माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१९ जानेवारी, २००९

मुंबई मॅरेथॉन-२००९


मी आणि माझी मुलगी कुमारी मधुरा.

मंडळी मुंबई मॅरेथॉनबद्दल गेली कैक वर्ष ऐकतोय,वाचतोय,पाहतोय;पण कधी त्या वाटेला जायचा योग नव्हता आला. ह्या वर्षी तो योग अचानकपणे आला. त्याचं काय झालं की माझ्या मुलीने तिच्या कार्यालयातर्फे 'उम्मीद' ह्या स्वयंसेवी संघटनेसाठी ६ किमीच्या ड्रीमरन मध्ये भाग घेतला आणि शनिवारी घरी आली तीच एक गोणपाटाची थैली घेऊन(मराठीत हिला सॅक म्हणतात). त्यात सगळ्या दुनियेचा माल भरलेला होता. एक टी शर्ट,स्पर्धेत भाग घेतल्याबद्दलचा स्पर्धक क्रमांक, बरीचशी स्त्रियांची सौंदर्यप्रसाधने(ह्यात शांपू,साबण,कसली कसली क्रीमं वगैरे) तसेच पुरुषांसाठी दाढीचा साबण. गोरे दिसण्यासाठीचे क्रीम, अंगाचा वास येऊ नये म्हणून सुगंधी द्रव्याचा फवारा(मराठीत डिओडोरंट की कायसेसे म्हणतात),टोमॅटो सुपची पिशवी,च्यवनप्राश,कॉफी वगैरेच्या पुरचुंड्या,फेविकॉल,चिकटपट्ट्या,दु:खदबाव मलम अशी एक-ना-अनेक वस्तु भरलेल्या होत्या. हे सगळे तिला ३००रुपये स्पर्धेसाठी भरले होते त्याच्या बदल्यात मिळालेले होते. दुसर्‍या दिवशी रविवारी आझाद मैदानात जमायचे होते. खरे तर मला मनापासून वाटत होते की माझी मुलगी दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी उठून धावायला नक्कीच जाणार नाही;पण समजा जाणारच असेल तर आपणही तिच्या बरोबर जावे असे मनातल्या मनात ठरवले आणि झोपी गेलो. मी नुकताच गंभीर आजारातून ऊठलेलो असल्यामुळे मी देखिल सकाळी ऊठेन तेव्हा माझ्यात तेवढी शक्ती आणि उत्साह असेलच ह्याची माझी मलाच खात्री नव्हती.

रविवारी पहाटे पाचला गजर होताच मुलगी ऊठली. पाच-दहा मिनिटे मी अंदाज घेतला आणि मीही ऊठलो.तिच्या बरोबरीने तयारी केली आणि तिच्या बरोबर घराच्या बाहेर पडलो. हवा फारशी थंड नव्हती पण रात्रभर मला झोप नसूनही कुठेही थकल्यासारखे वाटत नव्हते. मालाडहून चर्चगेटला पोचलो तेव्हा सकाळचे साडेसात वाजलेले होते. तिथून साधारणपणे २०मिनिटात आझाद मैदानच्या दरवाजा क्रमांक ३ मधून आत मध्ये प्रवेश केला. आत रंगीबेरंगी कपड्यातले आबालवृद्ध स्त्री-पुरुष
घोळक्या घोळक्याने उभे होते. निळे,पिवळे,लाल,हिरवे,भगवे,पांढरे आणि असे कैक रंगाचे कपडे परिधान केलेले उत्साही लोक तिथे उपस्थित होते. छातीवर,पोटावर आपले स्पर्धक क्रमांक लावून अगदी जय्यत तयारीत होते. आपापल्या गटाची छायाचित्र काढून घेत होते.काही लोकांनी भारताचा तिरंगी ध्वज आणलेला होता तर कुणी स्वयंसेवी संस्थेसाठी धावायला आलेले होते, त्यांच्या हातात त्या संस्थेचे फलक होते. एकूण वातावरण अतिशय उत्साहवर्धक होते. ह्या वातावरणाचा परिणाम म्हणून मी माझा आजार केव्हाच विसरून गेलो होतो. त्या मैदानात मी माझ्या मुलीबरोबर आणि तिच्या मित्रमंडळींबरोबर जवळ जवळ दीड-तास उभा होतो पण मला कुठे थकल्यासारखे वाटले नाही. ९ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष ड्रीमरन सुरु होणार होती म्हणून मग मी त्या सगळ्यांचा निरोप घेऊन चर्चगेटला माझ्या पूर्वीच्या कार्यालयात जाऊन बसलो. अधून मधून मुलगी भ्रमणध्वनीवरून माझी चौकशी करत होती. त्यातून ती सद्या कुठे आहे तेही कळत होते. शेवटी ६ किमी चे अंतर पार करून पुन्हा शिवाजी टर्मिनसला पोहोचल्याचे तिने मला कळवले आणि माझे मलाच कृतकत्य वाटले. माझीच जिद्द माझ्या मुलीत उतरलेली पाहीली आणि त्याच जिद्दीने तिने शर्यत पूर्ण केली हे ऐकून तिचा अभिमानही वाटला. शर्यत संपल्यावर मित्र-मंडळींबरोबर खान-पान करून ती साधारणपणे साडे-बाराच्या सुमारास पुन्हा चर्चगेटला आली आणि आम्ही दोघे तिथून परतीच्या प्रवासाला लागलो.

