आंतरजालावर स्वत:ची जालनिशी लिहीणारे काही तरूण/तरूणी एकत्र आले आणि झाला एका इ-संमेलनाचा जन्म! त्याला नाव देण्यात आले ’शब्दबंध!’ प्रशांत मनोहर,नंदन होडावडेकर आणि अजून काहीजण ह्यात सामील झाले. वर्ष होते २००८. ह्यावर्षी शब्दबंधचे पहिले इ-संमेलन झाले. भाग घेणार्या प्रत्येक सदस्याने आपल्या जालनिशीवरील एखाद-दुसर्या लेखाचे/कवितेचे अभिवाचन करायचे ही ती संकल्पना. पहिल्या वर्षी हा प्रयोग लहान प्रमाणात राबवला गेला.
ह्यावर्षी म्हणजे दिनांक ६/७जून २००९ ला हेच संमेलन खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप जास्त जणांच्या सहभागाने यशस्वी झाले. ह्यावर्षी शब्दबंधचे ६० च्या वर सभासद होते. पण प्रत्यक्ष सहभाग २९ सभासदांनीच घेतला. अर्थात पहिल्या संमेलनाच्या तुलनेत ह्यावर्षी अडीचपट जास्त उपस्थिती होती. त्यामुळे हे यश निश्चितच सुखावणारे आहे.
शब्दबंधसारख्या इ-संमेलनासाठी स्काईप हे माध्यम वापरले गेले. स्काईप हा देखिल इतर संवादकांसारखाच(मेसेंजर)एक संवादक आहे ज्यात एकाचवेळी जास्त लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला इ-सभेचं स्वरूप प्राप्त होऊ शकतं. ह्यावेळी स्काईपचा उपयोग करताना बर्याच अडचणी आल्या. तसे बहुतेकजण हे माध्यम पहिल्यांदाच वापरत होते त्यामुळे त्यात असणार्या सोयी/अडचणी काही अपवाद वगळता बहुतेकांना नीटशा माहीत नव्हत्या. ह्यासाठी शब्दबंधच्या संमेलनाआधी स्काईपची चांचणी घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. पण कार्यबाहुल्यामुळे म्हणा अथवा काही वैयक्तिक अडीअडचणींमुळे म्हणा त्याला खूपच कमी सभासदांकडून प्रतिसाद मिळाला.
ह्या इ-संमेलनाच्या दृष्टीने विचार केल्यास आलेल्या प्रत्यक्ष अडचणी अशा होत्या.
१)एकावेळी जास्त सभासद एकत्र आल्यावर होणारा गोंधळ...एकजण बोलत असताना इतरांनी शांत राहणे अपेक्षित असते.पण ओसंडून जाणार्या उत्साहाच्या भरात ही गोष्ट चटकन लक्षात येत नाही. अर्थात त्यावर उपाय होताच. प्रत्येक सत्राच्या सूत्रसंचालकाने अनुमती देईपर्यंत सर्वांनी आपापले माईक बंद(म्यूट) ठेवणे आणि ह्या पद्धतीने प्रत्येक सत्रात शिस्त राखण्याचा प्रयत्न बर्याच प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणता येईल.
२)प्रत्येक सभासदाच्या जालजोडणीची बॅंडविड्थ वेगळी असल्यामुळे बर्याच वेळा संभाषण तुटक तुटक ऐकू येणे.एकाच वेळी जास्त खिडक्या उघडल्यामुळे देखिल बर्याचदा बॅंडविड्थ कमी पडत असते. अशा वेळी सभासदाचे सभेतून आपोआप बाहेर फेकले जाणे होत असते. अशावेळी यजमानाने(जो ह्या सभेत इतरांना आमंत्रित करत असतो...ही व्यक्ती सूत्रसंचालक असू/नसू शकते)लक्ष ठेवून त्या सभासदाला पुन्हा आत घेणे वगैरे गोष्टी सातत्याने करायच्या असतात.
३)स्काईपचे व्हर्जन वेगवेगळे असणे की ज्यामुळेही एकमेकांशी संवाद साधण्यात काही अडचणी येत होत्या. स्काईपवर देवनागरीतून लेखी संवाद साधण्यातही काही सभासदांना अडचण जाणवत होती...ज्यावर अजूनही तोडगा सापडलेला नाहीये.
वरील सर्व अडचणींशी सामना करत शब्दबंधचे इ-संमेलन ४ सत्रात पार पडले. प्रत्येक सत्रात अभिवाचक आणि श्रोते मिळून सरासरी १५ जण होते. हे संमेलन अतिशय रंगतदार झाले. एरवी वाचलेले लेख/कविता वगैरे त्या त्या लेखक/कवींच्या तोंडून ऐकताना एक वेगळीच मजा येते आणि ती ह्या संमेलनात मला प्रत्यक्ष अनुभवता आली.पुढच्या वर्षी ह्यापेक्षाही मोठ्या संख्येने लोक भाग घेतील अशी अपेक्षा व्यक्त करून हे छोटेखानी मनोगत संपवतो.
ह्या सभेत मी वाचलेला लेख आणि सादर केलेली कविता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा