पुलंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे वाचणे,ती त्यांच्याच शब्दात आणि आवाजात ऐकणे आणि त्याचे दूरदर्शन रुपांतर पाहणे ह्यापैकी मला स्वतःला ती त्यांच्याच आवाजात ऐकायला जास्त आवडतात. आपण स्वतः ही व्यक्तिचित्रे नुसती वाचली तरी आवडतातच पण पुलंच्या आवाजात ऐकताना ते ती आपल्याला प्रत्यक्ष भेटवत असतात. नकलाकार असण्याचा पुलंना आणि त्यामुळे आपल्यासारख्या श्रोत्यांना ह्याठिकाणी खूपच फायदा झालाय. वर्णन केलेली व्यक्ती प्रत्यक्ष कशी बोलते ते पुलं आवाजातील बदल, चढउतार, नेमक्या जागी शब्दावर जोर अथवा शब्द तोडून आपल्याला दाखवत असतात. त्या व्यक्तीचे मूर्तीमंत दर्शन आपल्याला घडवतात.
कोकणात राहणार्यांना कोकणी बोली अथवा कोकणी बाणा काही नवीन नाही.पण तरीही तो ज्याला माहित नाही अशा माझ्यासारख्या असंख्य लोकांना निव्वळ शब्दांतून जाणवू देण्याची किमया केवळ पुलंच करू जाणे. आता उदाहरण म्हणून आपण "अंतू बर्वा आणि मंडळी" घेऊ या.
अंतूच्या तोंडी घातलेली आणि त्या अड्ड्यातील इतर मंडळींची भाषा पहा.
अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते.
"कशी काय गर्दी ?"
"ठीक आहे !"
"प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात ?"
"छे ! छे !"
"अहो, छे छे म्हणून झिटकता काय पाल झिटकल्यासारखे ? पहिला अंक ऐकला मी हितूनच.तुमच्या त्या सिंधूच्या पार्ट्यात काय दम दिसत नाही . 'लागे हृदयीं हुरहुर' म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलंनीत. बालगंधर्वाचं ऐकलं होतंत काय ?"
मॅनेजरही जरा उखडले. "आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा."
"अहो,गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत --- आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षतदेखील घेऊन हिंडत होते तुमचे ब्यांडवाले! अहो, एवीतेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं --- चार आण्यात जमवा."
"चार आण्यात बघायला काय डोंबा~याचा खेळ आहे काय ?"
"अहो तो बरा !
"आधी तो खेळ दाखवतो आणि मग थाळी फिरवतो."
"तुम्ही तसं करा. पुढलं 'कशि या त्यजूं पदाला' जमलं फक्कड तर थाळीत चार आणे आणखी टाकीन."
आणि हा एक नमूना पहा.अण्णा साने हा त्या अड्ड्यातलाच एक.
त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सान्यांनी एकदाच फक्त काही माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतूशेटच्या मुलाचा उल्लेख आला.
"म्हणजे? अंतूशेटना मुलगा आहे ?"
"आहे ? म्हणजे काय ? चांगला कलेक्टर आहे !"
"कलेक्टर ?"
"भायखळ्याच्या स्टेशनावर तिकिटं गोळा करतो." चेह~यावरची सुरकुती हलू न देता अण्णा म्हणाले.
"मग वडलांना मदत करीत नाही की काय ?"
"अहो, करतो कधी कधी. त्यालाही त्याचा संसार आहे. त्यातून बीबीशीआयला जीआयपीचा डबा जोडलेला ..."
ह्या अड्ड्यातले हे विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयाल होईल. बी बी सी आयला जी आय पीचा डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह हे लक्षात यायला मला उशीर लागला.
