माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१७ मे, २०१०

पावसाळी विशेषांक!

मंडळी...हिवाळी विशेषांक  आणि होळी विशेषांक  ह्या दोघांनंतर आता आपण काढत आहोत पावसाळी विशेषांक.
ह्या अंकासाठी आपण खास असा कोणताही विषय ठेवत नाही आहोत...मात्र "पाऊस आणि पावसाळी" अशा काही ओलेचिंब आठवणी आपल्याला सादर करायच्या असतील तर त्यासाठी आपण एक वेगळे सदर जरूर ठेवूया.
ह्या अंकासाठी आपण कथा.कविता,आठवणी,ललित,व्यंगचित्र,खास छायाचित्रं...इत्यादी कोणत्याही प्रकारचे साहित्य पाठवू शकता....मात्र अट एकच आहे....जे काही पाठवाल ते ताजे हवे...पूर्वप्रकाशित नको आणि आपला अंक प्रकाशित होईपर्यंत ते साहित्य इतरत्र कुठेही प्रकाशित होणार नाही ह्याची काळजी घ्या...

आपले साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आहे १५जून २०१० . अंक प्रकाशित करण्याची तारीख त्यानंतर जाहीर करण्यात येईल.
विशेष सूचना: ह्या अंकासाठी येणारे प्रत्येक लेखन प्रकाशित करण्याचा आमचा मनोदय आहे. येणार्‍या साहित्यात कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत...मात्र तशीच जरूर भासली तर संबंधित व्यक्तीशी चर्चा करूनच त्याप्रमाणे बदल केला जाईल....आलेल्या साहित्यात फक्त टंकलेखन  ,शुद्धलेखन इत्यादिमध्ये काही चूक आढळली तर तेवढेच संपादन त्यात केले जाईल.

आपले लिखित साहित्य कोणत्याही परिस्थितीत पीडीएफ  मध्ये पाठवू नका. एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवू शकता.  साहित्य पाठवण्याचा पत्ता आहे...
attyanand@gmail.com

तर मग लागा तयारीला...

१४ मे, २०१०

हमखास वजन कमी करायचंय?

खूपच सोप्पं आहे वजन कमी करणं...अर्थात मनात आणलं तर..
.पण हे मनात कोण आणणार?

कोण म्हणजे काय? ज्याला/जिला वजन कमी करायचे असेल त्या व्यक्तीने तसे मनात आणायला हवंय.

अहो,पण नुसतं मनात आणून असं वजन कमी झालं असतं तर काय हवं होतं?

नाही,म्हणजे तुमचं बरोबर आहे हो...नुसतं मनात आणून काही होणार नाही हे मलाही माहित आहे.

माहित आहे ना...मग मघापासून का म्हणताय की मनात आणलं तर...वगैरे.   आम्ही मनात लाख आणतो हो,पण वजन वगैरे काही कमी होत नाही...झालंच तर..चांगलं बारीक झाल्याचं स्वप्नही पाहातो...पण काहीऽऽही होत नाही....आणि तुम्ही उगीच शब्दांचे बुडबुडे सोडताय.

अहो नाही हो...मी स्वत: कमी केलंय माझं वजन.

काय सांगताय काय? खरंच की उगाच आमची फिरकी घेताय?

अगदी खरं...ऐकायचंय?तर मग ऐका.

मंडळी,साधारण जानेवारीच्या शेवटी माझा पाय मुरगळला होता, त्यानंतर तो सतत तीन आठवडे एकाच स्थितीत बांधून ठेवावा लागला होता....साहजिकच त्या काळात माझा रोजचा सकाळचा व्यायाम,संध्याकाळची फेरी इत्यादि हालचाली बंद झाल्या...खाणं मात्र तेवढच होतं...किंबहुना थोडं वाढलं होतं असंच म्हणा ना..त्यामुळे आपोआप वजनही वाढायला लागलं...पाय अगदी व्यवस्थित बरा झाल्यावर जेमतेम मी एक आठवडा व्यायाम केला आणि पुढे तो आपोआप बंद पडला. बंद पडायला कारण होते....रात्रीची अपूरी झोप..ज्यामुळे सकाळी वेळेवर उठणे होत नसे आणि व्यायाम केला तर सकाळीच...हे माझे ब्रीदवाक्य असल्यामुळे तोही आपोआप बंद पडला.

पाय दुखावण्याआधी माझे वजन साधारणपणे ६६ किलो होते...ते ह्या मधल्या काळात ७० किलोपर्यंत वाढले...झालंच तर पोटाचा घेरही दोन ते अडीच सेंमीने वाढला होता...हे सगळं मला आवडत नव्हतं पण तरीही पुन्हा व्यायामाला जाण्याचा मुहूर्त लागत नव्हता...मग आता काय करावे..असा मनात विचार करतांना एक साधा सोपा  मार्ग दिसला...तोच करून पाहायचे असे ठरवले.


एप्रिलच्या सुरुवातीला, माझा दिवसभराचा आहार काय असतो ह्याची एकदा खानेसुमारी केली...
सकाळी एक कप दूध आणि दूपारी एक कप चहा किंवा कॉफी...दोन्हींबरोबर ५ ते ६ पार्लेजीची बिस्किटे.
तसं माझं जेवण काही फारसं नाही...जेवणात भात- आमटी किंवा पोळी-भाजी..ह्यापैकी एकच जोडगोळी. भात असेल तर फक्त एकदाच घेतलेला मला पुरतो....तोही  फार नाही...तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगतो...माझ्या माहितीतले एक   पंचाहत्तरी पार केलेल गृहस्थ आहेत....त्यांचे नेहमीचे जेवण कसे आहे तर...एकूण तीन वेळा ते भात घेतात...मधे दोन-चार पोळ्या...आता त्याच्या अनुषंगाने येणारे भाजी-आमटी हे तोंडी लावणे वगैरे  गोष्टी  आल्याच...बाकी ताक/दही वगैरे.....तर त्यांचा एकवेळचा भात...हे माझे पूर्ण जेवण...विश्वास बसत नाही ना....जाऊ द्या...द्या सोडून.  हं, तर जेवणात केवळ पोळ्या असतील त्या ४ ते ५ ...एखादे वेळेस भाजी खूपच छान झाली असली तर ६वी पोळीही खाऊ शकतो.....असो...तर सांगायचा मुद्दा काय तर जेवणही यथातथाच......
जेवणा व्यतिरिक्त दिवसातून एकदोन वेळा कधी केळी,चिवडा,लाडू,तळलेली डाळ,खाकरे इत्यादिंपैकी काहीतरी असायचेच.
ह्या सगळ्यांचा विचार केल्यावर आता कोणत्या आहारात कपात करायची ह्याचा विचार सुरु केला. जेवण तर माझं सामान्यंच होतं...तेव्हा त्यात बदल  करण्याचा अथवा कपात करण्याचा प्रश्नच नव्हता. मग सर्वप्रथम पार्लेजीची बिस्किटे बंद केली.....तीन चार दिवसात त्याची सवय सुटली....म्हणून मग जेवणाव्यतिरिक्त आहारात हळूहळू कपात सुरु केली....हे करतांना भूक तर भागत नसायची...म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले...भूक लागली की पाणी प्यायचे...असे काही दिवस मोठ्या नेटाने सुरु ठेवले....पंधरा दिवसांनंतर संध्याकाळी एकदा  नुसतंच व्यायामशाळेचं दर्शन घेऊन आलो....तिथल्या काट्यावर वजन केलं...ते थोडे म्हणजे साधारण ६०० ग्रॅमने कमी झालेले दिसले...त्यामुळे लगेच उत्साह वाढला आणि दुसर्‍या दिवशी सकाळपासून पुन्हा व्यायामाला सुरुवात करायची असा मनाशी दृढनिश्चय केला....
दुसर्‍या दिवसापासून खरंच व्याशात जाऊ लागलो....अर्थात व्यायाम मात्र चाखत माखतच करत होतो...साधारण एक आठवड्याने शरीरातील सगळे सांधे मोकळे झाल्याचे लक्षात आल्यावर मग जरा नेटाने व्यायाम सुरु केला...बरोबर आहार नियंत्रण  कसोशीने सुरुच ठेवलेले होते...त्यानंतर पुन्हा एकदा वजन पाहिले...आता ते दीड किलो कमी झाले होते.....आणि आजच पुन्हा एकदा वजन केले...तेव्हा ते तीन किलोने कमी भरल्याचे दाखवते आहे....पोटावर वाढलेली ती दोन-अडीच सेंमीची चरबी आता दीड सेंमीने कमी झालेय....

मंडळी...हे सर्व घडायला साधारण एक-दीड महिन्याचा कालावधी जावा लागला...पण मी जाणीवपूर्वक करत असलेल्या प्रयत्नांना  निश्चितच फळ येत आहे....माझे वजन अजूनही आदर्श वजनाच्या तुलनेत साधारणपणे तीन किलो जास्त आहे....माझी खात्री आहे की...महिन्याभरात तेही निश्चितच  तेवढे खाली येईल....

खरं तर अतिशय काटेकोरपणे आहार नियंत्रण आणि त्याच बरोबर योग्य असा व्यायाम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला तर अजून चांगला परिणाम मिळू शकतो....पण माझे वजन आदर्श वजनापेक्षा खूप जास्त नसल्याने..मी स्वत:हून जे काही करतोय तेवढे परिश्रमही माझ्यासाठी पूरेसे आहेत.

म्हणूनच म्हणतो....वजन कमी करायचंय.....मग आधी तसे मनात आणा....आणि एकदा मनात असा विचार आणलात की त्यासाठी  पुढे जे काही करावे लागेल ते इमाने इतबारे एखाद्या व्रताप्रमाणे करा....पाहा तुमचा भार हलका होतो की नाही ते.... तर मग आता लागा तयारीला....
अरे हो, एक सांगायचेच राहिले...मंडळी हा उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे....तसेही थोडीशी हालचाल केली की घाम हा येतोच...तेव्हा व्यायाम करा आणि जास्त घाम गाळा...पाणी भरपूर प्या  मात्र खाणं कमी करा.......

इतकं केलंत की तुम्ही हलके झालात म्हणून समजा!!!
..

१२ मे, २०१०

आम्ही, बझकर !














   मुंबईतल्या पहिल्या मराठी ब्लॉगर स्नेह मेळाव्याला आलेले काही बझकर. अजून बरेच आहेत बरं का...ही आपली एक झलक दाखवली...अनायासे छायाचित्र मिळालंय...तर दाखवतोय.  ;)


गुगलने बझचा समावेश जीमेलमध्ये केल्याला आता बरेच महिने झाले. पहिले एकदोन दिवस हे बझ प्रकरण काय आहे हे कळण्यातच वेळ गेला. आपल्या जीमेल खात्यात जे लोक आहेत ते साधारणपणे आपल्याशी बझमध्येही जोडले गेलेले दिसतात..पण आणखी पुढची गंमत म्हणजे आपल्या खात्यातल्या प्रत्येक सभासदाशी जोडली गेलेली माणसं आपल्या बझमध्ये डोकावू शकतात...ह्याचा अर्थ हे बझ प्रकरण म्हणजे एक खूप मोठी साखळी आहे....उदा. मी म्हटलं की...नमस्कार मंडळी,या गप्पा मारायला.... की हे अशा तर्‍हेने जोडलेल्या सगळ्यांना माझ्या कळत/नकळत पाहता येते.

सुरुवातीला एक गंमत म्हणून ह्या बझवर ज्या गप्पा मारायला मी सुरुवात केली ती माझ्या माहितीतल्या सदस्यांशी...हळूहळू एकेक सभासद वाढायला लागला. ह्याचा/हिचा त्याचा/तिचा मित्र/मैत्रीण असे करत करत ओळख काढत काढत  माझ्या खात्यातले लोक वाढायला लागले...अगदी पारावर गप्पा मारायला आपण बसतो तसे व्हायला लागले . बोलतांना विषयाचे,वेळेचे वगैरे फारसे बंधन राहिले नाही.

आता सदस्यसंख्या इतकी वाढलेय की कैक वेळा एकमेकांच्या खरडींना उत्तर देतांना असंबद्धता निर्माण होतेय...तरीही विषय कुठून  आणि कसा सुरु होतो  हे मात्र कळत नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्या बझचं...धाग्याचं वाचन केलं तर अतिशय मनोरंजक असा मजकूर वाचायला मिळतो.

आजमितीला माझ्या बझमध्ये...किती बझकर आहेत हे मोजायचे ठरवले तर मोजता मोजता चूक होते..अशा तर्‍हेने रोज एकदोन नवी मंडळी हजेरी लावत असतात...तरीही ह्या घडीला...नियमित आणि क्वचित प्रसंगी हजेरी लावणारे असे बझकर मिळून जवळपास ४० जण हजेरी लावत असतात.

बझच्या एका धाग्यात ५०० खरडींची मर्यादा गुगलने घातली असावी असा अंदाज आहे....कारण गेले कैक दिवस आमच्या बझचा किमान एक  धागा तरी ५००च्या आसपास जाऊन बंद पडतो. ज्या दिवशी भरपूर हजेरी असते तेव्हा तर दोन दोन धागेही गप्पा मारायला आम्हाला कमी पडतात....इतकं काय बरं बोलतो आम्ही?
अहो सांगितलं ना ...विषयाला बंधन नाही त्यामुळे सुरुवातीला कोणता विषय असतो आणि धागा बंद पडेपर्यंत तो कुठवर गेलेला असतो ह्याचा काहीही हिशोब लावता येणार नाही...सापासारखी नागमोडी वळणं घेत आमच्या बझमधले विषय सारखे बदलत जातात....उत्सुकता असेल तर पाहा डोकावून....पण सावधान...ह्या आमच्या गप्पा वाचता वाचता तुम्ही कधी आमच्यात सामील झालात हे तुम्हालाही कळणार नाही....मग तुमचे रोजचे काम,लिखाण,वाचन, छंद वगैरेकडे दूर्लक्ष झालं तर आम्हाला दोष देऊ नका.  ;)

९ मे, २०१०

मुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा



मुंबईत आज  पहिला मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात, दादर पश्चिम येथील दासावा(दादर सार्वजनिक वाचनालय)च्या तिसर्‍या मजल्यावरील सभागृहात साजरा झाला.
ह्या मेळाव्याची पूर्वतयारी मुख्यत: कांचन कराई आणि तिच्या बरोबरीने महेंद्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी ह्यांनी अतिशय नेटकेपणाने केलेली होती.
मी तिथे साधारणत: पावणेपाचला पोचलो. सभागृहात बरीचशी ओळखीची आणि अनोळखी मंडळी जमलेली दिसली. स्वागतालाच सुहास झेले,सचिन उथळे-पाटील,आनंद पत्रे,सागर बाहेगव्हाणकर,भारत मुंबईकर, रोहन चौधरी इत्यादि तरूण मंडळी सुहास्य वदनाने तयारच होती. तिथेच मग प्रत्येकाला एक नोंदणी क्रमांक पट्टी (त्यावर संबंधिताचे नाव लिहून)  दिली जात होती. माझा क्रमांक होता ००७...

मी ती क्रमांक/नाव असलेली पट्टी छातीवर चिकटवत असतानाच बंगळूरहून अपर्णा लळिंगकरचा ह्या मेळाव्याला शुभेच्छा देणारा भ्रमण ध्वनी आला. तिला मग मी कांचन, सुहास आणि महेंद्रजींशी देखिल बोलायला लावलं. ;) अशा तर्‍हेने दूरस्थ असूनही अपर्णाने संमेलनाला हजेरी लावली.

त्यानंतर मग एकेकजण भेटत गेले. अमेय धामणकर,श्रेया  रत्नपारखी,आनंद काळे ,सोनाली केळकर (आर्यन,श्रीयुत केळकर) इत्यादि नेहमीची बझकर मंडळी भेटली. कोष्टीसाहेब...खास नाशिकहून आले  होते..तेही भेटले. सगळेजण एकमेकांना प्रत्यक्ष प्रथमच भेटत होते...तरीही कुठेही संकोच,दुरावा  जाणवला नाही. रोजच्या बझच्या गप्पांमुळे सगळी मंडळी जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारखी एकमेकांशी वागत होती.

इथे मला माझे काही जालावरचे जुने मित्र/मैत्रिणी भेटले...त्यात आनंदराव घारे, मिलिंद फणसे, शंतनू ओक, नरेंद्र प्रभू, हरेकृष्णजी, नीरजा पटवर्धन,सुधीर कांदळकर,जयबालाताई परूळेकर.अ‍ॅडी जोशी,आल्हाद महाबळ इत्यादि....त्यांच्याशीही मनमोकळ्या गप्पा झाल्या. स्टार माझाचे निवेदक प्रसन्न जोशॊही भेटले. मग आमच्या स्टार माझाच्या बक्षीस समारंभाच्या आठवणी निघाल्या.


त्यानंतर कार्यक्रम थोडा उशीरा म्हणजे साडेपाचला सुरु झाला. कांचनने अतिशय उस्फुर्तपणे प्रास्ताविक सादर केले. त्यात हा मेळावा घेण्यामागची मूळ संकल्पना, त्यानंतर त्यावर घडत गेलेला विचार विनिमय, पूर्वतयारी,एका अनामिक प्रायोजकाने उचललेला समारंभाच्या संपूर्ण खर्चाचा भार इत्यादि विविध अंगांवर तिने सविस्तर निवेदन केले. त्यानंतर महेंद्रजींनी उपस्थितांचे स्वागत केले ...आणि मग वैयक्तिक ओळखींचा कार्यक्रम सुरु झाला.

एकेक जण माईकसमोर येऊन आपली थोडक्यात ओळख करून देत होता/होती. ह्यामध्ये सर्वात लहान जालनिशीकार ’आर्यन’ पासून ते ७१ वर्षांचे आजोबा असे एकूण ७०-७५ जणानी हजेरी लावली. महाराष्ट्र शासनातील सनदी अधिकारी श्रीमती लीना मेहेंदळे ह्यांच्यासारख्या एका वेळी ३२ जालनिश्या लिहिणार्‍या विदूषीपासून ते एकुलती एक जालनिशी लिहिणार्‍या सर्व जुन्या नव्या लोकांनी आपापली ओळख,आपल्या जालनिशीचा विषय इत्यादींची माहिती करून दिली.
हा कार्यक्रम सुरु असतानाच खानपान सेवाही सुरु झाली होती. बटाटे वडा,कटलेट आणि कॉफी असा मस्त बेत जमून आला होता. सगळे पदार्थ अर्थातच चविष्ट होते...हे वेगळे सांगण्याची गरज नाही.




ओळख-परेड झाल्यावर मग काही जणांची एकीकडे जालनिशी लिहिण्याच्या बाबतीतल्या वैयक्तिक समस्या, प्रताधिकार कायदा वगैरेसंबंधी चर्चा सुरु होती तर दुसरीकडे इतर सदस्यांची आपापसात चर्चा, गप्पा वगैरे सुरु होत्या.
कार्यक्रम संपत असतानाच अमेरिकेहून हेरंब ओकचा भ्रमणध्वनी आला. त्यानेही मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आणि अशा तर्‍हेने संमेलनात हजेरीही लावली. त्याच्या आणि अपर्णाच्या वाटणीचा खाऊ कुणी खाल्ला...माहीत नाही.  ;)
शेवटी हजर असणार्‍यांची गटागटाने छायाचित्र काढण्यात आली....आणि मग ह्या मेळाव्याचे सूप वाजले.

ह्या मेळाव्यात मला सारिका खोत ही माझे लेखन आवर्जून वाचणारी वाचक भेटली.  :)

मी घरी पावणे दहाला पोचलो. आजचा दिवस खूपच आनंदात गेला.
बाकी सविस्तर आणि सचित्र वृत्तांत इतरजण लिहितीलच....हा होता प्राथमिक वृत्तांत.

८ मे, २०१०

पुन्हा एकदा..मुक्काम पोस्ट नवी दिल्ली! भाग ६

अशुभस्य कालहरणम्‌...असं कुणीसं म्हटलंय...त्यानुसार मी माझे दिल्लीतले दिवस काढत होतो. सोमवार ते शुक्रवार तसे बरे जात होते कारण दिवसभर कार्यालयात इतर सहकार्‍यांबरोबर गप्पा-टप्पांमध्ये वेळ त्यामानाने बरा जायचा...मी काम तर करतच नव्हतो...दिल्लीत आल्यापासून मी कामाला अजिबात हात लावलेला नव्हता....आणि नायरसाहेबांच्या आदेशाप्रमाणे...काम करावे/न करावे हे सर्वस्वी माझ्या इच्छेवर सोपवलेलं होतं.... त्यामुळे इतर साहेबलोक माझ्या भानगडीत पडत नसत....काम न करता वेळ कसा घालवायचा? हा एक प्रश्नच होता...पण तोही मी सोडवलेला होता...कार्यालयात काही कुणी सदैव काम करत नसतात...आणि त्यातून सरकारी कार्यालयात तर मान मोडून काम करणारे (पूर्वीच्या)माझ्यासारखे एकूण कमीच लोक असतात.
एकेकाळचा अत्यंत कामसू माणूस असा माझा लौकिक होता....आणि आता निव्वळ रिकामटेकडा...
त्यामुळे माझ्यासारखे रिकामटेकडे/अर्धरिकामटेकडे लोक असायचेच...त्यांच्याशी गप्पा मारण्यात माझा वेळ जायचा. संध्याकाळी कार्यालय बंद झाल्यावर मग कधीकधी कार्यालयातच बुद्धीबळाचा डाव मांडून बसायचो...माझ्यासारखेच एकटे राहणारे....घरादाराकडे कुणी वाट पाहणारे नसलेले ...आपले आजचे काम संपलंय तरी घरी जाण्यात फारसे रस नसलेले काही शिलेदार असायचे...त्यांच्यात एकदोन जण मला तुल्यबल असे प्रतिस्पर्धी सापडले आणि मग कैक वेळा रात्री दहा-दहा वाजेपर्यंत आमच्या लढती चालायच्या...कधी ते जिंकत...कधी मी जिंकत असे....पण जिंकण्या-हरण्याचा मुद्दा सोडला तर...त्यामुळे माझे मन कुठेतरी तेवढा वेळ गुंतून राहात असे हे माझ्यासाठी महत्वाचे होते.

त्या काळात माझी मेव्हणी मटेनिलि,मुंबईमध्ये दूरध्वनी केंद्रात कामाला होती...योगायोगाने ती त्याच कालात मालाड दूध्व केंद्रात रुजू झाली होती...त्यामुळे अधूनमधून एखाद्या संध्याकाळी ती माझ्या पत्नीला तिच्या कार्यालयातून माझ्याशी बोलण्याची सोय करून द्यायची....त्यावेळी आम्ही एकमेकांशी काय बोलायचो?...खरंच,काय सांगू? नवविवाहित पण विरहाने झुरणारे दोन जीव काय वेगळं बोलू शकणार...तुम्ही कल्पना करू शकाल...पण सौचा वेळ जास्त करून रडण्यात आणि माझा तिची समजूत घालण्यात जात असे...मी स्वत: कितीही परिस्थितीने गांजलेलो असलो तरी त्याची क्षिती न बाळगता समोरच्या व्यक्तीला त्याची फारशी जाणीव होऊ देता नये....अशा तर्‍हेने तिची समजूत काढत असे...अर्थात वेगळ्या नजरेने पाहिले तर ती मीच माझी काढलेली समजूत असायची....असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

शनिवार-रविवार अक्षरश: खायला उठायचे....मग मी उगाच दिशाहिन भरकटत बसायचो. बाहेर जातांना नेहमी माझ्याबरोबर एक शबनम पिशवी असायची....त्यात अगदी लहान-सहान पण वेळप्रसंगी उपयोगी पडतील अशा वस्तू असायच्या....मेणबत्ती-काड्यापेटी,सुईदोरा-कात्री,छोटासा चाकू,चष्मा,विजेरी आणि काही जुजबी औषधी गोळ्या....त्या काळात दिल्लीत वीज-भारनियमन चालायचे...एकूणच दिल्ली,दिल्लीच्या वस्त्या आणि रस्ते मला अनोळखी...त्यामुळे वेळप्रसंगी उपयोगी पडावी म्हणून विजेरी, मेणबत्ती-काड्यापेटी वगैरे होती.
माझ्या डोळ्यांचा नंबर खूप जास्त होता त्यामुळे मी नेत्रस्पर्षी भिंगं(कॉनटॅक्ट लेन्सेस)वापरायचो....पण दिल्लीत धूळ भरपूर होती त्यामुळे कैक वेळा ती डोळ्यात जाऊन नेभिं खुपायला लागायची....अशा वेळी ती काढून चष्मा वापरावा लागायचा...म्हणून चष्माही सदैव बरोबर असायचा.

असाच एका शनिवारी घराबाहेर पडलो...बाहेर पडतांना नेहमीप्रमाणे शबनम पिशवी खांद्यावर लटकवायला विसरलो...खरं तर कसा विसरलो तेच आठवत नाही...कारण त्या काळात मी कुठेही बाहेर जातांना शबनम खांद्यावर अडकवली जाणं...ही जणू प्रतिक्षिप्त क्रियाच झाली होती....पण तरीही त्यादिवशी खरंच विसरलो...
त्या दिवशी दिल्लीच्या बसने दिल्लीदर्शन करण्याचे ठरवले आणि मग मनात येईल तसे फिरत राहिलो...शनिवार-रविवारी..दिल्लीच्या बसमधून(डीटीसी) हवा तितका प्रवास एकरकमी तिकिट काढून करता यायचा. मी ते तसे तिकिट काढून हवा तसा...हवा तिथे जात होतो. दिल्लीतले कैक प्रसिद्ध/अप्रसिद्ध भागही पाहिले. हे सगळं करता करता संध्याकाळ झाली...हळूहळू काळोखही झाला....मी माझ्या निवासी स्थानापासून बराच दूर होतो...आणि अचानक एक जबरदस्त वार्‍याचा झोत आला....माझ्या डोळ्यात काहीतरी हललं....आणि मला सभोवतालचं ते सारं विश्वं एकदम अपरिचित वाटायला लागलं....आजूबाजूचा काळोख वाढला....आत्तापर्यंत दिसणारी माणसं,वस्तू वगैरे सगळं धूसर दिसायला लागलं.... डोळ्यातले नेभिं जागेवरून हललं होतं ह्याची तत्काल जाणीव झाली आणि हात आपोआप डोळ्याकडे वळले. डोळा बंद करून नेभिं जागेवर आणण्याचे सगळे प्रयत्न विफल ठरले....आणि मग लक्षात आलं की नेभिं...डोळ्यात नाहीच आहे...ते वार्‍याने कुठेतरी बाहेर उडाले....मग अंगावर चाचपडून पाहिले...जिथे जिथे हात जाईल तिथे बसच्या सीटवर, सीटच्या खाली...चाचपडणे सुरु झाले....माझ्या आजूबाजूला असलेल्यांच्या प्रतिक्रिया मला दिसणे शक्यच नव्हते...पण मी कल्पना नक्कीच करू शकत होतो....इतक्या वेळ नीट,व्यवस्थित बसलेल्या ह्या माणसाला झालं तरी काय? असे भाव त्याक्षणी नक्कीच त्यांच्या चेहर्‍यावर असावेत.

बरं, कुणाला काही सांगावं तर...हे नेभिं काय प्रकार आहे...हे समजावूनही कुणाला कळेना....मी आपला आंधळ्यासारखा....अहो आंधळाच म्हणा....निव्वळ चाचपडत होतो....बसमधल्या दिव्यांचा प्रकाशही अतिशय क्षीण वाटत होता...शेवटी एकदाची बस...शेवटच्या थांब्यावर जाऊन थांबली..सगळे लोक उतरून गेले...मी फक्त बसून होतो...काय करायचं ह्याचा विचार करत. इतक्यात चालक -वाहक दिवे बंद करून चालते झाले.
काय करावं मला कळेना....मी ओरडून  दिवा लावा ,दिवा लावा असे म्हटले पण ते कुणाच्याही कानी गेले नाही.  मी पुन्हा अंदाजाने आधी स्वत:चे कपडे, टीशर्टाचा वरचा खिसा वगैरे तपासून पाहात होतो...कुठे नेभिं चिकटून राहिलेले सापडतंय का? पण नाही...स्वत:वरच वैतागलो....नेमकी आजच शबनम विसरायची चूक कशी केली आपण? आता परत कसे जाणार निवासाकडे?

जिथे दोन पावलांवरचे मला स्पष्ट दिसत नव्हते तिथे मी घरी कसा पोचणार होतो? रस्त्यावरचे ते भगभगीत दिवे मला एखाद्या पसरट प्रकाशासारखे दिसत होते...समोरून येणार्‍या वाहनांचे प्रखर दिवे मला पार आंधळे करून टाकत होते...मी त्याच बसने परतण्याचा निर्णय घेतला...पण मला जिथे जायचे होते तिकडची ही बस नव्हती....म्हणजे मला आता दुसरी बस पकडणे क्रमप्राप्तच होते....कसाबसा बसमधून खाली उतरलो....कुठे जावे...कसे जावे काहीच कळत नव्हते... आजूबाजूला असणार्‍या व्यक्तींपैकी पूरूष कोण,स्त्री कोण हे ही कळत नव्हते....तरीही मी आसपास असणार्‍या एकदोघांना मला मदत करायची विनंती केली...सुदैवाने एकाने मला हाताला धरून एका बसथांब्याजवळ नेऊन उभे केले आणि इथे येणारी बस...ही माझ्या इच्छितस्थळी पोचवणारी असेल असे सांगितले...

दिल्लीतल्या बसेस कधीच थांब्यावर थांबत नाहीत...त्या एकतर थांब्याच्या बर्‍याच पुढे जाऊन थांबतात अथवा अजिबात न थांबता फक्त थांब्याच्या आसपास कमी वेगाने धावतात...त्यात आपण आपल्याला लोटून द्यायचे असते...पण आता माझ्यासारख्या आंधळ्याला हे कसे जमणार? माझ्या नशिबाने तो बस सुटण्याचा सुरुवातीचा थांबा होता...त्यामुळे मी त्यात व्यवस्थित चढू शकलो...अमूक ठिकाण आलं की मला सांगा असे वाहकाला सांगून त्याच्या जवळच्या जागेवर बसलो.

इतकं सगळं होऊनही मी निवांत नव्हतो...मनात एकच धाकधूक...हा माणूस सांगेल ना आपल्याला,  आपला थांबा आल्यावर....त्यामुळे डोळे फाडफाडून बाहेर पाहात होतो....बाहेर काय दिसणार म्हणा....सगळीकडे एकच चित्र....एखाद्या कॅनव्हासवर नुसतेच रंग ओतल्यावर दिसतं तस आकारहीन...अस्पष्ट असं...
सगळंच सारखं दिसत असल्यामुळे असेल कदाचित...अरे, किती वेळ लागतोय? अजून कसा  नाही आला माझा थांबा...अधीर मन क्षणाक्षणाला अजून अधीर होत होते आणि त्या नादातच कसा बसा हेलपाटत एका थांब्यावर उतरलो.

रात्र फार झाली होती अशातला भाग नाही...पण एकूणच दिल्लीत पादचारी...रस्त्याने चालणारा माणूस अशा अवेळी दिसणं कठीणच. त्यात नुकतीच थंडी सुरु झालेली...त्यामुळेही सगळं कसं चिडीचूप होतं....रस्त्यावरून  धावणारी वाहनंही तुरळक होती पण जी होती ती भरधाव वेगाने धावणारी होती....मला रस्ता ओलांडायचा होता...दूरून येणारे वाहन...नेमके किती दूर आहे तेही कळत नव्हते...कुणाची मदत घ्यावी तर दूरदूरपर्यंत चिटपाखरूही नव्हते...फक्त रस्त्यावरचे प्रखर प्रकाश ओकणारे दिवे तेच काय ते माझ्या साथीला होते...पण तो प्रकाशही असा नुसता...विस्कटलेला,उसवलेला वाटत होता...डोळ्यासमोर कोणतेही रेखीव आकार दिसतच नव्हते...सगळेच असरट-पसरट...अशा अवस्थेत रस्ता ओलांडण्याचा कैक वेळेला केलेला प्रयत्न आयत्या वेळी उगवणार्‍या एखाच्या चुकार भरधाव वाहनाने अयशस्वी होत होता...एकदोन वेळा गाडी अंगावर येता येताही वाचलो...वर चालकाच्या भरपूर शिव्याही खाल्ल्या... हो, नाही..करता करता कसाबसा रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला पोचलो....चाचपडत , खुरड्त, हेलपाटत कसाबसा घराचा शोध घेत होतो...दिल्लीत घरंही एकाच पद्धतीने बांधलेली...एकाच पद्धतीने रंगवलेली....अर्थात हे रंग वगैरेही मला दिसत नव्हते...आणि त्या इमारतीवर अगदी मोठ्या आकड्यात लिहिलेले क्रमांकही दिसत नव्हते...त्यामुळे माझे निवासस्थान शोधणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्याइतके कठीण झाले होते....

त्या इतक्या मोठ्या वसाहतीत कुणीही घराबाहेर दिसत नव्हतं...त्यामुळे विचारायचं तरी कुणाला आणि सांगायचं तरी कुणाला? त्या संपूर्ण वसहतीला माझ्या चारपाच फेर्‍या तरी मारून झाल्या असतील....कुणी मला त्या अवस्थेत पाहिले असेलच तर त्यांना, कुणी तरी चोर ठेहळणी करण्यासाठी आला असावा...असेही वाटू शकले असेल. पण माझा शोध काही संपता संपत नव्हता....एखाद्या दारूड्याप्रमाणे मी हेलपाटत, भेलकांडत घराचा शोध घेत होतो...तुम्हा कुणाला अनुभव आहे की नाही माहित नाही पण माझा असा अनुभव आहे की दृष्टी अधू झाली की आपले चालणेही आपोआप बेताल होते...आपल्या पायांवरही आपलं नियंत्रण राहात नाही.

नटसम्राटमधल्या अप्पासाहेब बेलवलकारांच्याहीपेक्षा जास्त आर्ततेने मी मनातल्या मनात म्हणत होतो...अरे कुणी घर दाखवता का घर...मी जिथे राहतो ते घर.
अशीच घरघर लागलेली असतांना शेवटी मी थकलो...पायातलं त्राणही संपलं होतं....एका इमारती समोरच्या गवतावर बसलो...बसत्याचा आडवा झालो...आणि आकाशातले तारे पाहता पाहता कधी डोळा लागला ते कळलंच नाही.

मला गदगदा हलवून कुणी तरी उठवत होतं...अरे देव, इथे कशाला झोपलास? चल खोलीत चल आणि झोप...असं काहीसं ऐकू येत होतं...हळूहळू मी भानावर आलो आणि पाहिले तो रामदास मला उठवत होता...योगायोगाने मी आमच्याच इमारतीसमोरच्या गवतावर झोपलो होतो. मी झटकन रामदासचा हात धरला आणि त्याच्या बरोबर वर गेलो...सर्वात आधी माझा चष्मा डोळ्याला लावला आणि...हुश्श...माणसात आलो.

मी खोलीवर पोचलो तेव्हा साडेअकरा वाजले होते....नेहमी साधारणपणे ९च्या आसपास घरी पोचणार्‍या मला इतका वेळ का लागला म्हणून सिब आणि रामदास दोघेही चिंतेत पडले होते....पण ते तरी मला कुठे शोधणार होते?  दोघेही आलटून पालटून घरातल्या घरात येरझारा घालत सर्व शक्याशक्यतेचा विचार करत होते...सहजपणाने सिब सज्जात आला आणि त्याने गवतावर कुणी माणूस सदृष्य आकृती पाहिली....रामदासलाही त्याने ती  दाखवली...म्हणून उत्सुकतेपोटी रामदासने खाली येऊन पाहिले तो काय....मीच होतो तो!

आधी दोघांची काळजीपोटी/प्रेमापोटी  बोलणी खाऊन घेतली...मग त्यांना झाला प्रकार सांगितला....त्यावर त्यांच्याकडेही काहीच उत्तर नव्हते....कारण आलेली बिकट परिस्थिती ही अचानक आलेली होती....बरं त्यावेळी दूरधनीचं प्रस्थही इतकं माजलं नव्हतं...की पावलापावलावर दूध्व करण्याची सोय असावी...दुसरी गोष्ट म्हणजे तशी सोय असती तरी मी कुणाला करणार होतो दूध्व? सिबकडे  नव्हता दूध्व...मग ? अशा परिस्थितीत मी तरी वेगळं काय बरं करू शकलो असतो?

४ मे, २०१०

गमवा, कमवा...

वृत्तपत्रातील ती ठळक बातमी वाचून तमाम वाचकवर्ग... कुणी अचंबित झाला, कुणी नि:शब्द झाला, कुणी ’भारा’वून गेला तर कुणाचा भार ’हलका झाला. मित्रमंडळीत,गाडीत,बसमध्ये,कार्यालयात,शाळांमध्ये,देऊळ-मशीद-गुरुद्वारा-चर्च-जैन मंदिरं, बागा,बाजार....कुठे जाल तिथे....अगदी रेशनच्या रांगेतसुद्धा.....एकच चर्चा सुरु होती...
हे कसं काय शक्य आहे?
पण काही म्हणा..कल्पना एकदम रम्य आहे ना!
खरंच असं व्हायला हवं, मजा येईल.

ही अशीच आणि अशाच आशयांची वाक्य जिथे तिथे ऐकायला येत होती.
बातमीच्या खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा बर्‍याच जणांचा प्रयत्न अयशस्वी होत होता...आपण रांगेत आहात,प्रतीक्षा करा...वगैरे मंजूळ आवाजातल्या तबकड्य़ा ऐकून ऐकून लोक कंटाळून गेले होते.

इथे, ही कल्पना डोक्यात आल्यापासून अत्त्यानंदांची झोप पार उडाली होती....जाहिरातवजा बातमी तर देऊन बसलो खरा...पण हे शक्य कसे करायचे? त्यातून आपण दूरध्वनी,भ्रमणध्वनी वगैरेही देऊन बसलोय...सेकंदा सेकंदाला घंट्या वाजताहेत....लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देता देता अगदी टेकीस आलोय...स्वत:शीच त्यांचा संवाद सुरु होता. गंमती गंमतीत कुणी काही तरी बोलून गेलं आणि आपण ते खूळ उगीच डोक्यात घेतलं...छे. आता ह्यातून वरून ब्रह्मदेवाचा बाप जरी उतरला तरी आपल्याला काही मदत करू शकणार नाही...तरी नशीब आपण आपलं नाव आणि पत्ता दिलेला नाहीये...नाहीतर? नाहीतर काय? लोकांनी आपली पार वाट लावली असती.

हं, पण कल्पना खरंच नामी आहे ह्यात काही शंका नाही...एरवी सकाळपासून शेकडो विचारणा झाल्याच नसत्या. आता खरंच काहीतरी करायला हवंय....काय बरे करावे?


बरं का दाभोळकर, मला दोन प्रकारची यंत्र बनवून हवी आहेत.

कशी? ते आधी सांगा...गिर्‍हाईकाला हवी तशी यंत्र बनवून देण्यात आमचा हात दुसरा कुणीच धरणार नाही...तुम्ही आधी तुमची कल्पना सांगा...मग ती कशी प्रत्यक्षात आणायची ते मी आणि माझे साथीदार पाहून घेऊ.

अत्त्यानंदांनी मग आपली कल्पना दाभोळकरांना सविस्तर समजावून सांगितली...ती कल्पना ऐकतांना क्षणाक्षणाला दाभोळकरांच्या चेहर्‍यावरचे रंग बदलत होते...आधी उत्सुकता,मग आश्चर्य,नंतर आनंद...
शेवटी तर दाभोळकरांनी उठून अत्त्यानंदांना कडकडून मिठीच मारली....

काही म्हणा अत्त्यानंद, तुम्ही खरंच सुपीक डोक्याचे आहात हो....कल्पना नावीन्यपूर्ण तर आहेच...पण त्याहूनही ती भन्नाट आहे...तुम्हाला एक विनंती करू का अत्त्यानंद?

बोला दाभोळकर, काय विनंती आहे तुमची?

अत्त्यानंद, ती दोन्ही यंत्र तर मी बनवतोच....पण सर्वात आधी तुम्ही त्याचा प्रयोग माझ्यावर करावात अशी मी तुम्हाला विनंती करेन...इतकी छोटी विनंती मान्य कराल काय?

दाभोळकर, अहो अजून कशास काही पत्ता नाही, यंत्र बनवायला किती दिवस लागतील,खर्च किती येईल..वगैरे वगैरे गोष्टींबद्दल अजून आपले काहीच बोलणे झालेले नाही...मग इतकी घाई कशाला?

ते सांगतो हो...पण सगळ्यात प्रमूख अट हीच आहे असे समजा...तुम्ही हो म्हणालात तरच मी तुमचे काम हातात घेईन...आता बोला...आहे की नाही माझी विनंती मान्य?

दाभोळकर, तुम्ही मला अगदी पेचात पकडलंत हो....पण हरकत नाही..मला मान्य आहे तुमचं म्हणणं....पहिला प्रयोग आपण तुमच्यावरच करू...मग तर झालं? आता लागा बघू कामाला....मला आता यंत्र बनवायला येणारा खर्च, किती दिवसात बनतील यंत्र...वगैरे माहिती द्या. एकदा खर्चाचा आकडा कळला की मग पुढच्या तयारीला लागता येईल.

अत्त्यानंद, माझी अजून एक विनंती आहे...नाही म्हणू नका...त्यात तुमचाही फायदा आहे.



बोला, दाभोळकर,बोला. आता आडपडदा न ठेवता काय आहे मनात ते सांगा.

अत्त्यानंद, आपण खर्च अर्धा अर्धा वाटून घेतला तर...मला आपल्याशी भागीदारी करायला आवडेल.

दाभोळकर, अहो आवडेल म्हणजे काय...आवडेलच...तसेही सद्द्या माझ्याकडे फार पैसे नाहीयेत..मी देखिल माझ्या काही खास मित्र-मैत्रिणींकडे हात पसरणार होतो...आता तुम्ही स्वत:हून भागीदारी पत्करता आहात तर मग....सोन्याहून पिवळे.

आणि...दाभोळकरांनी ती दोन यंत्र बनवली...अत्त्यानंदांच्या देखरेखीखाली त्याची एकदा कसून तपासणी झाली आणि ...अत्त्यानंदांनी दाभोळकरांना त्या यंत्रावर उभं राहायला सांगितलं....जेमतेम दहा मिनिटे दाभोळकर त्यावर  कसेबसे उभे राहू शकले आणि शेवटी चक्कर येऊन धाडकन्‌ खाली पडले. अत्त्यानंद आणि दाभोळकरांच्या साथीदारांनी मिळून त्यांना उचलून जमिनीवर झोपवले....पाच मिनिटांनी दाभोळकर शुद्धीवर आले....मी कुठे आहे? असा प्रश्न विचारत विचारतच ते सहजपणाने उठून बसले....

आयला, मी इथे जमिनीवर कसा आलो? आणि आता मी इतक्या सहजपणाने कसा उठू शकलो?

अभिनंदन दाभोळकर. आपला प्रयोग अतिशय यशस्वी झालाय. या, उठा आता आणि त्या यंत्राजवळ चला...

दाभोळकरांसहित सगळेजण त्या यंत्राजवळ पोचले....

दाभोळकर ह्या यंत्रात असलेले हे विविध दर्शक काय दाखवताहेत पाहा....त्यात तुम्हाला चटकन समजेल अशी गोष्ट म्हणजे...तुमचं वजन चक्क २ किलोंनी कमी झालंय....अशा गोष्टींची तुम्हाला सवय नसल्यामुळे तुम्ही चक्कर येऊन पडलात...पण घाबरण्याचे काही कारण नव्हते...मला हे असे होणार हे माहित होतेच...म्हणून फक्त पाच दहा मिनिटे तुम्हाला जमिनीवर झोपवून ठेवलं...शुद्धीवर येताच तुम्ही स्वत:हून सहजपणाने उठलात...म्हणजे पाहा...केवळ दोन किलोंचा भार हलका झाला तरी तुमच्यात चैतन्य आलं...आता अजून भार कमी झाला की काय होईल?

अत्त्यानंद,खरंच...जादू आहे हो ही.

अहो खरी जादू तर अजून पुढेच आहे.

ती कशी?

आता ते दुसरं यंत्र ह्या यंत्राला जोडा....आता ह्या तुमच्या एका सहकार्‍याला आपण त्या दुसर्‍या यंत्रावर चढवूया.

त्याने काय होईल?

काय होईल? स्वत:च्याच डोळ्याने पाहा की...

दुसर्‍या यंत्रावर त्या सहकार्‍याला चढवलं...केवळ पाच मिनिटं ते मशीन चालवलं...आणि
याऽऽहू! असे ओरडत त्या सहकार्‍याने आनंदाने हवेतल्या हवेत उडी मारली.

तो असा का ओरडतोय हो अत्त्यानंद...दाभोळकरांचा प्रश्न.

कारण...कारण तुमचे दोन किलो आपण त्याच्यात भरले...काटकुळ्या शरीराच्या तुमच्या सहकार्‍याला ते दोन किलो मिळताच...त्याच्यात एकदम शक्ति संचारली...दुसरं काय!

पण अत्त्यानंद, मला सांगा...तुम्ही दोन यंत्र का बनवायला सांगितलीत...हीच व्यवस्था एकातही करता आली नसती का?

हो, तसेही करता आले असते...पण ह्या दोन यंत्रांचा उपयोग असा आहे की...एकीकडे कमी होणे सुरु होईल तर दुसरीकडे वाढायला सुरुवात होईल...एका लयीत सगळं घडेल आणि आपलं कामही झटपट होईल.

मग, आता ह्याचा उपयोग लगेच सुरु करायचा?

नाही. आधी काही नियम बनवायला लागतील...एका वेळी किती वजन घटवायचे...किती वाढवायचे...ज्यांना वजन वाढवायचे/घटवायचे आहे त्यांचे वय,व्यवसाय,आहार वगैरे बाबी लक्षात घेऊन काही बारीक सारीक बदल ह्या यंत्रात करावे लागतील...त्यानंतर एक आदर्श तक्ता तयार करून त्या पद्धतीने वजन  घटवणे/वाढवणे वगैरे करता येईल...
आजपर्यंत वजन कमी करता येण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी बरेच उपाय होते...पण असे एकाचे घटवून दुसर्‍याचे वाढवणे.....


अहो बाबा, उठा. हे झोपेत काय बडबडताय? घटवणे /वाढवणे...कमवा/गमवा..

छ्या! काय मस्त स्वप्नं पडलं होतं...मी दोन मशीन बनवून घेतलेली...

जाऊ द्या हो. काहीतरी, जगावेगळ्या गोष्टी डोक्यात ठेवता आणि मग तेच तुम्हाला स्वप्नात दिसतं...चला आता उठा...बस्स झालं तुमचं स्वप्न पाहाणं...पटापट दात घासा आणि या चहा प्यायला...चांगला, आलं घालून केलाय चहा.

हो,येतोच,तू हो पुढे.

या लवकर...पुन्हा झोपू नका बरं का!!!