माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

२८ मार्च, २००७

आणि मी मार खाल्ला!

ही कहाणी साधारण २५ वर्षांपूर्वीची आहे. नेहमीप्रमाणेच कार्यालयात जायला उशीर झाला होता म्हणून ९-४७ ची चर्चगेटला जाणारी जलद गाडी कशीबशी मी मालाडहून पकडली. ही गाडी जोगेश्वरी ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान थांबणार नव्हती. त्यामुळे झटपट पोचता येणार होते.आधी दारातच लटकत होतो;पण दमादमाने जोगेश्वरीपर्यंत बराचसा आत पोचलो. गाडीला मरणाची गर्दी होती आणि त्यातच पंखे बंद होते. हे म्हणजे नेहमीसारखेच होते. म्हणजे काय की ऐन थंडीत हे पंखे अगदी सुसाट फिरतात आणि ऐन उन्हाळ्यात संप पुकारतात अगदी तसेच.

उकाड्याने संत्रस्त लोक रेल्वे खात्याला शिव्या देत होते. इथे धड उभे राहायला लोकांना जागा नव्हती आणि तिथे ७-८ जण मांडीवर पेट्या ठेवून पत्ते खेळण्यात रंगले होते. मी माझ्या पुढे असलेल्या लोकांना पुढे सरकायची विनंती केली तेव्हा त्यांनी पुढे जायला जागा नाही असे सांगितले ते ह्या पत्ते कुटणार्‍यांमुळेच. त्यांनी बरीच जागा अडवलेली होती.

मी त्या पत्ते खेळणार्‍यांनाही थोडा वेळ पत्ते बंद करा म्हणून विनंती केली पण एक नाही आणि दोन नाही. कुणी ऐकायलाच तयार नव्हते.मी एक प्रयत्न करावा म्हणून माझ्या पुढच्या माणसाला पुन्हा एकदा पाऊल पुढे टाकण्याची विनंती करून पाहिली पण त्याच्या नजरेनेच मला सांगितले की तो पुढे जाऊ शकणार नाही म्हणून. मग "मी पुढे जातो तू मागे हो" असे सांगून पुढे सरकलो आणि परिस्थिती माझ्या लक्षात आली.

ते ७-८ जण अशा तर्‍हेने एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या अडकवून बसले होते की पुढे एक पाऊलही टाकणे अशक्य होते म्हणून मी पुन्हा त्यांना विनंती केली की त्यांनी पाय मागे घेऊन मला थोडे पुढे जाऊ द्यावे म्हणून. माझ्या कडे त्रासिक नजरेने बघत त्यांनी पुन्हा आपला खेळ पुढे सुरु ठेवला. इथे गर्दीचा रेटा इतका वाढला होता की मी वरती कडीला धरलेला माझा हात सुटला आणि त्या पत्तेकुट्यांच्या पेट्ट्यांवर पडलो आणि त्यांचे पत्ते विखुरले गेले. ही घटना इतक्या अनपेक्षितपणे घडली की माझ्या मागोमाग अजून एक-दोघे माझ्या अंगावर पडले आणि नाईलाजास्तव पत्तेकुट्ट्य़ांना आपला डाव बंद करून आम्हाला जागा द्यावी लागली.

ह्या अपमानाने ते विलक्षण रागावले आणि माझ्याशी वाद घालू लागले. "कडी नीट धरायला काय होते! पडायचेच होते तर हीच जागा बरी सापडली"! वगैरे वगैरे. मी त्यांना समजावून सांगत होतो, " अरे बाबांनो,इथे लोकांना नीट उभे राहता येत नाहीये आणि तुम्ही जागा अडवून आरामात पत्ते खेळताय! तुम्हाला जरा तरी माणूसकी आहे की नाही".. वगैरे वगैरे!

ह्यावर एक त्यातला जरा टग्या होता तो दुसर्‍याला म्हणाला, "तुला सांगतो पक्या, ह्यांना साल्यांना हाणले पाहिजे. लातोंके भूत बातोंसे नही मानते"!
माझ्या स्वभावाला अनुसरून मी त्याला आव्हान दिले, अरे हाणण्याची भाषा कसली करतोस? माझे हात पण काही केळी खायला गेले नाहीत.तू हात लावून तर बघ"!
झालं! मी आगीत तेल ओतलं होतं! आग धुमसायला लागली. बोलण्याने बोलणे वाढत होते. इथे गाडीनेही चांगला वेग घेतला होता आणि अचानक एकाने मागून माझ्या पाठीत एक जोरदार रट्टा घातला. मी मागे वळलो आणि पुन्हा एक रट्टा पाठीत बसला. परत वळणार तोच चारी बाजूंनी माझ्या वर हल्ला सुरु झाला होता. ह्या सगळ्यांना एका वेळी तोंड देणे माझ्या शक्तीबाहेरचे असल्यामुळे मी लगेच खाली बसलो आणि डोके गुढग्यात घुसवले. मी कोणताही मार सहन करू शकणार होतो पण माझ्या डोळ्यात नेत्रस्पर्शी भिंगे(कॉन्टॅक्ट लेन्सेस) असल्यामुळे मला चेहरा वाचवणे भाग होते.

आता तर मी त्यांच्या पूर्ण तावडीत सापडलो होतो.प्रतिहल्ला होत नाहीये हे पाहून ते सगळे चेकाळलेच होते. आता लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरु झाली होती. मी हूं की चूं न करता तो मार मुकाट पणे सोसत होतो. मन तर पेटले होते. एकेकाचा गळा आवळावा असेही वाटत होते पण मी तसे काहीच करू शकत नव्हतो ही वस्तूस्थिती होती.गाडीत ह्यामुळे संतापाची एकच लहर उठली आणि आता लोक माझ्या बाजूने बोलायला लागले. " अरे एक आदमीको सब मिलके क्यों मार रहेले है? ये तो बहूत नाइन्साफी है! अगर मर्द हो तो एकेक करके लडो"! असा एकाने आवाज उठवल्यावर मग लोक मधे पडले आणि हळूहळू मारहाण बंद झाली.

माझ्या कपड्यांची तर दशाच झाली होती. एक-दोन क्षण मी चाहूल घेतली आणि मोठ्या प्रयासाने मान वर केली तेव्हा १५-१६ हिंस्त्र डोळे माझ्यावर रोखलेले मला दिसले. जणू काहीच झालेले नाही असे दर्शवीत(अंग तर चांगलेच ठणकायला लागले होते) हळूहळू उठून उभा राहिलो. त्या सर्व टग्यांच्या नजरांना नजर भिडवत म्हणालो, "भेकड कुठले! एकाच्या अंगावर सगळ्यांनी हल्ला करण्यात कसली आली आहे बहादुरी? हिंमत असेल तर एकेकट्याने या! नाही पाणी पाजले तर बघा! तुम्ही चर्चगेटला उतरा मग बघतो"(सगळा सुका दम हो! अंगात नाही त्राण आणि तरी माझा रामबाण! असा सगळा तो आव होता.)!


आता गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात शिरत होती. त्या कंपूपैकी दोनजण तिथे उतरून गेले. त्यानंतर ग्रॅंट रोड,चर्नी रोड आणि मरीन लाईन्स स्थानकांवर एकेक करून उतरले आणि शेवटी त्यांच्यापैकी एक जण चर्चगेटला उतरण्यासाठी माझ्या बरोबर राहिला. मी त्याच्या नजरेला नजर देण्याचा प्रयत्न करत होतो तर तो ती चुकवत होता.बहुतेक माझ्या सुक्या दमने घाबरला असावा. त्यातून एकटा राहिला होता ना! काही म्हणा कंपूमधे असताना सगळेच वाघ असतात पण एकेकटे असताना मात्र कुत्र्यासारखी शेपूट घातलेली असते. चर्चगेट स्थानकात गाडी शिरल्या शिरल्या त्या बेट्याने चालत्या गाडीतून उडी मारून सूंबाल्या केले.

मी त्या तशाच अवतारात कार्यालयात पोचलो. माझ्याकडे बघून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या.प्रश्नार्थक चेहरे बघून मी जरा स्थिरस्थावर झाल्यावर माझी राम(नव्हे 'मार')कहाणी सांगितली.ती ऐकतानाच दादा आणि चिंटूच्या चेहर्‍यावरचे रंग बदलत गेले आणि त्यांनी मला विचारले, "मालाडला किती वाजताची गाडी?उद्या आम्ही बरोबर टच करतो.एकेकाची फुल्टूच करून टाकतो"!
संतापाच्या भरात( अजूनही मी शांत झालेलो नव्हतो) मी त्यांना त्या विवक्षित वेळी भेटण्याचे कबूल केले आणि मग चहा पिऊन कामाला लागलो.

क्रमश:

1 टिप्पणी:

जयश्री म्हणाले...

आई गं... ! हे तर भयंकरच प्रकरण दिसतंय. आता तुमच्या दादा दोस्तांनी कसा घेतला बदला.....हे वाचायची उत्सुकता आहे :)