"हां! बोला. काय काम हाय?" एक तारा.
"साहेब, त्याचं काय आहे की माझं पाकीट उडवलं"! मी
"उडवलं? ते कस काय बुवा? "
"आता ते मला कळलं असतं तर मी इथे कशाला आलो असतो?" मी. मी देखिल तिरकस बोलण्यात कमी नव्हतो. इथे आपला हात दगडाखाली आहे हे माहित असल्यामुळे त्यातल्या त्यात सौम्य भाषेत बोललो.
"बर का वाघमार्या,ह्ये सायेब बग काय म्हनताहेत. त्येंचं पाकीट उडवलं तरी बी त्यांना काहीच कळालं न्हाय". एकतारा.
एकतार्याच्या बोलण्याने आता वाघमार्या मैदानात आला.
" बर सायेब मला सांगा तुमी ते पाकीट काय असे दोन बोटात धरून उंच धरले व्हते की काय? म्हंजी आसं बगा की ह्ये पाकीट हाय आनि ह्ये मी आसं धरलंय उंच(वाघमार्या अगदी प्रात्यक्षिक करून दाखवत होता) आनि तुमी त्या पाकीटमारांला आवतन देत व्हता काय की या,उडवा माजं पाकीट?" वाघमार्या. आणि दोघे खो-खो हसत सुटले.
"काय तिच्या आयला लोक बी कंप्लेंटी आनत्यात? पाकीट उडवले म्हनं?" एकतारा.
"बर माला सांगा,पाकीट उडवला तवा तुमी काय करत व्हता? न्हाय म्हन्जे बसला व्हता,उबा व्हता? नक्की काय करत व्हता?" वाघमार्या.
"अहो गर्दी चिक्कार होती गाडीला....
मी माझे वाक्य पूर्ण करण्याच्या आधीच दोघे ठो ठो हसू लागले.
" आरं तेच्या मायला,वाघमार्या! सायेब काय म्हन्तायेत की गाडीला लय गर्दी व्हती. आता मुंबैच्या गाडीत गर्दी आसनार न्हाय तर मग कुटं आसनार? मुंबैत नवीनच दिसतंय बेनं! भटाचं दिसतंय ! भासा बग कसी एकदम सुद्द वापर्तोय". एकतारा.
"ओ साहेब शिव्या द्यायचं काय काम नाही सांगून ठेवतोय आणि माझी जात काढायची तर अजिबात जरूर नाही. मीही बक्कळ शिव्या देऊ शकतो. उगीच माझे तोंड उघडायला लावू नका". मीही चिडून बोललो.
"च्यामारी वाघमार्या! हिथं पोलीस कोन हाय? आपून की ह्ये बेनं? चायला हाय तर किडूक-मिडूक. पर आपल्याला दम देतोय. घे रे ह्याला आत आन दाव आपला इंगा". एकतारा.
"ओ,हात लावायचे काय काम नाही सांगून ठेवतो. उगीच पस्तावाल". आता माझाही संयम संपत चालला होता. ते दोघे माझ्याकडे एक टाईमपास म्हणून बघत होते आणि स्वतःची करमणूक करून घेत होते. माझा आवाजही आता तापला होता आणि आजूबाजूची फलाटावरची दोनचार पासिंजर मंडळीही ही करमणूक बघायला आतमध्ये डोकावली.
माझ्या आव्हानाने वाघमार्या चवताळला. पटकन उठला आणि माझा दंड त्याच्या राकट हातांनी धरायला म्हणून पुढे सरसावला. पण मी सावध होतो. चपळाईने दूर झालो आणि वाघमार्याचा तोल जाऊन तो जमिनीवर कोसळला. जणू मला तो साष्टांग नमस्कार करत होता कारण त्या अवस्थेतही त्याने त्याचे हात मला पकडण्यासाठी लांब केले होते.
आता गप्प बसून चालणार नाही हे मी ताडले आणि माझा हुकुमाचा एक्का काढला. खरे तर मी एक सामान्य नागरिक म्हणून जगू इच्छित होतो पण ह्या दोघा टोणग्यांनी मला माझे खरे स्वरूप उघड करायची वेळ आणली होती जे मी स्वतःहून करू इच्छित नव्हतो.
"अतिरिक्त आयुक्त,विशेष शाखा(ऍडिशनल कमिशनर स्पेशल ब्रँच) श्रीयुत अमूक अमूक ह्यांच्या ऑफिसात मी काम करतोय. मला जायला उशीर होतोय. ते तिकडे माझी वाट पाहात आहेत आणि मला तुमच्यामुळे हा उशीर होतोय. वर मला मानसिक त्रास तुम्ही जो देताय हे सगळे त्यांना कळले ना तर माझ्याऐवजी तुम्हीच आत जाल. तेव्हा मुकाट्याने माझी तक्रार नोंदवून घ्या आणि मला त्याची पोचपावती द्या. नाहीतर पुढच्या परिणामांना तयार व्हा". माझ्या ह्या खणखणीत बोलण्याने दोघेही हतबुद्ध होऊन माझ्याकडे पाहातच राहिले.
अत्यंत कृश शरीरयष्टी(अगदी क्रिकेटच्या यष्टीसारखी),मध्यम उंची,पट्ट्यापट्ट्याचा टी शर्ट्,खाली भडक रंगाची पँट,केस अस्ताव्यस्त, हनुवटीखालची बोकडदाढी आणि हातात ब्रीफकेस असा माझा त्यावेळचा अवतार हा कोणत्याही अशा तर्हेच्या पोलीसी खात्याला शोभणारा मुळीच नव्हता त्यामुळे त्या दोघांना कळेना की नक्की काय प्रकार असावा ते. हा म्हणतोय ते खरे असेल तर आपले काही खरे नाही पण हा उगीचच दमबाजी करत असेल तर? अशा पेचात ते दोघे सापडले असतानाच एक सब इन्स्पेक्टर आत आला. त्याच्या आगमनाने त्या दोघांना हायसे वाटले असावे असे त्यांच्या चेहर्यावरच्या हावभावावरून वाटले. त्या दोघांनी सइला एक कडक सलाम ठोकला. सइ खूर्चीत स्थानापन्न झाला आणि त्याने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिले. ही संधी साधून मी माझी खरी ओळख दिली आणि तक्रार घडाघडा सांगून टाकली.
माझ्या साहेबांचे नाव ऐकले मात्र सइची पण कळी खुलली . हे साहेब मूळातले मुंबई पोलीसातलेच होते.पण आमच्या कडे पाहूणे कलाकार म्हणून(डेप्युटेशनवर) आले होते. राष्ट्रपती पदक विजेते आणि अतिशय कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष म्हणून त्यांचा लौकिक होता.सइदेखिल त्यांचा लौकिक जाणून होता.
लगेच मला बसायला खूर्ची दिली गेली आणि वाघमार्याला चहा आणायला पिटाळले. एकतारा आता खाली मान घालून उभा होता. आता आपले काही खरे नाही असेच भाव त्याच्या चेहर्यावर होते कारण आतापर्यंत झालेला प्रसंग मी सइला सविस्तर सांगितला. त्याने त्या दोघांना असे काही झापले की त्यांची ती दयनीय अवस्था पाहून मलाच वाईट वाटले.पण त्या माजोरड्यांना त्यांच्या भाषेत डोस मिळणे अत्यावश्यक होतेच. त्यानंतर विद्युत वेगाने हालचाली झाल्या. माझी तक्रार नोंदवून त्याची पोचपावती दिली गेली. स्पेशल चहा आलाच होता. तो पिऊन मी त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो.
एकतारा आणि वाघमार्यांनी माझ्याकडे दयेची याचना केली.
"सायेब, गलती जाली. एक डाव माप करा. आमी वळकलं न्हाय तुमाला. आता मोट्या सायबांस्नी काय सांगू नकासा. न्हाईतर आमची नोकरी जाईल. तुमी आदीच सांगतल आस्तं तर आसं जालं नसत. पुन्यांदा आसं न्हाय व्हनार. आयच्यान!" एकतारा
"बाबांनो, तुमी पोलीस लोक सामान्य माणसाशी कसे वागता हेच मला बघायचे होते आणि मी जर सामान्यच आहे असे सिद्ध झाले असते तर तुम्ही माझे काय हाल केले असते ह्याची कल्पनाच करवत नाही. तेव्हा एक अनुभव म्हणून मी हे साहेबांना सांगणार आहे हे नक्की".
माझ्या त्या बोलण्यावर दोघे माझ्या पाया पडायला लागले आणि मग जास्त तमाशा नको म्हणून मी त्यांना माफ करून साहेबांकडे त्यांची तक्रार करणार नाही असे वचन दिले.
आज मी जर एक सामान्य नागरिक असतो तर माझे काय झाले असते?
समाप्त!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा