माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
दिल्ली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिल्ली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

८ मे, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ६

अशुभस्य कालहरणम्‌...असं कुणीसं म्हटलंय...त्यानुसार मी माझे दिल्लीतले दिवस काढत होतो. सोमवार ते शुक्रवार तसे बरे जात होते कारण दिवसभर कार्यालयात इतर सहकार्‍यांबरोबर गप्पा-टप्पांमध्ये वेळ त्यामानाने बरा जायचा...मी काम तर करतच नव्हतो...दिल्लीत आल्यापासून मी कामाला अजिबात हात लावलेला नव्हता....आणि नायरसाहेबांच्या आदेशाप्रमाणे...काम करावे/न करावे हे सर्वस्वी माझ्या इच्छेवर सोपवलेलं होतं.... त्यामुळे इतर साहेबलोक माझ्या भानगडीत पडत नसत....काम न करता वेळ कसा घालवायचा? हा एक प्रश्नच होता...पण तोही मी सोडवलेला होता...कार्यालयात काही कुणी सदैव काम करत नसतात...आणि त्यातून सरकारी कार्यालयात तर मान मोडून काम करणारे (पूर्वीच्या)माझ्यासारखे एकूण कमीच लोक असतात.
एकेकाळचा अत्यंत कामसू माणूस असा माझा लौकिक होता....आणि आता निव्वळ रिकामटेकडा...
त्यामुळे माझ्यासारखे रिकामटेकडे/अर्धरिकामटेकडे लोक असायचेच...त्यांच्याशी गप्पा मारण्यात माझा वेळ जायचा. संध्याकाळी कार्यालय बंद झाल्यावर मग कधीकधी कार्यालयातच बुद्धीबळाचा डाव मांडून बसायचो...माझ्यासारखेच एकटे राहणारे....घरादाराकडे कुणी वाट पाहणारे नसलेले ...आपले आजचे काम संपलंय तरी घरी जाण्यात फारसे रस नसलेले काही शिलेदार असायचे...त्यांच्यात एकदोन जण मला तुल्यबल असे प्रतिस्पर्धी सापडले आणि मग कैक वेळा रात्री दहा-दहा वाजेपर्यंत आमच्या लढती चालायच्या...कधी ते जिंकत...कधी मी जिंकत असे....पण जिंकण्या-हरण्याचा मुद्दा सोडला तर...त्यामुळे माझे मन कुठेतरी तेवढा वेळ गुंतून राहात असे हे माझ्यासाठी महत्वाचे होते.

त्या काळात माझी मेव्हणी मटेनिलि,मुंबईमध्ये दूरध्वनी केंद्रात कामाला होती...योगायोगाने ती त्याच कालात मालाड दूध्व केंद्रात रुजू झाली होती...त्यामुळे अधूनमधून एखाद्या संध्याकाळी ती माझ्या पत्नीला तिच्या कार्यालयातून माझ्याशी बोलण्याची सोय करून द्यायची....त्यावेळी आम्ही एकमेकांशी काय बोलायचो?...खरंच,काय सांगू? नवविवाहित पण विरहाने झुरणारे दोन जीव काय वेगळं बोलू शकणार...तुम्ही कल्पना करू शकाल...पण सौचा वेळ जास्त करून रडण्यात आणि माझा तिची समजूत घालण्यात जात असे...मी स्वत: कितीही परिस्थितीने गांजलेलो असलो तरी त्याची क्षिती न बाळगता समोरच्या व्यक्तीला त्याची फारशी जाणीव होऊ देता नये....अशा तर्‍हेने तिची समजूत काढत असे...अर्थात वेगळ्या नजरेने पाहिले तर ती मीच माझी काढलेली समजूत असायची....असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

शनिवार-रविवार अक्षरश: खायला उठायचे....मग मी उगाच दिशाहिन भरकटत बसायचो. बाहेर जातांना नेहमी माझ्याबरोबर एक शबनम पिशवी असायची....त्यात अगदी लहान-सहान पण वेळप्रसंगी उपयोगी पडतील अशा वस्तू असायच्या....मेणबत्ती-काड्यापेटी,सुईदोरा-कात्री,छोटासा चाकू,चष्मा,विजेरी आणि काही जुजबी औषधी गोळ्या....त्या काळात दिल्लीत वीज-भारनियमन चालायचे...एकूणच दिल्ली,दिल्लीच्या वस्त्या आणि रस्ते मला अनोळखी...त्यामुळे वेळप्रसंगी उपयोगी पडावी म्हणून विजेरी, मेणबत्ती-काड्यापेटी वगैरे होती.
माझ्या डोळ्यांचा नंबर खूप जास्त होता त्यामुळे मी नेत्रस्पर्षी भिंगं(कॉनटॅक्ट लेन्सेस)वापरायचो....पण दिल्लीत धूळ भरपूर होती त्यामुळे कैक वेळा ती डोळ्यात जाऊन नेभिं खुपायला लागायची....अशा वेळी ती काढून चष्मा वापरावा लागायचा...म्हणून चष्माही सदैव बरोबर असायचा.

असाच एका शनिवारी घराबाहेर पडलो...बाहेर पडतांना नेहमीप्रमाणे शबनम पिशवी खांद्यावर लटकवायला विसरलो...खरं तर कसा विसरलो तेच आठवत नाही...कारण त्या काळात मी कुठेही बाहेर जातांना शबनम खांद्यावर अडकवली जाणं...ही जणू प्रतिक्षिप्त क्रियाच झाली होती....पण तरीही त्यादिवशी खरंच विसरलो...
त्या दिवशी दिल्लीच्या बसने दिल्लीदर्शन करण्याचे ठरवले आणि मग मनात येईल तसे फिरत राहिलो...शनिवार-रविवारी..दिल्लीच्या बसमधून(डीटीसी) हवा तितका प्रवास एकरकमी तिकिट काढून करता यायचा. मी ते तसे तिकिट काढून हवा तसा...हवा तिथे जात होतो. दिल्लीतले कैक प्रसिद्ध/अप्रसिद्ध भागही पाहिले. हे सगळं करता करता संध्याकाळ झाली...हळूहळू काळोखही झाला....मी माझ्या निवासी स्थानापासून बराच दूर होतो...आणि अचानक एक जबरदस्त वार्‍याचा झोत आला....माझ्या डोळ्यात काहीतरी हललं....आणि मला सभोवतालचं ते सारं विश्वं एकदम अपरिचित वाटायला लागलं....आजूबाजूचा काळोख वाढला....आत्तापर्यंत दिसणारी माणसं,वस्तू वगैरे सगळं धूसर दिसायला लागलं.... डोळ्यातले नेभिं जागेवरून हललं होतं ह्याची तत्काल जाणीव झाली आणि हात आपोआप डोळ्याकडे वळले. डोळा बंद करून नेभिं जागेवर आणण्याचे सगळे प्रयत्न विफल ठरले....आणि मग लक्षात आलं की नेभिं...डोळ्यात नाहीच आहे...ते वार्‍याने कुठेतरी बाहेर उडाले....मग अंगावर चाचपडून पाहिले...जिथे जिथे हात जाईल तिथे बसच्या सीटवर, सीटच्या खाली...चाचपडणे सुरु झाले....माझ्या आजूबाजूला असलेल्यांच्या प्रतिक्रिया मला दिसणे शक्यच नव्हते...पण मी कल्पना नक्कीच करू शकत होतो....इतक्या वेळ नीट,व्यवस्थित बसलेल्या ह्या माणसाला झालं तरी काय? असे भाव त्याक्षणी नक्कीच त्यांच्या चेहर्‍यावर असावेत.

बरं, कुणाला काही सांगावं तर...हे नेभिं काय प्रकार आहे...हे समजावूनही कुणाला कळेना....मी आपला आंधळ्यासारखा....अहो आंधळाच म्हणा....निव्वळ चाचपडत होतो....बसमधल्या दिव्यांचा प्रकाशही अतिशय क्षीण वाटत होता...शेवटी एकदाची बस...शेवटच्या थांब्यावर जाऊन थांबली..सगळे लोक उतरून गेले...मी फक्त बसून होतो...काय करायचं ह्याचा विचार करत. इतक्यात चालक -वाहक दिवे बंद करून चालते झाले.
काय करावं मला कळेना....मी ओरडून  दिवा लावा ,दिवा लावा असे म्हटले पण ते कुणाच्याही कानी गेले नाही.  मी पुन्हा अंदाजाने आधी स्वत:चे कपडे, टीशर्टाचा वरचा खिसा वगैरे तपासून पाहात होतो...कुठे नेभिं चिकटून राहिलेले सापडतंय का? पण नाही...स्वत:वरच वैतागलो....नेमकी आजच शबनम विसरायची चूक कशी केली आपण? आता परत कसे जाणार निवासाकडे?

जिथे दोन पावलांवरचे मला स्पष्ट दिसत नव्हते तिथे मी घरी कसा पोचणार होतो? रस्त्यावरचे ते भगभगीत दिवे मला एखाद्या पसरट प्रकाशासारखे दिसत होते...समोरून येणार्‍या वाहनांचे प्रखर दिवे मला पार आंधळे करून टाकत होते...मी त्याच बसने परतण्याचा निर्णय घेतला...पण मला जिथे जायचे होते तिकडची ही बस नव्हती....म्हणजे मला आता दुसरी बस पकडणे क्रमप्राप्तच होते....कसाबसा बसमधून खाली उतरलो....कुठे जावे...कसे जावे काहीच कळत नव्हते... आजूबाजूला असणार्‍या व्यक्तींपैकी पूरूष कोण,स्त्री कोण हे ही कळत नव्हते....तरीही मी आसपास असणार्‍या एकदोघांना मला मदत करायची विनंती केली...सुदैवाने एकाने मला हाताला धरून एका बसथांब्याजवळ नेऊन उभे केले आणि इथे येणारी बस...ही माझ्या इच्छितस्थळी पोचवणारी असेल असे सांगितले...

दिल्लीतल्या बसेस कधीच थांब्यावर थांबत नाहीत...त्या एकतर थांब्याच्या बर्‍याच पुढे जाऊन थांबतात अथवा अजिबात न थांबता फक्त थांब्याच्या आसपास कमी वेगाने धावतात...त्यात आपण आपल्याला लोटून द्यायचे असते...पण आता माझ्यासारख्या आंधळ्याला हे कसे जमणार? माझ्या नशिबाने तो बस सुटण्याचा सुरुवातीचा थांबा होता...त्यामुळे मी त्यात व्यवस्थित चढू शकलो...अमूक ठिकाण आलं की मला सांगा असे वाहकाला सांगून त्याच्या जवळच्या जागेवर बसलो.

इतकं सगळं होऊनही मी निवांत नव्हतो...मनात एकच धाकधूक...हा माणूस सांगेल ना आपल्याला,  आपला थांबा आल्यावर....त्यामुळे डोळे फाडफाडून बाहेर पाहात होतो....बाहेर काय दिसणार म्हणा....सगळीकडे एकच चित्र....एखाद्या कॅनव्हासवर नुसतेच रंग ओतल्यावर दिसतं तस आकारहीन...अस्पष्ट असं...
सगळंच सारखं दिसत असल्यामुळे असेल कदाचित...अरे, किती वेळ लागतोय? अजून कसा  नाही आला माझा थांबा...अधीर मन क्षणाक्षणाला अजून अधीर होत होते आणि त्या नादातच कसा बसा हेलपाटत एका थांब्यावर उतरलो.

रात्र फार झाली होती अशातला भाग नाही...पण एकूणच दिल्लीत पादचारी...रस्त्याने चालणारा माणूस अशा अवेळी दिसणं कठीणच. त्यात नुकतीच थंडी सुरु झालेली...त्यामुळेही सगळं कसं चिडीचूप होतं....रस्त्यावरून  धावणारी वाहनंही तुरळक होती पण जी होती ती भरधाव वेगाने धावणारी होती....मला रस्ता ओलांडायचा होता...दूरून येणारे वाहन...नेमके किती दूर आहे तेही कळत नव्हते...कुणाची मदत घ्यावी तर दूरदूरपर्यंत चिटपाखरूही नव्हते...फक्त रस्त्यावरचे प्रखर प्रकाश ओकणारे दिवे तेच काय ते माझ्या साथीला होते...पण तो प्रकाशही असा नुसता...विस्कटलेला,उसवलेला वाटत होता...डोळ्यासमोर कोणतेही रेखीव आकार दिसतच नव्हते...सगळेच असरट-पसरट...अशा अवस्थेत रस्ता ओलांडण्याचा कैक वेळेला केलेला प्रयत्न आयत्या वेळी उगवणार्‍या एखाच्या चुकार भरधाव वाहनाने अयशस्वी होत होता...एकदोन वेळा गाडी अंगावर येता येताही वाचलो...वर चालकाच्या भरपूर शिव्याही खाल्ल्या... हो, नाही..करता करता कसाबसा रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला पोचलो....चाचपडत , खुरड्त, हेलपाटत कसाबसा घराचा शोध घेत होतो...दिल्लीत घरंही एकाच पद्धतीने बांधलेली...एकाच पद्धतीने रंगवलेली....अर्थात हे रंग वगैरेही मला दिसत नव्हते...आणि त्या इमारतीवर अगदी मोठ्या आकड्यात लिहिलेले क्रमांकही दिसत नव्हते...त्यामुळे माझे निवासस्थान शोधणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्याइतके कठीण झाले होते....

त्या इतक्या मोठ्या वसाहतीत कुणीही घराबाहेर दिसत नव्हतं...त्यामुळे विचारायचं तरी कुणाला आणि सांगायचं तरी कुणाला? त्या संपूर्ण वसहतीला माझ्या चारपाच फेर्‍या तरी मारून झाल्या असतील....कुणी मला त्या अवस्थेत पाहिले असेलच तर त्यांना, कुणी तरी चोर ठेहळणी करण्यासाठी आला असावा...असेही वाटू शकले असेल. पण माझा शोध काही संपता संपत नव्हता....एखाद्या दारूड्याप्रमाणे मी हेलपाटत, भेलकांडत घराचा शोध घेत होतो...तुम्हा कुणाला अनुभव आहे की नाही माहित नाही पण माझा असा अनुभव आहे की दृष्टी अधू झाली की आपले चालणेही आपोआप बेताल होते...आपल्या पायांवरही आपलं नियंत्रण राहात नाही.

नटसम्राटमधल्या अप्पासाहेब बेलवलकारांच्याहीपेक्षा जास्त आर्ततेने मी मनातल्या मनात म्हणत होतो...अरे कुणी घर दाखवता का घर...मी जिथे राहतो ते घर.
अशीच घरघर लागलेली असतांना शेवटी मी थकलो...पायातलं त्राणही संपलं होतं....एका इमारती समोरच्या गवतावर बसलो...बसत्याचा आडवा झालो...आणि आकाशातले तारे पाहता पाहता कधी डोळा लागला ते कळलंच नाही.

मला गदगदा हलवून कुणी तरी उठवत होतं...अरे देव, इथे कशाला झोपलास? चल खोलीत चल आणि झोप...असं काहीसं ऐकू येत होतं...हळूहळू मी भानावर आलो आणि पाहिले तो रामदास मला उठवत होता...योगायोगाने मी आमच्याच इमारतीसमोरच्या गवतावर झोपलो होतो. मी झटकन रामदासचा हात धरला आणि त्याच्या बरोबर वर गेलो...सर्वात आधी माझा चष्मा डोळ्याला लावला आणि...हुश्श...माणसात आलो.

मी खोलीवर पोचलो तेव्हा साडेअकरा वाजले होते....नेहमी साधारणपणे ९च्या आसपास घरी पोचणार्‍या मला इतका वेळ का लागला म्हणून सिब आणि रामदास दोघेही चिंतेत पडले होते....पण ते तरी मला कुठे शोधणार होते?  दोघेही आलटून पालटून घरातल्या घरात येरझारा घालत सर्व शक्याशक्यतेचा विचार करत होते...सहजपणाने सिब सज्जात आला आणि त्याने गवतावर कुणी माणूस सदृष्य आकृती पाहिली....रामदासलाही त्याने ती  दाखवली...म्हणून उत्सुकतेपोटी रामदासने खाली येऊन पाहिले तो काय....मीच होतो तो!

आधी दोघांची काळजीपोटी/प्रेमापोटी  बोलणी खाऊन घेतली...मग त्यांना झाला प्रकार सांगितला....त्यावर त्यांच्याकडेही काहीच उत्तर नव्हते....कारण आलेली बिकट परिस्थिती ही अचानक आलेली होती....बरं त्यावेळी दूरधनीचं प्रस्थही इतकं माजलं नव्हतं...की पावलापावलावर दूध्व करण्याची सोय असावी...दुसरी गोष्ट म्हणजे तशी सोय असती तरी मी कुणाला करणार होतो दूध्व? सिबकडे  नव्हता दूध्व...मग ? अशा परिस्थितीत मी तरी वेगळं काय बरं करू शकलो असतो?

२४ एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ५

सिन्हा बर्मनकडे राहायला सुरुवात झाली...जागा आवडली होतीच त्यामुळे लगेच बस्तान बसले. सकाळी सकाळी सिब त्याच्या खास आवडीची बंगाली भजनं ऐकायचा. पंकज मलिक,ज्युतिका रे वगैरेंसारखे जुने गायक असायचे त्यात....बहुदा सिबकडे एकदोनच ध्वनीफिती असाव्यात पण त्यातली गाणी मात्र खूपच छान होती. सुरुवातीला लागणारे एक भजन....बहुतेक पंकज मलिक ह्यांच्या आवाजातले....विलक्षण खर्जातले....अंगावर अगदी काटा यायचा..त्याचे सुरुवातीचे बोल आठवताहेत....

रामनाम घन:श्यामनाम शिवनाम सिमर दिनरात,हरिनाम सिमर दिनरात.....पुढचं काही आठवत नाही कारण ते शब्द माझ्यापर्यंत कधीच पोचले नाहीत...पण हा सुरुवातीचा खर्जातला आवाज आजही माझ्या कानात गुंजतोय...मी काही देवभक्त नाही....म्हणजे आडनावात देवत्व आहे...म्हणजे देव आडनाव आहे...इतकाच माझा देवाशी संबंध...एरवी मी मूर्तीतला अथवा इतर कोणत्याही प्रकारातला देव मानत नाही...त्यामुळे त्या गाण्यातली राम,कृष्ण,शिव,हरि इत्यादी नामांशी मला काही देणे घेणे नाही.....पण ते शब्द,ती चाल आणि तो आवाज ह्यांचा असा काही विलक्षण गोफ गुंफला गेला होता की....सारखं ऐकत राहावंस वाटायचं....ऐकून ऐकून माझं ..ते पालूपद पाठही झालं....मी आंघोळीला जेव्हा जातो तेव्हा माझी संगीतसाधना सुरु असते....असं ऐकलंय की संगीतसाधनेची सुरुवात ही नेहमी खर्जाच्या रियाजाने करावी....मी काही जातिवंत गायक नाही...तरीही आंघोळ करतांना जी गाणी गात असतो....त्यात सर्वप्रथम हे पालूपद आपोआप ओठात येतं....मग सैगलची गाणी...मग भीमसेन...वगैरे वगैरे करत करत वरच्या पट्टीतली गाणी म्हणत असतो...असो.
इथे सांगायचा मुद्दा इतकाच की त्या पालूपदाचा माझ्यावर इतका परिणाम झाला की आजही इतक्या वर्षांनंतरही मी ते गुणगुणत असतो....काही काही गोष्टी मनावर किती खोल प्रभाव टाकतात ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे असे मानता येईल.

स्नान करतांनाच अंगावरचे कपडे धुवायला लागायचे...म्हणजे एरवी नुसत्या स्नानाला मला किमान अर्धा तास लागायचा...त्याऐवजी इथे एक तास लागत असे....त्यामुळे आधी सिब आणि मग रामदास ह्या दोघांच्या आंघोळी उरकल्या की मी मग अगदी आरामात न्हाणीघराचा ताबा घेत असे....आंघोळ,कपडे धुणे आणि संगीतसाधना असा त्रिवेणी कार्यक्रम मग चालायचा....अशा वेळी मी गातो म्हणजे अगदी खुल्या आवाजात गात असतो...त्यामुळे आवाज खर्जापासून तारसप्तकापर्यंत कसाही फिरवून(त्यावेळी खरंच फिरायचा...आता....गेले ते दिवस) गात असे....सुरुवातीला त्या दोघांना ते जरा विचित्र वाटत असे...मग हळूहळू त्यांनाही त्याची सवय झाली...अधेमधे दरवाजा ठोठावून ते दादही देऊन जायचे.  ;)

माझे स्नान होईपर्यंत सिब किवा रामदास चहा-पान करून तयार झालेले असत...त्या काळात मी कॉफीशिवाय काही पीत नसे... त्यामुळे मला कार्यालायात गेल्याशिवाय ती मिळत नसे. दिल्लीत ढाबे भरपूर आहेत...ढाबे म्हणजे आपल्या इथल्या टपर्‍या म्हणा...पण तिथे पेय म्हणून फक्त चहा मिळत असे आणि दुपारच्या वेळी लस्सी...एरवी न्याहारीसाठी छोले-बटुरे,छोले-कुलचे वगैरे खास पंजाबी पदार्थ असत....कधीमधी परोठे देखिल असत..मग ते आलू(बटाटा),मुली(मूळा),गाजर,कोबी,पालक,मेथी वगैरेपैकी कोणत्याही एका प्रकारचे असत...त्याबरोबर दही देखिल मिळायचे...मला सकाळी कडकडून भूक लागलेली असे ...मग मी आपला मोर्चा अशा एखाद्या ढाब्याकडे वळवत असे.....तिथे दही-परोठ्याची न्याहारी करून मगच कार्यालयाकडे प्रस्थान ठेवत असे...दिल्लीचे हवामान खाण्या-पिण्यासाठी मानवणारे होते त्यामुळे मी सहजपणाने ५-६ परोठे स्वाहा करत असे.

सिब आणि रामदास मुख्यालयात काम करायला जायचे तर मी संसदभवन मार्गावरच्या कार्यालयात जात असे. त्यामुळे आमचे मार्ग आणि दिशाही भिन्न होत्या. तिथून मला कार्यालयात पोचायला बसने साधारणपणे ३५ मिनिटे लागायची. वेळेवर जायचे तसे फारसे बंधन माझ्यावर नव्हतेच तरीही मी सर्वांच्या आधीच साधारणपणे नऊ-सव्वा नऊ वाजेपर्यंत कार्यालयात पोचत असे.

कार्यालयात गेल्यावर मस्तपैकी गरमागरम कॉफीची मजा लूटत ,मित्रांशी गप्पा मारत दिवस सुरु व्हायचा.
हे सगळं जरी व्यवस्थित सुरु होतं तरी मनात कुठे तरी...पुन्हा केव्हा एकदा मुंबईला परत जातो असं वाटत राहायचं.....दुपारच्या जेवणाची व्यवस्था....माझे मित्र आपणहून करायचे...प्रत्येकजण काहीतरी जास्त पदार्थ आणून मला आग्रहाने आणि प्रेमाने खायला लावायचा....सुरुवातीचे काही दिवस मी त्यांच्या आदरातिथ्याला नाही म्हटले नाही....पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मला ते सगळं प्रकरण पचवणं कठीण व्हायला लागले. असं फुकट कुणाचे, का आणि किती दिवस खायचे? म्हणून मी त्यांना कधी समजावून, तर कधी  परस्पर बाहेरच जेवायला जाऊ लागलो...ऊस कितीही गोड असला तरी तो मूळापासून खाऊ नये असे म्हणतात...... मी त्यांना न दुखावताही त्यातून अलगद बाहेर पडलो.

आमच्या कार्यालयाच्या सभोवताली सगळी सरकारी कार्यालयच होती. डाव्या बाजूला युएनआय(युनायटेड न्युज ऑफ इंडिया) चे ऑफीस(ह्यांचे उपहारगृह इतके जबरदस्त होते की काही विचारू नका...सकाळी तर शिरा,उपमा,इडली,वडा वगैरे पदार्थ असे झकास मिळायचे की आजही ती चव विसरलेलो नाही), विठठभाई पटेल भवन, जीपीओ, संसद भवन, आकाशवाणी,दूरदर्शन वगैरेसारखी महत्वाची कार्यालयं होती...तर उजव्या बाजुला..संसदभवन पोलिस स्टेशन,स्टेट बॅंक ऑफ इंडिया,जंतर मंतर,कॅनॉट प्लेस,नेहरू पार्क वगैरेसारखी सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणं होती.
ह्या संसदभवन पोलिस स्टेशनच्या मागेच एक छोटेखानी कोर्ट होते आणि त्याच्यालगत बर्‍याच वकिलांच्या टपर्‍या होत्या...ह्या सर्वांसाठी तिथे  एक छोटेसे उपहारगृहदेखिल होते...जिथे सकाळी चहा-न्याहारी.,दुपारी जेवण वगैरे मिळत असे. एकवेळ मी तिथे अपघातानेच पोचलो आणि तिकडची दालफ्राय खाऊन इतका खुश झालो की ...मग ठरवून टाकले की रोज दुपारी तिथेच जेवायला जायचे.

एकदोनवेळा तिथे गेलो आणि मी तिकडचाच झालो....गंमत अशी की तिथे काम करणार्‍या त्या बिहारी मुलाशी मी गप्पा मारायचो...तो दालफ्राय कसा बनवतो ते विचारायचो...तो ती बनवत असतांना तिथे उभा राहायचो...त्यामुळे एकदोन दिवसातच तो मला छानपैकी ओळखायला लागला....मी तिथे गेल्यावर माझी खास खातिरदारी करायला लागला...पुढे गप्पांच्या ओघात कळले की तो माझ्याशी इतका जवळीक का साधतो आहे ते....त्याचं असं झालं...बोलता बोलता त्याने मला प्रश्न केला..

बाबुजी,आप यहांपर नये दिखते हो.

जी,वैसे देखा तो मैं यहां नया हूँ. लेकिन तुमने कैसे पहचाना.

 आपका डिरेस...वो यहांके लोगोंसे बहुत ही अलग है.......

खरंच माझा पोशाख वेगळाच होता तिथल्या सगळ्यांच्यात. पॅंट,चट्ट्यापट्याचा अर्ध्या हातांचा टीशर्ट, केस विस्कटलेले,छोटेखानी मिशी, हनुवटीखाली राखलेली दाढी, गळ्यात शबनम पिशवी आणि पायात कोल्हापुरी चपला...अशा अवतारातला मी आणि दिल्लीतले सगळे कसे?  पॅंटमध्ये खोचलेले लांब हातांचे शर्ट, पायात बूट, आणि दिसण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचा मग्रूरपणा,रुबाब वगैरे

कहांके हो आप?

मुंबईका हूँ मैं .

बंबईसे?....आणि त्याचा वासलेला ’आ’ बराच वेळ तसाच होता...
.त्या दिवसानंतर मग तो माझ्या तिथे जाण्याची वाट बघत बसायचा...मी तिथे गेल्यावर एका खास टेबलावर...टेबलं कसली म्हणा...चारदोन फळकूटं जोडून केलेले टेबलासारखे काहीतरी....व्यवस्था करायचा. मला पाणी पिण्यासाठी एक खास पेला आणि जग...दोन्ही.. अगदी माझ्यासमोर घासून, आणून ठेवायचा...मग दालफ्राय,दही आणि गरमागरम फुलके...मुलगा तसा दिसायला काळा रप्प होता..चेहराही फारसा आकर्षक नव्हता...उंची अगदीच बेताची...पण दात एकदम मोत्यासारखे चमकणारे...माझ्या पानातला फुलका संपतो न संपतो दुसरा गरम फुलका हजर असायचा...कोणत्या जन्मीचे संबंध होते माहित नाही....पण तो मुलगा माझी इतकी काही बडदास्त ठेवत होता की साहजिकच त्याच्या मालकाच्या आणि इतर नेहमीच्या गिर्‍हाईकांच्या डोळ्यातही ते भरले....मालकाने एकदा त्याला विचारलेही...मग त्याने काय सांगितले माहित नाही पण त्यादिवसापासून मालकही माझ्या दिमतीला हजर असायचा...खरं सांगायचं तर इतक्या अगत्याची,कौतुकाची मला सवय नव्हती...मी त्या मालकाला तसे सांगूनही पाहिले पण त्याने त्याचा परिपाठ सुरुच ठेवला.

माझ्या सकाळच्या जेवणाची अशी सोय झाली...आणि संध्याकाळी मी ,रामदास आणि सिब मिळून पोळी-भाजी,भात,आमटी वगैरे बनवून खायला लागलो. मी कणीक भिजवून द्यायचो...रामदास मस्तपैकी पोळ्या करायचा...सिब वरणभाताचा कुकर चढवायचा आणि मग मी आमटी आणि भाजी बनवायचो..कधी कधी त्यांच्यापैकी कुणी तरी हे काम करायचे....भांडी घासायचे काम मी आणि रामदास दोघे मिळून करायचो. शनिवार रविवार मात्र मी संपूर्णपणे बाहेर फिरायचो,खायचो...कारण....सिब आणि रामदास दोघेही त्या दिवशी मासे वगैरे बनवून खात असत. ह्या काळात मी बसमधून दिल्लीदर्शन करत हिंडायचो. प्रगती मैदान,त्यावरील कैक प्रदर्शनं,अप्पूघर,बहाई मंदिर,कॅनॉट प्लेस... वगैरे ठिकाणी मी मुक्तपणे फिरायचो.

कॅनॉट सर्कलमधील नेहरू बागेत तिथल्या हिरवळीवर लोळायला मजा यायची. तिथेच संध्याकाळी जुन्या हिंदी सिनेमातली गाणी लावली जायची...संपूर्ण बागेत ठिकठिकाणी स्पीकर्स लावलेले असत...त्यातून मंदपणे ऐकू येणारी गाणी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जायची...ह्याच हिरवळीवर काही बुद्धिबळ खेळणारे महाभागही मला सापडले. मी त्यांच्या बाजूला जाऊन शांतपणे त्यांचा खेळ बघत बसायचो...एकदोन दिवसात त्यांच्याशीही दोस्ती झाली आणि मीही त्यांच्याशी दोन हात करायला लागलो....पाहता पाहता त्यांच्यातल्या पट्टीच्या खेळाडूलाही मी हरवले आणि मग माझा रुबाब वाढला....माझ्याबरोबर बसून मग ते आपापल्या खेळाचे विश्लेषण करायला लागले...ह्या लोकांनीही माझे दिल्लीतले वास्तव्य काही प्रमाणात सुखकर केले.

२० एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ४

एक महिन्याची रजा घेऊन मुंबईत आलो. बायको खुश झाली.मीही खुश होतोच..खरं तर तिला सोडून मला जाववत नव्हतं...कारण एकतर नवीनच लग्न झालेलं आणि त्यानंतर ती गर्भवती झालेली होती. अशा वेळी एकमेकांच्या जवळ असावं असं कुणालाही वाटावं तसंच आम्हा दोघांनाही वाटत होतं..पण नाईलाजाने जावं लागलं होतं. तिची शाळेतली नोकरी सुरु होती म्हणून तिला माझ्या बरोबरही नेता येत नव्हतं. पण आता पुन्हा महिनाभर तरी आम्ही दोघे एकत्र होतो.

सुट्टी संपत आली तरी मला पुन्हा दिल्लीला जावेसे वाटत नव्हते म्हणून अजून १५दिवस सुट्टी वाढवली. तेही दिवस हा हा म्हणता कापरासारखे उडून गेले. काय गंमत आहे पाहा...मी जेमतेम १५ दिवसच दिल्लीत राहिलो होतो पण एकेक दिवस मला युगायुगांचा वाटायचा आणि इथे....दीड महिना होऊन गेला तरी मला सुट्टीवर येऊन एखादा दिवसच झाल्यासारखे वाटत होते. तरीही शेवटी नाईलाजाने का होईना....पुन्हा लवकर येतो असे सांगून दिल्लीला जाण्याची तयारी केली.

दिल्लीला जायचे तर रेल्वेचे आरक्षण हवे...अहो,पण असे आयत्या वेळी कसे मिळणार? मग काय,गेलो आमच्या मुंबईच्या कार्यालयात....उभा राहिलो धारवाडकर साहेबासमोर...वरकरणी त्यांनी हसून स्वागत केले...विचारते झाले....काय मग.काय म्हणतेय दिल्ली? जम बसला की नाही तिथे? आणि आज इथे का येणं केलंत?
मी म्हटलं...सर,सुट्टीवर आलो होतो...पुन्हा जायचंय ...पण तिकीट मिळत नाहीये...सरकारी कोट्यातून मिळेल काय ते पाहायला आलोय...आपण तसं पत्र दिलंत तर काम होईल माझे.
हसत हसत साहेबांनी त्यांच्या सचिवाला बोलावून घेतले आणि रेल्वे प्रशासनाला पाठवण्यासाठी एक पत्र उद्घृत केले. पाचच मिनिटात सचिवाने ते टंकित करून साहेबाच्या सही/शिक्क्यासहित मला दिले.
निघतांना साहेब म्हणाले...देव,तिकिटाची चिंता करू नका...जरूर पडेल तेव्हा या...मी पत्र देईन तुम्हाला...आणि साहेब छद्मीपणाने हसले.

त्यानंतर तिकिटाची व्यवस्था सहजपणाने झाली आणि मी दिल्लीला रवाना झालो. गेल्यावर नायरसाहेबांना भेटलो. त्यांनीही घरची हालहवाल विचारली आणि म्हटलं...देव, , दिल्लीत आल्यापासून तू तूझा पगार घेतलेला नाहीस....आत्ताच्या आत्ता मुख्यालयात जाऊन घेऊन ये....तो कारकून केव्हापासून तुझी वाट पाहतोय.
तिथून बाहेर पडलो तो थेट मुख्यालयात गेलो...आर्थिक विभाग शोधायला...त्यातल्या त्यात तो कारकून शोधायला थोडा वेळ लागला. शेवटी एकदाचा मी त्याच्यासमोर उभा राहिलो.....

मै, पी.एस.देव...मुंबईसे ट्रान्स्फरपे आया हूँ....क्या मुझे मेरा पगार मिलेगा?
माझ्याकडे आपादमस्तक न्याहाळत तो म्हणाला....अच्छा, तो तुमही हैं वो....जिसने धारवाडकरसाहबसे पंगा लिया....बहूत सुना था तुम्हारे  बारेमें...आज दर्शन करनेका सौभाग्य मिला...

मी म्हटलं...इससे तुम्हारा क्या लेना देना...ये तो मेरी मर्जी हैं....मैं किससे कैसा बर्ताव करू....तुम  तुम्हारा काम करो.

माझ्या ह्या सरळ हल्ल्यामुळे तो बाबू वरमला...म्हणाला....अरे भई, तुम तो शेर निकले...जैसे मैंने सुना था तुम्हारे बारेमें...धारवाडकरसे पंगा कोई आम आदमी नही ले सकता....लेकिन क्या एक बात मैं पुछ सकता हूँ...तुम्हें डर नही लगता उसका...वो तो बहुतही बदनाम आदमी हैं....यहां दिल्लीमें था, इसीलिये मैं उसके बारेमें बहुत कुछ जानता हूँ...कई लोगोंको तकलीफ दी हैं उसने...

डर काहेका? वो भी तुम्हारे मेरे जैसा आदमी हैं....हां,अभी अधिकारी होनेके नाते कुछ अधिकार जादा हैं उसके पास...तो करता हैं मनमानी....लेकिन मैं ऐसे लोगोंसे नही डरता...मनही मनमें वो कायर होते हैं...

देखो भई, तुम्हारी फाईल मेरे पास पडी हैं...मैने तुम्हारा पूरा इतिहास पढा है...फडकेसाहब जैसे सबसे बडे साबने भी तुम्हारे बारेमें सबकुछ अच्छा ही लिख्खा हैं...फिरभी तुमको  मुंबई छोडके दिल्ली आना पडा....हुवा ना तुम्हारा नुकसान... क्या फायदा हुवा लडाई-झगडा करनेका?

देखिये,जो हुवा वो हुवा...तब उसकी बारी थी...कल मेरी बारी होगी...मैं भी उसको जिंदगीभर याद रहेगी ऐसी सबक सिखाऊंगा......बाकी बाते छोडो...मेरा पगार लेने आया हूँ, वो दिजिये.

माझा एकूण आवेश पाहून त्याने गप्प बसणेच पसंत केले...त्यानंतर झटपट माझा पगारही दिला....वर एक प्रश्नही विचारला....आपको पैसेकी कोई पडी नही हैं...कबसे आपका पगार यहाँपर पडा था...और एक बात...आपने आपका ट्रान्सफर बील अभीतक नही भरा. जल्दी किजिये,नही तो कुछ नही मिलेगा आपको....तुम वरून तो आपोआप...’आप’ वर आलेला होता हे माझ्या लक्षात आले...

मग मीही माझा पवित्रा बदलला...देखिये,मैं पहिली बार ट्रान्स्फरपे आया हूँ....इसीलिये मुझे कुछ भी मालूम नही हैं...क्या आप मुझे गाईड करेंगे?

माझ्यातला बदल त्यालाही सुखावून गेला. मग त्याने ते बील कसे भरायचे वगैरे माहिती मला दिली. मुंबईहून दिल्लीला सामान(घरगुती) वाहून आणल्याची एखाद्या वाहतुक कंपनीची पावती जोडली तर कसे जास्त पैसे मिळतील वगैरे माहितीही दिली...  मी म्हटलं....मैंने तो कुछ भी सामान लाया नही था..ना लानेवाला हूँ...तो कहांसे पावती लाऊं.....सरकारी आदेशसे वैध तरीकेसे और बिना पावतीके जो भी मिल सकता हैं...उतनाही मुझे चाहिये..किसी भी तरहका दो नंबरका पैसा मुझे नही चाहिये.

दोन क्षण तो माझ्याकडे पाहातच राहिला....कैसे हो आप...रिसीट नही हैं तो कहींसे भी पैदा की जा सकती हैं....उसमें बुरा क्या हैं...सब लोक ऐसेही करते हैं...आप कोशिस किजिये...आपको फायदा होगा.

देखिये भाईसाब,मैं हरामका पैसा नही लेना चाहता हूँ....ना आप मुझे उसके बारेमें  बताओ...मैं झुटी रिसीट नही ला सकता.

मैं कर सकता हूँ आपके लिये अ‍ॅरेंज....रिसीटके उपर जितना लिख्खा होगा उसका १५% आपको देना पडेगा...बस्स. मैंने कई लोगोंके लिये ये काम किया हैं...आप चाहे तो.....

धन्यवाद श्रीमानजी....लेकिन मुझे उसमें बिल्कूल दिलचस्पी नही हैं....मामला खतम‌....सीधे तरीकेसे जो मिलता हैं....उतना ही मुझे बस्स हैं.

खैर,मर्जी आपकी....मैं यहाँपर गये दस सालसे काम कर रहा हूँ...आप जैसा निराला आदमी मैंने आजतक देखा नही हैं...आपही पहेले हो.... आप हर बारेमें अलग ही हो...कोई बात नहीं....आप अभी अभी यह फार्म भरके दिजिये...बाकीकी कार्रवाई करके मैं एक हप्तेके अंदर आपका पैसा दे देता हूँ.....कोई मदद की जरूरत हो तो कभीभी आईये...बंदा हाजिर हैं आपकी सेवामें....

मी त्याचे आभार मानले आणि पुन्हा माझ्या कार्यालयात परतलो.

तिथे पोहोचल्या पोहोचल्या मला तिथल्या सेक्शन ऑफिसरने बोलावून घेतले.....
आपने तनख्वाँह ली?

जी,अभी ले आया हूँ.

आपने आपका ट्रान्सफर बील भरा?

हां जी,अभी ही भरके आया हूँ. उधरही उस बाबूके पास दिया.

अरे भाई,ऐसा नही करते...सब चीज थ्रू प्रापर चेनलसे जानी पडती है...उसके साथ लगाई गये रसीद वगैरेकी जांच करांके फिर हम उसको उधर भेजते है.

नही जी....उसके साथ कोई रसीद नही हैं....जो रसीदके सिवाँ मिलता हैं उतना ही था इसीलिये उधरही दिया....उस बाबूनेही बोला....यहां डायरेक्ट देनेसे चलेगा.

अच्छा,ये बताओ,मुंबईस दिल्ली आये हो...तो सामान यहां लानेकी ट्रान्सपोर्ट कंपनीकी रसीद तो होगी ना?

नही,जी मैंने कोई सामान नही लाया.

वह बाबू कर रहा था ना एडजस्टमेंट...तो क्युं ना बोला आपने?

अच्छा...म्हणजे ती बातमी इथपर्यंत लगेच पोचवली होती त्या बाबूने... कमाल आहे...मला पैसे नकोत म्हटलं तर ह्या दिल्लीवाल्यांना इतकं आश्चर्य वाटावे....हे पाहून मलाही आश्चर्य वाटले.  ;)

त्यावर त्या सेक्शन ऑफिसरनेही माझे बौद्धिक घ्यायचा प्रयत्न केला पण मी त्याला नम्रपणाने नकार दिला...आणि त्याने माझ्यापुढे अक्षरश: हात जोडले.  :)

आपके जैसा नमुना मैं आज पहली बार देख रहा हूँ.

१५ एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ३

फडके साहेबांना भेटून पुन्हा कार्यालयात परत आलो तर नायर साहेब माझी वाट पाहात थांबलेत असा निरोप मिळाला. मी तडक त्यांच्या खोलीत गेलो...नायर साहेब कामात व्यग्र होते पण त्यांनी लगेच आपले काम बंद करून मला बसायची आज्ञा करून शिपायाला कॉफी पाठवायला सांगितली.

फडके साहेब काय काय म्हणाले ते मी नायर साहेबांना सविस्तर सांगितले. त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले. मध्यंतरी कॉफी देखिल आली. तिचे घोट घेता घेता नायरसाहेबांनी मला प्रश्न केला....मग,तुझा काय निर्णय आहे?
(माझे आणि नायरसाहेबांचे बोलणे हिंदी/इंग्रजीतून झालेले असले तरी इथे मी ते मराठीतच मांडत आहे.)

मी म्हटलं...सर,माझा एक कलमी कार्यक्रम आहे...मला मुंबईला जायचंय परत,लगेच,लवकरात लवकर.

अरे,पण आता बदली झालीच आहे आणि एकावेळी दोन बढत्या मिळताहेत तर  घेऊन टाक...तसेही तीन वर्षांनी पुन्हा मुंबईला जाशीलच...मग बढत्यांमुळे निदान तुझे थोडेफार आर्थिक नुकसान तर भरून येईल की.

सर,मी आजवर पैशाला कधीच प्राधान्य दिलेले नाही...हे आपण जाणता. माझी बदली आकसाने झालेय...हेही जाणता...अशा परिस्थितीत केवळ समजूत पटावी म्हणून मला बढत्या देऊन कायमचे मुंबईपासून तोडण्याचा हा कुटिल डाव आहे असे माझे प्रांजळ मत आहे.

ते कसे काय? माझ्या काही लक्षात येत नाहीये...जरा उलगडून सांग.

सर, आपल्या आस्थापनेत बढतीबरोबर बदली ही अपरिहार्य आहे...ती कुणालाही चुकत नाही...हे तुम्हाला माहित आहेच.....माझी कधीही बदली होऊ नये म्हणून...मला ह्यापुढे कधीही बढती नको ... मी तसे लिहून दिले...आस्थापनाने ते लेखी स्वरूपात मान्य केले आहे. त्यानंतर मी कधीही मला बढती का देत नाही, माझ्यापेक्षा कनिष्ठांना का दिलीत असे विचारलेलेही नाही...मी माझ्या एका जागीच स्थिर राहण्यामुळे संतुष्ट आहे...अशा परिस्थितीत माझी बदली केली ती सर्वस्वी चूक आहे आणि ती बदली कायम राहावी...इतकेच नव्हे तर ह्यापुढेही सतत बदली होत राहावी म्हणून हे बढतीचे गाजर आहे असा मला पूर्ण संशय आहे.... मला बढतीचं कधीच आकर्षणं नव्हतं आणि नाही.

हं. हा मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे. तरीही एक गोष्ट पक्की आहे की एकदा फडकेसाहेब म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत ते तुला लगेच मुंबईला परत पाठवू शकत नाहीत...ह्याचा अर्थ तुला निदान तीन वर्ष तरी इथे काढावीच लागतील...धारवाडकरसाहेबाला निवृत्त व्हायला अजून चार वर्ष तरी आहेत...तेव्हा कदाचित तुला अजून एक वर्ष इथेच किंवा अन्यत्रही काढावे लागेल...अशा परिस्थितीत मला वाटतंय की तू बढती स्वीकारावीस...एवीतेवी तुझी बदली झालीच आहे,नुकसान तर झालंच आहे... तर मग आता बढती घेऊन टाक...निदान आर्थिक फायदा तरी होऊ दे.

सर, आता दुसरा कोणताही मार्ग नाही का? काय करावे तेच सुचत नाहीये...माझी चूक नसतांना,माझी आत्तापर्यंतची उत्तम वागणूक,कामातली तत्परता,प्रावीण्य वगैरे सगळे गुण एका क्षणात मातीमोल झाले?

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही मि. देव....पण आपण ह्यातूनही काढू काहीतरी मार्ग...मला तरी वाटतंय की सर्वप्रथम तू बढती स्वीकारावीस.

सर, आता ह्या घटकेला बढती स्वीकारून काय फायदा...माझ्या आयुष्यातील दहा वर्ष मी फुकट घालवलेत त्यासाठी...दहा वर्षांपूर्वी मला पहिली बढती देण्यात आली होती...जी मी नाकारली....मला सांगा...मी जर बढती स्वीकारण्याचं खरंच ठरवलं तर मला दहा वर्षांपूर्वीच्या त्या तारखेपासून आर्थिक लाभ मिळेल काय? तसे असेल तर एक वेळ विचार करता येईल...खरं तर मला त्यातही रस नाहीये कारण मला मुंबईला लवकरात लवकर परत जायचंय...पण ते अशक्य असेल तर मग हा पर्याय स्वीकारण्यावाचून गत्यंत्तर नाही.

ओके...तू जर तयार असशील तर मी पर्सनली फडकेसाहेबांना कन्व्हीन्स करायचा प्रयत्न करतो ज्यामुळे तुला मागील सगळी थकबाकी मिळू शकेल... एनीवे, तू आता शांत राहा. कामात मन रमव,बाकीचं माझ्यावर सोपव. तुला हवी तेव्हा,हवी तितकी सुट्टी घेऊ शकतोस...पण लक्षात ठेव...मन शांत ठेव...सद्द्या वाईट दिवस आहेत...अशा अवस्थेत राहाणं जरी त्रासदायक असलं तरी आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत हे लक्षात ठेव...तू इथे माझ्याबरोबर असतांना तुला कसलीही तोशीस पडणार नाही ह्याची मी खात्री देतो...बट बी पॉजिटिव्ह.

नायर साहेब माझी समजूत घालत होते...खरं तर माझी परत जाण्याची मूळ मागणी पूर्ण करता येत नसल्यामुळे तेच अस्वस्थ होते...पण वरवर मला धीर देत होते...हे मला माहित होते....अहो,कसे म्हणून काय विचारता? मुंबईत ते माझ्या बरोबर पाच वर्ष होते आणि मी ज्या खात्यात काम करायचो त्या खात्याचे ते साहेब होते....माझ्या कामातल्या तत्परतेमुळे,प्रावीण्यामुळे त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून कधीही उणा शब्द ऐकून घ्यावा लागलेला नव्हता...अगदी डोळे मिटून ते माझ्यावर विसंबून असायचे आणि मीही त्यांचा कधी अपेक्षाभंग होऊ दिला नाही. मुंबईत असतांना मी त्यांचा तो कार्यकाल कमालीचा यशस्वी केलेला होता...आणि आता आज त्यांची पाळी होती...मला मदत करण्याची...परतफेड करण्याची....पण दूर्दैवाने ते त्यांच्या अधिकार कक्षेबाहेरचे काम होते...त्यामुळेच ते मनातल्या मनात अस्वस्थ होते.

नायर साहेबांनी जबाबदारी स्वीकारली म्हटल्यावर ते ती काहीही करून यशस्वी करतीलच ह्याची मला खात्री होती त्यामुळे थोडासा आश्वस्त झालो. माझा प्रस्ताव नायरसाहेबांनी फडके साहेबांच्या कानावर घातला. फडकेसाहेबांनी नायरसाहेबांना तो प्रस्ताव लेखी स्वरूपात पाठवायला सांगितला..तसा लेखी प्रस्ताव नासांनी  अतिशय काळजीपूर्वक तयार केला....मला वाचून दाखवला आणि मग फसांकडे तो पाठवून दिला.

आता ह्या प्रस्तावाला उत्तर यायला निदान आठ-पंधरा दिवस तरी लागणार होते. मध्यंतरी मी आणि रामदास  सिन्हा-बर्मन साहेबाकडे  राहायला गेलो. त्याचा फ्लॅट चांगला ऐसपैस होता. आम्हा दोघांना मिळालेली खोली १२*१२ ची अगदी प्रशस्त अशी होती. दोन मोठ्या खिडक्याही होत्या...वारा आणि प्रकाश भरपूर होता. पण खोली पार रिकामी होती. कपाट,पलंग,टेबल,खुर्ची वगैरेंपैकी एकही वस्तू त्यात नव्हती. आम्ही खोली एकदा झाडून घेतली आणि आपापल्या पथार्‍या पसरल्या.  समोरासमोर असणार्‍या दोन खिडक्यांच्या गजांना दोर्‍या बांधून कपडे वाळत घालण्याची सोय केली. मी आणि रामदास...दोघेही तसे मधमवर्गातून आलेलो असल्यामुळे अशा गोष्टींची आम्हाला  सवय होतीच...त्यामुळे तशी फारशी अडचण आली नाही.

फसा हे तांत्रिक विभागाचे सर्वोच्च साहेब होते...त्यांना त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या कोणत्याही माझ्यासारख्याच तांत्रिक कर्मचार्‍यांची बदली/बढतीची शिफारस करण्याचे पूर्ण अधिकार होते....पण आमच्याकडे दुसरा एक विभाग होता...प्रशासन विभाग....त्यांच्या हातात आर्थिक आणि प्रशासनिक अधिकार होते. आता इथे असणारे साहेब लोक अशा शिफारसींची अंमलबजावणी करतांना त्यांचे काही निकष लावून करत. इथल्या साहेब लोकांचे म्हणणे पडले की काही विशिष्ट परिस्थितीत आणि फसांच्या अधिकारात जरी अशी बढती देता येऊ शकत असली तरी...त्या अनुषंगाने मागणी करण्यात आलेली थकबाकी  देण्यात मात्र अनंत अडचणी आहेत...त्यासाठी आर्थिक विभागाची परवानगी घ्यावी लागेल...जी मिळणे सर्वथा अशक्य आहे...एवंम...फक्त बढती...अपवादात्मक बाब म्हणून एकदम दोन बढत्या देण्यास कोणतीही अडचण नाही...तेव्हा ती देण्यास पूर्ण अनुमती आहे...तेव्हा त्यासंबंधाने योग्य त्या बदलांसहित प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पुन्हा पाठवण्यात यावा...

हे असे उत्तर येणार हे मला खरे तर अपेक्षितच होते...त्यामुळे मला त्याचे विशेष काही वाटले नाही...बढती घेण्याचा आता प्रश्नच नव्हता... पुन्हा मुंबईला कसे जायचे ह्याचाच विचार सुरु झाला. इतक्यातच काही चमत्कार घडण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे मी सुट्टी घेण्याचा विचार केला...त्याप्रमाणे नासांना म्हटले...रितसर महिनाभार सुटीचा अर्ज दिला... त्यांनी लगेच रुकार दिला ...आणि मी लगेच मुंबईसाठी प्रस्थान ठेवले.

म्हणतात ना..अशुभस्य कालहरणम्‌!

१० एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ३

सकाळी जाग आली तेव्हा एकदम प्रसन्न वातावरण होतं. बाहेर बर्‍यापैकी गारवा होता. पक्ष्यांची किलबिल जाणवत होती. मुखमार्जनादि आन्हिकं उरकली. रामदासने चहा केला होता. माझ्या समोर गरमागरम चहा आणि बिस्किटे ठेवून तोही गप्पा मारायला बसला. खरंतर त्या काळात मी फक्त कॉफीच पीत असे...पण रामदासने इतक्या प्रेमाने दिलेला चहा मला नाकारता आला नाही आणि मी तो कसाबसा पिऊन टाकला.

गप्पांच्या ओघात कळले की चारपाच दिवसातच रामदास ही जागा सोडून नवी दिल्लीतच....कार्यालयाच्या जवळपास जागा घेण्याच्या विचारात आहे. ह्याचा अर्थ सरळ होता की मलाही तेवढाच अवधी होता...माझ्यासाठी जागा शोधण्याचा...अर्थात आमच्यात एका बाबतीत एकमत होते की शक्य तो आपणे दोघे मिळून राहू शकू अशीच जागा शोधूया.

त्यानंतर स्नानादि इतर आन्हिके उरकून आम्ही दोघे कार्यालयाकड कूच केले. दिल्लीत आमची बरीच कार्यालये आहेत...रामदासला मुख्यालयात जायचे होते तर मला संसद भवनाजवळील कार्यालयात जायचे होते...त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या बस धरून आपापल्या कार्यालयात पोचलो.

कार्यालयात पोहोचताच मला शिपायाने सांगितले की मला साहेबाने बोलावलंय...मी तसाच साहेबांसमोर हजर झालो. हे साहेब...नायर साहेब मुंबईपासूनचे माझ्या ओळखीचे होते...निव्वळ ओळखीचेच नाही तर माझ्याबद्दल त्यांना आत्मीयताही होती. मी येईपर्यंत ते कॉफी घ्यायचे थांबले होते. त्यानंतर त्यांनी आम्हा दोघांसाठी कॉफी मागवली. दरम्यान त्यांनी माझ्या सोयी-गैरसोयीबद्दल विचारून घेतले. मी माझे आणि रामदासचे जागेबद्दलचे बोलणे त्यांना सांगितले...त्यावर त्यांनी मला...घाबरू नको...आजच तुला जागा मिळवून देतो...म्हणून आश्वस्त केले.

त्यानंतर तासाभरानेच मला पुन्हा नायरसाहेबांनी बोलावून घेतलं... नायर साहेबांच्या बरोबरचाच एक दुसरा साहेब...सिन्हा-बर्मन नावाचा...जो दिल्लीतल्या रामकृष्णपुरम(आरके पुरम) नावाच्या सरकारी वसाहतीत राहात होता...तो आम्हा दोघांना त्याच्या घरात एक खोली द्यायला तयार झालाय...असं सांगितलं. त्यानंतर काही वेळाने चश्मा लावलेला, सडसडीत बांध्याचा,साधारण पावणेसहा फूट उंचीचा एक सदगृहस्थ नायरसाहेबांच्या खोलीत प्रवेशकर्ता झाला...हाच तो सिन्हा-बर्मन. मग माझी आणि त्याची रीतसर ओळख करून देण्यात आली. भाडे ठरले आणि दोनतीन दिवसांनी राहायला येतो असे सांगून त्याचा निरोप घेतला.
लगेच रामदासला दूरध्वनीवरून कळवले...तोही खुश झाला.

इथे दिल्लीत मी जास्त दिवस राहणार नाहीये...असे मनात धरूनच माझे सगळे पुढचे बेत सुरु होते...त्यामुळे ह्या सिन्हा-बर्मनकडे मी काही जास्त दिवस राहणार नव्हतोच...
मी नायर साहेबांना भेटून त्यांच्याशी सल्ला-मसलत केली. मला परत मुंबईला लवकरात लवकर परत जाता यावे म्हणून लागेल ती मदत त्यांनी द्यायचे मान्य केले.बदलीच्या सर्वसाधारण नियमाप्रमाणे खरे तर मला निदान तीन वर्ष इथून हलता येणार नव्हते...पण काहीही करून मला इथून बाहेर पडायचे होते...तेव्हा नायर साहेबांची मदत निश्चितच उपयुक्त ठरणार होती. मग त्यांचीच परवानगी घेऊन मी आमच्या सर्वोच्च साहेबांना भेटण्याचा दिवस ठरवला.

ठरल्याप्रमाणे मी मुख्यालयात गेलो. तिथे साहेबांच्या शिपायामार्फत... मी आलोय...हे साहेबांना कळवायला सांगितलं... तो निरोप देऊन आला आणि मला निदान अर्धा तास तरी वाट पाहावी लागेल असे सांगून बाजूच्याच प्रतिक्षागृहात बसायची विनंती केली. मी आत खोलीत जाऊन बसलो...मनात विचारचक्र सुरु झाले...साहेब कसे वागतील आपल्याशी...रागावतील की सहानुभूती दाखवतील...मदत करतील की फटकारतील?
अशा विचारात गढलो असतानाच....साहेबांनी बोलावलंय...असा निरोप घेऊन शिपाई आला.

सर, मी आत  येऊ का... ह्या माझ्या प्रश्नाला...त्यांनी हसत हसत...या...म्हटलं आणि जीव भांड्यात पडला.चला,म्हणजे साहेब चांगल्या मूडमध्ये आहेत तर.
सर मी....मला पुढे बोलू न देताच सरांनी मला हातानेच खुर्चीकडे बोट दाखवून म्हटले...बसा. मी तुम्हाला पूर्णपणे ओळखतो. ही पाहा तुमची वैयक्तिक माहिती माझ्या पुढ्यातच आहे...आणि का आलात तेही माहीत आहे....साहेब अस्खलीत मराठीत बोलत होते....अहो पुण्याचेच होते फडकेसाहेब...त्यामुळे त्यांच्या मराठीचं आश्चर्य नाही वाटलं....आश्चर्य ह्याचं वाटलं की दिल्लीत राहूनही त्यांची मराठीशी नाळ तुटलेली नव्हती आणि माझ्यासारख्या त्यांच्या भाषाबंधूशी ते आवर्जून मराठीतच बोलत होते.
दिल्लीत मी आलो तेव्हा मला भेटलेल्या मराठी माणसांतील काही मोजकी माणसे सोडली तर बहुतेकजण हिंदी/इंग्रजीतच संवाद साधायचा प्रयत्न करायची...मी मराठी आहे,तुम्हीही मराठी आहात...तेव्हा मराठीतच बोला...असे सांगूनही त्यांच्यात बदल होत नसे....त्या पार्श्वभूमीवर पाहता...फडकेसाहेबांसारखा , आमच्या आस्थापनेतला देशातला सर्वोच्च साहेब सहजपणे माझ्याशी मराठीतून संवाद साधतोय हे ऐकून मला ...ते...गहिवरल्यासारखे की काय ते झाले.

हं.बोला देव,काय अडचण आहे?

सर,मला पुन्हा मुंबईला जायचंय....

एक क्षण फडकेसाहेब शांत होते.
अहो,पण आत्ताच तर तुम्ही आला आहात,लगेच कसं परत पाठवणार तुम्हाला? जरा काही दिवस कळ काढा...मग पाहू काय करता येते ते.

सर, पण मी आधीच लिहून दिले होते ना...मला बढती नको...आणि म्हणून त्यासाठी माझी बदलीही होणार नाही असे आस्थापनाने लिहून दिलेय...मग असे असतांना माझी बदली झालीच कशी? म्हणून सर,कृपा करा,मला लगेच मुंबईला परत पाठवा.

अहो,असं नाही करता येणार...त्या धारवाडकरांनी...तुमच्या मुंबईच्या प्रमुखाने...तुमच्या विरुद्ध शिस्तभंगाची तक्रार केलेय ना..

अहो सर,पण त्याबद्दलची चौकशी होऊन चौकशी समितीने माझ्या बाजूने निर्णय दिलाय...हे देखिल तुम्हाला माहित आहे ना...अशा परिस्थितीत केवळ अट्टाहासाने माझी बदली का केली?

देव,सगळ्याच गोष्टी शब्दात नाही सांगता येत. काही निर्णय हे धोरणात्मक असतात...एक धोरण म्हणून तुमची बदली करावी लागली...तुमची बदली व्हावी म्हणून तुमच्या त्या साहेबांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली...आता मला सांगा, एकाच वेळी दोघांना कसे खुश करणार? आज काही झाले तरी मुंबई कार्यालयाचा भार ते समर्थपणे सांभाळताहेत...तेव्हा तुमची बदली केली नसती तर साहजिकच त्यांचा मानभंग झाला असता.

सर,म्हणजे आम्हा लहान कर्मचार्‍यांना काहीच किंमत नाही...आमचा मानभंग होत नाही? बदली होऊ नये म्हणून मी, बढती नको...असे स्पष्टपणे लिहून दिले आणि तेही, तुम्ही लेखी मान्य केलेले आहे...मग आता बदली करून तुम्ही माझ्यावर अन्याय करता आहात असे नाही वाटत?.....माझा आवाज नकळत वाढत गेला.

मला शांत करत साहेब म्हणाले...हे पाहा,तुमची बदली झाली...किंबहूना एका विशिष्ट परिस्थितीत ती करावी लागली...आता घटना घडून गेलेय...ती दुरुस्त करता येणार नाही...पण मी त्याची भरपाई करू शकतो...तुमची योग्यता लक्षात घेता ...आजवर तुम्ही नाकारलेल्या दोन बढत्या मी तुम्हाला माझ्या अधिकारात त्वरित देऊ शकतो...त्यानंतर मुंबई सोडून तुम्हाला हवे तिथे...मुंबईच्या आसपास बदलीही देऊ शकतो...पण पुन्हा मुंबईला जाण्याचे नाव इतक्यात काढू नका आणि तसा हट्टही करू नका.

सर,अहो,बढतीबद्दल मला कधीच आकर्षण नव्हतं... कौटुंबिक स्थैर्यासाठी मी त्याकडे  जाणीवपूर्वक पाठ फिरवलेय...तेव्हा मला बढती नकोच...तुम्ही मला लगेच मुंबईला परत पाठवा.

देव,अहो असं काय करताय,मी म्हटलं ना....आता ते शक्य होणार नाहीये...तुमचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी...

सर,मला आर्थिक नुकसानी परवडेल...पण माझी चुकी नसताना.... मी माझे पालूपद सुरुच ठेवले.

फडके साहेबही मला समजावून थकले. एकीकडे त्यांना माझे म्हणणे पटत होते...दुसरीकडे ते धोरणात्मक निर्णयामुळे अडकलेले होते. शेवटी ते म्हणाले....देव,जरा शांतपणे विचार करा...मी तुम्हाला जे देऊ शकतोय ते द्यायला तयार आहे...पण उगाच नको तो हट्ट करू नका...तुमच्या मागचे कैक लोक पुढे गेले...तुम्ही अजून तिथेच राहिलात...काय मिळवलंत ह्यातून...आता बदली झालेलीच आहे तर...ही बढतीची संधी सोडू नका...मी तुमच्यावर मेहेरबानी म्हणून हे करत नाहीये...तुमची योग्यता आहेच...म्हणून सांगतो...हो म्हणा...दिल्ली काही इतकी वाईट नाही हो...मी गेली पंचवीस वर्षे इथे राहतोय...

सर,दिल्ली कितीही चांगली असो...मला माझी गल्ली...आपली, मुंबईच प्यारी आहे. तुम्ही मला पुन्हा परत पाठवा...बस अजून काही नको मला....आणि मला बढतीलायक समजून बढतीचा प्रस्ताव दिल्याबद्दल मी आपला मन:पूर्वक आभारी आहे...तुम्हाला जर मी खरोखरच तसा वाटत असेन तर मला मुंबईला परत पाठवा...बस्स,तीच माझी बढती असेल.

काही क्षण शांतता पसरली. मग शांततेचा भंग करत,घड्याळाकडे पाहात, साहेब म्हणाले...हे पाहा देव, मला आता एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागतेय...मी तुम्हाला दिलेल्या प्रस्तावाबद्दल नीट विचार करा...आपण पाहू काय करता येईल ते...या आता...आणि हो एक सांगायचंच राहिलं...नायरना हे सांगा...त्यांचाही सल्ला घ्या हवे तर...दिल्लीत ते तुमचे पालक आहेत...नव्हे,तुमचे पालकत्व त्यांनी स्वत:हून स्वीकारलंय...तुम्हाला हव्या त्या सवलती इथे मिळतील...तेवढं एक सोडून....
साहेबांनी वाक्य अर्धवट सोडलं आणि त्यांनी बाहेर जाण्यासाठी आपली ब्रीफकेस उचलली...

२ एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग २

जुलै १९८७ मध्ये मी नवी दिल्लीला जायला निघालो. ह्याआधी मी दिल्ली पाहिलेली असल्यामुळे मला नवीन असे काहीच नव्हते...तरीही नवी दिल्ली स्टेशनवर माझा एक ’अलग’ नावाचा सरदारजी मित्र त्याची मोपेड घेऊन हजर होता. त्या काळातही त्याची ती मोपेड जुनी-पुराणी वाटत होती...पण त्याच्या दृष्टीने ती इंपालापेक्षाही भारी होती.
नवी दिल्लीला उतरल्यावर पाहिले तर सरदारजी माझी वाटच पाहात होता. मला पाहताच तो चटकन पुढे धावला आणि माझ्या हातातली छोटी प्रवासी बॅग त्याने आपल्या हातात घेतली आणि म्हणाला...बाकीका सामान किधर है?

मी म्हणालो...बस,इतनाही है.

तो वेड्यासारखा माझ्याकडे पाहात राहिला. ..अबे,इतने सामानसे कैसे करेगा तू गुजारा?

मी म्हटल...मुझे आदत है.

है क्या इसमें?..त्याचा प्रतिप्रश्न.

दो पॅंट,तीन टी-शर्ट,दो लुंगी और बनियन,अंडरवेयर,रुमाल,टुवाल वगैरे सभी जरूरी कपडे...मी.

दोन क्षण तो माझ्याकडे वेड्यासारखा पाहात राहिला आणि म्हणाला...बस्स!इतनेही कपडे? अरे इतने कपडे तो मैं रोज बदलता हूँ! कमालका आदमी हो तुम. और बेडिंग किधर है? या जमिनपर ही सोयेगा?

मी त्याला माझी छोटेखानी वळकटी दाखवली. ती पाहून तो जोरजोरात हसायला लागला.

तू तो सचमूच पागल दिखता है रे. क्या है इसमे?

सतरंजी,एक रजई और दो चादर...मी

साले,यहांके भिखारीके पास भी जादा चीजे होगी. ये दिल्ली है. यहां सर्दीके मोसममें कैसे दिन निकालेगा तू इतने कम कपडेमें और ऐसे बिस्तरसे? मर जायेगा ठंडसे.

मैं इधर जादा दिन नही रुकनेवाला हूँ,कुछ दिनोंमेही वापस जाऊंगा.

अबे,तू ट्रान्सफरपे आया है या टूरपे?

मै आया तो हूँ ट्रान्सफरपेही...मगर इसको टूरमें बदल दूंगा.

माझा तो एकंदर आविर्भाव पाहून त्याने एकवार जोरदार हसून घेतले आणि मग म्हणाला...चल,जो तू ठीक समझे. मग आम्ही दोघे बाहेर आलो. स्टेशनच्या त्या आवारात असंख्य दुचाकी आणि चारचाकी पार्क केलेल्या होत्या. त्यातल्या सर्वात जुनाट अशा त्या ’इंपाला’कडे निर्देश करत तो खुशीत बोलला...ये है मेरी गड्डी. हवाके साथ बाते करती है...चल, बैठ जा पीछे.

अरे,लेकिन इसपे मेरा सामान कहाँ रक्खूँ?

त्याने क्षणाचाही विचार न करता माझी वळकटी त्याच्या पायाशी आडवी ठेवली आणि त्यावर माझी छोटेखानी बॅग...आणि म्हणाला ...चल अभी बैठ.
मी आज्ञाधारकपणे त्याच्या मागे बसलो आणि इंपाला सुसाट निघाली.

रस्त्यात  अधून-मधून प्रेक्षणीय स्थळं दिसत होती.  ;)  अशा वेळी सरदारजीची मान डाव्या उजव्या बाजूला जितकी फिरवता येईल तितकी फिरत असायची. वर...ओहो.क्या कुडी है,क्या माल है...देख,देख,दिल्लीका माल देख ...

अशा वेळी मला ही भिती असायची की...हा उगाच कुठे तरी गाडी ठोकायचा....म्हणून मी त्याला म्हणत असे..अरे बाबा,जरा आगे देखके गाडी चलाओ ना....कही अपघात हो जायेगा.

त्यावर त्याचे उत्तर...डरो मत पुत्तर,मै गये १०सालसे गड्डी चला रहा हूँ....आजतक कभी अ‍ॅक्सिडंट नही हुवा...और गड्डी चलाते चलाते इस ट्रॅफिकमें यही तो है टाईमपास...पेण**.... आपल्याकडे ’भ’काराने सुरु होणार्‍या शिव्या तिथे ’प’ ने सुरु होतात. गाडी चालवता चालवता सरदारजीचे चक्षूचोदन(हा त्याचाच शब्द) सुरु होते आणि त्याच वेळी जोरजोरात त्याचे धावते(अक्षरश:..गाडी धावत असल्याने)वर्णनही अखंडपणे सुरु होते.
मग मी त्याच्याकडे दूर्लक्ष केले आणि आजुबाजूचा परिचित परिसर पाहू लागलो.

दिल्लीचे रस्ते चांगले प्रशस्त आहेत आणि त्याच बरोबर पदपथही  प्रशस्त आहेत. रस्त्यापासून साधारण फूट-दीडफूट उंचावर हे पदपथ आहेत. पण गम्मत म्हणजे ह्या पदपथावरून चालणारा पादचारी अभावानेच आढळतो. सगळी दिल्ली रस्त्यावरून वाहात असते. स्वत:ची दुचाकी...सायकल,मोपेड,स्कुटर,मोटरसायकल.चारचाकी मोटरगाडी,तीनचाकी ऑटो-रिक्षा,डीटीसीच्या बसेस,खाजगी बसेस आणि टांगे....टांगे एका विशिष्ट परिसरातच चालतात....पण एकूण दिल्लीकर हा नेहमी कोणत्या ना कोणत्या वाहनानेच प्रवास करत असतो.

शेवटी एकदाची आमची इंपाला आमच्या कार्यालयाच्या आवारात पोचली आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. हातीपायी धड पोचलो ह्यातच सर्व आले म्हणून सरदारजीचे आभारही मानले. सगळं सामान घेऊन आम्ही दोघांनी कार्यालयात प्रवेश केला. काही जुने मित्र स्वागताला उभे होतेच...मग गळामिठी झाली...चहापाणी झाले.
मित्र आपापल्या कामाला निघून गेले. मी तिथल्या प्रमुख साहेबांची भेट घेतली...योगायोगाने हे साहेब मुंबईत चार वर्ष राहून गेलेले होते. त्यांचे माझे संबंधही उत्तम होते त्यामुळे त्यांनीही माझे सहर्ष स्वागत केले. काय हवे नको, दिल्लीत राहण्याची काय व्यवस्था आहे...इत्यादि चौकशी केली. पुन्हा एकदा चहापाणी झाले.

मुंबईहून काही महिन्यांपूर्वी एकजण दिल्लीत बदलीवर आला होता तो मराठी मित्रही भेटला....तुझ्या राहण्याची काही व्यवस्था नसेल तर तू माझ्याबरोबर राहू शकतोस...मी एकटाच राहतोय...वगैरे सांगून माझ्या तिथल्या वास्तव्याची चिंता दूर केली.

मी इथे राहायला आलेलो नाहीये...काही दिवसात परत जायचेच आहे...तेव्हा असेल तशा परिस्थितीत दिवस ढकलू...असा मनाशी विचार करून मी त्याच्याबरोबर राहायची तयारी दर्शवली.

नवी दिल्लीपासून दूर उत्तर प्रदेशच्या हद्दीतील  एका नव्याने उदयास येणार्‍या त्या वसाहतीचे नाव होते..नोएडा.
संध्याकाळी, रामदास...हे त्या मराठी मित्राचे नाव....रामदासबरोबर नोएडाला जाण्यासाठी डीटीसीच्या बसथांब्यावर आलो...आणि जाणवली ती तिथली प्रचंड गर्दी. त्या ठिकाणी जवळपास दहा-बारा वेगवगळ्या ठिकाणी जाण्यासाठीच्या बसेसचे क्रमांक दिसत होते...त्यापैकी फक्त एकच बस आमच्यासाठी होती. बसथांब्यावर बसची वाट पाहणारे लोक अस्ताव्यस्तपणे कसेही उभे होते. कुठेही रांग वगैरे असला प्रकार नव्हता. येणार्‍या बसेसही खचाखच भरलेल्या होत्या...आणखी एक गोष्ट म्हणजे मुंबईत जशा बस थांब्यावर थांबतात...प्रवासी चढतात उतरतात...असला प्रकार इथे नव्हता. बसेस थांब्यावर थांबत नसत...फक्त त्यांचा वेग कमी होत असे...त्या स्थितीतच लोक चढायचे उतरायचे.
हे सगळे पाहिल्यावर ...माझ्या सामानासकट ह्या असल्या गर्दीत आणि तेही न थांबणार्‍या बसमध्ये कसे चढायचे?....हा प्रश्न मला सतावत होता. सकाळी सरदारजीच्या हसण्याला कारणीभूत ठरलेले ते माझे किरकोळ सामानही आता मला खूप भारी वाटू लागले.
बसेस येत होत्या आणि जात होत्या..गर्दी कमी झाल्यासारखी वाटतेय न वाटतेय तोवर अजून नव्याने गर्दी जमा होत होती.  संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत आम्ही बसथांब्यावर नुसते उभेच होतो...ह्या अवधीत नोएडाला जाणार्‍या ज्या काही पाचसहा बसेस आलेल्या त्या आधीच प्रचंड भरून आलेल्या होत्या...त्यामुळे त्यात प्रवेश करणंच कठीण होतं. शिवाय नोएडा तिथून इतकं दूर होतं की ऑटोरिक्षानेही जाणे परवडण्यासारखे नव्हते...ह्यात अजून एक तिढा होता. दिल्ली आणि नोएडाच्या मध्ये यमुना नदी लागते...त्यांना सांधण्यासाठी तिथे एक मोठा सेतू बांधलेला आहे...तर दिल्लीतून जाणार्‍या रिक्षा फक्त ह्या सेतूच्या दिल्लीच्या बाजूपर्यंतच जाऊ शकत होत्या..पुढे जाण्यासाठी तो सेतू पायी चालून जाऊन पुढे नोएडात शिरून तिथल्या स्थानिक रिक्षांचा आसरा घ्यावा लागत होता...त्यामुळे हे प्रकरण सर्वार्थाने भारी होते....तेव्हा बससाठी वाट पाहण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता.

रात्रीचे  नऊ वाजले तरी आम्ही तिथेच ठाणबंद होतो...आता नोएडाला जाणारी एकच बस...शेवटची ९.३० ची होती...ती सुटली तर मग नाईलाजाने पुन्हा कार्यालयात जावे लागणार होते. रामदासने इतका वेळ माझ्यासाठी कसाबसा धीर धरला होता...तो म्हणाला...हे बघ देव, आता ह्या बसमध्ये नाही शिरू शकलो तर रात्रभर इथेच राहावे लागेल नाहीतर पुन्हा कार्यालयात जावे लागेल. मी आता काहीही करून ह्या बसमध्ये घुसणार आहे...तुही कंबर कसून तयार राहा...तुझी वळकटी दे माझ्याकडे...मी आधी घुसतो..तू माझी पाठ सोडू नकोस...घुसायचं म्हणजे घुसायचं...काय?

मी म्हटलं...रामदास..तू म्हणतोस तसे करूया...नाहीतरी मलाही असे तीन तास उभे राहून कंटाळा आलाय...आता शेंडी तुटो वा पारंबी तुटो...घुसायचं म्हणजे घुसायचं...तु हो पुढे...मी कसेही करून तुझ्यामागे येतोच....

माझे बोलणे ऐकून रामदासही सुखावला...हा रामदास म्हणजे चांगला पहेलवान गडी होता...त्यामुळे मला त्याच्या क्षमतेबद्दल अजिबात शंका नव्हती...आज तो केवळ माझ्यासाठी इथे ताबडला गेला होता...एरवी पहिल्याच बसने तो कधीच निघून जाऊ शकला असता...केवळ माझ्या सोयिसाठी तो आत्तापर्यंत शांत राहिलेला होता.

दूरून बस येतांना दिसली आणि रामदासने मला सावधान केले. खरे तर बस भरलेलीच होती..पण आता विचार करायला फुरसत नव्हती....हरहर महादेव...करत रामदासने धडक मारली..मीही त्याच्यामागे..सगळा जीव एकवटून  बसचा दांडा पकडला...बस तशी वेगातच होती...जेमतेम एक पाय पायरीवर आणि दुसरा पाय बाहेर..अशा अवस्थेत काही सेकंद गेले..आणि तेवढ्यात मागून एक जबरदस्त धक्का आला...आणि मी आपोआप आत ढकलला गेलो.... कसेबसे मागे वळून पाहिले...एक उभाआडवा पंजाबी...बसच्या दारात आरामात हवा खात उभा होता...मी मनातल्या मनात त्याचे आभार मानले...

शेवटी एकदाचे रात्री साडेदहाला नोएडाला...रामदासच्या खोलीवर पोचलो...हुश्श. गेल्या गेल्या मी तिथे जमिनीवर आडवा पडलो आणि चक्क झोपी गेलो.
मला कुणीतरी उठवत होते...डोळे उघडायला तयार नव्हते...मात्र कानांना ऐकू येत होते....अरे देव, उठ. हातपाय धू. मी मस्तपैकी पिठलं भात बनवलाय, तो खाऊन घे आणि मग निवांतपणे झोप.

मी कसाबसा उठलो,हातपाय धुतले...आणि त्याच्याबरोबर जेवायला बसलो....रामदासने खरंच खूप चविष्ठ असे पीठलं बनवलं होतं....

३० मार्च, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग १

मंडळी ह्या पूर्वी एकदा मी माझे दिल्ली पुराण आपल्यासमोर सादर केलं होतं. त्यावेळी मी केवळ एक रात्र-एक दिवस दिल्लीत राहिलो होतो. त्यानंतर पुन्हा एकदा साधारण १९८०-८१ दरम्यान तीन चार वेळा  १५-२० दिवसांचे दौरे झाले. आणि त्यानंतर १९८७ साली मी पुढे दीड वर्ष दिल्लीत बदलीवर काढली...तर ह्याच बदलीदरम्यान आलेले काही अनुभव इथे लिहिण्याचा विचार आहे...

माझे लग्न जरा उशीरानेच म्हणजे वयाच्या पस्तीशीत...१९८६च्या डिसेंबरात झाले. विवाहोत्तर आनंदात विहरत असतांना अचानक एप्रिल १९८७ मध्ये...माझी बदली मुंबईहून नवी दिल्लीला झाल्याचा आदेश निघाला. बदली तशी अचानकच होती...अर्थात कारणं मला माहित होती...तत्कालीन कार्यालय प्रमुखाशी माझी झालेली वादावादी आणि मी त्याच्या भ्रष्टाचाराची केलेली जाहीर वाच्यता...त्यामुळे त्याने काही एक खोट्या प्रकरणात मला गुंतवून माझी दिल्लीला बदली करण्यासंदर्भात केलेली शिफारस दिल्लीश्वरांनी उचलून धरली.

मला दिल्लीला जावेच लागणार हे जवळपास निश्चित झालेले होते तरी मी अजून आशा सोडलेली नव्हती कारण माझी बाजू पूर्णपणे सत्त्याची होती...आजवरचे,  ह्याआधीच्या वरिष्ठांचे माझ्याबद्दलचे सर्वथा अनुकुल मत..जे  माझ्या आजवरच्या प्रत्येक वार्षिक वैयक्तिक अहवालात नोंदले गेलेले होते...तसेच इतर सहकार्यांबरोबरचे स्नेहसंबंध वगैरे लक्षात घेता...माझ्या बाजूने बरेच अनुकुल ग्रह होते ह्याबाबत माझ्या मनात शंका नव्हती. म्हणून मी दिल्लीश्वरांकडे माझे निवेदन पाठवले...त्यात सत्य परिस्थितीसोबत इतरही काही गोष्टी त्यांच्या नजरेस आणल्या की ज्यावरून त्यांची खात्री व्हावी की ही बदलीची शिफारस निव्वळ आकसाने झालेली आहे.

माझा अर्ज दिल्लीत पोचला आणि त्यातील मजकूर पाहून त्याची शहानिशा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने पूर्ण शोध घेऊन निकाल माझ्या बाजूने दिला आणि मला जरा हायसे वाटले...आजवर केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधानही झाले. आता बदली रद्द होणार हे नक्की झाले...पण

हा पणच नेहमी आडवा येतो. इथेही असेच झाले. समितीच्या निर्णयाची एकेक प्रत दिल्लीश्वरांनी मला,आमच्या कार्यालयाला तशीच आमच्या दिल्लीतील सर्वोच्च अधिकार्‍याला पाठवली. आमच्या कार्यालयात ती प्रत येताच  माझ्या वरिष्ठाने हा प्रश्न आपल्या प्रतिष्ठेचा बनवला आणि त्याप्रमाणे आमच्या दिल्लीतील सर्वोच्च साहेबांना साकडे घातले. हे आमचे सर्वोच्च साहेब अधून मधून मुंबई दौर्‍यावर यायचे तेव्हा त्यांची आणि माझीही थोडीफार ओळख होतीच...पण आमच्या स्थानिक साहेबांमध्ये एक लोकोत्तर गुण होता...तो म्हणजे चमचेगिरी...आणि ह्या जोरावर आजवर दिल्लीहून आलेल्या कोणत्याही साहेब मजकुरांच्या सरबराईत त्यांनी कधी कुचराई केलेली नव्हती...त्यामुळे दिल्लीश्वरांचीही त्यांच्यावर विशेष मेहेरनजर होती.

योगायोग म्हणजे मी,आमचे स्थानिक साहेब आणि दिल्लीतील सर्वोच साहेब....हे तिघेही मराठी होतो. माझ्याबद्दल आमच्या दिल्लीच्या साहेबांचे वैयक्तिक मत अतिशय अनुकुल होते...हे मला पुढे काही कारणाने त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाले..ते येईलच पुढे....
हं तर काय सांगत होतो... आमच्या स्थानिक साहेबांवर वरिष्ठांची असलेली मर्जी...आणि आता तीच त्यांनी वापरायची असे ठरवल्यामुळे...दिल्लीश्वरांना साहजिकपणे त्यांची बाजू घेणे भाग पडले आणि ...नाही,हो...करता माझ्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले..  :(

आजवरच्या माझ्या निष्कलंक चारित्र्य आणि कामातील सचोटी वगैरेचा झालेला तो दारूण पराभव मला पचवणे अत्यंत कठीण होते...पण काय करणार? सरकारी नोकरी करायची तर काही कायदे पाळावे लागतात..ते खरे तर अलिखित आहेत...ते असे की...
साहेब नेहमी बरोबर असतो....तो बरोबर नसला तरी...तो बरोबरच असतो हे लक्षात ठेवायचे.
साहेब आणि गाढव ह्यांच्या पुढे आणि मागे उभे राहतांना सुरक्षित अंतरावर उभे राहावे...आणि
कधीही नकार देऊ नये....नकार देणे हा दंडनीय अपराध आहे....काम करायचे नसेल तरी होकार देऊन काम करू नका...इत्यादि इत्यादि.

आणि मी हे कायदे माहित असूनही पाळणारा नव्हतो. खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणतांना मी कुणाची कधीच भीडभाड बाळगली नव्हती. अर्थात त्याची जी काय असते ती सजा आता मला भोगावी लागतच होती.
काही सहकार्यांनी,हितसंबंधियांनी माझे मन वळवायचा निष्फळ प्रयत्नही करून पाहिला....अरे,जाऊ दे सोडून दे रे,मागून टाक माफी...कशाला उगाच भिंतीवर डोकं आपटतोस..वगैरे वगैरे...पण मी आधीच वैतागलो होतो...असत्याचा सत्यावर होत असलेला ढळढळीत विजय पाहून...त्यात हे असले सल्ले....मी त्यांना सांगितलं...मित्रांनो तुमच्या भावना मला समजतात....तरीही मी जी काही तत्व आजवर पाळत आलोय त्यात हे बसत नाही...आणि भ्रष्टाचार्‍याची माफी...तेही माझी कोणतीही चूक नसतांना मागायची...हे कधीच होणार नाही. ही लढाई आता खर्‍या अर्थाने सुरु झालेय...मी जाईन दिल्लीला आणि तिथून लवकरच विजयी होऊन परतेन...ह्याच्या उरावर बसण्यासाठी...

३ फेब्रुवारी, २००७

'दिल्लीवर स्वारी!'अंतिम भाग.

मित्रांचे आव्हान मी स्वीकारले आणि त्या तयारीला लागलो. खाली आलो आणि त्या छोट्या-छोट्या इमारतींच्या आसपास फिरून बघितले. माझ्या त्या अवस्थेत मला एकाने हटकले. माझे दिशाहीन फिरणे त्याला संशयास्पद वाटले असावे. मी त्यालाच प्रश्न केला...भाईसाब, यहांसे बाहर जानेका कोई रास्ता है क्या?
मला नीट न्याहाळत त्याने प्रतिप्रश्न केला, आप कौन है? कहांसे आये हो और कहांपे जाना है?
मी: मैं यहांपे विवेक लॉजमें ठहरा हूं. मुझे नाश्ता करना है. यहांपे कोई छोटामोटा होटल है क्या?
तो: आप नई दिल्ली स्टेशनपे जाओ,यहांसे नजदीक है!
मला तिथेच तर जायचे नव्हते, कारण तिथे जाण्यासाठी मला राक्षसासमोरून जावे लागले असते आणि पुन्हा कालच्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाली असती. मला हे सगळे टाळायचे होते आणि बाहेर निघण्याचा वेगळा मार्ग शोधायचा होता. म्हणून मी त्याला म्हटले, नई दिल्ली स्टेशनपे तो बहोत भीड है. यहां और कोई दुसरी जगह हो तो बताईये!
माझी मात्रा लागू पडली आणि त्याने तिथल्याच एका बोळकांडीतून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवत सांगितले,आप यहांसे चलते जाओ. बाहर जानेके बाद एक लंबी सडक लगेगी. वह 'पहाडगंज'(विभागाचे नाव) जायेगी. वहांपे आपको अच्छासा मद्रासी होटल मिलेगा. डोसा,इडली वडा ऐसा सब तुम्हारे लोगोंका खाना मिलेगा!
मनातल्या मनात म्हणालो, आयला!म्हणजे मी ह्याला मद्रासी वाटलो की काय? बाकी मद्रासी काय आणि मराठी काय, मला काहीही समजू दे ना. रस्ता दाखवला ना झाले तर मग. आपले काम झाल्याशी मतलब!

मी त्याचे आभार मानले आणि त्या बोळकांडीतून पुढे चालत जाऊन ती 'लंबी सडक' बघून आलो. आता ही सडक आम्हाला कुठे नेणार होती ते माहीत नव्हते;पण राक्षसाच्या तावडीतून चुपचाप सटकण्याचा त्याक्षणी तो एकमेव मार्ग मला तरी दिसत होता. तसाच उलट्या पावली परत आलो आणि माझा इरादा मित्रांना सांगितला. ते सर्व ऐकून सगळे सर्दच झाले. चुपचाप पळून जाताना त्याने पकडले तर काय? अशी भीती व्यक्त करू लागले. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सगळे भेकड आहात. काल रात्री जर तुम्ही माझी साथ दिली असतीत तर आज हा प्रसंग आलाच नसता. काल रात्रीच्या वेळी तुम्हाला सोडून मी कुठेही जाऊ शकलो असतो; पण केवळ मित्रत्वाच्या नात्याने मी तुमच्यासाठी माघार घेतली होती. आज सुद्धा तुम्ही अशीच कच खाणार असाल तर मग मी माझ्या रस्त्याने जाणार. तुम्हाला बरोबर यायचे असेल तर या, नाहीतर मी चाललो! असे म्हणून मी माझे सामान उचलले आणि दरवाजाच्या दिशेनं निघालो. लगेच तिघेही धावत आले आणि म्हणाले, बाप्पा,तू म्हणशील ते करतो पण आम्हाला असे वार्‍यावर टाकून जाऊ नकोस. जे व्हायचे ते होईल. आम्ही तू म्हणशील तसे करू!

मग मी सामान तिथेच ठेवून त्या तिघांना खाली नेले आणि ती चोरवाट दाखवली. सगळ्यांनी एकदम खाली न उतरता, एकेकट्याने आपले सामान घेऊन त्या लंबी सडकवर जाऊन दुसर्‍याची वाट बघायचे असे ठरले. मी सगळ्यांच्या शेवटी निघायचे असे सांगितल्यावर त्यांचे चेहरे खुलले. ठरवल्या प्रमाणे एकेक जण आपले सामान घेऊन त्या बोळकांडीतून विनाव्यत्यय जाऊ लागले. शेवटी माझी पाळी आली. मी खोलीवरनं एक नजर फिरवली. कोणाची काही वस्तू मागे राहिली नाही ह्याची खात्री केली आणि बॅग उचलून खोलीबाहेर पडणार एवढ्यात कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली. मी बॅग बाजूला ठेवली आणि येणार्‍या व्यक्तीबद्दल अंदाज करू लागलो. तो राक्षसाचा नोकर पुन्हा आम्हाला खाली बोलवायला आला होता. मी त्याला लगेच येतो असे सांगून कटवले. तो माझ्या मार्गातून दिसेनासा झाल्याची खात्री केली आणि लगेच 'सुटलो.' मला ठरलेल्या ठिकाणी पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे ते तिघे चिंताग्रस्त दिसत होते;पण मला पाहून त्यांच्या जीवात जीव आला. आता खरा प्रश्न होता जायचे कुठे आणि कसे?

रस्ते सुनसान होते. कोणतेही वाहन तर नव्हतेच;पण रस्त्यावर माणसांची वर्दळ पण जवळ जवळ नव्हतीच. आम्ही आपले बॅगा सावरत सावरत दिशाहीन अवस्थेत रस्ता जाईल तिथे चाललो होतो. मधनं-मधनं मागे वळून बघत होतो कुठे शत्रुसैन्य पाठलाग तर करत नाहीना? पण दूर दूरपर्यंत कुणीच दिसत नव्हते. ते मद्रासी हॉटेल देखील अजूनपर्यंत कुठेच दिसले नव्हते. सकाळपासून फक्त चहा पोटात गेला होता आणि आता पोटात कावळे कावकाव करत होते;पण एकही हॉटेल सद्दष्य ठिकाण दिसत नव्हते. चालून चालून थकलो होतो आणि वरून सूर्य आग ओकत होता. कुणाला काही विचारावे तर 'बंद' असल्यामुळे क्वचितच कोणी भेटत होते. तरी देखील मोठ्या आशेने पाय ओढत ओढत आम्ही कसेबसे चालत होतो. एव्हढ्यात सुध्या ओरडला. बाप्पा तिकडे बघ लिहिलेय 'बृहन महाराष्ट्र भवन.' अरे सापडले. चल आपण तिकडे जाऊ. आपली राहण्याची आणि खाण्याची सोय होईल!

वादळात भरकटलेल्यांना किनारा दिसावा आणि जगण्याची आशा जागृत व्हावी तसे काहीसे आम्हाला झाले. आम्ही मोठ्या उत्साहाने तिथे पोहोचलो. तिथून सामानासह बाहेर पडणारी काही मंडळी आम्ही पाहिली आणि आम्हाला जागा मिळणार अशी खात्री झाली. लगबगीने आम्ही व्यवस्थापकांकडे गेलो. आम्ही काहीही बोलायच्या अगोदर त्यांनी आम्हाला सांगितले ’जगह नही है!’
माझी तर खसकलीच. मी बोललो,आम्ही मुंबईहून आलोय,मराठी आहोत. आमच्याशी मराठीत बोलायच्याऐवजी सरळ हिंदी काय फाडताय?
शांतपणे ते सद्गृहस्थ म्हणाले, तुम्ही मराठी आहात असा काय शिक्का मारलाय काय तुमच्या कपाळावर? इथे जागा मागायला कोणीही येते,बोलल्याशिवाय आम्हाला कसे कळणार की कोण कुठला भाषक आहे ते?
मी म्हणालो,अहो तुम्ही बोलायला संधी देखिल दिली नाहीत आणि असे परस्पर जागा नाही म्हणून कटवताय काय? आम्ही एवढ्या लांबून आशेने आलोय तर आमची काही तरी व्यवस्था करा की!
व्यवस्थापक म्हणाले, अजून दोन दिवस तरी आम्ही तुम्हाला जागा देऊ शकणार नाही. आजच्या 'संसद घेराओ' कार्यक्रमासाठी आलेली मंडळी दोन दिवसापासूनच इथे येऊन थडकली आहेत आणि ती एवढ्या लवकर इथून हालणार नाहीत. मग मला सांगा,मी तुम्हाला जागा कुठून देऊ?

आता माझ्या लक्षात आले,सकाळी तो हमाल म्हणाला ते खरेच आहे. सध्या दिल्लीत रिकामे हॉटेल मिळणे शक्यच नव्हते. आता काय करायचे? मोठा गंभीर प्रश्न होता! आम्ही आपापसात विचारविनिमय केला आणि ठरले की ह्या अवस्थेत लटकत राहण्यापेक्षा आपण मुंबईला परत जाणेच श्रेयस्कर ठरेल. व्यवस्थापकाना आम्ही जेवण-खाण्या विषयी काही सोय होईल का म्हणून विचारले तेंव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे बाहेरच्या कुणासाठीही ते अशी व्यवस्था करू शकणार नव्हते असे कळले. मग त्यांना नवी दिल्ली स्टेशनकडे जाण्याचा रस्ता विचारला. तो मात्र मोठ्या आनंदाने त्यांनी आम्हाला स्वत: उठून बाहेर येऊन दाखवला. धन्य तो मराठी माणूस आणि धन्य ते आम्ही सारे!

ह्या ठिकाणाहून नवी दिल्ली स्टेशनवर पायी जायला किमान पाऊण तास लागेल असे कळले. पुन्हा एकदा आम्ही सामान उचलले आणि स्टेशनच्या दिशेने निघालो. आमच्या सुदैवाने रस्त्यात एक छोटेसे खानपानगृह आम्हाला दिसले. त्याचा मालक सरदारजी होता. आम्हाला बघून तो अदबीने पुढे आला आणि आसनस्थ होण्याची विनंती केली. लगेच थंडगार पाणी आणून पुढ्यात ठेवले. एका क्षणात चौघांनी घटाघट पाणी प्यायले आणि मग एकदम जीवात जीव आल्यासारखा वाटला.
गरम क्या है? ह्या आमच्या प्रश्नाला छोले-बटुरे असे उत्तर मिळाले. मग आम्ही तेच मागवले. पदार्थ छानच होते आणि भूक सपाटून लागली असल्याने सगळ्यांनी त्यावर आडवा हात मारला. खाणे आटोपल्यावर आम्ही लस्सी मागवली. दोन मिनिटातच तो बैरा परत आला म्हणाला,साब,दही कम है. सिर्फ दो लस्सी ही बन पायेगी. चार नही बनेगी!
मी त्याला म्हणालो, कोई बात नही,तुम दो लस्सी चार ग्लासमें ले आओ.
तो मान हालवून गेला आणि नंतर चार ग्लास भरून लस्सी घेऊन आला. आम्ही लस्सी मजा चाखत चाखत फस्त केली. त्या बैर्‍याला बील आणायला सांगितले. पण तो म्हणाला, साब पैसा काउंटरपेही देना,इधर बील नही देत!
आम्ही सरदारजीकडे गेलो. बैर्‍याने आम्ही खाल्लेल्या पदार्थांच्या यादीत चार लस्सी असे सांगितले. मी त्याला टोकले आणि म्हटले,चार नही,दो!
तो:चार ग्लास लस्सी लाया तो था!
मी: तुमने तो बोला की सिर्फ़ दो लस्सी बनेगी इतनाही दही है, तो चार लस्सी कैसी हुई?
तो: आपने तो बोला की दो लस्सी चार ग्लासमें लाओ, बोला था ना?
मी : हां,मैने बोला था. लेकीन दो ग्लास लस्सीके चार ग्लास कैसे बनाये?
तो: "आपने बोला तो मैने दहीमे पानी मिलाके चार ग्लास बनाये.
मी: जब तुमने दो ग्लासके चार ग्लास बनानेके लिये पानी डाला इसका मतलब लस्सी असली नही थी.
तो: ऐसे कसे असली नही होगी,मैने खुदने बनायी थी. वो असली ही थी. आप चार लस्सीके पैसे देना.

इतका वेळ आमचा संवाद ऐकणार्‍या सरदारजीने मध्येच तोंड घातले. ऐजी,पाईसाब की गल है? मेणु समझादे तुसी!
मी : देखो सरदारजी हम लोक मुंबईसे आये है. हमको धरमपाजी(हे माझ्या ऑफिसातील मित्राचे नाव बरं का.... गरम धरम नव्हे) ने बोला था की दिल्लीमें जाओगे तो पहाडगंजमे एक सरदारजीका ढाबा है(हे लोक छोटेखानी हॉटेलला ढाबा म्हणतात. उधरकी लस्सी पीके देखो,जनमभर याद रखोगे. ऐसी लस्सी पुरे दिल्लीमे कही नही मिलेगी. इसीलिये आपके पास खास लस्सी पीने आये थे, लेकिन निराश होकर जा रहे है! आणि मग घडलेले लस्सी पुराण मी त्याला समजेल असे सांगितले आणि म्हटले, अभी मै धरम पाजी को क्या बताऊं? लस्सी की क्वालिटी घट गयी है,लस्सी पानीदार हुई है! बोलो,क्या जवाब दुं?
सरदारजी एकदम शरणच आला. तो म्हणाला, प्राजी, माफ करना जी! ऐ बेवकुफ्के वास्ते मेरा नाम खराब ना करो. तुसी मेरा मेहमान हो. शामको वापस आओजी,मै अपने हातोंसे त्वाडेवास्ते लस्सी बणाउंगा! तुसी फिकर ना कर. ऐसी लस्सी पिलाउंगा की जिंदगीभर करतारसिंगदा नाम भुलोगे नही. लेकीन भगवानके वास्ते धरमपाजी को मत बताओ. इतना बडा आदमी दुखी हो जायेगा!
माझ्या लक्षात आले की बहुतेक ह्याची धरमपाजी च्या बाबतीत गल्लत झालेली दिसतेय म्हणून मी सफाई देण्यासाठी म्हणालो, प्राजी,धरमपाजी....माझे बोलणे अर्धवट थांबवून मला तो अजिजीने म्हणाला,पाइसाब,किरपा करके धरमपाजी को कुछ ना बताना. मेरी मानो,आप मेरे मेहमान है और मै आपसे पैसे कैसे ले सकता हुं? लेकिन शामको जरूर आना!

मी त्याला आमची परिस्थिती समजावून सांगितली. राहायला जागा नाही म्हणून आम्ही मुंबईला परत कसे जात आहोत वगैरे गोष्टी सांगितल्यावर सरदारजी खट्टू झाला. त्याने आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन तीन ठिकाणी टेलीफोन करून बघितले पण त्याला यश आले नाही. निराश मनाने त्यांने आम्हाला निरोप दिला. जाता जाता धरमपाजी ला ’सतश्री अकाल’ सांगायला विसरला नाही. विषण्ण मनाने आम्ही देखील स्टेशनच्या मार्गाला लागलो.
दिल्लीत आल्यापासूनचा हा पहिलाच 'माणुसकीचा' हृद्य अनुभव, आम्हाला दिल्ली सोडताना मिळण्यामागे काय योग होता न कळे!

समाप्त.

'दिल्लीवर स्वारी!'भाग५

अंथरुणावर पडल्या पडल्या दिवसभराच्या घटनांचा पट डोळ्यांसमोर उलगडत होता. दिवसभरातले उलटसुलट वागणे,महनीय व्यक्तींबद्दल अपुर्‍या ज्ञानातून केलेली टिकाटिप्पणी वगैरे सर्व गोष्टींची उजळणी करता-करता झोप कधी लागली कळले नाही.

कसल्या तरी हादर्‍याने मी धडपडून जागा झालो. उठून पहिला चष्मा लावला आणि पाहिले तर दिन्या स्वत:चा पलंग सोडून माझ्या बाजूला येऊन झोपला होता. मी त्याला त्याच्या जागेवर जाऊन झोपायला सांगितले. तो गयावया करून मला म्हणाला, बाप्पा,मी तुझ्या बाजूलाच झोपतो. मला सारखी भीती वाटतेय की तो राक्षस येऊन आपल्याला मारणार आहे. तू त्याला काय-काय बोललास. तो आता आपल्याला सोडणार नाही. आणि ती खिडकी पण बंद कर,त्याला गज नाहीत. तो तिकडून आत येईल!
मी त्याला समजावून सांगितले, अरे बाबा,आपण दुसर्‍या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहोत,आणि तो राक्षस बाजूच्या बैठ्या घरात आहे.(त्या लॉजची रचना जरा वेगळीच होती. रस्त्याला लागून एका बैठ्या घरात काही खोल्या होत्या आणि काही खोल्या मागच्या बाजूला दुसर्‍या एका एकमजली इमारतीत होत्या. ह्या दोन्हींमध्ये एक छोटेसे अंगण होते). तो इथे कशाला धडपडायला येणार आहे. तू गुपचुप आपल्या जागेवर जाऊन झोप!
पण काही उपयोग झाला नाही. आमच्या बोलण्याच्या आवाजाने सुध्या आणि पद्या पण उठले. त्या दोघांना पण दिन्यासारखीच भीती वाटत होती;पण ते मोठ्या नेटाने आतापर्यंत झोपायचा प्रयत्न करत होते. दिन्याचे बोलणे त्यांना पण पटले आणि सगळ्यांनी लांब-लांब झोपण्याऐवजी तीन पलंग एकत्र जोडून त्यावर एकत्र झोपावे असे त्या तिघांचे एकमत झाले. त्याप्रमाणे त्यांनी अजून दोन पलंग माझ्या पलंगाला जोडले आणि पटापट झोपी गेले. मला अशा तर्‍हेने झोपायची सवय नव्हती,म्हणून मी थोडावेळ बसूनच होतो. ते तिघे गाढ झोपल्याची खात्री झाल्यावर मी त्या वेगळ्या राहिलेल्या पलंगावर जाऊन अंग टाकले. थोड्या वेळात मला पण झोप लागली.

मला जाग आली तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते. मी उठून प्रात:र्विधी उरकले आणि खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा अजूनही दिल्ली झोपेतच होती. त्या इमारतीच्या बाजूला अशाच छोटेखानी इमारती दाटीवाटीने उभ्या होत्या. क्वचित एक-दोन ठिकाणी जागही दिसत होती. मी हळूच दरवाजा उघडून बाहेर गेलो. बाहेर त्या लॉजचा नोकर आपले अंथरूण आवरत होता. चहा कुठे मिळेल ह्या माझ्या प्रश्नावर आमच्यात पुढील संवाद झाला.
मी: यहां चाय कहां मिलेगा?
तो: साब, इतने जल्दी आपको इधर किधर भी चाय नही मिलेगा.
मी: तो इस वक्त चाय कहां मिलेगा? तुम नही पिला सकते क्या?
तो: नही साब हमारे यहां ८बजे के बाद ही चाय मिलेगा. आपको अभी पिनी है तो नई दिल्ली ठेसन जाना पडेगा.
मी: वो तो बहुत दूर है यहांसे.
तो : नही साब खाली तीन मिनट का रास्ता है.
मी: चलो, मेरेको दिखाओ.
तो मला खाली घेऊन आला. तिथेच राक्षस आडवा घोरत पडला होता. त्याला ओलांडून आम्ही बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर त्याने मला तिथूनच नवी दिल्ली स्टेशन दाखवले. त्या लॉज पासून सहज चालत जाण्याएवढे ते अंतर होते; आणि रात्री सरदारजीने आम्हाला अर्धा तास दिल्ली फिरवून मग इथे आणले होते हे माझ्या लक्षात आले. मी त्या नोकराचे आभार मानले आणि नवी दिल्ली स्टेशनकडे निघालो.

मी तिथे माझ्या चालीने मोजून ५ मिनिटात पोचलो. स्टेशनवर बघितले तर जबरऽऽदस्त बंदोबस्त होता. पोलीस,रेल्वे पोलीस, एस.आर.पी वगैरेंमुळे स्टेशनाला छावणीचे स्वरूप आले होते. तिथेच स्टेशनाच्या आवारात बाहेरून आलेल्यांची हीऽऽ गर्दी होती. मी एका हमालाकडे विचारणा केली तेंव्हा कळले की सध्या दिल्लीतील यच्चयावत हॉटेले,लॉज,रेल्वेचे विश्रांतीगृह अशी सगळी ठिकाणे भरलेली असल्यामुळे लोकांना इथे रेल्वेच्या आवारात राहण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता. मनातल्या मनात त्या सरदारजीला धन्यवाद दिले. काल जर आम्ही हट्टाने बाहेर पडलो असतो आणि कुठेच जागा मिळाली नसती तर? तर कदाचित आमच्यावर देखिल हीच पाळी आली असती. असो. तिथेच चहा प्यायला. वर्तमानपत्र विकत घेतले आणि आता कुठेही जाण्याची घाई नसल्यामुळे रमतगमत,वाचतवाचत लॉजवर आलो. अजूनही तो राक्षस आणि माझ्याबरोबरचे कुंभकर्ण घोरत पडले होते.

वर्तमानपत्राचे पहिले पान तर आजच्या 'संसद भवनाला घेराओ' आणि तत्संबंधी बातम्यांनी ओसंडून वाहत होते. दिल्लीमध्ये सगळीकडे बंद पाळला जाणार होता. बस,रिक्षा,टॅक्सी तसेच सर्व खाजगी वाहने रस्त्यावर उतरणार नाहीत असे म्हटले होते. खान-पानगृहे सोडली तर इतर सर्व दुकाने बंद राहतील असे त्यात म्हटले होते. म्हणजे ’आमचे दिल्लीदर्शन बोंबलले म्हणायचे’ असा विचार मनात आला आणि मग आता काय करायचे हा यक्षप्रश्न आ वासून पुढे उभा राहिला.

साडेसातच्या सुमारास मंडळी उठली. प्रात:र्विधी उरकले. तोपर्यंत चहा आला. त्याचबरोबर नोकराने मालकाचा निरोप आणला की सकाळी ८ वाजल्यापासून(आत्ता ह्या घडीला साडेआठ वाजत होते) नवीन दिवस सुरू होतो तेंव्हा त्याचे भाडे भरायला या.
हे असले काही असते हे आमच्या पैकी कुणालाच माहीत नव्हते. माझा तर असा 'गोऽड' समज होता की काल रात्री बारा वाजता भरलेले खोलीचे भाडे आज रात्रीच्या बारावाजेपर्यंतचे असते. त्यामुळे मी निश्चिंत होतो; पण हा राक्षस आता आम्हाला काही स्वस्थ जगू देणार नाही असे दिसत होते. मी मित्रांना म्हणालो,गेलो आपण बाराच्या भावात! आता काय करायचे?
ते तिघेही माझ्यावर खेकसायला लागले. म्हणत होते की हे सगळे तुझ्या कालच्या नाटकामुळे घडत आहे. मी त्यांना समजवायचा प्रयत्न करत होतो पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काय असेल ते आता तूच निस्तर! असे म्हणायला लागले.

'दिल्लीवर स्वारी!'भाग ४

दिल्ली स्टेशनवर आम्ही उतरलो तेव्हा रात्रीचे साडे-दहा वाजले होते. आयुष्यात पहिल्यांदाच दिल्लीत पाऊल ठेवले होते;त्यामुळे आता इतक्या रात्री जायचे कुठे हा प्रश्नच होता. मुंबईहून निघताना काही लोकांनी सल्ला दिला होता की सरळ महाराष्ट्र भवनात जाऊन राहायचे. आता एव्हढ्या रात्री ह्या अनोळखी जागी हे महाराष्ट्र भवन शोधायचे कुठे? तेव्हढ्यात एक सरदारजी आपली रिक्षा घेऊन आमच्या जवळ आला आणि आम्हाला कुठे जायचे आहे म्हणून विचारू लागला. सुध्याने लगेच तोंड उघडले, किधर भी होटल्मे रेहेनुकु मिलेंगा क्या?
मी त्याला मध्येच अडवत सरदारजीला धेडगुजरी भाषेत म्हणालो, पाजी(प्राजी चा अपभ्रंश) हमे महाराष्ट्र भवन जाणा है जी, तुसी लेके चलोगे?
तो लगेच तयार झाला. आम्ही चौघे आणि आमचे सामान,एव्हढे सगळे त्या रिक्षातून कसे जाणार हा प्रश्न मला पडला होता;पण सरदारजीने तो सहज सोडवला . तिघे मागच्या सीटवर आणि पुढे त्याच्या बाजूला मला बसवले, सामान कसे तरी कोंबले आणि त्याने रिक्षा सुसाट हाणली.

साधारण अर्धा तास त्याने आम्हाला दिल्ली फिरव-फिरव फिरवली आणि एका गल्लीमध्ये एका जुनाट इमारतीजवळ आणून थांबवली. पटापट आमचे सामान उतरवले आणि गडी समोरच असलेल्या दरवाज्यातून आत गेला सुद्धा. सुध्या,पद्या आणि दिन्या सुद्धा त्याच्या पाठोपाठ आत गेले. मी बाहेरच रेंगाळलो. महाराष्ट्र भवनाची पाटी कुठे दिसते काय म्हणून बघू लागलो;तर तसे काहीच मला दिसले नाही. उलट 'विवेक लॉज' अशी एक छोटेखानी पाटी दिसली. मी बाहेरच थांबलो हे बघून तो सरदारजी मला बोलवायला बाहेर आला. मी त्याला ती पाटी दाखवली आणि विचारले, इधर लिखा है विवेक लॉज तो महाराष्ट्र भवन किधर है?
साब अभी बहुत रात हुई है,आप इधरही रुकिये,कल आपको महाराष्ट्र भवनमे पहुचाऊंगा!इति सरदारजी.
मी म्हणालो, तुमने हमको फँसाके इधर लाया,हमको अभीके अभी महाराष्ट्र भवन मे जाना है!
तेव्हढ्यात सुध्या बाहेर आला. त्याने मला खेचत आत नेले. आत बसलेला व्यवस्थापक चांगला दणकट दिसत होता. त्याने माझे स्वागत केले, आइये साब. आपको बहुत अच्छा कमरा दिया है!
म्हणजे,मी बाहेर असताना, आमच्या ह्या तिघा दोस्तांनी खोली देखिल निवडली होती. मी ठामपणे म्हणालो, हमको इधर रेहनेकाच नही, हमको महाराष्ट्र भवनमे जाने का है. ये सरदारजीने हमको फँसाके इधर लायेला है. इसको आपसे कमिशन मिलता होगा इसिलिये ये हमको इधरिच लाया!
सुध्या गयावया करून मला म्हणाला, अरे आता रात्रीचे ११ वाजून गेलेत,आपण कुठे शोधत फिरणार ते महाराष्ट्र भवन. चल आज इथेच झोपू आणि उद्या सकाळी महाराष्ट्र भवना मध्ये जाऊ! आणि त्याने त्या व्यवस्थापकाकडे चावी मागितली.

पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. त्या व्यवस्थापकाने मला समजावण्याचा बराच वेळ प्रयत्न केला पण मी माझा हट्ट चालूच ठेवला आणि माझे तिघे मित्रही माझी मनधरणी करून थकले. ह्या सरदारजीने आम्हाला इथे फसवून आणल्याचा मला सात्त्विक संताप आला होता आणि म्हणूनच मी देखिल हटून बसलो होतो. कोणाच्याही विनवणीला मी भीक घालत नाही हे बघितल्यावर त्या व्यवस्थापकाने मला दरडावणीच्या स्वरात म्हटले, आपको इधर रहेनाही पडेगा. अभी इसी वक्त आप कही नही जायेंगे!
अशा भाषेत माझ्याशी कोणीही बोलले तर मी कधीच खपवून घेत नाही. मी त्याला त्याच भाषेत उत्तर दिले, हमको इधर रेहेनके लिये तुम(अजून माझे हिंदी मराठीच्या वळणाने जात होते) मजबूर नही कर सकता है. हम जायेंगे और जाके दिखायेंगे. कौन मायका लाल हमको रोकता है मैं देखता हुं!
असे म्हणून मी माझे सामान उचलले आणि दरवाजाच्या दिशेने निघालो. माझा हा पवित्रा बघितल्यावर तो व्यवस्थापक जागेवरून उठला आणि माझ्या कडे धावला. त्याच वेळी त्याच्या नोकरांनी मला दरवाज्यातच अडवले. तो माझ्या समोर येऊन उभा राहिला म्हणण्यापेक्षा उभा ठाकला हे म्हणणे जास्त योग्य होईल. सहा फुटापेक्षा अधिक उंच,आडव्या अंगाचा असा तो राक्षसी देह आणि त्याच्यासमोर मी म्हणजे एक 'चिलट' वाटत होतो. त्याच्या फुंकरीने देखील उडून गेलो असतो. माझ्या हातातील सामान त्याने सहजपणे हिसकावून घेतले आणि म्हणाला, हमारे यहां आया हुआ मेहेमान ऐसे कैसे जा सकता है. उसकी खातिरदारी करनेका मौका हम कभी नही छोड सकते. आपको आज की रात तो रुकनाही पडेगा. अभी आप यहांसे कल सुबह ही बाहर जा सकते है!

त्याच्या त्या आविर्भावाने क्षणभर मी घाबरलो. वाटले,आज काही आपली धडगत नाही. हा राक्षस वेळप्रसंगी शारीरिक मारहाण देखिल करेल; आणि ह्या अपरिचित शहरात आपल्या मदतीला कोण येणार?(ते तिघे केंव्हाच गळपटले होते, भीतीने थरथर कापत कोपर्‍यात उभे होते) काय करावे, माघार घ्यावी की आवाज चढवावा?(नेहेमीच विपरीत परिस्थितीत माझा मराठी बाणा आणि अहंकार असा उफाळून येतो असा अनुभव आहे.)मी असा विचारमग्न असताना त्याने त्या नोकराला आमचे सामान खोलीत नेऊन ठेवायची आज्ञा केली. ते ऐकल्यावर सगळा धीर एकवटून (जे काय होईल ते होईल असा विचार करून) टीपेच्या आवाजात मी त्या नोकरावर ओरडलो, हात नही लगाना सामानको. अभी तो मेरा निश्चय पक्का हुआ,मैं यहां एक पल भी नही रुकुंगा! आणि त्या राक्षसाकडे बघून म्हणालो, मेहेमानको हम देवता समझते है और आप लोग कैदी समझके अटकाके रखते है. अरे मैंने सुना था की दिल्ली दिलवालोंकी होती है,लेकिन यहां आकर पता चला की ये शहर तो ठगोंका शहर हैं. यहां मेहेमाननवाझीके नामपे पर्देसीयोंको लुटते हैं. ऐसे शहरमें मैं एक पल भी रहना नही चाहता. मैं जा रहा हुं, किसीकी ताकत हैं तो रोक लो. मैं मुंबई वापस जाउंगा तब वहांके लोगोंको कहुंगा की दिल्ली दिलवालोंकी नही बल्कि लुटेरोंकी है. मुंबईके सरदारजी टॅक्सी ड्रायव्हर कितने इमानदार और भरोसेमंद होते है. नही तो ये सरदारजी! सरदारके नामपे कलंक हैं!
मी माझ्या मित्रांना आज्ञा केली, चला! असे मुर्दाडासारखे शेपट्या घालून बसलात म्हणून हा राक्षस माजलाय. चला,आपला मराठी बाणा दाखवा! पण कसले काय न कसले काय! त्या तिघांचे पाय जमीनीला चिकटून बसल्याप्रमाणे ते तिघे निश्चल उभे होते.

नाही म्हटले तरी माझ्या आवाजाचा परिणाम त्या राक्षसावर झालाच. तो विचार करत असावा. हा प्राणी,फुंकर मारली तरी उडून जाईल असे ह्याचे शरीर आणि त्यात आवाज मात्र भीम गर्जनेसारखा(ह्या आवाजाने मला वेळोवेळी साथ दिली आहे). प्रकरण वाटते तितके सामान्य नाही.(हे सगळे मी मनातल्या मनात)मला कळेना काय करावे. मित्र हालायला तयार नाहीत. आम्ही एकत्र आलो होतो;त्यामुळे त्यांना सोडून जाणे योग्य वाटेना आणि इथे राहावे असे देखिल वाटत नव्हते. तेव्हढ्यात इतका वेळ गप्प असलेला सरदारजी मला हात जोडून,गयावया करत म्हणाला, बाबूजी,गुस्सा थूक दो. मैं माफी मांगता हूं. मेरे वजहसे आपको तकलीफ हुई. लेकिन कृपा करके मेरे नियतपे शक मत किजिये. मैं आपको ले चलता हूं वहां,जहां आपका मन हो. लेकिन दिल्लीवालोंके बारेमे ऐसी बात मत सोचो. हम भी मेहेमानको भगवान ही समझते हैं. मैं भी असली सरदार हूं और मेरे बम्बईके सरदारपाईजी जितना पाक हूं!(इथे मी आश्चर्यचकित झालोय! बाण वर्मी लागला म्हणायचा!)
सरदारजीचा बुरूज ढासळलेला बघताच राक्षस पण एकदम निरवानिरवीची भाषा करू लागला. तो म्हणाला, बाबूजी,आप को मैं प्यार मोहोब्बतसे कहता हूं की आप इतने रातको और कहीं नही जाना. मैं आपको सबसे अच्छी रूम देता हुं और वो भी आधे भाव मे. अभी आप, ना मत कहना,नही तो मुझे बहुत बुरा लगेगा. आज तक हमारे यहांसे कोई भी ग्राहक नराज होकर वापस नही गया. आप हमपे कृपा किजिये!(आश्चर्याचा कडेलोट! मला तर वाटले होते मुंबईला जर परत गेलोच तर हातपाय दिल्लीतच सोडून जावे लागणार!)

हा सगळा परिणाम मला अपेक्षित नव्हता. त्यामुळे काय करावे ह्या विचारात मी होतो. तिघे मित्र आणि हे दोघे माझ्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते. माझे मन मला सांगत होते, बाबा रे आता अतिशहाणपणा पुरे आणि आलेली संधी हातची घालवू नकोस.केलेस तेव्हढे नाटक बस्स कर!
मी त्यांच्या विनंतीला मान म्हणून रुकार दिला आणि वातावरण निवळले. आम्हाला एका प्रशस्त खोलीत चार स्वतंत्र पलंग देऊन ’गूड नाईट’ करून राक्षस निघून गेला आणि आम्ही अंथरुणावर अंग टाकले तेंव्हा रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते.

'दिल्लीवर स्वारी!'भाग ३

लग्न थाटामाटात पार पडले. पण मित्रांच्या अनुपस्थितीमुळे माझा जीव तिथे रमला नाही. त्या सर्व राजस्थानी वातावरणात मी मला उपराच वाटत होतो. नेमीचंद मात्र मधून-मधून माझ्या आसपास राहून माझा एकटेपणा कमी करायचा प्रयत्न करत होता. रात्री खूप उशीराने वधूसहित वरात परतली. नेमीचंदने माझी झोपण्याची व्यवस्था त्याच्या बरोबरच केली. सकाळपासूनच्या धावपळीने अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागली. सकाळी खूप लवकर जाग आली. प्रातर्विधी उरकून चहा-पान झाल्यावर मी माडीवर परतलो. अजूनही सगळेजण शांतपणे झोपले होते. लग्न होऊन गेले असल्यामुळे आता इथे राहण्यात विशेष स्वारस्य नव्हते. इथून पुढच्या प्रवासाची तयारी करणे क्रमप्राप्त होते. पण हे कुंभकर्ण उठतील तेंव्हाच पुढच्या हालचालींना वेग येणार होता. हळूहळू एकेक जण उठू लागला. गप्पा-टप्पा सुरू झाल्या. ह्या वेळी मात्र सर्वजण शुद्धीवर असल्याचे जाणवले. मी सगळ्यांना लवकर तयारी करायला सांगितले. त्यांना उद्देशून म्हणालो, आपल्याला आता पुढे दिल्लीला जायचे आहे तेंव्हा चला पटापट उठा आणि तयारी करा!
माझे बोलणे ऐकून सगळे चक्रावले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज लग्न झाले की मगच निघायचे असे होते(त्यांच्या साठी कालचा दिवस उजाडलाच नव्हता). मला त्यांना सगळी कालची रामकहाणी सांगावी लागली;पण कुणाचाच विश्वास बसेना. एव्हढ्यात नेमीचंद आला. त्याचेही तसेच उत्तर ऐकून मग मात्र त्यांना आपली चूक उमगली. आपण कशासाठी आलो आणि केले काय? हे समजल्यावर त्यांना स्वत:ची लाज वाटायला लागली. ते नेमीचंदची क्षमा मागायला लागले. नेमीचंदने त्यांना त्याच्या वडिलांची क्षमा मागा असे सांगितले;पण कोणाचीही त्यांच्यासमोर उभे राहण्याची हिंमत होईना. मग मी पुढाकार घेतला. सगळ्यांना कसेबसे तयार करून नेमीचंदच्या वडिलांना भेटवले;त्यांची क्षमा मागायला लावले. त्यांनीही मोठ्या उदारपणे त्या सगळ्यांना क्षमा केली आणि दुपारचे जेवण जेवूनच पुढच्या प्रवासाला जाण्याची परवानगी दिली.
ह्या सर्वांची तयारी होईपर्यंत मी जरा इकडे तिकडे भटकून गाव बघून घेतले. परत आलो तो रात्रीची वरातीची घोडी तिथेच बांधलेली आढळली. मोतद्दाराला मस्का लावून तिच्यावर स्वार झालो आणि फोटो काढून घेतला(मुंबईहून खास आणलेल्या फॊटॊग्राफरने तिथे काढलेला हा पहिला फोटो).

दुपारची जेवणे आटोपल्यावर आम्ही चौघे जण (मी,दिन्या,पद्या आणि सुध्या)नेमीचंद आणि त्याच्या घरातील सर्वांचा निरोप घेऊन दिल्लीकडे प्रस्थान ठेवले. आम्ही ज्या मार्गाने जाणार होतो त्या मार्गावर अजमेर आणि जयपूर अशी काही प्रेक्षणीय स्थळे होती. ती बघूनच दिल्ली गाठायची असे ठरवूनच आम्ही आमचा पुढील प्रवास सुरू केला. अजमेरला उतरल्यावर तिथे नेमके काय पाहायचे हे माहीत नव्हते. विचारल्यावर कळले की 'ख्वाजा मोईनुद्दिन चिश्तीचा दर्गा' ही एकच पाहण्यासारखी जागा आहे. आम्ही एक उपचार म्हणून तो पाहून घेतला. बाकी थोडा वेळ इकडे तिकडे भटकण्यात आणि खरेदी करण्यात घालवला. मी इथूनच खास माझ्यासाठी राजस्थानी 'मोजडी' आणि आई व मोठ्या बहिणीसाठी खास 'बांधणी' पद्धतीच्या दोन साड्या घेतल्या.(बहिणीला साडी अजिबात आवडली नाही. पण योगायोग असा की ह्या साडीमुळेच तिचे लग्न जमले)इथून आम्ही जयपुरला गेलो. संपूर्ण शहर बघितले. जगप्रसिद्ध 'हवामहल' बघितला. हे शहर आम्हा सगळ्यांना खूप आवडले. त्यानंतर आम्ही दिल्लीच्या वाटेला लागलो.

गाडीत आमच्या समोर एक प्रौढ जोडपे बसले होते. त्यांच्यातील पुरुषाचे आमच्या बोलण्याकडे बारीक लक्ष होते. बराच वेळ आमचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली. आम्ही कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत ह्याची चौकशी केली. आम्ही दिल्लीला जात आहोत हे ऐकून त्यांनी दिल्लीला जाण्याचे कारण विचारले. आमचा दिल्लीदर्शन करण्याचा विचार त्यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले की ते(दिल्लीदर्शन) आम्हाला पुढच्या दोन दिवसात घडणार नाही. कारण विचारले तेव्हा कळले की दुसर्‍या दिवसापासूनच दिल्लीत जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली संसद भवनाला घेराओ घालण्याचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम आहे आणि देशाच्या काना-कोपर्‍यातून त्यासाठी तरुण-तरुणींचे जथ्थे दिल्लीच्या दिशेने येत आहेत. आमच्या समोर बसलेली व्यक्ती कोण होती ह्याचे मला कुतूहल होते म्हणून मी धीर करून त्यांना त्यांचे नाव विचारले. ते होते थोर सर्वोदयी नेते आचार्य विनोबा भाव्यांचे पट्टशिष्य 'श्री.वसंतराव नारगोळकर' आणि त्यांच्या पत्नी 'सौ.कुसुमताई नारगोळकर'. वर्तमानपत्रात त्यांचे सर्वोदय चळवळी संबंधीचे लेख मी वाचले होते;त्यामुळे मला त्यांना प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला.

त्यानंतर मग बोलणे साहजिकच सध्यस्थितीवर म्हणजेच राजकारणावर सुरू झाले. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की सध्या त्यांनी विनोबांची साथ सोडून ते जयप्रकाश नारायणांबरोबर काम करत आहेत. विनोबांच्या पट्टशिष्या कडून हे ऐकले आणि मी पटकन बोलून गेलो, विनोबा मूर्ख आहेत!
नारगोळकराना ते आवडले नाही .ते म्हणाले, अरे अजून तुला खूप दुनिया बघायची आहे. असे एकदम एव्हढ्या मोठ्या माणसाला तू मूर्ख कसे ठरवतोस? असे बोलू नये!
त्या वेळी मी ऐन तारुण्याच्या जोषात होतो(मगरुर होतो म्हणा ना), समोरचा कोण आहे,त्याची थोरवी,योग्यता काय आहे आणि आपली लायकी काय आहे असले 'क्षुद्र' विचार मनाला शिवत नसत. 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असला प्रकार होता. शाळेत असताना विनोबांविषयी त्यांच्या लहानपणातील चुकीच्या वागण्याविषयीचा एक धडा होता आणि त्यात त्यांच्या आईने त्याना उद्देशून म्हटलेले 'विन्या,तू मूर्ख आहेस' हे वाक्य कुठे तरी स्मरणात होते. तेव्हढ्या भांडवलावर मी देखिल त्याना मूर्ख ठरवून मोकळा झालो होतो. त्यातून माझा कल हा जास्त करुन 'सावरकरवादी' विचारांकडे असल्यामुळे हे सगळे अहिंसावादी,सर्वोदयवादी किंवा तत्सम सगळे मवाळ लोक मला मूर्खच वाटत. त्यामुळे मी त्याच आगाऊपणाने त्यांच्याशी वितंडवाद घालू लागलो.

नारगोळकर हे हाडाचे कार्यकर्ते होते. कोसबाड सारख्या मागासलेल्या भागात राहून आदिवासींची उन्नती करण्याचे कार्य ते करत असत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला अनुभवाची जोड होती आणि मी मात्र फक्त आजपर्यंत वर्तमानपत्रातील लेख,अग्रलेख इत्यादि वाचून आपण सर्वज्ञ आहोत असा आव आणत होतो. माझे मतपरिवर्तन करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यानी दिल्ली येईपर्यंत केला;पण माझ्या अडेलतट्टु स्वभावापुढे त्यांचे काहीच चालले नाही. तरी देखिल दिल्ली आल्यावर मोठ्या मनाने त्यानी मला, ’अनुभवातून शिकशील’ असा आशीर्वाद दिला आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या वाटा धरल्या.

'दिल्लीवर स्वारी!'भाग २

माझ्या अंगाईगीत गाण्याचा परिणाम म्हणून की काय ;) दिन्या चुळबूळ करायला लागला. मनात म्हटले, आता हा काय नवीन प्रताप दाखवतोय कुणास ठाऊक! हळूहळू तो उठून बसला. त्याने इकडेतिकडे बघितले आणि त्याचा उजवा हात सारखा नाकाकडे न्यायला लागला. मी प्रथम लांबूनच निरीक्षण केले. नेमके काय काय करतो ते तर बघूया असा विचार करत होतो. इतक्यात पद्याने दिन्याकडे धाव घेतली आणि त्याला रडत रडत विचारायला लागला, दिन्या,मम्मी खंय गेली रे!
दिन्याला प्रश्न कळला की नाही माहीत नाही. तो आपला एकटक आपल्या नाकाच्या शेंड्याकडे बघत बघत उजव्या हाताने आपले नाक पकडायचा प्रयत्न करत होता,पण ते काही त्याच्या बोटाच्या चिमटीत सापडेना. म्हणून त्याने ओरडायला सुरुवात केली. माझे नाक कुठे गेले, ए बाप्पा(मला तो ह्याच संबोधनाने पुकारत असे) माझे नाक कुठे गेले रे?
मी पुढे सरकलो आणि त्याचा हात नीट धरून तो त्याच्या नाकावर ठेवला आणि म्हटले, हे बघ तुझे नाक. नाक म्हणजे काय पेन किंवा रुमाल आहे हरवायला ?
त्याने बोटाच्या चिमटीत नाक पकडले आणि म्हणाला, साल्या बाप्पा,तू माझा खरा दोस्त आहेस. माझे हरवलेले नाक शोधून दिले! असे म्हणून नाक सोडले आणि मला मिठी मारायला लागला. मी लगेच मागे सरकलो.

मला असल्या लोकांच्या सहवासात राहण्याचा मनस्वी तिटकारा आहे. इथे नाईलाज म्हणून मी थांबलो होतो. शक्य असते तर केव्हाच ह्यांच्यापासून दूर निघून गेलो असतो. पण आता मी परमुलुखात होतो आणि ते सुद्धा ह्या लोकांबरोबर एक मित्र म्हणून आलो होतो. तेंव्हा प्राप्त परिस्थितीला कसेही करून तोंड द्यायलाच हवे होते. मी असा विचार करतोय तोपर्यंत दिन्या पुन्हा आपले नाक शोधायला लागला.
ए बाप्पा पुन्हा हरवले माझे नाक. शोधून देना. तू माझा खरा मित्र आहेस ना, मग पुन्हा शोधून दे ना!
आता मला वैताग आला होता; पण रणांगण सोडून पळ काढणे माझ्या रक्तात नसल्यामुळे मी त्यावर लगेच तोडगा काढला. सुध्याला म्हणालो, सुध्या लेका नुसता हसतोस काय? ह्या दिन्याचे नाक हरवले आहे ते शोध ना!
त्यावर तो अजून हसत सुटला आणि टाळ्या वाजवत मोठ्या-मोठ्याने ओरडू लागला, दिन्याचे नाक हरवले,बरे झाले. पद्याची आई गेली मजा आली!
हे पालुपद त्याने सुरू केले आणि दिन्या आणि पद्याभोवती गोल-गोल फिरायला लागला. दिन्या त्याला आपले 'नाक शोधून दे' म्हणून आर्जव करायला लागला तर पद्याने ’मम्मी खंय गेली!’ हा धोशा लावला.

आता माझ्या लक्षात आले की हे तिघे पूर्णपणे भांगेच्या अमलाखाली गेलेत. अहो माझ्याही आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता. आतापर्यंत ऐकून होतो पण आज ह्याची देही ह्याची डोळा अनुभवत होतो. त्यामुळे मी ठरवले आता ह्यांची जरा मजा करूया;म्हणून मी दिन्याला हाक मारली आणि म्हणालो, दिन्या! हे बघ तुझे नाक माझ्या हातात आहे!
लगेच दिन्याने आर्जवं करायला सुरुवात केली, ए बाप्पा,दे ना! दे ना बाप्पा! बाप्पा देना नाक! ए बाप्पा देना नाक!
आणि ह्या आर्जवांची आवर्तनं सुरू झाली. मी त्याच्या जवळ हात नेला की ते नाक घ्यायला तो पुढे सरसावायचा. मी चटकन हात मागे घेतला की पुन्हा आर्जवं सुरू. तिथे सुध्याचे हसणे,टाळ्या वाजवणे आणि चिडवणे सुरूच होते आणि पद्याचे रडगाणे चालूच होते. थोडा वेळ मला पण गंमत वाटली; पण हे किती वेळ चालू राहणार अशी भीतियुक्त शंका देखिल मनात यायला लागली. ह्याच्या नाकाचा काही तरी सोक्षमोक्ष लावावा म्हणून मी ते नाक खिडकीतून बाहेर टाकले असे दिन्याला म्हणालो(लहान मुलांना आपण फसवतो ना अगदी तसेच; बाकी लहान मुले आणि आताचे हे तिघे ह्यांच्यात ह्या घडीला तरी कोणताच फरक नव्हता). मला वाटले तो आता गप्प बसेल;पण कसले काय आणि कसले काय? तो उठला आणि खिडकीच्या दिशेने धावला. त्या खिडक्यांना गज नव्हते. तो त्या खिडकीवर चढायचा प्रयत्न करत होता;त्याला तिथून उडी मारायची होती; नाक शोधायला जायचे होते. क्षणभर मी गडबडलो. पण लगेच पुढे धावत जाऊन त्याला ओढले आणि खिडकीपासून लांब आणून बसवले. आता हा नवीनच ताप झाला होता डोक्याला. दोन-दोन मिनिटांनी तो उठून खिडकीकडे जायचा प्रयत्न करत होता आणि मी त्याला खेचून पुन्हा लांब नेत होतो. शेवटी एक युक्ती केली. त्याला सांगितले की त्याचे नाक सुध्याला लावले आहे. तो लगेच सुध्याचे नाक ओढायला लागला. आपले नाक मागू लागला. आता सुध्याचे हसणे बंद झाले आणि ओरडणे सुरू झाले. दोघे एकमेकांची नाके खेचायला लागले. सगळाच राडा होऊन बसला.

आता ह्यातनं ह्यांना आणि मला कोण वाचवणार म्हणून मी चिंता करत होतो तेव्हढ्यात नेमीचंद अगदी देवदूतासारखा धावून आला. त्याने हे चाळे बघितले आणि प्रथम त्याला ह्याचे हसू आले पण त्या हसण्याची जागा हळूहळू संतापाने घेतली. नेमीचंद हा खरेच एक सरळमार्गी मुलगा होता. अतिशय शांत आणि प्रेमळ होता. त्यामुळे त्याला ह्या सर्व गोष्टींचा प्रचंड मनस्ताप होत होता. एकीकडे मित्रांना वाईट वाटू नये म्हणून त्यांची मर्जी सांभाळणे आणि दुसरीकडे ह्यातील काहीही वडिलांपर्यंत पोचणार नाही ह्याची खबरदारी घेणे अशा पेचात तो अडकला होता. तो आता आम्हाला चहाला बोलावायला आला होता;पण हे प्रकरण बघून तो मला एकट्यालाच चल असे विनवू लागला. मी दिन्याचे नाक प्रकरण आणि त्यावरून त्याचे खिडकी-उडी नाट्य त्याला सांगितल्यावर त्याने तिथेच चहा पाठविण्याची व्यवस्था करतो असे सांगितले आणि तो तिथून निघून गेला. परत मी त्या माकडांच्यात एकटाच राहिलो.

हळूहळू पद्या वळणावर येण्याची चिन्हे दिसू लागली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचे रडणे आणि आईचा शोध घेणे बरेच कमी झाले होते. मी बोलत होतो ते थोडे -थोडे त्याच्या डोक्यात घुसायला लागले होते. पण सुध्या आणि दिन्याचा धिंगाणा अजून सुरूच होता. तेव्हढ्यात दिन्याने ओकारी होत असल्यासारखे चाळे करायला सुरुवात केली. पुढच्या कल्पनेनेच मला शिसारी आली. मी पद्याला कसे तरी समजावले आणि त्याने त्याच्या दादाला म्हणजे दिन्याला मोरीकडे नेले आणि दिन्याने भस्सकन ओकायला सुरुवात केली. एक सेकंद जरी उशीर झाला असता तरी त्याने ते 'सगळे' सुध्याच्या अंगावर केले असते. त्या दुर्गंधीने मलाच मळमळायला लागले. काय करावे काहीच सुचेना. अती सुगंध अथवा दुर्गंधाची मला कमालीची ऍलर्जी असल्यामुळे माझ्या जीवाची तगमग सुरू झाली; पण मी मला मोठ्या शिकस्तीने जेमतेम सावरले. तेव्हढ्यात नेमीचंद नोकरासह चहा घेऊन आला. त्याने हे बघितले आणि त्याचे टाळकेच सरकले. तो तसाच चहासकट परत गेला आणि त्या नोकराला ते सगळे साफ करायला सांगितले. मला त्याने खुणेनेच खाली बोलावले आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी खाली गेलो.

मोकळ्या हवेत श्वास घेतला आणि इतके बरे वाटले म्हणून सांगू! शब्दच तोकडे पडतील! चहा पिऊन,जरा इथे-तिथे पाय मोकळे करून मी पुन्हा माडीवर आलो तोपर्यंत साफसफाई झाली होती. हसण्या-रडण्याचा भर ओसरला होता आणि मंडळी पुन्हा पेंगायला लागली होती. ह्या तिघांव्यतिरिक्त जे अजून चार जण राहिले होते त्यातला तो छायाचित्रकार(४ गोळ्या) अस्ताव्यस्त आडवा पडला होता. जिवंत आहे की मेला आहे अशी शंका वाटावी इतका गाऽऽऽढ झोपला होता. त्यामुळे त्याचा त्रास नव्हता. पण एका गोष्टीची काळजी वाटत होती की हा संध्याकाळच्या वराती पर्यंत शुद्धीवर येतो की नाही. अजून दोन तास बाकी होते पण त्याची हालचाल जाणवत नव्हती. मंदपणे हालणारा छातीचा भाता त्याच्या जिवंतपणाची साक्ष देत होता. एरवी तो ज्या स्थितीत झोपला होता तसाच्या तसा जवळजवळ ५-६ तास झोपून होता. बाकीचे तिघे केश्या,पक्या आणि गोट्या(प्रत्येकी १-१ गोळी) जागृत होण्याची चिन्हे दिसत होती. आता हे तिघे काय गुण उधळताहेत हे कुतूहलही होते आणि दडपण पण होते.

अर्धा एक तासात हे तिघे उठून बसले. आजूबाजूला बघितल्यावर साहजिकच त्यांना अपरिचित वातावरण दिसले. त्यामुळे ते काही वेळ तसेच मंदपणे बसून राहिले. पहिल्यांदा पक्या माझ्याकडे बघून म्हणाला, च्यायला बाप्पा, तू माझ्या घरी कधी आलास? ह्या केश्या आणि गोट्या बरोबर तर नव्हतास?
मी त्याला आठवण करून दिली, लेका पक्या,अरे आपण इथे राजस्थानात नेमीचंदच्या गावी आलोत. हे तुझे घर नाही. ही तुझी भांग बोलते आहे. तुला चढली आहे. जरा शुद्धीवर ये!
लगेच पक्या.... मी शुद्धीवरच आहे. तूच शुद्धीवर नाहीस. च्यायला माझ्या घरी येऊन मलाच दादागिरी दाखवतोस? गोट्या, त्याला घे रे कोपच्यात! आणि केश्या तू पण उठकी लेका! आपल्याला पिक्चरला जायचंय विसरलास वाटते?
केश्याने हळूच मान वर करून बघितले आणि पुन्हा गुडघ्यात मान घालून बसल्या बसल्या पेंगायला लागला.परत पक्या... ए गोट्या,आपण बाप्पाला पण पिक्चरला नेऊ या काय? बोल,तू,तू काय बोलतोस? बोल!
गोट्या उत्तर देण्याच्या परिस्थितीत नव्हता. अजूनही तो संभ्रमित अवस्थेत बसून होता. एकटक आढ्याकडे बघत. एकटा पक्याच पकपक करत होता. त्याच्या बोलण्याला कोणी प्रतिसाद देत नाही असे पाहून त्याने बाजूलाच झोपलेल्या सुध्या आणि दिन्याला ढोसायला सुरुवात केली. ५एक मिनिटांनी ते दोघे उठून बसले आणि आपापसात काहीतरी असंबद्ध बडबडायला लागले. हळूहळू गोंधळ वाढायला लागला.

मला भीती वाटत होती की जर मित्राचे वडील आत्ता ह्या क्षणी आले तर त्यांना तरी हे ओळखतील की नाही? हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली. खाली रस्त्यावर(ही माडी रस्त्यावरच होती) माणसांची वर्दळ वाढायला लागली. बँडवाले आलेले जाणवत होते. कारण मधून मधून बासरी किंवा ढोलाचा हळुवार आवाज (पूर्वतयारी चालली असावी) यायला लागला होता. तो आवाज ऐकून दिन्या पेटला. तो खिडकीजवळ जाऊन पुन्हा तिथून खाली उतरायचा प्रयत्न करायला लागला. सगळ्यांना बोलवू लागला, ए, चला चला! गणपतीची मिरवणूक येतेय. चला नाचायला चला!
मी पटकन पुढे झालो आणि त्याला आत ओढला आणि गादीवर झोपवले. मला शिव्या देत,माझ्याशी झटापट करत तो उठायचा प्रयत्न करत होता;पण मेंदूवर भांगेचा अंमल असल्यामुळे त्याला धड उभे सुद्धा राहता येत नव्हते. एव्हढ्यात जिन्यावर पावले वाजली. मला आता खात्रीच पटली की आतापर्यंत लपवून ठेवलेली ही वार्ता जर नेमीचंदच्या वडिलांना कळली तर आपली काही धडगत नाही. मी धडधडत्या अंत:करणाने येणार्‍या व्यक्तीची वाट बघू लागलो. सुदैवाने तो नेमीचंदच होता आणि आम्हाला वरातीसाठी बोलवायला तो आला होता. छायाचित्रकाराला उठवायचा प्रयत्न फोल ठरला. तो दादच देत नव्हता. इतरांची अवस्था देखिल असून नसल्या सारखीच होती. म्हणून मी एकट्यानेच चलावे असे नेमीचंदने मला सुचवले. मी त्याला दिन्याचा पुन्हा एकदा सुरू झालेला खिडकी पराक्रम सांगितला आणि अशा अवस्थेत मी कसा येऊ म्हणून विचारले. त्याच्या कडे पण उत्तर नव्हते. एव्हढ्यात जिन्यावर पुन्हा पावले वाजली आणि नेमीचंद लगेच खाली उतरला. त्याचा अंदाज बरोबर ठरला. साक्षात त्याचे वडीलच त्याच्या समोर उभे होते. नजरेनेच त्यांनी इतर सगळे कुठे आहेत म्हणून विचारले आणि नेमीचंदने मान खाली घातली. त्या परिस्थितीत मला त्याची खूप दया आली. पण मी तरी काय करणार? त्याला बाजूला सारून वडील वरती आले. समोरची सोंगे बघून ते हबकूनच गेले. अस्ताव्यस्त पसरलेल्या त्या छायाचित्रकाराला त्यांनी लाथेने ढोसून बघितले आणि मला म्हणाले, हे सगळे केव्हापासून चालले आहे? आणि तू एकटा ह्यांच्यात कशाला अडकून राहिला आहेस? चल खाली चल, ह्यांना लोळू दे खुशाल डुकरासारखे !
मी त्यांना दिन्याचा खिडकी-प्रताप सांगितला,आणि म्हणून,कसे येऊ असे विचारले. त्यावर त्यांनी एका भरभक्कम गड्याला बोलावले. खिडक्या बंद करून कुलुपं लावली आणि त्याला देखरेखीसाठी तिथे बसवून मला घेऊन खाली आले.
सचिंत चेहर्‍याने नेमीचंद खाली उभा होता. त्याच्या कडे बघून म्हणाले, अरे कसले मित्र जोडलेस? लाज वाटते मला तुझा बाप म्हणवून घ्यायला. हा एकच मुलगा सज्जन आहे. त्याच्यामुळे आज आपली सर्वांची इज्जत वाचली. त्या दिन्याने खिडकीतून खाली उडी मारली असती तर आज काय प्रसंग ओढवला असता कल्पना करवत नाही. ह्यापुढे हे तुझे इतर दोस्त आपल्या घरी आलेले मला चालणार नाही.

वरातीचा थाट जबरदस्त होता. जयपुराहून खास मागवलेला पोलिस बँड, त्यामागे नटून थटून नाचगाणी करणारे राजस्थानी कलाकार. पेट्रोमॅक्सच्या बत्त्या डोक्यावर घेऊन चालणारे ते रुबाबदार फेटेवाले आणि नटले -सजलेले स्त्री-पुरुष-मुले असा मोठा रुबाब होता ह्या वरातीचा. मोठ्या मानाने त्यांनी मला नवर्‍या मुलाच्या घोडी पाठोपाठ असणार्‍या सजवलेल्या मोटारीत नेमीचंदच्या बरोबरीने बसवले आणि वरात धीम्या गतीने वधूच्या घराकडे रवाना झाली.

'दिल्लीवर स्वारी!'भाग १

नमस्कार मंडळी. बंगलोर, मद्रास नंतर आपण आता जाणार आहोत दिल्ली दौर्‍यावर. ही दिल्लीवारी खरे तर बंगलोर(१९७३) आणि मद्रास (१९७७) ह्यांच्या मधल्या काळात म्हणजे १९७५ साली मी माझ्या काही जुन्या शाळकरी मित्रांबरोबर केली होती. तर आता ऐका त्याबद्दलची गंमत.

माझा एक शाळकरी वर्गमित्र नेमीचंद हा राजस्थानी जैन. तो माझ्यापेक्षा ३-४ वर्षाने मोठा होता. त्याचे लग्न देखील झाले होते आणि आता त्याच्या धाकट्या भावाच्या, लखीचंदच्या लग्नाला त्याने आम्हा सर्व खास मित्रमंडळीला बोलावले होते. लग्न राजस्थानातील एका खेडेगावात. तिथे जाण्याच्या तिकिटभाड्याचे पैसे त्यानेच भरले आणि आम्ही ६-७ मित्र त्याच्या घरच्या ४०-५० मंडळींबरोबर तिथे जायला निघालो. निघायच्या अगोदर आम्ही ३-४ मित्रांनी असे ठरविले होते की आपण लग्न आटोपल्यावर तिथूनच दिल्लीला जाऊ आणि आसपासचा परिसर पाहून दिल्लीहूनच परतीची गाडी पकडू. आम्ही राजस्थानला जायला निघालो तेव्हा फेब्रुवारी जवळ जवळ संपत आलेला होता. त्यामुळे थंडी वगैरेचा प्रश्न नव्हता आणि म्हणून दिल्लीला जायला हरकत नाही असे सर्वांचेच मत पडले.

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व वर्‍हाडी एका खास आरक्षित रेल्वे डब्यातून राजस्थानला निघालो. अंगात तरुणाईची मस्ती असल्यामुळे एकमेकांची टिंगलटवाळी,फिरक्या घेणे वगैरे चालू होते. लखीचंद आणि नेमीचंद आमच्यात अधून-मधून सामील होत असत. तसेच त्यांची समवयस्क चुलत-मावस-मामे-आते वगैरे भावंडे आमच्यात थट्टामस्करी करण्यासाठी सामील होत. ह्यातील काहींची नवीनच लग्ने झालेली होती म्हणून मधून-मधून आपल्या गृहलक्ष्मीला भेटून येत. प्रवास रात्रीचा होता पण आमच्या साठी मात्र ती रात्र नव्हतीच. प्रत्येकाला बोलण्याचा इतका सोस होता की किती बोलू आणि किती नको अशीच सगळ्यांची परिस्थिती झाली होती. शाळा सोडल्यानंतर जवळ-जवळ ७वर्षांनी आम्ही असे सगळे एकत्र जमलो होतो त्यामुळे इतक्या वर्षांच्या गप्पा साठलेल्या होत्या आणि ह्या गप्पाष्टकामुळे कुणालाच झोप येत नव्हती‌. संपूर्ण प्रवास आम्ही डोळे टकटकीत उघडे ठेवूनच केला‍. झोपेचे नाव सुध्दा येऊ दिले नाही. दुसर्‍या दिवशी दुपारी आम्ही त्याच्या गावाला पोहोचलो. तिथे जाई पर्यंत जेवणाची वेळ झाली होती आणि तिकडचे लोक जेवण तयार ठेवूनच आमची वाट पाहात होते. गेल्या-गेल्या हात-पाय धुऊन जेवायला बसवले. भुकेच्या पोटी दोन घास जरा जास्तच गेले आणि मग जिचा इतका वेळ विसर पडला होता ती 'झोप' आली आणि आम्ही तिच्या स्वाधीन कधी झालो कळले सुध्दा नाही.


नेमीचंद आम्हाला उठवायला आला तेंव्हा संध्याकाळचे ६वाजले होते आणि वातावरणात गारवा जाणवत होता. आम्हाला खरे तर उठावेसे वाटत नव्हते; पण आम्ही त्या गावचे पाहुणे होतो आणि आमच्या बरोबर चहा-पाणी घेण्यासाठी गावातील काही प्रतिष्ठित मंडळी खोळंबली आहेत असे कळले म्हणून नाइलाजाने उठावे लागले. हे सर्व आम्हाला अगोदर माहीतच नव्हते. वर्‍हाडाबरोबर काही खास नवर्‍या-मुलाची मुंबईकर मित्रमंडळी येणार आहेत तेव्हा त्यांचे आगत-स्वागत मोठ्या इतमामातच झाले पाहिजे हा तिकडचा जणू अलिखित कायदा होता असे काहीसे असावे त्यामुळे आम्हाला तिथे फार सन्मानाने वागवले जात होते. आमच्या ६-७ जणांसाठी एका प्रशस्त माडीवर राहण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. गुबगुबीत गाद्या-गिरद्या,अतिशय सुबक अशा रजया. तसेच खास राजेशाही खुर्च्या वगैरे सरंजाम बघितला आणि आम्ही वेडावूनच गेलो. अहो आम्ही सर्व कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसं होतो. आम्ही ह्या गोष्टी फक्त सिनेमातच बघितल्या होत्या आणि इथे साक्षात त्या सर्वांचा उपभोग घेण्याचे सुख आम्ही अनुभवत होतो;अशाने माणूस वेडावणार नाही तर काय? ह्या वेडात भर म्हणून की काय अजून एक गोष्ट घडली. राजस्थानातच नाही तर एकूणच उत्तर हिंदुस्थानात (हिंदी भाषिक पट्टा म्हणूया) 'भांग' सेवनाचे बरेच प्रस्थ आहे. आपल्याकडे जसे घाटावरचे लोक तोंडात दाढेखाली तंबाखूची गोळी ठेवतात तशीच इथली बरीच मंडळी भांगेची गोळी तोंडात ठेवतात. काहीजण थंडाईच्या स्वरूपात घेतात. जसजशी सवय वाढते तसतशी गोळ्यांची(सेवनाची) संख्या वाढते. आणि त्यातच मोठेपणा मानण्याची सवय लागलेली. त्यावर पैजा देखील लागतात... एका वेळी जास्त गोळ्या कोण खातो म्हणून.

तर असेच काही भांगेकस तरुण आम्हाला भेटायला आले. बोलता बोलता भांगेच्या गोळ्यांचा विषय निघाला. मग कोण किती गोळ्या पचवतो ह्यावर थापा-गप्पा झाल्या. मग हळूच एकाने पिलू सोडले. तुमच्यापैकी कोणाची आहे काय हिंमत आमच्या बरोबर स्पर्धा करायची? ह्यात भर घालायला नेमीचंदची काही चुलत-मावस भावंडे देखिल होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १-२ गोळ्यांनी काहीच होत नाही. ३-४ तरी घ्यायला पाहिजे तेव्हाच खरी मजा येते. मी ह्या सर्व भानगडींपासून पहिल्या पासूनच चार हात दूर होतो त्यामुळे मैदानात राहिले ६ मित्र आणि एक आमच्या बरोबर खास मुंबईहून लग्नाचे फोटो काढण्यासाठी आणलेला छायाचित्रकार(हा नेमीचंदचा कौटुंबिक छायाचित्रकार) असे सात जण. त्या सगळ्यांनी ते आव्हान स्वीकारले. ह्यातले काही पट्टीचे 'पिणारे' होते. त्यांना वाटले आपण 'ते' पितो त्यापुढे 'ह्याची' काय मातब्बरी.
मी आपला सगळ्यांना समजावत होतो की, बाबांनो असं काही करू नका. तुमच्या ह्या अशा करण्यामुळे आपल्या सर्वांची बदनामी होईलच पण आपल्या मित्राच्या वडिलांची सुध्दा नाचक्की होईल(ह्या गावात ते अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणले जायचे). आपण इथे लग्नाला पाहुणे म्हणून आलो आहोत ह्याचे भान ठेवा आणि हे रंगढंग आपापल्या घरी गेल्यावर करा.
पण माझे कोणीच ऐकेना. हा कार्यक्रम दुसर्‍या दिवशी सकाळी करायचे त्या सगळ्यांनी ठरवले. गोळ्यांचा बंदोबस्त ते गाववाले करणार होते. रात्री जेवणाच्या वेळी ही गोष्ट मी नेमीचंदच्या कानावर घातली म्हणून त्याने ही सर्वांना समजवायचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. मित्रांनी त्याचे बोलणे थट्टेवारी नेले आणि ’तसे काही होणार नाही, उगीच घाबरू नकोस’ वगैरे मुक्ताफळे उधळली.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी नवर्‍या मुलाची घोडीवरून वरात निघून ती नवरीच्या घरी जायची होती आणि त्यात आमची उपस्थिती अत्यंत आवश्यक होती. ह्या वरातीच्या वेळी आम्ही हजर राहायचे आहे हे आम्हाला त्याच्या वडिलांनी बजावून सांगितले. आम्ही सर्वांनी होकारही भरला होता. सकाळी नास्त्याचे वेळी ह्या सर्वांनी तिथे असणार्‍या वडील मंडळींचा डोळा चुकवून, कुणी एक,कुणी दोन तर कुणी तीन अशा गोळ्यांचे सेवन केले. नंतर दुपारच्या जेवणापर्यंत काहीच कार्यक्रम नव्हता म्हणून आम्ही माडीवर परत आलो. तास दोन तास मंडळी गप्पा मारण्यात रंगली आणि बोलता बोलता एकेक जण झोपायला लागला‍. जेवणाची वेळ झाली तरी कोणी उठवूनही उठेना म्हणून मग मी एकटाच जेवायला गेलो. मला बघितल्यावर नेमीचंदच्या वडिलांनी बाकीचे कुठे आहेत म्हणून विचारले. ते येतातच आहेत असे सांगून मी नेमीचंदला शोधायला पळालो. तो सापडल्यावर मी त्याला झाला प्रकार सांगितला. नेमके काय झाले असावे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने ७-८ ताटे भरून परस्पर माडीवर पोहोचवायला सांगितली. आम्ही दोघे माडीवर आलो आणि पुन्हा ह्या सर्वांना उठवायचा प्रयत्न केला पण कोणी उठेचना. ताटं तशीच झाकून ठेवली आणि आम्ही दोघे जेवायला खाली गेलो.

जेवण उरकून तासाभरानं आम्ही दोघे परत आलो. त्यांना उठवायचा प्रयत्न केला. जेमतेम ते उठले,कसे तरी अन्न पोटात ढकलले आणि पुन्हा झोपले. नेमीचंदने कपाळावर हात मारून घेतला, म्हणाला, कशाला मी ह्यांना बोलावले असे वाटतंय. आता माझ्या वडिलांना हे कळले तर एकेकाला हंटरने फोडतीलच आणि बरोबर मलाही चोपतील. निदान संध्याकाळी वराती पर्यंत शुध्दीवर आले तर नशीब म्हणायचे.
विषण्ण मनाने तो निघून गेला आणि मी त्या कुंभकर्णांच्या सहवासात एकटा पडलो. काय करावे मला सुचेना. वेळ जात नव्हता. कोणी उठण्याचे नाव घेत नव्हते. वाट बघण्या व्यतिरिक्त माझ्या हातात काहीच नव्हते.बर्‍याच वेळाने एकजण हालचाल करू लागला. हा पद्या होता. माझा वर्गमित्र दिन्याचा धाकटा भाऊ. त्याने एकच गोळी खाल्ली होती. उठल्या उठल्या तो रडायला लागला. मला कळेना हा रडतोय का? मी त्याला विचारलं तर तो सांगायला लागला, मला आईची आठवण येतेय! आणि मोठमोठ्याने आईला हाका मारायला लागला, मम्मी तू खंय असा? मम्मी तू खंय असा?

हा प्राणी गोंयकार होता आणि एरवी मराठीत बोलणारा हा कोंकणी बोलत होता(घरी कोंकणीच बोलतात). मी त्याला समजावून सांगतोय, अरे बाबा, आपण इथे राजस्थानात लखीचंदच्या लग्नाला आलोत,इथे तुझी आई कशी येणार?
पण एक नाही आणि दोन नाही. ह्याचे आपले रडगाणे सुरूच, मम्मी तू खंय असा?
ही रडारड ऐकून 'सुध्या'(२गोळ्या) जागा झाला. मला जरा बरे वाटले. चला एक माणूस तरी मदतीला आला. पण कसले काय आणि कसले काय! तो उठला तो हसायलाच लागला. हसत हसत काही तरी असंबध्द बोलत होता. मी त्याला गदगदा हालवले आणि म्हटले, अरे सुध्या, लेका हसतोस काय? हा पद्या बघ रडतोय आईची आठवण काढून. तू जरा त्याची समजूत घाल. सांग त्याला जरा वस्तुस्थिती समजावून सांग!
त्यावर तो पुन्हा हसायला लागला आणि पद्याकडे बघून जोरजोरात हसत हसतच ओरडू लागला, पद्याची आई नाही, पद्याची आई नाही!
ह्यामुळे पद्या अजून पिसाळला आणि रडू लागला आणि सुध्या टाळ्या वाजवत हसू लागला.

आता मला (एकही गोळी न घेता) गरगरायला लागले. कळेना ह्या लोकांबरोबर मी का आणि कसा आलो. वाटले हे झोपले होते तेच बरे होते . आता झोपलेत त्यांनी असेच झोपून राहावे म्हणून मी जोरजोरात अंगाईगीत गायला लागलो.