माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३१ ऑक्टोबर, २०११

फक्त केला आराम!

जगाच्या पाठीवर ह्या सिनेमातलं  सुधीर फडके आणि आशा भोसले ह्यांनी गायलेलं आणि अतिशय गाजलेलं असं गाणं....बाई मी विकत घेतला शाम...अतिशय अवीट गोडीचं असं हे गाणं कुणा रसिकाला आवडलं नसेल असे होऊच शकत नाही...अहो पण नुसतंच गाणं नाही आवडत लोकांना...त्यातले शब्दही आवडतात आणि कधी कधी त्याचे विडंबन करावे असेही वाटू लागते....माझ्या लहानपणी ह्या गाण्याचे विडंबन मी त्यावेळचे सुप्रसिद्ध नकलाकार श्री. वि.र.गोडे ह्यांच्या तोंडून ऐकले होते....त्यातले धृवपदच आता मला आठवतंय....

नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम
फुकट घेतला बाम, बाई मी फुकट घेतला बाम
...

हे इतकंच मला आठवतंय...पण जेव्हा जेव्हा मूळ  गाणं लागतं तेव्हा मला हे विडंबनही आठवतं....आज अचानक माझ्या डोक्यातही एक सणकी आली आणि मी ह्याच गाण्याच्या धृवपदाचे माझ्या पद्धतीने विडंबन केले...गेले बरेच दिवस काही ना काही शारिरीक दुखापतींमुळे  माझा व्यायाम जवळपास बंद आहे..तेव्हा साहजिकच त्याचे प्रतिबिंब त्यात उमटले........
नाही खर्चली चरबी बिरबी
नाही गाळिला घाम
फक्त केला आराम
अहो मी फक्त केला आराम....
हे इतकं करून मी ते थोपुवर..म्हणजे फेसबुकवर  टाकलं आणि विडंबन आवडलं म्हणून सांगणार्‍या एकामागून एक प्रतिक्रिया यायला लागल्या...त्यात क्रांतिने, "काका,पूर्ण करा हे विडंबन!" अशी विनंती केली.
मग काय आधी मूळ गीत शोधून काढलं आणि वाचलं तेव्हा लक्षात आलं की हे काही आपले काम नाही...तरीही उगाच एक चाळा म्हणून रला  ट ,टला फ असे जोडून मोडतोड सुरु केली...आणि हा हा म्हणता बर्‍यापैकी जमलं की हो...मग जरा त्याच्यावर संस्कार करण्यासाठी खुद्द क्रांतिकडेच ते गीत पाठवलं...तिने अगदी सहजपणाने तीन-चार बदल सुचवले आणि खरोखरच एक विडंबन तयार झालं.
गीताचं विडंबन करायचं असे जरी ठरवले होते तरी मला असं वाटतंय की हे मूळ गीताचे विडंबन म्हणण्याऐवजी त्याच चालीत गाता येईल असे, पण एक गमतीशीर असे स्वतंत्र गीतच तयार झालंय असे नक्की म्हणता येईल...तरीही मूळ प्रेरणा ज्या गीतापासून सुचली त्यातल्या भावाशी प्रतारणा करणारे हे गीत असल्यामुळे ह्याला आपण विडंबनच म्हणूया!
आता पाहूया पूर्ण गीत.....
नाही खर्चली चरबी बिरबी
नाही गाळिला घाम
फक्त केला आराम
अहो मी फक्त केला आराम

कुणी म्हणे मी वेडा झालो, कुणा वाटले उगा बरळलो
जन्मभरी त्या गादीवरती लोळायाचे काम

काल झोपलो आजच उठलो, कुशी बदलूनी पुन्हा झोपलो
एवढाच हो माझ्यासाठी रोज असे व्यायाम

जितुके खाणे तितुके बसणे, बसूनी दमणे आणि झोपणे
कुणी न म्हणती तरीही माझ्या आरामास हराम


हे विडंबन पूर्ण करून थोपुवर टाकलं आणि मग काहीजणांनी मागणी केली की काका आता हे त्याच पद्धतीने गाऊन सादर करा...मग काय महाजालावर शोधला त्याचा ट्रॅक...प्रभाकर जोग ह्यांचे गाणारे वायोलिन मदतीला आलं...त्यालाच ट्रॅक समजून त्याच्याच साथीने माझ्या खडबडीत आवाजात गायलं...आता ऐकून सांगा कसं वाटतंय ते...एकदोन ठिकाणी किंचित घाई झालेय..पण तरीही माझ्या कुवतीच्या मानाने मी बर्‍यापैकी न्याय दिलाय असं म्हणायला हरकत नाही...बाकी काय ते तुम्हीच ठरवा.  

१० टिप्पण्या:

शांतीसुधा म्हणाले...

हे मस्तच झालंय आणि तुम्ही गायलंयही छान!!

मुग्धा पानवलकर म्हणाले...

एकदम मस्त............All The Best!

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद अपर्णा आणि मुग्धा!

आशिष निंबाळकर म्हणाले...

मस्तच काका, कोण म्हणतं तुमचा आवाज ओबडधोबड आहे ?????

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद आशिष!
अरे बारीकसारीक जागा येत नाहीत गळ्यातून म्हणून मला तसं वाटतं.

विशाल म्हणाले...

भन्नाटच झालाय काकानु ! उगाच नाही तुमचं आडनाव देव ! ;)

मी अत्त्यानंद म्हणाले...

:) धन्यवाद विशाल!
संगीतातले 'महा’देव यशवंत देवांची गादी कुणी तरी चालवायला हवी ना! ;)

जयश्री म्हणाले...

अहा.......क्या बात है देवकाका :)

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद जयश्री!

सुदीप मिर्ज़ा म्हणाले...

zakkas!