माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१५ मार्च, २००७

सामनावीर!

चेंडू-फळी(क्रिकेट) खेळला नाही असा मुंबईकर सापडणार नाही. निदान गल्ली क्रिकेट,गॅलरी-क्रिकेट अशा कुठल्या तरी प्रकारात बसणारे का होईना क्रिकेट खेळला नसेल तर तो अस्सल मुंबईकरच नव्हे अशी माझी मी माझ्यापुरती मुंबईकराची केलेली व्याख्या आहे. त्यामुळे मुंबई आणि क्रिकेट हे शब्द जणू एकमेकांना पूरक असेच आहेत असा मी निष्कर्ष काढून मोकळा झालोय! (आपल्याला कोण अडवणार असा निष्कर्ष काढायला? आपण आपल्या मनाचे राजे! काय मंडळी? बरोबर आहे की नाही?) असो. थोडक्यात काय तर क्रिकेट हा एक खेळ आहे आणि तो मी भरपूर खेळलोय हेच मला सांगायचेय!

आमच्या वाडीत खेळायला भरपूर जागा आणि मुलेही होती. तेव्हा क्रिकेट खेळणे ओघाने आलेच आणि आम्ही तिघे भाऊ (माझ्यापेक्षा एक मोठा आणि एक धाकटा) वाडीतल्या इतर मुलांबरोबर मनसोक्त खेळत असू. तसे आम्ही तिघेही चणीने लहानसेच होतो आणि तसे क्रिकेटच्या कोणत्याच अंगात (गोलंदाजी,फलंदाजी वगैरे) फारसे प्रवीण नव्हतो; पण खेळण्याची खुमखुमी जबरदस्त होती. त्यामुळे मिळेल ती भुमिका वठवायची तयारी असे.

मला जाड भिंगांचा चष्मा असल्यामुळे माझी खूपच पंचाईत होत असे. फलंदाजी करताना बहुतेकवेळा चेंडूचा फळीशी संपर्क साधला जात नसे. गोलंदाजाने टाकलेला चेंडू मला यष्टीरक्षकाच्या हातात गेल्यावरच दिसायचा अथवा त्रिफळा उध्वस्त झालेला दिसायचा! चूकून कधी चेंडू-फळीची गाठ पडलीच तर झेल तरी जायचा अथवा चेंडू तिथल्या तिथेच घुटमळायचा. बाकी चौकार-षटकार वगैरे क्षुल्लक गोष्टीत मी कधीच रस दाखवला नाही.

फलंदाजीत हा असा भीमपराक्रम तर गोलंदाजीबाबत तर बोलायलाच नको. अत्यंत हडकुळी शरीरयष्टी असल्यामुळे (यष्टीच्या जागी मला उभे केले असते तरी चालले असते!) माझ्या खांद्यात अजिबात जोर नव्हता. त्यामुळे टाकलेला चेंडू यष्ट्यांपर्यंत पोचेपर्यंत कधी दोन, कधी तीन टप्पे पडत आणि नंतर बहुधा फलंदाजाने चौकार अथवा षटकारात त्याचे रुपांतर केलेले दिसे. पण मुळातच हार न मानणे हा माझा स्थायीभाव असल्यामुळे मी अजून जीव तोडून (खरेच जीव तूटत असे हो! काय सांगू!) चेंडू टाकीत असे आणि समोर असलेला फलंदाज आता तरी बाद होणारच ह्या आशेने ’आऊट रे!’ हे पालूपद घोळवत असे.

नाही म्हणायला क्षेत्ररक्षण खूपच उजवे होते. मला साधारण फलंदाजाच्या आसपास क्षेत्ररक्षण करायला जमत असे. हे देखिल जाड-भिंगी चष्मा आणि कमकुवत खांदे ह्यामुळेच शक्य झाले. आता कसे म्हणून काय विचारता? दूर उभे केल्यास मला चेंडू माझ्यापर्यंत येईस्तो दिसत नसे आणि तो हातात घेऊन नेमका यष्टीरक्षक अथवा गोलंदाजाकडे फेकता येत नसे. म्हणून जवळच मी उभा राही. जवळचे नीट दिसत असल्यामुळे जमिनीलगतचे झेलही मी अतिशय सहजपणे घेत असे (असतात एखाद्यात गुण! त्याचे एव्हढे काय कौतुक?). तर 'असे हे' माझे क्रिकेटजीवन सुरू होते.

हळूहळू मी वयाने आणि अंगाने वाढत होतो. नियमित खेळून आम्हा तिघा भावंडांचा खेळ बर्‍यापैकी सुधारला होता. माझ्या फलंदाजीत फारशी सुधारणा जरी झाली नव्हती तरी गोलंदाजी करताना चेंडू चक्क एक टप पडून फलंदाजापाशी पोचायला लागला होता. बहुतेकवेळा तो मधल्या यष्टीच्या दिशेने जात असे आणि अधनं-मधनं एखादा फलंदाज माझ्या मेहनतीवर खूष होऊन आपला आपण त्रिफळाचीत होऊन बाद होत असे.

अशातच एकदा आमच्या चाळीच्या मालकांच्या मुलांनी दुसर्‍या वाडीशी सामना ठरवला. त्यात ते चार भाऊ+ अजून तीन दुसरे बंधू आणि त्यांचा एक मित्र असे आठजण आणि आम्ही तिघे बंधू असे मिळून संघ बनला. हे इतर आठजण आम्हा भावांपेक्षा वयाने चांगलेच मोठे होते आणि नोकरी-धंद्यात स्थिरावलेले होते. माझा मोठा भाऊ नुकताच नोकरीला लागला होता आणि त्याने पहिल्या पगारातून क्रिकेटचे साहित्य (यष्ट्या,बॅट वगैरे) आणलेले होते. आम्ही हे साहित्य घेऊन आमच्या शाळेच्या मैदानावर जाऊन खेळत असू. ह्या सर्व साहित्यामुळेच आमचा संघात समावेश झाला होता (हे खाजगी आहे. कुठे बोलू नका!)

तर एका रविवारी सकाळी आठ वाजता आमचे दोन्ही संघ मैदानात एकमेकासमोर उभे ठाकले. ओलीसुकी आमच्या कर्णधाराने जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेतली. ८३ धावा करून आमचा संघ बाद झाला. त्यात माझ्या मोठ्या आणि धाकट्या भावाचा ५ आणि ३ धावा असा सहभाग होता आणि मी सर्वात शेवटी एक धाव काढून (ही एक धाव मला शतकापेक्षाही मोलाची वाटते) धावबाद झालो.

त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी सुरू झाली. त्यांनी तर मोठ्या धडाक्यात सुरुवात केली. बिनबाद ३८ अशी त्यांची झंझावाती सुरुवात बघूनच आमच्या कर्णधाराला काहीच सुचेनासे झाले. आतापर्यंत त्याने वापरलेले त्याचे खास गोलंदाज कोणताच प्रभाव पाडू शकले नाहीत त्यामुळे आता गोलंदाजी कुणाला द्यायची ह्या चिंतेत तो पडला होता. बरं, ह्या आधी आमच्या ह्या मोठ्या खेळाडूनी प्रतिस्पर्ध्याचे झेल टाकण्याची स्पर्धाच लावली होती. त्यामुळे खरे तर गोलंदाजांचा दोष नव्हता; पण हे त्या मोठ्यांना सांगणार कोण? मी आपला मनातल्या मनात मांडे खात होतो. ’माझ्या हातात चेंडू येऊ दे मग बघतो एकेकाला!’
पण माझ्या सारख्या चिल्लर खेळाडूकडे कर्णधार बघतसुध्दा नव्हता. मग आता कसे होणार आमचे? आम्ही हरणार हे तर दिसतच होते.

मी आपली कर्णधाराकडे भूणभूण सुरु केली, मला द्या ना एक दोन षटकं! बघा बळी मिळवतो की नाही!
पण एक नाही आणि दोन नाही. प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या बिनबाद ४९ झाली तशी कर्णधाराचे सगळे अवसान गळाले आणि माझ्या भूणभूणीला यश आले. मोठ्या नाराजीने त्याने चेंडू माझ्याकडे सोपवला.
फक्त एकच षटक बरं का! असे वर म्हणाला.
एक तर एक! मिळाले ना! म्हणून मी खूष!

मी गोलंदाजी करण्याअगोदर कर्णधाराला क्षेत्ररक्षणात काही बदल करायला सुचवला तर माझ्यावरच तापला.
स्वत:ला काय बापू नाडकर्णी की बिशनसिंग बेदी समजतोस? चल चूपचाप गोलंदाजी कर! काय मोठे दिवे लावणार आहेस माहित आहे!
काय करणार? चूपचाप गोलंदाजीसाठी पवित्रा घेतला. जेमतेम ५-६ पावलांच्या चालीनंतर मी पहिलाच चेंडू टाकला तो सरळ फलंदाजाच्या बॅटवरच! तो तर काय मस्तीतच होता. दाणपट्ट्यासारखी त्याने बॅट हवेत फिरवली आणि चेंडूला सीमापार पाठवले. मी कर्णधाराकडे बघायचे टाळले. दुसर्‍या चेंडूवर षटकार!!

कर्णधार माझ्याकडे धावत आला. खाऊ की गिळू अशी त्याची चर्या होती. बहुधा पुढच्या चार चेंडूतच सामन्याचा निकाल लागणार हे सर्वांनीच ताडले आणि मी पुन्हा गोलंदाजीसाठी पवित्रा घेतला. पुढचा चेंडू मी अगदी व्यवस्थितपणे मधल्या यष्टीवर टाकला. फलंदाजाने सरसावत पुढे येत सणसणीत फटका मारला आणि सगळ्यांच्या नजरा सीमारेषेवर खिळल्या; पण चेंडू कुठेच दिसेना. मी डोकं धरून खालीच बसलो. आणि एकच गलका झाला! माझ्या पाठीवर जोरजोरात थापट्या पडल्या आणि मग मला कळले की फलंदाजाच्या बॅटमधून चेंडू हुकला होता आणि त्याचा त्रिफळा उडाला होता. माझाच माझ्या त्या 'करणी'वर विश्वास बसत नव्हता पण ते वास्तव होते आणि मग इतरांच्या बरोबर मी देखिल थोडेसे नाचून घेतले.

एक बाद ५९! दुसरा खेळाडू आला. मी चौथा चेंडू टाकला. त्याने सावधपणे खेळून एक धाव घेतली. एक प्रयोग म्हणून मी कर्णधाराला एक खेळाडू फलंदाजाच्या उजवीकडे अगदी समोर(सिली-मीड-ऑफ) उभा करायला विनंती केली आणि ती चक्क त्याने मानली!! मी पाचवा चेंडू त्याच्या उजव्या यष्टीवर टाकला आणि फलंदाजाने तो तटवायचा प्रयत्न केला. माझा अंदाज अचूक ठरला आणि समोर उभ्या केलेल्या खेळाडूच्या हातात अगदी अलगदपणे जाऊन चेंडू विसावला. पुन्हा आरडा-ओरडा, आनंद व्यक्त करणे वगैरे झाले आणि कर्णधाराने येऊन मला उचलून खांद्यावर घेतले.

मी सहावा चेंडू टाकण्या साठी सज्ज झालो होतो आणि मला जरा अजून एक प्रयोग करावासा वाटला. फलंदाजाच्या उजवीकडे आणि डावीकडे अगदी जवळ (सिली-मीड-ऑफ आणि सिली-मीड-ऑन) असे दोन खेळाडू उभे केले . आता माझ्या सगळ्या सुचना कर्णधार हसत हसत मान्य करत होता. फलंदाजावरचे दडपण अजून वाढवण्यासाठी यष्टीरक्षकाला बोलावून त्याच्याशी गुफ्तगूचे नाटक केले. ह्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि माझ्या सहाव्या चेंडूवर फलंदाज त्रिफळाचित झाला. बिनबाद ५९ वरून ३ बाद
६०! जणू काही सामना जिंकला अशा आविर्भावात आमच्या खेळाडूंनी मला डोक्यावरच घेतले.

माझा हा पराक्रम बघून दुसर्‍या बाजूने गोलंदाजी करणार्‍याला पण जोर आला आणि त्याने त्याच्या षटकात ५ धावांच्या बदल्यात दोन बळी घेऊन प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली. ५ बाद ६५.
आता आमच्या कर्णधाराला देखिल जोर चढला. माझ्या पुढच्या षटकासाठी(एक षटकाच्या बोलीवर दिलेली गोलंदाजी पुढेही जारी ठेवली. म्हणतात ना, खुदा मेहेरबान तो गधा पेहेलवान!!!!! अशी माझी स्थिती होती.) त्याने सगळ्या खेळाडूंना फलंदाजाच्या अंगावर घातले. चारी बाजूने वेढलेला फलंदाज म्हणजे जणू काही पिंजर्‍यात अडकलेला पोपट अशी अवस्था करून टाकली. त्याचा परिणाम असा झाला की भितीनेच तीन फलंदाज एकाही धावेची भर न घालता माझ्या त्या षटकात बाजूच्या क्षेत्ररक्षकांकडे झेल देऊन तंबूत परतले. ८ बाद ६५.

राहिलेले काम दुसर्‍या गोलंदाजाने पूर्ण केले. त्याबदल्यात ३ धावा दिल्या आणि ६८ ह्या धावसंख्येवर आम्ही प्रतिस्पर्ध्याला चीत केले. माझ्या गोलंदाजीचे पृथ्थकरण होते... २ षटकं, १ निर्धाव, ११ धावा आणि सहा बळी!!!!!!!!! मंडळी आजवरचा माझा खेळ बघता माझ्यासाठीच हे सगळे स्वप्नवतच होते; पण तितकेच ढळढळीत सत्य होते. त्यानंतर दोन दिवस मी तर हवेतच तरंगत होतो.

आमच्या विजयाप्रित्यर्थ आमच्या कर्णधाराने मग आम्हाला उपहारगृहात नेऊन यथेच्छ खाऊ घातले. माझे तर विशेष कौतुक होत होते.
ह्याला आधीच गोलंदाजी द्यायला हवी होती! असे दहादा तरी बोलून दाखवले असेल. नंतर मला त्याने स्वत:च्या खांद्यावर बसवून वाडीभर मिरवणूक काढली होती.

(ह्या भांडवलावर मला निदान रणजीसाठी मुंबईच्या संघात जागा द्यायला हवी होती की नाही????
पण सगळीकडे वशिलेबाजी हो! जाऊ दे झालं! पुढची गोष्ट सांगेन पुन्हा केव्हा तरी!)

५ टिप्पण्या:

Prasad Chaphekar म्हणाले...

मस्त! ना.धों. ताम्हनकरांच्या "गोट्या"ची आठवण झली एकदम हे वाचून!! लगे रहो!

कोहम म्हणाले...

farach chaan....

TheKing म्हणाले...

इतके प्रतिभावंत खेळाडू असताना भारतीय क्रिकेट महासंघाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे म्हणजे ऑस्ट्रेलियाने वॉर्नला तेरावा खेळाडू म्हणून बसवण्यासारखेच झाले. :-)

पुढच्या लेखाची वाट पाहतो आहे!

Ojas म्हणाले...

तू मला भूतकाळाची सहल घडवलीस! मस्तच लेख!

जयश्री म्हणाले...

अरे वा....क्या बात है! म्हणजे आमच्या ओळखीत असे Great Players आहेत म्हणायचे :)
लेखन एकदम जबरी झालंय आणि निरागस सुद्धा. तुमची लेखणी अशीच फ़ुलत राहो.