माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२५ फेब्रुवारी, २००९

सहल: किल्ले रायगड आणि शिवथरघळची!


क्षत्रिय कुलावतंस,गोब्राह्मणप्रतिपालक,हिंदूपदपातशाही संस्थापक,सिंहासनस्थ छत्रपती शिवाजी महाराज!


रायगडाच्या पायथ्याशी.


रायगडाकडे कूच!


अचानकपणे रायगड दर्शनाचा योग चालून आला आणि त्याबरोबरीनेच समर्थांच्या शिवथरघळीचेही दर्शन घडले. आमच्या मालाड मधील ’प्रयोग’ ह्या नाट्यकलाप्रेमी संस्थेने दिनांक २०-२१ फेब्रुवारी २००९ ह्या दोन दिवसांसाठी हा योग जुळवून आणला होता. जावे की न जावे ह्याबद्दल माझ्या मनात संभ्रम होता. कारण होते दुखावलेले पाऊल,जे अधून मधून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. पण रायगडावर जाण्यासाठी रोपवेची सोय आहे हे कळले आणि मग मी जाण्याचा निर्णय नक्की केला. आम्ही सर्व मिळून ३०-३५ जण होतो. आम्हाला रायगड आणि शिवथरघळीची ऐतिहासिक माहिती देण्यासाठी डोंबिवलीहून एक खास व्यक्ती येणार होती. त्यांचे नाव होते श्री. सुरेश ग. वाडकर(गायक वाडकर नव्हेत!). मालाडहून खास बसने आम्ही सकाळी ६.३०ला निघालो. वाटेत नागोठणे येथे कामत ह्यांच्या उपाहारगृहात न्याहारी केली आणि मग तिथून रायगडाकडे प्रयाण केले. वाटेत माणगावला रहदारीची कोंडी झाल्यामुळे आम्ही नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीरा पोचलो.
रायगडाच्या पायथ्याशी पोचल्यावर आमच्यापैकी फक्त पाचजण(मी धरून)रोपवेने वर चढले,तर बाकीचे सर्वजण पायी चढून आले.
दूपारचे जेवण झाल्यावर मग आम्ही जेव्हा रायगड दर्शनाला निघालो तेव्हा संध्याकाळचे ४ वाजून गेले होते,म्हणून फक्त महत्वाच्या गोष्टीच पाहण्याचे ठरवले. त्यात मुख्य म्हणजे महाराजांच्या राण्यांच्या राजवाड्याची जागा,बाजारपेठ,राज्यारोहण जिथे झाला ती जागा,जगदीश्वर मंदीर वगैरे ठिकाणे होती. त्यानंतर आम्ही महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मुजरा केला. प्रत्येक जागेचे ऐतिहासिक महत्व आणि त्याबद्दलची माहीती सुरेश वाडकर देत होते. हे सगळे करेपर्यंत सुर्यास्त झालेला होता. त्यामुळे मग आम्ही आमच्या निवासस्थानाकडे निघालो. वाटेत अंधारात पायर्‍या उतरतांना मधेच एका ठिकाणी माझे पाऊल पुन्हा दुखावले गेले पण सुदैवाने फारसे नुकसान नाही झाले. माझ्या मुलीच्या आधाराने आणि इतर लोकांच्या सहकार्याने मी इच्छित स्थळी सुखरूप पोचलो.
त्या रात्री आमचा मुक्काम रायगडावरच होता. रात्री जेवणं झाल्यावर विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला. त्यात माझ्यासकट बर्‍याच जणांनी आपले गुण प्रकट केले.

दुसर्‍या दिवशी सकाळी आंघोळी करून,न्याहारी उरकून मग आम्ही रायगड उतरलो आणि शिवथरघळीकडे प्रस्थान केले.





दोरखंड मार्ग म्हणजेच रोप-वे!
फक्त चार मिनिटात वर पोचलो आणि नंतर तसाच खालीही उतरलो. ;) अशी चढ-उतार करण्यासाठी शुल्क आहे रुपये १५०/-(एकतर्फी रु.७५/-). ह्या यानातून वर-खाली करतांना खालचे विहंगम दृष्य नुसते पाहातच राहावे असे वाटते. पण ज्यांना चक्कर(व्हर्टिगो) वगैरेचा त्रास असेल त्यांनी मात्र ह्यात बसू नये.


रोपवे मधून दिसणारे खालच्या परिसराचे विहंगम दृष्य!



आमच्यातले पायी चढून येणारे विश्रांतीसाठी एका ठिकाणी टेकलेत तो क्षण!


रायगडावरून टिपलेला सुर्यास्त!


मेघडंबरीच्या मखरात टिपलेले सुर्यास्त-बिंब!



एक अवलिया...रायगडचा वारकरी आणि आमचे मार्गदर्शक श्री. सुरेश ग. वाडकर.
ह्यांनी १००८ वेळा पायी रायगडारोहण करण्याचा संकल्प केलेला आहे आणि आमच्या बरोबर ते आले ती त्यांची ६५४वी खेप होती.
ही व्यक्ति रायगड प्रेमाने वेडी झालेय. हे गृहस्थ डोंबिवलीत राहतात आणि त्यादिवशी ते डोंबिवलीहून सतत पायी प्रवास करून रायगडावर पोचले होते. रायगडाचा इतिहास त्यांना मुखोद्गत आहेच पण त्यांच्या बरोबरीने यथासांग रायगड जर बघायचा असेल तर किमान ५-६ दिवस रायगडावर वास्तव्य कराबे लागेल. त्यांना पक्षांची भाषा कळते असे त्यांच्याकडून कळते. आमच्यातले जे लोक वाडकरांबरोबर पायी चढले त्यांना प्रात्यक्षिकही पाहायला मिळाले. ह्या सद्गृहस्थाचे हस्ताक्षर पाहून थक्क व्हायला होते. त्यांनी लिहिलेली रोजनिशी पाहिली तेव्हा त्यातील हस्ताक्षर अगदी छापल्यासारखे सुंदर होते. कोणतेही पान उघडले तरी त्यावरील अक्षरात अजिबात फरक दिसत नाही इतके ते अचूक आणि नेमके होते. ह्यांचे छायाचित्रणही अतिशय देखणे असते. तसेच चित्रकला,काव्य वगैरेमध्येही त्यांची गती विलक्षण आहे. इतकेच नाही तर क्रिकेटमध्येही ते पारंगत आहेत. यष्टीरक्षणात त्यांना विशेष प्रावीण्य आहे असे त्यांनीच सांगितले. आमच्या चमूतील सगळे आबाल-वृद्ध त्यांच्या उपस्थितीने भारावून गेलेले होते. त्यांच्या सततच्या रायगड आणि इतर दूर्ग भ्रमणामुळे मी त्यांना त्यांचे वाडकर हे आडनाव बदलून त्याऐवजी गडकर असे आडनाव करावे अशी सूचना केली. :) बालचमूने तर त्यांचे नामकरण ’रायगडकाका’ असेच केले आहे.


गड चढताना...खाली दिसणारे विहंगम दृष्य!


रायगडच्या बाजारपेठेत!


बाजारपेठेतून फेरफटका!



शिवथरघळीच्या तोंडाशी!


शिवथरघळ!


घळीच्या बाजूचा धबधबा. सद्या कोरडा पडलाय. पावसाळ्यात मात्र हा ओसंडून वाहतो असे आमचे मार्गदर्शक सांगत होते. इथेच समर्थांनी तपश्चर्या केली. त्यावेळी घनदाट जंगल होते. तसेच तिथे वाघ सिंहांसारखी हिंस्र श्वापदे,तसेच सरपटणारे विषारी प्राणी ह्यांचेही वास्तव्य होते. ह्या ठिकाणी आता समर्थ आणि त्यांचा पट्टशिष्य कल्याणस्वामी ह्यांचे पुतळे आहेत. समर्थ दासबोध सांगताहेत आहेत आणि कल्याणस्वामी तो लिहीण्याचे काम करताहेत असे दृष्य आहे.
विशेष म्हणजे बाहेर प्रचंड उकाडा होता तरी घळीच्या आत मात्र मस्तपैकी थंडगार वातावरण होते.


टीप: आजवर हजारो लोकांनी रायगडाची विविध कोनातून काढलेली छायाचित्रे महाजालावर प्रकाशित केलेली असल्यामुळे तशा प्रकारची छायाचित्रे मी जाणीवपूर्वक प्रकाशित करत नाहीये.कारण त्यात वेगळेपणा असा काही जाणवणार नाही असे मला वाटते.

५ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

काका उत्तम वर्णन केलं आहात रायगडचं, मला तर रायगडला जाऊन आल्यासारखं वाटलं...फोटोही छान काढले आहेत.

जयश्री म्हणाले...

अरे वा..... मस्तच झालेली दिसतेय सहल.... दुख-या पायाने खरं तर धाडसंच केलं म्हणायचं !!
फोटोत एकदम देखणे दिसताहात :)

प्रमोद देव म्हणाले...

वैशाली आणि जयश्री,आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा दोघींना मनापासून धन्यवाद!
ह्यातली पहीली तीन छायाचित्रं ’प्रेषित’ नावाच्या एका तरूणाने काढलेली आहेत.
बाजारातले पाठमोरे छायाचित्र ’मुग्धा’ नावाच्या मधुराच्या मैत्रिणीने काढलेले आहे.
बाकी सर्व छायाचित्र मधुराने काढलेली आहेत.
>>>फोटोत एकदम देखणे दिसताहात
जयश्री,ही कॅमेरा आणि मधुराची कमाल आहे.
एरवी मी कसा आहे ते तू प्रत्यक्ष पाहिलेले आहेच.
:)

navling Dhumal म्हणाले...

Kaka
i also gone for trip to Raigad & the experience was so interesting but i cant explain it as well as u can really the nice one

Amit म्हणाले...

nice


marathi kavita