माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
रम्य दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रम्य दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१८ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग १४

रामूच्या विक्षिप्तपणाचे एकेक नमूने असे आहेत की ते आठवले की मी पुन्हा त्या जून्या काळात पोहोचतो.

सुरुवातीला आमच्या कार्यालयाची वेळ सकाळी सव्वा दहा ते संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत असे. वेळेआधी दहा मिनिटे कार्यालयात पोहोचणे आणि वेळेनंतरच बाहेर पडणे ह्याबाबतीत आम्ही सगळेचजण दक्ष होतो. आता खरे तर ह्यामधे आम्ही विशेष काही करत होतो अशातला भाग नव्हता. आम्ही नियमांचे यथायोग्य पालन करत होतो इतकेच. पण तरीही ह्याबाबतीत रामू खूष नसायचा. वेळेवर कार्यालयात पोहोचण्याची त्याची व्याख्या वेगळीच होती.

बर्‍याचदा तो खूपच लवकर म्हणजे नऊ-साडेनऊलाच कार्यालयात येऊन बसत असे. आम्ही आमच्या नियमित वेळी म्हणजे सव्वा दहाच्या आधी तिथे पोहोचल्यावर त्याच्यासमोर ठेवलेल्या हजेरी-पुस्तकात सह्या करताना त्याचे व्याख्यान ऐकून घ्यावे लागे. आता का म्हणून काय विचारता राव? अहो आम्हालाही हाच प्रश्न पडत असे. त्यावर रामूचे असे खास उत्तर होते..... कार्यालयात साहेब(म्हणजे रामू बरं का!) येण्याच्या आधी जो कर्मचारी येईल तो वेळेवर आला असे धरले जाईल आणि साहेबानंतर जो येईल तो उशीरा आला असे समजून त्याला हे व्याख्यान ऐकून घ्यावे लागे.

आता साहेब जर सकाळी सकाळी आठ वाजता जरी आला तरी त्यानंतर अर्ध्या मिनिटांनी आलेला कर्मचारी देखील उशीरा आला असे गणले जाईल आणि साहेब दूपारी १२-१ वाजता जरी आला तर त्याच्या आधी अर्धा मिनिट आलेला कर्मचारी हा वेळेवर आलाय असे धरले जाईल असा काहीसा विक्षिप्तपणाचा त्याचा नियम होता.

आता मला सांगा की जर सव्वा दहा ते सव्वा पाच ही कार्यालयाची वेळ ठरल्यानंतर हे असे रोजच रामूच्या लहरीप्रमाणे बदलणारे वेळेचे बंधन पाळणे कसे शक्य होते. आम्ही त्याला हे सांगूनही बघितले की,सर,इफ यू डू नॉट ऍग्री विथ दी शेड्युल (आधीपासून ठरलेली वेळ) देन टेल अस दी एक्सॅक्ट टाईमिंग फॉर आवर अटेंडन्स. वुई शॅल फॉलो इट. बट डोंट से दॅट वुई आर लेट! पण त्याचा आपला एकच हेका की तुम्ही माझ्या आधी कार्यालयात हजर पाहिजे. आता हा माणूस त्याच्या मर्जीप्रमाणे कोणत्याही वेळी येणार आणि वर आम्हालाच ऐकवणार हे आम्ही कसे सहन करायचे? शक्य तरी होते काय? मग आता ह्यावर उपाय काय? उपाय तर सुचत नव्हता पण काढायला तर लागणार होता.

मग आम्ही सात जणांनी आपली डोकी एकमेकांवर घासली(शब्दश: नाही) आणि त्यातून एकच मार्ग दिसला तो म्हणजे जशास तसे वागायचे. मग ठरले तर! रामूलाच दमात घ्यायचे.

दूसर्‍या दिवशी आम्ही नेहमी प्रमाणे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कार्यालयात प्रवेश केला तर रामू आलेलाच होता. आम्ही सगळे एकदमच सह्या करायला गेलो तर म्हणाला, मिस्टर,यू ऑल आर लेट अगेन आय से! आय टोल्ड, यू पीपल टू कम ईन टाईम अँड यू ऑल हॅव नॉट ओबेड माय ऑर्डर्स आय से! आय विल इश्यू यू मेमो आय से!
तेव्हढ्यात चिंटूने पहिला चेंडू टाकला.
सर,व्हेन डीड यू केम? (साहेबालाच प्रतिप्रश्न!)
नाईन तट्टी आय से!... रामू
सर वुई केम ऍट नाईन फिफ्टीन आय से! गजा रामूची नक्कल करत बोलला. रामू एकदम आश्चर्यचकितच झाला; पण सावरून बोलला, देन व्हेयर वेअर यू? आय हॅव नॉट सीन यू आय से!
साब, हम चाय पी रहे थे. हमने तुमको देखा आते समय. आज तुम लेट है!... इति पदू.

ह्या आकस्मिक हल्ल्याने रामू गारद झाला आणि त्याने आम्हाला सर्वांना सह्या करायला हजेरी-पुस्तक दिले. रामू हा असा बालीशपणा बर्‍याच वेळा करायचा. खरे सांगायचे तर साहेब बनण्याचे कोणतेही गुण त्याच्यात नव्हते. एक नशीब आणि दुसरे चमचेगिरी ह्या भांडवलावरच तो इथपर्यंत आला होता. त्यामुळे आम्ही त्याच्याशी कोणत्याही भाषेत(अनौपचारीक)बोललो तरी चालत असे. लहान मुलासारखेच रागवायला आणि खूष व्हायलाही त्याला वेळ लागत नसे.

क्रमश:

१७ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग १३

माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आमच्यावर फक्त दोनच साहेब होते. त्यात एक मद्रासी आणि दुसरा एक मराठी होता. मद्रासी हा आमच्या मुंबई कार्यालयाचा क्रमांक एकचा साहेब होता आणि मराठी दोन क्रमांकाचा साहेब होता. ह्या मद्राशाचे नाव रामचंद्रन असे होते;पण आम्ही सगळेजण त्याच्या अपरोक्ष त्याला 'रामू' म्हणत असू. दुसरे मराठी साहेब लघाटे म्हणून होते. त्यांचा मात्र आम्ही मान राखत असू.

तर हा रामू हा तसा विक्षिप्त प्राणी होता. त्याला रागवायला आणि थंड व्हायला अजिबात वेळ लागत नसे. अत्यंत संशयी,तितकाच बालीश आणि हावरटही होता. चमचेगिरी आणि मस्केबाजी मधे बहुदा त्याने पीएचडी केलेली असावी. नाही म्हणायला तो दूरसंचार आणि दळणवळण ह्या विषयातला पदवीधर अभियंता होता; पण त्याचे त्या विषयातले ज्ञान अगदीच कामचलाऊ होते. पण तरीही तो मुंबई शाखेचा प्रमुख होता. त्याच्या विक्षिप्त आणि बालीश वागण्याचा प्रसंगी आम्हाला त्रासही होत असे;पण जास्त करून त्यामुळे मनोरंजंच होत असे. एखाद्या विनोदावर तो अगदी मनसोक्त हसत असे आणि त्यावेळी त्याची लांबलचक जीभ बाहेर काढून एका विशिष्ठ पद्धतीने तो हसत असे (कुत्रे नाही का जीभ बाहेर काढून बसतात त्या पद्धतीने). आम्हाला त्याच्या त्या हसण्याचीच खूप मजा वाटायची. त्याच्या मनात असेल तर तो तासंतास आमच्याशी घोळक्यात उभा राहून गप्पा मारत असे. त्यावेळी त्याची उभे राहण्याची पद्धतही अतिशय मजेशीर होती. दोन्ही पायांची कात्री सारखी रचना करून आणि दोन्ही हात पाठीशी बांधून तो उभा राहत असे. मधनं मधनं आळोखे-पिळोखेही देत असे. कधी कधी जोरजोरात जांभया देत असे.

ह्या उभे राहण्यातही त्याची अजून एक विशेष अशी लकब होती. तो दोन्ही पायांची कैची आणि पाठीमागे हातांची कैची करून उभा असतानाच मधून मधून पुढेही सरकत असे. त्यावेळी त्याच्यासमोर उभ्या असणार्‍या व्यक्तिला अजून मागे व्हावे लागे. असेच बोलण्याच्या नादात तो त्या समोरच्या व्यक्तीला हळूहळू भिंतीला टेकवत असे आणि अगदी त्या व्यक्तीला चिकटत असे आणि एखादे गुपित सांगितल्यासारखे त्याच्याशी बोलत असे. आम्हाला,बहुतेक सगळ्यांना त्याची ही सवय माहित असल्यामुळे आम्ही त्याच्या त्या हालचाली बरहुकूम आपली स्थिती बदलत असू आणि त्याच्या कचाट्यात कधी न सापडता त्यालाच भिंतीवर आपटवत असू; पण आमचा 'अंकल’(ज्योसेफ) हा त्याचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत असे आणि त्याच्या हालचालींकडे दूर्लक्ष झाल्यामुळे त्याच्या कचाट्यात सापडत असे. वरून बोलताना रामुची थुंकीही उडत असे. त्यामुळे नेहमी अंकल वैतागत असे;पण प्रत्येकवेळी नेमका तोच सापडायचा आणि मग आम्हाला विचारायचा,शी रे! तो रामू काय होमो हाय काय? जवा बी मी बगतो तो मलाच चिटकतो. तुमाला कोनालाबी कसा चिटकत नाही?
मग गजा त्याला सांगत असे, अरे अंकल,तू त्याचे अगदी मन लावून ऐकतोस ना म्हणून तो तुझ्यावर खूष आहे. आम्ही कसे एकदम सेफ डिस्टन्स ठेऊन असतो. तू कशाला एव्हढा इनव्हॉल्व होतो त्याच्या थापांमधे? जस्ट टेक लाईटली मॅन! ही इज जस्ट फेकींग! नाऊ ऑनवर्डस कीप वॉच ऑन हीज मूव्हमेंटस अँड ऍडजस्ट युवर्सेल्फ! ओके?
अंकल मान डोलवत असे ; पण पुढच्या वेळी देखिल तोच सापडे आणि पुन्हा गजाची लेक्चरबाजी चालायची. पण अंकल आणि रामू दोघेही सुधारले नाहीत.

कार्यालयात पोहोचल्यानंतर आम्हा सातजणांचे(मी,पदू,ज्यो,गजा,दादा,चिंटू आणि यश. कधी कधी सदानंदही असे.) सामुदायिक चहापान चाले. मी एकटा कॉफी पिणारा आणि बाकी सगळे चहाबाज होते. अशा वेळी नेमका एक दिवस रामू आला आणि आरडा-ओरड करायला लागला.
कमॉन आय से! डोंट टेक टी ऑल ऑफ यू ऍटे टाईम आय से!
गजाने त्यातला मतलब ओळखला(ह्या असल्या बाबतीत गजा कमालीचा हुशार होता). त्याने लगेच उठून त्याला बसायला खूर्ची दिली आणि आपला चहा त्याच्यापुढे सरकवला.
रामू खोट्या विनयाने, नो,नो करत राहिला;पण गजाने त्याला गोड गोड बोलून तो चहा प्यायला लावलाच. झालं! चहा प्यायल्यावर रामू एकदम खूष! मग अतिशय सौम्यपणे, डोंट टेक टी टुगेदर आय से! यु नो!इट लुक्स ऑड आय से! वगैरे सांगून लगेच गायब.

त्या दिवसापासून तो रोज आमच्या त्या चहाच्या वेळी येऊन घुटमळत असे आणि गजा त्याला लगेच चहा प्यायला बसवत असे. आता आम्हाला वाटले हा चहा, गजा स्वतःच्या पैशाने पाजतोय;पण बेटा म्हणतो कसा? अरे तो एका चहामधे खूष आहे ना? आपल्याला त्रास देत नाही ना? मग, ह्या चहाचे पैसे आपण सगळे मिळून देऊ या! काय कशी आहे माझी आयडिया?
मी म्हटले, गजा,लेका आयडिया चांगली आहे;पण हे आपल्याला आणि त्यालाही शोभत नाही. एका यक:श्चित चहासाठी जो माणूस असल्या गोष्टी खपवून घेतो तो उद्या अजूनही काही नाटके करू शकेल; आणि खरे सांगायचे तर तो चहा त्याला तूच पाजतोस असा त्याचा समज आहे आणि त्याचा तू पुरेपूर फायदा घेतो आहेस हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे.
काय फायदा घेतला मी सांग ना?.... इति. गजा.
किती सीएल(कॅज्युएल लीव्ह-- आकस्मिक रजा) वाचवल्यास ते सांग ना? अरे आम्हाला सगळं माहित आहे. उगीच मोठेपणाचा आव आणू नको..... इति. पदू.
गजाचा आवाजच बसला.
ह्याच गजाने मधल्या काळात कार्यालयाला दांड्या मारूनही अजून त्याच्या बाराच्या बारा (वर्षाला बाराच असतात)आकस्मिक रजा शाबूत होत्या त्या केवळ ह्या चहाच्या जोरावर.

क्रमश:

१६ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग १२

दादाच्या 'दादागिरीचा' हा दुसरा किस्सा ऐका.

आमच्या कार्यालयाचे काम जसजसे वाढू लागले तसतसे नवीन कर्मचारी भरती होऊ लागले. त्या काळात बरेच अभियांत्रिकी पदवीधर(बीई-इलेक्ट्रॉनिक्स) भरती झाले. आम्ही जे आधी भरती झालो होतो ते सगळे आता सेवाकालामुळे ज्येष्ठ झालो होतो;पण हे येणारे नवे अभिभावक मात्र पदाने आमच्या वरचे होते. ह्या येणार्‍या लोकांची आम्ही जरा मजा करावी म्हणून एक खेळ खेळत असू. हा खेळ, जो उमेदवार पहिल्या दिवशी कार्यालयात रुजू होण्यास येत असे त्यावेळीच होत असे. एका खोलीत दादा,चिंटू आणि गजा हे तिघे बसत. कार्यालयाच्या दरवाजातून एखादा उमेदवार आत आला की मी त्याची कागदपत्रे पाहून त्याला हे तिघे बसलेल्या खोलीत घेऊन जात असे.

दादाचे आणि चिंटूचे वजनदार व्यक्तिमत्व, गजाचे त्याच्या बोकडदाढीमुळे (फ्रेंच कट) एखाद्या साहेबासारखे दिसणे ह्यामुळे आलेल्या त्या उमेदवारावर विलक्षण छाप पडत असे. मग चिंटू त्याच्या फर्ड्या इंग्लिशमधे त्यांची माहिती विचारून घेत असे. तो उमेदवार 'सर‌,येस सर' करत करत अतिशय अदबीने त्याची उत्तरे देई. मग गजा काही तरी जुजबी प्रश्न विचारत असे. त्याची उत्तरे देऊन झाली की मग दादाकडे सगळ्या नजरा लागत. दादाचा आणि इंग्लिशचा खास दोस्ताना असल्यामुळे तो काहीच बोलत नसे. फक्त त्या व्यक्तिची सगळी कागदपत्रे अतिशय बारकाईने बघत असल्याचे नाटक करत असे आणि मग त्याला रुजू करून घ्या असे खूणेनेच सांगत असे. तो उमेदवार माझ्याबरोबर त्या खोलीच्या बाहेर पडला की मागे हास्याचा मोठा स्फोट झाल्याचे ऐकून उमेदवार गोंधळला की मग आम्ही त्याला पुन्हा खोलीत बोलावून वस्तुस्थिती समजावून देत असू. मग नाईलाजाने त्यालाही ह्या हास्यकल्लोळात सामील व्हावे लागे.

अशाच एका प्रसंगी जगदीश नावाचा गुजराथी उमेदवार आला. त्याच्याबरोबर हे सगळे नाटक चालू असेपर्यंत तो अतिशय दडपणाखाली होता;पण हे सगळे नाटक होते असे त्याला आम्ही नंतर सांगितल्यावर त्याने तिथेच आई-माई वरून शिव्या द्यायला सुरुवात केली. दादाने उठून खिशातून रामपुरी काढून त्याच्यासमोर उघडल्यावर तो थरथर कापायला लागला आणि 'मारा बाप! मरी गयो'! म्हणत पळत सुटला.

हा जगदीश दिसायला एखाद्या 'सडक-सख्याहरी' सारखा होता. तोंडात अखंड शिव्या असायच्या. एकदा शिव्या देणे सुरु झाले की त्याच्या शिव्या संपतच नसत. 'लाखोली' म्हणतात तसला प्रकार होता. मात्र तो दादा आणि चिंटूला टरकून होता आणि त्यांच्याशी अतिशय नरमाईने वागत असे. हा जगदीश वेळेच्या बाबतीत एकदम पक्का होता. आमच्या कार्यालयात चार पाळ्यात काम चालायचे. ह्यातील ज्या पाळीचा हा प्रमुख असायचा त्यातील सगळ्यांना तो अखंड शिव्या देत असे‌. समजा बारा वाजताची त्याची पाळी असली की कार्यालयाच्या मुख्य दरवाजापाशी ११-४५ वाजता येऊन उभा राहायचा. ११-५५ झाले की तो आत येत असे. तोपर्यंत बाहेर सीगारेट फूंकत उभा राही. येण्याजाण्याच्या बाबतीतच नव्हे तर जेवायला जाताना आणि न्याहरीच्या वेळाही अगदी काटेकोरपणाने पाळत असे. काम मात्र यथातथा असे. तो अभियांत्रिकी पदवीधर कसा झाला हे मात्र एक कोडे होते. त्याच्यापेक्षा आम्हालाही त्या विषयातले जास्त ज्ञान होते हे वेळोवेळी सिद्ध झालेले होते;पण पदवी असल्यामुळे तो आमच्यापेक्षा वरच्या पदावर काम करत असे आणि जमेल तशी मग्रुरीही करत असे.

असेच एकदा एकाला त्याने धमकावले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ज्याला धमकी दिली तो एक सदगृहस्थ होता. मारामारी,भांडणं अशा क्षुद्र गोष्टींपासून नेहमीच चार हात दूर असे. अतिशय सौम्य स्वभावाच्या त्या माणसाला अशी धमकी मिळाल्याने साहजिकच तो अतिशय चिंताक्रांत झाला. माझ्याशी बोलताना त्याने मला सहजच ही गोष्ट सांगितली आणि मी ती दादाच्या कानावर घातली. दादाने पुढचा मागचा विचार न करता भर कार्यालयात जगदीशला झोडपले.

जगदीश ही तक्रार घेऊन वरीष्ठांकडे गेला;पण त्याच्या बाजूने एकही व्यक्ति साक्षीदार म्हणून उभी राहिली नाही. मग जगदीशच्या बरोबरचा एक वर्मा नावाचा अधिकारी तिथे होता. त्याची साक्ष काढावी असे जगदीशने साहेबांना सांगितले. साहेबाने वर्माला बोलावले आणि आम्ही चिंतेत पडलो. कारण वर्मा हा एकदम स्वच्छ चारित्र्याचा आणि खरे ते बोलणारा माणूस होता. आता त्याच्या साक्षीवर सगळे अवलंबून होते. वर्माने दादावर जगदीशद्वारे केलेल्या आरोपावर अतिशय मुत्सद्दीपणे आपली साक्ष दिली.
तो म्हणाला, सर, मी त्यावेळी कामात होतो आणि काय नेमके झाले हे मला खरेच माहित नाही!

वर्मा धडधडीतपणे खोटे बोलला होता(धर्मराजानंतर खोटे बोलणारा हा 'आधुनिक धर्मराज' आहे-इति. दादा) त्यामुळे तक्रार निकालात निघाली आणि दादावर कोणतीच कारवाई झाली नाही. उलट जगदीशलाच एक प्रेमपत्र(मेमो) मिळाले. वर्माचा दादावर एका अनामिक कारणाने जीव होता. त्यांचे नातेच सख्ख्या भावासारखे असावे इतका वर्मा त्याची काळजी घेत असे आणि म्हणूनच त्याच्या खोटे बोलण्याचे कारण आम्हाला पटले नव्हते तरी पचले होते. असो.
ह्यानंतर दादाने जगदीशला धमकी दिली, तू बाहेर पड,मग बघतो.

संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर धमकी दिल्याप्रमाणे दादाने जगदीशला चर्चगेटपासून ते शिवाजी टर्मिनसपर्यंत पाठलाग करत करत आणि कार्यालयाच्या हद्दीपासून १००मीटरच्या पुढे गेल्यावरच चोप दिला आणि तोही मुका मार बरंका! कुठेही रक्त येणार नाही ह्याची काळजी घेत(आहे की नाही ! दादा कायदे जाणून होता ह्याचा हा पुरावा). दुसर्‍या दिवशी कार्यालयात आल्यावर जगदीशने एक भले मोठे पत्र साहेबांना लिहून पाठवले आणि त्यात आदल्या दिवशी दादाने त्याची जी धुलाई केली होती त्याचं साद्यंत वर्णन करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. साहेबांनी जेव्हा दादाला ह्या बाबतीत विचारले तेव्हा दादाने आपण त्याला मारल्याचे कबूल केले आणि कार्यालयाच्या बाहेर १००मीटर अंतरापुढे केलेल्या कुठल्याही कृत्याचा जबाब द्यायला आपण बांधील नसल्याचेही ठासून सांगितले. साहजिकच साहेबांचा नाईलाज झाला आणि त्यांनी जगदीशला हवी असल्यास पोलीसात तक्रार कर असे सांगितले. हा गुन्हा कार्यालयात घडलेला नसल्यामुळे आपण ह्याबाबतीत काहीही कारवाई करू शकत नाही असेही वर सांगितले.

त्यानंतर दादाने जगदीशला जाऊन दम दिला, तू जर पोलीसात गेलास तरी माझे काहीही वाकडे होणार नाहीच पण मग मी तूझी फुल्टूच करेन हे लक्षात ठेव. शाना असशील आता शिस्तीत राहा आणि कुणाला पीडू नको! जगदीशने दादाचे पाय धरले आणि प्रकरण तिथेच समाप्त झाले.त्यानंतर पुन्हा कधी जगदीशने कुणाला त्रास दिला नाही.



क्रमश:

ते रम्य दिवस!भाग ११



डावीकडून: मी(चश्मीश), दादा आणि चिंटू कार्यालयात एका पार्टी दरम्यान!
हे छायाचित्र साधारणपणे १९७२-७३ मधील आहे. छायाचित्रकार आहे गजा.

माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात दादा हा खरा 'दादा'होता हे मी तुम्हाला सांगितलेच आहे. तर त्या काळातले काही किस्से ऐका. दादाच्या खिशात नेहमीच रामपुरी चाकू असायचा आणि कार्यालयात तो त्याचा प्रत्यक्ष जरी उपयोग करत नसला तरी वेळप्रसंगी समोरच्याला घाबरवण्यासाठी तो रामपुरी उघडून दाखवत असे. त्याचे लखलखते पाते बघितले की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडत असे(आता मला कळले की एखाद्याला गुंड का म्हणतात ते; अहो उत्तर साधे आहे! घाबरगुंडी उडवतो तो गुंड! आहे की नाही सोपी व्याख्या!).

दादाने बरेच यांत्रिक शिक्षणक्रम केलेले होते. टर्नर,फिटर,मशिनिस्ट,वेल्डर वगैरे वगैरे. त्यामुळे कोणत्याही यंत्राबद्दलचे त्याचे ज्ञान सखोल होते. लेथ मशीन,ड्रील मशीन,ग्राईंडर,वेल्डींग मशीन वगैरे यंत्रे हाताळण्यात तो कुशल होता. त्या यंत्रांकडून काम करून घेणे आणि त्यांची देखभाल करणे हे त्याचे नेहमीचे मूळ काम होते. ह्या व्यतिरिक्त तो कोणतेहि पडेल ते काम करत असे. जिथे कुणी हरला तिथे तुम्ही दादाला कामाला लावा. आपली सगळी बुद्धी,कौशल्य आणि शक्ती वापरून तो ते काम यशस्वी करत असे.

एकदा दादा आपल्या रामपुरीला, धार काढण्याच्या यंत्रावर(ग्राईंडर) धार काढत होता. नेहमी तो काम करताना त्यात रंगून जात असे. आताही तशाच अवस्थेत असताना आमचा सर्वात मोठा साहेब( हा मद्रासी होता) तिथे आला. त्याने ते बघितले आणि करु नये ते साहस केले. त्याने दादाला जरा गुश्श्यातच विचारले, व्हाट आरायू डुईंग आय से?
प्रश्न ऐकून दादाची समाधी भंग पावली. त्याने मागे वळून बघितले तर साहेब उभा आहे आणि जाब विचारतोय.

दादाने तो लखलखता रामपुरी त्याच्यावर रोखला आणि म्हणाला, देखता नही धार लगा रहेला है! अंधा है क्या?
साहेब, दादाचा तो अवतार बघून एकदम सर्दच झाला. इकडे-तिकडे बघत असताना मी त्याला दिसलो तसा मला म्हणाला, ए मिस्टर यु टेल हीम नॉट टू डू सच थिंग्ज हीयर आय से!('आय से' हे त्याचे पालूपद असायचे)
मी काही बोलायच्या आत दादाने त्या साहेबाची कॉलर धरली आणि त्याला विचारले, मरने का है क्या बोल? तेरे साथ उसको भी छील के रख दूंगा! क्या समझा? अभी चूपचाप चला जा नही तो घुसाड दूंगा!

मी मागच्या मागेच सटकलो. ह्या लोकांच्या भानगडीत मी कशाला उगीच मरू? साहेब तर पाणी-पाणी झाला होता. दादाचा तो हिंस्त्र चेहरा,हातातला चमचमणारा रामपुरी आणि आजूबाजूला मदतीला कोणीच नाही हे पाहून त्याने हात जोडले आणि गयावया करत दादाची माफी मागितली आणि पुन्हा असा प्रश्न कधीच विचारणार नाही अशी ग्वाही दिली तेव्हा कुठे दादाने त्याची कॉलर सोडली आणि साहेबाने लगेच तिथून पलायन केले.

थोड्याच वेळात ही बातमी सगळीकडे पसरली. गजा आणि चिंटूने जाऊन दादाचे अभिनंदन केले. साहेबाची चांगली जिरवली म्हणून दादाचे कौतुक केले. मी मात्र सगळे स्थिरस्थावर झाल्यावर लांबूनच (लांबूनच बरं का!) दादाला म्हणालो, दादा, तू हे जे काही केलेस ते चांगले केले नाहीस. कदाचित तुझी नोकरीही जाईल. ह्या साहेबाने दिल्लीला तुझ्या ह्या प्रतापाबद्दल कळवले ना तर तुला घरी बसावे लागेल. तेव्हा आता ह्यापुढे जरा जपून वाग!
दादाने फक्त एकदा माझ्याकडे तुच्छतेने बघितले आणि म्हणाला, अरे तो मद्रासी घरी जित्ता जायेल काय? त्याला वर रिपोर्ट तर करू दे, नाय त्याची फूल्टू केली ना तर बापाचे नाव नाय लावणार. आणि तू त्याची चमचेगिरी कशाला करतोस? कोण लागतो तुझा तो ?
मी आपला तिथून काढता पाय घेतला. मनात म्हटले, जे झाले ते चांगले झाले नाही. आता ह्यावर काही तरी उपाय केला पाहिजे. पण काय करणार?

इथे साहेब सॉलीड तापला होता पण दादाचे ते हिंस्त्र रूप त्याच्या नजरेसमोरून जात नव्हते आणि त्यामुळे वर दिल्लीला ह्याबद्दल कळवण्याची हिंमत करू शकत नव्हता आणि तिथे दादा विजयोन्मादात मश्गुल होता. काही तरी करायला पाहिजे होते आणि ते मलाच करावे लागणार होते. कारण सगळे दादाच्या बाजूने होते(विरोधात जाऊन मरायचे थोडेच होते कोणाला?) पण दादाला रोखण्याची शारिरीक क्षमता तर माझ्यात नव्हती. मग त्याला रोखायचे कसे? नीट विचार करून मी मनाशी एक निर्णय घेतला.

दुसर्‍या दिवशी सकाळी कार्यालयात पोहोचल्यावर हिंमत करून मी दादाला म्हटले, मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू शांतपणे ऐकणार असशील तर बोलू काय?
माझ्याकडे आपादमस्तक न्याहाळत दादा म्हणाला, बोल. तुझ्या सारख्या जंटलमन भटाला मी नाय कसा बोलनार?
मग मी कालच्या प्रसंगाबद्दल त्याला नीट समजावून सांगितले(त्याने ऐकून घेतले हे खरंच एक आश्चर्य होते).मी म्हणालो, " हे बघ दादा, आपण इथे नोकरी करायला येतो. तो आपल्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणूनच ना? मग इथे आल्यावर इथले काही नियम आपल्याला पाळायलाच हवेत असे मला वाटते. तू एक कुटुंबवत्सल माणूस आहेस हे नेहमी लक्षात ठेव. तुझ्या कोणत्याही वाईट कृत्त्यामुळे तुझ्या घरच्यांना हाल भोगावे लागले तर तुला ते आवडेल काय?
दादा म्हणाला, कुनाची माय व्यालेय माझ्या कुटुंबाला त्रास द्यायला? फुल्टू करून टाकेन त्याची!
मी म्हणालो, दादा तू एखाद्याची फुल्टू केलीस तर पोलीस तुला सोडतील काय? तू पण जेलमधे जाशील. कदाचित फाशीही होईल आणि तुझे कुटुंब रस्त्यावर येईल. हे सगळे तुझ्या करणीमुळे. दुसर्‍याचा त्यात कोणताही हात नसेल. बोल,तुला चालेल काय असे त्यांचे हाल झालेले? तू एकाला मारशील आणि तूही मरशील. मधल्या मधे ह्या तुझ्या कुटुंबाचा काय दोष आहे? विचार कर जरा!

मी त्याला तसेच सोडून माझ्या कामाला लागलो. जेवणाच्या सुट्टीनंतर दादा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, ए भटा! तुज्या बोलन्यात पाईंट हाय! पन मी गप्प बसलो तर तो मा**** मद्रासी माजा काटा काडेल त्याचे काय? त्याला वाटेल की मी त्याला घाबरलो आनि तो एकदम चढून बसेल. तेच्यावर उपाय काय?
मी दादाला म्हणालो, अरे तो तुला घाबरतोय. आता तो तुझ्या वाटेला जाणार नाही;पण तूही आता हे असले चाळे ह्यापुढे करु नकोस. जरा सभ्य माणसाप्रमाणे वाग. तुझ्यातल्या ताकदीचा चांगल्या गोष्टींसाठी वापर कर. कामात तर तू कुशल आहेसच. तेव्हढा माथेफिरूपणा जरा कमी कर म्हणजे बघ तुझ्याबद्दल साहेबासकट सगळ्यांना कसा आदर वाटायला लागेल ते!

माझ्या सुदैवाने (आणि त्याच्याही!) त्या बोलण्याचा खरोखरच चांगला परिणाम दादावर झाला आणि हळूहळू दादा बदलत गेला. हे सगळे मला त्यावेळी कसे सुचले आणि मी ते कसे बोललो हे आज मागे वळून पाहताना मलाही आश्चर्यकारक वाटतेय;पण दादा आता,ह्या घडीला माझा सख्खा मित्र असल्यामुळे मला त्याच्याकडून जे कळले ते असे! का कुणास ठाऊक पण पहिल्यापासूनच तो मला मानत होता. कदाचित माझ्यातल्या वेगळेपणामुळे असावे! नक्की सांगणे त्यालाही कठीण वाटते

१५ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग १०

कुणी आजारी असला की चालला दादा त्याला बघायला. वेळप्रसंगी तिथे सोबत म्हणून बसायची देखिल ह्याची तयारी. बर्‍याचशा सरकारी इस्पितळात दादाची ओळख निघतेच. कसे म्हणून काय विचारताय? अहो त्याचा एखाद्या व्यक्तिशी कोणत्याही निमित्ताने संबंध आला की दादा ती ओळख ठेवतोच;प्रसंगी वाढवतो. त्या व्यक्तिला आपल्या माहितीचा,ज्ञानाचा फायदा देतो. त्यामुळे ती माणसेही बांधली जातात आणि अशा ओळखीतून ओळखी वाढवत दादा लोकांची कामे बिनबोभाट करत असतो. माणसे जोडण्याची एक अद्भूत कला त्याच्या ठायी आहे. अपघात,मयत वगैरे प्रसंगी दादा हवाच. अपघातात मृत झालेल्या सग्यासोयर्‍यांची शवागारात जाऊन ओळख पटवणे असो अथवा पोस्टमॉर्टेम केल्यानंतर शवाचा ताबा घेणे असो, त्याच्या शिवाय एक पाऊलही टाकता येत नाही.

ओळखीत कुणाचे मयत झाल्यास दादाला पहिली खबर जाते आणि मगच नातेवाईकांना. दादा तातडीने तिथे पोचतो आणि सर्व भार आपल्या शिरावर घेतो. ह्या ठिकाणी धर्म,पंथ,जात-पात काही निषिध्द नाही. हिंदू,मुसलमान,ख्रिश्चन,बौध्द वगैरे कोणत्याही धर्माच्या मयताचे सगळे सोपस्कार ह्याला माहित असतात.त्याच्या देखरेखीखाली इतर लोक पटापट कामे करत असतात. अशा वेळी दादासारखी 'अनुभवी' माणसेच लागतात.

बर्‍याच हिंदू मित्रांच्या बरोबर तो पुढे नाशिकलाही जातो. पुढचे जे काही धार्मिक सोपस्कार करायचे असतात ते करणारे तिथले घाटावरचे ब्राह्मणही दादाला ओळखतात. मग यजमानाच्या(मयत व्यक्तीचे नातेवाईक) ऐपतीप्रमाणे क्रियाकर्म करण्यासाठी योग्य ब्राह्मणाची निवड करणे हेही दादाच ठरवतो.
बाळंतपणापासून ते व्यक्तिच्या अंत्य संस्कारापर्यंत प्रत्येक गोष्टींची अशी परिपूर्ण माहिती असणारा दादा हे काय रसायन आहे हे कळणे कठीण आहे. हे सगळे करूनही त्याची विनोदबुध्दी शाबूत आहे.

एकदा आमच्या कार्यालयात असताना त्याला मी विचारले, दादा तू सेवानिवृत्त झाल्यावर काय करणार?
दादाने मला हळूच डोळा घातला आणि म्हणाला, आता गंमत बघ.
बाजूलाच बसलेल्या आमच्या एका सहकार्‍याला त्याने मुद्दामच संभाषणात ओढले. हा आमचा सहकारी एकदम रंगाने काळा रप्प होता. त्यामुळे दादा त्याला 'डायमंड' म्हणत असे. तसेच दुसर्‍या कोणाचा नुसत्या कल्पनेतही आर्थिक फायदा होत असेल तरी त्याच्या पोटात दुखत असे.

दादा आणि डायमंडमधला हा संवाद वाचा...
तर काय आहे डायमंड, मी सेवानिवृत्त झाल्यावर काय करणार माहित आहे?
काय करणार आहेस?
मी एक ट्रॅव्हल सर्विस सुरु करणार आहे.
ट्रॅव्हल सर्विस?
खांदेकर ट्रॅव्हल सर्विस!
पण तुझे आडनाव तर पाटील आहे. मग खांदेकर कशाला? आणि जरा शुध्द बोल, खांडेकर असे!
अरे बाबा, खांदेकर म्हणजे खांदा देणारे अशा अर्थी!
मला नीट समजले नाही!
सांगतो. नीट समजावून सांगतो. बघ हल्ली लोकसंख्या वाढल्यामुळे लोक स्वतंत्र राहू लागले. घरात कुणाचे मयत झाल्यास स्मशानात पोचवायला चार माणसे मिळायला पण मारामार असते.मग अशा लोकांना मदत करण्यासाठी माझी योजना आहे!

खांदेकर ट्रॅव्हल्स सर्विस सादर करत आहे एक अभिनव योजना:(सद्या फक्त हिंदूंसाठी)

मुडदा तुमचा बाकी काम आमचा(हे केवळ यमक जुळवण्यासाठी बरं का)!

म्हणजे काय नीट समजाव मला!
तर बघ एकदा मुडदा हातात आला की त्याच्या जातीप्रमाणे आणि त्याच्या नातेवाईकांच्या ऐपतीप्रमाणे आमचे पॅकेज आहे.
१)सगळी क्रियाकर्म साग्रसंगीत करायची असतील १०,००० रुपये.
(ताटी बांधण्यापासून ते नाशिकला जाऊन रक्षा विसर्जनापर्यंतचा सगळा खर्च सामील)रडणारी माणसे आणि भजनी मंडळ ह्यांचा खर्च वेगळा

२)झटपट अंत्यसंस्कार: ५००० रु.(ताटी बांधण्यापासून ते विद्युतदाहिनीत नेण्यापर्यंत आणि रक्षा मुंबईच्या समुद्रात विसर्जित करण्यापर्यंत)

हे ऐकल्यावर डायमंड लगेच म्हणाला, आयला म्हणजे तू भरपूर पैसा मिळवणार आहेस! पण हे चांगले नाही. तू दु:खी लोकांकडून पैसे घेणार तुला पाप लागेल(लागलं पोटात दुखायला).
दादा म्हणाला, अरे बाबा अंत्यसंस्कार करण्याचे पण एक शास्त्र असते आणि सगळ्यांनाच ते माहित नसते. मी त्यांचे दु:ख हलके करण्यासाठीच तर ही योजना काढलेय. आता त्यांनी एकदा मुडदा माझ्या ताब्यात दिला की ते रडायला मोकळे. एकदम टेन्शन फ्री! काय? कळले की नाही. आणि हो हा देवही माझ्या बरोबर आहे. तो मंत्र-बिंत्र म्हणेल. त्यालाही मिळेल धंदा!
मी हे सगळे मजेत घेत होतो आणि तेव्हढ्यात डायमंडने पुढचा प्रश्न केला.... मी काय करू? मला पण त्यात पार्टनरशिप दे ना!
दादा म्हणाला, तुझ्यासाठी एकदम महत्वाचे काम आहे. तू पिंडाला शिवणारा कावळा हो! काय? आयडिया कशी आहे?
आणि आम्ही दोघेही खो-खो करून हसायला लागलो.

डायमंड खूप संतापला पण दादाचे तो काहीच वाकडे करू शकत नसल्यामुळे चडफडत बसला.

६ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग ९

दादाबद्दल ह्या अगोदर बरंच लिहिलंय; पण दादाचा अजून एक गुण सांगण्यासारखा आहे. अगदी रात्री-बेरात्री देखिल त्याला कुणीही बोलावलं तरी हातातलं काम टाकून तो त्या व्यक्तिच्या मागे धावणार. बाळंतपण,बारसं,वाढदिवस,मुंज,लग्न सारख्या ठिकाणी तो हजर राहणारच. बोलावणं साधे असो अथवा अगत्याचे असो तो हजेरी लावणारच आणि आहेरही घसघशीत करणार. एव्हढच काय कुणी त्याला एखाद्या कार्यात मदत हवी आहे असे सांगितले की हा माणूस तिथे कार्यालयावर अगदी सक्काळी सकाळी हजर होणार. तिथे अगदी साध्या हमालीपासून ते वधुवरांना लागणार्‍या सर्व गोष्टींची योग्य ती व्यवस्था करणार. कुणाला भटजी हवा,कुणाला आचारी-पाणके हवे; दादावर सोपवून निश्चिंत व्हा. पुलंनी 'नारायण' हे पात्र ह्या दादाला बघून तर निर्माण केले नाही ना असे वाटावे इतके साम्य.

कुणाला पळून जाऊन लग्न करायचे आहे. का? तर घरचे परवानगी देत नाहीत. दादाला शरण जा. दादा सगळी व्यवस्था करतो. त्याच्याकडे अशा तर्‍हेची लग्न लावणारे भटजी आहेत. जिथे लग्न लागतात अशी निर्मनुष्य अथवा भर वस्तीतील पण कुणाला फारशी माहित नसलेली देवळे त्याला माहित आहेत. तिथले व्यवस्थापक,कंत्राटदार,त्यांचे जेवणावळींचे दर अशी यच्चयावत माहिती असते. दादा म्हणजे एक चालते बोलते संस्थान आहे.

हे कमीच म्हणून की काय त्याचे इतरही सामाजिक कार्य चालते. ऐकून आपल्याला धक्का बसेल की तारुण्याच्या बेहोषित तरूण-तरूणी नको ते करून बसतात आणि मग कुठे वाच्यता होऊ नये,इज्जत जाऊ नये म्हणून दादाला शरण जातात. मग दादा त्या दुर्दैवी तरूणीचा नामधारी पती होऊन त्या तरूणीची अशा अवस्थेतून सुटका करण्यासाठी एखाद्या सरकारी आरोग्यकेंद्रात नेऊन तिचा भार हलका करतो. जो तरूण त्यात गुंतला असतो तो शेळपट असल्यामुळे दादालाच कैक जणींचे नामधारी पती बनावे लागलेय. ह्या नामधारी पती प्रकरणावरून मी दादाला कैक वेळेला छेडले असता त्याने मला दिलेले उत्तर हे केवळ दादाच देऊ जाणे.

मी त्याला म्हटले,"अरे तू इतक्या वेळा त्या आरोग्यकेंद्रात निरनिराळ्या तरूण मुलींबरोबर जातोस आणि आपण त्यांचा नवरा आहे हे सांगून त्यांची सुटका करतोस. मग तिथे असणारे डॉक्टर,परिचारिका आणि इतर लोक तुला चांगलेच ओळखत असतील ना?"
दादा "हो" म्हणाला.
"मग ते कसे मानतात तुला त्या सर्वांचा नवरा?"
दादा म्हणाला,"हे बघ माझा हेतू शुध्द आहे. संकटात सापडलेल्याला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे असे मी समजतो आणि त्या बदल्यात माझी कुणाकडूनही कसलीही अपेक्षा नसते. त्या आरोग्य केंद्र चालवणार्‍यांना काही औपचारिकता पूर्ण करावी लागते आणि त्यासाठी त्या तरूणीची संमती लागते आणि साक्षीला तिचा पती(नामधारी असला तरी) असावा लागतो. माझ्या खोट्या वागण्यामुळे त्या लोकांचे जर काही वाईट न होता भलेच होणार असेल तर ते तरी कशाला आडकाठी करतील? माझ्या क्षणिक खोट्या वागण्यामुळे जर दोन तरूण व्यक्तींची आणि त्यांच्या घरच्यांची लाज शाबूत राहणार असेल तर मला हे करायला कोणताही संकोच बाळगण्याचे काहीच कारण नाही. ही एक समाजसेवाच आहे असे मी मानतो. कुणाला पटो वा ना पटो. माझा हेतू एकदम साफ आहे. बस्स. मन चंगा तो कटोतीमे गंगा!"

दादाचा अजून एक गुण म्हणजे मैत्री करणे आणि ती निभावणे. उदा.तो माझा मित्र आहेच;पण त्याच्याशी मी जर एखाद्या व्यक्तिची जुजबी ओळख करून दिली की दादा त्यालाही आपला मित्र मानत असतो मग भले ती व्यक्ति त्याला विसरली तरी चालेल. खरे तर बर्‍याच वेळेला तो एक औपचारिकतेचाच भाग असतो आणि आपण सहसा ते विसरुनही जातो. पण दादाच्या सगळं लक्षात राहते.त्याला कळायचा अवकाश की तो कुणाच्याही दु:खाच्या प्रसंगी सांत्वनासाठी हजर असतो.

२ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग८

यश जसा दिसायला सुस्वरूप होता तसाच मनाने पण चांगला होता. त्याचे हस्ताक्षर म्हणजे मोत्याचे दाणे जणू आणि सर्किट डायग्रॅम,किंवा मशीन ड्रॉईंग काढण्यातही तो पारंगत होता. त्याचा नीटनेटकेपणाचा गुण सगळ्याच बाबतीत जाणवायचा. अशा ह्या सद्गुणी यशमध्ये दोन ठळक दोष होते ते म्हणजे थापेबाजपणा आणि चोरटेपणा. ह्यातल्या थापेबाजपणाचा तसा कुणाला काहीच त्रास होत नसे‍. झालीच तर लोकांची करमणूक होत असे(फक्त मी सोडून... कारण मला सगळं खरेच वाटायचे).

त्याच्यातल्या चोरटेपणाचा मात्र त्याला एकदा चांगलाच फटका बसणार होता. त्याची मोठी चोरी पकडली गेली होती(मीच पकडली...पुढे ओघाने ती कथा येईलच) आणि त्याला नोकरीतून कमी केले जाऊ शकत होते; पण त्याच्या सुदैवाने आणि साहेबांच्या दयाळूपणामुळे तो त्यातून सुखरूप बाहेर पडला. तरीदेखील त्याचा मूळ स्वभाव मात्र बदलला नाही. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी त्याची गत होती. ही घटना जेव्हा घडली तेव्हा यशचे लग्न झालेले होते आणि तो एका मुलीचा बापही होता. एव्हढी सगळी लफडी करूनसुद्धा लग्न मात्र त्याने त्याच्या आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशीच केले. त्याची बायको सुंदर खाशी नसली तरी सुबक ठेंगणी होती आणि मोठ्या मालदार घरातली होती. तिच्यातच मग त्याला मुमताज आणि नाही नाही त्या हिरॉईन्स दिसायला लागल्या आणि यश एका अर्थाने मार्गाला लागला.

लग्नानंतर यशला जवळजवळ दोन वर्षे मूलबाळ झाले नाही तेव्हा गजा त्याला 'पावलीकम' असे चिडवत असे. अशाच तर्‍हेने तो एकदा यशला चिडवत असताना योगायोगाने आमचे एक साहेब(हेही मराठीच होते) तिथे आले. गजा पाठमोरा होता आणि यशला मोठमोठ्याने चिडवत होता. तो शब्द त्या साहेबांनी ऐकला आणि त्यांनी गजाला त्याचा अर्थ विचारला. गजा हा बोलण्या-चालण्यात बिनधास्त प्राणी होता म्हणून त्याने साहेबांना सरळ शब्दात त्याचा अर्थ सांगितला.
त्यावर साहेब गजाला म्हणाले,"यशला दोन वर्षात मूलबाळ झाले नाही म्हणून तू त्याला असे चिडवतोस तर मला देखिल लग्नानंतर १४ वर्षांनी पहिले मूल झाले. मग मलाही लोक असेच म्हणत असतील नाही का?"
साहेबांच्या ह्या सरळ प्रश्नामुळे आम्ही सर्व चूप बसलो होतो; पण गजा कसला गप्प बसतोय?
तो सरळ म्हणाला,"हो साहेब तुम्हाला पण सगळे लोक असेच म्हणत असणार."
गजाच्या ह्या स्पष्टीकरणानंतर साहेब स्मितहास्य करत तिथून निघून गेले. आणि... काही दिवसांनी यशने येऊन बातमी सांगितली की तो बाप बनणार आहे म्हणून.. मग त्याच्याकडून पार्टी मागायला पण गजा पुढे होता.

यश बाप झाला. कुटुंबवत्सल झाला आणि आयुष्यात स्थिरावलाय असे वाटते आहे तोवर कळले की आजकाल यश रोज दारू प्यायला लागलाय. आता आमचा त्यावेळचा पगार जेमतेम ५०० रु च्या आसपास होता. रोज दारूचा खर्च आणि घरात बायको-तान्ही मुलगी ह्यांचा खर्च हे सगळे तो ह्या तुटपुंज्या पगारात कसा भागवणार असा प्रश्न माझ्यासारख्या सरळमार्गी माणसाला पडला; पण यशला त्याची फिकीर नव्हती.

सहसा इलेक्ट्रॉनिक्सचे स्पेअरपार्टस् आणायचे काम पदू करायचा; पण एक दिवस तो गैरहजर असल्यामुळे मला बाजारात जावे लागले. एक विशिष्ट पार्ट शोधताना एका दुकानात मला काही ओळखीचे प्रिंटेड बोर्डस् दिसले. हे असले प्रिंबो माझ्या माहितीप्रमाणे फक्त भारतात(निदान मुंबईत तरी)आमच्या ऑफिसातील विशिष्ट विदेशी बनावटीच्या यंत्रसामुग्रीसाठीच वापरात येत होते. अशा तर्‍हेच्या गोष्टी मी रोजच हाताळत असल्यामुळे मला त्याची पूर्ण खात्री होती. मी ते प्रिंबो त्या दुकानदाराकडून बघायला मागितले आणि त्यावरील ऐवज पाहून माझी पूर्ण खात्री झाली की हे आमच्याकडचेच(आमच्या भांडारात हे त्या यंत्रांबरोबर खास वेगळे मागवले होते) आहेत. मी काही जुजबी प्रश्न त्या दुकानदाराला विचारले तेव्हा माझ्या असे लक्षात आले की ते प्रिंबो कुठल्या यंत्राचे आहेत हे देखिल त्याला माहीत नव्हते आणि केवळ आपण आपल्या एका खास माणसाने हे इथे ठेवायला सांगितले आहे म्हणून ठेवलेत असेही सांगितले. मी त्या दुकानदाराकडून त्याचे दुकानाच्या नाव आणि पत्त्याचे कार्ड मागून घेतले आणि माझे काम आटपून ऑफिसला परत आलो.

माझ्या डोक्यात चक्र फिरत होती. हे प्रिंबो तिथे कसे. त्यावेळी यश भांडाराचा कारभार सांभाळत असे. मी दुरुस्ती आणि देखभालीचे काम करत असे. त्यामुळे दुरुस्तीसाठी सुटे भाग भांडारातून घेण्यासाठी मी तिथल्या नोंदवह्या आणि कपाटं तपासण्याचे ठरवले. माझ्या अंतस्थ हेतूची काहीच कल्पना नसल्यामुळे यश मला ते करू देत होता. मी सर्व तपासणी केल्यावर माझ्या लक्षात आले की काही प्रिंबो जागेवर नाहीत; पण यशला सरळसरळ विचारणे प्रशस्त वाटेना म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पात त्याला गुंतवून मी हळूच त्याला ते दुकानदाराचे पत्त्याचे कार्ड दाखवले. ते बघून तो अगदी सहजपणे म्हणाला,"अरे देवा तुला जर बाजारात कुठेच सुटा भाग मिळाला नाही ना तर तू ह्याच्याकडे जा. हा आपला खास दोस्त आहे आणि तुला पाहिजे तो सुटा भाग आणून देईल."
मला हेच अपेक्षित होते. मग मी त्याला सरळ प्रश्न केला,"यश,समजा आपल्याकडचे हे प्रिंबो संपले तर तुझा हा दुकानदार आपल्याला ते आणून देईल काय?"
"ऑफ कोर्स. अरे नक्की देईल. तू माझे नाव सांग त्याला,तर तुला तो कन्सेशन पण देईल." इति.यश.
आता मी सरळ मुद्यालाच हात घातला. मी त्याला म्हणालो,"यश,मी इतका वेळ कपाटं आणि नोंदवह्या तपासल्या तरी तुला काहीच कळले नाही? मी तुला त्या दुकानाचा पत्ता सांगितला तरी तुला काहीच वाटले नाही? तू मला काय दूधखुळा समजतोस काय? ह्या ठिकाणी ६ प्रिंबो कमी आहेत आणि त्याची परदेशी चलनातली किंमत हजारो पाउंडस् आहे. मला,तुझ्या मुलीची शपथ घेऊन सांग,ते प्रिंबो तूच त्याच्याकडे नेऊन दिलेस की नाही? आता खरे बोलला नाहीस तर मी हे प्रकरण साहेबांकडे घेऊन जाईन."
माझ्या ह्या अनपेक्षित सरबत्तीने यश कमालीचा घाबरला. ततपप करीत त्याने गुन्हा कबूल केला. हे सगळे तो रोजचा दारूचा खर्च भागवण्यासाठी करत होता.मी त्याला दोन तासांची मुदत दिली. त्या अवधीत तो तिथे जाऊन ते प्रिंबो घेऊन आला. मी पूर्णं खात्री करून घेतली आणि ते सर्व कपाटात ठेवले. त्यानंतर त्याच्याकडून भांडाराच्या चाव्या घेऊन मी त्याला आमच्या साहेबांपुढे(हेच ते मराठी साहेब-दयाळू होते म्हणूनच मी त्याला त्यांच्याकडे नेले)उभा करून झालेला वृत्तांत सांगितला. साहेबांनी चार उपदेशपर गोष्टी सांगून त्याला दुसर्‍या कामाला जुंपले जिथे अशा तर्‍हेचा व्यवहार त्याला करता येणार नव्हता.

यशचे नुकतेच सुरू झालेले कौटुंबिक आयुष्य विस्कटू नये म्हणून मोठ्या उदारतेने साहेबांनी त्याला माफ केले; पण यशच्या वर्तनात फारसा काही फरक पडला नाही. आज इतक्या वर्षांनंतरही यश दारूसाठी जमेल तिथे हात मारतच असतो. पकडला गेला तर हातापाया पडून माफी पदरात पाडून घेतो. लाज-लज्जा,इज्जत वगैरे गोष्टींच्या पलीकडे तो गेलाय. मुले मोठी झाली. दोन मुलांची लग्ने झाली. आजोबा झाला पण त्याचा तो रुबाब वगैरे आता औषधाला सुद्धा उरला नाही. एक चांगल्या घरातला मुलगा असा वाया गेलेला बघून वाईट वाटते; पण आपल्या हातात काय आहे? त्याला सुधारण्याचा आम्ही मित्रांनी खूप प्रयत्न केला पण तो आता सुधारण्याच्या पलीकडे गेलाय.
त्याचे ब्रीदवाक्यच जणू असावे 'हम नही सुधरेंगे!'

ते रम्य दिवस!भाग ७

यशवंत उर्फ यश ही अजून एक वल्ली. थापा मारण्यात पटाईत. मला ह्याच्या थापा खर्‍याच वाटायच्या कारण त्यावेळी मी जरा 'हा'च (बावळट--सभ्य भाषेत भाबडा) होतो. त्याच्या थापा तरी काय एकेक जबरदस्त होत्या म्हणून सांगू?

यश,त्याचा भाऊ,बहीण आणि आई-वडील असे हे ५ जणांचे कुटुंब होते. बाप प्रिंटींग मास्टर तर आई आर्ट मास्टर(इति.यश). हे सगळे कुटुंब हिंदी सिनेमाचे जबरदस्त शौकीन. कुठलाही नवा सिनेमा लागला की पहिल्या खेळाची, पहिल्या रांगेची(पिटातली) तिकिटे पैदा करून हे अख्खे कुटुंब तो सिनेमा पाहायला जात असे. आल्यावर मग यश त्या सिनेमाची ष्टोरी ऍक्शनसकट सांगायचा. त्या सिनेमाचा जो कोणी हिरो असेल(राजकपूर,देवाअनंद,शम्मीकपूर,राजकुमार वगैरे वगैरे वगैरे)त्यांच्या ऍक्शन्स,बोलण्याची पद्धत(ढब),त्यातली गाणी वगैरे सगळे अगदी तिखट मीठ लावून सांगत असे.

एकदा तो जितेंद्रचा सिनेमा बघून आला तर त्याने दुसर्‍या दिवशी तसाच एकाच रंगाचा पोशाख(सिनेमात जितेंद्रने एकाच रंगाची पँट आणि बुशकोट घातला होता-इति.यश)घालून ऑफिसात जितेंद्रच्या थाटात एंट्री घेतली आणि कुठलेतरी त्याचे गाणे म्हणायला सुरुवात केली. आम्ही सगळे तर ते बघून थक्कच झालो. ह्या यशचे केस इतके सरळ आणि भरपूर होते की तो रोज नवी हेअरस्टाईल करून (त्या त्या नटाप्रमाणे) येत असे आणि त्या त्या दिवशी त्याचे वागणे बोलणे त्या विशिष्ट नटासारखे असे. तर असा हा फिल्मी अंदाज असणारा यश माझ्या आयुष्यात प्रथम आयटीआय मध्ये असताना आला. चांगली दोन वर्षे आम्ही दोघे एकत्र होतो आणि पुढे नोकरीतही एकत्रच राहिलो.

आयटीआय मध्ये असताना तर त्याने माझा अक्षरक्ष: मामा बनवला होता. तो अशा काही गोष्टी सांगे की माझा त्याच्यावर विश्वास बसत असे. मी एकदा त्याला त्याच्या वडिलांबद्दल विचारले,म्हणजे ते काय नोकरीधंदा वगैरे करतात असे तर त्याचे उत्तर तयार होते.
तो म्हणाला,"माय पॉप यू नो(ह्याला निष्कारण इंग्रजी फाडायची..तेही चुकीचे.. सवय होती) ही वेअर इन मॉरिशस. त्यावेळी ते सकाळी विमानाने तिथे जायचे यू नो आणि संध्याकाळी परत विमानाने बॅक टू बाँबे."
मला तर खूपच अप्रूप वाटायचे(खरे तर हा मॉरिशस कुठे आहे आणि कसा आहे..म्हणजे देशात की परदेशात हे सामान्य ज्ञानही नव्हते). अशा मोठ्या माणसाचा मुलगा माझ्या बरोबर शिकायला आहे हे ऐकून स्वत:लाच धन्य वाटायचे.
मग ते तिथून फॉरेनच्या वस्तू कशा आणतात आणि आम्ही सुट्टीत त्यांच्या बरोबर कसे तिथे फिरायला जातो(अगदी चौपाटीवर जाऊन भेळ खाणे जितके सोपे आहे असे दर्शवत) वगैरे गोष्टी रंगवून सांगत असे आणि माझ्यावर इंप्रेशन पाडत असे.

मी दिसायला यथातथाच होतो. बुटका,चष्मीश आणि सुकडा आणि कपडेही साधेच असत. फॅशन बिशन अजिबात कधी केली नाही. त्यामुळे मुलींच्या भानगडीत मी आणि मुली माझ्या भानगडीत कधीच पडल्या नाहीत(नशीब त्या मुलींचं). माझ्या तुलनेत यश चांगलाच उंच,चष्मीश पण रूपाने देखणा,बर्‍यापैकी गोरा आणि स्टायलिश होता आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या बिल्डिंगमधल्या आणि आजूबाजूच्या पोरी त्याच्यावर मरत होत्या. माझा ह्यावरही विश्वास बसत असे कारण माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टी म्हणजे अशक्य कोटीतल्याच होत्या. त्यातून यश नेहमी फिल्मी अंदाजात वावरायचा. कधी देवआनंद सारखा गळ्यात मोठा रुमाल आणि ती विशिष्ट कॅप घालायचा तर कधी जितेंद्र नाहीतर राजेश खन्ना स्टाइलचे कपडे आणि ऍक्शन करत वावरायचा. त्यामुळे माझा न्यूनगंड भलताच वाढला आणि यशच्या कोणत्याही कथा मला खर्‍या वाटायला लागल्या.

एकदा त्याने मला त्याच्यावर मरणार्‍या मुलींबद्दल सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला,"अरे माझ्यावर एव्हढ्या मुली मरतात की काय सांगू? रिअली स्पिकींग मी काउंटच करू शकत नाही. अरे मी घरातून कधी बाहेर पडतो ह्याचीच वाट बघत असतात त्या. मी बाहेर पडलो की त्या मला फटाफट येऊन ’किसीकिसी’(हा यशचा खास शब्द) करतात. क्वॉरल करतात इच अदरशी. मग मी त्यांना लाईनीत उभे करतो आणि एकेकीला चान्स देतो."(इथे मला जेम्स बाँडची भूमिका करणार्‍या नटाबद्दल अशाच तर्‍हेच्या ऐकलेल्या आख्यायिकेची आठवण झाली)
मी बावळटपणाने विचारले,"मग त्यातली तुला कोण आवडते?"
यश म्हणाला,"चल हट! अरे अशा पोरींवर कोण मरतोय? माझी एक स्पेशल माल आहे. डिट्टो मुमताज(त्या काळात मुमताज ही नटी फॉर्मात होती). तू बघशील तर पागल होशील." (माझ्या दु:खावर डागण्या)इथे साधी एक पोरगी वळून सुद्धा बघत नाही तिथे मुमताज म्हणजे काय? साक्षात रंभा,उर्वशी नाहीतर मेनका! अशी मुलगी दिसली तर पागल नाही होणार तर काय?(हे आपले मनातल्या मनात... आपण मनातच बोलणार. प्रत्यक्ष बोलायची हिंमत नाही)
"तर व्हॉट आय वॉज स्पोक, शी वेअर लुकींग डिट्टो लाइक मुमताज. ती मॉमेडीअन आहे आणि आमच्याच बिल्डिंग मध्ये राहते. काय वंडरफूल स्माईल आहे यार, तू तर गारच होशील.(हा सारखा सारखा मला का गार करतोय ? मला कळत नव्हते; पण स्पष्ट बोलायची चोरी होती कारण मग तो मला काही सांगणार नाही असे वाटायचे) तर यू सी ती समोरच्या फ्लॅटमध्ये राहते आणि मी तिच्या डिट्टो(हा पण यशचा आवडता शब्द) ऑपोजीट. ऍक्च्युअली काय आहे ना तिची आई तिला घरातून बाहेर पडायला देत नाही. त्यामुळे मी पाइपवरून क्लाईंब करून जातो(परत फिल्मी स्टाइल...इथे धर्मेंद्र पाइपवरून चढून हेमामालिनीच्या खोलीत जातोय वगैरे असे दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले) आणि तिला किसीकिसी करून येतो. तिच्या आईला कळतच नाही. ती पुढच्या दरवाज्यात बसलेली असते."

ते रम्य दिवस!भाग६

त्या दिवशी रात्रपाळी होती. माझ्या बरोबर फक्त चिंटू होता. खरे तर माझे आणि त्याचे संबंध फक्त 'काय कसं काय?' असे विचारण्यापुरतेच होते पण एकत्र काम करताना थोडे एकमेकांना सांभाळून घेणे असा भाग असल्यामुळे कधी कधी जरा जास्त संभाषण देखिल होत असे.
साधारण रात्रीचे साडे दहा वाजले होते. कामाचा पहिला भर ओसरला होता. आम्ही आपापले जेवण केले. पुन्हा काम सुरू करायच्या अगोदर जरा पाय मोकळे करून यावे असे चिंटूने सुचवले. मला खरे तर जायचे नव्हते पण एव्हढ्या क्षुल्लक गोष्टीत आपले घोडे पुढे दामटवण्यात देखिल काही हशील नव्हते म्हणून त्याच्याबरोबर निघालो.

चर्चगेट स्टेशनजवळच ऑफिस असल्यामुळे आम्ही साधारणपणे समुद्राकडेच फिरायला जात असू. तिथल्या कट्ट्यावर बसून गार हवा खायची,इकडच्या तिकडच्या गप्पा मारून साधारण १५-२० मिनिटांनी निघायचे ह्या आमच्या नियमित सवयी प्रमाणे आम्ही पुन्हा ऑफिसच्या दिशेने निघालो.
रात्री चौपाटी ते नरीमन पॉईंटचा तो इलाखा ज्यांनी बघितला असेल त्यांना 'राणीच्या गळ्यातला हार'(क्वीन्स नेकलेस) हा काय आणि किती प्रेक्षणीय प्रकार आहे हे माहीत असेल. आम्हाला तसे त्याचे नावीन्य नव्हते कारण आम्ही अधनं मधनं हे दृश्य पाहतंच होतो. तर असाच लखलखाट त्या सर्व भागात नेहमीच असतो आणि रात्र किती झालेय हे देखिल कळत नाही. रस्त्यावरील रहदारी आणि पादचार्‍यांची वर्दळ मात्र निश्चितच खूपच विरळ झालेली असते.

तर आम्ही काही पावले चालून आलो. टॉक ऑफ द टाऊन रेस्टॉरंट मागे टाकले आणि ब्रेबर्न स्टेडियम पाशी आलो तेव्हा एक भयानक दृश्य दिसले आणि मी तर स्तब्धच झालो. चिंटूच्या हाताच्या मुठी वळल्या गेल्या आणि जोरात आरडा-ओरडा करत तो त्या दिशेला धावून गेला.
एका लहान मुलाला तीनचार जण लाथा-बुक्क्यांनी बुकलत होते आणि तो अतिशय दीनपणे भेसूर आवाजात रडत होता. ही सगळी मंडळी तिथेच पदपथावर राहून दिवसा बूटपॉलीश किंवा हमाली करून आणि रात्री जुगार,दारू,वेश्याव्यवसाय आणि गुंडगिरी करून आपला चरितार्थ चालवणारी होती. मारणारी आणि मार खाणारा असे सगळे तिथे एकत्रच राहणारे होते त्यामुळे त्यांच्या भानगडीत न पडणे शहाणपणाचे असे माझे मत होते; पण चिंटूची प्रतिक्रिया ही एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी होती. तो त्या चौघांवर तुटून पडला. त्याच्या जोरदार ठोशांनी त्याने त्या चौघांना आडवे केले आणि त्या मुलाची तो विचारपूस करू लागला.

एक क्षणभर ती सर्व मंडळी थक्क झाली पण पुढच्याच क्षणी त्या चौघांनी चिंटूला घेरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला सुरू केला. चिंटू देखिल कसलेला मुष्टीयोद्धा असल्यामुळे त्यांचे वार चुकवत लढत होता. काय करावे मला काहीच सुचत नव्हते. शारीरिक दृष्ट्या माझ्यात आणि त्या लहान मुलात फारसा फरक नव्हता आणि म्हणूनच मी चिंटूला मारामारीत मदत करू शकत नव्हतो. मग काय बरे करावे? असा विचार चालू असताना मला एकदम लक्षात आले की आमच्या ऑफिसच्या आसपास काही हत्यारी पोलीस सकाळपासून कामगिरीवर आहेत. त्यांना जाऊन सांगावे म्हणजे मग ही मारामारी थांबेल आणि त्या गुंडांना ते ताब्यात घेतील.

मी तसाच सुसाट पळत पळत त्या पोलिसांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना ही बातमी दिली. हो ना करता करता(हे पोलीस खास बंदोबस्तावरचे होते त्यामुळे ते आपली जागा सोडायला तयार नव्हते) ते माझ्या बरोबर आले. पोलीस येताहेत हे कळल्याबरोबर सगळे गुंड चारी वाटांनी पळाले. मी चिंटू जवळ पोचलो तेव्हा माझ्या लक्षात आले की तो रक्तबंबाळ झालाय आणि त्याने पोटावर हात दाबून धरलाय. रक्त बघून माझे पाय लटपटायला लागले आणि डोळ्यासमोर अंधेरी यायला लागली. मी मागच्या मागे सरकलो. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच त्या पोलिसांनी वायरलेस आणि रुग्णवाहिका मागवली आणि थोड्याच वेळात त्याला इस्पितळात घेऊन गेले.

ते दृश्य माझ्याच्याने बघवत नव्हते म्हणून मी हळूच तिथून सटकलो आणि ऑफिसात पोहोचलो. साहेबांच्या घरी दूरध्वनी करून झाल्या प्रकाराची माहिती दिली आणि मग स्वतःच्या शेळपटपणावर कुढत गुढघ्यात मान घालून बसलो. विचारांचे प्रचंड काहूर माझा पाठलाग करत होते. मी अशा तर्‍हेने का वागलो? मी त्याला तिथे एकटाच सोडून का आलो? का नाही यथाशक्ति प्रतिकार केला? आतासुद्धा त्याच्या बरोबर इस्पितळात का गेलो नाही? प्रत्येक वेळी शेपटी का घालतोस? एक ना दोन. असंख्य प्रश्नांनी माझ्या मेंदूचा भुगा करून टाकला पण मी निरुत्तर होतो.

साहेबांनी परस्पर आझाद मैदान पोलिस स्टेशनला दूरध्वनी करून तिथल्या अधिकार्‍याला झाल्या प्रकाराची माहिती दिली आणि गुंडांवर तातडीने कारवाई होईल आणि चिंटूच्या बाबतीत पोलीस केस वगैरे लफडी होणार नाहीत ह्याची जाणीव करून दिली. दुसर्‍या दिवशी त्या भागातील नेहमीच्या सराईत गुंडांची धरपकड झाली आणि त्यांना यथेच्छ पोलिसी पाहुणचार मिळाला. पोलीस केस झाली असती तर माझी आणि चिंटूची नोकरी गेली असती. ऑफिसच्या वेळेत वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बाहेर जाणे हाच पहिला गुन्हा आणि त्यात जर पोलिसी चक्रात अडकलात तर मग तो महागुन्हाच. पण साहेब दयाळू होते म्हणून बचावलो.

दुसर्‍या दिवशी सर्व मित्र मंडळींना कळले तसे ते सर्वजण इस्पितळात जाऊन आले. ह्या वेळी पण मी गेलोच नाही. चिंटूची तब्येत झपाट्याने सुधारत होती कारण गडी मनाने आणि शरीराने मजबूत होता. ह्या त्याच्या इस्पितळातील वास्तव्यात त्याची सेवा सुश्रुषा करायला त्याच्या ओळखीची एक ऍग्लोईंडियन तरुणी यायची. त्याच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठी होती. ह्या सहवासाचे रुपांतर प्रेमात आणि पर्यायाने लग्नात झाले.

चिंटू पूर्ण बरा होऊन आला आणि पहिल्यांदा मला भेटला. मला म्हणाला,"देवा,तू त्या पोलिसांना आनले नसतेस तर माझा त्या दिवशीच मुडदा पडला असता. अरे त्या सर्वांकडे रामपुरी होते आणि ते त्याच्याने माझ्यावर हल्ला करायला तय्यार होते एव्हढ्यात पोलिस आले म्हणून वाचलो. तरी पण एकाने जाता जाता पोटावर वार केलाच पण नशिबाने वाचलो. थँक यू मॅन.थॅक यू व्हेरी मच! तू नसतास तर? आय कांट इमॅजिन!"
काय बोलावे ते मला कळेना! मी पोलिसांना बोलावले वगैरे खरे असले तरी मी मुळात त्याला एकट्याला सोडून का आलो ह्या माझ्याच प्रश्नाचे उत्तर त्यावेळी माझ्याकडे नव्हते आणि आजही नाही.

ते रम्य दिवस!भाग५

दादाचे वडील इस्पितळातून घरी आले पण काही दिवसातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. माझ्या बरोबरचे सर्व मित्र त्यांच्या अंत्यसंस्काराला गेले पण माझ्या घाबरटपणामुळे मी मात्र गेलो नाही. दादाच्या त्या दु:खद प्रसंगात मी त्याला भेटायला गेलो नाही म्हणून खरे तर त्याला वाईट वाटायला हवे होते; पण उलट मी तिथे गेलो नाही म्हणून, मला जेव्हा तो ऑफिसात आल्यावर भेटला तेव्हा त्याने समाधानच व्यक्त केले. का? तर म्हणे ते वातावरण मला मानवले नसते!
बघा! म्हणजे त्या तशा वेळी देखिल तो माझ्या बर्‍या-वाईटाचा विचार करत होता. आणि मी?

दादाचे वडील गेले आणि दादा पोरका झाला. सहाजणींपैकी ५ बहिणी(एकीचे लग्न आधीच झाले होते), आई,बायको आणि मुलगी अशा ८ स्त्रियांचे पालनपोषण करण्याची अवघड जबाबदारी त्याच्या शिरावर येऊन पडली. ह्या सर्व गोष्टींचा चांगला परिणाम असा झाला की कौटुंबिक बाबींकडे लक्ष देताना त्याला वेळ अपुरा पडू लागला आणि त्याची बाहेरची गुंडगिरी हळूहळू कमी होऊ लागली. स्वभावामध्ये मवाळपणा यायला लागला. बोलण्याची भाषा सौम्य झाली.

ह्याच काळात आमच्यात बर्‍यापैकी मैत्री प्रस्थापित झाली. माझे अनाहूत सल्ले दादा मानायला लागला आणि बर्‍याच वेळा त्याला त्याचा फायदा झाला असेही सांगू लागला(आयुष्यात ही एकच व्यक्ती भेटली की जीने माझा सल्ला मानला आणि मिळालेल्या यशाचे श्रेय मनमोकळेपणाने दिले).

असेच दिवस जात होते आणि एक दिवस आमच्यामध्ये एक नवा प्राणी आला. बुटका,जाडसर,रंगाने सावळा आणि कमालीचा तोतरा. त्याचे नाव विचारले तेव्हा त्याने ते सांगायला जे तोंड उघडले ते जवळ जवळ ५ मिनिटे 'ओ' ह्या स्वरूपात उघडे होते पण आवाज फुटत नव्हता. बर्‍याच वेळा प्रयत्न केल्यावर कळले की त्याचे नाव श्शशशश...................... श्याम आहे. मुळचा दिल्लीचा रहिवासी. त्याचा मोठा भाऊ ह्याच ऑफिसात दिल्लीला साहेब आहे आणि त्याच्याच वशिल्याने ह्याचा इथे शिरकाव होऊ शकला होता.

तर असा हा श्याम साहजिकच आमच्या सर्वांच्या चेष्टेचा आणि वेळ घालवण्याचा विषय होऊन बसला. तोतरेपणा कमी म्हणून की काय ह्याचे हस्ताक्षर देखिल अगदी कोंबडीचे पाय ह्या सदरात मोडणारे. बीए ची पदवी आहे असे त्याने आम्हाला सांगितले तेव्हा आम्ही त्यावरून पण फिरकी घेतली.
हा श्याम सर्वच बाबतीत असा 'हा' होता पण कष्टाला कधी कमी पडला नाही. वृत्तीने अतिशय कंजूष असल्यामुळे जिथे काही स्वस्त अथवा फुकट मिळेल तिथे हा पुढे असायचा. दादाच्या डब्यातले खायला नेहमी हावरटासारखा टपलेला असायचा. दादाचा पण त्याच्यावर का एव्हढा जीव जडला हे एक कोडेच होते आणि श्याम देखिल कुणाचीही तक्रार घेऊन त्याच्याकडे जायचा. मग दादा त्यालाच अजून पिडायचा; पण तरी देखिल तो दादालाच धार्जिणा होता.

एकदा काय झाले! आम्ही दोघे म्हणजे मी आणि दादा आमच्या चहावाल्याकडे चहा पीत बसलो होतो. दादाचे तिथे खाते होते. तो सगळे पैसे महिन्याला चुकते करी. मी मात्र नेहमी रोख पैसे देत असे. तेव्हढ्यात श्याम तिथे आला आणि दादाकडे चहा मागू लागला. दादाने चहावाल्याला श्यामला चहा द्यायला सांगितले आणि स्वतःच्या खात्यात लिहायला सांगितले. श्याम चहा पिऊन निघून गेला. आम्ही पण चहा पिऊन आमच्या कामाला लागलो.
पगाराच्या दिवशी चहावाला दादाकडून पैसे घ्यायला आला तेव्हा त्याने सांगितलेला आकडा ऐकून दादा चांगलाच चक्रावला. त्याने खाते बघितले तर रोजच्या दोन चहाऐवजी ४-४ चहा लिहिलेले त्याला आढळले. मग त्याने चहावाल्याला जाब विचारला की एव्हढे चहा रोजचे कसे लिहिलेस. त्यावर त्या चहावाल्याचे उत्तर ऐकून दादाच काय मी पण उडालो.
चहावाला म्हणाला, "साहेब तुमच्या नावावर रोज ते श्यामसाहेब चाय पिऊनशान जातात. तुमीच त्येनलां त्या दिवशी चाय पाजूनशान ते तुमच्या खात्यावर लिवायला सांगतली म्हनूनशान रोज दोन टायमाला ते चाय पिऊनशान तुमच्या नावावर लिवायला सांगतात. म्हनूनशान मी रोजच्या ४-४ चाय लिवल्या. आत्ता मला काय ठाव तुमचा नी त्येंचा खाता वायला वायला लिवायचा ते."
दादाने शांतपणे ते जे काही पैसे झाले होते ते त्याला दिले आणि निक्षून सांगितले की ह्यापुढे खाते बंद आणि सगळा व्यवहार रोखीने होईल. मग माझ्याकडे वळून म्हणाला, "काय पण म्हण! हा माणूस (श्याम) एक नंबरचा चॅप्टर दिसतोय. आता तू पण बघ मी ह्याच्याकडून कसे डबल पैसे वसूल करतो ते."
मी म्हणालो, "दादा,मारामारी नाही करायची. काय वसुली करायची असेल ती युक्तीने कर."
दादाने ते मान्य केले.

मध्यंतरी काही दिवस गेले आणि एका सोमवारी,सकाळी सकाळी ऑफिसात एका अनोळखी इसमाचा दूरध्वनी आला. त्याच्या सांगण्यानुसार श्यामला शुक्रवारी संध्याकाळी रेल्वे पोलिसांनी स्त्रियांच्या डब्यातून प्रवास करताना पकडले होते आणि तो सध्या मुंबई सेंट्रल येथील रेल्वेच्या तुरुंगात आहे. १७५ रुपये दंड भरून त्याला सोडवावे अशी त्याने विनंतीही केलेली होती.
हा असा दूरध्वनी येताच साहेबांनी(योगा योगाने हा साहेबही दिल्लीकर होता आणि श्यामचा पाठीराखा होता. श्यामसारखाच कंजूषही होता आणि स्वत:कडचे पैसे न देता ते परस्पर इतरांनी भरावे अशी त्याची अपेक्षा होती) लगेच गजाला आणि दादाला बोलावून घेतले आणि घडला प्रकार सांगितला आणि लगेच पैसे भरून त्याला सोडवून आणा असे सांगितले. श्यामच्या पगारातून ते पैसे कापून घेऊन परत करण्याची जबाबदारी साहेबाने घेतली आणि मगच आम्ही सर्वांनी वर्गणी काढून त्याला सोडवून आणले.

एकदम १७५ रुपये गेल्यामुळे श्याम हबकूनच गेला होता. पै पै चा हिशोब करणार्‍या श्यामला आता ते पैसे परत कसे कमावायचे ह्या एकाच विचाराने झोप लागत नव्हती. सारखी चीड चीड चालायची त्याची. मी आणि दादाने हे बरोबर हेरले आणि मग दादाने त्याच्या चहाच्या पैशांची वसुली करण्यासाठी ही योग्य संधी आहे असे ओळखून एक योजना बनवली. त्यात मलाही सामील करून घेतले.

बोलता बोलता मी श्यामला हळूच म्हणालो, "श्याम, तुम दादाको क्यों नही बोलता तेरा वो १७५रु. वापस लानेको. उसका ससुर्जी इधरही चर्चगेट ऑफिसमे बडा अफसर है! उसकी बातको कोई नही ठुकरा सकता!"
"स्स्स्स्स्स्स्स्स्स्स सच्ची?"
मी हो म्हणालो आणि श्यामने जाऊन दादाचे पायच धरले.
"म्म्म्म्म्म्म्म्म मेरे प्प्प्प्प्पैसे ल्ल्ल्ल्ल्लाके द्द्द्द्देना!"
"तेरे पैसे? कायके पैसे? मैंने कब लिये?" दादाने नाटक केले. मग श्यामला छळून छळून (त्याला नीट बोलता येत नाही हे माहीत असून पुन्हा पुन्हा ते बोलायला लावणे हा छळ नाही तर काय? पण आम्हाला पण त्यात एक प्रकारचा आसुरी आनंद मिळत असे) शेवटी दादाने त्याचे पैसे आणून द्यायचे कबूल केले. दादा मला चहा प्यायला चल असे म्हटल्याबरोबर श्यामने त्याला एकट्याला नेऊन चहा आणि बरोबर बटाटे वडा खायला घातला(जगातले कितवे आश्चर्य?). जो माणूस स्वतःसाठी खर्च करायला कांकू करत होता त्याने एव्हढे पैसे एकदम खर्च केले हे पाहून आम्ही चक्रावून गेलो; पण मग एका अनुभवी माणसाकडून कळले की हीच दिल्लीकरांची खासियत आहे. आपले काम करून घेण्यासाठी ते वेळप्रसंगी लाच द्यायलाही कमी करत नाही(ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा सर्वसामान्य माणूस लाच घेणे आणि देणे वाईट असे समजत होता).
मग हा सिलसिला महिनाभर चालू राहिला. दादा काहीतरी खोटीनाटी कारणे सांगून वेळ काढत होता आणि रोज श्यामच्या पैशाने कधी चहा, तर कधी बटाटेवडा/समोसा वगैरे वगैरे खात खात पैसे वसूल करत होता. महाकंजूष आणि लालची श्याम रोज मोठ्या आशेने १७५रु. च्या वसुलीसाठी चहा-खाण्यावर पैसे खर्च करत होता(हे कसे घडत होते हे केवळ तो 'श्याम म्हणजे श्रीकृष्ण'च जाणे).
हे पैसे वसूल तर कधीच होणार नव्हते आणि रोज रोज श्यामकडून चहा-खाणे घेऊन दादाही कंटाळला होता. हा खेळ कुठे तरी थांबवायचा होता; पण कसा ते त्याला कळत नव्हते. मग त्याने माझा सल्ला विचारला. मी जरासा विचार केला आणि त्याला सांगितले की आता सासर्‍याचे काम संपले आहे तेव्हा त्याला मारून टाक. ते कसे काय करायचे ते त्याला नीट समजावले आणि मग दादाने सुटकेचा निःश्वास टाकला.

दुसर्‍या दिवशी श्याम माझ्याकडे आला आणि दादा त्याच्याशी काही बोलतच नाही असे सांगायला लागला. म्हणजे नाटक नीट वठत होते हे माझ्या लक्षात आले. मी त्याच्याबरोबर दादाकडे गेलो आणि दादाला काही विचारणार इतक्यात त्याने माझ्या खांद्यावर मान टाकून रडण्याचे नाटक सुरू केले‌. श्यामला हा काय प्रकार आहे ते कळेना. मग मी दादाकडून वदवून घेतले की त्याचा सासरा वारला म्हणून!
ते ऐकताच श्याम रडायला लागला आणि म्हणाला,"म्म्म्म्म्म्म्मेरा प्प्प्प्प्प्प्प्पैसा?"
दादाने आकाशाकडे बोट दाखवले आणि हळूच मला डोळा मारला! आणि अजून जोरात रडायला लागला. त्याचे रडणे बघून तो असा का रडतोय म्हणून श्यामने मला विचारले.
मी म्हणालो, "त्याचा सासरा हुंड्याचे दहा हजार न देताच मेला म्हणून तो अजून जोरात रडतोय."
हे ऐकून श्याम चुपचाप तिथून निघून गेला आणि दादाने एक मोठा सुस्कारा सोडला.

क्रमश:

ते रम्य दिवस!भाग४

एक दादा सोडला तर आम्ही सगळे अविवाहित होतो. नोकरीत येण्याच्या अगोदरच दादाचे लग्न झालेले होते आणि वर तो एका मुलीचा बापही झालेला होता. त्याचे वडील एका मोठ्या खाजगी कंपनीत फोरमन पदावर काम करत त्यामुळे पैशाची आवक चांगलीच होती. त्यातून ते कामगार संघटनेचे पदाधिकारी होते. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे हा मुलगा जरा जास्तच तोर्‍यात असायचा. अतिशय उग्र स्वभाव आणि ग्राम्य भाषा,त्यामुळे त्याच्या वाटेला सहसा कोणी जात नसे.
पण एक गोष्ट जाणवली की आमच्यामध्ये राहून हळूहळू त्याची भाषा आणि वागणे सुधारत असल्याचे दिसून येत होते. माझ्याशी वागताना का कुणास ठाऊक तो खूप जपून बोलत असे(अर्थात, मी देखिल . तरी देखिल माझ्याशी त्याची मैत्री होत नव्हती.

दादाचे वडील चिक्कार दारू प्यायचे. बायको मुलांना मारझोड करायचे. अती मद्यपानामुळे कितीतरी वेळा त्यांना इस्पितळात भरती करावे लागत असे. बरे झाले की पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे होत असे. नकळत ह्याचा चांगला परिणाम झाला तो म्हणजे दादाला दारूची भयंकर चीड निर्माण झाली. तो दारूच्या थेंबाला देखिल शिवत नसे. हां,आता नाईलाजाने बापाच्या आज्ञेवरून त्याच्यासाठी गुत्त्यावर जाऊन बाटल्या आणत असे; पण एकूणच त्याच्या मनात ह्या सर्व गोष्टींबद्दल एक प्रकारची घृणा निर्माण झाली.
दादा घरात सर्व भावंडात मोठा होता. त्याच्या पाठीवर सहा बहिणी झाल्या. त्यामुळे घरीदारी त्याला दादाच म्हणत. ह्या कौटुंबिक दादाचा सार्वजनिक दादा व्हायला कारण त्याची गुंडगिरी. आजूबाजूच्या भागात त्याचा दरारा निर्माण झाला. असा हा दादा आमच्या ऑफिसात कसा भरती झाला हे एक कोडेच होते. असो.
दिवसामागून दिवस जात होते आणि नकळत माझ्यात आणि दादाच्यात हळूहळू मैत्रिपूर्ण संबंध निर्माण होत होते.

एक दिवस दादा ऑफिसला आलाच नाही; पण त्याने दूरध्वनीने साहेबांना कळवले की वडिलांना पुन्हा इस्पितळात दाखल केले आहे आणि त्यांचे पोटाचे ऑपरेशन आहे. त्यामुळे तो काही दिवस येऊ शकणार नाही. आम्हा मित्रांना ही बातमी जशी कळली तसे काही जण इस्पितळात जाऊन त्याची विचारपूस करून आले. मी मात्र गेलो नाही. कारण मला इस्पितळाच्या त्या तसल्या वातावरणाची एक जबरदस्त भिती वाटत असे. त्या औषधांच्या विशिष्ट वासामुळे गुदमरून जायला होत असे. पण तरी मला मनापासून तिथे जावे असे वाटत होते. मग मी धीर करून गजाला म्हणालो की त्याने माझ्याबरोबर यावे म्हणजे मला दादाला भेटता येईल म्हणून तो माझ्याबरोबर यायला तयार झाला.

गजाच्या आधाराने मी केईएम इस्पितळात प्रवेश केला. ते इस्पितळाचे भव्य आवार,त्यातली डॉ.,परिचारिका,सेवकवर्ग ह्यांची लगबग आणि असंख्य रुग्णांची ताटकळत बसलेली रांग वगैरे सगळे बघूनच भांबावून गेलो. मी गजाला म्हटले की चल आपण परत जाऊ. त्यावर त्याने मला धीर देत बळजबरीनेच आत नेले. जिथेतिथे रूग्णच रुग्ण! निरनिराळ्या अवस्थेतले ते एव्हढे सगळे रुग्ण मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहत होतो. गजाचा हात गच्च पकडून डोळे बंद करून मी पुढे पुढे जात होतो; पण कानांवर कण्हण्या-विव्हळण्याचे आवाज आणि तो औषधांचा विचित्र दर्प माझे पाय मागे खेचत होते. शेवटी एका ठिकाणी गजा थांबला आणि दादाचा आवाज आला तेव्हाच मी डोळे उघडले.

दादा विमनस्क दिसत होता. रोजची चेहर्‍यावरची गुर्मी कुठेच दिसत नव्हती. खूप खचलेला दिसला. त्याचे बाबा झोपले होते म्हणून हळू आवाजात हालहवाल विचारली,त्याला धीर(खोटा खोटा... इथे मीच घाबरलेलो होतो) दिला आणि निरोप घेतला.
दादाच्या बाबांच्या बाजूच्याच पलंगावर एक रुग्ण पडला होता. त्याचा एक पाय कापला होता आणि एक पाय प्लॅस्टरमध्ये गुंडाळून वर टांगला होता. त्याच्या सर्वांगाला पट्ट्या बांधल्या होत्या आणि फक्त डोळे दिसत होते. ते भयानक दृश्य बघितल्यावर मला गरगरायला लागले. मी दादाचा आधार घेतला. मग एका बाजूला दादा आणि दुसर्‍या बाजूला गजा अशा दोघांच्या आधाराने मी त्या कक्षाच्या बाहेर येतच होतो तेव्हढ्यात समोरून एक अशी व्यक्ती आली की त्याला बघून माझी राहिलेली शुद्ध देखिल हरपली आणि काय होते आहे हे कळण्याअगोदर मी धाडकन जमिनीवर कोसळलो

मी शुद्धीवर आलो तेव्हा अक्षरश:'मैं कहां हूं?' असा प्रश्न मला पडला. वर लख्ख प्रकाशणारे दिवे,गरगरणारे पंखे आणि मी एका पलंगावर झोपलेलो,आजूबाजूला डॉक्टर,परिचारिका आणि दादा-गजा ह्यांचा घोळका माझ्याकडे सचिंत मुद्रेने पाहताना दिसला. काही क्षणातच मला मी इस्पितळात असल्याची जाणीव झाली आणि मी उठून बसलो. डॉक्टरांनी मला तपासले आणि सगळे ठीक असल्याचे सांगितले. परिचारिकेने तेव्हढ्यात ग्लूकोज -डी प्यायला दिले‍. त्यामुळे जरा हुशारी वाटली. मग मला तिथून जायची परवानगी मिळाली. मी दोघांच्या आधाराने जेव्हा इस्पितळाच्या बाहेर आलो, प्रथम दीर्घ मोकळा श्वास घेतला आणि मग त्या दोघांच्या डोळ्यातला चिंतातुर भाव बघून त्यांना मी आता पूर्ण ठीक आहे ह्याची खात्री दिली तेव्हाच ते मोकळेपणाने हसले. दादाने मला लगेच प्रेमाने मिठीच मारली. इथेच मला खर्‍या अर्थाने त्याच्या आतला माणूस भेटला.
मग मला त्याने विचारले की असे काय घडले की ज्यामुळे माझी शुद्ध हरपली होती?
मी त्याला म्हटले, "अरे तो तुझ्या बाबांच्या बाजूच्या पलंगावरचा रुग्ण(दादाने त्याचे 'जूगनू' असे नामकरण केले होते. धावत्या रेल्वेगाडीच्या टपावरून प्रवास करताना लोअर परेलच्या पुलाला आपटून तो खाली पडला होता असे कळले. त्याच काळात धर्मेंद्रची भूमिका असलेला 'जूगनू' नामक चित्रपट आलेला होता आणि त्यातील साहसी दृश्ये बघून काही असे युवक, असे स्वत:च्या जीवावर उदार झाले होते. त्यातलाच हा एक) होता ना त्याचा अवतार बघितला तेव्हाच मी अर्धमेला झालो होतो आणि तुमच्या दोघांच्या आधाराने जेमतेम बाहेर येत असताना तो दुसरा एक रुग्ण समोरून चालत आला त्याला तू बघितलेस काय? त्याचा चेहरा इतका सुजला होता की फक्त त्याचा एकच डोळा दिसत होता. एकाक्ष राक्षस जणू काही. आणि ते अनपेक्षितपणे पुढे आलेले ध्यान पाहून माझी उरली-सुरली शुद्धही हरपली."
दादाचा निरोप घेऊन मी आणि गजा निघालो. दादाने गजाला निक्षून सांगितले की त्याने मला रस्त्यात एकटे न सोडता ऑफिसमध्ये सुरक्षितपणे पोचवावे.

निघताना दादाने माझा हात हातात घेतला आणि त्यावेळी त्याच्या त्या स्पर्शाने जे सांगितले ते शब्दात मांडणे अशक्य आहे.

ते रम्य दिवस!भाग३

प्रतोद उर्फ पदू हे एक अजब रसायन होते. माझ्यापेक्षा तीनचार वर्षांनी मोठा होता. त्याच्या आई-वडिलांचे हे 'चौदावे रत्न' (अपत्य) होते. गोरा पान, शिवाजी महाराजांसारखे नाक आणि तशीच दाढी, हसरा चेहरा पण डोळ्याला चश्मा, मध्यम बांधा, मध्यम उंची आणि उडती चाल ही ह्याची काही वैशिष्ट्ये म्हणता येतील. स्वभाव गमतीदार त्यामुळे मिळेल त्याची फिरकी ताणायची हा त्याचा फुरसतीतला धंदा. मी पण त्यात हात धुऊन घेत असे. त्याचे सगळे वागणे मनसोक्त होते. हसायला लागला की एकदम लाल पडेपर्यंत हसायचा.

एकदा काय झाले, आम्ही जेवता जेवता गप्पा मारत आणि गप्पा मारता मारता जेवत असताना गजाने अंकलला('ज्यो' ला) विचारले, "काय रे अंकल,तुझे आई-बाप एव्हढे बूटलर(बुटके)आणि तू कसा एव्हढा उंच?"(अंकल जवळ जवळ पावणेसहा फूट उंच होता)
अंकल नेहमी स्वतःच्या कोशातच(ऍबसेंट माईंडेड) असायचा. त्याच तंद्रीत त्याने उत्तर दिले,"माजा अंकल टॉल हाये ना!"
ह्या त्याच्या उत्तरावर आम्ही सगळे खो-खो करून हसायला लागलो. अंकलला काही कळेच ना की आम्ही का हसतोय ते. त्याने पदूला विचारले, "तुमी सगले हासतात कसाला? काय जोक झाला? मला पन सांग ना!"
पदूने पण हसत हसत त्याला जे सांगितले ते ऐकून आम्ही अजून जोरात हसायला लागलो.
पदू म्हणाला, "बघ तुझी आई बुटकी! बरोबर?"
"बरोबर!"
"तुझा बापूस बुटका, बरोबर?"
"बरोबर!"
" मग तू एव्हढा ऊंच कसा? बरोबर?"
अंकल स्वतःच्या तंद्रीतून बाहेर न येता विचार करू लागला आणि म्हणाला,"हां,बरोबर रे! मी एव्हढा ऊंच कसा? ए,पदू सांग ना मी एव्हढा उंच कसा?"
पदू म्हणाला,"एकदम सोप्पं आहे. तुझा अंकल ऊंच होता ना!"
लगेच अंकल खूश होऊन म्हणाला,"बरोबर आहे,माजा अंकल ऊंच होता. पन पदू तुला कसा माहित?"(आम्ही त्याच्या ह्या प्रश्नावर हसतोच आहोत)
" अरे तूच तर आत्ता सांगितलंस ना? विसरलास?"
"मी कधी सांगितलं? मला आठवत नाही."
मग पदूने पुन:पुन्हा ती गोष्ट त्याला सांगितली तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि आम्हाला तो म्हणाला,"शी रे. तुमी लोक लै चावट हाये. जा मी तुमच्याशी बोलनार नाई." असे म्हणून अंकल रागावून निघून गेला.
आम्ही पदूला म्हणालो,"तुला काय जरूर होती त्याला एव्हढे सविस्तर समजावून सांगायची? जा,आता समजूत काढ त्याची."
मग पदूने जाऊन त्याची कशीबशी समजूत काढली आणि पुन्हा वातावरण निवळले.

ह्या अंकलने एकदा असाच आम्हाला एकदम विक्षिप्त प्रश्न विचारून हसवले होते आणि पदूचे त्यावरचे उत्तर अंकलला भारी पडले होते.
त्याचे काय झाले की गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे चालू होती आणि आम्हा सगळ्यांची त्यावरच वटवट चालली होती. नेहमीप्रमाणे अंकल आमच्यात असूनदेखील नसल्यासारखा होता. पण जरा अस्वस्थ दिसत होता. अशावेळी तो त्याचा एक हात मिशीवर ठेवत असे हे आम्हाला अनुभवाने माहीत झाले होते. म्हणून मी त्याला त्याचे कारण विचारले.
अंकल तसाच मिशीवर हात ठेवत म्हणाला,"ए मला एक क्वेश्चन हाय. विचारू काय?"
आम्ही आमचे बोलणे थांबवून त्याला विचार म्हणून सांगितले.
त्याने प्रस्तावना केली..."ते गनपती तुमचा हिंदू लोकांचा गॉड हाय ना त्येच्याबद्दल एक क्युरिऑसिटी हाय. पन तुमी लोक माईंड नाय करनार तरच मी विचार्तो."
आम्हाला पण आता उत्सुकता लागून राहिली होती की ह्याचा प्रश्न काय असेल?
त्याने सर्व धैर्य एकवटून विचारले, "ते गनपती मॅरीड हाय की अनमॅरीड?"
"हात्तिच्या,एव्हढेच ना? तो मॅरिड आहे." इति पदू.
"नाय मग तेचा माउथ हाय ना ते तर एलीफंटच्या ट्रंक सारखा आहे तर तो त्येच्या वाईफला किस कसा करतो?"
त्याचा तो अचाट प्रश्न ऐकून आम्ही पोट धरधरून हसायला लागलो पण उत्तर काय देणार?
तेव्हढ्यात पदू त्याला म्हणाला,"अंकल इथे बघ. मी तुला दाखवतो की गणपती किस कसा घेतो." आणि पदूने स्वतःच्या डाव्या हाताने स्वत:चाच उजवा कान धरला आणि त्यातनं उजवा हात बाहेर काढून(जुना 'सोनसाखळी'चा खेळ आठवा म्हणजे लक्षात येईल) त्या हाताचा विळखा अंकलच्या मानेला घातला आणि त्याला आपल्याजवळ ओढून किस केले.
इथे आम्ही हसून हसून बेजार झालो(हे लिहिताना देखिल मला हसणे आवरता आवरत नाहीये) आणि अंकल लाजून चूर झाला आणि पदूला म्हणाला, "शी रे, तू होमो हाय काय ? माजा काय किस घेतला?"
मोठ्या मुश्किलीने आम्ही आमचे हसू रोखले आणि मग अंकलला प्रश्न केला,"होमो म्हणजे काय?"(ह्या असल्या संकल्पना त्या काळी आमच्यासाठी नवीनच आणि विचित्रच होत्या.
मग अंकलने आम्हाला होमो म्हणजे काय? लेसबियन म्हणजे काय वगैरे यच्चयावत गोष्टींचे ज्ञान दिले. अर्थात तिथे गजा नसता तर आम्हाला त्या होमो शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची पण जरूर भासली नसती इतके आम्ही बाळबोध (हल्लीच्या भाषेत 'बाबल्या') होतो. असो.

ते रम्य दिवस!भाग १.

मला १९७२ साली नोकरी लागली. मी जेव्हा भरती झालो तेव्हा माझ्याबरोबरच शिकलेले अजून ४ जण देखिल काही दिवसांच्या फरकाने तिथेच भरती झाले.
ह्यामध्ये मी,गजेंद्र,प्रतोद,जोसेफ आणि यशवंत असे पाच आणि सीताराम व सदानंद असे दुसरे दोघे मिळून ७ जणांचा गट प्रस्थापित झाला. ह्या सर्वांच्यात मी वयाने आणि शारीरिक दृष्ट्या लहान होतो.

गजेंद्र उर्फ गजा म्हणजे एक वल्ली होता. ह्याचा बाप(तो वडिलांचा उद्धार असाच करत असे) कुठल्याशा इंग्लिश कंपनीत साहेब होता. त्यामुळे त्यांच्या घरातल्या कपाटात इंग्लिश दारूच्या बाटल्या भरलेल्या असायच्या. बाबासाहेब नियमित मद्यप्राशन करत. त्यांचेच बघून हा गजा देखिल त्यांच्या अनुपस्थितीत चोरून आचमनं करत असे. बोलाचालायला एकदम मोकळाढाकळा असा हा अवलिया पैशाच्या बाबतीत अत्यंत व्यवहारी होता.

प्रतोदला आम्ही सगळेजण पदू असेच म्हणत असू. जातीने कोब्रा असून देखिल खाण्यापिण्याची कोणतीच बंधन न पाळणारा हा प्राणी अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता पण इंग्लिश बोलण्यात मार खायचा त्यामुळे पुढे आला नाही. जी गोष्ट इंजिनियरिंगची पदवी घेतलेल्या माणसांना समजायला कठीण असे ती ह्याला चुटकीसरशी समजत असे. जगाच्या दोन पावले पुढे असणारा हा प्राणी वरिष्ठांना देखिल तंत्रज्ञानातील बारकावे अतिशय सहजतेने त्याच्या खास इंग्लिशमध्ये समजावून देत असे. तरीदेखील(त्याच्या भाषेच्या अज्ञानाकडे डोळेझाक करून) त्याला सगळेजण मानत. ह्याचे शरीर इतके लवचिक होते की खुर्चीच्या हातातून तो सहज आतबाहेर होत असे(हातवाल्या स्टीलच्या खुर्च्या ज्यांची बैठक आणि पाठ लाकडी चौकटींची व वेताने विणलेली असे).

जोसेफला तरुण वयातच टक्कल पडायला सुरुवात झाली असल्यामुळे आम्ही त्याला अंकल म्हणत असू. हा नेहमीच स्वत:च्या विचारात गुरफटलेला असे. ह्याला गिटार आणि स्टिरिओ अँप्लिफायर(त्यावेळी हे तंत्रज्ञान भारतात नवीनच आले होते) ह्यांचे जबरदस्त आकर्षण होते. बेस गिटार वाजवत तो अतिशय खर्जात जेव्हा ती इंग्लिश क्लासिकल गाणी म्हणायचा तेव्हा ऐकत राहावेसे वाटे.

यशवंत उर्फ यश हा जबरदस्त थापेबाज प्राणी होता. त्याच्या कैक थापा इतक्या बेमालून मारलेल्या होत्या की मी बरीच वर्षे त्या सर्व गोष्टी खर्‍याच धरून चालत होतो.

सीताराम उर्फ दादा(त्यावेळी तो खरोखरीचा दादा होता) म्हणजे एक अजब रसायन होते. १०० किलोच्यावर वजन,रात्रीची जरा जास्तच झालेली(आज पर्यंत दारूच्या थेंबाला देखील स्पर्श केलेला नाही) असावी असे तारवटलेले लालबुंद डोळे, ढगळ पँट,तितकाच ढगळ पूर्ण हातांचा शर्ट,सोन्याची कपलिंग,बटणं आणि आवाज जाडाभरडा. बोलताना शिव्यांचा सढळ वापर आणि खिशात रामपुरी(एकदा साहेबाला काढून दाखवला होता...‌साहेब गार!!!!). पण कामात तरबेज .

सदानंद अतिशय सभ्य आणि साधा‍. आपण आणि आपले काम ह्या व्यतिरिक्त जास्त कुठल्या भानगडीत नसायचा. हसणं मात्र गदगदून असायचे.

आणि मी. मला सगळे बाप्पा म्हणत. मी बडबड्या,फिरक्या घेणारा आणि माझ्या विषयात बर्‍यापैकी प्रवीण होतो. शारीरिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे कधी कधी मार देखील खायचो; पण तो पचवून पुन्हा फिरक्या घ्यायला तयार असायचो त्यामुळे हळू हळू इतरांना त्याची सवय झाली.

सुरुवातीला मी आणि दादा एकमेकांशी अगदी मोजकेच बोलायचो. दादाच्या दृष्टीने मी भट म्हणजे जंटलमॅन. अशा माणसाशी आपून कसा बोलनार?
दादा जातीने आग्री. नैसर्गिकच मत्स्याहारी आणि मांसाहारी होता. त्याचा जेवणाचा डबा म्हणजे चार-पाच लोकांचे जेवण असे. मी एकटा वेगळा जेवायला बसायचो (पूर्ण शाकाहारी आणि अभक्ष्यभक्षणाची नावड)आणि ते सहाजण एकत्र जेवत.
साहजिकच माझ्यात आणि त्यांच्यात एक अदृश्य अशी लक्ष्मणरेषा आखली गेली की ज्यामुळे मी थोडासा वेगळा पडलो आणि दादा व माझ्यामध्ये तशी खास मैत्रीभावना निर्माण झाली नाही. गजा आणि दादा हे एकमेकांचे घट्ट मित्र झाले.
मलाही त्याचे विशेष काहीच वाटले नाही कारण मी त्यांच्यासारखा वागू शकणार नव्हतो. पहिल्यापासूनच माझे धोरण याल तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय ह्या सावरकरांच्या धोरणासारखे होते.

ह्या सर्वांच्यात आणखी एकाची भर पडली. ह्याचे नाव लुडविग पण ह्याला घरचे लोक चिंटू म्हणत म्हणून आम्ही देखिल तसेच म्हणायला लागलो. दिसायला रानवट. भाषा शिवराळ. तरबेज मुष्टीयोद्धा आणि येताजाता ह्याला हाण त्याला धर असे चालायचे. त्यामुळे त्याला मी आणि दादा सोडले तर सगळे घाबरून असत.पहिल्यापासूनच मी उगीचच कोणाला कधी घाबरलो नाही(अरे मुष्टीयोद्धा असलास तर घरचा असे मनातल्या मनात म्हणत). दादा आणि तो बरेच दिवस एकमेकांना नजरेने जोखत होते आणि बघता बघता एकदिवस ते दोघे एकमेकांना भीडले. आमच्या सारख्या चिल्लर लोकांची शामतच झाली नाही त्यांच्या मध्ये पडायची; पण तेव्हढ्यात मी हळूच ओरडलो,"ए,साहेब आले", आणि घाईघाईत सगळेजण पांगले.

त्यानंतर ते दोघे संधी शोधत होते एकमेकाना भिडायची पण कशी कुणास ठाऊक मला एक युक्ती सुचली. मी त्या दोघांना एकेकटे गाठून (लांबूनच)एकमेकांबद्दल भलावण करणार्‍या चारदोन खोट्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्यात मैत्री झाली(मला आपापसातील मैत्रीचे वातावरण गढूळ होऊ द्यायचे नव्हते). मी मात्र नामानिराळा राहिलो, आपण त्या गावचेच नाही असे दाखवले.
त्यानंतर माझ्याबद्दल त्यांच्या मनात एक कृतज्ञतेची भावना जागृत झाल्याचे त्यांच्या वागण्यातून दिसायला लागले. तरीदेखिल मी चार हात अंतरावरच रहायचे पसंत केले.

ते रम्य दिवस!भाग२

गजा आमच्या गटाचा अघोषित नेता होता. त्याने सांगायचे आणि आम्ही ऐकायचे असे नेहमीच चालत असे. एकदा वृत्तपत्रात बातमी आली की दारूसाठी(पिण्यासाठी ) परवाना(परमिट) असण्याची जरूर आहे. परवान्याशिवाय कुणी पकडले गेले तर जबर दंड होईल वगैरे वगैरे. खरे तर ह्या असल्या बातम्यांशी माझे काहीच देणे घेणे नव्हते पण गजाच्या आग्रहास्तव आणि मैत्रीखातर इतरांसकट मी देखिल तो परवाना काढून घेतला. त्यासाठी लागणारे सव्यापसव्य मात्र गजाने आनंदाने केले. सगळ्यांकडून अर्ज भरून घेतले . परवाना शुल्कासहित ते ओल्ड कस्टम हाऊसमध्ये नेऊन दिले आणि नंतर परवाना स्वीकारायला आम्हा सगळ्यांना तिथे नेले.

घरी मी हे सांगितल्यावर मला आईचा ओरडा खायला लागला. "आधी परवाने काढा आणि मग दारू ढोसा. काय ठरवले आहेस काय तू? शोभते काय हे तुला? हेच संस्कार केले काय मी तुझ्यावर?" इति आई!
मी चुपचाप ऐकून घेतले कारण मला देखिल मी केलेल्या गोष्टीचे समर्थन करायचे नव्हते. दुसर्‍या दिवशी मी गजाला तो परवाना परत केला आणि सांगितले की त्याचे त्याने काय वाटेल ते करावे पण माझ्याकडे तो परवाना नको म्हणून.

त्या काळात मी नुकताच व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करायला सुरुवात केली होती. गजा सुद्धा दादरच्या एका सुप्रसिद्ध व्यायामशाळेत व्यायाम करत असे. तसा माझ्या आणि त्याच्या शरीरयष्टीत विशेष फरक नव्हता; पण माझ्यापेक्षा त्याचे दंडाचे स्नायू(बेडकी) जरासे बरे दिसत असत. तो नेहमी मला ते दाखवून म्हणायचा, "भेंxx (गजाच्या तोंडात 'भ' कार आणि 'म'कारयुक्त शिव्या ह्या शिव्या म्हणून न येता एक पालुपद म्हणूनच असत). बघ बघ! बेडकी बघ कशी फुगते! तू लेका भट. नुसता डाळ भात खाऊन कधी अशी बॉडी बनते काय?"
मी आपला काहीच न बोलता मान डोलवत असे त्यामुळे त्याला खूप जोर येई. लगेच खालच्या आवाजात काही तरी गुपित सांगितल्याच्या आविर्भावात तो मला सांगे, "xxx तू ना एक कर! डॉ.ब्रँडी असते ना ती रोज दुधात एक चमचा घालून घेत जा. तुझी पण बॉडी लवकर बनेल."
"अरे पण ब्रँडी म्हणजे दारू! मी दारू नाही पीत आणि पिणार पण नाही."
"xxx डॉ. ब्रँडी हे औषध आहे. दारू नाही काही आणि फक्त एकच चमचा घ्यायची दुधाबरोबर."
"नाही रे बाबा मला नाही जमणार. मी हा असा राहिलो तरी चालेल."
आमचे हे बोलणे नेहमीच होत असे आणि माझ्या नकारावर संपत असे; पण रोज रोज हे ऐकून मी देखिल विचलित झालो.

माझे वडील दुसर्‍या महायुद्धात इंग्रजांच्या सेनेत असताना ब्रह्मदेशात दोन वर्ष काढून आले होते. मी हळूच हा विषय त्यांच्याकडे काढला. ते म्हणाले,"हे बघ दारू आणि ब्रँडी ह्याच्यात साहेब लोक फरक मानतात. ब्रँडी ही शरीर गरम करण्यासाठी, विशेषत: थंडीत वापरतात. तसेच एखादा माणूस थंडीने गारठला तर त्याच्या हातपायांना ब्रँडी चोळतात. पण आपल्याकडे ह्या सर्व अल्कोहोलिक पदार्थांना दारूच मानतात."
"पण भाऊ(वडिलांना आम्ही 'भाऊ' च म्हणत असू) तुम्ही कधी प्यायलेय का दारू किंवा ब्रँडी?"
"हो! अरे तिथे थंडी काय असायची? मधनं मधनं प्यायलाच लागायची; पण प्यायची पण मर्यादा होती. केवळ गरज म्हणूनच प्यायली. मिलिटरी सोडल्यापासून ते पिणे ही सोडले. आपल्या हवामानात ह्याची जरूरच नाही. तिथे कधी कधी मांसाहार पण करावा लागला; पण आपत्काल म्हणूनच. त्याची चटक लागू दिली नाही. आता ते सर्व सोडल्याबद्दल काहीच वाटत नाही. पण हे सर्व तू आजच का विचारतोयस?"
भाऊंनी मला बरोबर पकडले होते. मी मग सगळी गोष्ट सांगून टाकली. तसे ते म्हणाले, "अरे असे काही नसते. नियमित आणि भरपूर व्यायाम आणि भरपूर आहार ठेवलास तर तूही शक्तिशाली बनशील."

मग मी गजाच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे; पण त्याने पिच्छा सोडला नाही आणि एका बेसावध क्षणी मी त्याचे ऐकले आणि एक छोटी ब्रँडीची बाटली त्याच्याच साहाय्याने खरेदी केली. घरी गेलो पण हे आईला सांगायची हिंमत नव्हती म्हणून दोन दिवस बाटली लपवून ठेवली. गजा विचारत होता,"घेतलीस की नाही?" आणि मी त्याला,"अजून हिंमत झाली नाही!" असे सांगत होतो.

एकदा संध्याकाळी घरी गेलो तेव्हा लक्षात आले की घरचे वातावरण तंग आहे. आई तर खूपच रागावलेली दिसत होती. मी घरात शिरताच तिने मला ती लपवलेली बाटली अंगुलिनिर्देश करून दाखवत विचारले,"ही तू आणलीस?"(अगोदर घरातल्या सगळ्यांना विचारून झाले होते)
मी होय म्हणालो आणि मग न भूतो न भविष्यति अशी माझी खरडपट्टी निघाली. मी खूप समजावून सांगितले पण माझ्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. आई न जेवताच झोपली. आपल्या संस्कारांचा आपल्याच डोळ्यादेखत झालेला पराभव तिच्या जिव्हारी लागला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी मी उठलो आणि तोंड धुऊन चहा प्यायला बसलो तर मला चहा पांढरा दिसला. नीट बघितल्यावर लक्षात आले की ते दूध होते. मी आईला विचारले तेव्हा तिने घुश्शातच उत्तर दिले,"काय दिवे लावायचेत ते लावा. तुझ्या वडिलांचा पण तुला पाठिंबा. आता काय ती तुझी ब्रँडी की फ्रँडी, जी काय असेल ती घाला त्यात आणि ओता नरड्यात! शरीर कमवतायत म्हणे शरीर!"
मी निमूटपणे बाटली उघडली (आईने नाकाला पदर लावला आणि नाही म्हटले तरी मलाही तो उग्र वास आवडला नाही; पण आता माघार नाही)आणि एक चमचा ब्रँडी त्या दुधात घालून दूध ढवळले. ओठाला कप लावला आणि तोंड वेडेवाकडे केले. कप बाजूला ठेवला. त्या माझ्या प्रतिक्रियेने आईला हसू आले म्हणून मी मोठ्या निर्धाराने कसाबसा तो कप नरड्याखाली ओतला.

ऑफिसात गेल्या गेल्या मी माझा पराक्रम गजाला सांगितला तेव्हा तो खूश झाला. मला म्हणाला, "xxx आता बघ दोन महिन्यात तुझी बॉडी कशी तयार होते ती; पण तू एक चमच्याऐवजी दोन चमचे घेत जा म्हणजे जरा लवकर बॉडी बनेल."
त्याच्या सल्ल्याप्रमाणे मी अजून दोन दिवस ते सर्व केले पण मला स्वत:लाच कुठे तरी अपराधी वाटत होते आणि ती चव देखील आवडली नव्हती. चौथ्या दिवसापासून मी पुन्हा आईकडे चहाची मागणी केली आणि ह्यापुढे मी असले काही करणार नाही असे वचन दिले. आईने मला माफ केले आणि ती बाटली फेकून द्यायला सांगितली.
मी ती न फेकता ऑफिसात घेऊन गेलो आणि गजाला भेट म्हणून दिली(तुझी तुला लखलाभो! असे म्हणून) आणि सांगितले की मी ह्यापुढे असले काहीही करणार नाही म्हणून. गजाला काय फुकटात मिळाली म्हणून तो खूश आणि एकदाची ब्याद टळली म्हणून मी पण खूश!