माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

४ ऑगस्ट, २०१२

पूर्वसूचना?

मंडळी गेले कैक महिने अधूनमधून मला कोरड्या खोकल्याने सतावलंय हे आपल्याला माहीत आहेच...मध्यंतरी जवळपास सलग तीन महिने माझी बोलतीही बंद होती....बरेच लोक खूशही होते त्यामुळे.  ;)
कारण,कानांना त्रास नव्हता ना?  :)

त्यावेळी बर्‍याच तपासण्या आणि दीर्घकालीन औषधोपचारांनंतर मी बरा झालो..आणि तुमच्या कानांचा त्रासही सुरु झाला होता....हेही तुम्हाला माहीत आहेच. पण आता तोच खोकला पुन: सुरु झालाय....पुन्हा एकदा डॉक्टरांची पायरी चढलोय...आता ह्यावेळी जरा वेगळ्या पद्धतीने तपासण्या सुरु आहेत....छाती तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे काही रक्ततपासण्या आणि त्यानंतर सीटी स्कॅन(कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी) करून घेतलंय....रक्ताच्या चाचण्यात काहीच दोष आढळलेला नाहीये....पण सीटी स्कॅनमध्ये श्वसनमार्गात एक गाठ असल्याचं आढळलंय....आता ती गाठ कसली आहे हे शोधण्यासाठी पुन्हा सीटी स्कॅनच्या जोडीने बायोप्सी करून घेण्याचा सल्ला मिळालाय...त्यानंतर मग प्रयोगशाळेत त्या काढलेल्या मांस/पाणी(जे असेल ते) वगैरेची तपासणी  होईल.
आता ही गाठ साधीच असू शकेल, कदाचित क्षय किंवा अस्थमाबद्दलची असू शकेल किंवा अगदी कर्करोगाचीही असू शकेल...त्यामुळे ती कसली आहे हे तपासणी अंतीच कळणार आहे.....

आजपर्यंत...अगदी ह्या क्षणापर्यंत मला एक कोरडा खोकला सोडला तर श्वसनाचा तसा कोणताच त्रास जाणवत नाहीये...त्यामुळे मला स्वत:ला काही फार गंभीर बाब असेल असं वाटत नाहीये...तरीही नेमकं काय आहे ते तपासणी नंतर कळेलच...तोवर वाट पाहूया....पण तसंच काही गंभीर असलं तरी काही हरकत नाही.....जे असेल ते सहजपणाने स्वीकारणं इतकंच मला माहीत आहे.

पुढचा आठवडा थोडा फार धावपळीचा जाणार आहेच ...कारण ह्या तपासण्या करण्यासाठी मला घरापासून बरंच दूर...मुंबईतच जावं लागणार आहे.... असो....माझ्या समस्त हितचिंतकांना माहीती असावी म्हणूनच हे सगळं लिहून ठेवतोय....उगाच अचानक ’धक्का’ नको!  ;)

वैधानिक इशारा: हे सर्व वाचून लगेच ...शुभेच्छा वगैरे देऊ नका....त्या देण्याआधी जरा पक्का विचार करा...कारण तुमच्या शुभेच्छा माझ्या उपयोगी पडल्या तर त्यात तुमचंच नुकसान आहे.  :)))
कसं? अहो, मी ह्यातून व्यवस्थित पार पडलो की लगेच माझं गाणं सुरु होणार आणि मग तुमचे कान आणि माझं गाणं ह्यांची गाठ(माझ्या श्वासमार्गातली नव्हे हो!) आहे हे लक्षात ठेवा......तेव्हा कोणती गाठ हवी त्याचा विचार करूनच सदिच्छांवर शिक्का मारा/मारू नका.  :पी

कुणीसं म्हटलंय तेच म्हणतो.....

काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ!   :)))))))))))

२ टिप्पण्या:

ऊर्जस्वल म्हणाले...

मूकं करोति वाचालं पंगूं लंघयते गिरीं
यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम्‌

त्या माधवालाच मी साकडे घालत असल्याने, कठीण परिस्थितीतूनही नक्कीच मार्ग मिळेल!

मिळो!! हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

GinkGoBlogs म्हणाले...

आपला ब्लॉग GinkgoBlogs वर जोडण्यात आलेला आहे. तुम्ही या http://www.ginkgoblogs.com/FAQs.aspx#registration पत्त्यावर जाऊन आपला ब्लॉग claim कसा करायचा ते पाहू शकता. जर आपल्याला हा ब्लॉग GinkgoBlogs वरून काडून टाकायचा असेल तर आम्हाला पुढील पत्यावर ईमेल करू शकता GinkGoTeam@ginkgoblogs.com