सुटीच्या दिवशी मद्रास फिरणे चालू होते. अख्खा 'माउंट रोड' पायी फिरून पालथा घातला. तसेच 'मरीना बीच','अड्यार बीच' सारखे अजस्र आणि छोटेखानी बीचेस(चौपाट्या) बघून झाले. झालंच तर 'स्नेक पार्क(सर्पोद्यान)' पाहिले. एक माउंट रोड सोडला तर बाकी मद्रास हे मागासलेले वाटले. माउंट रोड हे समस्त मद्रासी लोकांचे अभिमानाचे ठिकाण होते. कुणीही मद्रासी भेटला आणि त्याला तुम्ही जर विचारले की मद्रास मध्ये प्रेक्षणीय काय आहे तर सर्वप्रथम माउंट रोड हेच उत्तर येईल. इतका त्यांना त्याचा अभिमान आहे. ह्या रस्त्यावर भरपूर चित्रपटगृहे,मोठमोठी दुकाने, खाजगी कंपन्यांच्या मुख्य शाखा आणि खानपान गृहे असे सगळे चंगळवादी वातावरण आहे.
मद्रास शहराची उपनगरे आहेत त्यांची काही नावे मला अजून आठवतात. इथे जी उपनगरी रेल्वे चालते त्यावरील ही स्थानके आहेत.'गिंडी'(इथे आमचे वास्तव्य होते), 'मीनम्बाकम'( छोटेखानी विमानतळ आहे,तांबरम(हे उपनगरी रेल्वेवरचे एक टोक) आणि 'पार्क स्ट्रीट'(हे दुसरे टोक). हे पार्क स्ट्रीट म्हणजे आपल्या चर्चगेटचा जुळा भाऊ. मोठमोठ्या ब्रिटिशकालीन इमारती,सरकारी कचेर्या ह्यांनी हा भाग दिवसा गजबजलेला असतो.'मांबलम'(आपल्या दादर सारखे मध्यवर्ती ठिकाण-सर्व घाऊक खरेदी-विक्री इथे होते). 'सैदापेट्टी', 'एग्मोर'(हे एक जंक्शन होते मीटर गेज रेल्वेचे... इथून बाहेर गावच्या ... विशेषत: अंतर्गत तमिळनाडू,केरळ वगैरेसाठी)गाड्या सुटतात.
मध्यंतरी आम्ही चिंटू साठी 'वेलंकणी'ला जाऊन आलो. वांद्र्याच्या मतमाऊली सारखे हिचे प्रस्थ आहे. सर्व धर्मीय भाविक इथे जाऊन नवस बोलतात. माझा एकूणच देवा-धर्मावर विश्वास नव्हता पण चिंटूच्या बरोबर गेलो(गाड्या बरोबर नळ्याला यात्रा). प्रशिक्षण संपायच्या सुमारास आम्हाला तीन दिवसांची सुट्टी मिळणार होती(हे आम्हाला खूप अगोदरच सांगितले होते) म्हणून आम्ही थोडे आजूबाजूला फिरून येण्याचे नक्की केले आणि एक महिना आधी रेल्वेचे आरक्षण केले. जाण्याचा दिवस उजाडला. आमची तयारी झाली आणि आम्ही गिंडीहून एग्मोरला जायला निघालो. आमची गाडी एग्मोरहून रात्री ८वाजता सुटणार होती म्हणून आम्ही साधारण ७ वाजता गिंडीहून निघालो ते साडेसातच्या सुमारास एग्मोरला पोहोचलो. एग्मोरच्या उपनगरी स्थानकातून आम्ही एग्मोरच्याच बाहेरगावी जाणार्या स्थानकात पोहोचलो तेंव्हा दर्शकावर(इंडिकेटर) आमची गाडी लावलेली दिसली. आम्ही त्याप्रमाणे तिथे गेलो तेंव्हा नुकतीच एक गाडी स्थानकातून बाहेर पडताना दिसली. त्याच फलाटावर आमची गाडी येणार म्हणून आम्ही तिथे उभे राहिलो. थोड्या वेळातच तिथे एक गाडी आली. खात्री करून घेण्यासाठी आम्ही तिथल्या तिकिट मास्तरला विचारले तेंव्हा तो जे बोलला ते ऐकून आम्ही दोघे चक्रावूनच गेलो. आमच्या नजरेसमोर जी गाडी स्थानकातून बाहेर पडली होती तिच आमची गाडी होती. पण हे कसे शक्य आहे? अजून जेमतेम पावणेआठ तर वाजत होते आणि तिकिटावर ८ची वेळ छापलेली दिसत होती. तारीखही आजचीच होती. मग घोळ झाला कुठे?
आम्हाला तिकिट आरक्षित करून एक महिना होऊन गेला होता. मध्यंतरीच्या काळात गाड्यांच्या वेळापत्रकात काही बदल केले होते आणि नेमकी आमच्या गाडीची वेळ अर्धा तास आधीची ठेवण्यात आली होती. आम्हाला ह्या गोष्टीचा पत्ताच नव्हता. आता पुढे काय? गुपचुप तिकिट रद्द केले(३०% पैसे कापले) आणि रखडत रखडत खोलीवर आलो. सगळ्या उत्साहावर पाणी पडले होते. आम्हाला परत आलेले बघून सर्व मित्रमंडळी जमली. आमचे पडलेले चेहरे बघून त्यांना काहीच कळेना आणि काही सांगण्याचा उत्साह आमच्यात नव्हताच. उद्या सकाळी सांगतो असे म्हणून आम्ही आमची सुटका करून घेतली आणि सरळ जाऊन अंथरुणावर अंग टाकले. दुसर्या दिवशी जेव्हा आमची फजिती त्यांना सांगितली तेंव्हा सगळे जोरजोरात हसायला लागले. आमच्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे आम्ही देखिल त्यांच्या हसण्यात सामील झालो. ते दोनतीन दिवस आमचे अत्यंत कंटाळवाणे गेले. प्रशिक्षण संपले होते आणि हि तीन दिवसांची सुट्टी संपल्यावर आम्हाला उपचार म्हणून एक दिवस हजेरी लावायची होती आणि मुंबईला परतायचे होते.
शेवटी तो मुंबईला जाण्याचा दिवस उजाडला. आज कोणतीच घाई नव्हती. आमची मुंबईची गाडी रात्रीची होती. ह्या वेळेला वेळापत्रक नीट पुन्हा एकदा बघून घेतले होते. स्वयंपाकाचे सर्व सामानसुमान रामालिंगमला देऊन टाकले. त्याने प्रत्येक वेळी आम्हाला अतिशय मोलाची मदत केली होती त्यामुळे ते सर्व सामान त्याला देताना आम्हा दोघांचे पूर्णपणे एकमत झाले. त्यादिवशी सकाळी आम्ही बाहेरच जेवलो आणि सोबत रामालिंगम आणि परसरामलाही आग्रहाने घेऊन गेलो. संध्याकाळ झाली. सामान तर आम्ही केंव्हाच बांधले होते आणि निघण्याची तयारी (मनाची तर केंव्हाच झाली होती) सुरू होती.
इतक्यात वसतिगृहाच्या तळमजल्यावर काही तरी रडारड ऐकू आली. आम्ही तिथे जाऊन बघितले तर एक तरुण मुलगी रडत रडत काही तरी बोलत होती. ती तमिळमध्ये बोलत होती म्हणून आम्हाला काहीच बोध होत नव्हता. मी रामालिंगमला विचारले तेंव्हा तो म्हणाला की तिला मुंबईला जायचंय आणि कोणी तरी मुंबैवाला तिला बरोबर नेणार आहे म्हणून ती इथे आली पण ते लोक तिला इथे दिसत नाहीत. इतका वेळ ती मद्रास सेंट्रल स्टेशनवर त्यांची वाट बघत उभी होती पण ते अजून का आले नाहीत म्हणून ती त्यांना बघायला इथे आलेली आहे. चिंटू ने रामालिंगममार्फत तिला विचारल्यावर जे कळले त्यावरून बोध झाला की हे सगळे त्या विदेश संचार निगमच्या दोघांपैकी कुणाचे तरी कृत्य असावे. पण हेही कळले की ते दोघे दुपारीच इथून पसार झालेत म्हणून. आता काय करायचे? ती मुलगी हटून बसली होती. तिला मुंबईला जाऊन फिल्म्स्टार बनायचे होते आणि तो जो कोणी होता तो तिला ह्याकामी मदत करणार होता. गेले महिनाभर ती त्याच्या बरोबर फिरत होती वगैरे अजून काही धक्कादायक गोष्टी आम्हाला रामलिंगममार्फत कळत होत्या. तिला जेव्हा रामालिंगमकडून कळले की आम्ही दोघे पण मुंबईला जाणार आहेत तेंव्हा ती आमची विनवणी करायला लागली. . हे प्रकरण मला झेपणारे नव्हते. मुलींपासून चार पावले दूर राहणेच बरे म्हणून मी लगेच मागे हटलो(शांतं पापम्. चिंटू ह्या बाबतीत हुशार होता म्हणून पुढे होऊन त्याने रामालिंगममार्फत तिला सांगितले की आम्ही मुंबईला पोचलो की प्रोड्युसरशी बोलून नक्की करू आणि मग तुला बोलावून घेऊ. तरी ती हटून बसली आमच्या बरोबर येण्यासाठी.
आता पुन्हा प्रश्न उभा राहिला पुढे करायचे काय? एव्हढ्यात एक वयस्कर माणूस गर्दीतून वाट काढत पुढे आला आणि त्या मुलीला फरफटत घेऊन गेला. त्याच्या तोंडाचा पट्टा अखंड चालला होता आणि मध्ये मध्ये तिला फटकेही मारत होता. रामालिंगमने सांगितल्यानुसार तो तिचा बाप होता आणि पोरगी सकाळपासून बेपत्ता होती म्हणून घाबरला होता. आता तिला बघून त्याचा संताप अनावर झाला होता म्हणून तिला शिव्याशाप देत मारत तिला घेऊन गेला. हुश्श्य!!! सुटलो बुवा ह्या धर्मसंकटातून! अशा अर्थाचा सुस्कारा आम्ही तिघांनी एकाच वेळी टाकला. आता आणखी काही नाटक व्हायच्या आत इथून निघालेले बरे म्हणून भराभर सामान घेतले आणि खोलीला बाहेरुन कडी घातली आणि आम्ही सुटलो तडक गिंडी स्थानकाच्या दिशेने. रामालिंगमही आमच्या बरोबर होता. गिंडीला उपनगरी गाडीत सामान टाकले आणि रामालिंगमचा निरोप घेतला. तिथून मद्रास सेंट्रलला आलो,गाडीत सामान चढवले. गाडी सुरू झाली आणि आम्ही काळोखातच मागे जाणार्या त्या मद्रासला टाटा केले.
आम्ही जेव्हा दादरला गाडीतून उतरलो तेव्हा आमचे स्वागत करायला चिंटूची म्हातारी(बायको) आणि आमचा ऑफिसातला मित्र दादा पाटील असे दोघेजण हजर होते. चिंटूला बघताच म्हातारी घळघळा रडायलाच लागली. त्याच्या गळ्यात पडून तिने मोकळेपणी रडून घेतले आणि मग त्याला उद्देशून म्हणाली, व्हॉट हॅपंड टू यू माय लव्ह? यू हॅव रिड्युस्ड अ लॉट! आणि पुन्हा गंगा- यमुना वाहायला लागल्या.
लगेच चिंटूने तिच्याकडे माझी खोटी खोटी तक्रार केली. धिस बगऽ कनव्हऽटेड मी टू टोटली व्हेज यू नो! अँड अल्सो टॉट मी योगा! आय हॅव रेड्युस्ड १०केजी यू नो!
झालं! पुन्हा गंगा यमुना! ह्या बायकाना रडण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही काय(मनातल्या मनात)?
मी चिंटूला म्हणालो, चल,आता मी निघतो. तू खुशाल ह्या तुझ्या म्हातारीबरोबर 'तुझ्या गळा माझ्या गळा करत बस!’
मग मी त्या प्रेमळ दांपत्याचा निरोप घेऊन पाटील बरोबर उपनगरी रेल्वेकडे निघालो. पाटीलने मला विचारले, तुला एक विचारू का?
मी हो म्हणताच तो म्हणाला, तीन महिने ह्या माणसाबरोबर तू कसे काढलेस ह्याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. मला तर वाटले होते की बहुतेक तू मुंबईला परत येशील तेंव्हा तुझे हातपाय प्लॅस्टरमध्ये असतील म्हणून मी तुला न्यायला आलो होतो. पण तू तर एकदम व्यवस्थित दिसतोयस आणि उलट तोच सुकलाय. नक्की मामला काय आहे?
पाटील हा माझा जिवाभावाचा मित्र म्हणून त्याला मी थोडक्यात सगळे सांगितले आणि त्याचे शंकानिरसन केले. त्याच्या डोळ्यात कौतुक साठून राहिलेले मला दिसले. त्याने मला घट्ट मिठी मारली आणि माझी पाठ थोपटली. मग आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि घराकडे प्रस्थान ठेवले.
इति अलम्!
समाप्त!
२ टिप्पण्या:
मस्त! तुम्हाला इतक्या बारीक सारीक गोष्टी कशा काय लक्षात राहतात..... वर्णन सुरेख करता.......प्रसंग डोळ्यापुढे उभा राहतो अगदी :)
सुरेख. चित्रदर्शी वर्णन. फारच मजा आली.तरी एक शंका आहेच. घरी फोन वगैरे करीत किंबहुना १९७७ साली म्हणजे पत्र वगैरे पाठवीत होतां की नाहीं?
टिप्पणी पोस्ट करा