दिल्ली स्टेशनवर आम्ही उतरलो तेव्हा रात्रीचे साडे-दहा वाजले होते. आयुष्यात पहिल्यांदाच दिल्लीत पाऊल ठेवले होते;त्यामुळे आता इतक्या रात्री जायचे कुठे हा प्रश्नच होता. मुंबईहून निघताना काही लोकांनी सल्ला दिला होता की सरळ महाराष्ट्र भवनात जाऊन राहायचे. आता एव्हढ्या रात्री ह्या अनोळखी जागी हे महाराष्ट्र भवन शोधायचे कुठे? तेव्हढ्यात एक सरदारजी आपली रिक्षा घेऊन आमच्या जवळ आला आणि आम्हाला कुठे जायचे आहे म्हणून विचारू लागला. सुध्याने लगेच तोंड उघडले, किधर भी होटल्मे रेहेनुकु मिलेंगा क्या?
मी त्याला मध्येच अडवत सरदारजीला धेडगुजरी भाषेत म्हणालो, पाजी(प्राजी चा अपभ्रंश) हमे महाराष्ट्र भवन जाणा है जी, तुसी लेके चलोगे?
तो लगेच तयार झाला. आम्ही चौघे आणि आमचे सामान,एव्हढे सगळे त्या रिक्षातून कसे जाणार हा प्रश्न मला पडला होता;पण सरदारजीने तो सहज सोडवला . तिघे मागच्या सीटवर आणि पुढे त्याच्या बाजूला मला बसवले, सामान कसे तरी कोंबले आणि त्याने रिक्षा सुसाट हाणली.
साधारण अर्धा तास त्याने आम्हाला दिल्ली फिरव-फिरव फिरवली आणि एका गल्लीमध्ये एका जुनाट इमारतीजवळ आणून थांबवली. पटापट आमचे सामान उतरवले आणि गडी समोरच असलेल्या दरवाज्यातून आत गेला सुद्धा. सुध्या,पद्या आणि दिन्या सुद्धा त्याच्या पाठोपाठ आत गेले. मी बाहेरच रेंगाळलो. महाराष्ट्र भवनाची पाटी कुठे दिसते काय म्हणून बघू लागलो;तर तसे काहीच मला दिसले नाही. उलट 'विवेक लॉज' अशी एक छोटेखानी पाटी दिसली. मी बाहेरच थांबलो हे बघून तो सरदारजी मला बोलवायला बाहेर आला. मी त्याला ती पाटी दाखवली आणि विचारले, इधर लिखा है विवेक लॉज तो महाराष्ट्र भवन किधर है?
साब अभी बहुत रात हुई है,आप इधरही रुकिये,कल आपको महाराष्ट्र भवनमे पहुचाऊंगा!इति सरदारजी.
मी म्हणालो, तुमने हमको फँसाके इधर लाया,हमको अभीके अभी महाराष्ट्र भवन मे जाना है!
तेव्हढ्यात सुध्या बाहेर आला. त्याने मला खेचत आत नेले. आत बसलेला व्यवस्थापक चांगला दणकट दिसत होता. त्याने माझे स्वागत केले, आइये साब. आपको बहुत अच्छा कमरा दिया है!
म्हणजे,मी बाहेर असताना, आमच्या ह्या तिघा दोस्तांनी खोली देखिल निवडली होती. मी ठामपणे म्हणालो, हमको इधर रेहनेकाच नही, हमको महाराष्ट्र भवनमे जाने का है. ये सरदारजीने हमको फँसाके इधर लायेला है. इसको आपसे कमिशन मिलता होगा इसिलिये ये हमको इधरिच लाया!
सुध्या गयावया करून मला म्हणाला, अरे आता रात्रीचे ११ वाजून गेलेत,आपण कुठे शोधत फिरणार ते महाराष्ट्र भवन. चल आज इथेच झोपू आणि उद्या सकाळी महाराष्ट्र भवना मध्ये जाऊ! आणि त्याने त्या व्यवस्थापकाकडे चावी मागितली.
पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. त्या व्यवस्थापकाने मला समजावण्याचा बराच वेळ प्रयत्न केला पण मी माझा हट्ट चालूच ठेवला आणि माझे तिघे मित्रही माझी मनधरणी करून थकले. ह्या सरदारजीने आम्हाला इथे फसवून आणल्याचा मला सात्त्विक संताप आला होता आणि म्हणूनच मी देखिल हटून बसलो होतो. कोणाच्याही विनवणीला मी भीक घालत नाही हे बघितल्यावर त्या व्यवस्थापकाने मला दरडावणीच्या स्वरात म्हटले, आपको इधर रहेनाही पडेगा. अभी इसी वक्त आप कही नही जायेंगे!
अशा भाषेत माझ्याशी कोणीही बोलले तर मी कधीच खपवून घेत नाही. मी त्याला त्याच भाषेत उत्तर दिले, हमको इधर रेहेनके लिये तुम(अजून माझे हिंदी मराठीच्या वळणाने जात होते) मजबूर नही कर सकता है. हम जायेंगे और जाके दिखायेंगे. कौन मायका लाल हमको रोकता है मैं देखता हुं!
असे म्हणून मी माझे सामान उचलले आणि दरवाजाच्या दिशेने निघालो. माझा हा पवित्रा बघितल्यावर तो व्यवस्थापक जागेवरून उठला आणि माझ्या कडे धावला. त्याच वेळी त्याच्या नोकरांनी मला दरवाज्यातच अडवले. तो माझ्या समोर येऊन उभा राहिला म्हणण्यापेक्षा उभा ठाकला हे म्हणणे जास्त योग्य होईल. सहा फुटापेक्षा अधिक उंच,आडव्या अंगाचा असा तो राक्षसी देह आणि त्याच्यासमोर मी म्हणजे एक 'चिलट' वाटत होतो. त्याच्या फुंकरीने देखील उडून गेलो असतो. माझ्या हातातील सामान त्याने सहजपणे हिसकावून घेतले आणि म्हणाला, हमारे यहां आया हुआ मेहेमान ऐसे कैसे जा सकता है. उसकी खातिरदारी करनेका मौका हम कभी नही छोड सकते. आपको आज की रात तो रुकनाही पडेगा. अभी आप यहांसे कल सुबह ही बाहर जा सकते है!
त्याच्या त्या आविर्भावाने क्षणभर मी घाबरलो. वाटले,आज काही आपली धडगत नाही. हा राक्षस वेळप्रसंगी शारीरिक मारहाण देखिल करेल; आणि ह्या अपरिचित शहरात आपल्या मदतीला कोण येणार?(ते तिघे केंव्हाच गळपटले होते, भीतीने थरथर कापत कोपर्यात उभे होते) काय करावे, माघार घ्यावी की आवाज चढवावा?(नेहेमीच विपरीत परिस्थितीत माझा मराठी बाणा आणि अहंकार असा उफाळून येतो असा अनुभव आहे.)मी असा विचारमग्न असताना त्याने त्या नोकराला आमचे सामान खोलीत नेऊन ठेवायची आज्ञा केली. ते ऐकल्यावर सगळा धीर एकवटून (जे काय होईल ते होईल असा विचार करून) टीपेच्या आवाजात मी त्या नोकरावर ओरडलो, हात नही लगाना सामानको. अभी तो मेरा निश्चय पक्का हुआ,मैं यहां एक पल भी नही रुकुंगा! आणि त्या राक्षसाकडे बघून म्हणालो, मेहेमानको हम देवता समझते है और आप लोग कैदी समझके अटकाके रखते है. अरे मैंने सुना था की दिल्ली दिलवालोंकी होती है,लेकिन यहां आकर पता चला की ये शहर तो ठगोंका शहर हैं. यहां मेहेमाननवाझीके नामपे पर्देसीयोंको लुटते हैं. ऐसे शहरमें मैं एक पल भी रहना नही चाहता. मैं जा रहा हुं, किसीकी ताकत हैं तो रोक लो. मैं मुंबई वापस जाउंगा तब वहांके लोगोंको कहुंगा की दिल्ली दिलवालोंकी नही बल्कि लुटेरोंकी है. मुंबईके सरदारजी टॅक्सी ड्रायव्हर कितने इमानदार और भरोसेमंद होते है. नही तो ये सरदारजी! सरदारके नामपे कलंक हैं!
मी माझ्या मित्रांना आज्ञा केली, चला! असे मुर्दाडासारखे शेपट्या घालून बसलात म्हणून हा राक्षस माजलाय. चला,आपला मराठी बाणा दाखवा! पण कसले काय न कसले काय! त्या तिघांचे पाय जमीनीला चिकटून बसल्याप्रमाणे ते तिघे निश्चल उभे होते.
नाही म्हटले तरी माझ्या आवाजाचा परिणाम त्या राक्षसावर झालाच. तो विचार करत असावा. हा प्राणी,फुंकर मारली तरी उडून जाईल असे ह्याचे शरीर आणि त्यात आवाज मात्र भीम गर्जनेसारखा(ह्या आवाजाने मला वेळोवेळी साथ दिली आहे). प्रकरण वाटते तितके सामान्य नाही.(हे सगळे मी मनातल्या मनात)मला कळेना काय करावे. मित्र हालायला तयार नाहीत. आम्ही एकत्र आलो होतो;त्यामुळे त्यांना सोडून जाणे योग्य वाटेना आणि इथे राहावे असे देखिल वाटत नव्हते. तेव्हढ्यात इतका वेळ गप्प असलेला सरदारजी मला हात जोडून,गयावया करत म्हणाला, बाबूजी,गुस्सा थूक दो. मैं माफी मांगता हूं. मेरे वजहसे आपको तकलीफ हुई. लेकिन कृपा करके मेरे नियतपे शक मत किजिये. मैं आपको ले चलता हूं वहां,जहां आपका मन हो. लेकिन दिल्लीवालोंके बारेमे ऐसी बात मत सोचो. हम भी मेहेमानको भगवान ही समझते हैं. मैं भी असली सरदार हूं और मेरे बम्बईके सरदारपाईजी जितना पाक हूं!(इथे मी आश्चर्यचकित झालोय! बाण वर्मी लागला म्हणायचा!)
सरदारजीचा बुरूज ढासळलेला बघताच राक्षस पण एकदम निरवानिरवीची भाषा करू लागला. तो म्हणाला, बाबूजी,आप को मैं प्यार मोहोब्बतसे कहता हूं की आप इतने रातको और कहीं नही जाना. मैं आपको सबसे अच्छी रूम देता हुं और वो भी आधे भाव मे. अभी आप, ना मत कहना,नही तो मुझे बहुत बुरा लगेगा. आज तक हमारे यहांसे कोई भी ग्राहक नराज होकर वापस नही गया. आप हमपे कृपा किजिये!(आश्चर्याचा कडेलोट! मला तर वाटले होते मुंबईला जर परत गेलोच तर हातपाय दिल्लीतच सोडून जावे लागणार!)
हा सगळा परिणाम मला अपेक्षित नव्हता. त्यामुळे काय करावे ह्या विचारात मी होतो. तिघे मित्र आणि हे दोघे माझ्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते. माझे मन मला सांगत होते, बाबा रे आता अतिशहाणपणा पुरे आणि आलेली संधी हातची घालवू नकोस.केलेस तेव्हढे नाटक बस्स कर!
मी त्यांच्या विनंतीला मान म्हणून रुकार दिला आणि वातावरण निवळले. आम्हाला एका प्रशस्त खोलीत चार स्वतंत्र पलंग देऊन ’गूड नाईट’ करून राक्षस निघून गेला आणि आम्ही अंथरुणावर अंग टाकले तेंव्हा रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा