की आता हे लष्करी पथक इथे येणार तरी कसे? दोन्ही बाजूचे रस्ते तर वाहनांनी पूर्ण भरलेले आहेत...रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसर्‍या बाजूला खोल खोलपर्यंत उतार...मग हे लोक काय हेलीकॉप्टरने येणार आहेत काय? अहो,माणसं येऊ शकतील हो हेकॉने पण क्रेन कशी आणणार?
ही लष्कराची तुकडी आमच्या मागून येणार आहे की समोरच्या बाजूने? ह्याबाबतही परस्परविरोधी मतं होती...कुठूनही येऊ देत...पण त्यांच्यासाठी रस्ता कुठे होता?

चार तासांची निश्चिंती झाली बगूनाना!
मी मनातल्या मनात,पुलंच्या म्हैस कथेतला संवाद घोळवत बसलो...दुसरं करणार तरी काय अशावेळी?

तेवढ्यात थोडी धावपळ झाली...जो तो आपापल्या गाडीत जाऊन बसू लागला..आम्हीही बसलो...गाड्या चार पावलं...आपलं चार चाकं पुढे गेल्या आणि पुन्हा थांबल्या...आता मात्र पुढे जाईनात..पुन्हा लोक बाहेर पडले...आम्हीही बाहेर पडलो.

साधारण अर्धा तासाने पुढच्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवायला लागली....काही लष्करी जवान आणि वाहतूक पोलिस चालत येतांना दिसले...जरा हायसं वाटलं.  :)
पण नंतर लक्षात आलं की लष्करी जवान म्हणताहेत...एकेकाने गाड्या थोड्या थोड्या मागे घ्या(सुदैवाने डाव्या बाजूला थांबलेल्या ट्रकवाल्यांनी प्रत्येक दोन ट्रकमध्ये जी जागा सोडलेली होती त्यात जेमतेम एकेक छोटी गाडी मावू शकत होती)...तर वापु म्हणत होते की गाड्या थोड्या थोड्या पुढे घ्या!
दोघांच्यात अजिबात सामंजस्य दिसत नव्हतं..पण गाडीचालकांनी प्रसंगावधान राखून आपापल्या गाड्या दोन ट्रकांच्यामध्ये कशाबशा कोंबल्या....आणि थोड्याफार साफ झालेल्या रस्त्यावरून समोरच्या बाजूने लष्कराच्या तीनचार बस आणि एक क्रेन  हळूहळू येतांना दिसल्या....त्यांनी आपली कामगिरी संपवलेली होती..ट्रकला रस्त्याच्या एका कडेला सरकवून...रस्त्याचा एक पदर सुरु केलेला होता आणि आता तिथे वापुची नेमणूक करून आलटून पालटून दोन्ही बाजूच्या दहा दहा गाड्या सोडायला सुरुवात केलेली होती... आता गाड्या हळूहळू हलायला लागल्या...आमची गाडी प्रत्यक्ष अपघातस्थळापाशी पोचायलाच अर्धा तास लागला....पण कसे का असेना...शेवटी तिथून बाहेर पडलोच....पुढेही भरपूर रहदारी असल्यामुळे वेगावर मर्यादा होतीच....वाटेत अडकलेले...रांगेत उभे असलेले शेकडो ट्रक कैक किलोमीटर दूरपर्यंत आम्हाला भेटत होते...त्यावरून असं अनुमान काढता येईल की हा अपघात बराच आधी झालेला असावा....असो. आम्ही निघालो बुवा एकदाचे त्यातून...सहीसलामत!

पुढे साधारण दहा-पंधरा किलोमीटर गाडी अतिशय धिम्या गतीने जात होती...तिथल्या एका गावातून गाडी बाहेर पडली आणि मग रस्ता एकदम साफ मिळाला....मग काय चालक महाशयांनी अशी काय गाडी हाणली की यंव रे यंव!

गाडी जोवर हिमाचलच्या परिसरात होती तोवर सगळा रस्ता डोंगराळ होता...पण तिथून जेव्हा पंजाबात शिरली तेव्हा रस्ता एकदम सपाट दिसायला लागला. मध्ये दूभाजक असलेला लांबरूद रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना दूरदूरपर्यंत पोचलेला सपाट प्रदेश! रस्त्याच्या एका बाजूने संथपणे वाहणारा  भाक्रा-नान्गलचा पाट आणि त्या पाण्यावर होणारी शेती...दूरदूरपर्यंत...पाहावे तिथे शेतजमीनच दिसत होती.....हिमाचलमध्ये होतो तोवर हवा गरम असली तरी वारे थंड होते आता इथे हवा आणि वारेही गरम जाणवू लागले..गाडीची वाकु यंत्रणा व्यवस्थित सुरु होती म्हणून ठीक, नाहीतर काही खैर नव्हती.

पंजाबात शिरलो तेव्हा साधारण साडेतीनचा सुमार झालेला...पोटात भूक उसळलेली म्हणून एका ढाब्यावर गाडी थांबवायला सांगितली....गाडीतून बाहेर आल्याक्षणी उन्हाचा चटका बसला...ढाब्यावर हात धुवायला नळाखाली हात धरला आणि पुन्हा एकदा जोराचा चटका बसला...वरून सूर्य आग ओकत होता,अंग नुसते भाजून निघत होते..त्यावेळचे किमान तापमान ४५ अंशाच्या खाली नक्कीच नसावे...आमच्यासारख्या मुंबईकरांना हा अनुभव नवीनच होता...पण उपायही नव्हता....कसेबसे हात धूवून आत गेलो...जेवणाची मागणी नोंदवली आणि ते येण्याची वाट पाहात बसलो....अचानक आठवण झाली...जेवण येईपर्यंत लस्सी मागवूया...तेवढीच जीवाला शांती मिळेल...बैर्‍याला पुन्हा बोलावून सगळ्यांसाठी लस्सी मागवली....शिमल्यापासून माझ्या कन्येला लस्सी प्यायची होती...पण तिथला पहिलाच अनुभव खास नव्हता(पाणीदार ताक होते हो...साखर घातलेले) म्हणून मी तिला म्हटलं होतं की आपण पंजाबात पोचलो की तिथे पिऊया....त्यांच्याकडे मस्त लस्सी मिळते...म्हणून तो बैरा जातांना मला त्याला सांगायचं होतं...बाबा रे लाज राख तुझ्या पंजाबची....इथे पंजाबात लस्सी खास असते असे ऐकून आहे...पण पूर्वी दिल्लीत सरदारजीच्या ढाब्यावर प्यायलेल्या लस्सीने माझी चांगलीच फसगत केलेली होती.

लस्सी खरंच मस्त होती...पहिल्याच घोटात अंतरात्मा शांत झाला....नंतर जेवणही आलं...तेही उत्तम होतं...दोन प्रकारच्या भाज्या,दाल-फ्राय आणि तंदुरी रोटी असा सगळा बेत होता...सोबत कांदा-मुळा-गाजरही होतंच...लस्सीचे घोट घेत घेत जेवतांना मजा आली....तिथल्या त्या विलक्षण गरम हवेलाही आम्ही काही क्षण विसरलो.

जेवण झालं...सगळेजण तृप्त मनाने गाडीत जाऊन बसले...गाडी सुरु झाली...वाकुही सुरु झाले आणि आता पंजाबच्या त्या मोकळ्या आणि प्रशस्त मार्गावरून गाडी भन्नाटपणे धावू लागली....चंढीगढ अमूक किमी...असे अधून मधूने मैलाचे दगड दिसत होते....आम्ही चंढीगढच्या जवळ जवळ जात होतो...चालक इथल्या रस्त्यांबद्दल जाणकार होता .. मध्येच एक रेल्वे-फाटक आले होते..फाटक बंद असल्यामुळे तिथे वाहनांची रांग लागलेली होती आणि रेल्वेगाडी अजून यायची होती....तेव्हा त्याने लगेच आपली गाडी वळवून दुसर्‍या एका आडवाटेने काढून पुन्हा गाडी मूळ मार्गावर आणली आणि वेळ वाचवला....पाहता पाहता आम्ही चंढीगढमध्ये शिरलो....संध्याकाळचे सव्वापाच वाजून गेले होते....आम्ही जिथून चंढीगढमध्ये शिरलो...त्याच्या दुसर्‍या टोकाला विमानतळ होता...त्यामुळे संपूर्ण चंढीगढ पार करूनच तिथवर पोचायचे होते....आता संध्याकाळ झाल्यामुळे रस्त्यावरची रहदारीही वाढलेली होती आणि शहरातील वेगमर्यादेमुळे  साहजिकच गाडीचा वेगही मंदावलेला होता...चंढीगढमध्ये काहीही खरेदी करण्यासाठी आता वेळ नव्हताच; पण निदान आता आम्ही वेळेवर विमानतळावर पोचणार होतो...हेही कमी नव्हतं....
शेवटी एकदाचे पोचलो विमानतळावर तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते....

खरंच आमचं सुदैव म्हणून त्या वाहतूक खोळंब्यातून आमची वेळेवर सुटका झाली होती..एरवी आम्ही खूप मोठ्या विचित्र संकटात सापडलो असतो...असो...त्यानंतर मग पुन्हा सगळ्या तपासण्या वगैरे करून विमानात बसलो...विमान वेळेवर मुंबईला पोचलं....रात्रीची झगमगती मुंबई विमानातून पाहतांना जणू सूवर्णनगरीच वाटत होती....

विमानतळावरून रिक्षा पकडून घरी पोचलो....
हुश्श! किती बरं वाटलं म्हणून सांगू! कसंही असलं तरी..शेवटी आपल्या घराची सर कशालाच नाही हेच खरं!
इति अलम्‌!




१५ जुलै, २०११

आता पुढे काय?

१३ जुलै २०११. मुंबईत तीन ठिकाणी दहशतवाद्यांनी बॉंबस्फोट घडवून आणले. त्यात जितकी जीवित व वित्तहानी झाली त्यापेक्षाही लोकांमध्ये  एकप्रकारचे जे नैराश्य आलंय ते मला तरी जास्त त्रासदायक वाटतंय. अब्जावधी लोकसंख्येच्या ह्या देशात एकही असा नेता असू नये की जो अशावेळी सगळ्या लोकांना धीर देऊन पुन्हा असे काही घडू नये म्हणून योग्य ते उपाय योजू शकेल? अपराध्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना आणि त्यांच्या संघटनांना जरब बसेल अशी शिक्षा तातडीने करू शकेल? देशात लोकशाही पद्धतीने निवडून दिलेलं सरकार आहे,सक्षम अशी सैन्यदलं आहेत,उत्तम आणि प्रशिक्षित गुप्तवार्तादलं , पोलीसदलं आहेत,न्यायसंस्था आहेत..पण ह्यापैकी कुणीच ही जबाबदारी उचलायला तयार नाहीये...सगळेजण आपापली जबाबदारी झटकून...लोकांनी शांत राहावे(आणि किड्यामुंग्यांसारखे मरत राहावे)...असली आवाहनं करत आहेत....झालंय तरी काय ह्या देशाला?
ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराज,राणा प्रताप इत्यादि वीरांनी आपल्या पराक्रमाने बलाढ्य शत्रूला खडे चारले...त्याच आपल्या भारत देशाला शेजारचे काही क्षुल्लक देश,अतिरेकी वेठीस धरू शकतात आणि आपण बलाढ्य असूनही त्यांची मस्ती जिरवू शकत नाही...हे खरंच अतर्क्य आहे....सद्यस्थितीत हे खरं जरी असलं तरी मुळीच मानवणारं नाहीये...म्हणूनच आता नुसता विचार नव्हे तर कृती करायची वेळ आली आहे...आता नक्कीच ह्यावर तातडीचा तोडगा काढायलाच हवाय....काय बरं करता येईल तातडीने?

मला काही उपाय सुचताहेत...सर्वात पहिला आणि झटपट उपाय म्हणजे...अफजल गुरु आणि कसाब, ह्या,आपल्या न्यायसंस्थेने दोषी ठरवलेल्या आणि फाशीची सजा फर्मावलेल्या दहशतवाद्यांना तातडीने... कमाल एका आठवड्यात..फाशी दिलीच पाहिजे...अशा तर्‍हेने तातडीने फाशी देण्याने काही  गोष्टी साधल्या जातील...
१) सीमेपल्याडच्या राष्ट्रांना,त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांना आणि आपल्याच देशातील घरभेद्यांना योग्य तो संदेश जाईल...तो असा...अशा तर्‍हेने पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यांची मुळीच गय केली जाणार नाही. त्यांचा झटपट निकाल लावला जाईल.
२) जनतेमध्ये, सरकार आणि राज्यकर्त्यांप्रति विश्वास निर्माण होईल.
३) आपले पोलिस खाते..ज्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेचा प्रचंड ताण आहे, त्यांना,त्यांनी केलेल्या परिश्रमाचे, तपासकार्याचे..ज्यात गुंतागुंतीचे पुरावे गोळा करणं, खटला उभा करणं इत्यादि बाबतचे समाधान मिळेल...... अंतिम फळ त्यांना अशा तर्‍हेने चाखता येईल...आणि ह्यामुळे त्यांच्या मनोधैर्यात अजून वाढ होईल. त्यामुळे आपल्या कामाप्रति त्यांची आस्था अजून वाढेल...एरवी होतंय काय तर...इतके सगळे करूनही,न्यायसंस्थेने न्याय करूनही हे दहशतवादी आपल्या समोर वर्षानुवर्षे जीवंत राहून सरकारी पाहूणचार झोडताहेत... तर मग इतका सगळा अट्टहास कराच कशाला? असा विचार येऊन पोलिसांमध्येही सुस्ती, नैराश्य येऊ शकतं...

आता काही दुसरे उपाय...आपल्या न्यायप्रक्रियेत काही आमुलाग्र बदल करावे लागतील...लोकसभा आणि राज्यसभेत त्यासंबंधीचे प्रस्ताव पारित करून घेऊन त्याचे लगेच कायद्यात रुपांतरण करणे...हे शक्य वाटत नसेल तर त्यासाठी वेळप्रसंगी वटहुकुमाचाही वापर केला तरी चालेल...पण हे बदलही कमाल महिन्याभराच्या अवधीत व्हायला हवेत....अर्थात हे सगळे भविष्यातल्यासाठी(भविष्यात असे गुन्हे घडलेच तर)आहे....पण हेही बदल कमाल महिन्याभरात व्हायला हवेत.
हे बदल कोणते असावे?
१) देशद्रोहाच्या खटल्यासंदर्भात  खास कोर्ट स्थापन व्हावे.
२)परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही खटले दाखल करून घेतले जावेत.
ह्यातले खटले कमाल एक आठवड्यात उभे राहिलेच पाहिजेत.
३)गुन्हेगाराला वकील दिला जाणार नाही. त्याचे निरपराधित्व त्यानेच सिद्ध करायला हवे.
३) कमाल १५ दिवसात निकाल लागून त्याची अंमलबजावणी कमाल आठवडाभरात व्हायलाच हवी.
४) ह्या शिक्षेविरुद्ध कोणतेही अपील करण्याची तजवीज असू नये.
५) देशद्रोहाला अजिबात दया दाखवली जाता कामा नये. देहदंडाची-फाशीची शिक्षाच सुनावली जावी.

मंडळी, आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारलेल्या दहशतवाद्यांना जेरीस आणायचे असेल तर तातडीने हे अत्यंत कडक असे उपाय अंमलात आणायलाच हवेत.

आता असे गुन्हे शक्य तो घडूच नयेत म्हणून काही दीर्घकालीन उपाय...अंतर्गत सुरक्षेसाठी.. ज्यात राज्य आणि केंद्रिय पोलीसदलं आणि गुप्तवार्तादलं ह्यांच्यात समन्वय साधला जाण्यासाठी ह्या सर्व दलातील निवडक व कर्तृत्ववान अधिकार्‍यांची...गृह मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली   एक समिती नेमून वेळोवेळी देशातील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेऊन वेळोवेळी योग्य ती कारवाई तातडीने केली पाहिजे.

लोकप्रबोधनाचा कार्यक्रम राबवणे...आता जनतेचाही ह्या कार्यात सहभाग असलाच पाहिजे नाही का? सरकार , पोलिस आणि न्यायव्यवस्थेवरच  सगळा ताण का बरे?
ह्यासाठी स्थानिक मोहल्ला समित्या स्थापन करून ,त्या त्या विभागात काही अनुचित घटना घडत असतील,घडण्याची शंका असेल तर नेमकं काय करावं ह्याबाबत पोलिसांकडून नागरिकांचं प्रबोधन केलं जावं..जेणेकरून पोलिसांवरचा ताण काही प्रमाणात तरी कमी होईल.

युद्ध...युद्ध हा शेवटचा पर्याय आहे...भावनेच्या आहारी जाऊन अथवा तडकाफडकी त्याबाबत निर्णय घेणे कधीही उचित होणार नाही...म्हणूनच वर सांगितलेले उपाय आपण अत्यंत तातडीने केले तर आपल्याच देशात येऊन आपल्या लोकांना मारण्याचे दु:साहस करायला सहसा कुणीही परकीय धजावणार नाही....

अरे हो! पण हे करणार कोण? सद्द्याच्या राज्यकर्त्यांमध्ये,समस्त राजकीय पक्षांमध्ये इतकी हिंमत,एकी आहे काय? त्यांना खरोखर ह्या देशातील आम जनतेची किंमत आहे काय? त्यांच्यात हिंमत नसेल तर जनमताचा रेटा त्यांना तसे करायला भाग पाडेल काय? आणि तसे होण्यासाठी  हे जनमत संघटित होईल काय? त्यासाठी कोण पुढाकार घेणार? आहे का कुणी माय का लाल?

छे बुवा! विचार करूनच दमलो...
पुन्हा पहिले पाढे पंचावन!
मुंबईच्या स्पिरिटला...म्हणजे भूताला हो...आपला सलाम!
इतकंच हो...इतकंच म्हणणार आपले नेते ...फारतर एकदोन लोकांना बळीचे बकरे बनवले जाईल...आणि...आणि...
छ्या! पुन्हा हरदासाची गाडी आली मूळपदावर!
आता पुढे काय?????????????

८ जुलै, २०११

चंशिकुम! ११

गाडीत बसता बसताच रिमझिम पाऊस सुरु झालेला होता....पाहता पाहता तो तुफान वेगाने कोसळू लागला. आजुबाजुचे सगळे आसमंत ढगाळ भासू लागले...समोर जेमतेम सात-आठ फुटांवरचा रस्ता फक्त दिसू लागला...बाकी सगळीकडे ढगच ढग...आम्ही जणू ढगातूनच प्रवास करत होतो...साहजिकच आता गाडीचा वेग अतिशय मर्यादित ठेवावा लागत होता.

मुंबईत हवा तेवढा घनघोर पाऊस आयुष्यभर अनुभवलेला आहे त्यामुळे पावसाचे फारसे नाविन्य नाही...पण इथे आम्ही त्या ढगातच वावरत होतो...ज्यातून पडणारा पाऊस फक्त आम्ही अनुभवत असतो...आजचा हा अनुभव अगदी विलक्षणच होता.
आता आजुबाजूला काय पाहायचं म्हणून स्वस्थ बसलो होतो...इतक्यात लक्ष खाली गेलं आणि...

अहाहा,काय दृष्य होतं ते...खाली उतरून जाणारी बियास नदी..अगदी खोल खोलपर्यंत दिसत होती.तशातच डोंगरातला वळणावळणांचा उतरता रस्ता आणि त्यावरील वाहनं,झाडी इत्यादि विहंगम दृष्यही मोहवून टाकणारं होतं...मी लगेच प्रग्रा सावरला आणि त्याची काही छाचि उतरवून घेतली.

निसर्गाचं ते ओलेतं रूप न्याहाळतच आम्ही घाट उतरलो. रस्त्यात एका ठिकाणी सोलांग व्हॅली नावाचं अजून एक पर्यटन स्थळ लागलं....हिवाळ्यात इथे लोक बर्फातून घसरण्याचा खेळ(स्किईंग) करायला येतात असं कळलं. आत्ता इथे बर्फ वगैरे काही नव्हतं...पण आकाशात उडण्याचा...पॅरा ग्लाईंडिंगचा खेळ खेळता येतो असं आमच्या चालकाने सांगितलं...आम्ही चारजण गाडीच्या बाहेर पडलो....अजूनही पाऊस सुरुच होता...मात्र आता तो खूपच कमी झालेला होता...गाडी थांबली तिथून साधारण दहा मिनिटांच्या अंतरावर चालत जायचं होतं म्हणून आम्ही निघालो...माझ्या मनात केव्हापासून पॅरा ग्लाईडिंगचा अनुभव घ्यायचे घोळत होते...अनायासे संधी आलेय तर साधून घेऊ ह्या हिशोबाने आम्ही सगळे झपझप चालत त्या केंद्राजवळ पोचलो...पण आमचं दूर्दैव हे की पावसाळी हवामानामुळे सद्द्या ते बंद ठेवलेलं होतं...त्याच बरोबर इतर काही बारीक-सारीक खेळही बंद होते...तिथे, लोकांची बरीच गर्दी जमलेली होती पण सगळेच जण खट्टु दिसत होते...इतक्या लांब येऊन अपेक्षाभंग झाल्याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहर्‍यावर ठळकपणाने जाणवत होते.

आम्ही तिथे एक फेरी मारली...हवेतला गारवा चांगलाच जाणवत होता म्हणून मस्तपैकी कॉफी प्यायली आणि परतीचा रस्ता धरला...आमचे सहलप्रमुख आणि त्यांची कन्या पुढे आणि मी आणि त्यांचा पुत्र मागे असे चालत निघालो....अचानक सप्र मागे वळून म्हणाले...अरे,काय हे दगड कशाला मारताय?
आम्ही, मागचे दोघेही अचंबित झालो...हे असे काय अचानक वेड्यासारखे बोलताहेत?
त्यांना आम्ही काही बोलणार...इतक्यात आम्हालाही तसाच दगडांचा प्रसाद मिळायला सुरुवात झाली....हे काय आक्रित घडतंय म्हणून आम्ही आजुबाजूला पाहायला सुरुवात केली आणि.....लक्षात आलं की ते दगड वगैरे काही नव्हते तर आकाशातून चक्क आमच्यावर गारांचा मारा सुरु झालेला होता....आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता की आम्ही गारांचा अनुभव घेत होतो....गारा लहान बोराएवढ्या होत्या पण चांगल्याच शेकवत होत्या...माझ्या डोक्यावर टोपी होती म्हणून मी वाचलो...पण बाकीच्यांच्या डोक्यावर ठपाठप गारा आपटत होत्या....गारांच्या त्या अनपेक्षित माराने क्षणभर आम्ही बावचळलो खरे पण नंतर मग त्या गारा झेलण्यासाठी,वेचण्यासाठी आमच्यात स्पर्धा सुरु झाली.
गारा हातात सहजासहजी येत नव्हत्या. हुलकावणी देऊन निसटत होत्या...कधी एखादी गार हातात आलीच तर हाताच्या उष्णतेने पाहता पाहता विरघळत होती....कमाल ह्याची वाटली की अंगाला,डोक्याला आपटणार्‍या,टणक वाटणार्‍या त्या गारा हातात येताक्षणी कशा अगदी सहजपणाने विरघळत होत्या.
आजुबाजूला ,झाडां-झुडपांनी,गवतांनी तर जणू हिरे-मोती धारण केले होते...ते विलोभनीय दृश्य टिपायला प्रग्रा नव्हता...पाऊस पडत असल्यामुळे मी तो गाडीतच सोडून आलो होतो.
आता पावसाचा आणि गारांचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता त्यामुळे आम्ही तो खेळ सोडून देऊन झपाझप गाडीच्या दिशेने चालायला लागलो.

गाडीत बसेपर्यंत चांगलेच भिजलो होतो...अंगात घातलेला  स्वेटर ओला झाल्यामुळे मी काढून टाकला आणि थंडी जास्त जाणवायला लागली....गाडीच्या पुढच्या काचेवर पावसाच्या पाण्याबरोबरच येऊन आदळणार्‍या गारांचा खेळ पाहातच आमचा हॉटेलवर परतीचा प्रवास सुरु झाला....वाटेत पुन्हा एकदा थांबून सकाळी घेतलेला...बर्फात खेळण्यासाठीचा जामानिमा परत करून आम्ही हॉटेलवर परतलो...दुपारचा चारचा सुमार असूनही चांगलेच अंधारलेले होते.

हॉटेलात येताक्षणी आधी ओले कपडे काढून चांगले कोरडे कपडे चढवले. सकाळी रोहतांगला न्याहरी केली होती त्यानंतर सोलांगला कॉफी प्यायली...ह्या व्यतिरिक्त पोटात काहीच गेले नव्हते. आता जेवणाची वेळ तर केव्हाच टळून गेली होती म्हणून मग दुपारची न्याहरी मागवली.

पाचच्या सुमारास पाऊस थांबला आणि आम्ही स्थानिक स्थलदर्शनासाठी बाहेर पडलो.आता बाहेर चांगलाच गारठा निर्माण झाला होता. माझ्या अंगात थंडी भरायला लागली होती आणि माझा एकमेव स्वेटर तर ओला झाला होता...मग काय माझ्या कन्येचं पावसाळी जाकिट  घालून बाहेर पडलो...पण माझी थंडी काही कमी होईना..वाटेत पुन्हा कुठे कॉफी मिळाली तर पिऊ असा विचार करून मी कसाबसा थंडी थोपवण्याचा विचार करत होतो....
तसं पाहायला गेलं तर काही फारसं पाहण्यासारखं नव्हतं म्हणा...पण आलोच आहोत तर जाऊन येऊ म्हणून हजेरी लावली...त्यातलं एक आहे हिंडिंबा मंदिर!  हिडिंबा मंदिराचा परिसर बाकी मस्त आहे...उंचच उंच अशा (बहुदा) देवदार वृक्षांनी नटलेला आहे. दर्शनासाठीची हीऽऽऽऽऽऽ मोठी रांग पाहून आमच्या बरोबरची मंडळी फक्त बाहेरूनच ओझरतं दर्शन घेऊन परतली...ह्या मंदिराच्या आवारातच आमच्यातल्या तरूण मुलींनी हातात ससा घेऊन आपापली छाचि काढून घेतली..एकेक ससे कसले पोसलेले होते !!!
त्यानंतर मुलींनी हिमाचलच्या वेशभुषेतली छाचि काढून घेतली...त्या तिथल्या बायका काही म्हणता पिच्छा सोडीनात..मग काय मुलींचा नाईलाज झाला...तसंही मुलीना नटायला नेहमीच आवडतं म्हणा...म्हणून हो,नाही करता करता त्या तयार झाल्या ती वेशभुषा करायला.  :)

असो.त्यानंतर तिथल्याच एका राष्टीय उद्यानात थोडा फेरफटका मारून आम्ही गेलो बुद्धमंदिर पाहायला. ते पाहून झाल्यावर मंडळी रमत गमत खरेदी, अधिक नुसत्याच चौकश्या करत फिरायला लागली...इथे मला थंडी अजिबात सोसवेना...अंग थरथरायला लागलं होतं...मला माहीत असलेले सगळे श्वसनाचे...कपालभाती इत्यादि प्रकार करून पाहिले पण अंगात काही उष्णता निर्माण होईना...आजूबाजूला कुठेच चहाची टपरी किंवा तत्सम काही दिसेना...आणि मंडळी आपली गुंतलेली होती आपल्याच नादात....शेवटी मी कन्येला एका बाजूला बोलावून सांगितले...मी पुन्हा  मागे जातो...कुठे गरमागरम चहा-कॉफी काही मिळेल का ते पाहतो...तू ह्यांच्याबरोबरच राहा...वेळप्रसंगी भटक्यावर संपर्क साध....तिच्या हो-नाहीची वाटही न पाहता मी पुन्हा हमरस्त्याच्या(माल रोड...इथे मनालीतही आहे..शिमल्याप्रमाणे) वाटेला लागलो.

माझ्या सुदैवाने मला फार नाही चालावं लागलं...वळणावरच एक चांगल्यापैकी क्षुधाशांतिगृह होतं...पाटी दिसली..मद्रास कॅफे.. म्हणून घुसलो...तर कळलं की ते पहिल्या मजल्यावर आहे...मग जिना कुठे आहे ते शोधण्यात पाच मिनिटं गेली..मिळाला एकदाचा...मी वर गेलो. आतमध्ये फारशी गर्दी नव्हती पण हॉटेल ऐसपैस होतं...कडेचीच एक खुर्ची पकडून ’एक कडक फिल्टर कॉफी’ अशी ऑर्डर दिली...पण तो बैरा नुसता पाहातच राहिला माझ्याकडे...असं का पाहतोय? म्हणून विचारलं तर म्हणाला...साब,फिल्टर कॉफी नही है,नेसकाफी है,लाऊं?
मी म्हटलं...अरे जे काही असेल ते आण पण एकदम कडक आणि गरम आण...तो गेला आणि मी वाट पाहात बसलो...दहा मिनिटं लावलीन बेट्याने...मी आपला इथे कुडकुडतच होतो. शेवटी एकदाची ती कॉफी आली...दोनचार घोट पोटात गेले आणि जरा धुगधुगी आली...जीवात जीव आला...मग हळूहळू चवीने कॉफीपान संपवून मी पैसे द्यायला व्यवस्थापकाकडे गेलो आणि त्याला म्हणालो....मद्रास कॅफे नाम लिख्खा है और तुम्हारे पास फिल्टर कॉफी नही है?
तो माझ्याकडे पाहात म्हणाला...साब,ये खाली मद्रास कॅफे नही है...आगे भी क्या लिख्खा है देखो ना!
मी पाहिलं तर...मद्रास कॅफे और पंजाब. हिमाचल हॉटेल असे काहीसे धेडगुजरी समीकरण दिसलं....
क्या है ना साब,हम लोक इधरकेही है...लेकिन बाहरके लोग भी आते है ना, इसीलिये उनका भी नाम शामिल किया है हाटिलके नाममे...वो देखो, गुजराथी थाली,पंजाबी थाली...सब इधर मिलता है!

जाऊ द्या झालं...कॉफी मिळाली ना....उगाच खोलात कशाला शिरा..म्हणून मी पैसे देऊन तिथून सटकलो. खरं तर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते...सगळीकडे, जाईन तिथे गुजराथी,पंजाबी थाळी मिळते...पण महाराष्टीय थाळी कुठेच नाही....अहो कुठेच काय? खुद्द मुंबईतही शोधल्याशिवाय सहजासहजी मिळत नाही...तिथे इतरत्र,महाराष्ट्राबाहेर कशी मिळेल म्हणा!


२९ जून, २०११

चंशिकुम! १०

बर्फात खेळायला गेलो खरे...पण मी काही खेळलो नाही...त्याची दोन कारणं..एक तर गळ्यात प्रग्रा होता आणि आजुबाजूचे सृष्टीसौंदर्य,माणसांच्या हालचाली टिपण्यातच मी दंग होतो...हे एक कारण. दुसरं असं की बर्फात खेळायचा जामानिमा मी केव्हाच उतरवून गाडीत ठेवलेला होता...त्यामुळे साध्या कपड्यात बर्फात खेळण्यात ती मजा नव्हती...उगाच थंडी बाधायची आणि आजारपण उद्भवून सहलीचा मजा किरकिरा व्हायचा...माझ्या बरोबर असणार्‍यांनी मात्र तो मजा त्यांना हवा तसा लुटला.

बर्फातला मुख्य खेळ म्हणजे घसरगुंडी...लोक ते जाणतेपणाने आणि अजाणतेपणानेही खेळत होते....जाणतेपणाने म्हणजे...काही साधनांचा वापर करून...आणि अजाणतेपणाने म्हणजे...बर्फावरून चालतांना तसंही घसरायला होत होतंच...मीही एकदोनदा चांगलाच घसरलो...बरोबरच्या लोकांनी वेळीच आधार दिला म्हणून बरं...नाही तर माझा प्रग्राही बिघडला असता....त्यामुळे त्यानंतर मी बर्फाच्या बाहेरूनच इतरांच्या खेळाची मजा पाहात उभा होतो.

तास-दोन तास खेळल्यानंतर साहजिकच त्यातली गंमत कमी झाली,उत्साह मावळला आणि पोटात भूक जाणवू लागली...म्हणून मग आम्ही तिथून चालत चालत रस्त्यावर आलो आणि आमची गाडी शोधू लागलो...आता तिथे सगळ्याच गाड्या एका रंगाच्या,त्यातही एकाच मॉडेलच्याही भरपूर....इतक्या सगळ्या गाड्यांच्यात आपली गाडी शोधायची/ओळखायची म्हणजे प्रत्येक गाडीवरचा नंबर वाचत जायला हवा...आम्ही तेही करून पाहिले....पण गाडी काही सापडेना...खिशात हात घालून भ्रमणध्वनी काढावा म्हटलं....तर प्रत्येकाने तो गाडीतच ठेवून आल्याचं सांगितलं....मग आता गाडी कशी शोधणार? ती नेमकी कुठे पार्क केली हेच आम्हाला कुठे माहीत होतं? आम्ही तर मध्येच उतरलो होतो ना! :(


गाड्यांची ही भली थोरली रांग लागलेली होती....कैक किलोमीटर लांबवर ती पसरलेली दिसत होती...आम्ही परतीच्या दिशेन चालत होतो...आपली गाडी दिसेल ह्या आशेने...साधारण अर्धा-एक किलोमीटर चाललो...गाडीचा पत्ताच नव्हता...तेवढ्यात एक बाई दिसली...तिच्याकडे हातात तीन भ्रमणध्वनी दिसले...आमच्यापैकी एकाने जाऊन तिला विनंती केली....आम्हाला जरा आमच्या चालकाशी संपर्क साधायचाय, देता का तुमचा भ्रमणध्वनी?
ती बाई तर रडायलाच लागली....अहो, इथे रेंजच पकडत नाहीये...एकाही मोबाईलचा उपयोग नाहीये....मी गेले दोन तास शोधतेय....माझी गाडी कुठे हरवलेय कळतच नाहीये.आम्ही तिचे सांत्वन केले...म्हटलं,घाबरू नका,तुमच्या बरोबरची लोकंही तुम्हाला येतील शोधत. आम्हीही आमची गाडी शोधतोय.

त्या बाईसारखी आणि आमच्यासारखी अजूनही कैक लोकं आपापल्या गाड्या शोधत फिरत होती...आजूबाजूला इतक्या गाड्या असतांना नेमकी आपली गाडीच दिसू नये हा अनुभव अगदी वैताग आणणारा होता. इथे सूर्य तापलेला होता,त्यातच बर्फावरून परावर्तित होणारी त्याची किरणं अजून तापदायक वाटत होती आणि लोक आपापल्या साथीदारांना आणि गाड्यांना शोधत इतस्तत: भटकत होते...रोहतांगच्या त्या परिसरात कुणाचाही मोबाईल चालत नव्हता. खरं तर अशा ठिकाणी सरकारी पातळीवरून एखाद्या नियंत्रण कक्षाची स्थापना करणे गरजेचे होते...जिथे ध्वनीवर्धकाची योजना असायला हवी होती...ज्यावरून घोषणा करून संबंधितांचं लक्ष वेधता येईल...पण तशी काही सोय तिथे नव्हती....त्यामुळे सगळेच भरकटलेले दिसत होते.

आम्हा सहाजणांपैकी पाचजण आम्ही एकत्र होतो...आमच्या बरोबरच्या एक बाई आणि चालक गाडीबरोबर होते.जवळपास एक तास उलटला तरी गाडीचा पत्ता लागेना....आम्ही मात्र उगाच पुढे पुढे चालत होतो....बस्स! शेवटी मी निर्णय घेतला...आता पुढे जाणे नाही...इथेच थांबू.
पण मग प्रश्न निर्माण झाला...आम्हाला शोधायला कोण येणार?
मग दोन जणांना पुन्हा मागे पाठवलं...नदीच्या कोरड्या पात्रातही भरपूर गाड्या थांबवलेल्या दिसत होत्या....माझा अंदाज होता की आमची गाडी तिथेच असणार...कारण?
आमच्या बरोबरच्या ज्या बाई गाडीत राहिल्या होत्या त्या चालकाला गाडी खूप दूरवर नेऊन पार्क करायला निश्चितच देणार नव्हत्या ह्याची खात्री वाटत होती...त्यांचा नवरा,मुलांना सोडून फार लांब राहणं त्यांना शक्यच नव्हतं...तेव्हा गाडी तिथेच त्या नदीच्या कोरड्या पात्रातच असणार...साधारण त्याच्या आसपासच आम्ही उतरून गेलो होतो.

आमच्यापैकी दोघांना...माझी मुलगी आणि त्यांच्यापैकी एक मुलगा...अशा दोघांना मागे पाठवलं....हे असं करण्याचं कारण म्हणजे त्या मुलाला गाड्यांची इथ्यंभूत माहिती आहे आणि दूरवरून,मागून,पुढूनही तो गाडी कोणती आहे...म्हणजे कंपनी,मॉडेल इत्यादि ओळखू शकतो...अहो पण इथे एकाच कंपनीच्या मॉडेलच्या अनेक गाड्या आहेत...मग तो ओळखणार कसा आपली गाडी? आणि आत्तापर्यंत का नाही ओळखली?
प्रश्न बरोबर आहे...पण उत्तर असं आहे की...आत्तापर्यंत आम्ही केलेला गाडीचा शोध हा फारसे गंभीर होऊन केलेला नव्हता...आता मात्र संशोधक वृत्तीने आणि गंभीरपणाने तो शोध घ्यायचा होता...म्हणून ह्या दोघांना मागे पाठवलं. माझ्या मुलीकडे नुकताच घेतलेला अत्त्याधुनिक प्रग्रा होता...त्याचा उपयोग ह्यावेळी दुर्बीणीसारखा करायचा ठरले....त्याप्रमाणे ह्या दोघांचे पथक मागे रवाना झाले.
मग दुसरे दोन जणांचे पथक...आमचे सहलनेते आणि त्यांची मुलगी...हे दोघे पुढे निघाले...मी मात्र तिथेच एक उंचवटा पाहून बसून राहिलो. पुढे जाणार्‍यांना फार पुढे जाऊ नका...असं सांगून त्यांची रवानगी केली.

साधारण अर्ध्या तासाने पुढे गेलेले दोघेजण परत आले...गाडीचा कुठेच पत्ता नव्हता....ते जिथपर्यंत गेले होते...त्याच्याही पुढे किमान दोन किलोमीटरपर्यंत गाड्यांची रांग लागलेली होती...त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जास्त पुढे न जाता ते परतले होते....आता पुढे जायचंच तर सगळ्यांनी मिळूनच...हे ठरवून.

आमची मागे गेलेली दोनजणांची तुकडी अजूनही आलेली नव्हती...त्यांची वाट पाहणे सुरुच होते. आमच्यासारखे भरकटलेले लोकही इतस्तत: दिसत होते...त्यांचेही आपापसातले संभाषण निराशाजनक होते...गाडी कधी सापडणार? :(

इतक्यात काही विशिष्ट गणवेश घातलेले तरूण-तरूणींचे एक टोळके आले.....हातात फलक घेतलेले’पर्यावरण बचाओ’ मोहिमेचे ते सगळे शिलेदार होते. लोकांमध्ये जागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता...प्लास्टिक पिशव्या,बाटल्या इतस्तत: टाकू नका,हिमालयाचा परिसर खराब करू नका...असा लोकांमध्ये प्रचार करत,वैयक्तिक संवाद साधत ही मंडळी माझ्यापर्यंत आली...त्यातली एक तरूणी मला उद्देशून म्हणाली...अंकल,आपका क्या कहना है?
मी म्हटलं, हे पाहा,तुम्ही जे काही करताय ते अतिशय स्तुत्त्य आहे,पण....
मी मराठीतच बोलत होतो...त्या लोकांना समजेल की नाही हे लक्षात आलं म्हणून मराठी/हिंदी असे संमिश्र बोलू लागलो....आणि काय आश्चर्य! त्यांच्यापैकी काहीजण चक्क मराठीच निघाले....त्यांचा एक गटप्रमुख तर कोल्हापुरचा ’कपडेकर’ आडनावाचा तरूण होता(नाव मात्र विसरलो त्याचे.)
मग काय मराठीतच गप्पा सुरु झाल्या.
मी त्यांना म्हटलं..हे पाहा,लोकांना तुम्ही जे काही आवाहन करताय ते त्यांना समजत नाहीये असे समजू नका...खरं तर इथे येणारे बहुसंख्य हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातूनच आलेले आहेत/असतात...पण अंगभूत असलेल्या/लागलेल्या वाईट सवयी इतक्या सहजासहजी सुटणार नाहीत. लोक कचरा टाकतात/करतात...त्यांना तुम्ही कचरा करू नका असे सांगितले तर काही मोजकेच लोक कदाचित तुमचे तेवढ्यापुरते ऐकतीलही...पण तुमच्या अपरोक्ष पुन्हा ते कचरा करतील...कारण...सवयी कधी सुटत नाहीत..त्या तशाच राहतात अशा अर्थी एक इंग्रजी म्हण आहे..हॅबिट ऑलवेज रिमेन्स!
हॅबिटचे स्पेलिंग आहे...एच(h) ए(a) बी(b) आय(i) ट(t)...habit
ह्यातलं पहिलं अक्षर काढलं तर राहतं.. ए बीट(a bit) रिमेन्स!
ह्यातलं दुसरं अक्षर काढलं तर राहतं...बीट(bit) रिमेन्स!
ह्यातलं तिसरं अक्षर काढलं तर राहतं...इट(it)रिमेन्स!...म्हणजेच ती(it)टिकते! अशी सहजासहजी जात नसते.
तेव्हा तुम्ही आवाहन जरूर करा,लोक लगेच सुधारतील अशी अपेक्षा मात्र करू नका आणि ती सुधारत नाहीत म्हणून खट्टूही होऊ नका...कारण जी गोष्ट तुम्हाला मनापासून पटलेय आणि जी तुम्ही अंगीकारलेय, ही गोष्ट जर बहुजनांच्या फायद्याची आहे अशी तुमची मनापासून धारणा असेल तर ती तुम्ही करत राहा...सुधारणा ह्या खूप हळूहळू होत असतात....सुधारकांच्या कैक पिढ्यांना त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचावं लागतं,तेव्हा कुठे इंचभर प्रगती होत असते.
लोकांनी टाकलेला कचरा उचलणारे,हातात झाडू घेऊन स्वत: साफसफाई करणारे सेवाभावाने प्रेरित झालेले लोकही मी पाहिलेत....पण म्हणून सर्वसामान्य लोक सुधारलेत असे नाही झाले...उलट लोक मुद्दाम तिथे,साफ केलेल्या जागी जाऊन पुन्हा कचरा टाकायला लागले...अशा वेळी स्वत: स्वच्छतेचं उदाहरण घालून देणारी मंडळी एक तर रागावतात किंवा मरू दे,हे लोक सुधारायचे नाहीत. आपण कशाला उगाच मरा....असे म्हणून त्यातून बाजूला हटतात....
आपल्याला लोकांच्या सवयी सुधारायच्या असतील तर त्याची अगदी प्राथमिक शालेय पातळीपासूनच सुरुवात करायला हवी आहे...एकदा एखाद्याच्या मनात चांगल्या सवयींबद्दल जागरूकता निर्माण झाली की मग भविष्यात तो कधीच चुकीच्या गोष्टी करणार नाही....तेव्हा माझा तुम्हाला असा सल्ला आहे...की जोवर तुम्ही हे जे काही करताय(ते चांगलंच आहे...पण त्याला फारसे यश येणार नाहीये हे देखिल तेवढेच खरे आहे)ते तुम्हाला न रागावता,चिडता आणि निराश न होता करता येतंय तोवर जरूर करा...तुमच्या अशा मोहिमेमुळे किमान एक माणूस जरी सुधारला तरी खूप झाले असे समाधान माना...बाकी..आपण काही तरी समाज जागृतीचे काम करतोय ह्या समाधाना व्यतिरिक्त दुसरे काही फारसे साध्य होणार नाही हेही लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्यात नैराश्य निर्माण होणार नाही.

तुम्हाला निरुत्साही करण्यासाठी मी हे बोलत नाहीये...फक्त वस्तुस्थितीची कल्पना देतोय....कारण जेव्हा कुणीही आपल्या स्वत:च्या मनाने ठरवतो तेव्हाच ती सवय दीर्घकाळ टिकते,दुसर्‍यांच्या सांगण्याने नव्हे...एरवी तेरड्याचा रंग तीन दिवस ह्या म्हणीसारखे होत असते...असला ताप फार काळ टिकत नाही.

माझं हे बौद्धिक ती मुलं शांतपणे ऐकून घेत होती...मी सांगितलेला..विशेष करून कचरा गोळा करण्याबद्दलचा त्यांचा अनुभवही तसाच होता...ह्याआधी हे लोक जेव्हा पिशव्यातून कचरा गोळा करत असत तेव्हा इतर लोक लगेच, तिथेच...साफ केलेल्या जागेवर कचरा आणून टाकत....ही वस्तुस्थिती त्यांच्याही लक्षात आलेली आणि म्हणूनच आता त्यांनी कचरा उचलणे बंद करून फक्त कचरा इथे तिथे टाकू नका...आपल्याबरोबर घेऊन जा आणि कचर्‍याच्या डब्यातच टाका असं सांगायला सुरुवात केलेली होती.... अजूनही बरंच काही सांगता आलं असतं...पण तेवढ्यात आमची गाडी आली...मागे गेलेल्या दोघांनी आपली कामगिरी अगदी चोख पार पाडली होती.

गाडीत बसता बसता त्या तरूणांचा निरोप घेतला. गाडी येईपर्यंतचा माझा वेळ मात्र मजेत गेला...त्या लोकांना कदाचित तो कंटाळवाणाही वाटला असेल. ;)

२४ जून, २०११

चंशिकुम! ९

पहाटे चार वाजता जायचं म्हणून तीन वाजताच उठून मुखमार्जनादि आन्हिकं आटोपून आम्ही सगळे तयार होतो पण गाडी चालकाचा पत्ताच नव्हता. त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न फोल ठरत होता...चार ते पाच असा एकतास गेला आणि शेवटी एकदाचा संपर्क झाला बुवा...महाराजांनी फोन उचलून आम्हाला कृतार्थ केले...आणि मग गाडीत बसून रोहतांगच्या दिशेने निघायला सकाळचे पावणे सहा वाजले.
आमच्या आधीच्या चालकाने आम्हाला प्रवासाच्या सुरुवातीलाच सांगितले होते की इथे तुम्ही चालकाच्या सांगण्यानुसार आपला कार्यक्रम ठरवलात तरच तो उत्तमरित्या पार पडेल...कारण कोणत्या वेळी आणि कुठे रहदारी जास्त असते,ज्यामुळे उगाच प्रवासातला वेळ वाढत असतो...हे, चालक इथला स्थानिक असल्यामुळे त्यालाच बरोबर माहीत असतं. त्यामुळे तो सांगेल तसं वागा,तुम्हाला प्रवासात कोणतीच अडचण येणार नाही. आम्ही अगदी शहाण्या मुलासारखे त्याचे ऐकूनच ह्या आमच्या चालकाला आदल्या रात्री विचारून,त्याची संमती घेऊन पहाटे चारची वेळ ठरवली होती...पण त्याने तर मनालीतच आमचे दोन तास फुकट घालवले होते. असो,जे झालं ते झालं. आम्ही दोन-चार शब्द त्याला ऐकवले आणि त्यानेही प्रत्त्युत्तर न देता मुकाटपणे ऐकून घेऊन चक्राचा ताबा घेतला.

सकाळचं प्रसन्न वातावरण,थंडगार हवा,वळणावळणाचा रस्ता, रस्त्याच्या एका बाजूने वाहणारी नदी,तर दुसर्‍या बाजूला असणारा हिरवागार पर्वत...झोपेचे फुकट गेलेले दोन तास वसूल करायला मंडळींनी सुरुवात केली. मी मात्र चालकाजवळच्या आसनावर प्रग्रा सावरून बसून होतो...डोळ्यात काय आणि किती साठवू? प्रग्रात नेमकं काय कैद करू अशा द्विधा मन:स्थितीत सगळा आसमंत न्याहाळत होतो...अशा परिस्थितीत मला तरी झोप येत नाही बुवा...आपण अशी दृश्य रोज कुठे पाहात असतो?मग ही संधी सोडली तर आपणच आपल्यासारखे...कपाळकरंटे...

रस्ता अगदी साफ होता,वाटेत कुठेही विरुद्ध दिशेने येणारं वाहन दिसत नव्हतं. आमचा गाडीचालक अतिशय कुशलतेने गाडी चालवत होता...अधूनमधून भेटणार्‍या,आमच्याच सारखे रोहतांगच्या दिशेने जाणार्‍या बर्‍याच वाहनांच्या पुढे तो गाडी काढत होता.रस्ता असा नागमोडी होता की कधी नदी डाव्या हाताला तर कधी ती उजव्या हाताला...असे सारखे चित्र बदलत होते...मध्येच कधी छोटेखानी धबधबे दिसत होते आणि....आणि...अचानक समोरच्या बाजूला काहीतरी चमकायला लागलं...काय बरं होतं ते...अरेच्चा,ही तर हिमशिखरं दिसायला लागली होती...सूर्याची कोवळी किरणं त्यावर पडून ती हिमशिखरं जणू सुवर्णशिखरं भासत होती....मी लगेच प्रग्रा सावरला...काही छायाचित्रं घेतलीही...पण गाडी इतक्या वेगात पळत होती आणि रस्ता इतक्यावेळा वळत होता की ती हिमशिखरंही मध्येच गायब व्हायची....तशी ती अजून खूप दूर होती...आम्हाला तिथेच जायचं होतं...आणि त्यांनी आपली झलक दाखवून आमची उत्सुकता अजून वाढवून ठेवली होती.

चालकाने गाडी मध्येच एका गावात एका दुकानाजवळ थांबवली. इथून आम्हाला बर्फात खेळण्यासाठीचा सगळा जामानिमा घ्यायचा होता असं कळलं. पटापट सगळे खाली उतरून दुकानात गेलो. तिथे एक प्रसन्नवदना तरूण स्त्री उभी होती. तिच्याशी आमच्यातल्या महिलामंडळाने बातचीत करून आम्हा सहाजणांसाठी जामानिम्याची व्यवस्था केली..प्रत्येकी २०० रूपये असे त्याचे भाडेही ठरले. मग त्या स्त्रीने प्रत्येकाच्या उंचीचा,देहयष्टीचा अंदाज घेत एकेक पोशाख निवडून काढला,त्या त्या व्यक्तीला चढवला...अगदी आई लहान मुलाला आंगडं,टोपरं घालते त्याच मायेने ती माऊली आम्हाला सजवत होती. अंगात घालायच्या पोशाखात सगळ्यात आधी खुर्चीवर बसून पाय घालायचे, मग उभं राहून दोन्ही बाजूला हात पसरून लांब बाह्यात हात घालायचे आणि मग कमरेपासून वर गळ्यापर्यंत चेन खेचून अगदी गळाबंद व्हायचे. त्याच पोशाखाला जोडलेली टोपी असते...ती डोक्यावरून घ्यायची,तिचे बंद आवळून गळ्याशी बांधायचे....मग हातात घालायला हातमोजे आणि पायात घालायला गमबूट मिळाले....आयुष्यात पहिल्यांदाच हे सगळं आम्ही करत होतो...त्यामुळे एकमेकांच्या दिसणार्‍या ध्यानाकडे,अवताराकडे पाहून मस्तपैकी हसत होतो..एकमेकांची खेचत होतो...त्या माऊलीलाही आमची ही खेळीमेळी पाहून हसू फुटत होते. :)

चला,एकदाचे तयार तर झालो,म्हटलं आता सगळ्यांचं छायाचित्र काढूया.
नको,आत्ता नको,बर्फात गेल्यावर काढणारच आहोत ना,मग आता इथे वेळ नको घालवूया....असा एकूण विचार प्रकट झाल्यामुळे तसेच गाडीत बसलो आणि पुन्हा सुरु झाला प्रवास...रोहतांगच्या दिशेने.

मनाली ते रोहतांग पास हे अंतर तसं पाहायला गेलं तर फक्त ५१ किलोमीटरचं आहे असं नकाशा सांगतो....त्यामुळे ६०-७०च्या वेगाने गाडी हाणली तर ती तासाभरात पोहोचायला हवी असा सरळ साधा हिशोब आहे...पण तसं अजिबात झालं नाही...एक तर वळणावळणांचा आणि चढा रस्ता,त्यातच आता रहदारी कमालीची वाढलेली...सगळी रोहतांगच्या दिशेने जाणारी वाहनं एकामागोमाग एक अशी अक्षरश: रांगेत[रांगत म्हणलंत तरी चालेल.;)] चाललेली होती. अशी झुम्मड उडाल्यामुळे चांगले अडीच-तीन तास तरी लागले असावेत.(इथे घड्याळाकडे कुणाचं लक्ष होतं म्हणा?) तसेही शेवटचे काही किलोमीटर रस्ता बर्फाच्छादित असल्यामुळे प्रवाशांसाठी बंदच ठेवलेला होता...त्यामुळे आम्हाला जिथपर्यंत जायला परवानगी मिळाली तिथपर्यंत आम्ही पोचलो.वातावरणातला गारठा चांगलाच जाणवत होता...बर्फात खेळण्य़ासाठीचा सगळा जामानिमा घालून तयार होतो...तरीसुद्धा!
पांढर्‍या शुभ्र बर्फाच्या पार्श्वभुमीवर जिथे पाहावे तिथे पांढर्‍या गाड्याच गाड्या आणि प्रवाशांची वर्दळ दिसत होती. काही क्षुधाशांति गृह देखील तिथे असल्याचं लक्षात आलं....मग काय आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तिथे मोर्चा वळवला. सकाळपासून पोटात चहा-कॉफीसुद्धा गेलेली नव्हती...मग गरमागरम पराठे आणि चहा-कॉफी अशी न्याहरी केली. न्याहरी करतांनाही मी अक्षरश: थरथरत होतो...आयुष्यात इतका गारठा पहिल्यांदाच अनुभवत होतो...तेही अंगावर इतके सगळे कपडे असतांना...

पोट भरलं तसा जीवात जीव आला.तिथून बाहेर पडलो...आजूबाजूला हिंडत-फिरत निघालो.बर्फाळ शिखरांची छायाचित्र घेण्याचा सपाटा लावला.सकाळचे साडेनऊ वाजले असावेत.आता सूर्य बराच प्रखर भासू लागला होता...बर्फाच्छादित शिखरांवरून येणारे त्याचे प्रकाशकिरण डोळ्यांना जाचक वाटू लागले आणि त्याच वेळी जाणवलं की अंगातली थंडी आता कुठल्या कुठे दूर पळालेय...मग काय मी तो खास अंगावर चढवलेला जामानिमा काढून टाकला...त्याच्याबरोबरच अंगातला स्वेटरही काढून टाकला...आता अंगावर एक पॅंट आणि टी-शर्ट..नाही म्हणायला पायतले गमबूट फक्त ठेवले होते. बाकी अगदी मुंबईत राहतो तशा पोशाखात मी तयार झालो होतो...हुश्श! आता कसं अगदी मोकळं मोकळं वाटायला लागलं....इतका वेळ माझ्यातला गुदमरलेला मी, पुन्हा एकदा अंगात संचारलो.

आजूबाजूला आमच्यासारख्याच उत्साही प्रवाशांनी आणि त्यांच्या गाड्यांनी रस्ते फुलले होते. खरं सांगायचं तर बर्फ फारसा नव्हता पण जो काही आजूबाजूला पसरला होता त्यात लोकांचे खेळणे-घसरणे सुरुच होते. आम्हीही मग त्यांच्यात सामील व्हायचं ठरवलं आणि म्हणून, चालकाला गाडी एका बाजूला घ्यायला सांगितली जिथे लांबवर बर्‍यापैकी बर्फ दिसत होता. त्याने गाडी पुन्हा उतारावर घेतली आणि पार्किंग शोधत शोधत हळूहळू आम्ही पुढे निघालो....पण मुद्दाम पार्किंगला अशी जागा कुठेच सापडेना...असली नसलेली जागा आधीच आलेल्या गाड्यांनी काबीज केली होती...मग आम्ही मध्येच उतरलो आणि चालकाला पुढे जिथे जागा मिळेल तिथे गाडी लावण्यास सांगून लांबवर दिसणार्‍या बर्फात खेळायला निघालो.
इतक्या लांब, चढ-उतार करून जाण्याची तयारी नसल्यामुळे आमच्यापैकी एक बाईमाणूस गाडीतच बसून राहिली...गाडी जिथे पार्क होईल तिथेच थोडे-फार बर्फात खेळून घेण्याच्या इच्छेने...आम्ही सगळे त्या बर्फमय वातावरणामुळे भारलेलो होतो...त्यामुळे पुढचा-मागचा विचार न करताच निघालो...बर्फाळ प्रदेशाकडे.