माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

माझे सांगीतिक आयुष्य!अंतिम भाग

पेटी शिकवणारे गुरुजी यायचे बंद झाले. मी तर चांगली तीन महिन्याची फी एकदम भरली होती. मग आता काय करायचे? तसे मी त्या क्लासच्या प्रमुखांना विचारले.
ते म्हणाले,"हवी असेल तर फी परत करतो;पण माझा सल्ला आहे की काही दिवस थांबा. आम्ही काही तरी व्यवस्था करतो.त्यातून तुम्हाला जर दुसरे काही वाद्य शिकायचे असेल तर ते ह्या फीमध्ये शिकू शकता. नाट्यसंगीत,भावगीत गायन किंवा शास्त्रीय संगीत शिकायचे असल्यास आमची ना नाही. काय ते तुम्ही ठरवा."
मी विचार केला की मी शिकायलाच तर आलो आहे तर आता फी परत घेण्याच्या ऐवजी सध्या नाट्यसंगीत शिकून घेऊ.शास्त्रीय संगीत शिकलोच तर ते भीमसेनांकडे अथवा त्याच पठडीतल्या व्यक्तीकडे हे ठरले होते आणि ह्या ठिकाणी तर जे शिकवणारे होते ते सगळे अभिषेकी बुवांच्या वळणाचे शिकवत असत जे माझ्या आवाजाला शोभणारे नव्हते असा माझा स्वत:चा गोऽऽड गैरसमज होता. ह्या भानगडीत हे लक्षातच आले नाही की नाट्यसंगीत देखिल त्याच वळणाने शिकवले जाईल. त्यामुळे,मी नाट्यसंगीताच्या वर्गात जाऊन बसलो.

तिथल्या गुरुजींनी मला एखादे पद म्हणायला सांगितले. मी तयारीतच होतो.त्यावेळी नुकतेच मी रेडिओवर मंदारमाला नाटक ऐकले होते आणि त्यातील पं. राम मराठे ह्यांच्या जोरकस तानांनी('जबड्याच्या ताना' असे कुणीसे म्हटलेले मी ऐकले होते) मी भारावलो होतो. आजवर मी अनेक नामवंत गायकांच्या ढंगात त्यांच्या गाण्याची नक्कल(अहो नक्कलच ती! अस्सल यायला मी कुणाचा गंडा थोडाच बांधला होता) करत असे. अगदी हुबेहूब नसली तरी बर्‍यापैकी करत असे. तेव्हा ह्या वेळी रामभाऊंनी गायलेल्या अहिर भैरव रागातील 'जय शंकरा' ह्या पदाची झलक मी गाऊन दाखवली. त्यांच्या सारख्या जोरकस(?) ताना देखिल घेतल्या आणि गुरुजींनी थांबण्याची खूण केल्यावर थांबलो. माझे नाट्यसंगीत शिक्षण सुरू झाले आणि मला पहिलाच साक्षात्कार झाला तो म्हणजे गुरुजींचा आवाज! अहो भलताच मृदू होता आणि त्यांनी घेतलेल्या ताना तर अतिशय बुळबुळीत होत्या. हे असले गाणे माझ्या पचनी पडणारे नव्हते; पण काही झाले तरी ते गायन गुरुजी होते(आता एखाद्याचा आवाज असतो असा त्याला तो तरी काय करणार?) म्हणून त्यांच्या मागून मी माझ्याच आवाजात(त्यांच्या आवाजाची नक्कल न करता) गाऊ लागलो. पण.....त्यावेळी गाजलेल्या 'मत्स्यगंधा'(दि गोवा हिंदू असोसिएशनचेच नाटक होते) ह्या नाटकातील रामदास कामत ह्यांच्या बहारदार आवाजातील आणि अभिषेकी बुवांच्या उत्तमोत्तम चालीतील पदे जेव्हा गुरुजींनी चाली बदलून शिकवायला सुरुवात केली तेव्हा तर माझी खात्रीच पटली की आपले काही खरे नाही. अहो घोडवयात शिकताना हा असाच अनुभव येऊ शकतो असे माझे अनुभवांती झालेले मत आहे.

काय आहे की आपल्या कानांवर त्या त्या समर्थ गायकांनी गायलेल्या चीजांनी जे काही सुश्राव्यतेचे संस्कार केलेले असतात त्याच्याशी मग ह्या अशा प्रकारच्या गुरुजींच्या सामान्य प्रतीच्या गायनाची नकळतपणे तुलना होते आणि आपले गाणे शिकण्याकडे लक्षच लागत नाही. मेंदूमध्ये 'त्या' ताना आणि 'ह्या' तानांची तुलना होते आणि नकळतपणे आपल्या तोंडून 'त्या' ताना येतात आणि शिकण्याचा व शिकवण्याचा बट्ट्याबोळ होतो. ह्यात दोष गुरुजींचाही नसतो आणि माझ्यासारख्या कानसेनाचा(?) देखिल नसतो. पण त्याचे फलित म्हणजे नुसताच गोंधळ आणि गोंधळ! बाकी काही नाही! तरी देखिल मी काही दिवस तसेच रेटले आणि एक दिवस गुरुजींनीच मला सांगितले,"बाबा रे,तू हे नाट्यसंगीत शिकण्यापेक्षा रागदारी(शास्त्रीय) संगीत शीक . तुझ्या समजण्यात आणि माझ्या शिकवण्यात कुठेच एकसंधपणा नाही. राग शिकशील तर त्यातील चिजा शिकताना हा गोंधळ होणार नाही. तस्मात रागदारी संगीत शीक आणि नाट्यसंगीत शिक्षण इथेच थांबव. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी नाट्यसंगीत शिक्षणाला पूर्णविराम दिला आणि एकदाचा सुटऽलो!

ह्यानंतर माझ्या आयुष्यात संगीत शिकण्याचा योगच आला नाही. तसे अजून एकदोन ठिकाणी गेलो होतो पण मला त्या त्या व्यक्तींचे (गुरुजींचे) गाणे आवडले नाही म्हणून मी तिथे दाखलच झालो नाही. सर्वसाधारणपणे गुरु शिष्याची निवड करत असतो;पण माझ्या बाबतीत मी गुरुची निवड करत होतो आणि माझ्या दुर्दैवाने मला हवा तसा गुरु भेटलाच नाही. परिणामत: माझा 'रावसाहेब'(पुलंचा) झाला. गाण्याचे शास्त्र कळत नाही पण त्यातील सुर-बेसूर कळतात. ताल कळत नाही आणि स्वत: गाताना तर अवस्था अशी असते की 'टाळ-मृदंग पश्चिमेकडे' आणि 'माझे गाणे दक्षिणेकडे' असा एकूण मामला असतो. तालाचे भानच नसते. तसा माझा लहानपणापासूनचा कारभारच बेताल होता. म्हणूनच कदाचित मला संगीतातला ताल कधीच वश झाला नाही;पण एखाद्या गायकाचे गाणे अगदी रंगून ऐकताना देखिल तो एखादी छोटीशी अथवा लांबलचक तान घेऊन समेवर येताना मात्र ती 'सम' मला नेमकी जाणवते. हे कसे ते मला अजूनही कळले नाही. अहो साधा ठेका देखिल मला धरता येत नाही. मग तो भजनी ठेका असो वा अगदी आरतीमध्ये वाजवायच्या झांजांचा ठेका असो. तालाने माझ्यावर आजपर्यंत मेहेरबानी केलेली नाही.

ह्या तालावरूनच घडलेला हा किस्सा पहा...अशीच एक घरगुती मैफिल होती. त्यात गाणारे आणि वाजवणारे मात्र त्या त्या क्षेत्रातील दिग्गज होते. मी पण एक श्रोता म्हणून हजेरी लावली होती. प्रत्येकजण काही ना काही पेश करत होता आणि कार्यक्रम मस्तच रंगला होता. त्या ठिकाणी उपस्थित असलेली सर्वच लहान-थोर मंडळी माझी परिचित होती आणि त्यामुळे मलाही त्यांनी 'गा' असे म्हटले. तसा मी संकोची स्वभावाचा नव्हतो;पण ह्या सर्व संगीतातील बुजुर्ग मंडळींसमोर गायचे म्हणजे मला जरा जडच वाटत होते. पेटीवाल्याने लगेच विचारले,"पट्टी कुठली?"
आता आली का पंचाईत? मला पट्टी हा काय प्रकार आहे हे नुसते ऐकून माहीत होते. म्हणजे 'काळी चार' किंवा 'पांढरी पाच' वगैरे;पण ही पट्टी ठरवतो कोण आणि कसे? आणि त्याचा आपल्या आवाजाशी काय संबंध? काहीच माहीत नव्हते म्हणून मी आपले म्हटले,"मी,ते भीमसेन जोशी गातात ना तो 'देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल' हा अभंग गाणार आहे. तर त्याची(अभंगाची) जी पट्टी असेल ती पकडा."
ह्या माझ्या बोलण्यावर सगळ्यांनी मनसोक्त हसून घेतले आणि मग पेटीवाले म्हणाले,"हं,तू कर सुरुवात,आम्ही सांभाळून घेतो."
मी तबलजीना सांगितले(खूपच अनुभवी होते आणि वयोवृद्ध देखिल होते... पण हात जबरदस्त होता.),"काका, जरा सांभाळून घ्या. मी तबला-पेटीच्या साथीने आजपर्यंत कधीच गायलेलो नाही. तेव्हा मला हे कितपत जमेल माहित नाही."
काकांनी 'वत्सा तुजप्रत कल्याण असो' असा आवीर्भाव केला आणि मला म्हणाले,"हं,कर सुरुवात."
मी मग जरा उगीचच घसा खाकरुन साफ केला. जरा एकदोन घोट पाणी प्यायलो(म्हणजे अगोदरच घशाला कोरड पडली होती) आणि कुणाकडेही न बघता,मान खाली घालून जी जोर्दार सुरुवात केली की यंव! इकडे-तिकडे कुठेही न बघता,तबला-पेटीच्या साथीची पर्वा न करता दणदणीत (माझ्या मते) गाणं गायलो आणि गाणं संपवल्यावरच मान वर करून बघितले तो काय?तबलजी हात बांधून स्वऽऽस्थ बसले होते आणि पेटीवाले एक कुठली तरी पट्टी(काळी की पांढरी) धरून फक्त भाता हलवत होते.

एक क्षणभर सगळं शांत शांत होतं आणि मग एकेकाला कंठ फुटला. "अरे काय गातोस तू! जबरदस्त! आमची तर तिर्पीट झाली तुझ्याबरोबर वाजवताना." इति तबलजी.
पेटीवाल्यांनी देखिल सुरात सुर मिसळला. म्हणाले,"अरे मला पट्टीच सापडेना एव्हढा हा प्राणी नुसता धावत होता. कुठे थांबणे माहितच नाही ह्याला. अरे असे गातात का गाणे?"
मी म्हटले," मी तुम्हाला अगोदरच म्हणालो होतो की वाद्यांच्या साथीने गायची मला सवय नाही,तुम्ही सांभाळून घ्याल ह्या अपेक्षेने गायलो.खरे तर मी फक्त ऐकायलाच आलो होतो पण तुमच्या प्रोत्साहनाने जरा हुरुप आला आणि जे काही वेडेवाकडे येते तेच गायलो. पण मला वाईट वाटते की मी ह्या मैफिलीचा रसभंग केला. तेव्हा मला माफ करा."
सगळेजण मग माझी समजूत घालायला लागले. "अरे असे होते सुरुवातीला. नाउमेद व्हायचे कारण नाही. तुझ्याकडे गाणं आहे पण ते थोडे ताला-सुरात गायला शीक. तुझा आवाज चांगला आहे आणि थोडी डोळस मेहेनत केलीस तर तुला चांगले गाता येईल. प्रयत्न चालू ठेव."

मंडळी खरे सांगतो केवळ माझी समजूत काढण्यासाठीच ती सर्व मंडळी हे बोलत होती हे मला कळत होते आणि मुळात मला स्वतःच्या मर्यादांची जाणीव असल्यामुळे मी त्यानंतर कधीही अशा तर्‍हेने जाणकार लोकांच्यात गाण्याचा अट्टाहास केला नाही. गाण्यातील कोणत्याही तांत्रिक अंगाची माहिती नसलेला पण तरी देखिल अस्सल आणि नक्कल ह्यातील फरक समजणारा एक सर्वसामान्य श्रोता एव्हढ्यापुरतीच मी माझी भुमिका मर्यादित ठेवली. रागांची अथवा तालांची नुसती नावे माहित आहेत पण त्यातली तांत्रिकता अजिबात म्हणजे अजिबात माहित नाही. गाण्याचे प्रकार माहीत आहेत;म्हणजे जसे की ख्याल(विलंबित-द्रूत),ठुमरी-दादरा,टप्पा-तराणा वगैरे प्रकार ऐकायला आवडतात पण त्यातले बारकावे कळत नाही. तरी देखिल माझे कुठेही अडत नाही. कारण? मला संगीत मनापासून आवडते. अगदि सर्व प्रकारचे,मनाला प्रसन्न करणारे कोणतेही संगीत मला माझ्या जीवनाचा आधार वाटते.
रामदास कामत ह्यांनी गायलेल्या गाण्यातले शब्दच माझ्या जीवनाचे आधार आहेत....."संगीत रस सुरस मम जीवनाधार."

समाप्त!!!

1 टिप्पणी:

Yogesh म्हणाले...

साध्या शब्दात अतिशय सुंदर अनुभवकथन :))