माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
अहमदाबाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अहमदाबाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१९ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!६

खोलीवर परत आलो.माझी शबनम पिशवी घेतली (जिच्यात आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडतील अशा काही गोष्टी मी नेहमी बाळगत असे. जसे की चश्मा.खरे तर डोळ्य़ात नेत्रस्पर्षी भिंगे असत पण कधी धुळीचा त्रास होऊन ती भिंगे काढावी लागत आणि अशा वेळी चश्मा उपयोगी पडत असे.त्याबरोबरच विजेरी,सुईदोरा,कात्री,चाकू,एक निऑन टेस्टर,काड्यापेटी आणि मेणबत्ती अशी सगळी वेळप्रसंगी उपयोगी पडणारी सामग्री माझ्या ह्या शबनम पिशवीत असे) आणि पुन्हा रस्त्यावर आलो.समोरच कालूपूर बसडेपो होता तिथे गेलो.डेपोमध्ये भरपूर बस होत्या पण चालक-वाहकांचा कुठेही पत्ता नव्हता. ह्याचा अर्थ बस चालणार नव्हत्या हे नक्की झाले.मग आता काय करायचे. तिथून पुन्हा स्टेशनवर आलो.तिथेही बरेच लोक रिक्षा,टॅक्सी नसल्यामुळे ताटकळत बसल्याचे दिसले.म्हणजे एकूण सर्व वाहतूक व्यवस्था बंद होती हेही नक्की झाले.

मी आपले एका पोलिसाला विचारले की सॅटेलाईटला मला जायचे आहे तर कसे जाता येईल? त्याने एकदा मला आपादमस्तक न्याहाळले आणि म्हणाला, "तमे अंया नवा छो केम?तमने खबर नथी के आजे बंद छे?"
मी म्हटले, " एम तो हूं मुंबईना छूं अने अंया सरकारी काम माटे आवेला छूं! मने खबर तो छे के आजे बंद छे पण मारे जाऊज जोईये केमके हूं ड्युटी उपर छूं आने मारी हाजरी बहू जरूरी छे!"
मुंबईचा आणि त्यातून सरकारी माणूस म्हटल्यावर त्याचा आवाज जरा सौम्य झाला.पण तरीही "सॅटेलाईट अंयाथी बहू दूर छे. तमे कोई पण वाहन वगर त्यां नथी जई शकाय" असे त्याने ठासून सांगितले.
मग दूसरा काही मार्ग असल्यास सांग असे म्हटल्यावर त्याने मला सांगितले की "तमे काई पण करीने (म्हणजे पायीच की) लाल दरवाजा(एका विभागाचे नाव) पोचशो तो कदाच त्यांथी तमने एसटी मळशे. एनी पण गेरंटी नथी. पण मारी वात सांबळो, आजे माहोल बहू खराब छे. होई शके तो तमे अंयाच रेवो".
त्याचा सल्ला ऐकून माझा सगळाच उत्साह मावळला. तरीही बघूया तरी तो लाल दरवाजा किती दूर आहे ते. नाहीतरी इथे बसून वेळ कसा जाणार म्हणून मी त्या पोलिसाचा निरोप घेऊन पुन्हा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो.

रस्त्यावर आलो तेव्हा अतिशय तुरळक अशी वर्दळ दिसत होती. एखाद दूसरा माणूस आपल्याच नादात स्टेशनच्या दिशेने जाणारा दिसत होता. अशाच एकाला मी लाल दरवाजा इथून किती दूर आहे असे विचारल्यावर "बहू दूर छे" इतकेच उत्तर देऊन चटकन पसार झाला. आता विचारायचे तरी कोणाला? जाऊ दे! पाय नेतील तिथे जाऊ. कदाचित त्यातच सापडेल. लाल दरवाजा दिवसा उजेडी सापडायला काय हरकत आहे असा विनोदी विचारही माझ्या मनात आला. लांबूनच त्याचा लाल रंग दिसेलच की. उगीच कशाला कुणाला भाव द्या असा विचार करून मी चालायला लागलो.

माझ्या एकूण विक्षिप्त दिसण्यामुळे आणि दिशाहीन भरकटण्यामुळे नाही म्हटले तरी मी रस्त्यातल्या लोकांच्या डोळ्यात चांगलाच खूपत असलो पाहिजे असे मला जाणवले. कारण माझ्याकडे ते अगदी टक लावून बघत असायचे. माझी आणि त्यांची नजरानजर झाली की नजर चोरायचे पण मग पुन्हा हळूच वळून बघायचा प्रयत्न करायचे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मलाही त्यात गंमत वाटू लागली. अर्थात त्यांच्या नजरेचा अर्थ काय असावा हे मला माहित नव्हते पण आपल्याकडे कुणीतरी बघतंय म्हणजे आपण कुणीतरी खास आहोत असे मला उगीचच वाटायला लागले.ह्या भरात मी कितीतरी अंतर पार केले होते. आता उन चढायला लागले होते आणि चालून चालून थकायला झाले होते. कुठे तरी चहा-पाणी मिळाले तर बरे होईल असे मनात म्हणत होतो पण सगळी दुकाने बंद दिसत होती. नाईलाज म्हणून चालतच होतो. कुठे जात होतो ते माहित नव्हते पण जायचे कुठे ते मात्र पक्के डोक्यात होते.

तास दोन तासांची पायपीट झाली होती. मी पार थकलो होतो.कोरड्या हवेमुळे घाम येत नव्हता पण आता अंग भाजायला लागले होते आणि पिण्याचे पाणी कुठे मिळेल असेही वाटत नव्हते.सुदैवाने तिथे एक छोटीशी बाग दिसली तीही जवळपास रिकामी होती. काही घर नसलेली माणसे,भिकारी वगैरे कुठे कुठे बाकांवर झोपलेले दिसत होते. मी बागेत हळूच प्रवेश केला आणि एकदा सभोवार नजर टाकली. मला हवी असलेली गोष्ट एका कोपर्‍यात दिसली आणि मी खूश झालो.पाण्याचा नळ दिसत होता आणि चक्क त्या नळातून थेंब थेंब पाणी ठिबकत होते. आधी जाऊन हातपाय धुतले आणि आधाशासारखा पाणी प्यायलो. तेवढ्यानेही खूप बरं वाटलं. मग एका झाडाच्या सावलीत जाऊन निवांतपणे बसलो.पाचदहा मिनिटे अशीच गेली आणि माझ्या लक्षात आले की मी इथे आल्यापासनं माझ्यावर बरेच डोळे खिळलेले आहेत ह्या गोष्टीची जाणीव झाली. जेव्हा त्यातल्याच काहींशी माझी नजरानजर झाली तेव्हा का कुणास ठाऊक मला किंचित भिती वाटली. इथे आपण सुरक्षित नाही असेही वाटले आणि इथे थांबण्यात काहीही अर्थ नाही असे माझ्या मनाने ठरवले. मी तसाच उठून झपाझप चालत त्या बागेच्या बाहेर आलो आणि जणू काही फार मोठ्या संकटातून सुटलो असे समजून एक दीर्घ सुस्कारा सोडला.

आता मी कुठे येऊन पोचलोय?इथून लाल दरवाजा अजून किती दूर आहे आणि रेल्वे स्टेशन किती मागे राहिले ? ह्या कशाचाच पत्ता लागेना. मुंबई शहर कसे लांबलचक आहे. रेल्वेने केलेले दोन भाग; एक पुर्व आणि पश्चिम. बहुतेक रस्ते हे समांतर असल्यामुळे कोणत्याही रस्त्याने गेलात तरी फारशी चुकामुक होत नाही . तर त्याच्या उलट हे शहर. गोल गोल फिरवणारे. थोडासा कोन चुकला की पार भलत्याच दिशेला पोचवणारा रस्ता. अशा अवस्थेतही मी चालतच होतो आणि अचानक एका खूप मोठ्या चौरस्त्यावर मी येऊन पोचलो. आता आली का पंचाईत! कोणत्या रस्त्याने जायचे? आता कुणाला तरी विचारायला हवे हे नक्की. मग तिथूनच जाणार्‍या एकाला मी लाल दरवाजा कुठे आहे म्हणून मी विचारले तर अतिशय विचित्र नजरेने त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो चक्क पळत सुटला.मला कळेचना! हा काय प्रकार आहे? पण कोण सांगणार? होतंच कोण त्याचे स्पष्टीकरण द्यायला!

पुन्हा पायपीट सुरु झाली आणि मी त्या चौरस्त्यातला एक रस्ता पकडला आणि चालू लागलो.चालता चालता तोंडातून चक्क गाणे फुटायला लागले "एकटेच येणे येथे,एकटेच जाणे। एकट्याच जीवाचे हे,एकटेच गाणे॥"
माझ्या नादात चालत असतानाच मला अचानक जाणवले की मी हमरस्ता सोडून एका वेगळ्याच रस्त्याला लागलोय.ह्या रस्याच्या दोन्ही बाजूला बरीच गर्दी आहे. बरेच लोक बंद दुकानांच्या पायर्‍यांवर बसून आपापसात काही तरी कुजबुजत आहेत.आपोआप माझे गाणे बंद पडले आणि मला वस्तुस्थितीची कल्पना आली.मी चक्क मुसलमानांच्या मोहल्ल्यात शिरलो होतो. बाहेरचा असा मी त्या रस्त्यावरून एकटाच आपल्या नादात चाललो होतो.तो रस्ता कुठे जाणार आहे हे मला माहित नव्हते आणि इतकी सगळी लोकं आजूबाजूला असतानाही त्यांना विचारण्याची हिंमत होत नव्हती. खरे तर मी मनातून टरकलोच होतो.अगदी आयता बकरा चालून आलाय असेच त्या सगळ्यांच्या मनात असावे असेही क्षणभर वाटून गेले.पण माझी बोकड दाढी आहे ना! ती बघून कदाचित ते मला त्यांच्यातलाच समजतीलही. अरे पण ते लोक फक्त दाढीच ठेवतात. मिशी कापलेली असते आणि माझी तर मिशी चांगली वाढलेली आहे.आता आपले काही खरे नाही. पिशवीत चाकू,कात्री आहे .अशा वातावरणात ही सामान्य शस्त्रे देखिल आपल्याबद्दल संशय निर्माण करू शकतील.तेव्हा चल हो मरणाला तयार! असे उलटसुलट विचार मनात येत होते पण मी त्याची प्रतिक्रिया चेहर्‍यावर दिसणार नाही असा आटोकाट प्रयत्न करत नाकासमोर चालत राहिलो.

रस्ता खूपच लांब होता. कुठेही वळलेला दिसत नव्हता की पुढे संपतोय असेही दिसत नव्हते. अजून असे किती चालायचे? माहित नव्हते.फक्त चालत राहाणे माझ्या हातात होते. चांगला मैलभर चाललो आणि शेवटी तो रस्ता संपलाय असे दिसले. आता आली की पंचाईत? इतका वेळ मला कुणी काही केले नाही. आता पुन्हा त्याच रस्त्याने त्यांच्या समोरून परत जायचे. त्यांच्या नजरा झेलत,चुकवत जायचे म्हणजे आपले काही खरे नाही आज!"ते खरे आहे रे! पण असे हातपाय गाळून काही होणार आहे काय? आल्या प्रसंगाला तोंड द्यायलाच हवे. तुलाच खाज होती ना पायी जाण्याची मग भोग आपल्या कर्माची फळे." एक मन दुसर्‍या मनाला सांगत होते.पण दूसरे मन बजावत होते "सदैव सैनिका पुढेच जायचे,न मागुती तुवा कधी फिरायचे॥" मग काय? चला.तुका म्हणे "उगी रहावे,जे जे होईल ते ते पहावे॥
अशा प्रसंगी मी कितीही घाबरलेला असलो तरी कसे कुणास ठाऊक पण अचानक धैर्य गोळा होते असा माझा नेहमीचा अनुभव आहे.म्हणजे माझ्यातच एक घाबरट आणि एक धैर्यधर अशी दोन व्यक्तिमत्व वास करून आहेत असे म्हणता येईल. मी पुन्हा हिंमतवाला होतो आणि संकटाशी मुकाबला करायला तयार होतो. इथेही तसेच झाले. एका दृढ निश्चयाने मी त्या रस्त्यावरून पुन्हा त्या सर्व मियां लोकांच्या नजरा झेलत झेलत त्या मोठ्या चौरस्त्यापर्यंत आलो.मात्र एक गोष्ट नक्की की त्या लोकांपैकी कुणीही मला अडवण्याचा अथवा मी कोण आहे,इथे कशाला आलोय वगैरे चौकशी करण्यासाठी थांबवण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलेला नव्हता. माझा मीच घाबरलो होतो आणि माझा मीच तिथून सुखरूप बाहेर आलो होतो. म्हणजे हा सगळा माझ्याच मनाचा खेळ होता. माझ्या एकूण अवतारावरून मी एखादा अवलिया असावा अथवा वाट चुकलेला वाटसरू असावा असेही त्यांना वाटले असेल. खरे काय ते कुणाला ठाऊक? पण त्या तशा परिस्थितीतून मी सहीसलामत बाहेर आलो होतो हे नक्की.

मी मोठ्या रस्त्याला लागलो आणि अचानक मला एक पोलिसांची गाडी दिसली.त्या पहिल्या पोलिसाला विचारल्यावर रस्त्यात ठिकठिकाणी दिसणार्‍या पोलिसांना मी उगाचच विचारत बसलो नव्हतो; पण आता मी जास्त विचार न करता त्या गाडीला हात दाखवला. ती गाडी माझ्याजवळ येऊन थांबली.त्या गाडीत इतर पोलिसांबरोबर एक इन्स्पेक्टरही होता.मी सद्या कुठे आहे आणि इथून लाल दरवाजा किती दूर आहे?असे विचारताच.. माझ्याकडे आश्चर्याने बघत तो इन्स्पेक्टर बोलला ते ऐकून मी हैराण झालो.
"लाल दरवाजा तर विरुद्ध दिशेला राहिलाय" !म्हणजे आत्तापर्यंत माझी जी काही पायपीट झाली होती ती सर्व दर्यापूर,खानपूर,शाहपूर वगैरे मुसलमान बहुल भागांतूनच झालेली होती हेही कळले आणि इतका वेळ अशा भागांतून फिरल्यानंतरही मला काहीच त्रास झाला नव्हता हे माझ्याकडून ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात मला अविश्वासाची भावना जाणवली.पण त्याच वेळी मी किती नशीबवान आहे हे देखिल त्यांनी बोलून दाखवले. माझ्या बोलण्यावरून त्यांच्या केव्हाच लक्षात आलेले होते की मी इथला स्थानिक नागरिक नाहीये म्हणून मग त्यांनी माझी कसून चौकशी केली. मी कोण,कुठला,कशासाठी इथे आलोय?
पोलिसांना समजेल अशा भाषेत मी माझी ओळख करून दिली,माझे ओळखपत्र दाखवले आणि मला कसेही करून सॅटेलाईटला पोचवा अशी विनंती केली.ओळखपत्रावरचा अशोकस्तंभ बघून लगेच इन्स्पेक्टरने मला त्याच्या बाजूला बसवून घेतले.तिथून त्यांनी मला शहराच्या बाहेर पोचवले.बंदचे आवाहन शहरापुरतेच असल्यामुळे शहराबाहेर सगळे व्यवहार सुरळितपणे सुरु होते. इथे पोलिसांनी मला एका रिक्शात बसवून दिले.मी पोलिसांचे आभार मानले आणि रिक्षा सॅटेलाईटकडे दौडू लागली.
मी घड्याळात पाहिले तो दूपारचा एक वाजला होता.म्हणजे सकाळी ८ वाजता सुरु झालेली माझी पायपीट जवळ जवळ ५ तास सुरु होती तर.
आणि.. कितीतरी तासांनी मी मोकळा श्वास घेतला.

समाप्त!

१७ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!५

आम्ही मागवलेले मनुष्यबळ आले आणि काम अधिक जोरात आणि व्यवस्थितपणे सुरु झाले. माझ्या बरोबर काम करण्यासाठी पदू आला त्यामुळे मी एकदम निश्चिंत्त झालो होतो. पदू ज्ञानाच्या आणि कामाच्या बाबतीत 'बाप माणूस' होता. मी बरेचसे काम त्याच्याकडूनच शिकलो होतो. त्यामुळे आता तो माझा बॉस झाला होता आणि साहजिकच माझ्यावरचे दडपण खूपच कमी झालेले होते. मुंबईला एक चक्कर टाकावी असे मनात होते आणि आता पदूच्या आगमनामुळे ते शक्य होणार होते म्हणून मी वरिष्ठांकडे चार दिवस मुंबईला जाण्याची परवानगी मागितली आणि ती त्यांनी कोणतीही खळखळ न करता दिली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी लगेच मुंबई गाठली.

मुंबईत चार दिवस राहून मी पुन्हा अहमदाबादला आलो तेव्हा मला कळले की सॅटेलाईटच्या सगळ्या गेस्टरूम भरलेल्या असल्यामुळे निदान एक आठवडा तरी मला कुठे तरी बाहेर राहावे लागणार होते आणि त्याप्रमाणे माझ्या राहण्याची व्यवस्था अहमदाबाद स्टेशनच्या जवळ असणार्‍या कालूपूर भागातील वेड्यांच्या इस्पितळाशेजारी(मेंटल हॉस्पिटल.. इथे नुसते 'मेंटल' म्हणूनच प्रसिद्ध होते) असणार्‍या सरकारी विश्रामगृहात करण्यात आली होती. इथून सॅटेलाईटला जायचे म्हणजे खूपच वेळ लागत असे. बसने जवळ जवळ १७-१८ किमि चा प्रवास करावा लागायचा.पण त्यातही एक गंमत होती. जायला यायला बराच वेळ लागत असल्यामुळे मला फक्त दिवसपाळी करावी लागायची आणि त्यामुळे संध्याकाळ मोकळीच मिळायची. मग रात्रीचे जेवण अगदी मनपसंत असे मिळत असे. तसेच आजूबाजूचा परिसर बघण्याची संधी आणि तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्याची संधीही मिळाली.

संध्याकाळी शहरात परत आलो की मी आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी पायीच फिरत असे. पण असे करताना कैक वेळेला रस्ता चूकल्यामुळे माझ्या वसतीस्थानाकडे कसे पोहोचायचे हे कळत नसे. मग सरकारी विश्रामगृह कुठे असे एखाद्या स्थानिक माणसाला विचारले की तो बावचळत असे. इथे असे काही आहे हे स्थानिकांना माहितच नसायचे. मग नुसते 'मेंटल' म्हटले तरी चालायचे. पण असे म्हटल्याने समोरचा माणूस माझ्याकडे विचित्र नजरेने पाही आणि काहीच उत्तर न देता निघून जाई. आधी मला त्याचे कारण कळले नाही. पण मग उशीराने ट्युब पेटली. अरेच्चा! खरेच की! रात्री-बेरात्री मेंटल हॉस्पिटलचा पत्ता विचारणार्‍या माणसाकडे लोक असेच बघणार की! त्यातून माझा एकूण अवतारच एखाद्या विक्षिप्तासारखा असायचा. त्यामुळे काहीजण मला टाळत पण एखाददुसरा सज्जन भेटायचाच की जो व्यवस्थित मार्गदर्शन करायचा आणि मी सुखरुप आपल्या विश्रामगृहावर पोहोचायचो.

असाच एक दिवस मी माझे काम संपवून शहरात आलो आणि कळले की शहरात कुठे तरी दोन जमातीत वादावादी झाली आणि त्याचे पर्यवसान मारामारीत होऊन त्यात दोन जण ठार झालेत. त्यामुळे दुसर्‍या दिवशी अहमदाबाद बंदचे आवाहन केले गेलेय आणि त्यात बस,टॅक्सी,रिक्शा वगैरेसकट सगळी वाहने बंद राहतील. आता सॅटेलाईटला कसे जायचे हा प्रश्न माझ्या पुढे पडला होता.पण विचार करायला संपूर्ण रात्र हाताशी होती तेव्हा 'बघू उद्या सकाळी' असा विचार करून मी निवांतपणे जेवून झोपलो.

दुसर्‍या दिवशी उठलो. सगळी आन्हिके उरकली. कपडे चढवले आणि चहा पिण्यासाठी बाहेर पडलो. बाहेर सगळा थंडा कारभार होता. रस्ते सुनसान होते . दुकाने बंद होती. अहमदाबाद स्टेशन जवळच असल्यामुळे मी तिथे जाऊन चहा प्यायला. वर्तमानपत्र घेतले. त्यातील ठळक बातम्या वाचल्या आणि लक्षात आले की मामला गंभीर आहे. आज शहरातली सगळी वाहतूक बंद असल्यामुळे मला स्वतःला खोलीतच कोंडून घ्यावे लागणार होते.पण तिथे दिवसभर एकटाच भूतासारखा बसून काय करणार? पायी जावे काय? छे! ते तर शक्यच नव्हते आणि त्यातून मला रस्तेही नीट माहित नव्हते. मग काय करायचे?

१ नोव्हेंबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!४

त्या दिवशीच्या अनुभवामुळे मी वेळप्रसंगी स्वसंरक्षणासाठी हातात एखादी काठी असावी म्हणून खास शोधून एक बर्‍यापैकी काठी बरोबर बाळगू लागलो.माझ्या त्या ’हातात काठी’ घेऊन जाण्याचेही अप्रुप काही जणांना वाटले पण मी कुणालाच त्याचा खुलासा देत बसलो नाही.

त्या प्रसंगानंतर साधारण दोनतीन दिवसांनी रात्रीचे जेवण करण्यासाठी गेस्ट-हाऊसवर परतलो तेव्हा संध्याकाळचे सव्वासात वाजले असावेत.त्या दिवशीही जेवण मस्त होते.बाहेर थंडी पडायला सुरुवात झालेली आणि इथे गरम गरम फुलके पानात पडत होते. त्याच्याबरोबर तोंडी लावायला मस्त रस्सा भाजी असल्यामुळे मी अगदी रंगात येऊन जेवत होतो.चांगले मनसोक्त जेवून मग पुन्हा कामगिरीसाठी त्या महाकाय तबकडीकडे रमत-गमत जायला निघालो.

आज चंद्र चांगला हातभर वर आलेला दिसत होता. बहुदा पौर्णिमेच्या मागचा-पुढचा कोणता तरी दिवस(रात्र) असावा.मी माझ्याच तंद्रीत मार्गाला लगलो. आज माझ्यात भीमसेन संचारले होते. त्यांच्या गाण्यातल्या एकेक खास जागा मी आपल्या नरड्यातून काढण्याच्या प्रयत्नात होतो. भीमसेन आणि वसंतराव हे माझे खास आवडीचे आणि आत्मसात करण्याचे विषय आहेत. त्यांची गाणी लागली की त्यांच्यामागून मी देखिल तसेच्या तसे गायचा प्रयत्न करतो आणि बरेच वेळा चक्क जमून पण जाते. तर त्या दिवशी असाच "इंद्रायणी काठी,देवाची आळंदी। लागली समाधी,ज्ञानेशाची॥" हा अभंग गात गात निघालो.

पहिलीच तान घेताना जाणवले की आज आवाज अगदी मस्त लागलाय. आज ह्या ठिकाणी भीमण्णा असते तर नक्कीच "वा!" अशी सहज दाद मिळाली असती अशी खणखणीत तान माझ्या गळ्यातून (आता इथे नरडे म्हणणे शोभणार नाही)निघाली तेव्हाच लक्षात आले की आजचा दिवस काही वेगळाच आहे. इतकी स्वच्छ-सुंदर तान आजपर्यंत माझ्या गळ्यातून ह्यापूर्वी आलेली मलाही आठवेना.धृवपदही मस्तच जमले.त्यानंतरची दोन्ही कडवीही रंगली. वा! क्या बात है! मी आज स्वत:च स्वत:च्या गाण्यावर खुश होतो.

शेवटच्या कडव्याला पोचेपर्यंत मी महाकाय तबकडीच्या आसपास पोचलो देखिल.पण पायर्‍या चढण्या आधी चढ्या आवाजात सुरु केले "इंदायणी काऽऽऽऽठी,इंद्राऽऽयणी काऽऽठी. विठ्ठऽऽऽलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ मायऽऽऽबाऽऽऽऽऽऽऽऽऽपा, आऽऽऽऽऽऽऽ वगैरे करत पुन्हा खालच्या षड्जावर येईपर्यंत..... माझी बोलतीच बंद झाली.पायर्‍या चढण्यासाठी उचललेले पाऊल तसेच अधांतरी अवस्थेत,आवाज बंद,श्वास द्रूतगतीने चाललेला आणि नजर एका जागी खिळलेली!
त्या अलौकिक अवस्थेत काही क्षण गेले आणि मग वस्तुस्थितीची जाणीव झाली तेव्हा कळले की माझ्या नजरेसमोर अगदी ५-फुटांवर एक "नागराज" आपला भला थोरला फणा काढून अतिशय स्तब्धपणे बसलेले दिसले.

त्याची नजर आणि माझी नजर एकमेकांना भिडली आणि माझ्या अंगातून भितीची एक लहर उठली. मी तर मंत्रमुग्ध झाल्यासारखा,अगदी भारल्या सारखा तसाच उभा होतो.पुढे काय होणार हे माहित नव्हते.पुढे पाऊल टाकणे शक्यच नव्हते पण मागे पळण्याचाही विचार मनात डोकावत नव्हता. हातात जरी काठी होती तरी तिचा वापर करण्याची हिंमत होत नव्हती. काही क्षण तसेच त्या भारलेल्या अवस्थेत गेले आणि अचानक नागाने फणा खाली करून हळूहळू तो शांतपणे बाजूच्या बिळात दिसेनासा झाला.तो गेल्यावरही काही मिनिटे मी तसाच निश्चल उभा होतो.

वास्तवाचे पूर्ण भान आल्यावरही पुढे पाऊल टाकायची हिंमत होत नव्हती पण वर जाणे भाग होते कारण अजून एकाला वेळेवर जेवायला पाठवायचे होते. मी आजूबाजूचा कानोसा घेतला आणि मनाचा निर्धार करून पायर्‍यांना वळसा घालून जरा लांबून वर चढलो आणि धूम पळालो. आत दालनात पोचताच माझ्या सहकार्‍यांना झाला प्रकार सांगितला आणि त्यांचीही पांचावर धारण बसली.ज्याला जेवायला जायचे होते त्याने जेवण रद्द केले आणि पाणी पिऊनच भूक भागवली.

दुसर्‍या दिवशी मी ती गोष्ट आमच्या वरिष्ठांना सांगितली. त्यांनी ती तिथल्या सुरक्षा अधिकार्‍यांना कळवली. मग त्या लोकांनी ते बीळ आणि आजूबाजूला शोधून असलेली काही अन्य बीळे पक्की बुजवून टाकली आणि त्या ठिकाणी रात्रीचा पहारा लावला.त्यानंतरच आम्ही तिथे रात्री-बेरात्री निशं:क पणे वावरू लागलो.

३० ऑक्टोबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!३

त्या दिवशी मी माझे काम आटोपून पुन्हा गेस्ट-हाऊसकडे यायला निघालो तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते.आज जेवणही मनासारखे झाल्यामुळे आम्ही सगळेच खुशीत होतो. बरोबरीच्या त्या दोघांना व्यवस्थित सूचना देऊन त्यांचा निरोप घेऊन जेव्हा त्या दालनाच्या बाहेर पाऊल टाकले तेव्हाच जाणवले की बाहेर थंडगार वारं सुटलं होतं. बाहेरच्या त्या थंडगार हवेने अंगावर एक हलकिशी शिरशिरी आली.त्यावेळी मला आशा भोसले ह्यांनी गायलेले ते मस्त गीत आठवले.

थंडगार ही हवा,त्यात गोड गारवा
अशा सुरम्य संगमी जवळ तू मला हवा
...... यमकाबिमकाची पर्वा अजिबात न करता "हवा" च्या ऐवजी "हवी" असे घातले आणि ते गाणे गुणगुणतच मार्गाला लागलो.

आजूबाजूचा शांत परिसर,त्यात रातकिड्यांचे चाललेले जोशपूर्ण गायन,मधूनच वटवाघळांचा चित्कार आणि घुबडांचा घुत्कार. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गर्द झाडीमुळे आधीच मंद असणारा रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश अजून मंद वाटत होता आणि ह्या अशा वातावरणात मी आपल्याच नादात गाणे गात चाललो होतो. माझे ते चालणे अगदी वा.रा.कांत ह्यांनी लिहिलेल्या वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटते जसा फुला फुलात चाललो ह्या गीताच्या आशयाशी मिळते जुळते होते.गुणगुणणे संपून मी खुल्या आवाजात कधी गायला लागलो ते मलाही कळले नाही इतका मी त्या गाण्याशी एकरूप झालो होतो. त्यावेळी माझे लग्नही झालेले नसल्यामुळे तर ते गीत मी जास्तच समरसून गात होतो असेही असेल. जणू काही माझे गाणे ऐकून एखादी ’वनबाला’ मला आपल्या बाहूत सामावून घ्यायला येणार होती.

ह्या तंद्रीत अर्धा रस्ता कधी पार झाला तेही कळले नाही. गाणंही मनसोक्त आळवून झालं होतं. इतका वेळ मी माझ्याच मस्तीत असल्यामुळे मला आजूबाजूचे भान नव्हते; पण मन जाग्यावर नव्हते तरी डोळे आपले काम करतच होते. तशातच माझ्यापासून साधारण शंभर फुटावर मला काही तरी चमकणारे दिसले आणि माझी तंद्री खाडकन तुटली. "काय असावे बरे?" मी आपल्या मनाशीच म्हणालो. इतक्या वेळ मी अतिशय निर्भय अवस्थेत होतो त्याची जागा किंचित भयाने घेतली.

"भूत तर नसेल? पण भूतांवर माझा विश्वास नाही. जे नाहीच ते इथे तरी कसे असेल? पण समजा असलेच तर? आपला विश्वास नसला म्हणून काय झाले? ते जर भूत असलेच तर आणि त्याने आपल्याला काही केले तर?"

मनातल्या मनात मी हे सगळे बोललो आणि माझ्या शेवट्च्या विचाराने मीच कमालीचा शहारलो. अंगातून एक भीतीची लहर गेली. तोंडाला कोरड पडली. आता करायचे काय? मागेही जाऊ शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही. मदतीसाठी ओरडावे तर आसपास वस्तीही नव्हती आणि माझा आवाजही मला सोडून गेला होता.

ह्या अवस्थेत क्षण-दोन क्षण गेले आणि मी आता पुरता भानावर आलो. अंगातले सगळे धैर्य गोळा केले आणि पाऊल पुढे टाकले. जे होईल ते होवो. अशा विपरीत परिस्थितीत माझे धैर्य अचानक वाढते असा माझा आजवरचा अनुभव होता आणि आताही मी त्याच निश्चयाने पाऊल पुढे टाकले. अतिशय सावध चित्ताने मी एकएक पाऊल पुढे टाकत होतो आणि ते जे काही चमकणारे होते त्याच्यापासून मी आता साधारण पन्नास फुटावर येऊन उभा राहिलो.तिथेच उभे राहून नीट निरीक्षण केले आणि लक्षात आले की हे भूत नाही तर कुठला तरी प्राणी असावा.आपण उगीचच घाबरलो. ते त्या प्राण्याचेच डोळे होते आणि अंधारामुळे खूपच चमकत होते पण अजून तो प्राणी कोणता हे काळोखामुळे समजत नव्हते.


इतका वेळ भीती भूताची होती पण आता एखाद्या हिंस्त्र श्वापदाशी गाठ होती. आता काय करायचे? पुन्हा एक क्षणभर भीतीने मनाचा ताबा घेतला पण लगेच मी भानावर आलो. माझी आई म्हणायची "वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातो, मग वाघ्या च का म्हणू नये?" ते शब्द आठवले आणि पुन्हा मनाचा हिय्या करून पुढे चालायला लागलो. मी इतका पुढे आलो तरी ते डोळे जागचे हलेनात. पण एक झाले आता तो जो कुणी प्राणी होता त्याला मी व्यवस्थितपणे पाहू शकत होतो.

जरा निरीक्षण केल्यावर लक्षात आले की तो 'कोल्हा' असावा. रस्त्याच्या मध्यभागी ही स्वारी बसली होती जीभ बाहेर काढून आपल्या भक्षाच्या शोधात.त्याच्या आजच्या भोजनासाठी खास माझी योजना असावी असा एक विनोदी विचार त्या परिस्थितीतही मला चाटून गेला. आता आम्ही अगदी समोरा-समोर आलो होतो आणि आमच्यामधील अंतर जेमतेम २०-२५ फुटांचे असावे. आता हे महाराज जर असाच रस्ता अडवून बसणार असतील तर माझी तरी शहामत नव्हती त्यांना ओलांडून जाण्याची. मग काय करायचे? मागे हटावे तर तो हल्ला करेल आणि पुढे गेलो तरी तेच. माझ्या हातात काहीच नव्हते आणि आजूबाजूलाही कुठे एखादी झाडाची वाळकी फांदीही दिसेना. त्यामुळे काही वेळ माझी स्थिती बुद्धिबळातील 'ठाणबंद' केलेल्या राजासारखी झाली होती आणि आमच्या दोघांच्या हालचाली बंद असल्यामुळे बुद्धिबळातीलच 'स्टेलमेट' म्हणजे निर्नायकी अवस्था झाली होती. ह्यावर उपाय एक त्याने तरी करायचा होता किंवा मलाच काहीतरी करणे भाग होते.

ह्या अवस्थेत काही क्षण गेल्यावर मग मी खाली वाकून दगड उचलण्याची क्रिया केली(त्या रस्त्यावर असा चटकन हाताला लागावा असा दगडही नव्हता!कमाल आहे! आमच्या मुंबईत हवे तितके दगड मिळतात!) आणि अतिशय त्वेषाने तो दगड(नसलेला)त्याच्यावर भिरकावला. ह्या माझ्या अनपेक्षित खेळीने (बुद्धिबळातही मी कैक वेळेला अशा अनपेक्षित चाली करून प्रतिस्पर्ध्याला चकित करत असे)मात्र तो चांगलाच चक्रावला आणि बाजूच्या झाडीत धूम पळाला. तो जरी झाडीत पळाला होता तरी झाडीत उठलेल्या तरंगांवरून तो जास्त लांब गेला नसावा असे माझ्या लक्षात आले म्हणून मी चालत चालत तो आधी ज्या जागेवर बसला होता तिथे पोचलो आणि तो पळालेल्या दिशेला तोंड करुन उभा राहिलो. आताही त्याचे ते चमकणारे डोळे मलाच शोधत आहेत हे दिसत होते. पुन्हा अंगावर एक सरसरून शहारा आला. मग मी पुन्हा दगड उचल आणि भिरकावण्याची क्रिया केली आणि ह्यावेळी मात्र तो पार धूम पळाला. काही क्षण मी तिथेच उभा राहून खात्री केली की हे महाशय पुन्हा येत तर नाहीत ना! पूर्ण खात्री झाल्यावर मात्र एक क्षणही न दवडता झपाझप पाय उचलत गेस्ट-हाऊसकडे रवाना झालो.

२६ ऑक्टोबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!२

पहिला दिवस निव्वळ श्रमपरिहारार्थ गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी प्रोफेसर साहेबांनी आमच्या सगळ्यांचे बौद्धिक घेऊन कामाची रूपरेषा समजावून दिली.त्यानंतर यंत्रसामुग्रीची जुळवाजुळव, उभारणी, तपासणी आणि ती कार्यान्वित करण्याची जबाबदारी आमचे मुंबईचे साहेब आणि मी ह्या दोघांवर टाकली गेली. बाकीचे दोघे लागेल ती शारिरिक मदत करण्यासाठी होते.सर्वप्रथम आम्हाला जिथे प्रत्यक्ष काम करायचे होते ती जागा पाहिली.तिथे ज्या गोष्टींची कमी जाणवली(इलेक्ट्रिक पॉईंट्स,टेबल-खुर्च्या वगैरे)त्यांची यादी बनवून ती संबंधित व्यक्तीकडे सोपवून त्वरीत अंमल बजावणी करून घेतली.काय गंमत आहे पाहा. एरवी सहजासहजी न हलणारे हे सरकारी कर्मचारी(आम्हीही सरकारीच होतो म्हणा)आम्ही म्हणू ते काम अतिशय तातडीने पार पाडत होते. त्यामुळे त्या संध्याकाळपर्यंत आमचे जोडणी, उभारणी आणि तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले.आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची खोटी होती.

ह्या सर्व यंत्र उभारणीत माझाच सहभाग जास्त होता आणि ते स्वाभाविकही होते. साहेब म्हणून ते मोठे दोघे फक्त खुर्चीवर बसून सुचना देण्याचे काम करत होते.दुसरे दोघे आयुष्यात पहिल्यांदाच ती यंत्र पाहात होते त्यामुळे त्यांच्याकडून हमाली व्यतिरिक्त आणखी कोणतीही अपेक्षा करणे योग्य नव्हते. राहता राहिलो मी.ज्याला कामाची पूर्ण माहिती होती,ते करायची मनापासून तयारी होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी पदाने सर्वात कनिष्ट असल्यामुळे कुणाकडून कोणतीच अपेक्षा करू शकत नव्हतो.तरीही मी अतिशय सहजतेने ते काम पार पाडले. अर्थात त्याबद्दल प्रोफेसर साहेबांनी माझे सगळ्यांसमक्ष तोंड भरून कौतुकही केले.
हा प्रोफेसर मुळचा बंगाली होता.पण वैमानिक दलात नोकरी निमित्त सदैव देशभर फिरलेला होता. तिथून मग तो आमच्या खात्यात आला तो सेवानिवृत्त होईपर्यंत राहिला.माझ्या आडनावावरून तो मला बंगाली समजला. "सो मिश्टोर देब(देव चा खास बंगाली उच्चार..बंगाली लोकात ’देब’हे नाव आणि आडनाव असे दोन्हीही आहे)आय ऍम प्राऊड ऑफ यू! यू हॅव डोन(डन) अ नाईश जॉब!
हे बंगाली इंग्लीश,हिंदी आणि त्यांची बंगाली एकाच पद्धतीने बोलतात. तोंडात गुलाबजाम नाही तर रोशोगुल्ला(रसगुल्ला) ठेऊनच उच्चार केल्यासारखे जिथे तिथे ’ओ’कार लावतात. ’व’ चा ’ब’ करतात. पण तरीही ऐकायला गोड वाटते.

दुसर्‍या दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.आधी वाटले तितके काम कठीण नव्हते पण आता लक्षात आले की काम कठीण नसले तरी ते व्यवस्थित आणि सुरळीत पार पडावे असे वाटत असेल तर अजून काही माणसांची जरूर आहे. मग त्यावर त्या दोन साहेबांच्यात खल झाला. त्यांनी दिल्लीशी संपर्क स्थापून मग अजून काही लोकांची मागणी केली. त्याप्रमाणे मागणी मान्य होऊन दिल्ली आणि मुंबईहून प्रत्येकी अजून ३-३ म्हणजे सहा माणसे येतील असे कळले. अर्थात ती सर्वजण येईपर्यंत तरी आम्हा तिघांनाच ते काम करायचे होते.आमचे हे काम दिवसरात्र चालणारे होते त्यामुळे काम न थांबवता आम्ही तिघे आळीपाळीने ते करत होतो. एकावेळी दोघांनी काम करायचे; त्यावेळी तिसर्‍याने विश्रांती घ्यायची. असे सगळे आलटून पालटून चालत होते. त्यात खरे तर मीच जास्त ताबडला जात होतो कारण ह्या कामाबरोबरच सगळ्या यंत्रसामुग्रीची देखभाल आणि जरूर पडल्यास दुरुस्तीची कामगिरीही माझ्याच शिरावर होती.वर त्यांच्या शंका-कुशंकांचे निराकरण करणेही मलाच निस्तरावे लागत होते.पण खरे सांगू का त्यातही एक वेगळाच आनंद होता आणि मी तो पूर्णपणे उपभोगत होतो.

आमची काम करण्याची जागा गेस्ट हाऊस पासून साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर दूर होती. तिथे पायी चालत जावे लागे.पण त्याचे काही विशेष नव्हते. उलट तसे चालण्यातही एक आनंदच होता. ह्या अर्थस्टेशनचा परिसर कैक एकर दूरवर पसरलेला होता. मध्यभागी गेस्ट हाऊस,कंट्रोल रूम,तसेच इतर कार्यालयांच्या इमारती होत्या.त्याच्या आजूबाजूला खूप छान राखलेली हिरवळ,त्यात थुईथुई नाचणारी पाण्याची कारंजी, मधूनच जाणारे काळेभोर डांबरी रस्ते आणि दूरदूर पर्यंत पसरलेले नैसर्गिक रान होते.ह्या सगळ्या वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य प्रदेशामुळे इथे चित्रपटाची चित्रीकरणे पण होत असतात.सकाळी हा सगळा परिसर गजबजलेला असतो.
तिथूनच थोडे दूर एका बाजूला थोड्याश्या उंचवट्यावर ती महाकाय तबकडी(डिश ऍंटेना) आकाशाकडे ’आ’वासून होती. त्याच तबकडीच्या सावलीत एका दालनात आम्ही काम करत होतो. इथे जागा घेण्यामागे इतरेजनांपासून दूर आणि व्यत्ययाविना काम करता येणे हेच प्रयोजन होते.दिवसा तिथे चूकून माकून कुणी स्थानिक कर्मचारी तबकडीची देखभाल करण्याच्या निमित्ताने असायचा पण संध्याकाळ झाल्यावर मात्र एक भयाण शांतता तिथे नांदायला लागायची.अवघ्या वातावरणात एक प्रचंड गुढ भरलेले असायचे.

२३ ऑक्टोबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!१

आता मला नेमके साल आठवत नाहीये पण १९८०-८५ च्या दरम्यानची ही गोष्ट असावी. . मुंबईहून मी,माझे दोन वरिष्ठ (निव्वळ पदाने)सहकारी आणि एक साहेब असे चौघेजण अहमदाबादला कार्यालयीन कामासाठी गेलो होतो. अहमदाबादच्या उपग्रह भूस्थिर केंद्रात(सॅटेलाईट अर्थ स्टेशन) जाऊन काही खास संशोधन करण्याच्या कामगिरीसाठी आम्ही तिथे जाऊन पोचलो. दिल्लीहून एक मोठा साहेब आमच्या गटाचा प्रमूख म्हणून आला होता. त्या केंद्रात प्रवेश करण्यापासून ते तिथेच राहून काम करण्यासाठी लागणार्‍या सगळ्या परवानग्या त्याने आधीच काढून ठेवलेल्या होत्या. आमच्या राहण्याचाही बंदोबस्त तिथल्याच गेस्ट-हाऊसमध्ये केला होता.

आमचे क्रमांक एकचे साहेब हे प्रोफेसर आणि आम्ही इतर चौघे त्यांचे सहाय्यक आहोत आणि अतिशय महत्वाचे संशोधन करण्यासाठी आमचा तिथे मुक्काम आहे असा समज तिथल्या कर्मचार्‍यांचा करून देण्यात आला होता.मी सोडलो तर इतर चौघे अतिशय व्यवस्थित राहात. रोज गुळगुळीत दाढी,परीटघडीचे कपडे,मितभाषीपणा ह्यामुळे ते तिथल्या साहेब लोकांसारखेच दिसायचे. माझा पोशाख मात्र तसा 'हटके' होता. कमरेला गडद निळ्या रंगाची जीन्स, वर कोणताही भडक रंगाचा टी-शर्ट, डोळ्याला गडद रंगाचा गॉगल्स आणि कपाळावर अस्ताव्यस्त रुळणारे केस. तेव्हा मी नेत्रस्पर्शी भिंगे म्हणजे शुद्ध मराठीत ज्याला 'कॉंटॅक्ट लेन्सेस' म्हणतात ती वापरायचो आणि तिथल्या उन्हाचा, धुळीचा त्रास होऊ नये म्हणून तो गॉगल्स वापरत होतो. त्यावेळी माझ्या हनुवटीखाली असणारी दाढी मी व्यवथित राखून होतो(मला तितकीच दाढी आहे;संपूर्ण गालभर नाही. तशी 'ती दाढी' हीच माझी ओळख झालेय. हल्ली अमिताभने ’कौबक’ मध्ये तशी दाढी वापरायला सुरुवात केल्यापासून लोक मला मी अमिताभची नक्कल करतोय असे म्हणायला लागले.पण खरे तर अमिताभनेच माझी नक्कल केलेय हे लोकांना सांगूनही पटत नाही. असो. एकदा एखाद्याच्या नावाच्या मागे मोठेपण चिकटले की लोक तो करेल तीच फॅशन असे मानतात.)

मी जरी पदाने कनिष्ठ होतो तरी अनुभवाने माझ्या दोघा वरिष्ठ सहकार्‍यांपेक्षा जास्त संपन्न होतो. ते दोघे नुकतेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची डिग्री घेऊन आमच्या कार्यालयात चिकटले होते. प्रत्यक्ष कामाचा असा खास अनुभव नसल्यामुळे अलिखितपणे मीच त्यांचा बॉस झालो होतो. त्यामुळे ते मला 'बॉस' असेच म्हणत.काम करताना आलेली कोणतीही अडचण मी सहज सोडवत असे त्यामुळेही असेल ते मला मानत होते

तसा दिसायला जरी मी काटकुळा होतो तरी एकूण माझे विक्षिप्त दिसणे आणि तिथले गुढ वागणे ह्याचा संमिश्र परिणाम म्हणजे तिथले सगळे मला मी कुणी तरी 'शास्त्रज्ञ' आहे असेच समजायचे. माझे इतर दोघे साथी मला 'बॉस' म्हणत त्याचाही कदाचित तो अदृष्य परिणाम असावा. तसे वाटायला आणखी एक कारण होते. त्या केंद्रातील सर्वसामान्य कर्मचार्‍यांना जिथे प्रवेश वर्जित होता अशा एका अतिशय 'खास' जागेत आमचे हे काम चालत असे.तिथल्या केंद्र संचालकांनी आम्हाला त्या जागेचा ताबा देताना एकही प्रश्न विचारलेला नव्हता कारण त्यांनाही दिल्लीहून तसे आदेश आलेले असावेत. आम्ही तिथे काय करणार आहोत हे देखिल त्यांनी विचारले नव्हते आणि काय करतो आहोत हे पाहायला ते एकदाही तिथे फिरकले नाहीत. फक्त तिथल्या अतिशय महत्वाच्या आणि वरिष्ठ अधिकार्‍याला बोलावून "ह्यांना लागेल ती मदत त्वरीत द्यायची" असा आदेश दिला होता. तिथल्या सुरक्षा अधिकार्‍यांनाही त्याचप्रमाणे आदेश देऊन आम्हा पाच जणांच्या हालचालीवर,कामकाजावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत ह्याची पक्की काळजी घेण्याबद्दल बजावले होते. ह्या सर्व गोष्टींमुळे नकळत आमच्या भोवती असलेले गुढतेचे वलय अधिकच मोठे झाले.

तिथल्या वास्तव्यात आमचे वागणे,आमच्या हालचाली गुढ वाटाव्यात अशाच असत. कॅंटिनमध्ये जेवताना,न्याहारी करताना आम्ही तिघे एकत्रच असायचो पण एकमेकांशी बोलण्याऐवजी जास्ती करून मुद्राभिनय आणि सांकेतिक भाषेत आणि कमीत कमी शब्दात आम्ही आपापसात व्यवहार करायचो. ह्या आमच्या वागण्याचे नाही म्हटले तरी तिथल्या स्थानिक कर्मचार्‍यांना कुतुहल वाटत असायचे आणि ते आमच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे.पण आम्हाला सक्त सूचना होती की इथे आपण आणि आपले काम ह्या व्यतिरिक्त कुणाशी संबंध वाढवायच्या भानगडीत पडायचे नाही. तेव्हा आम्ही निव्वळ हसून वेळ साजरी करायचो.