त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता यावे म्हणून दोन्ही हातांनी वरच्या कड्या पकडल्या. मालाडला चढलो होतो तेव्हा जेवढी गर्दी होती त्यात अंधेरी पर्यंत वाढच होत गेली आणि मग तर श्वास घेणेही मुश्किल होऊन गेले. एकमेकांचे उच्छ्वास झेलत लोक कसे तरी प्रवास करत होते. त्यात काही पंखेही बंद होते. कुणीतरी उत्साही तरूण त्यात कंगवा घालून त्याचे पाते फिरवून पंखा सुरु होतो का असला प्रयत्नही करून पाहात होता.
जलद गाडी (फास्ट ट्रेन) असल्यामुळे अंधेरी-वांद्रे,वांद्रे-दादर आणि दादर-मुंबई सेंट्रल ह्या दरम्यानच्या स्थानकांवर ती थांबणार नव्हती त्यामुळे आता अंधेरीहून गाडी सुटल्यावर तरी निदान पुढचे स्थानक(स्टेशन) येईपर्यंत गर्दी वाढणार नव्हती. भर उन्हाळ्याचे दिवस,त्यात काही पंखे बंद म्हणजे आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना असा प्रकार होता. भरमसाठ गर्दीने आणि उकाड्यामुळे घामाने भिजलेली अंगं,त्यात पाशिंजरांच्या आपापसातील बडबडीमुळे होणारा कलकलाट आणि गाडी वेगात धावत असल्यामुळे होणारा खडखडाट ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही मला झोप येत होती. मी उभ्या उभ्या पेंगायलाही लागलो. एक-दोन वेळा मानही लुढकली पण पुन्हा मी मोठ्या निर्धाराने झोपेचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करू लागलो.
ह्या सगळ्या प्रकारात वांद्रे स्थानक आले केव्हा तेच कळले नाही पण वांद्र्याकडून गाडी जेव्हा माहीमच्या दिशेला निघाली तेव्हा त्या खाडीच्या थंडगार वार्याने मी जागा झालो. वांद्र्याला गाडी थोडी रिकामी झाल्याचे जाणवले आणि हात खाली करून कोणताही आधार न घेता उभे राहाता येईल अशी परिस्थिती असल्यामुळे मी कड्या सोडल्या आणि हात खाली केले. हातांचा स्पर्श पँटच्या खिशांना झाला आणि मी ताडकन उडालो. ज्या खिश्यात पास-पाकीट होते तो चक्क सपाट लागत होता. मी खिशात हात घालून पाहिले आणि माझ्या सगळा प्रकार लक्षात आला. माझे पाकीट त्या गर्दीत मारले गेले होते. त्यात नुकताच काढलेला तीन महिन्यांचा रेल्वेचा पास, माझे ऑफीसचे ओळखपत्र आणि काही किरकोळ रक्कम त्यात होती. पास पुन्हा काढता येत होता पण मला चिंता होती ती त्या ओळख पत्राची.कारण मी ज्या केंद्र सरकारी कार्यालयात काम करत होतो ते जरा विचित्र खाते होते. धड ना पोलीस ना नागरी. पोलिसांसारखे आम्ही २४ तास बांधील होतो पण आम्हाला गणवेश नव्हता. पोलीसांसारखे अधिकारही नव्हते पण सेवाशर्ती सगळ्या पोलिसांसारख्या. म्हणजे शिस्तीला एकदम कडक आणि अधिकार काहीच नाही. म्हणजे आमची अवस्था वटवाघळासारखी अधांतरी! ओळखपत्र हरवले म्हणजे आता चौकशीला सामोरे जावे लागणार, कानपिचक्या,दंड आणि रेकॉर्ड खराब होणार. मग आता काय करायचे?तर दादरला उतरून रेल्वे पोलीसात तक्रार करणे इतकेच माझ्या हातात होते.
मी दादरला उतरलो. रेल्वे पोलीस चौकी शोधून काढली आणि माझी तक्रार सांगितली. माझे पाकीट कुठे मारले गेले ? तर अंधेरी ते वांद्रे ह्या दरम्यान. हे त्यांनी माझ्याच तोंडून वदवून घेतले आणि आपले हात वर केले. म्हणाले की ही केस वांद्रे रेपोंची आहे तेव्हा तुम्ही तिथे जा. मग काय मी तसाच वांद्र्याला पोचलो. ह्या सर्व धांदलीत आता आपल्याकडे पास किंवा तिकीट नाही हे देखिल लक्षात आले नाही.पण सुदैवाने कुणी अडवले नाही. वांद्र्याच्या त्या पोचौ मध्ये मी पोचलो तेव्हा तिथे दोन पोलीस बसले होते. दोघे आमने सामने बसले होते. त्यातला एक जमादार(एक तारा) फोनवर कुणाशी तरी गप्पा मारत होता आणि दुसरा हवालदार त्याच्या समोरच्या बाकड्यावर बसून अगदी मन लावून कान कोरत होता. माझ्या तिथल्या आगमनाची जरादेखिल जाणीव त्यांना झाल्याचे दिसले नाही. मी आपला त्यांचे माझ्याकडे कधी लक्ष जाते ह्याची वाट पाहात चुळबुळ करत उभा होतो पण रामा शिवा गोविंदा. दोघेही आपल्याच तारेत होते. शेवटी एकदाचे त्या जमादाराचे फोनवरचे बोलणे संपले आणि आता तो आपल्याकडे नक्की पाहील आणि विचारेल... वगैरे वगैरे विचार मी केला पण पुढे काहीच घडले नाही. त्या जमादाराने हवालदाराशी बोलणे सुरु केले.
"बरं का वाघमार्या,तिच्या आयला........ ह्या मा**** साहेबाच्या *** बांबू सारला पाहिजे. फुकटचोट भे** तरास देतोय."
"सायेब.तुमाला काय सांगू? ते म्हनजे बगा एकदम बारा बोड्याचं बेनं हाय.लय मा**** बगा.त्येच्या फुडं नुस्तं हांजी हांजी म्हनायचं. अवो धा वर्सं काडलीत त्येच्या संगट.लई हरामी जात हाय. तुमी त्येच्या नादी लागू नका.... वगैरे वगैरे वगैरे"!
त्यांचे ते बोलणे असे सुरुच राहिले असते म्हणून त्यात व्यत्यय आणण्यासाठी मी जोरात खाकरलो आणि मग नाईलाजाने त्यांना माझ्या अस्तित्वाची दखल घ्यावी लागली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा