फडके साहेबांना भेटून पुन्हा कार्यालयात परत आलो तर नायर साहेब माझी वाट पाहात थांबलेत असा निरोप मिळाला. मी तडक त्यांच्या खोलीत गेलो...नायर साहेब कामात व्यग्र होते पण त्यांनी लगेच आपले काम बंद करून मला बसायची आज्ञा करून शिपायाला कॉफी पाठवायला सांगितली.
फडके साहेब काय काय म्हणाले ते मी नायर साहेबांना सविस्तर सांगितले. त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले. मध्यंतरी कॉफी देखिल आली. तिचे घोट घेता घेता नायरसाहेबांनी मला प्रश्न केला....मग,तुझा काय निर्णय आहे?
(माझे आणि नायरसाहेबांचे बोलणे हिंदी/इंग्रजीतून झालेले असले तरी इथे मी ते मराठीतच मांडत आहे.)
मी म्हटलं...सर,माझा एक कलमी कार्यक्रम आहे...मला मुंबईला जायचंय परत,लगेच,लवकरात लवकर.
अरे,पण आता बदली झालीच आहे आणि एकावेळी दोन बढत्या मिळताहेत तर घेऊन टाक...तसेही तीन वर्षांनी पुन्हा मुंबईला जाशीलच...मग बढत्यांमुळे निदान तुझे थोडेफार आर्थिक नुकसान तर भरून येईल की.
सर,मी आजवर पैशाला कधीच प्राधान्य दिलेले नाही...हे आपण जाणता. माझी बदली आकसाने झालेय...हेही जाणता...अशा परिस्थितीत केवळ समजूत पटावी म्हणून मला बढत्या देऊन कायमचे मुंबईपासून तोडण्याचा हा कुटिल डाव आहे असे माझे प्रांजळ मत आहे.
ते कसे काय? माझ्या काही लक्षात येत नाहीये...जरा उलगडून सांग.
सर, आपल्या आस्थापनेत बढतीबरोबर बदली ही अपरिहार्य आहे...ती कुणालाही चुकत नाही...हे तुम्हाला माहित आहेच.....माझी कधीही बदली होऊ नये म्हणून...मला ह्यापुढे कधीही बढती नको ... मी तसे लिहून दिले...आस्थापनाने ते लेखी स्वरूपात मान्य केले आहे. त्यानंतर मी कधीही मला बढती का देत नाही, माझ्यापेक्षा कनिष्ठांना का दिलीत असे विचारलेलेही नाही...मी माझ्या एका जागीच स्थिर राहण्यामुळे संतुष्ट आहे...अशा परिस्थितीत माझी बदली केली ती सर्वस्वी चूक आहे आणि ती बदली कायम राहावी...इतकेच नव्हे तर ह्यापुढेही सतत बदली होत राहावी म्हणून हे बढतीचे गाजर आहे असा मला पूर्ण संशय आहे.... मला बढतीचं कधीच आकर्षणं नव्हतं आणि नाही.
हं. हा मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे. तरीही एक गोष्ट पक्की आहे की एकदा फडकेसाहेब म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत ते तुला लगेच मुंबईला परत पाठवू शकत नाहीत...ह्याचा अर्थ तुला निदान तीन वर्ष तरी इथे काढावीच लागतील...धारवाडकरसाहेबाला निवृत्त व्हायला अजून चार वर्ष तरी आहेत...तेव्हा कदाचित तुला अजून एक वर्ष इथेच किंवा अन्यत्रही काढावे लागेल...अशा परिस्थितीत मला वाटतंय की तू बढती स्वीकारावीस...एवीतेवी तुझी बदली झालीच आहे,नुकसान तर झालंच आहे... तर मग आता बढती घेऊन टाक...निदान आर्थिक फायदा तरी होऊ दे.
सर, आता दुसरा कोणताही मार्ग नाही का? काय करावे तेच सुचत नाहीये...माझी चूक नसतांना,माझी आत्तापर्यंतची उत्तम वागणूक,कामातली तत्परता,प्रावीण्य वगैरे सगळे गुण एका क्षणात मातीमोल झाले?
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही मि. देव....पण आपण ह्यातूनही काढू काहीतरी मार्ग...मला तरी वाटतंय की सर्वप्रथम तू बढती स्वीकारावीस.
सर, आता ह्या घटकेला बढती स्वीकारून काय फायदा...माझ्या आयुष्यातील दहा वर्ष मी फुकट घालवलेत त्यासाठी...दहा वर्षांपूर्वी मला पहिली बढती देण्यात आली होती...जी मी नाकारली....मला सांगा...मी जर बढती स्वीकारण्याचं खरंच ठरवलं तर मला दहा वर्षांपूर्वीच्या त्या तारखेपासून आर्थिक लाभ मिळेल काय? तसे असेल तर एक वेळ विचार करता येईल...खरं तर मला त्यातही रस नाहीये कारण मला मुंबईला लवकरात लवकर परत जायचंय...पण ते अशक्य असेल तर मग हा पर्याय स्वीकारण्यावाचून गत्यंत्तर नाही.
ओके...तू जर तयार असशील तर मी पर्सनली फडकेसाहेबांना कन्व्हीन्स करायचा प्रयत्न करतो ज्यामुळे तुला मागील सगळी थकबाकी मिळू शकेल... एनीवे, तू आता शांत राहा. कामात मन रमव,बाकीचं माझ्यावर सोपव. तुला हवी तेव्हा,हवी तितकी सुट्टी घेऊ शकतोस...पण लक्षात ठेव...मन शांत ठेव...सद्द्या वाईट दिवस आहेत...अशा अवस्थेत राहाणं जरी त्रासदायक असलं तरी आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत हे लक्षात ठेव...तू इथे माझ्याबरोबर असतांना तुला कसलीही तोशीस पडणार नाही ह्याची मी खात्री देतो...बट बी पॉजिटिव्ह.
नायर साहेब माझी समजूत घालत होते...खरं तर माझी परत जाण्याची मूळ मागणी पूर्ण करता येत नसल्यामुळे तेच अस्वस्थ होते...पण वरवर मला धीर देत होते...हे मला माहित होते....अहो,कसे म्हणून काय विचारता? मुंबईत ते माझ्या बरोबर पाच वर्ष होते आणि मी ज्या खात्यात काम करायचो त्या खात्याचे ते साहेब होते....माझ्या कामातल्या तत्परतेमुळे,प्रावीण्यामुळे त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून कधीही उणा शब्द ऐकून घ्यावा लागलेला नव्हता...अगदी डोळे मिटून ते माझ्यावर विसंबून असायचे आणि मीही त्यांचा कधी अपेक्षाभंग होऊ दिला नाही. मुंबईत असतांना मी त्यांचा तो कार्यकाल कमालीचा यशस्वी केलेला होता...आणि आता आज त्यांची पाळी होती...मला मदत करण्याची...परतफेड करण्याची....पण दूर्दैवाने ते त्यांच्या अधिकार कक्षेबाहेरचे काम होते...त्यामुळेच ते मनातल्या मनात अस्वस्थ होते.
नायर साहेबांनी जबाबदारी स्वीकारली म्हटल्यावर ते ती काहीही करून यशस्वी करतीलच ह्याची मला खात्री होती त्यामुळे थोडासा आश्वस्त झालो. माझा प्रस्ताव नायरसाहेबांनी फडके साहेबांच्या कानावर घातला. फडकेसाहेबांनी नायरसाहेबांना तो प्रस्ताव लेखी स्वरूपात पाठवायला सांगितला..तसा लेखी प्रस्ताव नासांनी अतिशय काळजीपूर्वक तयार केला....मला वाचून दाखवला आणि मग फसांकडे तो पाठवून दिला.
आता ह्या प्रस्तावाला उत्तर यायला निदान आठ-पंधरा दिवस तरी लागणार होते. मध्यंतरी मी आणि रामदास सिन्हा-बर्मन साहेबाकडे राहायला गेलो. त्याचा फ्लॅट चांगला ऐसपैस होता. आम्हा दोघांना मिळालेली खोली १२*१२ ची अगदी प्रशस्त अशी होती. दोन मोठ्या खिडक्याही होत्या...वारा आणि प्रकाश भरपूर होता. पण खोली पार रिकामी होती. कपाट,पलंग,टेबल,खुर्ची वगैरेंपैकी एकही वस्तू त्यात नव्हती. आम्ही खोली एकदा झाडून घेतली आणि आपापल्या पथार्या पसरल्या. समोरासमोर असणार्या दोन खिडक्यांच्या गजांना दोर्या बांधून कपडे वाळत घालण्याची सोय केली. मी आणि रामदास...दोघेही तसे मधमवर्गातून आलेलो असल्यामुळे अशा गोष्टींची आम्हाला सवय होतीच...त्यामुळे तशी फारशी अडचण आली नाही.
फसा हे तांत्रिक विभागाचे सर्वोच्च साहेब होते...त्यांना त्यांच्या हाताखाली काम करणार्या कोणत्याही माझ्यासारख्याच तांत्रिक कर्मचार्यांची बदली/बढतीची शिफारस करण्याचे पूर्ण अधिकार होते....पण आमच्याकडे दुसरा एक विभाग होता...प्रशासन विभाग....त्यांच्या हातात आर्थिक आणि प्रशासनिक अधिकार होते. आता इथे असणारे साहेब लोक अशा शिफारसींची अंमलबजावणी करतांना त्यांचे काही निकष लावून करत. इथल्या साहेब लोकांचे म्हणणे पडले की काही विशिष्ट परिस्थितीत आणि फसांच्या अधिकारात जरी अशी बढती देता येऊ शकत असली तरी...त्या अनुषंगाने मागणी करण्यात आलेली थकबाकी देण्यात मात्र अनंत अडचणी आहेत...त्यासाठी आर्थिक विभागाची परवानगी घ्यावी लागेल...जी मिळणे सर्वथा अशक्य आहे...एवंम...फक्त बढती...अपवादात्मक बाब म्हणून एकदम दोन बढत्या देण्यास कोणतीही अडचण नाही...तेव्हा ती देण्यास पूर्ण अनुमती आहे...तेव्हा त्यासंबंधाने योग्य त्या बदलांसहित प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पुन्हा पाठवण्यात यावा...
हे असे उत्तर येणार हे मला खरे तर अपेक्षितच होते...त्यामुळे मला त्याचे विशेष काही वाटले नाही...बढती घेण्याचा आता प्रश्नच नव्हता... पुन्हा मुंबईला कसे जायचे ह्याचाच विचार सुरु झाला. इतक्यातच काही चमत्कार घडण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे मी सुट्टी घेण्याचा विचार केला...त्याप्रमाणे नासांना म्हटले...रितसर महिनाभार सुटीचा अर्ज दिला... त्यांनी लगेच रुकार दिला ...आणि मी लगेच मुंबईसाठी प्रस्थान ठेवले.
म्हणतात ना..अशुभस्य कालहरणम्!
२ टिप्पण्या:
ओघवत्या लेखनाने गुंतवले आहे. पुढे काय? लवकर येउ दे. वाचतो आहे.
सहज
धन्यवाद सहजराव.
टिप्पणी पोस्ट करा