माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२६ मे, २००७

गानयोगी!

पंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या 'गानयोगी' ह्या संपादित चरित्राचा हा एक परिचय करण्याचा प्रयत्न!
ह्या पुस्तकात मूळ कन्नड भाषेतील ' माझी रसयात्रा' ह्या पंडितजींच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद सौ.उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला आहे. ह्यात मजेची गोष्ट अशी आहे की सौ.उमा कुलकर्णीना कन्नड वाचता येत नाही मात्र त्या कानडी समजू शकतात. ह्या कामी त्यांना त्यांचे पती श्री. विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांनी वाचन करून साथ दिली आहे.
श्री पु. ल. देशपांडे, सौ. सुनिता देशपांडे,श्री भिर्डीकर(पंडितजींचे शिष्य),श्री.एम.के.कुलकर्णी यांच्या बरोबरीनेच मन्सूरपुत्र डॉ. राजशेखर ,सुकन्या लक्ष्मीबाई यांच्या लेखनाचा आणि श्री. अशोक वाजपेयी यांच्या कवितांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.
ह्या पुस्तकाचे संपादन श्री. वि.भा.देशपांडे ह्यांनी केलेय.

धारवाड जवळच्या मन्सूर ह्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांची आई नीलम्मा आपल्या गोड आवाजात जात्यावरच्या ओव्या गात असे. हेच त्यांच्यावर झालेले प्राथमिक संगीत संस्कार.त्यांचे मोठे बंधू बसवराज हे कन्नड संगीत नाटकात कामे करत आणि असे करताना त्यांनी खूप नावलौकिक मिळवला होता. त्यांच्याच आधाराने आणि प्रोत्साहनाने छोट्या मल्लिकार्जुनाने संगीत नाटकात कामे करायला सुरवात केली आणि थोड्याच काळात ते एक उत्तम बालगायक म्हणून प्रसिद्धी पावले.पण मल्लिकार्जुनाला त्यात समाधान वाटेना. त्याला गाण्यात प्रगती करायची होती. शेवटी बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावात शिवयोगी स्वामींच्या दर्शनाला गेले असताना छोट्या मल्लिकार्जुनाचे गाणे ऐकून स्वामी आनंदित झाले आणि त्यांनी नीलकंठबुवा आलुरमठ(ग्वाल्हेर घराणे) ह्यांच्याकडे त्याला गाणे शिकवावे म्हणून शिफारस केली. इथेच गाणे शिकता शिकता मन्सूरजी नावारुपाला आले. निरनिराळ्या ठिकाणच्या संगीतसभा गाजवत असतानाच काही नाटकांचे संगीत दिग्दर्शन करण्याची संधीही त्यांना मिळाली आणि त्यांनी ती अतिशय समर्थपणे पार पाडली. ह्यातूनच मग त्यांच्या आवाजात काही रागांच्या ध्वनिमुद्रिका काढण्याची प्रेरणा एचएमव्ही ला मिळाली.
पुढे त्यांची गाठ गान सम्राट अल्लादियांखांशी पडली आणि त्यातूनच मग त्यांचेच चिरंजीव मंजीखां ह्यांचेकडून गंडाबंधन करून घेऊन जयपूर घराण्याची तालीम सुरू झाली. पुढे मंजीखांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू भुर्जीखां ह्यांच्याकडून तालीम मिळाली.
अशाच आणि बऱ्याच चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेले हे चरित्र मुळातूनच वाचल्याशिवाय त्याची महती कळणार नाही.

पुलंनी म्हटलंय " मल्लिकार्जुन मन्सूर हा एक गाण्यात राहणारा माणूस आहे. तसा त्यांचा टपाली पत्ता'मृत्यंजय बंगला,धारवाड' असा आहे. पण अण्णांचे वास्तव्य गाण्यात. सकाळी ते तोडी-आसावरीत राहतात. दुपारी सारंगाच्या छायेत असतात. संध्याकाळी पूरिया-मारव्याच्या ओसरीवर येऊन बसतात आणि रात्री यमन-भूप-बागेश्रीच्या महालात असतात".

हे इतके सांगितले तरी भरपूर आहे. तरीही पंडितजी ही काय चीज आहे हे कळण्यासाठी त्यांचे भरपूर गाणे ऐकले पाहिजे आणि त्यांचे हे संपादित चरित्रही प्रत्येकाने जरूर वाचायला हवेय.

आता आपल्याला हे चरित्र वाचावेसे वाटले तर माझ्या लिहिण्याला काही अर्थ प्राप्त होईल.

गानयोगी
पं.मल्लिकार्जुन मन्सूर
प्रकाशिका: सौ‌. स्मिता इनामदार
पृथ्वी प्रकाशन,२२,भोसले काँप्लेक्स,
पौड रोड,पुणे: ४११०३८
किंमत:एकशे पंचवीस रुपये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: