माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

४ मे, २०१०

गमवा, कमवा...

वृत्तपत्रातील ती ठळक बातमी वाचून तमाम वाचकवर्ग... कुणी अचंबित झाला, कुणी नि:शब्द झाला, कुणी ’भारा’वून गेला तर कुणाचा भार ’हलका झाला. मित्रमंडळीत,गाडीत,बसमध्ये,कार्यालयात,शाळांमध्ये,देऊळ-मशीद-गुरुद्वारा-चर्च-जैन मंदिरं, बागा,बाजार....कुठे जाल तिथे....अगदी रेशनच्या रांगेतसुद्धा.....एकच चर्चा सुरु होती...
हे कसं काय शक्य आहे?
पण काही म्हणा..कल्पना एकदम रम्य आहे ना!
खरंच असं व्हायला हवं, मजा येईल.

ही अशीच आणि अशाच आशयांची वाक्य जिथे तिथे ऐकायला येत होती.
बातमीच्या खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा बर्‍याच जणांचा प्रयत्न अयशस्वी होत होता...आपण रांगेत आहात,प्रतीक्षा करा...वगैरे मंजूळ आवाजातल्या तबकड्य़ा ऐकून ऐकून लोक कंटाळून गेले होते.

इथे, ही कल्पना डोक्यात आल्यापासून अत्त्यानंदांची झोप पार उडाली होती....जाहिरातवजा बातमी तर देऊन बसलो खरा...पण हे शक्य कसे करायचे? त्यातून आपण दूरध्वनी,भ्रमणध्वनी वगैरेही देऊन बसलोय...सेकंदा सेकंदाला घंट्या वाजताहेत....लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देता देता अगदी टेकीस आलोय...स्वत:शीच त्यांचा संवाद सुरु होता. गंमती गंमतीत कुणी काही तरी बोलून गेलं आणि आपण ते खूळ उगीच डोक्यात घेतलं...छे. आता ह्यातून वरून ब्रह्मदेवाचा बाप जरी उतरला तरी आपल्याला काही मदत करू शकणार नाही...तरी नशीब आपण आपलं नाव आणि पत्ता दिलेला नाहीये...नाहीतर? नाहीतर काय? लोकांनी आपली पार वाट लावली असती.

हं, पण कल्पना खरंच नामी आहे ह्यात काही शंका नाही...एरवी सकाळपासून शेकडो विचारणा झाल्याच नसत्या. आता खरंच काहीतरी करायला हवंय....काय बरे करावे?


बरं का दाभोळकर, मला दोन प्रकारची यंत्र बनवून हवी आहेत.

कशी? ते आधी सांगा...गिर्‍हाईकाला हवी तशी यंत्र बनवून देण्यात आमचा हात दुसरा कुणीच धरणार नाही...तुम्ही आधी तुमची कल्पना सांगा...मग ती कशी प्रत्यक्षात आणायची ते मी आणि माझे साथीदार पाहून घेऊ.

अत्त्यानंदांनी मग आपली कल्पना दाभोळकरांना सविस्तर समजावून सांगितली...ती कल्पना ऐकतांना क्षणाक्षणाला दाभोळकरांच्या चेहर्‍यावरचे रंग बदलत होते...आधी उत्सुकता,मग आश्चर्य,नंतर आनंद...
शेवटी तर दाभोळकरांनी उठून अत्त्यानंदांना कडकडून मिठीच मारली....

काही म्हणा अत्त्यानंद, तुम्ही खरंच सुपीक डोक्याचे आहात हो....कल्पना नावीन्यपूर्ण तर आहेच...पण त्याहूनही ती भन्नाट आहे...तुम्हाला एक विनंती करू का अत्त्यानंद?

बोला दाभोळकर, काय विनंती आहे तुमची?

अत्त्यानंद, ती दोन्ही यंत्र तर मी बनवतोच....पण सर्वात आधी तुम्ही त्याचा प्रयोग माझ्यावर करावात अशी मी तुम्हाला विनंती करेन...इतकी छोटी विनंती मान्य कराल काय?

दाभोळकर, अहो अजून कशास काही पत्ता नाही, यंत्र बनवायला किती दिवस लागतील,खर्च किती येईल..वगैरे वगैरे गोष्टींबद्दल अजून आपले काहीच बोलणे झालेले नाही...मग इतकी घाई कशाला?

ते सांगतो हो...पण सगळ्यात प्रमूख अट हीच आहे असे समजा...तुम्ही हो म्हणालात तरच मी तुमचे काम हातात घेईन...आता बोला...आहे की नाही माझी विनंती मान्य?

दाभोळकर, तुम्ही मला अगदी पेचात पकडलंत हो....पण हरकत नाही..मला मान्य आहे तुमचं म्हणणं....पहिला प्रयोग आपण तुमच्यावरच करू...मग तर झालं? आता लागा बघू कामाला....मला आता यंत्र बनवायला येणारा खर्च, किती दिवसात बनतील यंत्र...वगैरे माहिती द्या. एकदा खर्चाचा आकडा कळला की मग पुढच्या तयारीला लागता येईल.

अत्त्यानंद, माझी अजून एक विनंती आहे...नाही म्हणू नका...त्यात तुमचाही फायदा आहे.बोला, दाभोळकर,बोला. आता आडपडदा न ठेवता काय आहे मनात ते सांगा.

अत्त्यानंद, आपण खर्च अर्धा अर्धा वाटून घेतला तर...मला आपल्याशी भागीदारी करायला आवडेल.

दाभोळकर, अहो आवडेल म्हणजे काय...आवडेलच...तसेही सद्द्या माझ्याकडे फार पैसे नाहीयेत..मी देखिल माझ्या काही खास मित्र-मैत्रिणींकडे हात पसरणार होतो...आता तुम्ही स्वत:हून भागीदारी पत्करता आहात तर मग....सोन्याहून पिवळे.

आणि...दाभोळकरांनी ती दोन यंत्र बनवली...अत्त्यानंदांच्या देखरेखीखाली त्याची एकदा कसून तपासणी झाली आणि ...अत्त्यानंदांनी दाभोळकरांना त्या यंत्रावर उभं राहायला सांगितलं....जेमतेम दहा मिनिटे दाभोळकर त्यावर  कसेबसे उभे राहू शकले आणि शेवटी चक्कर येऊन धाडकन्‌ खाली पडले. अत्त्यानंद आणि दाभोळकरांच्या साथीदारांनी मिळून त्यांना उचलून जमिनीवर झोपवले....पाच मिनिटांनी दाभोळकर शुद्धीवर आले....मी कुठे आहे? असा प्रश्न विचारत विचारतच ते सहजपणाने उठून बसले....

आयला, मी इथे जमिनीवर कसा आलो? आणि आता मी इतक्या सहजपणाने कसा उठू शकलो?

अभिनंदन दाभोळकर. आपला प्रयोग अतिशय यशस्वी झालाय. या, उठा आता आणि त्या यंत्राजवळ चला...

दाभोळकरांसहित सगळेजण त्या यंत्राजवळ पोचले....

दाभोळकर ह्या यंत्रात असलेले हे विविध दर्शक काय दाखवताहेत पाहा....त्यात तुम्हाला चटकन समजेल अशी गोष्ट म्हणजे...तुमचं वजन चक्क २ किलोंनी कमी झालंय....अशा गोष्टींची तुम्हाला सवय नसल्यामुळे तुम्ही चक्कर येऊन पडलात...पण घाबरण्याचे काही कारण नव्हते...मला हे असे होणार हे माहित होतेच...म्हणून फक्त पाच दहा मिनिटे तुम्हाला जमिनीवर झोपवून ठेवलं...शुद्धीवर येताच तुम्ही स्वत:हून सहजपणाने उठलात...म्हणजे पाहा...केवळ दोन किलोंचा भार हलका झाला तरी तुमच्यात चैतन्य आलं...आता अजून भार कमी झाला की काय होईल?

अत्त्यानंद,खरंच...जादू आहे हो ही.

अहो खरी जादू तर अजून पुढेच आहे.

ती कशी?

आता ते दुसरं यंत्र ह्या यंत्राला जोडा....आता ह्या तुमच्या एका सहकार्‍याला आपण त्या दुसर्‍या यंत्रावर चढवूया.

त्याने काय होईल?

काय होईल? स्वत:च्याच डोळ्याने पाहा की...

दुसर्‍या यंत्रावर त्या सहकार्‍याला चढवलं...केवळ पाच मिनिटं ते मशीन चालवलं...आणि
याऽऽहू! असे ओरडत त्या सहकार्‍याने आनंदाने हवेतल्या हवेत उडी मारली.

तो असा का ओरडतोय हो अत्त्यानंद...दाभोळकरांचा प्रश्न.

कारण...कारण तुमचे दोन किलो आपण त्याच्यात भरले...काटकुळ्या शरीराच्या तुमच्या सहकार्‍याला ते दोन किलो मिळताच...त्याच्यात एकदम शक्ति संचारली...दुसरं काय!

पण अत्त्यानंद, मला सांगा...तुम्ही दोन यंत्र का बनवायला सांगितलीत...हीच व्यवस्था एकातही करता आली नसती का?

हो, तसेही करता आले असते...पण ह्या दोन यंत्रांचा उपयोग असा आहे की...एकीकडे कमी होणे सुरु होईल तर दुसरीकडे वाढायला सुरुवात होईल...एका लयीत सगळं घडेल आणि आपलं कामही झटपट होईल.

मग, आता ह्याचा उपयोग लगेच सुरु करायचा?

नाही. आधी काही नियम बनवायला लागतील...एका वेळी किती वजन घटवायचे...किती वाढवायचे...ज्यांना वजन वाढवायचे/घटवायचे आहे त्यांचे वय,व्यवसाय,आहार वगैरे बाबी लक्षात घेऊन काही बारीक सारीक बदल ह्या यंत्रात करावे लागतील...त्यानंतर एक आदर्श तक्ता तयार करून त्या पद्धतीने वजन  घटवणे/वाढवणे वगैरे करता येईल...
आजपर्यंत वजन कमी करता येण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी बरेच उपाय होते...पण असे एकाचे घटवून दुसर्‍याचे वाढवणे.....


अहो बाबा, उठा. हे झोपेत काय बडबडताय? घटवणे /वाढवणे...कमवा/गमवा..

छ्या! काय मस्त स्वप्नं पडलं होतं...मी दोन मशीन बनवून घेतलेली...

जाऊ द्या हो. काहीतरी, जगावेगळ्या गोष्टी डोक्यात ठेवता आणि मग तेच तुम्हाला स्वप्नात दिसतं...चला आता उठा...बस्स झालं तुमचं स्वप्न पाहाणं...पटापट दात घासा आणि या चहा प्यायला...चांगला, आलं घालून केलाय चहा.

हो,येतोच,तू हो पुढे.

या लवकर...पुन्हा झोपू नका बरं का!!!

१४ टिप्पण्या:

आनंद पत्रे म्हणाले...

हे..हे...हे... हे बझ सगळ्यांच्या स्वप्नात येत आहे... ;-) मस्तंच

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद आनंद.
बझ स्वप्नात नाही आलं...
हे स्वप्नंच स्वप्नात आलं. ;)

श्रेया रत्नपारखी म्हणाले...

प्रतिक्रिया नाही अजिबात.....त्या यंत्राकरता माझा नंबर लावून ठेवा काका.

मी अत्त्यानंद म्हणाले...

श्रेया, घाबरू नकोस, तुझ्या त्या तळवलकराला बी त्ये यंत्र मी विकणार आहे. ;)

THE PROPHET म्हणाले...

आयला...आयडियाची कल्पना भन्नाट आहे एकदम....

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद विद्याधर(प्रोफेट).

canvas म्हणाले...

अत्त्यानंद महाराज, मला बी या यंत्राची ली गरज आहे बा. माझा बी नंबर लावून ठेवा.

मी अत्त्यानंद म्हणाले...

कॅनवास शेठ...घाबरू नका..तुमचीही सोय जरूर करू.

हेरंब म्हणाले...

हा हा काका, एकदम भन्नाट आयडियेची कल्पना आहे ही !! आवडेश !!

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद हेरंब.

मदनबाण म्हणाले...

हा.हा.हा...बुवा सपन मंदी काय बघतील त्याचा काय बी भरोसा नाय !!!

मी अत्त्यानंद म्हणाले...

सपनात कुनीबी,कायबी बगू शक्तं...नाय नाय...करू बी शक्तं बर्र का मदनबुवा.

Sarika म्हणाले...

काका,

काय... फिरकीच घेताय.. यंत्राच्या लाइन मध्ये माझा नंबर राखुन ठेवा...

मी अत्त्यानंद म्हणाले...

सारिका, बिनघोर राहा..माझ्या नेहमीच्या मित्र-मैत्रिणींसाठी एक स्वस्तातले घरगुती यंत्रही बनवणार आहे. यंत्र अगदी घरपोच मिळेल...काळजी नसावी. ;)