माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ जुलै, २०१३

'मोद’गाणीच्या दीडशतकाच्या निमित्ताने...

मंडळी, ’मोद’गाणी ह्या माझ्या जालनिशीवरील दीडशे गाणी पूर्ण झाली त्या निमित्ताने काही सांगावंसं वाटतंय...
सर्वप्रथम, मी इतकी विविध प्रकारची गाणी गाऊ शकेन असं मलाही वाटलं नव्हतं... त्याचे कारण मला ती गाणी आवडत नव्हती किंवा गाता येणार नाहीत असे नसून त्या सगळ्या गाण्यांसाठी त्यांचे रूळ (ट्रॅक्स) कसे आणि कुठून मिळतील हेच माहीत नव्हतं...पण काही जालमित्र अशा वेळी मदतीला धावून आले...(छट्ट...अजिबात नावं सांगणार नाहीये मी त्यांची...नाहीतर माझ्यावरचा राग त्यांच्यावर काढाल.)
त्यांनी काही रूळ पाठवले आणि मला जालावर शोध घ्यायला प्रवृत्त केलं..आणि पुढे....जाऊ दे...पुढे काय घडलं ते तुम्ही पाहताच आहात. 

दुसरी गोष्ट अशी होती/आहे की माझ्या गाण्यांना श्रोता आणि प्रतिक्रिया..दोन्हींचाही अभाव...अर्थात ह्यात फारसं वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही हे मी माझ्या मनाला बजावलं आहे...कारण, ही गाणी गाण्यात मला खूप आनंद मिळतोय  आणि त्याच बरोबर माझा वेळही मजेत जातोय... हेच माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे.

आता इतकी विविध गाणी गायल्यानंतर...अर्थातच त्या त्या गाण्यांचा अभ्यास केल्यानंतर माझी स्वत:ची अशी काही विशिष्ट मतं बनली आहेत जी मी ह्यापुढे आपल्यासमोर व्यक्त करणार आहे....ह्यातली बरीचशी मतं आपल्याला धक्कादायक आणि विक्षिप्तही वाटू शकतील...पण त्याला इलाज नाही...

नामवंत गीतकार-संगीतकार आणि गायक-गायिका ह्यांनी आपापल्या कलागुणांनी सजवलेली ही गीतं गातांना माझ्या आनंदाची पुनरावृत्ती होत होती...आजवर ही गाणी मी मला जमतील तशी...चुकीची शब्दरचना, चुकीच्या चाली, चालींची सरमिसळ वगैरे पद्धतीने गातच असायचो...पण आता नेमके शब्द कळून आल्यावर, त्या शब्दांमागची भावना समजून आल्यावर जी काही गंमत वाटली ती शब्दातीत आहे...चालींमधलं वैविध्य अनुभवतांना विशिष्ट संगीतकारांची काही वैशिष्ठ्यही लक्षात आली.

मराठी आणि हिंदी अश्या दोन्ही भाषांतली गीत मी इथे गायलेत....त्यामुळे त्यातला प्रामुख्याने जाणवलेला फरक मला इथे दाखवावासा वाटतोय....मराठी संगीतकारातील नामवंत अशा सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, हृदयनाथ मंगेशकर आणि इतरही...अशा ज्या संगीतकारांच्या रचना मी गायल्या त्यात ठळकपणे हे आढळले की कोणत्याही एका गीताची चाल..अथपासून इतिपर्यंत एकच नाहीये...गाण्यातल्या दोन-तीन कडव्यांतील किमान एका कडव्याला वेगळी चाल, वेगळे वळण दिलेले आपल्याला प्रकर्षाने आढळून येईल...मराठी संगीतकारांचे हे  वेगळे वैशिष्ठ्य ठळकपणाने डोळ्यात भरतंय...त्याचं कारण बहुसंख्य नामवंत हिंदी संगीतकारांच्या चालीतला साचेबद्धपणा...अर्थात काही अपवाद आहेतही...नाही असं नाही...पण मदन मोहन, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन, शंकर जयकिशन, ओ.पी नय्यर, कल्याणजी आनंदजी इत्यादि नामवंताच्या  चालीत आपल्याला हा साचेबद्धपणा दिसून येतो...गाण्यातली कडवी दोन असोत/तीन असोत..सगळी कडवी एकाच चालीत....शंकर जयकिशन किंवा बर्मन पिता-पुत्र ह्यांची एखाद दुसरी चाल वेगळेपणा दाखवणारी आहेही...पण ते अपवाद म्हणूनच समजावे.
नौशाद ,रवि  ह्यांच्या ज्या काही चाली मी गायल्या आहेत त्यात मात्र मराठी संगीतकारांसारखं वैषिष्ठ्य जाणवतं...रवि ह्यांची...चलो एक बार फिर से...ही चाल तर ह्याचं उत्तम उदाहरण आहे...तीनही कडव्यांच्या चाली वेगवेगळ्या आहेत...अशी गाणी गातांना गायकाची नक्कीच कसोटी लागते आणि महेंद्र कपूर ह्यांनीही ते गाणे खूप छान गायलंय.

लता, आशा ह्या गायिका हिंदी-मराठी अशा दोन्हीतही अग्रस्थानी आहेत...दोन्ही ठिकाणची त्यांची गाणी (इथे मी गायलेली) ही गाजलेलीच गाणी आहेत..तरीही मला असं वाटतं की मराठी संगीतकारांनी त्यांच्याकडून जे गाऊन घेतलंय त्या तुलनेत हिंदीतली त्यांची गाणी गायला खूपच सोपी आहेत...माझं हे विधान तुम्हाला खूप धार्ष्ट्याचे किंवा कदाचित वेडगळपणाचेही वाटेल...पण मी हे विधान गंभीरपणाने करतोय.

लताबाईंनी गायलेली...रागदारीवर आधारित गाणीही त्यांच्यासारख्या महान गायिकेला  गायला अगदीच सामान्य वाटली असतील ह्याची मला खात्री आहे...कारण त्यात गायिकेचा कस बघावा असं काही आहे असं मला स्वत:ला प्रामाणिकपणे  वाटत नाही...ती गाणी इतर कुणाही त्याकाळच्या गायिकांकडून गाऊन घेता आली असती...मात्र लताबाईंच्या (त्यावेळच्या) अलौकिक  आवाजाचा केलेला वापर हा त्या संगीतकारासाठी आणि पर्यायाने गाणी जास्त लोकप्रिय व्हावीत ह्या दृष्टीने केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठी आणि हिंदीतल्या माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लोकप्रिय अशा गायक-गायिकांनी गायिलेली ही गाणी गातांना मला जो आनंद मिळालाय तो वर्णनातीत आहे...ह्यातली कैक गाणी ही माझ्या जन्माआधीच जन्माला आलेली आहेत...कैक गाण्यांवर माझं बालपण आणि तरूणपण पोसलं गेलंय...
हिंदीत तलत, रफी, मन्ना डे, मुकेश, हेमंत कुमार, किशोर कुमार, महेंद्र कपूर अशा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ठ्यपूर्ण पुरुष गायकांची गाणी ऐकतांना आणि ती स्वत: गातांना एक वेगळाच आनंद मिळतो...अर्थात इथली गाणी ही उर्दू-हिंदी भाषेत असल्यामुळे नेमक्या उच्चारांची कसोटी पाहणारी असते...ते तसे नाही झाले तर ताल-लय बिघडण्याची आणि वेळप्रसंगी अर्थही बदलण्याची भिती असते...ह्याबाबतीत मी अजूनही शिकतोय..माझे जाणकार मित्र मला वेळोवेळी त्याबद्दल मार्गदर्शन करत असतातच...म्हणूनच आत्तापर्यंत हे साहस मी करू धजलोय
लता, आशा, सुमन अशा गायिकांची  एकापेक्षा एक सरस मराठी-हिंदी गाणी ऐकतांना मन प्रसन्न होत असतं आणि ती गातांना मात्र आपल्याला स्त्रीच्या आवाजात गाता येत नाही ह्याची खंत वाटते..तरीही ती गाणी गायला नक्कीच आवडतात...मग भले ती तेवढी प्रभावी होतही नसतील.

मराठी ही तर माझी मातृभाषा...त्यामुळे मराठीत गायला जास्त सहज वाटत असेल असे म्हणणंही धार्ष्ट्याचे होईल...कारण गाण्यात शब्दांचा उच्चार नेमका नाही झाला तर ताल-लय बिघडते हे गणित इथेही लागू आहेच...कैक वेळेला आपल्या तोंडात बसलेले उच्चार आणि गाण्यातले उच्चार वेगळे असतात...इथे र्‍हस्व-दीर्घ देखिल नीट उच्चारला नाही गेला तरी तालात-लयीत मार खावा लागतो....त्यामुळे इथेही गाणं वाटतं तेवढं सोपं नाही...पण आपल्या मातृभाषेत गाण्याचा आनंद मात्र काही औरच आहे.
मराठीतले आघाडीचे गायक-गायिका सुधीर फडके, अरूण दाते, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी, हृदयनाथ मंगेशकर, लता, आशा, सुमन  वगैरेंच्या  आवाजातले आणि गाण्यातले वैषिष्ठ्य आणि वैविध्य इतके आहे की त्यांची गाणी गातांना त्यांच्या शैलीची कळत-नकळत नक्कल करण्याचा मोह होतो..अर्थात मोह झाला तरी तसे जमणे ही गोष्ट मात्र माझ्यासारख्यासाठी किमान ह्या जन्मी तरी अशक्य आहे...ह्याचेही भान आहे बरं का!

तर मंडळी इतके दिवस सहन केलंत..पुढेही सहन करा...करू नका...तुमची इच्छा! 
धन्यवाद