पहिला दिवस निव्वळ श्रमपरिहारार्थ गेला. दुसर्या दिवशी सकाळी प्रोफेसर साहेबांनी आमच्या सगळ्यांचे बौद्धिक घेऊन कामाची रूपरेषा समजावून दिली.त्यानंतर यंत्रसामुग्रीची जुळवाजुळव, उभारणी, तपासणी आणि ती कार्यान्वित करण्याची जबाबदारी आमचे मुंबईचे साहेब आणि मी ह्या दोघांवर टाकली गेली. बाकीचे दोघे लागेल ती शारिरिक मदत करण्यासाठी होते.सर्वप्रथम आम्हाला जिथे प्रत्यक्ष काम करायचे होते ती जागा पाहिली.तिथे ज्या गोष्टींची कमी जाणवली(इलेक्ट्रिक पॉईंट्स,टेबल-खुर्च्या वगैरे)त्यांची यादी बनवून ती संबंधित व्यक्तीकडे सोपवून त्वरीत अंमल बजावणी करून घेतली.काय गंमत आहे पाहा. एरवी सहजासहजी न हलणारे हे सरकारी कर्मचारी(आम्हीही सरकारीच होतो म्हणा)आम्ही म्हणू ते काम अतिशय तातडीने पार पाडत होते. त्यामुळे त्या संध्याकाळपर्यंत आमचे जोडणी, उभारणी आणि तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले.आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची खोटी होती.
ह्या सर्व यंत्र उभारणीत माझाच सहभाग जास्त होता आणि ते स्वाभाविकही होते. साहेब म्हणून ते मोठे दोघे फक्त खुर्चीवर बसून सुचना देण्याचे काम करत होते.दुसरे दोघे आयुष्यात पहिल्यांदाच ती यंत्र पाहात होते त्यामुळे त्यांच्याकडून हमाली व्यतिरिक्त आणखी कोणतीही अपेक्षा करणे योग्य नव्हते. राहता राहिलो मी.ज्याला कामाची पूर्ण माहिती होती,ते करायची मनापासून तयारी होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी पदाने सर्वात कनिष्ट असल्यामुळे कुणाकडून कोणतीच अपेक्षा करू शकत नव्हतो.तरीही मी अतिशय सहजतेने ते काम पार पाडले. अर्थात त्याबद्दल प्रोफेसर साहेबांनी माझे सगळ्यांसमक्ष तोंड भरून कौतुकही केले.
हा प्रोफेसर मुळचा बंगाली होता.पण वैमानिक दलात नोकरी निमित्त सदैव देशभर फिरलेला होता. तिथून मग तो आमच्या खात्यात आला तो सेवानिवृत्त होईपर्यंत राहिला.माझ्या आडनावावरून तो मला बंगाली समजला. "सो मिश्टोर देब(देव चा खास बंगाली उच्चार..बंगाली लोकात ’देब’हे नाव आणि आडनाव असे दोन्हीही आहे)आय ऍम प्राऊड ऑफ यू! यू हॅव डोन(डन) अ नाईश जॉब!
हे बंगाली इंग्लीश,हिंदी आणि त्यांची बंगाली एकाच पद्धतीने बोलतात. तोंडात गुलाबजाम नाही तर रोशोगुल्ला(रसगुल्ला) ठेऊनच उच्चार केल्यासारखे जिथे तिथे ’ओ’कार लावतात. ’व’ चा ’ब’ करतात. पण तरीही ऐकायला गोड वाटते.
दुसर्या दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.आधी वाटले तितके काम कठीण नव्हते पण आता लक्षात आले की काम कठीण नसले तरी ते व्यवस्थित आणि सुरळीत पार पडावे असे वाटत असेल तर अजून काही माणसांची जरूर आहे. मग त्यावर त्या दोन साहेबांच्यात खल झाला. त्यांनी दिल्लीशी संपर्क स्थापून मग अजून काही लोकांची मागणी केली. त्याप्रमाणे मागणी मान्य होऊन दिल्ली आणि मुंबईहून प्रत्येकी अजून ३-३ म्हणजे सहा माणसे येतील असे कळले. अर्थात ती सर्वजण येईपर्यंत तरी आम्हा तिघांनाच ते काम करायचे होते.आमचे हे काम दिवसरात्र चालणारे होते त्यामुळे काम न थांबवता आम्ही तिघे आळीपाळीने ते करत होतो. एकावेळी दोघांनी काम करायचे; त्यावेळी तिसर्याने विश्रांती घ्यायची. असे सगळे आलटून पालटून चालत होते. त्यात खरे तर मीच जास्त ताबडला जात होतो कारण ह्या कामाबरोबरच सगळ्या यंत्रसामुग्रीची देखभाल आणि जरूर पडल्यास दुरुस्तीची कामगिरीही माझ्याच शिरावर होती.वर त्यांच्या शंका-कुशंकांचे निराकरण करणेही मलाच निस्तरावे लागत होते.पण खरे सांगू का त्यातही एक वेगळाच आनंद होता आणि मी तो पूर्णपणे उपभोगत होतो.
आमची काम करण्याची जागा गेस्ट हाऊस पासून साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर दूर होती. तिथे पायी चालत जावे लागे.पण त्याचे काही विशेष नव्हते. उलट तसे चालण्यातही एक आनंदच होता. ह्या अर्थस्टेशनचा परिसर कैक एकर दूरवर पसरलेला होता. मध्यभागी गेस्ट हाऊस,कंट्रोल रूम,तसेच इतर कार्यालयांच्या इमारती होत्या.त्याच्या आजूबाजूला खूप छान राखलेली हिरवळ,त्यात थुईथुई नाचणारी पाण्याची कारंजी, मधूनच जाणारे काळेभोर डांबरी रस्ते आणि दूरदूर पर्यंत पसरलेले नैसर्गिक रान होते.ह्या सगळ्या वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य प्रदेशामुळे इथे चित्रपटाची चित्रीकरणे पण होत असतात.सकाळी हा सगळा परिसर गजबजलेला असतो.
तिथूनच थोडे दूर एका बाजूला थोड्याश्या उंचवट्यावर ती महाकाय तबकडी(डिश ऍंटेना) आकाशाकडे ’आ’वासून होती. त्याच तबकडीच्या सावलीत एका दालनात आम्ही काम करत होतो. इथे जागा घेण्यामागे इतरेजनांपासून दूर आणि व्यत्ययाविना काम करता येणे हेच प्रयोजन होते.दिवसा तिथे चूकून माकून कुणी स्थानिक कर्मचारी तबकडीची देखभाल करण्याच्या निमित्ताने असायचा पण संध्याकाळ झाल्यावर मात्र एक भयाण शांतता तिथे नांदायला लागायची.अवघ्या वातावरणात एक प्रचंड गुढ भरलेले असायचे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा