माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२४ एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ५

सिन्हा बर्मनकडे राहायला सुरुवात झाली...जागा आवडली होतीच त्यामुळे लगेच बस्तान बसले. सकाळी सकाळी सिब त्याच्या खास आवडीची बंगाली भजनं ऐकायचा. पंकज मलिक,ज्युतिका रे वगैरेंसारखे जुने गायक असायचे त्यात....बहुदा सिबकडे एकदोनच ध्वनीफिती असाव्यात पण त्यातली गाणी मात्र खूपच छान होती. सुरुवातीला लागणारे एक भजन....बहुतेक पंकज मलिक ह्यांच्या आवाजातले....विलक्षण खर्जातले....अंगावर अगदी काटा यायचा..त्याचे सुरुवातीचे बोल आठवताहेत....

रामनाम घन:श्यामनाम शिवनाम सिमर दिनरात,हरिनाम सिमर दिनरात.....पुढचं काही आठवत नाही कारण ते शब्द माझ्यापर्यंत कधीच पोचले नाहीत...पण हा सुरुवातीचा खर्जातला आवाज आजही माझ्या कानात गुंजतोय...मी काही देवभक्त नाही....म्हणजे आडनावात देवत्व आहे...म्हणजे देव आडनाव आहे...इतकाच माझा देवाशी संबंध...एरवी मी मूर्तीतला अथवा इतर कोणत्याही प्रकारातला देव मानत नाही...त्यामुळे त्या गाण्यातली राम,कृष्ण,शिव,हरि इत्यादी नामांशी मला काही देणे घेणे नाही.....पण ते शब्द,ती चाल आणि तो आवाज ह्यांचा असा काही विलक्षण गोफ गुंफला गेला होता की....सारखं ऐकत राहावंस वाटायचं....ऐकून ऐकून माझं ..ते पालूपद पाठही झालं....मी आंघोळीला जेव्हा जातो तेव्हा माझी संगीतसाधना सुरु असते....असं ऐकलंय की संगीतसाधनेची सुरुवात ही नेहमी खर्जाच्या रियाजाने करावी....मी काही जातिवंत गायक नाही...तरीही आंघोळ करतांना जी गाणी गात असतो....त्यात सर्वप्रथम हे पालूपद आपोआप ओठात येतं....मग सैगलची गाणी...मग भीमसेन...वगैरे वगैरे करत करत वरच्या पट्टीतली गाणी म्हणत असतो...असो.
इथे सांगायचा मुद्दा इतकाच की त्या पालूपदाचा माझ्यावर इतका परिणाम झाला की आजही इतक्या वर्षांनंतरही मी ते गुणगुणत असतो....काही काही गोष्टी मनावर किती खोल प्रभाव टाकतात ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे असे मानता येईल.

स्नान करतांनाच अंगावरचे कपडे धुवायला लागायचे...म्हणजे एरवी नुसत्या स्नानाला मला किमान अर्धा तास लागायचा...त्याऐवजी इथे एक तास लागत असे....त्यामुळे आधी सिब आणि मग रामदास ह्या दोघांच्या आंघोळी उरकल्या की मी मग अगदी आरामात न्हाणीघराचा ताबा घेत असे....आंघोळ,कपडे धुणे आणि संगीतसाधना असा त्रिवेणी कार्यक्रम मग चालायचा....अशा वेळी मी गातो म्हणजे अगदी खुल्या आवाजात गात असतो...त्यामुळे आवाज खर्जापासून तारसप्तकापर्यंत कसाही फिरवून(त्यावेळी खरंच फिरायचा...आता....गेले ते दिवस) गात असे....सुरुवातीला त्या दोघांना ते जरा विचित्र वाटत असे...मग हळूहळू त्यांनाही त्याची सवय झाली...अधेमधे दरवाजा ठोठावून ते दादही देऊन जायचे.  ;)

माझे स्नान होईपर्यंत सिब किवा रामदास चहा-पान करून तयार झालेले असत...त्या काळात मी कॉफीशिवाय काही पीत नसे... त्यामुळे मला कार्यालायात गेल्याशिवाय ती मिळत नसे. दिल्लीत ढाबे भरपूर आहेत...ढाबे म्हणजे आपल्या इथल्या टपर्‍या म्हणा...पण तिथे पेय म्हणून फक्त चहा मिळत असे आणि दुपारच्या वेळी लस्सी...एरवी न्याहारीसाठी छोले-बटुरे,छोले-कुलचे वगैरे खास पंजाबी पदार्थ असत....कधीमधी परोठे देखिल असत..मग ते आलू(बटाटा),मुली(मूळा),गाजर,कोबी,पालक,मेथी वगैरेपैकी कोणत्याही एका प्रकारचे असत...त्याबरोबर दही देखिल मिळायचे...मला सकाळी कडकडून भूक लागलेली असे ...मग मी आपला मोर्चा अशा एखाद्या ढाब्याकडे वळवत असे.....तिथे दही-परोठ्याची न्याहारी करून मगच कार्यालयाकडे प्रस्थान ठेवत असे...दिल्लीचे हवामान खाण्या-पिण्यासाठी मानवणारे होते त्यामुळे मी सहजपणाने ५-६ परोठे स्वाहा करत असे.

सिब आणि रामदास मुख्यालयात काम करायला जायचे तर मी संसदभवन मार्गावरच्या कार्यालयात जात असे. त्यामुळे आमचे मार्ग आणि दिशाही भिन्न होत्या. तिथून मला कार्यालयात पोचायला बसने साधारणपणे ३५ मिनिटे लागायची. वेळेवर जायचे तसे फारसे बंधन माझ्यावर नव्हतेच तरीही मी सर्वांच्या आधीच साधारणपणे नऊ-सव्वा नऊ वाजेपर्यंत कार्यालयात पोचत असे.

कार्यालयात गेल्यावर मस्तपैकी गरमागरम कॉफीची मजा लूटत ,मित्रांशी गप्पा मारत दिवस सुरु व्हायचा.
हे सगळं जरी व्यवस्थित सुरु होतं तरी मनात कुठे तरी...पुन्हा केव्हा एकदा मुंबईला परत जातो असं वाटत राहायचं.....दुपारच्या जेवणाची व्यवस्था....माझे मित्र आपणहून करायचे...प्रत्येकजण काहीतरी जास्त पदार्थ आणून मला आग्रहाने आणि प्रेमाने खायला लावायचा....सुरुवातीचे काही दिवस मी त्यांच्या आदरातिथ्याला नाही म्हटले नाही....पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मला ते सगळं प्रकरण पचवणं कठीण व्हायला लागले. असं फुकट कुणाचे, का आणि किती दिवस खायचे? म्हणून मी त्यांना कधी समजावून, तर कधी  परस्पर बाहेरच जेवायला जाऊ लागलो...ऊस कितीही गोड असला तरी तो मूळापासून खाऊ नये असे म्हणतात...... मी त्यांना न दुखावताही त्यातून अलगद बाहेर पडलो.

आमच्या कार्यालयाच्या सभोवताली सगळी सरकारी कार्यालयच होती. डाव्या बाजूला युएनआय(युनायटेड न्युज ऑफ इंडिया) चे ऑफीस(ह्यांचे उपहारगृह इतके जबरदस्त होते की काही विचारू नका...सकाळी तर शिरा,उपमा,इडली,वडा वगैरे पदार्थ असे झकास मिळायचे की आजही ती चव विसरलेलो नाही), विठठभाई पटेल भवन, जीपीओ, संसद भवन, आकाशवाणी,दूरदर्शन वगैरेसारखी महत्वाची कार्यालयं होती...तर उजव्या बाजुला..संसदभवन पोलिस स्टेशन,स्टेट बॅंक ऑफ इंडिया,जंतर मंतर,कॅनॉट प्लेस,नेहरू पार्क वगैरेसारखी सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणं होती.
ह्या संसदभवन पोलिस स्टेशनच्या मागेच एक छोटेखानी कोर्ट होते आणि त्याच्यालगत बर्‍याच वकिलांच्या टपर्‍या होत्या...ह्या सर्वांसाठी तिथे  एक छोटेसे उपहारगृहदेखिल होते...जिथे सकाळी चहा-न्याहारी.,दुपारी जेवण वगैरे मिळत असे. एकवेळ मी तिथे अपघातानेच पोचलो आणि तिकडची दालफ्राय खाऊन इतका खुश झालो की ...मग ठरवून टाकले की रोज दुपारी तिथेच जेवायला जायचे.

एकदोनवेळा तिथे गेलो आणि मी तिकडचाच झालो....गंमत अशी की तिथे काम करणार्‍या त्या बिहारी मुलाशी मी गप्पा मारायचो...तो दालफ्राय कसा बनवतो ते विचारायचो...तो ती बनवत असतांना तिथे उभा राहायचो...त्यामुळे एकदोन दिवसातच तो मला छानपैकी ओळखायला लागला....मी तिथे गेल्यावर माझी खास खातिरदारी करायला लागला...पुढे गप्पांच्या ओघात कळले की तो माझ्याशी इतका जवळीक का साधतो आहे ते....त्याचं असं झालं...बोलता बोलता त्याने मला प्रश्न केला..

बाबुजी,आप यहांपर नये दिखते हो.

जी,वैसे देखा तो मैं यहां नया हूँ. लेकिन तुमने कैसे पहचाना.

 आपका डिरेस...वो यहांके लोगोंसे बहुत ही अलग है.......

खरंच माझा पोशाख वेगळाच होता तिथल्या सगळ्यांच्यात. पॅंट,चट्ट्यापट्याचा अर्ध्या हातांचा टीशर्ट, केस विस्कटलेले,छोटेखानी मिशी, हनुवटीखाली राखलेली दाढी, गळ्यात शबनम पिशवी आणि पायात कोल्हापुरी चपला...अशा अवतारातला मी आणि दिल्लीतले सगळे कसे?  पॅंटमध्ये खोचलेले लांब हातांचे शर्ट, पायात बूट, आणि दिसण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचा मग्रूरपणा,रुबाब वगैरे

कहांके हो आप?

मुंबईका हूँ मैं .

बंबईसे?....आणि त्याचा वासलेला ’आ’ बराच वेळ तसाच होता...
.त्या दिवसानंतर मग तो माझ्या तिथे जाण्याची वाट बघत बसायचा...मी तिथे गेल्यावर एका खास टेबलावर...टेबलं कसली म्हणा...चारदोन फळकूटं जोडून केलेले टेबलासारखे काहीतरी....व्यवस्था करायचा. मला पाणी पिण्यासाठी एक खास पेला आणि जग...दोन्ही.. अगदी माझ्यासमोर घासून, आणून ठेवायचा...मग दालफ्राय,दही आणि गरमागरम फुलके...मुलगा तसा दिसायला काळा रप्प होता..चेहराही फारसा आकर्षक नव्हता...उंची अगदीच बेताची...पण दात एकदम मोत्यासारखे चमकणारे...माझ्या पानातला फुलका संपतो न संपतो दुसरा गरम फुलका हजर असायचा...कोणत्या जन्मीचे संबंध होते माहित नाही....पण तो मुलगा माझी इतकी काही बडदास्त ठेवत होता की साहजिकच त्याच्या मालकाच्या आणि इतर नेहमीच्या गिर्‍हाईकांच्या डोळ्यातही ते भरले....मालकाने एकदा त्याला विचारलेही...मग त्याने काय सांगितले माहित नाही पण त्यादिवसापासून मालकही माझ्या दिमतीला हजर असायचा...खरं सांगायचं तर इतक्या अगत्याची,कौतुकाची मला सवय नव्हती...मी त्या मालकाला तसे सांगूनही पाहिले पण त्याने त्याचा परिपाठ सुरुच ठेवला.

माझ्या सकाळच्या जेवणाची अशी सोय झाली...आणि संध्याकाळी मी ,रामदास आणि सिब मिळून पोळी-भाजी,भात,आमटी वगैरे बनवून खायला लागलो. मी कणीक भिजवून द्यायचो...रामदास मस्तपैकी पोळ्या करायचा...सिब वरणभाताचा कुकर चढवायचा आणि मग मी आमटी आणि भाजी बनवायचो..कधी कधी त्यांच्यापैकी कुणी तरी हे काम करायचे....भांडी घासायचे काम मी आणि रामदास दोघे मिळून करायचो. शनिवार रविवार मात्र मी संपूर्णपणे बाहेर फिरायचो,खायचो...कारण....सिब आणि रामदास दोघेही त्या दिवशी मासे वगैरे बनवून खात असत. ह्या काळात मी बसमधून दिल्लीदर्शन करत हिंडायचो. प्रगती मैदान,त्यावरील कैक प्रदर्शनं,अप्पूघर,बहाई मंदिर,कॅनॉट प्लेस... वगैरे ठिकाणी मी मुक्तपणे फिरायचो.

कॅनॉट सर्कलमधील नेहरू बागेत तिथल्या हिरवळीवर लोळायला मजा यायची. तिथेच संध्याकाळी जुन्या हिंदी सिनेमातली गाणी लावली जायची...संपूर्ण बागेत ठिकठिकाणी स्पीकर्स लावलेले असत...त्यातून मंदपणे ऐकू येणारी गाणी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जायची...ह्याच हिरवळीवर काही बुद्धिबळ खेळणारे महाभागही मला सापडले. मी त्यांच्या बाजूला जाऊन शांतपणे त्यांचा खेळ बघत बसायचो...एकदोन दिवसात त्यांच्याशीही दोस्ती झाली आणि मीही त्यांच्याशी दोन हात करायला लागलो....पाहता पाहता त्यांच्यातल्या पट्टीच्या खेळाडूलाही मी हरवले आणि मग माझा रुबाब वाढला....माझ्याबरोबर बसून मग ते आपापल्या खेळाचे विश्लेषण करायला लागले...ह्या लोकांनीही माझे दिल्लीतले वास्तव्य काही प्रमाणात सुखकर केले.

२० एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ४

एक महिन्याची रजा घेऊन मुंबईत आलो. बायको खुश झाली.मीही खुश होतोच..खरं तर तिला सोडून मला जाववत नव्हतं...कारण एकतर नवीनच लग्न झालेलं आणि त्यानंतर ती गर्भवती झालेली होती. अशा वेळी एकमेकांच्या जवळ असावं असं कुणालाही वाटावं तसंच आम्हा दोघांनाही वाटत होतं..पण नाईलाजाने जावं लागलं होतं. तिची शाळेतली नोकरी सुरु होती म्हणून तिला माझ्या बरोबरही नेता येत नव्हतं. पण आता पुन्हा महिनाभर तरी आम्ही दोघे एकत्र होतो.

सुट्टी संपत आली तरी मला पुन्हा दिल्लीला जावेसे वाटत नव्हते म्हणून अजून १५दिवस सुट्टी वाढवली. तेही दिवस हा हा म्हणता कापरासारखे उडून गेले. काय गंमत आहे पाहा...मी जेमतेम १५ दिवसच दिल्लीत राहिलो होतो पण एकेक दिवस मला युगायुगांचा वाटायचा आणि इथे....दीड महिना होऊन गेला तरी मला सुट्टीवर येऊन एखादा दिवसच झाल्यासारखे वाटत होते. तरीही शेवटी नाईलाजाने का होईना....पुन्हा लवकर येतो असे सांगून दिल्लीला जाण्याची तयारी केली.

दिल्लीला जायचे तर रेल्वेचे आरक्षण हवे...अहो,पण असे आयत्या वेळी कसे मिळणार? मग काय,गेलो आमच्या मुंबईच्या कार्यालयात....उभा राहिलो धारवाडकर साहेबासमोर...वरकरणी त्यांनी हसून स्वागत केले...विचारते झाले....काय मग.काय म्हणतेय दिल्ली? जम बसला की नाही तिथे? आणि आज इथे का येणं केलंत?
मी म्हटलं...सर,सुट्टीवर आलो होतो...पुन्हा जायचंय ...पण तिकीट मिळत नाहीये...सरकारी कोट्यातून मिळेल काय ते पाहायला आलोय...आपण तसं पत्र दिलंत तर काम होईल माझे.
हसत हसत साहेबांनी त्यांच्या सचिवाला बोलावून घेतले आणि रेल्वे प्रशासनाला पाठवण्यासाठी एक पत्र उद्घृत केले. पाचच मिनिटात सचिवाने ते टंकित करून साहेबाच्या सही/शिक्क्यासहित मला दिले.
निघतांना साहेब म्हणाले...देव,तिकिटाची चिंता करू नका...जरूर पडेल तेव्हा या...मी पत्र देईन तुम्हाला...आणि साहेब छद्मीपणाने हसले.

त्यानंतर तिकिटाची व्यवस्था सहजपणाने झाली आणि मी दिल्लीला रवाना झालो. गेल्यावर नायरसाहेबांना भेटलो. त्यांनीही घरची हालहवाल विचारली आणि म्हटलं...देव, , दिल्लीत आल्यापासून तू तूझा पगार घेतलेला नाहीस....आत्ताच्या आत्ता मुख्यालयात जाऊन घेऊन ये....तो कारकून केव्हापासून तुझी वाट पाहतोय.
तिथून बाहेर पडलो तो थेट मुख्यालयात गेलो...आर्थिक विभाग शोधायला...त्यातल्या त्यात तो कारकून शोधायला थोडा वेळ लागला. शेवटी एकदाचा मी त्याच्यासमोर उभा राहिलो.....

मै, पी.एस.देव...मुंबईसे ट्रान्स्फरपे आया हूँ....क्या मुझे मेरा पगार मिलेगा?
माझ्याकडे आपादमस्तक न्याहाळत तो म्हणाला....अच्छा, तो तुमही हैं वो....जिसने धारवाडकरसाहबसे पंगा लिया....बहूत सुना था तुम्हारे  बारेमें...आज दर्शन करनेका सौभाग्य मिला...

मी म्हटलं...इससे तुम्हारा क्या लेना देना...ये तो मेरी मर्जी हैं....मैं किससे कैसा बर्ताव करू....तुम  तुम्हारा काम करो.

माझ्या ह्या सरळ हल्ल्यामुळे तो बाबू वरमला...म्हणाला....अरे भई, तुम तो शेर निकले...जैसे मैंने सुना था तुम्हारे बारेमें...धारवाडकरसे पंगा कोई आम आदमी नही ले सकता....लेकिन क्या एक बात मैं पुछ सकता हूँ...तुम्हें डर नही लगता उसका...वो तो बहुतही बदनाम आदमी हैं....यहां दिल्लीमें था, इसीलिये मैं उसके बारेमें बहुत कुछ जानता हूँ...कई लोगोंको तकलीफ दी हैं उसने...

डर काहेका? वो भी तुम्हारे मेरे जैसा आदमी हैं....हां,अभी अधिकारी होनेके नाते कुछ अधिकार जादा हैं उसके पास...तो करता हैं मनमानी....लेकिन मैं ऐसे लोगोंसे नही डरता...मनही मनमें वो कायर होते हैं...

देखो भई, तुम्हारी फाईल मेरे पास पडी हैं...मैने तुम्हारा पूरा इतिहास पढा है...फडकेसाहब जैसे सबसे बडे साबने भी तुम्हारे बारेमें सबकुछ अच्छा ही लिख्खा हैं...फिरभी तुमको  मुंबई छोडके दिल्ली आना पडा....हुवा ना तुम्हारा नुकसान... क्या फायदा हुवा लडाई-झगडा करनेका?

देखिये,जो हुवा वो हुवा...तब उसकी बारी थी...कल मेरी बारी होगी...मैं भी उसको जिंदगीभर याद रहेगी ऐसी सबक सिखाऊंगा......बाकी बाते छोडो...मेरा पगार लेने आया हूँ, वो दिजिये.

माझा एकूण आवेश पाहून त्याने गप्प बसणेच पसंत केले...त्यानंतर झटपट माझा पगारही दिला....वर एक प्रश्नही विचारला....आपको पैसेकी कोई पडी नही हैं...कबसे आपका पगार यहाँपर पडा था...और एक बात...आपने आपका ट्रान्सफर बील अभीतक नही भरा. जल्दी किजिये,नही तो कुछ नही मिलेगा आपको....तुम वरून तो आपोआप...’आप’ वर आलेला होता हे माझ्या लक्षात आले...

मग मीही माझा पवित्रा बदलला...देखिये,मैं पहिली बार ट्रान्स्फरपे आया हूँ....इसीलिये मुझे कुछ भी मालूम नही हैं...क्या आप मुझे गाईड करेंगे?

माझ्यातला बदल त्यालाही सुखावून गेला. मग त्याने ते बील कसे भरायचे वगैरे माहिती मला दिली. मुंबईहून दिल्लीला सामान(घरगुती) वाहून आणल्याची एखाद्या वाहतुक कंपनीची पावती जोडली तर कसे जास्त पैसे मिळतील वगैरे माहितीही दिली...  मी म्हटलं....मैंने तो कुछ भी सामान लाया नही था..ना लानेवाला हूँ...तो कहांसे पावती लाऊं.....सरकारी आदेशसे वैध तरीकेसे और बिना पावतीके जो भी मिल सकता हैं...उतनाही मुझे चाहिये..किसी भी तरहका दो नंबरका पैसा मुझे नही चाहिये.

दोन क्षण तो माझ्याकडे पाहातच राहिला....कैसे हो आप...रिसीट नही हैं तो कहींसे भी पैदा की जा सकती हैं....उसमें बुरा क्या हैं...सब लोक ऐसेही करते हैं...आप कोशिस किजिये...आपको फायदा होगा.

देखिये भाईसाब,मैं हरामका पैसा नही लेना चाहता हूँ....ना आप मुझे उसके बारेमें  बताओ...मैं झुटी रिसीट नही ला सकता.

मैं कर सकता हूँ आपके लिये अ‍ॅरेंज....रिसीटके उपर जितना लिख्खा होगा उसका १५% आपको देना पडेगा...बस्स. मैंने कई लोगोंके लिये ये काम किया हैं...आप चाहे तो.....

धन्यवाद श्रीमानजी....लेकिन मुझे उसमें बिल्कूल दिलचस्पी नही हैं....मामला खतम‌....सीधे तरीकेसे जो मिलता हैं....उतना ही मुझे बस्स हैं.

खैर,मर्जी आपकी....मैं यहाँपर गये दस सालसे काम कर रहा हूँ...आप जैसा निराला आदमी मैंने आजतक देखा नही हैं...आपही पहेले हो.... आप हर बारेमें अलग ही हो...कोई बात नहीं....आप अभी अभी यह फार्म भरके दिजिये...बाकीकी कार्रवाई करके मैं एक हप्तेके अंदर आपका पैसा दे देता हूँ.....कोई मदद की जरूरत हो तो कभीभी आईये...बंदा हाजिर हैं आपकी सेवामें....

मी त्याचे आभार मानले आणि पुन्हा माझ्या कार्यालयात परतलो.

तिथे पोहोचल्या पोहोचल्या मला तिथल्या सेक्शन ऑफिसरने बोलावून घेतले.....
आपने तनख्वाँह ली?

जी,अभी ले आया हूँ.

आपने आपका ट्रान्सफर बील भरा?

हां जी,अभी ही भरके आया हूँ. उधरही उस बाबूके पास दिया.

अरे भाई,ऐसा नही करते...सब चीज थ्रू प्रापर चेनलसे जानी पडती है...उसके साथ लगाई गये रसीद वगैरेकी जांच करांके फिर हम उसको उधर भेजते है.

नही जी....उसके साथ कोई रसीद नही हैं....जो रसीदके सिवाँ मिलता हैं उतना ही था इसीलिये उधरही दिया....उस बाबूनेही बोला....यहां डायरेक्ट देनेसे चलेगा.

अच्छा,ये बताओ,मुंबईस दिल्ली आये हो...तो सामान यहां लानेकी ट्रान्सपोर्ट कंपनीकी रसीद तो होगी ना?

नही,जी मैंने कोई सामान नही लाया.

वह बाबू कर रहा था ना एडजस्टमेंट...तो क्युं ना बोला आपने?

अच्छा...म्हणजे ती बातमी इथपर्यंत लगेच पोचवली होती त्या बाबूने... कमाल आहे...मला पैसे नकोत म्हटलं तर ह्या दिल्लीवाल्यांना इतकं आश्चर्य वाटावे....हे पाहून मलाही आश्चर्य वाटले.  ;)

त्यावर त्या सेक्शन ऑफिसरनेही माझे बौद्धिक घ्यायचा प्रयत्न केला पण मी त्याला नम्रपणाने नकार दिला...आणि त्याने माझ्यापुढे अक्षरश: हात जोडले.  :)

आपके जैसा नमुना मैं आज पहली बार देख रहा हूँ.

१५ एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ३

फडके साहेबांना भेटून पुन्हा कार्यालयात परत आलो तर नायर साहेब माझी वाट पाहात थांबलेत असा निरोप मिळाला. मी तडक त्यांच्या खोलीत गेलो...नायर साहेब कामात व्यग्र होते पण त्यांनी लगेच आपले काम बंद करून मला बसायची आज्ञा करून शिपायाला कॉफी पाठवायला सांगितली.

फडके साहेब काय काय म्हणाले ते मी नायर साहेबांना सविस्तर सांगितले. त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले. मध्यंतरी कॉफी देखिल आली. तिचे घोट घेता घेता नायरसाहेबांनी मला प्रश्न केला....मग,तुझा काय निर्णय आहे?
(माझे आणि नायरसाहेबांचे बोलणे हिंदी/इंग्रजीतून झालेले असले तरी इथे मी ते मराठीतच मांडत आहे.)

मी म्हटलं...सर,माझा एक कलमी कार्यक्रम आहे...मला मुंबईला जायचंय परत,लगेच,लवकरात लवकर.

अरे,पण आता बदली झालीच आहे आणि एकावेळी दोन बढत्या मिळताहेत तर  घेऊन टाक...तसेही तीन वर्षांनी पुन्हा मुंबईला जाशीलच...मग बढत्यांमुळे निदान तुझे थोडेफार आर्थिक नुकसान तर भरून येईल की.

सर,मी आजवर पैशाला कधीच प्राधान्य दिलेले नाही...हे आपण जाणता. माझी बदली आकसाने झालेय...हेही जाणता...अशा परिस्थितीत केवळ समजूत पटावी म्हणून मला बढत्या देऊन कायमचे मुंबईपासून तोडण्याचा हा कुटिल डाव आहे असे माझे प्रांजळ मत आहे.

ते कसे काय? माझ्या काही लक्षात येत नाहीये...जरा उलगडून सांग.

सर, आपल्या आस्थापनेत बढतीबरोबर बदली ही अपरिहार्य आहे...ती कुणालाही चुकत नाही...हे तुम्हाला माहित आहेच.....माझी कधीही बदली होऊ नये म्हणून...मला ह्यापुढे कधीही बढती नको ... मी तसे लिहून दिले...आस्थापनाने ते लेखी स्वरूपात मान्य केले आहे. त्यानंतर मी कधीही मला बढती का देत नाही, माझ्यापेक्षा कनिष्ठांना का दिलीत असे विचारलेलेही नाही...मी माझ्या एका जागीच स्थिर राहण्यामुळे संतुष्ट आहे...अशा परिस्थितीत माझी बदली केली ती सर्वस्वी चूक आहे आणि ती बदली कायम राहावी...इतकेच नव्हे तर ह्यापुढेही सतत बदली होत राहावी म्हणून हे बढतीचे गाजर आहे असा मला पूर्ण संशय आहे.... मला बढतीचं कधीच आकर्षणं नव्हतं आणि नाही.

हं. हा मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे. तरीही एक गोष्ट पक्की आहे की एकदा फडकेसाहेब म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत ते तुला लगेच मुंबईला परत पाठवू शकत नाहीत...ह्याचा अर्थ तुला निदान तीन वर्ष तरी इथे काढावीच लागतील...धारवाडकरसाहेबाला निवृत्त व्हायला अजून चार वर्ष तरी आहेत...तेव्हा कदाचित तुला अजून एक वर्ष इथेच किंवा अन्यत्रही काढावे लागेल...अशा परिस्थितीत मला वाटतंय की तू बढती स्वीकारावीस...एवीतेवी तुझी बदली झालीच आहे,नुकसान तर झालंच आहे... तर मग आता बढती घेऊन टाक...निदान आर्थिक फायदा तरी होऊ दे.

सर, आता दुसरा कोणताही मार्ग नाही का? काय करावे तेच सुचत नाहीये...माझी चूक नसतांना,माझी आत्तापर्यंतची उत्तम वागणूक,कामातली तत्परता,प्रावीण्य वगैरे सगळे गुण एका क्षणात मातीमोल झाले?

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही मि. देव....पण आपण ह्यातूनही काढू काहीतरी मार्ग...मला तरी वाटतंय की सर्वप्रथम तू बढती स्वीकारावीस.

सर, आता ह्या घटकेला बढती स्वीकारून काय फायदा...माझ्या आयुष्यातील दहा वर्ष मी फुकट घालवलेत त्यासाठी...दहा वर्षांपूर्वी मला पहिली बढती देण्यात आली होती...जी मी नाकारली....मला सांगा...मी जर बढती स्वीकारण्याचं खरंच ठरवलं तर मला दहा वर्षांपूर्वीच्या त्या तारखेपासून आर्थिक लाभ मिळेल काय? तसे असेल तर एक वेळ विचार करता येईल...खरं तर मला त्यातही रस नाहीये कारण मला मुंबईला लवकरात लवकर परत जायचंय...पण ते अशक्य असेल तर मग हा पर्याय स्वीकारण्यावाचून गत्यंत्तर नाही.

ओके...तू जर तयार असशील तर मी पर्सनली फडकेसाहेबांना कन्व्हीन्स करायचा प्रयत्न करतो ज्यामुळे तुला मागील सगळी थकबाकी मिळू शकेल... एनीवे, तू आता शांत राहा. कामात मन रमव,बाकीचं माझ्यावर सोपव. तुला हवी तेव्हा,हवी तितकी सुट्टी घेऊ शकतोस...पण लक्षात ठेव...मन शांत ठेव...सद्द्या वाईट दिवस आहेत...अशा अवस्थेत राहाणं जरी त्रासदायक असलं तरी आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत हे लक्षात ठेव...तू इथे माझ्याबरोबर असतांना तुला कसलीही तोशीस पडणार नाही ह्याची मी खात्री देतो...बट बी पॉजिटिव्ह.

नायर साहेब माझी समजूत घालत होते...खरं तर माझी परत जाण्याची मूळ मागणी पूर्ण करता येत नसल्यामुळे तेच अस्वस्थ होते...पण वरवर मला धीर देत होते...हे मला माहित होते....अहो,कसे म्हणून काय विचारता? मुंबईत ते माझ्या बरोबर पाच वर्ष होते आणि मी ज्या खात्यात काम करायचो त्या खात्याचे ते साहेब होते....माझ्या कामातल्या तत्परतेमुळे,प्रावीण्यामुळे त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून कधीही उणा शब्द ऐकून घ्यावा लागलेला नव्हता...अगदी डोळे मिटून ते माझ्यावर विसंबून असायचे आणि मीही त्यांचा कधी अपेक्षाभंग होऊ दिला नाही. मुंबईत असतांना मी त्यांचा तो कार्यकाल कमालीचा यशस्वी केलेला होता...आणि आता आज त्यांची पाळी होती...मला मदत करण्याची...परतफेड करण्याची....पण दूर्दैवाने ते त्यांच्या अधिकार कक्षेबाहेरचे काम होते...त्यामुळेच ते मनातल्या मनात अस्वस्थ होते.

नायर साहेबांनी जबाबदारी स्वीकारली म्हटल्यावर ते ती काहीही करून यशस्वी करतीलच ह्याची मला खात्री होती त्यामुळे थोडासा आश्वस्त झालो. माझा प्रस्ताव नायरसाहेबांनी फडके साहेबांच्या कानावर घातला. फडकेसाहेबांनी नायरसाहेबांना तो प्रस्ताव लेखी स्वरूपात पाठवायला सांगितला..तसा लेखी प्रस्ताव नासांनी  अतिशय काळजीपूर्वक तयार केला....मला वाचून दाखवला आणि मग फसांकडे तो पाठवून दिला.

आता ह्या प्रस्तावाला उत्तर यायला निदान आठ-पंधरा दिवस तरी लागणार होते. मध्यंतरी मी आणि रामदास  सिन्हा-बर्मन साहेबाकडे  राहायला गेलो. त्याचा फ्लॅट चांगला ऐसपैस होता. आम्हा दोघांना मिळालेली खोली १२*१२ ची अगदी प्रशस्त अशी होती. दोन मोठ्या खिडक्याही होत्या...वारा आणि प्रकाश भरपूर होता. पण खोली पार रिकामी होती. कपाट,पलंग,टेबल,खुर्ची वगैरेंपैकी एकही वस्तू त्यात नव्हती. आम्ही खोली एकदा झाडून घेतली आणि आपापल्या पथार्‍या पसरल्या.  समोरासमोर असणार्‍या दोन खिडक्यांच्या गजांना दोर्‍या बांधून कपडे वाळत घालण्याची सोय केली. मी आणि रामदास...दोघेही तसे मधमवर्गातून आलेलो असल्यामुळे अशा गोष्टींची आम्हाला  सवय होतीच...त्यामुळे तशी फारशी अडचण आली नाही.

फसा हे तांत्रिक विभागाचे सर्वोच्च साहेब होते...त्यांना त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या कोणत्याही माझ्यासारख्याच तांत्रिक कर्मचार्‍यांची बदली/बढतीची शिफारस करण्याचे पूर्ण अधिकार होते....पण आमच्याकडे दुसरा एक विभाग होता...प्रशासन विभाग....त्यांच्या हातात आर्थिक आणि प्रशासनिक अधिकार होते. आता इथे असणारे साहेब लोक अशा शिफारसींची अंमलबजावणी करतांना त्यांचे काही निकष लावून करत. इथल्या साहेब लोकांचे म्हणणे पडले की काही विशिष्ट परिस्थितीत आणि फसांच्या अधिकारात जरी अशी बढती देता येऊ शकत असली तरी...त्या अनुषंगाने मागणी करण्यात आलेली थकबाकी  देण्यात मात्र अनंत अडचणी आहेत...त्यासाठी आर्थिक विभागाची परवानगी घ्यावी लागेल...जी मिळणे सर्वथा अशक्य आहे...एवंम...फक्त बढती...अपवादात्मक बाब म्हणून एकदम दोन बढत्या देण्यास कोणतीही अडचण नाही...तेव्हा ती देण्यास पूर्ण अनुमती आहे...तेव्हा त्यासंबंधाने योग्य त्या बदलांसहित प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पुन्हा पाठवण्यात यावा...

हे असे उत्तर येणार हे मला खरे तर अपेक्षितच होते...त्यामुळे मला त्याचे विशेष काही वाटले नाही...बढती घेण्याचा आता प्रश्नच नव्हता... पुन्हा मुंबईला कसे जायचे ह्याचाच विचार सुरु झाला. इतक्यातच काही चमत्कार घडण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे मी सुट्टी घेण्याचा विचार केला...त्याप्रमाणे नासांना म्हटले...रितसर महिनाभार सुटीचा अर्ज दिला... त्यांनी लगेच रुकार दिला ...आणि मी लगेच मुंबईसाठी प्रस्थान ठेवले.

म्हणतात ना..अशुभस्य कालहरणम्‌!

१० एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ३

सकाळी जाग आली तेव्हा एकदम प्रसन्न वातावरण होतं. बाहेर बर्‍यापैकी गारवा होता. पक्ष्यांची किलबिल जाणवत होती. मुखमार्जनादि आन्हिकं उरकली. रामदासने चहा केला होता. माझ्या समोर गरमागरम चहा आणि बिस्किटे ठेवून तोही गप्पा मारायला बसला. खरंतर त्या काळात मी फक्त कॉफीच पीत असे...पण रामदासने इतक्या प्रेमाने दिलेला चहा मला नाकारता आला नाही आणि मी तो कसाबसा पिऊन टाकला.

गप्पांच्या ओघात कळले की चारपाच दिवसातच रामदास ही जागा सोडून नवी दिल्लीतच....कार्यालयाच्या जवळपास जागा घेण्याच्या विचारात आहे. ह्याचा अर्थ सरळ होता की मलाही तेवढाच अवधी होता...माझ्यासाठी जागा शोधण्याचा...अर्थात आमच्यात एका बाबतीत एकमत होते की शक्य तो आपणे दोघे मिळून राहू शकू अशीच जागा शोधूया.

त्यानंतर स्नानादि इतर आन्हिके उरकून आम्ही दोघे कार्यालयाकड कूच केले. दिल्लीत आमची बरीच कार्यालये आहेत...रामदासला मुख्यालयात जायचे होते तर मला संसद भवनाजवळील कार्यालयात जायचे होते...त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या बस धरून आपापल्या कार्यालयात पोचलो.

कार्यालयात पोहोचताच मला शिपायाने सांगितले की मला साहेबाने बोलावलंय...मी तसाच साहेबांसमोर हजर झालो. हे साहेब...नायर साहेब मुंबईपासूनचे माझ्या ओळखीचे होते...निव्वळ ओळखीचेच नाही तर माझ्याबद्दल त्यांना आत्मीयताही होती. मी येईपर्यंत ते कॉफी घ्यायचे थांबले होते. त्यानंतर त्यांनी आम्हा दोघांसाठी कॉफी मागवली. दरम्यान त्यांनी माझ्या सोयी-गैरसोयीबद्दल विचारून घेतले. मी माझे आणि रामदासचे जागेबद्दलचे बोलणे त्यांना सांगितले...त्यावर त्यांनी मला...घाबरू नको...आजच तुला जागा मिळवून देतो...म्हणून आश्वस्त केले.

त्यानंतर तासाभरानेच मला पुन्हा नायरसाहेबांनी बोलावून घेतलं... नायर साहेबांच्या बरोबरचाच एक दुसरा साहेब...सिन्हा-बर्मन नावाचा...जो दिल्लीतल्या रामकृष्णपुरम(आरके पुरम) नावाच्या सरकारी वसाहतीत राहात होता...तो आम्हा दोघांना त्याच्या घरात एक खोली द्यायला तयार झालाय...असं सांगितलं. त्यानंतर काही वेळाने चश्मा लावलेला, सडसडीत बांध्याचा,साधारण पावणेसहा फूट उंचीचा एक सदगृहस्थ नायरसाहेबांच्या खोलीत प्रवेशकर्ता झाला...हाच तो सिन्हा-बर्मन. मग माझी आणि त्याची रीतसर ओळख करून देण्यात आली. भाडे ठरले आणि दोनतीन दिवसांनी राहायला येतो असे सांगून त्याचा निरोप घेतला.
लगेच रामदासला दूरध्वनीवरून कळवले...तोही खुश झाला.

इथे दिल्लीत मी जास्त दिवस राहणार नाहीये...असे मनात धरूनच माझे सगळे पुढचे बेत सुरु होते...त्यामुळे ह्या सिन्हा-बर्मनकडे मी काही जास्त दिवस राहणार नव्हतोच...
मी नायर साहेबांना भेटून त्यांच्याशी सल्ला-मसलत केली. मला परत मुंबईला लवकरात लवकर परत जाता यावे म्हणून लागेल ती मदत त्यांनी द्यायचे मान्य केले.बदलीच्या सर्वसाधारण नियमाप्रमाणे खरे तर मला निदान तीन वर्ष इथून हलता येणार नव्हते...पण काहीही करून मला इथून बाहेर पडायचे होते...तेव्हा नायर साहेबांची मदत निश्चितच उपयुक्त ठरणार होती. मग त्यांचीच परवानगी घेऊन मी आमच्या सर्वोच्च साहेबांना भेटण्याचा दिवस ठरवला.

ठरल्याप्रमाणे मी मुख्यालयात गेलो. तिथे साहेबांच्या शिपायामार्फत... मी आलोय...हे साहेबांना कळवायला सांगितलं... तो निरोप देऊन आला आणि मला निदान अर्धा तास तरी वाट पाहावी लागेल असे सांगून बाजूच्याच प्रतिक्षागृहात बसायची विनंती केली. मी आत खोलीत जाऊन बसलो...मनात विचारचक्र सुरु झाले...साहेब कसे वागतील आपल्याशी...रागावतील की सहानुभूती दाखवतील...मदत करतील की फटकारतील?
अशा विचारात गढलो असतानाच....साहेबांनी बोलावलंय...असा निरोप घेऊन शिपाई आला.

सर, मी आत  येऊ का... ह्या माझ्या प्रश्नाला...त्यांनी हसत हसत...या...म्हटलं आणि जीव भांड्यात पडला.चला,म्हणजे साहेब चांगल्या मूडमध्ये आहेत तर.
सर मी....मला पुढे बोलू न देताच सरांनी मला हातानेच खुर्चीकडे बोट दाखवून म्हटले...बसा. मी तुम्हाला पूर्णपणे ओळखतो. ही पाहा तुमची वैयक्तिक माहिती माझ्या पुढ्यातच आहे...आणि का आलात तेही माहीत आहे....साहेब अस्खलीत मराठीत बोलत होते....अहो पुण्याचेच होते फडकेसाहेब...त्यामुळे त्यांच्या मराठीचं आश्चर्य नाही वाटलं....आश्चर्य ह्याचं वाटलं की दिल्लीत राहूनही त्यांची मराठीशी नाळ तुटलेली नव्हती आणि माझ्यासारख्या त्यांच्या भाषाबंधूशी ते आवर्जून मराठीतच बोलत होते.
दिल्लीत मी आलो तेव्हा मला भेटलेल्या मराठी माणसांतील काही मोजकी माणसे सोडली तर बहुतेकजण हिंदी/इंग्रजीतच संवाद साधायचा प्रयत्न करायची...मी मराठी आहे,तुम्हीही मराठी आहात...तेव्हा मराठीतच बोला...असे सांगूनही त्यांच्यात बदल होत नसे....त्या पार्श्वभूमीवर पाहता...फडकेसाहेबांसारखा , आमच्या आस्थापनेतला देशातला सर्वोच्च साहेब सहजपणे माझ्याशी मराठीतून संवाद साधतोय हे ऐकून मला ...ते...गहिवरल्यासारखे की काय ते झाले.

हं.बोला देव,काय अडचण आहे?

सर,मला पुन्हा मुंबईला जायचंय....

एक क्षण फडकेसाहेब शांत होते.
अहो,पण आत्ताच तर तुम्ही आला आहात,लगेच कसं परत पाठवणार तुम्हाला? जरा काही दिवस कळ काढा...मग पाहू काय करता येते ते.

सर, पण मी आधीच लिहून दिले होते ना...मला बढती नको...आणि म्हणून त्यासाठी माझी बदलीही होणार नाही असे आस्थापनाने लिहून दिलेय...मग असे असतांना माझी बदली झालीच कशी? म्हणून सर,कृपा करा,मला लगेच मुंबईला परत पाठवा.

अहो,असं नाही करता येणार...त्या धारवाडकरांनी...तुमच्या मुंबईच्या प्रमुखाने...तुमच्या विरुद्ध शिस्तभंगाची तक्रार केलेय ना..

अहो सर,पण त्याबद्दलची चौकशी होऊन चौकशी समितीने माझ्या बाजूने निर्णय दिलाय...हे देखिल तुम्हाला माहित आहे ना...अशा परिस्थितीत केवळ अट्टाहासाने माझी बदली का केली?

देव,सगळ्याच गोष्टी शब्दात नाही सांगता येत. काही निर्णय हे धोरणात्मक असतात...एक धोरण म्हणून तुमची बदली करावी लागली...तुमची बदली व्हावी म्हणून तुमच्या त्या साहेबांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली...आता मला सांगा, एकाच वेळी दोघांना कसे खुश करणार? आज काही झाले तरी मुंबई कार्यालयाचा भार ते समर्थपणे सांभाळताहेत...तेव्हा तुमची बदली केली नसती तर साहजिकच त्यांचा मानभंग झाला असता.

सर,म्हणजे आम्हा लहान कर्मचार्‍यांना काहीच किंमत नाही...आमचा मानभंग होत नाही? बदली होऊ नये म्हणून मी, बढती नको...असे स्पष्टपणे लिहून दिले आणि तेही, तुम्ही लेखी मान्य केलेले आहे...मग आता बदली करून तुम्ही माझ्यावर अन्याय करता आहात असे नाही वाटत?.....माझा आवाज नकळत वाढत गेला.

मला शांत करत साहेब म्हणाले...हे पाहा,तुमची बदली झाली...किंबहूना एका विशिष्ट परिस्थितीत ती करावी लागली...आता घटना घडून गेलेय...ती दुरुस्त करता येणार नाही...पण मी त्याची भरपाई करू शकतो...तुमची योग्यता लक्षात घेता ...आजवर तुम्ही नाकारलेल्या दोन बढत्या मी तुम्हाला माझ्या अधिकारात त्वरित देऊ शकतो...त्यानंतर मुंबई सोडून तुम्हाला हवे तिथे...मुंबईच्या आसपास बदलीही देऊ शकतो...पण पुन्हा मुंबईला जाण्याचे नाव इतक्यात काढू नका आणि तसा हट्टही करू नका.

सर,अहो,बढतीबद्दल मला कधीच आकर्षण नव्हतं... कौटुंबिक स्थैर्यासाठी मी त्याकडे  जाणीवपूर्वक पाठ फिरवलेय...तेव्हा मला बढती नकोच...तुम्ही मला लगेच मुंबईला परत पाठवा.

देव,अहो असं काय करताय,मी म्हटलं ना....आता ते शक्य होणार नाहीये...तुमचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी...

सर,मला आर्थिक नुकसानी परवडेल...पण माझी चुकी नसताना.... मी माझे पालूपद सुरुच ठेवले.

फडके साहेबही मला समजावून थकले. एकीकडे त्यांना माझे म्हणणे पटत होते...दुसरीकडे ते धोरणात्मक निर्णयामुळे अडकलेले होते. शेवटी ते म्हणाले....देव,जरा शांतपणे विचार करा...मी तुम्हाला जे देऊ शकतोय ते द्यायला तयार आहे...पण उगाच नको तो हट्ट करू नका...तुमच्या मागचे कैक लोक पुढे गेले...तुम्ही अजून तिथेच राहिलात...काय मिळवलंत ह्यातून...आता बदली झालेलीच आहे तर...ही बढतीची संधी सोडू नका...मी तुमच्यावर मेहेरबानी म्हणून हे करत नाहीये...तुमची योग्यता आहेच...म्हणून सांगतो...हो म्हणा...दिल्ली काही इतकी वाईट नाही हो...मी गेली पंचवीस वर्षे इथे राहतोय...

सर,दिल्ली कितीही चांगली असो...मला माझी गल्ली...आपली, मुंबईच प्यारी आहे. तुम्ही मला पुन्हा परत पाठवा...बस अजून काही नको मला....आणि मला बढतीलायक समजून बढतीचा प्रस्ताव दिल्याबद्दल मी आपला मन:पूर्वक आभारी आहे...तुम्हाला जर मी खरोखरच तसा वाटत असेन तर मला मुंबईला परत पाठवा...बस्स,तीच माझी बढती असेल.

काही क्षण शांतता पसरली. मग शांततेचा भंग करत,घड्याळाकडे पाहात, साहेब म्हणाले...हे पाहा देव, मला आता एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागतेय...मी तुम्हाला दिलेल्या प्रस्तावाबद्दल नीट विचार करा...आपण पाहू काय करता येईल ते...या आता...आणि हो एक सांगायचंच राहिलं...नायरना हे सांगा...त्यांचाही सल्ला घ्या हवे तर...दिल्लीत ते तुमचे पालक आहेत...नव्हे,तुमचे पालकत्व त्यांनी स्वत:हून स्वीकारलंय...तुम्हाला हव्या त्या सवलती इथे मिळतील...तेवढं एक सोडून....
साहेबांनी वाक्य अर्धवट सोडलं आणि त्यांनी बाहेर जाण्यासाठी आपली ब्रीफकेस उचलली...

४ एप्रिल, २०१०

महान फलंदाज सुनील गावसकर!

सुनील मनोहर गावसकर. जन्म-१०जुलै १९४९ . सरळ बॅटने खेळणारा सुनील हा भारताचा माजी संघनायक आणि जगातला सर्वात महान आघाडीचा फलंदाज आहे. त्याने वेस्ट-इंडीज विरुद्ध १९७०-७१ च्या दौर्‍यात पदार्पण केलं. ह्या पहिल्याच दौर्‍यात १५४.८ च्या सरासरीने त्याने ७७४ धावा कुटल्या.
ह्यात त्याच्या धावा अशा होत्या....
पोर्ट ऑफ स्पेन: ६५ आणि नाबाद ६७
जॉर्जटाऊन: ११६ आणि नाबाद ६४
ब्रिजटाऊन: १ आणि नाबाद ११७
पोर्ट ऑफ स्पेन: १२४ आणि २२०
त्यावेळी प्रतिस्पर्धी संघात होते हॉलफर्ड, होल्डर,शेफर्ड वगैरेंसारखे राक्षसी देहयष्टीचे जलदगती गोलंदाज आणि त्यांचा संघनायक होता जगातला अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू सर गारफील्ड सोबर्स. ह्या संघात हंट,कन्हाय,लॉईडसारखे नावाजलेले फलंदाज होते. अशा नाणावलेल्या खेळाडु असलेल्या संघाविरुद्ध त्यांच्याच देशात जाऊन पदार्पणातच असा पराक्रम केवळ गावसकरच करू जाणे. जेमतेम ५फूट ४इंच उंची असलेल्या गावसकरचा हा पराक्रम पाहून तिथले लोक त्याला आदराने ’लिटिल मास्टर ’ म्हणू लागले.


















उभा राहण्याचा पवित्रा-सरळ पकडलेली बॅट


सुंदर लेग ग्लान्स

गावसकरच्या जन्माची कथाही गमतीदार आहे. त्याच्या जन्माच्या वेळी परिचारिकेने त्याला दुपट्यात गुंडाळून त्याच्या आईजवळ ठेवण्याऐवजी चुकून एका कोळणीजवळ ठेवले होते आणि त्या कोळणीचे मुल गावसकरच्या आईजवळ. पण गावसकरचे मामा आणि भारताचे माजी यष्टीरक्षक श्री. माधव मंत्री ह्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि त्यांनी वेळीच चूक सुधारली. नाहीतर......सुनील गावसकर नावाचा महान खेळाडु भारताला कुठून मिळता? कुठेतरी समुद्रावर मासेमारी करत बसला असता. :D


बॅकफुटवर जात मारलेला ऑफ ड्राईव्ह.

वेस्ट इंडीजविरुद्ध दमदार खेळ खेळणारा गावसकर इंग्लंडच्या १९७१ दौर्‍यात मात्र फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यात त्याने २४ च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह फक्त १४४ धावाच केल्या.
लॉर्डस्‌: ४ आणि ५३
मॅन्चेस्टर: ५७ आणि २४
ओव्हल: ६ आणि ०

१९७२-७३ मध्ये भारतामध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही पुन्हा गावसकर २४.८९ च्या सरासरीने दोन अर्ध शतकांसह फक्त २२४ धावाच करू शकला.
दिल्ली: १२ आणि ८
कलकत्ता: १८ आणि २
मद्रास: २० आणि नाबाद ०
कानपूर: ६९ आणि २४
मुंबई: ४ आणि ६७


१९७४ सालच्या इंग्लंड दौर्‍यात पुन्हा गावसकर अपयशी ठरला. २६.१७ च्या सरासरीने एक शतक आणि एका अर्धशतकासह फक्त २१७ धावाच करू शकला.
मॅन्चेस्टर: १०१ आणि ५८
लॉर्डस्‌: ४९ आणि ५
बर्मिंगहॅम: ० आणि ४

१९७४-७५ मध्ये वेस्ट-इंडीजविरूद्ध भारतात झालेल्या दोन सामन्यात मिळून गावसकर २७च्या सरासरीने फक्त १०८धावाच करू शकला ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
बंगलोर: १४ आणि ०
मुंबई: ८६ आणि ८


बहारदार ऑफ ड्राईव्ह

१९७५-७६ च्या न्युझीलंड आणि वेस्ट-इंडीजच्या दौर्‍यात गावसकरची बॅट पुन्हा एकदा तळपली.
न्युझीलंडविरूद्ध त्याने ६६.५० च्या सरासरीने २६६ धावा काढल्या;ज्यात त्याचे एक शतक आणि एक अर्धशतक होते.
ऑकलंड:११६ आणि नाबाद ३५
ख्राईस्टचर्च: २२ आणि ७१
वेलिंग्टन: २२

विंडीजविरूद्ध ५५.७१च्या सरासरीने त्याने ३९० धावा काढताना दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं.
ब्रिजटाऊन:३७ आणि १
पोर्ट ऑफ स्पेन: १५६
पोर्ट ऑफ स्पेन: २६ आणि १०२
किंग्स्टन:६६ आणि २


त्यानंतरच्या १९७६-७७च्या न्युझीलंड आणि इंग्लंडविरूद्ध भारतात झालेल्या लढतीत त्याचा सरासरीचा आलेख पुन्हा खाली उतरला.
न्युझीलंडविरूद्ध ४३.१७च्या सरासरीने त्याने २५९ धावा केल्या,त्या एका शतकाच्या साथीने.
मुंबई: ११९ आणि १४
कानपूर ६६ आणि १५
मद्रास: २ आणि ४३

इंग्लंडविरुद्ध ३९.४० च्या सरासरीने त्याने ३९४ धावा केल्या,त्या एक शतक आणि दोन अर्धशतकांसह.
दिल्ली : ३८ आणि ७१
कलकत्ता: ० आणि १८
मद्रास: ३९ आणि २४
बंगलोर: ४ आणि ५०
मुंबई: १०८ आणि ४२



पुढे सरसावत मारलेला कव्हरड्राईव्ह

त्यानंतर १९७७-७८च्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर त्याला पुन्हा एकदा सूर गवसला. ह्या दौर्‍यात त्याने ५०च्या सरासरीने ४५०धावा केल्या, ज्यात त्याने तीन शतकं झळकावली.
ब्रिस्बेन: ३ आणि ११३
पर्थ: ४ आणि १२७
मेलबर्न: ० आणि ११८
सिडनी : ४९
ऍडिलेड:७ आणि २९

त्यानंतरच्या १९७८-७९च्या पाकिस्तानच्या दौर्‍यावर तर त्याने कमालच केली. ८९.४० धावांच्या सरासरीने त्याने ४४७धावा फटकावल्या. ज्यात त्याची दोन शतकं आणि दोन अर्धशतकं होती.
फैसलाबाद: ८९ आणि नाबाद ८
लाहोर: ५ आणि ९७
कराची: १११ आणि १३७


ह्याच मोसमात(७८-७९) भारतात वेस्ट-इंडीजविरूद्ध त्याने अजूनच कमाल केली. ९१.५० च्या सरासरीने त्याने चक्क ७३२ धावा कुटल्या,त्याही चार शतकं आणि एक अर्धशतकांच्या मदतीने.
मुंबई: २०५ आणि ७३
बंगलोर: ०
कलकत्ता: १०७ आणि नाबाद १८२
मद्रास : ४ आणि १
दिल्ली: १२०
कानपूर: ४०



जोरदार हुकचा फटका.

१९७९च्या इंग्लंड दौर्‍यात गावसकरने आपल्या बॅटचा हिसका इंग्रजांना दाखवला. इथे त्याने ७७.४३ धावांच्या सरासरीने ५४२ धावा तडकावल्या. ज्यात त्याचे एक शतक आणि चार अर्धशतकं होती.
बर्मिंगहॅम: ६१ आणि ६८
लॉर्डस्‌: ४२ आणि ५९
लिडस्‌:७८
ओव्हल: १३ आणि २२१



मिडविकेटला उत्तुंग षटकार

१९७९-८०साली ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला. त्यांच्या विरुद्ध गावसकरने ५३.१२ च्या सरासरीने ४२५ धावा काढल्या. ज्यात त्याची दोन शतकं आणि दोन अर्धशतकं होती.
मद्रास: ५०
बंगलोर: १०
कानपूर: ७६ आणि १२
दिल्ली: ११५
कलकत्ता: १४ आणि २५
मुंबई: १२३


त्यानंतर आलेल्या पाकिस्तानच्या संघाविरुद्धही सुनीलची बॅट अशीच तळपली. ५२.९० च्या सरासरीने त्याने ५२९ धावा फटकावल्या. ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
बंगलोर: ८८
दिल्ली: ३१ आणि २१
मुंबई: ४ आणि ४८
कानपूर: २ आणि ८१
मद्रास: १६६ आणि नाबाद २९
कलकत्ता: ४४ आणि १५




सणसणीत ऑनड्राईव्ह.
इथे डोक्यावर दिसतेय तेच ते खास शिरस्त्राण. वेस्ट इंडिजच्या ’माल्कम मार्शल’ ह्या द्रुतगती गोलंदाजाच्या शरीरवेधी मार्‍याविरुद्ध प्रत्युत्तर म्हणून मुद्दाम बनवून घेतलेले.

ह्यानंतर १९७९-८० साली भारतात इंग्लंडचा संघ आला. इथून गावसकरच्या धावांचा ओघ आटत गेला.
इंग्लंडविरूद्ध मुंबईत झालेल्या एकमेव सामन्यात त्याने ३६.५०च्या सरासरीने दोन्ही डावात मिळून फक्त ७३ धावाच(४९ आणि २४) काढल्या.

१९८०-८१च्या ऑस्ट्रेलिया न्युझीलंडच्या जोड दौर्‍यावर तर तो पार ढेपाळला.
ऑस्ट्रेलियात त्याने १९.६७च्या सरासरीने फक्त ११८ धावा काढल्या. ज्यात फक्त एकच अर्धशतक होते.
सिडनी: ० आणि १०
ऍडिलेड: २३ आणि ५
मेलबर्न: १० आणि ७०

तर न्युझीलंडमध्ये २१ च्या सरासरीने फक्त १२६ धावाच काढल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
वेलिंग्टन: २३ आणि १२
ख्राईस्टचर्च: ५३
ऑकलंड: ५ आणि ३३

१९८१-८२ साली इंग्लंड संघ भारतात आला असताना गावसकरला पुन्हा सूर सापडला आणि त्याने ६२.५० च्या सरासरीने ५०० धावा फटकावल्या. ह्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
मुंबई: ५५ आणि १४
बंगलोर: १७२
दिल्ली: ४६
कलकत्ता: ४२ आणि नाबाद ८३
मद्रास: २५ आणि ११
कानपूर: ५२

त्यानंतरच्या १९८२च्या इंग्लंड दौर्‍यात त्याची फलंदाजी पुन्हा एकदा तळाला गेली.
ह्या दौर्‍यावर त्याने २४.६७ च्या सरासरीने फक्त ७४ धावाच केल्या.
लॉर्डस्‌: ४८ आणि २४
मॅन्चेस्टर: २
ओव्हल:जखमी असल्यामुळे खेळू शकला नाही.

१९८२-८३ श्रीलंका संघाविरूद्ध मद्रास येथे झालेल्या एकमेव कसोटीत त्याने पुन्हा एकदा आपल्या बॅटीचे पाणी दाखवून दिले.
पहिल्या डावात १५५ धावा आणि दुसर्‍या डावात नाबाद ४ धावा काढत त्याने १५९ ची सरासरी गाठली.

त्यानंतर झालेल्या सामन्यांमध्ये त्याच्या खेळाचा आलेख असाच कधी खाली तर कधी वर होत गेला.

१९८२-८३ पाकिस्तानविरूद्ध-पाकिस्तानमध्ये.
एकूण धावा: ४३४ ; सरासरी: ४८.२२ ; शतक: १ ; अर्धशतक: ३

१९८२-८३ वेस्ट-इंडिजविरूद्ध-वेस्ट इंडिजमध्ये.
एकूण धावा: २४० ; सरासरी: ३० ; शतक: १

१९८३-८४ पाकिस्तानविरूद्ध-भारतामध्ये.
एकूण धावा: २६४ ; सरासरी: ६६ ; शतकं: १ ; अर्धशतकं: २

१९८३-८४ वेस्ट-इंडिजविरूद्ध-भारतात.
एकूण धावा: ५०५ ; सरासरी: ५०.५० ; शतकं: २ ; अर्धशतकं: १

१९८४-८५ पाकिस्ताविरूद्ध-पाकिस्तानमध्ये
एकूण धावा: १२० ; सरासरी: ४०

१९८४-८५ इंग्लंडविरूद्ध-भारतात
एकूण धावा: १४० ; सरासरी: १५.५६ ; अर्धशतकं : १

१९८५-८६ श्रीलंकेविरूद्ध-श्रीलंकेत
एकूण धावा: १८६ ; सरासरी: ३७.२० ; अर्धशतकं: २

१९८५-८६ ऑस्ट्रेलियाविरूद्ध-ऑस्ट्रेलियात
एकूण धावा: ३५२ ; सरासरी: ११७.३३ ; शतकं २

१९८६ इंग्लंडविरूद्ध-इंग्लंडमध्ये
एकूण धावा: १७५ ; सरासरी: २९.१७ ; अर्धशतकं: १

१९८६ ऑस्ट्रेलियाविरूद्ध-भारतात
एकूण धावा: २०५ ; सरासरी: ५१.२५ ; शतकं: १ ; अर्धशतकं: २

१९८६-८७ श्रीलंकेविरूद्ध-भारतात
एकूण धावा: २५५ ; सरासरी: ८५ ; शतकं: १ ; अर्धशतकं: १

१९८७ पाकिस्तानविरूद्ध-भारतात
एकूण धावा: २९५ ; सरासरी: ४९.१७ ; अर्धशतकं: ३

गावसकर एकूण १२५ कसोटी सामने खेळला. त्यातल्या २१४ डावात १६ वेळा नाबाद राहून त्याने ५१.१२ धावांच्या सरासरीने १०,१२२ धावा फटकावल्या. ह्यात २३६ नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने एकूण ३४ शतकं आणि ४५ अर्धशतकं ठोकलेली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा जगातला सर्वात पहिला फलंदाज म्हणून गावसकरच्या नावाची नोंद इतिहासात झालेय. तसंच डॉन ब्रॅडमन ह्यांचा २९ शतकांचा बरीच वर्ष अबाधित असलेला विक्रम मोडणारा पहिला फलंदाज म्हणूनही गावसकरचे नाव इतिहासात नोंदले गेलंय.

वेगवेगळ्या संघांविरुद्धची त्याची सरासरी अशी आहे.
वेस्ट-इंडिज: ६५.४५
इंग्लंड: ३८.२०
पाकिस्तान: ५६.४६
ऑस्ट्रेलिया: ५१.६७
न्युझीलंड: ४३.४०
श्रीलंका: ६६.६७

सुनीलने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १०८ झेल घेतलेले आहेत.

सुनीलने १०८ एकदिवसीय सामन्यातल्या १०२ खेळीत १४ वेळा नाबाद राहात ३५.१३ च्या सरासरीने ३०९२ धावा काढल्या आहेत. ह्यामध्ये त्याचे फक्त एक शतक आणि २७अर्धशतकं आहेत. एकदिवसीय सामन्यात सुनीलने एकूण २२ झेल घेतलेले आहेत.

प्रत्यक्ष खेळाडु म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर तो दूरचित्रवाणीवर क्रिकेट समालोचक म्हणून वावरतोय. तसेच वृत्तपत्र-मासिकातून स्तंभलेखन देखिल करतोय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ , तसेच आंतर्राष्ट्रीय क्रिकेट समितीवरही मानाची पदं भुषवलेली आहेत. त्याच्या बहारदार क्रिकेट कारकिर्दीचे कौतुक म्हणून भारत सरकारने त्याला पद्मभूषण देऊन सन्मानित केलंय.
नुकतीच त्याच्या वयाला ६० वर्षे पूर्ण झाली. आपण त्याला दीर्घायुरोग्य चिंतूया.
जीवेद्‌ शरद: शतम्‌!

ह्या लेखातील माहिती आणि छायाचित्रे महाजालावरून साभार.


पूर्वप्रकाशित: शब्दगाऽऽरवा २००९

२ एप्रिल, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग २

जुलै १९८७ मध्ये मी नवी दिल्लीला जायला निघालो. ह्याआधी मी दिल्ली पाहिलेली असल्यामुळे मला नवीन असे काहीच नव्हते...तरीही नवी दिल्ली स्टेशनवर माझा एक ’अलग’ नावाचा सरदारजी मित्र त्याची मोपेड घेऊन हजर होता. त्या काळातही त्याची ती मोपेड जुनी-पुराणी वाटत होती...पण त्याच्या दृष्टीने ती इंपालापेक्षाही भारी होती.
नवी दिल्लीला उतरल्यावर पाहिले तर सरदारजी माझी वाटच पाहात होता. मला पाहताच तो चटकन पुढे धावला आणि माझ्या हातातली छोटी प्रवासी बॅग त्याने आपल्या हातात घेतली आणि म्हणाला...बाकीका सामान किधर है?

मी म्हणालो...बस,इतनाही है.

तो वेड्यासारखा माझ्याकडे पाहात राहिला. ..अबे,इतने सामानसे कैसे करेगा तू गुजारा?

मी म्हटल...मुझे आदत है.

है क्या इसमें?..त्याचा प्रतिप्रश्न.

दो पॅंट,तीन टी-शर्ट,दो लुंगी और बनियन,अंडरवेयर,रुमाल,टुवाल वगैरे सभी जरूरी कपडे...मी.

दोन क्षण तो माझ्याकडे वेड्यासारखा पाहात राहिला आणि म्हणाला...बस्स!इतनेही कपडे? अरे इतने कपडे तो मैं रोज बदलता हूँ! कमालका आदमी हो तुम. और बेडिंग किधर है? या जमिनपर ही सोयेगा?

मी त्याला माझी छोटेखानी वळकटी दाखवली. ती पाहून तो जोरजोरात हसायला लागला.

तू तो सचमूच पागल दिखता है रे. क्या है इसमे?

सतरंजी,एक रजई और दो चादर...मी

साले,यहांके भिखारीके पास भी जादा चीजे होगी. ये दिल्ली है. यहां सर्दीके मोसममें कैसे दिन निकालेगा तू इतने कम कपडेमें और ऐसे बिस्तरसे? मर जायेगा ठंडसे.

मैं इधर जादा दिन नही रुकनेवाला हूँ,कुछ दिनोंमेही वापस जाऊंगा.

अबे,तू ट्रान्सफरपे आया है या टूरपे?

मै आया तो हूँ ट्रान्सफरपेही...मगर इसको टूरमें बदल दूंगा.

माझा तो एकंदर आविर्भाव पाहून त्याने एकवार जोरदार हसून घेतले आणि मग म्हणाला...चल,जो तू ठीक समझे. मग आम्ही दोघे बाहेर आलो. स्टेशनच्या त्या आवारात असंख्य दुचाकी आणि चारचाकी पार्क केलेल्या होत्या. त्यातल्या सर्वात जुनाट अशा त्या ’इंपाला’कडे निर्देश करत तो खुशीत बोलला...ये है मेरी गड्डी. हवाके साथ बाते करती है...चल, बैठ जा पीछे.

अरे,लेकिन इसपे मेरा सामान कहाँ रक्खूँ?

त्याने क्षणाचाही विचार न करता माझी वळकटी त्याच्या पायाशी आडवी ठेवली आणि त्यावर माझी छोटेखानी बॅग...आणि म्हणाला ...चल अभी बैठ.
मी आज्ञाधारकपणे त्याच्या मागे बसलो आणि इंपाला सुसाट निघाली.

रस्त्यात  अधून-मधून प्रेक्षणीय स्थळं दिसत होती.  ;)  अशा वेळी सरदारजीची मान डाव्या उजव्या बाजूला जितकी फिरवता येईल तितकी फिरत असायची. वर...ओहो.क्या कुडी है,क्या माल है...देख,देख,दिल्लीका माल देख ...

अशा वेळी मला ही भिती असायची की...हा उगाच कुठे तरी गाडी ठोकायचा....म्हणून मी त्याला म्हणत असे..अरे बाबा,जरा आगे देखके गाडी चलाओ ना....कही अपघात हो जायेगा.

त्यावर त्याचे उत्तर...डरो मत पुत्तर,मै गये १०सालसे गड्डी चला रहा हूँ....आजतक कभी अ‍ॅक्सिडंट नही हुवा...और गड्डी चलाते चलाते इस ट्रॅफिकमें यही तो है टाईमपास...पेण**.... आपल्याकडे ’भ’काराने सुरु होणार्‍या शिव्या तिथे ’प’ ने सुरु होतात. गाडी चालवता चालवता सरदारजीचे चक्षूचोदन(हा त्याचाच शब्द) सुरु होते आणि त्याच वेळी जोरजोरात त्याचे धावते(अक्षरश:..गाडी धावत असल्याने)वर्णनही अखंडपणे सुरु होते.
मग मी त्याच्याकडे दूर्लक्ष केले आणि आजुबाजूचा परिचित परिसर पाहू लागलो.

दिल्लीचे रस्ते चांगले प्रशस्त आहेत आणि त्याच बरोबर पदपथही  प्रशस्त आहेत. रस्त्यापासून साधारण फूट-दीडफूट उंचावर हे पदपथ आहेत. पण गम्मत म्हणजे ह्या पदपथावरून चालणारा पादचारी अभावानेच आढळतो. सगळी दिल्ली रस्त्यावरून वाहात असते. स्वत:ची दुचाकी...सायकल,मोपेड,स्कुटर,मोटरसायकल.चारचाकी मोटरगाडी,तीनचाकी ऑटो-रिक्षा,डीटीसीच्या बसेस,खाजगी बसेस आणि टांगे....टांगे एका विशिष्ट परिसरातच चालतात....पण एकूण दिल्लीकर हा नेहमी कोणत्या ना कोणत्या वाहनानेच प्रवास करत असतो.

शेवटी एकदाची आमची इंपाला आमच्या कार्यालयाच्या आवारात पोचली आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. हातीपायी धड पोचलो ह्यातच सर्व आले म्हणून सरदारजीचे आभारही मानले. सगळं सामान घेऊन आम्ही दोघांनी कार्यालयात प्रवेश केला. काही जुने मित्र स्वागताला उभे होतेच...मग गळामिठी झाली...चहापाणी झाले.
मित्र आपापल्या कामाला निघून गेले. मी तिथल्या प्रमुख साहेबांची भेट घेतली...योगायोगाने हे साहेब मुंबईत चार वर्ष राहून गेलेले होते. त्यांचे माझे संबंधही उत्तम होते त्यामुळे त्यांनीही माझे सहर्ष स्वागत केले. काय हवे नको, दिल्लीत राहण्याची काय व्यवस्था आहे...इत्यादि चौकशी केली. पुन्हा एकदा चहापाणी झाले.

मुंबईहून काही महिन्यांपूर्वी एकजण दिल्लीत बदलीवर आला होता तो मराठी मित्रही भेटला....तुझ्या राहण्याची काही व्यवस्था नसेल तर तू माझ्याबरोबर राहू शकतोस...मी एकटाच राहतोय...वगैरे सांगून माझ्या तिथल्या वास्तव्याची चिंता दूर केली.

मी इथे राहायला आलेलो नाहीये...काही दिवसात परत जायचेच आहे...तेव्हा असेल तशा परिस्थितीत दिवस ढकलू...असा मनाशी विचार करून मी त्याच्याबरोबर राहायची तयारी दर्शवली.

नवी दिल्लीपासून दूर उत्तर प्रदेशच्या हद्दीतील  एका नव्याने उदयास येणार्‍या त्या वसाहतीचे नाव होते..नोएडा.
संध्याकाळी, रामदास...हे त्या मराठी मित्राचे नाव....रामदासबरोबर नोएडाला जाण्यासाठी डीटीसीच्या बसथांब्यावर आलो...आणि जाणवली ती तिथली प्रचंड गर्दी. त्या ठिकाणी जवळपास दहा-बारा वेगवगळ्या ठिकाणी जाण्यासाठीच्या बसेसचे क्रमांक दिसत होते...त्यापैकी फक्त एकच बस आमच्यासाठी होती. बसथांब्यावर बसची वाट पाहणारे लोक अस्ताव्यस्तपणे कसेही उभे होते. कुठेही रांग वगैरे असला प्रकार नव्हता. येणार्‍या बसेसही खचाखच भरलेल्या होत्या...आणखी एक गोष्ट म्हणजे मुंबईत जशा बस थांब्यावर थांबतात...प्रवासी चढतात उतरतात...असला प्रकार इथे नव्हता. बसेस थांब्यावर थांबत नसत...फक्त त्यांचा वेग कमी होत असे...त्या स्थितीतच लोक चढायचे उतरायचे.
हे सगळे पाहिल्यावर ...माझ्या सामानासकट ह्या असल्या गर्दीत आणि तेही न थांबणार्‍या बसमध्ये कसे चढायचे?....हा प्रश्न मला सतावत होता. सकाळी सरदारजीच्या हसण्याला कारणीभूत ठरलेले ते माझे किरकोळ सामानही आता मला खूप भारी वाटू लागले.
बसेस येत होत्या आणि जात होत्या..गर्दी कमी झाल्यासारखी वाटतेय न वाटतेय तोवर अजून नव्याने गर्दी जमा होत होती.  संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत आम्ही बसथांब्यावर नुसते उभेच होतो...ह्या अवधीत नोएडाला जाणार्‍या ज्या काही पाचसहा बसेस आलेल्या त्या आधीच प्रचंड भरून आलेल्या होत्या...त्यामुळे त्यात प्रवेश करणंच कठीण होतं. शिवाय नोएडा तिथून इतकं दूर होतं की ऑटोरिक्षानेही जाणे परवडण्यासारखे नव्हते...ह्यात अजून एक तिढा होता. दिल्ली आणि नोएडाच्या मध्ये यमुना नदी लागते...त्यांना सांधण्यासाठी तिथे एक मोठा सेतू बांधलेला आहे...तर दिल्लीतून जाणार्‍या रिक्षा फक्त ह्या सेतूच्या दिल्लीच्या बाजूपर्यंतच जाऊ शकत होत्या..पुढे जाण्यासाठी तो सेतू पायी चालून जाऊन पुढे नोएडात शिरून तिथल्या स्थानिक रिक्षांचा आसरा घ्यावा लागत होता...त्यामुळे हे प्रकरण सर्वार्थाने भारी होते....तेव्हा बससाठी वाट पाहण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नव्हता.

रात्रीचे  नऊ वाजले तरी आम्ही तिथेच ठाणबंद होतो...आता नोएडाला जाणारी एकच बस...शेवटची ९.३० ची होती...ती सुटली तर मग नाईलाजाने पुन्हा कार्यालयात जावे लागणार होते. रामदासने इतका वेळ माझ्यासाठी कसाबसा धीर धरला होता...तो म्हणाला...हे बघ देव, आता ह्या बसमध्ये नाही शिरू शकलो तर रात्रभर इथेच राहावे लागेल नाहीतर पुन्हा कार्यालयात जावे लागेल. मी आता काहीही करून ह्या बसमध्ये घुसणार आहे...तुही कंबर कसून तयार राहा...तुझी वळकटी दे माझ्याकडे...मी आधी घुसतो..तू माझी पाठ सोडू नकोस...घुसायचं म्हणजे घुसायचं...काय?

मी म्हटलं...रामदास..तू म्हणतोस तसे करूया...नाहीतरी मलाही असे तीन तास उभे राहून कंटाळा आलाय...आता शेंडी तुटो वा पारंबी तुटो...घुसायचं म्हणजे घुसायचं...तु हो पुढे...मी कसेही करून तुझ्यामागे येतोच....

माझे बोलणे ऐकून रामदासही सुखावला...हा रामदास म्हणजे चांगला पहेलवान गडी होता...त्यामुळे मला त्याच्या क्षमतेबद्दल अजिबात शंका नव्हती...आज तो केवळ माझ्यासाठी इथे ताबडला गेला होता...एरवी पहिल्याच बसने तो कधीच निघून जाऊ शकला असता...केवळ माझ्या सोयिसाठी तो आत्तापर्यंत शांत राहिलेला होता.

दूरून बस येतांना दिसली आणि रामदासने मला सावधान केले. खरे तर बस भरलेलीच होती..पण आता विचार करायला फुरसत नव्हती....हरहर महादेव...करत रामदासने धडक मारली..मीही त्याच्यामागे..सगळा जीव एकवटून  बसचा दांडा पकडला...बस तशी वेगातच होती...जेमतेम एक पाय पायरीवर आणि दुसरा पाय बाहेर..अशा अवस्थेत काही सेकंद गेले..आणि तेवढ्यात मागून एक जबरदस्त धक्का आला...आणि मी आपोआप आत ढकलला गेलो.... कसेबसे मागे वळून पाहिले...एक उभाआडवा पंजाबी...बसच्या दारात आरामात हवा खात उभा होता...मी मनातल्या मनात त्याचे आभार मानले...

शेवटी एकदाचे रात्री साडेदहाला नोएडाला...रामदासच्या खोलीवर पोचलो...हुश्श. गेल्या गेल्या मी तिथे जमिनीवर आडवा पडलो आणि चक्क झोपी गेलो.
मला कुणीतरी उठवत होते...डोळे उघडायला तयार नव्हते...मात्र कानांना ऐकू येत होते....अरे देव, उठ. हातपाय धू. मी मस्तपैकी पिठलं भात बनवलाय, तो खाऊन घे आणि मग निवांतपणे झोप.

मी कसाबसा उठलो,हातपाय धुतले...आणि त्याच्याबरोबर जेवायला बसलो....रामदासने खरंच खूप चविष्ठ असे पीठलं बनवलं होतं....