"काय लक्षात आलं ना ? तेव्हा अंतूशेटच्या स्नानसंध्येची पंचाईत होते. मुलाच्या घरी थोडी इतर ’आन्हिकंही’ चालतात म्हणे. आमच्या अंतूशेटचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाहण्यास गेला होता. गणित चुकल्यासारखा परतला. दसरा-दिवाळीला अंतू बर्व्याला मिळतं आपलं मनिऑर्डरीतून पितृप्रेमाचं पोस्त ! पाचदहा रुपयांचं ! तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप म्हणून सांगत ! आणि उगीचच खुर्दा खुळखुळवतो चार दिवस खिशात हात घालून."
"अहो, तिकिट-कलेक्टरला पगार तो काय असणार ?"
"पगार बेताचाच, पण चवल्यापावल्यांची आचमनं चालतात म्हणतात. खरंखोटं देव जाणे. आणि चालायचंच ! घेतले तर घेऊ देत .. काय ? अहो, आठ आणे खाल्ले की चौकडीचा मुगूट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि एक लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत ! लोकनियुक्त प्रतिनिधी !"
ह्या दोन्ही संवादातून आपल्याला त्या बोलण्यातला मिस्किलपणा जाणवतो पण हेच शब्द वाचण्या ऐवजी पुलंच्या तोंडून ऐकले की ते अधिक प्रभावी वाटतात.निदान मला तरी ते तसे वाटते. त्यातला नेमका आशय हृदयाला भिडतो.
हरितात्या हे एक वेगळे पात्र पुलंनी रंगवलंय. सदैव इतिहासात रमलेले हे पात्र प्रत्येक गोष्ट "पुराव्याने शाबीत करीन" असे म्हणत असते. वर्तमानात जगायला तयार नसलेले हरितात्या आणि वास्तवाची नको तितकी जाणीव करून देणारे अंतू बर्वा ह्यांची एखादी जुगलबंदी पुलंच्या लेखणीतून झरावी अशी माझी खूप इच्छा होती. पण मी ती त्यांच्याकडे पत्ररुपाने बोलून दाखवू शकलो नाही ह्याची आज खंत वाटते. तसा संवाद लिहिला गेला असता तर... माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते आहे...
अंतू उवाच : "आला न्हेरू चालले बघायला ! आणि रत्नांग्रीत दाखवलनीत काय त्यांस ? बाळ गंगाधर टिळक जन्मले ती खोली आणि खाट? गंगाधरपंत टिळकास काय स्वप्नात द्रष्टांत झाला होता काय रे ... तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार म्हणून ? कुणाची तरी खाट दाखवली नि दिलं ठोकून त्याच्यावर टिळकानं पहिलं ट्यांहां केलं म्हणून ! पुरावा काय ? का टिळकाच्या आयशीचं बाळंतपण केलेली सुईण होती साक्षीस ? टिळकाचं सोड ! शंभर वर्षं झाली त्याच्या जन्मास. तू जन्मास आलास ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय ? म्हातारीस विचारून ये घरी जाऊन आणि मग सांग मला टिळकाच्या आणि न्हेरूच्या गोष्टी."
हे ऐकून हरितात्या पुढे येतात आणि म्हणतात .....
"तुला सांगतो पुरुषोतम, पुरावा आहे. अरे आम्ही इथे असे उभे. समोर गंगाधरपंत अस्वस्थपणे फेर्या मारताहेत. सुईणींची लगबग चाललेय. तिथे गरम पाण्याचा बंब पेटलाय. आत असह्य होणार्या वेदनांनी कळवळणार्या पार्वतीबाई. आणि तशाच अवस्थेत एकाएकी बाळाचे "ट्यांहां" ऐकू आले. बाळ किती तेजस्वी म्हणून सांगू? अरे सगळीकडे आनंदी आनंद झाला. हत्तीवरून पेढे वाटले. असे होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!"..... वगैरे वगैरे!
अर्थात हे चित्र खर्या अर्थाने पुलंनीच पूर्ण करायला हवे होते.ते ह्या जन्मी तरी आता होणे नाही.पण जर कधी पुलं मला वर भेटलेच तर मी त्यांना ह्याबाबत नक्कीच गळ घालणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा