माझा आणि महाजालाचा संबंध सर्वप्रथम २००० साली आला. तसे त्याआधी महाजालासंबंधी बरेच काही ऐकून होतो पण प्रत्यक्ष असा परिचय नव्हता. कार्यालयात प्राथमिक अवस्थेतल्या संगणकांपासून ते पी३ पर्यंतचे संगणक हाताळले होते पण ते कुठेही महाजालाला जोडलेले नव्हते त्यामुळे जरी महाजालासंबंधी एक प्रकारचे कुतुहल होते तरी ते शमवण्याची तशी सोय नव्हती. बाहेर सायबर कॅफेत जाऊन काही करावे तर तशी हिंमतही नव्हती आणि तासाला ३०-४० रुपये देऊन तिथे जाणे म्हणजे निव्वळ पैसे फुकट घालवणे असेही वाटत होते.
२००० साली एका स्थानिक संस्थेतर्फे संगणक बनवण्याचे प्रशिक्षण देण्याबद्दलची एक जाहिरात वाचली आणि मग ठरवले की आपणही हे शास्त्र शिकून घ्यायचे. त्याप्रमाणे तिथे २५०० इतके नाममात्र शुल्क भरून नाव नोंदवले. तिथे संगणक ओळख,त्याची अंतर्गत रचना आणि कार्य,तसेच जोडणी आणि दुरुस्तीचे जुजबी ज्ञान मिळाले. त्या भांडवलावर मग मी हिंमत करून माझा पहिला संगणक बनवला .
माझ्या कार्यालयातील एका तरूण पण ह्या क्षेत्रातल्या माझ्यापेक्षा अनुभवी मित्राला साथीला घेऊन मी हा संगणक बनवला. माझ्या संगणकाची प्रमूख तांत्रिक वैशिष्ठ्ये अशी होती.
१)प्रोसेसरः इंटेलचा पी३-८६६मेगाहर्ट्झ
२)मदरबोर्डः इंटेल ८१५ चिपसेट आधारित
३)रॅमः १२८एम्बी
४)१.४४ फ्लॉपी ड्राईव्ह
५) सीडी रॉम,
६)२०जीबी हार्डडिस्क
तसेच स्पीकर्स,माऊस्,कीबोर्ड,अंतर्गत मॉडेम वगैरे जरूरीच्या गोष्टी.
संगणक जोडणी तर व्यवस्थित झाली. त्यानंतर त्यावर विंडो९८ चढवणे आणि इतर जरूरी प्रणाल्या चढवताना अनंत तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले. एक तर तुटपुंजे ज्ञान आणि त्यात योग्य सल्ला देऊ शकतील असेच कुणीच आजुबाजुला नसल्यामुळे संगणक जोडणीनंतर प्रत्यक्ष संगणक व्यवस्थितपणे सुरु होईपर्यंत जवळ जवळ १५-२० दिवस मी त्याच्याशी झगडत होतो. त्याचा फायदा असा झाला की बर्याच गोष्टी ज्या शिकताना कळल्या नव्हत्या त्या अनुभवाने शिकलो. नुसताच शिकलो नाही तर त्याचा फायदा माझ्यानंतर ह्या क्षेत्रात पडलेल्यांना मी देऊ शकलो.
संगणकावर विंडो ९८ चढवताना आलेले अनुभव जर त्यावेळी लिहून ठेवले असते तर नवशिक्यांसाठी एक छानसे पाठ्यपुस्तक तयार झाले असते असे आज मागे वळून पाहताना वाटते. कितीतरी साध्या साध्या गोष्टी असतात ज्या अतिशय महत्वाच्या असतात पण त्याबद्दल फारसे कुणालाच माहीत नसते. मी प्रशिक्षण घेतले होते तेव्हा मलाही हे सर्व खूप सोपे वाटले होते पण जेव्हा प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली तेव्हा आलेल्या अडचणी आणि त्यावर योजायचे उपाय ह्याबद्दल दूरान्वयानेही काहीही शिकवले गेलेले नव्हते किंबहुना अशा अडचणी त्या शिक्षकांनाही कधी आलेल्या नव्हत्या. त्यामुळे मी जेव्हा त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने गेलो होतो तेव्हा ते देखिल भांबावलेले दिसले. असो.
तरीदेखिल मी माझ्या नेहमीच्या सहजासहजी हार न मानण्याच्या स्वभावामुळे त्यावर मात केली आणि एकदाचा माझा संगणक सुरु केला. त्यानंतर तो महाजालाला जोडतानाही काही अडचणी आल्या पण त्याबाबतीत मात्र मला इतरांची मदत झाली आणि एकदाचा माझा संगणक सर्वांग परिपूर्ण स्थितीत पोचला. त्यावेळचा आनंद काही और होता.
सुरुवातीला जालजोडणी होती ती एमटीएनएलच्या डायलअप प्रणालीच्या सहाय्याने होत होती. जालावर जाण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे जे जे दिसत होते ते सगळे वाचण्याचा,पाहण्याचा अट्टाहास होता. त्यामुळे तासंतास जालावर खिळून असायचो. त्यातच मधेच उगवणार्या चित्रविचित्र,हलत्या-नाचर्या जाहिराती वगैरेंच्या भूलभूलैयात मी असा अडकत गेलो की मला खाण्यापिण्याचेही भान नसायचे. त्यात अजून एक गोष्ट मोहमयी वाटायची...फसव्या जाहिराती. आपण नशीबवान ठरला आहात,आपल्याला अमूक इतके बक्षीस लागलेले आहे,मिळवण्यासाठी इथे टिचकी मारा. झाले,मग काय मारायची टिचकी. पुढे जो काही फॉर्म वगैरे असेल तो भरायचा आणि असेच गुंतत जायचे. प्रत्यक्ष बक्षीस तर कधीच मिळाले नाही पण महिना पूर्ण झाल्यावर एमटीएनएलचे बील आले ते पाहून डोळे पांढरे झाले होते....
बील होते निव्वळ रूपये ५०००+......
२ टिप्पण्या:
आसे कसे टिपण्या नाहीत ..आणि टिपण्या देण्या साठी थोडी तरी अक्कल हवी आम्हाला ...ती हि नाही
पण जेवढे समजते ते सागते ..खूप वाचले नाही लिखाण ..किवा चाली खूप ऐकल्या नाहीत पण ज्या ऐकल्या त्या अफलातून होत्या ...
धन्यवाद श्वेता! :)
टिप्पणी पोस्ट करा