माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

८ जून, २००७

तबलजीचे मनोगत!

मैत्री-कट्टा संगीत महोत्सव ह्या माझ्या लेखातील तबलजी उस्ताद विकिखां कुवेती ह्यांचे त्या कार्यक्रमा संबंधीचे समीक्षण त्यांच्याच शब्दात वाचा.

नमस्कार,
मी सुप्रसिध्द तबलावादक पं. विकी खान (हो, हल्ली हे "सुप्रसिद्ध" आणि "पंडित" वगैरे आपलं आपणच म्हणवून घ्यायचं असतं.) त्या अत्यानंदांवर अब्रुनुकसानीचा खटला भरायच्या विचारात आहे मी. अहो, परवाच्या त्या गाजलेल्या संगीत संमेलनाच्या वृत्तांतात बाकी सगळ्यांच्या नावापुढे "पंडित" आणि माझ्या नावापुढे "उस्ताद" ? छे छे, हे "उस्ताद" पेक्षा "पंडित" कसं भारदस्त वाटतं. त्या फडातल्या कुस्तीगीराला देखील उस्ताद्च (की वस्ताद) म्हणतात ना? तसं बघायला गेलं तर कुस्तीगीर आणि आमच्या जातकुळीत काय फरक ? ते माणसांना बुकलतात आणि आम्ही तबला डग्ग्याला. मला अशी शंका आहे की माझं विकी खान हे नाव बघून त्यांनी हा धर्मभेद केला असावा. मुसलमान नाव दिसलं की तो "उस्ताद" आणि इतर सगळे "पंडित" असा संकेत आहे काय ? वकीलाला विचारतोच की अब्रुनुकसानीच्या खटल्याबरोबरच अत्यानंदाना या "धर्मभेदाच्या"लफडयात पण अडकवता येईल का कसंतरी ?

आता विषय निघालाच म्हणून सांगतोय. माझं मूळचं नाव विश्वनाथ कणकवलीकर, अगदी खुद्द कणकवलीचा. तसा मी तबला बरा वाजवायचो (चो ?). पण काही केल्या कार्यक्रम मिळायची मारामारी. तेंव्हा एका हितचिंतकाने सल्ला दिला की "अरे हल्ली त्या 'खान' लोकांचं जरा बरं चाललंय, तू तुझं नामांतरण का नाही करत ? लाव की खान तुझ्या नावापुढे. पण ते विश्वनाथ खान वगैरे काही शोभणार नाही बुवा, दुसरं काहितरी बघ". मला (कधी नव्हे ती) एक छान कल्पना सुचली. म्हटलं आपल्या नावातली आद्याक्षरं घेऊन "विकी खान" असं केलं तर ? आणि माझ्या या नामांतरामुळे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासारखी चळवळ वगैरे होण्याची शक्यता तर दूरच. (विचारतोय कोण आम्हाला ?). मग काय, करुन टाकले कागदपत्र सरकार दरबारी दाखल. "ध चा मा" च्या "ध"र्तीवर "वि.क." चा विकी करुन टाकला) क्या बात है ! तबल्याच्या तुकड्याला दाद नाही तर निदान या नावाला ("तुकडे" करुन तयार केलेल्या) तरी दाद मिळेल. याचा दुसराही फायदा झाला. कुवेतमधे एका शाळेत तबला शिक्षकाची नोकरी चालून आली होती. माझ्या नावाकडे (बदललेल्या) पाहून त्यांनाही मी "आपलासा" वाटलो आणि नेमून टाकलं त्यांनी मला.
या नामांतरणामुळे आणि "अनिवासी भारतीय" दर्जामुळे हल्ली चांगलंच चाललंय (आमच्यात दोन वेळचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला की "चांगलं चाललंय" असं म्हणायची पद्धत आहे). जरा कार्यक्रम वगैरे मिळायला लागलेत, इथे कुवेतमधे आणि शाळेला सुट्टी पडेल तेंव्हा भारतातही. खरंच या "खान" आणि "एन आर आय" या शब्दात काय जादू आहे माहित नाही, पण लोकं हल्ली जरा आदराने बघायला लागले आहेत.

असो, मी सांगायला काय आलो आणि बोलत काय बसलोय ? कालच अत्यानंद नावाच्या वार्ताहराचा मैत्री-कट्टा संगीत महोत्सवावरचा वॄत्तांत वाचला. (ते स्वत:ला संगीत समीक्षक म्हणवतात, पण मला पंडित म्हणत नाहीत काय ? मग मी कशाला तुम्हाला संगीत समीक्षक म्हणू ?) म्हटलं आपणही मांडावेत महोत्सवातले आपले चक्षुर्वैसत्यम अनुभव (पुढेमागे तबल्यावर पोट चालायची पंचाईत झाली तर लिखाणाच्या मानधनावर तरी गुजराण करता येईल. आणि हो, पोट चालायला हात "चालला" पाहिजे ना तसा, पण इथे रियाज कोण करतो ?)

गेल्या महिन्यात मोद बुवांच्या खाजगी सचिवाचा फोन आला कुवेतला, महोत्सवाची माहिती द्यायला. प्रथम माझा समज झाला की मला अध्यक्ष वगैरे म्हणून बोलावताहेत की काय ? पण नंतर कळलं की मोद बुवांच्या गाण्याला साथ कराल का अशी विचारणा करण्यासाठी तो फोन होता. (नंतर असंही कळलं की हल्ली मोद बुवा स्वत:च फोन करुन मी त्यांचा खाजगी सचिव बोलतोय असंही सांगतात. गाण्याच्या विद्येचा वेगवेगळे आवाज काढण्यासाठी उपयोग करण्याची अभिनव कल्पना ऎकून बुवांचं कौतुकही वाटलं. पण खरं गूढ पुढेच उकललं. आमच्याच एका स्नेहयाकडून कळलं की हेच मोद बुवा पूर्वी (म्हणजेच ते तरुण असताना) वाद्यवृंदात मिमिक्री करायचे आणि अमिताभ, अशोक कुमार, दादा कोंडके वगैरेंचा आवाज हुबेहुब काढायचे म्हणे. असो, येतात चांगले दिवस काही काहींना)
मी देखील महोत्सवात कोण कोण हजेरी लावणार आहेत याची चौकशी केली (जसं काय बाकी कोण कोण आहेत यावर मी संमती देण्याचं अवलंबून होतं, पण लागतात आणायला असले आव). हजेरी लावणार्‍यांची जंत्री ऎकली आणि ठरवलं की इथे वाजवायचा चान्स अजिबात सोडायचा नाही. पं. दिगण्णा, पं. संजीवप्पा आणि श्री. ठाणेकर (आता वृत्तांतात ठाणेकरांनाच फक्त श्री. का ? अत्त्यानंदांची काहीतरी जुनी दुश्मनी दिसतेय) अशी दिग्गज मंडळी गाऊन जाणार होती. मग मी संमेलनाची तारीख आणि कोणत्या कलाकारांना कशा तारखा दिल्या आहेत याचा जरा अंदाज घेतला. कलाकारांचा क्रम ऎकल्यावर जरा आश्चर्यच वाटलं, सर्व दिग्गज कलाकार आधी आणि सर्वात शेवटच्या दिवशी मोदबुवा ? हे म्हणजे गार्डाच्या डब्याच्या दिशेने आगगाडी चालवण्यासारखं होतं. सवाई गंधर्व महोत्सवात सुध्दा पंडित भीमसेनजी सर्वात शेवटी गातात असाच प्रघात आहे ना ? मानच आहे त्यांचा तो. मग वाटलं की मोदबुवांचं वजन (गानक्षेत्रातलं, शारिरिक नव्हे) वाढलं देखील असेल येवढं. कुवेतला असल्यामुळे हल्ली मायदेशातील कलाकारांच्या वजनांचा हिशेब राहिला नाही तेवढा. आता कळतंय की मोदबुवांच्याच चाहत्यांनी (की हाताच्या बोटावर मोजता येतील अशा चमच्यांनी ?) मोदबुवांच्या आदेशावर या महोत्सवाचं आयोजन केलं होतं, मग मोदबुवा शेवटी गाणार नाहीत तर काय ?
तशी मी मोदबुवांना साथ केली नव्हती यापूर्वी आणि माझं नाव त्यांना कोणी सुचवलं याबद्द्लही मी जरा चाचपणी करुन बघितली फोनवर, पण सचिवाने (सचिव कसला ? बुवाच ते) सुगावा लागू दिला नाही. ही सर्व कोडी महोत्सवानंतर उलगडली. बहुतेक सर्व तबलजींनी बुवांना नकार कळवल्यावरच बुवा माझ्याकडे वळले असावेत. फोनवर बिदागी विचारावी की नको या संभ्रमात मी होतो, नाहीतर बुवांना तो आगाऊपणा वाटून संमेलनात वाजवायची हातची संधी मी गमावून बसेन असं वाटलं. पण धैर्य करुन केलीच विचारणा शेवटी. सचिव (म्हणजे बुवाच, आता दरवेळी नाही हां सांगणार हे) म्हणाला की आधी झाकीर हुसेनच वाजवणार होते, पण झाकीर ठाणेकरांना साथ करणार हे ऎकून बुवांनी विचार बदलला आणि तुम्हाला पाचारण केलं. पण झाकीरला जी बिदागी देणार होतो तेवढीच तुम्हालाही देऊ असं आश्वासन फेकलं माझ्या तोंडावर. आता झाकीर चेक वटल्याशिवाय बुडंच हलवत नाही असं ऎकलं होतं पण मला ती चैन परवडणारी नव्हती म्हणून सचिवाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला (ठेवला कसला ? ठेवावाच लागला). आता कार्यक्रम हातचा जात नाही याची एकदा मनोमन खात्री पटल्यावर म्हटलं विमानाच्या परतीच्या तिकिटाचा विषय काढावा. पण त्या चतुर सचिवाने संमेलनात हजेरी लावणार्‍या कोणत्याच कलाकाराने गाडीभाडं घ्यायचं नाही असं ठरवलं आहे असं दिलं बिनदिक्कत फेकून. आता पं. दिगण्णा, पं. संजीवप्पा आणि पं. ठाणेकर (अत्यानंद श्री. म्हणतात ना मग मी पंडितच म्हणणार) जर गाडीभाड्यावर पाणी सोडणार असतील तर म्या पामराची काय कथा. तेवढंच ‍चॅरिटी केल्याचं समाधान मानून घ्यायचं, दुसरं काय ? आणि तसं बघायला गेलं तर हा कार्यक्रम पदरात पडला नसता तरी शाळेला सुट्टी पडल्यावर स्वखर्चाने मायदेशी येणार होतोच की मी. त्यामुळे प्रवासभत्त्यावर पाणी सोडताना काळजाला फार घरं पडली नाहीत
.
महोत्सव तीन दिवस चालणार होता. खरं तर सगळ्या नावाजलेल्या कलाकारांना एका व्यासपीठावर ऎकण्याची संधी आयतीच चालून आली होती. पण प्रश्न ईभ्रतीचा होता. सवाईला शेवट्च्या दिवशी जर पंडितजींना झाकीर साथ करणार असेल तर तुमच्यापैकी झाकीरला पाहिलाय का कोणी आधी २ दिवस सगळयांची गाणी ऎकताना ? मग तोच रुबाब मी दाखवला जरा तर काय हरकत होती ? म्हणून पहिले दोन दिवस संमेलनाच्या आसपास सुध्दा फिरकलो नाही. (तसं बघायला गेलं तर श्रोत्यात, अगदी बसलो असतो तर कोण मरायला ओळखणार होतं मला ? पण आपला मान आपणच राखायचा असतो). तिसर्‍या दिवशी मात्र स्वत:चा तबला-डग्गा घेऊन वेळेवर हजर राहिलो. मला वाटलं माझं स्वागत करायला पुष्पगुच्छ घेऊन कोणीतरी हजर असेल, पण कसचं काय ? थेट रंगमंचाच्या मागे जाऊन उभा राहीपर्यंत कोणी दखल सुध्दा घेतली नाही माझी. इतकंच काय तर मागे उभा असलेल्या एका स्वयंसेवकाने (मोदबुवांच्या चमच्यापैकी एक कुणीतरी) मी कोणत्या तरी तबलजीचा वाहनचालक असावा असं समजून "पंडितजी नाही आले अजून ?" असा सवाल अस्मादिकांनाच केला. कितीही समजूत काढली तरी मीच "पंडितजी" यावर त्या मूर्खशिरोमणीचा विश्वासच बसेना. नंतर तोच दुसर्‍या स्वयंसेवकाला (अजून एक चमचा) "हल्ली कोणीही उठून तबला वाजवतं" असं बोलल्याचं पुसटसं कानावर आलं. पण ऎकून न ऎकल्या सारखं करण्याशिवाय माझ्यापाशी गत्यंतरच नव्हतं (शेवटी परत सांगतोय, आपला मान आपणच राखायचा असतो)
तबला-डग्गा विंगेत ठेवला आणि म्हटलं जरा समोर बसून पं. ठाणेकरांचं गाणं ऎकावं म्हणून पहिल्या रांगेत जाऊन बसलो, तर परत एका आगाऊ स्वयंसेवकाने मला तिथून उठवलं आणि मागे जाऊन बसण्याचं फर्मान सोडलं. (नंतर त्याच जागेवर अत्यानंद विराजमान झाले असल्याचं मी रंगमंचावरुन पाहिलं. हल्ली कलाकारांपेक्षा वार्ताहरांचं स्तोमंच जास्त माजलंय.) मागे नजर टाकता फक्त शेवटच्या रांगेत काही खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. तिथे जाऊन बसणं माझ्यासारख्या "प्रतिष्ठित" तबलजीला शोभून दिसलं नसतं म्हणून विंगेतूनच गाणं ऎकायचा सोयीस्कर ठराव मीच मांडला आणि मीच मंजूर देखील करुन घेतला. पण एक आनंद मात्र भरपूर झाला की माझ्यासारख्या तबलजीची साथ ऎकायला आज सभागृह खचाखच भरलं होतं.

सत्राची सुरुवात पं. ठाणेकरांच्या (बघा, मी अजूनही पंडित म्हणायचं सोडत नाहिये, शेवटी चांगले संस्कार थोडेच लपून रहातात ?) बहारदार गाण्याने झाली. आपल्या किचकट लयकारीने त्यांनी झाकीरची पळता भुई थोडी केली. त्यातल्या त्यात मला हेच समाधान की आता मी थोडं वाईट वाजवलं तरी हरकत नाही. कारण झाकीर नंतर वाजवण्याची भल्याभल्यांची हिम्मत होत नाही (मी सोडून). येवढं पहाडी गाऊन झाल्यावर पं. ठाणेकर लगेच भाषणाच्या आखाड्यात उतरतील असं वाटलं नव्हतं. पण त्यांनी गाण्यापेक्षाही लांब भाषण करुन आपण तिथेही कमी नाही याचा प्रत्यय श्रोत्यांना आणून दिला. श्रोत्यांनीही या भाषणाच्या वेळेचा सदुपयोग प्रसाधन गृहात जाण्यासाठी व बाहेर विकायला ठेवलेल्या वडे सामोश्यांचा आस्वाद घेण्यासाठी केला. (नाहीतरी भाषणं, एक भाषण करणारा आणि दुसरा ज्याच्याविषयी बोललं जातंय तो सोडून, दुसरं कोण ऎकतात ?)
मोद बुवा हे "न्हाणी" घराण्याचे ही माहिती मला ठाणेकरांच्या "गळ्यातूनच" कळली. (गायकांचे आवाज हे तोंडातून न येता गळ्यातून येतात असं म्हणतात ना ?) मधे मधे तबल्याचे कार्यक्रम मला मिळत नव्हते तेंव्हा गाऊन पहावं का असा एक क्रांतीकारी विचार माझ्या मनात आला आणि गायन साधनेची सुरुवात (आणि शेवटदेखील) मी न्हाणीघरातच केली होती. तेंव्हाच या न्हाणीघराचा महिमा कळला होता. (आपण गातो ते न्हाणी "घर", आणि मोद बुवा गातात ते न्हाणी "घराणं" ? अरे वा रे वा) मला असा शोध लागला होता की माझा आवाज इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा न्हाणीघरातच चांगला लागतो (की वाटतो ?) "डॉल्बी इफेक्ट" का काय म्हणतात ना त्यामुळे असेल. पण माझ्या गाण्याच्या मैफिली न्हाणीघरात घेणं प्रशस्त दिसलं नसतं म्हणून (तेवढं प्रशस्त न्हाणीघर नसल्यामुळे) नाहीतर आज मोदबुवांना माझी साथ करायची वेळ आली असती. भाषणातच मोदबुवा माझ्याहीपेक्षा (म्हणजे दस्तुरखुद्द ठणेकरांपेक्षा) किचकट लयकारी करतात असा दाखला पं. ठाणेकरांनी स्वत: दिल्यामुळे माझे पाय लटालटा कापायला लागले होते. (अशा प्रसंगातून निभावून जाण्यासाठी हल्ली मी जरा सैलसर पायजमेच वापरणं पसंत करतो.) म्हणजे आज माझ्या तालाच्या गणितांची परिक्षाच होती म्हणायचं तर. पण मी पण बारा गावचं (कणकवलीच्या पंचक्रोशीतल्याच) पाणी प्यायलो होतो, म्हट्लं होऊन जाऊ दे.
बुवांच्या परिचयातून त्यांचा कोणतेही नियम पाळण्यापेक्षा नियम मोडण्याकडेच जास्त कल आहे असंही कळून आलं. वादी, संवादी न मानण्याच्या हट्टापायी बुवांची अनेकांशी "वादावादी" झाल्याचे किस्सेही भाषणात कळले. पण मी म्हट्लं (मनातल्या मनात) की या वादावादीशी आपलं काय देणंघेणं. आपला संबंध तबला डग्ग्याच्या वादीशी. वादावादीत तोंड सैल सोडण्यापेक्षा तबल्याची वादी सैल पडली तर ती ओढून घट्ट कशी करावी इकडेच आपण जास्त लक्ष दिलेलं बरं असं म्हणून मी भाषण कधी संपतंय याची वाट पहात (लटपटत) उभा होतो.

(शेवटी एकदाचं) भाषण संपलं आणि मोदबुवा आणि त्यांच्या साथीदारांना पाचारण करण्यात आलं. (चोरांच्या टोळक्यातही त्यांचा म्होरक्या सोडून इतर जणांना साथीदारच कां म्हणतात हो ?) आम्ही सर्वजण आपापल्या जागी विराजमान झालो. साथीदारांचा परिचय करुन देणार्‍याने माझा परिचय चक्क झाकिर हुसेन असाच करुन दिला. (त्याचा काय दोष बिचार्‍याचा. त्याच्या हाती जुनीच कार्यक्रम पत्रिका असावी बहुतेक. झाकिर हुसेन ने मोद बुवांना विनम्र नकार कळवण्या आधीची) पण माझ्या (चुकीच्या) नावाचा जाहिर उच्चार झाल्यावर सभागृहात प्रचंड टाळ्या आणि चेहेर्‍यावर आश्चर्यमिश्रित भाव असं संमिश्र वातावरण होतं. झाकीर येवढ्या थोड्या वेळात (म्हणजे ठाणेकरांना भाषणाला जेवढा वेळ लागला तेवढ्यात) येवढा जाडा कसा झाला असेही भाव लोकांच्या नजरेत मला दिसत होते. पण माझ्या डोक्यात फक्त तबलजीच्या नावाचा झालेला पुकारा आणि त्यानंतर झालेला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट हेच समीकरण घट्ट बसलं होतं. आपल्याकडे काहीतरी म्हण आहे ना ? "कोणाच्याही कोंबड्याने उजाडलं तरी हरकत नाही, पण एकदाचं उजाडू दे".
पेटीवाल्याचं नाव तरी बरोबर घेतलं की नाही कोण जाणे, कारण मी त्याला आज प्रथमच बघत होतो. तोही बर्‍याच पेटीवादकांनी नकार दिल्यानंतर मिळालेला पेटीवादक असणार नक्कीच. आतातरी प्रथेप्रमाणे पुष्पगुच्छ वगैरे देतील ही आशाही संयोजकांनी फोल ठरवली. कारण कोणी स्वयंसेवक "फूल ना फुलाची पाकळी" घेऊन येतोय का या आशेने मी दोन्ही विंगेत मान वाकडी करुन बघत असतानाच बुवांनी स्वर लावला. (असू देत. गुच्छ कार्यक्रम झाल्यावर देणार असतील बहुतेक)
मोद बुवाच ते. नियम कसले मानणार ? एकदम द्रुत चीजेलाच हात घातला त्यांनी (खरं म्हणजे "तोंड" घातलं म्हणणंच योग्य नाही का ? तोंड फोडलं म्हणा हवं तर). मी म्हटलं की नक्की द्रुत चीजेनंतर ते विलंबित ख्याल गातील आणि मग संथ आलापी सुरु करतील. विंगेत तर बुवा अडाण्यातली त्रितालातली चीज गाणार म्हणून म्हणाले होते. आणि इथे तर वेगळाच प्रकार. तालाचं वजन बुवा काही विचित्रच दाखवत होते. अहो, ताल धरणार तरी कोणता. प्रत्येक आवर्तनाच्या मात्रा मोजतोय मी चक्क बोटं मोडून तर प्रत्येक आवर्तनाचा हिशेब वेगळाच भरत होता. मग मीही नाद सोडून दिला आणि दिलं काहीही रेटून. शॆवटी मला अडाणी ठरवून बुवांनी अडाण्यातली चीज संपवली एकदाची आणि विलंबित व आलापी काहीही न करुन माझी अपेक्षा खोटी ठरवली. विंगेत त्रिताल सांगून आयत्या वेळेस मला माहित नसलेला "आडा तिडा चौताल" घेण्यामागे बुवांचा मला "आडवा-तिडवा" पाडण्याचाच प्लॅन होता नक्की. पण या गोंधळाचा श्रोत्यांना फारसा सुगावा लागला नसावा असा गोड गैरसमज करुन घेऊन मी बुवा पुढे काय पुडी सोडताहेत इथे लक्ष लावून होतो.

पुढच्या गायन प्रकारात असा गोंधळ होऊ नये म्हणून बुवांना कोणत्या तालात गाताय आता असं विचारायचं धाडस केलं. तर त्यांनी कोणतातरी साडे अठरा मात्रांचा अनवट "तीन ताड" ताल धरा असं फर्मान सोडलं आणि माझ्याकडे एक क्षुद्र कस्पटासमान नजर टाकून गाण्याच्या तयारीला लागले. ते ऎकून मीच "तीन-ताड" उडालो. हा ताल तर मला कधीच शिकवला गेला नव्हता. पण गाळण उडालेली न दर्शवण्यात तर माझा हातखंडा होता. मला लगेच माझे वडील आठवले. संध्याकाळी शाळेतून आल्यावर जेंव्हा माझे सवंगडी उनाडक्या करायचे तेंव्हा आमचे पिताश्री आमच्या कडून पावकी, निमकी, पाऊणकी, अडीचकी, औटकी, अकरकी असे चित्रविचित्र पाढे घोकून घ्यायचे. येवढा राग यायचा आणि वाटायचं की काय आहे उपयोग या किचकट पाढ्यांचा ? शेवटी अडीच किलो बटाट्यांचे ३ रुपये ४० पैसे दराने किती पैसे झाले हे गणित आमच्यापेक्षा भाजीवालीच आधी सोडवायची. त्याकाळी भायखळा मार्केट्मधे भाजीदेखील अडीच किलोच्याच हिशेबात मिळायची. त्याचाही उद्देश आमचं गणित पक्कं व्हावं यापलिकडे दुसरा काहीही नसावा. पण माझे वडील किती दूरदर्शी होते हे मला त्यादिवशी रंगमंचावर कळलं. आपल्या मुलावर काही वर्षांनी काय अवघड प्रसंग येणार आहे याचं स्वप्न जणू त्यांना माझ्या लहानपणीच पडलं असावं. नाहीतर साडेअठरा मात्रांचं अवघड गणित सोडवणं मला "बाप"जन्मात शक्य नव्हतं.

मीही मग साडेअठरा मात्रांच्या अवखळ वारुला लगामात ठेवून एकदम "कट-टू-कट" वाजवत होतो. मधेच आड्यात वाजवून मोदबुवांना चुकवण्याचा प्रयत्न करत होतो. पण नंतर मला लक्षात आलं कि मोदबुवांना चुकवण्याचा वायफळ प्रयत्न करताना आपली शक्ती उगाच वाया जातेय. गाणं सुरु झाल्यापासून एकदाही समेवर येणं बुवांना जमलं नव्हतं. मला बुवा कितपत पाण्यात आहेत ते आता कळून चुकलं होतं. मला भीती वेगळीच होती. बुवांना चुकवण्याच्या प्रयत्नात उगाच चुकून बुवा समेवर आले तर पंचाईत व्हायची. श्रोत्यांना मात्र हा बुवांचा "समेवर येण्याच्या नियमाला" मोडण्याचाच प्रघात आहे असं वाटत होतं आणि संगीतातल्या या अभिनव प्रकारालाही ते दाद देत होते. सर्वसाधारणपणे समेवर सगळ्यांची मान एकत्रच पडायला पाहिजे ना ? पण इकडे तर मी, पॆटीवाला आणी दस्तुरखुद्द बुवा यांच्या प्रत्येकाच्या माना पडण्याच्या वेळा एकदाही जुळल्या नाहीत. मग श्रोत्यांनीही या खेळात सहभागी होण्याचं ठरवलं आणि चौथ्याच ठिकाणी माना पाडायला सुरुवात करुन एकंदर गोंधळात अजूनच भर पाडली. माझीही दमछाक होत होती हे सत्य नाकारता येणार नाही. शारिरिक शिवाय मानसिकही. कारण विषम (साडेअठरा मात्रा म्हणजे खरं तर विषमपेक्षाही भयंकर प्रकरण, अपूर्णांकच म्हणा ना) मात्रांचा ताल वाजवताना सतर्क रहायची जबाबदारी सर्वात जास्त तबलजीवर असते. नेमकी याच वेळेस सभागृहातील वातानुकुलन यंत्रणा बंद पडली. एका अर्थी ते बरंच झालं कारण बुवा (आणि मी देखील) नक्की कोणत्या कारणामुळे घामाघूम झालो होतो हे श्रोत्यांच्या लक्षातच आलं नाही. माझ्याच घामाचे टपोरे थेंब तबल्यावर तडातडा उडत होते. बुवा मेघ राग गात होते म्हणून हा घामाचा "पाऊस" पडत होता की काय ? बरं घाम पुसायला जायचं तर साडेअठरा मात्रांचं भान सुटेल आणि बुवांचा विजय होईल हे सतत ध्यानात. पण तो न पुसल्यामुळे तबला सतत ओला होऊन उतरत होता. तो स्वरात ठेवण्यासाठी मला सारखा त्याला (तबल्याला, बुवांना नाही) हातोडीने ठोकावा लागत होता. बुवांनाही हा प्रकार वेगळ्याच घराण्याचा वाटून तबलावादनातल्या हातोडीच्या या कल्पक प्रकाराला ते दाद देत होते.
सगळ्यांच्याच सुदैवाने हा खेळ काही फार वेळ चालला नाही कारण पुढे पुढे तालात पक्कं असण्याचं सोंग बुवांना झेपेनासं झालं पण बुवांना अनवट तालाचा अट्टाहास आणि मेघ रागाची मानगुट काही सोडवत नव्हती. एखादी कडक दारु कशी डोक्यात जाते तसा मेघ राग त्यांना चढला होता. द्रुत चीजेने (आणि बुवांच्या चेकाळण्याने) कळस गाठला होता तेवढ्यात बरोब्बर समेवर एक मोठ्ठा आवाज झाला. मी दचकलोच. वाटलं बुवांना सम सापडली की काय ? पण तेवढ्यात माईकच्या समोर पडलेल्या मुठीयेवढ्या आकाराच्या दगडाकडे माझं लक्ष गेलं आणि झाला प्रकार लक्षात यायला मला वेळ लागला नाही. बुवाही प्रसंगाचं गांभीर्य ओळखण्यायेवढे चाणाक्ष निघाले (बहुतेक यापूर्वीचे असे अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी असणार) आणि एक जोरदार तिहाई घेऊन मेघ रागाच्या मानगुटीवरुन बुवा त्वरित पायउतार झाले. माझ्याही घामाचा पाऊस मेघ राग थांबल्यामुळे थिजला.

तेवढ्यात एक १०-१२ जणांचे टोळके रंगमंचाच्या दिशेने येऊ लागले. क्रिकेटमधे नाही का शेवटचा विजयी चौकार मारल्यावर स्टेडियम मधली तमाम जनता विजयी संघाचं अभिनंदन करायला मैदानाकडे कूच करते तसासुध्दा हा प्रकार असू शकतो असा विचार क्षणभर मनात येऊन गेला म्हणून आम्ही सर्व त्या अभिनंदन करायला येणार्‍या श्रोत्यांशी हस्तांदोलन करण्यासाठी उठून उभे राहिलो, पण त्यांच्या संतप्त चर्येवरुन एकंदर प्रकार वेगळाच असावा हे सर्वात प्रथम त्या पेटीवाल्याच्या लक्षात आले असावे. तो पेटी घेऊन विंगेत पळाला तेंव्हाच आम्हाला तो किती चाणाक्ष आहे हे कळलं. मी देखील तबला-डग्गा काखोटीला मारुन विंगेकडे प्रयाण केलं आणि बुवांपेक्षा मी जास्त चपळ आहे हे सिध्द केलं. अहो, तबला डग्गा बरोबर घेणं भाग होतंच कारण माझा स्वत:चा होता तो. बुवांबरोबर परत कधी साथ करायची वेळ आलीच तर पहिली अट हीच की तबला-डग्गा तुमचा. भले बिदागी मिळाली नाही तरी चालेल, पण कठीण प्रसंगी विनासायास काढता पाय घेण्यात त्या वाद्यांची अडचण कशाला ?

बुवांचं वय झालं असल्यामुळे मात्र गळ्यातल्या चपळाईसारखं प्रात्यक्षिक त्यांना पळून जाऊन देता आलं नाही. त्या संतप्त गटाने मात्र बुवांच्या वयाचा मुलाहिजा न ठेवता द्रुत लयीतल्या "चोप"तालाचं प्रात्यक्षिक बुवांनाच दाखवलं. गेले २ तास चाललेल्या सांगितिक अत्याचाराचा व बिघडलेल्या वातानुकुलन यंत्रणेचा तो एकत्रित सूड असावा बहुतेक. एकंदर प्रकार बघवत नव्हता पण बुवांनी आयत्या वेळेस ताल बदलून दिलेल्या दग्याचा रोष माझ्या मनात अजून धगधगत होता. लगेच हातातल्या डग्ग्यासकट हात वर गेले बुवांच्या डोक्यात डग्गा घालण्यासाठी पण लगेच लक्षात आलं की फुटलेल्या डग्ग्याची पुडी बदलण्याची किंमत ४०० रुपये पडते आणि त्वरित विचार बदलला. हातोडी फेकून मारता आली असती कारण तिची किंमत काही फार नसते, पण तबला डग्गा उचलण्याच्या गडबडीत ती बरोबर घेण्याचं राहूनच गेलं की. मग सूड घेण्याची एक अभिनव कल्पना सुचली. (गरज ही शोधाची जननी असते) ज्या तालात श्रोते बुवांना बडवत होते त्याच तालात मी विंगेतून तबला डग्गा कुटायला सुरुवात केली. श्रोत्यांनीही यापूर्वी कोणाला असा तबल्याच्या साथीने चोप दिला नसावा त्यामुळे तेही चेकाळले. यातच भर म्हणून की काय मी पेटीवाल्यालाही कटात सामील करुन घेतलं. त्याला डाव्या डोळ्याच्या इषार्‍यानेच पेटी उघडायला लावली आणि म्हटलं "धर लेहरा". बर्‍याच दिवसांनी फुकट (बुवांच्या खर्चाने) पेटीवाला मिळाला होता त्यामुळे मी पण विस्मरणात पडत चाललेल्या कायदे पलटयांचा सराव करुन घेतला. बुवा गुडघ्यात मान घालून खाली बसून श्रोत्यांच्या या "आदरातिथ्याचा" मनमुराद आस्वाद घेत होते पण आश्चर्य म्हणजे त्या तसल्या परिस्थितीतही त्यांच्या तोंडून भैरवीसारखे वाटणारे सूर अगदी क्षीण आवाजात ऎकू येत होते. बुवांच्या धाडसाची कमालच म्हटली पाहिजे. जे बंद पाडण्यासाठी श्रोत्यांनी येवढा "सत्कार समारंभ" केला त्याला न जुमानता यांचं गाणं आपलं चालूच.

शेवटी काही दयाळू मंडळींनी व्यासपीठावर येऊन बुवांचा "सत्कार" करत असणार्‍या या मंडळीना हा सोहळा थोडा वाजवीपेक्षा जास्तच उत्साहात होतोय याची जाणीव करुन दिली. मंडळीना ते पटलं की सत्काराच्या कार्यभारामुळे ते दमल्यामुळे असेल पण तो सोहळा थांबला एकदाचा. संयोजकांना बुवांना नेण्यासाठी शेवटी रुग्णवाहिका बोलवावी लागली आणि अशा प्रकारे महोत्सवाची सांगता झाली.
पण अहो माझ्या बिदागीचं काय ? पुढच्या ३-४ दिवसात बुवांना रुग्णालयात बघायला जाण्याच्या निमित्ताने बिदागीची मागणी करावी असा दुष्ट विचार मनात येत होता पण बुवा अजून शुध्दीवर आले नाहीत असं कळलं. शेवटी एकदाचे बुवा शुध्दीवर आल्याची गोड बातमी कानावर आली आणि मी तडक इस्पितळाचा रस्ता धरला. माझ्या आधीच बुवांना भॆटायला काही मंडळी आली होती (मला वाटलं तीही बिदागीसाठीच आली असावीत) पण प्रत्यक्षात ती एका बॅंकेची मंडळी निघाली. बुवांकडून काही अर्जांवर सह्या घेतल्या जात होत्या. आजूबाजूला उभे असणार्‍या चमच्यांकडून चौकशीअंती असं कळलं की इस्पितळाचं बिल भरण्यासाठी बुवांनी बॅंकेकडून कर्जाची मागणी केली होती. माझ्या बिदागीचं भवितव्य माझ्या लगेच लक्षात आलं. बुवांच्या अशा परिस्थितीत बिदागी मागणं फारच अमानुष ठरलं असतं. शेवटी संस्कार आड येतात हो. पण एक विचार मात्र मनात नक्की आला की पुढच्या वर्षीच्या संमेलनाची बिदागी आधीच दामदुप्पट सांगायची आणि चेक वटल्याशिवाय तबला-डग्ग्याला उचलायचादेखील नाही. अरे हो, पण विसरलोच की. पुढच्या वर्षी तबला बुवांचा वापरायचा असं मघाशीच ठरलं होतं ना ?

जाता जाता एक कोडं सोडवण्याचा मोह आवरला नाही. बुवांना विचारलंच मी की येवढा मार खात असताना देखील भैरवी आळवत रहाण्यामागचं गूढ काय ? बुवा उसासा टाकत म्हणाले "अरे भैरवी कसली गातो आहेस, मी 'धाव घाली विठू आता, चालू नको मंद' हे भजन आळवत विठ्ठलाचा धावा करत होतो". आता मला बुवांच्या "त्या" गाण्यामागचं खरं कारण कळलं. बुवांना कुठे माहित होतं की आम्ही सर्व विंगेतून "घाव घाली विठू आता" आळवून विठ्ठलाच्या रुपात रंगमंचावर आलेल्या त्या दशावताराला "घाव घाली, घाव घाली" म्हणून उत्तेजन देत होतो ते ?
माझं मलाच हसू आवरेना आणि मी इस्पितळातून "मंद चालू" लागलो

:विवेक काजरेकर


ता.क.: 'स्पर्श चांदण्याचे' ह्या संगीत संचाचे(अल्बम) संगीत दिग्दर्शक श्री. विवेक काजरेकर(सद्या कुवेतनिवासी) हे माझ्या लेखातील 'उस्ताद विकिखां कुवेती' आहेत.

५ जून, २००७

मैत्री-कट्टा संगीत महोत्सव!

अतिशय रंगलेल्या मैत्री-कट्टा संगीत महोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस. मैदान चारी बाजूंनी तुडुंब भरलेले आहे.आज ह्या महोत्सवाची सांगता न्हाणी घराण्याचे बुजुर्ग गायक पं. मोदबुवा मालाडकर ह्यांच्या घनगंभीर आणि पहाडी आवाजातील गायनाने होणार आहे.त्यांच्या बरोबर तबल्याची साथ करायला खास परदेशातून त्यांचे मित्र उस्ताद विकीखां कुवेती आलेले आहेत आणि पेटीवर साथ करायला पंडित ऍशवीन डोंबिवलीकर सज्ज झालेले आहेत.

त्या आधी पहिल्या दिवशी पं.दिगण्णा भाईंदरकर ह्यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी त्यांचे आवडते आणि हुकुमी असे 'भैरव(दुख दूर करो हमारे) आणि अहिर भैरव(अलबेला सजन आयो रे) हे राग अतिशय सफाईने पेश केले. अतिशय मृदू आणि मधुर अशा त्यांच्या आवाजाने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला . लडिवाळ हरकती,मुरक्या आणि बकरीतानांनी त्यांनी श्रोत्यांची वाहवा मिळवली. त्यांना तबल्यावर मदन मिश्रा आणि सारंगीवर मसीदखां ह्यांनी साथ केली होती. तंबोऱ्याची साथ त्यांचे पट्टशिष्य सुरेश आणि रमेश ह्यांनी केली होती.
दुसऱ्या दिवशी पं. संजीवप्पा पुणेकर ह्यांचे सुगम गायन झाले. त्यांच्या गाण्याने तर रसिक श्रोत्यांनी मैदान डोक्यावर घेतले.त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निवडलेली गीते. काही गंभीर तर काही उडत्या चालीतील सिनेगीते पेश करून त्यांनी माहोल एकदम धुंद करून टाकला. त्यांचे लाडके कवी गुलजार,साहिर वगैरे अनेक दिग्गज कवींच्या आणि मदनमोहन पासून ते आजच्या ए.आर रेहमान पर्यंतच्या सगळ्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या रचना गाऊन श्रोत्यांना स्वरसागरात डुंबवले. त्यांच्या बरोबर त्यांच्या साथीला त्यांचे पट्टशिष्य केशव आणि योगेश हे पुणेकर बंधू होते. ह्या दोघांनी खूप मोठ्या वाद्यवृंदाचे समर्थपणे संचालन केले.
तिसऱ्या दिवशी अखिल भारतीय कीर्तीचे गायक आणि किराणा घराण्याचे अध्वर्यू श्री. चंदूतात्या ठाणेकर ह्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण गायकीने रसिकांची मने जिंकली. त्यांनी त्यांचे आवडते "बिहाग,यमन आणि मालकंस" हे राग मोठ्या तयारीने गायले(ह्याचे बोल मात्र नीट समजू शकले नाहीत.कदाचित ती त्यांच्या घराण्याची पद्धती असावी!)मधनं मधनं ते रागाचे चलन,वादी-संवादी वगैरेंबद्दल निरूपणही करत आणि श्रोत्यांना त्या त्या रागातील नेहमीच्या परिचयाची गाणी सांगून चकित करून सोडत.मध्येच ते अण्णांची अथवा बाबूजींची एखादी आठवण सांगून श्रोत्यांशी संवाद साधत आणि त्यातून आपले गाणे फुलवत फुलवत समेवर येताना त्यांना साथ करणाऱ्या प्रख्यात तबलजी उस्ताद झाकीर हुसेन कडे मिश्किल कटाक्ष टाकत तेव्हा जी बहार उडत असे तिला तोड नाही. पंडितजींना पेटीवर साथ करायला तुळशीदास बोरकर होते आणि तंबोऱ्याची साथ त्यांच्या लाडक्या शिष्या शिल्पा आणि ऐश्वर्या ह्यांनी केली.

आणि ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते तो मोदबुवांच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला बुवांची ओळख समस्त रसिकवृंदाला करून देण्याचे काम खुद्द पं. ठाणेकरांनीच केले. ते म्हणाले...... बुवांचे मूळ घराणे हे सुप्रसिद्ध न्हाणी घराणे. हे अतिप्राचीन घराणे होय. ह्या घराण्यातूनच आजच्या किराणा,जयपूर,ग्वाल्हेर वगैरे वगैरे घराण्यांचा जन्म झाला.ह्या न्हाणी घराण्याचे गाण्यातील रागांचे आणि तालांचे नियम मात्र अतिशय मोकळे ढाकळे. त्यामुळे ह्या असल्या नियमात म्हणण्यापेक्षा बेशिस्तीत गाणं बसवणं हे भल्या भल्या कलाकारांना आजवर जमलेले नाही.म्हणून त्यांनी आपले गाणे व्याकरणात बंदिस्त केले. कुठल्या रागात काय 'वादी' आणि काय 'संवादी' आणि कुठल्या तालात किती 'मात्रा' वगैरेंनी गाणं असं घट्ट बांधून ठेवलंय की गाणारा आणि वाजवणारा (आणि अर्थातच ऐकणाराही!) एका जागी घट्ट बांधल्यासारखा असतो! पण ह्या न्हाणी घराण्याचे गाणे कसे अगदी मोकळे,बेशिस्त ,स्वैर,बेधुंद,बेताल,बेसूर वगैरे 'बे'च्या पाढ्यासारखे आहे.इथे श्रोते बुवांचे गाणे ऐकायला आतुर झालेले होते आणि पं.ठाणेकरांचे बुवांचा परिचय करून देणे संपत नव्हते‌. सरतेशेवटी छायाचित्रकार बलुशेठ ठाणेकर हळूच पंडितजींच्या कानात जाऊन काही तरी सांगते झाले आणि मग पंडितजींनी आपले भाषण आवरते घेतले.

बुवांनी गायला सुरुवात करण्यापूर्वी घसा खाकरून इथे तिथे पाहिले. काही ओळखीच्या रसिकांशी नेत्रपल्लवी,नमस्कार-चमत्कार झाले आणि खाली मान घालून सुर लावला. अतिशय घनगंभीर असा सुर ऐकून काही रसिकांनी 'वा! वा!' चे उद्गार काढले. बुवांनी प्रेक्षकांचा अंदाज घेत 'अडाण्या'तील(श्रोत्यांना अडाणी समजत होते की काय?कुणास ठाऊक!) एक द्रुत चीज सुरू केली. बोल होते "महंमद शाह रंगेल"!साक्षात अमीरखां साहेबांनी गाऊन गाजवलेली चीज होती ती.पण अमीरखां पडले नियमांच्या बंधनात जखडलेले गायक. त्यामुळे त्यांच्या गाण्यावर मर्यादा पडत;पण मोद बुवा मात्र असे कोणतेच बंधन मानणारे नसल्यामुळे त्यांना हवे तसे गाऊ शकत होते.
(इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की न्हाणी घराण्याची गाण्याची पद्धती जरी स्वैर असली,गाण्यातले पारंपारिक नियम मानणारी नसली तरी सर्व पारंपारिक राग(फक्त रागांची नावे) आणि त्यातील चीजा मात्र तशाच्या तशा उचलल्या होत्या. त्यांचे वादी-संवादी असे काही स्वर नव्हते किंवा आरोह अवरोह वगैरे भानगड नव्हती. पारंपारिक ताल तर त्यांनी केव्हाच बाद केलेले होते.एकताल,तीनताल,झपताल,आडा चौताल वगैरे सारखे सगळ्यांना परिचित असणारे ताल ह्या घराण्याला मुळी मान्यच नाहीत. कारण कुणाच्याही तालावर नाचायला आणि गायला ह्या मंडळींना मान्यच नाही.त्यांचे तालही बेताल. त्याचे नियम(ते नाहीतच),कायदे (आता हा काय प्रकार आहे?) वगैरे सगळेच स्वैर,मुक्त! गाणं कसं स्वच्छंद(बेसूर) असलं पाहिजे. त्याला ह्या तालाची उगीच आडकाठी नको असा प्रशस्त विचार ह्या घराण्यातल्या ज्येष्ठांनी मांडला आणि ह्या सर्व गोष्टीचे आजचे चालते बोलते उदाहरण म्हणजे मोदबुवांचे चतुरस्र गायन.अहो हे बुवा काय गातात ह्यापेक्षा काय गात नाहीत असे विचारा! ख्याल म्हणू नका,ठुमरी,दादरा,कजरी,होरी म्हणू नका;झालंच तर भावगीत,भक्तिगीत,गजल,कव्वाली म्हणू नका,एव्हढेच नाही तर समरगीते,पाळणागीते,कोळीगीते,पोवाडे,लावण्या....... हुऽऽऽऽश्श! सांगता सांगता दमलो. बाकी पुन्हा कधी तरी. सद्या इतकेच पुरे. आपण बुवांचे गाणे ऐकू या.)
त्या उडत्या चालीतील चिजेचे शब्द नेमके काय होते ते बहुधा बुवांनाही माहीत नसावे;पण ह्या अशा प्रकारच्या गाण्यात लोक त्याकडे विशेष लक्ष देत नाही हे माहीत असल्यामुळे ते काहीही उच्चार करत होते. ताना, पलटे, हरकती घेताना मधनं मधनं आपल्या साथीदारांकडे मिश्किलपणे पाहत होते आणि पेटीवाले पं. ऍशवीन आणि तबलजी विकिखां मात्र गोंधळलेल्या अवस्थेत होते. तबलजी बिचारे सम जवळ आलेली आहे असे दर्शवीत पण ते बुवांच्या गावीही नव्हते. ते दाखवतील ती सम असा सगळा आनंदी आनंद होता.गाणं नेमक्या कोणत्या तालात आणि पट्टीत चाललंय हेच त्या दोघांना कळत नव्हते(इथे काय आहे की चूक तबलजी -पेटीवाल्यांची नव्हती. कारण ते पडले नियमबद्ध वादक. त्यांना बुवांच्या घराण्याची तालीम थोडीच मिळाली होती?).पण थांबला तो संपला ह्या न्यायाने तेही रेटतच होते.
शेवटी एकदाची ती 'चीज' संपली. तबलजींनी हळूच एक शंका विचारली."बुवा हे गाणं कोणत्या तालात होते? आडा चौताल होता काय?"अतिशय मिश्किलपणे बुवा त्यांना म्हणाले, "मियां! फसलात ना! अहो हा आडा चौताल नव्हता काही! हा होता"आड-तिडा चौताल ."ऐकून तबलजींची तर बोलतीच बंद झाली.पण सगळा धीर एकवटून त्यांनी पुढचे गाणे कुठल्या तालात आहे असे विचारले तेव्हा बुवांनी अतिशय दयार्द्र नजरेने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, " मियां!तीन ताल माहीत आहे ना? १६ मात्रांचा असतो तुमच्यात!पण तुम्ही तीन ताल च्या ऐवजी "तीन ताड" वाजवा. साडे अठरा मात्रांचा तीन ताड वाजवा. बघा कसे छप्पर उडून जाईल. आणि लक्षात ठेवा आमचे सगळे ताल हे वेगळे आहेत. तुमचा झप ताल तर आमचा 'झाप ताल'! कळले का?(तेव्हढ्यात तबलजीला 'झाप'ले)
तबलजींनी असहायपणे पेटीवाल्याकडे पाहिले(देवा! मागच्या जन्मी काय पाप केले होते म्हणून ही शिक्षा... असे भाव) . त्याच्याही डोळ्यात तेच भाव होते. पण आता अर्धी मैफल सोडून कसे जाणार? तेव्हा आता जमेल तसे वाजवायचे ,म्हणण्यापेक्षा रेटायचे! तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात तबलजीच्या मनात आले की बुवांचा 'झाप ताल' म्हणजे बहुधा श्रोत्यांचा "झोप ताल " असावा आणि कुणी सांगावे?त्यानंतर बहुधा "चोप ताल" ही असेल. आपले आपण सांभाळून राह्यला हवे.(ह्या क्षणिक विनोदी विचाराने त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकले आणि दोन्ही बाहू सरसावून त्याने नव्या जोमाने तबला कुटायला सुरुवात केली.

बुवांनी प्रेक्षकांची एकूण आवड निवड जोखलीच होती(असे बुवांना वाटत होते). प्रेक्षकांना कशी जोऽऽरकस आणि द्रुत लयीतली गाणी आवडतात. त्यात तबला असा छप्पर उडवणारा असला म्हणजे मग काय बघायलाच नको.त्यामुळेच पुढचे गाणे त्यांनी मेघ मल्हार रागातले निवडले. शब्द "का रे बदरा"(तुला देखिल वेठीस धरले म्हणून रडतो आहेस... ) असे काहीसे ऐकू येत होते.बुवा आपल्याच तंद्रीत गात होते. तबलजी त्यांचा पाठलाग करताना धापा टाकत होता.मधनंच रागाने तबल्यावर हातोडी मारत होता. अशा वेळी बुवा कौतुकाने त्याच्याकडे पाहत आणि "जियो" असे काहीसे म्हणत. पेटीवाल्याची तारांबळ तर बघवत नव्हती. कारण बुवा कुठे दमसास टिकवणार आणि कुठे छोटीसी तान घेऊन सम(त्यांची... बरं का!) साधणार ह्याचा अजिबात पत्ता लागत नव्हता.तो तर आपला सूरच हरवून बसला होता.
समोर बसलेले पं. ठाणेकर,पं.भाईंदरकर वगैरे एकमेकांकडे बघून सारखे चुकचुकत होते.खूप मोठा अपेक्षाभंग झाल्याचे त्यांच्या त्रासिक चेहऱ्यावरून सूचित होत होते.

इथे बुवा आणि त्यांच्या साथीदारांची अशी 'पकडापकडी-लपाछपी' चाललेली असताना अनपेक्षितपणे कुठूनतरी एक दगड माईकवर येऊन आदळला आणि अतिशय मोऽऽठ्ठा आवाज झाला. त्या आवाजाने बुवांची तंद्री भंग पावली आणि त्यांनी गाणे बंद केले.त्या दगडा पाठोपाठ एक १०-१२ जणांचे टोळके व्यासपीठाच्या दिशेने कुच करीत निघाले. ते बघताच तबलजी आणि पेटीवाल्यांनी आपापली वाद्य घेत तिथून पळ काढला आणि गाफिलपणे बुवा त्या टोळक्याच्या तावडीत सापडले. त्या टोळक्याने बुवांना 'चोप' तालातच बुकलून काढले. बुवांना पडलेल्या प्रत्येक फटक्याला तबलजी पडद्या आडून तबल्यावर थाप मारून साथ देत होता आणि पेटीवाल्याने लेहरा धरला होता. दोघे आपापल्या घराण्याचा अपमान अशा तऱ्हेने भरून काढत होते.
बुवांचा चष्मा एकीकडे,गाण्याची वही दुसरीकडे अशा उन्मनीय अवस्थेत काही वेळ गेला. मारण्याचा भर ओसरल्यावर मग बरीच प्रतिष्ठित मंडळी पुढे आली आणि त्यांनी त्या टोळक्याला व्यासपीठावरून हुसकावले. कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला(तो आधीच झाला होता.. इति: अंतुशेठ)होता.

बुवा गुढघ्यात मान घालून बसले होते आणि मनोमन भैरवीचे सुर आळवत होते ......
"धाव घाली विठू आता,चालू नको मंद
ब(भ)डवे मज मारिती ऐसा काय केला अपराध"!

वैधानिक इशारा: हा एक काल्पनिक कार्यक्रम होता. ह्यात आलेली नावेही काल्पनिक आहेत. दुरान्वयानेही एखाद्याला कुठे साधर्म्य जाणवले तर तो निव्वळ योगायोग समजावा.