बर्‍याच वर्षांनी मी कार्यालयात गेलो होतो त्यामुळे काही जुने सहकारी भेटले त्यांच्याशी मनसोक्त गप्पा झाल्या,खान-पान झाले आणि माझाही दिवस सार्थकी लागला.योग असेल तर पुढच्या वर्षी मी सक्रिय सहभाग घेईन म्हणतो.






मुलीच्या कार्यालयातले तिचे सहकारी

इतर क्षणचित्रे












१४ जानेवारी, २००९

२००८-एक आजारी वर्ष!

शीर्षक वाचून चक्रावलात ना? पण हे शीर्षक मी जाणीवपूर्वक दिलंय.कसं ते सांगतो.
एकूणच २००८ हे वर्ष जागतिक आर्थिक मंदी,मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि इतर तत्सम वाईट बातम्यांनी भरलेलं होतं. जागतिक आर्थिक मंदीचे चटके आता आपल्यापर्यंत पोहोचले आहेत.वर्षाच्या सुरुवातीला जो शेयरबाजार तेजीत होता तो बघता बघता पार धुळीला मिळाला.आत्तापर्यंत गुंतवणूकदारांचे (त्यात मीही आलो) जवळजवळ ६०-७०% नुकसान झालेले आहे.सत्यम्‌ चा घोटाळा उघडकीस आला आणि थोडाफार सावरणारा बाजार पुन्हा ढेपाळला. अजून किती वाईट बातम्या येणार आहेत कुणास ठाऊक.आजची परिस्थिती पाहता २००९ चे अर्धे वर्षही असेच मंदीच्या विळख्यात राहणार असे वाटतंय. अर्थात हे सांगायला फारशी विद्वत्ता असण्याची जरूर नाहीये. असो.
आर्थिक स्तरावर ह्या घडामोडी होत असतानाच माझ्या वैयक्तिक बाबतीतही हे वर्ष मला अनंत अडचणीचे गेले. सद्या झोपेचे पार खोबरे झालंय त्यामुळे सकाळी लवकर उठवत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे व्यायाम बंद झाला. त्यामुळे तब्येतीच्या बारीक सारीक तक्रारी सुरु झाल्या. त्यातच फेब्रुवारीत पाय मुरगळण्याचे निमित्त झाले आणि गेले वर्षभर अधून मधून तो पाय त्रास देतोच आहे. साधे डॉक्टर झाले.त्यानंतर दोन अस्थि-तज्ञ झाले पण तेव्हढ्यापुरते बरे वाटते आणि मग एखादे दिवशी अचानक दुखणे सुरु होते. सुदैवाने सद्या त्रास नाहीये त्यामुळे सुटकेचा श्वास टाकतोय.

पित्ताचा त्रास मला नेहमीच होत असतो पण लंघन करणे आणि भरपूर पाणी पिणे ह्या उपायांनी मी त्यावर मात करत असतो. पण हा विकार दोनतीन महिन्यातून एकदा तरी डोके वर काढत असतो.डिसेंबर २००८ मध्येही असेच पित्त खवळले. माझ्या नेहमीच्या उपायांनी त्यावर मात केली पण पुन्हा तीनचार दिवसांनी तसाच त्रास जाणवायला लागला. ह्यावेळी अंगातून एक शिरशिरी उठण्याचा एक वेगळाच अनुभव यायला लागला आणि अंगही थोडे तापल्यासारखे जाणवले. दोन दिवस माझे उपचार करूनही काही उपाय होईना तेव्हा मग मी डॉक्टरी सल्ला घ्यायचे ठरवले. आमच्या इमारतीतच राहणार्‍या डॉक्टरांना पाचारण केले. त्यानी तपासून मलेरियाचे निदान केले आणि फटाफट कमरेवर एक इंजेक्शन दिले. काही गोळ्याही दिल्या. तीन दिवसांचे औषध देऊन , काही जास्त त्रास वाटल्यास कळवा असे सांगून डॉक्टर गेले.
औषधांनी ताप उतरला पण त्या गोळ्यांनी माझ्या अंगातली शक्ती पार घालवून टाकली. मला सदैव गुंगी यायला लागली. जवळ जवळ चोवीस तास मी आडवा झालो होतो.नैसर्गिक विधींसाठी मोठ्या मुश्किलीने मुलीच्या आधाराने उठत होतो.
दोन दिवस ताप येत जात होता आणि शक्ती पार निघून गेलेली. अशा अवस्थेत मी निर्णय घेतला आणि आमच्या नेहमीच्या(फॅमिली) डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांनी मला त्वरीत त्यांच्या इस्पितळात दाखल व्हायला सांगितले. मग काय मोठ्या मुश्किलीने मी माझ्या मुलीच्या आधाराने त्यांच्या इस्पितळात संध्याकाळ्च्या सुमारास दाखल झालो.तारीख होती ३ जानेवारी २००९. लगेच सलायन लावले गेले.दुसर्‍या दिवशी सकाळी रक्त तपासणी केली त्यात टायफॉईड(विषमज्वर) चे निदान झाले आणि मग त्यावर उपचार सुरु झाले.पहिले दोन दिवस मी अत्यंत गंभीर परिस्थितीत होतो. ताप डोक्यात गेलेला आणि मग सुरु झाले चित्र-विचित्र भास-आभास.
एकूण चार दिवस मी इस्पितळात होतो. ह्या चार दिवसात उन-पावसाचा खेळ सुरु होता. कधी माझी अवस्था चिंताजनक होत होती तर कधी मी एकदम ठणठणीत झालोय असे वाटायचे.
पहिल्या दोन दिवसात तापाचा चढ-उतार सुरुच होता. शिरेतून इंजेक्शनचा मारा होत होता.त्याच बरोबर दोन्ही कमरेवर इंजेक्शनं दिली जात होती.डोक्यावर बर्फाच्या पाण्याची पट्टी असे उपचार सुरु होते. अंग सगळे आखडलेले.एक हात सलायनमुळे अडकलेला त्यामुळे मी पार वैतागलेलो होतो. त्यातच झोप पार उडालेली. डोळे टक्क उघडे. अजिबात मिटायला तयार नव्हते. एकदोनदा डोळे जबरदस्तीने मिटायचा प्रयत्न केला तर काय? डोळ्यासमोर भयंकर आणि चित्र-विचित्र आकृत्या दिसायला लागल्या. एखाद्या भयपटात दिसतात तसेच आकारहीन भयानक चेहरे माझ्याकडे रोखून पाहत होते. एरवी आपण घाबरून डोळे मिटतो पण इथे मी घाबरून डोळे उघडायचो.अधून मधून डोळे मिटण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते भयानक चेहरे चक्क माझ्या डोळ्यात डोळे घालून मला जणू सांगत होते की तुझी जागा आता इथे आहे. तू काही क्षणांचा सोबती आहेस. तुला इथे यावेच लागेल. घाबरून मी पुन्हा डोळे उघडायचो. पण विचारांची साखळी सुरुच होती. माझ्या मनात आले की ही बहुदा आपली शेवटची रात्र असणार. ही सगळी भूतं मला घाबरवूनच मारणार.उद्या आंतरजालावर बातमी झळकणार.... प्रमोदकाकांचे शोचनीय निधन! त्यानंतर काही प्रातिनिधिक श्रद्धांजली. १) तसा माणूस वाईट नव्हता पण कधी कधी काड्या सारायचा. कुणालाही कानपिचक्या द्यायला मागेपुढे बघत नसे.त्यांचे बाळबोध लिहीणे आवडायचे. २) जल्ला प्रमोदकाका, त्यांच्या बालपणातच गेले(बालपणीच्या आठवणी). अजून त्यांचे तरूणपण, म्हातारपण आम्हाला माहीत करून घ्यायचे होते.
३) रोज सकाळी आमच्या गप्पा व्हायच्या...आता आम्ही कुणाशी बोलायचं?
वगैरे वगैरे!
पहिली रात्र मी असेच घाबरलेल्या मन:स्थितीत घालवली. मनात विचार येत होते,मरायचे तर आहेच पण असे घाबरून मरणे आपल्याला शोभत नाही. मग काय करायचे? थेट हल्ला करायचा.पण कसा? तेही आपोआप सुचले. पहाटे पहाटे तर मला आता उघड्या डोळ्यांसमोर चित्र-विचित्र आकार दिसायला लागले.माझ्यासमोर एक चित्रफीतच उलगडायला लागली. कधी घाबरवणारे डोळे,वेडेवाकडे चेहरे,तर कधी चक्क नाचणार्‍या स्त्रिया. पुढे पुढे तर त्यात आपोआप बदल होऊन एक पुरूष एक स्त्री अशी जोडी नाचताना दिसायला लागली. मग नाचता नाचता त्यांचे हळूहळू अनंगरंगाचे खेळ सुरु झाले. हे सगळे बघता बघता मी आता खरंच वेडा होणार असे वाटायला लागले.

सकाळी मी लघवीसाठी उठलो तर मला चक्कर आली. थोडा वेळ बाजूच्या पलंगावर बसून राहिलो. तोवर माझ्या पलंगावरची चादर बदलण्यात आली.कसाबसा लघवी करून येऊन पुन्हा आपल्या जागेवर झोपलो.माझ्या अंगातली ताकत एकाएकी कुठे गेली काहीच कळेना. आता जवळ १२तास सलाईन लावून झालेले तरी अंगात अजिबात शक्ती नाही म्हणजे कमालच म्हणायची.
सकाळी डॉक्टर आले तेव्हा मी त्यांना रात्री झालेले भास-आभास सांगितले. ते फक्त हसले आणि म्हणाले, "तुम्ही अजिबात विचार करू नका. स्वस्थ पडून राहा. आपोआप झोप येईल आणि असले भासही होणार नाहीत."

मनात तर विचार येतच असतात. चांगलेही आणि वाईटही. पण ते रोखायचे कसे? विचारांतून विचार उलगडत जातात आणि मी त्यातच गुंतून पडतो आणि माझ्या झोपेचे खोबरे होते हा नेहमीचाच अनुभव आहे. पण सद्या होणारे हे भास-आभास म्हणजे काही तरी वेगळेच प्रकरण होते.मग आता काय करायचे. थोडा वेळ भटक्यावर गाणी ऐकू या म्हणून त्यात साठवलेली गाणी लावली. माझे आवडते गायक गजलनवाज भीमराव पांचाळे गात होते....घर वाळूचे बांधायाचे,स्वप्न नव्हे हे दिवाण्याचे.
एका मागून एकेक गजल उलगडत जात होत्या. त्यात काही शेर हे मरणाला उद्देशून होते........ये मरणा,ये रे ये मरणा,तुज वाचून मज वाटे जगण्याचे हे भय.... तर दुसरा होता...मृत्यु जामीन होऊनी यावा,जीवनाचा तुरुंगवास नको.
हे शेर माझे खास आवडते आहेत. मरणाला आवतण देणारे,त्याला आपले मित्र मानणारे. मला मरणाचे भय कधीच नाही वाटत. हं, पण मरणाने देखिल माझ्या पाठीवर वार करू नये. एखाद्या मित्रासारखे त्याने यावे आणि त्याच्या बोटाला धरून मी त्याच्याबरोबर हसत हसत जावे. पण अजून वेळ आहे. काही कर्तव्ये पूर्ण करायची बाकी आहेत.ती झाली की मी केव्हाही तयार आहे.

दिवसभर ह्याचाच विचार करत होतो की ह्या समस्येला कसे सामोरे जावे. संध्याकाळी माझ्या उजव्या हाताच्या शिरेत खुपसलेल्या इंजेक्शनच्या साधनातून इंजेक्शन देताना खूप वेदना होत होत्या. १०एमएल चे इंजेक्शन देता देता माझी शिरच फुस्स झाली. मग ते साधन बाद ठरून माझ्या उजव्या हाताला नवे साधन लावले गेले.पण ह्यामुळे माझ्या झोपण्याची दिशा बदलली. आधी उत्तरेकडे डोके आणि दक्षिणेकडे पाय होते ते नेमके उलट झाले आणि जवळ जवळ चोवीस तास माझ्या मेंदूत त्या खोलीची रचना जी पक्की बसली होती ती एकाएकी बदलली आणि मला गरगरल्यासारखे वाटू लागले. बाजूलाच अजून एक पलंग होता...पूर्व-पश्चिम असा...त्यावर मी झोपू का असे परिचारिकेला विचारले,तर ती हो म्हणाली. त्या पलंगावर जाण्यासाठी मी उठून बसायचा प्रयत्न केला तर एक सणसणीत चक्कर आली आणि मी पुन्हा आडवा झालो. थोडा वेळ तसाच झोपून राहिलो आणि मग पुन्हा एकदा उठण्याचा प्रयत्न केला तरी तेच....पुन्हा एक जबरदस्त चक्कर आली. डोळ्यासमोर अंधेरी आली. माझी परिस्थिती पाहून परिचारिकेने मला तसेच पडून राहायला सांगितले. लगेच रक्तदाब तपासला. तो बराच वाढला असावा म्हणून एक गोळी फोडून त्यातले द्रव्य माझ्या जीभेखाली सोडण्यात आले. त्यानंतर त्या परिचारिकेने दुसरीच्या मदतीने फटाफट माझा पलंग फिरवून माझी स्थिती पून्हा पूर्वपदावर म्हणजे उत्तरेला डोके आणि दक्षिणेला पाय अशी केली आणि मला काही कळायच्या आत भराभर हॅंडल फिरवून मला झोपत्याचा बसता केला. हे असे का केले म्हणून विचारले तर, "काका तुम्हाला एक गोळी घ्यायचेय ना! बसल्याशिवाय गोळी कशी घेणार?" असे म्हणाली. मी म्हटले,"अग मी गोळी पाण्याशिवाय आणि झोपल्या झोपल्या देखिल गिळू शकतो."
मग गोळी घेतली. मला त्यांनी पूर्ववत झोपवले आणि मी आणि त्या परिचारिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.इथल्या सगळ्या परिचारिका १८-२४ ह्या वयोगटातल्या आहेत.म्हणजे माझ्या मुलीसारख्याच. त्यामुळे त्या मला अधून मधून दटावत असत. "काका,लवकर बरं व्हायचंय ना? मग नीट जेवत जा.खाल्ल्याशिवाय ताकत कशी येणार?"
मी आपला हो ला हो करत होतो. कारण जेवलो की परसाकडे जावे लागणार आणि मग त्यातच माझी कमावलेली शक्ती फुकट जाणार हे माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाने मी शिकलेलो होतो.म्हणून मी फक्त रसपान करत होतो.त्या रात्री माझी तब्येत थोडी जास्तच गंभीर होती म्हणून मुलीने तिथेच थांबायचा निर्णय घेतला. अनायासे दुसरा पलंग रिकामाच होता त्यामुळे तिचीही झोपण्याची सोय होणार होती.

माझा ताप उतरत-चढत होता. इंजेक्शन्सचा मारा होतच होता. डोक्यावर थंड पाण्याची पट्टी होतीच. पण आता अजून एक उपाय योजायचे ठरवून माझ्या शर्टाची बटणे सोडवून मला पार उघडा केले आणि माझ्या छाती आणि पोटावर एक गार पाण्यात भिजवलेले फडके पसरण्यात आले. त्यावर बर्फाचे तुकडे टाकून तो सतत ओला ठेवला जात होता.दोन-तीन तासांच्या अव्याहत परिश्रमाला रात्री २ वाजता फळ आले. माझा ताप कह्यात आला. ह्याच वेळी मला अशी जाणीव झाली की माझे आत्तापर्यंत आक्रसलेले आणि कडक झालेले सगळे स्नायु,सांधे अगदी मस्तपैकी शिथिल झालेले होते. मला खूपच उत्साह वाटायला लागला. माझा श्वासोच्छ्वासही दीर्घ होऊ लागला. एरवी दोन-तीन सेकंद श्वास घेतल्यावर लागणारा दम बंद होऊन मी चांगला पाच-सहा सेकंद श्वास घेऊ लागलो. माझे सगळे शरीर अगदी नवीन झाल्यासारखे भासू लागले.

त्यानंतर मी माझ्या मुलीला आणि त्या परिचारिकांना सांगितले की आता तुम्ही थोडा वेळ झोपा. मला खूप बरे वाटतेय. पुन्हा एकदा माझा ताप आणि रक्तदाब मोजून त्यांनी खात्री केली. दोन्ही आटोक्यात आले होते. त्यानंतर त्या झोपायला निघून गेल्या. मी एका नव्या उत्साहाने झोपेची आराधना करायला लागलो. डोळे मिटले की पुन्हा तेच भितीदायक चेहरे दिसायला लागले. पण आता मी ठरवले होते की ह्यावर मात करायची. मी संथपणे श्वासोच्छ्वास करायला सुरुवात केली. त्यातच प्राणायामही करू लागलो आणि मला एक मार्ग सापडला. मी जेव्हा श्वास रोखून धरत असे तेव्हा त्या भयानक प्रतिमा जागच्या जागी स्थिर होत. मी श्वास सोडला की त्या माझ्यापासून दूर जात. श्वास घेतला की माझ्या अगदी जवळ येत. हा सगळा खेळ सुरु असताना मला आपोआप एक गोष्ट सुचली आणि ते भायनक चेहरे माझ्या जवळ यायला लागले की मी त्यांच्याकडे पाहून स्मित करायचो ,की त्यांचे स्वरूप बदलायचे. ते थोडेसे सुसह्य व्हायचे. मग मी त्यांच्यावर उच्छ्वास सोडायचो की ते हिरवे व्हायचे...म्हणजे ते माणसाळायचे. पण त्यातल्या काही जणांचा रंग निळा होत असे म्हणजे ते अजूनही मला विरोध करत असायचे. अशा लोकांवर मी कधी दीर्घ उच्छ्वास सोडून तर कधी थांबत थांबत उच्छ्वास सोडून त्यांना पार भस्म करू लागलो. आता ह्या खेळात मला खूप मजा यायला लागली. मी अतिशय वेगात श्वासोच्छ्वास करत होतो आणि त्या माझ्या वेगाने मी कितीतरी भयानक चेहरे भस्म करत सुटलो. पुढे पुढे तर मला अख्खी गावेच्या गावे अशा सुतकी आणि भयानक चेहर्‍याने भरलेल्या माणसांची दिसत होती. पण आता मला कुणाचीच भिती वाटत नव्हती. माझ्या श्वासावर माझे नियंत्रण आलेले होते आणि त्या जोरावर मी कधी त्या सगळ्या गावाला पूर्णपणे भस्मसात करून पुन्हा तिथे नवजीवन फुलवत होतो. तर कधी नुसत्या उच्छ्वासानेच त्यांचा कायापालट करत होतो. ह्या सगळ्यात माझी झोप कधीच हरवली होती आणि बघता बघता मी तो भयानक प्रदेश ओलांडून एका निसर्गरम्य स्थळी पोचलो होतो. इथून मग मागे परतणे झालेच नाही. आजवर डिस्कव्हरी आणि नॅशनल जिओग्राफिकवर पाहिलेले निरनिराळे निसर्गरम्य प्रदेश,नद्या,डोंगर,दर्‍या,चित्र-विचित्र प्राणी मी माझ्या नजरेने प्रत्यक्ष अनुभवले. इथे मी कोणत्या पक्षीरुपाने उडत होतो की विमानातून उडत होतो ते मला कधी कळले नाही. पण जगातला सगळा निसर्ग,सगळी हिरवळ मी अतिशय मजेत पाहत होतो. जिथे वैराण वाळवंट दिसायचे तिथे माझ्या उच्छ्वासाने हरित-क्रांती करत करत माझा स्वैर संचार सुरु होता.

ही सर्व हिरवाई पाहून माझी खात्री झाली की मी आता संकटमुक्त झालोय. तेवढ्यात मला एक छानशी डुलकी देखिल लागली.

समाप्त!
डोक्यात ताप चढला की काय काय पाहायला मिळते त्याची ही एक झलक. आता हे सर्व भास-आभास संपलेत. हुश्श!
राम गणेश गडकर्‍यांनी असं काहीसं म्हटलंय..की दोन पैशाची भांग खाल्ली की हव्या तितक्या कल्पना सुचतात.