आम्ही मद्रास सेंट्रल स्थानकात पोचलो. तिथून आम्हाला 'गिंडी' ह्या उपनगरात जायचे होते. चौकशी केल्यावर कळले की जवळच एक उपनगरी रेल्वेचे स्थानक(नाव विसरलो) आहे जिथून आम्हाला गिंडीला जाणारी गाडी मिळेल. त्याप्रमाणे आम्ही शोधत शोधत तिथे पोहोचलो. तिथे जाऊन गिंडी साठी तिकिट काढले आणि फलाटावर गेलो तेंव्हा लक्षात आले की हा मिटरगेज लोहमार्ग आहे. त्या छोट्या गाडीत बसताना जरा मजा वाटली. गर्दी अशी खास जाणवली नाही पण सर्वजण आमच्या दोघांकडे बघत आहेत असे जाणवत होते. आमच्या वेषभूषेमुळे आणि आमच्याकडच्या सामानामुळे ते आपापसात काही तरी बोलत असावे असे वाटले म्हणून मी एका बाजूच्या माणसाला प्रश्न केला, क्या बात है,सब लोक ऐसे क्यों देख रहे है?
माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्या माणसाने फक्त खांदे उडवले. मला त्याचा काहीच बोध झाला नाही म्हणून मी दुसर्या एकाला तोच प्रश्न विचारला. त्याने दिलेले उत्तर मात्र आमच्यासाठीचा पहिला धडा ठरला. तो म्हणाला, नो इंदी,वोन्लि इंग्लिश अँड तमिल!
मग तोच प्रश्न इंग्लिशमध्ये विचारल्यावर तो माणूस खूश झाला आणि म्हणाला, आर यू फ्रॉम बाँबे?(त्याच्या चेहर्यावर एक मिश्किल हास्य होते. ते जणू सुचवत होते, काय ओळखलं की नाही बच्चमजी?)
मी लगेच ’होय’ म्हणून सांगितले आणि विचारले, हाउ यू रेकग्नाइज्ड?
तो म्हणाला, युवर हेर स्टाईला अँड क्लोदिंगा!
मी मनातल्या मनात म्हटले बराच हुशार दिसतोय अण्णा! तेव्हढ्यात गिंडी स्थानक आलं आणि आम्ही त्याला 'टाटा' करून फलाटावर उतरलो. दोन-तीन हमाल धावत आले पण एकूणच भाषेचा अडसर असल्यामुळे आमचे बोलणे एकमेकांना समजेना. आम्ही स्वतःच सामान उचलले आणि स्थानकाच्या बाहेर पडलो.
मला खूप तहान लागली होती म्हणून मी चिंटूला म्हणालो की आपण कुठे तरी पाणी पिऊ या. कर्मधर्म संयोगाने समोरच एक बर्यापैकी उपाहारगृह दिसले. आम्ही तिथे गेलो आणि तिकडच्या पो्र्याला ’वॉटर प्लीज’ म्हटलं आणि त्याने हसत हसत दोन पाण्याचे पेले आणले. मी घटाघटा पाणी प्यायलो आणि त्याला म्हणालो,वन मोर.
तो पोर्या गेला आणि त्याने अजून एक पेला भरून आणला आणि मला दिला. मी बघितले तर तो काही तरी पांढरा द्रव पदार्थ होता पण पाणी नव्हते.मी त्याला म्हणालो, वॉटर वॉटर, आय वाँट वॉटर!
तो काही तरी कुडकूड बोलत होता आणि मला काही समजत नव्हते. तो हातवारे करून काही तरी समजावत होता पण मी फक्त ..." वॉटर वॉटर"! असेच बोलत होतो. हा सगळा तमाशा बघण्यासाठी आजूबाजूचे लोक जमले. ते पण त्या पोर्याची बाजू घेऊन काही तरी सांगत होते पण आमच्या मेंदूत ते काही शिरत नव्हते.
एव्हढ्यात हा काय तमाशा चाललाय म्हणून बघायला खुद्द कारभारी आला. त्याने आमच्याकडे बघून लगेच इंग्लिश सुरू केले. सार,येनी प्रोब्लेम सार?
मग मी त्याला काही समजावणार एव्हढ्यात तो पोर्या पुढे सरसावला आणि त्याने पुन्हा ती कुडकुडची तबकडी चालू केली. त्याचे बोलणे संपले न संपले, लगेच चिंटू मैदानात उतरला. त्याने एकदम फर्ड्या इंग्लिशमध्ये झालेली कहाणी सांगितली. त्यावरून त्या कारभार्याला नेमका बोध झाला आणि तो जोरजोरात हसायला लागला. आता आम्ही सगळेच ... म्हणजे तो पोर्या,समस्त जन्ता आणि आम्ही दोघे त्या कारभा्र्याकडे विस्मयाने बघायला लागलो. प्रसंग काय आणि हा माणूस हसतो काय? पण आमची ती अवस्था बघून त्याने प्रथम त्या पो्र्याला त्यांच्या भाषेत समजावले. ते ऐकून तो पोर्या आणि सभोवारची जन्ता हसायला लागली. मला कळेना, आता ह्यांना काय झाले? पण लगेच कारभार्याने आम्हाला झालेली हकिकत समजावून सांगितली आणि मग मी आणि चिंटू ही त्या हसण्यात सामील झालो.
सगळा घोळ त्याच्या मध्यस्थीने दूर झाला होता. मी ’वन मोर’ म्हणालो त्याचा अर्थ त्याला वाटले की मला 'ताक'(तमिळ मध्ये ताकाला 'मोर' म्हणतात ही नवी माहिती मिळाली) हवे आणि म्हणून त्याने ताक आणले आणि पुढचे रामायण नव्हे ताकायण घडले. असो. नांदीच चांगली रंगली म्हणून मनात आले आता पुढचे नाटक कसे रंगतंय बघू या.
तिथनं बाहेर पडताना त्या कारभार्याकडून आमच्या गंतव्य स्थानाचा पत्ता नीट समजावून घेतला. आम्ही चार पावले चालून गेलो आणि मागून हाक ऐकू आली, सार,ओन मिनिटा !
वळून बघितले तर एक काळासावळा,मध्यमवयीन गृहस्थ आमच्याजवळ आला.
तो म्हणाला, सार,आय तिंक यू आर फ्रॉम बाँबे.सार,आय वाज इन बाँबे फॉर टेन इयर्सा.आय लव पिपल फ्रॉम बाँबे. देअरफोर आय टेल यू वन सीक्रेट. इयर यू डोंट टाक इन इंदी,टाक वोन्ली इन इंग्लिस.पिपल इयर आर वेरी वेरी को-ओप्रेटिव. यू फालो टू तिंग्स. १)आलवेज टाक इन इंग्लिस अँड २)से,एमजीआर(त्यावेळी एम. जी. रामचंद्रन हे सुप्रसिध्द तमिल नट मद्रासचे मुख्यमंत्री होते आणि ते लोकांचे अतिशय लाडके होते) दि बेस्ट. यू विल नेवर फ़ेस डिफ़िकल्टी एनी वेयर इन मॅड्रास! बेस्ट ऑफ लक सार!
आम्ही त्या अनोळखी हितचिंतकाचे आभार मानले आणि पुढे निघालो ते नवीन उत्साहाने.
आता आम्हाला ह्या अनोळखी जगात शिरकाव करण्याची मास्टर-की मिळाली होती त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा ह्या निश्चयाने आमची चाल वेगावली(मंदावली च्या धर्तीवर).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा