माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२९ फेब्रुवारी, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ६

ताईंना एकच मुलगी होती.तिचे खरे नाव कधीच कुणाला लक्षात राहिले नाही कारण तिला सगळेच 'बेबी' म्हणत. बेबी माझ्या मोठ्या बहिणीपेक्षाही चार-पाच वर्षांनी मोठी होती. बेबी रंगाने ताईंसारखीच गोरी होती पण दिसायला मात्र सुंदर आणि नाजूक होती. ताईंही कदाचित त्यांच्या तरूणपणात सुंदर असतील, कुणास ठाऊक; पण आम्ही त्यांना पाहत होतो तेव्हापासून मात्र त्या बटबटीतच दिसत होत्या. ताईंचा आवाज पुरुषी आणि जाडा भरडा होता. त्याउलट बेबीचा आवाज अतिशय गोड होताच आणि मुख्य म्हणजे ती स्वभावाने अतिशय सोज्वळ आणि सौम्य होती. त्यामुळे आम्हाला नेहमीच हा प्रश्न पडायचा की बेबी ही ताईंची मुलगी होती तर त्यांच्या दिसण्या-वागण्यात इतका जमीन अस्मानाचा फरक कसा.

ताईंचे 'दादा' म्हणजे नवरा त्यांच्यापेक्षा खूपच वयस्कर होते.पण अंगा-पिंडाने दादा चांगलेच उंच आणि रुंद होते. कचेरीत जातानाचा त्यांचा रुबाब काही औरच होता. शर्ट-पॅंट, त्यावर कोट,पायात बूट, डोक्यावर गोल 'साहेबी हॅट'आणि डोळ्याला चष्मा. त्यावेळी त्यांच्याकडे पाहताना आम्हाला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती वाटत असे. मात्र दादा घरी असताना कमरेला धोतर, अंगात मलमलचा सदरा आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ ह्या व्यतिरिक्त अंगावर काहीच नसे. ह्या वेशात दादा अगदीच सोज्वळ आणि एखादे संत महंत वाटत. तसेही ते स्वामी समर्थांचे अनुयायी होतेच. त्यांच्या देवघरात स्वामी समर्थांची एक अतिभव्य तसबीर ठेवलेली होती. सुटीच्या दिवशी त्यांची पूजा-अर्चा तासंतास चालायची. घर सगळे धूप-उदबत्तीच्या वासाने भरलेले असायचे.वृत्तीने अतिशय भाविक असे हे दादा क्वचितच कुणाशी बोलत. पण ते बोलत तेव्हा त्यांचा तो 'धीरगंभीर आणि गडगडाटा' सारखा आवाज ऐकताच समोरचा मनुष्य त्यांच्यापुढे अगदी दीनवाणा व्हायचा.मात्र दादा कधी कुणावर रागावलेले मी तरी पाहिले नाही. तो सगळा मक्ता ताईंकडे होता.

अशा ह्या ताई-दादांच्या बंगल्यासमोर दिवाळीत रांगोळी काढायला बेबीला माझ्या बहिणीची मदत लागायची आणि बहिणीचे शेपूट बनून मीही तिथे जायचो. खरे तर ताईंसमोर जायची मला भिती वाटायची पण ताईंचा एकूणच आमच्या बाबतीत चांगला ग्रह असावा असे वाटते. कारण नेहमी त्यांच्या बोलण्यात ते जाणवायचे. कधीही काही संस्कारांचा विषय निघाला की त्या माझ्या आईकडे बोट दाखवीत. म्हणत, "विद्या(माझी बहीण)च्या आईचे संस्कार बघा. सगळी मुले कशी हुशार आहेत(हे जरा जास्तच होते. खरे तर आम्ही कुणीच म्हणावे असे हुशार नव्हतो. पण म्हणतात ना की वासरात.... तशी गत होती.). नेहमी सगळीकडे पुढे असतात.
अर्थात माझी बहीण आमच्या सगळ्या भावंडात हुशार होती हे मान्यच करायला हवे. त्यामुळेही असेल की 'गाड्याबरोबर नळ्याला यात्रा' ह्या न्यायाने आम्ही इतर भावंडेही हुशार ठरत असू. त्यात अजून एक भर म्हणजे बेबी अभ्यासात तशी यथातथाच होती. त्यामुळेही असेल कदाचित माझ्या बहिणीची हुशारी तिच्यापुढे जास्त उठून दिसत असावी. असो. तर एकूण काय तर ताईंच्या लेखी आम्ही सगळे हुशार होतो. त्याचा एक फायदा मला व्हायचा. मला त्यांच्या त्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसायला मिळायचे. मग ताई माझ्याकडून श्लोक,गाणी वगैरे म्हणवून घेत आणि त्या बदल्यात घसघशीत खाऊही देत. अशावेळचे ताईंचे रूप काही वेगळेच भासे. इतके झाले तरी माझी त्यांच्याबद्दलची भिती मात्र कधीच कमी होत नसे. कारण मधेच कधीतरी त्यांना तिथे कुणीतरी बागेत शिरतेय अशी चाहूल लागायची आणि त्या तिथूनच "थांब! आलो मी!" म्हणायच्या की इथे मी भितीने थरथर कापायला लागायचो. त्यांच्या लक्षात आले की लगेच त्या "अरे तुला नाही" असे म्हणून समजूत घालायचा प्रयत्न करायच्या. पण त्यांचे साधे कुजबुजणेही सहजपणे आल्यागेल्याच्या कानावर पडण्या इतपत मोठ्या आवाजात असल्यामुळे ओरडणे कसे असेल ह्याची कल्पना यावी. मी जात्याच घाबरट असल्यामुळे हळूच तिथून पळता कसे येईल ह्याची संधी शोधायचो.

ताई क्वचितप्रसंगी विनोदही करायच्या.त्यांना हास्य-विनोद वर्ज्य नव्हता. मात्र त्यांचे ते विनोद आणि त्या बरोबरचे त्यांचे ते गडगडाटी राक्षसी हास्य आम्हा पोरांना घाबरवून टाकत असे.त्याची ही एक झलक.
एकदा आम्ही सगळी भावंडं आईवडिलांसोबत भायखळ्याच्या राणिच्या बागेत(आताचे जिजामाता उद्यान)गेलो होतो. दिवसभर तिकडचे सगळे प्राणी-पक्षी बघून,मस्तपैकी खाऊन-पिऊन आणि मजा करून घरी परतलो. वाडीत शिरताक्षणी ताईंचा पहिला प्रश्न आला तोही सणसणत!
"काय? मग आज कुठे जाऊन आली मंडळी?"
त्यांच्या त्या गडगडाटामुळे आम्ही मुलं आई-वडिलांच्या मागे लपलो. पण माझ्या बहिणीने सांगितले(ती ताईंना विशेष घाबरत नसे. कारण बेबीशी मैत्री असल्यामुळे ती बराच वेळ तिथेच असायची)की "आम्ही आज राणीचा बाग बघायला गेलो होतो."
झालं. तिचे बोलणे संपले नाही तोच पुन्हा ताई गडगडाटल्या, "राणीचा बाग, तेथे मोऽऽठे मोऽऽठे वाऽऽऽऽघ!"
आणि स्वत:च स्वत:च्या विनोदावर गडगडाटी हसू लागल्या.
त्यांचे पाहून आम्ही मुलेही नाईलाजाने हसू लागलो आणि संधी साधून तिथून हळूच सटकलो.

२१ फेब्रुवारी, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ५

आमची वाडी खूप मोठी होती हे ह्या आधीच सांगितलेले आहे. तर ह्या वाडीतच एका बाजूला आमच्या वाडीच्या मालकांची खूपच मोठी एक बाग होती. त्यात अनेक प्रकारची फुलझाडे,वेली,फळझाडे, भाज्या, औषधी वनस्पती वगैरेंची रेलचेल होती. ह्या बागेचे वैशिष्ट्य हे होते की ह्यात लावलेली झाडे पद्धतशीर अथवा शिस्तशीर अशी लावलेली नव्हती. तर जिथे जशी जागा मिळेल तशी ती लावलेली होती. मात्र त्यातील विविधता इतकी होती की काही विचारू नका. बागेत एक छानशी विहीरही होती. हिच्याच पाण्यावर ती बाग पोसलेली होती.

मोठे वृक्ष म्हटले तर ताड-माड होतेच; वड-पिंपळ होतेच; बकुळ, चिंच, चिकू,पेरू,आंबा, फणस, केळी सारखी फळझाडं होती. विलायती चिंच,तुती सारखी क्वचितच आढळणारी झाडेही होती. भोपळा,शेवगा,दोडका,काकडी,टोमॅटो,कारली,वांगी,मिरच्या,अळू(भाजीचा आणि वड्यांचा आणि शोभेचा),तोंडली,भेंडी,मायाळू,नागवेल(विड्याची पाने) इत्यादी भाज्यांच्या वेली/झाडेही होती.
फुलझाडे आणि वेली तर विविध प्रकारच्या होत्या. गुलाब,मोगरा,जाई-जुई,चमेली,चाफा(ह्यातले जवळपास सगळे प्रकार म्हणजे हिरवा,पिवळा,पांढरा वगैरे), जास्वंदी(ह्याचेही बरेच प्रकार होते),सोनटक्का,कर्दळ(ह्यांची तर बने होती.),झेंडू,तगर,अनंत,गोकर्ण,सूर्यफूल,अष्टर,शेवंती,अबोली,गुलबक्षी,चिनी गुलाब अशी अनेकविध झाडे/रोपे/वेलींची रेलचेल होती.
शोभेची झाडेही भरपूर होती. त्यातच झिपरी(वेण्यांमध्ये जो हिरवा पाला घालतात ना ती), लाजाळू अशी नावे माहीत असलेली आणि नावे माहीत नसलेल्या असंख्य वनस्पती होत्या.
औषधी वनस्पतींमध्ये वाळा,माका,आघाडा,कोरफड,ब्राह्मी आणि अशा अनेक वनस्पती होत्या.
ह्या बागेला मालकांच्या बंगल्याजवळ प्रवेशद्वार ठेवले होते बाकी सर्व बाजूंनी तारांचे कुंपण घातलेले होते आणि त्याच्या जोडीला मेंदीची लागवड केलेली होती.

आमच्या वाडीत मुलांना तर तोटाच नव्हता. घरटी सरासरी तीन-चार मुले तर होतीच. त्यामुळे ह्या बागेवर आम्हा मुलांचा नियमित हल्ला असायचा. दगड मारून चिंचा,कैर्‍या,पेरू,चिकू वगैरे पाडण्यात आम्ही सगळे अव्वल होतो. पण व्हायचे काय की जी काही फळे पडत ती त्या बागेच्या आवारातच पडत. त्यात जायला एकच प्रवेशद्वार आणि तेही मालकांच्या बंगल्यासमोर असल्यामुळे त्यांची नजर चुकवून आत जाणे महा कर्मकठीण असे. त्यातही बागेचा माळी, मालकांचे इतर नोकर वगैरे मंडळींचा राबता असायचा. मग ती पडलेली फळे शोधायला बागेत जायचे तरी कसे? आमच्या वाडीच्या मालकीण बाई म्हणजे एक जंगी प्रकरण होते. मालक जातीने पाठारे-प्रभू समाजातले होते आणि ते रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त डेप्युटी डायरेक्टर होते. त्यांची पहिली पत्नी हयात नव्हती (जिला मी कधीच पाहिलेले नाही) म्हणून त्यांनी उतारवयात दुसरे लग्न केले होते आणि ती स्त्री(म्हणजे मालकीण बाई) जातीने कोळी होती. जाडजूड शरीरयष्टी, उंची अगदीच बेताची, बेडकासारखे बटबटीत डोळे आणि त्यावर लाल काड्यांचा जाड भिंगांचा चश्मा. लुगडे नेसणे खास कोळी पद्धतीचे आणि अंगात कोपरापर्यंत लांब बाह्यांचा पोलका.

ह्या बाईकडे नुसते डोळे वर करून पाहणेच आम्हाला भीतिदायक वाटायचे. त्यात तिचा तो भसाडा आणि राक्षसी आवाज. तिला नुसती चाहूल लागली की कुणीतरी बागेत शिरलंय; की ती असेल तिथून जोरात ओरडायची, "थांब! आलो मी!"
की त्याची पळता भुई थोडी व्हायची. ही बाई असून "आलो मी" असे का म्हणायची ह्याचे कोडे सुरुवातीला आम्हाला होते; पण पुढे कळले की कोळी जातीच्या बायका असेच बोलतात म्हणून. असो. तर अशा ह्या आमच्या वाडीच्या मालकिणीला आम्ही मुलेच काय तर मोठी मंडळी देखिल टरकून असत.

वाडीत शिरण्याचा रस्ताच त्यांच्या बंगल्याच्या दरवाज्यासमोरून होता. त्यामुळे वाडीत येणार्‍या जाणार्‍या सगळ्यांची खबर ह्या मालकिणीला.. ताईंना (ह्यांना समस्त भाडेकरू 'ताई' आणि मालकांना 'दादा' म्हणत) असायची. ताई तशा प्रेमळ होत्या पण त्यांचे प्रेमही पाशवी प्रेम होते. म्हणजे असे की प्रेमाने त्यांनी कुणाला हाक मारली तरी त्यात जरब जाणवायची. त्यामुळे आम्ही लहान मुले तर आईच्या पदरामागे नाहीतर वडिलांच्या मागे लपत असू.
आमच्या त्या मोठ्या वाडीत आमचे एकुलते एकच ब्राह्मणाचे (हल्लीच्या भाषेत सांगायचे तर 'भटाचे')कुटुंब होते. ब्राह्मणांचे त्यांना खूप कौतुक असावे असे वाटते; कारण त्यांचा देवही 'ब्राह्मणदेव'(त्यांच्या भाषेत 'बामणदेव) हा त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारापाशी एका छोटेखानी देवळात स्थानापन्न झालेला होता. त्यामुळेच की काय माझे वडील(ब्राह्मण आणि त्यातून आडनावाने देव) आणि माझी आई ह्यांच्याशी बोलताना ताई जरा(त्यातल्या त्यात हो !) नरमाईने बोलत.

ताई वाडीतल्या कोणत्याही स्त्रीला एकेरी संबोधत आणि वाडीतल्या सर्व स्त्रियादेखील त्यांना वडिलकीचा मान देत. घरात सगळ्याच कामांना नोकर-चाकर असल्यामुळे तसे ताईंना काहीच काम नसे. त्या त्यांच्या बंगल्याच्या प्रशस्त पडवीत खुर्ची टाकून बसलेल्या असत. बाहेरून येणार्‍या वाडीतल्या प्रत्येक स्त्रीची चौकशी केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्यामुळे सगळ्याच बायका आपल्या हातातील पिशव्या अथवा जे काही सामान असेल ते तिथेच खाली ठेवून दोन घटका तिथल्या ओट्यावर विसावत. मग ताईंच्या चौकश्या सुरू होत.
"कुठे गेली होतीस? काय आणलंस? काय भावाने आणलंस?" वगैरे वगैरे चौकश्या झाल्यावर आणि त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यावर मग त्या स्त्रीला जायची परवानगी मिळायची. ह्या चौकश्यांमध्ये कोण पाहुणे आले, कोण गेले, कोण आजारी आहे, मग औषध कोणत्या डॉक्टरांचे घेताय, घरात काय अडचण आहे, मुले नीट अभ्यास करतात की नाही असे सगळे बारीक-सारीक विषयही असत. ताईंच्या ह्या सवयीमुळे एक फायदा होत असे, सहसा वाडीत अनोळखी माणूस शिरत नसे. तसेच वाडीतली लहान मुलेही वाडीच्या बाहेर जाण्याची एकट्याने हिंमत करत नसत. एक प्रकारचा दरारा त्यांनी निर्माण केलेला होता. अर्थात त्यामागे वाडीतल्या आपल्या भाडेकरूंबद्दल आत्मीयता देखिल असायची. एका मोठ्या कुटंबाच्या कर्त्या स्त्री प्रमाणे त्या सगळीकडे लक्ष ठेवून असत. वेळप्रसंगी मदतही करत.
झाडाचे नारळ, आंबे, फणस ,केळी वगैरे फळे उतरवली की प्रत्येक घरी ती नोकरांच्या मार्फत जातीने पोचवली जात. त्यात दूजाभाव नसे.
सुरुवातीला भाडे घ्यायला ताई प्रत्येकाच्या घरी स्वतः जात. पुढे पुढे मग लोकच त्यांना त्यांच्या घरी भाडे नेऊन द्यायला लागले.
दरवर्षी न चुकता ताई नोकरांकरवी वाडीतल्या प्रत्येक घराला पिवळी (पिवळा चुना) फासून देत. त्या निमित्ताने मग आमची वाडी नव्याने चमकायला लागायची.

२ फेब्रुवारी, २००८

बालपणीचा काळ सुखाचा! ४

मुलींमध्ये खेळून मी त्यांच्या खेळात प्रवीण झालो होतोच पण त्यामुळे मुलांच्या खेळात आपोआप कच्चा लिंबू ठरायचो. मुले(मुलगे) माझ्याशी खेळताना सहज जिंकत. गोट्या,बिल्ले,सिगारेटची पाकिटे हे सगळे खेळ खेळताना मी नेहमीच हरायचो. ह्या खेळात एक छोटेसे रिंगण आखून त्याच्यापासून थोड्या अंतरावर एक आडवी रेषा आखली जायची. तिथे बसून मग ज्या वस्तूने(एका वेळी गोट्या तर गोट्या अशा पद्धतीने) खेळत असू(गोट्या,बिल्ले,सिगारेटची पाकिटे वगैरे)त्या वस्तू रिंगणात टाकायच्या.त्यापैकी एक जरी गोटी रिंगणाबाहेर गेली तरी आपला डाव गेला. मग दुसर्‍याने तसेच करायचे. पण जर का सर्व गोट्या रिंगणातच राहिल्या तर त्यातील एक गोटी आपला प्रतिस्पर्धी बोटाने दाखवत असे . नेमकी ती गोटी सोडून इतर कोणत्याही एकाच गोटीला आपल्या हातात असणार्‍या गोटीने नेम धरून मारायचे आणि त्या दोन्ही(हातातील आणि जिला मारतोय ती)गोट्या इतर दुसर्‍या कोणत्याही गोट्यांना स्पर्श न करता रिंगणाबाहेर घालवल्यास तो डाव जिंकता येत असे असे.पण माझा नेम कधीच लागत नसे आणि मी नेहमीच त्यात हरायचो.गोट्यांनी खेळायचे इतरही बरेच खेळ होते. आणखी एका खेळात मातीत छोटा खड्डा करून(त्याला आम्ही ’गल अथवा गील’ म्हणत असू) खेळण्याचा खेळ होता. त्याला ’गलगोप’ म्हणत. तसेच अजून एक ’कोयबा’ नावाचा खेळ होता. अजून बरेच होते पण त्यांची नावे आता विसरलो.

हे खेळ मी जरी सहजतेने हरत असायचो तरी मला त्याचे विशेष वाईट वाटायचे नाही. पण काही मुले,विशेष करून माझ्यापेक्षा थोडी मोठी मुले मला त्यांच्यात खेळायला घ्यायची नाहीत त्याचे मात्र वाईट वाटायचे. मी मुलींच्यात जास्त खेळायचो म्हणून मला काही मुलींप्रमाणे ही मुले देखिल "मुलीत मुलगा लांबोडा,भाजून खातो कोंबडा" असे चिडवायचे. ह्या चिडवण्याचे मला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे हळूहळू माझे मुलींच्यातले खेळणे कमी होऊन मी मग मुलांचे असे मानले गेले क्रिकेट, आबादुबी, लगोरी, भोवरेबाजी, तारघुसणी(हा खेळ केवळ पावसाळ्यातच खेळता येत असे) हुतुतू वगैरे खेळ खेळायला लागलो.अर्थात ह्यात मी लिमलोणचाच असायचो. हल्लीच्या भाषेत ’चिरकुट’(अहो ऑर्कुट नव्हे हो)!

माझ्या अजून एक लक्षात आले की मोठी मुले आपापसात काही तरी सतत कुजबुजत असत पण मी त्यांच्या जवळ गेलो की ती गप्प बसत किंवा विषय बदलत. असे बर्‍याच वेळा होत असे. "तुम्ही काय बोलता ते मलाही सांगा ना?" असे मी म्हटले की ते मला नेहमी "तू लहान आहेस अजून. तुला कळणार नाही!" असे म्हणायचे. मग मी खट्टू होत असे. खरे तर आता मी पाचवीत गेलो होतो म्हणजे तसा लहान नव्हतो; पण ह्या मुलांच्या लेखी मी लहानच होतो. मग एक दिवशी मी हट्टच धरला. त्यांना म्हटले, " मी आता लहान नाही. तुम्ही काय बोलता ते मलाही सांगा!"
त्यावर बरेच आढेवेढे घेत एकाने सांगितले,"तू मोठा झालास ना? मग सारखा त्या मुलींच्यात का खेळतोस?"
मग त्यावर माझे उत्तर असे होते, "लांब केस आणि कपड्यातला फरक सोडला तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? आणि का नाही खेळायचे त्यांच्याशी? मला आवडते. ते खेळही आवडतात म्हणून मी खेळतो."
त्यांनी एकमेकांकडे हसून पाहिले आणि त्यातला एकजण म्हणाला, "जा आता! म्हणूनच म्हटले की तू अजून लहान आहेस!"
नेहमीप्रमाणेच मी खट्टू झालो पण हे सारखे सारखे असे का बोलतात? हे जाणून घ्यायचेच असे ठरवले आणि त्यांच्या खनपटीस बसलो. मी म्हटले,"आज जर तुम्ही मला सांगितले नाही तर मी माझ्या आणि तुमच्या आईबाबांना तुमचे नाव सांगेन!"
ह्यावर ते सगळे हसायला लागले. पण मग त्यातल्या एकाने मला विश्वासात घेत "मी सांगितले असे सांगणार नसशील तर" ह्या अटीवर माझ्या कानात सांगितले.त्याने जे सांगितले ते सगळे नीटसे कळले नाही पण काही तरी विचित्र मात्र वाटले. मग मी पुन्हा खोदून खोदून त्यांना विचारल्यावर त्यांनी मला ते ’गुपित’(मुलगा आणि मुलीतला शारीरिक भेद) सांगितले. ते ऐकून माझ्या भावविश्वाला प्रचंड तडा गेला होता तरी ते तसे असेलच हे मानण्याची माझी अजिबात मानसिक तयारी नव्हती.
"पण मग हे लोक इतक्या आत्मविश्वासाने कसे सांगतात?" हा प्रश्न काही मला स्वस्थ बसू देईना. आता ह्याचा काही तरी सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे हे माझ्या मनाने घेतले. पण कसे? ते मात्र कळेना.

एक दिवस असाच मी खेळत असताना माझ्याबरोबरची एक मुलगी जरा आडोशाला गेली. ती तिथे काय करते आहे हे लक्षात येताच माझ्या मनात ठाण मांडून बसलेल्या प्रश्नाचा किडा डोक्यात वळवळू लागला. आपल्याला त्या मुलांनी जे काही सांगितले त्याची आता शहानिशा करता येईल असे वाटून त्याच ओघात मी तिच्या दिशेने जायला लागलो. हे तिच्या लक्षात आले आणि ती आपले कपडे सावरीत आणि रडत रडत पळाली. ती अशी का गेली ते मला काही कळले नाही म्हणून मी तिला "अग थांब! थांब!" असे म्हणत चार पावले तिच्या मागे गेलो. पण ती केव्हाच पसार झाली. "जाऊ दे झालं!" असा विचार करून मी पुन्हा खेळात गुंतलो.

ती मुलगी थेट तिच्या घरी गेली आणि तिने माझी तक्रार तिच्या आईकडे केली.तिची आई तिला घेऊन माझ्या आईकडे आली आणि झालेला प्रकार तिने माझ्या आईला सांगितला. दूरून मी हे पाहत होतो.मी नेमके काय चुकीचे केले हे मला समजत नव्हते त्यामुळे मी तसा बिनधास्तच होतो. पण आईने जेव्हा मला हाक मारून बोलावले तेव्हा तिच्या आवाजातली ’जरब’ जाणवून हे लक्षात आले की आपले काही तरी चुकले असावे आणि आता मार खावा लागणार. एरवी आईने हाक मारल्याबरोबर लगेच घरी परतणारा मी आज मात्र तिथेच उभा राहून पुढे काय घडणार आहे त्याचा अदमास घेत होतो. आतापर्यंत आईच्या हातात छडी आलेली होती आणि ती माझ्याच दिशेने चाल करून येत होती हे पाहिले मात्र, मी तिथून पोबारा केला. लगेच माझ्या आईने तिथे असलेल्या इतर मुलांना आणि माझ्या दोघा भावांना मला पकडून आणायला पाठवले. ह्या सगळ्यांना मी बराच वेळ गुंगारा दिला पण अखेरीस त्यांच्या तावडीत सापडलो आणि मग त्या सगळ्यांनी मिळून मला आईसमोर नेऊन उभे केले.

आधीच आईचा राग धुमसत होता त्यात मी पळून जाऊन निष्कारण तेलच ओतले होते. तिच्या समोर मला उभे करताच तिने मला बेदम मारझोड करायला सुरुवात केली. मी फटके वाचवायचा प्रयत्न करत होतो पण आईचा नेम अजिबात चुकत नव्हता. सटासट फटके बसत होते आणि मी अगदी लोळागोळा होईपर्यंत आई मला मारत होती. तोंडाने ती मला आणि स्वत:लाही दोष देत होती. "हेच संस्कार केले काय तुझ्यावर? आता मला तोंड दाखवायला कुठे जागा ठेवली नाहीस! माझंच नशीब फुटकं म्हणून तुझ्यासारखा दिवटा माझ्या पोटी आला!" असे म्हणत ती अजून जोरात फटके मारत होती.(हा मार खातानाही मला माझे (चुकले तर खरेच)नेमके काय चुकले हे कळत नव्हते; पण ते विचारण्याची माझी हिंमत नव्हती ) शेवटी आजूबाजूला जमलेल्या आयाबायांना माझी दया आली आणि त्यांनी माझ्या आईच्या हातातली छडी काढून घेतली आणि त्या तिला घरात घेऊन गेल्या. त्या दिवशी सबंध दिवसभर मला जेवायला मिळाले नाही आणि माझ्याबरोबर आईने स्वत:ला देखिल तीच शिक्षा करून घेतली.

ह्या सर्व प्रसंगामुळे माझ्या मनात स्त्रियांविषयी प्रचंड भिती आणि अविश्वास निर्माण झाला. त्याचेच प्रत्यंतर म्हणजे माझे मुलींच्यातले खेळणे अजिबात बंद झाले. इतकेच नाही तर आई,बहीण आणि शाळेतल्या शिक्षिका सोडल्यास(त्याही नाईलाज म्हणून) अन्य कोणत्याही, अगदी काकी,मामी,मावशी वगैरे नात्यातल्या इतर स्त्रियांशी देखिल मी बोलायला प्रचंड घाबरत असे.इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे मान वर करून बघण्याचीही हिंमत मी करत नसे.स्त्रियांबद्दल एक प्रकारची अढीच माझ्या मनात घर करून बसली.पुढे जशी अक्कल आली तेव्हा मला कळले की मी किती ’गंभीर’ चूक केली होती आणि त्यावरची आईने केलेली शिक्षा किती योग्य होती ते.

अर्थात झाले ते एका दृष्टीने चांगलेच झाले. कारण आईच्या ह्या शिस्तीनेच मी वेळोवेळी सावरलोय.मी स्त्रियांशी बोलत नव्हतो किंवा त्यांच्याकडे नजर वर करून पाहण्याची हिंमत करू शकत नव्हतो तरीही स्त्री-पुरुषांमधले नैसर्गिक आकर्षण मला स्वस्थ बसू देत नव्हते.परंतू ह्या झालेल्या प्रसंगाचा एक फायदा नेहमीच झाला की एखाद्या स्त्रीबद्दल मनात आकर्षण उत्पन्न झालेच तर मला सर्वप्रथम माझ्या आईचा ’त्या’ वेळचा तो क्रुद्ध चेहरा नजरेसमोर दिसत असे आणि इतर विचारांना बाजूला सारून साहजिकच माझे मन ताळ्यावर येत असे. मी माझे लग्न ठरेपर्यंत कोणत्याही स्त्रीच्या वाटेला गेलो नाही(अर्थात तसा प्रसंग कोणत्याही स्त्रीने देखिल येऊ दिला नाही हेही तितकेच खरे)आणि आज माझी पत्नी हयात नसतानाही त्याचे पालन करू शकतोय ह्याचे कारण त्यावेळी झालेली ती शिक्षाच होय. त्या विशिष्ट प्रसंगी मला आईचा खूप राग आला होता पण आज मागे वळून पाहताना नक्कीच जाणवते की तिच्या त्या शिक्षेनेच मी नेहमी सन्मार्गावर राहिलोय.

पुरुषाच्या उच्छृंखतेला आवर घालण्याची शक्ती केवळ स्त्री मध्येच आहे. मग ती आई,बहीण,पत्नी अथवा इतर कोणत्याही स्वरूपातली असो.