दुसर्या दिवशी लवकर उठून प्रातर्विधी आटोपून योगासनं करायला सुरुवात केली. चिंटू अजून झोपलेलाच होता. माझा अर्धा व्यायाम संपला तोपर्यंत त्याला जाग आली आणि डोळे उघडून जेव्हा त्याने पाहिले तेंव्हा तो ताडकन उठला. मला म्हणाला, मला का नाही जागं केलंस?
भराभर जाऊन प्रातर्विधी आटोपून तो आला आणि म्हणाला,चल आता मला शिकव!
मी प्रथम त्याला हात-पाय मोकळे करायला सांगितले. ते झाल्यावर त्याला जमीनीवर बसून मांडी घालायला सांगितले. पण पठ्ठ्याला मांडी घालणेच जमेना(आजपर्यंत टेबल-खुर्ची शिवाय पान हालले नव्हते). हे बघून त्याला एकदम नैराश्यच आले. आता माझे कसे होणार वगैरे प्रश्न त्याच्या डोक्यात उभे राहिले. मी त्याला धीर दिला. म्हटलं, अरे आयुष्यात आज पहिल्यांदा तू मांडी घालायचा प्रयत्न करतो आहेस म्हणून तुला ते जमत नाही. तुझे मांड्यांचे स्नायू आणि सांधे कडक झालेले आहेत. तू काळजी करू नकोस. मी तुला सांगतो तसे तू कर हळूहळू साधारण पंधरा दिवसात तुझ्यात चांगली सुधारणा होईल! मग मी त्याला दोन्ही पाय लांब करून बसायला सांगितले ते त्याला जमले. मग हळूहळू एक पाय गुढग्यात वाकवून शरीराजवळ आणायला सांगितला. त्याचा पाय जेमतेम दुसर्या पायाच्या गुढघ्या पर्यंतच येत होता. परत मी त्याला धीर देत म्हटले, दोन गोष्टी लक्षात ठेव घाई आणि जोर-जबरदस्ती अजिबात करायची नाही.सगळं काही ठीक होईल!
आठवडाभरातच त्याच्यात चांगली सुधारणा झाली . त्याला बर्यापैकी मांडी घालता यायला लागली. त्यामुळे त्याचा उत्साह वाढला आणि पंधरा दिवसांनी तर तो सुखासनात ५मिनिटं बसू लागला. मी त्याला सांगितले, तू अशीच मेहेनत घेतलीस तर आपण परत जाईपर्यंत तू निश्चितपणे काही सोपी आसने सहजपणे करू शकशील!
आज आमचा प्रशिक्षणाचा (ज्यासाठी इथे आलो होतो) पहिला दिवस होता. साडेआठ वाजता हजर व्हायचे होते. व्यायाम होईपर्यंत चहावाला पोरगा हजर झाला होता. आज येताना त्याने माझ्यासाठी कॉफी देखिल आणली होती. मी त्याला त्याचे नाव विचारले...मला येत असलेल्या तीनही भाषेत.. मराठी,हिंदी आणि इंग्लिश. (कधी कधी आपण किती बिनडोकपणे वागतो त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण) पण त्याला अर्थबोध झाला नाही. मग मी त्याला खुणेने माझे नाव सांगितले. म्हणजे स्वतःकडे बोट दाखवून ’देवा' असे दोन तीनदा म्हटले आणि त्याच्याकडे बोट दाखवून हात त्याच्यापुढे नाचवले. मात्रा बरोबर लागू पडली.
तंबी! असे तो म्हणाला.
मी पडताळून पाहण्यासाठी म्हटले, तंबी!
लगेच त्याने माझ्याकडे पाहिले. मला मजा वाटली म्हणून मी तंबी,तंबी,तंबी! असे तीनवेळा म्हटले तर तंबी एकदम खूश.
तो पण लगेच देवा,देवा,देवा! असे तीनवेळा बोलून हसायला लागला.
तेव्हढ्यात रामालिंगमही आला. मी त्याला सांगितले की ह्याला उद्यापासून सात वाजता आमच्यासाठी चहाकॉफी आणायला सांग. रामालिंगमने तमिळमध्ये त्याला तसे सांगितले. तंबीने मान डोलवली पैसे घेतले आणि जाताना देवा,देवा,देवा चा घोष करत आणि हसत हसतच गेला.
बॉस,व्हाट इस थिस देवा? व्हाट तंबी वास सेइंग्ग? रामालिंगमने पृच्छा केली.
मग मी झालेली सगळी कहाणी त्याला सांगितली त्यावर तो एकदम खूश होऊन म्हणाला, बॉस,यू आर वेरी वेरी इंटॅलिजन्टा! इन तमिला नेमं मिन्सं 'पेरं'! यू आस्कं हिम 'पेरंदा'? ही विल टेल्ल हिस नेमं!
चला अजून एका तमिळ शब्दाची भर पडली, 'पेरंदा' म्हणजे, (तुझे)'नाव काय'?
सर्व तयारी करून बाहेर पडायला आम्हाला पावणेआठ वाजले. त्यानंतर नास्ता वगैरे करेपर्यंत सव्वाआठ वाजले. प्रशिक्षण केंद्र इथून १५-२० मिनिटे अंतरावर होते. आमच्या बरोबरीने इतरही काही लोक (प्रशिक्षणार्थी) देशातल्या निरनिराळ्या भागातून आलेले होते. असे सर्व मिळून साधारण२०-२५ जणांचा आमचा काफिला 'प्रकें'च्या दिशेने मार्गस्थ झाला. रस्त्यात मध्ये मध्ये काही शाळकरी मुले दिसत होती. ती आमच्या ह्या काफिल्याकडे बघून काही तरी ’मणीएन्ना,मणीएन्ना’ असे ओरडायची. कुणालाच काही बोध होत नव्हता आणि ती मुलेदेखील आम्ही त्यांच्यापासून लांब जाईपर्यंत जोरजोरात ओरडत राहायची,हसत राहायची(मला आपलं असे वाटत होते की ती सर्वं मुलं आम्हाला 'भले शाब्बास' असे काही तरी म्हणत असावीत). आम्ही सुध्दा हात हालवून त्यांना प्रतिसाद दिला तसे त्या मुलांना खूप आनंद झालेला दिसला. हसताना त्यांचे मोत्यासारखे शुभ्र दात चमकत होते आणि त्यांच्या काळ्या-सावळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर तर ते अधिकच मोहक वाटत होते. त्या तापलेल्या उन्हातसुध्दा आम्हाला क्षणभर गार गार वाटले.
आम्ही 'प्रकें'वर पोहोचलो. तिथे काही औपचारिक प्रक्रिया आटोपल्यावर आम्हाला एका वर्गात नेऊन बसवले. तिथे असलेले प्रशिक्षक,कर्मचारी ह्यांनी सर्वप्रथम आम्हा सर्वांना आपली स्वतःची ओळख करून दिली. नंतर मग क्रमाक्रमाने आमची ओळख करून घेतली. इथे आलेली इतर मंडळी ही पंजाब,हरियाणा,बंगाल,आसाम,ओरिसा,आंध्र,महाराष्ट्र,गुजरात,केरळ,कर्नाटक वगैरे अशा निरनिराळ्या प्रांतातून आणि निरनिराळ्या सरकारी खात्यातून आली होती. जणू एक छोटासा भारतच तिथे अवतरला होता. काही प्राथमिक गोष्टींची माहिती करून घेईपर्यंत (सगळं कसं हसत-खेळत आणि रमत-गमत चालले होते) जेवणाची सुट्टी झाली.
हे 'प्रकें' शहरापासून एका बाजूला असल्यामुळे इथे बाहेर जेवणा-खाण्याची सोय नव्हती म्हणून एक जण इथे येणार्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जेवण पुरवण्याचे काम करतो असे समजले. सगळ्यांनाच भूक कडकडून लागली होती म्हणून जेवणाची थाळी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. मी जरा मागेच उभा राहिलो. थाळी घेऊन एकेक जण येत होता. माझे लक्ष त्या थाळ्यांकडे गेले तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे ढीगभर भात,त्यावर ओतलेले सांबार किंवा तत्सम काही तरी,भाजी,पापड,लोणचे आणि एका कटोर्यात आमटीसारख्या पदार्थात तरंगत असलेला पांढरा गोल गोळा. मला कळेना हा काय प्रकार आहे. इतक्यात चिंटू त्याची थाळी घेऊन आला. मी तसाच उभा आहे हे पाहून त्याने विचारले, तुझी थाळी कुठे आहे?
मी म्हटलं, आणतो, पण ते पांढरं पांढरं काय आहे?
अंडा-करी! चिंटू उवाच!
मी म्हटलं, मग मला नाही जेवायचे. तू जेव. मी बघतो बाहेर, कुठे काय मिळते का ते!
अरे असे काय करतोस? इथे काही सुध्दा मिळत नाही असे सगळेजण म्हणतात आणि तू इथे जेवला नाहीस तर उपाशीच राहायला लागेल. माझे ऐक,तू भाजी-भात तरी खाऊन घे! चिंटू उवाच!
नाही रे बाबा,मला नाही जमणार. तू जेव,तोपर्यंत मी बाहेर फेरी मारून येतो. काहीतरी नक्की मिळेल. तू काळजी करू नकोस! असे म्हणून मी जाण्यासाठी वळलो तर त्याने मला अडवले आणि म्हणाला,तू जर जेवणार नसशील तर मी पण जेवणार नाही!
मी कशीबशी त्याची समजूत काढली आणि त्याला जेवायला राजी केले. मी 'प्रकें' च्या बाहेर आलो आणि चारी बाजूंना बघितलं तर खरेच,तिथे सगळे उजाड होते. दूरदूर पर्यंत वस्तीचा मागमूस नव्हता. तसाच निराश होऊन परत येत होतो तर लक्ष गेले तिथे एकटीच एक वृध्दा केळी घेऊन बसली होती. मला हायसे वाटले. मी तिच्याकडची चार केळी घेतली आणि माझ्या हातावर पैसे ठेवून हात तिच्यापुढे धरला. तिने त्यातली पावली घेतली. मी तिथेच उभे राहून केळी खाल्ली आणि प्रकेंमध्ये परतलो. तोपर्यंत सगळ्यांची जेवणे झाली होती. मला पाहताच चिंटूने विचारले, काही मिळाले की नाही? नसेल तर चल,अजून जेवण शिल्लक आहे!
मी म्हणालो, केळी खाल्ली.माझे पोट भरले!
त्याचा विश्वास बसला नाही. मला म्हणाला, चल कुठे खाल्लीस दाखव!
मी त्याला लांबूनच ती म्हातारी केळेवाली दाखवली. तिच्या टोपलीत अजूनही काही केळी बाकी होती त्यामुळे माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा