माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२ फेब्रुवारी, २००७

ते रम्य दिवस!भाग२

गजा आमच्या गटाचा अघोषित नेता होता. त्याने सांगायचे आणि आम्ही ऐकायचे असे नेहमीच चालत असे. एकदा वृत्तपत्रात बातमी आली की दारूसाठी(पिण्यासाठी ) परवाना(परमिट) असण्याची जरूर आहे. परवान्याशिवाय कुणी पकडले गेले तर जबर दंड होईल वगैरे वगैरे. खरे तर ह्या असल्या बातम्यांशी माझे काहीच देणे घेणे नव्हते पण गजाच्या आग्रहास्तव आणि मैत्रीखातर इतरांसकट मी देखिल तो परवाना काढून घेतला. त्यासाठी लागणारे सव्यापसव्य मात्र गजाने आनंदाने केले. सगळ्यांकडून अर्ज भरून घेतले . परवाना शुल्कासहित ते ओल्ड कस्टम हाऊसमध्ये नेऊन दिले आणि नंतर परवाना स्वीकारायला आम्हा सगळ्यांना तिथे नेले.

घरी मी हे सांगितल्यावर मला आईचा ओरडा खायला लागला. "आधी परवाने काढा आणि मग दारू ढोसा. काय ठरवले आहेस काय तू? शोभते काय हे तुला? हेच संस्कार केले काय मी तुझ्यावर?" इति आई!
मी चुपचाप ऐकून घेतले कारण मला देखिल मी केलेल्या गोष्टीचे समर्थन करायचे नव्हते. दुसर्‍या दिवशी मी गजाला तो परवाना परत केला आणि सांगितले की त्याचे त्याने काय वाटेल ते करावे पण माझ्याकडे तो परवाना नको म्हणून.

त्या काळात मी नुकताच व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करायला सुरुवात केली होती. गजा सुद्धा दादरच्या एका सुप्रसिद्ध व्यायामशाळेत व्यायाम करत असे. तसा माझ्या आणि त्याच्या शरीरयष्टीत विशेष फरक नव्हता; पण माझ्यापेक्षा त्याचे दंडाचे स्नायू(बेडकी) जरासे बरे दिसत असत. तो नेहमी मला ते दाखवून म्हणायचा, "भेंxx (गजाच्या तोंडात 'भ' कार आणि 'म'कारयुक्त शिव्या ह्या शिव्या म्हणून न येता एक पालुपद म्हणूनच असत). बघ बघ! बेडकी बघ कशी फुगते! तू लेका भट. नुसता डाळ भात खाऊन कधी अशी बॉडी बनते काय?"
मी आपला काहीच न बोलता मान डोलवत असे त्यामुळे त्याला खूप जोर येई. लगेच खालच्या आवाजात काही तरी गुपित सांगितल्याच्या आविर्भावात तो मला सांगे, "xxx तू ना एक कर! डॉ.ब्रँडी असते ना ती रोज दुधात एक चमचा घालून घेत जा. तुझी पण बॉडी लवकर बनेल."
"अरे पण ब्रँडी म्हणजे दारू! मी दारू नाही पीत आणि पिणार पण नाही."
"xxx डॉ. ब्रँडी हे औषध आहे. दारू नाही काही आणि फक्त एकच चमचा घ्यायची दुधाबरोबर."
"नाही रे बाबा मला नाही जमणार. मी हा असा राहिलो तरी चालेल."
आमचे हे बोलणे नेहमीच होत असे आणि माझ्या नकारावर संपत असे; पण रोज रोज हे ऐकून मी देखिल विचलित झालो.

माझे वडील दुसर्‍या महायुद्धात इंग्रजांच्या सेनेत असताना ब्रह्मदेशात दोन वर्ष काढून आले होते. मी हळूच हा विषय त्यांच्याकडे काढला. ते म्हणाले,"हे बघ दारू आणि ब्रँडी ह्याच्यात साहेब लोक फरक मानतात. ब्रँडी ही शरीर गरम करण्यासाठी, विशेषत: थंडीत वापरतात. तसेच एखादा माणूस थंडीने गारठला तर त्याच्या हातपायांना ब्रँडी चोळतात. पण आपल्याकडे ह्या सर्व अल्कोहोलिक पदार्थांना दारूच मानतात."
"पण भाऊ(वडिलांना आम्ही 'भाऊ' च म्हणत असू) तुम्ही कधी प्यायलेय का दारू किंवा ब्रँडी?"
"हो! अरे तिथे थंडी काय असायची? मधनं मधनं प्यायलाच लागायची; पण प्यायची पण मर्यादा होती. केवळ गरज म्हणूनच प्यायली. मिलिटरी सोडल्यापासून ते पिणे ही सोडले. आपल्या हवामानात ह्याची जरूरच नाही. तिथे कधी कधी मांसाहार पण करावा लागला; पण आपत्काल म्हणूनच. त्याची चटक लागू दिली नाही. आता ते सर्व सोडल्याबद्दल काहीच वाटत नाही. पण हे सर्व तू आजच का विचारतोयस?"
भाऊंनी मला बरोबर पकडले होते. मी मग सगळी गोष्ट सांगून टाकली. तसे ते म्हणाले, "अरे असे काही नसते. नियमित आणि भरपूर व्यायाम आणि भरपूर आहार ठेवलास तर तूही शक्तिशाली बनशील."

मग मी गजाच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे; पण त्याने पिच्छा सोडला नाही आणि एका बेसावध क्षणी मी त्याचे ऐकले आणि एक छोटी ब्रँडीची बाटली त्याच्याच साहाय्याने खरेदी केली. घरी गेलो पण हे आईला सांगायची हिंमत नव्हती म्हणून दोन दिवस बाटली लपवून ठेवली. गजा विचारत होता,"घेतलीस की नाही?" आणि मी त्याला,"अजून हिंमत झाली नाही!" असे सांगत होतो.

एकदा संध्याकाळी घरी गेलो तेव्हा लक्षात आले की घरचे वातावरण तंग आहे. आई तर खूपच रागावलेली दिसत होती. मी घरात शिरताच तिने मला ती लपवलेली बाटली अंगुलिनिर्देश करून दाखवत विचारले,"ही तू आणलीस?"(अगोदर घरातल्या सगळ्यांना विचारून झाले होते)
मी होय म्हणालो आणि मग न भूतो न भविष्यति अशी माझी खरडपट्टी निघाली. मी खूप समजावून सांगितले पण माझ्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. आई न जेवताच झोपली. आपल्या संस्कारांचा आपल्याच डोळ्यादेखत झालेला पराभव तिच्या जिव्हारी लागला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी मी उठलो आणि तोंड धुऊन चहा प्यायला बसलो तर मला चहा पांढरा दिसला. नीट बघितल्यावर लक्षात आले की ते दूध होते. मी आईला विचारले तेव्हा तिने घुश्शातच उत्तर दिले,"काय दिवे लावायचेत ते लावा. तुझ्या वडिलांचा पण तुला पाठिंबा. आता काय ती तुझी ब्रँडी की फ्रँडी, जी काय असेल ती घाला त्यात आणि ओता नरड्यात! शरीर कमवतायत म्हणे शरीर!"
मी निमूटपणे बाटली उघडली (आईने नाकाला पदर लावला आणि नाही म्हटले तरी मलाही तो उग्र वास आवडला नाही; पण आता माघार नाही)आणि एक चमचा ब्रँडी त्या दुधात घालून दूध ढवळले. ओठाला कप लावला आणि तोंड वेडेवाकडे केले. कप बाजूला ठेवला. त्या माझ्या प्रतिक्रियेने आईला हसू आले म्हणून मी मोठ्या निर्धाराने कसाबसा तो कप नरड्याखाली ओतला.

ऑफिसात गेल्या गेल्या मी माझा पराक्रम गजाला सांगितला तेव्हा तो खूश झाला. मला म्हणाला, "xxx आता बघ दोन महिन्यात तुझी बॉडी कशी तयार होते ती; पण तू एक चमच्याऐवजी दोन चमचे घेत जा म्हणजे जरा लवकर बॉडी बनेल."
त्याच्या सल्ल्याप्रमाणे मी अजून दोन दिवस ते सर्व केले पण मला स्वत:लाच कुठे तरी अपराधी वाटत होते आणि ती चव देखील आवडली नव्हती. चौथ्या दिवसापासून मी पुन्हा आईकडे चहाची मागणी केली आणि ह्यापुढे मी असले काही करणार नाही असे वचन दिले. आईने मला माफ केले आणि ती बाटली फेकून द्यायला सांगितली.
मी ती न फेकता ऑफिसात घेऊन गेलो आणि गजाला भेट म्हणून दिली(तुझी तुला लखलाभो! असे म्हणून) आणि सांगितले की मी ह्यापुढे असले काहीही करणार नाही म्हणून. गजाला काय फुकटात मिळाली म्हणून तो खूश आणि एकदाची ब्याद टळली म्हणून मी पण खूश!

1 टिप्पणी:

Abhay म्हणाले...

गेल्या दोन तीन दिवसापासून तुमच्या ब्लॉग वरील लेख वाचत सुटलो आहे.. गोष्टी रसाळपणे सांगण्याची तुमची हातोटी भावली. एक छोटीशी सूचना ... या ब्लॉबगवरील लेख उलटक्रमाने आहेत (शेवट्चा लेख सर्वात आधी व पहिला सर्वात शेवटी) .. जर अनुक्रमे मांडता आले तर वाचताना सोपे जाईल.
happy blogging :-)