माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
इतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१६ फेब्रुवारी, २०१९

पुन्हा एकदा...वजन कमी केले आणि पोटाचा घेरही...


२१ डिसेंबर २०१८ ते आजपर्यंत, वजन  ७२किलोवरून ६६.८० किलोपर्यंत घटवलंय....आणि पोटाचा घेरही कमी केलाय...तरीही अजून संघर्ष जारी आहे....

गेली तीन-चार वर्ष व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणं बंद झालेलं...कारण होतं गोठलेला खांदा...शुद्ध मराठीत त्याला फ्रोजन शोल्डर असं काहीसं म्हणतात. तसा घरी मी व्यायाम करत नव्हतो असं नाही पण तो फारच जुजबी स्वरूपातला होता. त्यामुळे साहजिकच वजन आणि पोटाचा घेर वाढत गेला. ६६ किलोवरून वजन ७२ च्या वर सरकलं आणि पोटही नेहमीच्या पॅंटमध्ये मावेना...साहजिकच दोन नव्या पॅंट घ्याव्या लागल्या.

वजन वाढल्याचं फार काही वाटलं नाही कारण ते कमी करणे फारसे कठीण नाही हे मी स्वानुभवाने जाणतो. मात्र वाढलेलं पोट कमी करणे हे मात्र भलतंच कठीण आणि किचकट काम आहे...पोट हा सगळ्यात हट्टी अवयव आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो आणि म्हणूनच काळजी वाटायला लागली. आहार नियंत्रण मुख्य आणि नियमित मध्यम प्रतीचा व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहू शकते-कमी होऊ शकते हा अनुभव पदरी आहे म्हणूनच तसा निश्चिंत होतो पण पोटाचं काय करायचं ह्याबद्दल गंभीरपणे विचार करायला लागलो...पोटाचे असे खास व्यायाम अाहेत आणि मी ते करायला सुरूवातही केली. महाजालावरही  काही नवीन प्रकार सापडले...तेही रोजच्या व्यायामात सामील केले..दोन-तीन महिने हे सगळे निष्ठेने केले...पण पोटाचा घेर जैसे थे. मग पुन्हा विचारचक्र सुरू झालं...रोजच्या खाण्याची आणि शारिरीक हालचालीची खानेसुमारी सुरू केली.

खाणं तर माझं खूपच मर्यादित आहे. मी गेली काही वर्ष फक्त एकवेळच जेवतोय. तेही मोजकंच... बाकी दिवसभरात दोन वेळा चहा किंवा काॅफी, दुपारच्या चहासोबत थोडं अबर-चबर (चिवडा, खाकरा, शेव-गाठ्या वगैरेपैकी एखादा पदार्थ) आणि रात्री एक कप दूध. कधीतरी अचानक शेजारून काही अालंच तर तेही खात असे. माझं जेवण पाहून माझे मित्र मला नेहमी हसत असतात, काळजीही करतात...मी उगाच मन मारतोय असं समजतात...पण मी त्यांना दाद देत नाही.
  तरीही खाण्यातले ते अबर-चबर पदार्थ आणि शेजारून आयत्या वेळी येणारे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचं ठरवलं..शेजाऱ्यांनाही सांगून टाकलं...आता काही पाठवू नका...मी डायेट करतोय म्हणून. त्यांनी ते हसण्यावारी नेलं आणि पदार्थ पाठवणं थांबवलं नाही. पण मी ते स्वीकारणंच बंद केलं...मग त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी आयत्या वेळी पदार्थ पाठवणं बंद केलं.  मी ठरवलं तसं  काटेकोरपणे पाळलं...त्याचा परिणाम म्हणून महिनाभरात वजन किलो-दीड किलोने खाली आलं पण अजूनही पोटोबा काही दाद देत नव्हते...

पुन्हा विचार करायला लागलो...आता खाणं तर कमी करणं शक्यच नव्हतं म्हणून मग ठरवलं की आता शारिरीक मेहनत जास्त करायची. पण प्रश्न असा उभा राहिला की नेमकं काय करायचं? पुन्हा व्यायामशाळेत जायचं?
नको...आता पुन्हा खांदा दुखवायला नको. त्यापेक्षा आपण रोजचं चालणं वाढवुया. पण त्यातही भरपूर व्यत्यय येतात. रस्त्यात कुणी भेटलं  की आपण चालणं विसरून गप्पांत रमतो. अरे मग करायचं तरी काय ?

ठरलं एकदाचं...चालायचं/धावायचं...बाहेर/घरातल्या घरात...जिथे जसे जमेल तसे, जमेल तेवढे...नंतर हळूहळू वाढवत न्यायचं. हं, तरीही एक प्रश्न उरतोय...किती चाललो/धावलो ह्याची नोंद कशी ठेवायची ?
तोही प्रश्न सुटला...पावलं मोजणारं एक अॅप (स्टेप काऊंटर) उतरवून घेतलं मोबाईलवर आणि केली एकदाची सुरूवात चालण्या/धावण्याची.  घरात धावायचं आणि बाहेर चालायचं....सुरूवातीला अंदाज नव्हता...आपण एका वेळी किती वेळ आणि किती पावलं चालू शकू?  म्हणून निश्चित असं काही उद्दिष्ट ठेवलं नाही...पण थकेपर्यंत चालायचं इतकंच मनाशी पक्कं केलं आणि केली सुरूवात...२१ डिसेंबर २०१८ रोजी...त्या दिवशी साधारण ५०००+  पाऊले/ ३ किलोमीटर  चाललो/धावलो...त्यानंतर हळूहळू अंतर वाढवत गेलो, पावलंही वाढत गेली...सरासरी १० ते १२हजार पावले / सात-साडेसात किलोमीटर पर्यंत आता मजल पोचलेली आहे... हा उपक्रम सुरू  केल्यापासून साधारण तीन आठवड्याने म्हणजेच जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लक्षात आलं की पॅंट खाली घसरायला लागलेय.  :)
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चक्क पट्टा आवळावा लागला आणि ऊत्सुकता म्हणून जुनी पॅंट चढवून पाहिली आणि थोडी ओढाताण करून तीही पोटावर चढली की हो ! त्यामूळे हुरूप वाढला आणि उपक्रम नेटाने जारी ठेवला...परिणामस्वरूप आज जुनी पॅंट सहजपणे पोटावर चढतेय. मेहेनत केल्याचे सार्थक झाले म्हणायचे, त्यामुळे आता हा उपक्रम शक्य होईल तोवर असाच जारी राहील हे सांगणे नलगे !

कुणीसं म्हणून ठेवलंय....केल्याने होत आहे, आधी केलेचि पाहिजे.
-समाप्त.

२२ मे, २०१५

थोडे-बहुत....

अकबराच्या दरबारामध्ये एकदा एक भाषाप्रभू आलेला आणि त्याने बर्‍याच भाषेत अस्खलितपणे बोलल्यावर....आता माझी मातृभाषा कोणती ते सांगा....असा प्रश्न केला....नेहमीप्रमाणेच दरबारातल्या रथी-महारथींना त्याचे उत्तर देता आले नाही आणि बिरबलाने ते अचूकपणे दिले....कसे दिले ती गोष्ट इथे अभिप्रेत नाही...पण ते उत्तर दिल्यावर त्या भाषाप्रभूने आपला पराभव मान्य केला आणि मग अकबराने बिरबलाला विचारले की तू त्याची मातृभाषा ओळखलीस हे खरे पण तुला येते का ती भाषा?
त्यावरचं बिरबलाचं उत्तर होतं....थोडी-बहुत!
पुन्हा अकबराने प्रश्न केला...थोडी-बहुत हे काय प्रकरण आहे?
तेव्हा बिरबल म्हणाला...महाराज, हे जे भाषाप्रभू आहेत ना त्यांच्या तुलनेत थोडी आणि तुमच्यासारखे जे आहेत की ज्यांना ती भाषा अजिबात माहीत नाही...त्यांच्या दृष्टीने बहुत.

तर मंडळी, हा शब्दप्रयोग मला खूपच  आवडतो आणि माझ्या वैयक्तिक जीवनातही मला तो पदोपदी उपयोगात येत असतो....आता गंमत पाहा....मी एकेकाळी रेडिओ,टीव्ही वगैरेसारखी मनोरंजनाची उपकरणे दुरुस्त करीत असे....तसा माझा त्यात बर्‍यापैकी हात बसला होता आणि डोकंही उत्तम चालत असे...लोक मला एक्स्पर्ट वगैरे म्हणत ....तरीही मी स्वत:ला कधी त्यातला तज्ञ समजत नव्हतो... मी ह्या विषयातलं थोडं-बहुत जाणतो असेच मी म्हणत असे....ह्यावरून काही लोक मला डिवचतही असत...उगाच कशाला कमी लेखताय स्वत:ला किंवा उगाच खोटा विनय कशाला दाखवताय वगैरे...पण वस्तुस्थिती अशी आहे की  हे क्षेत्रच इतके विस्तारित आहे की रोज त्यात नवनवीन काहीतरी होतच असते....त्यामुळे ते सगळं एखाद्याला माहीत असू शकतंच असंही नाही...कुठे तरी आपल्या ज्ञानाला, जाणकारीला मर्यादा ह्या पडतातच.

आता दुसरं उदाहरण आपल्या मातृभाषेचं...मराठीचंच घ्या....मराठी मातृभाषिक म्हणून मराठी बर्‍यापैकी बोलता येतं...पूर्ण शालेय शिक्षण मराठीत म्हणूनही मराठीची जाण अजून वाढली...थोडं-बहुत लेखन केलंय/करतो...तेही मराठीतच...त्यामुळे काहीजणांचा(विशेष करून इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांचा) गैरसमज असा होतो की मी म्हणजे मराठीचा पापडच जणू...पण आता तुम्हीच विचार करा...मी जी  मराठी शिकलो ती मराठी  आणि २०० तीनशे वर्षांपूर्वीची मराठी... ह्यात किती प्रचंड फरक आहे....आपण फक्त एकच उदाहरण घेऊया...आज ज्ञानेश्वरी वाचायची म्हटली तरी त्याचा अर्थ कुणाच्याही मदतीशिवाय( शब्दकोश अथवा ज्ञानेश्वरीचे अभ्यासक) ती पूर्णपणे समजेल काय?
आता मराठीतच असूनही जर मला ज्ञानेश्वरी समजत नसेल तर मी स्वत:ला मराठीचा पापड कसा बरे म्हणू शकेन...पटलं की नाही?
म्हणून म्हणतो की मी थोडी-फार मराठी जाणतो.

कला,क्रिडा आणि अशाच अनेक बाबतीतही आपण असेच...म्हणजे मी थोडे-बहुत जाणतो असे मी म्हणतो...पटलं ना!  
अहो, पटवण्यात मी तसा एक्स्पर्ट आहेच मुळी.  :)))))))))))))))))

आता तुम्हीच विचार करा आणि सांगा...आपण नेहमी आपल्या स्वत:ला कोणत्या तरी विषयातले ’एक्स्पर्ट’ समजत असतो की नाही? पण खरोखरी असतो का तसे?

४ सप्टेंबर, २०१४

पावसाशी संवाद..

ह्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल वगैरे अशा तर्‍हेचे वेधशाळेचे सगळे अंदाज नेहमीप्रमाणेच चुकले...जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून पाऊस जो सुरु झालाय तो सतत पडतोच आहे  आणि ह्यावर्षी तर चांगला भरभरून पडतोय...पाऊस सुरु झाल्यापासून  एकही दिवस कोरडा असा गेलेला नाहीये..अगदी रिमझिम म्हणा किंवा दिवसभरात एखादी सर का होईना...पण अशा पद्धतीने तो रोज हजेरी लावतोच आहे....अर्थात हे मी फक्त मुंबईबद्दल बोलतोय...

तेव्हा मी पावसालाच विचारायचं ठरवलं.
हा आमच्यात घडलेला संवाद....

मी: का रे बाबा, नेहमी त्या वेधशाळेचे अंदाज चुकवतोस? यंदाही तेच केलंस.

पाऊस:.त्याला मी नाही, निदान ह्यावर्षी तरी तूच जबाबदार आहेस.

मी: ( आश्चर्यचकित होऊन म्हटलं)मी? मी काय वरूण देव आहे काय? मी तर प्रमोद देव आहे.

पाऊस: उगाच फालतू विनोद करू नकोस...पण तूच जबाबदार आहेस.

मी: कसा काय बुवा?

पाऊस: ते तुझ्या लहानपणीचे गाणे...ये रे ये रे पावसा, मल्हारमध्ये कुणी गायले आणि तेही एकदा नाही...रोज आपलं तुझं ते दळण सुरुच असतं.

मी: बरं मग, त्याचं काय? तो तर एक गमतीचा भाग होता आणि आहेही.

पाऊस: मग इतकी आळवणी केलीस...तीही मल्हारात..तर यावंच लागलं ना मला.

मी: ह्यॅ! उगाच काहीही फेकू नकोस! मल्हार आणि मल्हाराचे अनेक प्रकार नेहमीच गायले जातात आणि तेही एकापेक्षा एक सरस अशा गायकांकडून...तेव्हा का बरं येत नाहीस तू? मी काही तरी इकडचं तिकडचं ऐकून गायलो तर तू म्हणे आलास आणि नुसता आलासच नाहीस तर इथे मुक्कामही ठोकलास....कोण विश्वास ठेवेल तुझ्या बोलण्यावर?

पाऊस: अरे बाबा, खरंच सांगतोय मी!

मी: बरं ! मग मला सांग, तुला गाणं आवडलं म्हणून तू आलास की....

पाऊस नुसता गालातल्या गालात हसला आणि म्हणाला...तुला जे काही समजायचं ते समज!   ;)

१४ जून, २०१४

प्रभातफेरी....


सुप्रभात मंडळी.
रोज सकाळी हा माणूस फेर्‍या मारता मारता अचानक मध्येच असा का थांबतो , भटक्याच्या प्रग्रातून आकाशाकडे पाहात नेमकं काय टिपतो...ह्याचं नाही म्हटलं तरी किंचित कुतुहल आजूबाजूच्या लोकांना असावं असं वाटतंय खरं...कारण कधी ..वेडाच दिसतोय हा, तर कधी विक्षिप्तच दिसतोय. इतकं काय अगदी त्या आकाशात पाहाण्यासारखे आणि टिपण्यासारखे आहे? अश्या त्यांच्या नजरा सांगतात.  :)
अर्थात अजून कुणी थांबून किंवा थांबवून विचारलेलं नाहीये मला...बहुतेक लोक आपापल्या मस्तीत चालत असतात, फिरत असतात. कुणी ध्यानमग्न असतात, कुणी प्राणायामात गुंग असतात तर कुणी कंपू करून गप्पा मारत असतात किंवा  अगदीच काही नाही तर इथे-तिथे पाहात हात-पाय हालवत बसलेले/उभे असतात...ह्या सगळ्यांना आजूबाजूच्या निसर्गाशी, त्याच्या सतत बदलणार्‍या स्वरूपाशी काहीही देणेघेणे नसते...सूर्य काय रोजच उगवतो..त्यात काय पाहाण्यासारखे असतं बॉ? फार तर उन्हात बसावे, कोवळे ऊन खावे इतपतच ठीक... असाच एकूण सगळ्यांचा आव असतो.

कदाचित तुम्हालाही तसेच वाटत असेल...पण ढगांचे हे वेगेवगळे आविष्कार, सूर्यप्रकाशाचा हा इतका अवर्णनीय खेळ पाहतांना मी तर देहभान हरपून त्यात गुंग होतो...मला अजून एका गोष्टीचे कौतुकही वाटते आणि कमालही वाटते...वारा! ढगांचे सतत बदलणारे आकार तयार करण्याचे काम वारा करत असतो...खरा चित्रकार तोच असावा असेही वाटते...
हिंदीत एक गाणं होतं...ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार....मला वाटतं की हा वाराच ’तो चित्रकार’ असावा...सतत, काही तरी नवे रेखाटणारा.
























३ डिसेंबर, २०१२

रावणकृत शिवतांडव स्तोत्र-गायक रामदास कामत!

महान शिवभक्त दशानन उर्फ लंकापती रावण..ह्यांनी हे स्तोत्र रचलेले आहे. पंडीत रामदास कामतांच्या खड्या आवाजात, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून मी हे असंख्य वेळा ऐकलेलं आहे. पण मंडळी जालावर हे स्तोत्र कुठेच ऐकता येत नाही असे कळले...तेव्हा त्याचा शोध घेतांना हे मला कुलटोडवर सापडले....आता इतरांना ते सहज ऐकता यावे म्हणून मी ते डिवशेयरवर चढवून इथे देत आहे.




जटा कटाहसंभ्रमभ्रम न्निलिंपनिर्झरी
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम

धराधरेंद्रनंदिनी विलास बंधुबंधुर-
स्फुरद्दिगंत संतति प्रमोद मानमानसे
कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि
क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि

जटा भुजंगपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा-
कदंबकुंकुमद्रव प्रलिप्तदिग्वधूमुखे
मदांध सिंधुरस्फुरत्व गुत्तरीयमेदुरे
मनो विनोदद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि


सहस्रलोचनप्रभृत्य शेषलेखशेखर-
प्रसूनधूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः
भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः
श्रिये चिराय जायतां चकोरबंधुशेखरः

ललाटचत्वरज्वल द्धनंजयस्फुलिंगभा-
निपीतपंचसायकं नमन्निलिंपनायकम्
सुधामयुखलेखया विराजमानशेखरं
महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तु नः

२२ जून, २०११

ध्वनीमुद्रण!

बर्‍याच जणांना काही तरी दुसर्‍यांना सांगावेसे वाटते पण देवनागरीत लिहिता येत नाही किंवा लिहायचा कंटाळा असतो. अशा लोकांसाठी एक उपाय आहे तो म्हणजे..जे आपल्याला दुसर्‍याला सांगावेसे वाटते ते ध्वनीमुद्रित करून ऐकवावे...त्यासाठी कुणीही अगदी सहजपणाने आपल्या भ्रमणध्वनीवरील ध्वनीमुद्रक(रेकॉर्डर)वापरू शकतो...पण त्यावरील ध्वनीमुद्रणाचा दर्जा तेवढा खास नसतो..मग काय करायचं? त्यासाठी तेच ध्वनीमुद्रण संगणकावर करावे असे मी सांगेन...

आता तुम्ही म्हणाल ते कसे करावे बरं?
सांगतो.
आपल्या संगणकावर एक ध्वनीमुद्रक असतो..त्यात साधारण एक मिनिटाचे ध्वनीमुद्रण होते...पण ते होते .वॅव(.wav) ह्या प्रकारात...ज्यात फाईलचा आकार मोठा असतो...तो आकार कमी करण्यासाठी मग ही फाईल आपल्याला मप३(mp3) प्रकारात रुपांतरीत करावी लागते..ज्यासाठी वॅवचे मप३ मध्ये रुपांतर करता येणारी प्रणाली लागते...इतकं सगळं करूनही ध्वनीमुद्रण फक्त एकच मिनिटाचे होते आणि त्यात संपादनही करता येत नाही...मग अशा गोष्टीचा काय बरं उपयोग?

मंडळी असे निराश होऊ नका...मी सांगतो तुम्हाला...तुम्हाला हवा तेवढा वेळ बोलता येईल इतके ध्वनीमुद्रण करणारी प्रणाली..ज्यात हव्या तेवढ्या वेळा संपादन करता येते..झालंच तर अशा ध्वनीमुद्रणातून तयार होणार्‍या वॅव फाईलचे मप३ मध्ये सहजपणाने रुपांतर करता येईल अशी सोयही आहे ह्या प्रणालीत...आणि ही प्रणाली पूर्णपणे फुकटही आहे..तेव्हा लागा तयारीला.

ह्या प्रणालीचे नाव आहे ऑडेसिटी(Audacity).
http://audacity.sourceforge.net/download/windows ह्या दुव्यावरून आपण ती आपल्या संगणकावर उतरवून घेऊन वापरू शकता.
१)Windows 98/ME/2000/XP: Audacity 1.2.6 installer (.exe file, 2.1 MB) - The latest version of the free Audacity audio editor..ह्यातले Audacity 1.2.6 installer हे उतरवून घ्यायचंय.
२)आणि मप३ मध्ये रुपांतरण करण्यासाठी ज्या फाईलची गरज असते...ती लेम फाईल ... LAME MP3 encoder - Allows Audacity to export MP3 files.

वर दिलेल्या दोन्ही फाईली उतरवून घेऊन त्याची स्थापना आपण आपल्या संगणकावर केलीत की आपण हवे तेवढे ध्वनीमुद्रण करू शकता....लेम फाईल ही ऑडेसिटीच्या मूळ फोल्डरमध्येच ठेवावी म्हणजे ती त्या प्रणालीला आपोआप जोडली जाते.

ऑडेसिटी कसं वापरायचं? प्रश्न पडला असेल ना?
अहो त्याच्या हेल्प फाईलमध्ये सगळ आहे त्याबद्दल.
आणि इथेही आहे.....म्हणजे खालच्या दुव्यावर.
http://audacity.sourceforge.net/manual-1.2/index.html

खरं सांगायचं तर ध्वनीमुद्रणासाठी महाजालावर हव्या तेवढ्या फुकट स्वरूपातल्या प्रणाल्या आहेत...पण ऑडेसिटीइतकी सोपी आणि परिपूर्ण अशी दुसरी कोणतीही प्रणाली नाही आढळली.

३० ऑक्टोबर, २०१०

पुरूषांचा डबा!

स्त्री-पुरुष भेद हा निसर्गानेच निर्माण केलाय. पुरुष शारीरिक दृष्ट्या बलवान असतो तर स्त्री मानसिक दृष्ट्या बलवान असते.त्यामुळे खरंतर त्यांच्यात सर्वथा समानता असू शकणार नाही हे खरंय...पण काहीएक मर्यादेपर्यंत तरी ती तशी मानता यायला काहीच हरकत नाही कारण स्त्रियाही आता फारशा मागे नाहीत. बौद्धिक,शैक्षणिक बाबींबरोबरच त्या आता जिथे शारीरिक कस लागतो अशा पोलिस,सैन्यदल वगैरे ठिकाणींही नित्यनेमाने दिसू लागलेल्या आहेत. पुरुषांचीच मक्तेदारी समजल्या जाणार्‍या सगळ्या क्षेत्रात आता त्यांनीही भरारी मारायला सुरुवात केलेली आहे. ह्याच जोरावर आता त्या स्त्री-पुरुष समानता मागत आहेत...कैक गोष्टींत ती तशी अनुभवायलाही मिळतेय पण तरीही काही बाबींमध्ये स्त्रियांचा युक्तिवाद कसा चुकीचा असू शकतो हे एका उदाहरणावरून दिसून येईल. खरं सांगायचं तर हा दोष केवळ स्त्रियांचाच नाही तर पुरूषही त्या युक्तिवादाचा जसा प्रतिवाद करतात तेही तेवढेच चुकीचे आणि हास्यास्पद आहे...ते उदाहरण म्हणजे...रेल्वेतील पुरुषांचा डबा. स्त्री-पुरुष वादात नेहमीच सामील होणारे लोक हा ’पुरुषांचा डबा’ कुठून आणतात हे मला तरी आजवर पडलेले कोडे आहे.

केवळ स्त्रियांसाठी,सर्व वेळ स्त्रियांसाठी... असे शब्दप्रयोग असलेले आणि स्त्रीचे चित्र असलेले डबे आपण स्थानिक आणि दूर पल्ल्याच्या रेल्वे गाड्यातून नेहमीच पाहत असतो; पण केवळ पुरुषांसाठी,सर्व वेळ पुरुषांसाठी असा एकतरी डबा रेल्वेत आहे का?...ह्याचा विचार चांगले सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्री-पुरुषही करू शकत नाहीत हे पाहून माझी तर खूपच करमणूक होते.

आता मी जेव्हा म्हणतो की केवळ पुरुषांसाठी असे डबे नसतात...मग स्त्रियांसाठी राखीव डबे सोडले तर इतर डब्यात...जे सर्वसाधारण डबे आहेत...ह्यात स्त्री-पुरुष असे कुणीही प्रवास करू शकतात...अशा ठिकाणी पुरुषांची गर्दी का दिसते? अहो, त्याचे कारण खूपच साधे आहे. प्रवास करणार्‍या पुरुषांची संख्या ही प्रवासी स्त्रियांपेक्षा खूपच जास्त आहे म्हणून हे घडते.पुरुषांच्या अंगी नैसर्गिक असणार्‍या शारीरिक बलाचा त्रास स्त्रियांना सोसत नाही म्हणून त्या अशा सर्वसाधारण डब्यातून सहसा प्रवास करत नाहीत...त्यामुळे झाले काय? पुरूषांना आणि स्त्रियांनाही वाटायला लागलं की हा डबा/हे डबे केवळ पुरुषांसाठीच आहेत...म्हणून वाद-विवादात नेहमी पुरुषांचा डबा असाच वाक्प्रचार वापरला जातो...जो सर्वथैव चुकीचा आहे. आता दुसरी बाजू पाहू...ज्या डब्यातून कायद्याने केवळ महिलाच प्रवास करू शकतात त्यात पुरुषांना प्रवास करण्यास मज्जाव आहे...म्हणून ते इतर डब्यात गर्दी करतात....हसलात ना! माझे विधान तुम्हाला गंमतीशीर वाटेल...पण ते वास्तव आहे. अहो पुरुष प्रवाशांचीच नव्हे तर एकूणच आता स्त्री-पुरुष प्रवाशांची संख्या बेसुमारपणे वाढायला लागल्यामुळे गाड्यांना होणारी गर्दीही अनियंत्रित आहे त्यामुळे हे वाद नेहमीच उद्भवतात. आता स्त्री-प्रवाशांची संख्याही वाढायला लागलेय...तर त्यांनी अजून काही राखीव डबे आम्हाला हवेत अशी मागणी करणे हे एकवेळ समजू शकते...पण पुरुषांना इतके सारे डबे आणि बायकांना फक्त एकच का? असा चुकीचा सवाल करू नये. कारण स्त्रियांसाठीच्या राखीव डब्यातून त्या जसा हक्काने(अर्थात पुरुषांपासून सुरक्षित)प्रवास करू शकतात तसाच हक्काने इतर डब्यातूनही प्रवास करू शकतात...त्यात त्यांना कायदा कधीच आड येत नसतो...त्या उलट स्त्रियांसाठीच्या राखीव डब्यातून
पुरुषाने प्रवास केला तर तो बेकायदेशीर समजून त्याला दंड/कारावास होऊ शकतो....तेव्हा हे लक्षात घ्या...स्त्रियांसाठी संपूर्ण गाडी मोकळी असते..तसे पुरुषांना नसते...

असाच एक विरार लोकलचा मजेशीर अनुभव आहे माझ्या गाठीशी....पश्चिम रेल्वेवर गाडीला जो बायकांचा दुसर्‍या वर्गाचा अर्धा डबा असतो(पहिल्या दर्जाच्या डब्याला जोडून) तो एका विशिष्ट गाडीला सामान्य डबा म्हणून जोडलेला आहे....एकदा काही कामानिमित्त मी चर्चगेटहून दहिसरला जाण्यासाठी जी विरार लोकल पकडली...ती गाडी नेमकी हीच होती....आणि मी त्याच डब्यात चढलो होतो...अगदी बाहेर कोणतेही ’केवळ बायकांसाठी’ असे न लिहिलेले पाहून. पण सवयीने सगळ्या बायका त्यात भराभर चढायला लागल्या..आणि मला गुरकवायला लागल्या..लाज नाही वाटत का तुम्हाला? सरळ सरळ बायकांच्या डब्यात चढलात ते....त्यांचा तो रुद्रावतार पाहून माझ्यासारखे आणखी काही तुरळक पुरुष चढले होते त्यांनी लगेच पलायन केलं....मी मात्र तिथेच बसून राहिलो आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की हा सामान्य डबा आहे..केवळ तुमच्यासाठी नाहीये....हवं तर बाहेर जाऊन पाहा...तरीही त्या वाद घालायल्या लागल्या....नशीब माझं की त्यातल्या एकीने इमानदारीत बाहेर जाऊन पाहिले आणि मग...अय्या, खरंच की...हा आपला डबा नाहीये...हा तर पुरुषांचा डबा आहे...असे म्हणाली. मी पुन्हा तिची चूक दुरुस्त केली...पुरुषांसाठी..केवळ पुरुषांसाठी असा डबा अस्तित्त्वातच नाहीये....त्यावर त्या बायका आरडा-ओरडा करायला लागल्या..असे कसे तुम्ही म्हणून शकता?ते काही नाही...हा आमचाच डबा आहे...तुम्ही जागा खाली करा नाही तर... थांबा आता आम्ही टीसीला आणि रेल्वे पोलिसांना बोलावतो म्हणजे मग समजेल तुम्हाला....आम्हाला अक्कल शिकवताहेत!
पण मी त्यांना कसेबसे शांत करून... वर सुरुवातीला जे काही लिहीलंय तेच... त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं तेव्हा मात्र त्या अवाक्‌ झाल्या.....

मी त्याच गाडीने आणि त्याच डब्यातून शेवटपर्यंत प्रवास केला...पुढे तर अजून गंमत आहे.त्या बायका शांत झाल्यावर मी माझ्या ब्रीफकेसमधून दिवाळी अंक काढून वाचायला सुरुवात केली...होय. त्यावेळी दिवाळीचे दिवस जवळ आलेले होते आणि मी आमच्या कार्यालयात एक छोटेसे वाचनालय सुरु केले होते...माझ्या ब्रीफकेसमध्ये अजून एकदोन अंक होते...ते त्या बायकांनी माझ्याकडून मागून घेऊन त्यांचेही सामुदायिक वाचन सुरु झाले. पुढे प्रत्येक स्टेशनवर फक्त बायकाच चढत होत्या आणि मला पाहून अद्वातद्वा बोलायला सुरुवात करायच्या...पण मग सुरुवातीला ज्यांना मी समजावले होते...त्याच बायका माझी बाजू मांडायला लागल्या. :)
रागावलेल्या एका ठकीने मला हेही विचारले..तुम्हाला बायकांच्यात प्रवास करायला लाज कशी नाही वाटत?
मी म्हटलं...माझ्या घरातही आई-बहीण आहेच की...तुम्ही त्या जागी आहात मला..मग मी कशाला लाजू...तेव्हा ती देखील वरमली होती...
दहिसरला उतरण्याआधी कांदिवलीपासून माझ्या जागेसाठी कैकजणींनी फिल्डिंग लावलेली होती....मी उठलो आणि मग त्या आपापसात मारामार्‍या करत बसल्या.

ह्या गोष्टीला आता खूप वर्ष झाली तरीही आज ’पुरुषांचा डबा’ ही संकल्पना रेल्वेने प्रवास करणार्‍या बहुसंख्य लोकांच्यात टिकून आहे ह्याचे वैषम्य वाटते.

३ सप्टेंबर, २०१०

जालरंग प्रकाशन आणि त्याचे ओळखचिन्ह !

मंडळी आम्ही काही जणांनी मिळून ह्यापूर्वी काही इ-अंक प्रकाशित केले...जसे की शब्दगाऽऽरवा, हास्यगाऽऽरवाऋतू हिरवा आणि जालवाणी ...इत्यादि. आता आम्ही दिवाळी अंकही काढत आहोत. तेव्हा काही जणांनी असे सुचवले की आपल्या ह्या अंकांसाठी अमूक एक प्रकाशन असे काही  ओळखचिन्ह असावे...आणि प्रकाशनाचेही काही तरी वैषिष्ठ्यपूर्ण नाव असावे. म्हणून मग आम्ही आमच्या प्रकाशनासाठी नाव सुचवण्याचे आवाहन केले...त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला...साधारण १४-१५ सुचवलेल्या नावातून मग बहुमताने निवड झाली ती...जालरंग प्रकाशन ह्या नावाची.

आता त्या नावाचे ओळखचिन्ह बनवायला हवे होते....मग पुन्हा त्यासाठी आवाहन केले गेले आणि एकूण २७ अशी रंगीबेरंगी  ओळखचिन्ह जमली...त्यातून एकाच ओचिची निवड करणे खूपच कठीण काम होते..म्हणून आम्ही पुन्हा त्यासाठी मतदान घेतले आणि त्यात बहुमताच्या जोरावर विशाल कुलकर्णी निर्मित एका ओचिची निवड नक्की केली.....त्याबद्दल विशालचे मन:पूर्वक अभिनंदन!

                                हेच ते ओळखचिन्ह
आता ह्यापुढे आम्ही  जालरंग प्रकाशन ह्या नावाने आणि वर दिलेल्या ओळखचिन्हाने पुढचे अंक प्रकाशित करू ह्याची वाचकांनी/रसिकांनी कृपया नोंद घ्यावी.

१९ जून, २०१०

घन घन माला नभी दाटल्या...

ह्या घामोळ्याने तर पार भंडावून सोडलंय.... नुसती चावत असतात सारखी...कधी एकदा पाऊस येतोय असं झालंय...ह्यावर्षी पहिल्या पावसात नक्कीच भिजायचं...सर्दी होवो नाही तर ताप येवो...पण ही घामोळी जाऊ देत एकदाची...

मी गेले कित्येक दिवस मनात हे घोळवत होतो...आणि आला बुवा एकदाचा पाऊस...चांगला दणकून आला...सोसाट्याच्या वार्‍यासह....मेघगर्जना करत...विजांचा लखलखाट-कडकडाट करत आला अगदी...पण नेमका मध्यरात्री...म्हणजे भिजता नाहीच आलं..  :(

त्यानंतर मग मी वाट पाहू लागलो...कधी एकदा तो मला भिजवतोय...पण नाहीच...बेटा, मी घरात झोपलेलो असतांना...तेही मध्यरात्रीच यायचा...बरस-बरस बरसायचा आणि मला वाकुल्या दाखवत निघून जायचा...सगळा दिवस मात्र भाकड....अगदी टळटळीत उन्हात जायचा....पण एक झालं...रात्रीच्या पावसामुळे तापमानात थोडी घट झाली आणि पाहता पाहता अंगावरचे घामोळेही विरून गेले...मग आता पावसात कशाला भिजायचे? ज्यासाठी इतका अट्टाहास होता तेच नाही मग आता कशाला भिजा? पण तरीही डोक्यात काही छुप्या घामोळ्यांची अधूनमधून जाग जाणवायची...अचानक ती अशी काही चिवचिवाट करायची की वैताग व्हायचा....मग ठरवलं....जाऊन लगेच अंमलबजावणीही केली....केश-कर्तनालयात जाऊन डोक्यावरचे सगळं जावळ काढून टाकायला सांगितलं...अगदी एखाद्या सैनिकासारखे डोके भादरून घेतलं....असे केस कापवून घेतांना न्हावी दादांनी विचारलंच....आज हे असं विपरित काय झालं?(ही कसली अवदसा आठवली? असंच म्हणायचं असावं बहुधा त्याला) इतके बारीक केस?
मी म्हटलं....त्याचं काय आहे की डोक्यातली घामोळी लै तरास देतात तेव्हा एकदा पावसात भिजायचा विचार आहे....पण उगाच सर्दी नको व्हायला...आता झेपेल का ह्या वयात...म्हणून आपले केस बारीक केलेल बरे...काय?
त्यावर न्हावीदादांनी मान हालवली आणि मुकाटपणाने डोक्यावरून मशीन फिरवून छप्पर पार उडवून टाकलं...

झालं....एकदा मनासारखं झालं...पावसाला तोंड द्यायला तयार तर झालो...पण पाऊस कसला वस्ताद...मी घरात असतांना जोरात कोसळायचा आणि .मी घराच्या बाहेर पडलो रे पडलो की तो आपला निमूटपणाने दुसरीकडे निघून जायचा....मी देखिल मुद्दाम छत्री नेत नव्हतो...तरीही  तो ही मला दाद देत नव्हता....

मी आपले प्रयत्न सोडले नाहीत. परवाही असंच झालं...सकाळी व्यायामशाळेत निघालो...आभाळ चांगलंच भरून आलं होतं....मनाशीच म्हटलं.....चला आज योग दिसतोय....बहुदा अर्ध्या रस्त्यातच गाठणार महाराज आपल्याला...म्हणून मी मुद्दाम माझी चाल मंद केली...तशी ती मंदच आहे....पण त्यातही अजून मंद केली...रेंगाळलो म्हणा हवे तर...पण एक नाही दोन नाही...व्यायामशाळेत पोचलो तरी  पावसाचा पत्ता नाही....व्यायामाला सुरुवात केली आणि पाचच मिनिटाने पाऊस बरसू लागला....पण आता त्या अवस्थेत पावसात जाणं योग्य नव्हतं म्हणून व्यायाम करतच राहिलो....माझा व्यायाम संपेपर्यंत पाऊसही संपलेला होता. :(
परत घरी यायला निघालो...एखाद दुसरा चुकार थेंब अंगावर पडत होता पण पाऊस थांबलेलाच होता...अजून पाऊस भरलेला दिसत होता पण बरसणं थांबवून, माझ्या घरी पोचण्याची वाट पाहात असावा बहुतेक...मग मी ही हट्टाला पेटलो....चालणं हळू केलं...रेंगाळणं सुरु झालं...रस्त्यात एखाद दुसरा ओळखीचा भेटला की त्याच्याशी गप्पा मारण्यात वेळ काढायचा प्रयत्न करत राहिलो....पण त्या लोकांना पावसात भिजायचं नसल्यामुळे ते पटापट आपली सुटका करून घ्यायला लागले...इथे असे सर्वच बाजूने पावसाला फितूर असलेले वातावरण पाहून मी मग आजची भिजण्याची आशा सोडून दिली आणि घराकडे प्रस्थान ठेवले...घरापासून अर्ध्या अंतरावर आलो आणि अचानक पावसाची रिमझिम सुरु झाली....चला एकदाचे गंगेत घोडं न्हालं...असा मनात विचार येईपर्यंत पुन्हा पाऊस थांबला...आणि त्याच अवस्थेत दहा-पंधरा पावलं मी पुढे गेलो नाही तर शेवटी एकदाचा जोराचा पाऊस सुरु झाला. पाहता पाहता मी चिंब भिजलो...डोळ्यांवरच्या चष्म्यावर पाणी साठलं.(चष्म्याला वायपर बसवता येतात का हो?)...म्हणून चष्मा काढून खिशात टाकला आणि मनसोक्तपणे भिजत मार्गक्रमण करू लागलो....आता पावसाचा वेग इतका वाढला की त्याच्या आवाजाने आजूबाजूचे काहीच ऐकू येईनासे झाले....त्यातच सोसाट्याचा वारा सुटलेला...विजांचा लखलखाट-कडकडाट सुरु झालेला....पाहता पाहता जागोजागी पाणी साचू लागले...बाजूने जाणार्‍या वाहनांमुळे ते साचलेले पाणी अंगावर उडत होते....पण आता फिकीर कुणाला होती....सगळा आसमंत ओलाचिंब झालेला होता...छत्र्या रेनकोटांची गर्दी वाढलेली होती...दुकानांच्या वळचणीला असंख्य लोक उभे राहून पावसापासून आपला बचाव करत होती....काही महाविद्यालयीन तरूण तरूणी एकत्र भिजण्याचा आनंद उपभोगत होते....आणि अशाच त्या कुंद-फुंद वातावरणात मीही नखशिखांत भिजून रस्ता कापत होतो....माझ्याकडे पाहून काही लोकांचे आश्चर्यचकित झालेले चेहरे पाहतांना मलाही मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या.....आज कितीतरी वर्षांनी असा मनसोक्त भिजण्याचा आनंद मी उपभोगत...ओठातल्या ओठात गाणे गुणगुणत होतो...

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा...

१४ मे, २०१०

हमखास वजन कमी करायचंय?

खूपच सोप्पं आहे वजन कमी करणं...अर्थात मनात आणलं तर..
.पण हे मनात कोण आणणार?

कोण म्हणजे काय? ज्याला/जिला वजन कमी करायचे असेल त्या व्यक्तीने तसे मनात आणायला हवंय.

अहो,पण नुसतं मनात आणून असं वजन कमी झालं असतं तर काय हवं होतं?

नाही,म्हणजे तुमचं बरोबर आहे हो...नुसतं मनात आणून काही होणार नाही हे मलाही माहित आहे.

माहित आहे ना...मग मघापासून का म्हणताय की मनात आणलं तर...वगैरे.   आम्ही मनात लाख आणतो हो,पण वजन वगैरे काही कमी होत नाही...झालंच तर..चांगलं बारीक झाल्याचं स्वप्नही पाहातो...पण काहीऽऽही होत नाही....आणि तुम्ही उगीच शब्दांचे बुडबुडे सोडताय.

अहो नाही हो...मी स्वत: कमी केलंय माझं वजन.

काय सांगताय काय? खरंच की उगाच आमची फिरकी घेताय?

अगदी खरं...ऐकायचंय?तर मग ऐका.

मंडळी,साधारण जानेवारीच्या शेवटी माझा पाय मुरगळला होता, त्यानंतर तो सतत तीन आठवडे एकाच स्थितीत बांधून ठेवावा लागला होता....साहजिकच त्या काळात माझा रोजचा सकाळचा व्यायाम,संध्याकाळची फेरी इत्यादि हालचाली बंद झाल्या...खाणं मात्र तेवढच होतं...किंबहुना थोडं वाढलं होतं असंच म्हणा ना..त्यामुळे आपोआप वजनही वाढायला लागलं...पाय अगदी व्यवस्थित बरा झाल्यावर जेमतेम मी एक आठवडा व्यायाम केला आणि पुढे तो आपोआप बंद पडला. बंद पडायला कारण होते....रात्रीची अपूरी झोप..ज्यामुळे सकाळी वेळेवर उठणे होत नसे आणि व्यायाम केला तर सकाळीच...हे माझे ब्रीदवाक्य असल्यामुळे तोही आपोआप बंद पडला.

पाय दुखावण्याआधी माझे वजन साधारणपणे ६६ किलो होते...ते ह्या मधल्या काळात ७० किलोपर्यंत वाढले...झालंच तर पोटाचा घेरही दोन ते अडीच सेंमीने वाढला होता...हे सगळं मला आवडत नव्हतं पण तरीही पुन्हा व्यायामाला जाण्याचा मुहूर्त लागत नव्हता...मग आता काय करावे..असा मनात विचार करतांना एक साधा सोपा  मार्ग दिसला...तोच करून पाहायचे असे ठरवले.


एप्रिलच्या सुरुवातीला, माझा दिवसभराचा आहार काय असतो ह्याची एकदा खानेसुमारी केली...
सकाळी एक कप दूध आणि दूपारी एक कप चहा किंवा कॉफी...दोन्हींबरोबर ५ ते ६ पार्लेजीची बिस्किटे.
तसं माझं जेवण काही फारसं नाही...जेवणात भात- आमटी किंवा पोळी-भाजी..ह्यापैकी एकच जोडगोळी. भात असेल तर फक्त एकदाच घेतलेला मला पुरतो....तोही  फार नाही...तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगतो...माझ्या माहितीतले एक   पंचाहत्तरी पार केलेल गृहस्थ आहेत....त्यांचे नेहमीचे जेवण कसे आहे तर...एकूण तीन वेळा ते भात घेतात...मधे दोन-चार पोळ्या...आता त्याच्या अनुषंगाने येणारे भाजी-आमटी हे तोंडी लावणे वगैरे  गोष्टी  आल्याच...बाकी ताक/दही वगैरे.....तर त्यांचा एकवेळचा भात...हे माझे पूर्ण जेवण...विश्वास बसत नाही ना....जाऊ द्या...द्या सोडून.  हं, तर जेवणात केवळ पोळ्या असतील त्या ४ ते ५ ...एखादे वेळेस भाजी खूपच छान झाली असली तर ६वी पोळीही खाऊ शकतो.....असो...तर सांगायचा मुद्दा काय तर जेवणही यथातथाच......
जेवणा व्यतिरिक्त दिवसातून एकदोन वेळा कधी केळी,चिवडा,लाडू,तळलेली डाळ,खाकरे इत्यादिंपैकी काहीतरी असायचेच.
ह्या सगळ्यांचा विचार केल्यावर आता कोणत्या आहारात कपात करायची ह्याचा विचार सुरु केला. जेवण तर माझं सामान्यंच होतं...तेव्हा त्यात बदल  करण्याचा अथवा कपात करण्याचा प्रश्नच नव्हता. मग सर्वप्रथम पार्लेजीची बिस्किटे बंद केली.....तीन चार दिवसात त्याची सवय सुटली....म्हणून मग जेवणाव्यतिरिक्त आहारात हळूहळू कपात सुरु केली....हे करतांना भूक तर भागत नसायची...म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले...भूक लागली की पाणी प्यायचे...असे काही दिवस मोठ्या नेटाने सुरु ठेवले....पंधरा दिवसांनंतर संध्याकाळी एकदा  नुसतंच व्यायामशाळेचं दर्शन घेऊन आलो....तिथल्या काट्यावर वजन केलं...ते थोडे म्हणजे साधारण ६०० ग्रॅमने कमी झालेले दिसले...त्यामुळे लगेच उत्साह वाढला आणि दुसर्‍या दिवशी सकाळपासून पुन्हा व्यायामाला सुरुवात करायची असा मनाशी दृढनिश्चय केला....
दुसर्‍या दिवसापासून खरंच व्याशात जाऊ लागलो....अर्थात व्यायाम मात्र चाखत माखतच करत होतो...साधारण एक आठवड्याने शरीरातील सगळे सांधे मोकळे झाल्याचे लक्षात आल्यावर मग जरा नेटाने व्यायाम सुरु केला...बरोबर आहार नियंत्रण  कसोशीने सुरुच ठेवलेले होते...त्यानंतर पुन्हा एकदा वजन पाहिले...आता ते दीड किलो कमी झाले होते.....आणि आजच पुन्हा एकदा वजन केले...तेव्हा ते तीन किलोने कमी भरल्याचे दाखवते आहे....पोटावर वाढलेली ती दोन-अडीच सेंमीची चरबी आता दीड सेंमीने कमी झालेय....

मंडळी...हे सर्व घडायला साधारण एक-दीड महिन्याचा कालावधी जावा लागला...पण मी जाणीवपूर्वक करत असलेल्या प्रयत्नांना  निश्चितच फळ येत आहे....माझे वजन अजूनही आदर्श वजनाच्या तुलनेत साधारणपणे तीन किलो जास्त आहे....माझी खात्री आहे की...महिन्याभरात तेही निश्चितच  तेवढे खाली येईल....

खरं तर अतिशय काटेकोरपणे आहार नियंत्रण आणि त्याच बरोबर योग्य असा व्यायाम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला तर अजून चांगला परिणाम मिळू शकतो....पण माझे वजन आदर्श वजनापेक्षा खूप जास्त नसल्याने..मी स्वत:हून जे काही करतोय तेवढे परिश्रमही माझ्यासाठी पूरेसे आहेत.

म्हणूनच म्हणतो....वजन कमी करायचंय.....मग आधी तसे मनात आणा....आणि एकदा मनात असा विचार आणलात की त्यासाठी  पुढे जे काही करावे लागेल ते इमाने इतबारे एखाद्या व्रताप्रमाणे करा....पाहा तुमचा भार हलका होतो की नाही ते.... तर मग आता लागा तयारीला....
अरे हो, एक सांगायचेच राहिले...मंडळी हा उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे....तसेही थोडीशी हालचाल केली की घाम हा येतोच...तेव्हा व्यायाम करा आणि जास्त घाम गाळा...पाणी भरपूर प्या  मात्र खाणं कमी करा.......

इतकं केलंत की तुम्ही हलके झालात म्हणून समजा!!!
..

१२ मे, २०१०

आम्ही, बझकर !














   मुंबईतल्या पहिल्या मराठी ब्लॉगर स्नेह मेळाव्याला आलेले काही बझकर. अजून बरेच आहेत बरं का...ही आपली एक झलक दाखवली...अनायासे छायाचित्र मिळालंय...तर दाखवतोय.  ;)


गुगलने बझचा समावेश जीमेलमध्ये केल्याला आता बरेच महिने झाले. पहिले एकदोन दिवस हे बझ प्रकरण काय आहे हे कळण्यातच वेळ गेला. आपल्या जीमेल खात्यात जे लोक आहेत ते साधारणपणे आपल्याशी बझमध्येही जोडले गेलेले दिसतात..पण आणखी पुढची गंमत म्हणजे आपल्या खात्यातल्या प्रत्येक सभासदाशी जोडली गेलेली माणसं आपल्या बझमध्ये डोकावू शकतात...ह्याचा अर्थ हे बझ प्रकरण म्हणजे एक खूप मोठी साखळी आहे....उदा. मी म्हटलं की...नमस्कार मंडळी,या गप्पा मारायला.... की हे अशा तर्‍हेने जोडलेल्या सगळ्यांना माझ्या कळत/नकळत पाहता येते.

सुरुवातीला एक गंमत म्हणून ह्या बझवर ज्या गप्पा मारायला मी सुरुवात केली ती माझ्या माहितीतल्या सदस्यांशी...हळूहळू एकेक सभासद वाढायला लागला. ह्याचा/हिचा त्याचा/तिचा मित्र/मैत्रीण असे करत करत ओळख काढत काढत  माझ्या खात्यातले लोक वाढायला लागले...अगदी पारावर गप्पा मारायला आपण बसतो तसे व्हायला लागले . बोलतांना विषयाचे,वेळेचे वगैरे फारसे बंधन राहिले नाही.

आता सदस्यसंख्या इतकी वाढलेय की कैक वेळा एकमेकांच्या खरडींना उत्तर देतांना असंबद्धता निर्माण होतेय...तरीही विषय कुठून  आणि कसा सुरु होतो  हे मात्र कळत नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्या बझचं...धाग्याचं वाचन केलं तर अतिशय मनोरंजक असा मजकूर वाचायला मिळतो.

आजमितीला माझ्या बझमध्ये...किती बझकर आहेत हे मोजायचे ठरवले तर मोजता मोजता चूक होते..अशा तर्‍हेने रोज एकदोन नवी मंडळी हजेरी लावत असतात...तरीही ह्या घडीला...नियमित आणि क्वचित प्रसंगी हजेरी लावणारे असे बझकर मिळून जवळपास ४० जण हजेरी लावत असतात.

बझच्या एका धाग्यात ५०० खरडींची मर्यादा गुगलने घातली असावी असा अंदाज आहे....कारण गेले कैक दिवस आमच्या बझचा किमान एक  धागा तरी ५००च्या आसपास जाऊन बंद पडतो. ज्या दिवशी भरपूर हजेरी असते तेव्हा तर दोन दोन धागेही गप्पा मारायला आम्हाला कमी पडतात....इतकं काय बरं बोलतो आम्ही?
अहो सांगितलं ना ...विषयाला बंधन नाही त्यामुळे सुरुवातीला कोणता विषय असतो आणि धागा बंद पडेपर्यंत तो कुठवर गेलेला असतो ह्याचा काहीही हिशोब लावता येणार नाही...सापासारखी नागमोडी वळणं घेत आमच्या बझमधले विषय सारखे बदलत जातात....उत्सुकता असेल तर पाहा डोकावून....पण सावधान...ह्या आमच्या गप्पा वाचता वाचता तुम्ही कधी आमच्यात सामील झालात हे तुम्हालाही कळणार नाही....मग तुमचे रोजचे काम,लिखाण,वाचन, छंद वगैरेकडे दूर्लक्ष झालं तर आम्हाला दोष देऊ नका.  ;)

४ मे, २०१०

गमवा, कमवा...

वृत्तपत्रातील ती ठळक बातमी वाचून तमाम वाचकवर्ग... कुणी अचंबित झाला, कुणी नि:शब्द झाला, कुणी ’भारा’वून गेला तर कुणाचा भार ’हलका झाला. मित्रमंडळीत,गाडीत,बसमध्ये,कार्यालयात,शाळांमध्ये,देऊळ-मशीद-गुरुद्वारा-चर्च-जैन मंदिरं, बागा,बाजार....कुठे जाल तिथे....अगदी रेशनच्या रांगेतसुद्धा.....एकच चर्चा सुरु होती...
हे कसं काय शक्य आहे?
पण काही म्हणा..कल्पना एकदम रम्य आहे ना!
खरंच असं व्हायला हवं, मजा येईल.

ही अशीच आणि अशाच आशयांची वाक्य जिथे तिथे ऐकायला येत होती.
बातमीच्या खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा बर्‍याच जणांचा प्रयत्न अयशस्वी होत होता...आपण रांगेत आहात,प्रतीक्षा करा...वगैरे मंजूळ आवाजातल्या तबकड्य़ा ऐकून ऐकून लोक कंटाळून गेले होते.

इथे, ही कल्पना डोक्यात आल्यापासून अत्त्यानंदांची झोप पार उडाली होती....जाहिरातवजा बातमी तर देऊन बसलो खरा...पण हे शक्य कसे करायचे? त्यातून आपण दूरध्वनी,भ्रमणध्वनी वगैरेही देऊन बसलोय...सेकंदा सेकंदाला घंट्या वाजताहेत....लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देता देता अगदी टेकीस आलोय...स्वत:शीच त्यांचा संवाद सुरु होता. गंमती गंमतीत कुणी काही तरी बोलून गेलं आणि आपण ते खूळ उगीच डोक्यात घेतलं...छे. आता ह्यातून वरून ब्रह्मदेवाचा बाप जरी उतरला तरी आपल्याला काही मदत करू शकणार नाही...तरी नशीब आपण आपलं नाव आणि पत्ता दिलेला नाहीये...नाहीतर? नाहीतर काय? लोकांनी आपली पार वाट लावली असती.

हं, पण कल्पना खरंच नामी आहे ह्यात काही शंका नाही...एरवी सकाळपासून शेकडो विचारणा झाल्याच नसत्या. आता खरंच काहीतरी करायला हवंय....काय बरे करावे?


बरं का दाभोळकर, मला दोन प्रकारची यंत्र बनवून हवी आहेत.

कशी? ते आधी सांगा...गिर्‍हाईकाला हवी तशी यंत्र बनवून देण्यात आमचा हात दुसरा कुणीच धरणार नाही...तुम्ही आधी तुमची कल्पना सांगा...मग ती कशी प्रत्यक्षात आणायची ते मी आणि माझे साथीदार पाहून घेऊ.

अत्त्यानंदांनी मग आपली कल्पना दाभोळकरांना सविस्तर समजावून सांगितली...ती कल्पना ऐकतांना क्षणाक्षणाला दाभोळकरांच्या चेहर्‍यावरचे रंग बदलत होते...आधी उत्सुकता,मग आश्चर्य,नंतर आनंद...
शेवटी तर दाभोळकरांनी उठून अत्त्यानंदांना कडकडून मिठीच मारली....

काही म्हणा अत्त्यानंद, तुम्ही खरंच सुपीक डोक्याचे आहात हो....कल्पना नावीन्यपूर्ण तर आहेच...पण त्याहूनही ती भन्नाट आहे...तुम्हाला एक विनंती करू का अत्त्यानंद?

बोला दाभोळकर, काय विनंती आहे तुमची?

अत्त्यानंद, ती दोन्ही यंत्र तर मी बनवतोच....पण सर्वात आधी तुम्ही त्याचा प्रयोग माझ्यावर करावात अशी मी तुम्हाला विनंती करेन...इतकी छोटी विनंती मान्य कराल काय?

दाभोळकर, अहो अजून कशास काही पत्ता नाही, यंत्र बनवायला किती दिवस लागतील,खर्च किती येईल..वगैरे वगैरे गोष्टींबद्दल अजून आपले काहीच बोलणे झालेले नाही...मग इतकी घाई कशाला?

ते सांगतो हो...पण सगळ्यात प्रमूख अट हीच आहे असे समजा...तुम्ही हो म्हणालात तरच मी तुमचे काम हातात घेईन...आता बोला...आहे की नाही माझी विनंती मान्य?

दाभोळकर, तुम्ही मला अगदी पेचात पकडलंत हो....पण हरकत नाही..मला मान्य आहे तुमचं म्हणणं....पहिला प्रयोग आपण तुमच्यावरच करू...मग तर झालं? आता लागा बघू कामाला....मला आता यंत्र बनवायला येणारा खर्च, किती दिवसात बनतील यंत्र...वगैरे माहिती द्या. एकदा खर्चाचा आकडा कळला की मग पुढच्या तयारीला लागता येईल.

अत्त्यानंद, माझी अजून एक विनंती आहे...नाही म्हणू नका...त्यात तुमचाही फायदा आहे.



बोला, दाभोळकर,बोला. आता आडपडदा न ठेवता काय आहे मनात ते सांगा.

अत्त्यानंद, आपण खर्च अर्धा अर्धा वाटून घेतला तर...मला आपल्याशी भागीदारी करायला आवडेल.

दाभोळकर, अहो आवडेल म्हणजे काय...आवडेलच...तसेही सद्द्या माझ्याकडे फार पैसे नाहीयेत..मी देखिल माझ्या काही खास मित्र-मैत्रिणींकडे हात पसरणार होतो...आता तुम्ही स्वत:हून भागीदारी पत्करता आहात तर मग....सोन्याहून पिवळे.

आणि...दाभोळकरांनी ती दोन यंत्र बनवली...अत्त्यानंदांच्या देखरेखीखाली त्याची एकदा कसून तपासणी झाली आणि ...अत्त्यानंदांनी दाभोळकरांना त्या यंत्रावर उभं राहायला सांगितलं....जेमतेम दहा मिनिटे दाभोळकर त्यावर  कसेबसे उभे राहू शकले आणि शेवटी चक्कर येऊन धाडकन्‌ खाली पडले. अत्त्यानंद आणि दाभोळकरांच्या साथीदारांनी मिळून त्यांना उचलून जमिनीवर झोपवले....पाच मिनिटांनी दाभोळकर शुद्धीवर आले....मी कुठे आहे? असा प्रश्न विचारत विचारतच ते सहजपणाने उठून बसले....

आयला, मी इथे जमिनीवर कसा आलो? आणि आता मी इतक्या सहजपणाने कसा उठू शकलो?

अभिनंदन दाभोळकर. आपला प्रयोग अतिशय यशस्वी झालाय. या, उठा आता आणि त्या यंत्राजवळ चला...

दाभोळकरांसहित सगळेजण त्या यंत्राजवळ पोचले....

दाभोळकर ह्या यंत्रात असलेले हे विविध दर्शक काय दाखवताहेत पाहा....त्यात तुम्हाला चटकन समजेल अशी गोष्ट म्हणजे...तुमचं वजन चक्क २ किलोंनी कमी झालंय....अशा गोष्टींची तुम्हाला सवय नसल्यामुळे तुम्ही चक्कर येऊन पडलात...पण घाबरण्याचे काही कारण नव्हते...मला हे असे होणार हे माहित होतेच...म्हणून फक्त पाच दहा मिनिटे तुम्हाला जमिनीवर झोपवून ठेवलं...शुद्धीवर येताच तुम्ही स्वत:हून सहजपणाने उठलात...म्हणजे पाहा...केवळ दोन किलोंचा भार हलका झाला तरी तुमच्यात चैतन्य आलं...आता अजून भार कमी झाला की काय होईल?

अत्त्यानंद,खरंच...जादू आहे हो ही.

अहो खरी जादू तर अजून पुढेच आहे.

ती कशी?

आता ते दुसरं यंत्र ह्या यंत्राला जोडा....आता ह्या तुमच्या एका सहकार्‍याला आपण त्या दुसर्‍या यंत्रावर चढवूया.

त्याने काय होईल?

काय होईल? स्वत:च्याच डोळ्याने पाहा की...

दुसर्‍या यंत्रावर त्या सहकार्‍याला चढवलं...केवळ पाच मिनिटं ते मशीन चालवलं...आणि
याऽऽहू! असे ओरडत त्या सहकार्‍याने आनंदाने हवेतल्या हवेत उडी मारली.

तो असा का ओरडतोय हो अत्त्यानंद...दाभोळकरांचा प्रश्न.

कारण...कारण तुमचे दोन किलो आपण त्याच्यात भरले...काटकुळ्या शरीराच्या तुमच्या सहकार्‍याला ते दोन किलो मिळताच...त्याच्यात एकदम शक्ति संचारली...दुसरं काय!

पण अत्त्यानंद, मला सांगा...तुम्ही दोन यंत्र का बनवायला सांगितलीत...हीच व्यवस्था एकातही करता आली नसती का?

हो, तसेही करता आले असते...पण ह्या दोन यंत्रांचा उपयोग असा आहे की...एकीकडे कमी होणे सुरु होईल तर दुसरीकडे वाढायला सुरुवात होईल...एका लयीत सगळं घडेल आणि आपलं कामही झटपट होईल.

मग, आता ह्याचा उपयोग लगेच सुरु करायचा?

नाही. आधी काही नियम बनवायला लागतील...एका वेळी किती वजन घटवायचे...किती वाढवायचे...ज्यांना वजन वाढवायचे/घटवायचे आहे त्यांचे वय,व्यवसाय,आहार वगैरे बाबी लक्षात घेऊन काही बारीक सारीक बदल ह्या यंत्रात करावे लागतील...त्यानंतर एक आदर्श तक्ता तयार करून त्या पद्धतीने वजन  घटवणे/वाढवणे वगैरे करता येईल...
आजपर्यंत वजन कमी करता येण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी बरेच उपाय होते...पण असे एकाचे घटवून दुसर्‍याचे वाढवणे.....


अहो बाबा, उठा. हे झोपेत काय बडबडताय? घटवणे /वाढवणे...कमवा/गमवा..

छ्या! काय मस्त स्वप्नं पडलं होतं...मी दोन मशीन बनवून घेतलेली...

जाऊ द्या हो. काहीतरी, जगावेगळ्या गोष्टी डोक्यात ठेवता आणि मग तेच तुम्हाला स्वप्नात दिसतं...चला आता उठा...बस्स झालं तुमचं स्वप्न पाहाणं...पटापट दात घासा आणि या चहा प्यायला...चांगला, आलं घालून केलाय चहा.

हो,येतोच,तू हो पुढे.

या लवकर...पुन्हा झोपू नका बरं का!!!

१० जानेवारी, २०१०

मी ठरवलंय...

मी आता ठरवलंय की ह्या महाजालावरचा इ-कचरा वाढवायचा नाही..... अहो पण हा इ-कचरा काय असतो?
सांगतो. जरा थांबा.
सर्वसाधारण इ-कचरा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे जुन्या-पुराण्या, पुन्हा न वापरता येणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु,त्याचे सुटे भाग वगैरे असे येते. बरोबर आहे. तो सगळा इ-कचराच आहे. त्याची विल्हेवाट कशी लावावी,त्यातल्या कोणत्या गोष्टी पुनर्वापरात आणता येतील,ज्या तशा वापरता येणार नसतील तर त्याचे काय करावे...वगैरे प्रश्न सद्द्या आपल्याला भेडसावत आहेतच.
ह्या सगळ्याबरोबरच आता महाजालावर आपण जो काही विदा(डेटा) चढवतो आणि तिथून उतरवून घेतो....त्याचा साठा आता इतक्या प्रचंड प्रमाणावर होत चाललाय की त्यातूनही ह्या इ-कचर्‍याची समस्या निर्माण होणार आहे असे मला वाटतंय. आता हा विदा कोणकोणत्या स्वरूपात आपल्याला दिसतो?
१)लेखन...त्यात लेख आले,खरडी आल्या,व्यक्तीगत निरोप आले,विरोप(इ-मेल) आले,गप्पा(चॅटिंग) आलं,जाहिराती आल्या,ढकलपत्र आली(ह्यांना तर सुमारच राहिलेला नाहीये)... आता हा दिवसेंदिवस वाढत चाललेला लेखनसाठा कुठवर जाणार आहे? त्याला कोणती मर्यादा आहे का?
२)ध्वनीमुद्रण..ह्यात गाणी,संवाद वगैरे येतात. लेखनापेक्षा ह्याला जास्त जागा लागते. रोज लाखोंनी लोक अशा तर्‍हेने गाणी महाजालावर चढवत असतात/उतरवून घेत असतात.
३) ध्वनीचित्रमुद्रण...ह्याला सगळ्यात जास्त जागा लागते....इथेही तेच.
४)चित्र,छायाचित्रं....ह्यांनाही भरपूर जागा लागते...इथेही तेच.

अशा तर्‍हेने निरनिराळ्या माध्यमातून आपण महाजालावर/घराघरातून विदा साठवत चाललेलो आहे. एका लेखाच्या/गाण्याच्या,दृष्याच्या,छायाचित्राच्या अनेक आवृत्त्या..वेगवेगळ्या संकेतस्थळांवर आपण पाहत असतो..आपणही चढवत/उतरवत असतो. त्यामुळे तोच तोच विदा भरमसाठ वाढत जातोय. विदा वाढतोय म्हणून बँडविड्थ वाढवावी लागतेय,साठवण क्षमता वाढवावी लागतेय. त्यामुळे विजेचा खर्च वाढतोय. त्यामुळे उष्णतेचं उत्सर्जन वाढतंय...हवेतला कार्बन वाढतोय. जीवनावश्यक गोष्टींकडचा खर्च इथे वळवला जातोय...वगैरे वगैरे. खूप जास्त बोलतोय का मी? बरं सद्द्या इथेच थांबतो.  :)
ह्या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत...ह्याच्यात माझाही काही वाटा आहेच आणि तो वाटा पूर्णपणे बंद करणे मला जमणार जरी नसले....कारण? व्यसन लागलंय महाजालाचं आणि व्यसन असं सहजासहजी सुटत नाही म्हणून निदान काही प्रमाणात तरी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सद्द्या मी ठरवलंय की माझे लेखन मी फक्त माझ्या जालनिशीवरच करेन. त्याचीच आवृत्ती पूर्वीसारखी इतरत्र कोणत्याही संकेतस्थळावर चढवणार नाही. आलेले व्यनी, खरडी,विरोप वगैरे वाचून होताच पुसून टाकणार आहे.  कुणी म्हणेल ही तर दर्यामे खसखस आहे.. असेलही. नाकारतंय कोण. मी देखिल म्हणतोय की ही एक छोटीशी सुरुवात आहे. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही लहानच असते. हळूहळू त्यातही प्रगती होऊ शकतेच की. बहुतेकांना हे म्हणणे पटणार नाही. काहीतरी नवीन फॅड आहे म्हणूनही संभावना होईल. होऊ द्या. पण कदाचित काही लोकांना हे म्हणणे पटेलही,ते देखिल त्यांच्या परीने प्रयत्न करतील आणि कालांतराने ही एक मोठी चळवळ होईल.

हसलात ना? मी दिवास्वप्नं पाहतोय असं वाटतंय ना?
खरं तर मलाही तसंच वाटतंय. पण हे स्वप्न भलतंच रम्य वाटतंय मला त्यामुळे त्यातच हरवून जायला आवडतंय. :)
पाहूया ह्यातनं काय  साध्य होतंय ते.
सद्द्या तरी उद्दिष्ट मर्यादित आहे...त्यावर अंमल करू शकलो तर ....
सांगेन पुढच्या वेळी. 

२० नोव्हेंबर, २००९

’स्टार माझा’चे आभार!

मित्रहो गेल्यावर्षीप्रमाणे ह्या वर्षीही ’स्टार माझा’ ह्या वाहिनीने घेतलेल्या ’ब्लॉग माझा’ ह्या स्पर्धेत मी भाग घेतला होता.
आज सकाळी जीमेल मधील पत्रव्यवहार पाहताना एक वेगळेच पत्र दिसले. ते होते श्रीयुत प्रसन्न जोशी ह्यांचे. त्यात त्यांनी स्पर्धेचा निकाल पाठवलेला होता.

निकालात बरीच परिचित नावं दिसत होती. स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवणारी नीरजा पटवर्धन(नीधप).
विशेष उल्लेखनीय म्हणून ज्यांना पारितोषिकं मिळाली आहेत त्यातले हरिप्रसाद भालेराव(छोटा डॉन),देवदत्त गाणार(देवदत्त), राजकुमार जैन(राजे), दीपक कुलकर्णी(कुलदीप) आणि आनंद घारे(आनंदघन).
ही सगळी नावं आणि एकूणच पत्रातला सगळा मजकूर इंग्लीशमध्ये असल्यामुळे वरील सगळी नावं एकदोनदा वाचल्यावरच कळली. :)
पण त्यात अजून एक नाव दिसत होते....जे मला कुठे तरी ऐकल्यासारखे वाटत होते...पण ती व्यक्ती नेमकी डोळ्यासमोर येत नव्हती. इंग्लीशमध्ये स्पेलिंग लिहिलेले होते...पीआरएएमओडी डीइव्ही.
बराच वेळानंतर प्रकाश पडला की ते नाव....माझेच होते. ;)
मी माझ्या देव आडनावाचे डीइओ असे स्पेलिंग करतो त्यामुळे कुणी त्याचे डीइव्ही असे केले तर ते मला नेहमीच अनोळखी वाटत असते.

ह्यातला विनोदाचा भाग सोडला तर एक सांगेन ते म्हणजे ह्यावर्षी मला पारितोषिक मिळेल असे मी अजिबात गृहित धरलेले नव्हते...गेल्या वर्षी मात्र का कुणास ठाऊक पण ठाम खात्री होती. :D आणि गंमत म्हणजे गेल्या वर्षी न मिळता पारितोषिक अचानक ह्यावर्षी मिळाले...हे देखिल थोडे धक्कादायक वाटले. :D
मध्यंतरी ही स्पर्धाच रद्द झाली अशी माहिती एका मित्राकडून मिळाली होती.त्या पार्श्वभूमीवर तर आज आलेला निकालाचा मेल अजून जास्त धक्कादायक वाटला. असो. तरी देखिल आपला समावेश पारितोषिक पात्रांमध्ये झाला हे वाचून इतके दिवस जे काही वेडेवाकुडे लिहिले त्याची कुणीतरी दखल घेतंय ह्याची जाणीव झाली आणि बरंही वाटलं.
मराठीतून,तेही देवनागरीतून लिहीणार्‍या....लिहू शकणार्‍या ब्लॉगर्सना इंग्लीशमधून...म्हणजे लिपीही रोमन आणि मजकूरही इंग्लीशमध्ये... हा निकाल पाठवण्याचे कारणच काय?
तर, खुलाशात असं लिहिलेलं आढळलं....की एखाद्याच्या संगणकात देवनागरी फॉंट न दिसण्याची अडचण असू शकते. मला काही हे पटलं नाही. देवनागरीतून अट्टाहासाने लिहीणार्‍यांकडे अशी अडचण असणारच नाही असे माझे मत आहे. अर्थात....कुणी सांगावं ते म्हणतात तसे काही लोक असतीलही.....पण ते तसे असतील तर माझी त्यांना नम्र विनंती की...आपल्या संगणकाला काँप्लेक्स स्क्रीप्ट्सचा पाठिंबा आहे की नाही ते तपासून पाहावे आणि तो तसा नसल्यास सर्वप्रथम तो स्थापित करून घ्यावा.
अधिक काय सांगू?

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मला पारितोषिक ’पात्र’ ;) ठरवल्याबद्दल स्टार माझाचे मन:पूर्वक आभार.

४ नोव्हेंबर, २००९

ही बालगीते कोणाकडे आहेत काय?

मी ५वी ६वीत असताना म्हणजे सुमारे ४० वर्षापूर्वी ही दोन बालगीते पाठ करून त्यावर शाळेत बक्षिसे देखील मिळवली होती.पण ती बालगीते आता मला पुसटशी आठवतात ती अशी....

१) अशी कशी बाई ही गंमत झाली
फराळाची ताटली चालू लागली

कुशीवर झोपून लाडू कंटाळला
टुणकन ताटलीच्या बाहेर आला
गड गड गड गड गोलांटी रंगली.......वगैरे वगैरे.

आणि

२) मेथाबाईचे लगीन निघाले
दुध्या-भोपळा नवरा झाला
पुढे काशीफळ आघाडीला
वांगी-बटाटे दोहो बाजूला....... वगैरे वगैरे

ह्या बालगीतांचे कवी कोण हे देखिल मला आठवत नाहीत.आपणा पैकी कोणाला ह्याबद्दल काही माहिती असल्यास कळवण्याची कृपा करावी.

२२ ऑगस्ट, २००९

गोल असे ही दुनिया आणिक...

मित्रांनो गाणी ऐकताना त्यात जुनं नवीन असं काही नसतं असं म्हटलं जातं. काही प्रमाणात ते खरंही आहे. जुनी काय आणि नवीन काय..ही गाणी बनतात, ती ज्या रागांमध्ये, ते सगळे राग तर जुनेच आहेत मग गाण्यात नवीन जुने असे आपण का म्हणतो बरं? मला असं वाटतं की त्याचंही एक बहुदा कारण असावे ते म्हणजे गोडवा....जुन्या काळात गाण्यातला गोडवा जपला जायचा जो आज वाद्यमेळामध्ये पार हरवला गेलाय असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे पूर्वी वाद्यमेळा नव्हता काय? होता ना..नव्हता असं कसं म्हणता येईल? पण त्याचा उपयोग बराच मर्यादित प्रमाणात होत होता आणि त्याच वेळी गाण्याचे शब्द,त्यातल्या भावना ह्या गोष्टींना जास्त महत्व दिलं जायचं...ज्यामुळे आजही ती जुनी अवीट गोडीची गाणी ऐकली की मन चटकन भूतकाळात जातं.

आता असं मी म्हटल्यावर तुम्हीही जुनी आणि अवीट गोडीची गाणी आठवायला लागला असाल आणि त्याच बरोबर त्या गाण्यांबद्दलच्या तुमच्या आठवणीही मनात रुंजी घालायला लागला असाल. ह्या अशा गाण्यांबरोबरच काही जुने गायक-गायिका,त्यांचे आवाज,त्यांच्या गाण्याच्या लकबी वगैरे गोष्टी तुम्हाला आठवायला लागल्या असतील..खरं ना?

आज अशाच एका मला आठवलेल्या जुन्या गाण्याबद्दलची आठवण मी सांगणार आहे. ते गाणं गायलं होतं सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. गोविंद पोवळे ह्यांनी. संगीतही त्यांचेच होते. ते गाणं असं आहे....

गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रुपया
सूर्य फिरे हा पृथ्वीभवती फिरते दुनिया रुपयाभवती
रुपयाभवती दुनिया फिरते....

पहिल्यांदा हे गाणं ऐकलं तेव्हा मी बहुदा पाचवी सहावीत होतो. नुकतंच तेव्हा भुगोलात वाचलं होतं की.... पृथ्वी सुर्याभवती फिरते....आणि इथे ह्या गाण्यात चक्क उलट लिहिलंय....हट,हट,हट. हे असं नाहीच आहे. काय वेडा आहे का हा कवी? असं काय बोलतोय ते? फार फार वर्षांपूर्वी लोक असं समजत होते हे खरं आहे पण ते लोक अडाणी होते; पण आता सिद्ध झालंय की पृथ्वी सुर्याभवती फिरतेय मग लोक अशी गाणी लिहितातच का आणि वर ती हे गायक लोक गातातच का? हे कमी म्हणून की काय ...पाडगांवकरांनी लिहिलंय...शुक्रतारा मंद वारा...... छे,छे,छे. ...वार्‍याला यमक जुळायला हवं म्हणून शुक्राला तारा बनवलं. छ्या. मजा नाही. अशाने कसं होणार आपलं.

हं, तर काय सांगत होतो मित्रांनो, अशा प्राथमिक विचारांनी मी ते गाणं त्या वेळी पूर्णपणे ऐकलंच नाही.पण आकाशवाणीवरून ते गाणं पुन:पुन्हा लागायचं आणि नाही म्हटलं तरी कानावरून जायचं. हळूहळू मला ते आवडायला लागलं,कारण....
कारण ते पहिलं विधान....सूर्य फिरे हा पृथ्वीभवती... सोडलं तर बाकी गाणं मस्तच होतं. त्याची चालही साधी-सोपी होती आणि गोविंद पोवळेंचा आवाजही अतिशय मधुर होता. ज्यामुळे गाणं आवडावं असे सगळे गुण त्या गाण्यात होते.
मग काय ते गाणं केवळ माझं आवडतं गाणंच राहिलं नाही तर जिथे जिथे मला गाणं म्हणण्याचा आग्रह होत असे तिथे तिथे मी ते गात गेलो आणि लोकांनाही ते आवडत गेलं.ते पूर्ण गीत नाही पण जे आता आठवतंय तसं देतोय.

गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रुपया
सूर्य फिरे हा पृथ्वीभवती फिरते रुपयाभवती दुनिया
रुपयाभवती दुनिया फिरते

मजूर राबती,हुजूर हासती घामावरती दाम वेचिती
तिकिटावरती अश्व धावती,पोटासाठी करिती विक्रय
अबला अपुली काया,रुपयाभवती दूनिया फिरते

नाण्यावरती नाचे मैना,अभिमानाच्या झुकती माना
झोपडीत या बाळ भुकेले,दूध तयाला पाजायास्तव
नाही कवडी माया, रुपयाभवती दूनिया फिरते

अजून एक कडवं असावं...पण आता ते अजिबात आठवत नाहीये.

ह्या गीतातले शब्द किती सार्थ आहेत हे काय सांगायला हवं..आजही ते पदोपदी अनुभवाला येतात.

ता.क. मित्रहो हा लेख लिहायला घेतला आणि लक्षात आलं की हे गीत पूर्णपणे आठवत नाहीये आणि जे आठवतंय त्यातही काही शब्दांबद्दल शंका आहेत. मग काय विचारलं काही जुन्या-जाणत्या लोकांना. पण दूर्दैवाने त्यापैकी हे गीत कुणीच ऐकलेलं नव्हतं. योगायोगाने मिपावरची सिद्धहस्त कवयित्री क्रान्ति साडेकरशी बोललो. तिलाही नेमकेपणाने सांगता येईना पण तिच्याकडे गोविंद पोवळेंचा दूध्व होता. तो तिने मला दिला आणि...आणि काय मंडळी..मी दस्तुरखुद्द पोवळेसाहेबांशी बोललो आणि गाण्यातले शब्द तपासून घेतले. माझ्या दृष्टीने हा अलभ्य लाभ आहे. इतकी वर्ष ज्या व्यक्तीची गाणी मी मोठ्या भावभक्तीने ऐकली त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला मिळाला...अजून काय हवे?

२८ जून, २००९

माझे संगणकीय आणि महाजालीय उपद्व्याप!

माझा आणि महाजालाचा संबंध सर्वप्रथम २००० साली आला. तसे त्याआधी महाजालासंबंधी बरेच काही ऐकून होतो पण प्रत्यक्ष असा परिचय नव्हता. कार्यालयात प्राथमिक अवस्थेतल्या संगणकांपासून ते पी३ पर्यंतचे संगणक हाताळले होते पण ते कुठेही महाजालाला जोडलेले नव्हते त्यामुळे जरी महाजालासंबंधी एक प्रकारचे कुतुहल होते तरी ते शमवण्याची तशी सोय नव्हती. बाहेर सायबर कॅफेत जाऊन काही करावे तर तशी हिंमतही नव्हती आणि तासाला ३०-४० रुपये देऊन तिथे जाणे म्हणजे निव्वळ पैसे फुकट घालवणे असेही वाटत होते.

२००० साली एका स्थानिक संस्थेतर्फे संगणक बनवण्याचे प्रशिक्षण देण्याबद्दलची एक जाहिरात वाचली आणि मग ठरवले की आपणही हे शास्त्र शिकून घ्यायचे. त्याप्रमाणे तिथे २५०० इतके नाममात्र शुल्क भरून नाव नोंदवले. तिथे संगणक ओळख,त्याची अंतर्गत रचना आणि कार्य,तसेच जोडणी आणि दुरुस्तीचे जुजबी ज्ञान मिळाले. त्या भांडवलावर मग मी हिंमत करून माझा पहिला संगणक बनवला .
माझ्या कार्यालयातील एका तरूण पण ह्या क्षेत्रातल्या माझ्यापेक्षा अनुभवी मित्राला साथीला घेऊन मी हा संगणक बनवला. माझ्या संगणकाची प्रमूख तांत्रिक वैशिष्ठ्ये अशी होती.
१)प्रोसेसरः इंटेलचा पी३-८६६मेगाहर्ट्झ
२)मदरबोर्डः इंटेल ८१५ चिपसेट आधारित
३)रॅमः १२८एम्बी
४)१.४४ फ्लॉपी ड्राईव्ह
५) सीडी रॉम,
६)२०जीबी हार्डडिस्क
तसेच स्पीकर्स,माऊस्,कीबोर्ड,अंतर्गत मॉडेम वगैरे जरूरीच्या गोष्टी.

संगणक जोडणी तर व्यवस्थित झाली. त्यानंतर त्यावर विंडो९८ चढवणे आणि इतर जरूरी प्रणाल्या चढवताना अनंत तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले. एक तर तुटपुंजे ज्ञान आणि त्यात योग्य सल्ला देऊ शकतील असेच कुणीच आजुबाजुला नसल्यामुळे संगणक जोडणीनंतर प्रत्यक्ष संगणक व्यवस्थितपणे सुरु होईपर्यंत जवळ जवळ १५-२० दिवस मी त्याच्याशी झगडत होतो. त्याचा फायदा असा झाला की बर्‍याच गोष्टी ज्या शिकताना कळल्या नव्हत्या त्या अनुभवाने शिकलो. नुसताच शिकलो नाही तर त्याचा फायदा माझ्यानंतर ह्या क्षेत्रात पडलेल्यांना मी देऊ शकलो.

संगणकावर विंडो ९८ चढवताना आलेले अनुभव जर त्यावेळी लिहून ठेवले असते तर नवशिक्यांसाठी एक छानसे पाठ्यपुस्तक तयार झाले असते असे आज मागे वळून पाहताना वाटते. कितीतरी साध्या साध्या गोष्टी असतात ज्या अतिशय महत्वाच्या असतात पण त्याबद्दल फारसे कुणालाच माहीत नसते. मी प्रशिक्षण घेतले होते तेव्हा मलाही हे सर्व खूप सोपे वाटले होते पण जेव्हा प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली तेव्हा आलेल्या अडचणी आणि त्यावर योजायचे उपाय ह्याबद्दल दूरान्वयानेही काहीही शिकवले गेलेले नव्हते किंबहुना अशा अडचणी त्या शिक्षकांनाही कधी आलेल्या नव्हत्या. त्यामुळे मी जेव्हा त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने गेलो होतो तेव्हा ते देखिल भांबावलेले दिसले. असो.
तरीदेखिल मी माझ्या नेहमीच्या सहजासहजी हार न मानण्याच्या स्वभावामुळे त्यावर मात केली आणि एकदाचा माझा संगणक सुरु केला. त्यानंतर तो महाजालाला जोडतानाही काही अडचणी आल्या पण त्याबाबतीत मात्र मला इतरांची मदत झाली आणि एकदाचा माझा संगणक सर्वांग परिपूर्ण स्थितीत पोचला. त्यावेळचा आनंद काही और होता.

सुरुवातीला जालजोडणी होती ती एमटीएनएलच्या डायलअप प्रणालीच्या सहाय्याने होत होती. जालावर जाण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे जे जे दिसत होते ते सगळे वाचण्याचा,पाहण्याचा अट्टाहास होता. त्यामुळे तासंतास जालावर खिळून असायचो. त्यातच मधेच उगवणार्‍या चित्रविचित्र,हलत्या-नाचर्‍या जाहिराती वगैरेंच्या भूलभूलैयात मी असा अडकत गेलो की मला खाण्यापिण्याचेही भान नसायचे. त्यात अजून एक गोष्ट मोहमयी वाटायची...फसव्या जाहिराती. आपण नशीबवान ठरला आहात,आपल्याला अमूक इतके बक्षीस लागलेले आहे,मिळवण्यासाठी इथे टिचकी मारा. झाले,मग काय मारायची टिचकी. पुढे जो काही फॉर्म वगैरे असेल तो भरायचा आणि असेच गुंतत जायचे. प्रत्यक्ष बक्षीस तर कधीच मिळाले नाही पण महिना पूर्ण झाल्यावर एमटीएनएलचे बील आले ते पाहून डोळे पांढरे झाले होते....
बील होते निव्वळ रूपये ५०००+......

२१ नोव्हेंबर, २००८

नानुचे इंग्लीश!

ही व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहे. योगायोगाने कुणाशीही,कोणतेही साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

नानु माझा लहानपणचा खास सवंगडी. अभ्यासात तसा यथातथाच होता. अंगाने बर्‍यापैकी जाडसर, उंच म्हणता येईल इतपत उंची, कुरळे केस आणि डोळ्यांना जाड भिंगांचा चश्मा हे त्याचे पहिल्या नजरेत भरणारे रूप होते. ह्या जाड्याचा आवाज मात्र त्याच्या रुपाला अजिबात शोभणार नाही इतका किरटा होता. त्या आवाजात तो बोलायला लागला की समोरचा आश्चर्याने आ वासून राहायचा. इतक्या जाड माणसाचा आवाज असा? की कुणी त्याच्यासाठी बोलतंय आणि हा आपला नुसते तोंड हलवतोय? अशा भावना त्या समोरच्या माणसाच्या चेहर्‍यावर दिसत असत. पण अर्थात विश्वास ठेवावाच लागे कारण कितीही विचित्र वाटले तरी ते खरेच होते. असो.

तर हा नानु खूप गमतीशीर प्राणी होता. तशी जाडी माणसं विनोदी असतातच हा माझा आजवरचा अनुभव आहे. कारण लहानपणी किशोर की तत्सम कोणत्याश्या एका मासिकात एक सदर यायचे. त्याचे नाव होते "हंसा आणि हंसवा!"
तर हा नानु त्या अनुस्वारांचा उच्चार करीत ते वाचायचा. त्याचे ते वाचणेही आम्हाला हसायला कारणीभूत व्हायचे. तसेच अजून एक सदर यायचे. त्याचे नाव होते "हंसा आणि लठ्ठ व्हा!" त्यामुळे माझा असाही एक समज झाला होता की सतत हसणारी व्यक्ती ही लठ्ठच असते आणि त्याचे चालते बोलते उदाहरण म्हणून सदैव नानु समोर असायचाच.

ह्या नानुचे इंग्लीश बाकी खास असायचे. त्याचे इंग्लीश ऐकून समस्त इंग्लीश शिकवणार्‍या शिक्षकांचा तो नेहमीच बकरा व्हायचा आणि आमच्यासारख्यांचे मस्त मनोरंजन व्हायचे. अर्थात नानुला ह्या गोष्टीचे अजिबात वैषम्य वाटत नसे. तो आपला फिदीफिदी हसत असायचा. शेवटी ते मास्तर/बाईलोक कंटाळायचे अणि त्याचा नाद सोडायचे. एकदा नानुने निबंधात एक वाक्य लिहीले...."आय स्टडी हार्डली देअरफोर आय गेट गुड मार्क्स!" नानुच्या त्या निबंधात शिक्षकांनी लाल पेनाने "हार्डली" भोवती मोठ्ठा गोळा काढला. त्यावर नानुने शिक्षकांशी हुज्जत घातली. माझे काय चुकले? असा संतप्त प्रश्न करतच तो भर वर्गात उभा राहिला. हार्डली म्हणजे क्वचित, कधी कधी, असा शब्दाचा अर्थ शिक्षक त्याला किती तरी वेळ समजावून सांगत होते तरी त्याचा आपला एकच धोशा होती की हार्डली म्हणजे व्हेरी हार्ड! शेवटी शिक्षकांनी त्याच्यासमोर डिक्शनरी ठेवली. आता नानुला मानणे भागच होते. तरीही खाजगीत नानु मला म्हणाला , च्यायला ह्या इंग्रजांच्या! कुठे काय वापरतील काहीही सांगू शकत नाही. ब्रेव्ह-ब्रेव्हली, हेवी-हेविली वगैरे रुपं बनवणारे हेच ना ते! मग हार्ड-हार्डली कुठे चुकते?"
नानु, जाऊ दे! तू मनावर नको घेऊस, तसेही इंग्लीशमध्ये सगळे काही अनियमितच असते. आपली नाही ती भाषा. शेवटी राज्यकर्ते होते म्हणून लादलेली भाषा आहे ती. तुला जसे पटेल तसे बोल तू.
हे बाकी बरोबर बोललास तू भटा! तिच्यायला, टीओ-टू, डीओ-डू असे म्हणायचे तर एसओ-सो, जीओ-गो, एनओ-नो असे का म्हणायचे? तेही गो च्या ऐवजी गू म्हटले तर कुठे बिघडते.
एकदम बरोबर! अरे ह्या इंग्लीश लोकांनी आपल्या इथल्या जागांची, लोकांची नावंही बदलली आहेत..मी.
तुला सांगतो भटा, अरे शीव म्हणजे वेस, आपल्या मुंबईची वेस रे! त्याचे ह्या साहेबाने काय केले तर सायन? आरे तिच्या! शीव कुठे आणि सायन कुठे? काय साम्य आहे काय दोघात? वांद्रेचे बॅन्ड्रा, भायखळाचे बायकुला...तुला सांगतो की मीही आता ठरवलंय इंग्लीशची अशीच वाट लावयची म्हणून मी असे इंग्लीश बोलणार आहे की साहेब ते इंग्लीश ऐकून थक्कच झाला पाहीजे, पण ह्या आपल्या शिक्षकांना स्वाभिमानच नाहीये. बसतात आपले साहेबाची लाल म्हणत. असेल! त्याची लाल असेलही. पण आपली भाषा काय कमी आहे काय?
इथे नानुचा चेहरा लालेलाल झालेला असतो.

चक्रवर्ती चे चक्रबोर्ती, मुखोपाध्यायचे मुखर्जी, चट्टोपाध्यायचे चॅटर्जी, ठाकूरचे टागोर....असे कसली कसली वाट लावली रे ह्या लोकांनी आपल्या देशी नावांची. आता मीही त्यांच्या नावांची वाट लावणार आहे.
म्हणजे कसं रे? जरा उदाहरण दे ना!
नानुला क्रिकेटचा भलताच नाद त्यामुळे मग त्यातलीच नावे त्याने लगेच पुढे केली. आता बघ हं. आपला गावस्कर आहे ना..त्याला ती लाल माकडॆ गवास्कर,गॅवास्कर,गवॅस्कर असे काहीही म्हणतात. विश्वनाथ हे नाव त्यांना उच्चारता येत नाही म्हणून नुसताच विशी असा उच्चार करतात. म्हणून मी आता त्यांची नावे सांगतो ती ऐक.....
मार्टीन क्रो...मार्तिकेचा कावळा
जॉन स्नो.....बर्फाळ जानू
जॉन एम्बुरी....शेंबड्या जानू
अशी कितीतरी नावं तो सटासट सांग गेला. सगळीच आता लक्षात नाही.

नानुचे बोली इंग्लीश खास त्याचे असेच होते. कम हियरच्या ऐवजी "इकडे कम." मग तो जो कुणी असेल तो "इकडे आला" की हा म्हणणार...कमला!
मग म्हणणार सीट! तो बसला की हा म्हणणार सीटला. कोणत्या तरी एका मराठी सिनेमात ’लक्षा’च्या तोंडी असले शब्द घातलेले मी ऐकलेत. ते पात्र बहुदा नानुवरूनच बेतलेले असणार.

नानुने मला एक कोडे घातले....
ए भटा, ह्याचे इंग्लीश भाषांतर कर बघू......एकेका बाकावर दोन-दोन मुले बसतील.
हॅ! सोप्पे आहे...टू बॉईज विल सिट ऑन इच बेन्च!
साफ चूक!ह्याचा अर्थ काय होतो माहीतेय?
काय?
दोन मुले प्रत्येक बाकावर बसतील. आता हे कसे शक्य आहे? :)
मी म्हटलं,आयला हो रे! मग? तूच सांग आता उत्तर!
मग नानुने एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला.....टू-टू बॉईज विल सिट ऑन इच-इच बेंच! ;)
कशी जिरवली! असे भाव डोळ्यात घेऊन नानू माझ्याकडे मिश्कीलपणाने पाहात होता.


अरे भटा मला सांग...एलओडीजीइ चा उच्चार सांग?
लॉज!
नाही.
नाही? मग?
लोडगे! हाहाहा.
मग डीओडीजीइ म्हणजे काय? दोडगे?
बरोब्बर! च्यायला भटा! तू पण लय हुशार आहेस बरं का!
मग चेला कुणाचा आहे?तुझाच ना?
ह्यावर नानु मोठ्या खुशीत येऊन पाठीत एक रट्टा घालतो.

मंडळी असे नानु तुमच्याही आसापास असतील तर सांगा त्यांचे किस्से!

१२ एप्रिल, २००८

मराठी माणूस,हिंदू माणूस आणि भारतीय नागरिक!..काही साम्यस्थळे!

विषय पाहून चक्रावलात? विषय फार गहन आहे? अहो हे मला माहीत आहे हो. पण मी काठाकाठानेच पोहणार आहे. कारण फार खोलात शिरण्याची माझी क्षमता नाहीये ह्याची मला पूर्ण जाणिव आहे. ह्या तिघांच्यात जाणवणार्‍या दोषांत(मी इथे फक्त दोषांबद्दलच बोलणार आहे) एक समानता आढळते. त्याबद्दलची माझी काही ढोबळ निरीक्षणे मी इथे नोंदवणार आहे. त्यावर आपलीही मते जाणून घ्यावीत म्हणतो.

काही ठळक दोष जे वरील तिघात समान आहेत.

१)कृती कमी उक्ती जास्त. म्हणजे घोषणा करण्याची उपजत आवड पण अंमलबजावणीच्या नावाने बोंब.
२)मुत्सद्दीपणाचा अभाव. जे करायचे त्याची करण्याआधी जाहीर चर्चाच फार,त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावते.
३)अती सहिष्णुता. आपल्या विरोधात कुणी अवाजवी बोलले,वागले तरी त्याचा योग्य वेळी योग्य त्या प्रकारे बंदोबस्त करणे तर दूरच पण मनाचा उदारपणा दाखवण्यासाठी तिथे सोयिस्कर दुर्लक्ष करणे.
४)स्वत:च्या माणसांवर उठसूठ टीका करणे. प्रतिस्पर्ध्याला वचक बसेल असे वागण्याऐवजी स्वत:च्याच लोकांना अक्कल शिकवणे.
५)एकीचा अभाव. आपापसात सामंजस्य निर्माण करण्याऐवजी दुही कशी वाढेल अशी वक्तव्ये आणि वागणूक करणे.

मंडळी मी वर लिहिलेले सगळे दोष हे ममा(मराठी माणूस, हिंमा(हिंदू माणूस) आणि भाना(भारतीय नागरिक)ह्यांच्यामध्ये कमीजास्त प्रमाणात आढळतात.पण ह्यामध्ये ममा हा सर्वात कमजोर आहे,त्यानंतर हिंमा आणि मग भाना. हा नेमका काय प्रकार आहे? चला पुढे वाचा.

ममा:आपल्याच प्रदेशात(महाराष्ट्रात)हा आता उपरा ठरायला लागलाय.इथले राजकीय नेते मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी अमुक करू आणि तमुक करू असा नुसता घोषणांचा मारा करत असतात.पण कृतीच्या नावाने शून्य. कागदोपत्री मराठी भाषा जरी इथली राजभाषा असली तरी सगळे कागदी व्यवहार अजूनही इंग्लिश मध्ये आणि इतर सर्वसामान्य व्यवहार हिंदीमध्ये चालतात.नोकरी धंद्यात इथला भुमिपुत्र म्हणून ज्याला प्राथमिकता मिळायला हवी त्या ममा ला कुणी हिंग लावूनही विचारत नाही. मराठी अस्मितेचे गाजर दाखवून काही लोक आंदोलनं वगैरे करतात आणि त्यात मराठी माणूसच भरडला जातो. परप्रांतीयांना फुकटची इतरांची सहानुभूती मिळते. जे काही मराठी भाषा आणि ममा साठी करायचे ते बिनबोभाटही करता येत असते. पण इथल्या लोकांना,विशेष करून राजकारण्यांना असे काही करण्याऐवजी मोठमोठ्या घोषणा करण्यात आणि स्वत:भोवती दिवे ओवाळून घेण्यातच स्वारस्य असते. त्याला आम ममाशी काहीही देणेघेणे नसते.
अशा तर्‍हेच्या घोषणांमुळे विरोधकांचे मात्र फावते आणि मग आपली एकत्रित शक्ती ह्याविरुद्ध उभी करून महाराष्ट्र आणि ममाला संकुचित,जातीयवादी वगैरे ठरवून मोकळे होतात.

आता जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो तेव्हा ममाच्या जागी हिंमाला ठेवा. इथेही वरचे सर्व निकष लागू होतात. हिंदू नेते हिंदूंच्या भल्यासाठी(हिंदू बहुसंख्यांक असल्यामुळे ते साहजिक आहे) जे करायचे ते बिनबोभाटपणे करू शकतात पण त्यांना तसे काही करण्याच्या ऐवजी फुकट प्रसिद्धी हवी असते. त्यामुळे राणा भीमदेवी घोषणा करायच्या की ज्यामुळे निधर्मीवादाची झूल पांघरलेल्यांच्या हातात एक आयतेच हत्यार मिळते.इथे हिंमाच्या हिताचे म्हणजे दुसर्‍यांच्या अहिताचे असे नसते पण घोषणा करणार्‍यांना काही तरी सनसनाटी निर्माण करायची असते असे त्यांच्या वक्तव्यावरून कुणालाही वाटू शकते; त्यामुळे त्यावरून रण माजते आणि मूळ विषय बाजूलाच जातो.सर्व जनतेला रोजगार हमी.अन्न,वस्त्र,निवारा,पाणी अशा प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी
प्राथमिकता देण्याऐवजी नसलेले धार्मिक प्रश्न उकरून काढण्यात ह्या नेत्यांना स्वारस्य असते.त्यामुळे होते काय की इथला बहुसंख्य हिंमा हा उपरा ठरतो.त्यातून हिंदूंमधील तथाकथित विद्वान आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवणारी माणसे नुसते ’हिंदू’ असे काही ऐकले की लगेच कावकाव करायला सुरुवात करतात.त्यांना अन्य धर्मीयांनी स्वत:ला त्या धर्माचे अनुयायी म्हटले तर त्यात काहीही वावगे वाटत नाही पण हिंमा ने आपण हिंदू आहोत असे म्हटले तर ते जातीयवादाचे द्योतक मानले जाते.

हाच निकष आंतर्राष्टीय पातळीवर भाना ला लागू पडतो. चीन,अमेरिका,पाकिस्तान भारताला अक्कल शिकवायचा प्रयत्न करतात. स्वत:हून कधी कुणावर आक्रमण न करणार्‍या भारतीयांना शांतता आणि संयमाचे धडे दिले जातात. दिवसाढवळ्या चालणार्‍या पाकिस्तानी दहशतवादाला आम्ही चोख उत्तर देऊ वगैरे घोषणा सत्ताधारी नेहमीच करत असतात पण प्रत्यक्ष काहीच करत नाहीत. चीनने आपला प्रदेश बळकावला तरी भारताला आंतर्राष्ट्रीय समुदायाकडून सोडा पण इथल्या मार्क्सवादी पक्षाकडूनही पाठिंबा मिळत नाही. मुत्सद्दीपणात भारतीय नेहमीच मार खातात. मग तो ताश्कंद करार असो,अणुभट्टी-करार असो अथवा चीन-पाकिस्तान बरोबरची सीमावादाची बोलणी असोत,प्रत्येक ठिकाणी आपण कमी पडतो.

मंडळी ह्यातला एकेक विषय हाताळायचा म्हटला तरी त्यावर पानेच्या पाने लिहिता येतील इतके हे विषय सर्वव्यापी आहेत आणि माझ्यासारख्याची ती कुवत नाही. तेव्हा मी इथेच थांबतो. ह्या ठिकाणी बरेच मुद्दे अध्याहृत राहिलेले आहेत. ते आपण आपापल्या कुवतीनुसार समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि आता खरंच थांबतो.
इति अलम्!