अंथरुणावर पडल्या पडल्या दिवसभराच्या घटनांचा पट डोळ्यांसमोर उलगडत होता. दिवसभरातले उलटसुलट वागणे,महनीय व्यक्तींबद्दल अपुर्या ज्ञानातून केलेली टिकाटिप्पणी वगैरे सर्व गोष्टींची उजळणी करता-करता झोप कधी लागली कळले नाही.
कसल्या तरी हादर्याने मी धडपडून जागा झालो. उठून पहिला चष्मा लावला आणि पाहिले तर दिन्या स्वत:चा पलंग सोडून माझ्या बाजूला येऊन झोपला होता. मी त्याला त्याच्या जागेवर जाऊन झोपायला सांगितले. तो गयावया करून मला म्हणाला, बाप्पा,मी तुझ्या बाजूलाच झोपतो. मला सारखी भीती वाटतेय की तो राक्षस येऊन आपल्याला मारणार आहे. तू त्याला काय-काय बोललास. तो आता आपल्याला सोडणार नाही. आणि ती खिडकी पण बंद कर,त्याला गज नाहीत. तो तिकडून आत येईल!
मी त्याला समजावून सांगितले, अरे बाबा,आपण दुसर्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहोत,आणि तो राक्षस बाजूच्या बैठ्या घरात आहे.(त्या लॉजची रचना जरा वेगळीच होती. रस्त्याला लागून एका बैठ्या घरात काही खोल्या होत्या आणि काही खोल्या मागच्या बाजूला दुसर्या एका एकमजली इमारतीत होत्या. ह्या दोन्हींमध्ये एक छोटेसे अंगण होते). तो इथे कशाला धडपडायला येणार आहे. तू गुपचुप आपल्या जागेवर जाऊन झोप!
पण काही उपयोग झाला नाही. आमच्या बोलण्याच्या आवाजाने सुध्या आणि पद्या पण उठले. त्या दोघांना पण दिन्यासारखीच भीती वाटत होती;पण ते मोठ्या नेटाने आतापर्यंत झोपायचा प्रयत्न करत होते. दिन्याचे बोलणे त्यांना पण पटले आणि सगळ्यांनी लांब-लांब झोपण्याऐवजी तीन पलंग एकत्र जोडून त्यावर एकत्र झोपावे असे त्या तिघांचे एकमत झाले. त्याप्रमाणे त्यांनी अजून दोन पलंग माझ्या पलंगाला जोडले आणि पटापट झोपी गेले. मला अशा तर्हेने झोपायची सवय नव्हती,म्हणून मी थोडावेळ बसूनच होतो. ते तिघे गाढ झोपल्याची खात्री झाल्यावर मी त्या वेगळ्या राहिलेल्या पलंगावर जाऊन अंग टाकले. थोड्या वेळात मला पण झोप लागली.
मला जाग आली तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते. मी उठून प्रात:र्विधी उरकले आणि खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा अजूनही दिल्ली झोपेतच होती. त्या इमारतीच्या बाजूला अशाच छोटेखानी इमारती दाटीवाटीने उभ्या होत्या. क्वचित एक-दोन ठिकाणी जागही दिसत होती. मी हळूच दरवाजा उघडून बाहेर गेलो. बाहेर त्या लॉजचा नोकर आपले अंथरूण आवरत होता. चहा कुठे मिळेल ह्या माझ्या प्रश्नावर आमच्यात पुढील संवाद झाला.
मी: यहां चाय कहां मिलेगा?
तो: साब, इतने जल्दी आपको इधर किधर भी चाय नही मिलेगा.
मी: तो इस वक्त चाय कहां मिलेगा? तुम नही पिला सकते क्या?
तो: नही साब हमारे यहां ८बजे के बाद ही चाय मिलेगा. आपको अभी पिनी है तो नई दिल्ली ठेसन जाना पडेगा.
मी: वो तो बहुत दूर है यहांसे.
तो : नही साब खाली तीन मिनट का रास्ता है.
मी: चलो, मेरेको दिखाओ.
तो मला खाली घेऊन आला. तिथेच राक्षस आडवा घोरत पडला होता. त्याला ओलांडून आम्ही बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर त्याने मला तिथूनच नवी दिल्ली स्टेशन दाखवले. त्या लॉज पासून सहज चालत जाण्याएवढे ते अंतर होते; आणि रात्री सरदारजीने आम्हाला अर्धा तास दिल्ली फिरवून मग इथे आणले होते हे माझ्या लक्षात आले. मी त्या नोकराचे आभार मानले आणि नवी दिल्ली स्टेशनकडे निघालो.
मी तिथे माझ्या चालीने मोजून ५ मिनिटात पोचलो. स्टेशनवर बघितले तर जबरऽऽदस्त बंदोबस्त होता. पोलीस,रेल्वे पोलीस, एस.आर.पी वगैरेंमुळे स्टेशनाला छावणीचे स्वरूप आले होते. तिथेच स्टेशनाच्या आवारात बाहेरून आलेल्यांची हीऽऽ गर्दी होती. मी एका हमालाकडे विचारणा केली तेंव्हा कळले की सध्या दिल्लीतील यच्चयावत हॉटेले,लॉज,रेल्वेचे विश्रांतीगृह अशी सगळी ठिकाणे भरलेली असल्यामुळे लोकांना इथे रेल्वेच्या आवारात राहण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता. मनातल्या मनात त्या सरदारजीला धन्यवाद दिले. काल जर आम्ही हट्टाने बाहेर पडलो असतो आणि कुठेच जागा मिळाली नसती तर? तर कदाचित आमच्यावर देखिल हीच पाळी आली असती. असो. तिथेच चहा प्यायला. वर्तमानपत्र विकत घेतले आणि आता कुठेही जाण्याची घाई नसल्यामुळे रमतगमत,वाचतवाचत लॉजवर आलो. अजूनही तो राक्षस आणि माझ्याबरोबरचे कुंभकर्ण घोरत पडले होते.
वर्तमानपत्राचे पहिले पान तर आजच्या 'संसद भवनाला घेराओ' आणि तत्संबंधी बातम्यांनी ओसंडून वाहत होते. दिल्लीमध्ये सगळीकडे बंद पाळला जाणार होता. बस,रिक्षा,टॅक्सी तसेच सर्व खाजगी वाहने रस्त्यावर उतरणार नाहीत असे म्हटले होते. खान-पानगृहे सोडली तर इतर सर्व दुकाने बंद राहतील असे त्यात म्हटले होते. म्हणजे ’आमचे दिल्लीदर्शन बोंबलले म्हणायचे’ असा विचार मनात आला आणि मग आता काय करायचे हा यक्षप्रश्न आ वासून पुढे उभा राहिला.
साडेसातच्या सुमारास मंडळी उठली. प्रात:र्विधी उरकले. तोपर्यंत चहा आला. त्याचबरोबर नोकराने मालकाचा निरोप आणला की सकाळी ८ वाजल्यापासून(आत्ता ह्या घडीला साडेआठ वाजत होते) नवीन दिवस सुरू होतो तेंव्हा त्याचे भाडे भरायला या.
हे असले काही असते हे आमच्या पैकी कुणालाच माहीत नव्हते. माझा तर असा 'गोऽड' समज होता की काल रात्री बारा वाजता भरलेले खोलीचे भाडे आज रात्रीच्या बारावाजेपर्यंतचे असते. त्यामुळे मी निश्चिंत होतो; पण हा राक्षस आता आम्हाला काही स्वस्थ जगू देणार नाही असे दिसत होते. मी मित्रांना म्हणालो,गेलो आपण बाराच्या भावात! आता काय करायचे?
ते तिघेही माझ्यावर खेकसायला लागले. म्हणत होते की हे सगळे तुझ्या कालच्या नाटकामुळे घडत आहे. मी त्यांना समजवायचा प्रयत्न करत होतो पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काय असेल ते आता तूच निस्तर! असे म्हणायला लागले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा