दादाबद्दल ह्या अगोदर बरंच लिहिलंय; पण दादाचा अजून एक गुण सांगण्यासारखा आहे. अगदी रात्री-बेरात्री देखिल त्याला कुणीही बोलावलं तरी हातातलं काम टाकून तो त्या व्यक्तिच्या मागे धावणार. बाळंतपण,बारसं,वाढदिवस,मुंज,लग्न सारख्या ठिकाणी तो हजर राहणारच. बोलावणं साधे असो अथवा अगत्याचे असो तो हजेरी लावणारच आणि आहेरही घसघशीत करणार. एव्हढच काय कुणी त्याला एखाद्या कार्यात मदत हवी आहे असे सांगितले की हा माणूस तिथे कार्यालयावर अगदी सक्काळी सकाळी हजर होणार. तिथे अगदी साध्या हमालीपासून ते वधुवरांना लागणार्या सर्व गोष्टींची योग्य ती व्यवस्था करणार. कुणाला भटजी हवा,कुणाला आचारी-पाणके हवे; दादावर सोपवून निश्चिंत व्हा. पुलंनी 'नारायण' हे पात्र ह्या दादाला बघून तर निर्माण केले नाही ना असे वाटावे इतके साम्य.
कुणाला पळून जाऊन लग्न करायचे आहे. का? तर घरचे परवानगी देत नाहीत. दादाला शरण जा. दादा सगळी व्यवस्था करतो. त्याच्याकडे अशा तर्हेची लग्न लावणारे भटजी आहेत. जिथे लग्न लागतात अशी निर्मनुष्य अथवा भर वस्तीतील पण कुणाला फारशी माहित नसलेली देवळे त्याला माहित आहेत. तिथले व्यवस्थापक,कंत्राटदार,त्यांचे जेवणावळींचे दर अशी यच्चयावत माहिती असते. दादा म्हणजे एक चालते बोलते संस्थान आहे.
हे कमीच म्हणून की काय त्याचे इतरही सामाजिक कार्य चालते. ऐकून आपल्याला धक्का बसेल की तारुण्याच्या बेहोषित तरूण-तरूणी नको ते करून बसतात आणि मग कुठे वाच्यता होऊ नये,इज्जत जाऊ नये म्हणून दादाला शरण जातात. मग दादा त्या दुर्दैवी तरूणीचा नामधारी पती होऊन त्या तरूणीची अशा अवस्थेतून सुटका करण्यासाठी एखाद्या सरकारी आरोग्यकेंद्रात नेऊन तिचा भार हलका करतो. जो तरूण त्यात गुंतला असतो तो शेळपट असल्यामुळे दादालाच कैक जणींचे नामधारी पती बनावे लागलेय. ह्या नामधारी पती प्रकरणावरून मी दादाला कैक वेळेला छेडले असता त्याने मला दिलेले उत्तर हे केवळ दादाच देऊ जाणे.
मी त्याला म्हटले,"अरे तू इतक्या वेळा त्या आरोग्यकेंद्रात निरनिराळ्या तरूण मुलींबरोबर जातोस आणि आपण त्यांचा नवरा आहे हे सांगून त्यांची सुटका करतोस. मग तिथे असणारे डॉक्टर,परिचारिका आणि इतर लोक तुला चांगलेच ओळखत असतील ना?"
दादा "हो" म्हणाला.
"मग ते कसे मानतात तुला त्या सर्वांचा नवरा?"
दादा म्हणाला,"हे बघ माझा हेतू शुध्द आहे. संकटात सापडलेल्याला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे असे मी समजतो आणि त्या बदल्यात माझी कुणाकडूनही कसलीही अपेक्षा नसते. त्या आरोग्य केंद्र चालवणार्यांना काही औपचारिकता पूर्ण करावी लागते आणि त्यासाठी त्या तरूणीची संमती लागते आणि साक्षीला तिचा पती(नामधारी असला तरी) असावा लागतो. माझ्या खोट्या वागण्यामुळे त्या लोकांचे जर काही वाईट न होता भलेच होणार असेल तर ते तरी कशाला आडकाठी करतील? माझ्या क्षणिक खोट्या वागण्यामुळे जर दोन तरूण व्यक्तींची आणि त्यांच्या घरच्यांची लाज शाबूत राहणार असेल तर मला हे करायला कोणताही संकोच बाळगण्याचे काहीच कारण नाही. ही एक समाजसेवाच आहे असे मी मानतो. कुणाला पटो वा ना पटो. माझा हेतू एकदम साफ आहे. बस्स. मन चंगा तो कटोतीमे गंगा!"
दादाचा अजून एक गुण म्हणजे मैत्री करणे आणि ती निभावणे. उदा.तो माझा मित्र आहेच;पण त्याच्याशी मी जर एखाद्या व्यक्तिची जुजबी ओळख करून दिली की दादा त्यालाही आपला मित्र मानत असतो मग भले ती व्यक्ति त्याला विसरली तरी चालेल. खरे तर बर्याच वेळेला तो एक औपचारिकतेचाच भाग असतो आणि आपण सहसा ते विसरुनही जातो. पण दादाच्या सगळं लक्षात राहते.त्याला कळायचा अवकाश की तो कुणाच्याही दु:खाच्या प्रसंगी सांत्वनासाठी हजर असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा