माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२७ नोव्हेंबर, २००७

श्वना!

हे व्यक्तिचित्र ह्याआधी मायबोलीच्या ’हितगुज दिवाळी २००७" च्या अंकात प्रकाशित झालेले आहे.


"झालेत?" (झेंडू मधल्या झ चा उच्चार)
"भिजवलेत?" (जवान मधला ज चा उच्चार)?
"टॅम हाय?"
निरनिराळ्या वेळी येणार्‍या अशा निरनिराळ्या हाकांचा मालक म्हणजे 'श्वना'! नाव ऐकून गोंधळ होतोय ना! अहो होणारच! कारण असे कुणाचे नाव मी सुद्धा अजून पर्यंत ऐकलेले नाहीये. मग हा श्वना कोण? ऐकायचंय तर ऐका!

बाणकोटचा बाल्या सरळ मुंबईत आला तो आमच्या गावात म्हणजे मालाडला(मुंबई).तो इथे आला म्हणण्यापेक्षा आणला गेला. मला काही कळायच्या आधीपासूनच तो आलेला होता म्हणजे माझ्यापेक्षा चांगलाच मोठा होता(तरीही सगळे त्याला एकारान्तीच हाक मारायचे). त्याचे लग्न झालेले होते. एकदोन मुलेही होती; पण हे सगळे कुटुंब गावीच असायचे. क्वचित प्रसंगी दोनचार दिवस मुंबईला येत तेवढेच.
आम्ही ज्या चाळीत राहात होतो त्या चाळीच्या मालकांकडे हा घरगडी म्हणून होता.पण फावल्या वेळात आणि मालकांच्या परवानगीने वाडीतल्या एकदोन घरांतील धुणी-भांडी करत असे. सकाळी त्याच्या दोन फेर्‍या होत असत. एक १०च्या सुमारास कपडे धुण्यासाठी.
"भिजवलेत?" ह्या त्याच्या हाकेने त्या घरातल्या गृहिणीला साद घातली जात असे. मग साधारण एक-दीडच्या सुमारास जेवणं "झालेत?" अशा तर्‍हेची साद असायची आणि रात्री साडेआठ-नवाच्या सुमाराला "टॅम हाय?" अशा त्याच्या साद घालण्याच्या वेळा आणि पद्धती ठरलेल्या होत्या.

जेमतेम पावणे पाच फूट उंच,काळा कुळकुळीत पण तुकतुकीत रंग,रापलेला तरीही हसमुख चेहरा, अंगमेहनतीची कामे करून झालेली पीळदार पण कृश(मांसल नसलेली) शरीरयष्टी असणार्‍या ह्या श्वनाचा अंगात जाळीचा बनियन आणि कमरेला निळ्या रंगाची अर्धी चड्डी असा बारा महिने तेरा काळचा गणवेश होता. त्यात क्वचित बदल असे तो खूप थंडी असेल तेव्हाच. तो म्हणजे डोक्याला मफलर बांधणे इतकाच. धुण्या-भांड्याला थोडा अवकाश आहे असे कळले की मग खिशातून विडी-काड्यापेटी काढून त्याचे अग्निहोत्र सुरु व्हायचे.

ह्याचे खरे नाव 'यशवंत' असे होते; कधी मधी तो, आधीची हाक ऐकू गेली नाही असे वाटले की "यशवंता आलाय" असे ओरडायचा. आम्हा मुलांना त्याचा उच्चार 'श्वना' असाच ऐकायला यायचा. कदाचित तो त्याच्या बोलण्यातला अथवा आमच्या ऐकण्यातला दोष असावा; पण आम्ही मुले त्याला 'श्वना' च म्हणायचो आणि त्याबद्दल त्याची कधीच तक्रार नसायची.
आमच्या चाळीच्या पुढे मोठे अंगण होते आणि त्यात एक मोठे बकुळाचे आणि चिंचेचे झाड होते. श्वना भांडी अंगणात त्या झाडांखाली बसून घासायचा. त्याचे ते भांडी घासणे पण 'खास' असायचे. मी तर त्याच्या समोर बसून त्या सगळ्या क्रिया मंत्रमुग्ध होऊन पाहात असे. मधे मधे त्याच्याशी गप्पा देखील मारत असे. माझे बघून कधी तरी वाडीतली इतर मुलेही तिथे येत. श्वना आमची थट्टा मस्करी करायचा आणि आम्हालाही ते आवडायचे.

भांडी आणि पाण्याची बादली घेऊन श्वना अंगणात आला की मी त्याच्या जवळ जायचो.एका हातात भांड्यांचा डोलारा सावरत (मारुतीने द्रोणागिरी कसा उचलला होता त्या स्टाईलीत) आणि दुसर्‍या हातात पाण्याने भरलेली बादली.अशा अवस्थेत श्वनाचे ते दंडाचे आणि पोटर्‍यांचे फुगलेले स्नायु पाहिले की मला तो साक्षात बजरंगबलीच वाटायचा. प्रथम तो सगळ्या भांड्यांवर थोडे थोडे पाणी शिंपडून ती ओली करायचा. मग त्यातलीच एखादी छोटी वाटी नीट घासून घेऊन ती एका पायाच्या टाचेखाली ठेवायचा. नंतर मग नारळाची शेंडी पाण्याने ओली करून आणि तिला माती फासून भांडी घासायला सुरुवात करायचा. त्यातही एक विशिष्ट पद्धत होती. सुरुवातीला चिल्लर चमच्या-वाट्यांपासून सुरुवात करून सर्वात शेवटी तो ताटं घासायचा. मोठी भांडी घासताना तो थोडा जोर लावत असे. तो जोर लावतेवेळी जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला त्याच्या त्या टाचेखाली वाटी ठेवण्याचे रहस्य कळले.त्यामुळे कमी जोर लावून भांडे लवकर स्वच्छ घासले जाई.

भांडी विसाळताना तो उलट्या क्रमाने विसाळायचा. म्हणजे आधी मोठी आणि पसरट ताटं,मग पातेली ,मग तांबे,पेले,वाट्या,कालथे,डावले-चमचे वगैरे. त्यामुळे व्हायचे काय की विसाळलेली भांडी एकात एक नीट रचता यायची आणि उचलून नेण्यात सहजता यायची. माझ्या त्या बालपणी स्टेनलेस स्टीलचा नुकताच जन्म झालेला होता त्यामुळे बहुसंख्य घरातून अजूनही तांब्या-पितळ आणि ऍल्युमिनियम(जर्मन असेही काही लोक म्हणत)ह्या धातुंची भांडी वापरली जात. श्वनाने घासलेली ती भांडी इतकी लखलखीत असत की आपला चेहराही त्यात मी पाहून घेई.भांडी घासण्यातही शास्त्र असते हे मी त्याच्याकडून शिकलो.

श्वना कपडे कसे धुवायचा हे कधी पाह्यला मिळाले नाही कारण तो ते मोरीत धुवायचा.अशावेळी लोकांच्या घरात जाणे शक्य नव्हते. श्वना आमच्याकडे काम करत असता तर कदाचित ते देखिल कळले असते. माझी आई स्वावलंबनाची पुरस्कर्ती असल्यामुळे तिने असल्या कामासाठी कधी गडी वापरले नाहीत; पण श्वना कपडे वाळत कसा घालायचा हे मात्र पाहायला मिळायचे. कारण अंगणातल्या दोर्‍यांवरच सगळ्यांचे कपडे वाळत पडायचे. धुऊन घट्ट पिळलेले कपडे बादलीत घालून श्वना अंगणात आला रे आला की मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहात असे. प्रत्येक कपडा नीट झटकून आणि उलगडूनच तो दोरीवर अगदी व्यवस्थितपणे वाळत घालत असे. अहो छोट्या कपड्यांचे ठीक आहे पण त्याकाळी बायका नऊवारी लुगडी,आणि पुरुष धोतरे देखिल नेसत. मग ती कशी तो वाळत घालत असेल हा देखिल एक प्रश्नच आहे नाही का?त्याचेही शास्त्र श्वनानेच मला शिकवले(म्हणजे निरिक्षणातूनच मी ते शिकलो). त्या बादलीतलच तो ती लुगडी आणि धोतरे एकेक करून हळूहळू उलगडत असे आणि त्यांची चौपदरी घडी घालून, नीट झटकून मगच दोरीवर वाळत घालत असे. हे करताना चुकुनही कधी लुगड्याचा अथवा धोतराचा एखादा भाग बादलीच्या बाहेर गेलाय असे होत नसे इतकी त्याच्या कामात कमालीची सफाई होती.

श्वना कोकणी बाल्या असल्यामुळे साहजिकच नारळाच्या झाडांवर चढण्यात पटाईत होता. कमरेला कोयता अडकवून अगदी खारूताईच्या सहजतेने तो बघता बघता वर पोचत असे आणि नारळ पाडून झाले की तितक्याच लीलयेने खाली येत असे. आम्हा मुलांना त्याची खूप गंमत वाटायची. त्याकाळी आमच्या आजूबाजूला इतकी झाडी होती, वनराई होती की त्यामुळे साप वगैरेंचे असणे हे नैसर्गिकच होते. अशा परिस्थितीत साप मारण्याचे काम हे मुख्यत: श्वनावरच असे. तेव्हा साप हा माणसाचा मित्र वगैरे कल्पना लोकांपर्यंत पोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे साप दिसला रे दिसला की तो मारायचा इतकेच माहित असल्यामुळे आम्ही मुलं जाऊन त्याला सांगत असू की मग तो हातात असेल ते काम सोडून हातात त्रिशुळ घेऊन यायचा(मालकांनी हा त्रिशुळ खास श्वनाच्या सांगण्यावरून बाळगला होता).त्यावेळी श्वनाचे रूप बघण्यासारखे असायचे. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे तेज विलसत असायचे . आम्हाला तो खूप शूर वाटायचा. श्वनाचे साप मारण्यातले प्रावीण्य इतके कमालीचे होते की त्याचा वार क्वचितच फुकट जात असे. तो त्रिशुळ अशा तर्‍हेने चालवी की त्रिशुळाच्या मधल्या टोकाने नेमका सापाच्या डोक्याचा वेध घेतला जायचा. मग सापाला तसाच त्रिशुळाने टोचलेल्या अवस्थेत मिरवत मिरवत आम्हा मुलांसह ती मिरवणूक सबंध वाडीत फिरत असे.

मला तर सापांबद्दल जाम भिती वाटायची; पण तरीही आमच्या गप्पात सापाचा विषय हमखास यायचा. कधीतरी श्वनाकडे हा विषय काढला की मग त्याची रसवंती सुरु व्हायची. मग कोणता विषारी,कोणता बिनविषारी हे तो सांगायचा. त्यात 'नानेटी' नावाचा एक पट्टेवाला साप असतो आणि एकाला मारले की लागोपाठ सात नानेट्या कशा बाहेर येतात. त्या सगळ्यांना मारले नाही तर मग तो डुक ठेवतो आणि आपल्याला चावतो... वगैरे गोष्टी ऐकल्या की आमची सगळ्यांची पाचावर धारण बसे. आता त्या गप्पा आठवल्या की माझेच मला हसू येते.सापांबद्दल किती चित्रविचित्र कल्पना आणि गैरसमजूती आम्ही बाळगून होतो तेव्हा.

गौरी गणपतीला श्वना गावी जायचा तो मात्र दिवाळी करूनच यायचा. वर्षातली ही सुट्टी सोडली तर त्याने कधी सुटी घेतली नाही. संध्याकाळी अंगावर एक शर्ट चढवून एका विशिष्ठ ठिकाणच्या अड्डयावर थोडा वेळ समव्यवसायी गाववाल्यांबरोबर तासभर गप्पा मारल्या की त्याचा दिवसभराच्या कामाचा शीण दूर होत असे. कधीमधी देशी दारूची आचमनं देखिल चालत पण ते सगळे एका मर्यादेपर्यंतच होते.
असेच जीवन कंठता कंठता श्वना म्हातारा कधी झाला तेही कळले नाही कारण त्याच्या दृष्यरुपात कोणताच फरक पडलेला नव्हता. फरक पडलाच होता तर त्याच्या शारिरिक क्षमतेवर. नियमित विडी ओढण्यामुळे छातीचे खोके झाले होते. आताशा त्याने वाडीतील कामे देखिल सोडून दिली होती. कसेबसे मालकांचे काम तो करत होता.असाच एकदा गणपतीला तो जो गेला तो पुन्हा कधीच आला नाही. आपल्या गाववाल्यांबरोबर "आता मुंबईला पुन्हा कधी येणार नाही" असा निरोप धाडला आणि त्यानंतर त्याच्याबद्दल काहीच कळले नाही.

आज श्वना जर जीवंत असलाच तर त्याने वयाची सत्तरी नक्कीच ओलांडलेली असेल.कसा असेल तो आता? त्याला आमची आठवण येत असेल काय? कुणास ठाऊक!त्याला आठवत असेल नसेल ठाऊक नाही पण त्याने माझ्या बालपणात जे रंग भरले होते ते मी कधीच विसरणार नाही.

२३ नोव्हेंबर, २००७

बाबूल मोरा! २

"सैगल साहब! आपने इतने सारे गाने जो गाये है और उसमेसे बहूत सारे लोकप्रिय भी हुये है! क्या आप बता सकते है की इनमेसे कौनसा गाना सबसे ज्यादा, आपको पसंद है?"
माझा प्रश्न ऐकताच सैसा हसले आणि कोणताही कलाकार जे उत्तर देईल तेच, म्हणजे "जैसे माँ को तो सभी बच्चे प्यारे होते है वैसे ही मुझे मेरे गाये हुये सभी गाने उतनेही प्यारे है. उसमे कोई ज्यादा,कोई कम नही हो सकता!" असे म्हणाले.
"लेकीन मुझे तो आपने गाया हुआ 'बाबुल मोरा नैहर छुटोही जाय' यही गाना सबसे ज्यादा प्रिय है! मैं तो गये कितने सालोंसे उसके पीछे पागल हुआ हूँ.आपकी क्या राय हैं इस बारेमे?".... मी.
काही क्षण सैसांनी डोळे मिटले आणि त्या गाण्याचा पूर्व-इतिहास आठवण्यात दंग झाले. मग एकदम दचकून जागे झाल्यासारखे करत म्हणाले, " अरे वो गाना तो मेरे कलेजेका टुकडा है रे! 'आर सी बोराल' साहबने क्या धुन बनाई है! जितनी भी बार वो गाना गाता हूँ तो बाकी सबकुछ भूल जाता हूँ! सच कहूँ तो लब्जोमें बयाँ करना मुश्किल है!" आणि सैगल साहेब पुन्हा जुन्या आठवणीत हरवले.

"मोद'बुवा'! अहो तुम्ही काय ती तुमची कल्पना सांगणार होता ना? केव्हांपासून मी वाट पाहतोय, तुम्ही त्याबद्दल काही बोलतच नाहीये. आता काय ते चटकन सांगा बघू." अण्णा कृतक कोपाने म्हणाले.
"अण्णा! मी ह्या गाण्याबद्दलच म्हणत होतो की....
तेव्हढ्यात सैसा त्यांच्या भावसमाधीतून जागे झाले आणि नकळतपणे गुणगुणायला लागले. मी पटकन त्या नोकराला खुणेने पेटी आण म्हणून सांगितले आणि त्यानेही अतिशय तत्परतेने पेटी आणून सैसांच्या पुढ्यात ठेवली. सैसांनी पेटी उघडली आणि सहजतेने त्यावर बोटे फिरवत हलकेच भैरवीची स्वरधून छेडली आणि पाठोपाठ गळ्यातून तो ओळखीचा खर्ज उमटला.
आहाहाहा!सगळे अंग रोमांचित झाले.
"बाबुल मोराऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ नैहऽऽऽर छुटोऽऽही जाय." सैसा मुक्तपणे गाऊ लागले.

मी अण्णांकडे पाहिले. त्यांचीही भावसमाधी लागली होती. सैसा गातच होते आणि आम्ही सगळे त्यात रंगून गेलो होतो. मधेच थांबून सैसा म्हणाले, "भीमसेनजी! आपभी सुरमे सुर मिलाईये ना!"
अण्णा मनातल्या मनात सैसांबरोबर गातच होते. अशा तर्‍हेचे आवाहन ते वाया कसे जाऊ देतील. त्यांनीही आपला आवाज लावला आणि मग त्या दोन 'तानसेनांची' ती अवर्णनीय जुगलबंदी सुरु झाली.एकमेकांवर कुरघोडी करणारी जुगलबंदी नव्हती ती! ती तर एकमेकांसाठी पुरक अशीच होती. अण्णांच्या गळ्यातुन येणार्‍या त्या भैरवीच्या करूण सुरांनी सगळे वातावरणच भारुन गेले. अण्णांच्या सुरांची जादूच अशी होती की सैसांनी मग फक्त धृवपद गाण्यापुरताच आपला सहभाग ठेवला.

"चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें" ह्यातल्या "डोलिया" वर पोचलेला अण्णांचा आर्त 'तार षड्ज' काळजाचे पाणी पाणी करत होता. सैसांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु झरायला लागले. "क्या बात है!", "जियो!" अशी वाहवा त्यांच्या मुखातून निघू लागली. सैसांसारख्या तानसेनाची दाद मिळाल्यामुळे अण्णांना नव्या नव्या जागा दिसायला लागल्या आणि त्या त्यांच्या गळ्यातून निघताना त्यांच्या चेहर्‍यावरची ती तृप्ती खूप काही सांगून जात होती. मी तर त्या स्वरसागरात आकंठ बुडालो होतो. मधेच अण्णांनी मला खूण केली आणि माझ्या नकळत मीही गाऊ लागलो. अण्णा(माझे मानसगुरु) आणि सैसा ह्यांच्या गाण्याचा आणि सहवासाचा परिणाम म्हणा किंवा जे काही असेल त्याने माझाही आवाज मस्त लागला होता आणि कधी अण्णांची तर कधी सैसांची नक्कल करत मीही उन्मुक्तपणे गाऊ लागलो. त्यांची दादही घेऊ लागलो. मधेच सैसा देखिल एखादी छोटी नजाकतदार तान घेऊन अण्णांना प्रोत्साहन देत होते आणि अण्णा मला. कधीच संपू नये असे वाटणारा तो क्षण होता.

दुसर्‍या कडव्यातील "जे बाबुल घर आपनो मैं चली पिया के देश" मधल्या "पियाऽऽऽ" वर सैसांनी केलेला किंचित ठेहराव पुन्हा काळजाला हात घालून गेला. अण्णांनी तर ह्या ठिकाणी नतमस्तक होत सैसांना वंदन केले. धृवपद गाऊन सैसांनी भैरवीची समाप्ती केली आणि आनंदाच्या भरात अण्णांना कडकडून मिठी मारली. ते दृष्य पाहात असताना माझ्या डोळ्यांचेही पारणे फिटले.मघाशी कान तृप्त झाले आता डोळेही तृप्त झाले.ज्या साठी हा सगळा बनाव मी घडवून आणला होता तो त्या दोघांच्या नकळत त्यांनीच सहजसाध्य केलेला पाहून मी कृतकृत्य झालो. इथे मला तुकाराम महाराजांच्या त्या वचनाची प्रकर्षाने जाणीव झाली, "ह्याच साठी केला होता अट्टहास,शेवटचा दिस गोड व्हावा!"

बराच वेळ दिवाणखान्यात एक प्रसन्न शांतता नांदली. त्या शांततेचा भंग करत अण्णा म्हणाले, "काय मोद'बुवा'! आता तरी सांगणार काय तुमची कल्पना?"
"अण्णा! मी सांगायच्या आधीच तुम्ही दोघांनी ती काही प्रमाणात मूर्त स्वरुपात आणलीत."
"म्हणजे? मी नाही समजलो!"
"सांगतो ऐका! त्याचं काय आहे अण्णा! माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक कल्पना आहे. सैगल साहब आप भी सुनिये!.............

"आणि तू मला तेव्हढ्यात उठवलेस. काय मस्त बैठक जमली होती."
"कमालच आहे बाबा तुमची. अहो सैसा जाऊन कितीतरी वर्षे झाली आणि भीमसेन आजोबाही आता खूप थकलेत. तरीही तुमच्या बरोबर ते गात होते? तुम्ही काही म्हणा पण तुमची स्वप्नं देखील अफलातून असतात बाकी!"
"अगं! देहरुपाने सैसा आता नसले तरी ह्या 'बाबुल मोरा' च्या रुपात ते सदैव माझ्यासोबत असतात आणि अण्णा जरी शरीराने थकले असले तरी त्यांचे गाणे माझ्या हृदयात आजही तरूण आहे. ही कलावंत मंडळी म्हातारी होवोत अथवा ह्या जगाचा निरोप घेवोत पण त्यांची कला 'चिरतरूण' आहे हे विसरु नकोस. तिला कधीही मरण नाही."
"हे मात्र पटलं बाबा !"

दूर कुठे तरी रेडिओ गात होता, "बाबुल मोरा नैहर छुटोही जाय!"

समाप्त.

थोडीशी पूर्वपिठिका:
बरेच दिवस माझ्या डोक्यात स्वर्गीय कुंदनलाल सैगल ह्यांनी गायलेलं आणि अजरामर झालेलं 'बाबुल मोरा' ठाण मांडून बसलंय.सैगलसाहेबांची तशी सगळीच गाणी मला आवडतात; पण हे गाणं त्यातले शिरोमणी म्हणावं असे आहे. माझेच काय मोठमोठ्या गवयांना देखिल 'बाबुल मोरा' ने भूल घातलेय. ठुमरीच्या अंगाने जाणारे भैरवी रागातले हे गीत असल्यामुळे बर्‍याचदा शास्त्रीय मैफिलींचा शेवट देखिल ह्याच भैरवीने करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आलेला नाहीये. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींनी देखिल ही भैरवी गायलेली आहे.त्याची ध्वनीफितही माझ्याकडे आहे. तसेच गिरिजा देवींकडूनही हीच भैरवी ठुमरी एकदा कधीतरी ऐकल्याची स्मृती अजूनही ताजी आहे.
रोज न्हाणीघरात स्नानाच्या वेळी मी ह्याच गाण्यावर निरनिराळे प्रयोग करत असतो. तेव्हा मनात एक कीडा आला की आपण ह्या गीताचे 'फ्युजन' की काय म्हणतात ते का करू नये? सैसा,भीमसेन आणि गिरिजादेवी ह्या तिघांनी मिळून हे गीत गावे असे मला वाटते. मात्र प्रत्येक वेळी धृवपद सैगलसाहेबच गातील. त्यामुळे गाण्याला एक वेगळाच उठाव येईल असे माझे मत आहे.सगळ्यांचे गाऊन झाल्यावर मग त्याचे संपादन करून जे काही बनेल ते नक्कीच अफलातून असेल.अर्थात ही निव्वळ कविकल्पना आहे हे मला ठाऊक आहे. पण कशी वाटली कल्पना? आवडली का तुम्हाला?

अवांतर: मला संगीतातले तसे काही कळत नाही. पुलंच्या 'रावसाहेबां' इतकेच माझे संगीत विषयक ज्ञान आहे ह्याची कृपया संगीतज्ञांनी नोंद घ्यावी.

हाच लेख इथेही वाचता येईल.

२१ नोव्हेंबर, २००७

बाबुल मोरा!१

"अहो बाबा! उठा!"
माझी कन्या मला गदगदा हलवून जागे करत होती.
"काय शिंची कटकट आहे? सुखाने झोपू पण देत नाही." त्रासिकपणे उद्गारत मी धडपडून उठलो.
"काय झाले? कशाला ऊठवलेस? चांगली मस्त झोप लागली होती."
"अहो, पण झोपेत ते सारखं ’बाबुल मोरा,बाबुल मोरा’ काय चाललं होतं तुमचं? मधेच जोरजोरात गात काय होता. काय प्रकार काय आहे?"...कन्यारत्न उद्गारले.
"सांगतो. जरा आठवू दे. हं! तर काय छान स्वप्न पाहात होतो मी.....


बरेच दिवस एक कीडा मनात वळवळत होता.उठता बसता तो स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी एकदाचा निर्णय घेतला आणि मी
भीमसेन अण्णांना फोन केला, "अण्णा मी मोद बोलतोय. आत्ता येतोय तुमच्याकडे. आल्यावर बोलू".
तसाच सैगलसाहेबांना फोन केला, " सैगलसाहब मैं मोद बोल रहा हूं! आपके घर आ रहा हूं. आनेके बाद बात करेंगे"!
फोन ठेवला. गाडी काढली आणि तडक कलाश्री गाठले. अण्णा माझीच वाट पाहात होते.
" काय मोद’बुवा’? इतक्या घाईत काय काम काढलंत?"(अण्णा मला गमतीने मोद’बुवा’म्हणतात आणि अहो-जाहो करतात.फिरकी घेण्याची सवय आहे त्यांना!)
"अण्णा! एक मस्त कल्पना आहे. तुम्ही आधी हो म्हणा मग सांगतो".
"अहो पण कल्पना काय ती तर सांगा."
"नाही अण्णा. आपल्याला लगेच निघायचे आहे. इथून आपल्याला मुंबईला जायचेय.मी तुम्हाला गाडीत सांगतो. तुम्ही कपडे बदलून या लवकर".
अण्णा बघतच राहिले पण माझ्या विनंतीला मान देऊन दोन मिनिटात कपडे बदलून हजर झाले.आम्ही गाडीत बसलो. मी प्रथम टेपरेकॉर्डर सुरु केला. सैगलसाहेबांचे ’बाबुल मोरा’ सुरु झाले आणि ते स्वर कानावर पडताच अण्णा प्रश्न विचारायचे विसरले. गाण्यात रंगून गेले.
"काय आवाज आहे ह्या माणसाचा? खर्ज असावा तर असा"! अण्णा मनापासून दाद देत होते.
"मोद’बुवा’तुमची आवड देखिल भारी आहे हो. अहो आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण अगदी खरे आहे!सांगतो ऐका. माझ्या उमेदवारीच्या काळात मी देखिल सैगल साहेबांची नक्कल करायचा प्रयत्न केलाय. ह्या माणसाने गायलेली सगळीच गाणी गाजलेली आहेत. पण फक्त हे एकच गाणे जरी ते गायले असते ना तरीही ते अवघ्या संगीत विश्वात अजरामर ठरले असतेच ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.दैवी वरदहस्त बरं का! आपण नशीबवान, म्हणून असे स्वर्गीय गायन आपल्याला ह्याच जन्मी ऐकायला मिळतंय."
"अण्णा! तुम्ही देखिल ही भैरवी गायलेय. माझ्याकडे आहे त्याची ध्वनीफित.तुम्ही देखिल बहार उडवलेत त्यात.आता तुम्हाला माझी कल्पना सांगतो."
अण्णा सरसावून बसले. तेव्हढ्यात आमची गाडी सैगल साहेबांच्या बंगल्यात पोचली देखिल.
"अहो,हे काय ’बुवा’? आपण कुठे आलोय? हे कुणाचे घर आहे?"
"अण्णा,जरा धीर धरा. काही क्षणातच तुम्हाला ते कळेल."

मी दारावरची घंटी वाजवली. नोकराने येऊन दार उघडले. आत गेलो आणि समोर पाहिले.दिवाणखान्यात सोफ्यावर साक्षात सैगल साहेब माझी वाट पाहात बसले होते.अण्णांची आणि त्यांची दृष्टभेट झाली मात्र!क्षणभर दोघेही विस्फारलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहात राहिले.जन्मजन्मांतरीची ओळख पटली आणि दोघांचेही डोळे झरू लागले. अण्णा चटकन खाली वाकले सैगल साहेबांना नमस्कार करायला.सैगलसाहेबांनी त्यांना ऊठवून आलिंगन दिले.त्या दोन तानसेनांची भेट पाहताना मी आणि तो नोकर आम्ही दोघेही गहिवरून गेलो होतो.
"अहो ’बुवा’,किती सुखद धक्का दिलात ? नाही हो सहन होत आता ह्या वयात!आधी नाही का सांगायचंत?"
"बेटे,भीमसेनजी कहां मिले तुझे? अच्छा किया जो इन्हे अपने साथ लाया.इनका स्वर्गीय गाना तो मैं अक्सर सुनता रहता हूं! मगर ये कंबख्त बुढापा, कही जाने नही देता.कबसे इनको मिलनेके लिये जी तरस रहा था.जूग जूग जियो बेटे.तूने मेरा बहोत बडा काम किया हैं जो इनसे मिलाया.आज मैं तुझपर खुश हूं, तू जो कहेगा मैं करूंगा."
"मोद’बुवा’,मी देखिल आज तु्मच्यावर खुश आहे बरं का. माझे देखिल ह्या तानसेनाला साक्षात भेटण्याचे स्वप्न तुम्ही सत्यात आणलेत त्याबद्दल तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. बोला. काय करु?"
"अण्णा, ते मी सांगणारच आहे पण आधी आपण ह्या चहाचा आस्वाद घेऊ या आणि मग बोलू निवांतपणे."
नोकराने आणलेला चहाचा ट्रे घेत मी म्हटले. माझ्या ह्या बोलण्यावर त्यांनी सहमती दर्शवली आणि मग आमचे चहापान सुरु झाले.

१९ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!६

खोलीवर परत आलो.माझी शबनम पिशवी घेतली (जिच्यात आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडतील अशा काही गोष्टी मी नेहमी बाळगत असे. जसे की चश्मा.खरे तर डोळ्य़ात नेत्रस्पर्षी भिंगे असत पण कधी धुळीचा त्रास होऊन ती भिंगे काढावी लागत आणि अशा वेळी चश्मा उपयोगी पडत असे.त्याबरोबरच विजेरी,सुईदोरा,कात्री,चाकू,एक निऑन टेस्टर,काड्यापेटी आणि मेणबत्ती अशी सगळी वेळप्रसंगी उपयोगी पडणारी सामग्री माझ्या ह्या शबनम पिशवीत असे) आणि पुन्हा रस्त्यावर आलो.समोरच कालूपूर बसडेपो होता तिथे गेलो.डेपोमध्ये भरपूर बस होत्या पण चालक-वाहकांचा कुठेही पत्ता नव्हता. ह्याचा अर्थ बस चालणार नव्हत्या हे नक्की झाले.मग आता काय करायचे. तिथून पुन्हा स्टेशनवर आलो.तिथेही बरेच लोक रिक्षा,टॅक्सी नसल्यामुळे ताटकळत बसल्याचे दिसले.म्हणजे एकूण सर्व वाहतूक व्यवस्था बंद होती हेही नक्की झाले.

मी आपले एका पोलिसाला विचारले की सॅटेलाईटला मला जायचे आहे तर कसे जाता येईल? त्याने एकदा मला आपादमस्तक न्याहाळले आणि म्हणाला, "तमे अंया नवा छो केम?तमने खबर नथी के आजे बंद छे?"
मी म्हटले, " एम तो हूं मुंबईना छूं अने अंया सरकारी काम माटे आवेला छूं! मने खबर तो छे के आजे बंद छे पण मारे जाऊज जोईये केमके हूं ड्युटी उपर छूं आने मारी हाजरी बहू जरूरी छे!"
मुंबईचा आणि त्यातून सरकारी माणूस म्हटल्यावर त्याचा आवाज जरा सौम्य झाला.पण तरीही "सॅटेलाईट अंयाथी बहू दूर छे. तमे कोई पण वाहन वगर त्यां नथी जई शकाय" असे त्याने ठासून सांगितले.
मग दूसरा काही मार्ग असल्यास सांग असे म्हटल्यावर त्याने मला सांगितले की "तमे काई पण करीने (म्हणजे पायीच की) लाल दरवाजा(एका विभागाचे नाव) पोचशो तो कदाच त्यांथी तमने एसटी मळशे. एनी पण गेरंटी नथी. पण मारी वात सांबळो, आजे माहोल बहू खराब छे. होई शके तो तमे अंयाच रेवो".
त्याचा सल्ला ऐकून माझा सगळाच उत्साह मावळला. तरीही बघूया तरी तो लाल दरवाजा किती दूर आहे ते. नाहीतरी इथे बसून वेळ कसा जाणार म्हणून मी त्या पोलिसाचा निरोप घेऊन पुन्हा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो.

रस्त्यावर आलो तेव्हा अतिशय तुरळक अशी वर्दळ दिसत होती. एखाद दूसरा माणूस आपल्याच नादात स्टेशनच्या दिशेने जाणारा दिसत होता. अशाच एकाला मी लाल दरवाजा इथून किती दूर आहे असे विचारल्यावर "बहू दूर छे" इतकेच उत्तर देऊन चटकन पसार झाला. आता विचारायचे तरी कोणाला? जाऊ दे! पाय नेतील तिथे जाऊ. कदाचित त्यातच सापडेल. लाल दरवाजा दिवसा उजेडी सापडायला काय हरकत आहे असा विनोदी विचारही माझ्या मनात आला. लांबूनच त्याचा लाल रंग दिसेलच की. उगीच कशाला कुणाला भाव द्या असा विचार करून मी चालायला लागलो.

माझ्या एकूण विक्षिप्त दिसण्यामुळे आणि दिशाहीन भरकटण्यामुळे नाही म्हटले तरी मी रस्त्यातल्या लोकांच्या डोळ्यात चांगलाच खूपत असलो पाहिजे असे मला जाणवले. कारण माझ्याकडे ते अगदी टक लावून बघत असायचे. माझी आणि त्यांची नजरानजर झाली की नजर चोरायचे पण मग पुन्हा हळूच वळून बघायचा प्रयत्न करायचे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मलाही त्यात गंमत वाटू लागली. अर्थात त्यांच्या नजरेचा अर्थ काय असावा हे मला माहित नव्हते पण आपल्याकडे कुणीतरी बघतंय म्हणजे आपण कुणीतरी खास आहोत असे मला उगीचच वाटायला लागले.ह्या भरात मी कितीतरी अंतर पार केले होते. आता उन चढायला लागले होते आणि चालून चालून थकायला झाले होते. कुठे तरी चहा-पाणी मिळाले तर बरे होईल असे मनात म्हणत होतो पण सगळी दुकाने बंद दिसत होती. नाईलाज म्हणून चालतच होतो. कुठे जात होतो ते माहित नव्हते पण जायचे कुठे ते मात्र पक्के डोक्यात होते.

तास दोन तासांची पायपीट झाली होती. मी पार थकलो होतो.कोरड्या हवेमुळे घाम येत नव्हता पण आता अंग भाजायला लागले होते आणि पिण्याचे पाणी कुठे मिळेल असेही वाटत नव्हते.सुदैवाने तिथे एक छोटीशी बाग दिसली तीही जवळपास रिकामी होती. काही घर नसलेली माणसे,भिकारी वगैरे कुठे कुठे बाकांवर झोपलेले दिसत होते. मी बागेत हळूच प्रवेश केला आणि एकदा सभोवार नजर टाकली. मला हवी असलेली गोष्ट एका कोपर्‍यात दिसली आणि मी खूश झालो.पाण्याचा नळ दिसत होता आणि चक्क त्या नळातून थेंब थेंब पाणी ठिबकत होते. आधी जाऊन हातपाय धुतले आणि आधाशासारखा पाणी प्यायलो. तेवढ्यानेही खूप बरं वाटलं. मग एका झाडाच्या सावलीत जाऊन निवांतपणे बसलो.पाचदहा मिनिटे अशीच गेली आणि माझ्या लक्षात आले की मी इथे आल्यापासनं माझ्यावर बरेच डोळे खिळलेले आहेत ह्या गोष्टीची जाणीव झाली. जेव्हा त्यातल्याच काहींशी माझी नजरानजर झाली तेव्हा का कुणास ठाऊक मला किंचित भिती वाटली. इथे आपण सुरक्षित नाही असेही वाटले आणि इथे थांबण्यात काहीही अर्थ नाही असे माझ्या मनाने ठरवले. मी तसाच उठून झपाझप चालत त्या बागेच्या बाहेर आलो आणि जणू काही फार मोठ्या संकटातून सुटलो असे समजून एक दीर्घ सुस्कारा सोडला.

आता मी कुठे येऊन पोचलोय?इथून लाल दरवाजा अजून किती दूर आहे आणि रेल्वे स्टेशन किती मागे राहिले ? ह्या कशाचाच पत्ता लागेना. मुंबई शहर कसे लांबलचक आहे. रेल्वेने केलेले दोन भाग; एक पुर्व आणि पश्चिम. बहुतेक रस्ते हे समांतर असल्यामुळे कोणत्याही रस्त्याने गेलात तरी फारशी चुकामुक होत नाही . तर त्याच्या उलट हे शहर. गोल गोल फिरवणारे. थोडासा कोन चुकला की पार भलत्याच दिशेला पोचवणारा रस्ता. अशा अवस्थेतही मी चालतच होतो आणि अचानक एका खूप मोठ्या चौरस्त्यावर मी येऊन पोचलो. आता आली का पंचाईत! कोणत्या रस्त्याने जायचे? आता कुणाला तरी विचारायला हवे हे नक्की. मग तिथूनच जाणार्‍या एकाला मी लाल दरवाजा कुठे आहे म्हणून मी विचारले तर अतिशय विचित्र नजरेने त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो चक्क पळत सुटला.मला कळेचना! हा काय प्रकार आहे? पण कोण सांगणार? होतंच कोण त्याचे स्पष्टीकरण द्यायला!

पुन्हा पायपीट सुरु झाली आणि मी त्या चौरस्त्यातला एक रस्ता पकडला आणि चालू लागलो.चालता चालता तोंडातून चक्क गाणे फुटायला लागले "एकटेच येणे येथे,एकटेच जाणे। एकट्याच जीवाचे हे,एकटेच गाणे॥"
माझ्या नादात चालत असतानाच मला अचानक जाणवले की मी हमरस्ता सोडून एका वेगळ्याच रस्त्याला लागलोय.ह्या रस्याच्या दोन्ही बाजूला बरीच गर्दी आहे. बरेच लोक बंद दुकानांच्या पायर्‍यांवर बसून आपापसात काही तरी कुजबुजत आहेत.आपोआप माझे गाणे बंद पडले आणि मला वस्तुस्थितीची कल्पना आली.मी चक्क मुसलमानांच्या मोहल्ल्यात शिरलो होतो. बाहेरचा असा मी त्या रस्त्यावरून एकटाच आपल्या नादात चाललो होतो.तो रस्ता कुठे जाणार आहे हे मला माहित नव्हते आणि इतकी सगळी लोकं आजूबाजूला असतानाही त्यांना विचारण्याची हिंमत होत नव्हती. खरे तर मी मनातून टरकलोच होतो.अगदी आयता बकरा चालून आलाय असेच त्या सगळ्यांच्या मनात असावे असेही क्षणभर वाटून गेले.पण माझी बोकड दाढी आहे ना! ती बघून कदाचित ते मला त्यांच्यातलाच समजतीलही. अरे पण ते लोक फक्त दाढीच ठेवतात. मिशी कापलेली असते आणि माझी तर मिशी चांगली वाढलेली आहे.आता आपले काही खरे नाही. पिशवीत चाकू,कात्री आहे .अशा वातावरणात ही सामान्य शस्त्रे देखिल आपल्याबद्दल संशय निर्माण करू शकतील.तेव्हा चल हो मरणाला तयार! असे उलटसुलट विचार मनात येत होते पण मी त्याची प्रतिक्रिया चेहर्‍यावर दिसणार नाही असा आटोकाट प्रयत्न करत नाकासमोर चालत राहिलो.

रस्ता खूपच लांब होता. कुठेही वळलेला दिसत नव्हता की पुढे संपतोय असेही दिसत नव्हते. अजून असे किती चालायचे? माहित नव्हते.फक्त चालत राहाणे माझ्या हातात होते. चांगला मैलभर चाललो आणि शेवटी तो रस्ता संपलाय असे दिसले. आता आली की पंचाईत? इतका वेळ मला कुणी काही केले नाही. आता पुन्हा त्याच रस्त्याने त्यांच्या समोरून परत जायचे. त्यांच्या नजरा झेलत,चुकवत जायचे म्हणजे आपले काही खरे नाही आज!"ते खरे आहे रे! पण असे हातपाय गाळून काही होणार आहे काय? आल्या प्रसंगाला तोंड द्यायलाच हवे. तुलाच खाज होती ना पायी जाण्याची मग भोग आपल्या कर्माची फळे." एक मन दुसर्‍या मनाला सांगत होते.पण दूसरे मन बजावत होते "सदैव सैनिका पुढेच जायचे,न मागुती तुवा कधी फिरायचे॥" मग काय? चला.तुका म्हणे "उगी रहावे,जे जे होईल ते ते पहावे॥
अशा प्रसंगी मी कितीही घाबरलेला असलो तरी कसे कुणास ठाऊक पण अचानक धैर्य गोळा होते असा माझा नेहमीचा अनुभव आहे.म्हणजे माझ्यातच एक घाबरट आणि एक धैर्यधर अशी दोन व्यक्तिमत्व वास करून आहेत असे म्हणता येईल. मी पुन्हा हिंमतवाला होतो आणि संकटाशी मुकाबला करायला तयार होतो. इथेही तसेच झाले. एका दृढ निश्चयाने मी त्या रस्त्यावरून पुन्हा त्या सर्व मियां लोकांच्या नजरा झेलत झेलत त्या मोठ्या चौरस्त्यापर्यंत आलो.मात्र एक गोष्ट नक्की की त्या लोकांपैकी कुणीही मला अडवण्याचा अथवा मी कोण आहे,इथे कशाला आलोय वगैरे चौकशी करण्यासाठी थांबवण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलेला नव्हता. माझा मीच घाबरलो होतो आणि माझा मीच तिथून सुखरूप बाहेर आलो होतो. म्हणजे हा सगळा माझ्याच मनाचा खेळ होता. माझ्या एकूण अवतारावरून मी एखादा अवलिया असावा अथवा वाट चुकलेला वाटसरू असावा असेही त्यांना वाटले असेल. खरे काय ते कुणाला ठाऊक? पण त्या तशा परिस्थितीतून मी सहीसलामत बाहेर आलो होतो हे नक्की.

मी मोठ्या रस्त्याला लागलो आणि अचानक मला एक पोलिसांची गाडी दिसली.त्या पहिल्या पोलिसाला विचारल्यावर रस्त्यात ठिकठिकाणी दिसणार्‍या पोलिसांना मी उगाचच विचारत बसलो नव्हतो; पण आता मी जास्त विचार न करता त्या गाडीला हात दाखवला. ती गाडी माझ्याजवळ येऊन थांबली.त्या गाडीत इतर पोलिसांबरोबर एक इन्स्पेक्टरही होता.मी सद्या कुठे आहे आणि इथून लाल दरवाजा किती दूर आहे?असे विचारताच.. माझ्याकडे आश्चर्याने बघत तो इन्स्पेक्टर बोलला ते ऐकून मी हैराण झालो.
"लाल दरवाजा तर विरुद्ध दिशेला राहिलाय" !म्हणजे आत्तापर्यंत माझी जी काही पायपीट झाली होती ती सर्व दर्यापूर,खानपूर,शाहपूर वगैरे मुसलमान बहुल भागांतूनच झालेली होती हेही कळले आणि इतका वेळ अशा भागांतून फिरल्यानंतरही मला काहीच त्रास झाला नव्हता हे माझ्याकडून ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात मला अविश्वासाची भावना जाणवली.पण त्याच वेळी मी किती नशीबवान आहे हे देखिल त्यांनी बोलून दाखवले. माझ्या बोलण्यावरून त्यांच्या केव्हाच लक्षात आलेले होते की मी इथला स्थानिक नागरिक नाहीये म्हणून मग त्यांनी माझी कसून चौकशी केली. मी कोण,कुठला,कशासाठी इथे आलोय?
पोलिसांना समजेल अशा भाषेत मी माझी ओळख करून दिली,माझे ओळखपत्र दाखवले आणि मला कसेही करून सॅटेलाईटला पोचवा अशी विनंती केली.ओळखपत्रावरचा अशोकस्तंभ बघून लगेच इन्स्पेक्टरने मला त्याच्या बाजूला बसवून घेतले.तिथून त्यांनी मला शहराच्या बाहेर पोचवले.बंदचे आवाहन शहरापुरतेच असल्यामुळे शहराबाहेर सगळे व्यवहार सुरळितपणे सुरु होते. इथे पोलिसांनी मला एका रिक्शात बसवून दिले.मी पोलिसांचे आभार मानले आणि रिक्षा सॅटेलाईटकडे दौडू लागली.
मी घड्याळात पाहिले तो दूपारचा एक वाजला होता.म्हणजे सकाळी ८ वाजता सुरु झालेली माझी पायपीट जवळ जवळ ५ तास सुरु होती तर.
आणि.. कितीतरी तासांनी मी मोकळा श्वास घेतला.

समाप्त!

१७ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!५

आम्ही मागवलेले मनुष्यबळ आले आणि काम अधिक जोरात आणि व्यवस्थितपणे सुरु झाले. माझ्या बरोबर काम करण्यासाठी पदू आला त्यामुळे मी एकदम निश्चिंत्त झालो होतो. पदू ज्ञानाच्या आणि कामाच्या बाबतीत 'बाप माणूस' होता. मी बरेचसे काम त्याच्याकडूनच शिकलो होतो. त्यामुळे आता तो माझा बॉस झाला होता आणि साहजिकच माझ्यावरचे दडपण खूपच कमी झालेले होते. मुंबईला एक चक्कर टाकावी असे मनात होते आणि आता पदूच्या आगमनामुळे ते शक्य होणार होते म्हणून मी वरिष्ठांकडे चार दिवस मुंबईला जाण्याची परवानगी मागितली आणि ती त्यांनी कोणतीही खळखळ न करता दिली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी लगेच मुंबई गाठली.

मुंबईत चार दिवस राहून मी पुन्हा अहमदाबादला आलो तेव्हा मला कळले की सॅटेलाईटच्या सगळ्या गेस्टरूम भरलेल्या असल्यामुळे निदान एक आठवडा तरी मला कुठे तरी बाहेर राहावे लागणार होते आणि त्याप्रमाणे माझ्या राहण्याची व्यवस्था अहमदाबाद स्टेशनच्या जवळ असणार्‍या कालूपूर भागातील वेड्यांच्या इस्पितळाशेजारी(मेंटल हॉस्पिटल.. इथे नुसते 'मेंटल' म्हणूनच प्रसिद्ध होते) असणार्‍या सरकारी विश्रामगृहात करण्यात आली होती. इथून सॅटेलाईटला जायचे म्हणजे खूपच वेळ लागत असे. बसने जवळ जवळ १७-१८ किमि चा प्रवास करावा लागायचा.पण त्यातही एक गंमत होती. जायला यायला बराच वेळ लागत असल्यामुळे मला फक्त दिवसपाळी करावी लागायची आणि त्यामुळे संध्याकाळ मोकळीच मिळायची. मग रात्रीचे जेवण अगदी मनपसंत असे मिळत असे. तसेच आजूबाजूचा परिसर बघण्याची संधी आणि तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्याची संधीही मिळाली.

संध्याकाळी शहरात परत आलो की मी आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी पायीच फिरत असे. पण असे करताना कैक वेळेला रस्ता चूकल्यामुळे माझ्या वसतीस्थानाकडे कसे पोहोचायचे हे कळत नसे. मग सरकारी विश्रामगृह कुठे असे एखाद्या स्थानिक माणसाला विचारले की तो बावचळत असे. इथे असे काही आहे हे स्थानिकांना माहितच नसायचे. मग नुसते 'मेंटल' म्हटले तरी चालायचे. पण असे म्हटल्याने समोरचा माणूस माझ्याकडे विचित्र नजरेने पाही आणि काहीच उत्तर न देता निघून जाई. आधी मला त्याचे कारण कळले नाही. पण मग उशीराने ट्युब पेटली. अरेच्चा! खरेच की! रात्री-बेरात्री मेंटल हॉस्पिटलचा पत्ता विचारणार्‍या माणसाकडे लोक असेच बघणार की! त्यातून माझा एकूण अवतारच एखाद्या विक्षिप्तासारखा असायचा. त्यामुळे काहीजण मला टाळत पण एखाददुसरा सज्जन भेटायचाच की जो व्यवस्थित मार्गदर्शन करायचा आणि मी सुखरुप आपल्या विश्रामगृहावर पोहोचायचो.

असाच एक दिवस मी माझे काम संपवून शहरात आलो आणि कळले की शहरात कुठे तरी दोन जमातीत वादावादी झाली आणि त्याचे पर्यवसान मारामारीत होऊन त्यात दोन जण ठार झालेत. त्यामुळे दुसर्‍या दिवशी अहमदाबाद बंदचे आवाहन केले गेलेय आणि त्यात बस,टॅक्सी,रिक्शा वगैरेसकट सगळी वाहने बंद राहतील. आता सॅटेलाईटला कसे जायचे हा प्रश्न माझ्या पुढे पडला होता.पण विचार करायला संपूर्ण रात्र हाताशी होती तेव्हा 'बघू उद्या सकाळी' असा विचार करून मी निवांतपणे जेवून झोपलो.

दुसर्‍या दिवशी उठलो. सगळी आन्हिके उरकली. कपडे चढवले आणि चहा पिण्यासाठी बाहेर पडलो. बाहेर सगळा थंडा कारभार होता. रस्ते सुनसान होते . दुकाने बंद होती. अहमदाबाद स्टेशन जवळच असल्यामुळे मी तिथे जाऊन चहा प्यायला. वर्तमानपत्र घेतले. त्यातील ठळक बातम्या वाचल्या आणि लक्षात आले की मामला गंभीर आहे. आज शहरातली सगळी वाहतूक बंद असल्यामुळे मला स्वतःला खोलीतच कोंडून घ्यावे लागणार होते.पण तिथे दिवसभर एकटाच भूतासारखा बसून काय करणार? पायी जावे काय? छे! ते तर शक्यच नव्हते आणि त्यातून मला रस्तेही नीट माहित नव्हते. मग काय करायचे?

१३ नोव्हेंबर, २००७

"पोलीसी खाक्या"! २

"हां! बोला. काय काम हाय?" एक तारा.
"साहेब, त्याचं काय आहे की माझं पाकीट उडवलं"! मी
"उडवलं? ते कस काय बुवा? "
"आता ते मला कळलं असतं तर मी इथे कशाला आलो असतो?" मी. मी देखिल तिरकस बोलण्यात कमी नव्हतो. इथे आपला हात दगडाखाली आहे हे माहित असल्यामुळे त्यातल्या त्यात सौम्य भाषेत बोललो.
"बर का वाघमार्‍या,ह्ये सायेब बग काय म्हनताहेत. त्येंचं पाकीट उडवलं तरी बी त्यांना काहीच कळालं न्हाय". एकतारा.
एकतार्‍याच्या बोलण्याने आता वाघमार्‍या मैदानात आला.
" बर सायेब मला सांगा तुमी ते पाकीट काय असे दोन बोटात धरून उंच धरले व्हते की काय? म्हंजी आसं बगा की ह्ये पाकीट हाय आनि ह्ये मी आसं धरलंय उंच(वाघमार्‍या अगदी प्रात्यक्षिक करून दाखवत होता) आनि तुमी त्या पाकीटमारांला आवतन देत व्हता काय की या,उडवा माजं पाकीट?" वाघमार्‍या. आणि दोघे खो-खो हसत सुटले.
"काय तिच्या आयला लोक बी कंप्लेंटी आनत्यात? पाकीट उडवले म्हनं?" एकतारा.
"बर माला सांगा,पाकीट उडवला तवा तुमी काय करत व्हता? न्हाय म्हन्जे बसला व्हता,उबा व्हता? नक्की काय करत व्हता?" वाघमार्‍या.
"अहो गर्दी चिक्कार होती गाडीला....
मी माझे वाक्य पूर्ण करण्याच्या आधीच दोघे ठो ठो हसू लागले.
" आरं तेच्या मायला,वाघमार्‍या! सायेब काय म्हन्तायेत की गाडीला लय गर्दी व्हती. आता मुंबैच्या गाडीत गर्दी आसनार न्हाय तर मग कुटं आसनार? मुंबैत नवीनच दिसतंय बेनं! भटाचं दिसतंय ! भासा बग कसी एकदम सुद्द वापर्तोय". एकतारा.
"ओ साहेब शिव्या द्यायचं काय काम नाही सांगून ठेवतोय आणि माझी जात काढायची तर अजिबात जरूर नाही. मीही बक्कळ शिव्या देऊ शकतो. उगीच माझे तोंड उघडायला लावू नका". मीही चिडून बोललो.
"च्यामारी वाघमार्‍या! हिथं पोलीस कोन हाय? आपून की ह्ये बेनं? चायला हाय तर किडूक-मिडूक. पर आपल्याला दम देतोय. घे रे ह्याला आत आन दाव आपला इंगा". एकतारा.
"ओ,हात लावायचे काय काम नाही सांगून ठेवतो. उगीच पस्तावाल". आता माझाही संयम संपत चालला होता. ते दोघे माझ्याकडे एक टाईमपास म्हणून बघत होते आणि स्वतःची करमणूक करून घेत होते. माझा आवाजही आता तापला होता आणि आजूबाजूची फलाटावरची दोनचार पासिंजर मंडळीही ही करमणूक बघायला आतमध्ये डोकावली.
माझ्या आव्हानाने वाघमार्‍या चवताळला. पटकन उठला आणि माझा दंड त्याच्या राकट हातांनी धरायला म्हणून पुढे सरसावला. पण मी सावध होतो. चपळाईने दूर झालो आणि वाघमार्‍याचा तोल जाऊन तो जमिनीवर कोसळला. जणू मला तो साष्टांग नमस्कार करत होता कारण त्या अवस्थेतही त्याने त्याचे हात मला पकडण्यासाठी लांब केले होते.
आता गप्प बसून चालणार नाही हे मी ताडले आणि माझा हुकुमाचा एक्का काढला. खरे तर मी एक सामान्य नागरिक म्हणून जगू इच्छित होतो पण ह्या दोघा टोणग्यांनी मला माझे खरे स्वरूप उघड करायची वेळ आणली होती जे मी स्वतःहून करू इच्छित नव्हतो.
"अतिरिक्त आयुक्त,विशेष शाखा(ऍडिशनल कमिशनर स्पेशल ब्रँच) श्रीयुत अमूक अमूक ह्यांच्या ऑफिसात मी काम करतोय. मला जायला उशीर होतोय. ते तिकडे माझी वाट पाहात आहेत आणि मला तुमच्यामुळे हा उशीर होतोय. वर मला मानसिक त्रास तुम्ही जो देताय हे सगळे त्यांना कळले ना तर माझ्याऐवजी तुम्हीच आत जाल. तेव्हा मुकाट्याने माझी तक्रार नोंदवून घ्या आणि मला त्याची पोचपावती द्या. नाहीतर पुढच्या परिणामांना तयार व्हा". माझ्या ह्या खणखणीत बोलण्याने दोघेही हतबुद्ध होऊन माझ्याकडे पाहातच राहिले.

अत्यंत कृश शरीरयष्टी(अगदी क्रिकेटच्या यष्टीसारखी),मध्यम उंची,पट्ट्यापट्ट्याचा टी शर्ट्,खाली भडक रंगाची पँट,केस अस्ताव्यस्त, हनुवटीखालची बोकडदाढी आणि हातात ब्रीफकेस असा माझा त्यावेळचा अवतार हा कोणत्याही अशा तर्‍हेच्या पोलीसी खात्याला शोभणारा मुळीच नव्हता त्यामुळे त्या दोघांना कळेना की नक्की काय प्रकार असावा ते. हा म्हणतोय ते खरे असेल तर आपले काही खरे नाही पण हा उगीचच दमबाजी करत असेल तर? अशा पेचात ते दोघे सापडले असतानाच एक सब इन्स्पेक्टर आत आला. त्याच्या आगमनाने त्या दोघांना हायसे वाटले असावे असे त्यांच्या चेहर्‍यावरच्या हावभावावरून वाटले. त्या दोघांनी सइला एक कडक सलाम ठोकला. सइ खूर्चीत स्थानापन्न झाला आणि त्याने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिले. ही संधी साधून मी माझी खरी ओळख दिली आणि तक्रार घडाघडा सांगून टाकली.
माझ्या साहेबांचे नाव ऐकले मात्र सइची पण कळी खुलली . हे साहेब मूळातले मुंबई पोलीसातलेच होते.पण आमच्या कडे पाहूणे कलाकार म्हणून(डेप्युटेशनवर) आले होते. राष्ट्रपती पदक विजेते आणि अतिशय कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष म्हणून त्यांचा लौकिक होता.सइदेखिल त्यांचा लौकिक जाणून होता.

लगेच मला बसायला खूर्ची दिली गेली आणि वाघमार्‍याला चहा आणायला पिटाळले. एकतारा आता खाली मान घालून उभा होता. आता आपले काही खरे नाही असेच भाव त्याच्या चेहर्‍यावर होते कारण आतापर्यंत झालेला प्रसंग मी सइला सविस्तर सांगितला. त्याने त्या दोघांना असे काही झापले की त्यांची ती दयनीय अवस्था पाहून मलाच वाईट वाटले.पण त्या माजोरड्यांना त्यांच्या भाषेत डोस मिळणे अत्यावश्यक होतेच. त्यानंतर विद्युत वेगाने हालचाली झाल्या. माझी तक्रार नोंदवून त्याची पोचपावती दिली गेली. स्पेशल चहा आलाच होता. तो पिऊन मी त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो.

एकतारा आणि वाघमार्‍यांनी माझ्याकडे दयेची याचना केली.
"सायेब, गलती जाली. एक डाव माप करा. आमी वळकलं न्हाय तुमाला. आता मोट्या सायबांस्नी काय सांगू नकासा. न्हाईतर आमची नोकरी जाईल. तुमी आदीच सांगतल आस्तं तर आसं जालं नसत. पुन्यांदा आसं न्हाय व्हनार. आयच्यान!" एकतारा
"बाबांनो, तुमी पोलीस लोक सामान्य माणसाशी कसे वागता हेच मला बघायचे होते आणि मी जर सामान्यच आहे असे सिद्ध झाले असते तर तुम्ही माझे काय हाल केले असते ह्याची कल्पनाच करवत नाही. तेव्हा एक अनुभव म्हणून मी हे साहेबांना सांगणार आहे हे नक्की".
माझ्या त्या बोलण्यावर दोघे माझ्या पाया पडायला लागले आणि मग जास्त तमाशा नको म्हणून मी त्यांना माफ करून साहेबांकडे त्यांची तक्रार करणार नाही असे वचन दिले.

आज मी जर एक सामान्य नागरिक असतो तर माझे काय झाले असते?

समाप्त!

१२ नोव्हेंबर, २००७

"पोलीसी खाक्या"! १

त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता यावे म्हणून दोन्ही हातांनी वरच्या कड्या पकडल्या. मालाडला चढलो होतो तेव्हा जेवढी गर्दी होती त्यात अंधेरी पर्यंत वाढच होत गेली आणि मग तर श्वास घेणेही मुश्किल होऊन गेले. एकमेकांचे उच्छ्वास झेलत लोक कसे तरी प्रवास करत होते. त्यात काही पंखेही बंद होते. कुणीतरी उत्साही तरूण त्यात कंगवा घालून त्याचे पाते फिरवून पंखा सुरु होतो का असला प्रयत्नही करून पाहात होता.

जलद गाडी (फास्ट ट्रेन) असल्यामुळे अंधेरी-वांद्रे,वांद्रे-दादर आणि दादर-मुंबई सेंट्रल ह्या दरम्यानच्या स्थानकांवर ती थांबणार नव्हती त्यामुळे आता अंधेरीहून गाडी सुटल्यावर तरी निदान पुढचे स्थानक(स्टेशन) येईपर्यंत गर्दी वाढणार नव्हती. भर उन्हाळ्याचे दिवस,त्यात काही पंखे बंद म्हणजे आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना असा प्रकार होता. भरमसाठ गर्दीने आणि उकाड्यामुळे घामाने भिजलेली अंगं,त्यात पाशिंजरांच्या आपापसातील बडबडीमुळे होणारा कलकलाट आणि गाडी वेगात धावत असल्यामुळे होणारा खडखडाट ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही मला झोप येत होती. मी उभ्या उभ्या पेंगायलाही लागलो. एक-दोन वेळा मानही लुढकली पण पुन्हा मी मोठ्या निर्धाराने झोपेचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करू लागलो.

ह्या सगळ्या प्रकारात वांद्रे स्थानक आले केव्हा तेच कळले नाही पण वांद्र्याकडून गाडी जेव्हा माहीमच्या दिशेला निघाली तेव्हा त्या खाडीच्या थंडगार वार्‍याने मी जागा झालो. वांद्र्याला गाडी थोडी रिकामी झाल्याचे जाणवले आणि हात खाली करून कोणताही आधार न घेता उभे राहाता येईल अशी परिस्थिती असल्यामुळे मी कड्या सोडल्या आणि हात खाली केले. हातांचा स्पर्श पँटच्या खिशांना झाला आणि मी ताडकन उडालो. ज्या खिश्यात पास-पाकीट होते तो चक्क सपाट लागत होता. मी खिशात हात घालून पाहिले आणि माझ्या सगळा प्रकार लक्षात आला. माझे पाकीट त्या गर्दीत मारले गेले होते. त्यात नुकताच काढलेला तीन महिन्यांचा रेल्वेचा पास, माझे ऑफीसचे ओळखपत्र आणि काही किरकोळ रक्कम त्यात होती. पास पुन्हा काढता येत होता पण मला चिंता होती ती त्या ओळख पत्राची.कारण मी ज्या केंद्र सरकारी कार्यालयात काम करत होतो ते जरा विचित्र खाते होते. धड ना पोलीस ना नागरी. पोलिसांसारखे आम्ही २४ तास बांधील होतो पण आम्हाला गणवेश नव्हता. पोलीसांसारखे अधिकारही नव्हते पण सेवाशर्ती सगळ्या पोलिसांसारख्या. म्हणजे शिस्तीला एकदम कडक आणि अधिकार काहीच नाही. म्हणजे आमची अवस्था वटवाघळासारखी अधांतरी! ओळखपत्र हरवले म्हणजे आता चौकशीला सामोरे जावे लागणार, कानपिचक्या,दंड आणि रेकॉर्ड खराब होणार. मग आता काय करायचे?तर दादरला उतरून रेल्वे पोलीसात तक्रार करणे इतकेच माझ्या हातात होते.

मी दादरला उतरलो. रेल्वे पोलीस चौकी शोधून काढली आणि माझी तक्रार सांगितली. माझे पाकीट कुठे मारले गेले ? तर अंधेरी ते वांद्रे ह्या दरम्यान. हे त्यांनी माझ्याच तोंडून वदवून घेतले आणि आपले हात वर केले. म्हणाले की ही केस वांद्रे रेपोंची आहे तेव्हा तुम्ही तिथे जा. मग काय मी तसाच वांद्र्याला पोचलो. ह्या सर्व धांदलीत आता आपल्याकडे पास किंवा तिकीट नाही हे देखिल लक्षात आले नाही.पण सुदैवाने कुणी अडवले नाही. वांद्र्याच्या त्या पोचौ मध्ये मी पोचलो तेव्हा तिथे दोन पोलीस बसले होते. दोघे आमने सामने बसले होते. त्यातला एक जमादार(एक तारा) फोनवर कुणाशी तरी गप्पा मारत होता आणि दुसरा हवालदार त्याच्या समोरच्या बाकड्यावर बसून अगदी मन लावून कान कोरत होता. माझ्या तिथल्या आगमनाची जरादेखिल जाणीव त्यांना झाल्याचे दिसले नाही. मी आपला त्यांचे माझ्याकडे कधी लक्ष जाते ह्याची वाट पाहात चुळबुळ करत उभा होतो पण रामा शिवा गोविंदा. दोघेही आपल्याच तारेत होते. शेवटी एकदाचे त्या जमादाराचे फोनवरचे बोलणे संपले आणि आता तो आपल्याकडे नक्की पाहील आणि विचारेल... वगैरे वगैरे विचार मी केला पण पुढे काहीच घडले नाही. त्या जमादाराने हवालदाराशी बोलणे सुरु केले.
"बरं का वाघमार्‍या,तिच्या आयला........ ह्या मा**** साहेबाच्या *** बांबू सारला पाहिजे. फुकटचोट भे** तरास देतोय."
"सायेब.तुमाला काय सांगू? ते म्हनजे बगा एकदम बारा बोड्याचं बेनं हाय.लय मा**** बगा.त्येच्या फुडं नुस्तं हांजी हांजी म्हनायचं. अवो धा वर्सं काडलीत त्येच्या संगट.लई हरामी जात हाय. तुमी त्येच्या नादी लागू नका.... वगैरे वगैरे वगैरे"!
त्यांचे ते बोलणे असे सुरुच राहिले असते म्हणून त्यात व्यत्यय आणण्यासाठी मी जोरात खाकरलो आणि मग नाईलाजाने त्यांना माझ्या अस्तित्वाची दखल घ्यावी लागली.

३ नोव्हेंबर, २००७

मी एक पुलकित! २

पुलंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे वाचणे,ती त्यांच्याच शब्दात आणि आवाजात ऐकणे आणि त्याचे दूरदर्शन रुपांतर पाहणे ह्यापैकी मला स्वतःला ती त्यांच्याच आवाजात ऐकायला जास्त आवडतात. आपण स्वतः ही व्यक्तिचित्रे नुसती वाचली तरी आवडतातच पण पुलंच्या आवाजात ऐकताना ते ती आपल्याला प्रत्यक्ष भेटवत असतात. नकलाकार असण्याचा पुलंना आणि त्यामुळे आपल्यासारख्या श्रोत्यांना ह्याठिकाणी खूपच फायदा झालाय. वर्णन केलेली व्यक्ती प्रत्यक्ष कशी बोलते ते पुलं आवाजातील बदल, चढउतार, नेमक्या जागी शब्दावर जोर अथवा शब्द तोडून आपल्याला दाखवत असतात. त्या व्यक्तीचे मूर्तीमंत दर्शन आपल्याला घडवतात.

कोकणात राहणार्‍यांना कोकणी बोली अथवा कोकणी बाणा काही नवीन नाही.पण तरीही तो ज्याला माहित नाही अशा माझ्यासारख्या असंख्य लोकांना निव्वळ शब्दांतून जाणवू देण्याची किमया केवळ पुलंच करू जाणे. आता उदाहरण म्हणून आपण "अंतू बर्वा आणि मंडळी" घेऊ या.

अंतूच्या तोंडी घातलेली आणि त्या अड्ड्यातील इतर मंडळींची भाषा पहा.

अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते.
"कशी काय गर्दी ?"
"ठीक आहे !"
"प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात ?"
"छे ! छे !"
"अहो, छे छे म्हणून झिटकता काय पाल झिटकल्यासारखे ? पहिला अंक ऐकला मी हितूनच.तुमच्या त्या सिंधूच्या पार्ट्यात काय दम दिसत नाही . 'लागे हृदयीं हुरहुर' म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलंनीत. बालगंधर्वाचं ऐकलं होतंत काय ?"
मॅनेजरही जरा उखडले. "आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा."
"अहो,गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत --- आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षतदेखील घेऊन हिंडत होते तुमचे ब्यांडवाले! अहो, एवीतेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं --- चार आण्यात जमवा."
"चार आण्यात बघायला काय डोंबा~याचा खेळ आहे काय ?"
"अहो तो बरा !
"आधी तो खेळ दाखवतो आणि मग थाळी फिरवतो."
"तुम्ही तसं करा. पुढलं 'कशि या त्यजूं पदाला' जमलं फक्कड तर थाळीत चार आणे आणखी टाकीन."

आणि हा एक नमूना पहा.अण्णा साने हा त्या अड्ड्यातलाच एक.
त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सान्यांनी एकदाच फक्त काही माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतूशेटच्या मुलाचा उल्लेख आला.
"म्हणजे? अंतूशेटना मुलगा आहे ?"
"आहे ? म्हणजे काय ? चांगला कलेक्टर आहे !"
"कलेक्टर ?"
"भायखळ्याच्या स्टेशनावर तिकिटं गोळा करतो." चेह~यावरची सुरकुती हलू न देता अण्णा म्हणाले.
"मग वडलांना मदत करीत नाही की काय ?"
"अहो, करतो कधी कधी. त्यालाही त्याचा संसार आहे. त्यातून बीबीशीआयला जीआयपीचा डबा जोडलेला ..."
ह्या अड्ड्यातले हे विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयाल होईल. बी बी सी आयला जी आय पीचा डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह हे लक्षात यायला मला उशीर लागला.
"काय लक्षात आलं ना ? तेव्हा अंतूशेटच्या स्नानसंध्येची पंचाईत होते. मुलाच्या घरी थोडी इतर ’आन्हिकंही’ चालतात म्हणे. आमच्या अंतूशेटचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाहण्यास गेला होता. गणित चुकल्यासारखा परतला. दसरा-दिवाळीला अंतू बर्व्याला मिळतं आपलं मनिऑर्डरीतून पितृप्रेमाचं पोस्त ! पाचदहा रुपयांचं ! तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप म्हणून सांगत ! आणि उगीचच खुर्दा खुळखुळवतो चार दिवस खिशात हात घालून."
"अहो, तिकिट-कलेक्टरला पगार तो काय असणार ?"
"पगार बेताचाच, पण चवल्यापावल्यांची आचमनं चालतात म्हणतात. खरंखोटं देव जाणे. आणि चालायचंच ! घेतले तर घेऊ देत .. काय ? अहो, आठ आणे खाल्ले की चौकडीचा मुगूट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि एक लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत ! लोकनियुक्त प्रतिनिधी !"

ह्या दोन्ही संवादातून आपल्याला त्या बोलण्यातला मिस्किलपणा जाणवतो पण हेच शब्द वाचण्या ऐवजी पुलंच्या तोंडून ऐकले की ते अधिक प्रभावी वाटतात.निदान मला तरी ते तसे वाटते. त्यातला नेमका आशय हृदयाला भिडतो.

हरितात्या हे एक वेगळे पात्र पुलंनी रंगवलंय. सदैव इतिहासात रमलेले हे पात्र प्रत्येक गोष्ट "पुराव्याने शाबीत करीन" असे म्हणत असते. वर्तमानात जगायला तयार नसलेले हरितात्या आणि वास्तवाची नको तितकी जाणीव करून देणारे अंतू बर्वा ह्यांची एखादी जुगलबंदी पुलंच्या लेखणीतून झरावी अशी माझी खूप इच्छा होती. पण मी ती त्यांच्याकडे पत्ररुपाने बोलून दाखवू शकलो नाही ह्याची आज खंत वाटते. तसा संवाद लिहिला गेला असता तर... माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते आहे...

अंतू उवाच : "आला न्हेरू चालले बघायला ! आणि रत्नांग्रीत दाखवलनीत काय त्यांस ? बाळ गंगाधर टिळक जन्मले ती खोली आणि खाट? गंगाधरपंत टिळकास काय स्वप्नात द्रष्टांत झाला होता काय रे ... तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार म्हणून ? कुणाची तरी खाट दाखवली नि दिलं ठोकून त्याच्यावर टिळकानं पहिलं ट्यांहां केलं म्हणून ! पुरावा काय ? का टिळकाच्या आयशीचं बाळंतपण केलेली सुईण होती साक्षीस ? टिळकाचं सोड ! शंभर वर्षं झाली त्याच्या जन्मास. तू जन्मास आलास ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय ? म्हातारीस विचारून ये घरी जाऊन आणि मग सांग मला टिळकाच्या आणि न्हेरूच्या गोष्टी."

हे ऐकून हरितात्या पुढे येतात आणि म्हणतात .....

"तुला सांगतो पुरुषोतम, पुरावा आहे. अरे आम्ही इथे असे उभे. समोर गंगाधरपंत अस्वस्थपणे फेर्‍या मारताहेत. सुईणींची लगबग चाललेय. तिथे गरम पाण्याचा बंब पेटलाय. आत असह्य होणार्‍या वेदनांनी कळवळणार्‍या पार्वतीबाई. आणि तशाच अवस्थेत एकाएकी बाळाचे "ट्यांहां" ऐकू आले. बाळ किती तेजस्वी म्हणून सांगू? अरे सगळीकडे आनंदी आनंद झाला. हत्तीवरून पेढे वाटले. असे होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!"..... वगैरे वगैरे!

अर्थात हे चित्र खर्‍या अर्थाने पुलंनीच पूर्ण करायला हवे होते.ते ह्या जन्मी तरी आता होणे नाही.पण जर कधी पुलं मला वर भेटलेच तर मी त्यांना ह्याबाबत नक्कीच गळ घालणार आहे.

१ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!४

त्या दिवशीच्या अनुभवामुळे मी वेळप्रसंगी स्वसंरक्षणासाठी हातात एखादी काठी असावी म्हणून खास शोधून एक बर्‍यापैकी काठी बरोबर बाळगू लागलो.माझ्या त्या ’हातात काठी’ घेऊन जाण्याचेही अप्रुप काही जणांना वाटले पण मी कुणालाच त्याचा खुलासा देत बसलो नाही.

त्या प्रसंगानंतर साधारण दोनतीन दिवसांनी रात्रीचे जेवण करण्यासाठी गेस्ट-हाऊसवर परतलो तेव्हा संध्याकाळचे सव्वासात वाजले असावेत.त्या दिवशीही जेवण मस्त होते.बाहेर थंडी पडायला सुरुवात झालेली आणि इथे गरम गरम फुलके पानात पडत होते. त्याच्याबरोबर तोंडी लावायला मस्त रस्सा भाजी असल्यामुळे मी अगदी रंगात येऊन जेवत होतो.चांगले मनसोक्त जेवून मग पुन्हा कामगिरीसाठी त्या महाकाय तबकडीकडे रमत-गमत जायला निघालो.

आज चंद्र चांगला हातभर वर आलेला दिसत होता. बहुदा पौर्णिमेच्या मागचा-पुढचा कोणता तरी दिवस(रात्र) असावा.मी माझ्याच तंद्रीत मार्गाला लगलो. आज माझ्यात भीमसेन संचारले होते. त्यांच्या गाण्यातल्या एकेक खास जागा मी आपल्या नरड्यातून काढण्याच्या प्रयत्नात होतो. भीमसेन आणि वसंतराव हे माझे खास आवडीचे आणि आत्मसात करण्याचे विषय आहेत. त्यांची गाणी लागली की त्यांच्यामागून मी देखिल तसेच्या तसे गायचा प्रयत्न करतो आणि बरेच वेळा चक्क जमून पण जाते. तर त्या दिवशी असाच "इंद्रायणी काठी,देवाची आळंदी। लागली समाधी,ज्ञानेशाची॥" हा अभंग गात गात निघालो.

पहिलीच तान घेताना जाणवले की आज आवाज अगदी मस्त लागलाय. आज ह्या ठिकाणी भीमण्णा असते तर नक्कीच "वा!" अशी सहज दाद मिळाली असती अशी खणखणीत तान माझ्या गळ्यातून (आता इथे नरडे म्हणणे शोभणार नाही)निघाली तेव्हाच लक्षात आले की आजचा दिवस काही वेगळाच आहे. इतकी स्वच्छ-सुंदर तान आजपर्यंत माझ्या गळ्यातून ह्यापूर्वी आलेली मलाही आठवेना.धृवपदही मस्तच जमले.त्यानंतरची दोन्ही कडवीही रंगली. वा! क्या बात है! मी आज स्वत:च स्वत:च्या गाण्यावर खुश होतो.

शेवटच्या कडव्याला पोचेपर्यंत मी महाकाय तबकडीच्या आसपास पोचलो देखिल.पण पायर्‍या चढण्या आधी चढ्या आवाजात सुरु केले "इंदायणी काऽऽऽऽठी,इंद्राऽऽयणी काऽऽठी. विठ्ठऽऽऽलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ मायऽऽऽबाऽऽऽऽऽऽऽऽऽपा, आऽऽऽऽऽऽऽ वगैरे करत पुन्हा खालच्या षड्जावर येईपर्यंत..... माझी बोलतीच बंद झाली.पायर्‍या चढण्यासाठी उचललेले पाऊल तसेच अधांतरी अवस्थेत,आवाज बंद,श्वास द्रूतगतीने चाललेला आणि नजर एका जागी खिळलेली!
त्या अलौकिक अवस्थेत काही क्षण गेले आणि मग वस्तुस्थितीची जाणीव झाली तेव्हा कळले की माझ्या नजरेसमोर अगदी ५-फुटांवर एक "नागराज" आपला भला थोरला फणा काढून अतिशय स्तब्धपणे बसलेले दिसले.

त्याची नजर आणि माझी नजर एकमेकांना भिडली आणि माझ्या अंगातून भितीची एक लहर उठली. मी तर मंत्रमुग्ध झाल्यासारखा,अगदी भारल्या सारखा तसाच उभा होतो.पुढे काय होणार हे माहित नव्हते.पुढे पाऊल टाकणे शक्यच नव्हते पण मागे पळण्याचाही विचार मनात डोकावत नव्हता. हातात जरी काठी होती तरी तिचा वापर करण्याची हिंमत होत नव्हती. काही क्षण तसेच त्या भारलेल्या अवस्थेत गेले आणि अचानक नागाने फणा खाली करून हळूहळू तो शांतपणे बाजूच्या बिळात दिसेनासा झाला.तो गेल्यावरही काही मिनिटे मी तसाच निश्चल उभा होतो.

वास्तवाचे पूर्ण भान आल्यावरही पुढे पाऊल टाकायची हिंमत होत नव्हती पण वर जाणे भाग होते कारण अजून एकाला वेळेवर जेवायला पाठवायचे होते. मी आजूबाजूचा कानोसा घेतला आणि मनाचा निर्धार करून पायर्‍यांना वळसा घालून जरा लांबून वर चढलो आणि धूम पळालो. आत दालनात पोचताच माझ्या सहकार्‍यांना झाला प्रकार सांगितला आणि त्यांचीही पांचावर धारण बसली.ज्याला जेवायला जायचे होते त्याने जेवण रद्द केले आणि पाणी पिऊनच भूक भागवली.

दुसर्‍या दिवशी मी ती गोष्ट आमच्या वरिष्ठांना सांगितली. त्यांनी ती तिथल्या सुरक्षा अधिकार्‍यांना कळवली. मग त्या लोकांनी ते बीळ आणि आजूबाजूला शोधून असलेली काही अन्य बीळे पक्की बुजवून टाकली आणि त्या ठिकाणी रात्रीचा पहारा लावला.त्यानंतरच आम्ही तिथे रात्री-बेरात्री निशं:क पणे वावरू लागलो.