माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

३० ऑक्टोबर, २०१०

पुरूषांचा डबा!

स्त्री-पुरुष भेद हा निसर्गानेच निर्माण केलाय. पुरुष शारीरिक दृष्ट्या बलवान असतो तर स्त्री मानसिक दृष्ट्या बलवान असते.त्यामुळे खरंतर त्यांच्यात सर्वथा समानता असू शकणार नाही हे खरंय...पण काहीएक मर्यादेपर्यंत तरी ती तशी मानता यायला काहीच हरकत नाही कारण स्त्रियाही आता फारशा मागे नाहीत. बौद्धिक,शैक्षणिक बाबींबरोबरच त्या आता जिथे शारीरिक कस लागतो अशा पोलिस,सैन्यदल वगैरे ठिकाणींही नित्यनेमाने दिसू लागलेल्या आहेत. पुरुषांचीच मक्तेदारी समजल्या जाणार्‍या सगळ्या क्षेत्रात आता त्यांनीही भरारी मारायला सुरुवात केलेली आहे. ह्याच जोरावर आता त्या स्त्री-पुरुष समानता मागत आहेत...कैक गोष्टींत ती तशी अनुभवायलाही मिळतेय पण तरीही काही बाबींमध्ये स्त्रियांचा युक्तिवाद कसा चुकीचा असू शकतो हे एका उदाहरणावरून दिसून येईल. खरं सांगायचं तर हा दोष केवळ स्त्रियांचाच नाही तर पुरूषही त्या युक्तिवादाचा जसा प्रतिवाद करतात तेही तेवढेच चुकीचे आणि हास्यास्पद आहे...ते उदाहरण म्हणजे...रेल्वेतील पुरुषांचा डबा. स्त्री-पुरुष वादात नेहमीच सामील होणारे लोक हा ’पुरुषांचा डबा’ कुठून आणतात हे मला तरी आजवर पडलेले कोडे आहे.

केवळ स्त्रियांसाठी,सर्व वेळ स्त्रियांसाठी... असे शब्दप्रयोग असलेले आणि स्त्रीचे चित्र असलेले डबे आपण स्थानिक आणि दूर पल्ल्याच्या रेल्वे गाड्यातून नेहमीच पाहत असतो; पण केवळ पुरुषांसाठी,सर्व वेळ पुरुषांसाठी असा एकतरी डबा रेल्वेत आहे का?...ह्याचा विचार चांगले सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्री-पुरुषही करू शकत नाहीत हे पाहून माझी तर खूपच करमणूक होते.

आता मी जेव्हा म्हणतो की केवळ पुरुषांसाठी असे डबे नसतात...मग स्त्रियांसाठी राखीव डबे सोडले तर इतर डब्यात...जे सर्वसाधारण डबे आहेत...ह्यात स्त्री-पुरुष असे कुणीही प्रवास करू शकतात...अशा ठिकाणी पुरुषांची गर्दी का दिसते? अहो, त्याचे कारण खूपच साधे आहे. प्रवास करणार्‍या पुरुषांची संख्या ही प्रवासी स्त्रियांपेक्षा खूपच जास्त आहे म्हणून हे घडते.पुरुषांच्या अंगी नैसर्गिक असणार्‍या शारीरिक बलाचा त्रास स्त्रियांना सोसत नाही म्हणून त्या अशा सर्वसाधारण डब्यातून सहसा प्रवास करत नाहीत...त्यामुळे झाले काय? पुरूषांना आणि स्त्रियांनाही वाटायला लागलं की हा डबा/हे डबे केवळ पुरुषांसाठीच आहेत...म्हणून वाद-विवादात नेहमी पुरुषांचा डबा असाच वाक्प्रचार वापरला जातो...जो सर्वथैव चुकीचा आहे. आता दुसरी बाजू पाहू...ज्या डब्यातून कायद्याने केवळ महिलाच प्रवास करू शकतात त्यात पुरुषांना प्रवास करण्यास मज्जाव आहे...म्हणून ते इतर डब्यात गर्दी करतात....हसलात ना! माझे विधान तुम्हाला गंमतीशीर वाटेल...पण ते वास्तव आहे. अहो पुरुष प्रवाशांचीच नव्हे तर एकूणच आता स्त्री-पुरुष प्रवाशांची संख्या बेसुमारपणे वाढायला लागल्यामुळे गाड्यांना होणारी गर्दीही अनियंत्रित आहे त्यामुळे हे वाद नेहमीच उद्भवतात. आता स्त्री-प्रवाशांची संख्याही वाढायला लागलेय...तर त्यांनी अजून काही राखीव डबे आम्हाला हवेत अशी मागणी करणे हे एकवेळ समजू शकते...पण पुरुषांना इतके सारे डबे आणि बायकांना फक्त एकच का? असा चुकीचा सवाल करू नये. कारण स्त्रियांसाठीच्या राखीव डब्यातून त्या जसा हक्काने(अर्थात पुरुषांपासून सुरक्षित)प्रवास करू शकतात तसाच हक्काने इतर डब्यातूनही प्रवास करू शकतात...त्यात त्यांना कायदा कधीच आड येत नसतो...त्या उलट स्त्रियांसाठीच्या राखीव डब्यातून
पुरुषाने प्रवास केला तर तो बेकायदेशीर समजून त्याला दंड/कारावास होऊ शकतो....तेव्हा हे लक्षात घ्या...स्त्रियांसाठी संपूर्ण गाडी मोकळी असते..तसे पुरुषांना नसते...

असाच एक विरार लोकलचा मजेशीर अनुभव आहे माझ्या गाठीशी....पश्चिम रेल्वेवर गाडीला जो बायकांचा दुसर्‍या वर्गाचा अर्धा डबा असतो(पहिल्या दर्जाच्या डब्याला जोडून) तो एका विशिष्ट गाडीला सामान्य डबा म्हणून जोडलेला आहे....एकदा काही कामानिमित्त मी चर्चगेटहून दहिसरला जाण्यासाठी जी विरार लोकल पकडली...ती गाडी नेमकी हीच होती....आणि मी त्याच डब्यात चढलो होतो...अगदी बाहेर कोणतेही ’केवळ बायकांसाठी’ असे न लिहिलेले पाहून. पण सवयीने सगळ्या बायका त्यात भराभर चढायला लागल्या..आणि मला गुरकवायला लागल्या..लाज नाही वाटत का तुम्हाला? सरळ सरळ बायकांच्या डब्यात चढलात ते....त्यांचा तो रुद्रावतार पाहून माझ्यासारखे आणखी काही तुरळक पुरुष चढले होते त्यांनी लगेच पलायन केलं....मी मात्र तिथेच बसून राहिलो आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की हा सामान्य डबा आहे..केवळ तुमच्यासाठी नाहीये....हवं तर बाहेर जाऊन पाहा...तरीही त्या वाद घालायल्या लागल्या....नशीब माझं की त्यातल्या एकीने इमानदारीत बाहेर जाऊन पाहिले आणि मग...अय्या, खरंच की...हा आपला डबा नाहीये...हा तर पुरुषांचा डबा आहे...असे म्हणाली. मी पुन्हा तिची चूक दुरुस्त केली...पुरुषांसाठी..केवळ पुरुषांसाठी असा डबा अस्तित्त्वातच नाहीये....त्यावर त्या बायका आरडा-ओरडा करायला लागल्या..असे कसे तुम्ही म्हणून शकता?ते काही नाही...हा आमचाच डबा आहे...तुम्ही जागा खाली करा नाही तर... थांबा आता आम्ही टीसीला आणि रेल्वे पोलिसांना बोलावतो म्हणजे मग समजेल तुम्हाला....आम्हाला अक्कल शिकवताहेत!
पण मी त्यांना कसेबसे शांत करून... वर सुरुवातीला जे काही लिहीलंय तेच... त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं तेव्हा मात्र त्या अवाक्‌ झाल्या.....

मी त्याच गाडीने आणि त्याच डब्यातून शेवटपर्यंत प्रवास केला...पुढे तर अजून गंमत आहे.त्या बायका शांत झाल्यावर मी माझ्या ब्रीफकेसमधून दिवाळी अंक काढून वाचायला सुरुवात केली...होय. त्यावेळी दिवाळीचे दिवस जवळ आलेले होते आणि मी आमच्या कार्यालयात एक छोटेसे वाचनालय सुरु केले होते...माझ्या ब्रीफकेसमध्ये अजून एकदोन अंक होते...ते त्या बायकांनी माझ्याकडून मागून घेऊन त्यांचेही सामुदायिक वाचन सुरु झाले. पुढे प्रत्येक स्टेशनवर फक्त बायकाच चढत होत्या आणि मला पाहून अद्वातद्वा बोलायला सुरुवात करायच्या...पण मग सुरुवातीला ज्यांना मी समजावले होते...त्याच बायका माझी बाजू मांडायला लागल्या. :)
रागावलेल्या एका ठकीने मला हेही विचारले..तुम्हाला बायकांच्यात प्रवास करायला लाज कशी नाही वाटत?
मी म्हटलं...माझ्या घरातही आई-बहीण आहेच की...तुम्ही त्या जागी आहात मला..मग मी कशाला लाजू...तेव्हा ती देखील वरमली होती...
दहिसरला उतरण्याआधी कांदिवलीपासून माझ्या जागेसाठी कैकजणींनी फिल्डिंग लावलेली होती....मी उठलो आणि मग त्या आपापसात मारामार्‍या करत बसल्या.

ह्या गोष्टीला आता खूप वर्ष झाली तरीही आज ’पुरुषांचा डबा’ ही संकल्पना रेल्वेने प्रवास करणार्‍या बहुसंख्य लोकांच्यात टिकून आहे ह्याचे वैषम्य वाटते.

३ टिप्पण्या:

शांतीसुधा म्हणाले...

सर्वसामान्यांसाठीचा डबा हा घाईच्या वेळांमध्ये केवळ पुरूषांचाच (अघोषित) असतो. कारण ज्या डब्यांत पाय ठेवायला जागा नसते अशा सर्वसामान्य डब्यांत सगळे पुरूषच एकमेकांच्या उरावर बसून जाऊ शकतात. त्यामुळे अनेकवेळा स्त्रियाम्च्या प्रथम दर्जाच्या डब्यात सुद्धा द्वितीय दर्जाचा परवना असलेल्या स्त्रिया चढून बसतात. त्यामुळे ओघानेच स्त्रियांच्या कोणत्याही डब्यात घाईच्या वेळांत प्रचंड गर्दी होते. स्त्रियांसाठी अजुन राखिव डब्यांची मगणी रास्तच आहे. केवळ तांत्रिक दृष्ट्या सर्व गाडी स्त्रियंकरीता खुली असली तरी प्रत्यक्षात स्त्रियांसाठी राखिव डबे हे स्त्रियांचे डबे आणि इतर सगळे पुरूषांचे डबे अशीच विभागणी झालेली असते. म्हणून तेच लोकांच्या बोलण्यात प्रतिबींबीत होत आहे. एकूणच मुंबईत घाईच्या वेळांत लोकल गाडीचा प्रवास म्हणजे सगळ्यात मोठं दिव्य आहे.

मी अत्त्यानंद म्हणाले...

अपर्णा, ते मान्यच आहे की अघोषितपणे तसे घडलंय..पण तरीही केवळ पुरुषांसाठी जाहीरपणे एकच ठिकाण आहे...स्वच्छतागृह! ;)
रेल्वेतल्या गर्दीची समस्या सोडवण्यासाठी जे काही कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने करायचंय ते केलंच पाहिजे...त्यात केवळ स्त्रियांसाठीचे डबे वाढवण्याला माझा संपूर्ण पाठिंबाच आहे...पण कृपा करून कुणीही ’पुरुषांचा डबा’ असा वाक्प्रचार करू नये.

श्रेया म्हणाले...

फक्त पुरूषांचा डबा ही संकल्पना नसली आणि बायकांना बायकांच्या राखीव डब्याव्यतिरिक्त इतर डब्यातून प्रवास करायला मुभा असली तरिही कोणीही *शहाणी* बाई तिच्याबरोबर पुरूष जोडीदार असल्याशिवाय आणि अगदीच नाईलाज असल्याशिवाय राखीव डब्यांव्यतिरिक्त प्रवास करू धजेल अशी परिस्थिती नाही. २२ वर्षांपूर्वी मी स्वत: हा अनुभव घेऊन कानाला खडा लावून घेतला आहे.