माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

११ ऑक्टोबर, २००७

सहज सुचलं म्हणून!

"हे फक्त माझ्याच बाबतीत का घडते?"
असा प्रश्न मला पडत असे; पण आता जेव्हा माझा जनसंपर्क वाढलाय तेव्हा हे लक्षात आले की हे इतर कैक जणांच्या बाबतीतही घडतंय! आपण फक्त स्वतःचाच विचार करतो त्यामुळे सगळ्या जगात आपणच कसे आगळे-वेगळे आहोत असा विचार आपल्याला कधी सुखावतो तर कधी दुखवतो.
उदाहरणच द्यायचे झाल्यास: कल्पना करा की तुम्ही बस थांब्यावर उभे आहात. कित्येक बशी(बस चे मराठी अनेकवचन) तुमच्या समोर येताहेत पण नेमकी तुम्हाला हव्या असणार्‍या क्रमांकाची बस येत नसते. बराच वेळ वाट पाहून तुम्ही थकता आणि शेवटी 'एकदाची' तुमची बस येते. तुम्ही अगदी खुश होऊन त्यात चढण्याची तयारी करता आणि मग लक्षात येते की बसमध्ये पायरीवर उभे राहाण्याची देखिल जागा नाहीये. तुमच्या डोळ्यासमोर बस निघून जाते आणि वरचा प्रश्न स्वतःलाच विचारता!

दुसरे उदाहरणः आज शेयर बाजार चढणार आहे / अमूक अमूक शेयर वाढणार आहे असे ऐकून /वाचून/स्वतः अगदी अभ्यास करून वगैरे तुम्ही काही खरेदी करता. खरोखरच शेयर बाजार अगदी सूज येण्यासारखा वाढतो पण नेमका तुम्ही विकत घेतलेला शेयर खाली खाली जातो. आत्ता वाढेल,मग वाढेल असा विचार करून तुम्ही स्वस्थ राहता(निदान वरवर तरी) आणि त्याची पडझड बघत स्वतःला वरचा प्रश्न विचारता.
कधी बाजार खाली जाणार आहे,हातात असतील ते सगळे विकून टाका असा सल्ला तज्ञ देतात आणि तुम्ही तसे करता. तज्ञांचा सल्ला अचूक निघतो. फक्त तुम्ही विकलेले शेयर्स सोडून. तुमच्या हातातून ते शेयर्स निसटताच वेगाने वरच्या दिशेने धावतात आणि जे हातात असतात ते उलट दिशेने (खालच्या) केव्हाच रसातळाला पोचतात. आता पुन्हा तुम्ही स्वतःलाच वरचा प्रश्न विचारता!

रेल्वे गाडीत कधी नव्हे ती खिडकी जवळची जागा मिळते. गार हवा मिळतेय म्हणून तुम्ही खूश. लगेच पिशवीतून पुस्तक काढून वाचण्याचा घाट घातला जातो. चार-पाच स्टेशने गाडी पुढे जाते आणि अचानक जोराचा पाऊस येतो. खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करता पण ती नेमकी बिघडलेली असते. कशी बशी बंद करता पण तोवर तुम्ही अर्धे अधिक भिजले असता.पुस्तक भिजलेले असते. पाचेक मिनिटात पाऊस थांबतो. आजुबाजुचे लोक खिडकी उघडा म्हणून कोकलतात. पुन्हा खिडकी उघडताना खटपट करावी लागते.पावसाचे येणेजाणे चालुच असते. असेच संपूर्ण प्रवासभर हे उघडझाप प्रकरण चालू असते. खिडकीजवळ जागा मिळाल्याचा आनंद केव्हाच हरपलेला असतो . पुन्हा वरचाच प्रश्न!

मंडळी ह्यालाच म्हणतात सामान्य माणूस . अशा ह्या माणसालाच हे सगळे प्रश्न रोज नव्याने पडत असतात. आपला काय अनुभव आहे ह्या बाबतीत?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: