माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२४ एप्रिल, २००७

माझ्या 'बुध्दीचे बळ'! २

बुद्धिबळ हा असा एक खेळ आहे की एकदा का कुणी त्याच्या फंदात पडला ना की मग त्याच्याशिवाय त्याला दुसरे काहीच सुचत नाही. इतर गोष्टी करत असतानाही आपण त्याआधी खेळलेला डाव जसाच्या तसा मनाच्या एका कोपर्‍यात मांडलेला असतो आणि त्यात अमुक एक खेळी केली होती त्याऐवजी दुसरी एखादी खेळी केली असती तर.... वगैरे वगैरे गोष्टींचे रवंथ चालूच असते. हा खेळ एखाद्याला वेडही लावू शकतो.

आम्हा तिघाही भावांचे असेच झाले होते. उठता-बसता,खाता-पिता,झोपेतही ह्याच गोष्टीने पछाडल्यासारखे आम्ही त्या वेळी वागत होतो. जरा मोकळा वेळ मिळाला की डाव मांडलाच म्हणून समजा आणि मग तासंतास त्यात डोकी घासत बसायचो. हरणारा चिडायचा,जिंकणारा हसायचा आणि मग चिडवाचिडवी,त्यावरून मारामार्‍या. आव्हानं-प्रतिआव्हानं! असं सगळं वातावरण भारलेले होते.तसा मी जात्याच कोणताही खेळ ईर्ष्येने खेळणार्‍यांपैकी नव्हतो आणि आजही नाही. खेळाचा आनंद लुटायचा हा माझा स्वभाव. त्यामुळे जिंकण्याचे सोयर नसायचे आणि हरण्याचे सुतक नसायचे. त्या मानाने माझे दोघे भाऊ जास्त जिद्दीने खेळायचे. त्यातल्या त्यात लहान भाऊ तर जिंकण्याच्या ईर्ष्येनेच खेळायचा आणि जिंकायचाही! आणि जिंकला की मग खूपच मोठमोठ्याने आनंद व्यक्त करायचा;पण कधी कधी हरायचाही की मग भांडाभांडीला तयार असायचा. त्यामुळे मग घरातले वातावरण एकदम गरम व्हायचे. आई अशावेळी आमच्या सोंगट्या आणि पट काढून घेत असे आणि आम्हाला तिघांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी बसवत असे.बर्‍याच वेळा असे झालेय की आमची भांडण टाळण्यासाठी ती पट वगैरे लपवून ठेवायची.

अशा तर्‍हेने बुद्धिबळाचे वेड आम्हाला लागलेले होते तरी आमचा खेळ तसा प्राथमिक स्तरावरच होता. त्याकाळी जे नियम आम्ही पाळत असायचो ते धड भारतीय पद्धतीचेही नव्हते अथवा आंतर्राष्ट्रीय पद्धतीचेही नव्हते. सगळ्याच नियमांची खिचडी असे आमचे नियम होते. पण जसे जसे आणखी खेळत गेलो तेव्हा लक्षात आले की कुठेही एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा झाल्यास तिथे आंतर्राष्ट्रीय नियमांप्रमाणे खेळावे लागते.म्हणून मग ते नियम माहीत करून घेण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू झाला.हळूहळू ते नियमही माहीत होऊ लागले आणि आम्ही त्याप्रमाणेच खेळू लागलो.

आता वर्ष नक्की आठवत नाही पण साधारण १९७३-७४ साली(त्यावेळी मी आणि माझा मोठा भाऊ नोकरीला लागलेलो होतो) वृत्तपत्रात एका बुद्धिबळ स्पर्धेची जाहिरात पाहिली आणि मी आणि माझ्या मोठ्या भावाने त्यात भाग घ्यायचे ठरवले. ही स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची समजली जात असे(हे आम्हाला नंतर कळले). सयानी मार्ग,एलफिन्स्टन रोड येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधे निर्माण करणार्‍या झंडू फार्मसीच्या उपाहारगृहात(कॅन्टिन) ही स्पर्धा होत असे. आम्ही दोघे तिथे गेलो आणि वर्गणी भरून नाव नोंदवले. तिथले नियम समजावून घेतले . स्पर्धा साखळी पद्धतीने होणार होती. प्रत्येक खेळाडूला ९फेर्‍यातून ९डाव खेळायचे होते. रोज संध्याकाळी ६ते रात्री १० वाजेपर्यंत(प्रत्येकी एक फेरी) अशा तर्‍हेने सतत ९दिवस ही स्पर्धा चालणार होती. ही स्पर्धा नवोदितांसाठी होती(एनट्रंट्स साठी) .

ह्या अशा तर्‍हेच्या स्पर्धेत आम्ही पहिल्यांदाच भाग घेत होतो त्यामुळे उत्सुकता आणि भिती अशा संमिश्र भावनांसहित आम्ही दोघे ठरलेल्या दिवशी तिथे दाखल झालो. तिथे जाऊन पाहतो तो काय...........५०टेबले एका रांगेत मांडलेली होती.प्रत्येक टेबलावर एकेक पट मांडून ठेवलेला होता. पटाशेजारीच दोन घड्याळांचा असा एकेक संच(स्टॉप वॉचेस), बसायला टेबलांच्या दोन्ही बाजूंना ऐसपैस खुर्च्या,टेबलावर पाणी पिण्यासाठी तांब्याभांडे, सिगरेट पिणार्‍यांसाठी रक्षापात्र(ऍश ट्रे) असा सगळा जामानिमा होता. हे सगळे पाहूनच आमची छाती दडपून गेली. इथे आपल्या सारख्यांचे कसे होणार? मनात हा एकच प्रश्न घोळायला लागला.

आमच्यासहित सर्व खेळाडूंनी त्यांना सांगितलेल्या जागांवर बसून घेतले. घड्याळ कसे वापरायचे ते समजावून सांगितले गेले. तसेच एक कागद आणि पेनही देण्यात येऊन त्यावर आपल्या व प्रतिस्पर्ध्याच्या खेळी लिहाव्यात अशी सूचना देण्यात आली. आम्हा दोघांना हे सगळे नवीनच होते. घड्याळ काय, खेळी लिहिणे काय?

खेळाला सुरुवात करण्यापूर्वी काळ्या की पांढऱ्या सोंगट्यांनी खेळायचे ह्याबद्दल काटा-छापा झाले. त्यात मला काळ्या सोंगट्या मिळाल्या. माझा भाऊ माझ्यापासून बराच दूर होता त्यामुळे त्याला काय मिळाले कळले नाही. हे सगळे सोपस्कार झाल्यावर डाव सुरू करण्याची सूचना मिळाली आणि माझ्या प्रतिस्पर्ध्याने राजाच्या पुढचे प्यादे दोन घरे पुढे सरकवले आणि चटकन घड्याळाचा खटका दाबला आणि आपल्या कागदावर ती खेळी लिहिली(बहुतेक सराईत गडी असावा!). त्याला मी उजव्या हाताच्या हत्तीच्या पुढचे प्यादे पुढे करून उत्तर दिले(इथेच तो समजून गेला की भिडू अगदीच कच्चा आहे!). माझा अशा तऱ्हेच्या स्पर्धेत खेळण्याचा पहिलाच अनुभव असल्याने मला सुचेल तसे मी खेळत होतो.माझे घड्याळाकडे लक्षच नव्हते. प्रतिस्पर्ध्याने घड्याळाचा खटका दाबल्यामुळे माझे घड्याळ सुरू झाले होते आणि ते तसेच चालू राहिले कारण मी खटका दाबायचा पार विसरून गेलो होतो.त्यामुळे माझ्या घड्याळात एक तास झालेला दिसत होता तरी त्याचे घड्याळ जैसे थेच होते.माझे नवखेपण त्याच्या केव्हाच लक्षात आले होते;पण हे सगळे त्याच्या फायद्याचे असल्यामुळे त्याने मला ते तसे जाणवू दिले नाही.कागदावर खेळी कशी लिहायची हे देखिल माहीत नसल्यामुळे मी डाव लिहूनही काढत नव्हतो. माझे सर्व लक्ष त्याच्या आणि माझ्या खेळीकडे लागलेले होते.

बुद्धिबळाच्या ह्या खेळात नियमाप्रमाणे पहिल्या दोन तासात प्रत्येकाच्या निदान ४० खेळ्या होणे जरूरीचे असते, ते तसे झाले नाही तर ज्याच्या ४० पेक्षा कमी खेळी असतील तो हरला असे मानले जाते.त्यामुळे माझ्या घड्याळात जेव्हा दोन तास व्हायला आले होते(फक्त ३ मिनिटं बाकी होती) तेव्हा माझ्या ३०च खेळ्या झाल्या होत्या.साहजिकच त्याच्याही तितक्याच खेळ्या झालेल्या होत्या तरी त्याचे घड्याळ जेसे थे(सुरुवातीच्या) अवस्थेतच होते. आता मला राहिलेल्या तीन मिनिटात १० खेळ्या करणे भाग होते(त्याच्यावर तसे दडपण नव्हते ते केवळ माझ्या चुकीमुळे) आणि मी त्या करू न शकल्यामुळे मला तो डाव गमवावा लागला. खरे सांगायचे तर माझी परिस्थिती उत्तम होती आणि तो डाव मीच जिंकला असता;पण केवळ तांत्रिक कारणास्तव मी तो डाव गमावून बसलो होतो.

तिथे माझ्या भावाबरोबर खेळणारा प्रतिस्पर्धीही त्याच्यासारखाच नवीन होता त्यामुळे घड्याळ बाजूला ठेवूनच दोघे खेळले आणि त्यात माझ्या भावाचा विजय झाला.

क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: