माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
मद्रास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मद्रास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३ फेब्रुवारी, २००७

मुक्काम पोस्ट मद्रास! अंतिम भाग

सुटीच्या दिवशी मद्रास फिरणे चालू होते. अख्खा 'माउंट रोड' पायी फिरून पालथा घातला. तसेच 'मरीना बीच','अड्यार बीच' सारखे अजस्र आणि छोटेखानी बीचेस(चौपाट्या) बघून झाले. झालंच तर 'स्नेक पार्क(सर्पोद्यान)' पाहिले. एक माउंट रोड सोडला तर बाकी मद्रास हे मागासलेले वाटले. माउंट रोड हे समस्त मद्रासी लोकांचे अभिमानाचे ठिकाण होते. कुणीही मद्रासी भेटला आणि त्याला तुम्ही जर विचारले की मद्रास मध्ये प्रेक्षणीय काय आहे तर सर्वप्रथम माउंट रोड हेच उत्तर येईल. इतका त्यांना त्याचा अभिमान आहे. ह्या रस्त्यावर भरपूर चित्रपटगृहे,मोठमोठी दुकाने, खाजगी कंपन्यांच्या मुख्य शाखा आणि खानपान गृहे असे सगळे चंगळवादी वातावरण आहे.

मद्रास शहराची उपनगरे आहेत त्यांची काही नावे मला अजून आठवतात. इथे जी उपनगरी रेल्वे चालते त्यावरील ही स्थानके आहेत.'गिंडी'(इथे आमचे वास्तव्य होते), 'मीनम्बाकम'( छोटेखानी विमानतळ आहे,तांबरम(हे उपनगरी रेल्वेवरचे एक टोक) आणि 'पार्क स्ट्रीट'(हे दुसरे टोक). हे पार्क स्ट्रीट म्हणजे आपल्या चर्चगेटचा जुळा भाऊ. मोठमोठ्या ब्रिटिशकालीन इमारती,सरकारी कचेर्‍या ह्यांनी हा भाग दिवसा गजबजलेला असतो.'मांबलम'(आपल्या दादर सारखे मध्यवर्ती ठिकाण-सर्व घाऊक खरेदी-विक्री इथे होते). 'सैदापेट्टी', 'एग्मोर'(हे एक जंक्शन होते मीटर गेज रेल्वेचे... इथून बाहेर गावच्या ... विशेषत: अंतर्गत तमिळनाडू,केरळ वगैरेसाठी)गाड्या सुटतात.

मध्यंतरी आम्ही चिंटू साठी 'वेलंकणी'ला जाऊन आलो. वांद्र्याच्या मतमाऊली सारखे हिचे प्रस्थ आहे. सर्व धर्मीय भाविक इथे जाऊन नवस बोलतात. माझा एकूणच देवा-धर्मावर विश्वास नव्हता पण चिंटूच्या बरोबर गेलो(गाड्या बरोबर नळ्याला यात्रा). प्रशिक्षण संपायच्या सुमारास आम्हाला तीन दिवसांची सुट्टी मिळणार होती(हे आम्हाला खूप अगोदरच सांगितले होते) म्हणून आम्ही थोडे आजूबाजूला फिरून येण्याचे नक्की केले आणि एक महिना आधी रेल्वेचे आरक्षण केले. जाण्याचा दिवस उजाडला. आमची तयारी झाली आणि आम्ही गिंडीहून एग्मोरला जायला निघालो. आमची गाडी एग्मोरहून रात्री ८वाजता सुटणार होती म्हणून आम्ही साधारण ७ वाजता गिंडीहून निघालो ते साडेसातच्या सुमारास एग्मोरला पोहोचलो. एग्मोरच्या उपनगरी स्थानकातून आम्ही एग्मोरच्याच बाहेरगावी जाणार्‍या स्थानकात पोहोचलो तेंव्हा दर्शकावर(इंडिकेटर) आमची गाडी लावलेली दिसली. आम्ही त्याप्रमाणे तिथे गेलो तेंव्हा नुकतीच एक गाडी स्थानकातून बाहेर पडताना दिसली. त्याच फलाटावर आमची गाडी येणार म्हणून आम्ही तिथे उभे राहिलो. थोड्या वेळातच तिथे एक गाडी आली. खात्री करून घेण्यासाठी आम्ही तिथल्या तिकिट मास्तरला विचारले तेंव्हा तो जे बोलला ते ऐकून आम्ही दोघे चक्रावूनच गेलो. आमच्या नजरेसमोर जी गाडी स्थानकातून बाहेर पडली होती तिच आमची गाडी होती. पण हे कसे शक्य आहे? अजून जेमतेम पावणेआठ तर वाजत होते आणि तिकिटावर ८ची वेळ छापलेली दिसत होती. तारीखही आजचीच होती. मग घोळ झाला कुठे?

आम्हाला तिकिट आरक्षित करून एक महिना होऊन गेला होता. मध्यंतरीच्या काळात गाड्यांच्या वेळापत्रकात काही बदल केले होते आणि नेमकी आमच्या गाडीची वेळ अर्धा तास आधीची ठेवण्यात आली होती. आम्हाला ह्या गोष्टीचा पत्ताच नव्हता. आता पुढे काय? गुपचुप तिकिट रद्द केले(३०% पैसे कापले) आणि रखडत रखडत खोलीवर आलो. सगळ्या उत्साहावर पाणी पडले होते. आम्हाला परत आलेले बघून सर्व मित्रमंडळी जमली. आमचे पडलेले चेहरे बघून त्यांना काहीच कळेना आणि काही सांगण्याचा उत्साह आमच्यात नव्हताच. उद्या सकाळी सांगतो असे म्हणून आम्ही आमची सुटका करून घेतली आणि सरळ जाऊन अंथरुणावर अंग टाकले. दुसर्‍या दिवशी जेव्हा आमची फजिती त्यांना सांगितली तेंव्हा सगळे जोरजोरात हसायला लागले. आमच्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे आम्ही देखिल त्यांच्या हसण्यात सामील झालो. ते दोनतीन दिवस आमचे अत्यंत कंटाळवाणे गेले. प्रशिक्षण संपले होते आणि हि तीन दिवसांची सुट्टी संपल्यावर आम्हाला उपचार म्हणून एक दिवस हजेरी लावायची होती आणि मुंबईला परतायचे होते.

शेवटी तो मुंबईला जाण्याचा दिवस उजाडला. आज कोणतीच घाई नव्हती. आमची मुंबईची गाडी रात्रीची होती. ह्या वेळेला वेळापत्रक नीट पुन्हा एकदा बघून घेतले होते. स्वयंपाकाचे सर्व सामानसुमान रामालिंगमला देऊन टाकले. त्याने प्रत्येक वेळी आम्हाला अतिशय मोलाची मदत केली होती त्यामुळे ते सर्व सामान त्याला देताना आम्हा दोघांचे पूर्णपणे एकमत झाले. त्यादिवशी सकाळी आम्ही बाहेरच जेवलो आणि सोबत रामालिंगम आणि परसरामलाही आग्रहाने घेऊन गेलो. संध्याकाळ झाली. सामान तर आम्ही केंव्हाच बांधले होते आणि निघण्याची तयारी (मनाची तर केंव्हाच झाली होती) सुरू होती.

इतक्यात वसतिगृहाच्या तळमजल्यावर काही तरी रडारड ऐकू आली. आम्ही तिथे जाऊन बघितले तर एक तरुण मुलगी रडत रडत काही तरी बोलत होती. ती तमिळमध्ये बोलत होती म्हणून आम्हाला काहीच बोध होत नव्हता. मी रामालिंगमला विचारले तेंव्हा तो म्हणाला की तिला मुंबईला जायचंय आणि कोणी तरी मुंबैवाला तिला बरोबर नेणार आहे म्हणून ती इथे आली पण ते लोक तिला इथे दिसत नाहीत. इतका वेळ ती मद्रास सेंट्रल स्टेशनवर त्यांची वाट बघत उभी होती पण ते अजून का आले नाहीत म्हणून ती त्यांना बघायला इथे आलेली आहे. चिंटू ने रामालिंगममार्फत तिला विचारल्यावर जे कळले त्यावरून बोध झाला की हे सगळे त्या विदेश संचार निगमच्या दोघांपैकी कुणाचे तरी कृत्य असावे. पण हेही कळले की ते दोघे दुपारीच इथून पसार झालेत म्हणून. आता काय करायचे? ती मुलगी हटून बसली होती. तिला मुंबईला जाऊन फिल्म्स्टार बनायचे होते आणि तो जो कोणी होता तो तिला ह्याकामी मदत करणार होता. गेले महिनाभर ती त्याच्या बरोबर फिरत होती वगैरे अजून काही धक्कादायक गोष्टी आम्हाला रामलिंगममार्फत कळत होत्या. तिला जेव्हा रामालिंगमकडून कळले की आम्ही दोघे पण मुंबईला जाणार आहेत तेंव्हा ती आमची विनवणी करायला लागली. . हे प्रकरण मला झेपणारे नव्हते. मुलींपासून चार पावले दूर राहणेच बरे म्हणून मी लगेच मागे हटलो(शांतं पापम्. चिंटू ह्या बाबतीत हुशार होता म्हणून पुढे होऊन त्याने रामालिंगममार्फत तिला सांगितले की आम्ही मुंबईला पोचलो की प्रोड्युसरशी बोलून नक्की करू आणि मग तुला बोलावून घेऊ. तरी ती हटून बसली आमच्या बरोबर येण्यासाठी.

आता पुन्हा प्रश्न उभा राहिला पुढे करायचे काय? एव्हढ्यात एक वयस्कर माणूस गर्दीतून वाट काढत पुढे आला आणि त्या मुलीला फरफटत घेऊन गेला. त्याच्या तोंडाचा पट्टा अखंड चालला होता आणि मध्ये मध्ये तिला फटकेही मारत होता. रामालिंगमने सांगितल्यानुसार तो तिचा बाप होता आणि पोरगी सकाळपासून बेपत्ता होती म्हणून घाबरला होता. आता तिला बघून त्याचा संताप अनावर झाला होता म्हणून तिला शिव्याशाप देत मारत तिला घेऊन गेला. हुश्श्य!!! सुटलो बुवा ह्या धर्मसंकटातून! अशा अर्थाचा सुस्कारा आम्ही तिघांनी एकाच वेळी टाकला. आता आणखी काही नाटक व्हायच्या आत इथून निघालेले बरे म्हणून भराभर सामान घेतले आणि खोलीला बाहेरुन कडी घातली आणि आम्ही सुटलो तडक गिंडी स्थानकाच्या दिशेने. रामालिंगमही आमच्या बरोबर होता. गिंडीला उपनगरी गाडीत सामान टाकले आणि रामालिंगमचा निरोप घेतला. तिथून मद्रास सेंट्रलला आलो,गाडीत सामान चढवले. गाडी सुरू झाली आणि आम्ही काळोखातच मागे जाणार्‍या त्या मद्रासला टाटा केले.

आम्ही जेव्हा दादरला गाडीतून उतरलो तेव्हा आमचे स्वागत करायला चिंटूची म्हातारी(बायको) आणि आमचा ऑफिसातला मित्र दादा पाटील असे दोघेजण हजर होते. चिंटूला बघताच म्हातारी घळघळा रडायलाच लागली. त्याच्या गळ्यात पडून तिने मोकळेपणी रडून घेतले आणि मग त्याला उद्देशून म्हणाली, व्हॉट हॅपंड टू यू माय लव्ह? यू हॅव रिड्युस्ड अ लॉट! आणि पुन्हा गंगा- यमुना वाहायला लागल्या.
लगेच चिंटूने तिच्याकडे माझी खोटी खोटी तक्रार केली. धिस बगऽ कनव्हऽटेड मी टू टोटली व्हेज यू नो! अँड अल्सो टॉट मी योगा! आय हॅव रेड्युस्ड १०केजी यू नो!
झालं! पुन्हा गंगा यमुना! ह्या बायकाना रडण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही काय(मनातल्या मनात)?
मी चिंटूला म्हणालो, चल,आता मी निघतो. तू खुशाल ह्या तुझ्या म्हातारीबरोबर 'तुझ्या गळा माझ्या गळा करत बस!’

मग मी त्या प्रेमळ दांपत्याचा निरोप घेऊन पाटील बरोबर उपनगरी रेल्वेकडे निघालो. पाटीलने मला विचारले, तुला एक विचारू का?
मी हो म्हणताच तो म्हणाला, तीन महिने ह्या माणसाबरोबर तू कसे काढलेस ह्याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. मला तर वाटले होते की बहुतेक तू मुंबईला परत येशील तेंव्हा तुझे हातपाय प्लॅस्टरमध्ये असतील म्हणून मी तुला न्यायला आलो होतो. पण तू तर एकदम व्यवस्थित दिसतोयस आणि उलट तोच सुकलाय. नक्की मामला काय आहे?
पाटील हा माझा जिवाभावाचा मित्र म्हणून त्याला मी थोडक्यात सगळे सांगितले आणि त्याचे शंकानिरसन केले. त्याच्या डोळ्यात कौतुक साठून राहिलेले मला दिसले. त्याने मला घट्ट मिठी मारली आणि माझी पाठ थोपटली. मग आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि घराकडे प्रस्थान ठेवले.
इति अलम्!

समाप्त!

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ९

आमचे दिवस मजेत चालले होते. भर उन्हाळ्यात मद्रासमध्ये आणि मजेत हे जरा विचित्र वाटते ना? पण दिवसभर आम्ही कामात गढून गेल्यामुळे आम्हाला बाहेरच्या वातावरणाची विशेष फिकीर वाटली नाही. आणि प्रकें चा तो पट्टा सोडला तर मद्रासमध्ये ठिकठिकाणी फळांचे ताजे रस मिळत असत. १ रुपयात पूर्ण ग्लास(विश्वास बसत नाही ना?). त्यामुळे आम्ही, एक सकाळ सोडली तर एरवी जेव्हा इच्छा होईल तेव्हा फळांचा रसच पीत असू. ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे चिंटूचे वजन जवळजवळ ७ किलोने कमी झाले . योगासने,शाकाहार आणि रसप्राशन अशा त्रिसूत्रीमुळे तो जरा बारीक(तुलनात्मक) दिसायला लागला. त्याचा फायदा त्याला योगासनं करण्यात व्हायला लागला आणि त्याची त्यातील रुची वाढली.

अगोदर सांगितल्या प्रमाणे ह्या प्रकें मध्ये भारतातील निरनिराळ्या भागातून आणि निरनिराळ्या सरकारी खात्यातून(राज्य सरकार आणि केंद्र सरकार) प्रशिक्षणार्थी आले होते. एकमेकांची हळूहळू ओळख व्हायला लागली. मग कोण कुठले वगैरे चौकश्या झाल्या. आमच्या सारखेच मुंबईहून दोन जण विदेश संचार निगम मधून आले होते आणि ते दोघे चक्क मराठी होते. पण त्यांनी आमच्यात खास रस दाखवला नाही. नंतर त्याचे कारण कळले. मुंबई आणि मुंबईतील एकूणच सर्व गोष्टी म्हणजे सिनेमा जगत आणि त्यासंबंधीच्या दंतकथा, मुंबईतील मोकळे वातावरण(स्त्री-पुरुष संबंध)वगैरे गोष्टींचे मुंबईबाहेरील लोकांना जबरदस्त आकर्षण होते. अनायासे मुंबईची माणसे भेटली तेव्हा त्यांच्याकडून आपले कुतूहल शमवून घेण्यासाठी ह्या दोघांच्या भोवती नेहमीच इतरांचा गराडा पडलेला असे. त्यातून ते दोघे अगदी नीटनेटके राहत आणि शक्य तो इंग्लिशच बोलत. आम्ही सुध्दा त्यांना त्यांच्या ह्या गराड्यातून बाहेर काढायचा कधी प्रयत्न केला नाही.

आम्ही देखिल त्यांच्यासारखे मुंबईकर आहोत हे कळल्यामुळे काही जण आमच्या भोवती जमत. चित्रपटातील नटनट्यांबद्दल त्यांना प्रचंड कुतूहल होते. रामालिंगम आणि मंडळींचे प्रकरण अगोदर सांगितले आहेच. त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे ह्या सर्वांचे प्रश्न होते आणि उत्तरं द्यायला चिंटूसारखा फेकसम्राट असल्यानंतर तर काय मैफल रंगली नाही असे होणे शक्यच नव्हते. त्या लोकांचे ते भाबडे प्रश्न ऐकून मी एकदा बोललो सुध्दा की तुम्हाला जसे वाटते तसे काही नसते. पण माझ्याकडे साफ दुर्लक्ष करून ते चिंटूचे रसभरित प्रवचन मोठ्या भक्तिभावाने ऐकत. हळूहळू तो त्या सर्व लोकांच्यात लोकप्रिय झाला. आमचे ते दुसरे दोन मुंबईकर बघता बघता एकटे पडले. कारण त्यांच्या भोवतीची गर्दी आता चिंटूभोवती एकवटली. हे कमी म्हणून की काय आम्हाला शिकविणारे प्रशिक्षक, ते देखील त्याच्या भजनी लागले. चिंटूचा अगदी 'चिंटू महाराज' होऊन गेला.

हे सगळे बघून मी देखील ठरवले की आता आपला प्रामाणिकपणा बस्स झाला, म्हणून मी चिंटूची री ओढायला सुरुवात केली. मधून जरा उगीचच, अरे चिंटू ती धर्मेंद्रची फजिती सांग ना! अशी फर्माइश पण करत असे.
तुम्हाला सांगतो अहो मी आपलं काय तरी बोलायचं म्हणून बोलत असे पण चिंटू अजिबात बिचकत नसे. लगेच तो आजपर्यंत खाजगी असलेली (कधीही न घडलेली) गोष्ट, आपण (त्या सर्वांना कुठे बोलायचे नाही असे बजावून ) केवळ त्यांनाच सांगत आहोत असा आव आणून बिनधास्तपणे कुठेही न अडखळता सांगत असे. त्यामुळे लोकं एकदम खूश होत आणि मला पण जरा भाव देत(अगदीच काही गया गुजरा नाही, ह्यालाही बरीच माहिती दिसतेय,ह्या अर्थाने). खोलीवर आल्यावर चिंटू मला म्हणत असे, आयला,तू पण काय कमी नाहीस. एकदम गुगलीच टाकलास? खरे तर काय बोलावे मलाही माहीत नव्हते पण फेकत सुटलो. पण ,मला एक कळत नाही, हे लोक एव्हढे भोळे कसे? की आपली फिरकी घेताहेत स्वत:चा टाईमपास करण्यासाठी?
मी म्हटले, नाही. मला तरी तसे वाटत नाही. तुझे बोलणे ते एकाग्र चित्त करून ऐकत असतात. त्यांचे डोळे सांगतात की तू जे जे बोलतो आहेस ते त्यांच्यासाठी अद्भुत आहे!

ह्या सर्व लोकांच्या कुतूहलाचा अजून एक विषय म्हणजे मुंबईतील स्त्री-पुरुष संबंधातील मोकळेपण. मला काही जणांनी विचारले, तुला किती गर्लफ्रेंड्स आहेत ?
मी खरे खरे उत्तर दिले. मला एक पण गर्लफ्रेंड नाही आणि मी मुलींशी बोलत नाही आणि त्यांच्याकडे बघायची सुध्दा माझी हिंमत नाही!
त्यांना हे उत्तर खोटे वाटले. त्यांच्या मते मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला एक तरी गर्लफ्रेंड असतेच आणि हे सगळे लोक(स्त्री-पुरुष) नेहमी समुद्रकिनारी उघडपणे प्रेम करत बसतात. आणि हे सगळे म्हणे त्यांना त्यांच्या गाववाल्यांनी सांगितलंय जे कधीकाळी मुंबईला जाऊन आले होते. ह्यावर मी काय बोलणार, कप्पाळ! पण चिंटूने त्यांची निराशा केली नाही. त्याने सांगितले, दिवसातून तो तीन गर्लफ्रेंडना वेगवेगळ्या वेळी फिरायला नेतो. खाण्या-पिण्याचा खर्च त्या मुलीच करतात. तशा त्याच्या बर्‍याच गर्लफ्रेंड्स आहेत पण खास अशा तीनच आहेत आणि त्या फिल्मलाईन मधल्या आहेत वगैरे. ह्या गोष्टीने त्यांचे समाधान तर झालेच पण त्यांच्या लेखी तो आता एकदम सुपरस्टारच बनला आणि मी बीग झिरो.

खर्‍याची दुनिया नाही हेच खरे असे म्हणून(मनातल्या मनात) मी पण त्यांच्या त्या आनंदात सामील झालो.

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ८

संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो. साथीला रामालिंगम आणि परसराम होते. जेवण बनवण्यासाठी लागणारी सगळी सामग्री घेऊन आलो. त्यात डाळ-तांदूळ पासून ते पोळपाट लाटणे,स्टोव्ह, भांडीकुंडी वगैरे सर्व आलं. रॉकेलची व्यवस्था रामालिंगम करणार होता. अशी सर्व खरेदी करून आम्ही खोलीवर आलो. आमच्या पाठोपाठ दहा मिनिटांनी रामालिंगम एक ५लीटर चा कॅन भरून रॉकेल घेऊन आला.

घरी आईने आम्हा सर्व भावंडांना वरण-भात,खिचडी(मुगाच्या डाळीची) वगैरे गोष्टी करायला शिकवल्या होत्या. अधनं-मधनं ते सर्व केलेले देखिल होते. त्यामुळे एकप्रकारचा आत्मविश्वास होता. म्हणून मग मी चिंटूला म्हणालो की मी खिचडी करतो, तर त्याला खिचडी हा काय प्रकार आहे हे सगळे समजावून सांगायला लागले. त्या बिचार्‍या मांसाहारी प्राण्यावर काय हा प्रसंग गुदरला होता! पण कोणतीही खळखळ न करता त्याने संमती दिली आणि ह्यात मी काय करू म्हणून विचारले. मग मी अंदाजाने डाळ-तांदूळ मापून त्याला निवडायला दिले. मग टोमॅटो,कांदा,बटाटा चिरून घेतला. निवडलेले डाळ-तांदूळ धुऊन घेतले‌. तुपाच्या(त्यावेळी डालडा होता)फोडणीत टोमॅटो-कांदा-बटाटा टाकून चांगला परतला आणि मग धुतलेले डाळतांदूळ त्यात घालून सारखे केले. त्यात चवीपुरते तिखट-मीठ आणि थोडा गरम मसाला टाकून वर झाकण ठेवले. मध्ये एकवेळा अजून पाणी घातले आणि मग वीस मिनिटात खिचडी तयार झाली . काय घमघमाट सुटला होता म्हणून सांगू! ह्या खिचडीला मी नाव ठेवले 'शाही खिचडी.'

मग आम्ही दोघांनी खिचडी वाढून घेतली आणि त्यावर पुन्हा डालडा(पर्यायच नव्हता) घालून चिंटूला म्हटले, कर सुरुवात!
चिंटूने पहिलाच घास घेतला आणि म्हणाला, देवा,लेका काय टेस्टी आहे रे! आपण रोज रात्री आता खिचडीच खाणार. सकाळी चपाती-भाजी आणि रात्री तुझ्या हातची शाही खिचडी!
मी म्हणालो, अरे, रोज रोज खिचडी खाऊन कंटाळशील. कधी कधी आमटी-भात बनवूया, तेव्हढाच बदल!
ठीक आहे, तू म्हणशील तसे करू. पण सांगून ठेवतो उद्या सकाळपासून चपात्या बनवायचे काम माझे आणि तू भाजी बनवायची. कबूल? चिंटू उवाच!
मी म्हटले, कबूल!
आमचे हे प्रितीभोजन चालू असताना परसराम डोकावला. मग नको-नको म्हणत असताना त्यालाही थोडी खिचडी खायला लावली. तो तर पागलच झाला. त्याने लगेच माझ्याकडून रीत समजावून घेतली. मी त्याला म्हणालो, तुमको जब खिचडी खानेका मन होता है, हमारे पास आओ और जब हमको पराठा खानेका मन होगा तो हम तुम्हारे पास आयेंगे!(परसराम पराठे काय मस्त बनवायचा! परसरामदा जवाब नही!)
तो लगेच म्हणाला, अबे क्या मस्त आयडिया है! ऐसा करते है, मै इतवार को परांठे बनाउंगा और तुम ये तुम्हारी शाही खिचडी बनाओ. मिलकर खायेंगे‌. साथमे दही और पापड होगा और सलाद भी बनायेंगे!

आम्ही त्याची योजना मान्य केली आणि शाही खिचडीचा चट्टामट्टा केला. जेवण तर झाले. आता भांडी कुणी घासायची(मनातल्या मनात)हा प्रश्न निर्माण झाला. पण काही कळायच्या आत चिंटूने भांडी गोळा केली आणि गेलासुध्दा भांडी घासायला. जन्माचा आळशी म्हणून प्रसिध्द असलेल्या ह्या प्राण्याचे हे वेगळेच रूप मी पाहत होतो. तसे मुंबई सोडल्यापासूनच त्याच्यातला आमूलाग्र बदल मी पाहत आलो होतो. म्हणजे आपल्यात म्हण आहे ना की, 'संगतीला आणि पंगतीला एकत्र राहिल्याशिवाय खरा स्वभाव कळत नाही' अगदी तसेच ह्याच्या बाबतीत झाले होते. पूर्वीचे बरेच गैरसमज आता दूर होत होते आणि त्याचे खरे स्वरूप जे मी आता पाहत होतो ते माझ्यासमोर हळूहळू प्रकट होत होते.

दुसर्‍या दिवसापासून आमचा कार्यक्रम अगदी ठरल्याप्रमाणे सुरू झाला ‌सकाळी ५वाजता उठणे. प्रातर्विधी आटोपून योगासनं करणे,त्यानंतर चहापान, मग दोघांनी मिळून जेवण बनवणे(ह्यातच नास्ता पण होऊन जायचा आणि डबा पण तयार व्हायचा),मग अंघोळी करून,कपडे करून होइस्तोवर पावणे आठ वाजलेले असत. मग जाता जाता मध्येच उपाहारगृहात पुन्हा कॉफी पिऊन प्रकें कडे मार्गस्थ होणे. संध्याकाळी आल्यावर पुन्हा स्नान,कपडे धुणे(माझे बाहेरचे कपडे पण मीच धूत असे;चिंटू लाँड्रीत देत असे) मग जेवण बनवणे,जेवणे आणि गप्पा टप्पा करून झोपणे. अश्या तर्‍हेने दिवस हा हा म्हणता जात होते. प्रशिक्षण पण ऐन भरात आले होते आणि मुख्य म्हणजे आम्हालापण त्याची गोडी लागली होती. रविवारी आम्ही दोघे मद्रासभर भटकत दिवस सत्कारणी लावत असू. त्यादिवशी सर्व खाणे-पिणे बाहेरच असायचे.

अशाच एका रविवारचा प्रसंग आहे हा. आम्ही दोघे एका ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी पदपथावरून खाली उतरलो आणि चार पावलं चाललो नाही तर आमच्या जवळ एक ऑटोरिक्षा, ब्रेकचा कर्कश्श आवाज करत येऊन थांबली. मला धक्का लागता लागता थोडक्यात वाचलो पण त्या अनपेक्षित आवाजाने भांबावून गेलो होतो. त्या रिक्षा चालकाला चिंटूने दोनतीन अर्वाच्य शिव्या दिल्या त्याबरोबर तो रिक्षाच्या बाहेर आला. त्याला बघितल्यावर माझी खात्रीच पटली की आज काय आपली धडगत नाही. अहो साक्षात घटोत्कच आमच्या समोर उभा होता. काळा रप्प, सहा फूट उंच आणि अंगाने चांगलाच आडवा,झुपकेदार मिशा,अशा त्याने चटकन माझा हात धरला आणि तमिळमध्ये काही तरी गुरगुरला. त्याच्या त्या मुसळासारख्या हातात माझा हात म्हणजे एखाद्या भल्या मोठ्या अजगराच्या तोंडात ससा असावा तसे काहीसे दिसत होते. पण त्याक्षणी मी असेल नसेल तेव्हढा जोर काढून त्याच्या हाताला हिसडा दिला आणि माझा हात सोडवून घेऊन तिथून जरा दूर पळालो. तो मोका साधून चिंटूने मुष्टीचे दोनतीन तडाखे त्याला दिले. पण त्या घटोत्कचावर त्याचा विशेष असा परिणाम जाणवला नाही. मात्र मनात कुठे तरी त्याला आश्चर्य वाटले असावे की हे मच्छर माझ्याशी दोन हात करण्याची हिंमत कसे काय करताहेत. दोन पावले पुढे होऊन त्याने चिंटूला पकडण्यासाठी हात पुढे केला.ती संधी साधून चिंटूने त्याच्या नाकावर एक जबरदस्त ठोसा लगावला. ह्यावेळी मात्र घटोत्कच गडबडला, जरा तोल जाऊन पडता पडता बचावला आणि त्वेषाने चिंटूवर त्याने हल्ला केला आणि त्याला आपल्या जबरदस्त मिठीत पकडून दाबू लागला. चिंटू सुटायची धडपड करत होता पण ते त्याच्या शक्तीबाहेरचे काम होते. मी तर केवळ बघ्या होतो. काय करावं,कुणाला मदतीला बोलवावं हा विचार करता करता मला एक युक्ती सुचली. मी त्या घटोत्कचाच्या मागे गेलो आणि त्याच्या कुशीत बोट खुपसले तेंव्हा तो एकदम उसळला. माझा प्रयत्न फळास येतो आहे हे माझ्या लक्षात आले. म्हणून मी एकदम दोन्ही हातांनी त्याच्या कुशीत जोरदारपणे बोटे खुपसली त्यामुळे तो पुन्हा जोरात उसळला आणि त्याची चिंटूवरची पकड ढिली पडली. त्याचा फायदा घेत चिंटू त्याच्या मगरमिठीतून बाहेर पडला आणि त्याने एकामागून एक जबरदस्त ठोसे लगावायला सुरुवात केली. त्याच्या ह्या मार्‍याने नाही म्हटले तरी घटोत्कच थोडा ढिला पडला. त्या दोघांचे ते युध्द बघण्यासाठी बाजूला बरीच गर्दी जमली आणि साहजिकच वाहतूक खोळंबली.

हा काय प्रकार आहे म्हणून बघायला एक वाहतूक पोलीस शिट्टी वाजवत तिथे आला आणि त्या दोघांना दरडावून त्याने बाजूला केले आणि समोरच असलेल्या पोलीस स्टेशनकडे घेऊन निघाला. आमची वरात पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तिथल्या ड्यूटी ऑफिसरच्या हातात आम्हाला सोपवून तो आपले कर्तव्य बजावण्यासाठी निघून गेला. ड्युटी ऑफिसरने प्रथम त्या रिक्षावाल्याचा जबाब घेतला. ते दोघे तमिळ मध्ये बोलत होते म्हणून आम्हाला काहीच कळले नाही. मग त्याने मोर्चा आमच्याकडे वळवला आणि तमिळमध्येच काही तरी बोलला. आम्हाला काहीच अर्थबोध न झाल्यामुळे आमचे चेहरे कोरेच होते. ते बघून जणू त्याचा अपमान झाला असे वाटून त्याने चिंटूची कॉलर पकडली. चिंटूने त्याचा हात झटकला आणि जोरात ओरडला, ऑफिसऽ! बिहेव युवऽसेल्फ! अदऽवाइज यू विल रिग्रेट!
ह्या अनपेक्षित घटनेने ऑफिसर एक पाऊल मागे हटला आणि तो पुढे काही बोलणार तोच चिंटूने आपले ओळखपत्र त्याच्या टेबलावर जोरात आपटले आणि म्हणाला, आय ऍम फ्रॉम ......... डिपाऽट्मेंट! वगैरे वगैरे वगैरे.

तो पोलिस अधिकारी हादरलाच. त्याने आयकार्ड नीट पाहिले आणि लगेच एका हवालदाराला बोलवून त्या घटोत्कचाला त्याच्या हवाली करत काही तरी तावातावाने सूचना केल्या आणि त्यांना तिथून घालवून दिले. मग अतिशय नम्र आवाजात 'सार, सार' करत त्याने आम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागितली आणि कॉफी मागवली. आयकार्डावर ज्या साहेबांची सही होती ते साहेब किती पोचलेले आहेत (म्हणजे हे साहेब किती प्रसिध्द आहेत आणि त्यांचा कसा दरारा आहे)आणि त्यांनी तुमच्या(म्हणजे आमच्या सारखे- दिसायला सामान्य,अव्यवस्थित राहणी असणारे वगैरे )सारखे तरुण कसे भरती केलेत हे ऐकून होतो पण आज प्रत्यक्ष पाहिले तेंव्हा खात्री पटली असे सांगत पुन्हा:पुन्हा आमची माफी मागितली.

बाजूच्या खोलीतून आरडा-ओरड ऐकू येऊ लागली तशी त्याने सांगितले की घटोत्कच शिक्षा भोगतोय आपल्या पापांची. वरती हे पण सांगितलं की चांगली चामडी लोळव असं सांगितलंय त्या हवालदाराला. काही जरूर लागली तर मला फोन करा असे सांगून स्वत:चे नाव,हुद्दा आणि फोन नंबर त्याने दिला आणि जाता एक विनंती केली की हा झालेला प्रसंग कृपा करून साहेबांना सांगू नका म्हणून.
त्या नंतर आम्हाला मोठ्या सन्मानाने त्याने निरोप दिला.

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ७

त्यादिवशी खोलीवर येताना काही इतर प्रशिक्षणार्थींशी ओळख झाली त्यात आमच्या शेजारच्या खोलीत राहणारा पंजाब इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा 'परसराम' हा एक होता. त्याचा खोलीबंधू हा एक हरियाणवी 'प्यारेलाल' होता. हे दोघे मिळून खोलीतच जेवण बनवत असत. परसराम पोळ्या अगदी वर्तुळाकार लाटत असे. ते बघून मला त्याचे खूप कौतुक वाटले. आम्ही दोघांनी मात्र ह्या भानगडीत न पडता बाहेरच जेवणे पसंत केले.

संध्याकाळी रामालिंगमची भेट झाली तेंव्हा आम्ही त्याला त्या सकाळच्या मुलांचे 'मणीएन्ना' प्रकरण सांगितले आणि मला वाटलेला 'भले शाब्बास"असा अर्थ सांगितला. तो हसला आणि त्याने आम्हाला त्याचा अर्थ सांगितला.'मणी' म्हणजे 'वेळ'(वाजले ह्या अर्थाने) आणि 'एन्ना' म्हणजे 'किती’. किती वाजले म्हणजे मणीएन्ना हे समजले पण त्याचे उत्तर कसे द्यायचे? आम्ही साधारण सकाळी ८ च्या सुमारास प्रकें मध्ये जाण्यासाठी निघत असू म्हणून त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही त्यांना 'एट्टमणी' असे उत्तर द्या. ह्यातल्या 'एट्ट'चा अर्थ मी विचारला नाही आणि दुसर्‍या दिवशी गंमत झाली. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसातला आम्ही नास्ता करायला बाहेर पडलो तेंव्हा एका व्यक्तीने ’मणीएन्ना?’ असे विचारल्यावर मी ऐटीत ’एट्टमणी!’ असे उत्तर दिले आणि त्याने विचित्र नजरेने आमच्याकडे पाहिले. मला काही त्याच्या त्या पाहण्याचा अर्थ लागला नाही पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे एका शाळकरी मुलाने विचारले तेंव्हासुद्धा एट्टमणी असे उत्तर दिले. त्याने स्वतःच्या घड्याळात बघितले आणि तो हसत सुटला. (मला अगोदर हे कळत नव्हते की स्वतःच्या हाताला घड्याळ असताना हे लोक आम्हाला वेळ विचारतातच का? बरे विचारतात तर विचारतात आणि वर हसतात. अर्थ काय ह्याचा?) रस्त्यात भेटून वेळ विचारणार्‍या त्या सर्व मुलांना मी ओरडून ओरडून ’एट्टमणी,एट्टमणी!’ असेच सांगत होतो आणि ती मुले फिदीफिदी हसत असत. मी हैराण होतो पण विचारणार कुणाला?
पुढे मला रामालिंगमकडून कारण कळले आणि मी माझ्या मूर्खपणावर मनसोक्त हसलो. त्याने मला मग १ ते १० आकडे शिकवले ते काहीसे असे होते...'ओन्न(१),रंड(२),मूनं(३),नालं(४),अंज्ज(५),आरं(६),येळ्ळं(७),एट्ट(८),ओंपत्त(९), आणि पत्त(१०). मी त्याला तसे म्हणून दाखवले तर स्वारी एकदम खूश!

त्यादिवशी देखिल जेवणाच्या सुट्टीत मी केळीच खाऊन वेळ मारून नेली. केळी जरा जास्तच पिकलेली होती पण दुसरा पर्याय नसल्यामुळे मी ती तशीच खाल्ली आणि कालच्यापेक्षा दोन जास्तच खाल्ली. त्यामुळे पोट व्यवस्थित भरले आणि वर्गात नीट लक्ष लागले. अजून फक्त थिअरीच चालू होती आणि दुसर्‍या दिवसापासून प्रात्यक्षिकं सुरू होणार होती. संध्याकाळी आम्ही तिथून परस्पर बाहेर फिरायला गेलो आणि परतताना एका बर्‍याशा उपाहारगृहात जेवूनच परतलो. थोडावेळ रामालिंगमशी गप्पा झाल्या आणि मग आम्ही झोपायला खोलीत परतलो. रात्री मला अचानक जाग आली तेंव्हा जाणवले की पोटात प्रचंड खळबळ माजलेय. मी उठून दरवाजा उघडला आणि संडासला जाऊन आलो. जरा बरे वाटले. पुन्हा अंथरुणावर पडलो‍. झोप लागते आहे असे वाटते न वाटते तोच पुन्हा पोटात गडबड सुरू झाली. पुन्हा उठलो,जाऊन आलो. अंथरुणाला पाठ टेकली न टेकली पुन्हा गडबड. पुन्हा गेलो,पुन्हा गेलो. असे रात्रभर जातच होतो.

चिंटू शांत झोपला होता. मी त्याला जागे केले नाही. पहाटे पहाटे त्याला जाग आली आणि त्याने बघितले तर त्याला मी अंथरुणावर दिसलो नाही. तो उठून बसला आणि त्याच्या लक्षात आले की दरवाजा सताड उघडा आहे. तो बाहेर आला तेंव्हा त्याने मला संडासाकडून परतताना पाहिले. मी कसाबसा पाय ओढत चालत होतो. तो झटकन पुढे आला. मला आधार दिला आणि पलंगापर्यंत आणून सोडले. त्याने मला विचारले, हा काय प्रकार आहे?
मी झाला प्रकार त्याला सांगितला आणि पुन्हा 'गमन' कर्ता झालो. ह्यावेळी त्याने मला नेऊन आणले. ही माझी १८वी खेप होती आणि अजूनही जीवाला शांती नव्हती. शरीरात बळ नव्हते पुन्हा पुन्हा जाण्यासाठी, पण पर्याय नव्हता. संडास खोलीपासून लांब होते ह्याचे प्रथमच वैषम्य वाटत होते. असेही वाटत होते की संडासातच पलंग ठेवावा. सकाळी आठ वाजेपर्यंत माझा स्कोअर २३ झाला होता. पण अस्वस्थता जात नव्हती. खालच्या मजल्यावरील डॉक्टर ८ वाजता येतात असे कळले होते म्हणून चिंटू खाली गेला तेंव्हा सुदैवाने डॉ.आले होते. त्यांना त्याने झालेली कहाणी सांगितली आणि वर येण्याची विनंती केली. पण ती त्यांनी फेटाळली आणि मलाच तिथे आणण्यास सांगितले.

मी तर पार गळून (गळून जाणे म्हणजे काय त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो) गेलो होतो. चिंटूने मला उचलले आणि खाली नेले. हे दृश्य बघायला सगळी गर्दी जमली होती. डॉ. नी मला कंबरेच्या खाली एक मोठे इंजेक्शन दिले आणि काही गोळ्या दिल्या‌‌. शिवाय दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने 'इलेक्ट्रॉल' घ्यायला सांगितले. त्यादिवशी माझ्याबरोबर चिंटू देखिल खोलीवरच राहिला. ठरलेल्या वेळी औषधे देत होता. मी त्याला मोठ्या मुश्किलीने, जेवून येण्यास राजी केले. येताना त्याने माझ्यासाठी मोसंबीचा रस आणला. रस प्यायल्यावर मला जरा हुशारी वाटली. इंजेक्शन आणि इतर औषधांच्या परिणामांमुळे माझे गळून जाणे पूर्णपणे थांबले होते आणि संध्याकाळपर्यत थोडे बरे वाटायला लागले होते. भूक लागायला लागली होती पण काय खायचे हा प्रश्नच होता. पण हा प्रश्न त्यादिवशी परसरामने सोडवला. त्याने मऊमऊ खिचडी बनवून आणली आणि मला खायला लावली.

खिचडी ह्यांपूर्वी आयुष्यामध्ये असंख्यवेळा खाल्ली असेल पण त्यादिवशीची खिचडी काही औरच लागली‍. जवळजवळ २४तासांनी मी अन्नग्रहण करत होतो त्यामुळे मोठ्या आवडीने मी ती खिचडी खाल्ली आणि मोठ्ठी ढेकर दिली तेंव्हा समोर बसलेल्या परसराम आणि चिंटू च्या डोळ्यात मला समाधानाची तृप्ती दिसली. त्यानंतरच त्या दोघांनी जेवून घेतले. माझ्या मनात असंख्य प्रश्नांनी गर्दी केलेली. कोण लागतात हे माझे? काय ह्यांचा माझा संबंध? का माझ्यासाठी एव्हढे सगळे केले? मी असे काही केले असते काय इतर कुणासाठी? उत्तर नव्हते! फक्त प्रश्न! त्यातच झोप केंव्हा लागली कळलेच नाही.

सकाळी जाग आली तेंव्हा उठायचा प्रयत्न केला पण जाणवले की अजून अंगात शक्ती नाही म्हणून पडूनच राहिलो. तंबी चहा-कॉफी देऊन गेला. कॉफीपान करता करता चिंटूने त्याने घेतलेला निर्णय मला सांगितला. त्यानुसार आज संध्याकाळपासूनच आम्ही देखिल खोलीवरच जेवण बनवायचे होते. त्यासाठी लागणारी सर्व सामग्री संध्याकाळी बाजारातून आणायचे असे ठरले. आजच्या सकाळच्या जेवणाची जबाबदारी पुन्हा एकदा परसरामने उचलली. त्याने आमच्यासाठी स्वतःबरोबर अजून एक पोळीभाजीचा डबा घेतला होता. त्या दोघांच्या मदतीने मी हळूहळू तयारी केली आणि प्रकें कडे प्रयाण केले.

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ६

दुसर्‍या दिवशी लवकर उठून प्रातर्विधी आटोपून योगासनं करायला सुरुवात केली. चिंटू अजून झोपलेलाच होता. माझा अर्धा व्यायाम संपला तोपर्यंत त्याला जाग आली आणि डोळे उघडून जेव्हा त्याने पाहिले तेंव्हा तो ताडकन उठला. मला म्हणाला, मला का नाही जागं केलंस?
भराभर जाऊन प्रातर्विधी आटोपून तो आला आणि म्हणाला,चल आता मला शिकव!

मी प्रथम त्याला हात-पाय मोकळे करायला सांगितले. ते झाल्यावर त्याला जमीनीवर बसून मांडी घालायला सांगितले. पण पठ्ठ्याला मांडी घालणेच जमेना(आजपर्यंत टेबल-खुर्ची शिवाय पान हालले नव्हते). हे बघून त्याला एकदम नैराश्यच आले. आता माझे कसे होणार वगैरे प्रश्न त्याच्या डोक्यात उभे राहिले. मी त्याला धीर दिला. म्हटलं, अरे आयुष्यात आज पहिल्यांदा तू मांडी घालायचा प्रयत्न करतो आहेस म्हणून तुला ते जमत नाही. तुझे मांड्यांचे स्नायू आणि सांधे कडक झालेले आहेत. तू काळजी करू नकोस. मी तुला सांगतो तसे तू कर हळूहळू साधारण पंधरा दिवसात तुझ्यात चांगली सुधारणा होईल! मग मी त्याला दोन्ही पाय लांब करून बसायला सांगितले ते त्याला जमले. मग हळूहळू एक पाय गुढग्यात वाकवून शरीराजवळ आणायला सांगितला. त्याचा पाय जेमतेम दुसर्‍या पायाच्या गुढघ्या पर्यंतच येत होता. परत मी त्याला धीर देत म्हटले, दोन गोष्टी लक्षात ठेव घाई आणि जोर-जबरदस्ती अजिबात करायची नाही.सगळं काही ठीक होईल!
आठवडाभरातच त्याच्यात चांगली सुधारणा झाली . त्याला बर्‍यापैकी मांडी घालता यायला लागली. त्यामुळे त्याचा उत्साह वाढला आणि पंधरा दिवसांनी तर तो सुखासनात ५मिनिटं बसू लागला. मी त्याला सांगितले, तू अशीच मेहेनत घेतलीस तर आपण परत जाईपर्यंत तू निश्चितपणे काही सोपी आसने सहजपणे करू शकशील!

आज आमचा प्रशिक्षणाचा (ज्यासाठी इथे आलो होतो) पहिला दिवस होता. साडेआठ वाजता हजर व्हायचे होते. व्यायाम होईपर्यंत चहावाला पोरगा हजर झाला होता. आज येताना त्याने माझ्यासाठी कॉफी देखिल आणली होती. मी त्याला त्याचे नाव विचारले...मला येत असलेल्या तीनही भाषेत.. मराठी,हिंदी आणि इंग्लिश. (कधी कधी आपण किती बिनडोकपणे वागतो त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण) पण त्याला अर्थबोध झाला नाही. मग मी त्याला खुणेने माझे नाव सांगितले. म्हणजे स्वतःकडे बोट दाखवून ’देवा' असे दोन तीनदा म्हटले आणि त्याच्याकडे बोट दाखवून हात त्याच्यापुढे नाचवले. मात्रा बरोबर लागू पडली.
तंबी! असे तो म्हणाला.
मी पडताळून पाहण्यासाठी म्हटले, तंबी!
लगेच त्याने माझ्याकडे पाहिले. मला मजा वाटली म्हणून मी तंबी,तंबी,तंबी! असे तीनवेळा म्हटले तर तंबी एकदम खूश.
तो पण लगेच देवा,देवा,देवा! असे तीनवेळा बोलून हसायला लागला.
तेव्हढ्यात रामालिंगमही आला. मी त्याला सांगितले की ह्याला उद्यापासून सात वाजता आमच्यासाठी चहाकॉफी आणायला सांग. रामालिंगमने तमिळमध्ये त्याला तसे सांगितले. तंबीने मान डोलवली पैसे घेतले आणि जाताना देवा,देवा,देवा चा घोष करत आणि हसत हसतच गेला.

बॉस,व्हाट इस थिस देवा? व्हाट तंबी वास सेइंग्ग? रामालिंगमने पृच्छा केली.
मग मी झालेली सगळी कहाणी त्याला सांगितली त्यावर तो एकदम खूश होऊन म्हणाला, बॉस,यू आर वेरी वेरी इंटॅलिजन्टा! इन तमिला नेमं मिन्सं 'पेरं'! यू आस्कं हिम 'पेरंदा'? ही विल टेल्ल हिस नेमं!
चला अजून एका तमिळ शब्दाची भर पडली, 'पेरंदा' म्हणजे, (तुझे)'नाव काय'?

सर्व तयारी करून बाहेर पडायला आम्हाला पावणेआठ वाजले. त्यानंतर नास्ता वगैरे करेपर्यंत सव्वाआठ वाजले. प्रशिक्षण केंद्र इथून १५-२० मिनिटे अंतरावर होते. आमच्या बरोबरीने इतरही काही लोक (प्रशिक्षणार्थी) देशातल्या निरनिराळ्या भागातून आलेले होते. असे सर्व मिळून साधारण२०-२५ जणांचा आमचा काफिला 'प्रकें'च्या दिशेने मार्गस्थ झाला. रस्त्यात मध्ये मध्ये काही शाळकरी मुले दिसत होती. ती आमच्या ह्या काफिल्याकडे बघून काही तरी ’मणीएन्ना,मणीएन्ना’ असे ओरडायची. कुणालाच काही बोध होत नव्हता आणि ती मुलेदेखील आम्ही त्यांच्यापासून लांब जाईपर्यंत जोरजोरात ओरडत राहायची,हसत राहायची(मला आपलं असे वाटत होते की ती सर्वं मुलं आम्हाला 'भले शाब्बास' असे काही तरी म्हणत असावीत). आम्ही सुध्दा हात हालवून त्यांना प्रतिसाद दिला तसे त्या मुलांना खूप आनंद झालेला दिसला. हसताना त्यांचे मोत्यासारखे शुभ्र दात चमकत होते आणि त्यांच्या काळ्या-सावळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर तर ते अधिकच मोहक वाटत होते. त्या तापलेल्या उन्हातसुध्दा आम्हाला क्षणभर गार गार वाटले.

आम्ही 'प्रकें'वर पोहोचलो. तिथे काही औपचारिक प्रक्रिया आटोपल्यावर आम्हाला एका वर्गात नेऊन बसवले. तिथे असलेले प्रशिक्षक,कर्मचारी ह्यांनी सर्वप्रथम आम्हा सर्वांना आपली स्वतःची ओळख करून दिली. नंतर मग क्रमाक्रमाने आमची ओळख करून घेतली. इथे आलेली इतर मंडळी ही पंजाब,हरियाणा,बंगाल,आसाम,ओरिसा,आंध्र,महाराष्ट्र,गुजरात,केरळ,कर्नाटक वगैरे अशा निरनिराळ्या प्रांतातून आणि निरनिराळ्या सरकारी खात्यातून आली होती. जणू एक छोटासा भारतच तिथे अवतरला होता. काही प्राथमिक गोष्टींची माहिती करून घेईपर्यंत (सगळं कसं हसत-खेळत आणि रमत-गमत चालले होते) जेवणाची सुट्टी झाली.

हे 'प्रकें' शहरापासून एका बाजूला असल्यामुळे इथे बाहेर जेवणा-खाण्याची सोय नव्हती म्हणून एक जण इथे येणार्‍या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जेवण पुरवण्याचे काम करतो असे समजले. सगळ्यांनाच भूक कडकडून लागली होती म्हणून जेवणाची थाळी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. मी जरा मागेच उभा राहिलो. थाळी घेऊन एकेक जण येत होता. माझे लक्ष त्या थाळ्यांकडे गेले तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे ढीगभर भात,त्यावर ओतलेले सांबार किंवा तत्सम काही तरी,भाजी,पापड,लोणचे आणि एका कटोर्‍यात आमटीसारख्या पदार्थात तरंगत असलेला पांढरा गोल गोळा. मला कळेना हा काय प्रकार आहे. इतक्यात चिंटू त्याची थाळी घेऊन आला. मी तसाच उभा आहे हे पाहून त्याने विचारले, तुझी थाळी कुठे आहे?
मी म्हटलं, आणतो, पण ते पांढरं पांढरं काय आहे?
अंडा-करी! चिंटू उवाच!
मी म्हटलं, मग मला नाही जेवायचे. तू जेव. मी बघतो बाहेर, कुठे काय मिळते का ते!
अरे असे काय करतोस? इथे काही सुध्दा मिळत नाही असे सगळेजण म्हणतात आणि तू इथे जेवला नाहीस तर उपाशीच राहायला लागेल. माझे ऐक,तू भाजी-भात तरी खाऊन घे! चिंटू उवाच!
नाही रे बाबा,मला नाही जमणार. तू जेव,तोपर्यंत मी बाहेर फेरी मारून येतो. काहीतरी नक्की मिळेल. तू काळजी करू नकोस! असे म्हणून मी जाण्यासाठी वळलो तर त्याने मला अडवले आणि म्हणाला,तू जर जेवणार नसशील तर मी पण जेवणार नाही!

मी कशीबशी त्याची समजूत काढली आणि त्याला जेवायला राजी केले. मी 'प्रकें' च्या बाहेर आलो आणि चारी बाजूंना बघितलं तर खरेच,तिथे सगळे उजाड होते. दूरदूर पर्यंत वस्तीचा मागमूस नव्हता. तसाच निराश होऊन परत येत होतो तर लक्ष गेले तिथे एकटीच एक वृध्दा केळी घेऊन बसली होती. मला हायसे वाटले. मी तिच्याकडची चार केळी घेतली आणि माझ्या हातावर पैसे ठेवून हात तिच्यापुढे धरला. तिने त्यातली पावली घेतली. मी तिथेच उभे राहून केळी खाल्ली आणि प्रकेंमध्ये परतलो. तोपर्यंत सगळ्यांची जेवणे झाली होती. मला पाहताच चिंटूने विचारले, काही मिळाले की नाही? नसेल तर चल,अजून जेवण शिल्लक आहे!
मी म्हणालो, केळी खाल्ली.माझे पोट भरले!
त्याचा विश्वास बसला नाही. मला म्हणाला, चल कुठे खाल्लीस दाखव!

मी त्याला लांबूनच ती म्हातारी केळेवाली दाखवली. तिच्या टोपलीत अजूनही काही केळी बाकी होती त्यामुळे माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला.

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ५

त्या दिवशी आम्ही जवळपासचा भाग पाहिला. रखरखीत ऊन आणि रस्त्यावर शुकशुकाट(रविवार होता) ह्यामुळे कुठे फिरावेसे वाटेना. भूक भागवण्यासाठी थोडेफार खाऊन घेतले आणि आम्ही पुन्हा वसतिगृहात परतलो. खाली हिरवळीवर ते चार लुंगीधारी बसले होतेच. त्यांच्या गप्पा घोड्यांच्या शर्यतीबद्दलच्या असाव्यात असा तर्क केला. कारण त्यांच्या हातात काल रात्री बघितलेल्या पुस्तिका आजही त्यांच्याजवळ होत्या आणि त्यावरील घोड्यांची चित्रे आता मी स्पष्टपणे बघू शकत होतो. आम्हाला बघून रामालिंगम पटकन उठला आणि समोर आला. म्हणाला, बॉस,विल यू सीट विथ अस टुडे?

आम्ही त्याला कपडे बदलून येतो असे सांगून वर आलो. दिवसभर उन्हात फिरल्यामुळे डोळे लाल झाले होते. मी हल्लीच, म्हणजे इथे मद्रासला येण्याच्या एक महिना अगोदरच चष्म्याच्या जागी नेत्रस्पर्शी भिंगे(कॉन्टॅक्ट लेन्सेस)बसवली होती. त्यामुळे माझी अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली होती. अजून डोळे सरावले नव्हते. त्यात रखरखीत ऊन आणि खंडीभर धूळ ह्यामुळे माझ्या डोळ्यातून सारखे पाणी येते होते. मी 'नेभिं' काढून ठेवली आणि गार पाण्याने डोळे धुतले तेंव्हा कुठे बरे वाटले. नंतर कपडे बदलले आणि लुंगी बनियनवर खाली यायला निघालो. पण आता माझ्या डोळ्यांना त्रास होत होता म्हणून माझा नेहमीचा जाड भिंगांचा चष्मा चढवला. ह्या अवतारात चिंटूबरोबर खाली आलो. त्यांनी चिंटूला या,बसा केले आणि विचारले, व्हेअर इज दॅट अदर बॉस?
माझ्या उपस्थितीत त्यांनी केलेला हा प्रश्न ऐकून चिंटूने माझ्याकडे बोट दाखवले. त्या सगळ्यांनी माझ्याकडे एक क्षण न्याहाळून बघितले आणि रामालिंगम लगेच म्हणाला, अय्यो रामा, सो बीग स्पेक्टा? वुइ कुड नाट रेकग्नाइस हिम बॉस!
मग मी थोडक्यात त्यांना माझ्या डोळ्यांबद्दल सांगितले आणि मग त्यांच्या शंकेचे निरसन झाले. परत माझ्या लुंगीकडे बघून (ही लुंगी रंगीबेरंगी होती आणि त्यांच्या पांढर्‍या शुभ्र होत्या) ’वेरी नाईस,वेरी नाईस!’ म्हणत त्याच्याबद्दल थोडे जुजबी बोलणे झाले.

आता ह्या लोकांशी नेमके काय आणि कुठल्या विषयावर बोलायचे हे माझ्या डोक्यात शिरेना. त्यामुळे काही क्षण आम्ही सगळेच शांत बसलो. ह्या शांतीचा भंग करत रामालिंगमने पहिला चेंडू टाकला(काल पासून बहुधा तो ह्याच क्षणाची वाट पाहत असावा).
बॉस,यू मस्ट बी मीटिंग डेइली बीग-बीग फ्लीमस्टार लाइक दर्मेंद्रा,येमामालिनी,सर्मिला टॅगोर ना?
मुंबई म्हणजे बहुतेक एखादी लहानशी गल्ली आहे आणि हे सर्व सिनेमातील नटनट्या आमच्या सहित कुठल्याश्या चाळीत राहतात. त्यामुळे रोज सकाळी सकाळी संडासच्या लाईनीत आणि नळावर पाणी भरताना आमची भेट होते असे काहीसे चित्र त्यांच्या मनात असावे असे मला वाटले. म्हणून त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी मी काही बोलणार होतो पण चिंटूने मला डोळ्यांनी गप्प बसण्याची खूण केली आणि त्याने त्या पहिल्याच चेंडूवर सणसणीत षट्कार ठोकला. धर्मेंद्र कसा आपला दोस्त आहे,त्याचे आणि हेमामालिनीचे लफडे आपण कसे जुळवून दिले वगैरे वगैरे खर्‍याखोट्या गोष्टी स्वतःच्या नावावर खपवायला सुरुवात केली.

चिंटू एक नंबरचा थापाड्या माणूस होता हे मला पूर्ण माहीत होते पण त्याचा तो आत्मविश्वास आणि बोलण्यातला ठामपणा बघून मी देखील चकित झालो. त्याच्यासारख्या कसलेल्या फलंदाजाला(थापंदाजाला) अशी अनुकूल खेळपट्टी मिळाली की समोरच्या गोलंदाजांची(इथे रामालिंगम आणि मंडळी)काही खैर नसते. आणि इथे तर त्याच्या त्या चौफेर टोलेबाजीचे साक्षात प्रतिस्पर्धी संघच वारेमाप कौतुक करत होता. मग त्याला आवर तरी कोण घालणार? त्यांच्या डोळ्यातून कौतुक नुसते ओसंडून वाहत होते आणि अतिशय तल्लीन होऊन ती मंडळी त्या सर्व गोष्टींचा आस्वाद घेत होती. मी बाजूला बसलो होतो ह्याचे देखिल त्यांना भान नव्हते. चिंटूच्या वाक्या-वाक्यावर त्यांच्या डोळ्यातले भाव बदलत होते. चेहर्‍यावर कृतकृत्यतेचे भाव दिसत होते. चिंटू च्या त्या अफाट आणि अचाट प्रतिभेने मी सुद्धा अचंबित झालो.
थापा सुद्धा किती रसाळपणे मारता येऊ शकतात ह्याचे जिते-जागते उदाहरण त्याच्या रूपाने माझ्या समोर प्रकट झाले होते.

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ४

दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे(साडे पाच वाजले असावेत) दरवाज्याची कडी जोरजोरात वाजत होती म्हणून धडपडून उठलो. दरवाजा उघडून पाहतो तो एक काळा-सावळा लहान मुलगा दारासमोर हातात चहाची किटली घेऊन उभा होता. मला पाहताच त्याने विचारले, सार,चाया?
मला त्याला सांगायचे होते की थोड्या वेळाने ये पण हे मी त्याला कुठल्या भाषेत सांगायचं हा एक प्रश्नच होता. मी आपला खुणेने त्याला नंतर ये असे सांगायचा अयशस्वी प्रयत्न केला. पण त्याला माझी ही भाषा काही कळेना. तेव्हढ्यात त्याला बाजूच्या काही खोल्यांतून बोलावणे आले म्हणून तो तिथे गेला. ह्या सर्व गडबडीत चिंटू देखिल उठला आणि त्याने त्या पोर्‍याला खुणेने बोलावून चहा मागवला(चिंटूला'बेड टी’लागत असे). तो पोर्‍या दोन कप भरू लागला. मी चहा पीत नसे म्हणून नुसतेच ’कॉफी, कॉफी’ असे त्याला उद्देशून बोललो. त्याला ते कळले असावे म्हणून त्याने एकच कप भरून चिंटूला दिला आणि मला उद्देशून काही तरी बोलला, पण मला ते काहीच कळले नाही.

नंतर तो पोर्‍या दुसर्‍या खोल्यांकडे वळला आणि मी प्रातर्विधी उरकून आलो तेंव्हा हा पोर्‍या कॉफी घेऊन हजर झाला होता. मला त्याचे कौतुक वाटले पण ते कोणत्या शब्दात व्यक्त करावे हे कळेना म्हणून मी त्याच्या पाठीवर शाबासकी दिली. त्यावर तो पोर्‍या प्रसन्नपणे हसला. माझी भावना त्याच्या पर्यंत पोचली ह्याचीच ती पावती होती. आता प्रश्न, किती पैसे द्यावेत हा होता कारण त्याला तमिळ शिवाय काहीच येत नव्हते. सगळे व्यवहार खुणेनेच चालत होते. मी माझ्या हातावर काही नाणी ठेवली आणि हात त्याच्या समोर धरला. त्याने प्रथम १रुपया घेतला आणि म्हणाला, ’चाया!’ नंतर पुन्हा २रुपये घेतले आणि म्हणाला,कापी!
मी हसलो,तो हसला आणि काही तरी बोलून गेला. बहुतेक 'उद्या येताना कॉफी पण बरोबरच आणीन' असे काहीसे असावे.

आज रविवार असल्यामुळे जरा आरामच होता आणि अजून प्रवासाचा शीण पूर्णपणे गेला नव्हता म्हणून दरवाजा उघडा ठेवूनच निवांत पडलो. कडीचा आवाज आला म्हणून उठून बघितलं तर,गुड मॉर्निंग बॉस! म्हणत रामालिंगम दारात उभा होता.तेव्हढ्यात चिंटू अंघोळ करून आला. मग आमचे तिघांचे काही जुजबी बोलणे झाले आणि त्या दोघांना तसेच सोडून मी अंघोळीला गेलो. अंघोळीहून आलो तेंव्हा प्रश्न असा पडला की धुतलेले कपडे वाळत कुठे घालायचे. गादी दुमडून तात्पुरते पलंगावरच टाकले आणि रामालिंगमला दोरी कुठे मिळेल म्हणून विचारले.
नो प्रॉब्लेमा! आय वुइल गीव यू जस्ट नाऊ! असे म्हणून तरातरा चालत निघून गेला. १०-१५ मिनिटांनी साधारण दोन-तीन मीटर लांब अशी दोरी त्याने आणली आणि म्हणाला, टेक इट बॉस!
हा आम्हाला सारखा बॉस का म्हणत होता कळत नव्हते आणि मनाला पटत देखील नव्हते. मी त्याला तसे विचारले तेंव्हा तो म्हणाला, आवर चिंटू(आवर चिंटू ?म्हणजे एव्हढ्यात तो स्वतःला आमच्यातलाच एक समजायला लागला की काय?) लुक्स लाइक बॉस!

खरेच होते ते. मी आतापर्यंत माझ्या दूषित नजरेतूनच त्याच्याकडे बघितले होते त्यामुळे मला जे उमगले नव्हते ते ह्या गृहस्थाने दाखवून दिले. मग मी पण चिंटूला म्हटले, बॉस,आज दिवसभर काय करायचे?
चिंटू म्हणाला, आता बॉस-बीस बस कर. इथे तू माझा बॉस आहेस,काय करायचे ते तू सांग आणि त्याप्रमाणे आपण करू या!
मी म्हटले, ओके बॉस!
चिंटू मूठ आवळून माझ्याकडे बघू लागला आणि म्हणाला, आता बस करतो की देऊ एक ठेवून. कालपासून हा काळू(रामालिंगम) उगीचच बॉस बॉस करून कान खातोय आणि आता तू पण त्याला सामील झालास? माझा डोका नको फिरवू!
मी म्हटलं, बरं बॉस,तुला बॉस म्हटलेलं आवडत नाहीना बॉस, तर नाही म्हणणार तुला बॉस!ओके बॉस?
चिंटू भडकून अंगावर धावून आला. त्याचा तो अवतार बघून रामालिंगमने काढता पाय घेतला(त्याला बिचार्‍याला काहीच कळले नव्हते हा का पिसाळला ते).

चिंटू जातीचाच मुष्टीयोद्धा. तो मुठी वळून माझ्यापर्यंत पोचला आणि त्याने एक मूठ माझ्या दिशेने हाणली. मी ती चुकवली आणि जरा बाजूला सरकून कराटेच्या पवित्र्यात उभा राहिलो. माझा तो पवित्रा बघितला आणि चिंटू एकदम राग विसरून मला म्हणाला, आयला देवा,तू कधी कराटे शिकलास?
मी म्हणालो, मला जेव्हा कळले की मला तुझ्याबरोबर मद्रासला तीन महिने राहायचे आहे तेंव्हाच मी स्वसंरक्षणासाठी काही डावपेच शिकून घेतलेत!
तो म्हणाला, मग धमाल आहे, मी बॉक्सिंग करतो तू कराटेने डिफेंड कर. ओके.कमॉन स्टार्ट!

अहो ही भलतीच आफत आली होती. खरे तर मला कराटे-बिराटे काहीच येत नव्हते. काही दिवसांपूर्वी मी एक कराटेचे पुस्तक विकत घेतले होते आणि त्यातील काही पवित्रे अभ्यासले होते इतकेच. प्रात्यक्षिक कधी केले नव्हते आणि आता ह्या सराईत मुष्टीयोध्याबरोबर दोन हात करण्याचे नाटक करायचे म्हणजे चित्र बघून हिमालय सर करण्यासारखे होते. मी त्याला थांबण्याचा इशारा केला. तो थांबला.
मग त्याला म्हणालो, हे बघ माझ्या गुरुने मला काही नियम सांगितले आहेत ते मला पाळावे लागतील! नियम क्र.१..... उगाचच शक्तिपरिक्षण करू नये.
नियम क्र.२..... शक्यतो आपल्या बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्याशीच दोन हात करावेत( आपल्या पेक्षा दुबळ्या व्यक्तीवर हात उचलू नये).
नियम क्र.३..... हा शेवटचा आणि फार महत्वाचा नियम आहे. आपल्यावर हल्ला होत असेल तर सर्वप्रथम जिथून वाट मिळेल तिथून पळून जावे आणि जर तसे करता आले नाही तरच मग सामना करावा(आहे की नाही डोकॅलिटी).
आता तूच सांग मी तुझ्याशी कसे दोन हात करणार कारण तू माझ्या बरोबरीचा नाहीस(खरे तर मीच त्याच्या बरोबरीचा नव्हतो पण ह्या शक्तिमान लोकांचा मेंदू गुढग्यात असतो हे माहीत होते) म्हणजे नियमाप्रमाणे मी तुझ्याशी लढू शकत नाही आणि लढलो तर माझ्या गुरुचा अपमान होईल. आता तूच सांग काय करायचे ते!
त्यावर तो म्हणाला, नको,नको,गुरुचा अपमान नको. पण तू मला कराटे तर शिकवू शकशील ना?
मी त्याला म्हणालो, हो शिकवेन ना. पण अगोदर तुला काही योगासनं शिकावी लागतील. ती तुला व्यवस्थित आली की मग आपण कराटेचा अभ्यास सुरू करू. चालेल?
तो म्हणाला, चालेल. कधी करू या सुरुवात? आत्ता?
मी म्हटलं, आज नको,उद्या सकाळपासून करू या सुरुवात!
बरं चालेल! तो म्हणाला.

आणि अशा तर्‍हेने मस्करीची कुस्करी होता-होता मी कर्म-धर्म संयोगाने वाचलो.

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग ३

आम्ही आमच्या इच्छीत स्थळी पोहोचलो. तिथल्या मुख्य अधिकार्‍याला भेटून आमचा परिचय दिला. त्यानेही हसून आमचे स्वागत केले. चहा-पाणी झाल्यावर आमची राहण्याची व्यवस्था केली आणि एका सद्गृहस्थाबरोबर आमची निवासस्थानी पाठवणी केली.

आमची राहण्याची व्यवस्था एका वसतिगृहामध्ये केली होती. आम्हाला दिलेली खोली चांगली प्रशस्त आणि हवेशीर होती. दोन पलंग, दोन टेबल-खुर्च्या वगैरे सर्व जामानिमा व्यवस्थित होता. पण गंमत अशी होती की पलंगावर गाद्या नव्हत्या. आम्ही त्या सद्गृहस्थाला त्यासंबंधी विचारले त्यावर तो म्हणाला , इथे कोणी कायम स्वरुपी कारभारी आणि नोकर नसल्यामुळे आम्हाला हे वसतिगृह व्यवस्थित चालवता येत नाही. म्हणून खराब होऊ शकतील अशा गोष्टी(गाद्या,चादरी वगैरे) आम्ही पुरवत नाही. पण तुम्ही काळजी करू नका . इथे जवळच बाजार आहे. तिथला दुकानदार ह्या सर्व गोष्टी भाड्याने पुरवतो.
आम्ही त्याचे आभार मानले आणि त्याला रजा दिली.

हे वसतिगृह एक मजली होते. आम्हाला वरच्या मजल्यावरची एकदम टोकाची खोली मिळाली होती. प्रत्येक मजल्यावर १२-१२ खोल्या होत्या आणि प्रत्येक मजल्यासाठी ६ न्हाणीघरं-६ संडास अशी व्यवस्था होती. ही व्यवस्था आमच्या खोलीपासून दुसर्‍या टोकाला होती. आम्ही पटापट आन्हिकं उरकून घेतली आणि दुसरे कपडे चढवून बाहेर पडलो. त्या वसतिगृहाच्या तळमजल्यावर एक दवाखाना होता आणि पुढच्या आवारात छानशी हिरवळ राखली होती. त्या वसतिगृहाच्या बाहेर जाताना सगळ्या खाणाखुणा नीट बघून घेतल्या आणि मगच बाहेर पडलो. एकेक गोष्ट बघत बघत आम्ही पुढे चाललो होतो तेव्हढ्यात एक छोटेसे उपाहारगृह दिसले. मी पुढे जाऊन नीट चौकशी केली(शाकाहारी की मांसाहारी ह्याची) आणि आम्ही आत शिरलो. आमची जोडी किती विजोड होती हे अगोदरच सांगितले आहे पण आता लोकांच्या चेहर्‍यावरचे भाव बघून मला त्याची प्रकर्षाने पुन्हा-पुन्हा जाणीव होत होती. आमची वेषभूषा आणि अवतार परस्परविरोधी होते. माझ्या अंगात बिनकॉलरचा, पट्ट्यापट्ट्यांचा, अर्ध्या बाह्यांचा टी शर्ट(काही लोक ह्याला बनियन सुद्धा म्हणतात),घट्ट विजार,केस मानेपर्यंत वाढलेले,गळ्यात शबनम पिशवी(ह्यात चश्मा,चाव्या,काड्यापेटी-मेणबत्ती,विजेरी,सुई-दोरा,चाकू वगैरे) आणि पायात कोल्हापुरी चपला. चिंटूचा थाट काही न्याराच होता. पूर्ण हातांचा चौकडीचा शर्ट,त्यावर काळे जाकीट,खाली जीन पँट,पायात हंटर शूज,केस अस्ताव्यस्त,हातात की-चेन(ती अशी फिरवत फिरवत चालण्याची लकब) आणि चेहर्‍यावर मग्रुरी. ह्या सर्व गोष्टींमुळे आम्ही जाऊ तिथे लक्ष वेधून घेत असू. आम्ही स्थानापन्न झाल्यावर मसाला डोसा आणि फिल्टर कॉफी मागवली. एकूण पदार्थ बरे होते पण तितकी मजा नाही आली. कशी का होइना भूक भागली हेही नसे थोडके असे मनातल्या मनात म्हणत पैसे देऊन बाहेर आलो.

आता हळू हळू संध्याकाळ होऊ लागली होती म्हणून पहिल्यांदा त्या गादीवाल्याचा शोध घेतला‍. तसे जास्त शोधावे लागले नाही कारण त्या भागातील तो एकमेव गादीवाला होता. आणि एका माणसाने तर चार पावले आमच्या बरोबर चालून त्याच्यापर्यंत आम्हाला पोहोचवले. आम्ही त्याचे आभार मानून दुकानात शिरलो. दुकानदाराला गादी-भाडे वगैरे बद्दल विचारले आणि त्याला आमच्या पत्त्यावर दोन गाद्या पोहोचवायला सांगितले. तशी त्याने आम्हाला थांबवले आणि जमीनीवर दोन गाद्या पसरल्या. मग त्याने आम्हाला त्यावर झोपून बघण्याची विनंती केली. आम्हाला हे सगळे विचित्र वाटले म्हणून आम्ही त्याला सांगितले की आम्हाला दोन्ही गाद्या पसंत आहेत . पण त्याचे समाधान होईना म्हणून त्याने त्याच्या नोकराला त्यावर झोपवले. इकडून तिकडे लोळायला लावले. मग त्या नोकराने जेव्हा सांगितले की गाद्या ठीक आहेत तेंव्हा त्या दुकानदाराने मला पुन्हा झोपायची विनंती केली पण मला प्रशस्त वाटेना. बाजूलाच एक महिला गादी घेण्यासाठी आली होती तिने देखिल आम्हाला तसेच सांगितले पण आम्ही त्या गोष्टीला नकार दिला.आम्हाला विचार करायला वेळ देऊन त्याने एक गादी त्या महिलेसाठी अंथरली आणि आश्चर्य म्हणजे ती महिला आम्हा सर्व पुरुषांसमोर सहजपणे त्या गादीवर आडवी झाली. मग मात्र माझा संकोच मिटला आणि मी पण लोळून घेतले आणि त्या दुकानदाराचे समाधान केले. माझ्या आजवरच्या आयुष्यात मी पुन्हा असला प्रसंग कधीही अनुभवला नाही.

आम्ही वसतिगृहावर परत आलो तेंव्हा चांगलाच काळोख झाला होता. आवारातले दिवे लागले होते आणि तिथेच पायर्‍यांवर ३-४ लुंगीधारी बसले होते. त्यांच्या हातात कसल्याशा छोट्या पुस्तिका होत्या आणि त्यात बघून त्यांची आपापसात चर्चा चालली होती. आमची चाहूल लागली तशी त्यातला एक जाडजूड लुंगीधारी चटकन उभा राहिला आणि आमच्या कडे बघून ’वणक्कम!’ असे म्हणाला. आमचा थंड प्रतिसाद बघून तो स्वतःहून पुढे आला आणि स्वतःची ओळख करून देत म्हणाला, आय यम रामालिंगम्, आय स्टे इन थिस कोलोनी(बाजूच्या कॉलनीकडे बोट करून), युर नेम प्लीस?
आम्ही(मी आणि चिंटू) एकमेकांकडे पाहिले(काय करायचे ह्या अर्थाने). मग चिंटू पुढे झाला आणि म्हणाला, आय ऍम लुडविग अँड ही इज देवा(चिंटू मला ह्याच नावाने हाक मारायचा).
लगेच रामालिंगमने आम्हाला पुढचा प्रश्न विचारला, व्हेयर फ्रॉम यू कम?
फ्रॉम बाँबे!असे चिंटूने म्हणताच त्या सगळ्यांनी आमच्याकडे 'अजि म्या ब्रह्म पाहिले' अशा विस्फारीत डोळ्यांनी पाहिले. आश्चर्याचा भर कमी झाल्यावर मग त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर गप्पा माराव्यात म्हणून बसण्याची विनंती केली पण आम्ही ती सौम्यपणे नाकारली. आम्हाला आता विश्रांतीची जरूर आहे, आपण उद्या बोलू असे सांगून त्यांचा निरोप घेतला. मागोमाग गाद्या घेऊन गादीवाल्याचा नोकर आला. पलंगावर गाद्या पसरून , हात पाय धुऊन आम्ही अंथरुणावर पडलो. दिवसभराच्या श्रमाने थकलो होतो त्यामुळे पडल्या पडल्या झोप लागली.

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग २

आम्ही मद्रास सेंट्रल स्थानकात पोचलो. तिथून आम्हाला 'गिंडी' ह्या उपनगरात जायचे होते. चौकशी केल्यावर कळले की जवळच एक उपनगरी रेल्वेचे स्थानक(नाव विसरलो) आहे जिथून आम्हाला गिंडीला जाणारी गाडी मिळेल. त्याप्रमाणे आम्ही शोधत शोधत तिथे पोहोचलो. तिथे जाऊन गिंडी साठी तिकिट काढले आणि फलाटावर गेलो तेंव्हा लक्षात आले की हा मिटरगेज लोहमार्ग आहे. त्या छोट्या गाडीत बसताना जरा मजा वाटली. गर्दी अशी खास जाणवली नाही पण सर्वजण आमच्या दोघांकडे बघत आहेत असे जाणवत होते. आमच्या वेषभूषेमुळे आणि आमच्याकडच्या सामानामुळे ते आपापसात काही तरी बोलत असावे असे वाटले म्हणून मी एका बाजूच्या माणसाला प्रश्न केला, क्या बात है,सब लोक ऐसे क्यों देख रहे है?
माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्या माणसाने फक्त खांदे उडवले. मला त्याचा काहीच बोध झाला नाही म्हणून मी दुसर्‍या एकाला तोच प्रश्न विचारला. त्याने दिलेले उत्तर मात्र आमच्यासाठीचा पहिला धडा ठरला. तो म्हणाला, नो इंदी,वोन्लि इंग्लिश अँड तमिल!
मग तोच प्रश्न इंग्लिशमध्ये विचारल्यावर तो माणूस खूश झाला आणि म्हणाला, आर यू फ्रॉम बाँबे?(त्याच्या चेहर्‍यावर एक मिश्किल हास्य होते. ते जणू सुचवत होते, काय ओळखलं की नाही बच्चमजी?)
मी लगेच ’होय’ म्हणून सांगितले आणि विचारले, हाउ यू रेकग्नाइज्ड?
तो म्हणाला, युवर हेर स्टाईला अँड क्लोदिंगा!
मी मनातल्या मनात म्हटले बराच हुशार दिसतोय अण्णा! तेव्हढ्यात गिंडी स्थानक आलं आणि आम्ही त्याला 'टाटा' करून फलाटावर उतरलो. दोन-तीन हमाल धावत आले पण एकूणच भाषेचा अडसर असल्यामुळे आमचे बोलणे एकमेकांना समजेना. आम्ही स्वतःच सामान उचलले आणि स्थानकाच्या बाहेर पडलो.

मला खूप तहान लागली होती म्हणून मी चिंटूला म्हणालो की आपण कुठे तरी पाणी पिऊ या. कर्मधर्म संयोगाने समोरच एक बर्‍यापैकी उपाहारगृह दिसले. आम्ही तिथे गेलो आणि तिकडच्या पो्र्‍याला ’वॉटर प्लीज’ म्हटलं आणि त्याने हसत हसत दोन पाण्याचे पेले आणले. मी घटाघटा पाणी प्यायलो आणि त्याला म्हणालो,वन मोर.
तो पोर्‍या गेला आणि त्याने अजून एक पेला भरून आणला आणि मला दिला. मी बघितले तर तो काही तरी पांढरा द्रव पदार्थ होता पण पाणी नव्हते.मी त्याला म्हणालो, वॉटर वॉटर, आय वाँट वॉटर!
तो काही तरी कुडकूड बोलत होता आणि मला काही समजत नव्हते. तो हातवारे करून काही तरी समजावत होता पण मी फक्त ..." वॉटर वॉटर"! असेच बोलत होतो. हा सगळा तमाशा बघण्यासाठी आजूबाजूचे लोक जमले. ते पण त्या पोर्‍याची बाजू घेऊन काही तरी सांगत होते पण आमच्या मेंदूत ते काही शिरत नव्हते.

एव्हढ्यात हा काय तमाशा चाललाय म्हणून बघायला खुद्द कारभारी आला. त्याने आमच्याकडे बघून लगेच इंग्लिश सुरू केले. सार,येनी प्रोब्लेम सार?
मग मी त्याला काही समजावणार एव्हढ्यात तो पोर्‍या पुढे सरसावला आणि त्याने पुन्हा ती कुडकुडची तबकडी चालू केली. त्याचे बोलणे संपले न संपले, लगेच चिंटू मैदानात उतरला. त्याने एकदम फर्ड्या इंग्लिशमध्ये झालेली कहाणी सांगितली. त्यावरून त्या कारभार्‍याला नेमका बोध झाला आणि तो जोरजोरात हसायला लागला. आता आम्ही सगळेच ... म्हणजे तो पोर्‍या,समस्त जन्ता आणि आम्ही दोघे त्या कारभा्र्‍याकडे विस्मयाने बघायला लागलो. प्रसंग काय आणि हा माणूस हसतो काय? पण आमची ती अवस्था बघून त्याने प्रथम त्या पो्र्‍याला त्यांच्या भाषेत समजावले. ते ऐकून तो पोर्‍या आणि सभोवारची जन्ता हसायला लागली. मला कळेना, आता ह्यांना काय झाले? पण लगेच कारभार्‍याने आम्हाला झालेली हकिकत समजावून सांगितली आणि मग मी आणि चिंटू ही त्या हसण्यात सामील झालो.
सगळा घोळ त्याच्या मध्यस्थीने दूर झाला होता. मी ’वन मोर’ म्हणालो त्याचा अर्थ त्याला वाटले की मला 'ताक'(तमिळ मध्ये ताकाला 'मोर' म्हणतात ही नवी माहिती मिळाली) हवे आणि म्हणून त्याने ताक आणले आणि पुढचे रामायण नव्हे ताकायण घडले. असो. नांदीच चांगली रंगली म्हणून मनात आले आता पुढचे नाटक कसे रंगतंय बघू या.

तिथनं बाहेर पडताना त्या कारभार्‍याकडून आमच्या गंतव्य स्थानाचा पत्ता नीट समजावून घेतला. आम्ही चार पावले चालून गेलो आणि मागून हाक ऐकू आली, सार,ओन मिनिटा !
वळून बघितले तर एक काळासावळा,मध्यमवयीन गृहस्थ आमच्याजवळ आला.
तो म्हणाला, सार,आय तिंक यू आर फ्रॉम बाँबे.सार,आय वाज इन बाँबे फॉर टेन इयर्सा.आय लव पिपल फ्रॉम बाँबे. देअरफोर आय टेल यू वन सीक्रेट. इयर यू डोंट टाक इन इंदी,टाक वोन्ली इन इंग्लिस.पिपल इयर आर वेरी वेरी को-ओप्रेटिव. यू फालो टू तिंग्स. १)आलवेज टाक इन इंग्लिस अँड २)से,एमजीआर(त्यावेळी एम‍. जी. रामचंद्रन हे सुप्रसिध्द तमिल नट मद्रासचे मुख्यमंत्री होते आणि ते लोकांचे अतिशय लाडके होते) दि बेस्ट. यू विल नेवर फ़ेस डिफ़िकल्टी एनी वेयर इन मॅड्रास! बेस्ट ऑफ लक सार!
आम्ही त्या अनोळखी हितचिंतकाचे आभार मानले आणि पुढे निघालो ते नवीन उत्साहाने.
आता आम्हाला ह्या अनोळखी जगात शिरकाव करण्याची मास्टर-की मिळाली होती त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा ह्या निश्चयाने आमची चाल वेगावली(मंदावली च्या धर्तीवर).

मुक्काम पोस्ट मद्रास! भाग १

१९७७ सालच्या मे महिन्यात (मेलो!)मद्रासला जावे लागले. बरोबर एक लुडविग नावाचा रोमन कॅथलिक सहकारी होता आणि त्याच्या बरोबर पुरे तीन महिने काढायचे होते. अंगापिंडाने मजबूत(माजलेला म्हटलं तरी चालेल),साडेपाच-पावणे सहा फुटांच्या आंत-बाहेरची उंची,तोंडात अखंड शिव्या(इंग्लिश)आणि येताजाता सारखे हात चालवणारा(मुष्टीयोध्दा होता) असा हा माझा सहकारी आणि त्याचे घरगुती नाव काय तर म्हणे 'चिंटू' (काय लोकं एकेक नावं ठेवतात). आणि त्याच्या उलट मी‌. सव्वा पाच फूट उंची,वीतभर छाती,मारामारी वगैरे अशा 'क्षुद्र' गोष्टींपासून नेहमीच चार हात लांब दूर राहणे पसंत करणारा. तो मांसाहारी,नियमित पेय घेणारा,सिगरेट,तंबाखू झालंच तर मधनं मधनं स्त्री-संग करणारा आणि मी, मी ह्या सर्व गोष्टींच्या उच्चाराने देखिल घामाघूम होणारा. काय बघून ही जोडी आमच्या साहेब लोकांनी बनवली होती ते त्यांनाच माहीत. तसा हा चिंटू मला नवीन नव्हता. गेले वर्ष-दोन वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो. पण एक सुरक्षित अंतर ठेवूनच आम्ही एकमेकांशी बोलत असू(म्हणजे मीच जरा लांब राहत असे. हो त्याचा काय नेम. एक ठोसा जरी त्याने मला मारला असता तर भर दिवसा तारे दिसले असते. पण का कुणास ठाऊक तो माझ्याशी बोलताना शब्द जपून वापरत असे त्यामुळे असेल कदाचित, पण म्हणून मला असे वाटत असे की तो मला मानत असावा(हेच मला पदूने देखील सांगितले होते).

तर अशी ही जाड्या-रड्याची जोडी मद्रासला जायला निघाली तेंव्हा समस्त मित्रमंडळी आम्हाला गाडीवर सोडायला आली होती‌.
सांभाळून राहा रे,उगीच काही वाद घालू नका! असे दोघांना सांगत होती(जास्त करून मलाच,कारण अरेला कारे करणे ही माझी जित्याची खोड होती. पण ह्याच्याबरोबर तरी असे काही करू नको,नाहीतर खैर नाही तुझी ... हा त्यातला गर्भितार्थ!). ह्या सर्वांबरोबर त्याची बायको सुद्धा आली होती(ही म्हातारी... आम्ही तिला म्हातारीच म्हणत होतो कारण चांगली ८ वर्षांनी ती त्याच्यापेक्षा मोठी होती )आणि मला सांगत होती..... ब्रदर ते माज्या बाबाला (हा हिचा बाबा? मग ही कोण त्याची?)जरा सांबालुन घे. तेच्या खान्या-पिन्यावर जरा लक्स ठेव.
मी काय कप्पाळ लक्ष ठेवणार ह्याच्या खाण्यावर आणि पिण्यावर? पण आपलं हो ला हो केलं. ह्या चिंटुचे सामान तरी किती होते? अहो दोन मोठ्या बॅगा,एक वळकटी आणि गळ्यात एक मोठी एयर-बॅग; आणि माझ्याकडे एक मध्यम आकाराची बॅग आणि गळ्यात शबनम पिशवी.
माझे सामान बघून ती म्हातारी बरळली... पुअर फ़ेलो!एव्हढ्या छोट्याश्या बॅगेत काय रानार?
मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि गाडीत शिरलो. माझ्या मागोमाग चिंटू आपल्या सामानासकट होताच. गाडीने शिट्टी दिली आणि चिंटू टुणकन उडी मारून फलाटावर उतरला आणि म्हातारीला मिठीत घेऊन तिची चुंबनं घेत सुटला. मी आपली नजर वळवली. गाडी सुरू झाली आणि चिंटू धावत-पळत गाडीत चढला आणि दारातूनच हात हालवत उभा राहिला.

तासा-दोन तासांनी आम्ही आपापले डबे काढले. मला आईने पुरी-भाजी दिली होती . त्याने काय आणले होते? त्याने सँडविचेस आणली होती.
मला म्हणाला, खानार?
मी विचारले, काय आहे त्याच्यात?
पोक्!(पोर्क)
म्हणजे काय?
डुकराचे मांस!(तरीच डुकरासारखा माजलेला होता).
मी ब्राह्मण आहे,मी मांस-मच्छी खात नाही!
पदू पण ब्राम्हिन हाय,पन तो खातो.तुला काय प्रॉब्लेम?
मी पूर्ण शाकाहारी माणूस आहे आणि पुन्हा तू मला असले काही विचारू नकोस.मला आवडणार नाही!
त्याने शांतपणे ती सँडविचेस गुंडाळून ठेवली आणि म्हणाला, मी तुझ्यातलं खाल्लं तर चालंल?
मी हो म्हणालो,पण त्याला स्वच्छ साबणाने हात धुवायला लावले आणि मग आम्ही दोघांनी माझा डबा फस्त केला. पुरी-भाजी त्याला खूप आवडली.
मग तो मला म्हणाला, मुंबैला परत येईपर्यंत मी बी व्हेजिटेरियन र्‍हानार. आपन दोघे दोस्त आहोत. तू खानार तेच मी बी खानार. प्रॉमिस!
गाडी मध्येच एका स्टेशनावर थांबली तसे त्याने ते सँडविचेस भिकार्‍याला देऊन टाकले आणि इथेच ख्र्‍या अर्थाने आमची गट्टी जमली.