’यशवंत देव’ हे मराठी सुगम संगीतातले एक भारदस्त व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी आपल्या आजवरच्या सांगीतिक वाटचालीबद्दल लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक कथनाचे शीर्षक आहे ’कधी बहर कधी शिशिर.’
देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ चा.त्यांचे वडील हुशार,चतुरस्र आणि कर्तबगार होते. ते विद्वान तसेच अनेक कलानिपुणही होते. त्यांना गाण्याचाही नाद होता. गाता गळा जरी नसला तरी कान मात्र तयार होता. सतार, पेटी आणि तबला ते तयारीने वाजवत असत.त्यांच्याच तालमीत देवांचे प्राथमिक संगीत शिक्षण झाले. घरात मोठमोठ्या कलाकारांचे येणेजाणे असल्यामुळे त्यांची गाणी ऐकत ऐकतच देव मोठे झाले. तसंच त्यांच्याकडे असलेल्या फोनोवर तबकड्या ऐकूनही त्यांना रागसंगीतातल्या बर्याचशा चिजा पाठ झाल्या होत्या.
बालपणात जरी रागसंगीत आणि नाट्यसंगीताचे संस्कार त्यांच्यावर झाले तरी पुढे जी.एन जोशी,जे.एल रानडे आणि गजाननराव वाटवे इत्यादी गायकांची सुगम गायकीच त्यांना आवडू लागली आणि भविष्यात तेच आपले कार्यक्षेत्र असावे असे त्यांच्या मनाने घेतले.
देवांनी आपल्या संपूर्ण सांगीतिक कारकीर्दीत रेडिओ,दूरदर्शन, नाटक,चित्रपट,संगीतिका,नृत्यनाटिका अशा विविध माध्यमात कामं केली आणि त्यात नावाप्रमाणेच ते ’यशवंत’झाले. आठवणी आणि किश्श्यांच्या स्वरूपात असलेले हे आत्मचरित्र निश्चितच वाचनीय आहे आणि ते खुद्द त्यांच्या शब्दातच वाचणे रंजक होईल.
ठाण्याच्या ’अनघा प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकाची किंमत आहे रु. १६०/-
माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
पुस्तक परिचय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

१९ मे, २००८
२४ एप्रिल, २००८
भगीरथाचे वारस!
पाणी म्हणजेच जीवन असे आपण म्हणतो. पण आपल्याला मिळणारे पाणी कुठून येते? कसे येते? वगैरे प्रश्न आपल्याला कधी पडलेत काय? पडले असल्यास त्याची माहिती आपण कधी मिळवण्याचा प्रयत्न केलाय काय? काही अपवाद सोडल्यास आपण एकूण सगळेच जण त्याबद्दल फारसा विचार कधी करत नाही हेच खरे; मग पाण्याचा अभाव, म्हणून पडणारा दुष्काळ, दुष्काळपीडित लोक, त्यांच्यासाठी रोजगार हमी योजना वगैरे सारखी चालणारी सरकारी कामे वगैरेबाबत आपण कधी विचार करत असू असेही वाटत नाही. ह्याला कारण म्हणजे शहरी भागात न जाणवणारी पाण्याची टंचाई. त्याच्या उलट परिस्थिती खेड्यापाड्यात असते. विशेषतः उन्हाळ्यात, नदी, नाले, ओढे आटलेले असतात आणि मग तिथल्या आया-बायांना मैलोन-मैल पाण्यासाठी भटकावं लागतं; हे सगळे आपण वृत्तपत्रात वाचत असतो पण तरी त्याची म्हणावी तशी धग आपल्याला जाणवत नाही हेच खरे. अधेमधे कधी जलवाहिनी दुरुस्तीसाठी अथवा तलावात पाण्याचा साठा कमी आहे म्हणून काही टक्के पाणी कपात वगैरेची घोषणा महानगरपालिकेकडून झाली की आपल्याला त्याची तीव्रता कळते पण ती तेव्हढ्यापुरतीच असते.
पण ह्या जगात सगळेच काही आपल्यासारखे आत्मकेंद्रित आयुष्य जगणारे नसतात. पाणी सद्या जितक्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे त्याचा जर योग्य पद्धतीने आपण वापर आणि वाटप नाही केले तर भविष्यात पाण्यावरून युद्धे होतील असा गर्भित इशारा काही तज्ञांनी दिलेला आहे हे आपण वाचलेही असेल. काही लोक नुसतेच इशारे देतात, पण काही लोक केवळ इशारे देऊन स्वस्थ बसत नाहीत तर त्यावर तोडगा शोधण्यासाठी अविरत धडपडतात. त्यासाठी आपले आयुष्यही पणाला लावतात. अशाच पैकी एक आहेत 'पाणी पंचायत' चे विलासराव साळुंखे.
मुळातच पाणी पंचायत हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर मग आपल्याला विलासरावांचा सगळा जीवनप्रवास माहिती करून घ्यायला हवा. पाणी अडवा,पाणी जिरवा, पाणी साठवा आणि त्याचे समान वाटप करा... थोडक्यात..पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे असा जणू मंत्रच आहे विलासरावांच्या कार्याचा. वर म्हटल्याप्रमाणे खेड्यापाड्यात उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी परवड पाहिली आणि मग विलासरावांचे विचारचक्र सुरू झाले. त्यातून मग ह्या समस्येचा त्यांनी कसून अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही महाराष्ट्रातला कैक भाग हा दुष्काळग्रस्त आहे. पावसाचे पाणी नदी,नाले -ओढ्यांतून वाहत जाऊन समुद्राला मिळते हे त्याचे एक कारण. दुसरीकडे जिथे हे पाणी मोठमोठ्या धरणात साठवले जाते त्याचे काय होते? ह्या प्रश्नाचा पाठपुरावा केल्यावर लक्षात आले की सरकारी योजनेमुळे ही जी मोठमोठी धरणे बांधली गेली त्याचा जास्तीत जास्त फायदा हा त्या त्या ठिकाणच्या सधन शेतकर्यांनाच झालाय. त्यातूनच भरपूर पाणी लागणारे ऊसासारखे पीक घेतल्यामुळे इतर लोकांपर्यंत पाणी पोचतच नाही. धरणाच्या आसपास असणारे शेतकरीच त्या पाण्याचे लाभार्थी ठरतात आणि इतरजण पाण्याअभावी शेतीच करू शकत नाहीत. म्हणजे एका मर्यादित भागाचा विकास तर बाकी सर्व भकास!
दुष्काळ निवारणार्थ सरकारने हाती घेतलेली पाझर तलाव निर्माण वगैरेसारखी कामे कशी चालतात. त्यात काय फायदे/त्रुटी आहेत वगैरे गोष्टींचा साधकबाधक अभ्यास त्यांनी केला. ह्यातूनच काही धडा घेऊन विलासरावांनी आपली योजना तयार केली. त्यात जमेल तिथे पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बांध बांधणे,पाणी साठवण्यासाठी तलाव सदृश खड्डे खणणे,जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडवता येईल असे धोरण आखले. अडवलेले,साठवलेले पाणी मग सर्वांना समान वाटून देणे. कमी पाण्यात होणारी पिके घेणे ... हे सगळे कसे करायचे त्याबद्दल योजना आखल्या. हे सगळे एकट्याच्या बळावर करणे वाटते तितके सोपे नाही म्हणून स्थानिक लोकांशी बोलून,त्यांना ह्या गोष्टीचे महत्त्व पटवून त्यात सहभागी करून घेतले. अर्थात हे काम इतक्या सहजतेने झाले नाही. कारण जे आजवर शक्य झाले नाही असले स्वप्न दाखवणारा हा माणूस खरंच काही करून दाखवू शकेल काय? आणि त्यात त्याचा काय स्वार्थ दडलाय? असे काही प्राथमिक प्रश्न तिथल्या स्थानिकांना पडणे स्वाभाविकच होते. पण अडून राहण्याचा विलासरावांचा स्वभाव नसल्यामुळे जे आले त्यांना बरोबर घेऊन त्यांनी काम सुरू केले. ह्या संबंधीचा पहिला प्रयोग त्यांनी पुरंदर तालुक्यातील नायगाव ह्या दुष्काळी गावामध्ये केला. तो कमालीचा यशस्वी झाला.तिथे निर्माण झालेली हिरवीगार शेती, वनसंपदा पाहून जो तो त्या प्रकल्पाला भेट द्यायला येऊ लागला आणि मग ह्यातून पुढे सुरू झाली पुढची वाटचाल,पुढली चळवळ!
मंडळी हे जितक्या सहजतेने लिहिले तितके सहज झालेले नाही. ही चळवळ पुढे कशी गेली, त्याला किती यश आले,सरकारने ह्या असल्या प्रयोगांना किती आणि कसे साहाय्य केले अथवा नाही. त्या त्या वेळच्या सत्ताधार्यांनी, विशेषतः लोकनेते म्हणून गाजलेल्यांनी कसा/किती प्रतिसाद दिला, लोकांनी ह्या चळवळीला किती उचलून धरले,विरोध केला हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर मुळातूनच "भगीरथाचे वारस" हे वीणा गवाणकर लिखित पाणी पंचायतच्या विलासराव साळुख्यांच्या कार्यासंबंधीचे सचित्र कथन वाचायला हवेय.
पेश्याने विद्युत अभियंता असणारे विलासराव एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. परंतु आधी काही दिवस आपला व्यवसाय सांभाळून आणि नंतर आपली पत्नी आणि विश्वासू सहकारी यांच्यावर उद्योगाची जबाबदारी सोपवून पूर्णपणे त्यांनी ह्या कार्याला वाहून घेतले आणि हे करतानाच देह ठेवला.त्यांची ही कहाणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे.
भगीरथाचे वारस
लेखिका: वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन,पुणे.
किंमत १६०रू.

१९ जानेवारी, २००८
फु बाई फू!
बालपणी इच्छा असूनही आणि शिक्षण देण्याची बाची परिस्थिती असतानाही फक्त बाला जडलेल्या दारूच्या व्यसनापायी शिक्षण घेता आलं नाही. अनेक हालअपेष्टांना सामोरं जावं लागलं. तिथूनच सुरू झालेली जीवनाची ओढाताण शेवटपर्यंत टिकली. तरीही आयुष्यात आपण काहीतरी करायचंच, कोणीतरी मोठ्ठं बनायचं ही जिद्द ठेवली. त्यासाठी झटत राहिलो. दारूपायी घराची झालेली परवड बघितल्यामुळे आयुष्यभर दारूला शिवलो नाही.
अनेकांनी हिडीसफिडीस केले, पण परत परत खेटे मारत राहिलो. त्यात काही चांगली माणसे भेटली. त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि माझ्यातली शाहिरी कला बहरली. कलेच्या आवडीमुळे कधी कधी गाण्याच्या कार्यक्रमात जास्त पैसे मिळत असतानाही फक्त २० रुपयांसाठी नाटकात कामं केली. घरी उपासतापास करावे लागले. बोटावर मोजण्याइतके कलाकार सुखवस्तू जीवन जगले, बाकीचे कलाकार खडतर जीवनाशी झुंजतच राहिले. खडतर जीवन जगत रहाणार्या कलाकारांपैकी मीही एक...........
मित्रहो हे मनोगत आहे सुप्रसिद्ध लोकशाहीर श्री विठ्ठल उमप ह्यांचे. "जांभूळ आख्यान" मुळे संपूर्ण महाराष्टाला परिचित असलेले शाहीर विठ्ठल उमप ह्यांचे "फु बाई फू " हे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले. छोट्या छोट्या किश्शांच्या स्वरूपात लिहिलेले हे आत्मचरित्र आपल्याला शाहीरांच्या समग्र जीवनाचे दर्शन घडवते. गरिबी, अपमान, कौतुक,मानसन्मान वगैरे गोष्टींनी भरलेले प्रसंग वाचतांना शाहीरांच्या मोठेपणाची आणि त्याचवेळी अंगी असलेल्या विनम्रपणाची साक्ष पटते. लहान-थोर साहित्यिक, संगीतकार,गायक, नाट्य-चित्रपट कलावंत, राजकारणी, समाजकारणी, मंत्री वगैरे मोठ्या लोकांकडून भरपूर कौतुक होऊनही ह्या माणसाचे पाय जमिनीवरच आहेत.
लोकगीत गायक म्हणून ते आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेतच. त्यांच्या काही मोजक्याच गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघालेल्या आहेत पण त्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यातील " फु बाई फू फुगडी फू, ये दादा आवार ये,बाजीराव नाना तुमडीभर देना,माझी मैना गावाकडे राहिली, हे खरंच आहे खरं श्री भीमराव आंबेडकर, फाटकी नोट मना घेवाची नाय, प्रथम नमू गौतमा चला हो प्रथम नमू गौतमा " ही गाणी विशेषत्वाने सांगता येतील.
लोककला सादर करून आपल्या सारख्या रसिकांना रिझवणार्या एका सच्चा कलाकाराचे वास्तवातले जीवन किती हलाखीचे असते हे कळण्यासाठी तरी प्रत्येकाने हे चरित्र वाचलेच पाहिजे.
ह्या छोटेखानी आत्मचरित्राला सुप्रसिद्ध सिने आणि नाट्य कलावंत श्री निळू फुले ह्यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
प्रकाशक आहेत : शिवा घुगे, प्रभात प्रकाशन, वरळी, मुंबई
किंमतः १००रुपये.
थोडक्यात जांभूळ आख्यान शाहीरांच्याच शब्दात
एकदा कर्ण द्रौपदीच्या रंगमहाली आला. त्याला पाहून द्रौपदी मोहीत झाली. तिच्या मनी पाप आलं. द्रौपदीने कर्णाला भोजनासाठी बोलावलं. हे द्रौपदीचे वागणं कृष्णदेवानं अंतरमनानं ओळखलं. द्रौपदीचे हे पाप उघड करण्यासाठी कृष्ण द्रौपदीसह पांडवांना घेऊन वनभोजनाकरिता जांभूळ वनात जातो. भोजन झाल्यावर कृष्णाला फळं खायची इच्छा होते. कृष्ण फळं आणण्यासाठी भीमाला जांभूळ वनात पाठवतो, पण त्या जांभूळ वनातल्या सर्व झाडांची फळं कृष्णदेव आपल्या मायावी शक्तिनं गडप करतो आणि एकाच झाडाला एकच जांभूळ ठेवतो. भीम जांभूळ वनात गेल्यावर त्याच्या दृष्टीला एका झाडाला एकच जांभूळ दिसतं. भीम ते जांभूळ तोडून आणतो. मोठ्या आनंदानं कृष्णाला सांगतो, "देवा वनात हे एकच जांभूळ होतं तेच तोडून आणलं."
कृष्ण भीमाला म्हणतो, " अरे भीमा हे तू काय केलंस? अरे! या जांभूळ वनात एक महान ऋषी तपाला बसलाय. तो रोज सकाळी हे जांभूळ खाऊन दिवस काढतो. भीमा आता तो महाकोपिष्ट ऋषी येईल, त्याला जांभूळ तोडल्याचे कळेलच. तो आपल्या सर्वांना शाप देईल. आपण सगळे मरून जाऊ."
"देवा-देवा! आता याला काही उपाय सांगा" अशी प्रत्येक जण कृष्णाची विनवणी करतो. द्रौपदीही विनवणी करते.
"आपण हे जांभूळ जसं तोडलं तसंच ते त्या झाडाला लावून द्यावं" असे कृष्णदेव सगळ्यांना सांगतो.
मग धर्म,भीम,अर्जुन,नकुल,सहदेव हे सर्वजण जांभूळ झाडाला लावण्याचा प्रयत्न करतात, पण काही केल्या ते जांभूळ झाडाच्या देठी लागत नाही. शेवटी कृष्ण द्रौपदीला म्हणतो, " द्रौपदी, हे पाच पांडव तुझे भ्रतार. तुझ्या सत्वाच्या पुण्याईनं हे फळ लाव देठी."
तिच्या हातूनही ते जांभूळ देठी लागत नाही. द्रौपदी खिन्न मनानं लज्जीत होऊन उभी रहाते.
द्रौपदी म्हणते, " भगवंत असं का अघटीत झालं? माझ्या मनी तर कसलंबी पाप आलं नाही. माझं पाच भ्रतार हे पाच पांडव सोडून इतर समदे पुरूष मला पित्याप्रमाणे आहेत."
कृष्ण म्हणतो, " पण मनी खळबळ झालीच ना?"
द्रौपदी म्हणते, " काय सांगू देवा, रूप त्याचं आनंदाहून इशेस दिसं, लागला नजरेचा बाण त्याचा, काळजाला लागलं पिसं. पाच पुरूषोत्तम भ्रतार पांडव माझं सहावा असता कर्ण, सहा वार झाले असते पूर्ण. सहाव्या वारी भोग घेतला असता त्याच्या प्रितीचा."
झाडाची उडविली फळं,केली देवगत
एका झाडाला एक फळ लईच निर्मळ
देठी गाभुळलं
कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं
हे जांभूळ आख्यान मधील मी गायलेलं गाणं रसिकांच्या मनात घर करून राहिलं.

६ जानेवारी, २००८
माझंही एक स्वप्न होतं....
"फार वर्षांपूर्वी मी आणंदला आलो, ती माझी इच्छा नव्हती, तर सक्ती होती. अमेरिकेतल्या माझ्या शिक्षणाकरता भारत सरकारनं पैसे दिल्यामुळे एका करारान्वये मी सरकारशी बांधील होतो. मी पदवीनं इंजिनियर होतो. मला मुख्यत्वेकरून फिजिक्स आणि मेटलर्जी या विषयात रस होता. परंतु दुग्धव्यवसाय अभियांत्रिकीमध्ये पुढचं शिक्षण घ्यावं लागलं. तो एकापरीनं जुलमाचा रामराम होता. त्यानंतर आणंद इथल्या सरकारी 'लोणी संशोधन प्रक्रिया संस्थे' मध्ये कराराचा भाग म्हणून मला जबरदस्तीनं नोकरी करावी लागली आणि त्यानंतर जेव्हा मी दूध उत्पादक शेतकर्यांच्या सहकारी संस्थेत दाखल झालो, तेव्हा या क्षेत्राबाबत माझं काही फारसं प्रशिक्षण झालेलं नव्हतं.
ग्रामीण भारताशी काहीही सोयरसुतक नसलेला मी एक शहरी तरुण होतो. माझी शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी होती, परंतु शेतकरी आणि शेतीविषयक ज्ञान यथातथाच होतं. त्यानंतर अनेक घटना घडत गेल्या. या एका मागोमाग एक घडणार्या अपघाती प्रसंगांमुळे भारतातला दुग्धव्यवसाय पूर्वी होता तसा राहिला नाही, असं आज मागं वळून पाहताना मी म्हणू शकतो. आज ज्या प्रमाणात दुग्धव्यवसायाचा विकास झाला आहे, त्याला कारणीभूत या 'अपघाती घटना' आहेत आणि मीही आज जो आहे तो तसा नसतो, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही."
हे मनोगत आहे भारतातील 'धवलक्रांतीचे जनक' वर्गीस कुरियन ह्यांचे. त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती,अविरत मेहनत,जीवघेणा संघर्ष आणि आपल्या कामावरील निष्ठेच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. जे 'अमूल' हे नाव आता जगभरच्या दुग्धव्यवसायात प्रसिद्ध आहे त्या अमूलच्या निर्मितीमागची कहाणी म्हणजेच 'माझंही एक स्वप्न होतं' हे वर्गीस कुरियन ह्यांचे आत्मचरित्र आहे.
हे स्वप्न साकार करताना जशी त्यांना बर्याच भल्या माणसांची मदत झाली तसाच टोकाचा विरोधही झाला. हा विरोध करणारे लोक कुणी सामान्य नव्हते. तर ह्या धंद्यातले प्रस्थापित लोक, 'नेस्ले' सारख्या परदेशी कंपन्या, बडे सरकारी अधिकारी आणि मातब्बर राजकारणी. पण ह्या सगळ्यांना कुरियन पुरून उरले. वेळच्या वेळी नेमकी उपाययोजना करून त्यांनी ह्या बड्या विरोधकांचा विरोध मोडून काढला.
कुरियन ह्यांची काम करण्याची पद्धत अतिशय आदर्श अशी आहे. आधी ते आपली योजना अतिशय काळजीपूर्वक बनवतात. त्यानंतर आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन ते ती नीट समजावून देतात. त्यावर साधक-बाधक चर्चा घडवून आणतात आणि एकदा ती सगळ्यांकडून संमत झाली की मग धडकपणे अमलात आणण्यासाठी अक्षरशः आपल्या जीवाचे रान करतात. आपल्या बरोबर काम करणारे सहकारी देखिल त्यांनी अगदी पद्धतशीरपणे निवडलेले आहेत. योग्य माणसांची पारख करण्यात ते पटाईत आहेत. त्यांच्या बेधडक काम करण्याच्या वृत्तीमुळे जसे त्यांनी असंख्य शत्रू निर्माण केलेत तसेच काही हमखास उपयोगी पडतील असे मित्रही जोडलेले आहेत.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्यापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचा विश्वास आणि नि:संदिग्ध पाठिंबा मिळवण्यातही ते यशस्वी ठरलेले आहेत.
हे आत्मचरित्र वाचताना आपल्याला जागोजागी धक्के बसतात. कारण अतिशय परखडपणे आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता केलेले हे कथन आपल्यालाही आत्मसंशोधन करण्यास प्रवृत्त करते. कुरियनसाहेबांच्या परखडपणाचा एकच नमुना इथे पेश करतो त्यावरून आपल्याला त्याची कल्पना येईल.
"आणंदला भेट द्यायला न्यूझीलंडच्या उच्चायुक्त आल्या होत्या. त्यांनी कुरियनना सांगितले, "तुम्ही दूध उत्पादन करता, दुधाची भुकटी बनवता हे कौतुकास्पद आहे. पण जिथे आम्ही माल पुरवतो त्या परदेशातही आपण आपला माल निर्यात करता असे आम्हाला कळलंय. तेव्हा तुम्ही ते करता कामा नये."
खरे तर असा उद्धटपणा आणि तोही एका परदेशी व्यक्तीकडून सहन करणे हे कुरियन ह्यांच्या स्वभावात नव्हते पण एक स्त्री दाक्षिण्य म्हणून ते सौम्यपणे म्हणाले, "बाईसाहेब,अगदी खरं सांगायचं तर जागतिक बाजारपेठ ही तुमची खाजगी मालमत्ता आहे हे मला माहीत नव्हतं."
त्यावर त्या बाई उखडल्या आणि कुरियनना अद्वातद्वा बोलू लागल्या. त्यावर साहजिकच कुरियन ह्यांचा संयम सुटला आणि ते म्हणाले, "बाईसाहेब, तुम्ही न्यूझीलंड नावाच्या एका टीचभर देशाच्या प्रतिनिधी आहात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही सगळ्या भारतीयांनी एक होऊन तुमच्या देशावर थुंकायचं ठरवलं, तर तुमचा देश आमच्या थुंकीत बुडून जाईल."हे ऐकताच त्या बाई ताबडतोब तिथून निघून गेल्या."
तेव्हा मंडळी हे पुस्तक जरूर वाचलेच पाहिजे असे आहे.
इंग्लिश आवृत्ती आय टू हॅड अ ड्रीम... निवेदनः वर्गीस कुरियन; शब्दांकनः गौरी साळवी.मराठी आवृत्तीः माझंही एक स्वप्न होतं..... अनुवादः सुजाता देशमुखराजहंस प्रकाशन.किंमतः २०० रुपये.

११ डिसेंबर, २००७
समिधा: एक मनमोकळे आत्मकथन!
वेदशास्त्रसंपन्न घुले घराण्यातील,अतिशय सनातन वातावरणात वाढलेली एक सुंदर तरूणी आणि दाढी, जटा,कफनी व दंडधारी,आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतलेला एक संन्यासी ह्यांच्यातील ही प्रेमकथा आहे. पहिल्याच नजरेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि वयात भरपूर अंतर असूनही विवाहबद्ध होतात. ह्यातील ती सुंदर तरुणी म्हणजे सौ.साधनाताई आमटे आणि तो संन्यासी म्हणजे मुरली देवीदास उर्फ बाबा आमटे हे सांगितल्यावर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण ही सत्यघटना आहे.
सुखवस्तु, सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून दारिद्र्य आणि खाचखळग्यांनी भरलेले आयुष्य जाणिवपूर्वक स्वीकारणे हे येरा-गबाळाचे काम नोहे हेच खरे. बाबा आमट्यांसारख्या लोकोत्तर पुरुषाची मर्जी सांभाळत, वेळप्रसंगी त्यांच्या चुका दाखवत त्यांच्या समाजसेवी कामात सर्वस्वी झोकून देणे म्हणजे एक प्रकारचे असिधारा व्रतच होय आणि हेच व्रत सौ. साधनाताई आजवर अखंडपणे पाळत आलेल्या आहेत. त्यातील सर्व घटनांचे त्रयस्थपणे केलेले निवेदन "समिधा" ह्या नावाने पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहे.
लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ हा प्रणयाराधनेत गेल्यानंतर हळूहळू बाबांच्या अलौकिक कार्याला साधनाताईंनी डोळसपणे वाहून घेतले. पहिला कुष्टरुग्ण पाहिल्यावर झालेली बाबांच्या मनाची अवस्था,त्याची सेवा करण्यासाठी साधनाताईंनी दिलेले अनुमोदन आणि प्रत्यक्ष सहभाग ह्याचे वर्णन वाचले की कळते की शिव-शक्तीचे मीलन म्हणजे काय असते. बाबा म्हणजे कामाचा झपाटा. त्यात चूक झालेली त्यांना अजिबात चालत नाही. अशा वेळी साक्षात जमदग्नीचा अवतार असलेल्या बाबांची मर्जी सांभाळणे आणि त्यावेळी त्यांच्या रोषाला पात्र ठरलेल्या व्यक्तिला पाठीशी घालून ती चूक आपल्यावर ओढवून घेणे; ही सगळी तारेवरची कसरत करणार्या साधनाताई म्हणजे साक्षात मायमाऊलीच होत.
जसजसा व्याप वाढत गेला तसतशी कामे वाढत गेली. सगळ्यांचा स्वयंपाक करणे(रुग्ण आणि इतर साथीदार), भांडी घासणे ही कामे साधनाताई एकट्यानेच करत. वर चार चार गाईंचे दुध काढणे, कुणाचे दुखले-खुपले बघणे, आपापसातील वाद सोडवणे आणि बाबांची सेवा करणे वगैरे असंख्य कामे त्या न थकता, न कंटाळता सतत हसतमुख राहून करतात हे वाचले की जाणवते की श्रमासारखा खरा आनंद दुसरा कशात नाही. अर्थात हे सगळे त्याच करू जाणे. सामान्य माणसाचे ते काम नाही.
उजाड, ओसाड जागी बस्तान बसविणे, साप,विंचूंचे आगर असलेल्या ठिकाणी सहजपणे वावरणे हे आपल्यासारख्या शहरात वाढलेल्या पांढरपेशांना कसे जमेल? पण लाडा-कोडात आणि सुखवस्तु वातावरणात वावरलेली ही स्त्री किती धिटाईने ह्या सर्व प्रसंगात वागते हे पाहिले की मग घरातल्या पाली-झुरळांना घाबरणार्या आपल्यासारख्यांना आपलीच कींव करावीशी वाटते. साधनाताईंच्या आणि बाबांच्या बाबतीत मात्र जितकी परिस्थिती विपरीत तितकाच काम करण्याचा उत्साह वाढतो हे पदोपदी जाणवते.
साधनाताईंचा हा जीवनप्रवास वाचताना पदोपदी आपण थक्क होत जातो. डॉ.प्रकाश आणि डॉ.विकास ह्या मुलांचे बालपण, डॉ.प्रकाशची पत्नी डॉ. मंदा ह्यांच्याबद्दलची कृतज्ञता, प्रकाश-विकास ह्यांनी बाबांचे समर्थपणे पुढे चालवलेले कार्य, बाबांचे भारत-जोडो अभियान, मेधा पाटकर आणि नर्मदा बचाव आंदोलन वगैरे वगैरे आणि त्या अनुषंगाने येणारी माहिती देखिल ह्या आत्मकथनात वाचायला मिळेल. तसेच बाबांची नियमित आजारपणं,त्यावेळची झालेली साधनाताईंची धावपळ आणि मनाची घालमेल, त्यातून बाबांचे सही सलामत वाचणे हे सगळे वाचताना आपणही नकळतपणे त्यात सामील होतो.
प्रत्येक कर्तबगार माणसाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. त्यात किंचित बदल करून मी म्हणेन की "प्रत्येक कर्तबगार माणसाच्या मागे एक ’कर्तबगार’ स्त्री असते. अशा कर्तबगार स्त्रीच्या पाठिंब्याशिवाय कोणताही पुरुष उच्चपदी पोचू शकणार नाही हे मात्र नक्की.
बाबा आमटे ह्यांचे आजवरचे लोकोत्तर समाजकार्य तर जगजाहीर आहेच. ह्या कार्यात तितकीच समर्थपणे साथ देणार्या साधनाताईंची ही सगळी कहाणी साहजिकच बाबांच्या भोवतीच गुंफलेली आहे. बुद्धिमान आणि कर्तबगार पती असलेल्या पत्नींच्या आत्मचरित्रात पतीकडून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल लिहिलेले आढळेल. त्या तुलनेत हे आत्मचरित्र खूपच वेगळे आहे.
प्रत्येकाने हे आत्मकथन जरूर वाचावे असे मी आवाहन करतो.
५ डिसेंबर, २००७
मी दुर्गा खोटे!
हिंदी-मराठी चित्रपट आणि मराठी नाटकात गाजलेल्या जुन्या पिढीतील एक स्त्री कलाकार म्हणजे श्रीमती दुर्गा खोटे. हे नाव उच्चारताच दुर्गाबाईंचे ते खानदानी रुप डोळ्यासमोर दिसू लागते.
अतिशय लाडाकोडात आणि ऐश्वर्यात वाढलेली लाडांच्या घरातली ही माहेरवाशीण लग्नानंतर खोट्यांच्या घरात गेली. खोट्यांचे घराणेही तितक्याच तोलामोलाचे होते. पण व्यापारात खोट बसून असलेले सगळे वैभव पार धुळीला मिळाले आणि खोटे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. माहेरच्या मदतीमुळे राहाण्याची सोय झाली तरी मानी बानूला(बानू हे दुर्गाबाईंचे माहेरचे घरगुती नाव) बापाच्या जीवावर जगणे अमान्य होते. ऐष आरामात लोळणार्या नवर्याला कमावण्याची अक्कल नव्हती त्यामुळे मग दुर्गाबाईंनाच हातपाय हलवावे लागले. त्यातून पदरात दोन मुलेही होती. ह्या अशा परिस्थितीमुळे आणि निव्वळ योगायोगामुळे दुर्गाबाईंनी तोंडाला रंग फासला आणि एका सुमार चित्रपटात भूमिका केली. पहिलाच अनुभव इतका भयाण होता की घरच्यांनी त्यांना ह्यापुढे चित्रपटात काम करायची बंदी केली. पण पुन्हा एक संधी प्रभातच्या व्ही. शांताराम ह्यांच्याकडून मिळाली आणि मग दुर्गाबाईंच्या वडिलांच्या सर्व वकिली अटी मान्य करून प्रभातने त्यांच्याशी करार केला. इथून मग दुर्गाबाईंनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही.हा सर्व इतिहास खुद्द दुर्गाबाईंच्या तोंडून ऐकण्यात गंमत आहे.
बालगंधर्व हे नाट्य सृष्टीचे चालते बोलते दैवत होते. त्यांच्याबद्दल दुर्गाबाई भरभरून बोलतात. तसेच समकालीन नट,नट्या ह्यांच्याबद्दलच्या आठवणींही त्यांनी शब्दबद्द केलेत.दुर्गाबाईंची दोन लग्ने झाली. त्यासंबंधीही त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्यांची दोन मुले बकुल आणि हरीन ह्यांच्याबद्दलही भरभरून लिहिलेय. त्यांची एक सून विजया हरीन खोटे(पुर्वाश्रमीच्या विजया जयवंत आणि सद्याच्या नामवंत दिग्दर्शिका आणि अभिनेत्री श्रीमती विजया मेहता)ह्यांच्या अनुषंगानेही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.दुर्गाबाईंचे दुसरे पती श्री.रशीद ह्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती देखिल ह्यात आहे.
दुर्गाबाईंनी कधी एकटीने तर कधी सिनेसृष्टीतील शिष्ठमंडळाबरोबर केलेल्या प्रवासाचे साद्यंत वर्णन वाचताना आपण त्यात रंगून जातो.आपली संपूर्ण चित्रपट आणि नाट्य कारकीर्द दुर्गाबाईंनी अतिशय समर्थ शब्दात उभी केलेय. ती त्यांच्याच शब्दात वाचण्यातली मजा काही औरच आहे. एकदा हातात घेतलेले हे पुस्तक पूर्ण वाचून होईस्तो खाली ठेववत नाही ह्यातच त्याचे यश सामावलेले आहे.

२५ सप्टेंबर, २००७
टॉवर्स: एक पुस्तक परिचय!
Towवर्स
Towवर्स(टॉवर्स) ह्या नावाचे पुस्तक हल्लीच वाचनात आले. अग्रलेखांचे स्वयंघोषित बादशहा नीलकंठ खाडिलकर(नवाकाळ चे माजी संपादक) ह्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. नवाकाळचा खप कसा वाढवला,तत्कालीन भांडवलशाही वृत्तपत्रे(मटा,लोकसत्ता वगैरे) ह्यांच्यापेक्षा जास्त खप व्हावा(हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेय) म्हणून काय काय नवे प्रकल्प राबवले,कसे कष्ट उपसले ह्या बद्दलची अतिशय रोमहर्षक कहाणी ह्या पुस्तकात वर्णन केलेली आहे.पुस्तक एकदा हातात घेतले की खाली ठेववत नाही असे प्रभावी आणि प्रवाही लेखन आहे.सत्याची कास धरूनही पत्रकाराला केवळ यशस्वीच नव्हे तर दैदिप्यमान यश कसे प्राप्त करता येते ह्याबद्दलचे आपले जीवंत अनुभव त्यांनी इथे मांडले आहेत.
नीलकंठ खाडिलकर म्हणजे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ह्यांचे नातु . ह्या पुस्तकात नाट्याचार्य खाडिलकर, आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, बालगंधर्व, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, कॉ.जी.एल.रेड्डी, सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, शरद पवार, सत्यसाईबाबा, मोरारजी देसाई इत्यादि मोठ्या लोकांच्या आठवणी आणि मुलाखतींबद्दल सविस्तर वाचता येईल.
तसेच वासंती,जयश्री आणि रोहिणी ह्या (बुद्धिबळातल्या तिघी आंतर्राष्टीय महिला मास्टर्स )नीळूभाऊंच्या मुलींच्या बुद्धिबळ खेळातील कामगिरीबद्दलही वाचायला मिळेल.
Towवर्स: लेखक:नीलकंठ खाडिलकर
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मंदिर; किंमत: ४००रुपये.

२६ मे, २००७
गानयोगी!
पंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या 'गानयोगी' ह्या संपादित चरित्राचा हा एक परिचय करण्याचा प्रयत्न!
ह्या पुस्तकात मूळ कन्नड भाषेतील ' माझी रसयात्रा' ह्या पंडितजींच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद सौ.उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला आहे. ह्यात मजेची गोष्ट अशी आहे की सौ.उमा कुलकर्णीना कन्नड वाचता येत नाही मात्र त्या कानडी समजू शकतात. ह्या कामी त्यांना त्यांचे पती श्री. विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांनी वाचन करून साथ दिली आहे.
श्री पु. ल. देशपांडे, सौ. सुनिता देशपांडे,श्री भिर्डीकर(पंडितजींचे शिष्य),श्री.एम.के.कुलकर्णी यांच्या बरोबरीनेच मन्सूरपुत्र डॉ. राजशेखर ,सुकन्या लक्ष्मीबाई यांच्या लेखनाचा आणि श्री. अशोक वाजपेयी यांच्या कवितांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.
ह्या पुस्तकाचे संपादन श्री. वि.भा.देशपांडे ह्यांनी केलेय.
धारवाड जवळच्या मन्सूर ह्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांची आई नीलम्मा आपल्या गोड आवाजात जात्यावरच्या ओव्या गात असे. हेच त्यांच्यावर झालेले प्राथमिक संगीत संस्कार.त्यांचे मोठे बंधू बसवराज हे कन्नड संगीत नाटकात कामे करत आणि असे करताना त्यांनी खूप नावलौकिक मिळवला होता. त्यांच्याच आधाराने आणि प्रोत्साहनाने छोट्या मल्लिकार्जुनाने संगीत नाटकात कामे करायला सुरवात केली आणि थोड्याच काळात ते एक उत्तम बालगायक म्हणून प्रसिद्धी पावले.पण मल्लिकार्जुनाला त्यात समाधान वाटेना. त्याला गाण्यात प्रगती करायची होती. शेवटी बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावात शिवयोगी स्वामींच्या दर्शनाला गेले असताना छोट्या मल्लिकार्जुनाचे गाणे ऐकून स्वामी आनंदित झाले आणि त्यांनी नीलकंठबुवा आलुरमठ(ग्वाल्हेर घराणे) ह्यांच्याकडे त्याला गाणे शिकवावे म्हणून शिफारस केली. इथेच गाणे शिकता शिकता मन्सूरजी नावारुपाला आले. निरनिराळ्या ठिकाणच्या संगीतसभा गाजवत असतानाच काही नाटकांचे संगीत दिग्दर्शन करण्याची संधीही त्यांना मिळाली आणि त्यांनी ती अतिशय समर्थपणे पार पाडली. ह्यातूनच मग त्यांच्या आवाजात काही रागांच्या ध्वनिमुद्रिका काढण्याची प्रेरणा एचएमव्ही ला मिळाली.
पुढे त्यांची गाठ गान सम्राट अल्लादियांखांशी पडली आणि त्यातूनच मग त्यांचेच चिरंजीव मंजीखां ह्यांचेकडून गंडाबंधन करून घेऊन जयपूर घराण्याची तालीम सुरू झाली. पुढे मंजीखांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू भुर्जीखां ह्यांच्याकडून तालीम मिळाली.
अशाच आणि बऱ्याच चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेले हे चरित्र मुळातूनच वाचल्याशिवाय त्याची महती कळणार नाही.
पुलंनी म्हटलंय " मल्लिकार्जुन मन्सूर हा एक गाण्यात राहणारा माणूस आहे. तसा त्यांचा टपाली पत्ता'मृत्यंजय बंगला,धारवाड' असा आहे. पण अण्णांचे वास्तव्य गाण्यात. सकाळी ते तोडी-आसावरीत राहतात. दुपारी सारंगाच्या छायेत असतात. संध्याकाळी पूरिया-मारव्याच्या ओसरीवर येऊन बसतात आणि रात्री यमन-भूप-बागेश्रीच्या महालात असतात".
हे इतके सांगितले तरी भरपूर आहे. तरीही पंडितजी ही काय चीज आहे हे कळण्यासाठी त्यांचे भरपूर गाणे ऐकले पाहिजे आणि त्यांचे हे संपादित चरित्रही प्रत्येकाने जरूर वाचायला हवेय.
आता आपल्याला हे चरित्र वाचावेसे वाटले तर माझ्या लिहिण्याला काही अर्थ प्राप्त होईल.
गानयोगी
पं.मल्लिकार्जुन मन्सूर
प्रकाशिका: सौ. स्मिता इनामदार
पृथ्वी प्रकाशन,२२,भोसले काँप्लेक्स,
पौड रोड,पुणे: ४११०३८
किंमत:एकशे पंचवीस रुपये

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)