त्या दिवशीच्या अनुभवामुळे मी वेळप्रसंगी स्वसंरक्षणासाठी हातात एखादी काठी असावी म्हणून खास शोधून एक बर्यापैकी काठी बरोबर बाळगू लागलो.माझ्या त्या ’हातात काठी’ घेऊन जाण्याचेही अप्रुप काही जणांना वाटले पण मी कुणालाच त्याचा खुलासा देत बसलो नाही.
त्या प्रसंगानंतर साधारण दोनतीन दिवसांनी रात्रीचे जेवण करण्यासाठी गेस्ट-हाऊसवर परतलो तेव्हा संध्याकाळचे सव्वासात वाजले असावेत.त्या दिवशीही जेवण मस्त होते.बाहेर थंडी पडायला सुरुवात झालेली आणि इथे गरम गरम फुलके पानात पडत होते. त्याच्याबरोबर तोंडी लावायला मस्त रस्सा भाजी असल्यामुळे मी अगदी रंगात येऊन जेवत होतो.चांगले मनसोक्त जेवून मग पुन्हा कामगिरीसाठी त्या महाकाय तबकडीकडे रमत-गमत जायला निघालो.
आज चंद्र चांगला हातभर वर आलेला दिसत होता. बहुदा पौर्णिमेच्या मागचा-पुढचा कोणता तरी दिवस(रात्र) असावा.मी माझ्याच तंद्रीत मार्गाला लगलो. आज माझ्यात भीमसेन संचारले होते. त्यांच्या गाण्यातल्या एकेक खास जागा मी आपल्या नरड्यातून काढण्याच्या प्रयत्नात होतो. भीमसेन आणि वसंतराव हे माझे खास आवडीचे आणि आत्मसात करण्याचे विषय आहेत. त्यांची गाणी लागली की त्यांच्यामागून मी देखिल तसेच्या तसे गायचा प्रयत्न करतो आणि बरेच वेळा चक्क जमून पण जाते. तर त्या दिवशी असाच "इंद्रायणी काठी,देवाची आळंदी। लागली समाधी,ज्ञानेशाची॥" हा अभंग गात गात निघालो.
पहिलीच तान घेताना जाणवले की आज आवाज अगदी मस्त लागलाय. आज ह्या ठिकाणी भीमण्णा असते तर नक्कीच "वा!" अशी सहज दाद मिळाली असती अशी खणखणीत तान माझ्या गळ्यातून (आता इथे नरडे म्हणणे शोभणार नाही)निघाली तेव्हाच लक्षात आले की आजचा दिवस काही वेगळाच आहे. इतकी स्वच्छ-सुंदर तान आजपर्यंत माझ्या गळ्यातून ह्यापूर्वी आलेली मलाही आठवेना.धृवपदही मस्तच जमले.त्यानंतरची दोन्ही कडवीही रंगली. वा! क्या बात है! मी आज स्वत:च स्वत:च्या गाण्यावर खुश होतो.
शेवटच्या कडव्याला पोचेपर्यंत मी महाकाय तबकडीच्या आसपास पोचलो देखिल.पण पायर्या चढण्या आधी चढ्या आवाजात सुरु केले "इंदायणी काऽऽऽऽठी,इंद्राऽऽयणी काऽऽठी. विठ्ठऽऽऽलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ मायऽऽऽबाऽऽऽऽऽऽऽऽऽपा, आऽऽऽऽऽऽऽ वगैरे करत पुन्हा खालच्या षड्जावर येईपर्यंत..... माझी बोलतीच बंद झाली.पायर्या चढण्यासाठी उचललेले पाऊल तसेच अधांतरी अवस्थेत,आवाज बंद,श्वास द्रूतगतीने चाललेला आणि नजर एका जागी खिळलेली!
त्या अलौकिक अवस्थेत काही क्षण गेले आणि मग वस्तुस्थितीची जाणीव झाली तेव्हा कळले की माझ्या नजरेसमोर अगदी ५-फुटांवर एक "नागराज" आपला भला थोरला फणा काढून अतिशय स्तब्धपणे बसलेले दिसले.
त्याची नजर आणि माझी नजर एकमेकांना भिडली आणि माझ्या अंगातून भितीची एक लहर उठली. मी तर मंत्रमुग्ध झाल्यासारखा,अगदी भारल्या सारखा तसाच उभा होतो.पुढे काय होणार हे माहित नव्हते.पुढे पाऊल टाकणे शक्यच नव्हते पण मागे पळण्याचाही विचार मनात डोकावत नव्हता. हातात जरी काठी होती तरी तिचा वापर करण्याची हिंमत होत नव्हती. काही क्षण तसेच त्या भारलेल्या अवस्थेत गेले आणि अचानक नागाने फणा खाली करून हळूहळू तो शांतपणे बाजूच्या बिळात दिसेनासा झाला.तो गेल्यावरही काही मिनिटे मी तसाच निश्चल उभा होतो.
वास्तवाचे पूर्ण भान आल्यावरही पुढे पाऊल टाकायची हिंमत होत नव्हती पण वर जाणे भाग होते कारण अजून एकाला वेळेवर जेवायला पाठवायचे होते. मी आजूबाजूचा कानोसा घेतला आणि मनाचा निर्धार करून पायर्यांना वळसा घालून जरा लांबून वर चढलो आणि धूम पळालो. आत दालनात पोचताच माझ्या सहकार्यांना झाला प्रकार सांगितला आणि त्यांचीही पांचावर धारण बसली.ज्याला जेवायला जायचे होते त्याने जेवण रद्द केले आणि पाणी पिऊनच भूक भागवली.
दुसर्या दिवशी मी ती गोष्ट आमच्या वरिष्ठांना सांगितली. त्यांनी ती तिथल्या सुरक्षा अधिकार्यांना कळवली. मग त्या लोकांनी ते बीळ आणि आजूबाजूला शोधून असलेली काही अन्य बीळे पक्की बुजवून टाकली आणि त्या ठिकाणी रात्रीचा पहारा लावला.त्यानंतरच आम्ही तिथे रात्री-बेरात्री निशं:क पणे वावरू लागलो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा