माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१६ फेब्रुवारी, २०१९

पुन्हा एकदा...वजन कमी केले आणि पोटाचा घेरही...


२१ डिसेंबर २०१८ ते आजपर्यंत, वजन  ७२किलोवरून ६६.८० किलोपर्यंत घटवलंय....आणि पोटाचा घेरही कमी केलाय...तरीही अजून संघर्ष जारी आहे....

गेली तीन-चार वर्ष व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणं बंद झालेलं...कारण होतं गोठलेला खांदा...शुद्ध मराठीत त्याला फ्रोजन शोल्डर असं काहीसं म्हणतात. तसा घरी मी व्यायाम करत नव्हतो असं नाही पण तो फारच जुजबी स्वरूपातला होता. त्यामुळे साहजिकच वजन आणि पोटाचा घेर वाढत गेला. ६६ किलोवरून वजन ७२ च्या वर सरकलं आणि पोटही नेहमीच्या पॅंटमध्ये मावेना...साहजिकच दोन नव्या पॅंट घ्याव्या लागल्या.

वजन वाढल्याचं फार काही वाटलं नाही कारण ते कमी करणे फारसे कठीण नाही हे मी स्वानुभवाने जाणतो. मात्र वाढलेलं पोट कमी करणे हे मात्र भलतंच कठीण आणि किचकट काम आहे...पोट हा सगळ्यात हट्टी अवयव आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो आणि म्हणूनच काळजी वाटायला लागली. आहार नियंत्रण मुख्य आणि नियमित मध्यम प्रतीचा व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहू शकते-कमी होऊ शकते हा अनुभव पदरी आहे म्हणूनच तसा निश्चिंत होतो पण पोटाचं काय करायचं ह्याबद्दल गंभीरपणे विचार करायला लागलो...पोटाचे असे खास व्यायाम अाहेत आणि मी ते करायला सुरूवातही केली. महाजालावरही  काही नवीन प्रकार सापडले...तेही रोजच्या व्यायामात सामील केले..दोन-तीन महिने हे सगळे निष्ठेने केले...पण पोटाचा घेर जैसे थे. मग पुन्हा विचारचक्र सुरू झालं...रोजच्या खाण्याची आणि शारिरीक हालचालीची खानेसुमारी सुरू केली.

खाणं तर माझं खूपच मर्यादित आहे. मी गेली काही वर्ष फक्त एकवेळच जेवतोय. तेही मोजकंच... बाकी दिवसभरात दोन वेळा चहा किंवा काॅफी, दुपारच्या चहासोबत थोडं अबर-चबर (चिवडा, खाकरा, शेव-गाठ्या वगैरेपैकी एखादा पदार्थ) आणि रात्री एक कप दूध. कधीतरी अचानक शेजारून काही अालंच तर तेही खात असे. माझं जेवण पाहून माझे मित्र मला नेहमी हसत असतात, काळजीही करतात...मी उगाच मन मारतोय असं समजतात...पण मी त्यांना दाद देत नाही.
  तरीही खाण्यातले ते अबर-चबर पदार्थ आणि शेजारून आयत्या वेळी येणारे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचं ठरवलं..शेजाऱ्यांनाही सांगून टाकलं...आता काही पाठवू नका...मी डायेट करतोय म्हणून. त्यांनी ते हसण्यावारी नेलं आणि पदार्थ पाठवणं थांबवलं नाही. पण मी ते स्वीकारणंच बंद केलं...मग त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी आयत्या वेळी पदार्थ पाठवणं बंद केलं.  मी ठरवलं तसं  काटेकोरपणे पाळलं...त्याचा परिणाम म्हणून महिनाभरात वजन किलो-दीड किलोने खाली आलं पण अजूनही पोटोबा काही दाद देत नव्हते...

पुन्हा विचार करायला लागलो...आता खाणं तर कमी करणं शक्यच नव्हतं म्हणून मग ठरवलं की आता शारिरीक मेहनत जास्त करायची. पण प्रश्न असा उभा राहिला की नेमकं काय करायचं? पुन्हा व्यायामशाळेत जायचं?
नको...आता पुन्हा खांदा दुखवायला नको. त्यापेक्षा आपण रोजचं चालणं वाढवुया. पण त्यातही भरपूर व्यत्यय येतात. रस्त्यात कुणी भेटलं  की आपण चालणं विसरून गप्पांत रमतो. अरे मग करायचं तरी काय ?

ठरलं एकदाचं...चालायचं/धावायचं...बाहेर/घरातल्या घरात...जिथे जसे जमेल तसे, जमेल तेवढे...नंतर हळूहळू वाढवत न्यायचं. हं, तरीही एक प्रश्न उरतोय...किती चाललो/धावलो ह्याची नोंद कशी ठेवायची ?
तोही प्रश्न सुटला...पावलं मोजणारं एक अॅप (स्टेप काऊंटर) उतरवून घेतलं मोबाईलवर आणि केली एकदाची सुरूवात चालण्या/धावण्याची.  घरात धावायचं आणि बाहेर चालायचं....सुरूवातीला अंदाज नव्हता...आपण एका वेळी किती वेळ आणि किती पावलं चालू शकू?  म्हणून निश्चित असं काही उद्दिष्ट ठेवलं नाही...पण थकेपर्यंत चालायचं इतकंच मनाशी पक्कं केलं आणि केली सुरूवात...२१ डिसेंबर २०१८ रोजी...त्या दिवशी साधारण ५०००+  पाऊले/ ३ किलोमीटर  चाललो/धावलो...त्यानंतर हळूहळू अंतर वाढवत गेलो, पावलंही वाढत गेली...सरासरी १० ते १२हजार पावले / सात-साडेसात किलोमीटर पर्यंत आता मजल पोचलेली आहे... हा उपक्रम सुरू  केल्यापासून साधारण तीन आठवड्याने म्हणजेच जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लक्षात आलं की पॅंट खाली घसरायला लागलेय.  :)
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चक्क पट्टा आवळावा लागला आणि ऊत्सुकता म्हणून जुनी पॅंट चढवून पाहिली आणि थोडी ओढाताण करून तीही पोटावर चढली की हो ! त्यामूळे हुरूप वाढला आणि उपक्रम नेटाने जारी ठेवला...परिणामस्वरूप आज जुनी पॅंट सहजपणे पोटावर चढतेय. मेहेनत केल्याचे सार्थक झाले म्हणायचे, त्यामुळे आता हा उपक्रम शक्य होईल तोवर असाच जारी राहील हे सांगणे नलगे !

कुणीसं म्हणून ठेवलंय....केल्याने होत आहे, आधी केलेचि पाहिजे.
-समाप्त.