माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२३ ऑक्टोबर, २००७

मु.पो.अहमदाबाद!१

आता मला नेमके साल आठवत नाहीये पण १९८०-८५ च्या दरम्यानची ही गोष्ट असावी. . मुंबईहून मी,माझे दोन वरिष्ठ (निव्वळ पदाने)सहकारी आणि एक साहेब असे चौघेजण अहमदाबादला कार्यालयीन कामासाठी गेलो होतो. अहमदाबादच्या उपग्रह भूस्थिर केंद्रात(सॅटेलाईट अर्थ स्टेशन) जाऊन काही खास संशोधन करण्याच्या कामगिरीसाठी आम्ही तिथे जाऊन पोचलो. दिल्लीहून एक मोठा साहेब आमच्या गटाचा प्रमूख म्हणून आला होता. त्या केंद्रात प्रवेश करण्यापासून ते तिथेच राहून काम करण्यासाठी लागणार्‍या सगळ्या परवानग्या त्याने आधीच काढून ठेवलेल्या होत्या. आमच्या राहण्याचाही बंदोबस्त तिथल्याच गेस्ट-हाऊसमध्ये केला होता.

आमचे क्रमांक एकचे साहेब हे प्रोफेसर आणि आम्ही इतर चौघे त्यांचे सहाय्यक आहोत आणि अतिशय महत्वाचे संशोधन करण्यासाठी आमचा तिथे मुक्काम आहे असा समज तिथल्या कर्मचार्‍यांचा करून देण्यात आला होता.मी सोडलो तर इतर चौघे अतिशय व्यवस्थित राहात. रोज गुळगुळीत दाढी,परीटघडीचे कपडे,मितभाषीपणा ह्यामुळे ते तिथल्या साहेब लोकांसारखेच दिसायचे. माझा पोशाख मात्र तसा 'हटके' होता. कमरेला गडद निळ्या रंगाची जीन्स, वर कोणताही भडक रंगाचा टी-शर्ट, डोळ्याला गडद रंगाचा गॉगल्स आणि कपाळावर अस्ताव्यस्त रुळणारे केस. तेव्हा मी नेत्रस्पर्शी भिंगे म्हणजे शुद्ध मराठीत ज्याला 'कॉंटॅक्ट लेन्सेस' म्हणतात ती वापरायचो आणि तिथल्या उन्हाचा, धुळीचा त्रास होऊ नये म्हणून तो गॉगल्स वापरत होतो. त्यावेळी माझ्या हनुवटीखाली असणारी दाढी मी व्यवथित राखून होतो(मला तितकीच दाढी आहे;संपूर्ण गालभर नाही. तशी 'ती दाढी' हीच माझी ओळख झालेय. हल्ली अमिताभने ’कौबक’ मध्ये तशी दाढी वापरायला सुरुवात केल्यापासून लोक मला मी अमिताभची नक्कल करतोय असे म्हणायला लागले.पण खरे तर अमिताभनेच माझी नक्कल केलेय हे लोकांना सांगूनही पटत नाही. असो. एकदा एखाद्याच्या नावाच्या मागे मोठेपण चिकटले की लोक तो करेल तीच फॅशन असे मानतात.)

मी जरी पदाने कनिष्ठ होतो तरी अनुभवाने माझ्या दोघा वरिष्ठ सहकार्‍यांपेक्षा जास्त संपन्न होतो. ते दोघे नुकतेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची डिग्री घेऊन आमच्या कार्यालयात चिकटले होते. प्रत्यक्ष कामाचा असा खास अनुभव नसल्यामुळे अलिखितपणे मीच त्यांचा बॉस झालो होतो. त्यामुळे ते मला 'बॉस' असेच म्हणत.काम करताना आलेली कोणतीही अडचण मी सहज सोडवत असे त्यामुळेही असेल ते मला मानत होते

तसा दिसायला जरी मी काटकुळा होतो तरी एकूण माझे विक्षिप्त दिसणे आणि तिथले गुढ वागणे ह्याचा संमिश्र परिणाम म्हणजे तिथले सगळे मला मी कुणी तरी 'शास्त्रज्ञ' आहे असेच समजायचे. माझे इतर दोघे साथी मला 'बॉस' म्हणत त्याचाही कदाचित तो अदृष्य परिणाम असावा. तसे वाटायला आणखी एक कारण होते. त्या केंद्रातील सर्वसामान्य कर्मचार्‍यांना जिथे प्रवेश वर्जित होता अशा एका अतिशय 'खास' जागेत आमचे हे काम चालत असे.तिथल्या केंद्र संचालकांनी आम्हाला त्या जागेचा ताबा देताना एकही प्रश्न विचारलेला नव्हता कारण त्यांनाही दिल्लीहून तसे आदेश आलेले असावेत. आम्ही तिथे काय करणार आहोत हे देखिल त्यांनी विचारले नव्हते आणि काय करतो आहोत हे पाहायला ते एकदाही तिथे फिरकले नाहीत. फक्त तिथल्या अतिशय महत्वाच्या आणि वरिष्ठ अधिकार्‍याला बोलावून "ह्यांना लागेल ती मदत त्वरीत द्यायची" असा आदेश दिला होता. तिथल्या सुरक्षा अधिकार्‍यांनाही त्याचप्रमाणे आदेश देऊन आम्हा पाच जणांच्या हालचालीवर,कामकाजावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत ह्याची पक्की काळजी घेण्याबद्दल बजावले होते. ह्या सर्व गोष्टींमुळे नकळत आमच्या भोवती असलेले गुढतेचे वलय अधिकच मोठे झाले.

तिथल्या वास्तव्यात आमचे वागणे,आमच्या हालचाली गुढ वाटाव्यात अशाच असत. कॅंटिनमध्ये जेवताना,न्याहारी करताना आम्ही तिघे एकत्रच असायचो पण एकमेकांशी बोलण्याऐवजी जास्ती करून मुद्राभिनय आणि सांकेतिक भाषेत आणि कमीत कमी शब्दात आम्ही आपापसात व्यवहार करायचो. ह्या आमच्या वागण्याचे नाही म्हटले तरी तिथल्या स्थानिक कर्मचार्‍यांना कुतुहल वाटत असायचे आणि ते आमच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे.पण आम्हाला सक्त सूचना होती की इथे आपण आणि आपले काम ह्या व्यतिरिक्त कुणाशी संबंध वाढवायच्या भानगडीत पडायचे नाही. तेव्हा आम्ही निव्वळ हसून वेळ साजरी करायचो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: