त्या दिवशी मी माझे काम आटोपून पुन्हा गेस्ट-हाऊसकडे यायला निघालो तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते.आज जेवणही मनासारखे झाल्यामुळे आम्ही सगळेच खुशीत होतो. बरोबरीच्या त्या दोघांना व्यवस्थित सूचना देऊन त्यांचा निरोप घेऊन जेव्हा त्या दालनाच्या बाहेर पाऊल टाकले तेव्हाच जाणवले की बाहेर थंडगार वारं सुटलं होतं. बाहेरच्या त्या थंडगार हवेने अंगावर एक हलकिशी शिरशिरी आली.त्यावेळी मला आशा भोसले ह्यांनी गायलेले ते मस्त गीत आठवले.
थंडगार ही हवा,त्यात गोड गारवा
अशा सुरम्य संगमी जवळ तू मला हवा...... यमकाबिमकाची पर्वा अजिबात न करता "हवा" च्या ऐवजी "हवी" असे घातले आणि ते गाणे गुणगुणतच मार्गाला लागलो.
आजूबाजूचा शांत परिसर,त्यात रातकिड्यांचे चाललेले जोशपूर्ण गायन,मधूनच वटवाघळांचा चित्कार आणि घुबडांचा घुत्कार. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गर्द झाडीमुळे आधीच मंद असणारा रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश अजून मंद वाटत होता आणि ह्या अशा वातावरणात मी आपल्याच नादात गाणे गात चाललो होतो. माझे ते चालणे अगदी वा.रा.कांत ह्यांनी लिहिलेल्या वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटते जसा फुला फुलात चाललो ह्या गीताच्या आशयाशी मिळते जुळते होते.गुणगुणणे संपून मी खुल्या आवाजात कधी गायला लागलो ते मलाही कळले नाही इतका मी त्या गाण्याशी एकरूप झालो होतो. त्यावेळी माझे लग्नही झालेले नसल्यामुळे तर ते गीत मी जास्तच समरसून गात होतो असेही असेल. जणू काही माझे गाणे ऐकून एखादी ’वनबाला’ मला आपल्या बाहूत सामावून घ्यायला येणार होती.
ह्या तंद्रीत अर्धा रस्ता कधी पार झाला तेही कळले नाही. गाणंही मनसोक्त आळवून झालं होतं. इतका वेळ मी माझ्याच मस्तीत असल्यामुळे मला आजूबाजूचे भान नव्हते; पण मन जाग्यावर नव्हते तरी डोळे आपले काम करतच होते. तशातच माझ्यापासून साधारण शंभर फुटावर मला काही तरी चमकणारे दिसले आणि माझी तंद्री खाडकन तुटली. "काय असावे बरे?" मी आपल्या मनाशीच म्हणालो. इतक्या वेळ मी अतिशय निर्भय अवस्थेत होतो त्याची जागा किंचित भयाने घेतली.
"भूत तर नसेल? पण भूतांवर माझा विश्वास नाही. जे नाहीच ते इथे तरी कसे असेल? पण समजा असलेच तर? आपला विश्वास नसला म्हणून काय झाले? ते जर भूत असलेच तर आणि त्याने आपल्याला काही केले तर?"
मनातल्या मनात मी हे सगळे बोललो आणि माझ्या शेवट्च्या विचाराने मीच कमालीचा शहारलो. अंगातून एक भीतीची लहर गेली. तोंडाला कोरड पडली. आता करायचे काय? मागेही जाऊ शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही. मदतीसाठी ओरडावे तर आसपास वस्तीही नव्हती आणि माझा आवाजही मला सोडून गेला होता.
ह्या अवस्थेत क्षण-दोन क्षण गेले आणि मी आता पुरता भानावर आलो. अंगातले सगळे धैर्य गोळा केले आणि पाऊल पुढे टाकले. जे होईल ते होवो. अशा विपरीत परिस्थितीत माझे धैर्य अचानक वाढते असा माझा आजवरचा अनुभव होता आणि आताही मी त्याच निश्चयाने पाऊल पुढे टाकले. अतिशय सावध चित्ताने मी एकएक पाऊल पुढे टाकत होतो आणि ते जे काही चमकणारे होते त्याच्यापासून मी आता साधारण पन्नास फुटावर येऊन उभा राहिलो.तिथेच उभे राहून नीट निरीक्षण केले आणि लक्षात आले की हे भूत नाही तर कुठला तरी प्राणी असावा.आपण उगीचच घाबरलो. ते त्या प्राण्याचेच डोळे होते आणि अंधारामुळे खूपच चमकत होते पण अजून तो प्राणी कोणता हे काळोखामुळे समजत नव्हते.
इतका वेळ भीती भूताची होती पण आता एखाद्या हिंस्त्र श्वापदाशी गाठ होती. आता काय करायचे? पुन्हा एक क्षणभर भीतीने मनाचा ताबा घेतला पण लगेच मी भानावर आलो. माझी आई म्हणायची "वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातो, मग वाघ्या च का म्हणू नये?" ते शब्द आठवले आणि पुन्हा मनाचा हिय्या करून पुढे चालायला लागलो. मी इतका पुढे आलो तरी ते डोळे जागचे हलेनात. पण एक झाले आता तो जो कुणी प्राणी होता त्याला मी व्यवस्थितपणे पाहू शकत होतो.
जरा निरीक्षण केल्यावर लक्षात आले की तो 'कोल्हा' असावा. रस्त्याच्या मध्यभागी ही स्वारी बसली होती जीभ बाहेर काढून आपल्या भक्षाच्या शोधात.त्याच्या आजच्या भोजनासाठी खास माझी योजना असावी असा एक विनोदी विचार त्या परिस्थितीतही मला चाटून गेला. आता आम्ही अगदी समोरा-समोर आलो होतो आणि आमच्यामधील अंतर जेमतेम २०-२५ फुटांचे असावे. आता हे महाराज जर असाच रस्ता अडवून बसणार असतील तर माझी तरी शहामत नव्हती त्यांना ओलांडून जाण्याची. मग काय करायचे? मागे हटावे तर तो हल्ला करेल आणि पुढे गेलो तरी तेच. माझ्या हातात काहीच नव्हते आणि आजूबाजूलाही कुठे एखादी झाडाची वाळकी फांदीही दिसेना. त्यामुळे काही वेळ माझी स्थिती बुद्धिबळातील 'ठाणबंद' केलेल्या राजासारखी झाली होती आणि आमच्या दोघांच्या हालचाली बंद असल्यामुळे बुद्धिबळातीलच 'स्टेलमेट' म्हणजे निर्नायकी अवस्था झाली होती. ह्यावर उपाय एक त्याने तरी करायचा होता किंवा मलाच काहीतरी करणे भाग होते.
ह्या अवस्थेत काही क्षण गेल्यावर मग मी खाली वाकून दगड उचलण्याची क्रिया केली(त्या रस्त्यावर असा चटकन हाताला लागावा असा दगडही नव्हता!कमाल आहे! आमच्या मुंबईत हवे तितके दगड मिळतात!) आणि अतिशय त्वेषाने तो दगड(नसलेला)त्याच्यावर भिरकावला. ह्या माझ्या अनपेक्षित खेळीने (बुद्धिबळातही मी कैक वेळेला अशा अनपेक्षित चाली करून प्रतिस्पर्ध्याला चकित करत असे)मात्र तो चांगलाच चक्रावला आणि बाजूच्या झाडीत धूम पळाला. तो जरी झाडीत पळाला होता तरी झाडीत उठलेल्या तरंगांवरून तो जास्त लांब गेला नसावा असे माझ्या लक्षात आले म्हणून मी चालत चालत तो आधी ज्या जागेवर बसला होता तिथे पोचलो आणि तो पळालेल्या दिशेला तोंड करुन उभा राहिलो. आताही त्याचे ते चमकणारे डोळे मलाच शोधत आहेत हे दिसत होते. पुन्हा अंगावर एक सरसरून शहारा आला. मग मी पुन्हा दगड उचल आणि भिरकावण्याची क्रिया केली आणि ह्यावेळी मात्र तो पार धूम पळाला. काही क्षण मी तिथेच उभा राहून खात्री केली की हे महाशय पुन्हा येत तर नाहीत ना! पूर्ण खात्री झाल्यावर मात्र एक क्षणही न दवडता झपाझप पाय उचलत गेस्ट-हाऊसकडे रवाना झालो.
1 टिप्पणी:
प्रमोदजी,
छानच लिहिताय तुम्ही. तुमची वर्णनशैली इतकी प्रभावी आहे की वाचताना आपण त्या ठिकाणीच आहोत असा भास होतो.
जाता जाता एक रावसाहेबी सूचना.
त्या "गारवा" च्या ठिकाणी, "काकवी" बसतंय का पहा ना. "हवी" साठी यमक पण जुळेल, आणि "काकवी" गोडही असल्याने सुचवलेला बदलही अप्रस्तुत वाटणार नाही.
हां, आता हे वाचून लोकं मात्र नक्की म्हणतील की याला "का कवी" म्हणायचं ? :-)
टिप्पणी पोस्ट करा