माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२६ डिसेंबर, २००९

प्रभातफेरी...पुन्हा एकदा!

सकाळी सकाळी फिरायला जाणार्‍यांची संख्या हल्ली वाढलेली दिसतेय. आता ह्याला प्रकृती सांभाळण्याबाबत आलेली जागरुकता म्हणायची की मधुमेह-रक्तदाब ह्यांसारख्या रोग्यांची संख्या वाढल्यामुळे नाईलाजास्तव करावी लागणारी पायपीट समजायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. अर्थात ह्या फिरणार्‍यांतही वेगवेगळे प्रकार आहेत.
कुणी नेहमीच्याच कपड्यात असतात,तर कुणी अगदी घरगुती कपड्यात, नुकतेच झोपेतून उठून आणि मुखमार्जन वगैरे न करता तसेच आलेले,डोळ्यातली चिपाडं काढत काढत.. बायका गाऊनमध्ये आणि पुरूष चड्डी-बनियनमध्ये. कुणी खास जामानिमा करूनही आलेले असतात. स्नान वगैरे करून, शुचिर्भूत होऊन,कडक इस्त्रीचे कपडे घालून, अत्तर किंवा सुगंधी फवारा अंगावर शिंपडून वगैरे आलेले असतात. काही लोक धावण्यासाठी खेळाडू वापरतात तसले रंगीबेरंगी ट्रॅकसूट घालून येतात.

आता हे फिरायला जाणारे लोक नेमके करतात तरी काय?तर त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. काही जण बागांमध्ये गवतावर अनवाणी फिरत असतात....बहुदा मधुमेही असावेत. काही जलद चालतात...उच्चरक्तदाबपीडीत असणार, काही हळूहळू , आपापसांत गप्पा मारत चालत असतात...गंमत म्हणून आलेले. काही जण अधून मधून धावतात/चालतात,तर काही जण अखंडपणे धावत असतात. काहीजण व्यायामशाळांमध्ये घाम गाळायला जात असतात तर काही जण बागेसारख्या सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर हातवारे करत असतात....हा ही व्यायामाचा एक प्रकार आहे. काही लोक सामुदायिक हास्यजत्रेत सामील होतात.

ह्या अशा ठिकाणी मला एक मजेशीर दृष्य दिसलं. तिघाचौघांचा एक गट बागेत फिरायला आला. येतांना एकाच्या हातात एक पिशवी दिसली. ती त्याने त्या बागेच्या झुडपात ठेवली. नंतर बागेला दोन चकरा मारून झाल्यावर त्यांनी ती पिशवी तिथून घेऊन उघडली,त्यातून एक मोठी साधारण एक लीटरची बाटली काढली,त्यातील काळसर-लाल द्रव्य प्रत्येकाने एकेक-दोन घोट पिऊन पुन्हा बाटली बंद करून पिशवीसकट तिथेच ठेऊन फेर्‍या मारायला गेले. पुन्हा दोन फेर्‍यांनंतर तेच दृष्य. हे पाहून मी आश्चर्यचकित झालो....व्यायामाचा हा वेगळा प्रकार मला नवीनच होता. चक्क दारू पितात हे लोक,तेही इतक्या उघडपणे? मला त्या लोकांबद्दल एकदम घृणा वाटायला लागली. कसे एकेक लोक असतात ना? व्यायाम करायला येतात आणि दारू पितात...छे,छे. चांगलं नाही हे. असे का बरं करत असावेत हे लोक? दिसायला तर चांगल्या घरातले दिसताहेत.....माझ्या मनातलं कोडं काही सुटेना.

पण ह्या गोष्टीचा उलगडा लवकरच झाला. मी पूर्वी जिथे राहायचो तिथेच एक जैन मंदिर होते(आता तेही गेले). तिथे रोज भल्या पहाटे एका मोठ्या पातेल्यात एक औषधी काढा बनवून तो लोकांना पिण्यासाठी ठेवलेला असायचा. त्या चार लोकांपैकी एकाला मी एकदिवस त्या जैन मंदिरातून बाटलीसकट बाहेर पडतांना पाहिलं आणि लगेच ते कोडं सुटलं...ते चौघे जे प्यायचे तो काढा होता....साधारण काळसर लाल रंगाचा...आणि मी भलतेच समजलो होतो. चुकून का होईना मी त्यांच्यावर अन्याय केला होता म्हणून मी जाऊन त्यापैकी एकाला माझा गैरसमज कसा झाला होता ते सांगितले आणि ते चौघेही जोरजोरात हसायला लागले. मीही त्यांच्या हास्यात सामील झालो. त्यानंतर कधी माझी त्यांची भेट झाली की आम्ही त्या आठवणीने आजही हसतो. :)

सकाळची ही सगळी दृष्यं अतिशय आल्हाददायक असतं. सकाळी अजून एक हमखास दिसणारं दृष्य म्हणजे कुत्र्याला फिरायला आणणारी माणसं.....खरं तर हे लोक कुत्र्यांना फिरायला आणत असतात की कुत्रे त्यांना फिरवतात हा एक संशोधनाचा विषय आहे. गळ्यात पट्टा आणि साखळी घातलेला कुत्रा त्याला हवा तसा चालत असतो,वळत असतो. हे फिरणंही बहुतेकवेळा दिशाहीन असतं. कुत्रा वाटेत हुंगत हुंगत मध्येच कुठे तरी एखाद्या ठिकाणी तंगडी वर करून अभिषेक करत असतो तर कधी एखाद्या ठिकाणी मलविसर्जन करत असतो...अशा वेळी कुत्र्याचा मालक/मालकीण शांतपणे उभे असतात...एरवी कुत्रा त्यांना सतत ओढत असतो आणि कुत्र्याला आवरण्यातच मालक सगळी शक्ती एकवटत असतो. ह्यातल्या कुत्र्यांच्या जातीही वेगवेगळ्या असतात. लांडग्यासारखे दिसणारे अल्सेशियन, ऊंच ,दणकट आणि क्रूर चेहर्‍याचे डॉबरमन, लाडावलेली केसाळ पांढरीशुभ्र पामेरियन्स, आणि अशाच इतर अनेक जाती-प्रजाती आपापल्या मालकांना फिरवत असतात. परवाच एक बुलडॉग(नक्की बुलडॉग होता का?) पाहिला....जाणारे-येणारे सगळे लोक त्याच्याकडे आणि त्याच्या मालकाकडे आश्चर्याने पाहात होते. आमच्या त्या विभागात सहसा न दिसणारा तो अतिभव्य प्राणी आणि त्याचा अगदी सामान्य मालक...अशी ती विचित्र जोडी होती. अंदाजे साडेचार फूट उंच आणि तितकाच लांब असा तो कुत्रा भलताच रुबाबदार दिसत होता. रस्त्यावरची यच्चयावत कुत्री त्याला पाहून भुंकत होती....हे असे भुंकणे का आणि कशासाठी असते हे केवळ ते कुत्रेच जाणे. ती मानवंदना असते की....हा कोण उपटसुंभ आमच्या गल्लीत घुसखोरी करतोय..अशी भावना असते त्यामागे? असो. बाकी ते जनावर बाकी खरंच खूप उमदं होतं..आवडलं आपल्याला.

सकाळी अजून एक नेहमी दिसणारं दृष्य म्हणजे कचरा गोळा करणार्‍या मद्रासी बायका आणि त्यांच्यावर भुंकणारे गल्लीतले कुत्रे. ह्या बायका खरे तर नियमित येत असतात आणि त्यामुळे कुत्र्यांनाही त्या परिचित असतात..तरीही कुत्रे त्यांच्यावर भुंकतातच. एक मोठंच्या मोठं तागाचं पोतं घेऊन ह्या बायका जागोजागी फिरून कचरापेटी उचकटत असतात. त्यातून बरंच काही निवडून आपल्या पोत्यात भरत असतात. मधेच एकमेकींची चौकशी करण्यासाठी कुठेतरी एखाद्या मोकळ्या पडलेल्या हातगाडीवर बसून चहाचे घुटके घेत आपल्या गेंगाण्या आणि कर्कश्श आवाजात हितगुज करत असतात. ह्या अशाच एका मद्रासी कचरा गोळा करणार्‍या बाईच्या बाबतीत पाहिलेली आणि आश्चर्य वाटणारी एक गंमत आहे....ही बाई एका विशिष्ठ गल्लीत जेव्हा जाते तेव्हा तिथले कुत्रे तिच्यावर अजिबात भुंकत नाहीत तर ते तिच्या मागे मागे फिरतात. ती जाईल तिथे ते तिच्या मागे अगदी आज्ञाधारक मुलांप्रमाणे भटकत असतात. आपली हद्द संपली की मग ते मागे फिरतात...पण चुकुनही तिच्यावर भुंकत नाहीत किंवा तिच्यावर हल्लाही करत नाहीत. त्या बाईलाही त्या गोष्टीची सवय झाली असावी बहुदा...कारण तिलाही त्या कुत्र्यांची अजिबात भिती वाटत नाही...ती अगदी सहजतेने त्या भागात वावरत असते. तिने कधीच त्या कुत्र्यांना खायला घातलेले मी पाह्यलेले नाहीये..मग हे असे का घडत असेल?कुणास ठाऊक. सगळ्याच गोष्टींमागे काही कार्यकारणभाव असलाच पाहिजे असा तरी अट्टाहास का म्हणा.

सकाळी प्रत्येक गल्लीच्या तोंडाशी कुत्र्यांची सभा भरलेली दिसते....बरेचदा सभेत हजर सभासद हे मौनीबाबाच असतात. बहुदा ते वाट पाहत असतात...सकाळच्या न्याहरीची. कुणी बिस्किटं खायला घालणारा नेहमीचा इसम दूरून येतांना दिसला की ह्यांचे डोळे लुकलुकायला लागतात आणि शेपट्या हलायला लागतात. तो जसजसा जवळ यायला लागतो तसतशी कुत्र्यांच्या नजरेतली अधीरता वाढतांना दिसते. तो जवळ आला की मग त्याच्या अंगावर उड्या मारून त्याने त्यांच्या दिशेने फेकलेली बिस्किटे तोंडात पकडण्याचा खेळ सुरु होतो. ह्यातले काही खरचं अव्वल क्षेत्ररक्षकासारखे बिस्किटांचा झेल अलगद टिपतात तर काही ढिसाळ क्षेत्ररक्षकांसारखे झेल सांडत असतात. एकूणच हा खेळ गमतीचा असतो.
हे बिस्किटं खायला घालणारे लोक असतात ना त्यातही काही अजून पोचलेले लोक असतात. ते मोटर सायकलवरून गल्लोगल्ली भटकतात. त्यांच्याकडे बिस्किटांबरोबर कधीकधी दुधाच्या पिशव्या आणि प्लॅस्टिकचे वाडगेही असतात. ह्या वाडग्यातून ते कुत्र्यांना दूध प्यायला देतात. एकूणच अशावेळी कुत्र्यांची चंगळ असते.

सकाळची अशीच चित्रविचित्र आणि मजेशीर दृष्य पाहात माझे मार्गक्रमण होत असतं.

२० डिसेंबर, २००९

१९डिसेंबर १९९९

दहा वर्ष झाली त्या गोष्टीला. तरीही प्रसंग कालच घडल्यासारखा वाटतोय. आज इतक्या वर्षानंतरही तिची उणीव पदोपदी भासतेय.
जनकवी भा.रा. तांबे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे..

जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहिल कार्य काय....

हे तर खरंच आहे. राम-कृष्ण गेले तरी जगरहाटी सुरूच आहे की. कोण कुणासाठी थांबलंय? दोन मिनिटांची मूक श्रद्धांजली,बारावं-तेरावं आणि वर्षश्राद्ध किंवा स्मृतिदिन ह्याउप्पर आपण दुसरं काय करतोय? जाणारं माणूस जातं, मागे रहिलेली माणसं क्षणिक हळहळतात आणि पुन्हा आपल्या कामाला लागतात. हे असंच चालायचं हो. कुणी तरी म्हटलंच आहे ना....

एकटेच येणे येथे,एकटेच जाणे
एकट्याच जीवाचे हे एकटेच गाणे....

ह्या जगात येणेही एकटेच आणि इथून जाणेही एकटेच. येतांना लोक ’त्या’ला(जीवाला) रडवतात आणि स्वत: हसतात आणि ’तो ’ जाताना लोकांना रडवून जातो. हाच का काव्यात्म न्याय?

दहा वर्षांपूर्वी ’ती’ही अशीच गेली मला सोडून...माझ्या पदरात एक लहान लेकरू टाकून. कसं जाववलं तिला? माझं तिच्यावरचं आणि तिचं माझ्यावरचं प्रेम, तिची लेकरावरची माया आणि तिचीच... जगण्याची दूर्दम्य इच्छा देखिल तिला परावृत्त नाही करू शकली...जाण्यापासून. एरवी कुठेही जातांना तिला माझी सोबत लागायची; पण ह्या अनंताच्या प्रवासाला ती एकटीच निघून गेली. तिला एकटीला भिती कशी नाही वाटली?

आमचं दोघांचं ठरलं होतं..अगदी म्हातारं होईस्तो जगण्याचं..एकमेकांच्या साथीने.
अहो,असं काय करताय,ती कानटोपी घाला ना,सर्दी होईल अशानं. आताशा सोसत नाही तुम्हाला थंडी....असं थरथरत्या आवाजात तिचं म्हणणं..
मग मी म्हणावं...अगं,तुही घे हो ती शाल लपेटून अंगाभोवती. हवेत किती गारठा पडलाय बघ, नंतर मग खोकत बसतेस रात्रभर.....
असं अगदी भविष्यातली चित्रं रंगवत आम्ही गप्पा मारायचो...मी माझं वचन पाळलं,पण तिने तिचे वचन नाही पाळलं. अर्धा डाव टाकून गेली...असं करणं शोभलं का तिला?

आम्ही दोघेच असतांना तासंतास एकमेकाशी गप्पा मारायचो. रोज गप्पा मारण्यासारखं काय असतं हो एवढं?असा प्रश्न कुणालाही पडेल; पण आम्हा दोघांना कधी तसा प्रश्नच पडला नाही. आमच्या गप्पांना कोणत्याच विषयाचं वावडं नव्हतं की बंधनही नव्हतं. माझं बोलणं ऐकतानाचं तिचं ते टक लावून पाहाणं.....जाऊ द्या... आता फक्त आठवणीच आहेत. जातांना तिला इतकंही कळू नये की आता माझं बोलणं कोण ऐकेल म्हणून?

१९डिसेंबर १९८६ ला माझ्या जीवनात आली...माझी प्रिया.... आणि १९ डिसेंबर १९९९ ला निघून गेली अनंताच्या प्रवासाला.... तेरा वर्षांचा सुखी संसार असा अचानक सोडून ती का बरं गेली असावी....आजही ’ह्या’ प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये मला....

???

२ डिसेंबर, २००९

हिवाळी अंक प्रकाशन!

मित्रहो, महिन्यापूर्वी "महाजालीय शारदीय अंक" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती. त्या कल्पनेचं जोरदार स्वागत झालं. त्याच वेळी हा अंक साधारण नाताळच्या आसपास प्रसिद्ध करावा असंही मनात योजलेलं होतं; मात्र ह्या कल्पनेला आलेला उदंड प्रतिसाद आणि प्रकाशन कधी होणार? अशी सातत्याने होणारी विचारणा लक्षात घेऊन, वाचकांची उत्सुकता जास्त ताणून न .. धरता आम्ही हा अंक आजच प्रकाशित करत आहोत.

शारदीय अंक...हे खरं तर ह्या अंकाचं नाव नव्हतंच...तर तो एक अंकाचा प्रकार होता....जसा दिवाळी अंक.
आवाहना दरम्यानच्या चर्चेत ह्या अंकाचे नाव काय असावे....ह्याबद्दलही एकदोन सुचवण्या आलेल्या होत्या. प्रशांत मनोहरने....प्रकाशनाच्या दरम्यान शिशिर ऋतू असणार म्हणून त्याला ’शैशिरिय’ म्हणावे...असे मत मांडले, तर क्रान्तिने ’शब्दगारवा’ हे नाव सुचवले.

बराच विचार केल्यावर आम्ही असे ठरवले की..... अंक हिवाळ्यात प्रसिद्ध होतोय म्हणून.....हिवाळी अंक.. आणि म्हणूनच त्याला साजेसे क्रान्तिने सुचवलेले शब्दगाऽऽरवा हेच नाव आम्ही ह्या अंकासाठी निश्चित केलंय.

ह्या अंकात आपल्याला जुन्या-नव्या अशा सर्वांचे लिखाण वाचायला मिळणार आहे. ह्या अंकातील मान्यवर असे आहेत......
क्रान्ति, मदनबाण, माझी दुनिया, स्नेहाराणी, मनीषा भिडे, विनायक रानडे, कै. गीता जोगदंड,शशिकांत ओक, वैशाली हसमनीस, जयश्री अंबासकर, सुधीर काळे, अवलिया, नरेंद्र प्रभू, नरेंद्र गोळे , सुधीर कांदळकर, जयबाला परूळेकर आऽऽऽणि कांचन कराई(आदिती).

ह्या अंकाच्या संपादनात विनायक रानडे, माझी दुनिया आणि मदनबाण ह्यांनी मोलाचे साह्य केलेले आहे.
ह्या अंकातील सजावट आणि अंकाच्या मुखपृष्ठाचे काम विनायक रानडे ह्यांनी खूपच सुंदर पद्धतीने केलंय.

तेव्हा हा अंक आपल्यासारख्या दर्दी रसिकांच्या हवाली करत आहोत. वाचा आणि सांगा....कसा वाटला अंक.

कळावे,
आपला स्नेहांकित
प्रमोद देव

२० नोव्हेंबर, २००९

’स्टार माझा’चे आभार!

मित्रहो गेल्यावर्षीप्रमाणे ह्या वर्षीही ’स्टार माझा’ ह्या वाहिनीने घेतलेल्या ’ब्लॉग माझा’ ह्या स्पर्धेत मी भाग घेतला होता.
आज सकाळी जीमेल मधील पत्रव्यवहार पाहताना एक वेगळेच पत्र दिसले. ते होते श्रीयुत प्रसन्न जोशी ह्यांचे. त्यात त्यांनी स्पर्धेचा निकाल पाठवलेला होता.

निकालात बरीच परिचित नावं दिसत होती. स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवणारी नीरजा पटवर्धन(नीधप).
विशेष उल्लेखनीय म्हणून ज्यांना पारितोषिकं मिळाली आहेत त्यातले हरिप्रसाद भालेराव(छोटा डॉन),देवदत्त गाणार(देवदत्त), राजकुमार जैन(राजे), दीपक कुलकर्णी(कुलदीप) आणि आनंद घारे(आनंदघन).
ही सगळी नावं आणि एकूणच पत्रातला सगळा मजकूर इंग्लीशमध्ये असल्यामुळे वरील सगळी नावं एकदोनदा वाचल्यावरच कळली. :)
पण त्यात अजून एक नाव दिसत होते....जे मला कुठे तरी ऐकल्यासारखे वाटत होते...पण ती व्यक्ती नेमकी डोळ्यासमोर येत नव्हती. इंग्लीशमध्ये स्पेलिंग लिहिलेले होते...पीआरएएमओडी डीइव्ही.
बराच वेळानंतर प्रकाश पडला की ते नाव....माझेच होते. ;)
मी माझ्या देव आडनावाचे डीइओ असे स्पेलिंग करतो त्यामुळे कुणी त्याचे डीइव्ही असे केले तर ते मला नेहमीच अनोळखी वाटत असते.

ह्यातला विनोदाचा भाग सोडला तर एक सांगेन ते म्हणजे ह्यावर्षी मला पारितोषिक मिळेल असे मी अजिबात गृहित धरलेले नव्हते...गेल्या वर्षी मात्र का कुणास ठाऊक पण ठाम खात्री होती. :D आणि गंमत म्हणजे गेल्या वर्षी न मिळता पारितोषिक अचानक ह्यावर्षी मिळाले...हे देखिल थोडे धक्कादायक वाटले. :D
मध्यंतरी ही स्पर्धाच रद्द झाली अशी माहिती एका मित्राकडून मिळाली होती.त्या पार्श्वभूमीवर तर आज आलेला निकालाचा मेल अजून जास्त धक्कादायक वाटला. असो. तरी देखिल आपला समावेश पारितोषिक पात्रांमध्ये झाला हे वाचून इतके दिवस जे काही वेडेवाकुडे लिहिले त्याची कुणीतरी दखल घेतंय ह्याची जाणीव झाली आणि बरंही वाटलं.
मराठीतून,तेही देवनागरीतून लिहीणार्‍या....लिहू शकणार्‍या ब्लॉगर्सना इंग्लीशमधून...म्हणजे लिपीही रोमन आणि मजकूरही इंग्लीशमध्ये... हा निकाल पाठवण्याचे कारणच काय?
तर, खुलाशात असं लिहिलेलं आढळलं....की एखाद्याच्या संगणकात देवनागरी फॉंट न दिसण्याची अडचण असू शकते. मला काही हे पटलं नाही. देवनागरीतून अट्टाहासाने लिहीणार्‍यांकडे अशी अडचण असणारच नाही असे माझे मत आहे. अर्थात....कुणी सांगावं ते म्हणतात तसे काही लोक असतीलही.....पण ते तसे असतील तर माझी त्यांना नम्र विनंती की...आपल्या संगणकाला काँप्लेक्स स्क्रीप्ट्सचा पाठिंबा आहे की नाही ते तपासून पाहावे आणि तो तसा नसल्यास सर्वप्रथम तो स्थापित करून घ्यावा.
अधिक काय सांगू?

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मला पारितोषिक ’पात्र’ ;) ठरवल्याबद्दल स्टार माझाचे मन:पूर्वक आभार.

६ नोव्हेंबर, २००९

महाजालीय शारदीय अंक!

मंडळी,माझ्या मनात एक आयडियाची कल्पना आलेय. महाजालीय दिवाळी अंकासारखाच एक महाजालीय शारदीय अंक काढावा...ज्यासाठी सर्वांना हार्दिक निमंत्रण.
ह्या अंकासाठी लेखनाचा विषय कोणताही चालेल. तरीहीलोकांनी विचारणा केल्यामुळे अजून सविस्तर लिहितोय.
लेखनाचे विषय राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/प्रवासवर्णन/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन इत्यादि कोणतेही चालतील.

लेखन पाठवण्याची शेवटची तारीख ३०नोव्हेंबर २००९ अशी आहे. लेखनासोबत छापण्यासाठी आपले छायचित्रही जरूर पाठवावे. नाताळच्या आसपास हा अंक प्रसिद्ध करण्याचा मनसुबा आहे.
केवळ नवे/ताजे लेखन ह्या अंकासाठी पाठवावे. ह्या अंकासाठी पाठवलेले लेखन इथे प्रसिद्ध होईपर्यंत कृपया दुसरीकडे कुठेही प्रकाशित करू नये. योग्य वेळेत लेखन पाठवणार्‍या प्रत्येकाचे लेखन ह्यात समाविष्ट करण्यात येईल. संपादन कात्री/निवड निकष वगैरे असे कोणतेही बंधन राहणार नाही.

ह्या अंकाचे स्वरूप ब्लॉग पद्धतीचेच राहील...कारण मला स्वत:ला तांत्रिक गोष्टीत फारसे गम्य नाही. तरीही काही उत्साही आणि जाणकार मंडळी मदतीला मिळाली तर ह्या अंकाचे स्वरूप अधिक आकर्षक करता येईल.

तरी ह्या अंकाबाबत काही सुचना असल्यास अवश्य कळवाव्या...त्यांचे स्वागतच होईल.
लेखन पाठवण्यासाठीचा पत्ता:
attyaanand@gmail.com
लेखन पाठवताना.....शारदीय अंकासाठी....असे लिहून पाठवावे.....म्हणजे माझ्या वैयक्तिक पत्रव्यवहारापेक्षा वेगळे म्हणून लगेच लक्षात येईल.
चला तर मग आता लागा कळफलक बडवायला. कथा,कविता,लेख वगैरे जे हवे ते लिहा आणि पाठवा.
तथास्तु!!!

४ नोव्हेंबर, २००९

ही बालगीते कोणाकडे आहेत काय?

मी ५वी ६वीत असताना म्हणजे सुमारे ४० वर्षापूर्वी ही दोन बालगीते पाठ करून त्यावर शाळेत बक्षिसे देखील मिळवली होती.पण ती बालगीते आता मला पुसटशी आठवतात ती अशी....

१) अशी कशी बाई ही गंमत झाली
फराळाची ताटली चालू लागली

कुशीवर झोपून लाडू कंटाळला
टुणकन ताटलीच्या बाहेर आला
गड गड गड गड गोलांटी रंगली.......वगैरे वगैरे.

आणि

२) मेथाबाईचे लगीन निघाले
दुध्या-भोपळा नवरा झाला
पुढे काशीफळ आघाडीला
वांगी-बटाटे दोहो बाजूला....... वगैरे वगैरे

ह्या बालगीतांचे कवी कोण हे देखिल मला आठवत नाहीत.आपणा पैकी कोणाला ह्याबद्दल काही माहिती असल्यास कळवण्याची कृपा करावी.

३ नोव्हेंबर, २००९

कांद्याची पीठ पेरून भाजी!

मंडळी मी माझी एक आवडती पाककृती इथे चढवतोय.
बरेचजण विविध भाज्या बनवताना त्यात कांदा घालतात. पण मी आज फक्त कांद्याची भाजी कशी करतात हे सांगणार आहे.अर्थात हा पदार्थ तसा काही नवीन नाहीये. ही भाजी मी माझ्या लहानपणापासून खात आलेलो आहे....म्हणजे ही केवळ ही एकच भाजी नाही बरं का. :D
माझी आई ही भाजी अतिशय चविष्ट आणि खमंग अशी बनवायची. तुमच्यापैकी कैक जणांकडेही कदाचित ही भाजी केली जात असेल. असो. आता नमनाला वाटीभर तेल वापरल्यावर मूळ कहाणीकडे आपण आता वळू या....अहो तो ’वळू’ नाही हो. ;)
ह्या भाजीला लागणारे साहित्यः
४ कांदे,२चमचे चण्याचे पीठ(बेसन),तिखट,मीठ,साखर,तेल,मोहोरी,हिंग इत्यादि.
कृती:प्रथम कांदे सोलून,चिरून घ्यावेत. चिरताना कांदे उभे(खाली दाखवल्याप्रमाणे) चिरावेत.



त्यानंतर कढईत दोनतीन चमचे तेल घालून हिंग-मोहोरीची फोडणी करावी. त्या फोडणीत चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. त्यानंतर त्यात चवीपुरते लाल तिखट,मीठ आणि चिमूटभर साखर(साखरेमुळे खमंगपणा येतो.) घालून कालथ्याने सगळं एकजीव करावं.
त्यानंतर भाजीत बेसन घालावे... बेसन घालताना ते चमच्याने आधी हातावर घ्यावे आणि नीट पसरून भाजीवर पेरावे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. पुन्हा कालथ्याने भाजी सारखी करून मग त्यावर झाकण ठेवून एक हलकीशी वाफ द्यावी जेणेकरून बेसन कच्चं राहणार नाही.



अशा तर्‍हेने आपली भाजी तयार झाली.
करून पाहा आणि खाऊन सांगा कशी वाटली.
तळटीप: कांदे चिरल्यावर जरी जास्त दिसले तरी त्याची भाजी चोरटी होत असते. तेव्हा केवळ हे एकच तोंडीलावणे असल्यास अशी भाजी करताना आपण किती लोकांसाठी ही भाजी करणार आहोत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणात कांदे आणि इतर साहित्य वापरावे.

३० ऑक्टोबर, २००९

संगीत चिवडामणी!

संगीत चिवडामणी...ह्या नावाच्या आधी प्रकाशित केलेल्या माझ्या एका लेखाचे हे अभिवाचन आहे. ऐकून पाहा आवडतंय का?

२० ऑक्टोबर, २००९

दिवाळीचा सण!

मित्रहो,पुन्हा एकदा शब्दांची जुळवाजुळव करून अट्टाहासाने एक कविता केलेय आणि ते कमी म्हणून की काय तिला चालही लावलेय. तेव्हा कविता वाचा आणि ऐका बरं का!

आला दिवाळीचा सण आला
हासू नाचू खेळू चला॥धृ.॥

अंगणात काढा रांगोळी
पणती उजळेल दिवाळी ।
आकाशकंदील चढवू चला
फराळ मिळूनी करू चला ॥

इथे चाल ऐका.

१८ ऑक्टोबर, २००९

प्राक्तन!

प्राक्तन! शब्द जरा जडच आहे नाही. पण तरीही बहुतेकांच्या तोंडातून तो कधी ना कधी उमटतोच.आपटे गुरुजींचं आयुष्य पाहिलं की लक्षात येतं की ...हे प्राक्तन वगैरे नक्कीच खरं असावं. आता हे आपटे गुरुजी कुठून आणले? सांगतो. अगदी व्यवस्थितपणे सांगतो.

ज्या शाळेत माझं माध्यमिक... म्हणजे इयत्ता ५वी ते ११वी असं शिक्षण झालं त्या शाळेच्या काही संस्थापकांपैकी ते एक होते. होते म्हणजे...आता हयात नाहीत. मरेपर्यंत ध्यास एकाच गोष्टीचा होता...शिकवणं आणि शहाणं करून सोडणं. वागण्यात अतिशय शिस्तशीर आणि स्वभावाने तितकेच कडक. क्वचित प्रसंगी माफक विनोद आणि स्मितहास्य. एरवी चेहरा करारी आणि उग्र. आमच्या शाळेचे ते सर्वात पहिले मुख्याध्यापक होते. कधी धोतर सदरा आणि टोपी तर कधी शर्टपॅंट...मात्र हे सगळं जाड्याभरड्या खादीचे असायचे. २६ जानेवारी आणि १५ऑगस्टच्या दिवशी मात्र खास खादीचा सूट असायचा. उभं राहणं देखिल अगदी ताठ. शुक्रवारचा ’मास ड्रील’चा तास कधी मधी ते घेत...तेव्हा ’एडी मिलाव’ आणि ’कदम खोल’ हे त्यांचे शब्द ते ज्या आवाजात उच्चारत..त्याला जवाब नव्हता.बोलणं वागणं अगदी हुकुमशहासारखं होतं. एरवी हिंदी,समाजशास्त्र असेही काही विषय ते वरच्या वर्गांना शिकवत.

ह्यांचा मुलगा...दोन मुलींच्या पाठीवर मोठ्या नवस-सायासाने झालेला असल्यामुळे त्याच्या पायात एक चांदीचा वाळा घातलेला होता.पोरगं तसं लाडावलेलंच होतं म्हणा. हा मुलगा माझ्यापेक्षा एखाद-दोन वर्षाने मोठा होता आणि अंगापींडाने देखिल मजबूत होता. मात्र डोक्याने जरा कमीच होता. १ली ते चौथी माझ्याप्रमाणेच तो नगरपालिकेच्या शाळेत जायचा...तेव्हा आमच्या ह्या(माध्यमिक) शाळेच्या एका शिपायाच्या कडेवर बसून यायचा-जायचा. हे त्या दोघांचे येणे-जाणेही ’प्रक्षणीय’ होतं.
हा शिपाई लहानखोर अंगाचा आणि डोळ्याने चकणा होता....मात्र मनाने तितकाच निर्मळ आणि आज्ञाधारक होता. त्या लहान चणीच्या शिपायाच्या कडेवर ते पायात चांदीचा वाळा आणि डोळ्यात भरमसाठ काजळ(की काजळात डोळा) घातलेलं ’भलं थोरलं मूल’ पाहिलं की असं वाटायचं.....एखाद्या लहान मुलाने मोठ्या भावाला कडेवर घेतलं असावं. ;) पाचवीपासून मग तो त्याच शिपायाबरोबर त्याचा हात धरून आणि दप्तर शिपायाच्या गळ्यात टाकून शाळेत यायचा आणि पुन्हा घरी जायचा.
हा मुलगा जेमतेम ११वी पास झाला...तोही एकदोनदा गोते खाऊनच. ह्यालाच म्हणतात प्राक्तन....आपटे गुरुजींसारख्या शिक्षण-महर्षींच्या पदरी असा करंटा पुत्र...तोही नवसाने जन्मावा...दुसरं काय म्हणायचं? गुरुजींची बायको सदा आजारी..त्यामूळे त्या आघाडीवरही आनंदी-आनंदच होता. त्यांची मोठी मुलगी देखिल डोक्याने अधूच निघाली. बाकी इतर विषयात...संसारोपयोगी गोष्टीत त्या मानाने बरी होती. आईच्या सततच्या आजारपणामुळे तिलाच सगळं सांभाळावं लागलं आणि पुढे तिचं लग्नच नाही झालं.
त्यानंतरची दुसरी मुलगी जेमतेम ११वी झाली. तिचंही लग्न नाही झालं.

पुढे काही कारणावरून शाळेच्या संचालक आणि संस्थापकांमध्ये मतभेद निर्माण झाले...त्याची परिणती म्हणून आपटे गुरूजींना शाळा सोडावी लागली. पण ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी लटपट खटपट करून दुसरी एक शाळा स्थापन केली आणि त्यात आपल्या धाकट्या मुलीला शिक्षिका म्हणून नेमले. आणखी काही वर्षांनी मुलालाही त्याच संस्थेत कारकून म्हणून नेमले. पण पहिल्या शाळेसारखी(माझी शाळा) ही दुसरी शाळा मात्र ते नावारुपाला नाही आणू शकले.

आज गुरुजी हयात नाहीत. त्यांची ती मोठी मुलगी देखिल आता वृद्धत्वाने वाकलेली आहे. अंगावरची वस्त्रं देखिल अतिशय मलीन असतात.मधल्या मुलीबद्दल फारशी माहिती नाही. मुलगा अजूनही अंगाने तसाच आडदांड आहे पण आता नाही म्हटले तरी वृद्धत्वाने तोही वाकलाय...तशात लग्न झालेलं नाही... बाकी परिस्थिती एकूण बेतास बात अशीच आहे. कसंबसं जीवन जगताहेत. काय म्हणावे ह्या परिस्थितीला?

ज्याने असंख्य उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले....त्या हाडाच्या शिक्षकाची पुढची पिढी अशी निपजावी ना? जीवनात ऐहिक यश,सुख म्हणतात त्याचा लवलेशही ह्या शिक्षकाच्या संपूर्ण हयातीतच नव्हे तर त्याच्या पुढच्या पीढीतही नसावा...ह्याला काय म्हणावे?
प्राक्तन...दुसरे काय?

१७ ऑक्टोबर, २००९

पुनर्जन्म!

मित्रहो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकम्युनिकेशन क्षेत्रात माझी पुरी हयात गेली तरीही आज मी पूर्णपणे एक सामान्य व्यक्ती म्हणून जगतोय. म्हणजे असं की जेव्हा जे करायचं ते हिरीरिने केलं,त्यात बर्‍याच अंशी प्राविण्यही मिळवलं; मात्र आता ते सगळं सगळं जाणीवपूर्वक विसरलोय. राहिलेत फक्त काही कडू-गोड आठवणी. त्यातलीच एक इथे सांगतोय. पाहा तुम्हाला आवडते का?

आयटीआय(आय.आय.टी. नव्हे) मधून मी रेडिओ आणि टेलिव्हिजन मेकॅनिकचा दोन वर्षांचा(१९६९-१९७१)कोर्स केला तेव्हा खरे तर मुंबईत दूरदर्शनचा जन्म व्हायचा होता; त्यामुळे टीव्हीबद्दलचे फक्त पुस्तकी ज्ञान घेऊनच बाहेर पडलो होतो. पुढे २ऑक्टोबर१९७२ ला गांधी जयंतीचा मुहूर्त साधून मुंबई दूरदर्शन सुरु झाले.सुरुवातीला दूरदर्शनसंचांची(दूदसं)म्हणजेच टीव्ही सेट्सची संख्या मर्यादित होती आणि असे संच निर्माण करणार्‍या कंपन्याही अगदी मोजक्याच होत्या. हे सगळे दूदसं श्वेत-श्याम(ब्लॅक ऍंड व्हाईट)प्रकारातले होते.फारच थोड्या लोकांकडे असे संच त्यावेळी होते आणि त्यामुळे त्यावरचे कार्यक्रम पाहण्यासाठी अशा लोकांकडे खूप गर्दी जमत असे.

मी देखिल असे बरेच कार्यक्रम दुसर्‍यांच्या संचावर पाहत असे कारण आमच्या घरात त्यावेळेपर्यंत वीजच नव्हती. ती आली साधारण १९७५च्या आसपास.त्यामुळे जरी मी कोर्स १९७१ साली पूर्ण केलेला होता तरी घरी वीजेशी संबंधी कोणतेही काम करू शकत नव्हतो. १९७२ साली मला नोकरी लागली आणि मी माझे कौशल्य तिथे पारखून घ्यायला लागलो. पण इथे मुख्य काम टेलेकम्युनिकेशन संबंधीचे होते. इथे असणार्‍या काही कर्मचार्‍यांचे रेडिओ,ट्रान्झिस्टर आणि टेप रेकॉर्डर्स मी फुकटात दुरुस्त करून दिले आणि हळूहळू माझ्या कार्यालयीन कामाव्यतिरिक्त ह्या असल्या कामातही मी चांगलाच सराईत झालो. तरीही अजूनपर्यंत टीव्हीला मी हात लावलेला नव्हता,कारण त्यासंबंधीचे प्रात्यक्षिक मी अजूनपर्यंत केलेले नव्हते. एक-दोघांनी त्यांचा टीव्ही दुरुस्त करायला मला बोलावणेही धाडले होते पण माझ्यातच तसा आत्मविश्वास नसल्यामुळे मी त्यांना विनम्रपणे नकार दिला होता. पुढे लोकांची आमंत्रणे वाढायला लागली आणि मला त्याबाबत गंभीरपणाने विचार करावा लागला. त्याचा परिणाम म्हणून मग मी टीव्ही दुरुस्तीचा एका छोटासा खाजगी कोर्स केला आणि हळूहळू टीव्ही दुरुस्तीच्या क्षेत्रात प्रवेश केला.

सुरुवातीला मला बर्‍याच ठिकाणी हमखास अपयश येत गेले. लोकांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही. त्यावर मनातल्या मनात विचारमंथन सुरु असायचे की टीव्हीबाबत मला पूर्ण ज्ञान असूनही असे का होत असावे? विचार करता करता मला एक गोष्ट लक्षात आली आणि त्यावर नीट लक्ष केंद्रित केल्यावर मग मी देखिल सहजपणाने टीव्ही सेट्स दुरूस्त करायला लागलो. काय बरे हो्ती ती गोष्ट? सांगतो....
जेव्हा केव्हा मी कुणाच्याही घरी दुरुस्तीसाठी जात असे तेव्हा त्या टीव्हीचे मागचे कव्हर उघडल्यावर सर्वप्रथम काय दिसायचे तर..खंडीभर धूळ साचलेली असायची. मग मी सर्वात आधी ती धूळ साफ करायचो. टीव्ही आतून एकदम चकाचक करून टाकत असे आणि हीच गोष्ट नेमकी माझ्या अपयशाला कारणीभूत असायची. साफसफाई करताना टीव्हीतल्या मूळ दोषाबरोबर अजूनही काही ’मानवनिर्मित’ दोष निर्माण व्हायचे...जे शोधणे महाकर्म कठीण काम होऊन बसायचे. त्यामुळे टीव्हीतला मूळ दोष काढला तरी हे नवनिर्मित दोष काही केल्या डोक्यातच घुसायचे नाहीत...मग त्यावर उपाय काय योजणार?
असो. तर अशा तर्‍हेने ठकत ठकत मी शहाणा झालो आणि टीव्ही दुरुस्तीतही चांगलाच सरावलो.

असाच एकदा एका ठिकाणी टीव्ही दुरुस्ती आटोपून मी माझ्या सामानाची आवराआवर करत होतो. इतक्यात तिथे एक शेजारचे वृद्ध गृहस्थ आले आणि त्यांनी यजमानांकरवी(ज्यांच्या घरी टीव्ही दुरुस्त केला होता)माझ्याकडे विचारणा केली...
आमचा टीव्ही दुरुस्त करणार काय?
मी ’हो’ म्हटले आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या घरात गेलो.
त्यावेळचा अतिशय मानाचा समजला जाणारा असा २४इंची स्टॅंडर्ड कंपनीचा त्यांचा टीव्ही पाहून मला खूप आनंद झाला. आता हा टीव्ही मला हाताळायला मिळणार म्हणून मी अधीर झालो होतो. तेव्हढ्यात ते गृहस्थ म्हणाले....
बरं का! हा आमचा टीव्ही गेले सहा महिने बंद आहे. आमचा पूर्वीचा मेकॅनिक म्हणाला होता की ह्याची पिक्चर ट्युब गेलेय आणि ती बदलायला खूप खर्च होईल...म्हणून आम्ही हा दुरुस्त न करता असाच ठेवलाय. माझा मुलगा म्हणतोय की इतका खर्च ह्याच्यात करण्याऐवजी आपण नवा टीव्ही घेऊ या. पण मला हा टीव्ही खूप आवडतो,तेव्हा काहीही झाले तरी मी त्याला टाकू शकत नाही. आता तुम्ही त्याची ट्युब बदलायची असली तरी बदला पण त्याला दुरुस्त करा हो. घरातलं एक माणूस आजारी असल्यावर कसं घर सुनं सुनं होतं,तसं झालंय अगदी.
मी म्हटलं... काका! आधी मला त्याला तपासू द्या मग काय करायचे ते पाहू.
अहो,नाही हो! त्याची ट्युब गेलेय,तेव्हढी बदला म्हणजे सुरु होईल. आवाज मात्र अजूनही चांगला येतोय...काका वदले.
ठीक आहे, मी पाहतो काय करायचे ते असे म्हणून मी टीव्ही सुरु केला . टीव्हीचा आवाज अतिशय मस्त आणि खणखणीत होता;पडद्यावर मात्र मध्यभागी एक रेखीव अशी आडवी रेघ येत होती. मी काय समजायचे ते समजलो. लगेच टीव्हीचे सर्किट तपासले आणि पाचच मिनिटात दोषावर शिक्कामोर्तब केले.
नंतर मी त्या काकांना म्हणालो....काका,पिक्चर ट्युब बदलायची जरूर नाहीये. एक छोटा भाग बिघडलाय तो मी उद्या घेऊन येतो. उद्या तुमचा टीव्ही सुरु होईल.
काका म्हणाले...अहो,पण पिक्चर ट्युब गेलेय ना? ती बदला की. आमचा मेकॅनिक सारखे तेच म्हणत होता.
मी काकांना मध्येच थांबवत म्हणालो....उद्यापर्यंत धीर धरा. सगळं आपोआप कळेल.
बरं! मग तुम्हाला आत्ता किती रुपये देऊ? तो पार्ट आणायला लागतील ना?..काका
नाही हो. आत्ता काही नको. उद्याच द्या टीव्ही दुरुस्त झाल्यावर.... मी


दुसर्‍या दिवशी मी पार्ट बाजारातून विकत घेतला आणि त्यांच्या घरी गेलो. ते काका माझी अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होते. मी पटापट कामाला सुरुवात केली. जुना पार्ट काढून नवा बसवेपर्यंत ते काका मला काही ना काही विचारत होते आणि मी फक्त ’हो,नाही’अशा स्वरुपात त्यांना उत्तरं देत होतो.सगळी जोडणी पूर्ण झाल्यावर मी त्यांना टीव्हीच्या समोर बसायला सांगितले आणि हळूच टीव्ही सुरु केला. व्हॉल्वचा टीव्ही असल्यामुळे काही क्षण फक्त आवाज येत होता आणि मग हळूहळू चित्र दिसायला लागले. मी टीव्हीच्या मागून त्या काकांची प्रतिक्रिया न्याहाळत होतो. चेहर्‍यावरचे शंकाकुशंकांचे भाव हळूहळू दूर होत होते आणि चित्र दिसता क्षणी ते एखाद्या लहान मुलासारखे आनंदाने किंचाळले. चटकन कोचावरून ते ऊठले आणि येऊन त्यांनी माझे हात हातात घेतले.त्यांना बरंच काही बोलायचं होतं पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. मात्र त्यांचा स्पर्श बरंच काही सांगून गेला. त्याचवेळी त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहात होते.

मला हाताला धरूनच त्यांनी कोचाजवळ नेलं आणि स्वत:जवळ बसवून बोलायला लागले....
आज तुम्ही माझ्या टीव्हीला जीवंत केलंत. त्याचा जणू ’पुनर्जन्म’च झालाय. काय हवे ते मागा. मी देईन. कित्ती कित्ती महिन्यांनी ह्या घरात असा जीवंतपणा आलाय.
मी म्हटलं....काका,अहो मी फारसं काही नाही केलं. जे केलं ते नेहमीच्या सवयीप्रमाणे केलंय. मला हे काम करताना काहीच श्रम पडले नाहीत किंवा फारसे डोकंही लढवायला लागलं नाही. तरीही तुम्हाला त्याचं अप्रूप वाटावं..हे मी समजू शकतो. पण माझ्यासाठी हे विशेष असे काही नाही. तेव्हा फक्त पार्टचे ४० रुपये आणि माझ्या मेहनतीचे ५०रुपये असे मिळून ९०रुपये द्या. जास्त काही नको.
अहो,ते तर मी देईनच,पण मी आज खूप खुश आहे तेव्हा तुम्हाला बक्षीसही देणार...असे म्हणून काकांनी माझ्या हातात ३००रुपये ठेवले.
नाही-हो करता करता मला ते सगळे पैसे घ्यावे लागले. कारण काका मानायलाच तयार नव्हते. इतकं करून ते थांबले नाहीत. त्यांनी लगेच त्यांच्या सुनेला गोडाचा शिरा बनवायला सांगितले आणि मुलाला त्याच्या कार्यालयात दूरध्वनी करून टीव्ही सुरु झाल्याची बातमी कळवली. येताना पेढे आण..वर असेही फर्मान सोडले.

टीव्हीत काही छोट्या-मोठ्या गोष्टी तपासून त्याचे मागचे कव्हर लावेपर्यंत काकांनी त्या शेजार्‍यांनाही सहकुटुंब बोलावून आणले आणि त्या घरात गप्पा-गोष्टींना नुसता ऊत आला. सगळ्यांच्या कौतुक मिश्रित नजरांचे आकर्षण होतो...मी. मला अगदी अवघडल्यासारखे झाले होते.

आम्हा सगळ्यांचे खान-पान सुरू असतानाच काकांचा मुलगा त्याच्या पाच-सहा वर्षांच्या छोट्या मुलीसहीत आला....आणि मग पुन्हा जल्लोष झाला. ती छोटी तर आनंदाने घरभर बागडायलाच लागली. काकांच्या मुलानेही माझे हात हातात घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.

त्यानंतर बोलण्याच्या ओघात समजले ते असे....काका हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून दोनतीन वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते आणि त्यानंतर वर्षभरात त्यांची सौभाग्यवती आकस्मिकरित्या हे जग सोडून गेली होती. मुलगा आणि सून दोघेही नोकरी करणारे आणि छोटी दिवसभर शाळा आणि पाळणाघरात. वेळ घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी ते पूर्णपणे टीव्हीच्या आहारी गेलेले आणि अशात जवळपास सहा महिन्यांहून जास्त टीव्ही बंद ...मग त्यांनी वेळ कसा घालवायचा? काकांना दिवसभर एकाकीपणामुळे घर अगदी खायला उठायचे....आणि आज त्यांचा सखा,त्यांचा सोबती पुन्हा त्यांच्याशी गप्पा मारायला लागला होता....त्यामुळे झालेला हा आनंद...आनंद कसला ...परमानंदच म्हणा.

टीव्ही दुरुस्तीमुळे टीव्हीचा पुनर्जन्म झाला असं जरी काका म्हणाले असले तरी मला मात्र तो काकांचाच पुनर्जन्म वाटतो.

२८ सप्टेंबर, २००९

मोरीत जाऊन घसरा!

दोन मित्रांमधला मजेशीर संवाद आणि त्यातून जन्माला आले एक मजेशीर काव्य. मग काय मला आयतेच घबाड मिळाले चाल लावायला. अरे हो,हो! लगेच कानात बोटं घालू नका. :)
निदान संवाद वाचा,कविता वाचा आणि करा त्यावर चर्चा.....दसरा म्हटलं की तुम्हाला काय आठवतं त्यावर.

मो: काय म्हणतोय दसरा?
शां: आला दसरा, जेवून निवांत पसरा...
मो: आला दसरा आणि मोरीत जाऊन घसरा...असं आम्ही लहानपणी म्हणायचो
शां: ते दिवस आता विसरा. शोधा पर्याय दुसरा. :D
मो: अरे वा! मजेशीर कविता झाली.
शां: हो ना!

आला दसरा
मोरीत जाऊन घसरा
आला दसरा
ते दिवस आता विसरा
आला दसरा
शोधा पर्याय दुसरा
आला दसरा
जेवुनी निवांत पसरा

मो: मस्त ! आता चाल लावतो आणि ऐकवतो तुला. ;)
शां: नकोऽऽऽऽऽऽऽऽ! मी पळतो.


तर आता ऐका किंवा ऐकू नका चाल.

Get this widget | Track details | eSnips Social DNA


सर्वांना दसर्‍यानिमित्त शुभेच्छा!

२७ सप्टेंबर, २००९

भरत बलवल्ली !



भरत बलवल्ली, लहान वयातच शास्त्रीय संगीतात स्वत:चा दरारा निर्माण करणारं व्यक्तिमत्व! पंडीत यशवंतबुवा जोशी आणि पंडीत उल्हास कशाळकर अशा दिग्गजांकडून भरतने शास्त्रीय गायनाचे प्राथमिक धडे गिरवले आहेत. पंडीत तुळशीदास बोरकर यांच्याकडून त्याने हार्मोनियम वादनाचेही प्रशिक्षण घेतले आहे.

वयाच्या फक्त १९ व्या वर्षी स्वराधीश ही पदवी जगदगुरू श्री शंकराचार्य करवीर विद्यापीठ आणि सूरमणी ही पदवी सुरसिंगार संसद या नावाजलेल्या संस्थांतर्फ़े त्याला मिळाली आहे!


मानबिंदू ह्या संकेतस्थळावरची ही माहिती वाचून भरत बद्दल माझ्या मनात कुतुहल निर्माण झालं. त्याने गायलेले युवती मना हे गाणं ऐकलं आणि लक्षात आलं की हे काही तरी वेगळं रसायन आहे. मास्टर दीनानाथांची गायकी पेलणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. मागच्या पिढीतले पंडीत वसंतराव देशपांडे हे दीनानाथांचे एकमेव वारसदार मानले जायचे; पण आनंदाची गोष्ट म्हणजे भरतने हे आव्हान लीलया पेललंय. भरतच्या चेहर्‍यातही मला दीनानाथांचा भास होतोय. जणु काही दीनानाथांचा पूनर्जन्म असावा...असा भास होतोय. भरतचा आवाज तारसप्तकाच्याही पलीकडे सहज पोचतो जे साधारणपणे पुरूष गायकांमध्ये(सुफी पंथीय गायक सोडल्यास) अपवादाने दिसतं. अतिशय तरल आणि तीनही सप्तकांमध्ये सहजपणाने फिरणारा आवाज हे भरतचे वैशिष्ठ्य आहे.
आपण ऐका आणि स्वतःच अनुभव घ्या.
भरत गायन क्षेत्रातील नवनवीन शिखरं नक्की गाठेल ह्याबद्दल माझ्या मनात मुळीच संदेह नाही. त्याला त्याच्या भावी सांगितिक कारकिर्दीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

२६ सप्टेंबर, २००९

जीकेके !

जी.के.के.नायर! असे लांबलचक नाव धारण करणारी एक व्यक्ती आमच्या कार्यालयात दिल्लीहून मुंबईला बदलीवर आली.साधारण पन्नाशी गाठलेल्या ह्या व्यक्तीचे प्रथम दर्शनी रूप निश्चितच कुणावरही छाप टाकण्याइतके प्रभावी होतं. मध्यम उंची,तसाच मध्यम बांधा,नाकी-डोळी नीटस, भरपूर तेल लावून आणि मधल्या भांगाचे अगदी चापून चोपून बसवलेले काळे कुळकुळीत केस, डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चश्मा, अंगावर आकाशी रंगाचा सफारी पोशाख आणि हातात ऍरिस्टोक्रॅटची ब्रीफकेस अशा रुपातल्या जीकेकेला पाहिले आणि पहिल्या भेटीतच आमची मैत्री जमली.

ह्या जी.के.के आद्याक्षरांचे कोडे काय होते हे त्याने एकदा उलगडून दाखवले पण अगदी खरं सांगायचं तर तेवढ्यापुरतेच काय ते मला कळले. त्यानंतर मात्र मी ते पार विसरूनही गेलो. ह्या जीकेकेची एक खास अशी लकब होती. तो जेव्हा कामात मग्न असायचा तेव्हा त्याची मान एका विशिष्ट लयीत हलायची...कशी? जरा डोळ्यासमोर श्रीराम लागूंना आणा. संवाद म्हणतांना त्यांची मान कशी हलायची....आपलं कंप पावायची....अगदी तसेच. जीकेकेच्या ह्या लकबीमुळेच दादा पाटीलने...आमच्या कार्यालयातील ’दादा कोंडक्यानी’ जीकेके नायरचे नामकरण केले होते.....जी.कथकली नायर!
कथकली नाच करताना मानेच्या ज्या काही खास हालचाली असतात...तसे काहीसे नायरचे व्हायचे. त्या कथकलीचे नंतर एका बंगाल्याने ’कोथोकोली’ केले. :) तेव्हापासून जीकेके नायर म्हणजे जी.कोथोकोली नायर असे सुधारित नामकरण झाले आणि ते सर्वानुमते मान्य झाले. :)

जीकेके हा सैन्यदलातून आलेला म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर एक्स-सर्विसमन होता. कोणत्याही सैनिकाप्रमाणे तो त्याच्या कामात तरबेज होताच पण सैन्यात तो एक उकृष्ट कराटेपटू(खेळाडू) म्हणून गणला जायचा. अर्थात ही माहिती माझ्यासारख्या त्याच्याशी मैत्री असणार्‍या लोकांव्यतिरिक्त कुणालाही नव्हती. जीकेके वागायला इतका साधा होता की त्याने आपल्याकडे अशी काही विद्या आहे म्हणून मुद्दाम कधी कुणाची कळ काढलेय किंवा उगाचच कुणाला दम दिलाय असं माझ्या पाहण्यात आलं नाही. आपण आणि आपलं काम....बाकी काही नाही. कुणाच्या अध्यात ना मध्यात.

जीकेकेसारखीच सैन्यदलातून आमच्या कार्यालयात आलेली आणि आपल्या नोकरीतील दुसरी कारकीर्द चालवणारी ही बहुतेक माणसं ’ऑपरेटर’ सदरातील असायची. त्यामुळे जिथे कुठे मशीनमध्ये काही तांत्रिक दोष आला तर त्यांना माझ्यासारख्याची म्हणजे ’मेंटेनन्स’ वाल्याची जरूर लागायची. कदाचित ह्यामुळेच माझी आणि ह्या समस्त फौजी लोकांची वेव्ह-लेंग्थ जुळली असावी. ह्या सर्व माजी सैनिकांना सवलतीच्या दरात वस्तुखरेदीची जी सवलत असायची त्याचा फायदा एखादा अपवाद वगळता बहुतेक सर्वजण आमच्या सारख्या सिव्हिलियन्सना देत असत. जीकेकेही तशातलाच. त्याच्याकडे केव्हाही आपण काही मागणी नोंदवावी की पुढच्या वेळी जेव्हा तो कॅंटीन डिपार्टमेंट स्टोअरला जाईल तेव्हा आठवणीने तो ती गोष्ट घेऊन यायचा.

जीकेके अधनं मधनं आमच्यामध्ये हास्य-विनोद करायलाही सामील होत असे. त्याच्या कथकली ते कोथोकली ह्या नामकरणावरही त्याने हसून दाद दिलेली होती. त्यामुळे संपूर्ण कार्यालयात तो तसा लोकप्रिय होता. कधीही कुणावर रागावलेला,रुसलेला असे मी त्याला पाहिलेले नव्हते....एक वेळचा अपवाद सोडला तर....

त्याचे काय झाले...आमच्याच कार्यालयात एक लेस्ली नावाचा गोव्याचा रोमन कॅथलिक तरूण होता. तरूणाईचा जोश म्हणा किंवा स्वभाव जात्याच खोडकर म्हणा...तो ज्याला त्याला उगाचंच छेडत असायचा. आमच्या कार्यालयात भर्ती झाला तेव्हा अगदी शेलाट्या बांध्याचा असणारा लेस्ली बघता बघता वर्ष-दोन वर्षात एकदम धष्टपुष्ट झाला. बहुदा मुंबईची हवा आणि खाणं-पिणं त्याला मानवलं असावं. ह्यामुळे की काय त्याचा व्रात्यपणा अजूनच वाढला...म्हणजे आधी तो लोकांशी फक्त शाब्दिक छेडाछेडी करायचा..पण आता वेळप्रसंगी शारिरीक मारहाण करण्या इतपतही त्याची मजल जायला लागली. आमच्या कार्यालयात तो फक्त दोघांना घाबरून असायचा.. त्यात एक म्हणजे दादा पाटील आणि दुसरा चिंटू उर्फ लुडविग...असाच दुसरा रोमन कॅथलीक..जो सराईत मुष्टीयोद्धा होता...तर ह्या दोघांपासून तो चार हात दूर असायचा.



लेस्लीला एकदा कधी नव्हे ती जीकेकेची कळ काढण्याची हुक्की आली. जीकेके ह्या आद्याक्षरांवरून,त्याच्या नायर ह्या जातीवरून आणि एकूणच त्याच्या मल्याळी भाषेबद्दल चेष्टा करायला सुरुवात केली. आधी जीकेकेने त्याच्याकडे साफ दूर्लक्ष केलं. तरीही लेस्ली गप्प बसेना...म्हणून मग जीकेकेने त्याला सडेतोड शाब्दिक उत्तर दिले. जीकेकेचे उत्तर ऐकल्यावर लेस्ली जाम भडकला आणि जीकेकेच्या अंगावर धावून गेला. मी लेस्लीला अडवण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण लेस्लीने मला झटकून टाकले आणि जीकेकेच्या सफारीची कॉलर धरली. तरीही जीकेके शांत होता. तो लेस्लीला समजावण्याचा प्रयत्न करत होता,शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण त्यामुळे लेस्ली अजूनच पेटत होता. जीकेके समजावणीच्या भाषेत बोलतोय म्हणजे आपल्याला तो घाबरलाय असे लेस्लीला वाटत होते त्यामुळे लेस्लीने इंग्लीशमधल्या त्याला येत असतील-नसतील त्या शिव्या द्यायला सुरुवात केली. तरीही जीकेके शांत होता. जीकेकेचा शांतपणा असह्य होऊन शेवटी लेस्लीने त्याला मारण्यासाठी आपला उजवा हात उगारला...तरीही जीकेके शांत होता.

इतक्यात तिथे साहेब येताहेत अशी कुणकुण लागली आणि लेस्ली तिथून पळाला. लेस्लीने शारिरीक पातळीवर हल्ला करूनही जीकेकेसारखा कराटेपटू गप्प का बसला...असा प्रश्न मला सतावत होता. इथे मी जीकेकेच्या जागी असतो तर... असो.
ह्या प्रसंगानंतरही जीकेकेच्या मनात लेस्लीबद्दल कोणतीही अढी निर्माण झाली नाही...उलट,बच्चा आहे अजून,डोकं गरम आहे..वय वाढेल तसा होईल शांत...असं जीकेके म्हणायचा. मात्र लेस्लीने जीकेकेच्या शांतपणाचा चुकीचा अर्थ लावला. जीकेके मला घाबरतो...असे तो सर्वांना सांगत सुटला.

ह्या प्रसंगानंतर पुन्हा एकदा लेस्लीने संधी साधून जीकेकेची छेड काढली पण जीकेकेच्या थंड प्रतिसादामुळे तो शांत होण्याऐवजी अजूनच पेटत गेला आणि शेवटी त्याने पुन्हा जीकेकेची कॉलर पकडली. कॉलर सोड...असे वारंवार सांगूनही लेस्ली ऐकेना. उलट त्याने जीकेकेला एकदोन फटकेही लगावले. आपल्या बापाच्या वयाच्या व्यक्तीवर विनाकारण हात उचलताना लेस्लीला जरासुद्धा लाज वाटत नव्हती आणि जीकेकेच्या शांतपणाचा तो गैर अर्थ काढून त्याच्यावर शारिरीक हल्ला करण्यात धन्यता मानत होता.

लेस्लीला समजावण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि आता तो हाताबाहेर जातोय हे लक्षात आल्यावर जीकेकेने त्याला दरडावणीच्या स्वरात इशारा दिला आणि झटक्यात दूर ढकलून दिले. ह्यावरून खरं तर लेस्लीला काय ते समजायला हवे होते पण उलट तो मोठ्या त्वेषाने जीकेकेवर धावून गेला. आता पुढे काय होतंय...ह्याची मी उत्कंठेने वाट पाहत होतो...आणि..

मी पाहिले की लेस्ली एकाच जागी ठाणबद्ध झालेला होता. जीकेकेने त्याच्या गळ्यात दोन बोटं खुपसली होती आणि लेस्ली त्याच्यापासून एका हाताच्या अंतरावर अक्षरश: सुटकेसाठी तडफडत होता. काही क्षण तशाच अवस्थेत लेस्लीला लटकत ठेवून मग शांतपणे जीकेकेने आपली बोटं तिथून काढून घेतली आणि लेस्ली धाडकन्‌ जमिनीवर कोसळला. काही क्षण तो निपचित पडलेला पाहून मला खूप भिती वाटली ...वाटलं की लेस्ली बहुदा मेला की काय?
हुश्शऽऽ! पण थोड्याच वेळात तो शुद्धीवर आला आणि त्याला वास्तवाचे भान आले. आता मात्र त्याच्या डोळ्यात भिती दिसत होती. त्या तशाच पडलेल्या अवस्थेत त्याने हात जोडून जीकेकेकडे अभय मागितले. जीकेकेने खाली वाकून त्याला दोन्ही हाताने आधार देत उठवले,खुर्चीवर बसवले आणि पाणी प्यायला दिले.

त्या दिवसापासून लेस्लीची मस्ती अर्ध्याने कमी झाली. त्यानंतर त्याने कुणावरही शारिरीक हल्ला करायचा प्रयत्न केला नाही. म्हणतात ना ’समझनेवालोंको इशारा काफी होता है.’

लेस्लीसारख्यांकडे पाहून त्या म्हणीची आठवण येते...उथळ पाण्याला खळखळाट फार.
आणि जीकेकेसारख्यांकडे पाहून म्हणावेसे वाटते...फलभाराने वृक्षही नम्र होतात.

२३ सप्टेंबर, २००९

दूरध्वनी!

सकाळी लवकर जाग आली. झटपट उठून आन्हिकं उरकली. प्रभातफेरीला जाऊन आलो. आल्यावर मस्तपैकी गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत घेत वृत्तपत्र चाळलं. नंतर स्नान केले आणि कपडे चढवून बॅंकेची काम करायला बाहेर पडलो. बॅंकेत हीऽऽऽ गर्दी होती त्यामुळे घरी परतायला अंमळ उशीरच झाला. आल्या आल्या जेवण बनवले आणि मग स्वस्थपणे रवंथ करत पोटभर जेवलो. जेवण जरा जास्तच झाले त्यामुळे सुस्ती आली आणि हातावर पाणी पडताच केव्हा अंथरुणावर जाऊन आडवा झालो तेच कळलं नाही.

दूरध्वनीच्या कर्कश आवाजामुळे झोपमोड झाली.घड्याळात पाहिले तर दुपारचे दोन वाजले होते. म्हणजे मला आडवं पडून जेमतेम दहा मिनिटेच झाली होती. काय मस्त झोप लागली होती. मनातल्या मनात शिव्या मोजत धडपडत कसाबसा उठलो आणि दूध्व उचलला.
हॅलो,कोण बोलतंय....मी कंटाळलेल्या स्वरात बोललो.

अरे, मी जगूमामा बोलतोय. कसा आहेस?झोपमोड केली का रे तुझी?

नाही मामा. मी ठीक आहे ,तुम्ही कसे आहात? कुठून बोलताय?

अरे मी तुझ्या इमारतीच्या आसपासच आहे आत्ता.

अहो, मग या ना वर. निवांतपणे गप्पा मारूया.

नको रे, हेच बरं आहे. माझ्याबरोबर बरीच मंडळी आहेत.

मग त्यांनाही घेऊन या की.

अरे नको रे,ते सगळे घाईत आहेत. मी एकटाच निवांत आहे.तुझी हरकत नसेल तर आपण इथे असेच बोलत राहू.

हरकत नाही. बोला....

मग मी आणि जगूमामा बराच वेळ गप्पा मारत बसलो. जगूमामांनी बोलणं संपवलं आणि मी हुश्श केलं. आम्ही जवळजवळ दोन तास अखंडपणे बोलत होतो. आम्ही म्हणजे...प्रामुख्याने जगूमामाच बोलत होते. मी आपला...हो का! छान छान ! अरे वा! क्या बात है!....असंच काहीसं बोलत होतो.
बरेच दिवस जगूमामांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती पण आज ते इतकं भरभरून बोलले की मधल्या काळात काय काय झालं त्याचा सगळा पाढाच त्यांनी माझ्याजवळ वाचला होता.
जगूमामा नुकतेच काश्मीर ते कन्याकुमारी असा लांबवरचा प्रवास करून आले होते. भारतीय रेल्वेच्या अशा प्रकारच्या प्रवासासाठी असणार्‍या खास तिकिटाच्या साहाय्याने त्यांनी सलग महिनाभर प्रवास करून अख्खा भारत पिंजून काढलेला होता.


संध्याकाळी संगणकाशी चाळा करत बसलो होतो. इतक्यात दूध्व वाजला. मी तो लगेच उचलला आणि म्हटलं....हॅलो,कोण बोलतंय?

अरे मी विश्वास बोलतोय. सकाळपासून चार वेळा प्रयत्न करतोय पण तुझा दूध्व आपला नुसता वाजतोच आहे. कुठे गेला होतास?

अरे सकाळी मी बॅंकेत गेलो होतो पण पूर्ण दूपारभर तर घरीच होतो.

अरे दुपारी देखिल प्रयत्न केला पण तेव्हा तो व्यस्त असल्याचे दाखवत होता.

जाऊ दे रे. तू सांग कशाकरता आठवण काढलीस?

अरे हो. सांगतो. तुला जगूमामा माहिती आहेत ना? ते रोज बागेत भेटायचे आपल्याला...प्रभात फेरीच्या वेळी...

हो माहितीये. त्यांचं काय?

अरे ते आज गेले.

कुठे? काल-परवाच तर आले ना काश्मीर-कन्याकुमारी करून . मग आता लगेच पुन्हा कोणत्या दौर्‍यावर गेला म्हातारा?

अरे दौर्‍यावर नाही रे. त्यांनाच आज सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि जागच्या जागीच कोसळले ते. आज दुपारीच पोचवून आलो त्यांना. त्यासाठीच तुला फोन लावत होतो.

छट! काहीही फेकू नकोस. आज दुपारी चांगले दोन तास आम्ही दोघे बोलत होतो दूध्ववर.
ते सांगत होते,त्यांच्या बरोबर बरीच माणसे आहेत...ती घाईत आहेत पण मी अगदी निवांत आहे...वगैरे वगैरे...
ए बाबा, ऐकतो आहेस ना....हॅलो....हॅलो....हॅलो. विश्वास ...अरे ऐकतो आहेस ना?

पलीकडे काहीतरी धाडकन्‌ पडल्याचा आवाज आला........

माझी फोटोशॉपमधली लूडबूड.

अलीकडेच महाजालावर एक संपन्न व्यक्तीमत्व भेटले....श्रीयुत विनायक रानडे !
त्यांच्याशी बोलता बोलता लक्षात आलं की हा माणूस बर्‍याच कलांमध्ये पारंगत आहे.
त्यांच्यासंबंधीची माहिती तुम्हाला इथे मिळेल.

त्यांच्याकडून फोशॉमधले काही प्राथमिक धडे शिकलो आणि मग जे काही उपद्व्याप केले ते खाली पाहा.
प्रयोग १ला



हे आहे मूळ छायाचित्र...माझ्या भ्रमणध्वनीच्या कॅमेरावर टीपलंय. मात्र फोशॉच्या सहाय्याने मागचे दृष्य अस्पष्ट केलंय.(खालच्या क्रमांक ३च्या छाचिमध्ये ते स्पष्ट दिसतंय.)

प्रयोग २रा



फक्त चेहरा ठेवून बाकी भाग कापला आणि त्यातली प्रकाशमात्रा वाढवली.

प्रयोग ३रा



मूळ छायाचित्रातील चेहर्‍यावरील काळोख कमी केला.

प्रयोग ४था



मागचे दृष्य जाळण्याचा(बर्न टूल वापरून) अयशस्वी प्रयत्न. जणू काही मी डेस्कोथेमधेच उभा आहे असं वाटतंय ना? ;)

आयुष्यात पहिल्यांदाच फोशॉमध्ये किडे केलेत आणि तेही अतिशय प्राथमिक ज्ञान घेऊन.
ह्यातलं यश रानडेसाहेबांच्या मार्गदर्शनाचे आणि अपयश सर्वस्वी माझेच आहे.

इश्वरभाई!

परवाच आमच्या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्ष,सचिव आणि खजिनदार वगैरे नवे निवडले गेले. खरं तर नव्याने जबाबदारी घ्यायची कुणाचीच तयारी नव्हती. मी गेले दोन वर्ष अध्यक्ष होतो आणि आता कुणी तरी ही जबाबदारी घ्यावी म्हटलं तर कुणीच तयार होईना. प्रत्येकाला विनंती करून करून थकलो पण सगळेच माघार घ्यायला लागले. नेहमी ह्या सभेला हजर राहणारे पण आज हजर नसणारे इश्वरभाई माझ्या जागी अध्यक्ष होतील असे सांगून मी माझे बोलणे थांबवले आणि सभेत अचानक नीरव शांतता पसरली. सगळे सभासद अचानक चिडीचूप झाले.

काय झाले? मी आमच्या सचिवांना विचारले.

अहो,पंधरा दिवसांपूर्वीच इश्वरभाई त्या वरच्या इश्वराला भेटायला निघून गेले.

असं कसं होईल? मला कसं नाही समजलं ते? माझ्या खालच्या मजल्यावर तर राहतात ते.

गावाला गेले होते,तिथेच वारले आणि सगळे क्रियाकर्म तिथेच उरकले. त्यामुळे इथे फारसे कुणाला सांगितलेच नाही. आजच्या सभेत त्यांना आपण श्रद्धांजली वाहायचेय...अजेंडा वाचला नाही काय तुम्ही?

अहो,तुम्ही सगळं काही गुजराथीत लिहिता,मला नाही वाचता येत ते. पण तुम्ही जे काही म्हणताय ते मला खरं नाही वाटत,कारण कालच मी जवळ जवळ अर्धा तास इश्वरभाईंशी बोलत होतो लिफ्टमध्ये.

अहो,तो पाहा त्यांचा मुलगाही आलाय सभेला,टक्कल केलेला.

हो. ते पाहिलं मी. तरीही मी कसा विश्वास ठेवू? मी त्यांच्याशी कालच गप्पा मारल्या...मी पुन्हा म्हटलं.

सगळेजण माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहायला लागले.
सचिव म्हणाले...तुम्ही कधी 'घेत' नाही हे मला माहितेय तरी आता जरा शंका यायला लागलेय की काल तुम्ही शुद्धीवर होता ना?

अहो,कालचं कशाला ? हा आत्ता मी इश्वरभाईंना पाहतोय. ते तिथे काचेच्या दरवाज्याच्या पलीकडे उभे आहेत. थांबा बोलावतोच त्यांना ....आणि मी हाक मारली...इश्वरभाई,आत या.तुमची सगळेजण वाट पाहताहेत.

आणि काचेचा दरवाजा उघडून इश्वरभाई आत आले. मी उठून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आसन दिलं आणि...हे पाहा इश्वरभाई आलेत...असे इतरांना सांगण्यासाठी वळलो तर काय?
सगळेच गाढ झोपी गेले होते

२२ ऑगस्ट, २००९

गोल असे ही दुनिया आणिक...

मित्रांनो गाणी ऐकताना त्यात जुनं नवीन असं काही नसतं असं म्हटलं जातं. काही प्रमाणात ते खरंही आहे. जुनी काय आणि नवीन काय..ही गाणी बनतात, ती ज्या रागांमध्ये, ते सगळे राग तर जुनेच आहेत मग गाण्यात नवीन जुने असे आपण का म्हणतो बरं? मला असं वाटतं की त्याचंही एक बहुदा कारण असावे ते म्हणजे गोडवा....जुन्या काळात गाण्यातला गोडवा जपला जायचा जो आज वाद्यमेळामध्ये पार हरवला गेलाय असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे पूर्वी वाद्यमेळा नव्हता काय? होता ना..नव्हता असं कसं म्हणता येईल? पण त्याचा उपयोग बराच मर्यादित प्रमाणात होत होता आणि त्याच वेळी गाण्याचे शब्द,त्यातल्या भावना ह्या गोष्टींना जास्त महत्व दिलं जायचं...ज्यामुळे आजही ती जुनी अवीट गोडीची गाणी ऐकली की मन चटकन भूतकाळात जातं.

आता असं मी म्हटल्यावर तुम्हीही जुनी आणि अवीट गोडीची गाणी आठवायला लागला असाल आणि त्याच बरोबर त्या गाण्यांबद्दलच्या तुमच्या आठवणीही मनात रुंजी घालायला लागला असाल. ह्या अशा गाण्यांबरोबरच काही जुने गायक-गायिका,त्यांचे आवाज,त्यांच्या गाण्याच्या लकबी वगैरे गोष्टी तुम्हाला आठवायला लागल्या असतील..खरं ना?

आज अशाच एका मला आठवलेल्या जुन्या गाण्याबद्दलची आठवण मी सांगणार आहे. ते गाणं गायलं होतं सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. गोविंद पोवळे ह्यांनी. संगीतही त्यांचेच होते. ते गाणं असं आहे....

गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रुपया
सूर्य फिरे हा पृथ्वीभवती फिरते दुनिया रुपयाभवती
रुपयाभवती दुनिया फिरते....

पहिल्यांदा हे गाणं ऐकलं तेव्हा मी बहुदा पाचवी सहावीत होतो. नुकतंच तेव्हा भुगोलात वाचलं होतं की.... पृथ्वी सुर्याभवती फिरते....आणि इथे ह्या गाण्यात चक्क उलट लिहिलंय....हट,हट,हट. हे असं नाहीच आहे. काय वेडा आहे का हा कवी? असं काय बोलतोय ते? फार फार वर्षांपूर्वी लोक असं समजत होते हे खरं आहे पण ते लोक अडाणी होते; पण आता सिद्ध झालंय की पृथ्वी सुर्याभवती फिरतेय मग लोक अशी गाणी लिहितातच का आणि वर ती हे गायक लोक गातातच का? हे कमी म्हणून की काय ...पाडगांवकरांनी लिहिलंय...शुक्रतारा मंद वारा...... छे,छे,छे. ...वार्‍याला यमक जुळायला हवं म्हणून शुक्राला तारा बनवलं. छ्या. मजा नाही. अशाने कसं होणार आपलं.

हं, तर काय सांगत होतो मित्रांनो, अशा प्राथमिक विचारांनी मी ते गाणं त्या वेळी पूर्णपणे ऐकलंच नाही.पण आकाशवाणीवरून ते गाणं पुन:पुन्हा लागायचं आणि नाही म्हटलं तरी कानावरून जायचं. हळूहळू मला ते आवडायला लागलं,कारण....
कारण ते पहिलं विधान....सूर्य फिरे हा पृथ्वीभवती... सोडलं तर बाकी गाणं मस्तच होतं. त्याची चालही साधी-सोपी होती आणि गोविंद पोवळेंचा आवाजही अतिशय मधुर होता. ज्यामुळे गाणं आवडावं असे सगळे गुण त्या गाण्यात होते.
मग काय ते गाणं केवळ माझं आवडतं गाणंच राहिलं नाही तर जिथे जिथे मला गाणं म्हणण्याचा आग्रह होत असे तिथे तिथे मी ते गात गेलो आणि लोकांनाही ते आवडत गेलं.ते पूर्ण गीत नाही पण जे आता आठवतंय तसं देतोय.

गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रुपया
सूर्य फिरे हा पृथ्वीभवती फिरते रुपयाभवती दुनिया
रुपयाभवती दुनिया फिरते

मजूर राबती,हुजूर हासती घामावरती दाम वेचिती
तिकिटावरती अश्व धावती,पोटासाठी करिती विक्रय
अबला अपुली काया,रुपयाभवती दूनिया फिरते

नाण्यावरती नाचे मैना,अभिमानाच्या झुकती माना
झोपडीत या बाळ भुकेले,दूध तयाला पाजायास्तव
नाही कवडी माया, रुपयाभवती दूनिया फिरते

अजून एक कडवं असावं...पण आता ते अजिबात आठवत नाहीये.

ह्या गीतातले शब्द किती सार्थ आहेत हे काय सांगायला हवं..आजही ते पदोपदी अनुभवाला येतात.

ता.क. मित्रहो हा लेख लिहायला घेतला आणि लक्षात आलं की हे गीत पूर्णपणे आठवत नाहीये आणि जे आठवतंय त्यातही काही शब्दांबद्दल शंका आहेत. मग काय विचारलं काही जुन्या-जाणत्या लोकांना. पण दूर्दैवाने त्यापैकी हे गीत कुणीच ऐकलेलं नव्हतं. योगायोगाने मिपावरची सिद्धहस्त कवयित्री क्रान्ति साडेकरशी बोललो. तिलाही नेमकेपणाने सांगता येईना पण तिच्याकडे गोविंद पोवळेंचा दूध्व होता. तो तिने मला दिला आणि...आणि काय मंडळी..मी दस्तुरखुद्द पोवळेसाहेबांशी बोललो आणि गाण्यातले शब्द तपासून घेतले. माझ्या दृष्टीने हा अलभ्य लाभ आहे. इतकी वर्ष ज्या व्यक्तीची गाणी मी मोठ्या भावभक्तीने ऐकली त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला मिळाला...अजून काय हवे?

९ ऑगस्ट, २००९

दिल्लीवर स्वारी-१

माझ्या एका शाळकरी मित्राच्या भावाच्या लग्नाला राजस्थानला आणि पुढे केलेल्या दिल्ली दौर्‍यासंबंधीची कहाणी ऐका.

८ ऑगस्ट, २००९

रामप्रहर !

सकाळी सकाळी दिसणारी काही नेहमीची आणि काही बदलणारी दृष्यं.
सकाळी साधारण ६च्या सुमारास घरातून निघतो तेव्हा रस्ता...हमरस्ता असूनही तसा शांत शांत असतो. काही तुरळक रिक्षावाले(मुंबईत ऑटो रिक्षाला ’रिक्षा’ म्हणतात)रस्त्याच्या कडेला आपल्या रिक्षा लावून त्यात अंगाचं मुटकुळं करून झोपलेले असतात. तर काही टॅक्सीवाले टॅक्सीचे मागचे दोन्ही दरवाजे उघडे टाकून चांगले पसरून झोपलेले असतात. रस्त्यावरून एखाद दुसरी बस,रिक्षा किंवा खाजगी मोटार धावत असते. नाही म्हणायला अधून मधून दूधाच्या गाड्या,टॅंकर्स वगैरेंची लगबग दिसून येते. नाक्या नाक्यावर असणार्‍या चहाच्या टपर्‍यांपैकी मोजक्याच सुरु झालेल्या असतात.
घरोघरी दूधाचा रतीब घालणारे दूधवाले(हे बहुतेक करून राजस्थानी मारवाडी असतात. दोन्ही कानात सुंकल्या/रिंगा किंवा फिरकीची छोटी बटणं घातलेली असतात.)सायकलीवरून इथे-तिथे जाताना दिसतात. मधेच एखाद्या ठिकाणी परस्पर विरुद्ध दिशेने जाणारे दोघे दूधवाले थांबून एकमेकांची विचारपूस करतात/तंबाखूची देवघेव करतात.
सायकलींच्या मागे वृत्तपत्रांचे गठ्ठे लादून जाणारी मुलं देखिल अशा वेळी जागोजागी दिसतात.

एका छोट्याश्या दुकानापुढे आठवड्यातील तीन-चार दिवस(एक दिवसाआड) सुमारे ५०-६० लोकांची रांग लागलेली दिसते. आधी कल्पना नव्हती की ही रांग कशासाठी असते....मग कळले की तिथे काविळ उतरवली जाते म्हणून. गेली जवळ जवळ ४-५ वर्षे मी हे अव्याहतपणे चाललेले पाहत आहे. ह्याचा अर्थ मुंबई सारख्या शहरात..जिथे पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून पुरवले जाते....तिथेही बारामाही काविळीचे रोगी आढळावेत ह्यापेक्षा नामुष्की ती कोणती. अशा तर्‍हेने कावीळ खरंच उतरवता येते की नाही?....ह्याबद्दल मला जरी शंका असली तरी तिथली गर्दी मात्र कधीच आटत नाही.

प्रभातफेरीला निघालेली बरीच मंडळी हलके हलके दिसायला लागतात. रोज भेटणार्‍यांत एक असं जोडपं आहे की त्यातला नवरा जवळपास सहा-सव्वासहा फूट उंच आहे आणि बायको मात्र जेमतेम पाच फूट असावी. दोघेही शेलाट्या बांध्याची आहेत. दूरून पाहिले तर कुणी महाविद्यालयीन युवक-युवतीची जोडगोळी येतेय असे दिसते. मात्र जवळ आल्यावर चेहर्‍यावरून कळतं की दोघेही चांगलेच वृद्ध आहेत..अगदी माझ्यापेक्षाही. पण दोघांची चाल मात्र माझ्यापेक्षा खूपच जलद आहे.ह्या प्रभात फेरीला निघालेल्यात सर्व प्रकारची लोकं दिसतात. जाडजूड,महाकाय आकाराच्या व्यक्तींपासून ते अगदी वृद्धपणाने जेरीस आलेल्या आणि कमरेत वाकलेल्या लोकांची हजेरी देखिल लक्षणीय असते.

अजून एक हमखास दिसणारी व्यक्ति म्हणजे एक जाडजूड गुजराथी आजीबाई. त्यांना फार दूरवर नसलेल्या एका देवळात जायचं असतं पण पायी जाण्याऐवजी त्या रिक्षानेच जाणे पसंत करतात. आधी त्या रिक्षावाल्याशी बोलतात,भाव करतात...कारण त्यांना जिथे जायचे असते त्यासाठी कमीत कमी असलेले रिक्षाचे ९ रुपये भाडेही त्यांना जास्त वाटत असते. पाच रुपयात जो रिक्षावाला न्यायला तयार असेल त्याच्याच रिक्षात त्या बसतात. तसा कुणी गडी तयार होईपर्यंत त्या आजीबाई रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक रिक्षावाल्याशी हुज्जत घालायला तयार असतात.

अजून एक हमखास दिसणारा नमुना....हा माणूस टूथब्रशने दात घासत घासत रस्त्याने जात असतो. सगळ्या मुखरसाने तोंड माखलेले असते आणि हनुवटीवरून तो गळत असतो तरी त्याचे दात घासणे जोरजोरात सुरूच असते. तो खूप लांबवरून येत असावा. कारण मला तो नेहमी वेगवेगळ्या टप्प्यावर भेटतो. राहतो कुठे आणि नेमका जातो कुठे..ते बाकी माहित नाही.

एक बंगाली बाबू. पन्नाशीचा असावा. गेली जवळपास दहा वर्षे पाहतोय त्याला. तो रोज जॉगिंग करतो. रोज किमान पाचसहा किमी तरी तो धावत असावा पण पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच्या आणि आताच्या त्याच्या अवस्थेत काहीही फरक दिसत नाहीये. उन्हाळा-पावसाळा आणि थंडी असली तरी हा बाबू नित्यनेमाने रस्त्यावरून धावताना दिसणारच दिसणार. पहिले काही दिवस त्याच्या बरोबरीने धावणारे काही उत्साही लोक आता मात्र चुकूनही दिसत नाहीत.

अशीच गंमत जंमत पाहात रमत गमत मी व्यायामशाळेत जातो. साधारण तासभर व्यायाम करून परत यायला निघतो. आता रस्ते वाहनांनी,माणसांनी,शाळकरी,महाविद्यालयीन मुलांमुलींनी तुडूंब भरलेले असतात.शाळांच्या गणवेशाचे ते रंगीबेरंगी प्रकार,त्यातली ती छोटी-मोठी मुलं-मुली म्हणजे जणू रंगीबेरंगी फुलपाखरं वाटत असतात. कुणी आईबरोबर, कुणी बाबांबरोबर, मोठ्या भावा/बहिणी बरोबर हात धरून पाठीवरची दप्तरं, हातातली पाण्याची बाटली, छत्री वगैरे आयुधं घेऊन लगबगीने चालत असतात. आता रस्त्यावर अधून मधून फेरीवालेही बसलेले दिसायला लागतात. केळीवाले,भाजीवाले,चहावाले एकेक एकेक आपापल्या ठरलेल्या जागी स्थानापन्न व्हायला लागतात. काही भिकारीही आपापल्या ठरलेल्या जागांवर बसून बोहनी कधी होते ह्याची वाट पाहात असतात.

आपली धोपटी घेऊन काही न्हावी गिर्‍हाईक शोधण्यासाठी बाहेर निघालेले दिसतात. तर काही भटजीलोक सुस्नात होऊन आणि गंध-टिळे लावून पुजे-अर्चेच्या कामगिरीवर निघालेले असतात. जैन धर्मीय पुरूष तलम रेशमी वस्त्र परिधान करून हातात एक स्टीलची छोटी पेटी घेऊन आणि स्त्रिया डोक्यावर पदर आणि हातात बटवा घेऊन अनवाणी पायाने मंदिरांकडे कूच करत असतात.

हे सगळं पाहात आणि अनुभवत मी घरी परततो. घरात शिरल्यावर मात्र सगळं शांत शांत असतं. बाहेरच्या जगाची चाहूलही इथून लागत नाही. तो गजबजाट,ती लगबग मला आवडतेच आणि ही शांतताही मला आवडते.

७ ऑगस्ट, २००९

भीमटोला !

भीमटोला! काय जबरदस्त शब्द आहे ना! त्या शब्दातच सगळं वर्णन आलंय.
आता तो शब्द आठवायचं कारण काय म्हणाल तर....
सांगतो. नीट, सविस्तर सांगतो.

त्याचं काय झालं की परवा सकाळी मी व्यायामशाळेतून परत घरी येत होतो. रस्त्याच्या कडेकडेने चालत होतो आणि तेही उजव्या बाजूने.म्हणजे कसं, येणारी वाहने आपल्या नजरेसमोर दिसत असतात. अपघात होण्याचा कमीत कमी धोका.
हं, तर काय सांगत होतो की रस्त्याच्या कडेकडेने चालत येत होतो. एवढ्यात एक सायकलस्वार दूधवाला मला जवळ जवळ घासूनच पुढे गेला. मी त्याला आवाज दिला(तो आवाज नव्हे हो...हाक मारली म्हणा) आणि थांबवले. थोडंसं त्याचं बौद्धिक घेतलं. घंटीचा उपयोग का करत नाहीस असंही विचारलं; पण तो उलट माझ्यावरच गुरकावला. अंगापिंडाने मजबूत तर होताच आणि त्यात तरूणही होता. त्यामुळे माझे उपदेशपर बोलणे त्याला काही फारसे रुचले नाही.
आपको लगा तो नही ना?..असे उद्धटपणे बोलून त्याने पुन्हा सायकलवर टांग टाकली आणि सायकल दामटली. पण काही पावले पुढे जात नाही तोच त्याने एका शाळकरी मुलाला सायकल जवळ जवळ ठोकलीच आणि तो मुलगा,सायकलवाला असे दोघेही खाली पडले.

जाणारे येणारे लगेच जमले. त्या दोघांना उचलले. सुदैवाने त्या मुलाला काहीच लागले नव्हते पण तो चांगलाच घाबरलेला दिसला. त्याच्या मित्रमंडळींनी त्याला आधार देत शाळेकडे कूच केले. दूधवाल्याचे सगळे दूध सांडून गेले. सायकलचे हॅंडल वाकडे झाले. लोक त्याला चांगलेच फैलावर घेत होते आणि तो चूपचापपणे सगळे ऐकून घेत होता.

मीही तिथे पोचलो आणि त्याला सुनावले... देखो,मेरी बात मानते तो ऐसा नही होता था. जरा संभालकर चलाया करो.
बस्स. इतका वेळ निमूटपणे लोकांचे ऐकून घेणारा तो दूधवाला माझ्यावर खवळला आणि चवताळून माझ्या अंगावर आला आणि म्हणाला....
ये,सब आपकी वजहसे हुवा. ना आप मुझे रोकते,ना ही ऐसा कुछ होता.

मी म्हणालो....अरे भाई, इसमे मेरा क्या कसूर है? पहले तो तेरी सायकिलका धक्का लगते लगते मैं बच गया और अभी इस छोटे बच्चेको सीधा ठोक दिया. मैंने समझाया था न की सायकिल संभालकर चलाया करो और घंटीका भी इस्तेमाल करो. इसमे मैंने क्या गलत बताया?

हे ऐकताच त्या दूधवाल्याने मागचा पुढचा कोणताच विचार न करताच मला एक ठोसा लगावला आणि मला आडवा पाडला.
तसा आजवरचा माझा जीवनक्रम हा मार खाण्याचाच आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे अशा वेळी नको तेव्हा माझी सद्‌सद्‌विवेकबुद्धी अतिशय जागृत होत असते. त्याने मला मारले,मग मी त्याला मारले. मग पुन्हा त्याची पाळी मग माझी. नेमके काय साधतो आपण ह्यातून.....वगैरे वगैरे. असलेच विचार मी करत असतो. त्यामुळे स्वत:हून कधीच हल्ला करायचा नाही आणि केवळ स्वसंरक्षणापुरतीच आपली शक्ति वापरायची..असाच विचार आणि आचार माझा असतो.
त्यामुळे त्या दूधवाल्याच्या ठोशाचं इतकं काही वाटलं नाही; पण राग एका गोष्टीचा आला की...चूक त्याचीच आणि त्यासाठी शिक्षा मात्र मला होत होती.

इतर लोकांनी त्या दूधवाल्याला कसेबसे आवरले. मी धूळ झटकत उभा राहिलो आणि म्हणालो....उलटा चोर कोतवालको डाटे! गुन्हा तुने किया और उपरसे मुझेही मार रहा है?

माझे ते बोलणे ऐकून तो अजून पेटला आणि आणखी त्वेषाने माझ्या अंगावर आला. आता मी सावध होतो. त्याचे दोन सणसणीत फटके कसेबसे चुकवले. मनात म्हटलं, आता काहीतरी करायला हवंय. चूप बसलो तर हा आपला मुडदाच पाडायचा. इतक्यात त्याने तिसर्‍यांदा माझ्यावर हल्ला केला. मी तोही चुकवला आणि त्याच्या श्रीमुखात काडकन्‌ बजावली.
काय होतंय हे कळायच्या आत हे सगळं घडलं आणि तो आडदांड तरूण धाडकन जमिनीवर पडला. हे पाहताच बघ्यांनी टाळ्या वाजवल्या.

तो दूधवाला जमिनीवर अगदी निपचित पडून राहिला. ते पाहून माझे मात्र धाबे दणाणले.
माझं स्वगत सुरु झालं पुन्हा... काय हे? माझ्याकडून नकळत हे काय झाले? तरी नेहमी स्वत:ला बजावत असतो की असे काही नाही करायचं मग आज कसा काय संयम सुटला? हा आता मेला-बिला तर नाही ना?.

इतक्यात लोकांनी कुठून तरी पाणी आणलं,त्याच्या तोंडावर मारलं आणि हुश्शऽऽऽऽऽऽऽ
तो भानावर आला. माझ्याकडे पाहात आणि हात जोडत मला म्हणाला....अंकलजी,माफ किजिये. गलती मेरीही थी और मैं खामखा आपके उपर गुस्सा उतारा. अच्छा हुवा, जो की आपने मुझे चाटा मारा, मेरी अकल ठिकाने आई.
आयंदासे ऐसी गलती दुबारा फिर ना होगी.

मी त्याला माफ केलं आणि आपला रस्ता सुधारला.

मंडळी,माझ्या लहानपणी देखिल मी नेहमीच मार खायचो.कधीच कुणाला मारायचो नाही. कारण क्षमा करण्यातच मोठेपणा असतो असं माझ्या मनावर बिंबवलं गेलं होतं. पण असाच एक प्रसंग तेव्हा घडला होता. त्या प्रसंगी खूप मार खाल्ल्यावर मी माझा हात उचलला होता आणि एका फटक्यातच प्रतिस्पर्ध्याला गार केलं होतं. कितीतरी वेळ तो बेशुद्धावस्थेत होता. त्यावेळी त्या मुलाचा अपराध विसरून सगळेचजण मला सुनावत होते. माझ्या आईने तर मला सक्त ताकीदच दिली होती की तू कुणाच्या वाटेला जाऊ नकोस आणि कुणी जरी तुझ्या वाटेला गेलं तरी फक्त स्वत:चा बचाव कर. आक्रमण करू नकोस. तुझ्या हातात भलताच जोर आहे. तुझा टोला म्हणजे भीमटोला आहे रे बाबा. अशाने तू कुणाला तरी जीवे मारशील आणि अपेशाचा धनी होशील. तेव्हा सावध राहा. वादविवाद,भांडणं आणि मारामार्‍यांपासून चार हात दूर राहा.
तेव्हापासून कान पकडले होते. आजतागायत ते पाळत आलो होतो पण परवा संयम सुटला आणि भीमटोला वर्मी बसला. थोडक्यात वाचलो तेव्हा आता पुन्हा काळजी घ्यायला हवी.

३० जुलै, २००९

गंमत!

परवा रस्त्याने जाताना एक गंमत पाहिली. मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी दूध आणायला गेलो होतो. दूधवाल्याला पैसे दिले आणि दूध घेऊन पुन्हा घरी येण्यासाठी निघालो तो काय? त्या दूधवाल्याच्या दुकानासमोर एक खाजगी गाडी येऊन उभी राहिली आणि .....

दूधवाला चांगला श्रीमंत माणूस आहे आणि तितकाच माजोरडाही आहे.त्याच्या दुकानासमोर दूधाची ने-आण करणारी त्याचीच वाहने नेहमी उभी असतात त्यामुळे रस्त्याचा तो भाग आपल्याच बापाचा असल्याच्या आविर्भावात तो नेहमी वावरत असतो.
अशा ठिकाणी एक खाजगी गाडी येऊन थांबली म्हटल्यावर त्याची काकदृष्टी तिथे गेली. त्या गाडीतून दोनजण उतरले आणि बाजूलाच असलेल्या इस्पितळात निघून गेले. चालक महाशय आपल्या जागेवरच बसून राहिले.हे सर्व इतका वेळ पाहणारा दूधवाल्याचा एक चमचा त्या गाडीजवळ जाऊन तावातावाने त्या चालकाला गाडी पुढे नेऊन लाव असे सांगायला लागला; पण चालकाने त्याच्याकडे साफ दूर्लक्ष केलं. ते पाहून तो चमचा आगाऊपणाने त्या गाडीचा दरवाजा उघडायला लागला.
इतका वेळ शांत असलेला चालक स्वतःच दार उघडून बाहेर आला. त्याच्याकडे पाहताच त्या चमच्याची वाचाच बसली. सहा-साडेसहा फूट उंच आणि चांगला धष्टपुष्ट असा तो देह पाहून चमच्याने चार पावलं माघार घेतली.

चमच्याला बधत नाही म्हटल्यावर दूधवाला आपल्या बसल्या जागेवरूनच ट्यँव ट्यँव करायला लागला आणि त्या चालकाला सुनावू लागला. पण त्या चालकाने त्याच्याकडेही काणाडोळा केला आणि शांतपणे आपली गाडी पुसू लागला.
आता मात्र दूधवाला,त्याचा चमचा आणि दूधवाल्याच्या दुकानात काम करणारी काही मंडळी संतापली. त्या चालकाच्या जवळ जाऊन त्याने गाडी अजून थोडी पुढे नेऊन लावावी असे फर्मावू लागली.

इतका वेळ शांत बसलेल्या चालकाने तोंड उघडले आणि....
इथेच एक गंमत घडली. एक कुणी तरी स्त्री उच्चरवाने भांडते आहे असा काहीसा आवाज ऐकू यायला लागला. मला पहिल्यांदा काहीच कळले नाही की हा बाईचा आवाज कुठून येतोय पण नीट लक्ष दिल्यावर लक्षात आले की तो आवाज त्या तगड्या देहातूनच येत होता. इतका वेळ भडकलेली डोकी त्या आवाजाने किंचित शांत झाली. माझ्यासारखीच आजूबाजूला असणारी बघे मंडळी हसायला लागली. इतक्या बलदंड देहाला हा असा आवाज? निसर्गाची पण काय एकेक किमया असते म्हणतात ती ही अशी.

पुढे? पुढे काय, मंडळी त्याच्या आवाजाने भांडणाचा नूरच बदलला. मग समजावणीच्या गोष्टी झाल्या आणि एकूण प्रकरणावर पडदा पडला.

२६ जुलै, २००९

माझी ’चाल’पन्नाशी!

मंडळी एक आनंदाची बातमी आहे. महाजालावरील नामांकित कवि/कवयित्रींनी रचलेल्या कवितांना चाली लावण्याच्या छंदाचे फलस्वरूप म्हणजे नुकतीच मी ’पन्नासावी’ चाल लावली.
ह्या निमित्ताने मागे वळून पाहतांना जे काही मनात आले ते आपल्यासमोर मांडतोय.

चाल लावण्याचा छंद कधी लागला म्हणाल तर तो लहानपणीच लागला असे आता सांगितले तर कदाचित तुम्ही हसाल;पण वस्तुस्थिती तशीच आहे. मी चौथीत असताना आम्हाला एक केणी आडनावाचे गुरुजी होते. त्यांनी कविता शिकवताना पारंपारिक चालींऐवजी स्वत:ची अशी चाल लावून आम्हाला जी पहिली कविता शिकवली होती ती म्हणजे...जा हासत खेळत बालनिर्झरा आनंदाने गात.
ह्या चालीने माझ्यातला ’चाल’क जागा झाला आणि त्यानंतर मात्र मी देखिल मला आवडणार्‍या कवितांना चाल लावायला सुरुवात केली. पण ते सर्व हौस ह्या सदरात होते आणि मुख्य म्हणजे त्या चाली कोणत्याही स्वरूपात मी जतन करू शकलो नाही.पण तरीही हे चाली रचण्याचे काम माझे अखंडपणे सुरु होते.

साधारण वर्षभरापूर्वी महाजालावर ओळख झालेल्या माझ्या एका संगीतकार मित्राशी म्हणजेच श्री विवेक काजरेकरांशी बोलणे सुरु होते तेव्हा अर्थात विषय होता संगीत. त्या दरम्यान त्यांना मीही ’चाल’क आहे असे सांगितले आणि त्यांनी मला एक चाल करण्यासाठी एक कविता सुचवली. मी तिला चालही लावली पण ती त्यांना ऐकवणार कशी? म्हणून त्यांनी मग ती ध्वनीमुद्रित करायला मला भाग पाडले आणि तिथूनच सुरु झाला माझ्या चाली ध्वनीमुद्रित करण्याचा उपक्रम.

ती माझी पहिली चाल होती सुप्रसिद्ध कवि श्री.प्रसाद शिरगांवकर ह्यांच्या हे गजवदना ह्या भक्तिगीताची.म्हणजे चाली ध्वनीमुद्रणाचा श्रीगणेशाच अशा रितीने झाला असे म्हणता येईल.
आणि आता ५०वी चाल ध्वनिमुद्रित स्वरूपात सादर केलेय ती आहे सुप्रसिद्ध ज्योतिषी,साहित्यिक आणि समर्थ कवि श्री. धोंडोपंत आपटे ह्यांची एक गजल...जिथे तिथे मी हर्ष पेरला जाता जाता.

आजवर ज्यांच्या कवितांना चाली लावलेल्या आहेत ते सर्वजण महाजालावरच नियमितपणे आपले लेखन करत असतात.मी ज्यांच्या कवितांना चाली लावल्या आहेत त्यांची यादी आता दिवसेंदिवस वाढत चाललेय. वर उल्लेख केलेल्या दोन कविं व्यतिरिक्त ज्यांच्या कवितांना चाली लावल्या आहेत त्यांची नावे असी आहेत....
अनिरुद्ध अभ्यंकर,अरूण मनोहर,कुमार जावडेकर,क्रान्ति साडेकर,जयंत कुलकर्णी,जयश्री कुलकर्णी-अंबासकर,तुषार जोशी,दीपिका जोशी,पुष्कराज,प्रशांत मनोहर,प्राजक्ता पटवर्धन,चक्रपाणि चिटणीस,मनीषा,मिलिंद फणसे,राहुल पाटणकर,रामदास,रेमी डिसोजा,विशाल कुलकर्णी,कामिनी केंभावी,सुमति वानखेडे आणि सोनाली जोशी.

मंडळी,खरे तर ही कविता पन्नाशी म्हणायला हवे कारण मी ज्या कवितांना चाली लावून त्या माझ्या जालनिशीवर चढवल्या आहेत त्या कवितांची संख्या पन्नास झालेय आणि त्याच वेळी काही कवितांना दोन-दोन,प्रसंगी तीन चाली लावलेल्या आहेत. त्यामुळे तसे पाहिले तर चाली पन्नास पेक्षा जास्तच होतील. :)
तरीही पन्नास कविता इथे चढवल्या म्हणून त्यांच्या पन्नास चाली असा साधा हिशोब मी केलाय.

मी वर ’आनंदाची बातमी’ असे जरी म्हटलेले असले तरी कदाचित माझ्या परिचयातील आणि नेहमीच्या संपर्कातील काही व्यक्तींना ही बातमी आनंदाची वाटणार नाही. ;) कारण?
कारण हक्काने मी त्यांचे कान खाण्याचे पाप केलेय आणि केवळ सौजन्य म्हणून त्यांनी ते सहन केलेले असू शकते. :)
तेव्हा हा लेख त्या सर्व सौजन्यमूर्तींना अर्पण करतो.

१ जुलै, २००९

गजलनवाज!

मराठी गजल-गायन,गजलेचा प्रचार आणि प्रसार अव्याहतपणे गेल्या ३७ वर्षांपासून करणार्‍या गजलनवाज भीमराव पांचाळेंशी माझी पहिली भेट साधारणपणे १२-१३ वर्षांपूर्वी झाली. ती कशी झाली, ऐकायचंय? मग ऐका इथे.

३० जून, २००९

मराठी गजल-गायनातला ध्रूवतारा!



विवेक काजरेकर,गजलनवाज भीमराव पांचाळे आणि मी

काही दिवसांपूर्वी माझे मित्र संगीतकार विवेक काजरेकर त्यांच्या नवनिर्मित संकेतस्थळाबद्दल मला माहिती देत होते. आपल्या संकेतस्थळावर काय नावीन्य असेल ह्याची माहिती देताना त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला होता; तो म्हणजे मराठीतील नामांकित गायक/गायिका, संगीतकार वगैरेंच्या मुलाखतींसाठी एक खास विभाग निर्माण करण्याचा. काजरेकरांनी मला त्यांच्या संस्थचा दुवा दिलाच होता त्याप्रमाणे मी त्यावर फेरफटका मारून आलो आणि मला हे संकेतस्थळ खूपच आवडले. तरीही त्यावेळी ते जनतेसाठी खुले केलेले नसल्यामुळे मी त्याबद्दल माझ्या मित्रमंडळींमध्येही काही चर्चा केली नाही.

काजरेकर आणि माझ्या बोलण्यात बरेचदा मी माझे दुसरे एक मित्र आणि माझे आवडते मराठी गजल गायक गजलनवाज भीमराव पांचाळेंबद्दल बोलत असे. हाच धागा पकडून मी भीमरावांची मुलाखत घ्यावी असा प्रस्ताव काजरेकरांनी माझ्यासमोर मांडला. ही केवळ गंमत असावी असे समजून मी त्याला होकारही दिला. पण काजरेकरांनी ते विधान गंभीरपणे केलेले होते आणि त्यामुळेच मध्यंतरी ते सुट्टीवर भारतात आल्यावर त्यांनी लगेच भीमरावांची भेट घेण्याचा आपला मनोदय बोलून दाखवला. मग मीही आधी भीमरावांशी बोलून घेतले आणि त्यांच्यासमोर काजरेकरांचा प्रस्ताव मांडला आणि भीमरावांनी तो आनंदाने मान्य केला. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ ठरवण्यासाठी मी सुत्र काजरेकरांच्या हाती दिली आणि त्यांनी मे महिन्यातल्या एका शनिवारची संध्याकाळी पाचची वेळ निश्चित केली.

गंमती गंमतीतला हा खेळ असा अंगाशी येईल असे मुळीच वाटले नव्हते पण एकदा मुलाखतीची तारीख आणि वेळ पक्की ठरल्यावर मी देखिल मनापासून तयारीला लागलो. खरे सांगायचे तर मला बोलायला खूप आवडते आणि कुणाशीही नव्याने ओळख झाली की मी त्या व्यक्तीला त्याच्यासंबंधीची माहिती विचारण्यासाठी बरेच प्रश्न विचारत असतो. म्हणजे ती देखिल एक जीवंत मुलाखतच असते,त्यामुळे भीमरावांची मुलाखत घ्यायची ठरल्यावर मला निश्चितच आनंद झाला. माझ्या मनातले प्रश्न त्यांना विचारावे असे कैक वेळेला मला वाटले असूनही भीमरावांची गजल गायन,प्रचार आणि प्रसारातली व्यस्तता पाहून मी नेहमीच माझे तोंड बंद ठेवलेले होते; आणि आता तर मला हे सर्व करण्यासाठी अधिकृत परवानगी आणि भरपूर वेळ मिळालेला होता. तेव्हा ही संधी मी कशी बरं सोडेन?

तर आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीकडे वळूया.

१९७२ सालापासून आजतागायत अखंड ३७ वर्षे भीमराव मराठी गजल-गायनाची आणि गजल प्रसाराची ध्वजा आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहून नेत आहेत.अशा भीमरावांना मी मराठी गजल गायनातला ध्रुवतारा असे मानतो.



भीमराव आणि मी

भीमराव,तुमच्याबद्दलची थोडी वैयक्तिक माहिती द्या...उदा. तुमचे बालपण,शालेय शिक्षण,महाविद्यालयीन शिक्षण तसेच संगीताचे शिक्षण वगैरे.

माझा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या एका अशा छोट्या खेड्यात झाला की जिथे शालेय शिक्षणाची सोय नव्हती.जिथे रेडिओ ऐकायला मिळत नव्हता आणि लोकगीतांव्यतिरिक्त मनोरंजनाचे कोणतेही साधन नव्हते. मी एका शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातला आहे. गावापासून शाळा तीन किलोमीटरवर होती आणि तिथे चालतच जावे लागायचे.त्यामुळे रोज ६किलोमीटरची पायपीट करावी लागायची. अशा बिकट परिस्थितीतच प्राथमिक शिक्षण झाले. संगीताची पार्श्वभूमी तशी घरातच होती. माझ्या आईचा आवाज अतिशय मधुर होता. तिच्याकडूनच मला आवाजाची देणगी मिळाली. माझे वडीलही अतिशय उत्तमपणे गायचे. हीच संगीताची शिदोरी घेऊन पुढचा प्रवास केला.

पुढे माध्यमिक शिक्षणाची सोय गावात नव्हती त्यासाठी अमरावती गाठावी लागली. इथेच मी शास्त्रीय संगीताचे रितसर शिक्षण गांधर्व महाविद्यालयात घेतले. इथे पंडीत भय्यासाहेब देशपांडे ह्यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढचं गाण्याचे शिक्षण अकोल्याला पंडीत एकनाथबुवा कुलकर्णी ह्यांच्याकडे घेतले.

शालांत परीक्षेपर्यंतचे शिक्षण अमरावतीत झाले. माझे एक हितचिंतक आणि माझ्या गाण्याचे चाहते श्री. किशोरदादा मोरे ह्यांनी माझ्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि मला अकोल्याला बोलावले.त्यांच्याकडे राहूनच मग मी माझे महाविद्यालयीन आणि सांगितिक शिक्षण पुरे केले.

सुरेश भट ह्यांची तुमची पहिली भेट कधी झाली?
सुरुवातीला मी सर्व पद्धतीची गाणी गायचो. त्यात शास्त्रीय,नाट्यगीत,ठुमरी,दादरा वगैरे सर्व प्रकार गायचो. तसंच उर्दू गजलाही गायचो. माझे मित्र आणि आजूबाजूचे वातावरणच असे होते की मी नववी-दहावी पर्यंत उर्दू लिहा-वाचायला शिकलो. पण एक प्रसंग असा घडला की त्यामुळे मी मराठी गजलकडे वळलो. ती गोष्ट सांगतो.अमरावतीला राजकमल चौकात सुरेश भट असे सायकल रिक्षात बसलेले असत. आजुबाजुला असंख्य रसिक त्यांचे गजल-गायन ऐकायला जमलेले असत. त्यात माझ्यासारखे विद्यार्थी,रिक्षावाले,टांगेवाले,डॉक्टर,वकील असे सर्व थरातील लोक असायचे. भटसाहेब आपल्या खड्या आवाजात गजला पेश करायचे. त्यातली एक गजल मला अजूनही आठवतेय.... तीच गजल मी माझ्या पहिल्या कार्यक्रमात पहिल्यांदा पेश केली.
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही.

भटसाहेबांची आणि तुमची प्रत्यक्ष मुलाखत कधी झाली ते आठवतंय का?

अमरावतीला मी त्यांना भेटायचो पण खरी भेट माझी अकोल्याला किशोरदादांकडे झाली.ते किशोरदांचे मित्रच होते. भटसाहेब आले की किशोरदा मला बोलावून घ्यायचे आणि म्हणायचे, सुरेश आलाय(ते त्यांना एकेरी संबोधत) त्याला काहीतरी गाऊन दाखव. मग मीही म्हणून दाखवायचो तेव्हा भटसाहेब मला म्हणायचे...आवाज चांगला आहे बरं का तुझा. मेहनत कर,रियाज कर,गजलचा अर्थ,मर्म समजावून घे.
गजल कशी गायची ते गप्पा गप्पांमधून समजावून सांगत.

गजल गायकी कशी असावी?...बद्दल बोलताना भीमराव म्हणाले...
त्याकाळी मी पाकिस्तान रेडिओ ऐकायचो. त्यात एकदा मेहदी हसन ह्यांनी गायलेली एक गजल ऐकली आणि गजल गायन कसे असावे ह्याचा मला साक्षात्कार झाला.गजल लेखन हे जसे इतर गीतप्रकारांहून वेगळे असते तसेच गजल पेश करण्याची पद्धतही वेगळी असायला हवी आणि ती कशी हे मला मेहदी साहेबांच्या गजल गायनावरून समजले.
ती गजल अशी होती...

देख तो दिल के जहॉंसे उठता है
ये धुवॉंऽऽऽ कहॉंसे उठता है

तो ’धुवॉ’...धुर असा नजरेसमोर दिसला. अशा तर्‍हेने गजल कशी गायची ह्याचा साक्षात्कार झाला.
दोन ओळींचा शेर म्हणजे पूर्ण कविता असते असे भट साहेब म्हणत. म्हणजे त्या दोन ओळीत आशयाचा सागर असतो...गागरमे सागर. मग हा सागर बाहेर कसा आणायचा? ते मला ती गजल ऐकली आणि कळले.


सलग दीड तास ही मुलाखत सुरु होती. इथे फक्त ह्या मुलाखतीचा हा एक नमुना पेश केलाय.संपूर्ण मुलाखत लेखाच्या स्वरूपात सादर करणे फारच किचकट काम आहे. त्यातून अधून मधून भीमरावांनी पेश केलेली गान प्रात्यक्षिके ही निव्वळ ऐकण्या/पाहण्याची बाब आहे. म्हणून दृक्‌श्राव्य स्वरूपातली संपूर्ण मुलाखत ऐकायची/पाहायची असेल तर ती खालील दुव्यावर दहा भागात पाहता येईल. रसिकांनी त्याचा जरूर आनंद घ्यावा ही विनंती.




ह्या मुलाखतीचे चित्रीकरण खुद्द विवेक काजरेकरांनी केलंय.

मी एक किंचित बिरबल!

माझ्यावर अनपेक्षित ओढवलेला एक प्रसंग आणि त्यातून मी कशी सुटका करून घेतली हे ऐकायचंय? तर ऐका.

२९ जून, २००९

स्वगत!

आपली दोन मनं असतात असे म्हटले जाते. तर अशा ह्या दोन मनांचा आपापसातला संवाद म्हणजेच स्वगत...तेच सादर करतोय. ऐकून सांगा कसे वाटतंय.


२८ जून, २००९

माझे संगणकीय आणि महाजालीय उपद्व्याप!

माझा आणि महाजालाचा संबंध सर्वप्रथम २००० साली आला. तसे त्याआधी महाजालासंबंधी बरेच काही ऐकून होतो पण प्रत्यक्ष असा परिचय नव्हता. कार्यालयात प्राथमिक अवस्थेतल्या संगणकांपासून ते पी३ पर्यंतचे संगणक हाताळले होते पण ते कुठेही महाजालाला जोडलेले नव्हते त्यामुळे जरी महाजालासंबंधी एक प्रकारचे कुतुहल होते तरी ते शमवण्याची तशी सोय नव्हती. बाहेर सायबर कॅफेत जाऊन काही करावे तर तशी हिंमतही नव्हती आणि तासाला ३०-४० रुपये देऊन तिथे जाणे म्हणजे निव्वळ पैसे फुकट घालवणे असेही वाटत होते.

२००० साली एका स्थानिक संस्थेतर्फे संगणक बनवण्याचे प्रशिक्षण देण्याबद्दलची एक जाहिरात वाचली आणि मग ठरवले की आपणही हे शास्त्र शिकून घ्यायचे. त्याप्रमाणे तिथे २५०० इतके नाममात्र शुल्क भरून नाव नोंदवले. तिथे संगणक ओळख,त्याची अंतर्गत रचना आणि कार्य,तसेच जोडणी आणि दुरुस्तीचे जुजबी ज्ञान मिळाले. त्या भांडवलावर मग मी हिंमत करून माझा पहिला संगणक बनवला .
माझ्या कार्यालयातील एका तरूण पण ह्या क्षेत्रातल्या माझ्यापेक्षा अनुभवी मित्राला साथीला घेऊन मी हा संगणक बनवला. माझ्या संगणकाची प्रमूख तांत्रिक वैशिष्ठ्ये अशी होती.
१)प्रोसेसरः इंटेलचा पी३-८६६मेगाहर्ट्झ
२)मदरबोर्डः इंटेल ८१५ चिपसेट आधारित
३)रॅमः १२८एम्बी
४)१.४४ फ्लॉपी ड्राईव्ह
५) सीडी रॉम,
६)२०जीबी हार्डडिस्क
तसेच स्पीकर्स,माऊस्,कीबोर्ड,अंतर्गत मॉडेम वगैरे जरूरीच्या गोष्टी.

संगणक जोडणी तर व्यवस्थित झाली. त्यानंतर त्यावर विंडो९८ चढवणे आणि इतर जरूरी प्रणाल्या चढवताना अनंत तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले. एक तर तुटपुंजे ज्ञान आणि त्यात योग्य सल्ला देऊ शकतील असेच कुणीच आजुबाजुला नसल्यामुळे संगणक जोडणीनंतर प्रत्यक्ष संगणक व्यवस्थितपणे सुरु होईपर्यंत जवळ जवळ १५-२० दिवस मी त्याच्याशी झगडत होतो. त्याचा फायदा असा झाला की बर्‍याच गोष्टी ज्या शिकताना कळल्या नव्हत्या त्या अनुभवाने शिकलो. नुसताच शिकलो नाही तर त्याचा फायदा माझ्यानंतर ह्या क्षेत्रात पडलेल्यांना मी देऊ शकलो.

संगणकावर विंडो ९८ चढवताना आलेले अनुभव जर त्यावेळी लिहून ठेवले असते तर नवशिक्यांसाठी एक छानसे पाठ्यपुस्तक तयार झाले असते असे आज मागे वळून पाहताना वाटते. कितीतरी साध्या साध्या गोष्टी असतात ज्या अतिशय महत्वाच्या असतात पण त्याबद्दल फारसे कुणालाच माहीत नसते. मी प्रशिक्षण घेतले होते तेव्हा मलाही हे सर्व खूप सोपे वाटले होते पण जेव्हा प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली तेव्हा आलेल्या अडचणी आणि त्यावर योजायचे उपाय ह्याबद्दल दूरान्वयानेही काहीही शिकवले गेलेले नव्हते किंबहुना अशा अडचणी त्या शिक्षकांनाही कधी आलेल्या नव्हत्या. त्यामुळे मी जेव्हा त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने गेलो होतो तेव्हा ते देखिल भांबावलेले दिसले. असो.
तरीदेखिल मी माझ्या नेहमीच्या सहजासहजी हार न मानण्याच्या स्वभावामुळे त्यावर मात केली आणि एकदाचा माझा संगणक सुरु केला. त्यानंतर तो महाजालाला जोडतानाही काही अडचणी आल्या पण त्याबाबतीत मात्र मला इतरांची मदत झाली आणि एकदाचा माझा संगणक सर्वांग परिपूर्ण स्थितीत पोचला. त्यावेळचा आनंद काही और होता.

सुरुवातीला जालजोडणी होती ती एमटीएनएलच्या डायलअप प्रणालीच्या सहाय्याने होत होती. जालावर जाण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे जे जे दिसत होते ते सगळे वाचण्याचा,पाहण्याचा अट्टाहास होता. त्यामुळे तासंतास जालावर खिळून असायचो. त्यातच मधेच उगवणार्‍या चित्रविचित्र,हलत्या-नाचर्‍या जाहिराती वगैरेंच्या भूलभूलैयात मी असा अडकत गेलो की मला खाण्यापिण्याचेही भान नसायचे. त्यात अजून एक गोष्ट मोहमयी वाटायची...फसव्या जाहिराती. आपण नशीबवान ठरला आहात,आपल्याला अमूक इतके बक्षीस लागलेले आहे,मिळवण्यासाठी इथे टिचकी मारा. झाले,मग काय मारायची टिचकी. पुढे जो काही फॉर्म वगैरे असेल तो भरायचा आणि असेच गुंतत जायचे. प्रत्यक्ष बक्षीस तर कधीच मिळाले नाही पण महिना पूर्ण झाल्यावर एमटीएनएलचे बील आले ते पाहून डोळे पांढरे झाले होते....
बील होते निव्वळ रूपये ५०००+......

२३ जून, २००९

छोमा!

एक त्रिकोणी कुटुंब! आई-बाबा आणि त्यांची छोटी... वय वर्षे ३ ते ४.
बाबांनी छोटीचे लाडाने ठेवलेले नाव आहे.. छोटी माऊ म्हणजेच छोमा.
तर हे नाव आपल्या छोमाला इतके आवडले की तिने लगेच आपल्या आई-बाबांनाही नावं ठेवली.
बाबांचे नाव बाबा बोका...बाबो आणि आईचे नाव मोठी माऊ...मोमा. आहे ना छोमा हुशार!



छोमाला बाबोने एक युट्युबवरचे गाणे दाखवले. ....एका माकडाने काढले दुकान. ते गाणे तिला इतके आवडले की ती आता ते साभिनय म्हणू शकते. पण पुढची गंमत म्हणजे तशा प्रकारचा खेळ खेळण्यासाठी छोमाने बाबोला दुकानदार बनवले ....माकड बनवले . त्यातल्या मनीमाऊसारखी ऐटीत पर्स घेऊन येते , पैसे देते आणि बाबोकडे उंदिर मागते. तर कधी अस्वल बनून येते आणि मध मागते.

छोमाची अजून एक गंमत सांगतो.
बाबो फोनवर त्याच्या बायकोशी म्हणजे मोमाशी बोलताना छोमा विचारायची की तू कोणाशी बोलतोय?
तर कधी बाबो सांगायचा की मी तुझ्या मंमुली मम्माशी बोलतोय तर कधी सांगायचा की मी माझ्या बायकुली बाईशी बोलतोय.
आपली मम्मा ती बाबोची बायकुली हे चाणाक्ष छोमाच्या लक्षात आले. त्याचा वापर तिने कसा केला पाहा.
बाबोच्या आधी मोमा कामावर निघाली की बाबो छोमाला बोलावून सांगायचा...आता खिडकीतून बघ तुला तुझी मंमुली मम्मा दिसेल. त्यावर छोमा मिस्किलपणे बाबोला सांगते...आणि तुला तुझी बायकुली बाई दिसेल.

तिला नावावरून कोणते नाव मुलीचे,कोणते मुलाचे ह्याचा अंदाज येतो.
तर एकदा बाबोने तिला 'स्वार्थी मगर' ही गोष्ट इंग्रजीतून सांगितली ज्यात मगर पुल्लिंगी आहे.
मग छोमा बाबोला म्हणाली, त्या गोष्टीमधील मगर मुलगा आहे ना? मग त्याला स्वार्थी नाही म्हणायचे...स्वार्थ म्हणायचे.
स्वार्थी...म्हणजे गर्ल आणि स्वार्थ म्हणजे बॉय.

छोमाला बाबोने मराठी मुळाक्षरे शिकवायला सुरुवात केली.
अ..अननस, आ..आई वगैरे.
मग छोमाशी बोलताना बाबो असे बोलायचा... आ आ आम्ही ,बो बो बोलतो , अ अ असेच, का का काहीही....अशा तर्‍हेने शिकवायला सुरुवात केली . त्या तशा बोलण्याची छोमालाही गंमत वाटायला लागली.
मग एकदा तिला नात्यांबद्दल अशीच माहिती देताना बाबो म्हणाला...आ आ आजी, आ आ आजोबा, मा मा मावशी ....
छोमाला सख्खा काका किंवा मामा नाहीये.
तेव्हा आ आ आजी, आ आ आजोबा, मा मा मावशी च्या पुढे का का काका असे म्हटल्यावर तिने विचारले..
कु कु कु कुठला का का काका?
बाबोला हसावे की रडावे ते कळेना.
मग बाबो म्हणाला...आ आ आपण अ अ असे ने ने नेहमी बो बो बोललो त त तर तो तो तोतरे हो हो होऊ.
ह्यावर छोमा फक्त मिस्किलपणे हसते.

सद्या इतकेच. छोमा आवडली तर तिच्या आणखी काही गमती-जमती सांगेन

१० जून, २००९

बंगलोरच्या आठवणी!

ऑफिसच्या कामानिमित्त मी १९७३ साली माझ्या दोन सहकार्‍यांसह बंगलोरला गेलो होतो. तिथे महिनाभर आमचे वास्तव्य होते. त्या दरम्यानच्या काही गंमतीदार आठवणी ऐका माझ्याच आवाजात.


९ जून, २००९

ऐसपैस गप्पा!

गप्पा मारायला जशा आवडतात तशाच त्या इतरांनी मारलेल्या ऐकायला आवडतात....असे जर तुमचेही असेल तर मग इथे ऐका माझ्या गप्पा. गप्पा आवडल्या/नावडल्या  तरी ऐकल्यावर सांगायला विसरू नका/संकोच करू नका.
तर ऐका ह्या ऐसपैस गप्पा!

८ जून, २००९

शब्दबंध!

आंतरजालावर स्वत:ची जालनिशी लिहीणारे काही तरूण/तरूणी एकत्र आले आणि झाला एका इ-संमेलनाचा जन्म! त्याला नाव देण्यात आले ’शब्दबंध!’ प्रशांत मनोहर,नंदन होडावडेकर आणि अजून काहीजण ह्यात सामील झाले. वर्ष होते २००८. ह्यावर्षी शब्दबंधचे पहिले इ-संमेलन झाले. भाग घेणार्‍या प्रत्येक सदस्याने आपल्या जालनिशीवरील एखाद-दुसर्‍या लेखाचे/कवितेचे अभिवाचन करायचे ही ती संकल्पना. पहिल्या वर्षी हा प्रयोग लहान प्रमाणात राबवला गेला.

ह्यावर्षी म्हणजे दिनांक ६/७जून २००९ ला हेच संमेलन खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप जास्त जणांच्या सहभागाने यशस्वी झाले. ह्यावर्षी शब्दबंधचे ६० च्या वर सभासद होते. पण प्रत्यक्ष सहभाग २९ सभासदांनीच घेतला. अर्थात पहिल्या संमेलनाच्या तुलनेत ह्यावर्षी अडीचपट जास्त उपस्थिती होती. त्यामुळे हे यश निश्चितच सुखावणारे आहे.

शब्दबंधसारख्या इ-संमेलनासाठी स्काईप हे माध्यम वापरले गेले. स्काईप हा देखिल इतर संवादकांसारखाच(मेसेंजर)एक संवादक आहे ज्यात एकाचवेळी जास्त लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला इ-सभेचं स्वरूप प्राप्त होऊ शकतं. ह्यावेळी स्काईपचा उपयोग करताना बर्‍याच अडचणी आल्या. तसे बहुतेकजण हे माध्यम पहिल्यांदाच वापरत होते त्यामुळे त्यात असणार्‍या सोयी/अडचणी काही अपवाद वगळता बहुतेकांना नीटशा माहीत नव्हत्या. ह्यासाठी शब्दबंधच्या संमेलनाआधी स्काईपची चांचणी घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. पण कार्यबाहुल्यामुळे म्हणा अथवा काही वैयक्तिक अडीअडचणींमुळे म्हणा त्याला खूपच कमी सभासदांकडून प्रतिसाद मिळाला.

ह्या इ-संमेलनाच्या दृष्टीने विचार केल्यास आलेल्या प्रत्यक्ष अडचणी अशा होत्या.
१)एकावेळी जास्त सभासद एकत्र आल्यावर होणारा गोंधळ...एकजण बोलत असताना इतरांनी शांत राहणे अपेक्षित असते.पण ओसंडून जाणार्‍या उत्साहाच्या भरात ही गोष्ट चटकन लक्षात येत नाही. अर्थात त्यावर उपाय होताच. प्रत्येक सत्राच्या सूत्रसंचालकाने अनुमती देईपर्यंत सर्वांनी आपापले माईक बंद(म्यूट) ठेवणे आणि ह्या पद्धतीने प्रत्येक सत्रात शिस्त राखण्याचा प्रयत्न बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणता येईल.

२)प्रत्येक सभासदाच्या जालजोडणीची बॅंडविड्थ वेगळी असल्यामुळे बर्‍याच वेळा संभाषण तुटक तुटक ऐकू येणे.एकाच वेळी जास्त खिडक्या उघडल्यामुळे देखिल बर्‍याचदा बॅंडविड्थ कमी पडत असते. अशा वेळी सभासदाचे सभेतून आपोआप बाहेर फेकले जाणे होत असते. अशावेळी यजमानाने(जो ह्या सभेत इतरांना आमंत्रित करत असतो...ही व्यक्ती सूत्रसंचालक असू/नसू शकते)लक्ष ठेवून त्या सभासदाला पुन्हा आत घेणे वगैरे गोष्टी सातत्याने करायच्या असतात.
३)स्काईपचे व्हर्जन वेगवेगळे असणे की ज्यामुळेही एकमेकांशी संवाद साधण्यात काही अडचणी येत होत्या. स्काईपवर देवनागरीतून लेखी संवाद साधण्यातही काही सभासदांना अडचण जाणवत होती...ज्यावर अजूनही तोडगा सापडलेला नाहीये.


वरील सर्व अडचणींशी सामना करत शब्दबंधचे इ-संमेलन ४ सत्रात पार पडले. प्रत्येक सत्रात अभिवाचक आणि श्रोते मिळून सरासरी १५ जण होते. हे संमेलन अतिशय रंगतदार झाले. एरवी वाचलेले लेख/कविता वगैरे त्या त्या लेखक/कवींच्या तोंडून ऐकताना एक वेगळीच मजा येते आणि ती ह्या संमेलनात मला प्रत्यक्ष अनुभवता आली.पुढच्या वर्षी ह्यापेक्षाही मोठ्या संख्येने लोक भाग घेतील अशी अपेक्षा व्यक्त करून हे छोटेखानी मनोगत संपवतो.

ह्या सभेत मी वाचलेला लेख आणि सादर केलेली कविता

२ जून, २००९

प्रणयगंध!

नव्या पिढीतील ताज्या दमाचे संगीत दिग्दर्शक श्री. विवेक काजरेकर ह्यांच्या संगीत दिग्दर्शन कारकीर्दीतील दुसर्‍या ध्वनी-गीतसंचाचे (ऑडियो अल्बम) ’प्रणयगंध’चे प्रकाशन सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ संगीतकार श्री. यशवंत देव ह्यांच्या शुभहस्ते दिनांक ३१मे २००९ ह्या दिवशी प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे प्रतिष्ठानच्या भरत नाट्यम्‌ सभागृहात झाले.
ह्या संचातली दोन गीते ज्येष्ठ कवयित्री कै. शांता शेळके ह्यांची आहेत, तसेच नव्या दमाच्या आणि आजच्या पिढीतील नव्या कवी/कवयित्रींपैकी वैभव जोशी(३),अरूण सांगोळे(१),प्रसन्न शेंबेकर(१) आणि क्षिप्रा(१) ह्यांचीही गीते ह्यात आहेत.
ह्या ध्वनी-गीतसंचातील गाणी वैशाली सामंत आणि अमेय दाते ह्यांनी गायलेली आहेत.


प्रणयगंधच्या निर्मिती प्रक्रियेबद्दलची माहिती देतांना श्री. विवेक काजरेकर



प्रणयगंधच्या प्रकाशनानंतर ध्वनी-गीतसंचासह (डावीकडून) श्री.विवेक काजरेकर, समारंभाचे अध्यक्ष,उद्घाटक आणि सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव,गायिका वैशाली सामंत,गायक अमेय दाते, प्रणयगंधच्या निर्मात्या सौ. वैशाली काजरेकर आणि वैभव काजरेकर


ध्वनी-गीतसंचाबद्दलचे आपले विचार व्यक्त करताना यशवंत देव


अमेय दाते एक गीत सादर करताना


प्रकाशन सोहळ्याला उपस्थित रसिकगण

ह्या ध्वनी-गीत संचात असणारी सर्व गीते अतिशय श्रवणीय झालेली आहेत. आजवर आपण वैशाली सामंतची जी गाणी ऐकत आलोय त्यापेक्षा खूपच वेगळी गाणी गायची तिला इथे संधी मिळाली आहे आणि तिने त्याचे सोने केले आहे. अमेय दातेनेही त्याच्या सहजसुंदर आवाजात गायलेली गीते ऐकल्यावर ’ह्या मुलाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे’ असे म्हटले तर मुळीच अतिशयोक्ती होणार नाही. रसिकांनी प्रत्यक्ष ऐकूनच खात्री करावी.

हा छोटेखानी पण अतिशय रंगलेला समारंभ जवळपास दोन तास चालला होता. समारंभाचे सूत्रसंचालन सद्याचे आघाडीचे निवेदक श्री. भाऊ मराठे ह्यांनी अतिशय सराईतपणे केले होते.
प्रणयगंधचे कर्ते-धर्ते श्री विवेक काजरेकरांचे मनोगतही रंगतदार झाले.
कवी-कवयित्रीं,तसेच गायक-गायिका अमेय दाते आणि वैशाली सामंत ह्यांनाही त्यांचे मनोगत व्यक्त केले. प्रत्येकाने आपापल्या परीने समारंभातली रंगत वाढवत नेली. अमेय दाते आणि वैभव काजरेकर(विवेक काजरेकर ह्यांचे चिरंजीव) ह्यांनी एकेक गीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
ज्येष्ठ संगीतकार आणि समारंभाचे अध्यक्ष श्री. यशवंत देवांनी त्यांच्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत आपले विचार व्यक्त केले .
श्री विवेक काजरेकर अशाच श्रवणीय आणि कर्णमधुर चाली ह्यापुढेही आपल्याला ऐकवत राहतील अशी मी खात्री बाळगतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यकालीन कार्यात सुयश चिंतितो.
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते ह्या वचनाचे प्रात्यक्षिक म्हणजे इथे सौ. वैशाली काजरेकर ह्या आहेत. त्यांनी प्रणयगंधच्या निर्मितीपासून ते त्याच्या प्रकाशनापर्यंत अफाट मेहनत घेतलेय तेव्हा त्यांचा उल्लेख इथे अनुचित ठरू नये.

तर मित्रहो अशा तर्‍हेने एका रंगतदार संगीतमय सोहळ्याला हजेरी लावण्याची सुवर्णसंधी मला मिळाली त्यात तुम्हाला सामील करून घ्यावे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे.

२८ मे, २००९

कृतार्थ!

ही माझी दुसरी कविता. शब्दांची मोडतोड करून जोडलेली. जमलेय का सांगा.

मी,हासत हासत जगलो
अन्‌ हसता हसता मेलो

बालपणाची गंमत न्यारी
आठवणींचा खजिना भारी
खेळातील आनंद पाहुनी
खेळातच परी रमलो ॥

तरूणाईचा जोश अनोखा
ज्यात सखीचा जाहलो सखा
शृंगाराच्या मत्त लीलांनी
रतीरंगातच रमलो ॥

वृद्धपणाची सांज सावळी
जीवनगंगा कृतार्थ झाली
मोद म्हणे संसारसागरी
आत्मानंदी तरलो ॥


चाल इथे ऐका.


ही नव्याने लावलेली चाल ऐका. ही चाल दिनांक १८ जून २०११ ह्या दिवशी ध्वनीमुद्रित केलेय.
ही चाल दिनांक २१/२२ जून २०१२ रोजी  थेट ध्वनीमुदित केलेय...चाल जशी सुचत गेली तसा गात गेलोय....मागे तालही घेतलाय मदतीला...ऐकून सांगा आवडली की नावडली .

१० मार्च, २००९

होळी!


होळी रे होळी पुरणाची पोळी
सायबाच्या *** बंदुकीची गोळी
होळी म्हटलं की माझ्या बालपणातली ही आरोळी मला सर्वप्रथम आठवते. ह्याचे जनकत्व कुणाकडे होते कुणास ठाऊक. माझा जन्म स्वातंत्र्योत्तर काळातला. त्यामुळे साहेब म्हणजे इंग्लीश माणूस असे जे एक समीकरण त्याकाळी होते त्यातला साहेब मी कधीच पाहीलेला नाही. कदाचित स्वातंत्र्यपूर्व कालात ह्या आरोळीचा जन्म झाला असावा आणि परंपरेने ती आमच्यापर्यंत पोचलेली असावी. असो.
होळीचा सण हा आम्हा लहान मुलांसाठी खूप आनंदाचा सण होता. होळीच्या आधी चांगले आठवडाभर जळाऊ लाकडांची जमवाजमव करण्यात आम्हा मुलांचा सगळा वेळ जात असे. लाकडे,बांबू पळवणे,छोटी-मोठी झाडं तोडणे,सुकलेला पालापाचोळा एकत्र साठवणे इत्यादि कामं करण्यात सगळ्यांची अहम-अहमिका लागत असे. त्यानंतर प्रत्येक घरी जाऊन वर्गणी गोळा करायची अशीही एक कामगिरी असायची. आमच्या वाडीत जवळजवळ तीस-चाळीस बिर्‍हाडं होती. साहजिकच होळी अगदी दणक्यात साजरी व्हायची.

होळीचा खड्डा खणण्यासाठी घराघरातून पहारी,कुदळी,फावडी वगैरे माळ्यावरून काढण्यापासून तयारी चालायची. खड्डा खणण्याचे काम मोठ्या मुलांकडे असायचे. खड्डा खणताना निघणारी माती उचलून बाहेर टाकण्याचे काम मात्र लहान मुलांवर सोपवले जायचे. ती बाहेर काढलेली माती मग त्या खड्ड्याच्या बाहेरून गोलाकार रिंगणबांध बनवण्यासाठी वापरली जायची. खड्ड्याच्या मधोमध एक छोटासा खड्डा खणला जायचा. त्यामध्ये एक मोठा थोरला बुंधा रोवला जायचा. मग ह्या बुंध्याच्या आधाराने इतर लाकडे रचली जायची. ही लाकडे रचण्याची पण एक खास पद्धत होती ज्यामुळे त्यात हवा खेळती राहात असे आणि होळीही सदैव पेटती राहात असे. होळीची लाकडे रचून झाली की मग एका मोठ्या दोरीने त्यांच्याभोवती वेढा घातला जायचा.मग होळीला हार घातला जायचा.

अशा तर्‍हेने जय्यत तयारी झाली की रात्री आठच्या सुमारास वाडीतील सर्व आबालवृद्ध एकत्र जमत. वाडीतल्या सुवासिनी होळीची पुजा करत. मग कुणी तरी वडिलधारं व्यक्तिमत्व होळी पेटवत असे. उघड्या तोंडावर पालथी मूठ धरून 'बो बो बो' असे मनसोक्त ओरडायला अशा वेळी खूप मजा यायची. एरवी असे ओरडले तर मार मिळत असे पण त्याच्याउलट ह्या दिवशी जो जास्त जोरात ओरडू शकायचा त्याचे जाहीर कौतुक व्हायचे. त्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जायचा. होळीत नारळ,लाह्या पैसे वगैरे अर्पण केले जायचे. होळीत खरपूस भाजले गेलेले नारळ बाहेर काढण्याचे काम मोठी मुले करत. त्यासाठी त्यांच्याकडे मोठ्या काठ्या असत. असे भाजलेले नारळ बाहेर काढले की त्याचे खोबरे बाहेर काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून साखरेबरोबर प्रसाद म्हणून ते वाटण्यात यायचे. त्या खोबर्‍याची चव काही न्यारीच असते. आजही त्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलंय.

आमच्या वाडीतली होळी इतकी प्रचंड असे की आजूबाजूच्या वाडीतली समस्त मंडळी तिच्या दर्शनाला येत असत. दर्शन घ्यायला येणारी मंडळी आधी होळीची पूजा करत. मग नैवेद्य म्हणून होळीला पुरळपोळी,लाह्या,नारळ,पैसे वगैरे अर्पण करत. त्यामुळे नारळांनाही तोटा नसायचा. त्यानंतर हातातल्या लोट्यातले पाणी सांडत सांडत होळीला प्रदक्षिणा घालत.

रात्री शेव कुरमुर्‍यांची भेळ बनवली जायची. ही भेळ इतकी चविष्ट आणि भरपूर बनवत की आम्ही मुले ती मनसोक्त खात असू तरीही ती संपत नसे. त्याच बरोबरीने खोबर्‍याचा तोबराही सतत चालूच असायचा. होळीसाठी भांगही वाटली जायची पण आमच्या घरात भांग,दारू वगैरेसारख्या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात, त्यामुळे मी आणि माझी भावंडं त्या भानगडीत कधीच पडलो नाही. रात्री बारा वाजेपर्यंत आम्हाला होळीचा आनंद उपभोगायची मोकळीक असायची. त्या वेळेत इतर मुलांच्या संगतीने आम्हीही इकडून तिकडून लाकडं,बांबू वगैरे पळवून आणण्यात आमचा हातभार लावत असू. आईची हाक आली की मग नाईलाजाने झोपायला जावे लागे. खरे तर अशा वेळी झोप कसली येतेय म्हणा. बाहेरून, होळीच्या पेटण्याचा, त्यातल्या लाकडांच्या फुटण्याचा तो विशिष्ट आवाज, वातावरणात भरलेला धूर आणि उकाडा आणि त्याचसोबत जागरण करणार्‍या होळकरांचे बोंबलणे,ह्या सर्व गोष्टींमुळे अंथरुणावर नुसते कुशी बदलत पडून राहाणे इतकेच आमच्या हातात असे.

दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी उठून मग त्या धुगधुगी असलेल्या होळीवर आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी वाडीतल्या वाडकरांची रांग लागलेली असायची. मोठी माणसे आपापल्या आंघोळी उरकून घेत. आम्हा मुलांना मात्र धुळवड साजरी करायची असल्यामुळे आम्ही त्या आंघोळीच्या कचाट्यातून सुटायचो. माझ्यासारखी काही उपद्व्यापी मुले होळीच्या बाजुलाच बसून त्यात आदल्या दिवशी लोकांनी टाकलेले पैसे शोधण्यासाठी एखाद्या काठीच्या सहाय्याने उसका-उसकी करायचो. त्यात बर्‍याच जणांना पैसे मिळायचे देखिल. त्या काळी एक नया पैशाचे तांब्याचे नाणे होते. ते राखेने घासले की इतके चकचकीत दिसायचे की ते आम्ही एकमेकांना दाखवत असू. असे नाणे ज्याला मिळायचे त्याच्या भाग्याचा इतरजण हेवा करत.

त्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत यथेच्छ धुळवड साजरी करायचो. आधी आमच्या वेळी कृत्रिम रंग नसायचे.(पुढे पुढे तैलरंग(ऑईलपेंट)वापरायला सुरुवात झाली. तो घालवायचा म्हणजे अक्षरश: खरवडून काढावा लागायचा.अंगाला रॉकेल फासावे लागायचे तरीही रंग सहजासहजी निघत नसे. त्यामुळे कातडी सोलवटायची,डोक्याचे केस तडतडायचे. हे सगळे अनुभवल्यानंतर मी त्यातून अंग काढून घेतले.) एकमेकांना रंगवण्यासाठी आम्ही गुलाल,होळीतली राख आणि माती ह्यांचा यथेच्छ वापर करायचो. अंगावर बादल्याच्या बादल्या पाणी ओतायचो आणि मग एकमेकांना मातीत लोळवायचो. अगदी कंटाळा येईपर्यंत हे सगळं चालत असे. मग विहीरीवर जाऊन त्याच कपड्यात गार पाण्याने मनसोक्त स्नान करून ओल्या अंगानेच घरी परतायचो. घरी आल्यावर ऊन ऊन पाण्याने आणि साबण लावून पुन्हा आंघोळ व्हायची; आणि मग पुरणपोळी,कटाची आमटी वगैरे पक्वान्ने आमची भूक भागवत. अशी सगळी मज्जा मज्जा होती.

२५ फेब्रुवारी, २००९

सहल: किल्ले रायगड आणि शिवथरघळची!


क्षत्रिय कुलावतंस,गोब्राह्मणप्रतिपालक,हिंदूपदपातशाही संस्थापक,सिंहासनस्थ छत्रपती शिवाजी महाराज!


रायगडाच्या पायथ्याशी.


रायगडाकडे कूच!


अचानकपणे रायगड दर्शनाचा योग चालून आला आणि त्याबरोबरीनेच समर्थांच्या शिवथरघळीचेही दर्शन घडले. आमच्या मालाड मधील ’प्रयोग’ ह्या नाट्यकलाप्रेमी संस्थेने दिनांक २०-२१ फेब्रुवारी २००९ ह्या दोन दिवसांसाठी हा योग जुळवून आणला होता. जावे की न जावे ह्याबद्दल माझ्या मनात संभ्रम होता. कारण होते दुखावलेले पाऊल,जे अधून मधून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. पण रायगडावर जाण्यासाठी रोपवेची सोय आहे हे कळले आणि मग मी जाण्याचा निर्णय नक्की केला. आम्ही सर्व मिळून ३०-३५ जण होतो. आम्हाला रायगड आणि शिवथरघळीची ऐतिहासिक माहिती देण्यासाठी डोंबिवलीहून एक खास व्यक्ती येणार होती. त्यांचे नाव होते श्री. सुरेश ग. वाडकर(गायक वाडकर नव्हेत!). मालाडहून खास बसने आम्ही सकाळी ६.३०ला निघालो. वाटेत नागोठणे येथे कामत ह्यांच्या उपाहारगृहात न्याहारी केली आणि मग तिथून रायगडाकडे प्रयाण केले. वाटेत माणगावला रहदारीची कोंडी झाल्यामुळे आम्ही नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीरा पोचलो.
रायगडाच्या पायथ्याशी पोचल्यावर आमच्यापैकी फक्त पाचजण(मी धरून)रोपवेने वर चढले,तर बाकीचे सर्वजण पायी चढून आले.
दूपारचे जेवण झाल्यावर मग आम्ही जेव्हा रायगड दर्शनाला निघालो तेव्हा संध्याकाळचे ४ वाजून गेले होते,म्हणून फक्त महत्वाच्या गोष्टीच पाहण्याचे ठरवले. त्यात मुख्य म्हणजे महाराजांच्या राण्यांच्या राजवाड्याची जागा,बाजारपेठ,राज्यारोहण जिथे झाला ती जागा,जगदीश्वर मंदीर वगैरे ठिकाणे होती. त्यानंतर आम्ही महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मुजरा केला. प्रत्येक जागेचे ऐतिहासिक महत्व आणि त्याबद्दलची माहीती सुरेश वाडकर देत होते. हे सगळे करेपर्यंत सुर्यास्त झालेला होता. त्यामुळे मग आम्ही आमच्या निवासस्थानाकडे निघालो. वाटेत अंधारात पायर्‍या उतरतांना मधेच एका ठिकाणी माझे पाऊल पुन्हा दुखावले गेले पण सुदैवाने फारसे नुकसान नाही झाले. माझ्या मुलीच्या आधाराने आणि इतर लोकांच्या सहकार्याने मी इच्छित स्थळी सुखरूप पोचलो.
त्या रात्री आमचा मुक्काम रायगडावरच होता. रात्री जेवणं झाल्यावर विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला. त्यात माझ्यासकट बर्‍याच जणांनी आपले गुण प्रकट केले.

दुसर्‍या दिवशी सकाळी आंघोळी करून,न्याहारी उरकून मग आम्ही रायगड उतरलो आणि शिवथरघळीकडे प्रस्थान केले.





दोरखंड मार्ग म्हणजेच रोप-वे!
फक्त चार मिनिटात वर पोचलो आणि नंतर तसाच खालीही उतरलो. ;) अशी चढ-उतार करण्यासाठी शुल्क आहे रुपये १५०/-(एकतर्फी रु.७५/-). ह्या यानातून वर-खाली करतांना खालचे विहंगम दृष्य नुसते पाहातच राहावे असे वाटते. पण ज्यांना चक्कर(व्हर्टिगो) वगैरेचा त्रास असेल त्यांनी मात्र ह्यात बसू नये.


रोपवे मधून दिसणारे खालच्या परिसराचे विहंगम दृष्य!



आमच्यातले पायी चढून येणारे विश्रांतीसाठी एका ठिकाणी टेकलेत तो क्षण!


रायगडावरून टिपलेला सुर्यास्त!


मेघडंबरीच्या मखरात टिपलेले सुर्यास्त-बिंब!



एक अवलिया...रायगडचा वारकरी आणि आमचे मार्गदर्शक श्री. सुरेश ग. वाडकर.
ह्यांनी १००८ वेळा पायी रायगडारोहण करण्याचा संकल्प केलेला आहे आणि आमच्या बरोबर ते आले ती त्यांची ६५४वी खेप होती.
ही व्यक्ति रायगड प्रेमाने वेडी झालेय. हे गृहस्थ डोंबिवलीत राहतात आणि त्यादिवशी ते डोंबिवलीहून सतत पायी प्रवास करून रायगडावर पोचले होते. रायगडाचा इतिहास त्यांना मुखोद्गत आहेच पण त्यांच्या बरोबरीने यथासांग रायगड जर बघायचा असेल तर किमान ५-६ दिवस रायगडावर वास्तव्य कराबे लागेल. त्यांना पक्षांची भाषा कळते असे त्यांच्याकडून कळते. आमच्यातले जे लोक वाडकरांबरोबर पायी चढले त्यांना प्रात्यक्षिकही पाहायला मिळाले. ह्या सद्गृहस्थाचे हस्ताक्षर पाहून थक्क व्हायला होते. त्यांनी लिहिलेली रोजनिशी पाहिली तेव्हा त्यातील हस्ताक्षर अगदी छापल्यासारखे सुंदर होते. कोणतेही पान उघडले तरी त्यावरील अक्षरात अजिबात फरक दिसत नाही इतके ते अचूक आणि नेमके होते. ह्यांचे छायाचित्रणही अतिशय देखणे असते. तसेच चित्रकला,काव्य वगैरेमध्येही त्यांची गती विलक्षण आहे. इतकेच नाही तर क्रिकेटमध्येही ते पारंगत आहेत. यष्टीरक्षणात त्यांना विशेष प्रावीण्य आहे असे त्यांनीच सांगितले. आमच्या चमूतील सगळे आबाल-वृद्ध त्यांच्या उपस्थितीने भारावून गेलेले होते. त्यांच्या सततच्या रायगड आणि इतर दूर्ग भ्रमणामुळे मी त्यांना त्यांचे वाडकर हे आडनाव बदलून त्याऐवजी गडकर असे आडनाव करावे अशी सूचना केली. :) बालचमूने तर त्यांचे नामकरण ’रायगडकाका’ असेच केले आहे.


गड चढताना...खाली दिसणारे विहंगम दृष्य!


रायगडच्या बाजारपेठेत!


बाजारपेठेतून फेरफटका!



शिवथरघळीच्या तोंडाशी!


शिवथरघळ!


घळीच्या बाजूचा धबधबा. सद्या कोरडा पडलाय. पावसाळ्यात मात्र हा ओसंडून वाहतो असे आमचे मार्गदर्शक सांगत होते. इथेच समर्थांनी तपश्चर्या केली. त्यावेळी घनदाट जंगल होते. तसेच तिथे वाघ सिंहांसारखी हिंस्र श्वापदे,तसेच सरपटणारे विषारी प्राणी ह्यांचेही वास्तव्य होते. ह्या ठिकाणी आता समर्थ आणि त्यांचा पट्टशिष्य कल्याणस्वामी ह्यांचे पुतळे आहेत. समर्थ दासबोध सांगताहेत आहेत आणि कल्याणस्वामी तो लिहीण्याचे काम करताहेत असे दृष्य आहे.
विशेष म्हणजे बाहेर प्रचंड उकाडा होता तरी घळीच्या आत मात्र मस्तपैकी थंडगार वातावरण होते.


टीप: आजवर हजारो लोकांनी रायगडाची विविध कोनातून काढलेली छायाचित्रे महाजालावर प्रकाशित केलेली असल्यामुळे तशा प्रकारची छायाचित्रे मी जाणीवपूर्वक प्रकाशित करत नाहीये.कारण त्यात वेगळेपणा असा काही जाणवणार नाही असे मला वाटते.